पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आजगावकर सरांबद्दल मी शिक्षक होईपर्यंत जी माहिती होती ती एक कठोर, शिस्तप्रिय संस्थाचालक, ध्येयवादी शिक्षक म्हणून; पण मी शिक्षक व्हायचं ठरवलं नि अनपेक्षितपणे मला त्यांच्या शाळेतच नोकरी मिळाली. उत्तूरच्या आंतरभारती शिक्षण मंडळातर्फे भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथे एक हायस्कूल चालविण्यास घेण्यात आलं होतं. त्यांना चांगल्या शिक्षकांची गरज होती म्हणून मला कोल्हापूरच्या आंतरभारतीतर्फे तिकडे पाठविण्यात आलं होतं. आजगावकर सर संस्थाचालक व मी शिक्षक असं औपचारिक नातं असलं तरी ते फार दिवस तसं राहिलं नाही. मला आठवतं त्याप्रमाणे पहिल्या दिवशीच ते गळून पडलं, एक शहरातला तरुण, भांबावलेला शिक्षक खेड्यात आल्यावर त्याला त्यांनी ज्या पद्धतीनं समजावलं, सावरलं ती होती त्यांच्यातील मातृमयी पित्याची खूण. मला त्यांच्या मेसमध्ये घेऊन गेले होते. रात्री शाळेची जबाबदारी त्यांनी समजावून सांगितली होती. त्यात काळजी भरलेली होती. बबन ठाकूरना माझ्या सोबतीला देऊन त्यांनी केलेलं मार्गदर्शन - ते नुसतं गावाची वाट दाखविणारं नव्हतं. त्या मार्गदर्शनानं माझं जीवन निश्चित केलं. माझी वाट निश्चित केली.
 पिंपळगाव, उत्तूरच्या निरंतर संपर्कातून मला जे आजगावकर सर समजले ते इतरांपेक्षा वेगळे होते. माझे अन्य सहकारी त्यांना घाबरायचे. मला त्यांची कधी भीती वाटली नाही. आपल्या सहका-यांनी आपल्याप्रमाणेच त्यागी, ध्येयवादी असावं अशी त्यांची अपेक्षा होती. सहकारी नोकरीस आलेले. ते प्रामाणिक होते; पण त्यांच्या मर्यादा होत्या. इतरजण सरांना घाबरायचे ते त्यांच्या नि सरांच्या ध्येयवादातील दरीमुळे. सर सहका-यांना सुनवायचे. अत्याधिक अपेक्षांच्या शिखरापुढे सुमार व्यवहारी कसे टिकणार? त्यामुळे सरांची एक अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली होती की त्यामुळे त्यांच्यापर्यंत, त्यांच्यापुढे सहसा कुणी जात नसे. त्यावेळी सर अविवाहित होते. घर होतं; पण ब-याचदा अंधारखोलीतील त्यांचं एकटं राहणं बरंच बोलकं असायचं. बाजारी दुनियेत ते वाट चुकलेले असायचे. सरांच्या विचारातील जग साने गुरुजी, महात्मा गांधी, एस. एम. जोशी यांनी भरलेलं असायचं. झोकून देऊन कार्य करायची झिंग असलेल्या या माणसापुढे नोकरदार शिक्षक त्यांना क्लेशकारी वाटायचे. असंवाद, असंपर्क ही त्यांची परिणती; पण हा तोकडेपणा लोकांचा. सर त्याचे प्रायश्चित्त मूक, स्थितप्रज्ञ होऊन भोगत राहायचे.

 उत्तूर, चिमणे, पिंपळगाव येथील शाळा, शिक्षक, विद्यार्थी असा मोठा शैक्षणिक पसारा सरांनी उभा केला. त्यामागे समाजातील तळागाळातील मुलांना शिकविण्याची तळमळ होती; पण गरजा व साधनांचं विषम गणित

माझे सांगाती/१२