पान:गांव-गाडा.pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८
गांव-गाडा.

 गांवाचें त्या गांवाशीं वांकडे नसलें तर नशीब समजावयाचें. "गांवचा बळी गांवींच बळी पऱ्या गांवीं गाढवें वळी ” ह्या म्हणीवरून गांवगांवचे लोक परगांवच्या लोकांशीं कसे वागत ह्याचा उलगडा होतो. जें तें गांव आपल्यापुरतें पाही. अनेक गांवें किंवा सबंध प्रांत ह्यांचें लोकोपयोगी कामांत सहकार्य पाहण्याचा सुयोग विरळ. उलट परदेशस्थांना असें अनेक वेळीं दिसून येई कीं, एखाद्या गांवाच्या सुड्या जळाल्या, तर आसपासचीं गांवें आपलें धान्य त्यांना न विकतां दाबून धरीत; आणि शेजारच्या गांवावर आपआपल्या शेतांनीं नांगर कुळव हांकीत. राजकीय विभागांसंबंधानें गांवचा हात महालाला, महालाचा सुभ्याला आणि सुभ्याचा राज्याला लागला तरी तो पुण्याहवाचनापुरताच. एकमेकांनीं एकमेकांला कडकडून कवटाळलें व ओढून घेतलें आणि चिरकालीन विस्तृत सार्वजनिक हितसंबंध निर्माण केले असें क्वचित झालें. ह्यामुळे एक राज्य जाऊन दुसरें आलें म्हणून गांवच्या दिनचर्येत दिसण्याजोगा बदल झाला, किंवा गांवकरी गांवकीपलीकडच्या विचारांत निमग्न झाले, असें बहुधा होत नसे. ज्याप्रमाणें अनेक पिढ्या वरून आल्या व गेल्या तरी उंबरा आपल्या ठिकाणच्या ठिकाणींच, त्याप्रमाणें राज्यांच्या अनेक तऱ्हा व उलथापालथी झाल्या, तरी गांवगाड्यानें आपलें ठिकाण सोडलें नाहीं. त्याचे गुणावगुण कांहीं असले तरी हें कबूल केलें पाहिजे कीं, गांवगाडा हा राज्यव्यवस्थेचा आदि घटक, आणि अनेकविध धर्मव्यवस्था व समाजव्यवस्था ह्यांचा प्रधान घटक अनेक शतकें होऊन बसला आहे; आणि आजला सुद्धां त्याची ही पदवी कायम आहे. कारण हिंदीस्तान हा शह-


 १ पूर्वकालीन शेजार वैराचे स्मारक म्हणून नगर जिल्ह्यातल्या कोपरगांव तालुक्यांतील संवत्सर व कोकमठाण या दोन गांवांतल्या लोकांमध्यें अद्याप दरसाल अक्षय्य तृतीयेस गोफणधोंड्याची लढाई होते, व कांहीं डोकीं फुटतात. अशी लढाई न केली तर पीक जातें, असें तेथील लोक मानतात म्हणून ते राजीखुशीने लढतात. हत्यारे होती तेंव्हा ते हत्यारांनी लढत असत.