पान:देशी हुन्नर.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १३ ]
ताबूत वगैरे काम.

 देशांतील हवापाणी, लोकांचे आचारविचार व त्यांजमधील चालीरीति यांचा त्या देशांतील कारागिरी कसबावर केवढा जबरदस्त अम्मल असतो, हें स्पष्टपणें समजण्यासाठीं एखादें ठळक उदाहरण पाहिजे असल्यास ब्रह्मी लोकांत किंवा आपलेंकडील मुसलमान लोकांत मेलेल्यांचे स्मरण राखण्यासाठी ताबूत करण्याची जी चाल आहे तिचें होय. ज्यानीं ज्यानीं पुणें येथील कित्येक ताबुतांचे किंवा ब्रह्मदेशांतील तिरड्यांचे काम पाहिलें आहे ते खचित असें ह्मणतील कीं, काड्यामोत्यासारख्या भिकार जिनसांस सुद्धां ताबूत व तिरड्या बांधणारे लोक इतकी शोभा आणतात त्यापेक्षां त्यांचे कसब अजब म्हटलें पाहिजे. ही औटघटकेच्या मनोरम इमारती बांधण्याची कला कसबामुळे इतक्या श्रेष्ठत्वास जाऊन पोंचली आहे कीं तिची गणना आलीकडे ललितकलांत होऊं लागली आहे. ब्रह्मदेशांतील तिरड्यांसाठीं जीं मखरें बांधितात त्याचें टिलीसाहेबांनी वर्णन केलें आहे, त्यावरून असें समजते कीं हीं मखरें कधीं कधीं ७० पासून ८० फूट उंच असतात व त्यांजवर सात मजले केलेले असतात. लांकडाच्या खांबावर बांबूच्या ताट्याचें छत करून त्याच्यावर कागद चिकटवून त्या कागदांवर तऱ्हेतऱ्हेचीं चित्रें कातरतात. असें बारीक व रंगाचें काम करण्याकरितां शेंकडो रुपये खर्च करून अखेरीस तें सर्व प्रेताबरोबर जाळून टाकतात.

मुखवटे.

 वरील तऱ्हेंचे, कसबाच्या दृष्टीनें कांहीसें महत्वाचें दुसरे काम म्हटलें म्हणजे मुखवट्याचे होय. चित्रविचित्र रंगविलेले व वेडेवांकडे आकाराचे मुखवटे घालून हिंडणारीं अडाणी जातांचीं पाेरें शिमग्याचे सणांत या प्रांती दृष्टीस पडतात. तसेंच तागडधोम नाटकांत गणपतीच्या सोंडेचा मुखवटा वगैरे ज्याप्रमाणें मासले आपलेकडे दृष्टीस पडतात त्याप्रमाणें ब्रह्मदेशांत राक्षसांचे वगैरे वेडेवांकडे चेहेरे दाखविण्याकरितां तोंडाला लावण्याचे कागदाचे मुखवटे केलेले असतात. लांकडाचा सांचा कोरुन त्याजवर खर्ची कागदाचे सात किंवा आठ थर देऊन ते सुकले ह्मणजे काढून घेऊन त्यांस रंग देतात. कधी कधी बांबूच्या चिंभांचे तोंड करून त्याजवर शेणमातीचे कान, नाक, ओंठ चिकटवून त्याजवर कागद मारून नंतर ते रंगवितात. असले चित्रविचित्र मुखवटे करण्याच्या कामांत ब्र-