पान:गांव-गाडा.pdf/253

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३२      गांव-गाडा.

किंवा हिंदू गांठून कसाबाला गाय विकण्याची हूल दाखवितात आणि तसे न करण्यासाठी त्यांजवळून पैसे घेऊन अखेर करावयाचें तेंच करतात. कायदा न मोडतां ज्याला जो धंदा करतां येतो, तो तो करणारच. त्यापासून त्याला पराङ्मुख करण्यासाठी इतर त्याची मूठ कोठवर दाबणार ? ह्याप्रमाणे सार्वजनिक हित व एकमेकांचा परामर्ष ह्यांविषयी बेपरवाई वाढत गेली; आणि वीत वीत टीच टीच जमातींनी भरलेला राष्ट्रपुरुष आत्महत्त्येच्या पंथास लागला. पायाजवळ पाहून प्रत्येक जात शाबूत ठेवण्याच्या भरांत सर्व समाजाची मजबुती अंतरली, व अखेर सर्वांना सर्वांचे एकदिल साह्याचे नेट न पोंचून सर्वच संघ मोडकळीला आले, आणि समाजाच्या हितानहितावर नजर पुरविण्याइतकी दीर्घदृष्टि व समाजाला सर्व बाजूंनी सांवरून धरण्याचा आवाका कोणा एकाही समाजविभागांत उरला नाही.

 वतनपद्धति ही जातिधर्माच्या अपार कुंडाचा गांवापुरता एक लहानसा हौद आहे. तिने जसें वतनदारांना व्यक्तिशः व समुच्चयाने तुटक, स्वार्थी, व कमजोर करून एकंदर गांवगाड्याचा विचका केला, तीच गति जातिधर्मानें एकंदर हिंदुसमाजाची केली. जे आडांत तेंच पोहऱ्यांंत येणार. जे धंदे ज्या जातीच्या हाती पडले ते तिच्या बाहेर जाऊं नयेत, ह्या धोरणाने जातधंदे धर्माच्या पदवीस चढविले. धंदेवाल्या जातींतील व्यक्तींचा लोभ वाढून त्यांना असे वाटू लागले की, कांहीं प्रदेशापुरता का होईना जातधंदा आपल्या विवक्षित कुळांच्या बाहेर जाऊ देऊ नये. त्यांच्या ह्या आपमतलबी धोरणाने वतन निर्माण केलें. वतनांत राजाधिकाराचा अंश प्रमुख व जातिधर्मात धर्माधिकाराचा अंश प्रमुख असतो; तथापि दोघांनाही समाजाचे पाठबळ लागते व होतेंही. ज्या कारणांनी वतनी धंदे खालावले आणि अव्वल वतनदारांच्या हातून गेले, त्याच कारणांनी अव्वलच्या जातधंद्यांची तटबंदी ढासळली.जात-धंदा आणि वतन ह्या संस्था लोकसंग्रहाच्या आटोपसर बाल्यावस्थेमध्ये समाजस्थिति कशीबशी सांवरून धरण्याला कितीही उपकारक असल्या तरी त्या