पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदर्श समाजशिक्षक : अनंतराव आजगावकर

 अनंतराव आजगावकरांना मी आठवीत शिकत असल्यापासून पाहत आलो आहे. काही माणसं आयुष्यभर आतून-बाहेरून आहे तशी कशी राहू शकतात, याचं आश्चर्यमिश्रित गूढ म्हणून मी सतत आजगावकर सरांना न्याहाळत आलो आहे. त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातील जो आदर आहे, त्यामागचे गूढ अजूनही मला उमगले नसले तरी तो आदर रोज वाढतो आहे खरा! मी कोल्हापूरच्या आंतरभारती विद्यालयात शिकत होतो. सन १९६३ ची गोष्ट असावी. त्या वेळी आमच्या शाळेत राष्ट्र सेवा दल, समाजवादी पक्ष, सर्वोदय अशा विविध संघटनांचे कार्यकर्ते येत राहायचे. तो काळ स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या तपाचा होता. गांधीवादी साधेपणा, ध्येयवाद, प्रखर राष्ट्रनिष्ठा यांची विलक्षण मोहिनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या तत्कालीन तरुण पिढीवर असल्याचं जाणवायचं. ही पिढी आता प्रौढ होऊन आमच्यासमोर वावरत होती. त्यांचे खादीचे कपडे, वक्तशीरपणा, शिस्त, सभ्यता व ऋजुता या गोष्टींची विलक्षण मोहिनी आमच्यावर होती. आजगावकर सर याच पठडीतले. ते उत्तूरहून आमच्या शाळेत येत राहायचे. डोक्यावर बारीक केस, सडपातळ देहयष्टी, खादीचा झब्बा, विजार, खांद्यावर शबनम, पायी साध्या चपला अशी असलेली त्यांची बाह्य ओळख आजही तशीच आहे. सभा-समारंभात मागे, संकोचून बसलेले सर, ते नेहमी अबोल असायचे. सभेत लक्षपूर्वक ऐकण्याचा त्यांचा प्रघात. तशी त्यांची मूळ वृत्ती थट्टामस्करी करण्याची नसली तरी समवयस्कांत त्यांची खुललेली कळी मी अनेकदा अनुभवली आहे.

माझे सांगाती/११