पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण दुसरें.
---------------
नीतिगर्भ शब्द.

 मनुष्य प्राण्याचा चांगल्याकडे कल आहे काय? त्याला चांगले आवडते काय ? चांगल्याविषयी त्याच्या मनांत पूज्यबुद्धि आहे काय? लोकांनी चांगले केले तर त्याला संतोष होतो काय ? त्याचे अंत:करण पवित्र आहे काय ? ह्या प्रश्नांचा उलगडा करावयास आपणास फार लांब जाणे नलगे. त्याच्या भाषेतील शब्दांचे अवलोकन केले म्हणजे पुरे आहे. चांगल्याची प्रशंसा करणारे, चांगल्याविषयी आवड आणि पूज्यबुद्धि दाखविणारे शब्द भाषेमध्ये पुष्कळ असतात. आणि मनुष्य प्राणी जात्या चांगला आहे, हा सिद्धांत स्वीकारल्याविना वरच्या प्रकारचे शब्द भाषेमध्ये कसे आले, ह्याचा उलगडा पडावयाचा नाहीं. शब्दांची गरज नसतां शब्द कधीं उत्पन्न होऊ शकत नाहींत. जी वस्तु आपण कधी पाहिली नाहीं, किंवा ऐकिली नाहीं, तिचा वाचक शब्द भाषेमध्ये कधी असावयाचा नाहीं; आगगाड्या, तारायंत्रे वगैरे अर्वाचीन काळच्या कलांचे वाचक शब्द प्राचीन भाषांमध्ये आढळणे अशक्य आहे; अज्ञात वस्तूंचे वाचक शब्द अस्तित्वात येणे अशक्य आहे. यावरून असे म्हणायास पाहिजे की, ज्या वस्तूंचे वाचक शब्द भाषेमध्ये आहेत, त्या वस्तु ती भाषा बोलणाऱ्या लोकांस खचित ठाऊक होत्या. आणि वर निर्दिष्ट केलेल्या प्रकारचे चांगल्याविषयी आदर, आवड वगैरे दाखविणारे शब्द जर भाषेमध्ये असतात तर मनुष्य प्राणी हा जात्या चांगला आहे, असे म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. परंतु ह्या प्रश्नाची दुसरी बाजूही मनांत आणली पाहिजे.