पान:गांव-गाडा.pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भरित.
१७

जागा ग्रामाभिमानाने पटकावली व तोही पुढे वतनलोभांत लय पावला. आतांप्रमाणे प्रवाससौकर्य, व्यापारविस्तार, आणि नियमबद्ध कारभार व तो चालण्यास जरूर तें राजबल ह्यांचा भरपूर आश्रय नसल्यामुळे आपापले उद्योगधंदे आणि प्रपंचाचे नित्य व्यवहार अव्याहत चालूं ठेवण्यासाठी खेड्यांना स्वयंपूर्ण व स्वावलंबी होणें अवश्य झालें. हमेषचा सर्व प्रकारचा व्यवहार गांव आपल्या अखत्यारीवर करी, आणि राजाधिकारी किंवा धर्माधिकारी त्यांत क्वचित् चित्त घालीत. जीवित किंवा वित्त संरक्षण करण्याच्या कामी शिवभावांचे किंवा राजाधिकाऱ्यांचे वेळेवर सहाय्य मिळेलच असा भरंवसा नव्हता. त्यामुळे गांवावर जी धोंड येई तिचे ओझें सर्व गांवानें समाईक उचलण्याखेरीज गत्यंतर नव्हते. ज्या गांवाला बाजार नसतो, किंवा असूनही वेळेवर सौदा मिळण्याचा संभव नसतो तेथले धोरणी संसारिक जसे सवडीनुसार हरएक वाण संपादन करून लावून ठेवतात आणि वेळेवर काढतात; त्याप्रमाणे गांवगाड्याच्या योगक्षेमासाठी जरूर ते राजाधिकारी, धर्माधिकारी, ग्रामरक्षक, हुन्नरी, मजूर, मनोरंजन करणारे, त्यानें आपले संग्रहास वंशपरंपरेनें ठेवले. खरे पाहूं गेलें तर प्रत्येक गांव हा एक तुटक जनसमाज किंवा स्वतंत्र राज्यच झालें, आणि राज्यांतील इतर विभागांशी त्याचा इतका कमी संबंध येत होता की, तो असून नसल्यासारखा होता. सिंधप्रांतीं गांव वसविणाऱ्या घराण्यांना समुच्चयाने राज ( राज्य ) म्हणतात. ही गोष्ट वरील विधानाच्या प्रत्यंतरादाखल लक्षांत घेण्याजोगी आहे. सबंध काळी-पांढरीची सामाजिक व राजकीय जबाबदारी गांवाने सर्व मिळून घ्यावी, होतां होईल तोपर्यंत त्याला कोणत्याही कारणाने परगांवापाशी किंवा खुद्द सरकारापाशी सुद्धा तोंड वेंगाडण्याची गरज पडूं नये हे ध्येय सतत डोळ्यापुढे ठेवून आमच्या पूर्वजांनी गांवगाडा भरला, आणि त्यांना तो अंतर्बाह्य व्यवहारांत जितका स्वयंसमाविष्ट करता आला तितका करण्यांत त्यांनी यत्किंचित् कसर केली नाही. म्हणून तो पूर्वीच्या बेबंदशाहीतून वांचून निघाला. ह्या