Jump to content

E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2)/'''प्रास्ताविक '''

विकिस्रोत कडून


प्रास्ताविक

पक्षी हे कुठल्याही परीसंस्थेच्या (ecosystem) परिस्थितीचे मापक मानले जाते. जेवढी पक्ष्यांची विविधता जास्त तेवढाच तो अधिवास चांगला समजला जातो. एखाद्या ठिकाणचे पक्षीवैविध्य घटायला लागले की त्याठिकाणी काहीतरी विसंगत घडते आहे असे बिनधोकपणे मानायला हरकत नाही.

पक्षी निरीक्षणाचा छंद जनमानसात दिवसेंदिवस अधिकाधिक प्रिय होत चालला आहे. त्याप्रमाणे पक्ष्यांची अनेक पुस्तकेसुध्दा निघत आहेत. मराठीत सुध्दा बरीच पुस्तके आली आहेत. प्रस्तुत "महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी" ह्या ई-पुस्तकाचा (e-book) उद्देश पक्षांची माहिती अगदी तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहचवणे हा आहे. ज्यांना इंटरनेट उपलब्ध आहे अशी कुणीही व्यक्ती हे पुस्तक मोफत डाऊनलोड करून बिनधास्तपणे वापरू शकते.

प्रस्तुत पुस्तकात प्रत्येक पक्ष्याचे मराठी नाव, इंग्रजी नाव, शास्त्रीय नाव, लांबी, आकार (म्हणजे ओळखीच्या पक्ष्याच्या तुलनेत), ओळख, आवाज, व्याप्ती (म्हणजे रहिवासी की स्थलांतरित व महाराष्ट्रात नेमका कुठे आढळतो), अधिवास व खाद्य एवढी माहिती दिलेली आहे.

पुस्तकाचे नाव जरी "महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी" असे असले तरी काही दुर्मिळ (खरे तर संकटग्रस्त) पक्षी, जसे, माळढोक, रानपिंगळा इ. मुद्दामहून पुस्तकात घेतले आहेत. सामान्य पक्षी बघता-बघता संकटग्रस्त पक्ष्यांबद्दल कुतूहल जागृत व्हावे हा त्यामानाचा हेतू.

हे पुस्तक वाचून लहान मुलांमध्ये पक्ष्यांची आवड निर्माण व्हावी व त्यातूनच निसर्गावर मनापासून प्रेम करणारे नागरिक घडावेत अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना.

डॉ. राजू कसंबे