पान:गांव-गाडा.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.      २३३

जातीजातींमध्ये व व्यक्तीव्यक्तींमध्ये सामाजिक जबाबदारी समतोल वांटून देण्याला, व्यक्तिगुणपोषणाला,आणि त्याच्या द्वारे समुच्चयाने सर्व प्रकारच्या कौशल्यवृद्धीला पूर्णपणें असमर्थ आहेत. वतनदारीपेक्षा जातिधर्माचा व्याप फार मोठा असल्यामुळे त्याचे परिणामही फार खोल व दूरवर गेले आहेत. धंद्यांत जे धर्माचे वारे शिरले, त्याचा फायदा घेऊन जी ती जात आपल्या धंद्यांतला गलिच्छ किंवा कंटाळवाणा भाग तोडून टाकू लागली; इतकेच नव्हे तर त्याला निषिद्धत्वाचा डाग देण्यास देखील धीटावली, आणि असली कामें करणारांच्या स्वतंत्र पण कमी दर्जाच्या जाती बनल्या. धंद्याची प्रतिष्ठा सर्वत्र आहे, आणि जगांत जोपर्यंत हाताची पांच बोटें लहानमोठी असणार म्हणजे मनुष्याच्या कर्तुकीत तफावत पडणार तोपर्यंत माणसांबरोबर धंद्यांचीही प्रतिष्ठा राहणार. धंदा करण्यास आवश्यक अशा शारीरिक, मानसिक व नैतिक गुणांवर त्याची प्रतिष्ठा साधारणतः अवलंबून असते, आणि ती त्याच्या उपयुक्ततेवर टिकते. उपयुक्तता देशकालपरत्वें बदलत जाते. तेंव्हा गुण व उपयुक्तता ह्या दुहेरी कसाने धंद्यांच्या शेजेंत चढ-उतार होत गेला, तर तो समाजशाश्वतीस फायदेशीर होतो. एक धंदा दुसऱ्यापेक्षा प्रतिष्ठित ठरला तरी जर एक इसम त्यांना पुरून उरण्यासारखा असला तर तो ते दोन्ही हातचे जाऊ देत नाही. ते दोन्ही एकट्याला करता येणे अशक्य झाले किंवा दोन्ही करण्यापेक्षा एक करण्यातच त्याचा अधिक फायदा असला, तर तो ते दोन्ही धंदे करण्याच्या भरास पडत नाही आणि श्रमविभागाच्या तत्वाने एकाच धंद्याला हात घालतो. आपल्या देशांत धंद्यांचे सिद्ध व निषिद्ध हे विभाग आणि पोट-जातीपरत्वे दिसून येणारे पोट धंदे हे गुण व उपयुक्तता किंवा श्रमविभाग ह्यांपेक्षा सोवळ्याओवळ्यावर बसविले आहेत, असे वर वर कबूल करावे लागेल. कामाला बाट नाही, हात बाटत नसतात, हे सत्य आम्ही केव्हांच झुगारून दिले आणि भरपूर काम असो वा नसो अमकें काम निषिद्ध म्हणून झोंकून देऊन रूढीने ठरविलेले सूक्त तेवढे करून