पान:गांव-गाडा.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बलुतें-आलुतें.      ९७


काढला तर त्याला भाकर, धान्य किंवा तीन चार आणे रोज द्यावा लागतो. खानदेशांत आग्रा रोडवर भिल्लांच्या चौक्या पहाण्यांत आल्या. त्या कोणी बसविल्या हे समजले नाही. त्यांवरील भिल्ल वाटेच्या गाड्यांबरोबर पुढील चौकापर्यंत जाऊन आणा अर्धा आणा रहदारी (दस्तुरी) घेतात. गांवांत घोडे, गाडी रात्री मुक्कामाला राहिली तर महार जागले आणा अर्धा आणा जागलकी घेतात. पूर्वी लोक गांव सोडून धंद्याला देखील लांबवर जात नसत, आणि सोयरसंबंधही दूर गांवी करीत नसत. त्यामुळे चिठीचपाटी, निरोप-पडताळा, मुऱ्हाळकी या कामी महारांचा उपयोग होई. आतां हे सर्व पालटले आहे. त्यामुळे व टपालखात्याचे जाळें सर्व देशभर पसरल्यामुळे महारांची जासुदकी सुटली. गांव झाडून साफ करण्याचे काम पाडेवार महार टाकवेल तितकें अंगाबाहेर टाकतात. ह्याप्रमाणे महारजागल्यांच्या सार्वजनिक अथवा गांवकीच्या कामाची कहाणी झाली. घरकी कामाबद्दलही तेंच किंवा त्याहून अधिक रडगाणे आहे असें हमटलें तरी चालेल. तोंड पाहून गांवांतल्या कर्त्या लोकांची, पाटीलकुलकर्णी, देशमुख-देशपांड्ये, किंवा श्रीमंत कुणबी ह्यांची मात्र थोडी फार घरकी कामें महार करतात; पण ती सुद्धा पुष्कळ बोलावणी पाठवून गांठ पडल्यास करतात. नाही तर 'पाटील मी घरी नव्हतों, मला कळलें नाहीं' वगैरे थाप मारून चाळवतात. गरीब कुणब्यांना त्यांच्याकडे हेलपाटे घालण्याला, त्यांची वाट पाहण्याला व त्यांशी हुजत घालीत बसण्याला सवड नसते. कुणब्याचे गोठे साफ करतांना आतांशा महार आढळत नाहीत. काही ठिकाणी घरांपुढें झाडण्याला महारणी फुरसतीने येताना दिसतात. नांगर, कुळव, बी वगैरे ओझें ज्या त्या कुणब्याला स्वतःच घरून शेतांत न्यावे लागते. बोलावलें तर 'येतों जातो' अशी महारांची टंगळमंगळ चालते. ही कामें निकडीची असतात. त्यामुळे शेकडा एका कुणब्याचे सुद्धा-आऊतकाठी, मोट, बी, सर्पण वगैरे ओझें महारांच्या वाट्याला येत नाही. फॉरेस्ट झाल्यामुळे व ओहोळ-खोळ वगैरे ठिकाणांची झाडे सरकारच्या मालकीची असल्यामुळे महारांचे सर्पण पुरविण्याचे काम