सोनसाखळी/सदिच्छेचे सामर्थ्य
<poem> एक होता राजा. तो फार दुष्ट होता. तो प्रजेला फार छळी. प्रजेला कोणतेही सुख नाही. डोक्यावर कर मात्र वाढत होते. प्रजा हवालदील झाली. 'असा कसा हा राजा, मरत का नाही एकदा,' असे ती म्हणे. पुढे काय झाले. राजा आजारी पडला. त्याच्या सर्व शरीराला व्रण झाले. त्या व्रणातून पू येई, रक्त येई, माशा सभोवती भणभण करीत. गावोगावचे वैद्य आले. हकीम आले, नाना उपाय झाले. परंतु गुण पडेना, व्रण बरे होई ना. ती क्षते मोठी होऊ लागली. अपार वेदना होऊ लागल्या. राजाला वाटे मरण बरे. गावाबाहेर एक नवीन साधू आला होता. लहानशी झोपडी बांधून तो राहिला होता. तो कोणाच्या आगीत नसे दुगीत नसे. रामनाम घेण्यात रंगलेला असे. "राजा, गावाबाहेर एक साधू आला आहे. त्याच्याकडे जाऊन पाया पड. तो काही उपाय सांगेल." एक जुना वृद्ध मंत्री म्हणाला. "न्या मला पालखीतून. पाहू या प्रयत्न करुन." राजा म्हणाला. पालखीतून राजाला नेण्यात आले. साधू रामनामात रंगला होता. "महाराज, राजा तुमच्याकडे आला आहे. पाहा त्याची स्थिती. किती दुर्दशा झाली आहे! तुम्ही सांगा काही उपाय. राजाला चैन पडत नाही. त्यामुळे राज्यकारभाराकडे लक्ष लागत नाही. तुम्ही दया करा." असे मंत्री हात जोडून म्हणाला. पालखीवरील पडदा दूर करण्यात आला. राजा विव्हळत होता. माशा येऊन भणभण करु लागल्या. शिपाई त्यांना हाकलू लागले. "फार होतो त्रास. महाराज, फार आहे दुःख. तुम्ही तरी आरोग्य द्या. माझ्यासाठी देवाला आळवा. देव तुमचे ऐकेल." राजा म्हणाला. साधूने राजाची दशा पाहिली. तो तेथेच सचिंत उभा होता. "राजा, तुझ्यासाठी मी देवाची प्रार्थना करीन. परंतु तू सुद्धा मी सांगेन तसे केले पाहिजे. औषध घेतले पाहिजे. पथ्यपाणी सांभाळले पाहिजे." साधू म्हणाला. "कोणते औषध घेऊ? जो उपाय सांगाल तो करीन. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी वागेन." राजाने सांगितले. साधू म्हणाला, "राजा, तुझ्या सर्व अधिकाऱ्यांना प्रजेशी नीट वागण्याची आज्ञा दे. प्रजेवर किती तरी नवीन नवीन कर बसविण्यात आले आहेत, ते सारे कमी कर. शेतसारा फार वाढला आहे, तोही माफ कर. रस्ते नीट बांध. दवाखाने ठायी ठायी घाल. उद्योगधंद्याच्या शाळा काढ. त्याने बेकारी कमी होऊन लोक सुखी होतील. ठिकठिकाणी पाटबंधाऱ्यांची कामे सुरु कर. कालवे वाढव. तसेच लाचलुचपतीस आळा घाल. जंगलातील गवत, वाळलेले फाटे लोकांना मोफत नेऊ दे. अरे, प्रजा सारी दुःखी आहे. ती दुःखी असता तुला कोठून सुख! सारी प्रजा तुझ्या नावाने खडे फोडीत आहे. मी जेथे जातो तेथे हायहाय ऐकू येते. रोग वाढले, दारिद्र्य वाढले. मरणाचा सुकाळ झाला. 'असा कसा हा राजा, असा कसा हा राजा!' असे सारे बोलतात. म्हणून हो तुझ्या शरीराला ही व्याधी! तू नीट वाग, प्रजेला पोटच्या मुलाप्रमाणे पाळ म्हणजे बघ चमत्कार होईल. रोग पळून जाईल. तू बरा होशील." मंत्री म्हणाले, "साधू महाराज, राजाच्या दुखण्याचा राज्यकारभाराशी काय संबंध? राज्यकारभार कसा चालवावा ते सांगायला आहेत मंत्री. तुम्ही एखादे औषध सांगा. झाडाचा पाला, एखादी मुळी, नाहीतर अंगारा असे काही द्या. राजाच्या दुखण्याची थट्टा नका करु." साधू म्हणाला, "मला उपाय माहीत आहे तो सांगितला. दुसरे उपाय मला माहीत नाहीत. जडीबुटी मजजवळ नाही. राजाच्या दुखण्याची मी थट्टा नाही करीत. मी खरे ते सांगितले. दुसऱ्याच्या दुःखाची थट्टा करणारा साधू कसा असेल? मी तसा असेन तर माझी प्रार्थना तरी देव कसा ऐकेल?" राजा म्हणाला, "प्रधानजी, साधू म्हणतो तसे करुन पाहू या. इतके बाह्य उपाय झाले. हकीम झाले, वैद्य झाले, मांत्रिक झाले, तांत्रिक झाले. आता साधू म्हणतो तसे वागू या. चला परत." साधूला प्रणाम करुन ते सारे परत गेले. राजाने नवीन हुकूम दिले, अधिकारी नीट वागू लागले. डोईजड कर कमी झाले, शेतसार प्रमाणात झाला. रस्ते झाले, कालवे झाले. उद्योगधंद्याच्या शाळा झाल्या. लोकांना आज आजारीपणात औषधपाणी मिळू लागले. जसजसा राज्यकारभार सुधारु लागा तसतसा राजाचा रोग बरा होऊ लागला. प्रजा राजाला दुवा देऊ लागली. "कसा उदार आहे राजा, किती प्रजेवर त्याचे प्रेम!" असे लोक म्हणू लागले. "राजा चिरायू होवो, सुखी होवो, उदंड आयुष्याचा होवो!" अस स्त्रीपुरुष, लहानथोर सारे म्हणू लागले. हळूहळू राजा निरोगी झाला. शरीरावरचे व्रण गेले. शरीर तेजस्वी व सुंदर झाले. त्याचे मनही सुंदर झाले. त्याची बुद्धिही निर्मळ झाली. एके दिवशी राजा प्रधानाला म्हणाला, "त्या साधूने सांगितले तसे झाले. त्यांचे हे उपकार. त्यांना वाजतगाजत येथे आणू या. त्यांचा सत्कार करु या." सारे शहर शृंगारले गेले. ठायी ठायी कमानी व तोरणे उभारण्यात आली. रस्त्यात चंदनाचा सडा घालण्यात आला. घोडेस्वार, हत्ती, वाजंत्री सारा थाट सजला. राजा साधूकडे गेला. त्याने आग्रह करुन साधूमहाराजांस पालखीत बसविले. स्वतः राजा पायी चालत निघाला. तो साधूवर चौऱ्या वारीत होता. मिरवणूक सुरु झाली. हजारो लोक जमले होते. साधूचा जयजयकार होत होता. लोक लाह्या, फुले यांची वृष्टी करीत होते. कोणी तर चांदीसोन्याची फुले उधळली. मिरवणूक संपली. महासनावर साधूमहाराज बसले. राजाने त्यांची पूजा केली. नंतर साष्टांग प्रणाम करुन राजा म्हणाला, "हजारो लोक जमले आहेत. दोन उपदेशाचे शब्द सांगा." साधूमहाराज उभे राहिले. टाळ्यांचा कडकडाट झाला. नंतर सारे शांत झाले. साधू म्हणाला, "मी काय सांगू? मी एकच गोष्ट सांगतो. दुसऱ्याला कधी दुःख देऊ नका, दुसरा तुमचे भले चिंतील अशा रितीने वागत जा. सर्वांना तुम्ही हवेसे वाटाल असे वागा. मनुष्य जन्मतो तेव्हा स्वतः रडतो परंतु इतरांना आनंद होतो. आता असे मरा की, तुम्हाला मरताना आपण चांगले वागलो असे मनात येऊन आनंद वाटेल व असा चांगला मनुष्य मरणार असे मनात येऊन लोक रडतील. लोकांची सदिच्छा, लोकांचे आशीर्वाद हेच आपले सुख. राजा, तू नीट वागत नव्हतास. तुझा राज्यकारभार चांगला नव्हता. लोक म्हणत, "राजा म्हणजे पीडा. कधी सरेल ही पीडा." त्यामुळे तू व्याधीने पीडलास. परंतु तुझा कारभार कल्याणमय होऊ लागताच "किती चांगला राजा" असे लोक म्हणू लागले. तुझा रोग हटला. प्रजेच्या आशीर्वादात राजाचे बळ, प्रजेच्या शापात राजाचे मरण, म्हणून सर्वांनाच सांगतो की, चांगल्या रीतीने वागा. एकमेकांचे शिव्याशाप न घेता एकमेकांचे आशीर्वाद घ्या. आणि हा संसार सुखाचा करा. पृथ्वीवर स्वर्ग आणा."
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |