पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांनी चक्क तीस शिलालेख उजेडात आणले. शिलालेख संरक्षण नि वाचनाची नवी पद्धत रूढ केली. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील शिलालेखाद्वारे चोल राजाची स्वारी प्रकाशात आणली. त्यांच्या कार्याच्या आधारे डॉ. रत्तींसारख्या महारथींनी इंग्रजीत ग्रंथ लिहिला. तो धारवाड विद्यापीठाने प्रकाशित करून विश्वमान्यता दिली. आज अ.ब.क. यांच्याकडे असे ऐतिहासिक दस्तावेज आहेत की त्यांचा अभ्यास करायला विद्यापीठीय नि पुस्तकी संशोधकांना सात जन्म वेचावे लागतील.
 अ.ब.क, यांचे घर म्हणजे अजायबघरच! ते एक-एक चीजा काढून दाखवितात. तेव्हा माझ्यासारख्याची अबब म्हणत बोबडी वळते. शेणवी, सारस्वत समाज नि शिवाजी महाराज, करवीर गॅझेट दुरुस्तीच्या महायज्ञाचा प्रारंभ, जे. पी. नाईक प्रभृतींसारख्या महनीय व्यक्तींच्या जीवनप्रसंगांची दुर्मीळ छायाचित्रे, अनेक दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखिते यांच्या पसाऱ्यात सतत हरविणारे अ.ब.क. म्हणजे खरे करवीरभूषण! येत्या ३१ जुलैला त्यांच्या वयास ८० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांना लाभलेल्या सहस्रचंद्रदर्शन योगाबद्दल त्यांचे बुके देऊन अभिष्टचिंतन करणे मात्र उपचार होईल. त्यांना चिंता आहे आपल्याकडील बुकांचं, साधनांचं काय करायचं? करवीर नगर वाचन मंदिर, शिवाजी विद्यापीठसारख्या संस्थांनी पुढे येऊन त्यांची चिंता दूर करावी. त्यांनी जपलेल्या चिजांचं चीज व्हावं, अन्यथा कोल्हापूरकरांना आपल्या इतिहासाचा प्रारंभ परत अ ब क नी करावा लागेल.

***

जाणिवांची आरास/७४