पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अ.ब.क.

 वाचन, व्यासंग, संशोधनाच्या कोल्हापूरच्या परिघात अ.ब.क. या संक्षिप्त परंतु संपूर्णतेने परिचित एक गृहस्थ आहेत. अनंत बळवंत करवीरकर त्यांचे नाव. ते सध्या येथील विजापूरकरांच्या एका खासगी कंपनीत हिशेबाच्या वह्या लिहिण्याचे, ऐतिहासिक भाषेत सांगायचे तर खर्डेघाशीचे काम करतात. आयुष्याची सुरुवात ५० रुपये वेतनावर करणारे हे सद्गृहस्थ आज ८० वर्षे पूर्ण करताना मासिक फक्त २००० रुपये कमावतात. सन १९४९ मध्ये इंटर आर्ट्स पास झालेले करवीरकर आजऱ्याहून कोल्हापुरात शिक्षणासाठी येतात. शाळेत मोरेश्वर हुजूर बाजार, सलगर, बाद्रायणी, गिरीधर पंडितांसारख्या शाळकरी मित्रांशी त्यांची गट्टी जमते. ही सारी मुलं वाचणारी. करवीरकरांनाही वाचनाचा छंद जडतो. त्याचं व्यसनात रूपांतर कधी झालं ते त्यांना कळलंसुद्धा नाही!
 प्रापंचिक उलाढालीत पोटची मुलं करतीसवरती झाली. एक मुलगा पुरातत्त्व विभागात नोकरी करू लागला. वस्तुसंग्रहालयातील नोकरी त्यानं अधिक चांगली करावी म्हणून करवीरकरांनी आपल्या मुलास ऐतिहासिक साधनांचा अभ्यास शिकवायला सुरुवात केली. मुलाचा अभ्यास काही पुढे सरकला नाही. बेटे से बाप सवाई झाला. त्या वेळी इतिहासकार ग. ह. खरे निवर्तले नि महाराष्ट्राच्या इतिहास क्षेत्रात शिलालेखाचा अभ्यास ठप्प झाला. करवीरकरांनी शिलालेखाचे अ ब क सुरू केले. तेही पदरमोड करून, त्यांना प्राध्यापकांसारखे विद्यापीठ अनुदान आयोगाचे कधी गलेलठ्ठ अनुदान मिळाले नाही. प्राध्यापकांसारखी अंशकालीन नोकरीसाठी पूर्णकालीन पगारही कधी लाभला नाही. विद्यापीठाची ग्रंथालय सुविधा नाही. तरी

जाणिवांची आरास/७३