पान:गांव-गाडा.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.      २३५

हासांतर्गत झाले. लोकांत धंद्यांची संख्या घटली, व जे हुन्नर जातिधर्माच्या गाळणीतून राहिले ते गचांड्या खात खात बहुतेक तळपायरीवर येऊन पडले आहेत. गेल्या खानेसुमारीत असें प्रमाण निघालें आहे की आधुनिक सुधारणेने जरी वाटेल तितक्या नवीन धंद्यांना जन्म दिला आहे, तरी आमच्यांत शेकडा ९० लोक शेती व तिच्या भोंवतालच्या खेड्यापाड्यांतून दृष्टीस पडणाऱ्या सोप्या व रासवट अशा अवघ्या सव्वीस धंद्यांत काय ते गुरफटून राहिले आहेत.

 धंद्यांची जातवार परोपरी वाटणी झाल्यामुळे लहानशा कामासाठी सुद्धा दहा घरी जोडे फाडावे लागतात, व तितक्यांची बोळवण करावी लागते. म्हणून एकंदर खर्चही अधिक येतो, आणि कधी कधी कामाच्या निषिद्धत्वामुळे काम अडून पडते, व अतोनात गैरसोय होते. हल्ली जी ती जात नीच मानलेली कामें टाकून देण्याच्या विचारांत आहे. जात म्हणून ती कामें करण्याला तिला भाग पाडणे हे सध्यांच्या समतेच्या युगांत कोणालाच उचित नाही. बरें, दुसऱ्या जातीच्या इसमानें तें केलं तर त्याला त्याची जात वांकडे लावते. महारमांग गांवोगांव रस्ते साफ करण्याचे सोडून देत आहेत. भंग्यांचा पुरवठा मुबलक नाही. शिक्षण व किफायतशीर धंदे ह्यांचा प्रसार जों जो अधिक होईल तो तों आजपर्यंत गदळ, ओंगळ, म्हणून नीच मानलेले धंदे करणाऱ्या जाती आपली पिढीजाद कामें सोडून आपल्या पसंतीच्या धंद्यांत पडतील, आणि समजाची आवश्यक कामें पुरातन जातधंद्याच्या व्यवस्थेवर पुढे चालविण्यास बेसुमार खर्च येऊन वेळेला कामकरीही मिळणार नाहीत.

 एक जात दुसरीच्या धंद्याला निव्वळ पारखी झाल्याने जातकसबाचा बाऊ होऊन बसला आहे. तो इतका की, परजातीचा धंदा आपल्याला काही केल्या येणार नाही असे सर्वांना वाटू लागले आहे, एवढेच नव्हे तर तो त्यांना त्याज्यही वाटू लागला आहे. पहाडांत राहणाऱ्या शकूर जातीचा माणूस मेला म्हणजे जात जमते आणि प्रेताला म्हणते, 'ब्राह्मणाचे जन्माला जाशील तर लिहूं लिहूं मरशील, वाण्याच्या ज-