Jump to content

स्टींग ऑपरेशन

विकिस्रोत कडून
लेखिका :

अॅड. वर्षा देशपांडे

निर्मिती सहाय्य :
राजीव मुळ्ये

मुखपृष्ठ :
कैलास जाधव

मांडणी
दिपेन्ती चिकणे, अॅड. शैला जाधव

मूल्य:
रु.२००/-

• लेकलाडकी अभियान
४९०ए, गुरुवार पेठ,
मुक्तांगण, सातारा


प्रथम आवृती १४ एप्रिल २०१९
अर्पण पत्रिका


 जन्माला येण्याआधीच गायब करण्यात आलेल्या या देशातील लाखो छकुल्यांना हे पुस्तक अर्पण करीत आहोत. स्टिंग ऑपरेशनच्या प्रक्रियेत सहाय्यभूत ठरलेल्या आणि स्टार विटनेस असणाऱ्या सर्व सहभागी गरोदर मातांना लेकरांना धन्यवाद ! तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडता सामाजिक बांधिलकीने कोर्टात येऊन साक्ष नोंदवणाऱ्यांना सर्व साक्षीदारांच्या धैर्याला मानाचा मुजरा....


अॅड. वर्षा देशपांडे...

अनुक्रमणिका

पृष्ठ क्र. अनं. प्रकरणाचा तपशील १ पूर्वपिठीका २ नंदूरबार ते सुरत ३ मल्हार सिनेमा ते साकीनाका ४ डेस्टीनेशन बीड ५ जय पराजय ६ अडथळ्यांची शर्यत ७ सोळाकी एकोणीस एकावर पाच फ्री ९ विजयाची दुखरी किनार

१० केवढी ही साखळी
पूर्वपीठिका

 मुलीला पहिला श्वासच घेऊ द्यायचा नाही, आईच्या गर्भातूनच तिला नाहिसं करायचं, ही क्रूरता असल्याचं आता बहुतांश सर्वांना पटू लागलंय. अशा घटनांमुळं समाजात स्त्री-पुरुषांचं प्रमाण व्यस्त झाल्यास पुढच्या पिढीचं काय? हा प्रश्नही अनेकांना पडू लागलाय. काहीजण पाप समजून तर काहीजण कायद्याच्या भीतीनं अशा दुष्कृत्यांपासून दूर राहू लागलेत. कायद्याची अंमलबजावणीही बऱ्यापैकी होत असल्यामुळं डॉक्टर मंडळींना किमान धाक तरी आहे. 'नोबेल प्रोफेशन' म्हणून मिरवताना अचानक कोठडीत जायला लागू नये, यासाठी गर्भलिंगचिकित्सेसारखे प्रकार किमान उघड होणार नाहीत, याची काळजी ते घेऊ लागलेत. पण एक काळ असा होता, जेव्हा यात काही गैर आहे, असं कुणाला मुळात वाटतच नव्हतं. दुकानातून एखादी वस्तू खरेदी करताना जसा अँड ठरवण्याचा हक्क आपल्याला असतो, तसाच आपल्याला मुलगा हवा की मुलगी, हे ठरवण्याचा हक्कही आपल्याला आहे, अशीच अनेकांची मानसिकता झाली होती. मी काही मध्ययुगातली गोष्ट सांगत नाहीये. अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचं आहे हे सगळं. मुली वाचवण्याची आम्हा कार्यकर्त्यांची धडपड आज ज्या टप्प्यावर आहे, तिथपर्यंतचा प्रवास खूप चढउतारांचा, खाचखळग्यांचा आणि आडवळणांचा आहे. त्यातला एकेक टप्पा उलगडून दाखवण्यापूर्वी या प्रवासाची पार्श्वभूमी सांगायलाच हवी. कारण आज कल्पनाही करता येणार नाही, असं ते वातावरण होतं.

 वाढती लोकसंख्या ही भारताची गंभीर समस्या आहे, हे लक्षात आल्यामुळं १९७० मध्ये त्या विषयावर गांभीर्यानं चर्चा सुरू झाली. परिणामी, १९७१ मध्ये वैद्यकीय गर्भपाताचा हक्क देणारा कायदा संसदेत संमत करण्यात आला. “एमटीपी' कायदा नावानं ओळखला जाणारा हा कायदा महिलांच्या मागणीमुळे झालेला नव्हता, तर लोकसंख्या नियंत्रण हेच त्याचं प्रमुख उद्दिष्ट होतं. या कायद्यान्वये चार परिस्थितींमध्ये गर्भपात करण्याचा हक्क महिलेला मिळाला. सोनोग्राफी मशीन त्याकाळी नव्हतं, गर्भजल बाहेर काढून त्याची तपासणी करण्यात येत असे. गर्भात मुलगा आहे की मुलगी, हे या तपासणीतसुद्धा कळायचं. परंतु ही चाचणी खूप घातक होती. गर्भाशय फाटण्याचा धोका असायचा. शिवाय नाळेलाही इजा होण्याची शक्यता असायची. त्यामुळं ही चाचणी फारशी लोकप्रिय नव्हती. सोनोग्राफी मशीन आल्यावर मात्र गर्भात मुलगा आहे की मुलगी, हे पाहणं सोपं झालं. 'एमटीपी' कायदा केला, तेव्हा गर्भलिंग जाणून घेणारं तंत्रज्ञान विकसित होईल, अशी कल्पनाच कुणाला नव्हती. अर्थातच, सोनोग्राफीची सोय झाल्यावर या कायद्याचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग सुरू झाला. संततीनियमनाचं साधन कुचकामी ठरल्याचं कारण दाखवून गर्भपात सुरू झाले. 'एमटीपी' कायद्यात दिलेल्या चार प्रकारच्या परिस्थितीमध्ये हे कारण होतंच. सोनोग्राफी मशीन हे गर्भलिंगनिदानाचं शस्त्र ठरलं आणि मुलींची संख्या झपाट्यानं कमी होऊ लागली.

 मुलांच्या तुलनेत मुलींच्या संख्येत होत असलेली घट, या विषयावर जगात सर्वप्रथम चर्चा झाली ती १९८५ मध्ये बीजिंगला झालेल्या परिषदेत. आशियात आणि त्यातल्या त्यात भारतात मुलींची संख्या झपाट्यानं रोडावतेय, असं आकडेवारीनिशी सांगितलं गेलं, तेव्हा पहिला हादरा जाणवला. तत्पूर्वी ‘एमटीपी' कायदा झाल्यापासून १९७१ ते १९८५ या पंधरा वर्षांच्या काळात आपण किती मुली गमावल्या असतील, याची कल्पनाही करवत नाही. अल्ट्रा सोनोग्राफी मशीन भारतात सर्वप्रथम मोठ्या शहरांमध्ये दाखल झालं होतं. अर्थातच, गर्भपातांचं प्रमाणही याच शहरांत अधिक होतं. बीजिंगच्या परिषदेनंतर मुंबईत इन्टर्नशिप करीत असलेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजीव कुलकर्णी यांनी एक शोधनिबंध लिहिला. मुंबईसारख्या मोठ्या शहरांतली दोनशे सोनोग्राफी यंत्रं आणि गर्भपात केंद्रं त्यांनी अभ्यासासाठी निवडली होती. गर्भपाताचा हक्क देणारा कायदा मुलींच्या जिवावर उठेल, असं कुणाला त्यावेळी वाटलंही नसेल; पण ते घडलं होतं, हे डॉ. संजीव कुलकर्णी यांनी पुराव्यांनिशी शाबीत केलं. त्यांच्या शोधनिबंधांच्या आधारे महाराष्ट्रातल्या स्त्रीवादी चळवळींनी, महिला संघटनांनी याविषयी जागृती सुरू केली. महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी एक खासगी विधेयक या महिलांनी सादर केलं. विधानसभेत मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर यांच्यासारख्या लढाऊ सदस्या होत्या. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्यावेळी राज्याच्या समाजकल्याण मंत्री होत्या. रजनी सातव यांच्यासारख्या हिंगोलीतून निवडून आलेल्या तरुण आमदार सभागृहात होत्या. या सगळ्यांच्या प्रयत्नांतून गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक म्हणजेच 'पीएनडीटी' कायदा विधिमंडळात मंजूर झाला. महाराष्ट्रानं जगाला दिलेल्या अनमोल देणग्यांपैकी ही एक होय. कारण असा कायदा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वप्रथम महाराष्ट्रात झाला. १९८८ मध्ये झालेला हा कायदा पुढे १९९४ मध्ये लोकसभेतही संमत झाला आणि देशभरात लागू झाला.

 'पीएनडीटी' कायद्यान्वये महाराष्ट्रात पहिले दोन गुन्हे दाखलही झाले; मात्र त्यानंतर आम्ही या कायद्याचा वापर पुन्हा करायचा नाही, असंच ठरवलं. कारण या कायद्यात एक गंभीर त्रुटी होती. ती म्हणजे, गर्भवती महिलेला 'आरोपी क्र. १' करण्यात आलं होतं. वस्तुतः आपल्याकडे वर्षानुवर्षे मुरलेल्या पुरुषसत्ताक कुटंबव्यवस्थेत साधे-साधे निर्णयसुद्धा महिला घेत नाही. 'मुलगी नको' हा निर्णयही बहुतांश वेळा महिलेचा नसतोच. जी फक्त परंपरेची वाहक आहे, लग्नानंतर जिचा स्वतःच्या शरीरावरही हक्क राहत नाही, अशा महिलेला आरोपी क्र. १ करणं आम्हाला पटलं नाही. रोगापेक्षा औषध भयानक अशी अवस्था या कायद्यामुळं झाली होती. निर्णय घेणारे आरामात आणि जिच्यावर तो लादला गेला, ती तुरुंगात, हे स्त्रीवादी चळवळ म्हणून आम्हाला स्वीकारार्ह असणं शक्यच नव्हतं. आमच्याप्रमाणंच अनेकांना ही गोष्ट खटकली होती. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयात या तरतुदीविरोधात अनेक जनहित याचिका दाखल झाल्या. आम्हीही २००० मध्ये याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान २००१ च्या जनगणनेची आकडेवारी आली आणि न्यायालयीन प्रक्रियेत उपयोगीही पडली. 'सेहत' या संस्थेने सर्वप्रथम याचिका दाखल केली असल्यामुळं 'सेहत विरुद्ध भारत सरकार' या नावानं हा खटला आणि २००४ मध्ये झालेला त्याचा निकाल ऐतिहासिक ठरला. गरोदर मातेला आरोपी करता येणार नाही, यासह चार आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले. कायद्यात बदल करून कलम २४ समाविष्ट करणं कोर्टानं सरकारला भाग पाडलं. भारतीय कुटुंबव्यवस्थेत मुलाला जन्म देणं महिलेला बंधनकारक केलं जातं, ही परिस्थिती न्यायालयानं मान्य केली. पुढं आम्ही जी असंख्य स्टिंग ऑपरेशन आत्मविश्वासानं केली, त्याला हा निकालच कारणीभूत ठरला. बनावट पेशंट म्हणून गर्भवती महिलेला डॉक्टरकडे घेऊन जाणं, ऑडिओ-व्हिडिओ पुरावे जमवणं शक्य झालं.  कोणताही कायदा केवळ काय योग्य, काय अयोग्य आणि काय दंडनीय, एवढंच सांगतो. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्राचं नियमन करणारा हा कायदा असल्यामुळं केंद्रीय आरोग्य विभागाला अंमलबजावणीचे अधिकार देण्यात आले. महिला आणि बालकल्याण विभागासह महिला आयोग, केंद्रीय देखरेख मंडळ अशा अनेक संस्थांचा एकेक प्रतिनिधी घेऊन सल्लागार समित्या नेमल्या गेल्या. हीच यंत्रणा राज्यांच्या पातळीवरही तयार करण्यात आली. आम्ही त्याकाळी 'दारूची दुकानं फोडणाऱ्या बायका' म्हणून प्रसिद्ध झालो होतो. अनिल डिग्गीकर तेव्हा साताऱ्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं आणि गर्भलिंगचिकित्सेला प्रतिबंध करणाऱ्या पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी निर्माण केलेल्या समितीत सहभागी होण्यास सांगितलं. 'दारूच्या बाटल्या तर तुम्ही फोडताच; आता चार-दोन डॉक्टरांनाही पकडा,' हे त्यांचे शब्द होते. अशा प्रकारे सल्लागार समितीत माझा समावेश झाला. प्रथम सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि नंतर कायदेशीर सल्लागार म्हणून!

 दारूच्या बेकायदा भट्ट्या, दुकानं शोधणं सोपं होतं. आमच्या महिला संघटनेतल्या कार्यकर्त्यांकडूनच माहिती मिळत असे. पण गैरप्रकार करणारे डॉक्टर कसे शोधायचे? दरम्यान, सल्लागार समितीचं काम करताना आमच्या हातून, आज हास्यास्पद वाटावी अशी एक गोष्ट घडत होती. आम्ही डॉक्टरांच्या बैठका बोलावून त्यांना मार्गदर्शन करत होतो. कायदा काय सांगतो, कोणकोणती कागदपत्रं तयार करायला हवीत, कोणत्या कारणानं तुम्ही कचाट्यात सापडू शकता, हे आम्ही खुद्द डॉक्टरांनाच सांगत होतो. कुलूप कसं उघडायचं, याचं ज्ञान चोराला देण्यासारखंच हे होतं. पण खरं सांगायचं, तर एवढी माहिती देऊनसुद्धा आजही डॉक्टर जाळ्यात अडकतात, याचं विशेष नवल वाटतं. बैठकीच्या बाबतीतसुद्धा ही 'नोबेल प्रोफेशन'मधली प्रतिष्ठित मंडळी आम्हा कार्यकर्त्यांना कस्पटासमान लेखायची. दिवसभर कामात असल्यामुळं संध्याकाळीच बैठका घ्या, असं बजावायची. कागदपत्रांचा तपशील ऐकून त्यांच्या कपाळावर आठ्या यायच्या. काहीजण कुत्सितपणे हसायचे. “एवढं करूनसुद्धा आम्ही गर्भलिंगचिकित्सा करून दाखवू,' असं खुलं आव्हानसुद्धा त्याकाळी आम्हाला काही डॉक्टर द्यायचे, हे आज कुणाला खरंही वाटणार नाही. पण हे आव्हान देण्याचं सामर्थ्य त्यांच्यात येतं कुठून, हे बरंच काम केल्यानंतर आम्हाला कळू लागलं.

 शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक अशा मंडळींना कुटुंबनियोजनाचं काम देण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आलीय. याच मंडळींपैकी काहींना पैशांचं आमीष दाखवून डॉक्टर मंडळी “एजंट' बनवतात, हे आमच्या लक्षात आलं. नेटवर्क लक्षात आलं. माहिती काढण्यासाठी कुणाकडे जायचं, हे समजलं. गर्भलिंगचिकित्सा आणि गर्भपातासाठी किती पैसे लागतात, हे समजू लागलं. हे 'काम' डॉक्टर मंडळी कोणत्या वेळेत करतात, याची माहिती मिळत गेली. बहुतांश डॉक्टर संध्याकाळी पाच ते रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान किंवा शनिवार-रविवारी दिवसभर अशा गोष्टी करतात, हे लक्षात आलं.

 एकीकडे अनेक पातळ्यांवर आमचं 'संशोधन' चाललेलं असताना दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक घटना सोनोग्राफी मशीन बनवणाऱ्या एल. अँड टी. कंपनीतच घडली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय चिकित्सेसाठी आलेल्या खर्चाची री-एम्बर्समेन्ट कंपनीकडून मिळते. त्यासाठी बिलं सादर करावी लागतात. आपल्याच कंपनीनं तयार केलेल्या मशीनवर सोनोग्राफी करायला फारतर चारशे ते पाचशे रुपयांचा खर्च अपेक्षित असताना कर्मचारी दोन हजार, चार हजार अशी बिलं कशी काय जमा करतात, अशी शंका तिथल्या लेबर फिसरला आली. त्यानं चौकशी केल्यावर कर्मचाऱ्यांनी त्याला डॉक्टरांचे रेट्स' सांगितले. लेबर ऑफिसरला धक्काच बसला. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, हा विवेक जागा ठेवून त्या अधिकाऱ्यानं या बाबत थेट राज्य सरकारला पत्र पाठवलं. या संवेदनशील अधिकाऱ्याचं नाव आज कुणाला ठाऊक नसलं, तरी त्यानं लिहिलेलं पत्र आजही रेकॉर्डवर आहे.

 सातारा जिल्ह्यात त्याही काळात तब्बल २५० सोनोग्राफी सेंटर्स होती. सिव्हिल सर्जन डॉ. मारुलकर यांच्याकडच्या रेकॉर्डवरून ही माहिती आम्हाला मिळाली होती. यापैकी कितीजण नियमित अहवाल (प्रोसीजर रिपोर्ट) सादर करतात, या प्रश्नाला डॉ. मारुलकर यांनी दिलेलं उत्तर मात्र धक्कादायक होतं. कारण नियमित अहवाल सादर करणारे जेमतेम शंभरच डॉक्टर भरले. उरलेल्या दीडशे डॉक्टरांची स्वतंत्र यादी आम्ही तयार केली. दरम्यान, वेगवेगळ्या मार्गानं आम्ही माहिती गोळा करीत होतो. समस्या किती खोल आहे, याचा अंदाज हळूहळू येत होता. वैद्यकीय कचऱ्याच्या (बायोमेडिकल वेस्ट) कायद्याची त्यावेळी प्रभावी अंमलबजावणी होत नसे. ज्या गर्भपात केंद्राच्या आसपास उकीरड्यावर कुत्री-डुकरे जास्त प्रमाणात कशावर तरी तुटून पडलेली दिसतात, त्या केंद्रांची नोंद आम्ही ठेवली. वेगवेगळ्या मार्गानं मिळत असलेली माहिती 'त्या' दीडशे केंद्रांशी पडताळून पाहिली असता कुठे पाणी मुरतंय याची कल्पना आली. आणि त्याच काळात दुसरी धक्कादायक घटना आमच्याच बाबतीत घडली.

 आमच्या बचत गटातून विविध कारणांसाठी महिलांना कर्ज दिलं जायचं. महिला मंडळात आम्ही गर्भपातासंबंधी माहिती जमवायचा प्रयत्न करीत असतानाच एका महिलेनं दिलेल्या माहितीनं आम्ही दचकलो. मुलगा की मुलगी बघायला दोन हजार रुपये आणि गर्भपाताला दोन हजार रुपये घेणाऱ्या डॉक्टरचं नाव समजलं. पण गर्भपात करून घेणाऱ्या महिलेचं नाव आमच्या दृष्टीनं अधिक धक्कादायक होतं. कारण हे चार हजार रुपये तिनं आमच्याच बचत गटातून कर्जाऊ घेतले होते. या महिलांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही तयारी केली आणि पहिलं स्टिंग ऑपरेशन करून सातारचे डॉ. थीटे यांना गर्भलिंगचाचणी करताना पकडलं. त्यावेळी सोनोग्राफी करून देणारा डॉक्टर तर आज साताऱ्यातूनच निघून गेलाय. डॉ. थीटे यांनीही “मलाच एकट्याला पकडलं. इतरांचं काय?" असा सूर लावला. मग त्यांच्याकडूनच नावं घेऊन आम्ही पुढच्या कारवाया केल्या. डॉ. थीटे यांना पकडण्यासाठी केलेलं स्टिंग ऑपरेशन महाराष्ट्रातलं पहिलं आणि देशातलं दुसरं ठरलं. तत्पूर्वी फक्त हरियानातल्या पालवलमध्ये अशा प्रकारची कारवाई झालेली होती. मुली वाचवण्याची आमची धडपड त्या क्षणापासून आजतागायत अव्याहत सुरू आहे. या प्रवासात आमच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा खूप त्रास सहन केलाय. ताणतणाव झेललेत. उपाशी-तापाशी राहून

काम केलंय. त्यांची हिंमत आणि मेहनत लोकांसमोर यावी, म्हणूनच या संपूर्ण प्रवासातले खाचखळगे, चढउतार, वेडीवाकडी वळणं, जय-पराजय उलगडून दाखवावेत, असं वाटलं. माझ्या या प्रयत्नाचं तुम्ही स्वागत कराल, अशी अपेक्षा करते.
नंदूरबार ते सुरत


हॅलो - ०२१६२ - २२१०३१ नंबर ना ?
हो, बोला.
अॅड. वर्षा देशपांडे आहेत का? मी नंदुरबारहुन डॉक्टर बोलतोय. आहेत का वर्षाताई
मी: नमस्कार, बोला.
आवाज : नमस्ते ताई, मी आरोग्य अधिकारी बोलतेय. आम्ही महिलांचा मेळावा घेतलाय. तुम्ही आलात तर आमच्या आदिवासी भागातील महिलांचं थोडं प्रबोधन होईल. मुली वाचवण्याविषयीही त्यांना सांगता येईल.
मी : हो, मी यायला तयार आहे; परंतु “मुलगी वाचवा मुलगी शिकवा' हा प्रश्नच मुळात आदिवासी समाजात नाही. ते कधीच मुलगा-मुलगी तपासयला जात नाहीत. त्यामुळं माझ्या भाषणाचा तसा फार उपयोग होईल असं वाटत नाही.
आवाज : हे खरं असलं तरी जनजागृती तरी होईल ना. म्हणून तुम्ही यावं ही विनंती.
मी: ठिक आहे केव्हा आहे कार्यक्रम ते कळवा. मेल करा, मी येईन.
आवाज : ठिक आहे, धन्यवाद ताई.

 फोन ठेवला; परंतु माझ्या डोक्यात काही प्रश्न येऊ लागले. का बोलावलं असेल इतक्या लांब ? मी शैलाला विचारलं.शैलाचही मत पडलं.की इतक्या लांब, त्या भागात कधी गेलो नाही आपण. धुळ्यापर्यंत आपण गेलो होतो. मी कैलासला विचारलं. “गाडी घेऊन जावं लागणार. जायचं का?" कैलासही जाऊया म्हटल्यावर मी त्यांना होकार कळवला. खरंतर, आम्ही चळवळवाले. कोणतीही परिस्थिती हाताळण्याचा अनुभव. दारुधंदेवाल्यां पासून ते डॉक्टर पकडण्यापर्यंत आमचा हात कुणीच धरत नसे. फक्त काळजी घ्यायची-

 त्या दिवशी संध्याकाळी निघालो. कैलासला गाडीत हवा, पाणी, डिझेल सगळी तयारी करून ठेवायला सांगितलं. कपडयांच्या बॅगा गाडीत टाकल्या आणि निघालो. बॅगा कायम भरुन ठेवलेल्याच असायच्या. त्यामुळं मी गमतीनं म्हणायचे, आपण फायर ब्रिगेड किंवा एअर इंडियावाले वाटतो. सतत तयार. सतत ऑन ड्युटी ! गाडी सुरु झाली आणि सातारा ते नंदुरबार प्रवास सुरु झाला.

 सकाळी साधारण आठच्या दरम्यान नंदूरबारमध्ये पोहाचलो. जवळजवळ चौदा तास प्रवास झाला होता. विश्रांतीची गरज होती. आरोग्य विभागानं आमची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केली होती. आम्ही पोहोचल्याबरोबर आरोग्य विभागची गाडी आम्हाला रिसीव्ह करायला आली. सकाळी अकरा वाचता कार्यक्रम होता. आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. ग्रामीण भागातून महिला येणार, तेही घरातली काम आवरुन. म्हणजे थोडावेळ इकडे-तिकडे होणार हे गृहितच होते. बारा वाजता कार्यक्रम सुरु झाला. कैलास फोटो काढण्यासाठी समोर प्रेक्षकांमध्ये होता. सगळ्यांची भाषणं झाली. प्रमुख पाहुणी म्हणून माझं भाषण ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. माझं भाषण सुरु झालं. महिलांवर त्याचा प्रभाव दिसू लागला. टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला, थोडंसं हसू, कधी डोळ्यात पाणी तर कधी बाई म्हणून अभिमान वाटावा अशा शब्दांनी भाषण रंगत गेलं. मी शेवटी असं सांगितलं की, मुलगी वाचवण्याचा प्रश्न जरी आदिवासी भागात नसला तरी शेजारच्या जिल्ह्यात हा प्रश्न असल्यास त्याचा परिणाम आकडवारीत दिसतो. कारण आपल्या भागातील म्हणजेच नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी सोडून ज्यांना मुली नको अशी मानसिकता आहे ते नंदुरबारमधून शेजारच्या जिल्ह्यात जाऊन गर्भलिंगनिदान करु शकतात. मुलगी असल्यास ते आपल्या जिल्ह्यात गर्भपात करु शकतो. म्हणजे तपासणी शेजारच्या जिल्ह्यात आणि गर्भपात आपल्या जिल्ह्यात. असं होत असेल. तरी आपण सगळ्यांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे. या वाक्यानंतर जोरदार टाळ्या पडल्या. यावरुन मला थोडा अंदाज आला. काहीतरी गडबड आहे दिसत होतं. सरकारी यंत्रणाही थोडी गाफिल असणार. कारण आमच्याकडे असं काही होतच नाही. अशी भूमिका घेतली की प्रश्नच उरत नाही. मग सरकारकडून आलेले पैसे पोस्टर, बॅनर, पथनाट्य आणि कार्यशाळा यात खर्ची पडतात. पण मी शांत बसणारी आणि भाषण करुन निघून जाणारी बाई नव्हते आणि भाषण करुन जावयांचा छान-छान म्हणणं माझ्या स्वभावात नव्हतं. म्हणून जमलेल्या सर्व महिलांना आईची शपथ घातली. " आई नसती तर आपण जन्माला आलो असतो का ? मग तिच्याप्रती कृतज्ञ राहायचं असेल तर आपण मुली वाचवण्याचा वसा घेतला पाहिजे." असं आवाहन केलं. कार्यक्रमाला आशाताई, अंगणवाडीताई आल्या होत्या.  कार्यक्रम संपल्यावर महिलांनी मला घेरलं आणि खरा कार्यक्रम सुरु झाला. अनौपचारिक गप्पांमध्ये कळलेल्या माहिती नुसार गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात स्टिंग ऑपरेशन सुरु होती. मुलींची संख्या वाढताना दिसू लागली होती. काही डॉक्टर जेलमध्ये गेले होते. याचा परिणाम राज्याचा सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये दिसू लागला होता. पूर्वी तालुक्यात डॉक्टर पकडल्यास लोक शेजारच्या तालुक्यात गर्भलिंगनिदानासाठी जात असते. तिथं कारवाई झाल्यास शेजारच्या जिल्ह्यात जात असत. असं करता - करता स्टिंग ऑपरेशनच्या धसक्यानं लोक आपलं राज्य सोडून शेजारच्या राज्यात जाऊ लागल्याचं या गप्पांमधून स्पष्ट झालं. खरं तर पूर्वीपासून मला तसे फोन येत होते. त्यातलं सत्य आज मला नंदूरबारमध्ये उलगडलं होतं. नंदुरबारची हद्द जिथं संपते तेथून गुजरातची हद्द सुरु होते. नंदुरबारच्या शेवटच्या तालुक्यात काही डॉक्टर गरोदर महिलेला तपासणीसाठी सुरतला पाठवतात अशी माहिती आम्हाला मिळाली. परंतु माहिती पुरेशी नसताना स्टिंग ऑपरेशन करायचं तर बऱ्याच गोष्टी तपासून पाहाव्या लागतात. फिल्डवर जाऊनच सत्यता तपासावी लागते.

 कार्यक्रम संपल्यावर आम्ही हॉटेलवर आलो. सोबत आरोग्य विभागाचे अधिकारी होते. चहा झाला आणि महिलांनी दिलेल्या माहितीसंदर्भात मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंत ते या माहितीविषयी अनभिज्ञ होते किंवा तसं दाखवत होते. असं काही असल्यास गंभीर गोष्ट आहे असे ते म्हणाले. मी म्हटलं."खात्री करावी लागेल. प्रत्यक्ष पाहावं लागले. आता दोन वाजलेत. आपण त्या शेवटच्या तालुक्यात तपासणी करुन घ्यावी असं मला वाटतं. जाऊया का ? एखादी चार-साडेचार महिन्यांची गरोदर महिला शोधावी लागेल. जेणेकरुन एखाद्यानं पैशाच्या हव्यासापोटी तिथंच गर्भलिंग निदान केलं तर जागीच त्याला पकडता येईल. कुणी गरोदर महिला संपर्कात असेल तर बघा" अधिकाऱ्यांनी फोन करायला सुरुवात केली. या सगळ्यात एक तास गेला. " एक महिला आपल्या आरोग्य विभागात आशाताई म्हणून काम करते. जिला पहिली मुलगी आहे. तिनं यायचं कबूल केलंय. परंतु तिच्या नवऱ्याला समजावून सांगावं लागेल" असं अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर मी त्यासाठी होकार दिला. शहरातच तिचं घर होते आम्ही तिच्याकडे गेलो. तिच्या घरच्यांना नवऱ्याला समजावून सांगितलं, “तुम्ही शासनाला मदत करीत आहात. तुमची शासन नक्की नोद घेईल. त्याला ते पटलं आणि त्यान पत्नीला सोबत घेऊन जाण्याची तयारी दर्शवली.

 मी कैलासला तिचा भाऊ बनून जायला सांगितलं. साताऱ्याहून आम्ही तयारीनिशीच आलो होतो. छोटे कॅमेरे, ऑडिओ सिस्टीम अशी साधनं सोबत आणली होती. किंबहुना ती कायम आमच्यासोबत असतातच. कधी, कुठे, काय लागेल सांगता येत नाही. तालुक्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही एक १०० रुपयांचा स्टॅम्पपेपर घेतला. त्यावर गरोदर महिलेचं प्रतिज्ञापत्र तयार केलं. त्यावरचा मजकूर असा : मी शासनाला मदत करण्यासाठी, मुलगा-मुलगी तपासताना डॉक्टरला रंगेहाथ पकडण्यासाठी जात आहे. पोटातील बाळ काहीही असो, ते मला प्रिय आहे. प्रतिज्ञापत्र करुन सोनोग्राफी सेंटर मध्ये डॉक्टरकडे गेलो. गाडी दवाखान्यापासून दूर उभी केली. तिला घेऊन कैलास आत गेला आणि “मुलगा - मुलगी तपासायचं आहे," असं सांगितलं. त्यांनी नाव विचारलं असता गावित अडनाव सांगितलं. तसे त्यांनी कैलासला हाकलूनच दिलं. त्याला काही कळलंच नाही. दवाखान्याबाहेर आल्यानंतर जरा पुढेपर्यंत ते चालत गेले. गाडीजवळून ते थोडे पुढे गेले. कारण दवाखान्याच्या बाहेर येऊन डॉक्टर सगळं बघत होते. थोड्या अंतरापर्यंत अंतरापर्यंत मागून गाडी नेली आणि कैलास गाडीत बसला.

 अडनाव ऐकून डॉक्टरांनी हाकलून दिल्याचं कैलासनं मला सांगितलं. काय अडनाव सांगितलंत,' अस सरकारी डॉक्टरांनी विचारलं. कैलासनं गावित असं उत्तर देताच सरकारी डॉक्टर म्हणाले गावित हे अडनाव आदिवासी समाजात असतं आणि आदिवासी समाजात काहीही झालं तरी गर्भलिंगनिदान करत नाहीत. हे सगळ्या डॉक्टरांना माहित आहे. त्यामुळे तुम्हाला हाकलून दिलं असणार. मी म्हणाले. बघा ज्यांना आपण आदिवसी म्हणतो तेच सगळ्यांत सुसंस्कृत आहेत. किंबहुना त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील मुलींची संख्या टिकून आहे" खर तर स्टिंग ऑपरेशनच्यावेळी आम्ही पूर्ण भागाचा अभ्यास करतो. तिथली भाषा, राहणीमान, भागातील काही ठिकाणांचा माहिती, प्रमुख आडनांवासोबत येणाऱ्या जाती, धर्म सगळ्यांचा अभ्यास करायचा आणि मगच स्टिंगला सुरुवात करायची. परंतु यावेळी घाई झाली. डॉक्टरांना पकडायला जायचं म्हणजे प्रचंड ताण असतो. पण दुसऱ्या बाजूला मुली वाचवल्याचं समाधान असतं. तणावाच्या वेळी विनोदांमुळं वातावरण हलकं होतं. म्हणून मी म्हणला “आता दुसऱ्या दवाखान्यात जाऊ पण अडनाव काय सांगायचं हे नीट ठरवून घ्या" यावर सगळे हसले आता मी त्यांना युनिव्हर्सल अडनाव घ्यायला सांगितलं. पाटील कसं आहे छान ना ?

 संशयास्पद दवाखाने तपासायचे असं ठरलं. खरं तर आम्ही चमत्कारावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते नव्हे, पण इथं घडलेल्या चमत्काराला दहशतीची बाजू होती. चांगल्या कामामुळं निर्माण झालेली दहशत ! कोणाला तरी कुणकुण लागली, वर्षा देशपांडे आल्यात आणि दवाखाने धडाधड बंद करून डॉक्टर गायब झाले. एका दृष्टीने चांगलं झालं किमान भीती आहे, हे तरी समजलं, परंतु दवाखाने बंद करुन ते सगळे गर्भलिंगनिदान करणारे हेते की काय ? मी म्हणारले, "चला, संध्याकाळ होऊ लागली. अनोळखी परिसर, अनोळखी माणसं. निघूया. काळजी घेतलेली बरी!" गाडी वळवळी. गावातून बाहेर पडताना सोनोग्राफी व सरकारमान्य गर्भपात केंद्र असा फलक दिसला. मी गाडी थांबवायला सांगितलं आणि कैलासला आत जायला सांगितलं म्हटलं," कैलास, हा एवढा एक शेवटचा प्रयत्न करुन ये. मग नको थांबायला. थेट नंदुरबारला जाऊ."

 कैलास आणि ती ताई उतरली. कैलास आत गेला. दवाखाना रिकामा होता. काऊंटरवर एक सफारी घातलेला पुरुष बसला होता. त्यांच्याकडे विचारपूस केली," डॉक्टर कधी भेटतील ? ही माझी बहीण आहे. माझं नाव पाटील आहे. माझ्या बहिणीला पहिली मुलगी आहे. मी मुंबईला ड्रायव्हर आहे. बहिणीला इथंच दिलंय. तिला घरचे त्रास देतात, मुलगा पाहिजे म्हणून- "कैलासच्या बोलण्यानं तो जरा सावध झाला ; कारण भाषा वेगळी होती. परंतु कैलास हिंदीमिश्रित मराठीत बोलत राहिला. कैलास जरी मुंबईत राहत असला तरी तो आपल्याच भागातला असावा, यावर त्या माणसाचा विश्वास बसायला अर्धा तास गेला. कैलासच्या बहिणीची परिस्थिती ऐकून त्याच्यातलं बंधुप्रेम जागं झालं आणि म्हणाला " कोई फिकर नई.करु मई.. देखताव, फोन लागताव.." त्याने फोन लावला. पहिल्यांदा दवाखान्यात तो कंपाउंडर होता, त्या डॉक्टरांना त्यानं विचारलं. पलीकडून" चार दिवसांनी बोलाव," असं सांगितलं गेलं. परंतु कैलास म्हणाला, “चार दिवस राहणं शक्य नाही. माझी उद्या गाडीवर ड्युटी आहे. मुंबईला जायचंय. पैशाची काही काळजी करु नका. जास्त-कमी लागले तरी चालेल. पण बघा काही होतंय का.." कैलासनं त्या माणसाला घोळात घ्यायला सुरुवात केली. पैशाचा विषय निघाला तसा त्यानं फोन करायला सुरुवात केली. तीन ते चार ठिकाणी फोन केले. परंतु काय बोलणं झालं हे काही समजेना. शेवटी त्यानं सांगितलं., “तुम्ही आता जा. मी जरा नियोजन करून तुम्हाला रात्री फोन करतो. कैलासला मी सांगितलं होतं की, तुला खूपच घाई आहे. असे दाखवू नको. संशय येईल... त्या माणसाचा फोन नंबर एका कागदावर त्याच्या हस्ताक्षरात कैलासनं लिहून आणला. पुरावे तयार करण्याचा अनुभव त्याला होताच. याआधी १३ ते १४ स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांन प्रमुख भूमिका यशस्वी केल्या होत्या; परंतु आता हे स्टिंग ऑपरेशन होईल, याची शक्यता कमी वाटू लागली. दिवस फुकट गेला की काय असं वाटू लागलं. गाडी पुन्हा नंदुरबारच्या दिशेनं धावू लागली. आदिवासी संस्कृतीविषयी जाणून घेत. त्यांच्या कलेविषयी माहिती घेत प्रवास सुरु राहिला.

 तिकडे आदिवासी पाड्यांवर होळीदिवशी पारंपारिक वेशभूषा करुन स्त्रिया आणि पुरुष नृत्य करतात. वाद्य, गाणी, त्यांचा पेहराव- सगळं काही बघण्यासारखं असतं. शहरातल्या मनोरंजानाच्या साधनांपासून ते फार दूर आहेत. म्हणूनच ते सुसंस्कृत आहेत. गप्पा मारता-मारता कधी नंदुरबार आलं कळलंच नाही. हॉटेलवर उतरलो. डॉक्टर आमच्यासोबत थांबले आणि गाड़ी त्या ताईंना सोडायला गेली. फ्रेश झालो. चहा मागवला. चहा झाल्यानंतर मी कैलासला फोन करण्यास सांगितले. खिशातला कागद बाहेर काढून त्यांन फोन लावला. पहिल्यांनादा फोन उचलला नाही. पुन्हा लावला तेव्हा उचलला गेला, " हॅला, भाई मई कैलास बात करताउ - ओ हुई क्या बात?" तिकडून म्हणाला, “अरे, ओ नई बोलते है, नहीं होगा काम."

 मी कैलासवर ओरडले, “तुला जरा गळ घालता आली नाही का ? लाव परत फोन, कैलासनं परत फोन लावला, "हॅलो, भाई अरे देखो, कुछ तो करो, पैसे का टेन्शन नहीं, मै दूंगा, मगर काम होना चाहिये, मेरे लिए इतना करो भाई." तिकडून "देखता हूं, एकाद घंटे मे फोन करो," असं सांगितलं गेलं तेव्हा वाजले होते रात्रीचे दहा. पुढचं सगळं नियोजन करायचं होते. पैसे किती लागतली, याचा अंदाज नव्हता, अर्थात ते सगळं तिकडून होकार आला तर ! सरकारी डॉक्टरांनी जेवन करुन घेऊया, असे सांगितलं. जेवण रुमध्येच मागवलं. साधारण अकरा वाजता कैलासनं पुन्हा फोन केला आणि तिकडनू आवाज आला, "भाई देखो, मेरी बात हो गई है डॉक्टर के साथ, १५००० तो लगेगा." कैलासने त्याला जरा कमी करा; अशी विनंती केल्यावर “एक - दोन हजार कम होगा, सुबह मिलेंगे," कैलासं कुठे यायचं. हे विचारल्यवर मात्र त्यानं सांगण्यास नकार दिला. "सकाळी फोन करा, मग सांगतो, " म्हणला. तो किमान तयार झाला हे महत्त्वाचं होतं. पण काही अंदाज येईना. मी डॉक्टरांना एक सरकारी गाडी तयार ठेवायला सांगितलं आणि पैसेही सोबत ठेवायला सांगितलं. पंधरा हजारच्या नोटांचे नंबर प्रतिज्ञापत्रावर नोंदवयला सांगितले आणि सकाळी जायचंय, हा निरोप त्या ताईला पाठवला.

 रात्रभर मी विचार करत राहिले. तो माणूस आपल्याला कुठे नेईल? मी इथेच नंदुरबार शहरात आणेल? काहीच अंदाज येईना. परिस्थिती काय असेल याचा अंदाज येईना. परक्या गावात नवीन जागी झोपही लागेना. उजाडायची वाट बघत पडून राहिले. कोण असेल डॉक्टर ? किती मुली याआधी मारल्या असतील त्यानं ? माझ्या हातूनच त्याचं कल्याण होणार असं दिसतंय .. पहाटे कधीतरी झोप लागली. आठ वाजता गजर झाला तेव्हाच जाग आली. आवरुन कैलासला फोन करायला सांगितलं. यावेळी त्या भाईने दुसऱ्या रिंगला फोन उचलला आणि बरोबर दहा वाजता नंदूरबार एसटी स्टॅण्डवर यायला सांगितलं. मी सरकारी डॉक्टरांना फोन केला आणि दहा वाजता त्या ताईला सोबत घेऊन स्टॅण्ड परिसरात यायला सांगितलं.

 ठरल्याप्रमाणे पावणेदहाला स्टॅण्डवर दोघं उतरले. पुढचं काहीही नियोजन माहित नव्हतं. परंतु आम्ही गाफील अजिबात नव्हतो. सोबत महाराष्ट्र शासनाची गाडी होती. एक व्हिडिओ शूटींगवाला कॅमेरा घेऊन सोबत घेतला. कैलासने त्याच्यासोबत छुपे कॅमेरे घेतले होते. दहा वाजले तरी भाईचा पत्ता नाही ! दोघे स्टॅण्डवर थांबले होते. साडेदहा वाजले तरी भाई येईना. आता मला काळजी वाढू लागली. भाई बहुतेक गायब झाला, असं वाटू लागलं. मी कैलासला फोन केला आणि सांगितलं, “भाईला फोन कर," तेवढ्यात भाई दिसला आणि मी फोन कट केला. भाई कैलासजवळ आला आणि समोरच एका एसटीमध्ये बसायला सांगितलं. एसटी महामंडळाचा लाल डबा ! ते तिघं एसटीमध्ये चढल्याचं आम्ही पाहिलं. पण ते कुठं निघालेत, हे कळेना. एसटीचा बोर्ड लांबून वाचता येईना. फोन करावा तर गडबड होणार !

 मी आमच्या शासनाच्या गाडीच्या ड्रायव्हरला सांगितलं की, काही झालं तरी त्या एसटीच्या मागे-मागे गाडी चालवायची. पण संशय येता कामा नये. थोडं अंतर ठेवून गाडी चालवायची.. हे सांगत असेपर्यंत एसटी सुटली. कैलासचा मेसेज आला. सुरत ! एसटीचा वेग बेताचा होता. त्यामुळं कधीकधी नाईलाजाने आम्हाला तिला ओवरटेक करावं लागत होते. खिउकीत बसलेला कैलास आम्हाला दिसत होता. तोही बघून न बघितल्यासारखं करायचा. एसटीमध्ये कैलासने भाईशी गप्पा सुरु केल्या आणि त्याचा विश्वास संपादन करुन लागला. एसटीचा कंडक्टर आला. त्याने तिकीट विचारलं. कैलास तिघांचं सुरतपर्यंत तिकीट काढलं. पुरावा म्हणून तिकिटाचाही उपयोग होणार होत. जवळजवळ साडेतीन तास एसटीचा प्रवास सुरु होता. सोबतच्या ताईला भाई सतत प्रश्न विचारत होता. नवरा काय करतो, तू काय करतेस... असे तो विचारायला लागला. मग कैलास मध्येच म्हणायचा, “भाई काम व्हायला पाहिजे. प्लीज बघा कर का." भाईही लगेच म्हणायचा, " अरे फिकीर नको करु, मई हूंना." कैलासला सारखं मै हु ना" म्हणायचा. कैलास आणि भाईच्या गप्पा रंगात आल्याची संधी साधून सोबत आलेली ताई चक्क झोपून गेली. भाईनं प्रश्न विचारु नयेत म्हणून !

 हळूहळू एसटी सुरत शहराच्या जवळ आली. रस्त्यावरचे गुजराती बोर्ड दिसू लागले. तसा कैलास अलर्ट झाला. आम्ही मागे होतोच. शेवटी एसटी स्टॅण्डमध्ये गेली आणि गडबड झाली. कैलासचा संपर्क तुटला. कैलास कुठे गेला. हेच कळेना. फोन करावा तर भाईला संशय येणार. तिकडे एसटीमधून उतरल्यवर तिघे चहाला एका हॉटेलमध्ये गेले. कारण भाईला फोन करायचा होता. त्यानं फोन वरून डॉक्टरला माहिती दिली आणि चहा घेऊन ते स्टॅण्डपासून चालायला लागले. बऱ्याच वेळानं मेसेज आला- आम्ही रस्त्याने चालतो आहोत; परंतु ठिकाण सांगता येत नाही. कैलास गुजराती बोर्डही वाचता येईना. शेवटी त्याने भाईला" रिक्षा करुयात का" असं विचारलं तिघं रिक्षात बसले रिक्षावाल्यास कुठं जायचंय हे विचारले परंतु भाईलासुध्दा नीट पत्ता सांगता येईना. पुढे एका ठिकाणी रिक्षा थांबवली आणि भाई म्हणला," इथेच दवाखाना आहे. मी आलोच, तुम्ही थांबा !" असं म्हणून तो एका दवाखान्यात गेला. कैलासनं लगेच मला फोन लावला कुठे आहोत, असं त्यानं विचारलं तेव्हा मी त्याला समोरच्या रिक्षात बघायल्या सांगितलं. कैलासनं मला बघितलं आणि हुश्श झालं ! भाई डॉक्टरांना विचारायला गेलाय, असं कैलासनं मला सांगितलं. पण मला रिक्षात बघून कैलास जरा चाचपडलाच. त्याला काहीच कळेना. मी रिक्षातून कशी आले. हे त्याला ळेना. पण मी गाडी गर्दीतून निघत नसल्यामुळं आम्ही रिक्षा केल्याचं मी त्याला सांगितलं. रिक्षावाल्याला सांगितलं समोरच्या रिक्षाचा पाठलनाग करायचाय.

 भाई दवाखान्यातून बाहेर आला. डॉक्टर करायला तयार नाहीत, असं त्यांन कैलासला सांगितलं. झालं! सगळं मूळ केरात ! एवढा उपदव्याप करुन हाती काहीच नाही. कैलासही त्याच्यावर वैतागलना. तुम्हाला खात्री नव्हती तर कशाला आणलं एवढ्या लांब ? असं विचारलं. पण भाईसुध्दा नाराज झाला होता. आमच्या काळजीपोटी नव्हे, तर त्याला पैसे मिळणार नाहीत म्हणून ! पण तो थांबला नाही. तो कैलासला म्हणाला, “रुको, मेरी बहुत पहचान है, बहुत सारे डॉक्टर है. करता हूं कूछ" दोघांना चालतच त्यानं दुसऱ्या ठिकाणी नेलं. एका ठिकाणी थांबायला सांगितले जिना चढून दवाखान्यात गेला. पाच मिनिटांनी खाली आला. कैलासला आणि त्या ताईला वर बोलावलं डॉक्टरांनी केबिनबाहेर बसवलं. भाई केबिनमध्ये गेला. पंधरा मिनिटांनी ताईला आणि कैलासला आत बोलावलं. डॉक्टर म्हणला "का करताय? होऊद्या दुसरं. मग बघूयात. डिलिव्हरीनंतर कळणारच की काय होईल ते !"पण कैलासनं त्यांना गळ घालायला सुरुवात केली. इमोशनल ड्रामा केला. शेवटी तो "ठिक आहे, बसा बाहेर," असं म्हणाला आणि पुन्हा भाईला आत बोलावलं. भाई दहा मिनिटांनी बाहेर आला. त्याने थेट १३ हजारांची मागली केली. कैलासने हुशारीनं छुपा कॅमेरा ऑन केला आणि नोटा मोजण्यास सुरुवात केली. हळूहळू नोटा मोजत त्या कॅमेऱ्यासमोर आणल्या. पुन्हा 'मोजून घ्या, असे भाईला सांगताना तोही कॅमेऱ्यात नोटांसह दिसेल अशी काळजी घेतली. केबीनमध्ये गेल्यावर मेसेज केला. "काम सुरु आहे. पैसे घेतले."

 नंतर डॉक्टर केबीनबाहेर आला आणि फक्त ताईलाच घेऊन दुसरीकडे जाणार असल्याचं सांगितलं. ती थोडी घाबरली होती. पण कैलासने तिला काळजी करु नको असं सांगितलं. डॉक्टरला संशय येऊ देता कामा नये ! म्हणून कैलासनं सोबत जायचा आग्रही धरला नाही. डॉक्टर ताईला घेऊन जिना उतरला. तसा कैलासनं मला फोन केला. - "डॉक्टर खाली येतोय. पाठलाग करा." डॉक्टरांनी त्यांची गाडी घेतली. मी त्यांच्या मागे-मागे रिक्षानं गेले. त्यांनी ताईला एका मोठ्या सोनोग्राफी सेंटरमध्ये नेलं. अर्ध्या तासानं ते बाहेर आले. मला काय करावं हेच कळेना. या डॉक्टरला इथे पकडावं की.. मी गोंधळले. दरम्यान मी गुजरातच्या हेल्थ सेक्रेटरीशी संपर्क साधून सुरतमध्ये मदत लागेल असं सांगितलं. त्यांनी सुरक्षिततेसाठी एक पोलीस अधिकारी आणि तीन-चार पोलीस असा ताफा पाठवला. मी त्यांना कैलास ज्या हॉस्पिटलमध्ये थांबला होता त्याठिकाणी थांबायला सांगितलं. तपासणी करुन ते डॉक्टर परत आले आणि हॉस्पिटलकडे निघाले. कैलास तयारीतच होता. त्यानं कॅमेरा ऑन केला. पण त्या डॉक्टरने फक्त भाईला आत बोलावलं आणि त्याला सोनोग्राफीचा रिपोर्ट सांगितला. भाई बाहेर आला आणि मुलगी आहे, असं कैलासला सांगितलं. परंतु हेच वाक्य डॉक्टरच्या तोंडून ऐकणं, कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणं महत्त्वाचं होते.

 म्हणून कैलासनं दोन मिनिटं डॉक्टरांना भेटण्याची विनंती भाईजवळ केली. भाईने आत जाऊन विचारलं तेव्हा नाइलाजाने त्यानं परवानगी दिली. कैलास ताईला घेऊन गेला ऑडिओ आणि व्हिडीओ दोन्ही सुरु होतं. डॉक्टरसमोर उभं राहून कैलासने पुन्हा डॉक्टरला रिझल्ट विचारला. “ यांना सांगितला आहे,"असं डॉक्टरांनी भाईकडे बघून सांगितलं. कैलास म्हणाला, “ आपकी और उनकी जुबानी में फरक है, इसलिए वापस पूछा." डॉक्टरांनी लडकी है,. असे सांगितलं. बस ! काम झालं! पुढचं सगळं बोलणं बोणसच होतं. पुढे अर्धा तास कैलासनं डॉक्टराकडून चार पाच वेळा हेच वदवून घेतलं. नीट तपासल ना ? त्या दुसऱ्या डॉक्टरांनी कन्फर्म सांगितलं ना? वगैरे-वगैरे सोनोग्राफीवाल्या डॉक्टरचं नाव रेकॉर्ड व्हावं, याची काळजी घेऊन, काम फत्ते करून कैलास खाली आला. मी पोलिस, सर्व अधिकारी, पत्रकार असा मोठा ताफा घेऊन सज्ज होते. कैलासनं 'ओके' म्हटलं आणि आम्ही तुटून पडलो. डॉक्टरच्या केबिनमध्ये गेलो विचारपूस केली तर त्याने असं काही घडलंच नाही, म्हणून हात वर केले. मग कैलासला बोलावलं. त्या ताईला बोलावलं. भाईला ताब्यात घेतलं होतं. त्यालाही बोलावलं. तेव्हा डॉक्टरांनी यातल्या कुणालाच आपण ओळखत नाही. असं सांगितलं. मग मात्र मी त्याला चांगलंच फैलावर घेतलं. मराठीत चार शिव्या हासडल्या आणि कैलासला रेकॉर्डिंग दाखवायला लावलं. मग मात्र तो घाबरला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या गाडीत बसवलं.प्रेस फोटोग्राफर गोळा झालेले.

 आम्ही सगळे डॉक्टरला घेऊन सोनोग्राफी सेंटरमध्ये गेलो. तपासणी केली त्या डॉक्टरांनीही या डॉक्टरांना ओळखत नसल्याचं सांगितलं. मग मी सगळ्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. शहरात उघड असे प्रकार होतात. सुरतमध्ये मुलींच्या संख्येत घट होतेय आणि तुम्ही काहीच कसं करीत नाही. असे विचारलं हा प्रकार अधिकाऱ्यांना खजील करणारा होता. हे लोक कुठून कुठे स्टिंग ऑपरेशन करतात आणि आपल्या हातून काहीच घडलं नाही, असं त्यांना वाटलं. किंबहुना स्टिंग ऑपरेशनचं क्रेडिट आम्हाला मिळाल्याचाही त्यांना त्रास झाला. पण आम्हाला फक्त मुली वाचवणं महत्त्वाचं होतं. क्रेडिट वगैरेच्या पलीकडे आम्ही पोहोचलो होतो. सुरतच्या अधिकाऱ्यांनी सोनोग्राफी मशीन सील केल. आमचे जबाब नोंदवले. आमच्याकडून पुरावे घेतलं. पंचनामा नोंदवला. दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतलं. त्यांचे जबाब घेतलं. त्याचे जवाब घेतलं. तोपर्यंत रात्रीचे अकरा वाजले. सगळं संपवून आम्ही परत नंदुरबारच्या दिशेने निघालो मनात प्रचंड आनंद होता. मोहिम फत्ते झाली होती. तेवढयात एका पत्रकाराचा फोन आला. आपने कैसे किया ये सब ? कितने दूर से आकर.. और क्यू?" मी त्याला शांतपणे उत्तर दिले, "सूरत की सुरत बदलने के लिये." गाडीतील सगळे हसू लागले. प्रचंड आनंद झाला होता. स्वत:चाअभिमान वाटत

होता. कारण क्रॉस बॉर्डर स्टिंग ऑपरेशनची ही पहिलीच यशस्वी मोहिम होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लुट केली होती स्वराज्यासाठी धन मिळवण्यासाठी आता आम्ही सुरतेची लूट केली होती. मुली वाचवण्यासाठी !
मल्हार सिनेमा ते साकीनाका


 प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात काहीतरी क्रांतिकारी करण्याची इच्छा असते. आपल्या हातून समाजहिताचं काम व्हावं, त्या कामाचं लोकांनी कौतुक काहींनी सामाजिक कामाचाही धंदा मांडलाय, हे वेगळं,परंतु अजूनही काही प्रमाणिक कार्यकर्ते काम करत आहेत. त्यातला एक रविकांत तुपकर हा बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी हिरीरीनं लढणारा कार्यकर्ता. तो आमचा मित्र. मुली वाचवण्याच्या माझ्या कामाचं कौतुक वाटतं. ताई मलाही सहभाग नोंदवायचाय तुमच्या कामात," असं तो सारखं म्हणायचा. त्यांच्या मते, आम्ही म्हणजे स्टिंगचे किंग.' त्याची बायको वकिल आहे. तिचीही इच्छा होती. तिला आम्ही म्हणायचो, “शर्वरी तू प्रेग्नांट राहिली की डॉक्टर पकडायचा बर का !" तीही लगेच म्हणायची, "ताई तुम्ही सोबत असाल की कुठेही यायला मी तयार आहे.

 साताऱ्याहून बुलढाण्याचं अंतर जवळजवळ चारशे किलोमीटर. सहसा जाणं व्हायचं नाही. पण कार्यक्रमानिमित्त जात होते. महाराष्ट्रातील मुलींच्या संख्येत घट होत होती. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात मुलींची संख्या खूप कमी होती. सिंदखेडराजा म्हणजे जिजाऊंच माहेर आणि त्या ठिकाणी मलगी नको. ही मानसिकता असंण म्हणजे दिव्याखाली अंधार असंच म्हणावं लागेल. बुलढाणा जिल्ह्यातून मला खूप निमंत्रण येत असतं. परंतु अंतर जास्त असल्यामुळे काही महत्त्वाच्या कार्यक्रमालाच फक्त मी जात असे. काही अधिकाऱ्यांच्या कार्यशाळाही घेतल्या तिकडे गेलं की रविकांतकडे संध्याकाळचे जेवण, गप्पा आणि चळवळीतली गाणी असा बेत असायचा रविकांत आणि शर्वरी यांच्यामधील भांडणं, तक्रारी संगळं मी सोडवायची. अधिकारवाणीनं रागवायचीही!

 खरंतर हे सगळं कशाला सांगायचं असा प्रश्न पडेल. पण त्याचं उत्तर पुढे मिळेलच असो! आमच्या मुली वाचवण्याच्या चळवळीमध्ये प्रसारमाध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कधीकधी आमच्यासोबत येऊन स्टिंग ऑपरेशनाचा अनुभव पत्रकारांनी घेतला. अशाच एका नावाजलेल्या चॅनेलच्या मुंबईतल्या पत्रकार मैत्रिणींन स्टिंग ऑपरेशनमध्ये सहभागी व्हायची इच्छा व्यक्ती केली. मला स्टिंग ऑपरेशनमध्ये सहभागी व्हायचं आहे. माझ्याकडे माहिती आहे एका डॉक्टरची. साकीनाकामध्ये आहे तो डॉक्टर . बिनधास्त गर्भलिंगनिदान करतो आणि मुलगी असल्यास गर्भपातसुध्दा करतो. गर्भपात केलेले भ्रूणांचे फोटो मला दाखवले आहेत. आपण हे लवकरात लवकर थांबवायला पहिजे," तिच्याशी मी याआधीही बोलले होते. तशी ती खूप धडपडी होती, पण ती चॅनेलची प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार की वैयक्तिकरीत्या, हे स्पष्ट नव्हते. स्पष्टता यासाठी हवी की, स्टिंग झाल्यानंतर उद्या कोर्टात केस उभी राहीली, की साक्षीदार म्हणून पिंजऱ्यात उभं रहावं लागणार. केवळ डॉक्टरला पकडणंच महत्त्वाचं नाही. तर साक्षीपुरावे होऊन कोर्टात शिक्षा लागणं त्याहून महत्त्वाचं असतं. मी तिला तिची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. तिने तिच्या चॅनलच्या बॉसशी मला बोलण्यास सांगितलं. त्यानुसार, मी तिच्या बॉसशी बोलले. त्यांनी सहभागी होण्याची संमती मैत्रिणीला दिली. म्हणाले" वर्षाताई, तुम्ही असल्यानंतर मला कसलीच काळजी नाही. किमान चांगलं काम एकत्रित केल्याचं समाधान तरी मिळंल. माझी काही हरकत नाही. चला, एका काम तर झालं. मी तिला त्या डॉक्टरची भेटायची वेळ घेऊन ठेवायला सांगितलं. मी गरोदर महिला शोधून ठेवते. पण डॉक्टरची सगळी माहिती, वेळ सगळं पध्दतशीर झालं पाहिजे. बाकी संगळं माझ्यावर सोडून चला लागा कामाला असं मी सांगितलं.

 मी एक-एक फोन केले. कार्यकत्यांना विचारलं. कोणी गरोदर महिला असेल तर कळवायला सांगितलं. सगळीकड़े निरोप दिले. कारण खात्रीशीर गरोदर महिला मिळणं महत्त्वाचे. उद्या डॉक्टरला पकडल्यानंतर कोर्टात साक्षीला उभं राहावं लागेल. ती महिला स्टार विटनेस असेल. कोर्टात ती टिकली पाहिजे. तरच केस मजबूत होते. नाहीतर डॉक्टरची निर्दोष मुक्तता ठरलेली. पुन्हा कोर्टात केस उभी राहिल्यानंतर तारखा पडतात. या प्रक्रियेत दोन तीन वर्ष जातात. तोपर्यंत साक्षीदार सांभाळणं, गरोदर महिलेची काळजी घेणं, तिची प्रसूती सुखरूप होईल हे बघणं, बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या जन्मतारखेचा दाखला कोर्टात सादर करणं, खूप गुंतागुंत असते. या सगळ्या प्रक्रियेत गरोदर महिला ठाम राहिली पाहिजे. अशी कोण मिळेल ? शैलाताई म्हणाल्या, " रविकांतची बायको शर्वरी गरोदर आहे ना ? विचारा बर तिला ! मी लगेच फोन लावला. तिला बरोबर चौथा महिना होता. मी तिला विचारलं आणि रविकांतलाही सांगितलं. दोघेही आनंदानं तयार झाले. पण बुलढाणा ते मुंबई आणि पुन्हा बुलढाणा हा सगळा प्रवास कसा झेपणार असा प्रश्न त्याला पडला. मी त्याला सांगितले काही काळजी करून नको, मी माझी गाडी घेऊन येते आणि कैलास ड्रायव्हिंग करणार आहे. त्यामुळं सुरक्षित पोहाचेल." कैलासचं ड्रायव्हिंग उत्तम आहे. हे रविला सुध्दा माहित होतं. त्यामुळं त्यांना तयारी दर्शविली आणि कामाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला.

 मी आणि कैलास बुलढाण्याकडे निघालो. बुलढाणा ७० किलोमीटर राहिलं. तेव्हा वळिवाचा पाऊस सुरु झाला. पाऊस प्रचंड होता. पुढचा रस्तादेखील दिसेना. रात्रीचे साधारणअकरा वाजले होते. खरं तर आम्ही बारापर्यंत पोहाचयला हवं होतं. परंतु पोहोचायला तब्बल दोन वाजले. रवी तयारच होता. शर्वरीही तयार होती. आम्ही येणार म्हणून जेवायला वाट बघत बसले होते. दोघे रात्री दोन वाजता सगळे जेवलो आणि तीन वाजता पुन्हा प्रवास सुरु केला. बुलढाणा ते मुंबई नऊ वाजता पनवेलला पोहोचलो. माझी धाकटी बहिण मेघा डॉक्टर आहे. ती पनवेलला राहते शर्वरी आणि रविकांतला तिच्याकडे आराम करायला सांगितलं आणि आम्ही त्या पत्रकार मैत्रिणीला भेटायला आणि पुढच्या नियोजनासाठी मुंबईत पोहाचलो. मुंबईतली कामं संपवून पनवेलच्या दिशेने निघालो. मेघानं स्वयंपाक करुन ठेवला होता.

 स्टिंग म्हटले की, कार्यकर्त्यांची मदत लागते. गरोदर महिलेसोबत कधी आत्या बनून तर कधी मावशी बनून कुणीतरी ओळखीचं किंवा रक्ताचं लागतंच. आमच्याकडे आत्या, मावशीचा रोल पर्मनन्टली शैलाताई करतात. डोक्यावर पदर घेऊन पेशंटसोबत जातात. त्यांना साताऱ्याहन बोलावन घेतलं. सोबत मायाला घेऊन यायला सांगितलं. माया म्हणजे स्टिंगमधील कॉमन पर्सन. कुठंही, कशीही, कधीही माया स्टिंगमध्ये फिट बसते. शैला आणि माया साताऱ्याहून पनवेलला आल्या. मी येणार म्हटलं की मेघा खूश असते. रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारतो. तिला माझ्या कामाविषयी खूप आदर आहे. माझ्या कामाविष्यी जाणून घ्यायला ती उत्सूक असते. त्य दिवशी मुंबईतून पनवेलला पोहाचायला रात्रीचे नऊ वाजले होते. मेघा, तिचा नवरा सुधीर आणि मुलगी सूमेधा तिघेही वाटच बघत होते जेवणासाठी. सुधीर केरळाचा. त्यामुळं त्याची मराठी भाषा फार मजेशीर. भुकेने व्याकूळ झाला होता तो. म्हणाला अरे कधीपासुन मी भुकेली आहे, पोटामधी कावळा ओरडतो आहे. ' मी म्हटले, 'सुधीर भकेली नाही रे.. जेंडर बदलातेयस. मी भुकेला आहे. असं म्हणा दाजीबा' सगळे हसले आणि जेवायला बसले. जेवताजेवता सुधीरने मला विचारलं, अरे वर्षा, कायदेशीर गर्भ ऐसा कुछ होता हे क्या?" मी म्हटलं. कायदेशीर गर्भपात सही हे वर्ड है! ये कहना चाहते हो क्या ?" सुधीरने “हा, ऐसाही कुछ था रुक मैने फोटो निकाला है! ये मस्जिद बंदर स्टेशन के बाहर, सीढीया चढते समय ये बोर्ड चिपकाया था ! मुझे लगा की तू इसमे काम करती है ! कुए गलत भी रहेगा" असं म्हणत त्यांनी फोनमधून काढलेला फोटो मला दाखवला. त्यामध्ये कायदेशीर गर्भपात केंद्र. काही समस्या असल्यास संपर्क साधा,' असा बोर्ड होता. खाली पता, फोन नंबर होता. ठाण्यातील तीनहात नाका इथला पत्ता होता. दिलेल्या फोन वर फोन करुन बघावा म्हणून मी कैलासला फोन करण्यास सांगितलं. कैलासनं फोन लावला तर डॉक्टरांनी फोन उचलला. कोण, काय प्रत्यक्ष या आणि बोला, असं म्हणून सकाळी दहापर्यंत यायला सांगितलं. खरंतर ठाण्यात अपॉइमेंट मिळाली होती आणि सांकीनाकासुध्दा ! दोन अपॉइमेट मिळाल्यामुळे हे कसं काय निभावायचंय असा मला प्रश्न पडला. पण आधी आपण ठाण्यामध्ये त्या डॉक्टरला जाऊ भेटू, असं ठरवलं. त्याने सकाळी दहाची वेळ दिली होती. त्यानुसार सकाळी नऊ वाजता आवरुन आम्ही ठाण्याला जायचं ठरवलं.

 शर्वरी, रविकांत, शैलाताई, माया, कैलास आणि मी असे सगळे आमच्या गाडीतून निघालो. शर्वरीने काय सांगायचं, कैलासनं काय सांगायचं, दोघांमध्येही कोणतीही गफलत होता कामा नये, त्यासाठी मी त्यांना त्यांचे रोल काय आहेत ते समजून सांगितलं. मी म्हणाले,“ शर्वरी, तू चित्रकलेची शिक्षिका आहे, ड्रॉइंग क्लास घेतेस पनवेलमध्ये, असं सांग आणि कैलास तू नवरा आहेत आणि टुरिस्टचा व्यवसाय आहे, असं सांग." दोघांनी हो म्हटलं. तसं बघितलं तर शर्वरी वकील असल्यामुळे तिला अशा केसेसमध्ये काय करायचं हे चांगलंच माहिती होतं. आणि कैलासही स्टिंग ऑपरेशनमध्ये चांगला तयार झालेला होता. आम्ही हळूहळू ठाण्याच्या दिशेने जाऊ लागला. मी शर्वरीला एक मोबाईल दिला. त्यात कोणत्याही सिमकार्ड नव्हतं. फक्त होते मेमरीकार्ड. हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी त्याचा रेकॉर्डर ऑन करायचा. अशी सूचना आम्ही शर्वरीला दिली. कैलासकडे त्याचा छुपा कॅमेरा होताच. तिकडून पत्रकार मैत्रीण मला फोन करत होती. मी तिला ठाण्यामध्ये तीनहात नाक्याला भेटूयात असं सांगितलं. आम्ही तीनहात नाक्याला पोहाचलो. मल्हार सिनेमाच्या चौकात डॉक्टरचा दवाखाना होता. शर्वरी आणि कैलास ती पत्रकार मैत्रीण जायचं म्हणत होती. मी तिला जाण्यास सांगितलं. हे तिघे मिळून दावाखान्यात गेले. रविवार होता. त्यामुळे रस्त्यावर गर्दी कमी होती. मीही दवाखान्यापासून थोड्या दूरवर गाडीत थांबले होते. माझ्यासोबत रविकांत होता. रविकांत थोडा अस्वस्थ होता. बायकोला पहिल्यांदा त्यांना असल्या मोहिमेवर पाठवलं होते. खरंतर, त्याला सोबत जायचं होतं. ऐनवेळी काहीही होऊ शकत म्हणून त्याला सोबत बसवलं होतं. दुसरी एक गाडी आमच्या पाठीमागे उभी होती. त्यामध्ये शैलाताई आणि मायाताई अशा दोघी बसल्या होत्या. कैलास आणि शर्वरी स्टिंगला गेले तेव्हा मी आणि शैलाताईंनी ठाण्यातील सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करायला सुरुवात केली.

 रविवार दिवस असल्यामुळं कोणताही अधिकारी सापडत नव्हता. तरीसुध्दा वरपर्यंत अधिकाऱ्यांना कल्पना देऊन काही अधिकारी पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार मनपा आरोग्य अधिकारी आले. तिकडे कैलास, शर्वरी आणि ती पत्रकार मैत्रीण बसून राहिले. शर्वरीने पंजाबी ड्रेस घातला होता. ड्रेसच्या आत तिने मी दिलेला मोबाईल रेकॉर्ड ओन करून ठेवला होता. कैलासने कॅमेरा ऑन केला होता. पत्रकार मैत्रिणीने तिच्या डायरीमध्ये एक कॅमेरा आणला होता. कैलासने तिला कॅमेरा सावधपणे वापरायला सांगितलं. कारण डॉक्टरच्या थोडंजरी लक्षात आलं असतं तरी सगळं काम फिसकटलं असतं. ती कैलासला म्हणाली, “ मला सवय आहे. मी आधी भरपूर जणांचे स्टिंग केलं आहे." कैलास तिला म्हणाला," या स्टिंगमध्ये आणि इतर स्टिंगमध्ये फरक आहे. यामध्ये थोडी जरी गडबड झाली. डॉक्टरला शंका आली तरी काम फिसकटेल. त्यामुळे रिस्क नको." पण ती काही ऐकत नव्हती. तेव्हा कैलास तयार झाला.

 तिथे त्या बाकड्यावर एक बाई तिच्या गरोबर मुलीला घेऊन बसली होती. तिच्यासोबत आणखी एक बाई आलेली होती. कैलासने हॉस्पिटलवर नजर टाकली. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. कैलासने शर्वरीला हळूच सांगितलं, की आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे कोणतीही गडबड करायची नाही. शांतपणे जे चाललंय ते चालू द्यायचं. थोडया वेळांनं डॉक्टर केबिनच्या बाहेर आले. त्यांनी तिघांकडे पाहिलं. आपण फोन केला होता. याची आठवण कैलासने त्यांना करुन दिली. डॉक्टरांनी त्यांना बसायला सांगितलं आणि बाकडावर बसलेल्या त्या महिलांना बाजला घेऊन गेलं. त्यांच्याशी ते गर्भपात करण्याविषयी बोलत होते. गरोगर मुलीचं वय लहान असल्याचं दिसत होतं. तिचं एका मुलावर प्रेम होते पण घरच्यांना ते मान्य नव्हतं. तिचं पोट खाली करायचं होतं. त्या दोघींसोबत आणखी एक बाई होती. ती ते बाळ जन्माला आल्यावर, ज्यांना बाळ नाही त्यांना डॉक्टरांच्या मदतीनं विकणार होती. या सगळ्या चर्चा कैलास ऐकत होता. हा डॉक्टर दिसतो तेवढा साधा नाही. त्या बाईची एक संस्था मुंबईतपासून जवळच काम करत होती. डॉक्टरांनी त्या गरोदर महिला व तिच्या आईला दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं आणि घरी पाठवलं.  नंतर त्यांनी कैलास, शर्वरी आणि ती पत्रकार या तिघांना केबिनमध्ये बोलवलं. कैलास डॉक्टरांना म्हणाला, “ही माझी पत्नी आहे. तिला फिटसचा त्रास होतो. त्यामुळं आम्हाला एकच बाळ हवं आहे. पण मुलगाच पाहिजे. आम्ही इथले नसून बुलढाणा जिल्ह्यातले आहोत."असं सांगण्याचे कारण शर्वरीची भाषा थोडी वेगळी होती. डॉक्टरला शंका येऊ नये म्हणून असं सांगितलं. डॉक्टर चिडून कैलासवर ओरडले. म्हणाले,“कसले लोक तुम्ही ! तुम्हाला मुलगा हवा थांबू नका. निघा इथून. त्यावर कैलास म्हणाला, “चिडू नका. माझी आई हिला त्रास देते. तिला मुलगाच हवाय. गावाकडे कशी परिस्थिती तुम्हाल माहित असेलच. माझा नाइलाज आहे. मी कितीही खर्च करायला तयार आहेत. पण कृपा करुन आम्हाला मदत करा."

 डॉक्टरांनी विचारलं, "किती खर्च करणार? काय व्यवसाय करता तुम्ही?" त्यावर कैलासनं आपल्या गाड्यांचा व्यवसाय आहे, असं सांगितलं डॉक्टरांनी शर्वरीला चिारलं, “तू काय करतेस ग?" शर्वरी म्हणाली,"मी ड्रॉइंग क्लास घेते." त्यावर डॉक्टरांनी "कुठंही घेतेस," असं विचारलं. शर्वरी म्हणाली," पनवेलमध्ये."पनवेलला कुठे? डॉक्टरांचा प्रश्न. ती म्हणाली ," ब्रिजच्या पलीकडे." त्यावर, ब्रिजच्या पलीकडे म्हणजे नेमकं कुठं, असं डॉक्टर विचारु लागले. प्रश्नावर प्रश्न विचारायला त्यांनी सुरुवात केली. कैलासला या सगळ्याची सवय होती. डॉक्टर प्रश्न विचारतात, खात्री करून घेतात. आपल्याकडे किती पेशन्स आहे हे ते बघत असतात. शर्वरी थोडी काळजीत होती; पण तीही तयार होती. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली. डॉक्टरांनी तिला कोणती चित्र काढतेस? कशी काढतेस? असे प्रश्नही विचारले. शेवटी ते म्हणालो, “केबिनमध्ये जेवढी चित्रं दिसतायत, ती सगळी मी काढलीयेत माझं जीडी आर्ट झालेलं आहे." हे एकून कैलास आणि शर्वरी हबकलेच. शर्वरीनं इकडची-तिकडची उत्तरं दिली.

 नंतर त्यांनी पत्रकार मैत्रिणीकडे मोर्चा वळवला. तिला विचारलं,"तू काय करतेस? तू यांच्या सोबत कशी?" पत्रकार मैत्रिणीने सांगितलं," ही माझ्या शेजारी राहते. माझी मैत्रीण आहे." त्यांनी कैलासला आणि शर्वरीला बाहेर बसायला सांगितलं आणि त्या पत्रकार मुलीसोबत चर्चा केली. थोड्या वेळानं मैत्रीण बाहेर बसली. कैलासला आणि शर्वरीला डॉक्टरांनी पुन्हा केबिनमध्ये बोलावलं आणि सांगितलं. "मला त्या मुलीची शंका येते. ती मला पत्रकार वाटते." डॉक्टर हे वाक्य बोलले आणि कैलास एकदम शांत झाला.काय बोलावं कळेना. तो फक्त हो म्हटला. नंतर डॉक्टरांनी तुम्ही सगळं का करताय ? तुम्हाला सगळं परवडणार आहे का? त्याला खूप खर्च येता, अशी चर्चा करायला सुरुवात केली. हा आता गर्भलिंगदान करणार, हे निश्चित झालं. डॉक्टर पैशाची भाषा बोलू लागते. तेव्हाच कैलासनेही ओळखलं. त्यानं डॉक्टरांना सांगितलं की, तुम्ही पैशाची काळजी करु नका. किती खर्च येईल, असंही विचारलं. डॉक्टरने सांगितलं, खूप खर्च येईल. तुम्हाला तो परवडणार नाही. पण मला जरा शर्वरीला तपासायचं आहे, असं सांगून त्यानं शर्वरीला आत नेलं. ती तयार नव्हती. पण कैलासने 'काळजी करु नको,' असं सांगितलं.

 कैलासला वाटलं की, कदाचित हेच डॉक्टर सोनोग्राफी करणार आहेत. शर्वरीला कॅबिनमध्ये नेल्यावर डॉक्टरानी स्टेथोस्कोप तिच्या छातीवर लावला आणि खट-खट असा आवाज आला. त्यांनी विचारलं. कसला आवाज आला गं ? तिनं आत मोबाईल असल्याचं सांगितलं. ठिक आहे. असं डॉक्टर म्हणाले. तेव्हा शर्वरीला हायसं वाटलं.

 तपासणी झाली आणि डॉक्टर बाहेर आले. म्हणाले हे सगळं खूप रिस्की असतं. खूप काळजी घ्यावी लागते. अलीकडे कायदा खूप कडक झालेला आहे. हे बघा.. असं म्हणून त्यांनी सकाळ पेपर कैलाससमोर टाकला. पेपरमध्ये माझाच लेख होता. फोटोसहित. गर्भलिंनिदान कायद्याविषयी मुंबईमध्ये कसं दुर्लक्ष केल जातं आणि त्यामुळं मुलींची संख्या कशी कमी होत आहे. या विषयीचा तो लेख होता. लेख आणि माझा फोटो पाहिल्यावर कैलास आणि डॉक्टर एकमेकांकडे बघत राहिले. डॉक्टर म्हणाले. कळलं का आम्हाला फासाला लावाल. म्हणून आम्ही खूप काळजी घेतो आणि तुम्हाला ते परवडणारही नाही." कैलासने मात्र त्यांना पुन्हा एकदा खर्च किती येईल हाच प्रश्न विचारला त्यावर डॉक्टरांनी ९० हजारांचा आकडा सांगितला. कैलास म्हणाला," खूप खर्च आहे हो, मी एवढा खर्च करु शकत नाही. काही कमी होतात का बघा की!

 त्यावर डॉक्टर म्हणाले, 'अरे हे नव्वद हजाराचं पॅकेज असतं. त्यात गर्भलिंग निदान करून गर्भपातही करुन देतो. मुलगा असला तर काही प्रश्नच नाही. पण मुलगी असेल तरी जास्त पैसे द्यायचे नाही. त्या ९० हजारांमध्येच सगळं असतं. कैलासने त्यांना मला परवडणार नाही असं सांगितले. डॉक्टर म्हणाले,"तु मराठी माणूस आहेत म्हणून तुला साठ हजार रुपयात करुन देईन. याच्यापेक्षा कमी करून शकणार नाही." खरंतर एवढी मोठी रक्कम कैलासनं पहिल्यांदा ऐकली होती. पण हा डॉक्टर राजरोसपणे हा व्यवसाय करत होता. डॉक्टरांकडे सोनोग्राफी मशीन दिसत नव्हतं. बहुतेक डॉक्टर दोघांना सोनोग्राफीसाठी दुसरीकडे नेणार,अशी शंका कैलासला आली. डॉक्टरांनी एक फोन केला आणि विचारलं अरेज आज बैठोगे क्या? बहुतेक फोनवर बोलणार माणूस सोनोग्राफी करणारा असावा. थोडा वेळ त्याच्याशी गप्पा झाल्यानंतर डॉक्टरांनी फोन खाली ठेवला आणि कैलासला सांगितलं की, आज डॉक्टर बाहेरगावी आहेत. उद्या आपण हे सगळं करून. पण आज तुम्हाला अॅडव्हान्स मला द्यावा लागले. त्याशिवाय उद्या मी काय करू शकणार नाही. मला त्या डॉक्टरला आधी पैसे द्यावे लागतील. त्यावर कैलासने १०००० अॅडव्हान्स दिला. हे सगळं घडत असताना ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरु होते. दवाखान्यातून सगळे खाली उतरले. थोडं अंतर चालत गेले आणि त्यांच्या गाडी आल्यावर तिथे गाडीत बसले. मी कैलासला काय-काय झालं.हे विचारलं. कैलासले सगळी माहिती दिली आणि उद्या येताना त्या दुसऱ्या मुलीला घेऊन येऊ नका असं डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती दिली. त्याला तिची चांगलीच शंका आलेली होती. एवढी मोठी रक्कम जमवावी लागेल आणि तोपर्यंत कुणाला काही सांगू नका,' असं मी आलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं.

 तिथून आम्ही पुढच्या मोहिमेवर निघालो. साकीनाका येथे पत्रकार मैत्रिणीनं अपॉइमेंट घेऊन ठेवलेली होती. त्यानुसार आम्ही ठाण्याहून साकीनाक्याकडे मोर्चा वळवला. तिथल्या डॉक्टरकडे शैलाताई, शर्वरी आणि ती पत्रकार मैत्रीण असे सगळे गले. कैलास माझ्याजवळच थांबला. कारण सिस्टीम सोबत नेलेली होती. डॉक्टर त्यांची वाटच बघत होते. तिघी आत जातात डॉक्टरांनी तपासणी केली. ते स्वत: रेडिओलिस्ट होते. त्याच्याकडे मशीनही होतं. त्यांनी तपासणी केली आणि मुलगी आहे असं सांगितलं. एवढ्याबिनधास्तपणे त्यांनी सांगितलं याचं जरा आश्चर्यच वाटलं या लोकांना कायद्याचा धाक किती कमी आहे, हे जाणवलं. शैलाताईंनी त्याला दहा हजार रुपये रोख दिले. गर्भपात करायचा असल्यास जास्त पैसे द्यावे लागतील. असं डॉक्टर म्हणाले. शैलाताईंनी त्याला विचार करुन येतो' असे सांगितलं ते सगळं बाहेर आले. हे सगळं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत होतं. आम्ही सगळे दवाखान्या बाहेर उभे होतो. आमच्यासोबत अधिकारीसुध्दा होते. ठाण्याची आणि साकीनाक्याची हद्द वेगवेगळी असल्यामुळे आता वेगळेच अधिकारी आमच्यासोबत होते. शैलाताई, शर्वरी आणि पत्रकार मैत्रिणींन माझ्याकडे येऊन सगळा प्रकार सांगितला आणि तो रेकॉर्ड झालाय असंही सांगितलं.  माझ्यासोबत आरोग्य अधिकारी होते. आम्ही सगळे दवाखान्यात गेलो. छापा टाकला. सर्व कागदपत्रे घेतली. डॉक्टरांची चौकशी केली आणि नोटा बाहेर काढण्यास सांगितले. त्या नोटा शर्वरीच्या अफिडेव्हिटवर नोदवलेल्या होत्या नोटांचे नंबर एक-एक वाचून दिलेल्या नोटा त्याचा आहेत, याची खात्री करुन घेतली. सर्व नोटा बाहेर काढायला लावल्या सोनोग्राफी मशील सील करण्याची प्रक्रिया सुरु झाली. पत्रकारांना काही कळवायचं नाही, असं त्या पत्रकार मैत्रिणीला सांगितलं होते. त्याच कारण असं की जर ही बातमी उद्या पेपरमध्ये छापूर आली तर ठाण्याचा डॉक्टर सावध होईल आणि त्यामुळं ठाण्यातील कारवाई फसेल. शांतपणे कारवाई केली. उशीर झाला मुद्देमाल जप्त करणं. पंचनामा, जबाजबाब घेणं. सोनोग्राफी मशीन सील करणं. साक्षीदाराच्या सह्या हे सगळं काम संपायला दहा साडेदहा झाले. मुद्देमाल आरोग्य अधिकाऱ्यांच्या ताब्यात देउन आमची गाडी पुन्हा पनवेलाच्या दिशेनं धावू लागली. दिवसभराच्या धावपळीने सगळेच थकून गेले होते. पण दुसऱ्या याचा आनंद होता. रात्री बारा वाजता आम्ही पनवेलला पोहोचलो. सकाळी पुन्हा लवकर उठायचं असल्यामुळे सगळे झोपून गेले. मेघा जागी होती. नेहमीप्रमाणे तिला उत्सुकता होती. जाणून घ्यायची. रात्री दोनपर्यंत मी आणि मेघा गप्पा मारत बसलो. दिवसभरात काय काय झालं यांच रिपोटिंग मी तिला केल.

 सकाळी सगळ्यांनी पटापट आवरलं कैलासला डॉक्टरांना फोन करायला सांगितलं. त्यांनी फोन करुन किती येऊ असं विचारलं. डॉक्टरांनी दिलेल्या वेळेनुसार आम्ही निघालो. कॅमेरे, ऑडिओ, सिस्टीम चार्ज करुन घेतली होती. शर्वरीला मी विचारलं. बरी आहेस ना ? कालचा दिवस खूप ताणाखाली गेला होता. प्रवासही खूप झाला होता. पण शर्वरी फ्रेश होती. आम्ही ठाण्याच्या दवाखान्यात बरोबर अकरा वाजता पोहोचलो. डॉक्टर वाट बघत होते. त्यानी शर्वरी आणि कैलासला केबिनमध्ये बोलावलं. ती कालची मुलगी सोबत नाही ना आली ? असं विचारलं. दोघांनी नकार दिला. तिला जरा मुंबईची माहिती आहे म्हणून काल सोबतीला आणलं आज ती नाही आली. असं उत्तर कैलासं दिलं. डॉक्टरांनी विचारलं "तू पोलिसात नाहीस ना ? मला तू तसा वाटतोस." कैलास म्हाणाला नाही हो. मी कुठला पोलीस- साधा गाडीचा व्यवसाय आहे माझा. डॉक्टरांनी लगेच पुढचा प्रश्न विचारला. “काल आलेली ती मुलगी मला पत्रकार वाटत होती." दोघांनीही एकमेकांकडे बघितलं शर्वरीन ती तिची मैत्रिण असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं. निर्धास्त झाल्यावर डॉक्टरांनी उरलेल्या पैशाची मागणी केली. तीनहात नाक्यावर ठाणे मनपाचे आरोग्य अधिकाऱ्यांना पैसे घेऊन येण्यास सांगितलं होतं. त्याप्रमाणे ते आले होते. ठरल्याप्रमोण १०००० आणि नंतर ५०००० जमा करायचे होते. थोडी काळजी वाटत होती. साठ हजाराचा हिशोब कसा लागणार, दिलेले सगळे पैसे मिळाले पाहिजे.कैलासनं डॉक्टरांना ५०००० दिले. नंबर आमच्याकडे नोटांचे नंबर आमच्याकडे नोंदविले होते. पैसे मिळाल्यावर डॉक्टरांनी ड्रॉवर उघडला गाडीची चावी घेतली आणि चला म्हणाले. कैलासला सोबत घेतलंच नाही. त्यामुळे शर्वरी थोडी घाबरली. तिला कैलासनं समजून सांगितलं. काळजी करु नकोस. डॉक्टर सोबतच आहेत. डॉक्टराचे काहीतरी विसरल्यामुळे ते पुन्हा केबिनमध्ये गेले तेवढ्यात मी खाली उभी आहे आणि त्याच्या मागेच आहे असं कैलासने शर्वरीला सांगितले दरम्यान कोणतही इंजेक्शन किंवा औषध घेऊ नको.असं तिला आधीच बजावलं होतं. डॉक्टर बाहेर आले आणि शर्वरीला घेऊन लिफ्टमधून खाली उतरले. कैलासनं त्यांना चहा घेऊन येतो, असं सांगितलं. ते खाली उतरले तेवढ्यात कैलासने मला फोन लावला." ते दोघेही खाली उतरत आहेत. डॉक्टर त्यांच्या गाडीतून तिला घेऊन जात आहेत" असे त्यांन सांगितलं ते कुठे नेतात हे कैलासला माहित नव्हते. आम्ही खाली गाडी स्टार्ट करुन तयार राहिलो. डॉक्टरांनी शर्वरीला गाडीत बसवलं. आम्ही त्या गाडीचा पाठलाग करत होतो. सुरक्षति अंतर ठेवून आम्ही त्याच्या मागे-मागे होता. अर्धा तास गेल्यानंतर एका अपार्टमेंटजवळ गाडी थांबवली अपार्टमेंटच्या खाली काही गाळे होते. एका गाळ्यावर सोनोग्राफी सेंटर असा बोर्ड होता. शर्वरीला घेऊन डॉक्टर तिथं गेले. आमची गाडी आम्ही लांब थांबवली. कारण स्टिंग ऑपरेशन अजून पूर्ण झाले नव्हते. जवळजवळ एक तास शर्वरी आणि डॉक्टर दोघेही सोनोग्राफी सेंटरमध्ये होते. मी मायाला चक्कर मारुन यायला सांगितलं. माया आणि शैला दोघी सोनोग्राफी सेंटरमध्ये गेल्या. आत त्यांना बरीच गर्दी दिसली. डॉक्टर आणि शर्वरी दोघेही दिसत नव्हते यांचा अर्थ ते सोनोग्राफीसाठी आत गेले होते. इथल्या कंपाऊंडरनी शैलाला विचारलं काय करायचंय? कोणाकड़े आलात? कोणाला भेटायचं? आमचा पेशंट येणार होता, म्हणून आलो" असं शैलाताईंनी त्यांना सांगितलं त्या दोघी खाली उतरल्या. दहाच मिनिटांत डॉक्टर शर्वरीला घेऊन खली आले. पुन्हा गाडी बसले आणि गाडी परत तीन नाक्याकडे धावू लागली. आम्ही त्याच्या पाठीमागे होतो. डॉक्टर शर्वरीला घेऊन पुन्हा त्यांच्या दवाखान्यात आले. गाडी पार्क करुन पुन्हा लिफ्टने जाऊन त्यांच्या केबिनमध्ये गेले. डॉक्टरांनी कैलास आणि शर्वरीला केबिनमध्ये बोलावलं दोघेही शांत बसले होते. डॉक्टरांनी रिपोर्ट सांगायला सुरुवात केली. यवेळी रिपोर्ट चांगला नाही. मुलगी आहे असं म्हणला आणि दोघांनी चेहरी पाडले. तुम्ही व्यवस्थित बघितलंय ना, असं कैलासनं त्यांना विचारले खात्रीशीर आहेत ते डॉक्टरांची नजर तयार आहे त्यांचा, रिपोर्ट चुकीत नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे." डॉक्टरांनी उत्तर दिलं. पुढे काय करायचं? "कैलासने विचरलं डॉक्टर म्हणाले. “माझ्या पॅकेजप्रमाणे मुलगी असेल तर खाली करुन देणार. त्यामुळे अडमिट व्हा." शर्वरी म्हटली, "अडमिट होणार नाही. इंजेक्जन घेणार नाही. मला भीती वाटते. "कैलासनं तिला काही होणार नाही." अस सांगितलं. तरीसुधदा शर्वरी नकार देत होती. कैलासनं डॉक्टरांना नकी मुलगीच आहे का? असं विचारलं त्यावर डॉक्टर चिडलं. म्हणाले मी माझ्या डोळ्यांनं बघितलं आहे.सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांसुध्दा सांगितलं. आता तुम्ही निर्णय घ्या." शर्वरी पुन्हा नाही म्हणाली आणि तिथं त्यांचा ड्रामा सुरु झाला. शर्वरीला कैलास रागवायला लागला “तु इथे अडमिट हो, नाहीतर तुझ्या गावी निघून जा. माझ्या डोक्याला ताप नको देऊस" असा दंगा कैलासने घातला. शर्वरीनं रडायला सुरुवात केली. कानाखाली वाजवीन असं कैलास म्हणाला, तेव्हा डॉक्टर घाबरले आणि दोघांना शांत केलं. कैलासला बाहेर काढलं आणि ते शर्वरीचे कौन्सिलिंग करुन लागले. तिला समजून सांगू लागले. तिला अडमिट होण्याची विनंती केली. पुन्हा कैलासला आत बोलावलं. “तुमची बायको अडमिट व्हायला तयार आहे" असं सांगितलं. शर्वरीने इंजेक्शन न घेण्याचा निर्णय सांगितला.पण अडमिट व्हायला तयार झाली होती.

 नंतर शर्वरी एका रुमध्ये जाऊन झोपली. पलीकडच्या कॉटवर कालची मुलगी झोपलेली होती. तिच्या शेजारी एक छोटं बाळ होतं. डॉक्टर शर्वरीजवळ गेले आणि तिला सांगितलं."तु कशाला घाबरतेस ? ही बघ कालची मुलगी. रात्री डिलिव्हरी केली. आता घरी जाईल. एक दिवसाची प्रोसीजर असते. संध्याकाळी तुही घरी जाऊ शकते." असं सांगून त्यांनी शर्वरीला धीर द्यायचा प्रयत्न केला. कैलास शेजारी उभा होता. इतका विकृत डॉक्टर कसा असू शकतो. याचा विचार तो करता होता. ही विकृती शिक्षणामुळे तर नक्कीच आलेलली नसेल. मी ज्यूस घेऊन येतो. असं सांगून कैलास खाली उतरला. मी खाली होतेच. सर्व अधिकारी गोळा केले होते. संरक्षणासाठी पोलिसही होते. कैलासने खाली येऊन आम्हाला वर यायला सांगितलं. काम झालंय. असं म्हटल्याबरोबर ताफा घेऊन मी थेट दवाखान्यात गेले. डॉक्टर केबिनमध्ये होते. निघायच्या तयारीतच होते. त्याचा आजचा धंदा झाला होता. आम्ही सगळे आत गेलो. त्याला बसायला सांगितले आणि आधी खिशातील नोटा बाहेर काढ, असं मी म्हणलो. तो नाही नाही करुन लागला. मी तुम्हाला ओळखत नाही. मला काहीच माहिती नाही. माझ्याकडे कोणीच नव्हतं असं म्हणून लागला. शर्वरीला जिथं अॅडमिट केले होतं तिथं आम्ही सगळे गेलो. तिला का अडमिट केलंय असं विचारलं त्यावर त्यांच्या तिच्या पोटात दुखतंय असं कारण सांगितलं. आम्ही तिच्याच सोबत आलोय. याची कल्पना डॉक्टरांना त्या क्षणापर्यंत आली नव्हती

 “ पोटात मुलगी आहे. गर्भपात करण्यासाठी अडमिट केलंय." असं शर्वरी म्हणाली. तसे डॉक्टर बावचळले. त्यांनी सारवासारव करायला सुरुवात केली. आम्ही त्यांना पुन्हा त्याच्या केबिनमध्ये नेलं. सगळ्या नोटा काढायला सांगितल्या. ड्रॉव्हरमधल्या नोटा काढायला सुरवात केली. आमच्या नंबर नोंदवलेल्या नोटा बाजूला काढल्या मग मात्र डॉक्टर घामाघूम झाले. नोटांचे नंबर वाचले एकेक नोटा मिळू लागल्या. काही पैसे मिळाले नाही. त्याबद्दल विचारल्यानंतर ते पैसे सोनोग्राफी सेंटरवाल्या डॉक्टरांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही डॉक्टरांना सोबत घेतलं आणि सोनोग्राफी सेंटरवाल्या डॉक्टरांकडे गेलो. तिथं सगळ्या सेंटरची तपासणी केली आणि हे डॉक्टर आले होतेका, असं विचारलं त्यांनी ते मान्य केलं. पण मुलगा-मुलगी सांगितलं नाही. असं तो म्हणाला. दरम्यान या सगळ्या घटनंच रेकॉर्डिंग झाले होते. आणि ते रेकॉर्डिंग आम्ही त्याला ऐकवलं.

 दोन्ही डॉक्टर शांत झाले. कागदपत्रे, सोनोग्राफी मशीन, पुरावे असं संगळं गोळा केलं. मशीन सील केलं आणि पुढची सगळी कारवाई आरोग्य अधिकाऱ्यांनी पूर्ण केली. हजारो मुली वाचल्याचं समाधान आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आम्ही सगळेच खूश होता. सर्वांनी शर्वरीच अभिनंतदन केले तिच्या चेहऱ्यावर लढाई जिंकल्याचा आनंद होता. आपल्या हातून चांगलं काम घडलं म्हणून शर्वरीचं अभिनंदन केलं. तिच्या चेहऱ्यावर लढाई लिंकल्याचा आनंद होता. आपल्या हातून चांगलं काम घडलं म्हणून शर्वरीचा नवरा रविकांत खूश होता. सगळ्या चॅनल्सवर बातम्या सुरु झाल्या. पेपरवाल्यांनी गराडा घातला आणि मग आम्ही सगळे हिरो असल्याचा अविर्भावात मिरवत राहिलो शर्वरी तर म्हणाली,"माझ्या पोटी जिजाऊज येणार आहे." यानंतर आम्ही तिथून निघालो. हे सगळे होईपर्यंत रात्रीचा एक वाजला. आरोग्य अधिकारी आणि आम्ही रात्री एक वाजता एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो. सर्वानाच खूप आनंद झाला होता. डॉक्टर पकडला गेला म्हणून नव्हेत, तर हजारो मुली वाचतील, याचा आनंद होता तो. पुढे दोन वर्षांनी ही केस कोर्टात उभी राहिली. शर्वरीनं बुलढाण्याहून येऊन ठाणे कोर्टात साक्ष दिली. साक्ष एकदम मजबूत झाली. कैलासनंही जबरदस्त साक्ष दिली आणि शेवटी केसचा निकाल लागला. डॉक्टरांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा झाली.
डेस्टिनेशन बीड

 "आमच्या भागात तर उघडउघड चालतंय..." अशरुबा गोरे सहज बोलून गेला होता आणि त्याचे शब्द तंतोतंत खरेही ठरले होते. आमचा हा कार्यकर्ता केज तालुक्यातला. बीड जिल्ह्याची खडान्खडा माहिती असलेला. जन्माआधीच मुलींच्या जिवावर उठणाऱ्या आणि वैद्यकीय पेशाला कलंक लावणाऱ्या डॉक्टरांवर आम्ही कसं जाळं टाकतो, हे त्यानं पाहिलेलं. त्यानं दिलेल्या माहितीनुसार खरोखर सगळं काही अगदी उघड चाललंय, याचा अनुभव आम्हाला फोनवर बोलताना आलेला. त्यानंच दवाखान्यांचे नंबर मिळवलेले. आम्ही लैंडलाइनवरून फोन केले होते. "मुलगा आहे की मुलगी, हे तपासायचंय," असं २००७ मध्ये आम्ही चक्क फोनवरून उघडपणे बोलू शकलो होतो आणि पलीकडून भरभरून प्रतिसादही मिळाला होता. एकाच दिवसातल्या तब्बल आठ दवाखान्यांच्या अपॉइन्टमेन्ट्स, त्याही खुद्द बीड शहरातल्या, मिळवण्यात आम्हाला यश आलं होतं आणि आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात अपरिचित अशा या स्टिंग ऑपरेशनसाठी आम्ही निघालो होतो. बीड आजपावेतो फक्त नकाशावरच पाहिलेलं होतं.

 त्यावेळी आमची लाल रंगाची ट्रॅक्स होती. कैलासचं ड्रायव्हिंग सफाईदार होतं. गाडीत माझ्यासोबत शैलाताई, माया, बबलू आणि अवघडलेल्या अवस्थेतली सरिता. खरं तर आज घरच्यांचा थोडा हिरमोड करूनच मी बाहेर पडले होते. संजीवच्या प्रमोशनची आज पार्टी होती. विभागप्रमुख म्हणून आपल्या पतीला बढती मिळाली, या आनंदात असायला हवं होतं मी. आनंद होताच; पण आखलेल्या मोहिमेची धाकधूक पार्टीत रमू देत नव्हती. पार्टी संपल्यावर आमच्यापैकी कुणीच घरी गेलं नाही. सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच टार्गेट होतं आणि ते गाठणं फारसं सोपं नाही, याची सुज्ञ जाणीवही होती. मुक्कामापुरते कपडेलत्ते आणि जुजबी साहित्य इकडून-तिकडून जमा करून आम्ही स्टार्टर मारला, तेव्हा संध्याकाळचे सात वाजून गेले होते. अजिबात ठाऊक नसलेल्या रस्त्यावरून आम्ही प्रवास सुरू केला होता.  पंढरपूरमार्गे बीडच्या सर्किट हाउसवर पोहोचलो, तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते. मनात धाकधूक घेऊनच सगळे झोपले. सकाळी दवाखाने उघडायच्या वेळेपर्यंत आवरून तयारही झाले गाव अगदीच अपरिचित. कुणीच ओळखीचं नाही. एवढी सगळी ठिकाणं शोधायची कशी? हा प्रश्न होताच. पण 'अशा' ठिकाणांचे पत्ते रिक्षावाले अचूक सांगतात, हा आजवरचा अनुभव. त्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलचा पत्ताही एका रिक्षावाल्याकडूनच मिळाला. “फार लांब नाही; चला चालतच सोडतो," असं म्हणून तो आम्हाला हॉस्पिटल दाखवायला आला. हे हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलच्या अगदी समोर होतं. म्हणजे, ज्या सिव्हिल सर्जनने नियमबाह्य गोष्टींवर देखरेख करणं अपेक्षित असतं, त्यांच्या अगदी डोळ्यासमोर हे सगळं चाललं होतं! डॉक्टरांची वाट बघत काही पेशंट बसलेले; पण डॉक्टर गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात गुंतलेले. अनोळखी गावात आमच्या कामाचा श्रीगणेशा गणेश चतुर्थीलाच होत होता.

 आमच्यापैकी प्रत्येकाची कामं नेहमीप्रमाणं ठरलेली होती. सगळ्यांनी वेड पांघरून पेडगावला जायचं. काम फत्ते होईपर्यंत कुणी कुणाला ओळखसुद्धा द्यायची नाही. योग्य वेळी स्थानिक मीडियाला माहिती देण्याचं काम कैलासचं. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना माहिती देणं आणि पुढचे सोपस्कार करणं ही माझी जबाबदारी. तपासणी होईपर्यंत दवाखान्यातलं सगळं काम कुशलतेनं हाताळण्याचं काम शैलाताईंचं. बबलू, माया जणू आमच्याबरोबर नसल्यासारखेच. आमच्याकडे न पाहता परिस्थितीवर बारकाईनं नजर ठेवणारे. बाहेर गणपतीच्या मिरवणुकांचे आवाज, गुलालाची उधळण, बँडचे आवाज सुरू झालेले.

 गणपतीची पूजा आटोपून डॉक्टर बनियन आणि हाफ पँटवरच घरातून दवाखान्यात आले. बरेच पेशंट बसलेत हे बघून गणेश चतुर्थीला 'लक्ष्मी' घरी चालून आल्याचे प्रसन्न भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसले. सरिताची सोनोग्राफी केली. 'मुलगाच आहे; पण खात्री करून घेऊ,' असं डॉक्टर म्हणाले. या बाबतीतही डॉक्टर 'सेकंड ओपिनियन' घेतात हे आम्हाला नवीनच होतं! धाकधूक वाढत होती आणि डॉक्टरांनी ओपिनियनसाठी बोलावलेल्या व्यक्तीला बघून तर आम्ही चाटच पडलो. चक्क सिव्हिल हॉस्पिटलमधल्या रेडिओलॉजिस्टनाच त्यांनी बोलावून घेतल होतं. पुन्हा सोनोग्राफी झाली. 'मुलगाच आहे,' यावर त्यांचंही शिक्कामोर्तब झालं. निम्मं काम झालं होतं. आता कारवाईसाठी सिव्हिल सर्जनना बोलवायचं आणि हे सगळं गोपनीयरीत्या करून उरलेल्या सात अपॉइन्टमेन्ट्स आजच पूर्ण करायच्या, असं आमच्या मनात होतं.

 सिव्हिल सर्जनच्या घरीही बाप्पांची प्राणप्रतिष्ठा सुरू होती. आम्ही सगळे आरतीला उभे राहिलो. त्यानंतर त्यांना आमची ओळख सांगून घडलेला प्रकार सांगितला, तेव्हा 'कसला रे बाबा विघ्नहर्ता!' असं म्हणून कपाळावर आठ्या घेऊन ते आमच्यासोबत निघाले. दरम्यान, तोपर्यंत पत्रकारांना या प्रकरणाचा कसा सुगावा लागला कुणास ठाऊक! एकेक करून तब्बल साठ पत्रकार डॉक्टरांच्या दवाखान्यात जमले. खरं तर आठही स्टिंग ऑपरेशन एकाच दिवशी करून मीडियाला एकदम माहिती द्यायची असं आमचं ठरलं होतं. आम्ही सिव्हिल सर्जनना घेऊन डॉक्टरांच्या दवाखान्यात पोचलो तोपर्यंत डॉक्टर दवाखान्यातून पुन्हा घरात गेले होते. पण प्रसूतीसाठी एक महिला अॅडमिट होती आणि ती कळाही देऊ लागली होती, म्हणून डॉक्टर पुन्हा दवाखान्यात आले. त्या महिलेची प्रसूती झाल्यानंतर कारवाईस सहकार्य करण्याचं आश्वासन देऊन ते प्रसूती करण्यासाठी आत गेले.

 इकडे बाहेरच्या कक्षात पत्रकारांनी आमच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली होती. फोटो काढणं, शूटिंग वगैरे सुरू केलं होतं. या सगळ्या गदारोळात आम्ही डॉक्टर बाहेर येण्याची वाट बघत होतो. पंधरा मिनिटांनी मी कानोसा घेतला, तेव्हा पेशंट महिलेच्या कळांचे आवाज येईनासे झाले होते. आतून कुठलाच आवाज येत नव्हता. संशय आला म्हणून आम्ही आत गेलो, तेव्हा तिथं कुणीच नव्हतं. खिडकीतून आम्ही बघितलं, तेव्हा जवळच्या मैदानातून डॉक्टर पळताना दिसले... बनियन-हाफ पँटवरच! अशा प्रकारचा अनुभव आम्हाला पहिल्यांदाच येत होता. रंगेहाथ पकडल्यानंतर डॉक्टर मंडळी बहाणे सांगतात, आम्हाला ओळखायलाही नकार देतात, आपण असं काही केलंच नाही असं सांगू पाहतात, इथपर्यंतचे प्रकार आम्ही पाहिले होते. परंतु हे डॉक्टर तर चक्क खिडकीतून पळून गेले होते. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दरम्यानच्या काळात त्यांनी कुठून, कसं आणि कुठे पाठवलं, हे आम्हाला कळलंसुद्धा नाही. डॉक्टर पळून गेल्याचं कळल्यावर 'आता काय करणार,' असा प्रश्न पत्रकार आम्हाला विचारू लागले.

 सोनोग्राफी मशीन सील करण्यासाठी बेडशीट, लाख, मेणबत्ती, काडेपेटी असं साहित्य अशा वेळी आमच्यासोबत असतंच. सिव्हिल सर्जननी मशीन सील करायला सांगितलं आणि डॉक्टर बेपत्ता झालेत असं पत्रकारांना सांगितलं दवाखान्यातल्या फायली, रेकॉर्ड सगळं जप्त केलं आणि आम्ही सगळे पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल सर्जनच्या कक्षात आलो. दरम्यान, ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि शहरातले सगळे दवाखाने धडाधड बंद झाले. संपूर्ण शहरात तब्बल ऐंशी सोनोग्राफी सेंटर होती, ती सगळी बंद झाल्याचं कळलं. इकडे मीडियाला कारवाईची माहिती मिळालेली. त्यामुळं पुढची स्टिंग ऑपरेशन करणं अशक्य झालं होतं. उरलेल्या सात अपॉइन्टमेन्ट्स वाया जाणार असल्या, तरी एक समाधान होतं की, इतकं उघडउघड आपण यापुढं करू शकणार नाही, कधीतरी आपल्याला अडकावं लागेल, कुणीतरी मुली वाचवायचं काम करतंय, हे शहरातल्या डॉक्टर मंडळींना कळून चुकलं होतं.

 चांगल्या कामांसाठी लोकांचा पाठिंबा मिळवणं किती अवघड असतं! परंतु गैरकृत्यं करणारे आपल्या मागे कशी फौज उभी करू शकतात, हे त्या दिवशी आम्हाला समजलं. आम्ही सिव्हिल सर्जनच्या केबिनमध्ये असतानाच सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर अचानक अडीचशे ते तीनशे तरुण जमा झाले. आमच्या ट्रॅक्सला त्यांनी दुचाक्या आडव्या लावल्या होत्या. एका स्थानिक देवस्थानशी संबंधित ती 'सेना' होती आणि स्थानिक युवा नेता या जमावाचं नेतृत्व करत होता. कारवाई झालेले डॉक्टरसुद्धा या देवस्थानशी संबंधित असल्याचं समजलं. काही वेळानं तो युवा नेता सिव्हिल सर्जनच्या कक्षात आला आणि आम्हाला अद्वा-तद्वा बोलू लागला. आमच्यासारख्या बाहेरच्या मंडळींनी बीडमध्ये येऊन असं काही करणं त्याला बरंच झोंबलेलं होतं. नेमक्या त्याच वेळी लालूप्रसाद यादवांना अटक झाल्यामुळं बिहारमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती आणि महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नेते तातडीनं पाटण्याला रवाना झाले होते. त्यावेळच्या महिला आरोग्यमंत्री स्थानिक युवा नेत्याच्या प्रतिस्पर्धी पक्षातल्या होत्या. त्यामुळं त्यांच्याकडून 'सुपारी घेऊन आम्ही हे सगळं करीत आहोत आणि बीड शहराची त्यामुळं नाहक बदनामी होत आहे, असा सूर युवा नेत्यानं लावला होता.

 दरम्यान, तत्कालीन गृहमंत्र्यांना मी फोनवरून घटनेची माहिती दिली होती. त्यांनी सूत्रं हलवली आणि पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक असे वरिष्ठ अधिकारी तिथं दाखल झाले. युवा नेत्याला आमच्या ताकदीचा अंदाज आला. तरीही आम्ही काहीही गैर करत नाही आहोत, जे करतो आहोत ते आवश्यक आणि कायदेशीरच आहे, हे त्याला समजावणं आवश्यक वाटलं. मी म्हटलं, “नेते, या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरं होतायत. त्यामुळं लोकसभेचा एक आणि विधानसभेचे तीन मतदारसंघ कमी झालेत. आता मुलींची संख्या घटत चाललीय. एक हजार मुलांमागे साडेसहाशे मुली, एवढंच आजचं प्रमाण आहे. हे असंच राहिलं, तर पुढं लोकसंख्येचा समतोल कसा राहील? जिल्ह्यातले मतदारसंघ असेच कमी होत गेले तर तुमचं राजकीय भवितव्य काय? खरं तर तुम्ही आम्हाला थक्स म्हणायला हवं. बघा पटतंय का!"

 थेट राजकारणाशी जोडलेला हा मुद्दा युवा नेत्याला चटकन समजला; भिडला. शिवाय, “मी दारूचे धंदे उधळून आलेली बाई आहे. मला धमक्या देऊ नका," हेही सांगितल्यामुळं आणि पोलिस अधिकारीही आमच्यासाठीच तिथं आलेले असल्यामुळं त्याचा पारा उतरला होता. शेवटी कारवाईचं कामकाज पूर्ण झालेवर आम्ही सगळे त्याच्याबरोबरच खाली आलो. “या ताईला काही करायचं नाही. जाऊद्या ताईला," असं त्यानं जमलेल्या तरुणांना सांगितलं. आमच्याच गाडीच्या बॉनेटवर उभा राहिला आणि चक्क भाषण वगैरेही केलं. मग पुढे-मागं पोलिसांच्या गाड्या देऊन स्थानिक प्रशासनानं आम्हाला बीड जिल्ह्याच्या सीमेपर्यंत बंदोबस्तात सोडलं. पण हे सीमोल्लंघन तात्पुरतं ठरणार, हे त्यावेळी आम्हाला कुठं माहीत होतं! बीड जिल्ह्याच्या हद्दीतून बाहेर पडल्यावर पुन्हा या भागात येणंही होणार नाही, असं त्यावेळी वाटलं होतं. परंतु मुलींना जन्म नाकारण्याबरोबरच अनेक प्रश्न या भागात होते. ते एकात एक गुंतलेले होते. या जिल्ह्यातले असे असंख्य प्रश्न पुढं आम्हाला या जिल्ह्यात घेऊन येतील आणि इथले हजारो लोक पुढं आमच्याशी घट्ट जोडले जातील, याची पुसटशीही शंका जिल्ह्याची सीमा ओलांडताना आम्हाला आली नव्हती. पण... त्या दिशेनं प्रवास सुरू झाला होता. गाडी धावत होती साताऱ्याकडे; पण आमचं डेस्टिनेशन होतं बीड! पुढे बीड जिल्ह्यातल्याच शिरूर-कासार परिसरात मुली वाचवण्याचं आणि बालविवाह रोखण्याचं काम आमच्याकडून सुरू झालं आणि पाहता-पाहता त्या कामाचा प्रचंड विस्तार झाला. गरीब घरातले असंख्य लोक आमच्याशी जोडले गेले. प्रश्नांची गुंतागुंत समजून घेणं, त्यानुसार कामाची पद्धत आणि फोकस बदलणं हे सगळं बीड जिल्ह्यानंच तर आम्हाला दिलं.
जय-पराजयाच्या पलीकडे...

 मुक्तांगणमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम आम्ही सर्वप्रथम १९८९ मध्ये केला. कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रात निष्ठेनं काम करणारे एक डॉक्टर आले होते. कार्यक्रमानंतर आमच्या गप्पा रंगल्या आणि बोलता-बोलता त्यांनी आम्हाला एका संशयास्पद घटनेची माहिती दिली. सातारच्या पोवई नाक्यावर एका डॉक्टरांच्या दवाखान्यात छोटीशी खोली होती. दवाखान्याच्या सुटीदिवशी तिथं रांग लागायची. खूप मोठ्या प्रमाणावर काहीतरी चुकीचं चाललंय आणि त्याबाबत शहानिशा करायला हवी, असं ते सांगत होते. आम्हालाही सगळं विचित्र वाटलं. परंतु नेहमीच्या कामाच्या गडबडीत कालांतरानं आम्हाला या गोष्टीचा थोडा विसर पडला. आम्ही नुकतंच मोफत कायदेविषयक सल्ला आणि सहाय्य केंद्र सुरू केलं होतं. सहा महिन्यांनी एक धक्कादायक घटना घडली.

 एक माणूस प्लास्टिकच्या काळ्या पिशवीतून चक्क भ्रूण घेऊन आमच्याकडे आला. डॉक्टरांनी आपल्याला फसवलं, अशी त्याची तक्रार होती. पोवई नाक्यावरच्या 'त्याच' छोट्या खोलीत सुट्टीदिवशी येणाऱ्या डॉक्टरांविषयी त्याला आमच्याकडे तक्रार करायची होती. या डॉक्टरांनी मुलगी समजून मुलगा पाडला, असं तो सांगत होता. पाडलेला भ्रूण पिशवीतून घेऊन तो आमच्याकडे आला होता. परंतु त्यानंही गुन्हाच केला होता. पीएनडीटी कायदा नुकताच लागू झाला होता; त्यामुळं 'तुझ्यावर गुन्हा दाखल होईल, असा उलटा दम आम्ही त्याला दिला. त्यानं दिलेल्या माहितीनुसार, हे डॉक्टर कोल्हापूरहून साताऱ्यात येऊन हे प्रकार करतात, हे समजलं. योगायोगाची बाब म्हणजे शैलाताईंचं माहेर कोल्हापूरच. हे डॉक्टर राजारामपुरीत त्यांच्या शेजारीच राहायचे. शैलाताईंचं घर मोठं. घराच्या निम्म्या भागात होस्टेल होतं आणि निम्म्या भागात डॉक्टर राहायचे. इयत्ता चौथीत असतानाच डॉक्टरांचं कुटुंब तिथं राहायला आलं होतं. त्यामुळं डॉक्टर लहानपणापासून शैलाताईंच्या पाहण्यात होते. शैलाताईंचं लग्न झाल्यानंतर डॉक्टरांनी कोल्हापुरात मोठं हॉस्पिटल बांधलं. आणखीही एक 'कनेक्शन' जुळलं होतं. आतापर्यंत आम्ही तीन स्टिंग ऑपरेशन केली होती. त्यात पकडलेल्या एका डॉक्टरांनीच आम्हाला आव्हान दिलं होतं, “कोल्हापुरात जा की, तिथं जोरात चालतंय." असं तो म्हणाला होता.

 आंदोलनांमुळं आमची भीती चेपली होती. दारूबंदीसाठी केलेल्या आक्रमक आंदोलनांमुळं तुरुंगात जाणंही आमच्यासाठी नवीन राहिलं नव्हतं. नवा कायदा आल्यानंतर स्त्रीभ्रूणहत्येच्या विषयाला वाचा फुटली होती. लोकांमध्ये जागृती नव्हती; पण कुतूहल होतं. एक स्टिंग ऑपरेशन झालं की, त्यानंतर दहा-पंधरा दिवस त्याविषयी पेपरात लेख येत राहायचे. त्यामुळं कायद्याचा वचक निर्माण व्हायला खूप मदत होत होती. आम्हालाही स्टिंग ऑपरेशनबद्दल थ्रिल वाटू लागलं होतं. पण ते नुसतंच थ्रिल नव्हतं. त्याला कायदेशीर बाजू होती. स्टिंग ऑपरेशनची रूपरेषा, कार्यपद्धती आम्ही स्वतःच तयार केली होती. नोटांचे नंबर लिहून अॅफिडेव्हिट तयार करण्यापासून कोर्टात खटला चालवेपर्यंतचा रोडमॅप' तयार केला होता. मी आणि शैलाताई दोघीही वकील असूनसुद्धा आम्ही फौजदारी खटल्यांमध्ये वकिली केली नव्हती. 'फौजदारी प्रक्रिया संहितेचं अनुसरण करा,' असं पीएनडीटी कायद्यात म्हटलं होतं. त्यानुसार आम्ही आमची प्रक्रिया आखली होती. ताणतणाव न घेता कार्यकर्ते आव्हानं स्वीकारत होते आणि ही प्रक्रिया एन्जॉय करीत होते. गैरप्रकार करणाऱ्या डॉक्टरांबद्दल प्रत्येकाला चीड होती. त्यामुळं ज्याला जे करता येईल, ते तो करीत होता. आमची एनजीओ नव्हती; जवळ पैसा नव्हता. फक्त काम करण्याची उत्कट इच्छाशक्ती प्रत्येक कार्यकर्त्यात होती. हळूहळू प्रत्येक कामात एकेका कार्यकर्त्याचं 'स्पेशलायझेशन' होत गेलं. आंदोलनांमुळं रस्त्यावर येऊन ओरडण्याची सवय होती. मांढरदेव दुर्घटना किंवा दंगलींमध्ये मदतकार्य केल्यामुळं आपत्ती व्यवस्थापनाचंही कौशल्य बऱ्यापैकी आलं होतं. कार्यकर्ते थ्रिल म्हणून काम स्वीकारत होते.

 दरम्यान, 'जीने का अधिकार' नावाची डॉक्युमेन्टरी फिल्म तयार करण्यासाठी दिल्लीहून एक टीम आली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून तयार केल्या जात असलेल्या त्या डॉक्युमेन्टरीला युनिसेफकडून अर्थसाह्य मिळालं होतं. त्या फिल्ममेकरला पीएनडीटी कायद्यासंदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या बैठकीचं चित्रीकरण करायचं होतं. सल्लागार समितीची बैठक कोल्हापूरला सीपीआर हॉस्पिटलमध्ये होणारच होती. मी डॉक्युमेन्टरीच्या टीमला सांगितलं, “प्रत्यक्ष मीटिंगच घेऊ. तुम्हाला हवं ते चित्रीकरण करून घ्या." स्टींगच्या निमित्तानं कोल्हापूरला गेले, तेव्हा तिथल्या महिला- बालसंगोपन अधिकारी भेटल्या. मीटिंगनंतर तिनं नेमक्या त्याच' डॉक्टरांबद्दल काही संशयास्पद माहिती असल्याचं सांगितलं. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दिवसाला ५६-५६ गर्भपात झाल्याच्या नोंदी दिसत होत्या. रेकॉर्ड व्यवस्थित असलं आणि गर्भपात आपोआप झालेत असं नोंदवलं जात असलं, तरी संशय आहे, असं महिला-बालसंगोपन अधिकाऱ्यांनी सांगितलं. कारण संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी पाहता, गर्भपातांचा आकडा खूपच मोठा वाटत होता. त्या हॉस्पिटलचं रेकॉर्ड आम्ही तपासलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही पुन्हा गेलो. ज्या बायकांची 'मिस्ड अॅबॉर्शन' म्हणजे आपोआप झालेले गर्भपात दाखवले होते, त्या बायकांची माहिती घेतली असता, त्यातल्या बहुसंख्य बायकांना आधीच्या दोन-तीन मुली असल्याचं दिसून आलं. सगळं संशयास्पद होतं. मग आम्ही मोहीम आखण्याचा निर्णय घेतला आणि गर्भवतीचा शोध सुरू केला.

 एड्सविषयी ट्रकचालक आणि क्लिनर यांच्यात जागरूकता निर्माण करण्याच्या मोहिमेत आमच्यासोबत जमीर सय्यद काम करत होता. दारूबंदीसह अनेक चळवळींमध्ये आमच्यासोबत असायचा. त्याची बायको मुमताज गर्भवती होती. जमीर तयार झाला; पण घरी सांगावं लागेल, असं म्हणाला. मी त्याच्या घरी गेले. त्याच्या वडिलांचं चिकन सेंटर होतं. आमच्यासाठी त्यांनी चिकनचा बेत केला होता. मी जमीरच्या वडिलांना म्हटलं, “मुलींना वाचवायचं काम आम्ही करतोय. जमीर आणि मुमताजला आमच्यासोबत द्या." त्यांनी परवानगी दिली. आम्हाला अत्यंत प्रामाणिक आणि मुख्य म्हणजे कोर्टात टिकेल अशी साक्षीदार मिळाली. दोन दिवसांनंतर जायचं ठरवलं. बाकी तयारी सुरू होती. गुन्हेगार ज्याप्रमाणं गुन्ह्यापूर्वी रेकी करतात, त्याप्रमाणंच आम्हाला तयारी करावी लागायची. ज्या भागात जायचंय तिथली भाषा, परिसर, पोलिस स्टेशन किती अंतरावर आहे, गावात कुणी ओळखीचे, पाहुणे वगैरे आहेत का, त्या गावातली अडनावं, पेहराव हे सगळं माहीत करून घ्यावं लागायचं. तरच आपण आसपासच्या जिल्ह्यातून आलोय, असं सांगू शकतो. डॉक्टर मंडळी अशा वेळी खूप चौकशी करतात. कुणामार्फत आलात, असं विचारतात. त्यामुळं त्यांच्या संपर्कात असलेल्या डॉक्टरांची नावं शोधायला लागायची. शिवाय, इतर तयारीमध्ये सोनोग्राफी मशीन गुंडाळून सील करण्यासाठी बेडशीट, लाख, मेणबत्ती, काडेपेटी असं साहित्य जमवून ठेवायला लागायचं. प्रत्येकाचे रोल ठरलेले असायचे. ज्या जिल्ह्यात जायचं, तिथल्या सिव्हिल सर्जनचा नंबर मिळवायचो. ते कसे आहेत, सहकार्य करणारे आहेत का, पोलिस अधीक्षक कसे आहेत, याची माहिती घ्यायचो. गाडी किती अंतरावर उभी करायची, हेही ठरवून ठेवायचो.

 माया पवार, बबलू, शैलाताई (मावशी), कैलास सगळे तयार आहोत, असं सांगायचं ठरलं. हॉस्पिटलपासून पाच-सात घरं सोडून गाडी उभी केली आणि कार्यकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवून मी तिथंच बसून राहिले. कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये गेले, तेव्हा डॉक्टर कुत्र्याला फिरवायला घेऊन गेले होते. तिथल्या लोकांनी कार्यकर्त्यांची चौकशी केली, तेव्हा सरळ 'मुलगा-मुलगी बघायला आलोय,' असं त्यांनी सांगून टाकलं. इतक्या उघडपणे सगळं चाललं होतं. एजंटही कार्यरत आहेत, असं समजलं होतं. कुत्र्याला फिरवून डॉक्टर आले, तेव्हा वाटलं की, ते अंघोळ वगैरे करून येतील. पण ते लगेच करू,' म्हणाले. खर्च जास्त येईल, असं सांगून त्यांनी दोन हजार रुपयांचा आकडा सांगितला. शिवाय, मोठ्या रकमेच्याच नोटा द्यायच्या, असंही सांगितलं. आमच्याकडे नोटा आणि त्यांचे नंबर लिहिलेलं अॅफिडेव्हिट तयार होतं. हॉस्पिटलमध्ये हे सगळं सुरू असताना मी फोनाफोनी ना, याची खात्री केली. वेळ पडलीच तर अगदी मंत्रालयापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, अशी तयारी मी नेहमी करून ठेवत असे.

 डॉक्टरांनी पेशंटला आत बोलावलं. आपल्या सुनेलाही बोलावून घेतलं. सासरेबुवांनी ही सगळी प्रक्रिया पाहायला कौतुकानं सूनबाईंना बोलावलं होतं. शैलाताईंच्या पर्समध्ये छोटा टेपरेकॉर्डर सुरू होता. त्यातली कॅसेटसुद्धा खूप छोटी. फक्त ढाब्यावरच्या पानपट्टीत मिळायची. माया, शैलाताई सगळे समोर असताना सुनेला समजून सांगताना डॉक्टरांना चेव चढला. अशोभनीय भाषेत तो चवीनं सुनेला माहिती सांगत राहिले. पटकन आवरायचं सोडून टाइमपास करत राहिले. दोन हजार आधीच घेतले होते. अधिकारी येईपर्यंत टाइमपास करणं कार्यकत्यांना भाग होतं. फक्त कोणतंही इंजेक्शन घ्यायचं नाही, अशा सूचना आम्ही पेशंटला नेहमी द्यायचो. कैलास बाहेर उभा राहत असे. कोणीही एकमेकांना अशा वेळी ओळख देत नाहीत. डॉक्टरांनी पेशंटचं ब्लड आणि युरीन तपासून यायला सांगितलं. ते ठिकाण शेजारच्याच गल्लीत होतं. ब्लड-युरीनचे रिपोर्ट हादेखील अशा केसमध्ये पुरावा असतो. तपासणीसाठी जाता-येता कैलासनं मला माहिती दिली. मी सिव्हिल सर्जनच्या केबिनमध्ये गेले आणि 'आमच्यासोबत चला,' म्हणाले. "स्टिंग ऑपरेशन कुठं केलंय," हा सिव्हिल सर्जनचा पहिला प्रश्न होता. 'राजारामपुरीत' असं उत्तर देऊन मी त्यांना सोबत घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

 हॉस्पिटलमध्येच थांबले होते. पोटात मुलगी असल्यामुळं अॅडमिट झालेले इतरही पेशंट हॉस्पिटलमध्ये होते. डॉक्टर आल्यानंतर सिव्हिल सर्जनना घेऊन मी त्यांच्या केबिनमध्ये गेले. सोबत त्यांचा शिपाई आणि शैलाताईही होत्या. तोपर्यंत बाहेर कैलासनं कॉइनबॉक्सवरून फोन करून पत्रकारांना बोलावून घेतलं. दहाव्या मिनिटाला पंधरा-वीस पत्रकार तिथं पोहोचले. डॉक्टरांनी सुरुवातीला गर्भलिंगचिकित्सा केल्याचं नाकारलं. समोरच्या कुणालाही आपण ओळखत नाही, असं म्हणाले. तोपर्यंत डॉक्टरांच्या सूनबाईंनी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेल्या पेशंट्सना पळवून लावायला सुरुवात केली होती. डॉक्टरांची बायको आणि सासरेही आले. सगळेजण केबिनमध्ये येऊन पाया पडू लागले. पण दुसरीकडे डॉक्टरांनी आधीच 'माणसं' सांगून ठेवली होती, तीही हॉस्पिटलमध्ये आली. त्यातला एक पैलवान केबिनमध्ये आला. योगायोगानं तो मला ओळखणारा निघाला. म्हणाला, "ताई, तुमचं काम एकदम कायद्यानुसार असतंय. हा आमचाच एरिया आहे. पण आम्हीही तत्त्वं पाळणारी माणसं आहोत. बाईमाणसांना त्रास देणार नाही आम्ही. चालू द्या तुमचं. सगळं कायदेशीरच असणार."

 डॉक्टरांचा सासरा पाया पडून रडतच राहिला. शेवटी शैलाताईंनी मुमताज आणि माया पवार यांना गाडीत बसवलं. तेवढ्यात जमीर धावत आला. “पैसे घ्या; पण ओळखत नाही असं सांगा," असा जबाब देण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला जात होता. मग मी पोलिस ठाण्यात फोन करा, असं सिव्हिल सर्जनना सांगितलं. त्यांनी फोन लावला. पोलिस तिथं पोहोचले. पत्रकार ‘एफआयआर' होणार का, असं विचारू लागले. मग मी पत्रकारांना तसं होऊ शकत नाही, असं सांगून कायदेशीर बाबी समजून सांगितल्या. ही तक्रार पोलिसांकडून नव्हे तर सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दाखल केली जाते. पत्रकारांना तोपर्यंत ही बाब विचित्रच वाटत होती. पालिकेचे दोन वैद्यकीय अधिकारी तक्रार नोंदवायला आले. हे अधिकारीही मला ओळखत होते. तेवढ्यात डॉक्टरांच्या लैंडलाइंडवर प्रत्यक्ष मंत्रीमहोदयांचाच फोन आला. ते सिव्हिल सर्जनशी बोलले, माझ्याशी बोलले. 'अशा स्थितीत काय करता येईल,' असं मंत्रीमहोदयांनी मला विचारलं. मी म्हटलं, "आता फक्त कारवाई करता येईल. बाकी काही नाही." मंत्रीमहोदयही मला व्यक्तिशः ओळखत होते. डॉक्टरांच्या वतीनं शब्द वगैरे टाकण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. मग मात्र डॉक्टरांना कळून चुकलं... आपली धडगत नाही!

 दरम्यान, आमच्या पेशंटला जेव्हा अॅडमिट केलं होतं, त्यानंतर डॉक्टर पुन्हा एकदा कुत्र्याला फिरवायला घेऊन गेले होते. आम्ही दिलेले दोन हजार रुपये त्यांनी शर्टच्या खिशात ठेवल्याचं कार्यकत्यांनी बघितलं होतं. त्या नोटा हजर करा, असं सांगितल्यावर डॉक्टरांनी ते पैसे आणून समोर ठेवले. नोटा बाजूला काढून लखोट्यात घालायला मी सांगितलं. बाकी कुणाचा हात त्या नोटांना लागायला नको. नोटांवरचे नंबर आणि अॅफिडेव्हिटवरचे नंबर जुळवण्याचं काम सुरू असतानाच डॉक्टरांनी कुणाला काही कळायच्या आत नोटा फाडल्या आणि तोंडात टाकल्या नंतर टेबलवरच्या तांब्यातलं पाणी ते घटाघटा प्यायले. नोटा हा महत्त्वाचा पुरावा. तो नष्ट होत असल्याचं पाहून शैलाताई मोठमोठ्यांदा ओरडू लागल्या. मी डॉक्टरांचं बखोटं पकडून आतल्या बाजूला असलेल्या बेसिनजवळ नेलं आणि त्यांच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली. तशा डॉक्टरांनी तोंडातल्या नोटा बेसिनमध्ये टाकल्या. मी त्या नॅपकीननं उचलायला सांगितल्या. पेपरवर ठेवल्या आणि पंखा सुरू करून त्या वाळवल्या. मग सील करून, सह्या करून पुराव्याचं पाकीट तयार केलं. डॉक्टरला थोबाडीत बसल्या क्षणापासून सगळे अचानक स्तब्ध झाले होते. सगळे सरळ वाग लागले होते. नंतर आम्ही पत्रकारांना घटनेसंबंधी सविस्तर माहिती दिली. हा 'मेडिकल क्राइम' नसल्यामुळं महापालिकेचे आरोग्य अधिकारीच तक्रारदार असणं स्वाभाविक होतं. ही पोलिस केस नव्हती. तरीसुद्धा बंदोबस्ताला यावं लागलं म्हणून पोलिस खट्ट झाले.

 २००५ मध्ये केलेल्या या स्टिंग ऑपरेशनचा खटला २०१० मध्ये सुरू झाला. साक्षीदार, प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या साक्षी झाल्या. शैलाताई, माया यांचे जाबजबाब नोंदवले गेले. सगळ्यात शेवटी मुमताजची साक्ष होती. तिला भेटून आलो. दरम्यानच्या काळात ती बचत गटात काम करू लागली होती. 'उद्या घरी येते,' असं म्हणाली. दुसऱ्या दिवशी ती आली. आम्ही पोहे खात-खात तिला साक्ष देताना मानसिक संतुलन कसं राखायचं, याची माहिती दिली. उलटतपासणीबाबत मानसिकदृष्ट्या तयार केलं. ठरलेल्या तारखेला आम्ही कोल्हापूरला गेलो. “माझं काही चुकलं, तर माझ्याशी फारकत घेऊ नका," असं ती जाताना म्हणत होती. साक्ष देताना काहीतरी विसरण्याची शक्यता आहे, असा संदर्भ त्यामागे असावा, असं आम्हाला वाटलं. पण आम्ही तिची मानसिक तयारी करून घेतली. पण सरकारी वकिलांच्या लक्षात खरा प्रकार आला होता. ती सतत बाजूला जाऊन कुणाशीतरी मोबाइलवरून बोलायची. आम्ही वकिलांना सांगितलं, “शंका आली तर सरळ होस्टाइल डिक्लेअर करून टाका. फार प्रश्न विचारत बसू नका."

 मुमताजची साक्ष सुरू झाली. नाव, पत्ता आणि इतर प्राथमिक माहिती विचारणारे प्रश्न झाले. इथे कशासाठी आला होता, या प्रश्नावर तिने 'नातेवाइकांकडे आले होते,' असं उत्तर दिलं. शैलाताई जाधव आणि वर्षाताईंसोबत इथं आला होता का, या प्रश्नावर ती 'नाही' म्हणाली. यांच्यापैकी कुणालाच आपण ओळखत नाही, असं तिनं सांगून टाकलं. हॉस्पिटलमध्ये कशासाठी गेला होता, या प्रश्नाला तिनं 'पोटात दुखत होतं,' असं उत्तर दिलं. सरकारी वकिलांनी हरकत घेतली आणि तिला फितूर जाहीर करून टाकलं. सरकारी वकिलांनी बाहेर येऊन आम्हाला साक्षीदार फितूर झाल्याचं सांगितलं. आम्ही फार चिडचीड न करता परिस्थिती स्वीकारली आणि वकिलांच्या केबिनमध्ये गेलो. पाच महिन्यांचा गर्भ असल्यापासून प्रसूतीपर्यंतचा कालावधी रेकॉर्डवर आणावा, असा निर्णय झाला आणि त्यानुसार प्रश्न विचारले. मुलगी झाल्याचं मुमताजनं मान्य केलं. तिची जन्मतारीखही सांगितली.  त्यानंतर आम्ही इलेक्ट्रॉनिक पुरावा कोर्टासमोर आणायचा निर्णय घेतला. 'लेक लाडकी अभियान'च्या वतीनं हा पुरावा सादर करण्याची विनंती कोर्टानं अमान्य केली. प्राधिकृत अधिकाऱ्यांनीच या पुराव्यातले आवाज प्रमाणित करावेत, असं कोर्टानं सांगितलं. त्यानुसार ज्यांचे-ज्यांचे आवाज ऑडिओमध्ये होते, त्या सगळ्यांना बोलावलं. माझ्यासह सगळ्यांच्या आवाजाचे नमुने घेतले. मूळ सीडीत असलेल्या आवाजानुसारच बोलायचं आणि रेकॉर्ड करायचं. ते मूळ कॅसेटबरोबर ताडून पाहायचं, अशी ही प्रक्रिया होती. डॉक्टरांनी तर आवाज रेकॉर्ड करताना गाणंच म्हणायला सुरुवात केली. न्यायाधीशांच्या समोर दोन्ही कॅसेट सील केल्या आणि मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्या. प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंतच्या कालावधीत दोन पंचांच्या साक्षी झाल्या. त्यातला एक फितूर झाला. दुसरा मात्र जबाबावर कायम राहिला.

 दरम्यान, दोन्ही कॅसेटमधील सर्वांचे आवाज मिळतेजुळते असल्याचा अहवाल आला. अहवाल येण्यापूर्वी आम्ही सरकारतर्फे विशेष वकील या खटल्यात दिला जावा, अशी मागणी करणारा अर्ज दिला. महापालिकेनं सभेत तसा ठराव मंजूर केला आणि मुंबईच्या निष्णात वकिलांना तो पाठवला. ते वकील विमानानं कोल्हापूरला आले. परंतु त्यांना खटला चालवण्याची परवानगी खटल्यातल्या विद्यमान सरकारी वकिलांनी द्यावी लागते. न्यायालयासमोर तसं मान्य करावं लागतं. सरकारी वकिलांनी त्याला नकार दिला. “ही माझी केस आहे. सरकारनं मला दिली आहे. खटल्याचं आतापर्यंतचं कामकाज मी बघितलंय. मला कुणाची गरज नाही," असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं.

 निकाल लागला. स्टिंग ऑपरेशन झालं, त्यावेळेपर्यंत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गॅजेटनुसार समुचित प्राधिकारी म्हणून अधिसूचित करण्यात आलं नव्हतं. स्टिंग ऑपरेशनच्या तारखेनंतर साडेचार महिन्यांनी अधिसूचना निघाली, या कारणावरून डॉक्टरांना निर्दोष मुक्त करण्यात आलं. एक मोठी लढाई संपली होती. जय-पराजयाच्या पलीकडं जाऊन आम्ही एक प्रदीर्घ संघर्ष एन्जॉय केला होता.
अडथळ्यांची शर्यत


 डिस्कळच्या महिला मंडळातल्या बायका बोलायला अगदी मोकळ्या. याच मंडळातल्या बायडा मावशींकडून एका डॉटरांचं नाव ऐकलं. ते पुसेगावला गर्भवतींची तपासणी करतात आणि त्यांच्याकडे लिंगनिदानासाठी बायका जातात, अशी पक्की माहिती बायडा मावशींना होती. पुसेगाव हे खटाव तालुक्यात मध्यवर्ती गाव. आजूबाजूच्या गावांमधल्या बायकांना तिथं तपासणीसाठी जाणं सोयीचं होतं. त्यामुळं त्यांच्याकडे गर्दीही खूप असते, अशी माहिती मिळाली. पुसेगावच्या बसस्टैंडपासून फलांगभर अंतरावर डॉटरांच्या हॉस्पिटलची तीन मजली बिल्डिंग. तिथं घडत असलेल्या प्रकारांची माहिती मिळाली, तेव्हा मंडळातली एक महिला गरोदर होती. तिची ही तिसरी वेळ. पहिल्या दोन मुलीच. पण सततच्या बाळंतपणांनी ती फारच अशक्त झालेली. हिमोग्लोबिन चारवर आलेलं. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. अन्नान्नदशा म्हटलं तरी चालेल. एका वेळी दोनच माणसं मावतील एवढं छोटंसं घर. नुसते दगड एकावर एक रचून तयार केलेल्या भिंतींचं. डॉटरांच्याकडे तपासणीला तिला न्यायचं ठरलं. तिला बोलावून घेतलं. सगळं समजावून सांगितलं. त्या गर्भवती महिलेच्या एका मुलीला तिच्या सासूजवळ ठेवलं. डॉटर तपासणीसाठी दोन हजार रुपये घ्यायचे. ती रक्कम महिलेकडं देऊन तसं अंडरटेकिंग स्टैपपेपरवर घेतलं. सिव्हिल सर्जनना आमच्या मोहिमेची माहिती कळवली. ते स्वतःच येतो म्हणाले. परंतु अधिकृतरीत्या वडूजच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही बोलावणं आवश्यक होतं.

 हॉस्पिटलमध्ये गेल्या-गेल्या पहिला धक्का बसला. हॉस्पिटलमध्ये जागोजागी बाटल्यांमध्ये मानवी अवयव ठेवल्याचं दिसलं. खरं तर ते स्त्रीरोगतज्ज्ञ होते; सर्जन नव्हे. तरी हे अवयव हॉस्पिटलमध्ये कसे काय ठेवलेत, हेच कार्यकर्त्यांना समजेना. मी आणि कैलास लांब रस्त्यावर गाडीतच थांबलो होतो. हॉस्पिटलमधून बाहेर पडणाऱ्या काही पेशंटना कैलास गाठत होता. त्याच्याकडे ओळखी काढण्याचं, बोलण्याचं भलतंच कौशल्य. त्याचा पुरेपूर वापर करून त्यानं काही पेशंटच्या हातातल्या फायली मिळवल्या आणि त्यातल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढून घेतल्या. बायडाबाई आणि शैलाताई गर्भवती महिलेसोबत हॉस्पिटलमध्ये होत्या. त्याच आमच्या साक्षीदार.

 सिव्हिल सर्जन येईपर्यंत अनेकांशी बोलून आम्ही काही माहिती मिळवली होती आणि ती धक्कादायक होती. डॉक्टरांकडे गर्भलिंगनिदान करण्यासाठी बायकांना घेऊन येणाऱ्यांमध्ये त्या भागातल्या शिक्षकांची संख्या जास्त होती. खटावच्या एका कॉलेजचा शिपाईच शिक्षकांना तिथं घेऊन यायचा. कोणत्याही शिक्षकाला तिसरं मूल झालं तर नियमानुसार त्याची नोकरी जाते. म्हणजे, दोनच मुलांवर थांबायला हवं आणि त्यात एखादा मुलगा हवाच! डॉक्टरांचे वडीलही शिक्षकच आहेत, अशीही माहिती मिळाली. म्हणजेच, मोठ्या हुशारीनं नेटवर्क तयार केल्याचं दिसत होतं.

 आमच्या पेशंटचा नंबर आला, तेव्हा शैलाताई आणि बायडा मावशी तिच्याबरोबर आत गेल्या. शैलाताई खरंतर तिच्या नातेवाईक वाटत नव्हत्या, पण संशय येऊनसुद्धा डॉक्टरांनी कन्सेन्ट घेतली नाही. तपासणी केली आणि तिच्या पोटात मुलगी आहे, असं सांगितलं. तेवढ्या वेळात सिव्हिल सर्जन पुसेगावात पोहोचले होते. इशाऱ्याचा मेसेज येताच त्यांना घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरांनी सिव्हिल सर्जनना, का आलाय, असं विचारलं, तेव्हा इन्स्पेक्शनसाठी आलोय, असं ते म्हणाले. मग डॉक्टरांनी आम्हा सगळ्यांना कोल्ड्रिंक पाजलं. सकाळपासून किती सोनोग्राफी झाल्या, असं सिव्हिल सर्जननी डॉक्टरांना विचारलं. दोन-तीनच सोनोग्राफी झाल्यात, असं त्यांनी सांगितलं. पण, इकडे कैलासच्या हातात मात्र दहा-बारा कागद जमले होते. पेशंटच्या फायलींमधून झेरॉक्स काढून घेतलेले! हॉस्पिटलमधलं रेकॉर्ड तपासलं, तेव्हा यापैकी एकाही सोनोग्राफीचं रेकॉर्डच ठेवलं नाहीये, हे लक्षात आलं. आमच्या पेशंटचे तर कोणतेही कागदपत्र नव्हते, पण तिला सोनोग्राफीचा रिपोर्ट मात्र दिला होता. कैलासकडे जमलेल्या कागदपत्रांनुसार पेशंटचं रेकॉर्ड हॉस्पिटलनं ठेवलेलं नव्हतं, म्हणजेच काहीतरी गडबड आहे, हे स्पष्ट होतं.

 मग आम्ही पेशंटला आणि शैलाताईंना डॉक्टरांच्या केबिनमध्ये बोलावलं, तेव्हा तर डॉक्टरांनी कहरच केला. आमच्या पेशंटची सोनोग्राफी आपण केलीच नाही, असं ते म्हणू लागले. कन्सेन्ट तर घेतलाच नव्हता. पण पेशंटकडे रिपोर्टचा कागद होता. सोनोग्राफीसाठी किती फी घेता, असं विचारलं तेव्हा डॉक्टरांनी पाचशेचा आकडा सांगितला. मग या पेशंटकडून दोन हजार का घेतलेत ? रेकॉर्ड का ठेवलं नाहीत? अशी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर डॉक्टरांची पुरती भंबेरी उडाली आणि आमच्या पेशंटची सोनोग्राफी केल्याचं त्यांनी कबूल केलं. पण मुलगा की मुलगी, हे मात्र मी सांगितलं नाही, असंच ते अजूनही म्हणत होते. आपल्याकडून चूक झाल्याचं मात्र त्यांनी मान्य केलं. मग डॉक्टरांच्या कार्यशाळेत त्यांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांचं नेमकं काय चुकलं याचं स्टेटमेन्ट डॉक्टरांकडून लिहून घेतलं. सोनोग्राफीसाठी दोन हजार रुपये घेतले, त्या नोटा हॉस्पिटलमध्ये मिळून आल्या, हे कायद्याचं उल्लंघन आहे, असं पुन्हा करणार नाही, असं स्टेटमेन्ट त्यांनी लिहून दिलं.

 वडूजच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच या प्रकरणात प्राधिकृत अधिकारी म्हणून कागदपत्रं ताब्यात घेणं अपेक्षित होतं. पण ते लवकर येईनात. दोन साक्षीदारांचे जबाब आणि इतर कागदपत्रं त्यांच्या ताब्यात देऊन आम्हाला लवकरात लवकर निघायचं होतं. कारण डॉक्टरांनीच दिलेल्या माहितीनुसार, कोरेगावजवळ सातारारोड हद्दीतसुद्धा हा प्रकार सुरू होता. तिथं आणखी एक डॉक्टर असे प्रकार करतात, हे आत्ताच समजलं होतं. अनायसे पेशंट मच्याबरोबरच होती. अंतरही फार नव्हतं. आम्ही पुसेगाव सोडल्यावर काही उलटसुलट होऊ नये म्हणून बबलू या आमच्या एका कार्यकर्त्यासह शैलाताई पुसेगावच्या हॉस्पिटलमध्येच थांबल्या. सोबत सिव्हिल सर्जनचा शिपाई आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारीही थांबला. पोलिस स्टेशनला ही माहिती देऊन ठेवली आणि आम्ही कोरेगावच्या दिशेनं निघालो.

 मनात विचारांचं चक्र सुरू झालं. अंडर रिपोर्टिंग, म्हणजे सोनोग्राफी कागदोपत्री न दाखवण्याचं प्रमाण किती प्रचंड आहे, याचा अंदाज डॉक्टरांचं रेकॉर्ड पाहून आला होता. अशी कितीतरी सोनोग्राफी सेंटर असतील! कलर डॉपलर सोनोग्राफी मशीन विकत घ्यायला २१ लाख रुपये लागतात. कर्ज काढलं तर साठ हजारांचा मासिक हप्ता द्यावा लागत असणार. रोज किमान २५ पेशंट तपासले, तरच वेळच्या वेळी हप्ते भरणं शक्य आहे. पण कर्ज देताना बँकेकडून किमान प्रश्नही विचारले जाऊ नयेत, याचं नवल वाटलं. बँकांना फक्त कर्जाच्या परतफेडीत आणि व्याजातच रस. पण सोनोग्राफीचं यंत्र घेतल्यावर केला जाणारा व्यवसाय कायदेशीर असणार का? सोनोग्राफी करण्याचा परवाना कायदेशीर आहे का? कर्ज काढून घेतलेल्या मशीनच्या साह्यानं गुन्हे तर होणार नाहीत ना? वैद्यकीय पेशातली मूलभूत तत्त्वं पाळली जाणार का? या प्रश्नांशी बँकांना काहीच सोयरसुतक नाही. डॉक्टरची डिग्री बघून लगेच कर्ज मंजूर! घर बांधण्यासाठी कर्ज काढायचं म्हटलं तर याच बँका किती चौकशा करतात. जागा निर्वेध आहे की नाही? जागेवर पूर्वीचं कर्ज आहे का? मालकीचा पन्नास वर्षांचा इतिहास... असं सगळं तपासतात. पण डॉक्टरांना कर्ज देताना सवालजवाब नाहीत आणि शंकाकुशंकाही नाहीत. ज्या भागात डॉक्टर सोनोग्राफी सेंटर उभारणार, त्या भागात कायदेशीर व्यवसाय करायचा म्हटलं, तर कर्जाची परतफेड करण्याइतका व्यवसाय होईल का, असाही प्रश्न बँकांच्या अधिकाऱ्यांना पडत नाही. पुसेगावच्या डॉक्टरांच्या एकाच प्रकरणात, एकाच दिवशी... नव्हे काही तासांत सोनोग्राफी केल्याचे बारा कागद आम्हाला हातात मिळाले. रेकॉर्डवर फक्त दोन सोनोग्राफी झाल्याचं दिसतंय. म्हणजेच, उरलेल्या दहा केसेसमध्ये गर्भलिंग चाचणी झाली असण्याची शक्यता आहेच. हे सगळं आम्ही पुराव्यासह रेकॉर्डवर आणलं होतं. आता दिवसातलं आमचं दुसरं टार्गेट होतं सातारारोड...!

 आजचा दिवस जणू धक्यांवर धक्के देण्यासाठीच उगवला होता. सातारारोडला पोहोचलो तेव्हा समजलं, डॉक्टरांचा दवाखाना तिथल्या पोलिस औटपोस्टपासून शंभर पावलांपेक्षाही कमी अंतरावर... आणि मिळालेल्या माहितीनुसार, तिथं गर्भलिंग चाचणीचा व्यवसाय मात्र प्रचंड प्रमाणात सुरू होता. डॉक्टर राहायला होते साताऱ्यात. पुसेगावच्या डॉक्टरांनी पेशंट पाठवलाय, असा निरोप मिळाल्याबरोबर साताऱ्याहून धावतपळत ते दवाखान्यात हजर झाले. नेहमीप्रमाणं आम्ही थोडं लांबच थांबलो होतो. पेशंटसोबत दवाखान्यात जाण्यासाठी द्रुपदा मावशी आणि माया या दोघींना बोलावून घेतलं होतं. पेशंटची दिवसातली दुसरी सोनोग्राफी झाली. शंभर टक्के मुलगीच आहे, असं डॉक्टरांनी ठासून सांगितलं. १५ ते २० मिनिटांत आम्ही दवाखान्यात पोहोचलो. तक्रार दाखल करण्यासाठी कोरेगावच्या सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावलं. एव्हाना सिव्हिल सर्जन साताऱ्याला गेले होते. प्राधिकृत अधिकारी म्हणून कोरेगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं. अचानक झालेल्या कारवाईमुळं डॉक्टर अक्षरशः रडायला लागले. हे सगळं होईपर्यंत यांच्या पत्नी साताऱ्याहून धावत आल्या. त्याही गयावया करू लागल्या. त्याही पेशानं डॉक्टर. “सोनोग्राफी मशीनवर आमचं पोट आहे, ते सील करू नका, अशी विनवणी नवरा-बायको करू लागले. दरम्यान, या कारवाईत आम्हाला भक्कम ऑडिओ पुरावा मिळाला होता. सोबत आणलेला हँडीकॅम पुसेगावातल्या मंडळींजवळच राहिला होता. पण शूटिंग करणारा कार्यकर्ता आमच्यासोबतच होता. त्यानं सगळं शूटिंग करून घेतलं. डॉक्टरांना दिलेल्या नोटा जप्त झाल्या. मशीन सील झालं आणि आम्ही सातारला आलो. दिवसात दोन स्टिंग ऑपरेशन फत्ते झाली होती.

 आपल्याकडे गुन्हे करणाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी एवढी सगळी मेहनत करावी लागते. एवढं मनुष्यबळ राबत असतं गैरप्रकार रोखण्यासाठी... पण दुर्दैवानं, त्याहून अधिक मेहनत घ्यावी लागते गुन्हे करणाऱ्यांना गुन्हेगार शाबीत करण्यासाठी. कोर्टात खटला उभा राहीपर्यंत अनेक धक्के बसत असतात. पण हे धक्केच आपल्याला बरंच काही शिकवत असतात. आपली कार्यपद्धती अधिकाधिक निर्दोष होते, ती अशा धक्यांमुळंच! याही प्रकरणात तसे धक्के बसलेच. दवाखान्याचं चित्रीकरण केलेल्या सीडीची अन्एडिटेड कॉपी पुरावा म्हणून सादर करावी लागते. आमच्याकडे सीडी होती. पण कशी मग व्हिडिओ पुरावा कोर्टात सादरच करायचा नाही, असं आम्ही ठरवलं आणि एक महत्त्वाचा निर्णय घेतला. यापुढे कोणत्याही स्टिंग ऑपरेशनच्या वेळी सीडी आधी आपल्या ताब्यात घ्यायची. या प्रकरणानं दिलेला आणखी एक धडा म्हणजे, स्टिंग ऑपरेशनसाठी ज्या गर्भवती महिलेची मदत घेतली असेल, तिचा पत्ता रेकॉर्डवर आणायचाच नाही. मुक्तांगणचाच पत्ता द्यायचा.

 प्रचंड कष्ट केल्यानंतर न्यायालयात जेव्हा साक्षीदार फितूर होतो तो क्षण कसा असतो, हे फक्त आमच्या कष्टाळू कार्यकत्यांनाच माहीत आहे. असं स्टिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या गर्भवतीनं जेव्हा सांगितलं, तो क्षण असाच होता. सातव्या महिन्यातच बाळंत झाल्यामुळं आपली नवजात मुलगी वारली, असं तिनं कोर्टात सांगितलं. इतर साक्षीदारांना ओळखायलाही तिनं नकार दिला. खरं तर संस्थेची ऐपत नसतानासुद्धा तिच्या बाळंतपणाचा खर्च आम्ही केला होता. तरीसुद्धा सगळ्या मेहनतीवर पाणी पडण्याची वेळ आली होती. बायडा मावशीची साक्षही तकलादूच झाली. डॉक्टरांनी आपला कबुलीजबाब दबावाखाली घेतला गेला, असं कोर्टात सांगितलं. परंतु तशी तक्रार केली का, असा प्रश्न विचारल्यावर डॉक्टर निरुत्तर झाले. हातात साक्षीपुरावे कमी होते, तरीसुद्धा आम्ही शेवटपर्यंत लढाई करायचं ठरवलं होतं. मीही साक्षीदार होते. परंतु इतरांच्या साक्षी सुरु असताना बचाव पक्षाच्या वकिलांनी कोर्टात माझ्या उपस्थितीला हरकत घेतली. कोणत्या नियमानुसार, या न्यायाधीशांच्या प्रश्नाला बचाव पक्षाच्या वकिलांकडे उत्तर नव्हतं. पण, थोडक्यासाठी वाद नकोत म्हणून मीच स्वतःहून बाहेर आले. शैलाताईसह दोन साक्षीदारांची साक्ष माझ्या अनुपस्थितीतच झाली.

 निकालाबाबत अनिश्चितता होती. पण अखेर डॉक्टरांना कोर्टानं वेगवेगळ्या १३ कलमांखाली दोषी ठरवलं. मुख्य साक्षीदार फितूर झाला असला, तरी इतर दोन साक्षीदारांच्या साक्षींवर अविश्वास व्यक्त करण्याचं काहीच कारण नाही, असं निरीक्षण नोंदवलं आणि डॉक्टरांना तीन वर्षांची सजा सुनावली. शिवाय तब्बल १ लाख ३० हजार रुपयांचा दंड! वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी डॉक्टरांनी जामीन मागितला; परंतु दंडाची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच जामीन दिला जाईल, असं कोर्टानं सुनावलं. अडथळ्यांची शर्यत संपली होती. आम्ही जिंकलो होतो.

 या दरम्यान एकदा कामानिमित्त डिस्कळला जाण्याचा योग आला. स्टिंग ऑपरेशनसाठी आम्ही सोबत नेलेल्या महिलेच्या घरासमोर विटा, वाळू, सिमेंट असं बांधकाम साहित्य येऊन पडलं होतं. नव्या घराचं बांधकाम सुरू झालं होतं. ती आता मोठ्या घरात आनंदानं राहणार होती.
सोळा की एकोणीस?

 हसतखेळत जेवण चाललेलं. पीळ मारायला आयेशा आणि प्रदीप बऱ्याच दिवसांनी सापडले होते. लग्नानंतर नोकरीसाठी प्रदीप खोपोलीला गेला, तेव्हापासून दोघांची क्वचितच भेट व्हायची. अलीकडे मात्र भेटी वाढल्या होत्या. दोन महिन्यांत चौथ्यांदा भेटत होतो आम्ही. अर्थात, गेल्या काही वर्षांत राखीपौर्णिमा दोघांनीही कधी चुकवली नव्हती. प्रदीप चैत्राकडून राखी बांधून घेतो तर आयेशा कैलासला राखी बांधते. रक्षाबंधनानंतर गोडाधोडाच्या जेवणावर ताव मारताना प्रदीप-आयेशाच्या लग्नाच्या आठवणी निघाल्या. आता आम्ही ते सगळं आठवून हसत असलो, तरी त्यावेळी किती तणाव सहन केला, हे आमचं आम्हालाच माहीत!

 प्रदीप एक खंदा कार्यकर्ता. युक्रांदमध्येही धडाडीनं काम केलेला. आमच्या चळवळीशी जोडला गेला आणि आमच्या घरचाही कायमचा सदस्य झाला. एचआयव्ही-एड्सविषयी प्रबोधनात्मक काम करताना हायवेवरचा उंब्रजचा स्पॉट त्याला दिला होता. ट्रकवर स्टिकर चिकटवणं, ट्रकचालकांशी संवाद साधणं हे त्याचं काम. तेव्हापासून सतत संपर्कात होता. पुढं मार्केटिंग कंपनीत एजंट म्हणून नोकरीला लागला आणि तिथंच त्याची आयेशाशी ओळख झाली. एकत्र काम करता-करता प्रेमात पडली दोघं एकमेकांच्या. लग्नाचं ठरवलं. आंतरधर्मीय लग्न. तीव्र विरोध ठरलेलाच. दोघं पळून आले. माहुलीच्या देवळात लग्न लावलं. मी आणि शैलजा साक्षीदार. लग्नाची कागदपत्रं दोघांच्या घरी पाठवली. मग जे व्हायचं तेच झालं. आयेशाच्या घरातले संतप्त होऊन आमच्या घरी. प्रचंड गदारोळ आणि तणाव. कसाबसा तो निस्तरला. पण प्रदीपच्या घरच्यांनी मात्र शांतपणे सांगितलं, "आम्ही त्याच्या नावानं अंघोळ करून मोकळे झालोय." यथावकाश प्रदीपला खोपोलीत नोकरी मिळाली आणि दोघं तिकडे राहायला गेले.

 “ताणतणावात स्थिर आणि हसतमुख राहण्याची सवय तुम्हा दोघांना तेव्हापासूनच लागली असणार," या माझ्या वाक्यानं गप्पांचा शेवट झाला आणि आम्ही हॉलमध्ये आलो. एरवी सतत लगबग करणारी आयेशा आता जपून पावलं टाकत होती. स्वाभाविकच होतं. साडेपाच महिन्यांची गर्भवती होती. पण आतापर्यंत तीन डॉक्टरांना कोठडीपर्यंत पोहोचवून आलेली. इस्लामपूर, करमाळा आणि जामखेडच्या डॉक्टरांना बेकायदा गर्भलिंग चिकित्सा केल्याच्या आरोपावरून अटक झाली होती, ती आयेशानं स्टिंग ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळंच. पण...

 हास्यविनोदाचा मूड बदलून मी गंभीरपणे बोलू लागले... "आयेशा, आता जी लढाई करायचीय, ती सोपी नाही. परक्या भागात चाललो आहोत आपण. इथल्या लोकांना किमान आपण चूक करतोय, एवढं तरी माहीत असतं. तिथं मात्र यात काही वाईट आहे, हेच मुळात मान्य नाहीये कुणाला. शिवाय... माणूस वजनदार आहे. वरपर्यंत हात पोहोचलेला. भीती वाटत असेल तर सांग."

 आयेशानं काही न बोलता नकारार्थी मान हलवली. “जे व्हायचं ते होऊ दे. आम्ही आहे तयार," असं म्हणून प्रदीपनंही दुजोरा दिला. मग मी तिकडची परिस्थिती थोडक्यात समजावून सांगितली. कैलास, शैलजाही कान देऊन ऐकत होते. म्हटलं, “हे बघा, चर्चा उघडपणे होतात; पण यंत्रणा काही करत नाही, अशा ठिकाणी आपण सावध असायला हवं. या प्रकरणात हात घालणं खूप धोकादायक आहे, असं सगळ्यांचं म्हणणं पडलंय. तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जाईल, वेळप्रसंगी मारून टाकतील, असेही इशारे मिळालेत. धोका पत्करायचा का? आत्ताच ठरवा."

 लग्नानंतर आयेशाचं नाव 'भावना' झालं होतं. तिचा निर्धार पक्का होता. प्रदीपही तिला साथ देत होता. पण आम्हाला ज्या डॉक्टरचा पर्दाफाश करायचा होता, तो परळीतलं बडं प्रस्थ म्हणून ओळखला जात असे. अंदाज घेतला तेव्हा धोका स्पष्टपणे जाणवला होता. काही दिवसांपूर्वी दिल्लीत खासदारांची भेट झाली होती, तेव्हाही विषय काढला होता. मी काही करू शकत नाही,' एवढंच ते मोघम बोलले होते. ते आपल्यासाठी काही करू शकत नाहीत की या प्रकरणात पडू इच्छित नाहीत. याचा अंदाज या वाक्यावरून लावणं अवघड आहे. हे कार्यकत्यांना सांगितलं. पण मग कैलासनं मुंबई हायकोर्टाच्या बार रूममध्ये झालेल्या चर्चेची आठवण करून दिली. आमच्या आतापर्यंतच्या कारवाया अगदीच किरकोळ प्रकार चालतात, अशा ठिकाणच्या असून, राजरोस आणि मोठ्या प्रमाणावर जिथं गर्भलिंग चिकित्सा चालते, त्या परळीकडे आम्ही दुर्लक्ष केलंय, असं ज्येष्ठ वकील मंडळींनी निदर्शनाला आणून दिलं होतं. ही मंडळी आम्हाला कोर्टात नेहमी साथ देणारी. पण त्यासाठी प्रकरण न्यायप्रविष्ट होणं गरजेचं... त्यासाठी पुरावे आणि... त्यासाठी स्टिंग ऑपरेशन! सोपं नव्हतं; पण आवश्यक होतं. कार्यकत्यांचा निर्धार पाहून हुरूप आला. चर्चा सुरू असतानाच बबलूही आला. म्हणाला, “निघायचंना, ताई?"

 “जागरूकता, संवेदनशीलता वगैरे आपण म्हणतो; पण समाजातच काय, कोर्टातसुद्धा अजून फारसं गांभीर्य दिसत नाही. हा कायदा नेमका काय आहे, कसा आणि कुणी राबवायचाय, तक्रार कुणी दाखल करायची, तपास कुणी करायचा, याचा बऱ्याच जणांना गंधही नाही. कोर्टालासुद्धा वाटतं की, डॉक्टर लोक वेळ काढून आलेत आणि आपण कार्यकर्ते रिकामटेकडे!" हे ऐकून कैलास ड्रायव्हिंग करताना हसला. कोर्टातले बरेच अनुभव घेतलेले त्यानं. पत्रकारांनाही रिपोर्टिंग करताना तपशील समजावून सांगावा लागत असे. तिथंही डोकेफोड करायचं काम त्याचंच. पण आता पत्रकारांबरोबरच न्यायाधीशांच्याही कार्यशाळा सुरू झाल्या होत्या. कार्यकर्त्यांना परळीत सोडून मी नांदेडच्या जाणार होते, ते अशाच कार्यशाळेसाठी.

 "तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलंय ना? बीडमध्ये नुकतंच स्टिंग केलंय. त्यामुळं मला सगळे ओळखतात. मी तिथं थांबून उपयोग नाही. पण नांदेडमधूनसुद्धा संपर्कात राहीन. शैलजा, मोबाइलचं ऑपरेशन नीट पाहून ठेवलंय ना?" शैलजाताईंनी होकार भरला. स्मार्टफोन त्यावेळी बाजारात आले नव्हते. पण 'जावा'चा एक हँडसेट आणि नवीन सिमकार्ड आम्ही खरेदी केलं होतं. क्लिनिकमध्ये गेल्यावर मला फोन लावायचा आणि बंद खोलीत जे बोलणं होईल, ते मला ऐकवायचं. माझ्या मोबाइलवर ते रेकॉर्ड करायचं, असं ठरलं होतं. गप्पा मारता-मारता मोबाइलच्या ऑपरेशनचीही उजळणी झाली. थेट परळीला न जाता गाडी अंबाजोगाईकडे वळली. तसंच ठरलं होतं. तिथल्या एका संस्थेचे कार्यकर्ते आमच्या परिचयाचे. वेळ आलीच तर चार माणसं पाठीशी उभी राहावीत, एवढाच हेतू. त्या मंडळींनी आमची मुक्कामाची सोय करून ठेवली होती. अनिश्चितता आणि काहीसा तणाव अशा वातावरणातच आम्ही झोपी गेलो.

 सकाळच्या ताज्या वातावरणात तणाव हलका करण्याचे नेहमीचे हातखंडे वापरून आम्ही सगळे हसत-हसत अंबाजोगाईहून परळीला निघालो. त्यातच प्रदीपला उलट्या होऊ लागल्या. त्याला गाडी लागायची. त्यातही आम्ही विनोद शोधला. “दिवस आयेशाला गेलेत आणि उलट्या प्रदीपला होतायत," असं चिडवून आम्ही खो-खो हसू लागलो. तेरा किलोमीटर अंतर कसं पार झालं आणि परळीच्या एसटी स्टँडसमोरच्या त्या बहुचर्चित क्लिनिकच्या दारात आम्ही कधी पोचलो, समजलंच नाही. क्लिनिकसमोर पार्किंगला बंदी. वैजनाथ मंदिराच्या पार्किंगमध्ये गाड्या लावायच्या आणि मग क्लिनिकमध्ये यायचं, हा तिथला शिरस्ता. पण क्लिनिकसमोरच्या टपरीवर थोडं खाऊन घेतलं. दिवसभर पुन्हा काही मिळेल न मिळेल!

 वैजनाथ मंदिरासमोरच्या पार्किंगमध्ये गाडी लावली, तेव्हा कळलं की, तिथून त्या क्लिनिकपर्यंत शेअर रिक्षा सुटतात. पोटुशी बाई दिसली की रिक्षावाले त्या हॉस्पिटलचं नाव घेऊन ओरडत होते. हॉस्पिटलजवळच्या स्टॉपचं नावही हॉस्पिटलच्याच नावावरून पडलेलं. इथून पुढं कार्यकर्त्यांची आणि माझी ताटातूट होणार होती. सगळ्यांचे चेहरे एकदा पाहून घेतले. निग्रही दिसले. कुणीच घाबरलेलं नव्हतं. कार्यकर्ते रिक्षा स्टॉपकडे वळले आणि मी नांदेडच्या दिशेनं प्रवास सुरू केला. इथून पुढची हकीकत मला नंतर कार्यकर्त्यांकडूनच समजली.

 क्लिनिकमध्ये तब्बल नव्वद पेशंट बसलेले. बीडमधल्या स्टिंग ऑपरेशनची बातमी छापून आलेली असल्यामुळं सगळ्यांना चेकिंग करूनच आत सोडत होते. पेशंटला वरच्या मजल्यावर नेलं जात होतं. सोबत एकाच माणसाला जाण्याची परवानगी. आयेशा आणि शैलाताई वरच्या मजल्यावर गेल्या तर बाकीचे तळमजल्यावर थांबले. सगळ्यांनी आपण बिनधास्त असल्याचं नजरेनंच एकमेकांना सांगितलं. वरच्या मजल्यावर एकेका खोलीत पाच-पाच पेशंट. त्यांच्यावर नजर ठेवायला एक धिप्पाड माणूस. “केवढी गर्दी! कधी यायचा नंबर..." असं शैलाताई पुटपुटल्या अन् तो धिप्पाड गृहस्थ म्हणाला, “दुपारी दोननंतर इथं कुणीच नसेल. तीस वर्षांचा अनुभव आहे. सगळ्या पेशंटचा नंबर दोनच्या आत येणारच."

 एखाद्या यंत्राप्रमाणं हॉस्पिटलचं कामकाज सुरू होतं. प्रत्येकजण आपापलं काम करत होता. पेशंट वगळता कुणी कुणाशी बोलत नव्हतं. नंबर आल्यावर आयेशाला घेऊन शैलजा आत गेली. तिथं सोनोग्राफीसाठी जेल लावायला एक बाई आणि डॉक्टरांच्या पत्नी अशा दोघीच होत्या. तपासणी झाली आणि एका चतकोर कागदावर इंग्रजीत 'सोळा' आकडा लिहून तो कागद डॉक्टरीण बाईंनी शैलाताईंच्या हातात दिला. त्याचा अर्थ दोघींनाही कळेना. “खाली जाऊन डॉक्टरांना हा कागद दाखवा," असं फर्मान सोडून डॉक्टरीणबाईंनी पुढचा पेशंट आत बोलावला. कागद घेऊन शैलाताई आणि आयेशा तळमजल्यावर डॉक्टरांकडे आल्या.

 कैलास आणि बबलू या दोघींची वाटच बघत होते. चौघं डॉक्टरांना भेटायला गेले. कागद पाहून डॉक्टर म्हणाले, "व्वा, तुमच्या मनासारखा आहे रिपोर्ट. पेढे ठेव वैजनाथाला." याचा अर्थ मात्र दोघींनाही कळाला. पण 'सोळा' आकड्याचं गुपित काही केल्या कळेना. त्या दोघी जायला वळल्या, तेवढ्यात पुढची बाई डॉक्टरांकडे कागद देऊन उभी राहिली. डॉक्टर त्या बाईला म्हणाले, “मनासारखा नाहीये रिपोर्ट. दोन हजार रुपये भरा आणि वर अॅडमिट व्हा!" त्या बाईच्या कागदावर इंग्रजी ‘एकोणीस' आकडा काढलेला. मग कार्यकर्त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. 'सोळा'मधला 'सहा' इंग्रजी 'बी' अक्षराचं प्रतिनिधित्व करत होता, तर ‘एकोणीस'मधला 'नऊ' इंग्रजी 'जी' अक्षराचं प्रतिनिधित्व करत होता. कार्यकत्यांनी एकमेकांकडे पाहिलं. सगळ्यांनीच ओळखलं होतं. बी म्हणजे बॉय आणि जी म्हणजे गर्ल. एक आकडा सिंगल प्रेग्नन्सीचा निदर्शक. कार्यकर्ते बाहेर पडणार एवढ्यात...

“अॅडमिट होते; पण आम्ही घेऊन जाणार नाही..." आयेशाच्या नंतर नंबर असलेल्या बाईच्या तोंडून हे उद्गार ऐकून कार्यकर्ते दबकलेच! प्रश्नार्थक चेहऱ्यांनी सगळ्यांनी एकमेकांकडं पाहिलं. म्हणजे..? गर्भपातानंतर भ्रूण पेशंटलाच घेऊन जायला सांगितलं जात होतं की काय...! एव्हाना बबलू, आयेशा आणि प्रदीप दरवाज्याजवळ पोहोचले होते. कैलास आणि शैलाताई जरा मागे होते. त्या बाईला समोरचा बोर्ड दाखवून डॉक्टर म्हणाले, "ते बघा काय लिहिलंय, कायदा जसा तुम्हाला आहे, तसाच आम्हालाही आहेच की! ... आणि... डॉक्टरांनी बोलता-बोलता त्यांच्या आसनाजवळ असलेली खिडकी उघडली. शैलाताई आणि कैलासला आतलं स्पष्ट दिसत होतं. आतलं दृश्य बघून कैलास आणि शैलाताई गोठले...

 जर्मनचं एक भांडं आणि त्यातल्या ऐवजावर तुटून पडलेली चार गलेलठ्ठ कुत्री... बापरे! दोघं प्रचंड हादरलेले; पण चेहऱ्यावर तसं दाखवता मात्र येईना. पटकन सगळेजण बाहेर पडले आणि थोडं अंतर चालून गेल्यावर मग तोंडावर हात ठेवून, डोळे मोठे करून कैलास आणि शैलजा एकमेकांकडे पाहू लागले. आत जे पाहिलं ते बिचकत-बिचकत दोघांनी इतर तिघांना सांगितलं. हे सगळं मी फोनवर ऐकत होते...शैलजाचा फोन सुरू होता... आणि रेकॉर्डिंगसुद्धा!

 गावातलं एकंदर वातावरण आणि पाहिलेला प्रकार... सगळेच जण जाम घाबरलेले. फोनवर तो प्रकार ऐकल्यामुळं माझीही छाती दडपलेली. कार्यकर्त्यांची काय अवस्था झाली असेल! पुढं नेमकं काय घडेल, याची धाकधूक तर त्यांना होतीच. कुणी ओळखलं तर...? मी फोनवरून त्या चौघांना सांगितलं, “परळीत आता क्षणभरही थांबू नका. तुम्ही सगळे थेट नांदेडलाच या. इथं आल्यावर बघू पुढं काय करायचं ते." मुख्यमंत्र्यांचं शहर असल्यामुळं इथं कार्यकर्ते सुरक्षित राहतील, असं वाटलं. कार्यकर्ते दडपलेल्या, भांबावलेल्या अवस्थेतच गाडीपर्यंत पोहोचले आणि मग कैलासनं अॅक्सिलरेटरवर जोर दिला. खूप वेगात त्यानं सगळ्यांना घेऊन सुखरूप नांदेड गाठलं.

 इकडे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातलं माझं लेक्चर संपवल्यानंतर मी चक्रं फिरवायला सुरुवात केली. बीडच्या सिव्हिल सर्जनना फोन केला. "आमच्या कार्यकत्यांची स्टेटमेंट्स घ्यायला नांदेडलाच या," असं मी त्यांना सांगू पाहत होते; पण पलीकडून 'हॅलो, हॅलो' असा आवाज येऊन फोन कट व्हायचा. असंच तीन- चार वेळा झालं. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी... सगळ्यांचे फोन अचानक बंद! म्हणजे, आम्ही जे केलं, त्याची माहिती तिकडे अधिकारी वर्तुळात पसरली होती तर! आता काय करणार? सगळाच पेच! पुढं कारवाई करायची तरी कशी?

 अखेर मुख्यमंत्र्यांच्या पीएला कळवलं. मग वरूनच चक्रं फिरली. अंबाजोगाईच्या प्रांताधिकाऱ्यांवर कारवाईची जबाबदारी सोपवलीय आणि ते तब्बल शंभर पोलिसांचा फौजफाटा घेऊन परळीच्या हॉस्पिटलकडे गेलेत, असं कळलं. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये परळीतल्या त्या हॉस्पिटलच्या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आल्याचा मथळा...

 आम्ही सगळे सातारला परत यायला निघालो. साताऱ्यात येऊनच कार्यकत्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले जाणार होते. प्रवासात सतत फोन सुरू होते. अंबाजोगाईचे प्रांताधिकारी तपास करीत असताना पुरावे कुठे आणि कसे सापडतील, याविषयी कार्यकर्ते त्यांना फोनवरून सांगत होते. कार्यकत्यांनी स्टिंग ऑपरेशनच्या वेळी बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. 'सोळा' आकडा लिहिलेला चतकोर कागद आणि माझ्या फोनवर केलेलं रेकॉर्डिंग याखेरीज आमच्याकडे पुरावा काय होता? ही मंडळी आमच्या हॉस्पिटलमध्ये आलीच नव्हती, असा बचाव डॉक्टरांनी घेतला तर...? त्यामुळं कार्यकत्यांनी काही ठिकाणी आपण येऊन गेल्याचं रुग्णालयातच ठिकठिकाणी तारीख आणि वेळेसह लिहून ठेवलं होतं... वॉशरूममध्ये फ्लशच्या टाकीखाली... टॉयलेटच्या भिंतीवर... बाकाच्या खाली... फोनवर कार्यकर्ते ती ठिकाणं प्रांताधिकाऱ्यांना सांगत होते. पण...

 प्रांताधिकारी प्रत्येक ठिकाणी पोहोचून निरीक्षण करीत राहिले; पण त्यांना कुठेच, कसलाच मजकूर दिसला नाही... छापा पडल्यावर हॉस्पिटलातल्या संशयास्पद गोष्टी गायब झाल्या होत्या... ती कुत्रीही! पण हा मजकूर कुठं गेला? कसा गेला? आम्हालाही कळत नव्हतं आणि प्रांताधिकाऱ्यांनासुद्धा! उलट त्यांनी तिकडून जी माहिती दिली, ती आम्हाला जास्तच अस्वस्थ करणारी ठरली. ते म्हणाले, "अहो, पुराव्यांचं काय घेऊन बसलाय! ते तर कुठेच नाहीत. उलट छापा पडल्यावर हॉस्पिटलसमोर बोर्ड लागलाय. त्यावर लिहिलंय - 'आज हॉस्पिटल बंद राहील. छापा पडणार आहे!' ...आता बोला!" भुवया उंचावण्यापलीकडे तूर्त तरी हातात काहीच नव्हतं! हातात होती फक्त एक चिठोरी आणि एक कॉल रेकॉर्डिंग!
एकावर पाच फ्री

माझ्या मतदारसंघात जर कुणी गर्भलिंगचिकित्सा करताना आढळला, तर गाढवावरून धिंड काढेन, अशी गर्जना करणारा गृहमंत्री राज्याला लाभल्याचा आनंद होताच; पण त्याच मतदारसंघात पलूस, तासगाव, बत्तीस शिराळा आणि वाळवा भागात मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत घटत चाललंय, असं आकडेवारी सांगत होती. या मतदारसंघात खरोखर असे प्रकार घडत नसतील का? सावळज, ताकारी, लोणारी भागात असे प्रकार सुरू आहेत, असं पेशानं डॉक्टर असलेल्या व्यक्तीकडूनच समजलं होतं. कार्यकर्त्यांनी हा भाग बघायचा, असं ठरवलं. दोन गर्भवती महिला डोळ्यापुढं होत्या. एक म्हणजे, घरकाम करणारी रेखा. तिच्या नवऱ्यानं आधी रेखाच्या बहिणीशी आणि नंतर रेखाशी लग्न केलेलं. रेखाला पहिली मुलगी होती. तिचा नवरा साईभक्त. शिर्डीला नेहमी जाणारा.

 दुसरी गर्भवती म्हणजे सुनीता. ती कैलासची नातेवाईक. चार महिन्यांची गर्भवती. दोघींना घेऊन आधी तासगावला गेलो, कारण तासगावच्या एका हॉस्पिटलबद्दल पक्की खबर मिळाली होती. इथला एक कर्मचारी गर्भलिंगनिदानास इच्छुक असलेल्या महिलांना सावळजला घेऊन जातो, अशी ही खबर होती. तासगावला एक कम्पाउंडर भेटला. 'मुलगा-मुलगी बघायचंय, हे वाक्य चेहऱ्यावर अचूक भाव आणून दबक्या आवाजात बोलण्याच्या अभिनयाला कार्यकर्ते आता सरावले होते. "हे डॉक्टर करत नाहीत. दुसरे डॉक्टर करतात. बघून सांगतो. आता खूप कडक झालंय. पैसे जास्त लागतील, ही माहिती तितक्याच दबक्या आवाजात कम्पाउंडरनं 'विमल पाटील यांना दिली. विमल पाटील म्हणजे शैलाताई! नात्यातल्या दोन गर्भवती एकाच वेळी समोर बघून कम्पाउंडरला खात्री पटली. प्रत्येकी दहा हजार म्हणजे दोघींचे वीस हजार, असा दरही त्यानं सांगून टाकला. 'उद्या येऊ का, हा प्रश्न ऐकून कम्पाउंडरला खात्री पटली की, पैशांची जुळणी करण्यासाठीच चोवीस तास हवेत. त्यानं होकार भरला. एवढंच नव्हे, तर नात्यागोत्याच्या, ओळखीपाळखीच्या आणखी कुणी गर्भवती असतील तरी एकदमच सगळ्यांना घेऊन येण्याचा सल्लाही दिला. दुसऱ्या दिवशी दोन्ही पेशंटना घेऊन शैलाताई (विमल पाटील) हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. वीस हजार रुपये कम्पाउंडरला दिले. पण पैसे दिल्याचं लेखी द्या, असा आग्रह धरला. 'घरी विचारलं तर काय सांगू, असं म्हणाल्या. कम्पाउंडरनं साध्या कागदावर वीस हजार रुपये मिळाल्याचं लिहून दिलं. त्याची सही, तारीख, फोन नंबर हे सगळं रेकॉर्डवर येत होतं आणि त्याला पत्ताच नव्हता. 'मी आणि माझा मित्र आता तुम्हाला सोबत घेऊन जाणार, असं त्यानं सांगितलं. त्याच्या मित्रासह या तिघींना त्यानं सोबत घेतलं आणि एसटीनं निघाला. मी, कैलास, अनिता यांच्यासह चार कार्यकर्ते गाडीतून त्या एसटीचा पाठलाग करू लागलो. शैलाताई आणि मी एकमेकांना एसएमएस करत होतो. कुणालाही शंका येऊ न देता शैलाताईंना हे सगळं करावं लागत होतं. फोन करण्याऐवजी एसएमएस हा त्याचाच भाग. कोणत्या एसटीत बसलो, किती वाजता निघाली, कुठपर्यंत पोहोचलो, हे सगळं शैलाताई मला मेसेजद्वारे कळवत होत्या.

 कम्पाउंडर आणि त्याच्या मित्रानं तिघींना ताकारीला एका दवाखान्यात नेलं. नवरा-बायको दोघेही डॉक्टर दवाखान्यात दोन्ही पेशंटना आणि शैलाताईंना खूप वेळ बसवून ठेवलं गेलं. अशा वेळी चिडचीड होऊन देता शांत राहणं भाग असतं. संशय येता कामा नये. हालचाली टिपल्या जात असतात. आपल्याला खरंच गरज आहे, असे भाव घेऊन तासन्तास बसावं लागतं. डॉक्टरीण बाई आल्यावर दोघींची सोनोग्राफी झाली. सुनीताचा गर्भ लहान आहे आणि काही दिवस वाट पाहावी लागेल, असं त्यांनी सांगितलं. रेखाचा गर्भ 'चिकित्सेला योग्य होता; पण दुसऱ्या डॉक्टरांकडून कन्फर्म करून घेऊ, असं उत्तर मिळालं. खरं तर ही कार्यकत्यांची परीक्षाच होती. सुनीताला डॉक्टर स्वतःच दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन जाणार होते. पण संध्याकाळपर्यंत त्यांनी सगळ्यांना बसवून ठेवलं आणि अखेर 'उद्या या,असं सांगितलं.

 दुसरा दिवसही वाट बघण्यातच वाया गेला. संयमाची कसोटी होती. आमच्यात एसएमएस सुरूच होते. शिवाय, ताकारीसारख्या गावात मुक्काम कसा करणार? साताऱ्याहून जाऊन-येऊन सगळं करावं लागत होतं. दोन पेशंटना घेऊन शैलाताई एसटी स्टँडजवळ यायच्या. कुणी पाठलाग केलाच, तरी मंडळी एसटीनं गेली असंच वाटायला हवं. थोड्या वेळानं आम्ही जिथं गाडी उभी केली असेल, त्या ठिकाणी या तिघी यायच्या आणि आम्ही साताऱ्याला यायचो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. कुणी बघणार नाही, अशा ठिकाणी तिघींना सोडायचं आणि तिथून त्यांनी हॉस्पिटलमध्ये जायचं. तीन दिवस असेच गेले आणि चौथ्या दिवशी सुनीता दवाखान्यात आलीच नाही. फक्त रेखाच शैलाताईंबरोबर आली. सोबत तिची पहिली मुलगीही होती. तिघींना डॉक्टरांनी ओम्नीमध्ये बसवलं. तेही खूप वेळ वाट बघायला लावून. शैलाताईंनी हेलपाटे घालायचे आणि डॉक्टरनं पेशंट तपासत राहायचं, हेच तीन दिवस चाललेलं. हा वेळकाढूपणा कशासाठी? जर ही मंडळी स्टिंग ऑपरेशनसाठी आलेली असतील, तर त्यांचे कॅमेरे, मोबाइल यातली बॅटरी संपेल, पुरावा मिळणार नाही म्हणून! केवढी ही हुशारी!!

 ओम्नी गाडी आधी इस्लामपुरात आली आणि एका हाडाच्या डॉक्टरांच्या दवाखान्यासमोर थांबली, तेव्हा काय चाललंय कुणाला कळेनाच! प्रवासात शैलाताईंनी एक चांगली गोष्ट केली होती. ओम्नीमध्ये ड्रायव्हरच्या मागे असलेल्या उलट्या सीटवर बसल्या होत्या. म्हणजे, मागून आम्ही येत असताना त्यांनी काही खाणाखुणा केल्या, तर त्या ड्रायव्हरला आरशात दिसू शकणार नाहीत. शिवाय रेखाची मुलगी त्यांच्या मांडीवर होती. तिच्या आडून त्या मेसेज करत राहिल्या. आम्ही मागून हा प्रवास कॅमेऱ्यात शूट करत होतो... अर्थात कुणाला शंका येणार नाही, अशी काळजी घेऊन.

 इस्लामपुरात काही वेळ थांबल्यानंतर गाडी बत्तीस शिराळ्याच्या रस्त्याला लागली. शिराळ्याच्या महिला डॉक्टरच्या दवाखान्यात सगळ्यांना नेण्यात आलं. डॉक्टरीण बाईचा नवरा कोकरूड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी. बाईंचा दवाखाना तळमजल्यावर आणि वरच्या मजल्यावर घर. ताकारीचे डॉक्टर आत गेले. डॉक्टरीण बाईंशी काहीतरी बोलला आणि पाच मिनिटांनी बाहेर आला. मग रेखाला आत नेलं. डॉक्टरीण बाईंनी सोनोग्राफी ली. एक्झामिनेशन रूम मोठी होती. पडद्याआड एक बेड आणि सोनोग्राफी मशीन. सोनोग्राफीनंतर दोघी बाहेर आल्या. थोड्या वेळानं ताकारीचे डॉक्टरही बाहेर आले. त्यांनी सांगितलं 'मनासारखं नाही.म मग डाकक्टरीण बाईही बाहेर आल्या आणि त्यांनीही तेच सांगितलं. अर्ध काम झालं होतं. शैलाताईंनी तसा मेसेज मला केला.

 या डॉक्टर लोकांचं सिंडिकेट आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला दादच द्यायला हवी. ताकारीच्या डॉक्टरांनी अशी मेख मारून ठेवली होती की, मुलगा असेल तरच त्यांना पैसे द्यायचे. मनासारखं नसेल, म्हणजे मुलगी असेल तर गर्भपात त्याच्याच दवाखान्यात म्हणजे ताकारीला करायचा. त्यामुळं प्रत्येक वेळी ते मुक्कामाच्या दृष्टीनं कपडेलत्ते घेऊन या, असं सुचवायचे. माझी मात्र अडचण झाली होती. सरकारी कॉटेज हॉस्पिटल इस्लामपूरला. त्यामुळं वैद्यकीय अधिकाऱ्याला नेऊन इस्लामपूर कोर्टात तक्रार दाखल करणं सोयीचं होतं. परंतु डॉक्टर ताकारीचे, तर सहकारी महिला डॉक्टर शिराळ्याच्या. काही झालंच तर न्यायालयीन कक्षा वेगवेगळ्या राहतील, अशी काळजी या मंडळींनी आधीच घेतली होती. त्यासाठी सोनोग्राफी एकीकडे आणि गर्भपात दुसरीकडे, अशी व्यवस्था केलेली. शिवाय, शिराळ्यात कारवाई करावी तर डॉक्टरीण बाईंचा नवराच जवळच्या ग्रामीण रुग्णालयाचा इनचार्ज! अखेर ताकारीच्या डॉक्टरांच्या ओम्नीतून शैलाताई आणि रेखानं निघावं आणि इस्लामपूरच्या हद्दीत आल्यावर ओम्नी अडवणार होतो.

 ओम्नीचा पाठलाग करीत असतानाच मी ट्रॅप लावल्याचं सांगलीच्या पोलिस अधीक्षकांना कळवलं. जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी ठराविक ठिकाणी पोलिस तैनात केले. शैलाताईंना मेसेज केला, 'तुम्ही इस्लामपूरच्या एसटी स्टँडपर्यंत या. आम्ही मध्येच कुठेतरी गाडी अडवतो. उलट्या सीटवर बसून आमची गाडी मागून येतेय की नाही, हे शैलाताई बघत येत असल्याचं सांगून शैलाताईंनी गाडी थांबवली. ओम्नी थांबताच रेखानंही छान अभिनय सुरू केला. आमची गाडी ओम्नीला ओलांडून पुढे जाईपर्यंत रस्त्याकडेला ती 'वॅक वॅक्म करत बसली. ओम्नीत बसल्यावर शैलाताईंनी त्यांच्या अस्सल कोल्हापुरी भाषेत डॉ. शिंदेंना सांगितलं की, घरून कपडे घेऊन रेखाचा नवरा आणि दीर टू व्हिलरवरून येतायत. रस्त्यात ते आपल्याला भेटतील. ती नवऱ्याबरोबर मुंबईला राहते आणि तिचं गाव कोल्हापूर जिल्ह्यात आहे, असंही सांगितलं. गावाचं नाव राणीच्या लक्षात नाही, हे सांगताना शैलाताईंच्या अभिनयाचा कस लागला. पण डॉक्टर मंडळी आणि आमचे कार्यकर्ते यांच्यात जणू अभिनयाची स्पर्धाच लागली होती.

 इस्लामपूरजवळच्या पुलापाशी ओम्नी आल्याचा मेसेज आला आणि ठरलेल्या ठिकाणी, तिकाटण्यावर कैलासनं आमची गाडी ओम्नीला आडवी घातली. मी झटकन खाली उतरून आधी ओम्नीची चावी काढून घेतली. काहीतरी घडतंय, हे समजल्यावर प्रचंड गर्दी तिथं जमली. गाडीवाल्यांमध्ये साइड न देण्यावरून किंवा झासा मारण्यावरून भांडणं झाली असावीत, असा लोकांचा कयास होता. “ही मंडळी गरोदर बाईच्या पोटात मुलगा आहे की मुलगी, हे पाहून पाडायला निघाली होती,मम असं कैलासनं गर्दीला सांगितलं तेव्हा माणसं चिडली. मीही शैलाताईंना खोटं-खोटं झापू लागले. आता डॉक्टरांवर पब्लिक खवळलं आणि त्यांच्या अंगावर धावून गेलं. तेवढ्यात पोलिस आले आणि डॉक्टरांसह शैलाताई आणि रेखाला तिच्या मुलीसह पोलिसांच्या गाडीत बसवलं. तिथून दोन्ही गाड्या थेट पोलिस ठाण्यात गेल्या. तिथून उपजिल्हा रुग्णालयात. वैद्यकीय अधिकाऱ्यानं पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 इथे अभिनयाचा दुसरा टप्पा सुरू झाला. आमच्या नाटकात पोलिसही सहभागी झाले. 'ताकारीच्या डॉक्टरीण बाई, शिराळ्याच्या डॉक्टरीण बाई, इस्लामपूरचा कम्पाउंडर, त्याचा मित्र या सगळ्यांना बोलावून घ्या... मिटवून टाकू, असं सांगून डॉक्टरांनाच सगळ्यांना फोन करायला लावले आणि एकेक करून सगळे आरोपी स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाले. शिराळ्याच्या डॉक्टरीण बाई मात्र माहिती मिळताच फरार झाल्या... घर, दवाखाना तसाच उघडा ठेवून! ताकारीच्या डॉक्टरीण बाई, इस्लामपूरचा कंपाउंडर, त्याचा मित्र हजर झाले. आम्ही दिलेल्या नोटा समुचित प्राधीकाऱ्यांनी तपासल्या. कारवाईच्या आधी आम्ही करून घेतलेल्या अॅफिडेव्हिटप्रमाणेच त्या होत्या. हे अॅफिडेव्हिट आम्ही नेहमी नोटराइज करून घेतो. आम्ही विनाकारण तर कुणाला गोवत नाहीये ना, याची शहानिशा केली. सोनोग्राफी मशीनचे नंबर आणि नोंदणी प्रमाणपत्रं तपासली. शिराळ्याच्या डॉक्टरीण बाईंचं सोनोग्राफी मशीन तिच्याच नावावर होतं. पण ताकारीच्या डॉक्टरांचं मशीन मात्र क-हाडच्या एका रेडिओलॉजिस्टच्या नावावर असल्याचं आढळलं. त्यांनाही पोलिसांनी बोलावून घेतलं. अशी बेकायदा काम करणाऱ्यांची गाढवावरून धिंड काढण्याची भाषा करणाऱ्या गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात एकही माणूस सापडणं शक्य वाटत नव्हतं. प्रत्यक्षात सहाजण सापडले. चार डॉक्टर आणि दोन एजंट. एकावर पाच फ्री!

 शिराळ्याच्या डॉक्टरीण बाई पळून गेल्यावर त्यांच्या नवऱ्याला म्हणजे कोकरूडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. जाबजबाब व कारवाई संपवून सगळ्या आरोपींना घेऊन सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो. जाताना दोनदा लघवीचं कारण सांगून कोकरूडचे वैद्यकीय अधिकारी उतरले. 'आता मी आत्महत्याच करतो, असं सांगून पळून जायचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना जाऊ दिलं नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही पोहोचलो, तेव्हा मात्र ते पळाले ते पळालेच.

 एवढं सगळं घडल्यानंतर आमच्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले. तीन टीम साताऱ्यात आल्या. रेखाला, मला, कार्यकत्यांना आमिषं दाखवायचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यानच्या काळात इस्लामपुरात एक खून झाला होता. आम्ही इस्लामपुरात आल्यावर आमचीही तशीच गत होईल, अशा धमक्या सुरू झाल्या. एकंदर पकडलेल्या डॉक्टरांना पाठीशी घालायला भलेभले रिंगणात उतरलेत, हे स्पष्ट होत होतं. अशा वेळी खटला दाखल कसा करायचा? अखेर आम्ही इस्लामपुरातल्या महिला संघटना, आशा संघटना यांच्याशी संपर्क साधला. दाव्याचे कागदपत्र आणि सोनोग्राफी मशीन पालखीत घातलं आणि भजन म्हणत कोर्टापर्यंत गेलो. तिथं सरकारी वकिलांच्या ताब्यात कागदपत्रं दिली. स्लामपूरप्रमाणंच शिराळा न्यायालयाच्या अधिकारकक्षेतही गुन्हा घडला होता. त्यामुळं तिथंही खटल्याची कारवाई सुरू झाली.

 दरम्यान, मी एका कार्यक्रमासाठी कैलासला सोबत घेऊन सोलापूरला गेले होते. तेव्हा शैलाताईंचा फोन आला. त्यांना शिराळ्याच्या सरकारी वकिलांचा फोन आला होता. रेखाची साक्ष दुसऱ्या दिवशी होती. परंतु माझ्या कार्यक्रमामुळं आम्ही पुढची तारीख घेणार होतो. पण कशी कुणास ठाऊक, रेखा शिराळ्यात दाखल झाली होती. 'आलेच आहे तर जबाब देऊन टाकते, असं म्हणत होती. काहीतरी गडबड होती. सरकारी वकिलांशी मी फोनवरून बोलले. न्यायालयात तिला ओळखायचंच नाही, असं ठरलं. एवढं झाल्यावर मी सोलापूरहून तातडीनं निघाले. रेखाच्या सासूची बहीण पेठनाका येथे राहते, हे माहीत होतं. पेठनाक्यालाच शिराळ्याच्या डॉक्टरीण बाईंचा मोठा बंगला होता. खटला भुसभुशीत करण्याचे प्रयत्न सुरू झालेत आणि रेखाचा त्यासाठी वापर होतोय, हे समजायला वेळ लागला नाही. रेखाच्या नवऱ्याला फोन केला. तो शिर्डीला गेला होता. तिथून त्यानं रेखाला फोन केला. रेखानं नवऱ्याला आपण पेठनाक्याला आलोय, असं कळवलं होतं. मला पैसे दिले जातायत, हेही सांगितलं होतं. रेखाचा नवरा प्रामाणिक. त्यानं मला तेही सांगून टाकलं. तो स्वतः शिर्डीहून तातडीनं निघाला.

 शैलाताई, माया आणि इतर कार्यकर्ते साताऱ्याहून पेठनाक्याला पोहोचले. मीही इस्लामपूरमार्गे पेठनाक्याला पोहोचले होते. रेखाच्या सासूच्या बहिणीच्या घरी आम्ही रेखाला भेटलो. रेखाची सासू आणि तिच्या बहिणीनं पैशांसाठी हा कारभार केलाय, हे तिथल्या चर्चेतून उघड झालं. वकिलांना आणि पोलिसांना आम्ही हा प्रकार कळवला. रेखाला घेऊन आम्ही पेठनाक्याच्या मणिकंडन हॉटेलवर आलो. लाख रुपयांचं बंडल घेऊन रेखा आली होती. ते पुडकं तिनं पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी रेखाचा जबाब घेतला. कोर्टातही अॅफिडेव्हिट दिलं. दरम्यानच्या काळात शिराळ्याच्या डॉक्टरीण बाई पोलिसांपुढे हजर होऊन जामिनावर सुटल्या होत्या. कोर्टानं त्यांचा जामीन रद्द केला आणि दोन दिवस पुन्हा तुरुंगात टाकलं. साक्षीदारांवर दबाव आणणं आणि लाच देणं असा आणखी एक गुन्हा त्यांच्यावर कोर्टानंच दाखल केला.

 सऱ्याच दिवशी रेखाची साक्ष होती. तिच्याकडून वकिलांनी तयारी करून घेतली. नीट जबाब देता येईल ना, याची चाचपणी केली. पण रेखानं वेगळाच हट्ट धरला. तिला तंबाखूची सवय होती. 'तंबाखू खाल्ली नाही तर मला बोलता येणार नाही,म असं ती सांगू लागली. गावापासून न्यायालय खूप लांब. पण तिच्यासाठी गाडी काढून आयुष्यात पहिल्यांदाच मी पानपट्टीवर गेले. तंबाखूची गोळी लावताच रेखा कोर्टात घडाघडा बोलू लागली. तिची सरतपासणी तीन दिवस चालली. उलटतपासणीत तिला खूप छळलं. प्रत्येक आरोपीचा एकेक वकील. प्रत्येकजण वेगवेगळे प्रश्न विचारून सतावू लागला. पण रेखा बधली नाही. एक वकील तर बीएमडब्ल्यू कारमधून येणारा. आपल्यासोबत दहाबारा सहकारी वकिलांचा ताफा घेऊन फिरणारा.

 या खटल्यात कैलास पंच होता. पाच आरोपींच्या पाच वकिलांनी कैलासलाही खूप छळलं. पण इथं एक गंमत झाली. एका वकिलानं कैलास पंचनाम्याला उपस्थितच नव्हता, असा बचाव घेतला. कैलास माझा कार्यकर्ता आहे आणि साताऱ्याचं ऑफिस सोडून तो इस्लामपुरात येईलच कशाला, असा सूर त्यानं लावला होता. पंचनाम्याच्या ठिकाणी कैलासची उपस्थिती त्यानं नाकारली. मग दुसरा वकील उठला आणि कैलासला भलतेसलते प्रश्न विचारू लागला. इस्लामपूरला आला होतास, तर कुठल्या कुठल्या गाडीतून आलास? किती वेळ लागला? किती वाजता साताऱ्यातून निघालास? किती वाजता पोहोचलास? असे प्रश्न विचारले. पण कैलासनं त्याच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तरं दिल्यामुळं उलट पंचनामा शाबीत व्हायलाच मदत झाली. म्हणजे, एका वकिलानं नाकारलेला पंचनामा दुसऱ्या वकिलानं शाबीत करून दिला. पहिला वकील त्यामुळं खट्ट झाला. पीसीपीएनडीटी कायद्याचा अभ्यास असलेल्या निष्णात वकिलांना आम्ही या खटल्यात मदतीसाठी बोलावलं होतं. वकिलांचा मोठा ताफा असूनसुद्धा सर्व आरोपी दोन्ही न्यायालयांमध्ये दोषी ठरले. बत्तीस शिराळा कोर्टानं आरोपींना दोषी ठरवल्यावर शिक्षा सुनावताना सांगितलं, “इस्लामपूर आणि शिराळा न्यायालयानं ठोठावलेल्या शिक्षा आरोपींनी एकत्रितपणे भोगायच्या नाहीत. इस्लामपूर न्यायालयानं दिलेल्या शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर शिराळा न्यायालयाच्या शिक्षेचा कालावधी सुरू होईल.

 आम्ही पुन्हा एकदा जिंकलो होतो. अपार मेहनतीला यश आलं होतं. केस हातातून सुटून जाता-जाता पुन्हा हातात आली होती. परंतु दरम्यानच्या काळात मी विपश्यनेसाठी गेले होते. तिथून आल्यावर आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की, कोर्टात यश येवो वा अपयश.... त्याचा विचारच करायचा नाही. आपण संघर्ष एन्जॉय करायचा. तो आम्ही भरभरून एन्जॉय केला होता. शिवाय निकालही आमच्या मनाजोगा लागला. पण या सगळ्या प्रकरणाची नायिका ठरली ती रेखा... गरिबीत राहणारी. मोलमजुरी करून जगणारी; पण लाख रुपयांचं पुडकं परत करणारी. साक्ष देताना तंबाखू मागणारी आणि 'नवऱ्याला सांगू नका, असं म्हणणारी. तिच्या नवऱ्याला मुळातच ऐकू कमी येतं. पण तरीही आम्ही त्याला रेखानं तंबाखू मागितल्याचं सांगितलेलं नाही. आजअखेर!
विजयाची दुखरी किनार...

 कविताचा नवरा अचानक इतक्या लांबून कसा काय आला, याचं आम्हाला आश्चर्यच वाटलं! कविताचं माहेर सातारा आणि सासर वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यातलं. नवऱ्याच्या दारूमुळं सतत भांडणं होत होती म्हणून कविता घरातून निघून माहेरी आली होती. तिचा नवरा तिला घ्यायला नव्हे, तर भांडायला आला होता; पण भांडणाचं कारण वेगळंच होतं. कविता त्याला चक्क टीव्हीवर दिसल्यामुळं त्याचा पारा चढला होता. बीडच्या डॉक्टरांच स्टिंग ऑपरेशन करताना बनावट गि-हाइक म्हणून आम्ही कविताला सोबत नेलं होतं आणि हे प्रकरण माध्यमांमध्ये गाजलं होतं. आपल्या अपरोक्ष बायकोनं असं काहीतरी केल्याची सल तिच्या नवऱ्याला टोचत होती. पण मग कैलासनं त्याची समजूत घातली. हे काम किती महत्त्वाचं आहे, हेही सांगितलं आणि तेवढ्यात पुढच्या कारवाईची परवानगीही शिताफीनं काढून घेतली. यावेळी कविताबरोबर तिच्या नवऱ्यालाही घेऊन जायचं ठरलं. पत्रकारांनी विचारलं तर नवरा-बायको दोघंही आमच्यासोबत आहेत, असंही सांगता येईल.

 यावेळी जरा वेगळाच मामला आमच्यासमोर होता. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी दवाखान्यातला डॉक्टरच त्याच्या खासगी क्लिनिक गर्भलिंगचिकित्सा करतो, असं समजलं होतं. आमच्या एका पत्रकार मित्रानं ही माहिती काढली होती. जुळेवाडी या सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या हद्दीवरच्या गावात या डॉक्टरांचं क्लिनिक होतं. आपल्याकडच्या सरकारी यंत्रणांमध्ये ज्या गमतीजमती दिसतात, त्या या प्रकरणात पहिल्या क्षणापासून दिसायला लागल्या होत्या. डॉक्टरांच्या क्लिनिकची इमारत सातारा जिल्ह्याच्या हद्दीत तर परसबाग सांगली जिल्ह्याच्या हद्दीत! त्यांच्याबद्दल जी माहिती समजली होती, ती हादरवून टाकणारी होती. सोनोग्राफी आणि गर्भपात केल्यानंतर ते पेशंटला ज्या खोलीत ठेवतात, तिला बाहेरून कुलूप घालतात, अशी माहिती मिळाली होती. जुळेवाडी फाट्यावर गाडी लावून आम्ही त्याच्या दवाखान्यात गेलो, तेव्हाच बाहेरून कुलूप लावलेल्या खोल्या आम्हाला दिसल्या. डॉक्टरांकडे येणाऱ्यांमध्ये शिक्षकांची संख्या मोठी होती. भावी पिढी ज्यांनी घडवायची, त्या शिक्षकांचं एक नेटवर्कच भावी पिढीतल्या मुलींची संख्या कमी करण्याच्या कामात सक्रिय झालं होतं. सातारा, सांगली, कन्हाड, इस्लामपूर भागात हे नेटवर्क काम करत होतं.

 डॉक्टरांच्याबद्दल अशीही माहिती मिळाली होती की, राजकारणातल्या वजनदार व्यक्तींशी त्यांचा जवळचा संबंध आहे. खुद्द गृहमंत्री त्यांच्यासाठी जेवायला थांबले होते, असे किस्से लोक ऐकवायचे. त्यांचे वडील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सेनेत होते आणि डॉक्टर जवळ हत्यारं बाळगतात, अशीही माहिती मिळाली होती. आणखी एक गमतीशीर माहिती म्हणजे 'संजा नावाचा एकजण त्यांच्या हाताखाली काम करायचा. डॉक्टर त्याला सगळं समजावून सांगायचे. बघून-बघून संजा 'या कामातसुद्धा तरबेज झालाय, असं समजलं होतं. क-हाडच्या कॉटेज हॉस्पिटलच्या अखत्यारीत त्यांचं क्लिनिक येत असल्यामुळं येता-येता आम्ही कारवाईची कल्पना कॉटेज हॉस्पिटलला दिली होती. अशा वेळी आम्ही या हद्दीत कारवाई करणार आहोत, एवढीच माहिती देतो. नेमकी कुठल्या क्लिनिकवर कारवाई करणार, हे सांगत नाही. आम्ही गेलो तेव्हा डॉक्टर बाहेर गेले होते. नंबर लावून आम्ही वाट पाहत बसलो.

 डॉक्टर आल्यानंतर त्यांनी कविताला तपासलं आणि तिच्या पोटात मुलगा आहे, असं तोंडी सांगितलं आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट दिला. आम्ही कॉटेज हॉस्पिटलला फोन केला, तेव्हा तिथले वैद्यकीय अधिकारी सातारला गेल्याचं कळलं. मग कारवाई करायला येणार कोण? तिथं आम्ही थांबणार तरी किती वेळ? कविताच्या पोटात मुलगी असती, तर गर्भपातासाठी थांबलो आहोत, असं कारण तरी देता आलं असतं. पण मुलगा आहे, हे कळल्यावरसुद्धा थांबलो तर संशय येणार. शेवटी सिव्हिल हॉस्पिटलला फोन केला. सिव्हिल सर्जननी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारवाईसाठी पाठवलं. पण ते जुळेवाडीत पोहोचेपर्यंत करायचं काय? दवाखान्यातून बाहेर गेलो आणि कागदपत्रं गायब झाली तर? शिवाय आम्ही प्रतिज्ञापत्रावर नंबर नोंदवलेल्या नोटाही आतून गायब होण्याची भीती. तोच मोठा पुरावा होता. अडीच हजार रुपये घेतले होते डॉक्टरांनी तपासणीचे! अखेर एक कल्पना सुचली. कृष्णा साखर कारखान्यावरून आम्हाला न्यायला गाडी येणार आहे, असं कारण सांगून आम्ही वाट पाहू लागलो. मी आल्याखेरीज तिथून हलू नका, असं निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फोनवर सांगितलं होतं. अंतराचा विचार करता ते खूपच लवकर जुळेवाडीत पोहोचले आणि सर्वसाधारण तपासणी असल्याचं भासवून कागदपत्रं तपासायला सुरुवात केली. हा सगळा स्टिंग ऑपरेशनचा परिणाम आहे, हे त्यांनी चेहऱ्यावर दिसूही दिलं नाही. पीसीपीएनडीटी कायद्याच्या सल्लागार समितीची मी सदस्य असल्यामुळं मी ओळखपत्र दाखवून त्यांना तपासणीसाठी अधिकृतरीत्या मदत करू शकत होते. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी डॉक्टरांना पेशंटचा (कविताचा) कन्सेन्ट दाखवायला सांगितला. पण डॉक्टर तो देऊ शकले नाहीत. अखेर अधिकाऱ्यांनी डॉक्टरांच्या टेबलाचा ड्रॉव्हर उघडून नोटा बाहेर काढल्या आणि प्रतिज्ञापत्रात वर्णन केल्याप्रमाणंच त्या आहेत का, याची तपासणी सुरू केली, तेव्हा आपण जाळ्यात अडकल्याचं डॉक्टरांना समजलं.

 हे सगळं सुरू असताना पत्रकार मित्रानं क-हाडहून पत्रकारांना बोलावून घेतलं होतं. अधिकाऱ्यांची गाडीही त्यानं त्यासाठी पाठवली होती. दोन गाड्याभरून पत्रकार आल्यानंतर सगळ्यांची तारांबळ उडाली. पत्रकारांचा नेहमीप्रमाणं पहिला प्रश्न, 'डॉक्टरांना अटक होणार का, असाच होता. पोलिस तर कुठेच दिसेनात. परंतु अशी प्रकरणं 'सरकारी अधिकाऱ्यांनी दाखल केलेला फौजदारी गुन्हा या गटात मोडतात, असं पत्रकारांना समजावून सांगितलं. स्टिंग ऑपरेशनमध्ये सगळे पुरावे हाताशी आलेले असतात. अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तपास संपलेला असतो. त्यामुळं तपासासाठी म्हणून आरोपीला ताब्यात घेण्यात अर्थच नसतो. तपासात अवघे सात मुद्दे असतात आणि त्यांची उत्तरं मिळाली, की तपास पूर्ण होतो. त्यानंतर रोपीकडून समाजाला धोका आहे, असं जर न्यायालयाला वाटलं, तरच त्याला अटक करून न्यायालयीन कोठडी दिली जाते. आपल्याकडे माध्यमांसह सगळेजण अटकेबद्दल आग्रही असतात; परंतु खरं तर आरोपीला शिक्षा व्हावी, यासाठी आग्रही असायला हवं. एखादं प्रकरण घडल्यानंतर तपासातल्या प्रगतीवर लक्ष ठेवायला हवं. खटले लवकरात लवकर निकाली निघायला हवेत. अशा प्रकारचा खटला उभा राहिल्यानंतर सुनावणीसाठी अवघे सहा-सात दिवस पुरेसे असतात; पण वर्षानुवर्ष खटले चालतात. शिवाय, अटकेपेक्षा अनेक महत्त्वाचे मुद्दे असतात आणि त्याची माहिती सगळ्यांना असणं अधिक महत्त्वाचं असतं.

 जुळेवाडीच्या डॉक्टरांचंच उदाहरण घ्यायचं झालं, तर त्यांचं सोनोग्राफी सेंटर नोंदणीकृत नव्हतं. सोनोग्राफी करण्याची अधिकृत परवानगी झटरांना नव्हती. त्यामुळं सोनोग्राफी करताना कोणकोणती कागदपत्रं तयार करावी लागतात, याची माहितीही अर्थातच त्यांना नव्हती. अर्थातच आवश्यक रेकॉर्ड नव्हतं. परवाना नसताना त्यांना सोनोग्राफी मशीन विकलं कुणी आणि कसं? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा व्यक्तीलाही या प्रकरणात आरोपी करायला हवं. परवाना नसताना एखाद्या कंपनीला सोनोग्राफी मशीनची ऑर्डर देता येते. परंतु मशीनचा कब्जा घेण्यापूर्वी नोंदणी तपासली जाते. तपास अहवालात हे सगळे मुद्दे आम्ही नोंदवले आणि कविताला तिच्या नवऱ्यासह मीडियासमोर आणलं. अर्थात त्यांची नावं जाहीर केली नाहीत. प्रकरण कोर्टात गेलं, तेव्हा आरोपीनं जामीन मिळाल्याबरोबर सोनोग्राफी मशीनची परत देण्याची मागणी केली. पुरावा नोंदवला गेल्यामुळं सोनोग्राफी मशीन कोर्टाच्या ताब्यात ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता, म्हणून कोर्टानं मशीन न्यायला सांगितलं. कोर्टातून बाहेर पडलेल्या मशीनचा ताबा डॉक्टरांना मिळणं योग्य नव्हतं. ते कन्हाडच्या कॉटेज हॉस्पिटलनं ताब्यात घ्यायला हवं होतं. परंतु हॉस्पिटलनं ताबा घेतला नाही. सिव्हिल सर्जननी मशीन डॉक्टरांना परत केलं.

 खटला सुरू झाला होता; पण त्यासाठी बघता-बघता तीन वर्ष उलटून गेली होती. आमची साक्ष असेल, तेव्हाच आम्ही कोर्टात जात होतो. रोजच्या रोज सुनावणीला हजर राहत नव्हतो. त्याच वेळी मसूर भागात एक महिला गर्भलिंगचाचणी करते, उंब्रजमध्येही असे प्रकार घडतात, अशी माहिती मिळाली. एक दिवस आम्ही गाडी काढून नागठाणे, मसूर, उंब्रज भागात फिरून आलो. ज्या महिला डॉक्टवर आम्हाला संशय होता, तिथं आम्ही कविताला पाठवलं; पण 'आमच्याकडे असे प्रकार केले जात नाहीत,म असं सांगून तिला तिथून जायला सांगण्यात आलं. पण त्याच क्लिनिकमधल्या एका स्टाफ मेंबरनं दुसऱ्या एका महिला डॉक्टरचं नाव सांगितलं; पण तिच्याकडे जायचं असेल, तर तिच्या मुलाचीच गाडी बुक करावी लागते, असंही सांगितलं. तोपर्यंत कैलास गावात चौकशी करत होता आणि त्याला यशही आलं होतं. 'मी काम करून देईन, अशी हमी देणारा एक माणूस त्याला भेटला होता. थोडक्यात, त्याच्या आईकडे तपासणीसाठी जायचं असेल, तर त्याचीच गाडी भाड्यानं घ्यावी लागत होती आणि त्याची आईही दुसऱ्या कुणाकडून आलेले पेशंट स्वीकारत नाही, असा हा मामला असल्याचं लक्षात आलं. 'दोन-तीन दिवसांनी जाऊया. फोन करून येतो, असं कैलासनं त्या माणसाला सांगून टाकलं.

 ठरल्या दिवशी त्याला फोन केला आणि एका गर्भवतीला घेऊन आम्ही आणखी एका मोहिमेवर निघालो. देहविक्रय करणाऱ्या महिलांमध्ये एचआयव्हीविषयी जागृतीचं काम आम्ही करीत होतो. गर्भवती महिला त्यातलीच एक. परंतु या व्यवसायात असूनसुद्धा ती अशा प्रकारच्या कारवाईसाठी तयार झाली, हे विशेष! त्या माणसाच्या गाडीत तिला घेऊन आमची कार्यकर्ता वनिता आणि वनिताच्या पतीला पाठवलं आणि आम्ही दुसऱ्या गाडीतून त्या गाडीचा सुरक्षित अंतरावरून पाठलाग करू लागलो. 'आईकडे जावं लागेल. ती पुढे घेऊन जाईल, असं त्यानं सांगितलं होतं. परंतु त्याच्या आईचं क्लिनिक खूपच मागे पडलं होतं आणि त्याची गाडी क-हाडच्या दिशेला लागली होती. आम्हाला आश्चर्य वाटलं; पण तो मात्र गाडी भलत्याच आडमार्गानं दामटत राहिला. कृष्णा साखर कारखान्याजवळ आम्ही पोहोचलो, तेव्हा त्याची गाडी आम्हाला दिसेनाशी झाली. इथून पुढे तो कुठे गेला, हेच कळेना. अखेर वनिताला फोन करून विचारलं, तेव्हा मोठा धक्का बसला. ती म्हणाली, 'आम्ही जुळेवाडीत आलोय. म्हणजे, एक खटला डोक्यावर असताना तिथल्या डॉक्टरांनी पुन्हा व्यवसाय सुरूही केला होता. सोनोग्राफी मशीन त्यांना परत करणं सिव्हिल सर्जनना नव्हे, तर ग्राहकांना महागात पडलं होतं. कारण तपासणीचा पूर्वीचा अडीच हजार रुपये दर जवळजवळ तिप्पट वाढून सहा हजार झाला होता!

 जुळेवाडीच्या पहिल्या मोहिमेत कैलास, शैलाताई सगळे होते. यावेळी फक्त वनिताच्या पर्समध्ये ठेवलेला मोबाइल आणि त्यावर झालेलं थोडंफार रेकॉर्डिंग एवढाच पुरावा हाताशी होता. शिवाय, नंबर नोंदवून प्रतिज्ञापत्र केलेल्या नोटा डॉक्टरांना दिल्या होत्या. पण आम्ही पुन्हा जुळेवाडीत जाऊ शकत नव्हतो. डॉक्टर सावध झाले होते. शिवाय ते आम्हाला चांगलंच ओळखत होते. अखेर वनिताला त्याच माणसाच्या गाडीतून क-हाडपर्यंत यायला सांगितलं. आम्ही रस्त्यातच थांबलो होतो. त्याच्या गाडीच्या मागून आम्ही कहाडच्या हद्दीत प्रवेश केला. पण दरम्यानच्या काळात त्याची त्यावेळी क-हाडच्या पोलिस निरीक्षकांनी वाहतूक पोलिसांना संबंधित क्रमांकाची गाडी अडवायच्या सूचना देऊन ठेवल्या होत्या. क-हाडच्या मार्केट यार्डजवळ येताच त्याची गाडी अडवून वाहतूक पोलिस थेट त्याच्या गाडीतच जाऊन बसला. गाडीच्या बाबतीत काहीतरी गडबड झाली आहे, आपल्याला आता आरटीओ ऑफिसला जावं लागणार, असं त्याला वाटत असतानाच पोलिसानं त्याला गाडी कॉटेज हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं, तेव्हा मात्र तो बिथरला. कॉटेज हॉस्पिटलमल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे त्याला आणलं; पण तो काही बोलायला तयार होईना. तेव्हा मात्र मी आणि शैलाताईंनी त्याला स्वतंत्र खोलीत नेलं आणि कौशल्य पणाला लावून बोलतं केलं. तोपर्यंत कॉटेज हॉस्पिटलमध्ये पत्रकार येऊन दाखल झाले होते. त्यांच्यासमोर तो घडाघडा बोलायला लागला. त्याच्याबरोबर त्याचा क्लीनरही होता.क्लीनरकडे मधूनच तो बघायचा आणि म्हणायचा, “गयी रे गयी... पूरी गयी.

 त्यानं दिलेल्या माहितीनुसार, जुळेवाडीच्या क्लिनिकवर कारवाईला पथक गेलं, तेव्हा मात्र तिथलं सोनोग्राफी मशीन गायब झालं होतं. 'मशीन दुरुस्तीसाठी पुण्याला पाठवलंय, असं डॉक्टर सांगू लागले. मग मात्र आम्ही मशीन ज्याच्याकडे दुरुस्तीला दिल्याचं तो सांगत होता, त्यालाच पकडून आणायला लावलं. या निमित्तानं यंत्रणांमधल्या पोकळीचा कसा गैरफायदा घेतला जातो, याचा आम्हाला जवळून अनुभव आला. जुळेवाडीच्या त्या डॉक्टरांविरुद्ध पहिला गुन्हा नोंदवला गेला, त्याला तीन वर्ष उलटली होती. त्या खटल्याचा निकाल तर अजून लागला नव्हताच; शिवाय सोनोग्राफी मशीनचाही दुरुपयोग डॉक्टरांनी गुन्हा दाखल झाल्यानंतरही तब्बल तीन वर्ष केला होता. नोंदणी न केलेलं मशीन डॉक्टरांकडे दिलं गेलं, तिथंच यंत्रणेकडून मोठी चूक राहून गेली होती. यावेळी तसं होऊ नये, यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. मनात आलं, साधा एक गुन्हा रोखायचा तरी किती पातळ्यांवर प्रयत्न करावे लागतात! आम्हाला फक्त मुली वाचवायच्या आहेत; पण ज्यांना त्या नको आहेत, त्यांच्यासाठी यंत्रणेत किती पोकळ्या आहेत! किती पळवाटा आहेत!

 लढाई एवढ्यावर संपणार नव्हतीच. याच खटल्यात आमच्या पुढे बरंच काही वाढून ठेवलं होतं. खटला सुरू झाला आणि अचानक तपासणीसाठी नेलेली गर्भवतीच गायब झाली. ती कुठे गेली हे कुणालाच माहीत नाही. ती गायब झाली की तिला गायब केलं गेलं, हेही समजायला मार्ग नाही. खटला सुरू होण्यापूर्वी ती प्रसूत झाली होती. तिला मुलगा झाला होता. पण दुर्दैवानं ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि तिचं बाळही! तिच्यावर, तिच्या बाळावर योग्य उपचार होत आहेत की नाही, याची माहिती आम्ही बाळ वर्षाचं होईपर्यंत घेत होतो... आणि अचानक ती गायब झाली. तिला शोधण्यासाठी आम्ही आमची सगळी यंत्रणा कामाला लावली. अनेक शहरांमधले रेड लाइट एरिया पालथे घातले. पोलिसांत तक्रार दिली, तर पोलिसांनाही ती सापडली नाही. अखेर आम्ही हायकोर्टात 'हेबिस कॉर्पसम दाखल केलं. तिचा तपास हायकोर्टानं पोलिसांकडून काढून सीआयडीकडे दिला. सीआयडी ही एक गतिमान यंत्रणा आहे, असं आम्हाला तोपर्यंत वाटत होतं. पण तोही गैरसमजच ठरला. सीआयडी कार्यालयातला संगणकसुद्धा चांगला नव्हता. अखेर आम्ही त्या कार्यालयात जाताना आमचा लॅपटॉप घेऊन जाऊ लागलो.

 दरम्यान, जुळेवाडीच्या डॉक्टरांविरुद्धचा पहिला खटला अजून सुरूच होता आणि दुसऱ्या खटल्यातला प्रमुख साक्षीदारच बेपत्ता झाला होता. त्यातच हे दोन्ही खटले एकत्रितपणे चालवावेत, अशी सूचना आली. खटले लवकर निकाली काढण्याच्या दृष्टीनं ती योग्य असली, तरी दुसऱ्या खटल्यातली मुख्य साक्षीदारच बेपत्ता असल्यामुळे डॉक्टरांचा सुटकेचा मार्ग जवळजवळ मोकळा झाल्याचं दिसू लागलं होतं. त्याचा परिणाम पहिल्या खटल्यावरही झाला असता. त्यामुळं आम्ही दोन्ही खटले एकत्र करण्यास नकार दिला. स्वतंत्रपणे चालवलेल्या पहिल्या खटल्यात डॉक्टरांना तीन वर्षांचा सश्रम कारावास, दहा हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास आणखी एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत निकाल लागलेला हा देशातला पहिला खटला ठरला. या खटल्याचं निकालपत्र सर्व संबंधितांनी अभ्यास करावं, असं आहे. एकंदर नऊ कलमं शाबीत झाली आणि प्रत्येक कलमाखाली वेगवेगळी शिक्षाही ठोठावली गेली. परंतु सगळ्या शिक्षा एकाच वेळी भोगायच्या असल्यामुळं डॉक्टरांना तीन वर्षेच तुरुंगात जावं लागणार होतं. निकालपत्रात न्यायालयानं जी टिपणी केली आहे, ती उद्बोधक आहे. न्यायाधीशांनी आपल्याकडची मुलगा जन्माला घालण्यासाठी महिलेवर कुटुंबात किती दबाव असतो आणि त्यामुळं असे प्रकार करणाऱ्यांचं कसं फावतं, याचं समर्पक चित्र असला, तरी आमच्या मनाला वेगळीच चुटपूट लागून राहिली. ती आजतागायत कायम आहे. डॉक्टरांच्याविरुद्धच्या दुसऱ्या खटल्यात प्रमुख साक्षीदार असलेली ती अभागी महिला कुठं आहे, हे आजही आम्हाला ठाऊक नाही. एखादा मोठा विजय मिळावा आणि त्याला अशी जिव्हारी लागणारी दुखरी किनार असावी, याला काय म्हणायचं!
केवढी ही साखळी..!

 हा निनावी फोन दोन-तीन दिवसांपासून सतत येतोय आणि कार्यकर्ते मात्र कागदपत्रं चिवडत बसलेत... मला राहवलंच नाही. जोरात ओरडले, "अरे, कागद मांडून काय बसताय सगळे! एवढंच काम उरलंय का आपल्याला? हा फोन कुणाचा आहे? कशासाठी सारखा-सारखा फोन करतोय हा माणूस? ह्याच्या गावच्या माणसानं वेडंवाकडं काही केलं असेल, तर ह्याला का उत्साह आलाय सांगायचा? व्यक्तिगत काही खुन्नस असेल का? कराना जरा शहानिशा!

 कैलास, शैलाताई आणि बाकीचे सगळेच कान देऊन ऐकू लागले. वाईजवळच्या गावातून हा फोन येत होता. त्या गावच्या कुठल्यातरी फौजीनं बायकोची सोनोग्राफी केली आणि कुठंतरी जाऊन सगळं 'उरकूनम आले, असं तो सांगत होता. फौजीला दोन मुली आहेत म्हणे. सहा महिन्यांपूर्वीच बायकोचं अॅबॉर्शन करून घेतलं होतं. आता पुन्हा... आम्ही गर्भलिंगचाचणी करणाऱ्या डॉक्टरांना पकडतो, एवढ्या माहितीवर हा माणूस सतत त्या फौजीची तक्रार करत होता. ही सगळी माहिती दिल्यावर कार्यकर्ते सावध राहिले आणि त्यानंतर आलेला फोन कैलासनं घेतला. त्याला प्रश्न विचारून माहिती मिळवू लागला. माहितीचा खरेखोटेपणा तपासण्यासाठी उलटसुलट प्रश्न विचारू लागला.फोन रेकॉर्ड होत होता आणि महत्त्वाची माहिती कैलास लिहनही घेत होता. त्या फौजीचं आणि तुमचं काही भांडण आहे का,म असं थेट विचारल्यावर म्हणाला, “हो आहे. आमचा सिव्हिल मॅटर चाललाय. मला नडलाय तो. आमच्याच भावकीतला आहे. पण फौजी म्हणून लई मिजास करतो. आम्ही कष्टानं शेती करणारी माणसं. खोटं बोलणार नाही. बातमी शंभर टक्के खरी आहे.

 त्या फौजीचं नाव रामसिंग. किस्सा वाई पोलिस स्टेशनच्या हद्दीतला. इन्स्पेक्टर वेताळ तिथले इनचार्ज. मग त्यांना फोन लावला. सांगणाऱ्यानं बरीच हेरगिरी केली होती. फौजी बायकोला ज्या गाडीतून घेऊन गेला, त्या पांढऱ्या आल्टोचा नंबरसुद्धा त्यानं आम्हाला पुरवला होता. वेताळ साहेबांनी भेटायला बोलावल्यावर आम्ही सगळे संध्याकाळी वाईला गेलो. गाडीनंबर बघून ते म्हणाले, इथली लोकलच दिसतीय गाडी. त्यांनी आरटीओ ऑफिसला फोन लावून गाडी कुणाच्या नावावर आहे, हे काढून घेतलं. गाडीमालकाला बोलवून घेतलं. तो रामसिंगचा मित्रच. मग त्याला पाठवून रामसिंगला बोलावून घेतलं. प्रश्नोत्तरं सुरू झाली; पण ठोस माहिती मिळेना. उडवाउडवीचीच उत्तरं.

 अशा वेळी तोंडं कशी उघडायची, हे तंत्र आतापर्यंत मला चांगलंच अवगत झालं होतं. “मला पाच मिनिटांचा वेळ द्या, असं मी वेताळ साहेबांना खुणावताच रामसिंगला एकट्याला तिथं ठेवून बाकी सगळे बाहेर गेले. मी रामसिंगला म्हटलं, “हे बघ. सरळ बोललास तर ठीक आहे. तुला सुरक्षित कसं ठेवायचं, हे आम्ही बघू; पण त्यासाठी तू खरं बोललं पाहिजे. थोड्या प्रयत्नांनंतर तो बोलू लागला. बायकोला घेऊन गेल्याचं कबूल केलं. वेताळ साहेबांकडून साडेसात-आठच्या दरम्यान रामसिंगला आमच्या ताब्यात घेतलं. सातारच्या सिव्हिल हॉस्पिटलला येईपर्यंत वाटेत त्याचं प्रबोधन केलं. 'चुकीचं काही बोललास तर तू नक्की अडकशील, हे समजावून सांगितलं. सिव्हिल सर्जनच्या केबिनमध्ये गेल्यावर त्याला जसं आठवेल तसं खरं-खरं लिहून काढायला सांगितलं. बोलतानासुद्धा तो मधून-मधून वेगळीच माहिती देतोय, काहीतरी लपवतोय, विसंगत बोलतोय, हे ध्यानात येत होतं. लिहिताना तसं होणार नाही, असं वाटलं होतं. पहाटे पाचपर्यंत त्याचं स्टेटमेन्ट लिहून घेणं चाललं होतं. सिव्हील हॉस्पीटल सातारा येथे.

 बायको कुठाय, असं विचारल्यावर ती माहेरी गेल्याचं त्यानं सांगितलं. त्याला म्हटलं, “घरी जा. तुझ्या दोन्ही मुलींची कुठेतरी सोय लाव. सासुरवाडीला जा आणि बायकोला घेऊन ये. त्याची सासुरवाडी खंडाळा तालुक्यातल्या शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत. नीरा नदीजवळ. तो बोलत असताना कैलासनं शूटिंग करून ठेवलं होतं. लेखी स्टेटमेन्टबरोबरच बाइटसुद्धा आमच्याकडे जमा झाली होती. पण त्याच्या बोलण्यातली विसंगती मात्र गुंतागुंत वाढवणारी होती. रामसिंगच्या सांगण्यानुसार, त्याला एका मित्रानं नंबर दिला होता. त्या नंबरवर फोन लावल्यावर त्याला साताऱ्यात बोलावून घेण्यात आलं होतं. एसटी स्टैंडच्या मागं. पारंगे हॉस्पिटल चौकात. तिथून बायकोला संबंधित लोक एका गाडीतून सोनोग्राफीसाठी घेऊन गेले होते. पण सोनोग्राफी कुठं झाली, हे मात्र आपल्याला माहीत नाही, असा जबाब त्यानं दिलेला. “सोनोग्राफीनंतर दोन दिवसांनी गर्भपात करण्यासाठी मात्र मीच माझ्या ओळखीनं तिला अकलूजला घेऊन गेलो होतो, असा त्याचा जबाब होता.

 पोलिसांच्या मदतीनं आम्ही रामसिंगचे त्या काळातले कॉल डिटेल्स मिळवले. दोघांचं स्टेटमेन्ट जवळजवळ सारखंच येणार, असं वाटलं होतं. पण त्याच्या बायकोची एन्ट्री झाल्यावर कहाणीला वेगळीच कलाटणी मिळाली. "तू शिकलेली आहेस का? या प्रश्नानं मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. पण ती केवळ शिकलेलीच नव्हे, तर मला ओळखणारी निघाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेत महिलांना नोकरी मिळायला हवी, या मागणीसाठी आम्ही पूर्वी मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला ती आली होती. पारंगे हॉस्पिटल चौकात तिला गाडीत बसवून नेण्यात आलं, इथंपर्यंतचा तपशील बरोबर होता. "तुला कुठं नेलं हे दाखवू शकशील का? दवाखाना दाखवशील का? या प्रश्नाला तिनं होकारार्थी उत्तर दिलं आणि आम्ही तिला गाडीत बसवलं. पोवई नाक्यावरून तिनं गाडी हायवेच्या दिशेनं नेली. गाडी हायवेला लागल्यावर आम्हाला शंका आली... काशीळचा बोगस डॉक्टर खान! तोच असावा. व्हेटर्नरी डॉक्टर जे मशीन गाई-म्हशींची सोनोग्राफी करायला वापरतात, त्या मशीननं बायकांची सोनोग्राफी करणारा! 'दवाखाना असा बोर्ड लावलाय. त्याचा भाऊ डॉक्टर आहे; पण खान स्वतः मात्र डॉक्टर नाही. आधीही अशा प्रकरणात तो सापडला होता. रामसिंगच्या बायकोनं काशीळचा तोच दवाखाना दाखवला.

 ही बाब एवढ्यात उघड करायची नाही. तिला काशीळच्या खानकडे ज्या डॉक्टरनं पाठवलं, त्यालाही पकडायचं आणि त्यासाठी स्टिंग ऑपरेशन करायचं, असं आम्ही ठरवलं. परत येताना हायवेवरच्या ढाब्यावर आम्ही सगळे जेवलो. रामसिंगच्या बायकोला तब्येत सांभाळण्याच्य सूचना दिल्या. सकाळी आल्याबरोबर तिनं निम्मीच कहाणी सांगितली होती आणि आम्ही बाहेर पडलो होतो. उरलेली कहाणी ती सांगत असताना रामसिंग मध्येच काहीतरी बोलत होता. त्यामुळं शंका वाढत होत्या. 'सोनोग्राफीसाठी कुणी आणि किती पैसे दिले, असं आम्ही त्याला विचारलं. त्यानं हजार रुपये दिल्याचं सांगितलं. 'गर्भपातानंतर गर्भ कुठे टाकला, या प्रश्नाला त्यानं 'माहीत नाही, असं उत्तर दिलं होतं. पण त्याच्या बायकोला एकान्तात विचारल्यावर ती म्हणाली, "टाकून कसं देईन? शेवटी तो पण जीवच आहे की! मी घेऊन आले. माहेरी नेलं आणि नीरा नदीच्या डोहात पुरलं. हे सगळं करताना रामसिंग तिच्याबरोबरच होता, ही गोष्ट रामसिंगनं लपवून ठेवली होती. मग रामसिंगला बोलावून रुजवात केली. सगळं सत्य समोर आलं होतं. आता नीरा नदीच्या डोहात पुरलेला गर्भ शोधून काढण्याचं खडतर आव्हान समोर उभं होतं.

 जिल्हाधिकाऱ्यांना भेटून डोहातून गर्भ उकरून काढण्याची परवानगी मागितली. त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीत त्यांची बैठक सुरू होती. पण बैठक संपेपर्यंत थांबायला आम्हाला वेळ नव्हता. त्याच बैठकीत खंडाळ्याचे तहसीलदार बसले होते. त्यांच्या नावे परवानगी मागणारं पत्र दिलं. शिरवळ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागणार होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांना तशी विनंती केली, तेव्हा त्यांनी शिरवळ पोलिस ठाण्याला फोनवरून तसं कळवलं. शिरवळ पोलिसात झिरो नंबरनं नोंद केली. कॉन्स्टेबल सोबत घेऊन रामसिंगच्या सासऱ्याकडे गेलो. त्याला सोबत घेऊन नीरा नदीच्या त्या डोहाकडे निघालो, तेव्हा अंधार पडला होता. नदीपात्रातल्या चिखलातून चालवत म्हाताऱ्यानं आम्हाला चांगलं अडीच किलोमीटर आत नेलं. पाय घसरत होते. चिखलात रुतत होते. पण आम्ही चालत राहिलो. अंधार पडल्यामुळं नेमकं ठिकाण सापडेना. जेव्हा म्हाताऱ्यानं ठिकाण खवलं तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते. रात्री उकरू शकत नाही, असं पोलिसांनी गितलं; पण रात्रीत कुणी गर्भ गायब केला तर...? शेवटी तहसीलदारांना सांगितलं, “इथं नदीपात्रात गार्ड लावा... रात्रभर... सकाळी शोधायचं ना? मग लावा पहारा. तहसीलदारांनी दोन पोलिसांना तिथंच, नदीपात्रात पहायला उभं केलं. रात्रभर दोघं पाण्यात उभे होते.

 हे सगळं सुरू असेपर्यंत रामसिंगचा सासरा वेगवेगळ्या सबबी सांगत राहिला. “फार खणलं नव्हतं आम्ही. आता नदीला पाणी वाढलंय. गेलं असेल वाहून, असंतो सांगत होता. पण 'गर्भ सापडला नाही, तर तुझी खैर नाही, असा उलटा दम मी म्हाताऱ्यालाच दिला तेव्हा तो गप्प झाला. सूर्योदय झाल्याबरोबर तहसीलदार पंचांना घेऊन डोहाजवळ गेले. गर्भ सापडला. सहा महिन्यांची मुलगी. नदीपात्रात, थंड वातावरणात राहिल्यामुळं जशीच्या तशी राहिली होती. डॉक्टरनं गर्भ नेण्यासाठी दिलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत स्पष्टपणे दिसत होता तिचा पूर्ण आकार धारण केलेला देह. आईच्या ऊबदार गर्भातून खेचून नीरेच्या थंडगार डोहात गाडला गेलेला. श्वास घेण्याचा हक्क नाकारलेला इवला मानवी देह! त्या वितभर देहाकडे बघून तळपायाची आग मस्तकाला गेली.

 गर्भ डीएनए चाचणीसाठी पाठवून रामसिंगला दमात घेतलं. फौजी असूनही त्याच्याबद्दल कोणतीही सकारात्मक भावना मनात शिल्लक नव्हती. त्याला म्हटलं, “ज्या डॉक्टरांनी सोनोग्राफीसाठी तुझ्या बायकोला खानकडे पाठवलं, त्याची अपॉइन्टमेन्ट आता तूच आम्हाला मिळवून द्यायची, समजलं? शाहूपुरीतल्या त्या डॉक्टरांचे कारनामे आम्हाला आधीपासूनच ठाऊक होते. अशा एका प्रकरणात पूर्वी ते निर्दोष सुटले होते. त्याला जाळ्यात पकडण्यासाठी आम्ही गर्भवती महिलेचा शोध घेऊ लागलो. डॉ. आ. ह. साळुखे यांची सून उमा साळुखे या एकात्मिक बालविकास यंत्रणेत सुपरवायझर असल्यामुळं त्यांनाही सांगून ठेवलं होतं. त्यांनी सुषमाचं नाव सुचवलं. साताऱ्यातल्या एका खेड्यातील ही अंगणवाडी सेविका. तिसऱ्यांदा गरोदर असल्यामुळं बाळाच्या जन्मानंतर नियमाप्रमाणं तिची नोकरी जाणार, हे निश्चित होतं. पण चांगल्या कामासाठी शासनाला मदत केली, तर शासनानं तिला मदत करावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं तिला सांगितलं. तिचा भाऊ शहीद जवान. त्याच्या नावाची कमानही आहे तिच्या गावात. तिच्या घरी जाऊन तिच्या सासू-सासऱ्यांना, पतीला विश्वासात घेतलं. तिनं तयारी दर्शवल्यावर आम्ही तिला साताऱ्याला आणलं. आमच्या एका कार्यकर्त्याला तिच्या नवऱ्याची भूमिका दिली. तो छुपा कॅमेराही सहजगत्या हाताळण्यात पटाईत होता.

 रामसिंगनं शाहपुरीतल्या डॉक्टरांना फोन केला. "माझ्यासारखाच फौजी आहे. त्याला मदत करा, असं बोलला. डॉक्टर तयार झाले; पण रेट वाढलाय असं सांगितलं. वीस हजारांची मागणी केली. मग आम्ही नोटांचा तपशील लिहून अॅफिडेव्हिट तयार केलं. डॉक्टरांचं क्लिनिक माझ्या बहिणीच्या, रूपाताईच्या घराजवळच आहे. रूपाताई आणि शैलाताई घराजवळच रिक्षा घेऊन तयारीत राहिल्या. कार्यकर्ता सुषमाला घेऊन क्लिनिकमध्ये गेला. मी आणि कैलास थोड्या अंतरावर गाडी घेऊन थांबलो. आमची गाडी डॉक्टरांनी ओळखली असती म्हणून! कार्यकर्त्याचा एक मित्र मोटारसायकल घेऊन तयार होता. ठरल्याप्रमाणं कार्यकर्त्यानं डॉक्टरांशी संभाषण झाल्यावर शैलाताईंना मेसेज केला. शैलाताईंनी मला फोन केला... "डॉक्टर त्यांना घेऊन बाहेर पडतायत.मम तेवढ्यात डॉक्टरांची काळ्या रंगाची गाडी सुसाट वेगानं बाहेर पडली. शैलाताईंनी रिक्षा वळवून घेईपर्यंत दिसेनाशीही झाली. मग कार्यकत्यांच्या मित्राबरोबर शैलाताई मोटारसायकलवर बसल्या आणि पाठलाग सुरू झाला. आम्हीही निघालो. कैलास वेळीप्रसंगी खूप वेगानं गाडी चालवू शकतो. तरीसुद्धा आम्हाला काळी गाडी दिसत नव्हती, इतक्या वेगात ती गेली होती. गाडीतूनच आम्ही शाहूपुरी पोलिस ठाण्यात फोन केला आणि तयारीत राहायला सांगितलं. काशीळमधला डॉ. खानचा दवाखाना बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळं बोरगाव ठाण्यालाही कळवलं. तिथून पोलिसांची गाडीही निघाली. डॉक्टरांची गाडी खूप पुढे गेली असली तरी काशीळला खानकडेच जाणार, हे आम्हाला माहीत असल्यामुळं त्या दिशेनं सगळ्या गाड्या सुसाट निघाल्या. पोलिस येईपर्यंत आम्हाला ओळखसुद्धा द्यायची नाही, अशा सूचना कार्यकर्त्याला आम्ही दिल्या होत्या. खानच्या घरासमोर काळी गाडी दिसली. बोरगाव पोलिसांची गाडी आल्यावर मी गाडीतून उतरले. पोलिसांनी गाडीतून उड्या टाकल्या.

 खानला समोर बघितल्यावर माझी मस्तकाची शीरच तडतडली. वैद्यकिय अधिकारी यांनी त्याला ताब्यात घेऊन आतल्या खोलीत नेलं. सोनोग्राफी मशीन ताब्यात घेणं आवश्यक होतं. पण आम्ही आत येईपर्यंत चमत्कार झाला होता. मशीन गायब झालं होतं. शैलाताईंनी आणि वैद्यकिय अधिकारी बोरगाव पोलिसांनी सगळीकडे शोधाशोध केली. पाण्याच्या टाकीत, घरामागच्या विहिरीत, सगळीकडे शोधलं; पण मशीन सापडलंच नाही. बोरगाव पोलिस ठाण्याचे प्रमुख साध्या वेशातच आले होते. पण आम्ही खानला निष्कारण गोवत आहोत, असंच त्यांना वाटत होतं. पोलिसांनी खानला आतल्या खोलीत नेलं, तेव्हा बाहेर आमच्याबरोबर ते हुजत घालत होते. खान असं काही करत असेल, हे मानायलाच ते तयार नव्हते. पण तेवढ्यात तिथं आणखी एक बाई आली. आम्हाला तिथलेच कर्मचारी समजून ती म्हणाली, “मुलगा की मुलगी बघायचंय... तेव्हा कुठं पोलिस अधिकाऱ्यांना खात्री पटली. अर्थात, खान दोन-तीन गुन्ह्यांसाठी पोलिसांना हवा होता. सोनोग्राफी मशीन शोधताना त्याची बँकेची पासबुकं, प्रॉपर्टीचे कागदपत्र, गाड्या असं बरंच काही पोलिसांना सापडलं. सोनोग्राफीसाठी आलेल्या बाईला विचारलं, "तुला हे ठिकाण कुणाकडून समजलं? तिनं दिलेल्या उत्तरानं सगळेच चाट पडले. तिला क-हाडच्या एका प्रतिष्ठित कॉलेजच्या प्राध्यापिकेनं काशीळला जायला सुचवलं होतं. कपाळावर हातच मारून घेतला मी!

 इकडे बोरगाव पोलिस खानची चौकशी करत असताना मी पुन्हा साताऱ्यात आले. शाहपुरी पोलिसांची तयारी झाली होती. त्यांना घेऊन वैद्यकिय अधिकाऱ्यांनासह शाहपुरीतल्या डॉक्टरांच्या क्लिनिकवर छापा टाकला. आम्ही दिलेल्या वीस हजार रुपयातल्या काही नोटा जप्त झाल्या. बाकीच्या नोटा बोरगावला आल्या होत्या. साताऱ्यातून डॉक्टरांना ताब्यात घेऊन आम्ही काशीळला आणलं. तिथं खानच्या घरासमोर आता गर्दी झाली होती. पत्रकारही जमले होते. दोघांनाही बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं. कलमं कोणती लावायची, आयपीसीची कुठली, पीसीपीएनडीटी कायद्याची कुठली, यावर चर्चा झाली. बोरगाव पोलिस ठाण्यात खानविरुद्ध गुन्हा दाखल करून आम्ही माघारी फिरलो तेव्हा खूप रात्र झाली होती.

 सोनोग्राफी करणारे गजाआड झाले होते. आता गर्भपात करणाऱ्याकडे मोर्चा वळवायचा होता. थांबून चालणार नव्हतं. सातारा आणि काशीळमधली कारवाई होईपर्यंत मी अकलूजच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या गर्भपाताबद्दल सोलापूर जिल्हा प्रशासनाला कळवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही साताऱ्याहून निघालो. सोलापूरच्या सिव्हिल सर्जनना घेऊन आम्ही अकलूजमध्ये पोहोचलो, तेव्हा दुपारचे चार वाजले होते. रामसिंगला बरोबर घेतलं होतं. फाइव्ह स्टार हॉटेलला लाजवेल असं हॉस्पिटल, यापूर्वीही अशा घटनांमुळं चर्चेत आलं होतं. डॉक्टर स्वतः शिक्षा भोगून आले होते. हॉस्पिटलचा थाट काही औरच. प्रशस्त इमारत, देखणं इन्टीरिअर. मुख्य म्हणजे, रेकॉर्ड अपडेट ठेवलेलं. सिव्हिल सर्जन आणि आम्ही डॉक्टरांना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर रेकॉर्डही बघू लागलो. गर्भपातांच्या नोंदी तपासताना त्यात रामसिंगच्या बायकोचं नाव दिसलं. त्याचबरोबर या सोनोग्राफी मशीनची नोंदणी एमटीपी कायद्यांतर्गत केलेली नव्हती, हेही स्पष्ट झालं. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत केवळ डॉटरच नव्हे तर त्यांच्या वडिलांनाही शिक्षा झाली होती. मग डॉटरांनी आपल्या पत्नीला गायनॅकॉलॉजीचा कोर्स करायला सांगितलं. विजापूरमधून पत्नीनं तो कोर्स केला आणि मग तिच्या नावावर सोनोग्राफी मशीनचा परवाना मिळवला.

 ही सगळी माहिती घेता-घेता बरंच रेकॉर्ड तपासून झालं होतं. पंढरपूर, माळशिरस, फोंडशिरस, नातेपुते, म्हसवड, फलटण, वाई... अगदी दूरदूरच्या महिलांचा गर्भपात या हॉस्पिटलमध्ये झाल्याच्या नोंदी होत्या. यातले बहुतांश गर्भपात संशयास्पद असणार, याची आम्हाला खात्री पटली. रेकॉर्डनुसार या सगळ्या गर्भपातांची चौकशी व्हायला हवी, असं आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना सांगितलं. अकलूजचे पोलिस उपअधीक्षक हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी पंचनामे, मशीन सील करणं, जाबजबाब ही सगळी कायदेशीर प्रक्रिया उरकून आम्ही परत निघालो, तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते. दमणूक तर खूप झाली होती; पण डोक्यातली चक्रं थांबत नव्हती. कुठे वाई तालुक्यातलं छोटंसं गाव, कुठे सातारची शाहपुरी, कुठे काशीळ, कुठे शिरवळ.... आणि कुठे अकलूज! एका मुलीला जन्म नाकारण्यासाठी कुठल्या कुठे भटकंती करतात माणसं! कुठल्या कुठल्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कुठले-कुठले गुन्हे नोंदवायचे? कोणकोणत्या कोर्टात कुणा-कुणाविरुद्ध खटले लढवायचे? केवढी ही साखळी! कशासाठी..? मुलगी नको म्हणून! मुलगा हवा म्हणून देवाला नवस बोलणारी ही माणसं मुलगी नको म्हणून इतक्या ठिकाणी फिरून, इतकी पापं करताना त्याच देवाला घाबरत कशी नाहीत? एक प्रकरण खणून काढलं, तर इतकी दमणूक होते आपली... पण थकायची परवानगीच नाही आपल्याला....शक्य तेवढ्या साखळ्या उद्ध्वस्त केल्याच पाहिजेत... शक्य तितक्या मुली वाचवल्याच पाहिजेत!