पान:देशी हुन्नर.pdf/121

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ११५ ]

असतात. ही जर गोष्ट खरी आहे तर लंकेस विकण्याकरितां कांचेचे मणी पाठविणाऱ्या आह्मां पाश्चिमात्यांच्या धंद्या पेक्षां या लोकांचा धंदा विशेष भूषणार्ह आहे, कारण हे लोक ज्यास स्फटिक ह्मणतात तो खरोखरी स्फटिक असतो, कांचेचा गोळा नसतो. इतकेंच नाही तर तो कधीं कधीं मौल्यवान रत्नाप्रमाणें चमकतोही. ब्रोच हा इंग्रजी शब्द हिंदुस्थानांत स्फटिक सांपडत होते याचा वाचक आहे, परंतु ही गोष्ट खरी नाहीं. हा शब्द फ्रेंच भाषेतील ब्राची ह्मणजे सळइ किंवा शलाका या शब्दापासून झालेला आहे. भडोच या शब्दापासून झालेला नाहीं. पुष्कळांचें असें ह्मणणें आहे कीं गुजराथेंतील भडोच हें गांव पूर्वी बॉरिगाझा या नावानें प्रसिद्ध होतें, व तेथील अकीकांपासूनच ग्रीक लोकांचे व रोमन लोकांत प्रसिद्ध असलेले स्फटिकाचे प्याले तयार झाले असावे.

 तांबड्या रंगाच्या अकीकाच्या एका प्याल्याची रोमन सरदार नीरो यानें ५५५१२५ रुपये किंमत दिली होती. हा प्याला मुंबई शहरांत आजरोजीं मिळत असलेल्या अकीकाच्या प्याल्यापासून भिन्न असावा असें आह्मांस वाटत नाहीं.

 हे मुंबईतील प्याले खंबायतेकडून आलेले असतात. खंबायतेस सुऱ्याच्या मुठी, कागद कापावयाच्या सुऱ्या, कागदावर ठेवावयाचीं वजनें, येशू ख्रिस्ताचे खुरुस, मडमाच्या गळ्यांतील ब्रोच, स्फटिकाच्या माळा, आंगठ्या, चहाचे प्याले व बशा, आणि इतर पुष्कळ पदार्थ तयार होतात. हे अकीक राजपिंपळा संस्थानांतील रतनपूर येथील खाणींत सांपडतात. त्याजबद्दल मेहेरबान क्यांबेल साहेब यांनीं आपल्या 'मुंबई ग्याझेटियर ' नांवाच्या ग्रंथमालेत दिलेल्या वर्णनांतून खालीं दिलेली माहिती घेतली आहे.

 "हे दगड रतनपूर किंवा रत्नपूर ह्मणजे रत्नाचें नगर या गांवापासून साठेकरी आणतो. खाणींत सांपडलेल्या दगडाचे दोन भाग करितात. एक भाजावयाचा व दुसरा भाजल्याशिवाय ठेवावयाचा. तीन जातीचे दगड भाजीत नाहींत. एकास “मोरा” किंवा “बवा चोरी" ह्मणतात. दुसऱ्यास " चशमदार” किंवा “डोळा" ह्मणतात. आणि तिसऱ्यास "रोरी" किंवा " लसण्या " ह्मणतात. प्रत्येक दगड वजनानें बहुत करून एक रतलापेक्षां जास्ती नसतो. परंतु त्याचा अमुकच आकार असतो असें नाही. हे तीन जातीचे दगड खेरीजकरून रत्नपुराच्या खाणींत सांपडणारे सर्व प्रकारचे दगड त्याचा रंग जास्ती खुलण्याकरितां भाजावे लागतात.