सोनसाखळी/मुले म्हणजे देवाची ठेव
<poem> एक होता राजा. तो रस्त्याने जात असता वाटेत जर लहान मुले भेटली तर त्यांना नमस्कार करी. राजा म्हाताऱ्या लोकांना नमस्कार करीत नसे. परंतु मुलांसमोर मात्र लवे. लोकांना याचे आश्चर्य वाटे. हळूहळू लोक राजाला वेड लागले असे म्हणू लागले.
गोष्ट प्रधानाच्या कानावर गेली. त्याच्या मनात आले की, राजाला आपण सारे सांगावे. एके दिवशी तो मुद्दाम उजाडताच राजाला भेटावयास गेला. राजाने विचारले, "आज इतक्या लवकर काय काम आहे?" प्रधान म्हणाला, "महाराज मला तुम्हाला काही विचारावयाचे आहे." राजा म्हणाला, "विचारा. संकोच करु नका." प्रधान म्हणाला, "महाराज, तुम्ही वेडे झाले आहात असे सारे लोक म्हणतात." राजा म्हणाला, "का बरे? मी कुणाच्या घरांना आगी लावित नाही. कोणाचे नुकसान करीत नाही. दुसरे देश लुटित नाही. प्रजेवर वाटेल तसे कर लादित नाही. मग मला वेडा का म्हणतात?" प्रधान म्हणाला, "महाराज आपण दयाळू आहात, न्यायी आहात, सारे खरे. आपल्या कारकीर्दीत खेडोपाडी रस्ते झाले, विहिरी झाल्या, पाट झाले, उद्योगधंदे आहेत, सारे शिकलेले आहेत. न्याय आहे, नीती आहे. ते सारे खरे पण.." राजा म्हणाला, "पण काय? कोणती माझी चूक झाली, कोणते अविचाराचे कृत्य झाले?" प्रधान म्हणाला, "महाराज, तुम्ही रस्त्यातून जाताना शेंबड्या लहान पोरांना वाकून लवून नमस्कार करता. परंतु वृद्धांना कधी करीत नाही. नमस्कार करायचाच झाला तर म्हाताऱ्या मंडळीस करावा. लहान मुलांना का कोणी नमस्कार करतो?" राजाने हसून विचारले, "म्हणून का मी वेडा?" प्रधान म्हणाला, "लोक असे म्हणतात, राजा पोराबाळांना प्रणाम करतो. राजाला वेड लागले." राजाने उत्तर दिले, "मी वेडा नाही. लोकांनाच कळत नाही. मी करतो ते बरोबर करतो." प्रधानाने विचारले, "ते कसे काय?" राजा म्हणाला, "जे लोक म्हातारे झाले, त्यांचा पराक्रम कळून चुकला. ते काय करणार, काय नाही, सारे जगाला कळले. त्यांची कर्तबगारी काय ती दिसून आली. परंतु लहान मुलांचे अद्याप सारे दिसावयाचे असते. लहान मुले पाहिली म्हणजे माझ्या मनात येते यांच्यातून उद्या कोण निर्माण होईल, कोणास ठाऊक? यांच्यातून मोठे कवी निघतात, चित्रकार निघतात, वीर निघतात, मुत्सद्दी निघतात, साधुसंत निघतात का मोठे शास्त्रज्ञ निघतात? काय सांगावे? सारे शक्य आहे. म्हणून मी मुलांना वंदन करतो. त्यांच्यातील अप्रकट शक्तीला नमस्कार करतो." प्रधान म्हणाला, "महाराज आपले करणे बरोबर आहे. आम्हीच वेडे. आपण शहाणे आहात, दूरचे बघणारे आहात." राजा म्हणाला, "म्हणून तर लहान मुलांची काळजी घेतली जावी म्हणून मी खटपट करतो. त्यांच्यासाठी फुलबागा आहेत, त्यांच्यासाठी क्रीडांगणे आहेत. त्यांच्यासाठी नाना वस्तूंची संग्रहालये आहेत. शाळांतून त्यांना गायीचे दूध मिळेल अशी व्यवस्था केली. मुलांमधील देव प्रकट होतो. मुलांची जीवने नीट फुलून त्याचा सुगंध पसरो. मुले म्हणजे देवाची ठेव. हिला जपले पाहिजे. प्रधान म्हणाला, "खरे आहे महाराज. आता लोकांना मी समजावून सांगेन. इतके दिवस बालदिन पाळतात परंतु मुलांचे महत्त्व त्यांना कळले नाही. मलाही कळले नाही. आम्ही सारे वरवर पाहणारे लोक. बरे जातो."
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |