पान:गांव-गाडा.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३४      गांव-गाडा.

राहिला वेळ हातपाय जोडून बसत आलो. ठोंब्या ब्राह्मणाला कोळ्याप्रमाणे टोणग्यावर पखाली वाहून पैसे मिळविता येईनात किंवा चलाख महाराला लेखणी चालवून डोके काढतां येईना. ह्याप्रमाणे कोणालाच आपापल्या मगदुराप्रमाणे परजातीचा धंदा करता येईना. धंदा करणारांच्या बायकांना सुद्धां धंद्याचे काम पडूं लागले म्हणजे त्या धंद्यांतले काम वाढले असें म्हणता येईल. ह्या मापाने मोजूं गेलें तर महाराष्ट्रांत तरी तशी स्थिति बरीच शतकें नसावी. 'सगळी बायको साळ्याची, अर्धी बायको माळ्याची आणि ऋणकरी बायको ब्राह्मणाची' ही म्हण फार जुनी आहे; आणि ती असे सांगते की, विणकाम व बागाईत शेती ह्या दोन धंद्यांतील लोकांपेक्षा इतरांना भरपूर काम पडत नव्हते. श्रमविभाग झाला पाहिजे; पण तो तोंडाकडील भाग पवित्र व शेपटाकडील अपवित्र, म्हणून वरिष्ठ जातीने तोंडांकडून व कनिष्ठ जातीने शेपटाकडून निमानिम करावा असला नसावा. आमच्यांतील पुष्कळ एक हाती होण्यासारखी कामें जातधंद्यांनी विभागून दिल्यामुळे तिकसतिंगा झाला आहे. सबंध सनंग एक हाती किंवा एकतंत्री म्हणजे एकापायाळूच्या ( दर्दी ) नजरेखाली तयार झाले तर त्याचे सर्व भाग प्रमाणशीर करून ते सर्वांग बळकट व उपयुक्त बनविण्याकडे कारखानदाराला लक्ष्य देतां येतें. जातधर्माने ही घडी मोडली, आणि जाती व पोट जाती परस्परावलंबी धंद्यांत गैरवाकब राहून त्यांची एकहाती दोरी सुटली. परदेशगमनाला अटकाव करून पुढे प्रांताप्रांतांचे दळणवळण जातिभेदाने संपुष्टांत आणिलें. सिद्ध-निषिद्धता व स्थानिक रूढि ह्यांच्या चरकांत कसब सांपडून अनुकूलता असतांनाही एक जात दुसरीचा धंदा करीनाशी झाली, इतकेच नव्हे तर अरूढ पद्धतीने तो करणाराला वाळीत टाकण्यापर्यंत जातगंगा छळू लागली. अशा रीतीने आमच्यांत व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तिवैचित्र्य, चढाओढ ही पार जिरून गेली, व संघटनाशक्ति लुप्तप्राय झाली; आणि जो देश एका काली सर्व प्रकारच्या ज्ञानांत, कलांत व सुधारणांत अग्रगण्य होता, त्याचे वैभव इति-