पान:देशी हुन्नर.pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना.

 देशी हुन्नरावर इंग्रजी भाषेत बरीच पुस्तके आहेत. पुष्कळ वर्तमानपत्रांतून व मासिक पुस्तकांतूनही या विषयावर नेहमी निबंध छापून येत असतात. तरी एकाच ठिकाणी मिळेल तितकी माहिती गोळा करून स्वतंत्र ग्रंथ छापण्याची अवश्यकता होती. ती बाबू त्रैलोक्यनाथ मुकरजी इंडियासरकारच्या हपिसांतील प्रदर्शन शाखेचे माजी मुख्य कामदार यानी पुरी केली व "आर्टम्यानुफॅकचर्स ऑफ इंडिया" या नांवाचा गुदस्त साली माझ्या व इतर कामदाराच्या मदतीने इंग्रजीत एक ग्रंथ छापिला आहे. या इंग्रजी पुस्तकाच्या धरतीवर मराठीभाषेत एक स्वतंत्र ग्रंथ प्रसिद्ध करण्याची इच्छा प्रथम माझे मित्र माधवराव बल्लाळ नामजोशी यांस झाली. त्यांच्या सुचनेवरून, मीं हें पुस्तक स्वभाषेत लिहिलें. त्यांत, आज सुमारे चौदा वर्षे सर्व संग्रहालयांची व प्रदर्शनांची कामें करीत असताना कलकत्त्यापासून लंडन शहरापर्यंत फिरून जी काही माहिती मला मिळाली तिचा उपयोग केलेला आहे. व स्वतःच्या अनुभवास आलेल्या बऱ्याच गोष्टी येथे दाखल केल्या आहेत. हा ग्रंथ महाराष्ट्रभाषाभिज्ञ वाचकांस पसंत पडला तर तो रचविण्याचें, छापविण्याचें, व प्रसिद्ध करण्याचें सर्व यश रावसाहेब नामजोशी यांचे आहे. व कोणाही नवीन उद्योग करणारांस या पुस्तकाचा उपयोग झाल्यास त्यांनी त्यांचेच आभार मानावें,हें रास्त आहे.

ग्रंथकार.