सुरवंटाचे फुलपाखरू

विकिस्रोत कडून





सुरवंटाचे फुलपाखरू
व्यवस्थापनशास्त्रातील भारतीय प्रयोग




सुरवंटाचे फुलपाखरू
व्यवस्थापनशास्त्रातील भारतीय प्रयोग



डॉ.लक्ष्मण नारायण गोडबोले






ग्रंथाली प्रकाशन क्रमांक ४०४ सुरवंटाचे फुलपाखरू

पहिली आवृत्ती २२ मार्च २००९


© डॉ.लक्ष्मणनारायणगोडबोले

ए/४१, सुखदा सहनिवास

पांडुरंगवाडी मार्ग ४, गोरेगांव पूर्व

मुंबई ४०० ०६३

Email : tatami@mtnl.net.in


मुखपृष्ठ

राजा मराठे


अक्षरजुळणी

ग्रंथाली संगणक विभाग

प्रकाशन

ग्रंथाली

इं.ए.सोसायटीची म. फुले कन्याशाळा,

बाबरेकर मार्ग, गोखले रोड (उ)

दादर (प), मुंबई ४०००२८

दूरध्वनी : २४४७४८४३ ग्रँटरोड २३८७५४८१

Email: granthalio1@gmail.com


मुद्रण

जयमल्हार प्रिटिंग प्रेस

२१७ आशीष इंडस्ट्रियल इस्टेट

गोखले रोड, (प.) दादर (प)

मुंबई ४०० ०२५


मूल्य १२० रुपये





व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासात
माझी आद्यगुरू असलेल्या
आईस
(कै. अन्नपूर्णा नारायण गोडबोले)
१ चैत्र १९३१/२२ मार्च २००९



आमुख




 काटेरी व माणसाला त्रास देणाऱ्या 'सुरवंटाचे फुलपाखरू' हा निसर्गात घडणारा चमत्कार, खुद्द या लिखाणाच्या बाबतीत घडलेला आहे. मी याचा पहिला खर्डा १९९४ सालापासून २००४ सालापर्यंत तयार केला. तो काही मित्रांना छायाप्रतींच्या स्वरूपात वाचायला दिला. तो त्यांना आवडला. ते लिखाण पुस्तक म्हणून छापावे असा विचार त्यातून पुढे आला, पण हातून कृती घडली नव्हती.

 माझा अनुभव मानव-संसाधन-संबंधीच्या कामाचा, तो मराठीतून नवीन धंदा-उद्योग करू इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या मराठी व्यवस्थापकीय उमेदवारांच्या हाती पडावा असे वाटत होते. छोट्या उद्योजकांच्या कारखान्यांना बरे दिवस आले की लगेच तिथे 'लेबर प्रॉब्लेम' झाला आहे असे कानावर यायचे. ते उद्योजक निरुत्साही झालेले दिसायचे. माझे या क्षेत्रातले अनुभव त्यांच्यापर्यंत पोचवावे असे वाटे. हा वाचक-समूह छोटा असणार हे अपेक्षित होते. त्यामुळे मूळ लिखाण जरी २००४ सालापर्यंत पुरे झालेले होते तरी त्यानंतरची पाच वर्षे ते सुरवंटासारखे माझ्यापाशी कोषात पडून होते.

 पाच महिन्यांपूर्वी, माझे मित्र वैद्य भिकाजी केशव पाध्ये-गुर्जर यांनी याची प्रत दिनकर गांगल यांच्या हाती पडण्याची व्यवस्था केली. तिथून मग या लिखाणाला पंख फुटले. त्याचे फुलपाखरू झाले आहे की नाही हे वाचकांनी ठरवायचे आहे.

 सगळेजण वैश्विकीकरण (ग्लोबलायझेशन) या विषयाविषयी बोलतात, पर्यावरणाविषयी बोलतात, तेव्हा तो जणू काही हल्लीच उद्भवलेला विचार आहे असे लोकांना वाटते. भारतातले अद्वितीय विचारवंत आचार्य विनोबा भावे यांनी त्याचा उद्घोष १ नोव्हेंबर १९५७ रोजी 'आता 'जय हिंद' पुरेसे नाही, तर 'जय जगत' हवे,' असा केला होता. ही घटना लोकांना माहीतच नाही असे आढळले.
 त्यामुळे माझे अनुभव, त्यांचे भारतीय मुळाशी नाते व जग छोटे होत असताना भारतीय विचारपद्धतीत असलेली अंतर्गत ऊर्जा जगव्यापी कशी होऊ शकेल असा विचार मनात आल्यावर, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा असे प्रकर्षाने जाणवले. या नव्या जगात वावरण्यासाठी, संगणक व इंटरनेटमुळे घरात येणारी क्रांती कशी पचवायची, त्यांचा वापर करून भारतीय पृथगात्मता व तिची जयष्णुता पुढे कशी आणावी हा विचार बळावला. अर्थात मी हे सारे माझ्या अनुभवांच्या मर्यादित चौकटीतून, व्यवस्थापनशास्त्राच्या मर्यादित क्षेत्रातल्या शक्यतांतून मांडले आहे.
 व्यवस्थापनशास्त्र हे जागतिक आहे. त्यात भारतीय असा वेगळेपणा आहे का? हा प्रश्न माझ्यासमोर गेली अनेक वर्षे सतत आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे. रसायन. वैद्यक भौतिकी ही जशी जागतिक विज्ञाने किंवा शास्त्रे आहेत; तसेच अर्थशास्त्राचे आहे. हिंदू अर्थशास्त्र असे वेगळे काही शास्त्र आहे हे मला पटत नाही. त्यामुळे व्यवस्थापनशास्त्राचे तसेच आहे का? त्याबाबतचा हा माझा शोध आहे.
 मी स्वतः व्यवस्थापक म्हणून १९६४ सालापासून २००७ सालापर्यंत निरनिराळ्या पदांवर काम केले आहे. व्यवस्थापनशास्त्रावरची पाश्चात्य लेखकांची बरीच पुस्तके आहेत, त्यांतली काही मी वाचली आहेत आणि त्या पुस्तकांत दिलेल्या काही कल्पना व विचार प्रत्यक्ष माझ्या कामाच्या ठिकाणी वापरून पाहिल्या आहेत.मी काम करत असलेल्या कंपन्यांच्या कामगारांना उद्देशून १९६६ पासून २००७ पर्यंत दरमहा पत्ररूपाने, त्या कल्पनांच्या अनुषंगाने काहीना काही लिहीत आलो आहे.
 त्यातले जे विचार पक्के झाले त्यांना एकत्रित स्वरूपात वाचकांच्यासमोर मांडण्याचा माझा हा प्रयत्न आहे.
 मी रोज नवे विचार वाचत नव्याने जगत असतो व रोजच, माझ्या स्वतःच्यात प्रयत्नपूर्वक बदल करत असतो. मी रोज बदलतो म्हणून माझे लेखनही आपोआप बदलत गेलेले आहे.
 व्यवस्थापनशास्त्रातल्या अनेक परकीय संकल्पना, विचार इंग्लिश भाषेमधून भारतात येतात, त्यावर परिसंवादही होतात, पण त्या संकल्पनांचा वापर करून आलेले अनुभव क्वचित कोणी व्यवस्थापकांनी लिहिलेले मला आढळले आहेत.
 व्यवस्थापनशास्त्रावर भारतीय लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांतसुद्धा भारतीय उदाहरणे, भारतीय अनुभव, केस स्टडीज' जवळ जवळ नसतात. यशस्वी भारतीय व्यवस्थापकांच्या, उद्योगपतींच्या वा व्यावसायिकांच्या मुलाखती मधून मधून नियतकालिकांतून प्रसिद्ध होतात. त्यात त्या यशस्वी व्यवस्थापकांच्याबद्दल स्तुतिपर ढोबळ विधाने केलेली असतात. त्यांतले निष्कर्ष अमेरिकन पुस्तकातल्या निष्कर्षांशी मिळतेजुळते दिसतात. त्यांत मधून मधून तोंडी लावण्यासाठी गीता, रामायण, महाभारत,चाणक्याचे अर्थशास्त्र यांच्यातली वचने ही त्यांच्या आयुष्यातली ध्येयवाक्ये होती असे सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यातून वेगळ्या असा व्यवस्थापनशास्त्राचा भारतीय अनुभव मांडलेला नसतो.
 दुसऱ्या बाजूला त्यासाठी व्यवस्थापनासंबंधी प्रसिद्ध होणाऱ्या अमेरिकन मासिकांत सध्या चलनात असलेल्या व्यवस्थापनशास्त्रातल्या संकल्पना जुन्या भारतीय वाङ्मयात कशा आहेत हे सांगण्याचा आटापिटा आढळतो. जुन्या संस्कृत वाक्यांचा किंवा वाक्यांशांचा त्यासाठी वापर केला जातो. तोही मला योग्य वाटत नाही.
 अद्वैतासारखे अत्युत्तम 'दर्शन' जगाला दिलेल्या आपल्या देशात वर्ग- संघर्ष व 'अॅडवर्सरी कल्चर' या दोन द्वैताधारित गोष्टींनी साऱ्या व्यवस्थापन विचाराला जखडून टाकलेले आहे. ब्रिटिश राजकर्त्यांनी त्यांच्या देशात असलेली वर्गविग्रहाची संकल्पना त्यांच्या कायद्याच्या रूपाने भारतात आणली. त्यांचीच न्यायपद्धत आपल्याकडे राबवली. त्यातले मूळ गृहीत कृत्य 'अॅडवर्सरी कल्चर'चे किंवा समाजात निरनिराळ्या गटांतल्या सततच्या द्वंद्वस्थितीचे आहे. याउलट, भारतीय परंपरा ही सामाजिक समन्वयाची आहे. अॅडवर्सरी कल्चर या मूळ गृहीतकाचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे. संघर्षाऐवजी सामंजस्यावर भर देण्याची आपल्या देशात आवश्यकता असताना आपण आमच्या मुळांपासून उखडले गेलेलो आहोत, म्हणून सदैव हक्कांची व संघर्षाची भाषा वापरली जाते. चीन,जपानसारख्या पौर्वात्य देशांत सामाजिक व्यवहारात 'न्याया' पेक्षा 'सामंजस्य' ही अग्रक्रमाची गोष्ट मानतात हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.
 जपानच्या 'नॅशनल पॅनॉसॉनिक'ने फिलिप्स ह्या हॉलंडमधल्या कंपनीशी तांत्रिक सहकार्याचा पहिला करार केला तेव्हा त्यांनी, 'तंत्रज्ञान सर्वस्वी तुमचे घेऊ, त्यावरचे स्वामित्वाचे पैसे पूर्ण देऊ पण व्यवस्थापनात मात्र तुमची तांत्रिक मदत आम्हाला नको' अशी भूमिका घेतली होती. ओऽहमी या व्यवस्थापनशास्त्रातल्या नामवंत जपानी वंशाच्या लेखकाने तर जपानी लोकांनी व्यवस्थापनातल्या सर्व आधुनिक कल्पना अमेरिकन पुस्तकांतूनच उचलेल्या आहेत. फक्त त्या जपानी मुशीत घालून त्यांनी त्यांचे जपानी व्यवस्थापनपद्धतीत रूपांतर केले असे म्हटले आहे. आपल्याला यातून बरेच शिकण्यासारखे आहे.
 विनोबांना एकदा एका सभेत (१९५२) कोणीतरी असा प्रश्न विचारला की, “काय हो, नव्या घटनेप्रमाणे जवाहरलाल नेहरूंना एक मत आणि त्यांच्या चपराशालाही एक मत देण्यात नेहरूंचा काय शहाणपणा आहे?" विनोबांनी उत्तर दिले, की जवाहरलाल हे पाश्चात्य विचारात वाढलेले असले तरी त्यांची मूळ भूमिका अद्वैतवादी आहे. प्रत्येक व्यक्तीतला आत्मा एक असल्याने त्यांनी सर्व लोकांना सारखा म्हणजे दरडोई एका मताचा अधिकार दिला. एवढा सुंदर, सोपा आणि भारतीय माणसाला भावणारा व सहज समजणारा खुलासा माझ्या पाहण्यात अन्यत्र आलेला नाही.
 नेहरूंनी अद्वैतवादी श्रद्धेने वा विचाराने हा निर्णय घेतलेला असेल की काय याबद्दल माझ्या मनांत शंका आहे. ब्रिटनच्या पार्लमेंटने जे कायदे पास केले व जो मताधिकाराचा पाया घातला तो त्यांच्या विचारांप्रमाणे. भारतीय घटना ज्या लोकांनी बनवली त्यांच्यासमोर फ्रेंच, ब्रिटिश, अमेरिकन असे पाचात्य नमुने होते. तेव्हा सार्वत्रिक प्रौढ मतदान ही कल्पना परकीय विचारातून भारतात आलेली आहे. हा मुळचा पाश्चात्य विचार विनोबांनी पचायला सुलभ बनवून, भारतीय वैचारिक मूलाधाराशी या संकल्पनेचे कलम मोठ्या कुशलतेने केले.
 व्यवस्थापनशास्त्रातल्या पाचात्य संकल्पना भारतीय मुशीत ओतून, जपानी व्यवस्थापनासारखी, भारतीय व्यवस्थापनशास्त्राची भारतीय मूलाधारावर आधारित मांडणी आपण कां करू नये या विचाराने हे लिहिले आहे. त्यातला स्वतःच्या अनुभवास आला व यशस्वी वाटला तेवढाच भाग या पुस्तकाच्या उत्तरार्धात उत्तररंग म्हणून लिहिला आहे. नारदीय कीर्तनपद्धतीप्रमाणे पूर्वरंगात तत्त्वविचाराची मांडणी आणि उत्तररंगात तो विचार किंवा तेच पालुपद अनुभवाधारित गोष्टींनी आळवले आहे. खरेतर भारतीय व्यवस्थापनशास्त्राच्या नव्या विचारांची सुरुवात शेवटच्या अठराव्या प्रकरणापासून सुरू होत आहे. माझ्या या लेखनात त्याची नुसती सुरुवात मांडलेली आहे.

सुरुवात


 १.०१ भारतीय व्यवस्थापनशास्त्राचा वेगळेपणा शोधण्याच्या माझ्या प्रयत्नांना सुरुवातीची प्रेरणा एका अभ्यासवर्गाने झाली. फाऊंडेशन फॉर इंटिग्रल मॅनेजमेंट या संस्थेने ८ मार्च १९९२ ते १३ मार्च १९९२ या सहा दिवसांत अहमदपूर-मांडवी या दीव बेटाजवळच्या गुजरात सरकारच्या पर्यटक निवासात कार्यशाळा योजलेली होती. तीत भाग घेण्याची संधी गुजरात अंबुजा आणि एक्सेल इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त सहकार्यामुळे मला मिळाली.
 १.०२ आम्ही सतराजण त्यात सहभागी होतो. कार्यशाळेचे प्रमुख संयोजक प्रा. एस् के चक्रवर्ती हे कोलकात्याच्या 'इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट' मधले प्राध्यापक होते. कार्यशाळेचा मुख्य आधार 'मॅनेजमेंट बाय व्हॅल्यूज' हे प्राध्यापक चक्रवतींचे पुस्तक व रवींद्रनाथ ठाकर. योगी अरविंद आणि विवेकानंद यांची भारतीय विचारधारेसंबंधीची मते हा होता. त्यांनी मांडलेल्या विचारांच्या अनुषंगाने अभ्यासवर्गात चर्चा झाली.
 १.०३ या कार्यशाळेचा दुसरा विशेष म्हणजे मौन या संकल्पनेचा जास्तीत ही सर्वजण सकाळी एकत्र जमत असू. सर्वांनी पांढरे कपडे वापरायचे असा नियम होता. बैठकीची सरुवात 'वंदे मातरम'ने व्हायची. शेवट 'जनगणमन'ने व्हायचा. आद्य शंकराचार्यांचे 'निर्वाणषटकम' म्हणन सहा कडव्यांचे गीत आहे. ते प्रथम टेपरेकॉर्डरवर वाजवले जायचे. त्यानंतर प्रत्येक सहभागी माणसाने मनाचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न व्यक्तिशः काही वेळ करायचा असाही नियम होता.
 १.०४ माणसाच्या जीवनाची सुरुवात श्वासोछ्वासाने होते व शेवटही त्यानेच होतो. म्हणून श्वासोछ्वासावर नियंत्रण ही पहिली पायरी. दीर्घश्वासाचा सराव करायचा. मग श्वासावर लक्ष केंद्रित करत करत, मनाचे अचपळपण आवरत हृदयाच्या अंतरंगात लक्ष केंद्रित करायचे अशी अपेक्षा होती. भारतीय तत्त्वज्ञानात मनाच्या गूढ कप्प्यात, म्हणजेच हृदयगुहेत जे सूक्ष्म तत्त्व विद्यमान असते, त्याचा विचार करायचा ही महत्त्वाची गोष्ट मानली जाते. त्याच आत्मतत्त्वाचे वैश्विक सत्याशी असलेले नाते लक्षात घेऊन माणसामाणसांमधले संघर्ष, मानसिक ताण टाळण्याचे उपाय आणि यशस्विता व त्यातून . उद्योगव्यवस्थापनाचा भारतीय पायावरील विचार हे कार्यशाळेचे सूत्र होते.
 १.०५ अमेरिकन व्यवस्थापन तंत्रातल्या 'मोटिवेशन', 'वर्क एथिक', 'मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिज', 'ट्रॅन्झंक्शनल अॅनॅलिसिस' यासारखी व्यवस्थापन तंत्रे (मॅनेजमेंट टेक्निक्स), जपानी पद्धतीची मॅनेजमेंट, धंद्यातल्या यशाच्या मोजमापाच्या पद्धती, 'गोल्स', 'सुपरऑर्डिनेट गोल्स' अशा साऱ्या संकल्पनांशी अभ्यासकांचा पूर्वपरिचय कार्यशाळेत गृहीत धरलेला होता. त्यामुळे भारतीय पायावर आधुनिक कल्पनांची सांगड घालणे आणि त्यातले मुळातले फरक लक्षात घेणे हे कार्यशाळेचे प्रमुख काम होते.
 १.०६ थोडक्यात म्हणजे इंग्लिशमधून शिकलेल्या, इंग्लिशमधून आधुनिक तंत्रज्ञान ग्रहण केलेल्या भारतीय व्यवस्थापकांना त्यांच्या मूळ भारतीय नाळेच्या नात्याचा प्रायोगिक अनुभव आणि बुद्धिवादावर आधारलेली ओळख करून देणे हा कार्यशाळेचा हेतू होता. पायाभूत ग्रंथ अर्थातच रवीन्द्रनाथ, विवेकानंद, अरविंद, व गांधी या पश्चिमेची विद्या पचवून स्वदेशी मुळांकडे परतलेल्या महान भारतीयांचे होते. त्यातला आध्यात्मिक अनुभूतीसंबंधीचा भाग रामकृष्ण परमहंस यांच्या अनभवजन्य गढ साक्षात्कारासंबंधी होता. मी या आध्यात्मिक अनुभूतीसंबंधी लिहिणार नाही. कारण त्यातली माझी साधना अगदी तोकडी आहे. त्यातला फक्त बुद्धिगम्य भाग मी माझ्या शब्दांत भारतीय व्यवस्थापनासंबंधीच्या माझ्या कल्पनांच्या संदर्भात मांडणार आहे.
 १.०७ रामकृष्ण परमहंस, अरविंद व रवींद्रनाथ यांच्या बऱ्याचशा कल्पना विश्वमानवाच्या संदर्भातल्या आहेत. म्हणजेच, खास हिंदुस्थानी माणसांचा विचार असा वेगळेपणा त्यात दाखवता येणार नाही. त्या महामानवांच्या विचारांचा मूळस्रोत भारतीय अध्यात्मात खोलवर रुजलेला असला तरी त्यांच्या विचारांत देशविशिष्ट अशा अर्थाने भारत-राष्ट्रीय भाग कमी आहे. अध्यात्मातला भारतीय विचार मुळात 'वसुधैव कुटुंबकम्' म्हणून जगातल्या सर्व मानवांसाठी आहे. या विचारवंतांपैकी कुणालाही त्यांच्या प्रादेशिक भारतीय राष्ट्रीयत्वाची लाज वाटत नव्हती, पण त्यांच्या विचारविश्वाचे स्वरूप मूलतः व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासातून आंतरराष्ट्रीय किंवा वैश्विक मंगल साधण्याचे होते. त्यामुळे भारतीय पृथगात्मता त्यांत खास उल्लेखलेली नाही. वैयक्तिक मोक्षाचा विचार जास्त आहे. मी मोक्ष या कल्पनेसंबंधी फारसा विचार केलेला नाही, किंवा तशा अनुभवाचा प्रयास केलेला नाही व म्हणून काहीही लिहिलेले नाही.
 १.०८ त्या मानाने, विवेकानंद हे जास्त प्रादेशिक स्वरूपाचे, राष्ट्रीय व लौकिक आयुष्याचा विचार मांडणारे, भारतात त्या काळात रूढ असलेल्या सामाजिक गोष्टी बदलायला हव्यात असे मानणारे होते. लोकमान्य टिळकांचा गीतेचा अर्थही निष्क्रिय भारतीय समाजाला निष्काम कर्मयोगाची प्रेरणा देणारा होता; तत्कालीन 'स्वदेशा'शी प्रादेशिक अर्थाने जास्त जोडलेला होता. माझी स्वतःची मानसिक घडण गुरुपरंपरा सांगायची तर शिवाजी, विवेकानंद, टिळक, सावरकर, विनोबा अशी आहे. माझे भारतीयत्वाचे आकर्षण या राष्ट्रीय, प्रादेशिक समाजात रुजलेले आहे. त्यामुळे आधुनिकातले आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान, उत्पादनतंत्र पचवून, भारताच्या मूळ संचिताशी संबंध कायम ठेवून भारतीय व्यवस्थापनशास्त्राचा विचार करणे आवश्यक आहे असे मला ठामपणे वाटते.
 १.०९ त्यामुळे मूळ भारतीय गाभ्याला हात न लावता पण ज्या गोष्टी स्थलकालसापेक्ष आहेत त्यात संपूर्ण बदल करण्यास माझी मानसिक तयारी आहे. पाश्चात्य विचारातला लोकशाहीचा आग्रह, स्त्रीपुरुष समानता, मतस्वातंत्र्य ह्या साऱ्या गोष्टी माझ्या श्रद्धेचा विषय आहेत. माझा ध्यास कुठल्याही ग्रंथप्रामाण्यापेक्षा त्या विचारसूत्रांशी प्रामाणिक राहण्याचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विचारांइतकाच प्रत्यक्ष आचार कती मला महत्त्वाची वाटते. केवळ आध्यात्मिक अनुभूतीवर किंवा ज्ञानावर माझे समाधान होत नाही. 'यथा चित्तं तथा वाचा यथा वाचा तथा क्रियाम्' यांतले वाचा आणि क्रिया यांमधले समानत्व मान्य करूनही केवळ चित्त व वाचा यांच्या शुद्धीवर माझे समाधान होत नाही तर तदनुसार कृती हीदेखील मला तितकीच महत्त्वाची वाटते.
 १.१० त्यामुळे प्रा. चक्रवर्ती यांचे विचारऋणं मान्य करूनही, त्यांनी उघडलेल्या दारातून प्रवेश केल्यानंतर मला जे जाणवले आणि मी गेली चाळीस वर्षे जे निरनिराळ्या अंगांनी व्यवस्थापनाचे अनुभव घेतले, त्यावर आधारित हे लिखाण आहे. रामायण, महाभारत, गीता, गीतारहस्य, गीताप्रवचने, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास हे त्याचे आधार आहेत. सावरकरांचे जळजळीत, हिंदुत्ववादी राष्ट्रीय विचार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटनात्मक संस्कार माझ्या मनावर आहेत. भारतातल्या 'धर्म' या संकल्पनेचा आधार आणि त्या मर्यादेतच 'अर्थ' व 'काम' यांचा विचार व्हायला हवा, पण त्याचा 'रिलिजन' हा सर्वमान्य अर्थ अपेक्षित नसल्याने मी धर्म या शब्दाचा वापर शक्यतो टाळला आहे.
 १.११ या साऱ्या गोष्टी बुद्धिगम्य पातळीवर समजून घेऊन, स्वतःच्या अनुभवांच्या व चिंतनाच्या मुशीत ओतून, मी हे सारे राजापुरी रोकडेपणाने लिहिले आहे.
 १.१२ वसंत बापटांनी म्हटल्याप्रमाणे, 'वंद्य हिमाचल तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा' त्यात डोकावणार ! 'मार्साचा मज अर्थ हवा अन् फ्रॉयडाचा मज काम हवा, या असुराघरी राबवण्या परी गांधींचा मज राम हवा' हे बा.भ.बोरकरांचे वचन मला मननीय वाटते, पण शेवटी विंदा करंदीकरांचा 'मृद्गंध' या लिखाणात अपरिहार्यपणे रसरसून आहेच.

स्वानुभवाची जमिन कसाची,
बीज रुजे श्रद्धेचे त्यावर;
आणिक वाढे वृक्ष तयातुन,
फळे लटकती ज्ञानाची वर.
.....मृदगंधाच्या नजराण्याविण,
काय तुला मी दुसरे देणे,
मातीतुन मी आलो वरती,
मातीचे घेऊनिया गाणे.

 १.१३ अमेरिकन पुस्तके जेव्हा एखाद्या नवीन व्यवस्थापनतंत्राचा विचार मांडतात त्यावेळी त्यांच्या संस्कृतीचा पाया त्यात गृहीत धरत असतात. त्या लेखकांच्या आणि वाचकांच्या मनात सारे गृहीतक स्पष्ट असते. त्यातला ख्रिश्चन तत्त्वज्ञानाचा मूलाधार पक्का असतो. त्यापेक्षा वेगळ्या पायावर ज्यांचे संचित आधारलेले आहे त्या भारतीयांनी त्या संकल्पना हा नुसत्या पुस्तकांत वाचलेल्या असतात. ती त्यांची श्रद्धा नसते. साधा शपथ घेण्याचा विचार पाहा. खोटी शपथ घेण्याच्या विचाराला जो ख्रिश्चन धर्मातला पापाचा (सिन) विचार आहे तो भारतीयांच्या मनात फार थोडा असतो.
 १.१४ पूर्व न्यायमूर्ती न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी तर असे विधान केले आहे, की 'पाश्चात्य देशात आरोपीही खरे बोलतो व या तथाकथित धार्मिक देशात देवाची शपथ घेऊन शंभर टक्के खरे बोलणारा साक्षीदारच अस्तित्वात नाही, मग तो धर्मगुरू असो, नेता-पुढारी असो. खोटे साक्षीदार, खोटी कागदपत्रे यांच्या भरवशावर न्याय दिला जाऊ शकतो. (मुंबई उच्च न्यायालयाच्या वास्तूच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त लिहिलेला 'लोकमुद्रा' पुरवणीतला लेख).
 १.१५ त्यामुळे साधा अर्ज करताना गांभीर्यपूर्वक शपथ घेण्याचा जो मजकूर असतो तो कोणीच गांभीर्याने पाहात नाही. तो नुसता उपचार होतो. त्यामुळे अर्जात दिलेली माहिती, तपशील खोटा ठरला तर माझी नेमणूक मुळातून रद्द होऊ शकते याचे महत्त्वच लोक ध्यानात घेत नाहीत. त्यामुळेच कामगाराचे संपूर्ण नाव, त्याचे स्पेलिंग, संबंधित नातेवाईकांची नावे, वये, जन्मतारखा, पत्ते व त्यांतले बदल कळवण्याची आपली जबाबदारी आहे असे कोणी मानत नाही. मग एखाद्याच्या अकाली मृत्यूनंतर कागद जेव्हा सरकारी खात्यात अडकून पडतात तेव्हा ते तपशील लोकांच्या लक्षात येतात. पण तोवर उशीर झालेला असतो. तपशिलाच्या, माहितीच्या (सँक्टिटीची) पावित्र्याची कल्पनाच लोकांना ज्ञात नसते. त्यातली वाईट गोष्ट अशी, की व्यवस्थापक लोकही माहिती पडताळून पाहात नाहीत किंवा कामगारांना जागरूक करण्याचे काम करत नाहीत. व्यवस्थापक म्हणून वडिलकीची ही नैसर्गिक जबाबदारी आपली मानत नाहीत. कारण कामगाराचे व आपले बृहत्पारिवारिक नाते आहे हेच त्यांच्या मनात नसते. ही परिवार-भावना किंवा समाजभावना त्यांनी तोडन टाकलेली आहे. त्यामळे कोणतीही शाश्वत मल्यव्यवस्था हा त्यांच्या श्रद्धेचा विषय नसतो. केवळ आर्थिक लाभ हे सर्व सार होते. 'अर्थ' व 'काम' यांनी धर्माच्या तटाच्या आत वावरायला हवे हे सूत्र लक्षात घेतले जात नाही.



 २.०१ माणसाच्या आयुष्याची सुरुवात श्वासाने होते व शेवट श्वास थांबण्याने होतो. त्यामुळे भारतीय योगास्त्राच्या विचारात श्वासोच्छ्वासाच्या नियंत्रणाला म्हणजेच प्राणायामाला महत्त्व दिले जाते. भारतीय मानसशास्त्रात पतंजलीने त्यावर साऱ्या योगसूत्रांची आखणी केली आहे. योग याचा मूळ अर्थ जोडणे असा आहे. त्यात मुळात काय जोडायचे हे माहीत असायला हवे.
 २.०२ भारतीय दर्शनांत प्रत्येक सजीवाच्या हृदयात असणारा ज्योतिःपिंड किंवा स्व किंवा आत्मा हे गृहीत प्रमेय आहे. ही मूळ संकल्पना आहे. वेदान्त, योग, सांख्य या दर्शनांत आत्म्याच्या ओळखीवर भर आहे. सारी खटपट 'मी कोण?' हे जाणण्याची आहे. म्हणजे स्व-चा अनुभव घेण्याची आहे. 'कोहम्' हा मूळ प्रश्न आहे. अध्यात्मशास्त्र याचा अर्थ आत्म्याला जाणून घेण्याचे शास्त्र. प्रत्येक जीवाच्या आत असणारा आत्मा हा सर्व जगाला व्यापून राहणाऱ्या परमात्म्याचा, परब्रह्माचा अंश आहे. त्यामुळे परमात्मा ही दुसरी महत्त्वाची संकल्पना आहे.जे 'ईश्वर', 'अला'. 'गॉड' मानतात ते त्या संकल्पनेचे परब्रह्माशी साधर्म्य मानू शकतात. ईश्वराचे अस्तित्व मानणे हा भारतीय तत्त्वज्ञानातल्या काही दर्शनांचा आधार आहे, पण सर्वांचा नव्हे. आत्मा व परमात्मा या दोन संकल्पना आणि त्यांचे एकावयवी स्वरूप सर्व दर्शनांत समान आहे.  २.०३ मालक-मजूर, व्यवस्थापन, धंदा-उद्योग यांचा विचार करत असताना आत्मा-परमात्म्याची भानगड कुठे आली असा प्रश्न वाचकाच्या मनात उठणे स्वाभाविक आहे. कुठलाही माणूस हा कोणत्यातरी समाजाचा . घटक असतो. त्या समाजाच्या काही मूळ संकल्पना समान असतात. त्या मूळ संकल्पनांची स्पष्ट ओळख जर तुम्हाला 'व्यवस्थापक' म्हणून नसेल तर त्या तुमच्याबरोबर काम करणाऱ्या माणसांच्या मनापर्यंत तुम्ही पोचू शकत नाही. देवाचे अस्तित्व नाकारून किंवा तशी भूमिका घेऊन तुम्ही ख्रिश्चन, मुसलमान किंवा ज्यू धर्मपंथांचे अनुयायी असणाऱ्या समाजाला समजू शकणार नाही. बहुतांश हिंदू संस्कारांत वाढलेल्या समाजाला तुम्हाला समजून घेता येणार नाही. माणसांना किंवा त्यांच्या समाजाला जर तुम्हाला समजून घेता आले नाही तर मग त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे करणार ? तुमची वैयक्तिक श्रद्धा।अश्रद्धा काहीही असली तरी परिणामकारक व्यवस्थापनासाठी इतरांच्या संचिताबद्दल माहिती असायला हवी. माणसामाणसांमधले संबंध समजून घ्यायचे असतील, एखाद्या प्रदेशातल्या लोकांकडून काम करून घ्यायचे असेल, उत्पादन करून घ्यायचे असेल, त्यांना एखादे उत्पादन विकायचे असेल, धंदा करायचा असेल, निवडणूक जिंकायची असेल, राज्य करायचे असेल तर त्या त्या विशिष्ट प्रदेशातल्या किंवा समाजातल्या लोकांच्या संस्कृतीचा, परंपरांचा, लोकमानसाचा मूलाधार तुम्हाला माहीत असायला हवा. एवढेच नव्हे तर त्याचे लोकव्यवहाराशी असलेले प्रत्यक्ष नाते समजून घ्यायला हवे. ते जर समजून घेतले नाही तर सारे प्रयत्नच फोल ठरतात.
 २.०४ भारतातल्या जवळजवळ सर्व माणसांच्या मनांत आत्म्यापरमात्म्याची कल्पना जाणते-अजाणतेपणे शब्द म्हणून तरी रुजलेली असते. ती व्यवस्थापकाच्या श्रद्धेचा विषय झाली तर उत्तमच, पण अगदी व्यावसायिक पातळीवर विचार करायचा झाला तरी असली गृहीतकृत्ये, मूळ मूल्ये ही तुम्हाला ध्यानात घ्यावी लागतात. विनोबांनी एका ठिकाणी म्हटले आहे, की युक्लिडच्या भूमितीची सुरुवात बिंदूच्या व्याख्येने होते. बिंदूला लांबी, रुंदी किंवा खोली नसते. ही परिमाणे नसतील तर तुम्ही बिंदू 'पाहणार' कसा? युक्लिडच्या भूमितीत बिंदू या संकल्पनेचे अस्तित्व गृहीत धरून मग त्यावर रेषा, सरळ रेषा, कोन, वर्तुळ, त्रिकोण या पायऱ्या पायऱ्यांनी सर्व अभियांत्रिकी शिकवली जाते. आरेखने, नकाशे बनवले जातात, यंत्रे, इमारती बांधल्या जातात. लोकव्यवहार चालवला जातो. विनोबा म्हणतात, की "बिंदूच्या व्याख्येत किंवा बिंदूच्या अस्तित्वाबद्दलच्या शंकेत तुम्ही अडकून राहिलात तर अभियांत्रिकीत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही."
 २.०५ एकदा सर्वव्यापी ब्रह्माचे किंवा ईश्वराचे अस्तित्व मानले, की मग ही सारी माणसे एकाच ईश्वराची लेकरे म्हणजे आपण सारी माणसे भावंडेच आहोत हे समजावणे सोपे होते. परमात्म्याचा अंश प्रत्येकात आहे हे सांगणे सोपे जाते. ही सारी गृहीतके जेव्हा श्रद्धेने, भावनेने स्वीकारली जातात तेव्हा तशा श्रद्धेच्या लोकांना कृती करण्यासाठी प्रोत्साहित करता येते. स्वतःच्या श्रद्धा काय आहेत याचा विचार उपयुक्त ठरतो. मोठी कामे घडवण्यासाठी नुसती शक्ती किंवा क्षमता पुरेशी ठरत नाही तर माणसाच्या भावनांना, मनाला जागे करावे लागते. तेव्हाच मोठी कामे होतात, मोठ्या गोष्टी घडतात. बहिणाबाईने म्हटले आहे, "ज्याच्यामधी नाही भाव, त्याले भक्ती म्हनू नही, ज्याच्यामधी नाही चेव त्याले शक्ती म्हनू नही." काम करणाऱ्या माणसांच्या मनात हा चेव कसा निर्माण करायचा हा व्यवस्थापन शास्त्रासमोरचा मूळ प्रश्न आहे. तो सुटला तर बाकीचे तिढे सुटतात. तो नसला आणि सारी सामग्री, यंत्रे, संपत्ती, सोयी असल्या तरी त्यातून काही मोठी कामे होत नाहीत. काही सकारात्मक घडत नाही.
 २.०६ दुसऱ्या महायुद्धात राखरांगोळी झालेला जपान त्यावेळच्या विजेत्या अमेरिकेला त्यांच्याच बाजारपेठेत वरचढ कसा ठरला त्याचे कारण समजावून घ्यायला हवे. अमेरिकन मोटारी, अमेरिकन कॅमेरे, टीव्ही, रेडियो, गृहोपयोगी वस्तू त्यांच्या स्वतःच्या देशात परदेशी जपानी वस्तूंशी स्पर्धा करू शकत नाहीत! जपानी व्यवस्थापनतंत्र म्हणजे काही गूढ गोष्ट नाही. प्रख्यात जपानी व्यवस्थापनतज्ज्ञ ओऽहमी तर असे म्हणतात, की व्यवस्थापनाच्या ज्या कल्पना जपानी कारखानदारांनी वापरल्या त्या साऱ्या अमेरिकन पुस्तकांत लिहिलेल्या आहेत. जपानी लोकांनी त्यांच्या प्रादेशिक, राष्ट्रीय भावनांना अनुरूप त्यांचा वापर केला. जपानची गणना आर्थिक महाशक्ती म्हणून होते. त्यांनी व्यवस्थापनाच्या अमेरिकन कल्पना अंमलात आणताना जपानी लोकांमधला राष्ट्रीय अभिमान, त्यांची समूहाने कामे करण्याची परंपरा व वैशिष्ट्ये वापरल्या. त्या कल्पना पचवून त्यांनी त्यांना जपानी रूप दिले. त्या कल्पना आत्मसात केल्या. पाश्चात्य देशांत विकसित झालेले विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनं यांचा वापर करून त्यांनी जगभर आपला व्यापार वाढवला. ह्या साऱ्या गोष्टी १९५० सालानंतर घडलेल्या आहेत, म्हणजेच भारताला ब्रिटिश सत्तेपासून राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या व माझ्या कार्यकालीन कालखंडातल्या म्हणजे १९६० ते २००० या वर्षांतल्या आहेत.  २.०७ भारतात मात्र इंग्लिश शिकलेले लोक मूळ मातीशी नाळ तोडून विचार करत आले. भारतातला हा अभिजनांचा वर्ग आहे. ही माणसे इंग्लिश परंपरेचा अभ्यास असलेल्या पण मूळ मातीशी नाते राखलेल्या विवेकानंद, रवींद्रनाथ, गांधी आणि अरविंदांना विसरली. या लोकांनी जी स्वत्वजागृती केली होती ती विसरली. पाश्चात्य देशांतल्या विज्ञानाबरोबर पाश्चात्य देशांतली आर्थिक तत्त्वज्ञाने स्वीकारल्यामुळे या देशातल्या भूमिपुत्रांना ती हलवू शकली नाहीत. त्यांच्यात प्रेरणा व चेव निर्माण करू शकली नाहीत. अभिजन जे जे भारतीय ते ते टाकाऊ, जे जे स्वदेशी ते ते कमी दर्जाचे अशा कल्पनेने वावरत आले.
 २.०८ 'आत्मार्थे पृथिवीं त्यजेत' या कोटीची ज्या देशाची व्यक्तीच्या वैचारिक स्वातंत्र्याची कल्पना त्या देशात स्टॅलिनिस्ट केंद्रीकरणाची अंमलबजावणी करण्याची या मंडळींनी शर्थ केली. माणसे म्हणजे जणू छापातले ठोकळे किंवा यंत्रातले खिळेमोळे अशासारख्या कल्पना गृहीत धरून मांडणी केली. माणसांची फक्त आर्थिक जीव अशी एकांगी व्याख्या धरून साया योजना मांडल्या. पैशांच्या आमिषाशिवाय दुसऱ्या प्रेरणा असतात ही कल्पनाच बाद ठरवली. चेतना जागृतीच्या नावावर हक्क (राइटस्) यांचा आक्रोश करायला शिकवले. कर्तव्याचा ओझरता उल्लेखही केला नाही.
 २.०१ पाश्चात्यांच्या समाजधारणेच्या कल्पना श्रेष्ठ, कारण त्यांचे विज्ञान श्रेष्ठ, त्यांचे तंत्रज्ञान श्रेष्ठ अशी सोयिस्कर समजूत पसरवण्याचा प्रयोग झाला. सोय अशी होती, की जेत्यांनी हे सारे इंग्लिश भाषेत त्यांच्या साम्राज्याच्या सोयीसाठी आधीच लिहून तयार ठेवले होते. चष्मा तयार होता.आमच्या अभिजनवर्गाने तो वापरायला सुरुवात केली आणि मग त्यांना सारे तसेच दिसू लागले नसते तरच नवल. पाश्चात्यांचा प्रयत्नवाद, ज्ञानसाधनेची तळमळ, ख्रिश्चन धर्मपंथातली करुणा हे गुण आम्ही आत्मसात केले नाही. घेतला फक्त त्यांचा वरवरचा भोगवाद. आम्ही साधी वेळ पाळण्याची गोष्ट किंवा शारीरिक श्रमांबद्दलची आदरभावना शिकू शकलो नाही. आम्ही त्यांचे दुर्गुण घेऊन त्यांच्याशी स्पर्धा कशी करू शकणार आहोत? आम्हाला त्यांचे ज्ञान हवे, विज्ञान हवे, तंत्रज्ञान हवे, पण आमचा मानव्याचा सर्व सजीवांपर्यंत पोचणारा व्यापक विचार, समाजधारणेचा विचार हा मात्र या परंपरेशी अभिन्न नाते जपणारा हवा. आमच्या मूळच्या दार्शनिक विचारांशी प्रामाणिक हवा. पूर्ण स्वदेशी हवा.
 २.१० भारतीय परंपरेचा मूळ पाया नाकारून या देशात तुम्ही काही उभारू शकणार नाही. आमची मूळ प्रेरणा स्पष्टपणे आत्मशोधाची आहे, स्वतःला बदलण्याची, स्वतःचे आमूलाग्र परिवर्तन करण्याची आहे. व्यक्तीचे ट्रान्स्फॉर्मेशन न करता समाज सुधारणार नाही. कृतिप्रवण होणार नाही. कामासाठी, काही घडवण्यासाठी चेव निर्माण होणार नाही. स्वतःच्या बदलातून समाजाचे परिवर्तन ही इथल्या विचारांची मूळ गाठ आहे. आमच्या समाजाचा रोख त्यागावर आहे, भोगावर नाही. संन्याशाला या देशात सर्वात जास्त मान मिळतो, कारण तो समाजाकडून कमीत कमी घेतो, कुठे मिंधेपणा निर्माण होऊ देत नाही, एका ठिकाणी राहात नाही. जास्तीत जास्त देतो, भरभरून देतो व कमीत कमी घेतो, म्हणून तो या देशात अग्रमानाचा पुजारी मानला जातो. लोकांच्या मनात आदर आहे तो विवेकानंद, महात्मा गांधी, विनोबा, जयप्रकाश, खान अब्दुल गफारखान आणि त्यांच्या सारख्या विरक्तांबद्दल. लोक त्यांना मानतात व त्यांच्या प्रेरणेने काम करणाऱ्या त्यागी लोकांना लोक मानतात. ते सारे भगवी वस्त्रे घालत होते किंवा घालतात असेही नाही. पण या देशात पूजा फक्त संन्याशाची होते.कारण तो स्वतःचे श्राद्ध स्वतः करून दुसरा जन्म घेत असतो. नवे नाव घेतो. नवे व्यक्तित्व धारण करतो. सर्व जीवांत शिव रूप पाहतो. सर्वांच्या आनंदात स्वतःच्या आनंदाचे समाधान अनुभवतो. म्हणून संन्याशांची नावे आनंद या उपाधीने पुरी होतात. त्यागी माणसाचा शब्द लोक मानतात. देणे ('गिविंग') हीच त्यांची प्रेरणा असते मग ते बाबा आमटे असोत वा सुंदरलाल बहुगुणा. त्यांचे पंथ, त्यांच्या चुका, साऱ्यांच्या पलीकडे त्यांचा प्रभाव असतो. कारण भारतीय मानसिकतेत त्याग हे मोठे मूल्य मानलेले आहे. याउलट, आमच्या आजच्या अर्थविचारात व व्यवस्थापनविचारात त्याग ही चेष्टेची गोष्ट आहे.
 २.११ केवळ बोनसच्या आमिषाने किंवा इन्सेंटिवच्या आमिषाने माणसे काम करत नाहीत, उद्योग उभे राहात नाहीत. सैन्ये लढू शकत नाहीत. केवळ भोगाच्या लोभाने चेव निर्माण होत नाही. काम करायला प्रेरणा देणारे आवाहन भावनिक अस्तराने जोडलेले असावे लागते. उत्पादकतेसंबंधीची किंवा मूल्यवर्धनाची ही भावना कशी निर्माण करायची ह्यात साऱ्या व्यवस्थापनाच्या प्रश्नांची गुरुकिल्ली आहे. लोकांसमोर मोठी स्वप्ने ठेवली तर सामान्य लोक असामान्य गोष्टी घडवू शकतात. प्रतिकूल परिस्थितीत काम करणारी माणसे कारखाने सोडून जात नाहीत, पण बरेचसे व्यवस्थापक मात्र जातात असा अनुभव आहे. बऱ्याच कारखानदारांनी या अनुभवाबद्दल लिहिलेलेही आहे.
 २.१२ माझ्या लेखनाचा उद्देशच या, जे प्रत्यक्ष काम करणारे व्यवस्थापक, कामगार व कर्मचारी आहेत त्यांनी या संकल्पनांचा आपल्या व्यवहारात वापर करावा व त्याचा परिणाम होतो किंवा नाही याची नोंद घ्यावी त्याला प्रसिद्धी द्यावी हा आहे. असे लिखाण प्रसिद्ध झाल्याशिवाय भारतीय व्यवस्थापनाचा वेगळा असा आविष्कार मान्य होणार नाही. आमचा मूळ पाया वेगळा आहे हे कृतीतून दिसायला हवे.

प्राथमिक मूल्यविचार



 ३.०१ मी त्यागाच्या गोष्टी बोलतो तेव्हा या क्षेत्रात त्या भाषेची संवय नसल्यामुळे लोकांना कसनुसे होते. प्रत्येकजण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतो. गाजराची आशा दाखवूनच गाढवाला चालते करावे लागते. एकतर गाजर दाखवायचे नाहीतर काठी हाणायची हेच काम करायला लावायचे (म्हणजेच व्यवस्थापनाचे) दोन मार्ग आहेत असा साधासरळ हिशेब असतो. हे सर्वमान्य तत्त्वज्ञान आहे किंबहुना हे एकमेव' सत्य आहे असाही काही लोकांचा दावा असतो. वरवर पाहता तो खराही वाटतो. 'सर्वारंभाः तंडुलाप्रस्थमूलाः' असे एक वचन आहे. पण ज्यांनी नवीन उद्योग सुरू केला आहे, नव्या गोष्टी उभ्या केल्या आहेत, 'नूतन काही ते करावे' अशी धारणा बाळगली आहे त्यांचे उत्तर निराळे असते.
 ३.०२ चोरांची किंवा स्मगलरांची टोळी असली तरी तिच्यामध्ये काही मूल्ये मानली जातात. नव्हे मानावी लागतात. त्या टोळीतून फुटणारे, फसवणारे लोक असतात, खबऱ्या तयार होतात. त्यांना टोळीकडून होणारी शिक्षा तशीच टोकाची असते. चोरी किंवा स्मगलिंग यांसारख्या समाजविघातक गोष्टीसुद्धा जेव्हा समूहाने केल्या जातात (आजच्या काळात कोणतीच गोष्ट एकट्याने करता येत नाही) त्यावेळी टोळीशी इमानदारी ही महत्त्वाची गोष्ट मानली जाते. इमानदारीचे मूल्य मोठे मानले जाते. तिथे गद्दारांना क्षमा नसते. कुठल्याही समूहाला किंवा समाजाला परस्पर 'विश्वासा'शिवाय जगताच येणार नाही.शरीरधारणेसाठी श्वास हा जितका आवश्यक आहे तितकाच समाजधारणेसाठी विश्वास हा आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखाद्याचा घरातल्या माणसांवर जर विश्वास नसेल तर त्या घरात तो साधा झोपू शकेल का ? राजे लोकांना कंटकशय्याच लाभते ती यामुळे.
 ३.०३ हल्ली सगळ्या पुढाऱ्यांना संरक्षकाच्या गराड्यात वावरावे लागते ते यामुळेच. धनबादसारख्या कोळशाच्या खाणींच्या मुलखात वावरणारे, कामगारांवर अनभिषिक्त साम्राज्य चालवणारे कामगार पुढारी एका रात्रीत सतत एका खोलीत दोन तासांच्यावर रक्षकांच्या पहाऱ्यातही झोपू शकत नाहीत ! त्यांना झोपण्याच्या खोल्या रोज रात्री वारंवार बदलाव्या लागतात. संरक्षक बदलावे लागतात. सार्वभौम समजल्या जाणाऱ्या गुंड लोकांनाही विचार करण्याची वेळ येते ती अशी की विश्वास तरी कोणावर ठेवायचा? बायकामुलांवर? कुटुंबीयांवर? जातवाल्यांवर? कशाच्या आधारावर? रोजचे वृत्तपत्र वाचले तर सहज लक्षात येईल, की या सर्व समूहात अविश्वासाच्या घटना, खून होणे, फसवणे असे प्रकार मधून मधून घडत असतात, पण बहुसंख्य लोक 'विश्वास' हे सामाजिक मूल्य म्हणून मानतात, त्याप्रमाणे वर्तन करतात म्हणून रोज झोपू शकतात. आपण विश्वासाच्या आधारावर समाजात राहू शकतो.
 ३.०४ पाश्चात्य देशात, अगदी न्यू यॉर्कसारख्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. हिंसक घटना सतत घडत असतात. त्यामुळे सर्व प्रकारची उपभोगाची साधने असूनसुद्धा त्यांना मानसिक शांतता नसते. याचे मूळ कारण सामाजिक व्यवहारातला विश्वासासारख्या नैतिक मूल्यांचा जो मूळ आधार होता तो त्या समाजात ख्रिश्चन धर्मश्रद्धेवर आधारलेला होता. त्याला बुद्धिवादाच्या किंवा निधार्मिकतेच्या नावावर पांगळे करण्यात आलेले आहे. ते सर्व आधार पांगळे व लवचीक करून ठेवले आहेत. एकदा लवचीक, 'रिलेटिव' मूल्यविचार स्वीकारला की व्यक्तीच्या स्वैराचारावर नियंत्रण घालणे अशक्य होते. माझा त्वरित फायदा होत आहे, मी तुम्हाला लुटून जर गबर होऊ शकत आहे तर मी तसे का न व्हावे? या प्रश्नाचे इहवादी, बुद्धिवादी उत्तर पांगळे येते. माझी लूट होऊ नये, माझा खून होऊ नये म्हणून मी तुमची लूट करत नाही किंवा तुमचा खून करणार नाही अशी लिया/दिया वाली स्पष्टीकरणे पांगळीच राहतात. चोरी करणे हा गुन्हा नाही, पकडला गेलात तर चोर अशी पळवाट तयारच असते. ती वाट दाखवणारे पण तयार असतात. न्यायालयात शिक्षा झाली तरच तो गुन्हेगार हे एकदा मान्य केले, की मग कायद्यातल्या पळवाटा, न्यायाधीश विकत घेणे हे सर्व बुद्धिगम्य मार्ग गुन्हेगारांना खुलेच राहतात!
 ३.०५ मला फायदा होत नसेल तर मी काम का करावे? मी कायदे का पाळावेत? मी चांगले का वागावे? मी शोषण का करू नये? मी मानवी व्यवहारात समता का मानावी? माझ्या हातात जे गावले आहे ते मी का सोडावे? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक समाजात व प्रत्येक काळात नव्याने शोधावी लागतात. ती पक्की ठरवल्याविाय व्यवस्थापनासारख्या लोकव्यवहाराच्या कामात पाऊल पुढे टाकता येत नाही. त्याची स्पष्ट जाण असो वा नसो पण ती आपण गृहीत धरत असतो. व्यवस्थापक म्हणून मी हिंदुस्थानात काम करतो त्यावेळी माझ्याबरोबर काम करणारे लोक कोणती मूल्ये मानतात, त्यांची गृहीत कृत्ये काय आहेत याची कल्पना मला असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे परकीय चष्म्यातून पाहिले तर माझी उत्तरे चुकणार हे उघड आहे. कारण प्रश्नाची समज किंवा 'दर्शन' हेच प्रश्नाचे उत्तर' शोधण्याचे महत्त्वाचे साधन असते. Perception of a problem is a solution of the problem.
 ३.०६ भारतीय दर्शनात व्यक्तीचा देह ही क्षणभंगुर व तात्पुरती गोष्ट मानलेली आहे. पुनर्जन्माच्या कल्पनेप्रमाणे व्यक्तीचा आत्मा हा चिरंतन आहे. देह हा महत्त्वाचा मानलेला नाही. आत्मा अविनाशी आहे, त्याला आदि नाही आणि अंतही नाही. देह हा वस्त्रासारखा आहे. जुने जाऊन नवीन येत राहणार. तेव्हा माझा देह म्हणजे मी नव्हे. 'कोऽहम्'चे उत्तर माझा देह हे नव्हे. यालाच अध्यात्मात 'देहभाव' अशी संज्ञा वापरतात. मी कोण?चे उत्तर, अद्वैत वेदांत मताप्रमाणे 'अहं ब्रह्मास्मि' म्हणजे 'मी ब्रह्म आहे' असे आहे. 'स्व' च्या खऱ्या, व्यापक रूपाची ओळख झाली की बऱ्याच गोष्टींकडे निराळ्या दृष्टीने पाहता येते. मुळातच सर्व संदर्भात आमूलाग्र बदल घडून येतो. यालाच 'पस्पेक्टिव शिफ्ट' किंवा संदर्भबदल असे म्हणतात आणि तो महत्त्वाचा असतो.
 ३.०७ तुम्ही जेव्हा कॅमेऱ्यातून निसर्गदृश्याकडे पाहता त्यावेळी सबंध दृश्यातला एक तुकडा तुम्ही तुमच्या काचेसमोर आणता. समोरच्या सर्व दृश्याला तुम्ही तुमच्या मनातल्या चौकटीत बंदिस्त करत असता. तेवढेच प्रकाशचित्र कॅमेऱ्यातल्या पट्टीवर नोंदवून घेता. ते तुमचे 'दर्शन' असते. ते सत्य असते का? याचे उत्तर होय किंवा नाही असे दोन्ही तन्हांनी संभवते. कुठल्याही प्रकाशचित्रकाराला तुम्ही विचारलेत तर तो सहज सांगेल, की नुसती चौकट बदलून त्या मूळ चित्रातून वेगळा अर्थ व्यक्त करता येतो. संपूर्ण भिन्न असे दोन अर्थ दाखवता येतात. पुष्कळशी चमत्कारिक कोडी, विनोद हे सारे चौकटीच्या बदलातून निर्माण होताना दिसतात. चौकटीतला बदल हा चित्राच्या अर्थाचा बदल ठरू शकतो. आपण चौकट बदलताना काही मानसिक रेषा आखत असतो. 'आतले' काय, 'बाहेरचे काय हे ठरवत असतो. ठेवायचे काय, जी वगळायचे काय याची निवड करत असतो. हे ठरवताना आपल्या मनाची चौकटीत काय घ्यायचे; भावना किंवा भूमिका असते ती आणि काय गाळायचे ते ठरवते. एकूण दृश्यातून तुम्ही जेव्हा निवड करता तेव्हा तुम्ही तुमची टिकाटिप्पणी त्यात मिसळत असता. प्रकाशचित्रकाराची किंवा चित्रकाराची महत्ता किंवा वेगळेपणा ती निवड करण्यात असते.
 ३.०८ साध्या चित्रातल्यासारख्या भौतिक वस्तूंची कल्पना रेखाटताना जरा कोन बदलून, चौकट बदलून वेगळे परिणाम निर्माण करणे शक्य असते, तर सत्य' काय, 'मी' कोण, जग म्हणजे काय, समाजाशी माझा संबंध कसा- काय-केवढा? या साऱ्यांना जोडणारे सूत्र काय? ते कोणते? असल्या मूलभूत संकल्पनांच्या बाबतीत चौकट बदलून किती बदल घडवता येतील याची कल्पनाच केलेली बरी ! पण प्रथम त्यांची व्यवस्थापनाच्या क्षेत्रात गरज आहे हे स्वीकारायला हवे.
 ३.०९ भारतीय विचारांत पाश्चात्य अर्थाने फिलॉसॉफी याला 'दर्शन' हा शब्द वापरतात. इंग्लिशमध्ये याला 'वर्ल्डव्ह्यू' हा शब्द वापरला जातो. या शब्दातला भावार्थ महत्त्वाचा आहे. आपले तत्त्वज्ञान ‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति।' या सूत्रावर आधारलेले आहे. सत् म्हणजे सार्वकालिक सत्य इंग्लिशमध्ये त्याला 'सुप्रीम रिअॅलिटी' म्हणतात. भारतीय विचाराप्रमाणे सत्य एकच आहे, फक्त जाणते (विप्र) त्याला नाना नावांनी (बहु-धा) संबोधतात. जाणत्यांना सत्याची घडणारी दर्शने किंवा भावलेली रूपे यांनाच 'दर्शने' असे म्हणतात. एकाच सत्याला अनेक प्रकारांनी पाहता येते हा बहुविधतेचा मुद्दा कळीचा आहे.
 ३.१० आपल्याकडे मुख्य दर्शने सहा मानलेली आहेत. त्याशिवाय अन्य अनेक दर्शने आहेत. त्यांत नवीन दर्शनांची भर पडू शकते. दर्शनांची संख्या मर्यादित मानलेली नाही. नवे मनू येत राहणार, नवी दर्शने घेत राहणार, ते ती तशी मांडत रहाणार. म्हणजे हा एक नित्यनूतन राहणारा, बदलणारा आणि तरीही गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सातत्य असणारा सनातन प्रवाह आहे. भारतीय विचारपद्धतीची ही खास खूण आहे. एखाद्या विशिष्ट ग्रंथावर किंवा पुस्तकावर आधारलेल्या किताबी पंथात 'एकम् सत्' हे मान्य केलेले असले तरी 'बहु-धा वदन्ति' हे मान्य नसते.
 ३.११ पाश्चात्य म्हणजे मुख्यतः ख्रिश्चन विचारात परमेश्वर व भक्त हे द्वैत मान्य केलेले आहे. परमेश्वर सर्व घडवतो, तो जगच्चालक, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आहे. त्याने आखून दिलेली मूल्ये, त्याच्या आज्ञा या अनुल्लंघनीय आहेत. परमेश्वराच्या आज्ञा, मूल्ये, नीतिनियम हे जीजस या प्रेषिताद्वारे मानवाकडे पोचलेले आहेत. तो विचार बायबल या ग्रंथात समाविष्ट आहे. बायबल हा सर्व तत्त्वज्ञानाचा मूलाधार आहे. बायबलविरोधी विचार हे पाखंड आहे. बायबलचा अर्थ रोममध्ये राहणाऱ्या जीजसच्या वारसदाराने म्हणजे पोपने जसा लावला असेल तसा तो सर्व कातोलिकावर बंधनकारक आहे. प्रोटेस्टंट पोपचा हा अधिकार मानत नाहीत. पण त्यांनाही बायबलचा आधार मान्य आहे. ज्यू पंथाचे लोक बायबलमधल्या जुन्या कराराला मानतात व मोझेस या प्रेषिताला मानतात. तालमुडच्या ग्रंथाचा त्यांच्या विचाराला आधार आहे. मुसलमान पंथाच्या दृष्टीने कुराण हा सर्व विचाराचा आधार आहे. महंमद हा शेवटचा प्रेषित आहे. त्याने अल्लाकडून प्राप्त केलेल्या व अरेबिकमध्ये लिहिल्या गेलेल्या आज्ञा ह्या पूर्णतया अपरिवर्तनीय आहेत. त्यात कानामात्रेचासुद्धा बदल करण्याचा अधिकार कुणाला नाही. त्याच्यावर टीकाटिप्पणी होऊ शकत नाही. त्यात सार्वकालिक मार्गदर्शन आहे. सारा तत्त्वविचार व माणसांचा आचार हा कुराणातल्या आज्ञेप्रमाणे होणे गरजेचे आहे. अन्य विचारांना 'असण्या'चाही अधिकार नाही.
 ३.१२ मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या या पंथांचा किंवा शेमेटिक धर्मांचा पाया त्यांच्या किताबांबद्दलचे अपरिवर्तनीयत्व आणि मोझेस, जीजस, व महंमद यांचे प्रेषितत्व यांच्या मान्यतेवर आधारित आहे. या लोकांच्या संस्कृतीचे पायाभूत विचार हे बायबल, कुराण, किंवा कुठला ना कुठला ग्रंथ या चौकटीत बद्ध आहेत. हे पंथ परमेश्वर व भक्त यांच्यामध्ये स्पष्ट फरक मानणारे द्वैती आहेत. त्यांची चौकट ग्रीको रोमन विचाराप्रमाणे बरोबर।चूक, खरेखोटे, न्याय।अन्याय, अशा प्रत्येक गोष्टीचे वर्गीकरण दोन गटात करण्याची आहे. ते विचारही पुन्हा त्यांच्या त्यांच्या किताबातल्या उत्तराप्रमाणे असण्याचा आग्रह आहे. तोच त्यांच्या साऱ्या समाजविषयक धारणां पाया असतो. त्यालाच मोरॅलिटी असे मानले जाते. त्यांच्या या मूल्यकल्पना स्पष्ट आहेत. अनेक वर्षांच्या शिकवणुकीमुळे त्या घट्ट व कणखर बनलेल्या आहेत.
 ३.१३ एकोणिसाव्या शतकात जन्मास आलेल्या मार्क्सच्या कम्युनिस्ट पंथाचेही असेच एक आधारभूत पुस्तक आहे. त्यातला विचार धर्म ग्रंथांशी विरोधी असला किंवा त्याग्रंथांना 'अफूची गोळी' मानणारा असला तरी त्यात अंतिम सत्य आहे असा त्या पंथाच्या अनुयायांचा आग्रह आहे. या सर्व पंथांचे अनुयायी जगभर पसरलेले आहेत. ते भारतातही आहेत. पण येथले बहुसंख्य लोक मात्र 'किताबी' नाहीत. भारताची पृथगात्मता त्यात आहे.
 ३.१३ आज पाश्चात्यांसमोरचा जो प्रश्न आहे तो धर्मपंथाची चौकट, किताबाची चौकट, एकाच दर्शनाची चौकट, सार्वकालिक चौकट, अपरिवर्तनीय चौकट न मानण्याच्या विचारावरून निर्माण झालेला आहे. चौकट बदलणारी असली तरी चौकट टाळता येत नाही. बदलणारी चौकटही मूल्यविरहित असू शकत नाही. मूल्ये किंवा त्यांच्याबद्दलचा आग्रह कमीअधिक असू शकेल, दाब कमीजास्त होईल पण काही मूल्ये मानल्याशिवाय सामाजिक जीवन चालू शकत नाही. या धर्मांनी केवळ मूल्यांचा नाही तर त्यांच्या त्यांच्या किताबातले प्रत्येक अक्षर हे अपरिवर्तनीय मानावे असा आग्रह धरला कारण त्यांच्या दृष्टीने तेच परमसत्य आहे. त्यात बदल म्हणजे किताबावर हल्ला मानला गेला. त्यात बदल नाकारला आहे. पूजापद्धति, रीतिरिवाज, आचारविचार हे सर्व किताबांच्या चौकटीत बसवणे आवश्यक बनवले. चर्च, संघटित धर्म या गोष्टींनी साचेबंदपणा, घट्ट चौकटी निर्माण केल्या. पाश्चात्य जगात याविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून या साऱ्या चौकटी मोडण्यावर भर दिला गेला. चौकट मोडणारेही अर्थातच त्यांची नवी चौकट गृहीत धरत असतात.
 ३.१४ मूळ मूल्यांवरची श्रद्धा कशी वाढवायची याचा विचार स्पष्टपणे माडला गेला नाही. असा सकारात्मक सामाजिक विचार मांडला न गेल्यामुळे व त्याचा प्रसार करण्याची, तो समाजात रुजवण्याची मेहनत कोणीही न केल्यामुळे चंगळवाद, उपभोगवाद यांची चलती आहे. प्रत्येक व्यक्ती तिचा स्वीकार करत आहे. संस्कृतीच्या कल्पनेच्या बांधाची मोडतोड केल्यावर वासनांचे, विकारांचे पाणी आसमंतात प्रलय करणार हे स्वाभाविक आहे.
 ३.१५ पाश्चात्य तत्त्वज्ञही या शाश्वत मूल्यांचा शोध घेत आहेत. भारताकडून त्यात योगदान होईल का याबाबत त्यांचा शोध वैयक्तिक पातळीवर चालू असतो. धार्मिक किंवा खरेतर पांथिक चौकटी, आचारविचार, व्रतेवैकल्ये, कर्मकांड टाळूनही शाश्वत मूल्यांचा विचार होऊ शकतो हे भारताने सिद्ध केलेले आहे. परदेशात त्याचा प्रसार करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.
 ३.१६ अनेक दर्शने, अनेक तत्त्वज्ञाने, अनेक पूजापद्धती समाजात अस्तित्वात असूनही चिरंतन तत्त्वांचा विचार प्रेषित, पुस्तक यांच्यापलीकडे जाऊन करता येतो ही भारतीय विचारधारेची आधारशीला आहे. याचा विसर पडला असेल किंवा त्याबद्दल अज्ञान असेल तर ते नाहीसे होणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यवस्थापनशास्त्राचा भारतीय मूलाधार शोधणे, मांडणे वा अधोरेखित करणे केवळ प्रादेशिक किंवा राष्ट्रीय दृष्टिकोनातून नव्हे तर सर्व जगाची गरज म्हणून शोधणे ही या लिखाणामागची प्रेरणा आहे.
 ३.१७ व्यवस्थापन हे जागतिक आहे हे खरे, पण भारतीय मूलाधाराशी त्याचे नाते जोडणे जास्त बुद्धिगम्य, जास्त खोलात जाऊन विचार करणारे, जास्त लवचीक व जास्त विस्तार पावण्याची क्षमता धरण करणारे आहे. कृण्वन्तो विश्वम् आर्यम्' हे शक्य कोटीत आणण्यासाठी ही पूर्वस्मृती जागृत ठेवणे आवश्यक आहे. माझ्या दृष्टीने भारतीय व्यवस्थापन शास्त्रात त्याची ही पृथगात्मता दिसली व असली पाहिजे.





 ४.०१ स्वातंत्र्योत्तर काळात इंग्लिश माध्यमाच्या शाळांत जाणाऱ्यांची संख्या खेडापाड्यांतही वाढली आहे. धनिकांपासून कामगारांपर्यंत साऱ्यांना 'कॉन्व्हेंट स्कूल' म्हणजे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण हवे आहे. यातून ही मुले इंग्रजी किती शिकतील, पाश्चात्य संस्कृतीतली श्रमप्रधानता, समानता, लोकशाहीवरची श्रद्धां हे चांगले गुण किती घेतील ते सांगणे कठीण आहे. पण या देशाच्या मूळ धाग्यापासून दुरावतील एवढे मात्र नक्की.
 ४.०२ या देशाचे जे संचित आमच्या देशी भाषांत, साहित्यात, कलाप्रकारांत आहे ते या नवशिक्षित मुलांपर्यंत पोचणार नाही. मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी शिवाजी, श्रीराम, हिमालय, गंगा, सिंधू, कावेरी, कन्याकुमारी यांचा विचार परकीय दृष्टीने करू शकत नाही. त्याबद्दल अनुदार उद्गार काढू शकणार नाही. कारण ते केवळ शब्द नाहीत तर त्यांच्याबरोबर अनेक संकल्पना जोडलेल्या आहेत. त्याला नकळत त्या मराठी भाषेच्या वापरातून त्याच्यापर्यंत पोचत असतात. ते नाळेचे नाते असते. ते तोडून वेगळे करता येत नाही. हे मोस्कतिक संचित या मातीशी इमान राखणारे आहे. या भूप्रदेशातल्या अन्य निशी नाते जोडणारे आहे. तुळसीदास, तुकाराम, कबीर, तिरुवल्लवर. नारायणगुरू, बसवप्पा, दासीमय्या, ज्ञानेश्वर, नरसी मेहता, मीरा यांचे विचार, आचार ओव्या, अभंग, विराण्या, वचने, दोहे, श्लोक हे सारे एका रसायनातले आहेत. त्यातल्या आध्यात्मिक संकल्पना समान आहेत. ही एकता ही आपली मोठी शक्ती आहे. सार्वभौम एकछत्री राजसत्ता नसली तरी श्रद्धास्थाने, आचार्यपीठे, यात्राक्षेत्रे यांच्यामुळे समान आध्यात्मिक सार्वभौमत्व भारतात हजारो वर्षे आहे. शाश्वत समाज म्हणून टिकण्याला ही सांस्कृतिक एकात्मता मोलाची ठरली आहे.
 ४.०३ जर या देशी भाषा खुरटल्या, तरुण माणसे इंग्लिशमध्ये विचार करू लागली तर त्यातून येणारी सांस्कृतिक गुलामगिरी ही गेल्या हजार वर्षांच्या राजकीय गुलामगिरीपेक्षा खोलवर तोडणारी, मुळांचा छेद घेणारी असेल. अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळवणे हेच एकमेव ईप्सित त्यांच्यासमोर असेल. भारतीयत्व हे नुसते एथ्निक फॅशन्स पुरते, फॅन्सी ड्रेसपुरते शिल्लक राहील. ही कल्पना मला भयानक वाटते. त्याहून भयानक म्हणजे ह्या छेदामुळे विचारक्षमताच खुंटून जाईल.
 ४.०४ ही आत्मविस्मृती घालवण्यासाठी भारतीय व्यवस्थापकांनी भारतीय मूलाधारावर आधारलेली व्यवस्थापनाची तंत्रे विकसित करायला हवीत, ती वापरायला हवीत. अशी दणकट क्षमता मिळवायला हवी की पाश्चात्य विज्ञान- तंत्रज्ञानाचे ज्ञान पचवण्याची (किंवा हलाहल पचवणाऱ्या 'नीलकंठा'ची) क्षमता कमावायला हवी. पाश्चात्यांच्या चुकांपासून शिकायला हवे. दोन उदाहरणे पुरेशी ठरावीत. अणुविज्ञान व अंतरिक्ष विज्ञान आणि तंत्रज्ञान. आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी गेल्या पन्नास वर्षांत परकीय साहाय्याशिवाय, जिथून जे मिळेल ते मिळवून त्याच्या जोरावर आपली कौशल्ये वाढवली व क्षमता सिद्ध केली आहे. भारताने अणुबाँब बनवून दाखवला आहे. केव्हा, कसा, कुठे बनवायचा व वापरायचा हा निर्णय भारतीय नेतृत्वापाशी एक पर्याय म्हणून उपलब्ध आहे. अणुऊर्जा हाताळण्याचे तंत्रज्ञान व त्यातून वीजनिर्मिती, शेतमालाचे संरक्षण यांसारख्या गोष्टी आपण स्व-बळावर मिळवल्या आहेत.म्हणून तर इतर देश अणुऊर्जेच्या क्षेत्रात आपल्याशी करार करायला तयार झालेले दिसतात. पाश्चात्यांपासून आपण विज्ञान शिकलो व ती विद्या आपल्या देशासाठी वापरली. संगणकाच्या क्षेत्रात तर 'सॉफ्टवेअर'मध्ये जगभर आपले नाव आहे. सिलिकॉन व्हॅलीतली बरीचशी मुले देशी माध्यमाच्या शाळांतून शिकून पुढे गेली आहेत. महाकाय भारताला जी जगात किंमत निर्माण झाली आहे ती तंत्रज्ञानातल्या, विज्ञानातल्या या क्षमतेमुळे. प्रक्षेपणास्त्रे, अवकाशविज्ञान यांतली भारताची कामगिरी मोलाची आहे. हे सारे भारताने स्वबळावर कमावले आहे.
 ४.०५ जपान हा शेजारचा पौर्वात्य देश आहे. त्याने बौद्ध-विचाराचा स्वीकार केलेला आहे. त्यांनी पाश्चात्यांकडून सर्व विज्ञान-तंत्रज्ञान घेतले पण व्यवस्थापन तंत्र मात्र स्वतःचे स्वतः विकसित केले. सिंगापूरसारखा देश सामाजिक व्यवहारात व्यक्तीपेक्षा कुटुंबाचे हित प्राधान्यतेने पाहतो. किंबहुना सामाजिक द्वंद्वाऐवजी (adversary culture) सामंजस्य (harmony) ही मोलाची गोष्ट मानणारा तो देश आहे.
 भारताने सर्व कामगार कायदे, न्यायशास्त्र कायदेबाजीत अडकावून ठेवले आहे. आपसातली तडजोड हा विषयच भारतात कमी महत्त्वाचा ठरवला गेला आहे. सामंजस्याऐवजी कोर्टात मिळणाऱ्या न्यायाकडे जाण्याच्या वाटा आपण चोखाळत आहोत. लोकांना ग्राहक संरक्षणात, आरोग्यासारख्या क्षेत्रातसुद्धा कोर्टाकडून मिळणारे भरमसाट निवाडे महत्त्वाचे वाटतात.
 ४.०६ 'क्वॉलिटी सर्कल्स' 'समान युनिफॉर्स' यांसारख्या वरवरच्या देखाव्याच्या गोष्टींचे अनुकरण जपानी व्यवस्थापनाचे अनुकरण म्हणून भारतात करण्याचा प्रयत्न होतो. मी, माझी कंपनी, माझ्या कंपनीत काम करणारे सारे, हे जणू सहोदर आहेत या भावनेने लज्जेने जीव देणारे व्यवस्थापक मात्र भारत निर्माण करू शकत नाही. मुखवट्यांचे अनुकरण सोपे असते. इंग्रजांचा वक्तशीरपणाचा आग्रह, काटेकोरपणा, शरीरश्रमाला कमी न लेखण्याची संस्कृती, कार्यसंस्कृती भारतीय माणूस शिकला नाही. आम्हाला कष्ट करण्याची तयारी, चिवटपणा दोनशे वर्षांत साध्य झाला नाही. जपान्यांचा राष्ट्राभिमानाचा वारसा आम्ही कसा घेणार हा भारतासमोरचा मुख्य प्रश्न आहे.
 ४.०७ मात्सुशिटा (नॅशनल पॅनासॉनिक) या कंपनीचे जे ध्येयवाक्य आहे व प्रार्थनागीत आहे त्यात पहिला मुद्दा 'उद्योगातून राष्ट्रसेवा' असा स्पष्ट नोंदलेला आहे. हा मुद्दा, नफा कमावणारी, अतिशय तडफेने आंतर्राष्ट्रीय बाजारपेठ काबीज करणारी, जगभर उप-कंपन्यांचे जाळे असणारी खासगी मालकीची एक व्यापारी कंपनी महत्त्वाचा मानते व ध्येयाचा पहिला मान 'उद्योगातून राष्ट्रसेवा' या गोष्टीला देते. जास्तीत जास्त नफा, जास्तीत जास्त मार्केट शेअर, जास्तीत जास्त शेअरचा भाव यांना पहिले मानाचे पान देत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. मोठा ध्येयाने प्रेरित होऊन काम करणारे लोक, त्याच ध्यासाने पछाडलेले त्यांचे व्यवस्थापक नफा, मार्केट शेअर, शेअरचा भाव हे सारे मिळवतातच, पण सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाला पक्का संदर्भ असतो तो, किंवा चौकट असते ती या पहिल्या ध्येयवाक्याची.
 ४.०८ माणसे काम करतात, पेटून-जीव ओतून काम करतात, ती काही भावनिक प्रेरणा असेल तर. नुसत्या गाजर।चाबूक पद्धतीने माणसे भारून जात नाहीत. जेव्हा लोक कुठल्यातरी मोठ्या ध्येयाने प्रेरित झालेले असतात तेव्हाच सतत वाढत राहणारी उत्पादकता व उत्तमता हे भारून टाकणारे ध्येय होऊ शकते. 'सोल्जर फाइट्स फॉर द नेशन अॅण्ड अ पेनी अ डे' अशी इंग्लिश म्हण आहे. जवान राष्ट्रासाठी लढतो आणि पगारासाठी लढतो हे खरेच आहे. राष्ट्र व रोटी ही दोन्ही महत्त्वाची आहेत, पण राष्ट्र हे पहिले पद आहे. जीव पणाला लावावा असे वाटणारे ध्येय आहे. पगार हा दुसरा भाग आहे. पगारासाठी किंवा बोनससाठी जीव पणाला लावला जाऊ शकत नाही. राष्ट्ररक्षणासाठी लावला जातो हे आपण पाहतच आहोत.
 ४.०९ गेली पन्नास वर्षे केवळ रोटीसाठी चेतना जागृती केली गेली. रोटी ही प्रत्येकाला मिळायला हवी, पण केवळ रोटीसाठी कोणी प्राणाहुती देऊ धजत नाही. बोनससाठी जवान लढू शकणार नाही. प्राण पणाला लावण्यासाठी रोटी।बोनस पुरेसे ठरत नाहीत. रोटीचाच विचार करणारे गद्दार पैशांसाठी देशाची गुपिते विकतात, पण बहुसंख्य जवान तसे करत नाहीत, म्हणून देशाच्या सीमा सुरक्षित राहतात. इहवादीच विचार करायचा तर परमवीरचक्रातून दुपारची भूक भागत नाही हे खरेच आहे. आपणच मरून गेलो तर मग त्या चक्राचा आणि पैशांचा तरी उपयोग काय? 'आप मेला जग बुडाला' हा विचार कुणालाही सहज समजतो. लढाईत मेलास तर स्वर्गात जाशील, जिंकलास तर राज्य मिळवशील यांतला स्वर्ग काल्पनिक आहे. मग राज्य राखण्यापेक्षा किंवा कमावण्यापेक्षा कुणाचे तरी मांडलीक झालेले काय वाईट?
 ४.१० भारतीय व्यवस्थापकांनी या मूळ भारतीय विचारपरंपरेतली आत्मा- परमात्म्याची एकजीवता व एकावयवी घडण समजून घेतली तर वरिष्ठ-कनिष्ठ, लहान-मोठा हे स्थानभेद आहेत. सर्व अधिकार हे पदसिद्ध आहेत. त्यांतील समानता त्यांना मनापासून पटेल व ती स्वीकारणे सोपे होईल. मग कनिष्ठाकडून काही चांगली सूचना आली तर ती दाबून ठेवायची बुद्धी होणार नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष होणार नाही. सारे अधिकार, हक्क, साऱ्या जबाबदाऱ्या ह्या वैयक्तिक अहंकार सुखावण्यासाठी नव्हे तर उद्योगाच्या उपयोगासाठी वापरायचे. असतात, ही पुढची पायरी समजायला सोपी होईल. हे सर्वांमधले ‘परम-साम्य' समजणे सोपे होईल.
 ४.११ म्हणून 'स्व'चा शोध स्वतः घ्यायला हवा. आपली दृष्टी सर्व बाह्य उपाधी टाळून आत खेचायला हवी. एकदा श्रद्धेची गोष्ट साधली की मग व्यवस्थापक म्हणून कसे वागायचे, नेतृत्व कसे द्यायचे हे समजणे सोपे होते. स्वतःचा शोध स्वतःच्या विकासाची वाट दाखवू शकतो.  ४.१२ मी कसा बदलणार, कसा फुलणार, कसा बहरणार, कसा फळणार, माझी उन्नती कशी होणार याचा विचार स्व पासून सुरू करायचा. सामान्यतः मी म्हणजे माझा देह किंवा माझे शरीर असा विचार होतो. कारण उघड आहे. प्रत्यक्ष दिसते ते शरीर. जी ज्ञानेंद्रिये आहेत ती शरीराची आहेत. दोन कान, दोन नाकपुड्या, दोन डोळे, एक तोंड व मलमूत्रविसर्जनाची दोन द्वारे अशी नऊ दारे शरीराला आहेत.म्हणून शरीराचे धर्मशास्त्रातले नाव 'नवद्वारपुरी' असे आहे. नवद्वारपुरीत अंतर्यामी वसणारा अंतरात्मा हा खरा महत्त्वाचा. 'मी' कोण चे उत्तर 'हा अंतरात्मा' असे आहे. देह हे त्याचे वस्त्र आहे. वाहन आहे. त्याचा शोध हा स्वतः घ्यायचा असतो आणि तो भारतीय अध्यात्मात महत्त्वाचा विषय मानलेला आहे.
 ४.१३ माणसाला ज्ञान होते ते पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, म्हणून स्व मध्ये बदल घडवायचा असेल तर त्याचा पहिला आणि सर्वात कठीण टप्पा म्हणजे, शरीर म्हणजे स्व किंवा मी नव्हे हे समजणे होय. हा देह आणि त्यातील अंतरात्मा म्हणजे 'देही' ही स्व च्या ज्ञानाची पहिली पायरी मानली जाते. ती पार केली तरच अनुभूतीचा पुढचा प्रवास शक्य होतो.
 ४.१४ आद्य शंकराचार्यांना त्यांच्या भारत परिक्रमेत नर्मदेच्या तीरावर गोविंदपादांनी, बाळा तूं कोण आहेस, 'कस्त्वम्?' हा प्रश्न विचारला. त्याला त्यांनी उत्तर दिले ते सहा कडव्यांचे उत्तर आत्मषटकम् किंवा निर्वाणषटकम्, या नावाने प्रसिद्ध आहे. आचार्य त्यात मी कोण नाही हे सविस्तर सांगतात आणि शेवटच्या एका ओळीत 'चिदानंदरूपः शिवोहं शिवोहम्' असा उद्घोष करतात. अतिशय प्रेरणादायी, स्वच्छ, रोखठोक असे खास आचार्यांच्या शैलीतील हे उत्तर आहे. वानगीदाखल त्यातले पहिले कडवे पाहू या.
 मनोबुद्धिहंकारचित्ताणिनाहम्
 नच श्रोत्र जिह्वे नच घ्राण नेत्रे
 नव्योमभूमि तेजोनवायुः
 चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् । चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ।
 अशा या मधुर गीताच्या तालावर स्व चा शोध सुरू झाला की मोठा पट उलगडू लागतो. हा मानसिक पट म्हणजे शरीरापेक्षा वेगळा, शरीरापेक्षा मोठा, शरीराला वेढून त्यापेक्षा मोठा व सतत पसरत जाणारा स्व चा हा विस्तार व त्याचे अवकाशाशी नाते मनाच्या डोळ्यांसमोर आले की मग भारतीय विचारधारेचा वेगळेपणा स्पष्ट होऊ लागतो.
 ४.१५ शरीर म्हणजे व्यक्ती, शरीर म्हणजेच मी, एवढ्या छोटा मानसिक परीघात माणूस वावरत राहिला तर मग सर्व सृष्टीशी जोडलेले प्रश्न, समाजाचे प्रश्न, जगाचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न हे सारे परके ठरतात. मला काय त्याचे? शरीराला, इंद्रियांना समजेल-आवडेल-प्रिय होईल, तेवढेच माणूस करणार ही त्या भूमिकेची सरळ तार्किक परिणती होते. किंवा व्यक्तीच्या आयुष्यात जर एखाद्या गोष्टीचा दुष्परिणाम तिला भोगावा लागणार नसेल तर तिने पर्यावरणाचा विचार कशासाठी करायचा हा प्रश्न स्पष्ट होऊ शकतो.
 ४.१६ पाश्चात्य व्यवस्थापन तंत्रात, शरीरशास्त्रात, समाजशास्त्रात, अर्थशास्त्रात, सर्वत्र माणूस म्हणजे त्याचे शरीर, व्यक्ती म्हणजे केवळ देह एवढा मूळ पाया आहे असे गृहीत धरलेले आहे. त्यांच्या धर्मश्रद्धेप्रमाणे त्यात व्यक्तीला आत्म-स्वातंत्र्य नाही. ती व्यक्ती ईश्वरी कृपेने सुखी होऊ शकते,स्वर्गाला जाऊ शकते. ईश्वरी आज्ञांचे पालन केले म्हणजे व्यक्तीच्या सुखाचा मार्ग मोकळा होतो. व्यक्ती कर्ता नव्हे. ही तिथल्या धर्मसंस्थेची भूमिका होती. याउलट कर्त्यांची भारतीय व्याख्या मुळी 'स्वतंत्रः कर्ता।' अशी आहे. ते स्वातंत्र्य शरीराला नाही. म्हणून निर्णयाचा दिवस, डे ऑफ जजमेंट, कयामत का दिन येईपर्यंत व्यक्ती म्हणजे तिचे शरीर पेटीत सन्मानाने पुरून ठेवले जाते.
 ४.१७ याउलट, भारतीय विचाराप्रमाणे आत्म्याला स्वातंत्र्य आहे. व्यक्ती ही शरीरापलीकडे आहे. 'वासांसि जीर्णानि यथा विहाय', म्हणजे मृत्यू होतो तेव्हा आत्मा देहाचे वस्त्र टाकून दुसरे वस्त्र धारण करायला मोकळा होतो. तेव्हा हे जुने वस्त्र नष्ट करणे, जाळून टाकणे हा भाव भारतीय विचारपरंपरेत आढळतो. देहभावाविषयीच्या विचारांतला हा फरक महत्त्वाचा आहे. ह्याचे मोठे परिणाम होतात. वर्तुळाचा मध्यबिंदू सूक्ष्म असतो. त्या सूक्ष्मातले छोटे छोटे वाटणारे फरक, जेव्हा वर्तुळाचा परीघ वाढत जातो तेव्हा खूप मोठे व न जोडता येण्याजोगे, न समजण्याइतके किंवा विरोधी वाटण्याएवढे मोठे होत विस्तारत जातात. मुळांतला हा छोटा फरकही दूरगामी परिणाम करणारा ठरतो.
 ४.१८ जे कुठलीही धर्मश्रद्धा मानत नाहीत त्यांचा प्रश्नच वेगळा. आपल्याकडचे बरेच सुशिक्षित लोक व व्यवस्थापक पुष्कळ वेळा पूजापाठ, प्रार्थना किंवा मंदिरांना भेट या अर्थाने धार्मिक आचरण करतात वा धर्मपालन करतात, पण कामाच्या ठिकाणी या सर्व विचारांच्या अभावाचा 'इहवाद' या नावाने आधार घेतला जातो. मी काम करताना अंगचोरपणा केला, काम केलेच नाही, पगार घेतला पण त्याची श्रमातली किंमत दिली नाही तर मी अधर्म केला असे मानले जात नाही. मी केलेला करार पाळणे हे माझे कर्तव्य आहे हे मुळात मानले जात नाही. कामगार-व्यवस्थापकांची कर्तव्यच्युती ही गोष्ट वाईट मानली जात नाही. त्याला कायद्यात गैरवर्तन किंवा Misconduct असे लिहिलेले असते. पण चांगले आचरण किंवा वर्तन म्हणजे काय हे कुणाच्या गावीच नसते. कामगारसंघटना तो त्यांच्या कर्तव्याचा भाग मानत नाहीत. व्यवस्थापकही तो त्यांच्या जबाबदारीचा भाग मानत नाहीत.
 ४.१९ काम करणारा काय काम करतो- अगदी फायलिंग, टायपिंग, जोडणी. त्याची परिणती कशात होते, चांगले काम म्हणजे काय ही कल्पना सुद्धा व्यवस्थापकाने द्यायला हवी, काम करणाऱ्याने समजून घेऊन ती वाढवायला हवी, तरच कार्यपध्दीत प्रगती होऊ शकते. बारीकसारीक वाटणाऱ्या या गोष्टी खूप मोठे घोटाळे, चुका टाळू शकतात, गुन्हे उघडकीस आणू शकतात. साध्या वाटणाऱ्या या गोष्टींकडे दुर्लक्ष मोठा विनाश घडवू शकते.
 ४.२० व्यष्टी-समष्टी-सृष्टी व परमेष्टी या साखळीतल्या व्यष्टी आणि परमेष्टी या दोन पायांच्या पातळीवरचा वागणुकीचा किंवा वर्तनाचा विचार व प्रसार केला जातो. धर्माचार्य समष्टी म्हणजे समाज व सृष्टी म्हणजे पर्यावरण ह्या मधल्या दोन टप्प्यांचा विचार व आचार करताना दिसत नाहीत. परिणामी समाजात वावरताना व्यक्तीने व्यापारी म्हणून, व्यवस्थापक म्हणून, कामगार म्हणून, किंवा कर्मचारी म्हणून, ग्राहक म्हणून कसे वागावे, कोणत्या मूल्यांचा आधार घ्यावा याची शिकवण दिली जात नाही. हे सारे आपोआप येईल असे गृहीत धरण्यात येते. व्यवस्थापकही त्यांच्या प्रशिक्षणात हा मूल्यविचार रुजवताना दिसत नाहीत. हे सारे आपोआप होत नाही. त्यासाठी सतत प्रशिक्षणाची गरज असते. हे काम धार्मिक संस्था करू शकतात व परदेशात करतात, पण त्याची सोय भारतीय विचारवंतांनी केलेली नाही. त्यामुळे सदाचाराची भावना, राष्ट्रीयत्वाची भावना कायदे करून, घटनेचे पुस्तक बनवून निर्माण होईल या खोट्या आशेवर सारे चाललेले आहे.



 ५.०१ स्व ची मानसिक कल्पना शरीर किंवा देहापुरती मर्यादित ठेवली तर मग स्व चा विकास किती होणार याला मर्यादा पडतात. तुमचे वय, तुमचे आरोग्य यांच्या त्या मर्यादा पाडतात. शरीराला होणारे सुखदुःख, हर्षखेद या साऱ्यांनी ही मर्यादा आणखी कोती होत जाते. सुरवंटाचे फुलपाखरू होण्याची शक्यताच संपुष्टात येते. सुरवंटाचा लठ्ठ सुरवंट, मोठा सुरवंट ही कल्पनेची भरारी होऊ शकते. पण स्व ची कल्पना शरीरापलीकडे आत्म्यापर्यंत पोचवली तर परमात्म्याचे अनंतत्व मनासमोर खूप मोठा अवकाश उभा करू शकते. तसे घडले तरच मनाची चौकट मोठी होऊ शकते, क्षितिजे रुंदावतात व सुरवंटाचे फुलपाखरू होण्याइतका आमूलाग्र बदल (ट्रान्स्फॉर्मेशन) होऊ शकते.
 ५.०२ सुरवंट तरी काय करतो? तो स्वतःला स्वतःच्या शरीरातून निर्माण केलेल्या तंतूंच्या कोषात गुंतवून घेतो. त्या कोषाच्या अंतरंगात जाऊन स्वतःची जी बाह्य अंगे असतात, ते कवच टाकून स्वतःची नवीन रचना करून जमिनीवर किंवा फांदीवर सरपटण्याचे छोटे जीवन टाकून, पंख लाभलेले, खूप मोठे जग पाहू शकणारे, उडू शकण्याची क्षमता असलेले असे रूप धारण करतो. सुरवंटाच्या बाबतीत हे सारे बदल त्याच्या शरीरात घडतात, पण सुरवंटातला जीव आणि फुलपाखरातला जीव हा एकच असतो. हे आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. माणसाचे मन हे त्याच्या शरीरापेक्षा शक्तिमान आहे. शरीर तेच राखून मन आणि बुद्धी ह्यांच्या जोरावर माणूस त्रि-भुवनाची कल्पना करू शकतो,  ५.०३ सर्व प्राणी क्षणाक्षणाने आणि त्या त्या क्षणापुरते जगत असतात त्यांना कालाआजाउद्या असा काळाचा संदर्भ समजतो का हे माहीत नाही. पण माणसाला तो समजतो. त्यामुळे भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ या संकल्पना त्याला समजतात. माणूस स्वतःला भूतकाळाशी जोडतो, वर्तमानात जगतो आणि भविष्याची स्वप्ने पाहतो. मागचे-पुढचे पाहण्याची शक्ती ही माणसात असते. माणसाच्या मागे ज्या चिंता, काळज्या, मानसिक दबाव व ताण निर्माण होतात त्यांच्यामागे ही मानसिक शक्ती असते. म्हणून शरीर न बदलता, प्रत्यक्ष शरीरात बदल न घडवता माणूस उद्यांचा विचार करू शकतो. स्वतःला चिरंतनाशी जोडून स्वतःला पसरवू शकतो, स्वतःचा विस्तार करू शकतो. स्वतःमध्ये मानसिक बदल किंवा क्रांती घडवू शकतो. फक्त स्वतःच्या शरीरापुरते पाहत, आताच्या क्षणापुरता विचार केल्यास, फक्त पायाखालचे पाहत राहणारा माणूस क्षुद्र बनतो. तो वाढू शकणार नाही. तो खुजा किंवा थिटा राहील. ही भूत-भविष्य पाहण्याची शक्ती त्याच्या काळज्या वाढवते. त्याचप्रमाणे त्याची वाढ, विस्तार यांची स्वप्ने त्याला देऊ शकते.
 ५.०४ मनाच्या या शक्तीमुळे आपण पाठच्या गोष्टी आठवू शकतो. कल्पनेने ते ते सारे परत परत आठवू शकतो, उद्याच्या कल्पना करू शकतो. विजेच्या वेगापेक्षा जास्त वेगाने एका जागेहून दुसऱ्या जागी मनाला नेऊ शकतो. मनःचक्षुसमोर नवीन प्रदेश काळ, घटना, व्यक्ती, दृश्य, आणू शकतो. आणि हे सारे शरीर एका जागी स्थिर राहून आपण साधू शकतो.
 ५.०५ या विवेचनावरून दोन गोष्टी स्पष्ट होतील. सुरवंटाचे फुलपाखरू होण्याची क्षमता मनामुळे आपल्या प्रत्येकाच्या अंगात मुळात दडलेली आहे. ती झाकून ठेवायची, दडपायची की तिला वाढू द्यायचे हे प्रत्येकाच्या स्वतःच्या हातात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माणसाचे शारीरिक व्यक्तित्व ही खूप छोटी, मर्यादित वस्तू आहे. माणसाचे मानसिक व्यक्तित्व हे खूप मोठे होऊ शकणारे व्यक्तित्व आहे.
 ५.०६ भारतीय विचारधारेप्रमाणे माणसाने अंतरात्म्याचा शोध घेण्याचा जो मार्ग सांगितला आहे तो अंतर्मनाचा शोध घेता घेता खूप मोठे मानसिक व्यक्तित्व घडवण्याचा मार्ग आहे. हा शोध जर जास्तीत जास्त केला तर स्वतःच्या छोट्याशा शरीराच्या आत असलेल्या 'मी'ला सबंध जग सामावून घेऊन त्याच्याही पलीकडे पाहण्याची शक्ती त्याच्यात येऊ शकते. 'स्थिरचर व्यापून अवघा, तो परमात्मा दशांगुळे उरला' असा अनुभव त्याला येऊ शकतो. अनंताची ही संकल्पना त्याला शरीराच्या कोशाबाहेर पडण्यास मदत करते. आत्मा आणि परमात्मा यांची जोड किंवा एकत्व आपण ह्या मानसिक शक्तीमुळे पाहू शकतो.
 ५.०७ माणसाने स्वतःला असे ताणले, वाढवले, विस्तारले की मग तो अनेकांना त्याच्या विश्वात सहज सामावून घेऊ शकतो. त्याच्या शरीराचे सुख, दुःख, आनंद, खेद, फायदा, तोटा ह्या जगातल्या इतर माणसांच्या दृष्टीने फार कमी महत्त्वाच्या वा सीमित महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यात दुसऱ्या कोणाचा सहभाग होऊ शकत नाही. 'स्वार्थबुद्धिः परार्थेषुः' हे वाग्भटाचार्यांचे वचन प्रसिद्ध आहे. सारे जग माझ्या फायद्यासाठी आहे या प्रेरणेने जर माणूस जगू लागला, काम करू लागला तर त्याचे त्याच्या सिद्धीही या मर्यादित राहतील. तो 'मी म्हणजेच माझे शरीर' या परिघात घुसमटत राहील. सर्वात महत्त्वाची मर्यादा म्हणजे त्याचा कार्यकाल ही फार छोटी गोष्ट असल्याने तो दूरचा विचार करू शकणार नाही. पण जर का माणूस त्याच्या स्व च्या कल्पनेचा विस्तार करू शकला तर मग त्याचे कुटुंब, त्याचा समूह, त्याची जात, त्याचे मोहल्ला- प्रांत-देश-जग अशा गोष्टी तो त्यांत कलेकलेने समाविष्ट करू शकेल. सर्वांना हे साधेल असे नव्हे, पण सर्वांच्या विचाराची दिशा ती असायला हवी. प्रत्यक्ष अनुभव किंवा प्रत्यय कितीही मर्यादित राहो, पण त्यामागची भावना, प्रेरणा, चेतना अशी नित्य नवी स्वप्ने पाहणारी, कलाकलाने वाढणारी, पसरणारी हवी.
 ५.०८ भारतीय विचारपद्धतीप्रमाणे स्व कडून परमात्म्याकडे जाण्याची जी गोष्ट आहे तो जर आधार धरला तर माणसाचा दृष्टिकोन बदलेल, चौकट बदलेल. भौतिक गोष्टी तशाच राहूनही, भोवतालची माणसे तशीच राहूनही, त्याच्या मनाचे संदर्भ बदलतील. ही मोठी स्वप्ने पाहण्याची, विस्तार पाहण्याची आणि त्याचे आपल्याशी असलेले नाते पाहण्याची मानसिक भावना भारतीय दर्शनात महत्त्वाची मानलेली आहे. ती एखाद्या मूर्तीपर्यंत, एखाद्या प्रदेशापर्यंत, एखाद्या देवापर्यंत पोचली तरी खूप मानसिक प्रवास होतो. खूप वाढ होते, त्याच्याही पलीकडे आपली झेप जाऊ शकते.
 ५.०९ भारतीय दर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे ती देवाच्या किंवा इश्वरापलीकडेही पोचू शकतात. अनंत ही संकल्पनाच अशी प्रसरणशील आहे. देव या कल्पनेपेक्षा वाढू शकणारी, अद्वैताची कल्पना विस्तारू शकणारी. याची दोन कारणे आहेत. दर्शनांत कल्पना करण्याचे किंवा विचार करण्याचे हे स्वातंत्र्य (फ्री विल) प्रत्येक व्यक्तीला आहे. बरेचसे देव न मानणारे लोक स्व चा विस्तार त्यांच्या स्वतःच्या देहापर्यंत किंवा त्यांच्या शरीराबाहेर करू शकत नाहीत किंवा करत नाहीत. स्वतःचे शरीर किंवा देह हेच अंतिम सत्य मानून फार छोट्या परिघात स्वतःला कोंडून घेतात. कुणीही त्यांच्यासाठी काम का करावे याची तोकडी उत्तरे ते देऊ शकतात.
 ५.१० 'अणोऽरअणीयान् महतोमहीऽयान्' यातल्या पहिल्या छोटा परिघात अडकून राहतात. अशी माणसे कुठल्याही संस्थेत उच्च अधिकारपदावर असली तर ती इतरांनाही त्यांच्याच संकुचित पातळीवर खेचण्याचा प्रयत्न करतात हे आपण पाहतोच. त्यांचा आवाकाच लहान असतो. मोठी स्वप्ने पाहण्याचे त्यांना जमत नाही. ते स्वतःची वाढ करत नाहीत व हाताखालच्या लोकांनाही वाढू देत नाहीत. कारण त्यांच्या कोत्या जगात दुसऱ्यांच्या हिताची कल्पनाच बसत नाही. पहिल्या कर्त्याने जोमदार वाढवलेली कंपनी वारसांच्या मोडक्या हातून नष्ट होते हे सर्वत्र दिसतेच.
 ५.११ व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाचे 'माणसे काम का करतात' ह्यासंबंधी काही गणित असते. स्पष्टपणे विचार करून ठरवलेले असो वा नसो, स्पष्टपणे पटलेले असो वा नसो, पण प्रत्येक व्यवस्थापकाच्या मनात माणसे काम का करतात याबद्दल काही गृहीत कृत्य असते. प्रत्येक पुढाऱ्याच्याही मनात ते तसे असते. खरे तर, हाच खूप महत्त्वाचा आणि मूलभूत प्रश्न आहे. व्यवस्थापन, व्यवस्थापनाचा दर्जा, व्यवस्थापनाची परिणामकारकता, यशस्वीता या मूळ धारणेवर आधारलेल्या असतात. जो त्याच्या 'स्व' ची व्याख्या त्याच्या शरीराबाहेर नेऊ शकत नाही, कल्पू शकत नाही असा नेता, असा पुढारी, असा मालक, असा व्यवस्थापक, असा सुपरवायजर त्याच्या हाताखालच्या लोकांची कामामागची प्रेरणा आपल्या संकुचित पातळीवर रोखून ठेवत असतो. त्याचा परीघ छोटा, त्याची चौकट संकुचित असल्यामुळे त्याच्या हाताखालच्यांची घुसमट अपरिहार्य होऊन बसते. तुमचे स्वप्न छोटे, संकुचित आणि तुमच्या शरीराच्या वैयक्तिक सुखाएवढे मर्यादित असेल तर तुमच्या हाताखालच्या लोकांना अवकाश कुठे राहणार? त्यांना त्यात रस का असावा? अशा ठिकाणी त्यांनी हात राखून काम करणे स्वाभाविकच नाही का?
 ५.१२ हाताखालच्या लोकांची क्षमता फुलवून त्यांची फुलपाखरे होऊ देणार की त्यांना सुरवंटच राहू देण्याचा आटोकाटात प्रयत्न करणार हा व्यवस्थापकाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. त्याची उत्तरे त्यानेच शोधायची असतात. कुठलाही धंदा वा व्यवसाय ही नित्य वाढणारी किंवा खंगणारी जिवंत गोष्ट असते. कायद्याने निर्माण केलेल्या सरकारी उद्योगधंद्यांच्या कंपन्या निर्जीव व स्पर्धेला घाबरणाऱ्या का होतात यांचे उत्तर यात आहे. वर्धिष्णुता किंवा मरण या माणसाच्या शरीरासारख्या अपरिहार्य गोष्टी औद्योगिक, व्यावसायिक संघटनांना लागू होत असतात. धंदा मेला तर नोकरी मरते हे साधे गणित लक्षात न घेतल्याचे परिणाम उदाहरणार्थ मुंबईच्या कापड गिरण्या) सर्वत्र दिसतातच. लोकांना काम नको असते पण नोकऱ्या हव्या असतात. पण कामामुळेच त्यांची सामाजिक किंमत ठरत असते हे कुणी त्यांना शिकवत नाही. त्यामुळे 'मी समाजावर अवलंबून आहे, समाजाचे माझ्याशिवाय काही अडणार नाही' एवढा सोपा विचारही, स्वतःच्या पलीकडे विचार करू न शकणारा माणूस करू शकत नाही. आपल्या बऱ्याच व्व स्थापनातल्या प्रश्नांची मूळ गाठ तिथे आहे.



 ६.०१ नेत्याचे विचारांचे किंवा कल्पनेचे विश्व जेवढे व्यापक व प्रशस्त तेवढी अनुयायांची विकासाची वेस मोठी होते. कुठल्याही नेत्याने, व्यवस्थापकाने जो आत्मशोध घ्यायचा असतो किंवा घ्यायला हवा तो यासाठी. लोकांसमोर व्यापक ध्येय ठेवण्यात नेत्याची कसोटी असते. तुम्हाला रोजीरोटी देऊ असे सांगणारे लोकांना फक्त पशूच्या पातळीवर समजतात. रोजीरोटी माणसाच्या दृष्टीने महत्त्वाची असते. तेवढीच आवश्यक असते पण पुरेशी ठरत नाही. ती प्राथमिक गरज खरी पण पर्याप्त नव्हे. रोटीची सोय करणे, मजुरी देणे, एवढीच जर मालकाची जबाबदारी मानली तर साऱ्या मालक-मजूर संबंधांची चर्चा भाकरी साधी की तूप लावलेली, करपलेली की नीट फुगवलेली, तुला किती व मला किती या परिघाबाहेर जाऊ शकत नाही. मग भाकरीसाठी हिसकाहिसकी, दिले म्हणजे लुटले या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्याची परिणती म्हणजे गाजर किंवा चाबूक हेच पर्याय सर्वोच्च तत्त्वज्ञानाच्या स्वरूपात पुढे येतात.
 ६.०२ उद्योगाचा, कारखान्याचा, कंपनीचा, संस्थेचा मूळ उद्देश, कामगार किंवा भागधारक यांच्या भाकरीपलीकडे व्यापक असायला हवा तसे नसेल तर. ज्याच्या आधारावर सान्या धंद्याचा डोलारा उभा तो ग्राहक अडगळीत पडतो. त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. कारखाने, बँका, कंपन्या नोकरांसाठी चालू लागतात. असे चालू राहिले तर धंदा चालत नाही, वाढत नाही, आणि भाकरीचा आकार वाढत नाही.मालक-मजूर संबंधांची मारामारी कमीकमी होत जाणाऱ्या भाकरीच्या तुकड्यावर केंद्रित होते.म्हणूनच मात्सुशिटा कंपनीने 'उद्योगातून राष्ट्रसेवा' ही पहिली जबाबदारी मानली आहे.हे बृहत् ध्येय (सुपरऑर्डिनेट गोल) ठरवले आहे.कंपनी रोजच्या प्रार्थनेतून ते बिंबवण्याचा प्रयत्न करते.उद्योगातली ही मूळ संकल्पना जेवढी विशाल तेवढी उद्योगाची अनेक लोकांना सामावून घेण्याची शक्ती मोठी असते.संकल्पनेची चौकट लहान असेल तर उद्योग किती जणांना वेढून त्यांत सामावून घेणार? किती जणांना सहभागी करणार? किती शक्ती जोडणार?
 ६.०३ धंद्याच्या अध्वदूंच्या मोठ्या चौकटीत (कॉण्टेक्स्टमध्ये) अनेक लोकांना त्यांचे संदर्भ लाभतात, त्यांच्या लहान चौकटी बसवता येतात.आस्थापनेचा 'कॉण्टेक्स्ट' त्यात काम करणाऱ्यांच्या 'टेक्स्ट'ना आधार पुरवतो.व्यवस्थापकीय परिणामकारकता ठरवताना हे महत्त्वाचे घटक असतात.
 ६.०४ मोठे ध्येय समोर असले की दुसरा एक फायदा असा होतो, की माणसाला स्वतःच्या वैयक्तिक शरीराची आणि त्याच्या छोटेपणाची सतत जाणीव राहते.आपण दुसऱ्या लोकांवर अवलंबून आहोत हे लक्षात येते आणि नम्रता अंगी बाणायला सहज मदत होते.भारतीय दर्शनशास्त्रात नम्रता मोलाची मानलेली आहे.नम्रता खरोखरी स्वतःच्या वागणुकीत मुरवायची असेल तर स्व चे छोटेपण सदैव मनात राहायला हवे.
 ६.०५ माणसाच्या मनाला शिकवणीची नित्य गरज असते.त्याचे मन चंचल असते.कुठल्याही गोष्टीवर मन केंद्रित करायला साधना करावी लागते.माणसाच्या मनाचे वर्णन कवीने असे केले आहे,
 आधीच मर्कट तशातही मद्य प्याला,
 झाली तयास वृश्चिकदंशबाधा
 चेष्टा वदू मग किती कपिच्या अगाधा ।
 मन हे माकडासारखे चंचल असते.त्यातच, ते माकड तृप्त न होणाऱ्या वासनांचे मद्य पिते.त्यातच, त्याला मत्सर व असूया या खेकड्याचा दंश झाल्यावर त्याच्यातला अहंकार हा दैत्य आहे तो फणा काढून उसळतो, अशा त्या माकडाच्या मर्कटलीला काय वर्णन कराव्यात!
 ६.०६ चंचल मनावर काबू मिळवायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला दिशा दाखवणे किंवा त्याचे ध्रुवीकरण ठीक करणे ही होय.लोहचुंबकाचा तुकडा जर साध्या लोखंडावर फिरवला तर त्याचे दक्षिण। उत्तर ध्रुव समान होऊन लोखंडात चुंबकत्वाची शक्ती संक्रमित होते.हे अर्थात थोड्या वेळासाठी घडते. थोड्या वेळापुरते का होईना, मौन, ध्यान, स्वतःच्या श्वासोच्छ्वासावर नियंत्रण करण्याचा रोज प्रयत्न केला की मनाचे नियंत्रण होते.देह म्हणजेच केवळ मी आणि या मी चा अहंकार कमी होऊ लागतो.मन देहाबाहेरचा विचार करायला अनुकूल बनते.प्रार्थना, सामूहिक प्रार्थना, अशासारख्या कर्मकांडाचा हेतू रोज कामाला जीवनव्यवहाराला सुरुवात करण्यापूर्वी हे ध्रुवीकरण, हे एकत्रीकरण साधण्याचा असतो. वेदांत म्हटले आहे,
 समानीऽव आकूति
 समाना हृदयानिव
 समानमस्तु वो मनो
 समानः सुसहासति ।
 आमचे ध्येय एक असू दे.आमचे हृदय एक असू दे.आमची मने एक असू देत.अशाच समानतेने आम्ही दिवस घालवू.हे साधले की 'सहवीर्य करवावहै'ची तयारी पूर्ण होते.कुठल्याही सामूहिक कामाला मनांच्या समानीकरणाची गरज असते.
 ६.०७ एकदा का मनांचे समानीकरण झाले की मग व्यक्ती-व्यक्तीच्या रंगभूमीवरच्या भूमिका वेगवेगळ्या असतील, पण सर्वांचे नाटक एक आहे हे समजणे सोपे जाते.भूमिका लहानमोठ्या असतात, त्यात उतरंड असते लहानमोठेपणा असतो.रंगभूमीवरच्या त्या भूमिकेपेक्षा मी वेगळा आहे हे समजले की व्यक्ती समान होतात.कामे कमीजास्त उंचीची असतात पण माणूस म्हणून सारे समान असतात.मोठी कामे घडवायची असतील,अशक्य गोष्टी शक्य करायच्या असतील, तर तसे आचरण आवश्यक ठरते.
 ६.८ काम करणारे वेगवेगळ्या वाद्यवादकांसारखे असतात.त्या त्या वाद्याची, वादकांची पद्धत वेगवेगळी असते.साऱ्यांचा सूर मात्र एक असतो.राग एक असतो.साऱ्यांचा राग एक, सूर एक असला तर त्यातून एकतानता अनुभवता येते.बेसुरेपणा-गोंगाट होत नाही.त्याऐवजी निरनिराळी वाद्ये, निरनिराळे राग उत्तमपणे एकाच वेळी वाजवले गेले तर कर्कश गोंगाटापलीकडे काही हाती लागणार नाही,काही अनुभवता येणार नाही.म्हणूनच भारतीय दर्शनशास्त्रात मनांच्या समानीकरणावर खूप भर दिला जातो. साऱ्यांनी एकच वाद्य वाजवावे असा आग्रह नसतो,पण राग एक असावा,दिशा एक असावी.साऱ्यांची प्रगती छोटा मी पासून मोठा मी पर्यंत पसरत जाणारी असावी.हे परम साम्य, परम समानतेचे तत्त्व विनोबांनी गीतेचे सार म्हणून सांगितले आहे. 'अभिधेयं परं साम्यम्' हा सर्व भारतीय विचाराचा मूलाधार आहे.  ६.९ पाश्चात्य विचारात व्यक्ती समूहापेक्षा वेगळी मानली जाते.भारतीय विचाराची सुरुवात मुळी व्यक्ती ही समाजाच्या देहाचा अवयव आहे येथून होते.मी ची व्याप्ती कशी वाढत जाईल व त्याच्या व्याख्येत अधिकाधिक माणसे कशी बसतील, हे समाज-देहाच्या हिताच्या दृष्टीने गरजेचे असते. विचारांचा प्रवाह समूहाकडून व्यक्तीकडे न जाता व्यक्तीकडून समाजाकडे कसा जाईल हे पाहिले जाते.बाहेरून आत असा विचार न करता आतून बाहेर फाकणाऱ्या तेजासारखा व्यक्तीचा विचार केलेला आहे. विनोबांच्या शब्दांत सांगायचे तर 'मी'चे अनेकवचन ‘आम्ही' होते.म्हणजे मी केले नाही तर आम्हीही काही करणार नाही.आम्ही अमुक करायला हवे, लोकांनी अमुक करायला हवे,समाजाने अमुक करायला हवे, दुसऱ्यांनी अमुक करायला हवे, दुसरे चांगले वागले तर मी चांगला वागेन हे सर्व विचार परावलंबी आहेत.चांगले वागायला मला वाट पाहण्याची गरज नाही.मी सुरुवात माझ्यापासून करायला हवी.या बाबतीतील परावलंबन माझे कर्तृत्व व वाढ रोखणारे आहे.हा विचार माझा 'कर्ते'पणा हिरावणारा आहे. मी जगाला फार थोडे सुधारू शकेन पण मी स्वतःला खूप बदलू शकतो.मी सुरवंटाचा फुलपाखरू बनू शकतो.मी या समाजाचा अवयव आहे.अवयवाच्या पेशीच अवयव बदलत असतात.हानी भरून काढत असतात.मीच माझ्या पेशींची झीज भरून काढायला हवी.मीच बदलायला हवे.माझ्यासारखे अनेक 'मी' यांना जोडणारा समाज आहे.त्यांना जोडणारे एक समान सूत्र आहे.माझ्यासारखे अनेक कर्ते मिळून समाज बनलेला आहे, हा भारतीय विचार व्यष्टीकडून समष्टीकडे जाणारा आहे.मला कोणी मोक्ष देणार नाही.तो माझा मी मिळवायला हवा.
 ६.१० समाजात जे बदल व्हायला हवेत असे मला वाटते त्याची सुरुवात मी माझ्यापासून करायला हवी.मी स्वतःला सुधारू शकतो.मी स्वतःला नम्र बनवू शकतो.मी अहंकार टाकू शकतो.ही भूमिका घेतली, हा विचार समजावून घेऊन तशी कृती सुरू केली की मोठमोठे जटिल सामूहिक प्रश्न सोपे होतात.मुख्य म्हणजे फार मोठा किंवा जटिल प्रश्न आहे म्हणून व्यक्तीने काहीच न करता बसून राहायचे, हा प्रकार घडत नाही.काहीतरी कृती घडत राहते.
 ६.११ वेदांत एक गोष्ट आहे.एकदा दहाजण एका दाट जंगलातून शिकारीला चालले होते. जंगल निबिड होते.हिंस्त्र श्वापदांची भीती होती.सर्वांनी एकमेकांच्या नजरेच्या टप्प्यात किंवा किमान एकमेकांच्या हाकेच्या अंतरात राहणे आवश्यक होते.मधुनमधून सर्वजण एकत्र आहोत ना,कुणी चुकला-हरवला नाही ना याचा शोध घेणे गरजेचे होते.एकदा असा तपास घेताना, एकाने आपण किती जण आहोत हे पाहण्यासाठी किती सवंगडी आहोत हे मोजायला सुरुवात केली. मोजल्यावर त्याने ओरडून सर्वांना थांबवले व म्हणाला,'अरे थांबा, थांबा.काही तरी घोटाळा आहे.आपण निघताना दहाजण होतो.पण आता मी मोजले तर ते नऊच निघाले.आपल्यापैकी कुणीतरी एक हरवला आहे'. चिंतातुर होऊन दुसऱ्याने मोजायला सुरुवात केली आणि त्याचेही उत्तर तेच निघाले. 'नऊ' पाळीपाळीने प्रत्येकाने मोजले.साऱ्यांचे उत्तर एकच. नऊ! तेव्हा दहा जणांनी एकमताने आपण 'नऊ' आहोत असा निष्कर्ष काढला.सारेजण चिंतेत पडले.हरवलेल्या दहाव्याचा शोध घेणे अपरिहार्य झाले.थोडा वेळाने एकाच्या डोक्यात प्रकाश पडला.तो म्हणाला,'आपण वेड्याप्रमाणे स्वतःला सोडून आपली संख्या मोजत आहोत.नऊजणच आहेत आणि एक हरवला म्हणून चिंता करत आहोत. स्वतःपासून मोजायला सुरुवात करा, पुरे दहाच्या दहा सापडतील!
 ६.१२ सामाजिक कामे करताना हेच घडते.मी सोडून सर्वांनी वेळ पाळायला हवी, वेळेवर यायला हवे.मला मात्र सवलत हवी.बाकीच्यांनी वादविवाद टाळावा.बाकीच्यांनी वाहने हाकताना शिस्त पाळायला हवी.त्यांनी त्यांची कामे मनापासून, मन लावून करायला हवी.त्यांनी साऱ्या चांगल्या गोष्टींचे पालन करायला हवे.समाजाने सुधारायला हवे.सरकार सुधारायला हवे.युनियन सुधारायला हवी. सोसायटी सुधारायला हवी.कुटुंब सुधारायला हवे.आपल्या सर्वांना हे शंभर टक्के मान्य असते.
 ६.१५ पण मी काय करणार? मी कसा सुधारणार हा प्रश्न आम्हाला पडत नाही.महत्त्वाचा वाटत नाही.आपण मी सोडून जग सुधारू पाहतो.जग बदलत नाहीच पण मीही बदलत नाही.ज्यांनी ज्यांनी स्वतःला बदलून पाहिले,त्यांनी त्यांनी त्यांना स्वतःला तर सुधारले, बदलले, पण त्यांनी त्यांचा समाजही सुधारला.मी पासून सुरुवात केल्याशिवाय आम्ही पर्यंत पोचणे शक्य नाही.मी हे स्वतःला जाणवणारे, बदलता येणारे वास्तव आहे.तो धागा पकडला तर पुढे पोचता येईल.
 ६.१६ भारतीय विचारात माझे कर्तव्य काय यावर भर आहे.माझे हक्क काय याचा विचार नाही.माझ्या कर्तव्यात इतरांचे हक्करक्षण होते.व्यवस्थापकांनी ही खूण लक्षात ठेवायला हवी.



 ७.०१ व्यवस्थापनाच्या विचारात हक्काकर्तव्ये यांचा प्रश्न साहजिक उपस्थित होतो.दोनपेक्षा अधिक माणसे एकत्र आली की त्यांच्या परस्पर संबंधात हक्क-कर्तव्याचे मुद्दे येतात.व्यक्तीव्यक्तीमधल्या या नात्यांना,या साऱ्या अणंना जोडणारी ऊर्जा कोणती हा प्रश्न निर्माण होतो.मानवजातीसमोरच्या या नित्य प्रश्नांची उत्तरे निरनिराळ्या तत्त्ववेत्त्यांनी त्यांच्या 'दर्शनां प्रमाणे निरनिराळी दिली आहेत.बर्दीड रसेलच्या मते, पदार्थविज्ञानात जे महत्त्व ऊर्जेला आहे तेच महत्त्व मानवी संबंधात 'सत्ता' या संकल्पनेला आहे.ऐतिहासिक काळात निरनिराळ्या कालखंडांत निरनिराळ्या लोकांनी ही सत्ता धर्माच्या नावावर, संपत्तीच्या,संघटनेच्या,लैंगिक आकर्षणाच्या जोरावर आपल्या हाती राखण्याचा प्रयत्न केला आहे.त्या त्या गोष्टींना समाजातले महत्त्वाचे मूल्य मानले आहे.फ्रॉइड हे मानवी संबंध व तदनुसार सामाजिक व्यवहार सेक्सच्या परिभाषेत समजावून देतो,मार्क्स तो धनाच्या परिभाषेत मांडतो,पण बर्नांड रसेलच्या मते साऱ्याच्या मुळाशी खरा मुद्दा सत्ता (पॉवर) हा आहे.रसेलच्या ह्या 'दर्शना'ने बऱ्याच समजायला वरवर कठीण वाटणाऱ्या सामाजिक घटना, समजायला सोप्या होतात. अर्थात हा विचार समूहाकडून व्यक्तीकडे जाण्याच्या पद्धतीतलाच आहे.
 ७.०२ याउलट,भारतीय विचार व्यक्तीकडून समूहाकडे जातो.त्यात व्यक्तीची सत्तालालसा, व्यक्तीच्या शरीराची सत्ता अशी न मानल्यामुळे सेक्स किंवा धन यांचे सत्ताकारणातले महत्त्व कमी होते.व्यक्तीचा प्रभाव त्या व्यक्तीच्या आंतरिक प्रगल्भतेवर अवलंबून ठेवल्यामुळे त्याच्या जवळचे धन किंवा त्याचे सेक्सअपील हे महत्त्वाचे ठरत नाही.अकिंचन अवस्थेतल्या साधूंनी, चिंतकांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे,ते वैयक्तिक विकासाच्या पातळीवर किंवा वैयक्तिक प्रगल्भतेवर.
 ७.०३ मार्क्ससुद्धा माणूस किंवा व्यक्ती हाच विकासाचा मानदंड मानतो.त्याची मूळ प्रेरणा नैतिक भूमिकेवर आधारलेली आहे.'मी'ने चांगले का वागावे? हा सनातन प्रश्न त्यालाही पडलेला होता. त्याने स्वतःला जडवादी मानताना,शुद्ध वैज्ञानिकतेचा पुरस्कार करत असताना,ईश्वरासमोर सर्व समान आहेत ही अध्याहृत धर्मकल्पना आर्थिक क्षेत्रातही सर्व समान असायला हवेत अशी विस्तारली.सर्व माणसे वेगवेगळी दिसतात हे नैसर्गिक वास्तव आहे.शक्ती, बुद्धी, उंची, जाडी, वर्ण, क्षमता, कौशल्य यांबाबतीत सर्वामध्ये कोणतीही समानता प्रत्यक्ष दिसत नसताना साऱ्यांना समान का मानायचे याचे 'सायंटिफिक' उत्तर नाही. कारण मानवी समानता हे नैतिक मूल्य आहे. नैसर्गिक सत्य नव्हे. पाश्चात्यांच्या समानतेच्या मूल्यामागे सारी माणसे एकाच ईश्वराची लेकरे आहेत या धर्मकल्पनेचा आधार आहे.भारतीय समानतेच्या कल्पनेत केवळ माणसे नव्हे तर सारी सजीव सृष्टी ही एकाच परमात्म्याच्या अंशाची धनी आहे व म्हणून समान आहे असा आध्यात्मिक आधार आहे.पशुपक्षी, वृक्षवल्लरी हेही त्याच परमात्म्याचे अंश आहेत हे सूत्रदेखील पर्यावरण संरक्षणाच्या आधुनिक विचाराला आधार परवते.सर्वांभती समत्व हे नैतिक मूल्य आहे.
 ७.०४ विनोबा त्याच्याही पुढे जाऊन असे म्हणतात, की भारतीय विचारात सर्व सजीवांत एकाच आत्म्याचा आविष्कार आहे हे मानल्यामुळे अहिंसा हे मूल्य स्थापित झाले आहे.सुरुवातीला माणूस माणसाला खात असे.आता तो तसे करत नाही.तो दुसऱ्या किंवा परकी माणसांना मारून का खात नाही,तर सर्व माणसे हे त्याचे सहोदर आहेत,त्याच्या समान आहेत म्हणून.तेच तर्कशास्त्र प्रगत झाले की प्राणिहत्या, मांसाहार ह्या कृती अनैतिक ठरतात.
 ७.०५ माणसे एका देवासमोर समान मानली की मग समान लोकांच्या समाजातले व्यवस्थापन हुकुमांवर, कायद्यांवर, हक्कांवर, धर्माज्ञेवर आधारलेले ठेवायचे की स्वतःच्या कर्तव्यप्रेरणेवर सोडायचे हा प्रश्न पुढे येतो.या प्रश्नावरची पाश्चात्य व भारतीय उत्तरे दोन टोकांची भासणारी आहेत.
 ७.०६ पाश्चात्य विचारात हक्क व अधिकार हा माणसामाणसांमधल्या परस्परसंबंधांचा पाया मानला जातो.भारतीय विचारात कर्तव्य हा परस्परसंबंधाचा पाया मानला जातो.यशस्वी व परिणामकारक व्यवस्थापनाचा विचार करताना हा फरक ध्यानात ठेवून व्यवस्थापनात पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत.
 ७.०७ माणसे काम का करतात ?लोकांकडून काम करवून घेण्याचे दायित्व ज्या व्यवस्थापकांवर आहे त्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते.त्यांना या मूळ प्रश्नाची खोल समज असायला हवी.या प्रश्नाचे सर्वसामान्य उत्तर,माणूस स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी,स्वार्थासाठी,पैशासाठी,अहंकार-तृप्तीसाठी, सत्तालालसेपोटी काम करतो असे आहे.देहभावावर आधारलेला स्व चा हा अर्थ व पाया मान्य केला की मग मी कमीत कमी काम करणार,जास्तीत जास्त नफा कमावणार,जास्तीत जास्त घेणार व कमीत कमी देणार हे तर्कप्राप्त आहे.माणसांमधले संबंध बळजोरी,सत्ता हिसकावून घेणे व त्याचे सामाजिक नियंत्रण यांवर आधारलेले असणार हे उघड आहे.समानता,सहभाव अशासारखी सामाजिक दृष्टीने महत्त्वाची मूल्ये आहेत,त्यांच्याकडे केवळ साधन म्हणून,सोय म्हणून पाहिले जाणार व वापर केला जाणार हे तर्कतः बरोबर ठरणार.
 ७.०८ भारतीय विचाराचा सारा भर या छोटा स्व ला किंवा स्वार्थाला स्वतःच नियंत्रणात ठेवून, त्याचे मोठ्या विशाल स्व मध्ये परिवर्तन करणे यावर आहे.मोठ्या स्व च्या व्याख्येत इतरांचा समावेश आपोआप होणार आणि मग 'स्वतंत्रः कर्ता' या व्याख्येप्रमाणे भोवतालच्या साऱ्यांचे हितरक्षण हा व्यक्तीच्या कर्तव्याचा भाग बनतो.दुसऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हे कर्तव्य ठरते.कारण हे दुसरे कोणी परके नसून व्यक्तीचे सहावयवी वा सहचर वा सहोदर आहेत.कुठल्यातरी परम शक्तीसमोर मी समान असेन,ईश्वरासमोर मी समान असेन,तरी माझे वेगळेपण हे शिल्लक राहते.पण एकाच परमात्म्याचा मी अंश आहे आणि इतर सारे हेही तसेच त्या परमात्म्याचे अंश आहेत,त्यांचा-माझा अ-द्वैत संबंध आहे हे मान्य केले तर काम सोपे होते.हातांनी पायांचे, पायांनी पोटाचे,डोक्याने मानेचे रक्षण केले,असे आपण म्हणत नाही कारण सर्व सहअवयवांचे ते कर्तव्य आहे.विशाल अर्थाने ते त्यांचे प्रत्येकाचे स्व चे काम असते.द्वैतीभावनेने नव्हे,सोय म्हणून नव्हे,फायद्याचे म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून दुसऱ्यांचे हितरक्षण करणे हे व्यक्तीला क्रमप्राप्त ठरते.
 ७.०९ वरिष्ठ अधिकाऱ्याने हाताखालच्या लोकांचे, समान पातळीवरच्या अधिकाऱ्यांचे हितरक्षण करणे, स्वतःच्या कर्तव्याचा भाग म्हणून स्वयंप्रेरणेने करणे हा एक वेगळा क्रांतिकारी दृष्टिकोन आहे. क्रांतिकारी बदल आहे.हा बदल कायदे करून, अधिकारी नेमून घडणार नाही.हा बदल वरिष्ठ अधिकारी घडवणार नाहीत तर तो मी पासून सुरुवात करून मी घडवणार आहे.हा विचार मोलाचा आहे.अधिकाऱ्याचा 'मी' हे सारे करणार आहे ते त्याच्यावर कुणाचे दडपण आहे म्हणून नव्हे,कुणी त्याला सांगते आहे म्हणून नव्हे,तर त्याच्या स्वतःच्या इच्छेने (फ्री विल) करणार आहे.ही भारतीय धारणा आहे.
 ७.१० मी स्व-तंत्र आहे.मी हे कारण आहे.घटिते ही माझ्यामुळे घडतात.मी कर्ता आहे आणि घटिते ही माझी कर्मे आहेत.प्रत्येक कर्माचे कर्मफल आहेच.ते मला चुकवता येणार नाही.ते मला सोडणार नाही.हा कार्यकारण संबंध,हा अनुल्लंघनीय निसर्गनियम आहे.ह्या कर्माचे फळ या किंवा पुढच्या जन्मी मिळेल,कारण मागच्या जन्मीच्या कर्माचे कर्मफल या जन्मात मी मिळवत असतो.ही जीवनाच्या सातत्याची कल्पना हा भारतीय विचारधारेचा भाग आहे.पर्यावरणाची चिंता साहजिकच आजच्या सामाजिक चिंतेचा सहज विषय बनते.वैदिक,वेदान्ती,सनातन,जैन या साऱ्या भारतीय धर्मपंथांनी वैयक्तिक कर्मवाद मान्य केलेला आहे.हे संचित प्रत्येक देहाबरोबरच्या सूक्ष्म कोषात आत्मा साठवत जातो.जेव्हा कर्मक्षय होतो,सारे संचित संपते तेव्हा मग मोक्ष किंवा निर्वाणाची प्राप्ती होते व आत्मा परमात्म्यात विलीन होतो अशी भारतीय सैद्धांतिक कल्पना आहे.
 ७.११ इतरांचे हक्करक्षण करणे हे व्यक्तीचे कर्तव्य ठरले की परस्पर संबंधातला विखार आपोआप संपतो.कर्तव्ये प्रत्येकाला आहेत.अधिकारी,सेवक,व्यवस्थापक,नोकर,मालक,मजूर,नागरिक,पिता,माता,पुत्र,कन्या,स्त्री,पुरुष या साऱ्या भूमिकांतील व्यक्तीची कर्तव्ये निहीत म्हणून सांगितलेली आहेत.त्यांची त्यांच्या कर्तव्याचरणामुळे घडणारी कर्मे त्यांना कर्मफले देणार आहेत.यात सर्वांच्या हितरक्षणाची सोय आपोआप आहे.
 ७.१२ भारतीय संस्कृतीने जी जीवनमूल्ये जोपासली आहेत,त्यामुळेच अर्जुनाला
 कृष्णा स्व-जन हे सारे
 युद्धी उत्सुक पाहुनी...
 कल्याण न दिसे युद्धी
 स्व-जनांस वधुनिया
 असा विषाद झाला होता.अटीतटीच्या युद्धात शत्रू हा सुद्धा स्व-जन आहे ही भावना मनांत पुरी रिघल्याशिवाय तसा तो होणार नाही.श्रीकृष्णाने अर्जुनाच्या विषादातले फोलपण निष्काम कर्माचा विचार सांगून संपवले व अर्जुनाला कृतयुद्ध केले.  ७.१४ माझ्या या लिखाणाला गीता,जी प्रत्यक्ष कटोकटीच्या धर्मयुद्धात सांगितली व जिचे फलित निष्काम कर्मयोगात झाले,ती प्रेरणा आहे.तिच्यावरचे लोकमान्य टिळक व विनोबा भावे यांचे भाष्य हा आधार आहे.भारतीय विचारधारेत आद्य शंकराचार्य,ज्ञानेश्वर,टिळक,विनोबा आणि अन्य भाष्यकारांनी गीतेचा अनेक अंगांनी अर्थ लावला आहे.ती ती त्यांची दर्शने आहेत.व्यवस्थापकाच्या आयुष्यातल्या लढाया,युद्धे ही स्व-जनांशी असतात,म्हणून तर गीतेचा संदर्भ योग्य असा ठरतो.



 ८.०१ चांगला व्यवस्थापक बनण्यासाठी व्यक्तीने काय करायला हवे.व्यक्तीने काम का करावे,या प्रश्नाचा शोध मला भारतीय मूल्यव्यवस्थेकडे घेऊन गेला.त्या शोधाचे फलित म्हणून मी जिथे काम करतो तिथली माणसे मला जास्त चांगली समजली.मला मिळणारे सहकार्य वाढले.माझ्या मनावरचा ताण कमी झाला. असल्या भावात्मक प्रेरणेशिवाय घडणारी कृती फक्त यांत्रिक होते.ते कलेवर होते.त्यांत प्रेरणेचा प्राण असत नाही.
 ८.०२ विषाद अर्जुनालाच होतो असे नाही.प्रत्येक व्यक्तीला तिच्या दैनंदिन जीवनात तो होत असतो.श्रमाने असो,भावनात्मक असो,खोल विचार करून असो,निराशेने असो,धक्क्याने असो.विषाद हा कधी ना कधी निर्माण होतच असतो.अर्जुनासमोरचा प्रश्न 'मी युद्ध कशासाठी लढू' हा होता. व्यक्तीसमोर मी काम का करावे? कशासाठी करावे?असा प्रश्न असू शकतो.भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला गीतेतला कर्मयोग सर्व लोकांच्या उपयोगाचा आहे. खास करून ज्यांना लोकांकडून काम करवून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा आहे.
 ८.०३ माणूस जे जीवन जगतो ते सातत्याने बाह्यदर्शी असते. चिंता,जीवनाचा वेग, गुंतागुंतीचे प्रश्न हे इतके व्यामिश्र असतात की त्या गुंताड्यात आणि महाप्रचंड वेगात मूळ धागे तपासायला अंतर्मनात प्रवेश करायचा म्हटला तरी ते सोपे नसते.आपल्या संपर्कात येणाऱ्या माणसांची संख्या,जगातल्या वेगवेगळ्या भूभागातल्या लोकांशी येणारा संपर्क,निरनिराळ्या भौतिक गोष्टींची वाढत जाणारी संख्या,त्यांची गुंतागुंत ही अक्षरशः भोवंड आणणारी असतात.विज्ञानामुळे भौतिक गोष्टींची वाढ आणि त्यासाठी वाटणारी लालसा सारखी वाढत असते.
 ८.०४ महाभारतातली ययातीची कथा प्रसिद्ध आहे.ययाती या राजाने त्याचे आयुष्य नाना प्रकारचे उपभोग घेण्यात खर्च केले.प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अपरिहार्यपणे येणारे वार्धक्य त्याच्याही वाट्याला आले,पण त्याची उपभोगाची लालसा पुरी होत नव्हती.त्याने आपल्या मुलाजवळ त्याचे तारुण्य मागून घेतले व मुलाला आपले वार्धक्य दिले,तरीही त्याची उपभोगाची लालसा परी होईनाः उपभोग भोगन समाधान होईना तेव्हा मग त्याला वैराग्याचा झटका आला आणि सबंध आयुष्याच्या विफलतेचा अनुभव मिळाला. महाभारतकारांनी त्याच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी श्लोक लिहिला आहे.
 न जात कामः कामानां उपभोगेन शाम्यति ।
 हविषा कृष्णवर्मेव भूय एवाभिवर्धते ।।
उपभोग, आणखी उपभोग यांतून फक्त चंगळवाद फोफावतो,अधिकाधिक अभिलाषा निर्माण होते.पण कामना काही शमत नाहीत.त्या सारख्या वाढत राहतात.ज्याप्रमाणे यज्ञात दिलेल्या हविर्भागामुळे यज्ञीय अग्नी भडकत राहतो,तशी उपभोगातून तृप्ती येत नाही.उलट लालसा वाढत राहते.हा सार्वत्रिक अनुभव आहे.ज्याला खाण्याची आरोग्यदृष्टया कमीत कमी गरज असते त्यालाच खाण्याच्या पदार्थांचे आकर्षण जास्त असते.त्याच्या जिभेचे लौल्य सदैव धारदार राहते.
 ८.०५ माणूस सदैव बाहेरच्या जगाचा,बाहेरच्या गोष्टींचा विचार करतो.त्यांतच रंगून जातो, त्यांतच गुरफटून राहतो.आधुनिक जगात बाह्य उपाधींचे आकर्षण एवढे जबरदस्त वाढले आहे,की मग स्वतःबद्दल विचार करायला वेळ राहत नाही.ही सारी बाह्य व्यवधाने माणसाच्या मनाला इकडेतिकडे खेचत राहतात.माणसाच्या विचारांचा मूळ गाभा असतो तो तोडण्याचा,त्याची शकले करण्याचा.तो प्रयत्न या बाह्य व्यवधानांमुळे चालू राहतो.जीवनाचा अर्थ लावण्यासाठी त्याचा स्वतःचा जो कॉम्प्युटर प्रोग्रॅम असतो तोच भ्रष्ट होऊन जातो.मग जीवनाचा अर्थ लागत नाही.जीवन निरर्थक, निःसंदर्भ बनते.कृती घडत राहतात.त्यांचा मेळ घालता येत नाही.अमुकएक गोष्ट व्यक्ती का करते,तिने ती का केली याचा बोधच होत नाही.पुढे पुढे तर साऱ्या कृती गोधडीसारख्या वेगवेगळ्या रंगांच्या चिंध्या जोडल्यासारख्या होतात.त्यांचे आंतरिक सूत्रच हरवते.
 ८.०६ तडजोडीमागून तडजोडी,मग आपल्या मनाला पटवण्यासाठी त्या सोप्या करण्याचे प्रयत्न, चुकीच्या कृतीचे समर्थन करण्याचे प्रयत्न,त्यात आणखी फरफट असा गुंताडा वाढत जातो.
 ८.०७ त्यासाठी बाह्यदृष्टी टाळून अंतर्मुख होण्याचे महत्त्व असते. ती एक गरज बनते. कारण नाहीतर शहाणपण टिकवणे कठीण होऊन बसते.अंतर्यामी उडी घेण्याची, मन एकाग्र करण्याची आणि मी कोण आहे (कोऽहम्) हा शोध घेण्याची गरज वाढत जाते.त्या मार्गावरची वाटचाल साधनेशिवाय शक्य नसते.मानसिक शांती ही प्रत्येक माणसाची गरज असते.त्याशिवाय तो बाह्य आपर्तीना तोंड देऊ शकत नाही.त्याच्या जहाजावर बाहेरच्या घटनांच्या लाटा आदळत राहतात.त्याच्या शरीराची व मनाची सततची बाह्य झुंज ही चालू असते.त्याचवेळी अंतर्यामी जी एकसूत्रता,जीवनमूल्याविषयी पक्की समज व मूळ सूत्राशी पक्की जडवणूक असावी लागते ती नसेल तर मग त्याचा सुकाणूवरचा हात स्थिर राहत नाही. अशा दुहेरी ताणात वावरणारी माणसे मनातून दुभंगतात,सैरभैर होतात.व्यवस्थापनशास्त्रातला आधुनिक युगातला हा मोठा आव्हानाचा भाग आहे.
 ८.०८ जिथे मूल्ये ही केवळ सोयीची गोष्ट म्हणून त्यांची रेवडी उडवली गेली,मूल्ये ही साधुसंतांची, कीर्तनकारांची किंवा तत्त्वज्ञानातल्या लोकांची मिरास असे समजून त्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते तिथे तिथे छिन्नमनस्क लोकांचा हा प्रश्न व्यापक होत आहे.मूल्ये परिस्थितीसापेक्ष असतात,खास करून आर्थिक परिस्थितीशी सापेक्ष असतात अशा कल्पना मांडल्या गेल्या.तिथे नवे ययाती जन्माला येत राहतात.सापेक्ष मूल्ये याचा अर्थ सोयिस्कर व निसरड्या श्रद्धा असा होतो.जिथे ही मूल्ये बुद्धीवर आधारलेली असतात,केवळ तार्किक चर्चेवर आधारलेली असतात,केवळ बुद्धीने स्वीकारलेली असतात, तिथे ती निसरडी ठरण्याची शक्यता जास्त असते.कारण सोय ही महत्त्वाची ठरते.पक्क्या निष्ठा, पक्का मूल्यविवेक ह्या धारणा श्रद्धेवर किंवा भावनात्मक बांधिलकीवर आधारलेल्या असू शकतात. कॉपी करून परीक्षेत यश मिळवणारा विद्यार्थी,पेपर फोडून पैसे कमावणारा अध्यापक,खोटे बोलून हाताखालच्या लोकांना आश्वासने देणारा व्यवस्थापक,अंतर्गत गुप्त माहिती वापरून स्वतःच्या कंपनीतल्या शेअर्सच्या खरेदीविक्रीत पैसे कमावणारा अधिकारी ही घसरड्या जीवनमूल्यांवर जीवन घालवणाऱ्या लोकांची उदाहरणे आहेत.  ८.०९ मूल्यांविषयी व्याख्याने देता येतात,शब्दचातुर्य वापरण्यास जमते,पण असे करू शकणाऱ्या माणसांना जवळच्या लोकांचा विश्वास संपादन करता येत नाही,कठीण वेळ आली तर ती टिकाव धरू शकत नाहीत.कठीण वेळ येते व जाते.फक्त कठीण निश्चयाची माणसे टिकून रहातात. कठीण निश्चय करायला श्रद्धेने, भावनेने स्वीकारलेली मूल्ये गाठीशी असावी लागतात.स्वदेशीचे,राष्ट्रप्रेमाचे मूल्य जिवापाड जपणारे जपानी लोक जपानी विमानाने प्रवास करतात,जपानी माल वापरतात आणि आंतर्राष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहतात.तंत्रज्ञान बिनदिक्कत परदेशी आयात करतात पण आंधळ्या अनुकरणाने व्यवस्थापन पद्धती आयात करत नाहीत.स्वतःच्या राष्ट्रीय चारित्र्याशी सुसंगत अशी व्यवस्थापनपद्धत विकसित करतात. त्यांनी राष्ट्रीय सन्मान, देशभक्ती हे मूल्य मनापासून स्वीकारलेले आहे.त्याबद्दल त्यांच्या मनांत शंका नसते. अशा निःशंक मनाने,निश्चयाने काम होते तेव्हाच यश मिळते.
 ८.१० निसरड्या श्रद्धा,लाटालाटांनी वाहत येणारी व फक्त बुद्धीने स्वीकारलेली मूल्ये कठीण काळात आधार देऊ शकत नाहीत.मुळात डळमळीत असणाऱ्या गोष्टीचा आधार कुणाला काय उपयोगी पडणार? ती गटांगळ्या खाण्यास लावणारी परिस्थिती असते.
 ८.११ आपल्या श्रद्धांचा खुंटा मजबूत ठेवण्यासाठी स्वतःचा शोध,स्वतःच्या मनावर ताबा, स्वतःच्या वासनांवर ताबा,बाह्य उपाधींबद्दल उपेक्षा या साऱ्या गोष्टींचा सातत्याने अभ्यास व साधना या गोष्टी भारतीय विचारात सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत.सर्व भारतीय दर्शनांत अंतःशुद्धी व तिच्याद्वारे बाह्य शुचिता यांवर आचरणाचे नियम गुंफलेले आहेत.मनाची शांतता महत्त्वाची.समधात मन,शुद्ध मन ही कुठल्याही व्यक्तीच्या सुखातली पहिली पायरी असते.व्यवस्थापक,मालक,मजूर,नेते,अनुयायी या साऱ्यांचे पहिले ध्येय हे शुद्ध मनाची साधना हेच सांगितले गेले आहे.स्वतःच्या मनाच्या शुद्धतेवरचा भर हे खास भारतीय लक्षण आहे.कारण 'मी'चे अनेकवचन 'आम्ही' होते.ही मूळ गाठ पक्की आहे.


 ९.०१ भारतीयांनी मन आणि बद्धी यांच्यात मनावर.मनाच्या व्यापारावर जास्त भर दिलेला आहे. कारण मन हा यंत्रातल्या मूळ जनित्रासारखा आहे.चेव ही मनाची अवस्था आहे.केवळ बुद्धीची क्षमता माणसाला कार्यप्रवृत्त करण्याला समर्थ नसते आणि काही कृती घडल्याशिवाय कोणताच बदल घडून येत नाही.मनाने दिलेली प्रेरणा योग्य दिशेने जाण्यासाठी, सन्मार्गावर राहण्यासाठी मनःशुद्धी ही आवश्यक गोष्ट मानली आहे.कारण कुठलीही शक्ती ही बरे किंवा वाईट,दोन्ही घडवू शकते.शक्ती ही यंत्रासारखी असते.त्याच्यामागच्या चालकाची प्रेरणा ही इष्ट-अनिष्ट परिणाम घडवते.
 ९.०२ योगी अरविंदांच्या मते.माणसाच्या मनाची वाढ प्रथम इतर प्राण्यांप्रमाणेच झाली.त्यामुळे पाशवी-भावनांचा मानवी मनावर जबरदस्त,अतिप्राचीन असा पगडा आहे.त्या मानाने बुद्धीची वाढ ही उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यावरची गोष्ट आहे.रंगपटलाचा इंद्रधनुष्यासारखा पट असतो,तशीच भावना व बुद्धी ही पटलाची दोन टोके आहेत.त्यांत भावनांच्या दृश्य भागापलीकडचा जो भाग असतो त्याचा इतिहास जुना आहे.त्यामुळे मनाची शुद्धता ही सर्व धर्मात महत्त्वाची मानली आहे.बुद्धाने म्हटले आहे,की विद्वान माणसाचे शहाणपण सुद्धा त्याच्या लालसेने भ्रष्ट होते.ही हाव त्याच्या सामाजिक व्यवहारांवर प्रतिकूल परिणाम करते.  ९.०३ पाश्चात्य विचारांतला बुद्धीवरचा भर,भावनात्मक नियंत्रणावर कमी भर दिल्यामुळे चिंतेची अवस्था निर्माण करतो.हे तिथल्या समाजधुरीणांनाही जाणवू लागले आहे.सतत वाढत राहणाऱ्या गरजा, त्या गरजा भागवण्यासाठी अधिकाधिक बुद्धीचा वापर,त्यामुळे होणारा नैसर्गिक साधनसंपत्तीचा हास यांमुळे पर्यावरण वगैरे संबंधीचे प्रश्न पुढे ठाकले.त्यांचे बुद्धिवादी उत्तर आता पाश्चात्य लोकांनाही बुद्धीला न पटणारे वाटू लागले आहे.सर्व धर्मपंथांची वासना-नियंत्रणाची,ययातीवाद न स्वीकारण्याची शिकवण आहे.ती पुन्हा महत्त्वाची वाटू लागली आहे.शेतीसारखा सर्वांच्या जीवनाशी जिव्हाळ्याचा संबंध राखणारा विषय निराळ्या दृष्टिकोनातून पाहिला जातो.बिनरासायनिक खते,बिनरासायनिक शेती-उत्पादन लोकप्रिय होऊ लागले आहे.नुसता बुद्धीने विचार करायचा झाला तर ज्यांना लुटता येईल त्यांनी जगातली निसर्गदत्त संपत्ती लुटावी व त्यांनी ती का लुटू नये हे प्रश्न आता व्यक्तिगत न राहता निरनिराळ्या प्रभुसत्तांमधले किंवा राष्ट्रराज्यांतले महत्त्वाच्या संघर्षाचे प्रश्न होऊ लागले आहेत.त्याला आवर घालणे नैतिक मूल्यांतून किंवा नैतिक मूल्यांवरच्या गाढ श्रद्धेतून होऊ शकेल.
 ९.०४ विनोबांनी पन्नास वर्षांपूर्वी हा विचार मांडला आहे.त्यांनी धर्म (पंथ वा रिलिजन या अर्थाने) व राजकारण (सत्ताकारण किंवा पॉलिटिक्स या अर्थाने) ह्या कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत.नवे युग हे विज्ञान (सायन्स) व अध्यात्म (स्पिरिच्युअॅलिटी) यांचे असणार आहे.देशाच्या सीमा तोकड्या ठरणार आहेत.म्हणून त्यांनी 'जय जगत'चा घोष केला.त्यांनी अध्यात्मातले जुन्यातले जुने विचार व ग्रंथ आणि विज्ञानातले अद्ययावत विचार व ग्रंथ यांची सांगड घालण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.विज्ञानाच्या सतत वाढत जाणाऱ्या शक्तीला आत्मज्ञानाची जोड़ नसेल तर विज्ञानाची संहारशक्ती अनावर होईल व त्यातून सर्वनाश अटळ आहे.भारतीय विचारपद्धतीत विचारसूत्रे महत्त्वाची मानली जातात.सूत्रे जुनीच पण त्याचा अर्थ नित्य नव्या विज्ञानाच्या प्रकाशात प्रत्येक व्यक्तीने शोधायचा असतो.त्या सूत्रांचा विस्तार करायचा असतो.मग त्याला जडत्व येऊ शकत नाही.कारण त्याला नव्या व्यक्तीबरोबर,नव्या विचारकाबरोबर नित्यनवे धुमारे फुटत राहतात. कुठल्याही राजकारणी प्रमेयात, तत्त्वज्ञानात, पुस्तकात, मतात, किंवा मठात विचार अडकावून ठेवता येत नाही, ठेवता कामा नये.विज्ञानात जशी प्रत्येक संकल्पना नवनव्या प्रयोगाच्या प्रकाशात पुनःपुन्हा तपासली जाते,त्यातले हीण टाकून देण्यात येते,तसाच समाजकारणात नित्यनूतनत्वाचा विचार महत्त्वाचा असतो.श्रद्धांचे विषय पुनःपुन्हा तपासल्यावर भावनिक श्रद्धा जास्त बळकट होते.त्यातले जे टाकाऊ व हीण असेल ते जळून जाते आणि मूळ विचार प्रगल्भ होतो, झळाळून निघतो.अशा श्रद्धा सहजासहजी भंग पावू शकत नाहीत.
 ९.०५ भारतात आपण मूर्तीचे उत्सव करतो मूर्ती तर धातूची,काचेची,मातीची असते.ती घरी आणतात,तिची प्राणप्रतिष्ठा करतात,तिच्यात अक्षरशः प्राण फुकण्याचा प्रयत्न होतो.तिची पूजा करतात.काही दिवसांनी तितक्याच श्रद्धेने तिची उत्तरपूजा होते व तिचे विसर्जन केले जाते.अविनाशी आत्मा आणि मर्त्य शरीर हे वस्त्र ह्या मूळ कल्पनेवरच मूर्तिपूजेचा विचार व पद्धत आधारलेली आहे.
 ९.०६ आजच्या राजकारणातही पंतप्रधानांपासून सरपंच,राष्ट्राध्यक्षांपासून संस्थेचा अध्यक्ष ही सारी पदे असतात.व्यक्ती बदलत जातात.पदे कायम असतात.मूर्तिपूजेत,मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेत व यथावकाश विसर्जनात मूर्ती बदलणारी पण देवत्व कायमचे हाच विचार ठसवण्याचा प्रयत्न असतो.ह्या कल्पना नित्यनूतन,तावून-सुलाखून राखण्याचा प्रयत्न असतो.एकाच मूळ कल्पनेची अनेक विश्वरूपे.कालानसार बदलत प्रकट होत राहतात.प्रत्येक समाजाच्या अशा मर्मबंधाच्या ज्या गाठी असतात,त्या नित्य नव्या वेशात समोर येत असतात.रामायण-महाभारत हे तुमच्या आमच्या भोवती नित्य घडत असते.नवे रावण, नवे दुर्योधन, नवे कृष्ण नवनव्या रूपांत जन्माला येत असतात.परिवर्तनशीलता हा भारतीय विचारातला मूळ भाग आहे.व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नव्या रूपात येणाऱ्या समस्यांची सोडवणूक करताना त्या त्या प्रश्नांच्या गाभ्याशी भिडण्यासाठी, तळ गाठण्यासाठी भारतीय विचारांच्या मुळाशी जाण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
 ९.०७ दुर्योधन पराक्रमी होता,शूर होता,शिकलेला होता.तो म्हणतो,
 जानामि धर्म नच मे प्रवृत्ति
 जानामि अधर्म नच मे निवृत्ती
 मला धर्म्य काय ते समजते, पण त्याकडे माझी नैसर्गिक ओढ नाही.अधर्म्य काय तेही मी जाणतो पण त्यापासून माझे मन ढळत नाही.अधर्माकडे धावणारी ही भावना,प्रवृत्ती किंवा हृदयवृत्ती त्याच्या शौर्याचा, धैर्याचा,बुद्धीचा,ज्ञानाचा उपयोग त्याला धर्माकडे करू देत नव्हती.त्याला समजत नव्हते असे नव्हे,कळत होते पण (मन) वळत नव्हते.
 ९.०८ भारतीय विचारात चार पुरुषार्थ सांगितले आहेत.धर्म,अर्थ,काम व मोक्ष.सन्मार्गाने जाणारी सामाजिक वागणूक कशी ठरवायची याचा खुलासा असा,  श्रुतिविभिन्नाः स्मृतयश्च भिन्ना ।
 नैको मुनिर्यस्य वचः प्रमाणं
 धर्मस्य आज्ञा निहितं गुहायाम्
 महाजनो यस्य गतः स पंथः ।।
 (वेदवचने भिन्न भिन्न आहेत,स्मृती वेगवेगळी मते मांडतात,दर्शने भिन्न आहेत.कुणाही एका मुनीचे वचन प्रमाण मानता येत नाही.धर्माची आज्ञा काय,धर्माचरण म्हणजे काय हे गूढ असते.तेव्हा धर्माचरण करताना समाजातले जे महाजन आहेत,ते ज्याप्रमाणे जातात,वागतात,वर्तन करतात,आचरण करतात त्याप्रमाणे वागावे म्हणजे धर्माचरण घडते)
 ९.१० आधुनिक कायद्यांचा अर्थ लावताना कायद्याच्या शब्दांपेक्षा वेगवेगळ्या न्यायाधिशांनी वेळोवेळी त्याचे लावलेले अर्थ (प्रिसिडंट्स) समाजधरीणांनी पाडलेले शिष्टाचाराचे संकेत (कन्वेन्शन्स) हे जास्त महत्त्वाचे असतात.राजाला अधिकार असत,पण त्याचा वापर त्याने धर्माच्या मर्यादेत.केला पाहिजे हा संकेत होता.अनुशासन म्हणजे धर्माचे अनुशासन असा अर्थ होता.अनुशासनाची व्याख्या राजाने करायची नसते तर धर्माचारी महाजनांनी करायची असते.म्हणून कर्तव्ये महत्त्वाची,हक्क महत्त्वाचे नव्हेत.वरिष्ठांच्या कर्तव्यात कनिष्ठांचे हक्कसंरक्षण होते.कारण दोघांनाही धर्माच्या मर्यादेतच राहायचे आहे.चार पुरुषार्थांत धर्माचे आद्यस्थान मानले जाते.मोक्ष हे सर्वात शेवटचे ईप्सित आहे.धर्म व मोक्ष या जीवनाच्या नदीच्या दोन तटांच्या आत अर्थ व काम या अन्य दोन पुरुषार्थांचा प्रवाह चालला पाहिजे.भारतीय विचाराची ही धारणा आहे.हे तट जेवढे घट्ट,त्यांच्यावर होणारे अर्थ व काम यांचे आक्रमण जेवढे कमी तेवढी समाजाची धारणा जास्त मजबूत बनते.
 ९.११ अंकगणित शिकवताना अ च्या खिशात दहा रुपये होते त्यातले ब ने पाच हिसकावून घेतले तर किती शिल्लक राहतील असे उदाहरण देऊन चालणार नाही. कारण अशा प्रकारच्या उदाहरणांनी शिकवलेली वजाबाकी धर्माज्ञांची,मूळ मूल्यांची वजावट शिकवील.अंकगणितात मिश्रण, प्रमाण,गुणोत्तर शिकवताना भेसळ कशी करावी हे शिकवून चालणार नाही.धर्माची लवचीक पण दृढ, महाजनांच्या आचरणावर आधारलेली व्याख्या परिवर्तनशील व नित्यनूतन राहणारी ठेवणे हा भारतीय विचारपद्धतीचा कणा आहे.
 ९.१२ आपल्यापैकी प्रत्येक व्यवस्थापकाला महाजनपद मिळवायचे आहे.कारण व्यवस्थापकाचा मोठ्या मानवसमूहाशी संबंध येत असतो, तेव्हा त्यांची वागणूक ही लोकांना आदर्श ठरू शकते.



 १०.०१ व्यवस्थापकांनी महाजन बनण्याचे ध्येय समोर ठेवले तर व्यवस्थापनाचे प्रश्न सोपे होतात. विनोबांनी समाजाच्या घटनेसाठी पंच-जन-शक्तीचे महत्त्व सांगितले आहे.त्यांनी समाजातल्या या पाच प्रकारच्या लोकांची गणना अशी केली आहे.
 "आपल्या हाताची बोटे पाच असतात.तशा समाजातल्या या पाच शक्ती आहेत.पहिली शक्ती ही अंगठ्यासारखी.अंगठा हे सर्वात मजबूत बोट असते.त्याला मी जन-शक्ती म्हणतो.सत्य व अहिंसा यांच्या पायावर या जनशक्तीला मी उभी करू इच्छितो.दुसरी आहे मनाची प्रेरणा देणारी शक्ती.तिला मी करंगळीची उपमा देऊ इच्छितो.ती असते सज्जन लोकांची शक्ती.साध्या भाषेत त्याला सेवकांची किंवा सज्जनांची शक्ती म्हण.नैतिक धर्मनियमांच्या आधारावर जीवन घालवणाऱ्यांची शक्ती,सतत कार्यरत राहणाऱ्यांची शक्ती.तिसरी दिशा दाखवणाऱ्या मार्गदर्शन करणाऱ्या बोटाच्या जागी मी विद्वान लोकाच्या विद्वज्जनशक्तीची कल्पना करतो.जगात चांगले काय-वाईट काय याचा अभ्यास करून,तटस्थ वृत्तीने विचार करून लोकांसमोर आपले विचार मांडणाऱ्या या लोकांचे कार्य या निर्देशक बोटासारखे असते.मधले मोठे बोट असते ते महाजन शक्तीचे रूप होय.समाजातले धनिक,उद्योजक,व्यापारी,व्यवस्थापक हे या महाजनशक्तीचे रूप होय.इतर साऱ्या शक्तींचा परिपोष हे लोक करतात म्हणून तर त्यांना महा-जन असे म्हणतात.त्याशिवाय शेवटचे अनामिक बोट आहे.त्याला संस्कृतमध्ये अनामिकाच म्हणतात.खास असे त्याचे महत्त्व नसते.हे बोट बाकी चार बोटांना मदत करून त्यांची गुंफण करायचे काम साधते.लोक त्याच्यावर अंगठी चढवून त्याचा सन्मान करतात.विनोबांच्या मते शासनाचे,सरकारचे काम या बोटासारखे असते.स्वतःहून हे बोट काही करू शकत नाही.अनामिक असण्याचे कारण या शक्तीमध्ये किंवा बोटामध्ये स्वतःचे काम नसते.लोकशाहीत तर सरकार शून्यासारखे असते.त्याच्यामागे लोक उभे राहिले,लोकांचा एक या शून्याच्यामागे उभा राहिला की त्याची शक्ती दसपट होते.अन्यथा त्याचे महत्त्व शून्य,आजही,ज्या कामांमागे लोकांचा पाठिंबा नाही ती कामे शून्यवत् झालेली दिसतातच!
 १०.०२ व्यवस्थापनशास्त्रात या महाजनशक्तीचा विचार आपल्याला करायला हवा.समाजासमोरचा प्रश्न उपाशी मनांचा आहे.पाश्चात्य देशांच्या,विशेषतः इंग्रजांच्या संपर्कामुळे आम्ही इंग्रजी भाषा,इंग्रजी विचारपद्धत अशा इंग्रजी गोष्टी भारतात उचलल्या.पण सारे लोक ज्यामुळे जोडले जातात,त्यांच्या भावनांचा जिथे संबंध येतो ती धर्मकल्पना या साऱ्या इंग्रजीपासून वेगळीच राहिली.
 १०.०३ इंग्रजांच्या जीवनात ख्रिश्चन धर्मपंथाचे स्थान आहे,त्यांच्यावर ख्रिश्चन नैतिक शिक्षणाचे जे संस्कार आहेत ते आपल्यापैकी बहुतेक लोकांच्या मनावर नाहीत.बायबलचा जो परिणाम तेथल्या लोकांच्या मनावर आहे तो भारतातल्या बहुसंख्य शिक्षित लोकांमधील व्यवस्थापक,अधिकारी किंवा कामगार लोकांच्या मनावर नाही.इंग्रजी शिकल्यामुळे इंग्रजी शब्द समजले,भाषा समजली पण त्यामागचा जो सांस्कृतिक संदर्भ आहे,तो आमच्यापर्यंत पोचलेला नाही.भारतातील घराघरात जे येथले संस्कार होते, धार्मिक संस्कार होते,ते प्रतिगामी,वेडगळ,अंधश्रद्धेचे प्रतीक म्हणून इंग्रजीत शिकलेल्यांनी टाकून दिले. धर्म हा खासगी प्रश्न आहे,समाजजीवनात त्याची लुडबूड असू नये हाच विचार आपल्याकडे शिष्टमान्य आहे. सामाजिक जीवनातून त्याला हद्दपार करण्याचा पुरस्कार केला गेला आहे.
 १०.०५ इंग्रजीतून शिकलेल्यांना इंग्रजीतल्या 'ऑर्गनाइज्ड रिलिजन' या मर्यादित अर्थाने धर्माची लुडबूड नको असे म्हणायचे असते.आपल्याकडे धर्म ही व्यापक व जीवनव्यापी कल्पना आहे.तिचा अर्थ इथल्या समाजाचे मूल्यसंचित असा आहे.त्या अर्थाने धर्माला बाजूला ठेवून वा वगळून आपण सामाजिक विचार करू शकणार नाही.एवढी वैचारिक स्पष्टता नसल्याने आणि मने आत्मविस्मृतीच्या रोगाने ग्रासलेली असल्याने धर्मालाच सार्वजनिक व्यवहारातून वळ करण्यात आले आहे.सदाचरणाचे.सन्मार्गाचे संस्कार नष्ट करून आपण पोकळी निर्माण करत आहोत आणि केवळ वासनांना मोकळे रान सोडत आहोत. बुद्धीवरचा मनाचा अंकुश काढून टाकला जात आहे परिणामी येनकेनप्रकारेण उपभोग, चंगळ,वासना, लालसा यांची अधिकाधिक सोय यामागे लागून आधुनिक मानव मनाची शांती गमावून बसला आहे. वाढती व्यसनाधीनता, हिंसाचार, गुन्हेगारी या साऱ्यांना अंकुश लावण्याचा प्रयत्न सरकार या कमकुवत बोटासारख्या संस्थेमार्फत व्हावा अशी आशा त्याला आहे.
 १०.०६ स्वामी विवेकानंदांनी हा पेच सुरेख शब्दांत मांडला आहे.ते म्हणतात, प्रत्येकासमोर दोन पर्याय असतात. आहे ती स्थिती सत्य धरून तिचे उदात्तीकरण करणे किंवा उदात्त स्थिती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करणे.(आयडियलाईज द रिअॅलिटी और रिअलाइज द आयडिअल).निर्णय माणसाने आपला आपण घ्यायचा आहे.आहे तेच उत्तम आहे म्हटले की काही करण्याची जरुरी नाही.कमी त्रासाचा हा मार्ग धरून उलट्यासुलट्या बौद्धिक व शाब्दिक कोलांट्या मारायला माणूस मोकळा होतो.
 १०.०७ भारतातल्या इंग्रजीतून विचार करणाऱ्यांनी, भारतीय मातीशी इमान राखणारे हे नाळेचे नाते नाकारलेले आहे.त्याच लोकांना समाजात बुद्धिमंत मानले जाते.समाजात त्यांचा वरचष्मा आहे.त्यांना मूळ मूल्यांचा शोध हा खुळा शोध वाटतो,ते प्रतिगामीपणाचे लक्षण वाटते.
 १०.०८ पहिला प्रश्न असा आहे, की ही मानसिक उडी मारायची आजच्या लोकांची तयारी आहे का? कारण ही उडी मारल्यावर मग आपल्या लक्षात येईल,की त्यांच्याजवळ तयार मसाला,तयार कल्पना फार थोड्या आहेत.व्यवस्थापक म्हणून प्रत्येकाला आपली प्रत्येक कृती मूळ मूल्यांच्या संदर्भात तपासावी लागेल.अनेक धक्के बसतील,बऱ्याच शिष्टमान्य कल्पना सोडाव्या लागतील-बदलाव्या लागतील, पुष्कळ नव्या वाटा सापडतील,त्यात पुष्कळ चुकाही होतील.प्रयोग करावे लागतील.या देशातल्या लोकांच्या लोकमानसाशी सुसंगत अशा आचारविचाराच्या पद्धती,प्रश्नांची त्यांची उकल आपल्यासमोर उभी राहील.बऱ्याच जुन्या रीतिरिवाजांचे नवनवे संदर्भ,नवे अर्थ सापडतील.अशीही शक्यता आहे की लोक काम का करतात,किंवा त्यांनी का करावे- कसे करावे याचे प्रेरणास्त्रोत सापडतील.हे काम सोपे नाही.त्यासाठी अमेरिकन मॅनेजमेंट किंवा जपानी मॅनेजमेंट असा रेडिमेड तयार मसाला किंवा झटपट परिणाम करणारे औषध मिळणार नाही.
 १०.०९ स्वतःपासून बदलाची सुरुवात करायची हा पहिला टप्पा.मनाचा तळ हा काळोखात असतो.तो खाली सोडून आपल्याला वर येणे आवश्यक आहे.हे जे अंतर्मन आहे ते पाश्चात्य विचाराप्रमाणे काळेकुट्टे आहे.ते शुद्ध आनंदाने व पवित्रतेने भरलेले आहे असा भारतीय विचार आहे.त्या अवस्थेला पोचेपर्यंत वाटेत खूप संकटे आहेत,अडथळे आहेत.विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत.वासना, लालसा यांच्या दऱ्याखोऱ्या पसरलेल्या आहेत,पण त्या टोकाला पूर्ण आनंद आहे.म्हणून स्वतःची ओळख हा पहिला टप्पा.
 १०.१० पुराणात एक गोष्ट आहे.हिरण्याक्ष नावाचा दैत्य मातला होता.तो कुणालाच आवरेना. सर्वजण त्रस्त झाले होते.त्याच्या दुष्टपणापासून वाचण्यासाठी,सर्व लोकांनी श्रीविष्णूचा धावा केला.विष्णू म्हणाले, मी या दैत्याचा समाचार घेतो.मृत्युलोकातल्या या दैत्याचे निदर्शालन करण्यासाठी त्यांनी वराहाचे रूप धारण केले आणि त्या दैत्याचा नाश केला.सर्व देव आनंदी झाले.पण मग पाहतात तो पृथ्वीवर आलेले विष्णू स्वर्गात परतलेच नाहीत.देव विचारात पडले.मग तपास करताना त्याना आढळले,की भगवान विष्णूंनी वराहरूप धारण केले,एवढेच नव्हे तर वराह म्हणून ते भूतलावर गटारात लोळत कुटुंबकबिला बाळगून बसले आहेत.त्यांना त्यांच्या विष्णुत्वाचाच विसर पडला आहे.पुन्हा देव चिंतेत पडले.त्यांनी भगवान शंकरांकडे धाव घेतली.भगवान शंकरानी वराहरूपातल्या विष्णूंना पाहिले,त्यांना स्वर्गात परत येण्याची विनंती केली,पण ते बधेनात.सर्व उपाय हरल्यानंतर त्यांनी बाणाने वराहरूपातल्या विष्णूंचा वध केला व त्याचे संपूर्ण शरीर छेदले.त्या कलेवरातले मूळ स्वरूपातले - विष्णुरूपातले-विष्णुभगवान स्वर्गलोकी रवाना झाले.कथेचा इत्यर्थ इतकाच की भारतीय कल्पनेप्रमाणे माणसाचे वरवरचे रूप हे त्याचे वराहरूप असते.ते सुखोपभोग,वासना,लालसा यांच्या गर्तेत लोळण्यात,प्रेयाच्या कैफात जीवन व्यतीत करण्यात आनंद मानते.त्याच माणसाच्या अंतरातले विष्णुरूप हे उच्च प्रतीचे असते.ते स्वयंप्रकाशी आहे.त्याची आठवण ठेवून,त्याला जागवत ठेवून,त्याला सतत श्रेयाची आठवण करून देत माणूस स्वतःचे व स्वतःबरोबरच्या लोकांचे उन्नयन करू शकतो.
 १०.११ व्यवस्थापकांत ही जाणीव निर्माण करणे व त्यासाठी क्रांतिकारक बदल घडवण्याची सुरुवात स्वतःपासून करणे ही भारतीयत्वाची खूण राहील.पाश्चात्य मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात मनोरुग्णांच्या अभ्यासापासून झाली आहे.त्यामुळे माणसाचे निरोगी रूप हा पाया न राहता मनाची रोगी स्थिती प्राथमिक बनून त्यावर चिकित्सेची व सिद्धांतांची उभारणी झाली आहे.
 १०.१२ माणूस मुळात आनंदरूप आहे.त्याच्या आत्म्यावरची बाह्य आवरणे,देहभाव,जडकोष ही पांघरुणे आहेत.ती प्रयत्नांनी दूर केली, बाजूला सारली तर माणूस आनंदरूपदर्शन अनुभवू शकतो. पाश्चात्य विचारात माणूस त्याच्या मूळ पापामुळे (ओरिजिनल सिन) पृथ्वीवर फेकला गेलेला आहे.त्याचे मूळ पापात आहे अशी कल्पना आहे.ह्या संपूर्णपणे भिन्न व विरुद्ध अशा संकल्पना आहेत.
 १०.१३ त्यांच्याकडच्या मोरॅलिटीच्या, सामाजिक मूल्यांच्या किंवा रिलिजनच्या प्रचलित कल्पना त्यांच्या इहवादात अडथळ्याच्या ठरतात.म्हणून त्यांचा स्पष्ट उल्लेख व्यवस्थापनशास्त्रातल्या त्यांच्या पुस्तकात नसतो,पण तेथील विचारक त्यामागची मूल्यव्यवस्था गृहीत धरत असतात.भारतीय मूल्यविचार धर्म या कल्पनेत वसलेला आहे.तो वगळून व्यवस्थापनाचा विचार करता येणार नाही.धर्म या शब्दात भारतीय संदर्भात खूप मोठी शक्ती आहे.तिचा योग्य वापर भारतीय व्यवस्थापनव्यवहारात करून घेता येण्यासारखा आहे.
 १०.१४ नारदीय कीर्तनातील पूर्वरंग इथे संपला.पुढचे अध्याय हे उत्तररंगाचे आहेत.


 ११.०१ पूर्वरंगात केलेल्या तात्त्विक चर्चेनंतर,मी माझ्या व्यवस्थापकीय जीवनात केलेले प्रयोग व उपयोग काही उदाहरणांनी यापुढच्या उत्तररंगाच्या अध्यायांत स्पष्ट करणार आहे.त्यासाठी माझी वैयक्तिक पार्श्वभूमी प्रथम लिहीत आहे.मी औषध बनवणाऱ्या एका कारखान्यात कंपनी सेक्रेटरी म्हणून १९६४ साली कामाला सुरुवात केली.त्यापूर्वी माध्यमिक शिक्षक, कारकून व प्राध्यापक अशा नोकऱ्या केल्या होत्या.त्यामुळे बऱ्यापैकी लोकसंपर्क होता.विशेष म्हणजे १९५३ ते १९६३ हा महाविद्यालयीन व पुढचा काळ मुंबई या महानगरात गेला.तो काळ पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांचा होता.स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या त्या कालखंडात सर्वत्र उत्साहाचे,देशाच्या औद्योगिक पायाभरणीचे वातावरण होते.हवेत समाजवाद,मुख्य म्हणजे केंद्र सरकारच्या हातात सर्व आर्थिक नियोजन,चे वातावरण होते.आर्थिक नियोजन दिल्लीहून होणार अशी हवा होती.त्या काळात कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वाचला.जॉर्ज ऑर्वेलच्या 'अॅनिमल फार्म' व '१९८४' या कादंबऱ्या महाविद्यालयीन अभ्यासात क्रमिक पुस्तके म्हणून वाचलेल्या होत्या.
 ११.०२ शाळेत असतानाच मुंज झालेली होती.संस्कृत शिकलो नव्हतो,त्यामुळे अजूनही मूळ संस्कृत गोष्टी इंग्रजीत लवकर समजतात.पण वडिलांनी थोडेफार पाठांतर करून घेतले होते.अधिक योग्य शब्द म्हणजे 'म्हटले होते.सुट्टीत वडील थोडेफार ते घटवायचा प्रयत्न करत.कारण आमचा पिढीजात भिक्षुकी वृत्तीचा म्हणजे उपजीविका मिळवण्याचा तो मार्ग होता.पण त्यात माझी प्रगती झाली नाही. इंग्रजी शिक्षण जास्त झाले.रोजचे वर्तमानपत्र सातव्या वर्षापासून वाचत असे.रोजचे वर्तमानपत्र म्हणजे अर्थात केसरी, प्रथम साप्ताहिक व नंतर द्विसाप्ताहिक.राजापूरला शाळेत आल्यावर नवशक्ती,बलवंत वगैरे वाचत असे.म्हणजे राजापूरच्या गुजरआळीतल्या दातार छापखान्यात जवळ जवळ फुकट वाचायला मिळेल तेवढे.त्यात मग त्यांना प्रुफ करेक्शनला आणि ट्रेडल मशीन चालवण्याला व कटिंग मशीनला खेचण्याची मदत करत असे.काम केल्याशिवाय खायला मिळणार नाही ही समज राजापुरातून एसेस्सी होण्यापूर्वीच पक्की झालेली होती.माझे मी माझ्या पायावर उभे राहायला हवे ही समज पक्की होती. मला लोकांनी नोकरी द्यावी किंवा काम द्यावे,किंवा समाजाने माझा विचार करावा ही कल्पना माझ्या मनात नव्हती.मी समाजाचे देणे लागतो,समाज माझे देणे लागत नाही हे स्पष्ट होते.
 ११.०३ मी नोकरी करण्यासाठी,पोटापाण्याच्या उद्योगासाठी १९५३ साली मुंबईस आलो.वडील भावाच्या वेड्या वाटण्यासारख्या धाडसामुळे व मेहेरबानीमुळे सरकारी सिडनहॅम कॉलेजात दाखल झालो होतो.त्याच्यामुळेच 'सत्यकथा' वाचायला लागलो होतो.ठाकुरद्वारच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात बऱ्याच कथा-कादंबऱ्यांची पुस्तके वाचली.
 ११.०४ राजापूर या रत्नागिरी जिल्ह्यातल्या छोट्या शहरातून आलेला असल्याने स्वतःला सर्व काही समजते ही नैसर्गिक गाठ मनाशी पक्की होती.त्यामुळे वादविवादात निबंधलेखनात भाग घेणे, भाषणे करणे ह्या गोष्टी शाळेपासनच घटवल्या होत्या.राजकारणात भाग घ्यायचे व पुढारी व्हायचेही मनात होते.शाळेत असतानाच कॉमर्स विभागाचे वेगळे समांतर गॅदरिंग करणे,सेक्रेटरी होणे वगैरे उपद्व्याप केले होते.तो अनुभव पदरी होता,त्याचा कॉलेजच्या मराठी मंडळाचा सेक्रेटरी होण्यासाठी उपयोग झाला. निवडणुकीचाही अनुभव मिळाला व माझ्या निवडून येण्याच्या क्षमतेची मर्यादा जाणवली.मुंबईत आल्यावर या साऱ्या पक्क्या गृहीतकांना धक्के बसायला सुरुवात झाली.
 ११.०५ कॉलेज संपल्यानंतर लगेच दीड वर्षे शिक्षक होतो.नंतर लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये कारकून झालो. ती नोकरी मुंदडा प्रकरणानंतरची होती.जीवन विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर हरिदास मुंदडा या गृहस्थांनी बनावट शेअर सर्टिफिकिटे कॉपोरेशनला विकली.त्यांतून झालेला घोटाळा बाहेर आल्यानंतरच्या काळात त्या कॉपोरेशनमध्ये निरनिराळ्या कंपन्यांच्या ताळेबंद पत्रकांची छाननी करून त्यांचे कागद तयार करण्याचे काम आमच्या खात्यात चालत असे.त्यासाठी भरती झालेल्यांत मी एक होतो. म्हणजेच राष्ट्रीयीकरणाने माझी नोकरी निर्माण झाली होती.तिथे सरकारी आस्थापने कामे कशी करतात ते समजले.तिथे मी मराठी वाङमय मंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न केला.वरिष्ठ अधिकाऱ्यांना परवानगी विचारायला गेलो,तर त्यांना युनियन स्थापन करण्याचा हा छुपा प्रयत्न असावा असा संशय आला असावा.त्यांनी परवानगी नाकारली.पुढे त्याच कॉर्पोरेशनच्या उच्चाधिकाऱ्यांच्याही युनियन्स झाल्या,पण ती नंतरची गोष्ट.त्या साऱ्यांनी यथावकाश संप वगैरेही केले.पण मी ही १९५९-६० सालची गोष्ट सांगत आहे.माझ्या दृष्टीने,शाळेतले समांतर गॅदरिंग, कॉलेजमधले मराठी-गुजराती मंडळ ह्याचीच नोकरीच्या ठिकाणी मराठी मंडळ स्थापन करणे ही पुढची पायरी होती.युनियनबाजीचा उगाच आरोप मात्र झाला.पुढे मी ती नोकरी सोडली.
 ११.०६ त्यानंतर मी सिडनहॅम कॉलेजात शिकवायची नोकरी पकडली.तिथे पाच वर्षे खूप आनंदात काढल्यावर, पगारात भागत नाही म्हणून,खासगी क्षेत्रात नोकरीचा विचार सुरू केला.तेव्हाच सरकारी महाविद्यालयांतल्या प्राध्यापकांची म्हणजे सनदी राजपत्रित अधिकाऱ्यांची अनौपचारिक संघटना होऊ घातली होती.तेव्हाची कल्पना अशी होती,की सर्वांनी,वैयक्तिक रीत्या पगार वाढवून मिळावा अशी छापील मागणी करायची होती.सामूहिक मागणी म्हणजे बंडाचा प्रकार (म्युटिनी) मानला गेला असता. त्यात मीही सही केल्याचे आठवते.सरकारी नोकरांच्या युनियन्स,त्यांचे संप हे प्रकार सुरू झाले,पण ते १९६४ सालानंतर.मी सिडनहॅममधली नोकरी सोडून युनिकेम.या खासगी क्षेत्रातल्या कंपनीच्या औषध कारखान्यात १९६४ साली कामाला सुरुवात केली.सारांश असा, की नोकरीत अनेक वर्षे राहूनही मी कधी युनियनचा सभासद झालो नाही.तेव्हा कामगार म्हणून काय मनोभूमिका असते त्याचा मला वैयक्तिक अनुभव नाही.
 ११.०७ मी युनिकेम कंपनीचा सर्वोच्च श्रेणीतला अधिकारी १९६४ सालापासून झालो व आपोआप 'मॅनेजमेंटचा कुत्रा' वगैरे झालो.सतत 'आहे रे' वाल्यांच्या बाजूला राहिलो,एस्टॅब्लिशमेंटचा प्रतिनिधी म्हणून काम केले.त्यामुळे मी युनियनच्या दृष्टीने सुरुवातीच्या काळात प्रतिगामी होतो.ती स्थिती तिथून पुढे तीस वर्षे तशीच राहिली.त्यानंतर कंपनीचा संचालक म्हणून झाल्यामुळे चक्क भांडवलदार झालो! पण सध्या,हे सगळे शब्द,मालक-मजूर संबंधांतून जवळ जवळ नाहीसे झाले आहेत.'युनिकेम'मध्येसुद्धा कंपनी सेक्रेटरी, फायनॅन्शीयल कंट्रोलर,पर्योनेल खात्याचा अलिखित प्रमुख म्हणून माणसांच्या निरनिराळ्या समूहांशी काम करण्याचा अनुभव आला.खूप शिकायला मिळाले.संस्थापक चेअरमन पद्मभूषण अमृत विठ्ठलदास मोदी यांच्यामुळे सतत वाचता राहिलो.सतत शिकत राहिलो.कंपनीचा प्रतिनिधी म्हणून सुप्रीम कोर्टापर्यंतची सर्व कोर्ट,सरकारी समित्या,कारखानदारांच्या संघटना,सरकारी कायद्यांना आव्हान देणारा अर्जदार,पब्लिक इंटरेस्टच्या नावावर आंतर्राष्ट्रीय फंडांवर जगणाऱ्या संस्था यांच्याशी झगड़े करण्याचा अनुभव मिळाला.या साऱ्या कामांमुळे सतत नवीन विचार करावा लागला.अनेक लोकांची खरी ओळख पटण्याचा अनुभव गाठीशी लागला.मी सदैव सरव्यवस्थापक म्हणूनच वावरलो.माझा कंपनीतला हुद्दा पहिल्यापासून शेवटपर्यंत कंपनी सेक्रेटरी असाच राहिला.हुद्दा आणि प्रत्यक्ष काम यांचा बऱ्याच वेळा दूरान्वयानेही संबंध नसतो हे वैयक्तिक पातळीवर अनुभवले.
 ११.०८ हजार बाराशे माणसांशी रोजचा वैयक्तिक संपर्क,दोन ठिकाणच्या कारखान्यातले व देशभर पसरलेले तीनशे विक्रीप्रतिनिधी असा साधारण दीड हजार माणसांच्या मालक-मजूर संबंधित प्रश्नांशी संबंध आला.त्यांत संप,मंद काम,मारामाऱ्या,धमक्या,युनियन्समधली सुंदोपसुंदी हे सारे अनुभवले.केमिस्ट व व्यापारी लोक यांच्या युनियन्स व त्यांतले ताणतणाव पाहायला मिळाले.जवळजवळ दीडशे मॅनेजर्सची वागण्याची पद्धत,आंतरिक संबंध,ताणतणाव अनुभवायला मिळाले.
 ११.०९ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, सरकारमधले निरनिराळ्या पातळीवरचे प्रतिनिधी,मंत्री-त्यांचे भगत व अडत्ये,सार्वजनिक सेवाभावी संस्थांमधले कार्यकर्ते,पगारी कामगार,ट्रस्टी अशी निरनिराळ्या थरांतली माणसे पाहायला मिळाली.दसऱ्या कंपन्यांतले अधिकारी व त्यांच्या वागणुकीचे नमुनेही पाहायला मिळाले.
 ११.१० सारांश १९५० पासून २००७ सालापर्यंत सतत सत्तावन वर्षे माणसे,माणसांची वागणूक, माणसामाणसांमधले संबंध यांचा भरपूर अनुभव गाठीशी आला.वृत्तपत्रे,मासिके,पुस्तके वाचतच होतो. १९५१ सालापासून विनोबांविषयी वाचत होतो.त्यांच्या भूदानाच्या चळवळीमुळे मार्क्सच्या पोथीत अडकलो नाही.विनोबांच्या वाङमयावर विचारपोषण झाले.कोणीच 'नाही रे' (हॅव-नॉट) नसतो हे समजले व पटले.माझा प्रत्यक्ष अनुभव वर्गविग्रहाचा नव्हताच.अखेर,तुमची अनुभूती ही वैयक्तिक असते.वर्ग,वर्ण, जात,धर्म,समाज,राज्य या साऱ्या परोक्ष किंवा अनुमानाच्या गोष्टी असतात.प्रादेशिक मराठी ललित साहित्यातून आजुबाजूच्या जगाचे ज्ञान होत होते. प्रा. शि. ल. खोतांच्या गुरुमंत्राप्रमाणे ललित साहित्यात 'फक्त आत्मचरित्रे वाच,ती ललित साहित्यापेक्षा जास्त खरी असतात' हे पण पाहिले.सुदैवाने,आत्मचरित्रे विकत घेण्याची ऐपत होती.म्हणून ग्रंथसंग्रहही झाला.
 ११.११ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार थोडाफार राजापूरच्या संघस्थानावरचा,शाळेत असतानाचा.त्यानंतर एकदम नोकरीच्या काळात संघपरिवारातल्या समाजसेवी स्वयंसेवी संस्थांचा परिचय १९७० नंतरचा.त्याशिवाय समाजवादी व खास करून सर्वोदयी स्वयंसेवी संस्थांचा परिचयही त्याच काळातला.हे सारे संपर्क कंपनीतल्या अधिकारस्थानामुळे,देणगी देण्याच्या क्षमतेमधून झालेले.संघाकडे ओढा जास्त होता.
 ११.१२ बाँड रसेलचे 'पॉवर' हे पुस्तक परिणाम करून गेले.बऱ्याचशा सामाजिक गोष्टी समजल्या त्या त्यामुळे.मानवी संबंधांसंबधीचे ते एक अजब पुस्तक आहे.दोनपेक्षा जास्त माणसे जिथे एकत्र येतात तिथे सत्तालालसेचा प्रश्न अपरिहार्यपणे येतो.त्यामुळे आयुष्यातल्या बऱ्याच अनुभवांचा अर्थ लागला.दुसरी पुस्तके एडवर्ड डी बोनोची.त्यांनी तर माझ्या विचार करण्याच्या पद्धतीची पाळेमुळेच हादरवली.तार्किक पद्धतीने विचार करणे ही विचार करण्याची एक पद्धत आहे.ती एकमेव नव्हे,हे फार जाणवले.१९७४ साली सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंगचा एका आठवड्याचा अभ्यासवर्गही असाच ध्यानांत राहणारा ठरला.
 ११.१३ १९६६ ते १९९० अशी तेवीस वर्षे 'युनिकेम'चे हाउस बुलेटिन चालवले एक प्रकारे विचारप्रसाराचा हा दीर्घकालीन प्रयत्न होता.कामगारांनी कसा विचार करावा हे सांगत राहिलो,पण माझाच विचार माना असे चुकूनही म्हटले नाही.माझे म्हणणे योग्य आहे हे जरूर म्हटले पण माझेच म्हणणे बरोबर आहे असा आग्रह धरला नाही.कृतीचे स्वातंत्र्य वाचकांवर सोडले होते.त्यामुळे मोकळा राहिलो, लिहिता राहिलो.त्यामुळे विचार करायची,विचार मांडायची सवय राहिली.व्याख्यानेही बरीच दिली.दरवेळी पूर्वतयारीशिवाय व समोरच्या श्रोत्यांकडे पाहून बोलताबोलतानाच विचार करायची सवय लागून गेली. श्रोत्यांकडे पाहून बोलल्यामुळे श्रोत्यांच्या प्रतिसादातून सतत शिकत आलो.
 ११.१४ पहिल्यापासून काही वाचले किंवा ऐकले की आपल्या अनुभवाशी ते पडताळून पाहायचे आणि पटले तर स्वीकारायचे ही पद्धत राखली.हा ज्ञानसंपादनाचा मुख्य मार्ग आहे.सारखा पुनर्विचार करत राहिलो.त्यामुळे नित्यनूतनत्व राखणे सहज सोपे गेले.विनोबांच्या अप्रतिहत तर्कशक्तीने तर अजूनही भारायला होते.बर्नार्ड शॉ हाही एक घटक त्यात होताच.प्रा. अ.भि.शहांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी मनुस्मृती जाळली.त्यामुळे मी प्रथम मी मनुस्मृतीचा संस्कृत-मराठी अनुवाद वाचला.संस्कृत शिकलेला नसल्याने इंग्रजी भाषांतर (१८८४ सालचे) वाचले.भिक्षुकीच्या परंपरेने पढिक संस्कृत तसे रक्तात भिनलेले आहे.पण शास्त्रकाट्याच्या तराजूत तपासलेले नव्हे.संस्कृतवरचे प्रेम आतले,पण अभ्यास नाही.
 ११.१५ अमेरिकन मॅनेजमेंटची अनेक पुस्तके,मासिके,सेमिनार,अभ्यासवर्ग झाले.काही मी स्वतः ही घेतले.पण अमेरिकेतल्या स्थितीविषयी मला प्रत्यक्ष अनुभव नाही.माझ्या या लिखाणाला या साऱ्यांचा आधार आहे,पण जेवढे पचले तेवढेच लिहायचे असा दंडक माझा मी हे लिहिताना घालून घेतलेला आहे.
 ११.१५ मी समता हे मूल्य मानवी संबंधांत महत्त्वाचे मानतो.ते मला पुस्तकांनी शिकवलेले नाही.ते मी राजापूरच्या मातीतून घेतलेले आहे.पुस्तकांनी त्याला उजाळा दिला.त्या लाल मातीइतकेच ते मला चिकटलेले आहे.त्यामुळे कुणाही मोठ्या माणसाशी बोलताना मला कधी अडचण वाटली नाही, दबाव वाटला नाही.मीही कधी माझ्याबद्दल दबदबा वाटावा असे वागलो नाही.सगळ्यांशी बरोबरीच्या पातळीवर वागत आलो.आजही जेव्हा मी माझ्या देवाच्या गोठण्याच्या घरी जातो तेव्हा माझ्या साऱ्या उपाधी गळून पडतात.खरे तर,तिथे मी फक्त पहिली सोळा वर्षे होतो.पुढचे सारे आयुष्य मुंबईच्या महानगरीत गेले.पण गावच्या लोकांच्या दृष्टीने मी अजूनही नाना उपाध्यांचा आणि अन्नपूर्णावहिनींचा मुलगा वसंताच आहे.तिथल्या लोकांच्या मनात मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे,शिकलेला आहे,बऱ्या परिस्थितीतला आहे याचा कोणताही संस्कार नसतो.त्यामुळे तिथे राहताना मी मोकळेपणाने राहू शकतो.मी तेथे मालक नसतो किंवा मजूर नसतो.हॉटेलमधले गि-हाईकही नसतो.मी फक्त मी असतो.समाजव्यवहारातली ही समानता मी माझ्या गावातल्या मातीतून मिळवलेली आहे.मी तीच जीवनश्रद्धा टिकवून आहे.
 ११.१६ ज्ञानी माणसांपुढे,वडिलधाऱ्यांसमोर किंवा साध्यासुध्या निरलस कार्यकर्त्यासमोर वाकायला मला संकोच वाटलेला नाही.पण बाकी कुणासमोर वाकणे मला कठीण जाते.त्यामुळे वैयक्तिक नुकसानही करून घेतले आहे.बरोबरीच्या,समानतेच्या नात्याने व पातळीवरून काम करायची किमया मी साध्य केली आहे असे मला वाटते.ही गोष्ट फार थोड्यांना साधते हेही मी पाहिले आहे.  ११.१७ राजापूरच्या मातीतल्या समानतेच्या गुणामुळे कुठल्याही गोष्टीमुळे किंवा व्यक्तीमुळे मी फारसा कधी भारावून गेल्याचे आठवत नाही.मी मोठ्यामोठ्यांचे मातीचे पाय पाहिले आहेत.मी 'सिनिक' होण्याचे मात्र टाळत आलो आहे.कारण एकदा हा सिनिसिझम अंगात शिरला की मग कोणतेही उत्पादक काम माणसाच्या हातून होत नाही. त्याच्या साऱ्या वागणुकीला अकर्तृत्वाचा कुबट वास येऊ लागतो. राजकारणातल्या अनेक लोकांचे हे अनुत्पादकत्व मला नेहमी खटकते.महाराष्ट्रातल्या अनेक बुद्धिमंतांचा, लेखकांचा,विचारवंतांचा अनुत्पादकपणा माझ्या मनात खंत निर्माण करतो.त्यांतल्या बऱ्याच जणांचे लेखन मला वांझोटे थयथयाट वाटतात.कारखाने काढून उत्पादन करणारा,वाढवणारा कमी महत्त्वाचा ठरतो आणि त्यांना संपावर नेऊन वाऱ्यावर सोडणारा हिरो होतो,ही माझ्या दृष्टीने मोठी चूक वाटते.
 ११.१८ नेणत्या कर्मनिष्ठांचा बुद्धिभेद करू नये हे मला मनोमन पटलेले आहे.जिथे मतभेद झाले तिथे मी संस्था सोडली,पण त्या संस्थेविरुद्ध बोललो नाही.कोणतीही विरुध्द अनुत्पादक चाल केली नाही. सदैव उत्पादनसमर्थक राहिलो.'मॅनेजमेंटचा कुत्रा' हे दूषण मानले नाही.मॅनेजमेंटही उत्पादनप्रवण राहील हे पाहिले.जेव्हा तिथला रंग बदलला तेव्हा संस्था सोडून,वानप्रस्थाश्रमात जाऊन स्वयंप्रेरणेने स्वेच्छानिवृत्ती घेतली.
 ११.१९ भाकरी निर्माण करण्याचे प्रयत्न मला मोलाचे वाटतात.समानता हवी,न्याय्य वाटणी व्हावी,कारण आपण सारे एकाच सूत्राने जोडले गेलेले आहोत.हे गृहीतक सामाजिक दृष्ट्या मोलाचे असते,पण ते भाकरी निर्माण झाल्यावर हा माझ्या चिंतनाचा विषय आहे.अनेक माणसांशी संबंध आल्यामुळे संघर्षापेक्षा वाटाघाटींमुळे,तोडग्यांमुळे वेगवेगळ्या पैलूंचा विचार सहज होऊन गेला.
 ११.२० ज्याला काम नाही त्याला किंमत नाही हे सत्य मला मनोमन पटलेले आहे.व्यक्तीचे काम त्या व्यक्तीचे सामाजिक मोल ठरवत असते.मी जगावे किंवा जेवावे ही माझी गरज आहे,समाजाची नव्हे.ती माझी जबाबदारी आहे, समाजाची नव्हे.मी समाजाचा ऋणी आहे,समाज माझे देणे लागत नाही, समाजाला माझी गरज नाही,मला माझ्या जगण्यासाठी समाजाची गरज आहे हे मला पटलेले आहे.
 ११.२१ अनेक लोकांना नोकरी हवी असते पण काम हवे असतेच असे नाही.भारतातल्या शहरी समाजात सतत नोकऱ्यांची किंवा जॉबची वार्ता होते,कामाची होत नाही.काम करणारे बेकार राहत नाहीत.नोकऱ्यांचा दुष्काळ आहे,कामाचा दुष्काळ अजिबात नाही हे मला स्पष्ट दिसते.हा माझ्या आयुष्यभराच्या अनुभवाचा सारांश आहे.
 ११.२२ या समानतेच्या भावनेवर,आपण एकाच शरीराचे अवयव आहोत या भावनेची भारतीय तत्त्वज्ञानाच्या मूळ सूत्रांशी गाठ बांधलेली आहे.बदल माझ्यापासून सुरू व्हायला हवा.मी बदललो की आम्ही आपोआप बदलू.म्हणूनच मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माणसांना जोडून संघटना बांधण्याच्या व राष्ट्रीय दानतसंपन्न नागरिक घडवण्याच्या प्रयत्नांचे आकर्षण आहे.भारतीय समाजात रक्ताच्या किंवा लग्नाच्या नात्याबाहेरच्या माणसांची संघटना,कुटुंबाबाहेरच्या माणसांची संघटना,जातीपलीकडची संघटना हा विचार नवीन आयात केलेला आहे.म्हणूनच परदेशस्थ भारतीयांना तो ओळखीचा वाटतो.ह्याकडे फारसे कोणाचे लक्ष गेलेले नाही.संघाने पचवलेला हा पाश्चात्य विचार आहे.
 ११.२३ भारतातले सध्याचे राजकीय पक्ष,संघटना, युनियन्स,कंपन्या,स्वयंसेवी संस्था,ह्या साऱ्या पाश्चात्य कल्पनांची कलेवरे आहेत.त्यांच्या घटना आहेत,पदाधिकारी आहेत,हिशोब आहेत,ऑडिट्स आहेत, मिनिटबुके आहेत.पण ती सारी वरवरची व्यवधाने आहेत.त्यांच्यातला सत्ताव्यवहार हा मात्र हिंदू एकत्र कुटुंबासारखा असतो.त्या संघटना नाहीत.अजूनही सत्तासंबंध जन्माने ठरतात.संघटनेचे प्राणतत्त्व अजूनही व्यक्ती आणि तिचे कुटुंब यांतच गुरफटलेले दिसते.संघटनेतली पदांची प्राणप्रतिष्ठा आम्ही शिकलेलो नाही.ते महत्त्व आमच्या भारतीय मुशीत ओतले गेलेले नाही.त्यासंबंधींच्या विचारांना चालना मिळावी हाही या लेखनाचा हेतू आहे.
 ११.२४ ही वैयक्तिक पार्श्वभूमी विस्ताराने लिहिण्याचा हेतू हा आहे,की येथून पुढे लिहिलेले अनुभव हे एका व्यक्तीचे अनुभव व प्रयत्न आहेत.त्याला पूर्ण भारतीय वळण आहे.पहिल्या दहा प्रकरणांत लिहिलेल्या सिद्धांतावर किंवा पूर्वरंगावर आधारलेला हा उत्तररंग आहे.शक्य तितकी स्वानुभवाची उदाहरणे द्यायची.वाचलेली किंवा ऐकलेली उदाहरणे शक्य तितकी टाळायची.'एक तरी ओवी अनुभवावी' हा ध्यास धरून मला आलेल्या अनुभवांचा मी लावलेला अन्वयार्थ हा या उत्तररंगाचा आधार आहे.

सत्याचे अनुभव



 १२.०१ व्यक्तीच्या जीवनात 'श्वासा'चे जे महत्त्व आहे ते सामाजिक जीवनात 'विश्वासा'ला आहे. विश्वासाशिवाय सामाजिक व्यवहार अशक्य आहे.व्यापार-व्यवहारात व उद्योगात याला खूप महत्त्व दिले जाते.व्यक्ती बोलते,शब्द देते, आश्वासन देते. त्यावर लोकांचा विश्वास बसतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.थापा मारणे, वेळ मारून नेणे,शब्दांत न सापडणे,मोघम बोलणे, यातच धंद्याची गुरुकिल्ली आहे असे मानणारे बरेच लोक आढळतात.खोटे बोलणे व्यवहारात आवश्यक असते असे मानणारे लोकही असतात.विक्रयकला, व्यवस्थापन, राजकारण यांत खोटे बोलणे हे क्षम्य असते असे मानण्याचीसुद्धा पद्धत आहे.
 १२.०२ पण हे खरे आहे का? दूरदृष्टीच्या आणि दीर्घकाल यशस्वी ठरलेल्या धंदेवाईक माणसाला हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर तो हे खोटे आहे असेच सांगेल.एखाद्या माणसाला,एखाद्या वेळी,भूलथापा मारून,खोटे बोलून एखादा सौदा किंवा व्यवहार फायद्याचा,अगदी घसघशीत फायद्याचा करणे जमेल.पण अशा एखाददुसऱ्या सौद्यावर किंवा व्यवहारावर धंद्याचे दीर्घकालीन धोरण ठरवता येत नाही किंवा गणित बांधता येत नाही.धंदा करणे,दुकान चालवणे,कारखाना चालवणे ही रोजच्या रोज सातत्याने दीर्घकाळ करायची गोष्ट असते.धंदा ही अनेक व्यवहारांची मालिका असते.  १२.०३ व्यक्तीवर लोक विश्वास केव्हा ठेवतात याचे उत्तर सोपे आहे.ती शब्द पाळत असेल तर!सांगितला जाईल तो माल,सांगितल्या वेळी,सांगितल्या किंमतीत,सातत्याने पुरवला गेला तरच लोकांचा विश्वास निर्माण होतो.माणूस खरा आहे की खोटा आहे हे अशिक्षित माणूसही आंतरिक प्रेरणेने ओळखतो.व्यक्तीचा खोटा मुखवटा केव्हा गळून पडतो हे व्यक्तीला कळतही नाही.खोटे हसणे,खोटी आश्वासने लोकांच्या सहज ध्यानात येतात.ती जन्मजात देणगी प्रत्येक माणसाला असते.
 १२.०४ मी माझ्या आयुष्यात या गोष्टीचा अनुभव अनेक वेळा घेतलेला आहे.सत्याचे पाय खंबीर असतात.ते आपल्या पायावर उभे राहते.खोटे बोलणाऱ्याला सतत सतर्क व सावध राहून,बोललेल्या गोष्टींचे स्मरण करत,तारेवरची कसरत करत जगावे लागते.त्यातून मानसिक ताण आपोआप निर्माण होत असतो.१९६५ सालची गोष्ट आहे.मी कंपनीत नवीनच कामाला लागलो होतो.कंपनीतल्या संपाला पस्तीस दिवस होऊन गेले होते.संप करणाऱ्या कामगारांना संपातली निरर्थकता हळुहळू ध्यानात येऊ लागली होती.लोक कामावर परतायला सुरुवात झाली होती.विष्णू म्हणून एक कामगार कामावर येण्यासाठी जोगेश्वरी स्टेशनवर उतरल्यावर त्याच्यापेक्षा दणकट व मुजोर अशा एका पुढारी कामगाराने त्याला अडवले.त्याने संप फोडणारा म्हणून त्याला दोन गुद्दे लगावून त्याचे तोंड फोडले.त्याचे दात पडून त्याचा चेहरा रक्तबंबाळ झाला हे मी पाहिलेले होते.तो तसाच कारखान्यात आला.काही दिवसांनी,कंपनीने त्या मार देणाऱ्या कामगाराला चार्जशीट दिला.मी त्यात चौकशी अधिकारी नेमला गेलो होतो.
 १२.०५ चौकशी सुरू झाल्यावर,मी विष्णूचे निवेदन रीतसर लिहून घेतले.मारणारा कामगार चौकशीच्या वेळी हजर होता.मी सारे जाबजबाब जसे सांगितले जात होते तसे माझ्या हस्ताक्षरात लिहून घेत होतो.बाकी सह्या वगैरे सारे सोपस्कार विधिवत् चालले होते.विष्णूने त्याच्या तोंडी जबानीत जशी तक्रार केली होती तशीच सर्व माहिती सांगितली.त्याला त्याच कामगाराने स्टेशनवर कशी थोबाडीत मारली,त्यामुळे दात ओठात घुसून रक्त कसे आले हे सारे सांगितले.विष्णू हा साधा व बावळट समजला जाणारा अशिक्षित कामगार होता.ज्याच्यावर चार्जशीट होती तो कामगार जास्त बळकट,तरणा,शिकलासवरलेला,पुढारीपणा व टगेगिरी करणारा म्हणून प्रसिद्ध होता.त्याच्या उलटतपासणीत विष्णूची सहज भंबेरी उडणार असे वातावरण होते.
 १२.०६ विष्णूने रक्त येईपर्यंत मार खाल्ला होता ही गोष्ट खरी होती,पण आरोपीने म्हणजे त्याच माणसाने त्याला मारले हे सिद्ध होणे आवश्यक होते.संपाचे वातावरण असल्याने दुसरा कोणी प्रत्यक्ष हजर असणारा साक्षीदार नव्हता.एकाच ठिकाणी काम करत असल्याने ओळख पटवण्याचा मुद्दा नव्हता.विष्णू खरे बोलत होता याबद्दल मला खात्री वाटत होती.विष्णूची बौद्धिक क्षमता गोष्ट रचून सांगण्याएवढी नव्हती.पण उलटतपासणीत तो कसा टिकाव धरील याबद्दल माझ्याही मनात शंका होती.आरोपी कामगाराला तर विष्णू कस्पटाप्रमाणे वाटत होता.त्याचा आविर्भावही तसाच होता.विष्णूला सत्याशिवाय कसलाच आधार नव्हता.
 १२.०७ आरोपी कामगाराने विष्णूची उलटतपासणी सुरू केली.त्यांचा जो संवाद चालला होता तसा तो मी लिहून घेत होतो.माझ्या यथामूल लिहिण्याच्याबद्दल कोणाचीही तक्रार नव्हती,कारण अशाच आणखी पस्तीस जणांच्या इतर चौकश्या मी चालवत होतो.युनियनचीही तक्रार नव्हती,पुढे कोर्टातही ते सर्व कागदपत्र मान्य झाले.अगदी 'मॅनेजमेंटचा कुत्रा','मराठी माणूस असूनही गुजराती मालकांची बाजू घेणारा' अशा साऱ्या आरोपांचा धनी असूनही मी लिहिलेल्या जाबजबाबांविषयी सर्वांचा विश्वास होता.
 १२.०८ उलटतपासणीत प्राथमिक सवाल-जबाब झाले.कुठल्या गाडीतून उतरलास, कुठल्या वेळी उतरलास, कुठे मारले-कसे मारले याबद्दल आरोपीने विष्णूला उलटसुलट खूप प्रश्न विचारले. विष्णूने मूळ जबानीप्रमाणे उत्तरे दिली.आरोपीने अगदी दबकावून विष्णूची चेष्टा करत असल्यासारखे प्रश्न विचारले.विष्णू घाबरून कापतच बोलत होता.पण तो मूळ तक्रारीपासून ढळत नव्हता.शेवटचा वर्मी प्रश्न म्हणून आरोपीने विष्णूला विचारले,"विष्ण्या, मी तुका टेशनवर तोंडात मारलंय म्हणून तुजे दांत फुटोन रकात इला म्हणतंस,तर तुज्या थोबाडावर जखमेची खून खय दिसत नाय.ह्यां कसा रे?"(विष्ण्या मी तुला स्टेशनवर तोंडात मारले म्हणून तुझे दांत फुटून रक्त आले म्हणतोस,तर तुझ्या थोबाडावर जखमेची खूण कुठे दिसत नाही. हे कसे रे?") त्याने विष्णूला चारीमुंड्या चीतपट केल्याच्या आविर्भावात प्रश्न केला. विष्णूच्या चेहऱ्यावर जखमेची खूण दिसत नव्हती हे स्पष्ट होते.विष्णू खोटा ठरणार असे मलाही वाटले,पण विष्णूचे उत्तर असे होते.“मेल्या, माझ्या थोबाडीत दणको मारलंस,माजे दात भुतुरसून गालात घुसोन रगात इले तर त्येची खून भायर कशी दिसात?"(मेल्या, माझ्या थोबाडीत दणका मारलास, माझे दात आतून गालात घुसून रक्त आले तर त्याची खूण बाहेर कशी दिसेल?") त्याने तोंड उघडून आतला व्रण दाखवला आणि तो आरोपी माझ्या डोळ्यांसमोर अक्षरशः ढेपाळला.त्याने लगेच गुन्हा कबूल केला आणि चांगली नोकरी गमावली.विष्णूसारख्या बावळट माणसाचे सत्य एवढे बळकट व मजबूत होते की त्याच्यासमोर सारे काही दुबळे ठरले.
 १२.०९ मी माझ्या डोळ्यांसमोर सत्याचा हा उघड आविष्कार झालेला पाहिला आहे.इतकी वर्षे झाली तरी आजही बावळट विष्णूच्या सत्याचा आविष्कार आणि रगेल कामगाराचे ढेपाळलेपण माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट आहे.त्या मूळ सत्याचा अनुभव पुढे अनेक वेळा आला.सत्य हे स्वयंभू व स्व-तंत्र असते याबद्दल त्यानंतर माझ्या मनात शंका निर्माण झाली नाही.त्यावेळी मी सत्याच्या पक्षात होतो.
 १२.१० याच आविष्काराची दुसरी बाजूही मी पुढे अनुभवली.
 १२.११ मधुमेहावर इंन्शुलिनची रोज इंजेक्शने घेणे हाच उपाय त्या काळी असे.रोज आणि घरच्याघरी इंजेक्शने घेणे हा मोठा तापदायक प्रकार असे.होक्स्ट व फायजर या दोन कंपन्यांनी टोल्बुटामाइड हे गोळ्यांच्या स्वरूपात म्हणजे तोंडाने घ्यायचे औषध १९६० च्या सुमारास बाजारात आणले.त्याचे मूळ पेटंट टेक्स्टचे होते.ते औषध महाग होते.त्याला खूप मागणी होती.युनिकेम कंपनीने हाफकिन ह्या सरकारी संस्थेने पेटेंट घेतलेले टोल्बुटामाइड बाजारात आणले.ह्येक्स्टच्या दाव्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने घेतलेले पेटेंट अ-वैध होते.म्हणून त्यांनी युनिकेम व महाराष्ट्र सरकार यांच्याविरुद्ध मुंबईच्या हायकोर्टात दावा गुदरला.भारतात ह्येक्स्ट व फायजर या दोन कंपन्यांनी ते बाजारात आणले होते.युनिकेमच्या स्वस्त किंमतीमुळे त्या कंपन्यांना बाजारातली स्पर्धा महाग पडत होती.ज्या पेटेंट अधिकाऱ्यांनी ह्येक्स्टचे पेटेंट दिले होते त्यांनीच हाफकिनच्या प्रोसेसला महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नावे पेटेंट दिले होते.आमची औषध बनवायची पद्धत (प्रोसेस) ही ह्येक्स्टच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे असा आमचा दावा होता.ज्या पायावर म्हणजे सुरुवातीच्या घटकद्रव्यावर आमच्या पद्धतीची सुरुवात आधारलेली होती ती टेक्स्टच्यासारखीच होती व त्याचे अंतिम उत्पादन (प्रॉडक्ट) एकच म्हणजे टोल्बुटामाइड आहे हे आम्हाला मान्य होते,पण २००५ सालापूर्वी भारतीय कायद्याप्रमाणे औषधे व अन्न या क्षेत्रात 'प्रोसेस' पेटेंट दिले जात असे व 'प्रॉडक्ट' पेटेंट दिले जात नसे.आमच्याजवळ सरकारी पेटेंट होते म्हणून आम्ही कायद्याचा भंग केलेला नाही असा आमचा दावा होता.हे आमचे 'सत्य' होते.
 १२.१२ पेटेंट पंजीकृत असले तरी त्याला हायकोर्टात आव्हान देता येते व ते तसे होक्स्टने दिले होते आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नावे दिलेले पेटेंट रद्द करून मागितले होते.त्या लोकांनी मुंबईत उपलब्ध असलेल्या नामवंत वकिलांना त्यांच्यातर्फे अधिकारपत्र देऊन अडकावून ठेवले होते.आधीच या कायद्यावरचे खटले दुर्मीळ त्यामुळे यात खास तयारी असणारे वकील मुळात कमी व जे होते त्यांना ह्येक्स्टने आपल्याकडे घेऊन आमची कोंडी केली होती. आमच्या वतीने मझबान मिस्त्री ह्या नावाचे नामवंत वकील उभे राहिले.त्यांच्या मदतीला एस पी भरुचा हे तरुण वकील उभे होते.ते २००२ मध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाले.त्याशिवाय एस बी शाह हे माझे प्राध्यापक व या कायद्याचे खास अभ्यासक 'युनिकेम'च्या वतीने उभे राहिले होते.आमच्या केसचा भर आमचे पेटेंट कायद्याने प्रस्थापित केलेल्या मार्गाने मिळवलेले आहे,म्हणजेच सरकारच्या सर्वोच्च अधिकाऱ्याने आमच्या पद्धतीचा वेगळेपणा मान्य केलेला आहे.उत्पादन एक असले तरी उत्पादनाची पद्धत वेगळी असल्याने आम्ही एकाच अंतिम उत्पादनावर दोन वेगवेगळ्या मार्गांनी येऊन पोचलेले आहोत असा आमचा दावा होता.
 १२.१३ कालानुक्रमाने,पहिले पंजीयन ह्येक्स्टचे होते.तो वादाचा मुद्दा नव्हताच.पण ते पंजीयन सरकारी दप्तरात असूनही आम्हाला पेटेंट मिळालेले होते व महाराष्ट्र सरकारचे पेटेंटही पंजीकृत होते हे टेक्स्टला मान्य होते.आमच्या दृष्टीने हाच कळीचा मुद्दा होता.त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा एकच व तांत्रिक स्वरूपाचा असा होता,की आमची पद्धत (प्रोसेस) खरोखरी वेगळी होती का? हाफकिन इन्स्टिट्यूटचे संबंधित शास्त्रज्ञ आम्हाला ठामपणे सांगत होते,की त्यांची प्रोसेस वेगळी आहे.ह्येक्स्टने ब्लँको वाइट या ख्यातनाम व या विषयात खास तज्ज्ञ असणाऱ्या इंग्लिश बॅरिस्टरना त्यांची बाजू मांडायला आणले होते. त्यांचे अनेक भारतीय वकील व आमचेही वकील विज्ञानाची व खासकरून रसायनशास्त्रातली पार्श्वभूमी असणारे नव्हते.आमची सारी भिस्त आमच्या रसायनशास्त्रातल्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांवर होती.थोडक्यात म्हणजे एका बाजूला रसायनशास्त्रातला जाणकार व पेटेंट कायद्यातला तज्ज्ञ वकील व दुसऱ्या बाजूला त्या शास्त्रातले खास तज्ज्ञ यांच्यात प्रोसेसच्या वेगळेपणाच्या दाव्यावर लढाई होती.न्यायाधीश रसायनशास्त्रातले जाणकार असण्याची अपेक्षा नसते व तसे ते नव्हतेही.
 १२.१४ माझे रसायनशास्त्रातले ज्ञान जवळजवळ शून्य होते.पण या केससाठी तयारी करताना कार्बन अॅटम्स, बेंझिन रिंग,वॅलेन्सीज व त्यांची जोडणी हे सारे शिकावे लागले.हे शिक्षण जुजबी होते. आमची व आमच्या वकिलांची अडचण होती ती वेगळीच.आमचे शास्त्रज्ञ जोरजोराने वाद करायचे तो कायद्यातल्या तरतुदींचा,पण वैज्ञानिक दृष्टीने आमची प्रोसेस कशी व किती वेगळी आहे हे न्यायाधिशांना कसे समजावायचे याबद्दल त्यांच्याकडून फारशी मदत होत नव्हती.आपल्याकडच्या एकूण शिक्षणातच आपली शास्त्रीय प्रतिपादने सोप्या भाषेत व परिणामकारक रीत्या मांडायची कशी याचा विचार केला जात नाही.तांत्रिक शब्द व वाक्ये ठासून सांगणे वर्गात ठीक असते कारण विद्यार्थीही फारसे खोलात जायला उत्सुक नसतात,पण कोर्टात विरुद्ध पक्षाचे लोक तुमच्या प्रत्येक विधानाचा कीस काढतात व तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात.आम्ही त्यात फार कमी पडलो.ब्लँको वाइट पुऱ्या तयारीने आलेले होते.ते वादीच्या टोलबुटामाइड या प्रॉडक्टच्या अणुरचनेचे प्लास्टिकचे मॉडेलच घेऊन आले होते.संपूर्ण प्रोसेस प्रत्येक सुट्या अणूपासून सुरुवात करून त्याची रचना कशी केली जाते,जोडणी कशी होते,प्रत्येक पायरीवर त्यात फरक कसे पडतात,प्रक्रिया काय घडतात,कोणते अणु जोडले जातात, कुठले काटले जातात,कोणते बदलतात व शेवटी टोल्बुटामाइड हे प्रॉडक्ट कसे तयार होते हे त्यांनी टेक्स्टच्या पद्धतीने प्रात्यक्षिकाच्या रूपाने,प्लास्टिकच्या मॉडेलच्या साहाय्याने करून दाखवले व आमच्या प्रोसेसमध्ये त्यात किती थातुरमातुर बदल करून तोच परिणाम घडवला जातो हे त्यांनी भर कोर्टात सोप्या शब्दांत,थोडक्यात व दृश्य रूपात सिद्ध केले.हाफकिनची प्रोसेस म्हणजे काही अणू सुरुवातीला जोडून मग काढून टाकण्याचा आहे हे त्यांनी सिद्ध केले.आमचे शास्त्रज्ञ त्यांच्या प्रयोगावर एकही शंका काढू शकले नाहीत.त्यांच्या तांत्रिक मांडणीला आमचे शास्त्रज्ञ एक केसभरही हलवू शकले नाहीत.हाफकिनची प्रोसेस ही ह्येक्स्टच्या प्रोसेसची नक्कल आहे हे सत्य ब्लँको वाइटने सोप्या,सरळ पद्धतीने कोर्टासमोर मांडले.तेव्हा सत्याचे दुसरे दर्शन मला भर हायकोर्टात १९६८ साली झाले.आमची बाजू खरोखरी सत्यावर उभीच नव्हती.आमची कुबडी पंजीकृत कागदाची म्हणजे पेटेंटची होती.त्यावर सरकारी शिक्का होता. प्रत्यक्षात प्रोसेस टेक्स्टचा होता व खरा होता.सत्याचे असे उघडेनागडे दर्शन,हा मला वेगळा,दिपवून टाकणारा चमत्कार होता.'युनिकेम'तो खटला हरली हे सांगायलाच नको.
 १२.१५ विष्णूच्या चौकशीत झालेले सत्याचे दर्शन व आलेला अनुभव आणि टोलबुटामाइडच्या खटल्यातले सत्याचे दर्शन व अनुभव ही दोन्ही दर्शने वा अनुभव मी वैयक्तिक पातळीवर घेतली किंवा अनुभवली.ती दर्शने सत्याला स्वत:चे बळ असते,स्वतःचे खंबीर पाय असतात,ही खूणगाठ पुरवण्यास समर्थ होती.टोलबुटामाइडसाठी मेहेनत घेतली होती.खूप चर्चा केल्या होत्या. सत्य आमच्या बाजूलाच आहे हा जबरदस्त विश्वास माझ्या मनात होता.एकाच अंतिम सत्याकडे किंवा प्रॉडक्टकडे अनेक वाटांनी जाता येते हे वैज्ञानिक सत्यही आहेच ! प्रत्यक्ष प्रामाण्याच्या परीक्षेत आम्ही सडकून आपटलो व मार खाल्ला.कारण ज्याला मी सत्य समजत होतो ते सत्यच नव्हते! कदाचित तो माझ्या डोक्यातला भ्रम असेल.बाकीच्या लोकांना सत्य माहीत असून त्यांनी एक प्रयत्न म्हणून त्याच्याकडे पाहिले असेल,खपले तर सत्य असा व्यावहारिक विचारही केला असेल.
 १२.१६ मागाहून,अनेक लोकांशी या बाबतीत चर्चा केल्यावर माझ्या लक्षात आले,की आमच्या रजिस्टर्ड' सत्याचा पायाच तकलादू होता.भारतातले बरेच नवीन संशोधन,त्याबद्दल केले जाणारे दावे जोवर कसोटीच्या दगडावर घासले जात नाहीत तोवर मजबूत असतात.पण कोणी साधा उलट प्रश्न केला,की बरेचसे दावे कोसळतात,कारण सत्याचा आधार त्यांच्यामागे नसतो.युक्लिडच्या भूमितीत तर स्पष्टच विधान आहे,की दोन सरळ रेषा जेव्हा आणि जिथे एकमेकींना छेदतात तिथेच बिंदूचे अस्तित्व सिद्ध होते.सत्याचा बिंदू विरोधाच्या कसोटीवर प्रस्थापित होत असतो.आपल्याकडचे बरेचसे संशोधन, बरेच सिद्धांत स्वयंसिद्ध विधानांचे असतात.त्या गोष्टी जेव्हा विरोधाच्या काटाने छेदल्या जातात तेव्हाच त्यांतले हीण जळून जाते व खरा भाग,जो बऱ्याच वेळा काल्पनिक असतो किंवा लवमात्र शिल्लक राहतो,तेवढेच त्यातल्या निखळ सत्याचे दर्शन होते.कार्ल पॉपरच्या म्हणण्याप्रमाणे जिथे फॉल्सिफिकेशन शक्य नसते तिथे सत्य हे गृहीतकांच्ने म्हणजे फक्त श्रद्धेचा भाग असतो.त्याला निरीक्षणाचा किंवा पुराव्याचा आधार नसतो.ती वैज्ञानिक दृष्टीने सत्य विधाने नसतात.
 १२.१७ माझ्या वैयक्तिक जीवनात मला या सत्यदर्शनाचा खूप फायदा झाला.माझ्या डोक्यातली सत्ये,माझी माहिती,त्यावरचा ठाम विश्वास,माझी घट्ट मते,माझे विचार चुकीचे असू शकतात व म्हणून योग्य मार्गाने व माहितीने,योग्य निरीक्षणाने माझे सर्व विचार पुनःपुन्हा तपासून घेतले पाहिजेत हा बोध झाला.त्यावरचा माझा विश्वास दृढावला.
 १२.१८ नित्य बदलणारे वास्तव आणि वास्तवाची कल्पना सतत तपासणे का आवश्यक आहे ते चरचरीत अनुभवाने शिकलो.नित्यनूतन विचार करत राहण्याचे महत्त्व समजून घेतले.मी ठाम भूमिका घेत नाही,एकदा घेतलेल्या भूमिकेला चिकटून राहत नाही,त्यामुळे मी बुळा आहे अशी माझ्या अनेक सहकाऱ्यांची कल्पना झाल्याचे माझ्या कानावर आलेले आहे.मी असे प्रवाद माझ्या व्यवस्थापक म्हणून घेतलेल्या निर्णयांबद्दल ऐकलेले आहेत.कदाचित ते खरेही असतील.मला मात्र ते त्या त्या वेळी तसे वाटले नव्हते.तसा माझा कुठलाच मुद्दा मी सोडत नाही,पकडून ठेवतो असे माझ्याशी ज्यांनी करार केले आहेत त्यांचे मत असे.त्यांना मी फार घासाघीस करणारा वाटत असे.पण माझेच बरोबर असा ठाम व अटळ विश्वास माझ्या मनात नसतो.
 १२.१९ वास्तव हे वास्तव असते. त्याच्यावर तर्कात, चौकटीत बसण्याची जबाबदारी नसते.ते असते.माझ्या ज्ञानाला,वर्णनाला,मानसिक चौकटींना,नकाशांना भूमितीची,आकारांची,तार्किक व्यवस्थेत बसण्याची आवश्यकता असते,वास्तवाला ती तशी नसते.म्हणूनच जे शक्य नाही असे वाटते ते घडलेले असते,हे अनेक आत्मचरित्रांतला मजकूर वाचल्यावर माझ्या ध्यानात आलेले आहे.कादंबऱ्यांत ते खरे वाटले नसते,काल्पनिक व खोटे समजले गेले असते,पण प्रत्यक्षात तसे घडलेले असते.माझ्या गुरूंचा 'आत्मचरित्र'च वाच हा वाचनासंबंधीचा उपदेश मला असा उपयोगी पडलेला आहे.




 १३.०१ मी स्वतः सामाजिक संस्कारांचे एक जिवंत उदाहरण अनुभवले आहे.मी 'युनिकेम'मध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत असताना, १९७४ पासून १९७९ पर्यंत कंपनीच्या जोगेश्वरीतल्या कारखान्यातल्या कामगारांच्या युनियनची सूत्रे आर.जे.मेहता यांच्या मुंबई मजदूर सभेकडे होती.ती मान्यताप्राप्त युनियन होती.आर.जे.मेहता हे मुंबईच्या ट्रेड युनियन क्षेत्रातले मोठे,जबरदस्त आणि आक्रमक नेते होते.त्यांची मला जाणवलेली जी अनेक वैशिष्ट्ये होती त्यात माझ्या झटकन लक्षात आलेले वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची आर्थिक व्यवहार समजण्याची क्षमता व दक्षता.ते पालनपरी जैन या.हिरेव्यवसायात पहिल्यापासन पुढे असणाऱ्या समाजातले व व्यापारी परंपरेतले गृहस्थ होते.त्यामुळे अर्थव्यवहाराची त्यांची जाण पक्की होती.कामगारांनी भरपूर काम करावे व भरपूर पैसे मिळवावेत हा त्यांचा दृष्टिकोन असे. अनेक कारखानदारांचा अनुभव असा होता,की त्यांनी जे जे करार केले त्यांची कामगारांच्या बाजूने अंमलबजावणी करवून घेण्याची त्यांची क्षमता होती.कामगारांना संपात उतरवायचे आणि संपाचा डाव दीर्घ काळ कुजत पडला की काय करायचे याची माहिती नसायची असा प्रकार त्यांच्या बाबतीत नसे. कारण कोणता कारखाना काय देऊ शकेल ह्या बाबतचा त्यांचा ठोकताळा असायचा.तो सहसा चुकत नसे.त्यांना कामगार कायद्यांतल्या खाचाखोचा ठाऊक होत्या.  १३.०२ अशा या जाणकार व बुजूर्ग कामगार नेत्याबरोबर अनेक वेतनविषयक करार मी केलेले आहेत.त्यांची अंमलबजावणीही झालेली आहे.त्यांच्या या व्यवहारात त्यांचा शब्द हा अखेरचा असा दोन्ही बाजूंच्या लोकांनी मानावा असा त्यांचा आग्रह असे.ते म्हणतील ती पूर्वदिशा असे कामगारांनी व मालकांनीही मानावे असा त्यांचा आग्रह असे.कामगार हे मानायला तयार असत,कारण युनियन चालवण्याचे काम करायला कोणाला नको असते.युनियनमुळे मिळणारे फायदे मात्र सर्वांना हवे असतात व त्यासाठी जी काही क्षुल्लक वर्गणी द्यावी लागते ती एकाच काय पण अनेक युनियन्सना द्यायची त्यांची तयारी असते.कारण बहुतांश करार हे मालकांनी एकतर्फी पाळायचे असतात असे आपल्याकडचे वातावरण आहे.
 १३.०३ मालक लोकांना हे स्वीकारणे कठीण असते.अनेक कारखानदार औद्योगिक शांतता विकत घेण्याचा हा सोपा मार्ग समजतात.त्यांचा दृष्टिकोन युनियन ही औद्योगिक शांतता पुरवणारी एजन्सी असा असतो.एका मेहतांशी जमवून घेतले की मग पन्नास कामगारांशी बोलण्याची गरज उरत नाही.त्या दृष्टीने हा प्रश्न सोपा असतो.खरा प्रश्न मोठ्या कारखान्यांत येतो.तिथे मालक.ही बहुधा कंपनी असते. मालक ही संकल्पना धूसर असते.व्यवस्थापक ही एक नवीन व्यक्ती मध्ये येते. ह्या व्यवस्थापकांसाठी कंपनीचे मालक व आरजेंसारखा औद्योगिक शांतता पुरवणारा पुरवठादार यांच्या खिंडीत अडकल्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.व्यवस्थापकाच्या दृष्टीने दोन साहेब तयार होतात.तो मध्ये गरला जातो. या संघर्षात खासगी क्षेत्रातली शाश्वती नसलेली नोकरी असा त्याचा अनुभव असतो.
 १३.०४ आरजेंच्या युनियनने 'युनिकेम'च्या जोगेश्वरी कारखान्यात जवळजवळ सहा महिने मंदकाम आंदोलन चालवले होते.संपाचा हा चेंगट प्रकार कायद्याच्या मार्गाने जाणाऱ्या मालकांना गुदमरवणारा असतो.पगार तर पूर्ण द्यायचा पण काम किती निघेल ते सांगता येत नाही अशी स्थिती असते.तशीच ती 'युनिकेम'मध्ये होती.जून १९७९ ते ३ डिसेंबर १९७९ एवढा काळात हे आंदोलन चालले.उत्पादन नित्याच्या मानाने जेमतेम चाळीस टक्के मिळत असे, पण कायद्याची अपेक्षा पूर्ण पगार द्यावा व कामगारांवर वैयक्तिक शिस्तभंगाची कारवाई करावी अशी होती.माझी आवश्यक ती कोर्टातली धावाधाव चालू होती.मी जुलै १९६७ पासून 'युनिकेम' बुलेटिन म्हणून मासिक चालवत होतो.त्यातून कामगारांच्या कानावर युनियनशी होणाऱ्या चर्चा महिन्याच्या महिन्याला लिहून घालत होतो. ही पत्रिका कामगारांच्या घराघरात वाचण्याची सवय घरच्या लोकांना झालेली होती.या पत्रिकेने मजकुराच्या निष्पक्ष सत्यतेविषयी विश्वासही निर्माण केलेला होता.मुख्य म्हणजे,एखाद्या त्रयस्थ वर्तमानपत्राप्रमाणे मी कामगारांची प्रतिकूल पत्रे,टीका व लेख हे सुद्धा छापत असे.कंपनीची बाजूच नेहेमी बरोबर,कंपनीचीच बाजू मांडायची अशी भूमिका न घेता कामगारांची गा-हाणी,प्रतिकूल मते,प्रश्न,शंका छापून त्यांची उत्तरे देऊन संवाद वाहता ठेवत होतो. 'युनिकेम' बुलेटिनमध्ये 'असत्य' छापले जाणार नाही हा विश्वास सतत बारा वर्षांत निर्माण केला होता.
 १३.०५ मंद कामाचा हा प्रकार कामगारांच्या कुठल्याही मागण्यांसाठी नसून आरजे मेहतांना, कंपनी आपल्या मुठीत आहे हा अहंकार दाखवण्याच्या भावनेतून निर्माण झालेला होता. त्यांत कामगारांच्या मागण्यांचा काही संबंध नाही हे मी सहा महिने कामगारांपर्यंत पोचवत होतो. नेहेमीप्रमाणे, बुलेटिन दरमहा लोकांच्या हातात पडत होते.ह्या निवेदनांचा चांगला परिणाम झाला.
 १३.०६ संप काळात'न काम न पगार' हे सूत्र सर्वमान्य आहे.पण मंद काम हा तसा संप नसतो. लोक थोडेफार काम करत असतात.यावर औद्योगिक संबंध कायद्यात काही औषध त्या काळात नव्हते. कायद्याची अपेक्षा अशी की मंदकाम हे वैयक्तिक गैरवर्तणुकीचे प्रकरण समजून त्यावर चौकशीचे सव्यापसव्य करून वैयक्तिक शिक्षा द्यावी.हे मुळातच चुकीचे औषध आहे.सामूहिक कृतीला सामूहिक उत्तर असायला हवे.पण ते नव्हते,म्हणून मी पगारकपातीचा मार्ग चालू केला.युनियनला हे अनपेक्षित होते.कायद्यात बसो वा न बसो,आम्ही जितके काम कमी तेवढ्या प्रमाणात पगार कापायला सुरुवात केली.तसेच,जिथे अगदी उघडउघड काम कमी होत आहे हे स्पष्ट दिसत होते तेथेच कामगारांच्या पगारात त्या प्रमाणात कपात करायला सुरुवात केली.मंद काम आंदोलनाचे चटके तिसऱ्या महिन्यापासून या कामगारांना बसू लागले.हा प्रश्न साहाजिकच घराघरात पोचला.त्याची पूर्वपीठीका माझ्या बुलेटिनने आधीच तयार केलेली होती.
 १३.०७ आरजे मेहतांच्या युनियनची कामगारांकडून जमवलेल्या पैशांचे चोख हिशेब ठेवून त्याचा योग्य वापर करण्याबद्दल ख्याती होती.युनियनने कामगारांच्या पगारात अशा कपातीमुळे येणाऱ्या तूटीपोटी त्यांना आगाऊ खर्ची म्हणून पैसे द्यायला सुरुवात केली.युनियनने साधारण दीड लाख रुपये या कामगारांत उचल म्हणून त्या काळात वाटले किंवा मेहतांनी 'युनियनच्या या युनिटमधल्या धंद्या'त गुंतवले होते. सारांश युनियनने कामगारांकडून जमवलेल्या पैशांच्या योग्य वापरावर हे आंदोलन चालू ठेवण्याचा पवित्रा घेतला व त्याचबरोबर आमचे पगार कापण्याचे तंत्र बेकायदा आहे म्हणून कोर्टाची वाट पकडली.त्यांची अपेक्षा कोर्ट ही कायद्याबाहेरची पद्धत मानणार नाही व आमची हार होऊन त्यांच्या अहंकाराचा विजय होईल.सुदैवाने, तसे झाले नाही.आम्ही कोर्टाला सांगितले,की जेव्हा केव्हा कमी झालेले काम भरून निघेल तेव्हा आम्ही कापलेला हा पगार देऊ,आणि आवश्यक तर कापलेले पैसे कोर्टात भरू पण काम न करणाऱ्या लोकांना पगार देणार नाही! हा पवित्रा नवीनच होता. कोर्टाने तो मान्य केला.आरजे मेहतांची कोर्टात सतत जिंकणारा नेता म्हणून जी प्रतिमा होती तिला हा मोठा धक्का होता! मंद कामाचा संप चिघळत राहिला,पण कोर्टात युनियनच्या बाजूने निकाल झाला नाही आणि कामगारांना त्यांची चूक लक्षात आली.
 १३.०८ 'युनिकेम'मधले सर्व कामगार बऱ्याच प्रमाणात कोकणातले होते.त्यामुळे कोर्टात हरल्यावर त्यांचा या आंदोलनाला असलेला पाठिंबा संपला.त्यातच शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेने कंपनीच्या कामगारांत आपला शिरकाव केला व एका दिवसात,सर्व कामगारांनी त्यांच्या,मुंबई मजदर सभा या कायद्याने मान्यताप्राप्त असलेल्या यनियनचा त्याग केला.ती युनियन कायदेशीर प्रतिनिधी होती,पण ज्या घोड्यावर त्यांची स्वारी होती,ज्यांचे प्रतिनिधित्व होते ती मांड निसटून गेली होती.
 १३.०९ या साऱ्या प्रकरणात माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका होती.ती मी सतत लोकांना औपचारिक-अनौपचारिक रीतीने सांगत असे.ती अशी की 'युनिकेम'मध्ये काम करणारे कामगार हे माझ्यासारखे त्या कंपनीचे नोकर होते.मी व्यवस्थापक असलो तरी मीसुद्धा नोकरीच करत होतो.त्यामुळे आमच्यात समानता आहे अशी माझी श्रद्धा होती.घरातले सगळे भाऊ सारखे असले तरी वडील भावाची जबाबदारी जास्त असते.'युनिकेम'च्या परिवारात त्यांच्यातला वडील भाऊ किंवा कर्ता अशी माझी भूमिका होती.आरजे मेहता ही व्यक्ती किंवा त्यांची मुंबई मजदूर सभा ही युनियन माझ्या भावंडांसाठी म्हणून त्यांचे नेतृत्व व प्रतिनिधित्व करत होती.पण काही झाले तरी ते प्रतिनिधी होते.माझी बांधिलकी या कामगाराशी,या माझ्या भावंडांशी होती.मी प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद 'युनिकेम बुलेटिन'द्वारा चालू ठेवला होता.मला केवळ बोर्डावर नोटिसा लावायच्या,वकील लोक मान्य करतील तेवढाच लेखी व्यवहार कामगारांबरोबर करायचा हे मान्य नव्हते.परस्परांमध्ये सतत संवाद सर्व पातळीवर चालू ठेवणे हे औद्योगिक कामगार संबंधांसाठी आवश्यक आहे हे माझे मत होते.
 १३.१० माझी कोकणच्या मातीत वाढ झालेली असल्याने समानता या मूल्यावर माझी खोल श्रद्धा आहे.मी अधिकारपदावर आहे म्हणजे मी माणूस म्हणून श्रेष्ठ आहे असे मी कधी मानले नाही. माझी जबाबदारी,माझे शिक्षण,माझे ज्ञान,माझा अनुभव हा इतर सहकर्मचाऱ्यांपेक्षा जास्त वरचा आहे हे स्पष्टच होते, पण माणूस म्हणून मी त्याच्यासारखाच आहे.वेगळेपण अधिकारात,कार्यक्षमतेत,ज्ञानात आहे. श्रेष्ठत्व कामात, माणसात नव्हे हा मुद्दा माझ्या मनात स्पष्ट होता. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक कामगाराला मी ते स्पष्ट शब्दांत सांगत आलो होतो.मी व माझी खुर्ची ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.केव्हाही आभार, उपकार मानायचे असतील तर ते खुर्चीचे माना हे मी आवर्जून सांगत असे.
 १३.११ सहा महिने मंद काम, काफ्लेला पगार - तोही कोर्टात भरलेला आणि कोर्टाची कामे कोर्टाच्या गतीने चाललेली म्हणून 'युनिकेम'चे कामगार कंटाळले. १९६५ साली बावन दिवसांचा अयशस्वी संप चालवून कंटाळलेले कामगार जसे महाराष्ट्र वर्कर्स युनियनला रामराम करून परत आले होते तोच प्रकार ३ डिसेंबर १९७९ ला घडला.'मी मंद काम आंदोलन संपवून कामावर रुजू होत आहे' असे लेखी निवेदन देऊन कामगार त्या दिवसापासून कामावर रुजू झाले.मंद कामामुळे झालेले त्यांचे आणि कंपनीचे होत असलेले नुकसान मी लोकांना सतत सांगितलेले होतेच.त्यासाठी बुलेटिनचा वापर केला होता.
 १३.१२ कामगार आरजे मेहतांच्या दीर्घसूत्री कारभाराला कंटाळले.कामगारांनी भारतीय कामगार सेनेच्या झेंड्याखाली कंपनीतल्याच तरुण कामगार नेत्याच्या कर्तेपणाच्या भूमिकेतून युनियन बदलली. नवी विटी नवे राज्य सुरू झाले.कामगार प्रतिनिधी गुप्त मतदान पद्धतीने निवडले गेले.म्हणजे नवी युनियन प्रातिनिधिकत्वाची पहिली पायरी सहज ओलांडून गेली.कायदेशीर मान्यता मुंबई मजदूर सभेकडे चालू राहिली.कंपनीची नव्या निर्वाचित प्रतिनिधींबरोबर चर्चा होऊन,मंद काम आंदोलनाच्या काळात राहिलेले काम कामगारांनी भरून द्यायचे व कापलेला पगार कंपनीने त्यांना द्यायचा असा करार केला.
 १३.१३ त्याप्रमाणे कामगारांनी काम केले व कंपनीने कापलेल्या पगाराची भरपाई केली.पण भरपाई देत असताना 'युनिकेम'च्या कामगारांनी, मुंबईतल्या सबंध कामगार चळवळीच्या तोपर्यंतच्या इतिहासात कधीही न घडलेली एक गोष्ट केली. आरजे मेहतांनी मंद काम आंदोलनाच्या काळात साधारण दीड लाख रुपये कामगारांना उचल दिली होती किंवा युनियनचे पैसे गुंतवले होते.त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने,असे पैसे कंपनीशी करार करताना फरकाच्या रकमेतून वसूल करायचे.इथे,त्यांची युनियन कामगारांनी सोडलेली होती.त्यांच्यावर त्यांचे नियंत्रण शिल्लक राहिलेले नव्हते.
 १३.१४ ज्यावेळी कामगारांनी काम भरून दिले व कंपनीने त्यांचा कापलेला पगार त्यांना द्यायचा निर्णय घेतला तेव्हा जुन्या-नव्या सर्व कामगारपुढाऱ्यांना मी एकत्र बसवले व नवीन येणाऱ्या युनियनच्या संमतीने ज्यांनी ज्यांनी अशी उचल घेतली होती त्यांच्या त्यांच्या भरपाईच्या रकमेतून ती उचल कापून घेऊन मुंबई मजदूर सभेला चेकने देऊन टाकली!त्या कामगारांनी ती रक्कम कापायला स्वखुषीने संमती दिली.समाधानाने कापून दिली.आरजे मेहतांच्या युनियनने गुंतवलेले सर्व पैसे त्यांना परत मिळाले!
 १३.१५ युनियन बदलल्यानंतर.जुनी युनियन परास्त झाल्यानंतर सहसा कोणी तिची आठवण ठेवत नाही.युनियनचे व माझे मतभेद झाले,विकोपास गेले,त्यानंतर पुन्हा कधी त्या युनियनशी संपर्क आला नाही.पण 'युनिकेम'च्या कामगारांनी,माझ्या सहकर्मचाऱ्यांनी युनियन बदलली म्हणून पैसे बुडवले नाहीत.नव्या-जुन्या पुढाऱ्यांनी व भारतीय कामगार सेनेने यात जी समजदारी दाखवली ती मोलाची गोष्ट होती.या घटनेचे अद्वितीयत्व मी 'युनिकेम' बुलेटिनमध्ये लगेच नोंदवले.
 १३.१६ सामाजिक जीवनातल्या विश्वासाची महती अशा उदाहरणांतून घडत असते.माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांत ही भावना मी जागृत ठेवू शकलो याचे श्रेय,माझ्या मते,परस्पर संवादाला आहे. कुणाच्या कर्जात राहू नये,कर्जाची फेड करावी हे तर सगळ्या धर्मात सांगितलेले आहे.हिंदू समाजात तर आपलेच नव्हे तर आपल्या वडिलांचे,आजोबांचे कर्ज फेडणे हे व्यक्तीचे कर्तव्य मानले जाते.हे कर्ज फिटल्याशिवाय मृतात्म्याला स्वर्गात प्रवेश मिळत नाही अशी मान्यता आहे.ही श्रद्धा मी निर्माण केलेली नाही.ही या देशातल्या,भूमीतल्या,मातीतल्या गुणांचा भाग आहे.
 १३.१७ या समाजात वावरणारा एक व्यवस्थापक म्हणून मी या श्रद्धेशी माझ्या सहकर्मचाऱ्यांचा व्यवहार जोडून दिला,इतकेच.त्यांनी त्या श्रद्धेचे पालन करावे व त्यांच्या पूर्व युनियनचे कर्ज बुडवू नये हे पाहिले.माझ्या अधिकाराचा वापर या धर्मसंमत आचरणाशी जोडला.कामगारांचे पुढारी,युनियन यांनी माझे हे म्हणणे मानले,कारण त्याच्या मनोभूमिकेचे पोषण याच समान श्रद्धेवर झालेले होते.त्यांच्या नसनसात तीच श्रद्धा होती.मी फक्त त्या समान श्रद्धेची आठवण करून दिली.त्यांचे त्यांना काय ते ठरवू दे,मला काय त्याचे,किंबहुना ज्या युनियनने माझे उत्पादन खोळंबवून ठेवले होते.त्यांच्या कर्जवसुलीची चिंता मी कशाला वाहावी असा विचार मी केला नाही.वरवर पाहता,व्यवस्थापनाच्या अपेक्षित कामाशी,जॉब स्पेसिफिकेशनशी त्याचा संबंधच काय असाही मुद्दा पुढे येऊ शकतो.पण मीच माझे जॉब स्पेसिफिकेशन सतत लिहीत गेलो आहे.
 १३.१८ जुन्या युनियनने माझ्या कंपनीचे नुकसान केले होते.माझ्यावर त्यांची नुकसानभरपाई करून देण्याची कोणतीही जबाबदारी नव्हती.किंबहुना,ही उचल माझ्या कंपनीवर दबाव आणण्याच्या स्पष्ट हेतूने दिली गेलेली होती.तिची परतफेड कंपनीने करण्याचा प्रश्नच नव्हता.कंपनीने ती केलीही नाही.मी व्यवस्थापक म्हणून ती कामगारांकरवी करवली.माझे बांधव,जे सहकर्मचारी त्या युनियनचे ऋणाईत होते त्यांनी ऋणमुक्त होणे हे त्यांचे कर्तव्य होते.त्याची त्यांना जाणीव करून देऊन,कृती करवून घेणे हा वैयक्तिक दृष्ट्या धोक्याचा भाग होता.नवीन आलेल्या युनियनला माझा जुन्या युनियनशी लागाबांधा ठेवण्याचा हा प्रकार अविश्वासाचा वाटण्याची शक्यता होती.वरवर पाहता,तो निर्णय त्यांच्या अ-हिताचा होता.तो त्यांच्या गळी उतरवणे हे सोपे काम नव्हते.हे धर्मसंमत होते,पण नाकापुढचेच पाहून विचार करायचा असे ठरवले तर,व्यवहाराशी विसंगत होते.आरजे मेहतांच्याबद्दलचा कंपनीच्या कामगारांच्या मनातला विश्वास संपला होता.पण या पैशाच्या वसुलीसाठी त्यांनी उपद्रव करत राहणे स्वाभाविक होते.ती शक्यता होती.व्यापारी विचाराचा माणूस बुडत्या धंद्यात घुटमळत राहत नाही.त्यांची या बुडत्या दुकानातली गुंतवणूक मोकळी करून देण्यात व्यावहारिक स्वार्थही होता.परिणाम अपेक्षित असा झाला.मेहतांनी हा युनिट सोडून दिले आणि कामगारांनी नवी निवडून आणलेली समिती स्थानिक काम करणाऱ्या माणसांच्या नेतृत्वाखाली दृढमूल झाली.
 १३.१९ मला स्वतःला मूळ भारतीय विचारधारेशी असलेली ही बांधिलकी महत्त्वाची वाटते. सामाजिक व्यवहारात विश्वास जागवणे महत्त्वाचे आहे.पाश्चिमात्य समाज व त्यांचे धर्मग्रंथ हा विश्वास महत्त्वाचा मानतात.मग या साऱ्या प्रकारातले भारतीय वेगळेपण कशात होते? जर त्या कामगारांनी स्वतः आरजेंचे पैसे परत केले असते तर त्यांचे कृत्य त्यांचे व्यक्तिगत व त्यांच्या घरच्या भारतीय संस्कारातून झाले असते,पण साऱ्यांनीच पैसे परत दिले असते का?नव्या पुढाऱ्यांना,नव्या युनियनला ते आवडले असते का? खरे तर,या लढाईत नवीन पुढारी व त्यांची युनियन जिंकले होते.त्यांनी पराभूतांचा विचार करायची गरज काय होती? पण त्यांच्याही मनातल्या रामाला जागवणे आवश्यक होते एक कुटुंबातला कर्ता म्हणून.'मरणान्तानि वैराणी' हा आदर्श त्यांच्याही सुप्त संस्कारात होताच.सर्वसामान्य कामगारांत तो जागवणे,फुलवणे हे कठीण होते.व्यवस्थापक म्हणून,कर्ता म्हणून,वडील भाऊ या पदामुळे माझे ते कर्तव्य होते,ते मी केले.माझ्या वागणुकीतला वेगळेपणा हा या कर्तेपणाच्या भूमिकेत आहे.तसे पाहायला गेलो तर मी स्वतः कामगार नव्हतो,त्यांचा पुढारी नव्हतो,नेता नव्हतो,लोकनियुक्त प्रतिनिधी नव्हतो किंवा सरकारी अधिकारी वा कोर्ट नव्हतो.मी व्यवस्थापक होतो.एका छोट्या कंपनीतला एक छोटा व्यवस्थापक होतो.
 १३.२० कर्त्याची भूमिका व्यक्तिवादी पाश्चात्य समाजातल्या व्यवस्थापन शास्त्रात बसत नाही.तिला पॅटर्नालिस्टिक विचार म्हणून हिणवण्याची पद्धत आहे.एवढेच काय,पण भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या अॅडवर्सरी कल्चरवाल्या कामगार कायद्यांत व्यवस्थापकाने युनियनच्या कामात लुडबूड करणे हे गर्दा मानलेले आहे.कारण त्या कायद्यात कामगार व व्यवस्थापन हे दोन भिन्न वर्ग आहेत व त्यांच्यात सतत वैर असणार हे गृहीत धरलेले आहे.त्यामुळे त्यात समन्वयाचे (कन्सीलिएशन) सर्व विचार ठिगळासारखे चिकटवलेले आहेत.मूळ विचार वर्गयुद्धाचा आहे.त्यांच्यात वर्गकलह अपरिहार्य आहे,तो संघर्षातून संपणार,कारण ते वेगवेगळे वर्ग सदस्य आहेत.त्यांचे संबंध केवळ करारमदारांनी चालणार अशी गृहीतकृत्ये त्यामागे आहेत.
 १३.२१ भी वर्गकलह ही कल्पनाच अ-भारतीय व भारतीय वास्तवाशी सुसंगत नाही असे मानतो.देहभेद हे जेवढे वास्तव आहे तेवढेच आत्म्याची एकात्मता हेही वास्तव आहे.सारे कामगार एका वर्गात मोडतात व सारे मालक एका वर्गात मोडतात,हे गृहीतक सत्याच्या म्हणजे प्रत्यक्ष-प्रामाण्याच्या कसोटीवर टिकणारे नाही.कामगारांचे अंतर्गत मतभेद,हेवेदावे,भांडणे,मानापमान,मारामाऱ्या ह्या साऱ्या गोष्टी मालक लोकांतही तितक्याच प्रमाणात असतात.युनियनची गेटमीटिंग घडवणे,लोकांना घरी जाण्यापूर्वी गेटवर थांबवणे, एवढेच काय कंपनीशी करार झाल्यावर मग गेटमीटिंगसाठी त्यांना थोपवणे हे किती कठीण असते ह्याचा अनुभव सर्व कामगारपुढाऱ्यांना येत असतो.मालक लोकांच्या संघटनातील मतभेद त्याच स्वरूपाचे व तितकेच तीव्र असतात याचा मला अनुभव आहे.माणसे वैयक्तिक दृष्टीने व स्वतःच्या फायद्यापुरता विचार करतात,त्यांना वर्गाच्या गाठोड्यात बांधून विचार करणे हेच मुळात चुकीचे आहे.
 १३.२२ हे साधे सरळ वास्तव नाकारून पढिक पंडितांनी पाश्चात्य चण्यातून विचार करून मालक-मजूर संबंघांचा विचका करून ठेवला आहे. औद्योगिक संबंधातले संबंध (Relations)वगळून फक्त औद्योगिक विवादांचा (Disputes) विचार केला आहे. हा फरक केवळ शब्दांतला नाही तर मूळ भूमिकेतला आहे.ज्यांनी याहून वेगळा विचार केला आहे त्या मालकांनी किंवा व्यवस्थापकांनी वेगळ्या वाटेने यश मिळवले आहे.कीर्तीचे वेगळे मानदंड स्थापित केले आहेत.एकच उदाहरण द्यायचे तर जमशेटपूरच्या टाटांच्या कारखान्याच्या राष्ट्रीयीकरणाचा केंद्र सरकारने केलेला विचार १९७७ साली तिथल्या कामगारांच्या युनियनने हाणून पाडला.त्यांच्याकडे पन्नास वर्षांत काम बंद पडलेलेच नव्हते. .



 १४.०१ रिस्टोटेलियन किंवा देकार्त यांच्या तर्कशास्त्राची रचना होय/नाही या स्पष्ट कप्प्यांत करण्यावर आधारलेली आहे.वस्तुस्थितीचे आहे/नाही,होय/नाही असे स्पष्ट कप्पे पाडून विचारांची किंवा विधानांची मांडणी केली जाते.त्यामुळे त्यांच्यातला भेद स्पष्ट होतो.साम्यभेद नेटकेपणाने समोर येतात. सर्व विचारांवर होय/नाहीच्या या साच्याची जबरदस्त छाप आहे.तार्किक बोलणे म्हणजे कप्प्यांत,वर्गीकरण करून बोलणे,विचार करणे,वागणे असे मानले जाते.त्याव्यतिरिक्त विचार करण्याची पद्धत असू शकते याला बुद्धिमंतांची मान्यता नाही.'येसानो' चा हा ठोकळा सगळ्या विचारांवर आहे.या विचारसरणीमुळे चिकित्सा,विश्लेषणाचे फायदेही आहेत.पाश्चात्य लोकांशी जित समाज म्हणून संपर्क आल्यावर भारतातल्या सर्व शिक्षित समाजावर या विचारसरणीची भुरळ पडलेली जाणवते.सर्व विद्या किंवा विचारप्रसार हा प्रामुख्याने इंग्लिशमधून झाल्यामुळे ही पायाभूत तर्कप्रणाली सर्व पुस्तकांतून,लेखनातून वा भाषणांतून गृहीत धरलेली असते.
 १४.०२ हा साचा माझ्याही डोक्यावर आहे हे मला माहीत नव्हते.एडवर्ड डि बोनो या लेखकाचे 'पो : बियाड येस ऑर नो' हाती येईपर्यंत मी ह्या साच्यात घट्ट अडकलेला होतो.ते पुस्तक वाचल्यावर मला या बौद्धिक बेडीची जाणीव झाली.ॲरिस्टोटेलियन तर्कशास्त्र एवढेच खरे नव्हे,तर लॅटरल थिंकिंगमुळे, ते प्रमुख तर्कशास्त्र असले तरी ते एकमेव तर्कशास्त्र नाही हे स्पष्ट झाले.या जोखडातून मुक्तता झाल्यावर मला भारतीय विचार जास्त स्पष्टपणे कळू लागला.बोनोच्या लॅटरल थिंकिंगमुळे माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला.माझ्या मूळ भारतीय स्रोताकडे जाण्याला हा दणका खूप उपयुक्त ठरला.
 १४.०३ होय नाही ही मांडणी तर्कदृष्ट्या बरोबर आहे असे मानल्यावर पुढची पायरी म्हणजे तीच एकमेव तर्कपद्धत ही कल्पना बळावते.प्रत्येक घटना,गोष्ट विशिष्ट साच्यात बसली पाहिजे हा आग्रह सुरू होतो.हा जो एकमेवत्वाचा आग्रह आहे ती मोठी बेडी आहे.यातून माझंच' बरोबर हा विचार सहजपणे येते.हा 'च' फार महाग पडतो.जगातली सगळी भांडणे,युद्धे,हिंसा ही या 'च' च्या आग्रहातून उत्पन्न होतात.विनोबांनी त्यांच्या शैलीत याचे छान विवरण केले आहे.ते म्हणतात,हा 'ही' व 'भी' मधला फरक आहे.(हा संदर्भ अर्थात हिंदी भाषेतला आहे).माझाच विचार बरोबर किंवा योग्य असे न म्हणता माझाही विचार बरोबर किंवा योग्य आहे असे म्हटले तर वाद हे शाब्दिक पातळीवर राहतात.त्यांत कडवटपणा येत नाही.एकूण विचारसरणीत फरक पडतो.
 १४.०४ याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे धर्माच्या नावावर होणारे जगभरचे झगडे.सर्व धर्म पूजनीय आहेत.सारे पंथ,मार्ग एकाच ईश्वराकडे जातात अशी मांडणी आपल्याकडे केली जाते.सर्वधर्म समभाव असे त्याचे वर्णन आपल्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे.सर्व धर्म ‘एकं सत्' मानतात हे बरोबर आहे.त्या 'एकम्' ला ईश्वर,ब्रह्म,येहोवा,गॉड,अल्ला असे नाव देतात,येथवर ठीक आहे.भारतीय वैशिष्ट्य 'बहु-धा वदन्ति' मध्ये आहे.म्हणजे ह्या एकाच सत् ला विविध नावांनी ओळखले जाते हे मान्य होणे कठीण आहे.हा बहुधा किंवा अनेकान्तवादी विचार सर्वाना मान्य होत नाही.म्हणजेच येहोवा,गॉड,अल्ला हे एकम् मान्य असते,पण आग्रह त्यापैकी एकच सत् बरोबर बाकीचे अन्य सत् त्या पांथिकांना मान्य नसतात.वेगवेगळ्या मार्गांनी एकाच ईश्वराकडे जाण्याचा पर्याय त्या धर्मश्रद्धाना मान्य नसतो.म्हणजेच हे सारे 'ही' वादी होतात.'भी' वादी होण्याचे त्यांना मान्य नसते.कुठल्याही पंथाला,पक्षाला,एकमेवत्वाच्या भिंती घातल्याशिवाय वेगळेपणा दाखवता येत नाही.आपल्या गोटातला कोण व बाहेरचा कोण हे ठरवणे,त्यांचे वर्गीकरण करणे शक्य होत नाही.भिंतीच्या आतल्या माणसाला मिळणारे लाभ भिंतीबाहेरच्या माणसाला मिळू शकत नाहीत.त्यामुळे त्या त्या पंथाचे (धर्माचे) लोक 'बहुधा वदंति' हे मान्य करू शकत नाहीत.यहुदी ख्रिचन किंवा मुस्लिम धर्मीयांना एकम् सत् हे मान्य असते पण बहुधा वदन्ति हे ते मान्य करू शकत नाहीत.ते सर्वधर्म समभाव न मानता फारफार तर सर्वधर्म सहभावापर्यंत येऊन पोचतात. ही सुद्धा खूप मोठी प्रगती आहे.इक्विझिशन किंवा जिहादच्या काळात,जगाची विभागणी कातोलिक व इन्फायडेल,मुस्लिम व काफर या कप्प्यांत केली जात असे.इन्फायडेलना किंवा काफरांना जगण्याचा अधिकारही नाकारला जात असे.त्यातून युद्धे सुरू होतात.एकोणिसाव्या शतकात उदय पावलेल्या कम्युनिझम या,धर्म ही अफूची गोळी आहे असे म्हणणाऱ्या नव्या धर्मातही जे वर्गशत्रू म्हणून मानले जातात त्यांची कत्तल ही योग्य मानली गेली.हा विसाव्या शतकाचा नक्षलग्रस्त व जगातल्या बऱ्याच भौगोलिक भागातला इतिहास आहे.
 १४.०५ सर्व सामाजिक प्रश्नांचे मूळ कारण फक्त आर्थिक विषमतेत आहे ही कम्युनिस्टांची श्रद्धा होती.ते ईश्वर।अल्ला गॉड काहीच मानत नाहीत.ते सर्व इहवादी, प्रत्यक्षप्रामाण्यवादी होते.त्यांचे प्रतिपादन प्रत्यक्ष आर्थिक विषमता व तिचे निर्मूलन यांवर आधारलेले होते.कार्ल मार्क्सने सर्व जगाची विभागणी आहे-रे व नाही-रे ('हज' व 'हॅव-नॉटस्') या दोन कप्प्यांत केली.त्याचे विवेचन स्पष्ट कप्पेबंदपणावर आधारलेले आहे.त्याच्या अनुभवातली परिस्थिती १८४० ते १८८० पर्यंतच्या युरोपातल्या व खास करून ब्रिटनमधल्या वास्तवाच्या आकलनावर आधारलेली होती.युरोपातले देश राष्ट्र-राज्य ह्या, तशा,युरोपातही नव्या असलेल्या संकल्पनेवर आधारित,आर्थिक साम्राज्य जगभर पसरवण्यास उत्सुक असे देश होते.ब्रिटनचे साम्राज्य अमेरिकन वसाहती या जगाच्या नव्या भूभागातून माघार घेतल्यावर आफ्रिकी व आशियाई देशांत विशेषकरून भारतात स्थापित झालेले होते.व्यापारात एकाधिकार मिळवण्यासाठी राजसत्ता हातात घेण्यात आली होती.राजकीय प्रभुसत्ता स्थापन करण्यात आली होती.जगभरच्या साऱ्या देशांतून खेचून आणलेली संपत्ती बाळगणारे नवे नबाब व जमिनीच्या परंपरागत मालकीवर आधारित अशी संपत्ती बाळगणारे सरंजामशहा हा एक वर्ग आणि बाकी सारी जनता दुसऱ्या बाजूला अशी स्पष्ट दोन सामाजिक वर्गांत वांटणी हे एकोणिसाव्या शतकातले ब्रिटनमधले वास्तव मार्क्सच्या नजरेसमोर होते.खेचून आणलेल्या व वारशाने लाभलेल्या धनाची वाटणी कशी करायची,हा त्याच्या मते,महत्त्वाचा आर्थिक प्रश्न होता.उत्पादन कसे करायचे हा मुख्य प्रश्न नव्हता.केक वाटायचा कसा हा प्रश्न त्याला महत्त्वाचा वाटला.केक निर्माण कसा करायचा व केकचा आकार हा स्थिर असण्याची किंवा मानण्याची आवश्यकता नाही हे त्याचे आकलन नव्हते. नवीन तंत्रज्ञानावर आधारित औद्योगिक उत्पादन करणारा पहिला देश म्हणून ब्रिटन हे अग्रणी राष्ट्र-राज्य होते.अनिबंध व्यापारस्वातंत्र्य व राखीव बाजारपेठ ही त्यांची गरज होती.हुकमी बाजारपेठ साम्राज्यवादाच्या विचारातून खेचून घेतली गेली होती.
 १४.०६ कम्युनिझमचा वा समाजवादाचा विचार हा या प्रकारच्या सामाजिक वास्तवावर आधारलेला विचार आहे.'आहे रे' व 'नाही रे' हे समाजाचे दोन प्रतिस्पर्धी गटांत केलेले विभाजन खरे आहे.जगातले सर्व कामगार एक आहेत,त्यांच्याजवळ गमावण्यासारख्या फक्त बेड्याच आहेत,त्यांचे परस्परांशी वैर नाही.राष्ट्रराज्यांच्या सीमा ह्या भांडवलदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी किंवा लुटीसाठी निर्माण केलेल्या आहेत,ही सर्व तर्कप्रणाली मार्क्सच्या ब्रिटनमधल्या एकोणिसाव्या शतकातल्या वास्तवाच्या आकलनावर आधारलेली आहे.
 १४.०७ भारतात १९३० ते १९८० या कालखंडात राजकारणात प्रभावी असणाऱ्या पुढाऱ्यांनी याच विचारप्रणालीच्या आधारावर सर्व कायदे,राजकीय व्यवहार,आर्थिक धोरणे आखून तशा घोषणा केल्या.त्यात आहेरे।नाहीरे,मालकामजूर हे दोन प्रभावी व परस्परविरोधी गट मानण्यात आले आणि त्यांच्या परस्पर व्यवहारात वर्गसंघर्ष गृहीत धरण्यात आला होता.त्यात मजूर हा दुबळा व नाहीरे गटातला आहे.त्यामुळे भारतीय समाजात वर्गसंघर्ष हा अटळ आहे हे उघड होते.मालक-मजूर संबंध हे भांडणांचे,डिस्प्यूट्सचे,असणार हेही सहजच मानण्यात आले.वर्गयुद्धाच्या वल्गनाही करण्यात आल्या.
 १४.०८ मी ज्यावेळी एका कंपनीचा व्यवस्थापक म्हणून काम करू लागलो त्यावेळपासून (१९६४) १९८० सालापर्यंत कामगार-मजूर संबंधातले एकामागून एक असे जे कायदे करण्यात आले,ज्याप्रकारचे शिक्षण विद्यालयांतून देण्यात आले,ज्याप्रकारे कामगार अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण करण्यात आले,त्या साऱ्या गोष्टींत समाजवादी,वर्गसंघर्षाची कल्पना अध्याहृत धरण्यात येत असे.याचाच परमोत्कर्ष म्हणजे १९७६ साली,देशातल्या लोकशाहीचा गळा आवळण्यात आलेला होता,त्याच आणीबाणीच्या काळात समाजवादी हे बिरुद घटनेच्या मथळ्यातच कोंबण्यात आले.
 १४.०९ वर्गसंघर्षाची विचारसरणी मला माझ्याभोवती वावरणाऱ्या सर्वसामान्य कामगारांत रुजताना दिसत नव्हती,अनुभवास येत नव्हती.कम्युनिस्टांच्या शास्त्रीय परिभाषेत बोलायचे तर कामगारांच्या वर्ग-जाणिवा पुरेशा प्रखर झालेल्या नव्हत्या.आजही मला त्या तशा प्रखर दिसत नाहीत. सर्वसामान्य कामगाराला नोकरी हवी असते,उत्पन्नाचे स्थिर साधन हवे असते.त्यात मधुनमधून मिळेल तेवढी वाढ हवी असते.इतर कामगारांपेक्षा जास्त पगार मिळाला तर हवा असतो.बढती हवी असते,पेन्शन,फंड,सुट्टया हव्या असतात.अडीअडचणीला कर्ज हवे असते.मुख्य म्हणजे उत्पन्नाची व नोकरीची शाश्वती हवी असते व त्यासाठी नेता सांगेल ते मानायची त्यांची तयारी असते.संप करायला मात्र तो नाखूष असतो,कारण त्यामुळे त्याच्या स्थिर उत्पन्नावर घाला येतो.नाखुषीने का होईना 'जातीसाठी खावी माती' म्हणून तो संपाला तयार होतो.तो कामगारवर्ग म्हणून एका विचाराचा नसतो.मालक हा शत्रू असा विचार त्याच्या मनात नसतो.त्यातून त्याचा मालकही कोणी मोठी कंपनी असली तर मालक अशी कोणी प्रत्यक्ष व्यक्ती त्याला दिसत नाही.दिसतात ते सारे त्याच्याचसारखे नोकरी करणारे,जास्त पगार मिळवणारे लाभार्थी अधिकारी.त्यांच्याबद्दल व खास करून त्यांना मिळणाऱ्या जास्त पैशांबद्दल त्याला असूया वाटते.मला अधिक पैसे मिळायला हवे,मग भले तुम्ही कितीही मिळवा असा साधा-सोपा विचार त्याच्या मनात असतो.त्याच्या मनात काही वैयक्तिक राग,सूड अपमान जरूर असतात,पण ते कुठल्या एका वर्गाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून असतात.
 १४.१० मला मालक लोकांची एकी,कारखानदारांची एकी अशी कधी दिसली नाही.मालक-मजूर तंट्यात त्यांची एकमेकांना मदत कधी आढळली नाही.प्रत्येक जण एकट्यानेच स्वतःची सोय पाहताना,स्वतःचा फायदा मिळवताना व स्वतःच्या अडचणीची सोडवणूक करताना आढळला.मालक वर्ग म्हणून विचार करताना दिसले नाहीत.सरकारविरुद्ध तक्रारी करतांना,अर्ज-विनंत्या करताना आणि जेव्हा आयात-परवान्यांसारखे घबाड मिळवायचा विषय होता तेव्हा त्यासाठी संघटना होत्या व आहेत,पण त्या तेवढ्यापुरत्या.एरवी,उलट,एकीपेक्षा फाटाफूट आणि भांडणे व चढाओढ जास्त आढळली.
 १४.११ कामगार-मालक या वर्गशत्रूची भांडणे व खेकटी निस्तरण्यासाठी इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स अॅक्ट व इतर कामगार कायदे,कोर्ट,वकील,सल्लागार व अधिकारी यांची प्रचंड संख्या दिसली.सर्व प्रश्न कोर्टात जाऊन सोडवायचे यावर भर दिसला.या सर्व कायद्यांत एक मूलभूत खोटेपणा भरलेला आहे.त्यांची मूळ धारणा ही वर्गकलहाची आहे.पाश्चात्य विचारपद्धतीने होयानाही या तर्कशास्त्राच्या पद्धतीने सर्व प्रश्नांबाबत निर्णय घेण्याची संकल्पना आहे.दोन पक्षांतला एक बरोबर-दुसरा चुकीचा,एक जिंकणार-दुसरा हरणार असे ठरवण्याची अपेक्षा आहे.या कायद्यांच्या आधारावर न्याय करणाऱ्या कोर्टातला न्याय.याचा अर्थ दोन्ही बाजू बरोबर ठरण्याची शक्यताच नाही.यालाच न्याय म्हणण्याची पद्धत आहे.मानवी संबंधांतली बरीचशी महत्त्वाची क्षेत्रे कायद्याच्या पद्धतीने क्लिष्ट बनतात,संघर्षापेक्षा सहयोगाने,भांडणांपेक्षा समझौत्याने सामंजस्याने मानवी नाती जास्त चिरकालीन व टिकाऊ बनतात हा अनुभव प्रत्येकाला येत असतो.तरीही या कायद्यांची भूमिका ही अशी आहे.
 १४.१२ घर चालवण्यासाठी, संसार करण्यासाठी,मुलाबाळांचे संगोपन करण्यासाठी,लग्न करण्यासाठी कोणी हिंदू कायद्याचे पुस्तक वाचत नाही.घराच्या वाटण्या करण्याची वेळ येते किंवा घटस्फोट घेण्याची वेळ येते,पोटगी मागण्याची वेळ येते तेव्हा कायद्याची पुस्तके,वकील,कोर्ट यांच्याकडे धाव घ्यावी लागते.त्यांची गरज अशा अपवादात्मक परिस्थितीत लागते,असाच सर्वसामान्य लोकांचा अनुभव असतो.सामान्यतः कौटुंबिक कलह हे समझौत्याने,तडजोडीने,आपापसातल्या बोलण्यांनी संपवले जातात.त्यासाठी कोर्टात जाणे कमीपणाचे असे अजूनही मानले जाते.पण एकाच कारखान्यावर किंवा आस्थापनेवर जीविका अवलंबून असणाऱ्या मालक-मजूर संबंधात मात्र गृहीतक कलहाचे असून तिकडेच लोकांचा ओढा दिसतो !
 १४.१३ भारतीय परंपरेला अनुसरून या कायद्यातली सारी पहिली कलमे समझौत्याची (द्विपक्षीय करार),समन्वय (कन्सिलिएशन),लवादाची (आर्बिट्रेशन) अशी आहेत.कोणतेही प्रकरण कामगार न्यायालयात सरकारच्या निर्देशाशिवाय जाऊ शकत नाही.या कायद्यांखालील कामकाज कामगार न्यायालयातसुद्धा वकिलांच्या लुडबुडीशिवाय व्हावे असा मूळ विचार आहे.उभय पक्षांनी मान्यता दिल्याशिवाय वकील उपस्थित राहून कोणत्याही बाजूने,कामकाजात भाग घेऊ शकत नाहीत.राजकीय नेते तर मालक-मजूर संबंध हे सलोख्याचे,समन्वयाचे असावेत याबद्दल भाषणे देतात.परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र कन्सिलिएशन वगैरे उपचार म्हणून पाळले जातात.कन्सिलिएशन ऑफिसर किती तडजोडी घडवून आणतात व किती फेल्युअर रिपोर्ट देतात यांची आकडेवारी पाहिली तर समन्वय ही कल्पना किती तुच्छतेने पाहिली जाते ते लक्षात येईल.दोन्ही पक्षांचा खरा जोर कोर्टात जाण्याकडे असतो.कामगारांचा कुठलाही अर्ज कोर्टात जाण्यास मंत्री नकार देत नाहीत.
 १४.१४ मी व्यवस्थापक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केल्यानंतरच्या पहिल्या काळात या सर्व प्रक्रियांतून गेलो.कोर्टाच्या वाऱ्या केल्या,कंपनीच्या वतीने सुप्रीम कोर्टापर्यंत खटले लढवून पाहिले.न्यायालयात जाऊ,अनुकूल निर्णय मान्य करू किंवा त्यावर अपील करू,उच्च न्यायालयात जाऊ,सर्वोच्च न्यायालयात जाऊ अशा साऱ्या अनुभवातून गेलो.समोरासमोर द्विपक्षीय करार केला तर आपण फसवले जाण्याचा,दबावाखाली सही करण्याचा प्रश्न येतो.तेव्हा तो मार्गच नको.साधा उपाय म्हणजे न्यायालयात जाण्याचा असे मलाही सुरुवातीला वाटत असे.
 १४.१५ पुढे हळुहळू हे लक्षात आले,की कायद्याची,न्याय करण्याची सारी प्रक्रिया मुळात वांझोटी आहे.त्यातून हक्क शाबीत होतात,जय-पराजय नक्की होतो,मी बरोबर की तो बरोबर हे जाहीर होते,पण काहीतरी उत्पादन,काहीतरी मूल्यवर्धन (व्हॅल्यू अॅडिशन) हा जो कुठल्याही कारखान्याचा किंवा कंपनीचा मूळ उद्देश तो मात्र साध्य होत नाही.काहीही घडवायचे असेल तर त्याला या प्रक्रियेचा उपयोग होत नाही.यात मुळात निर्मितिक्षमतेची बीजेच नाहीत.उत्पादकतेतली वाढ,उत्पादनातली वाढ ही त्यांतून प्राप्त होत नाही.कारण मुळात हे समाजवादी कायदे ज्या वर्गकलहाच्या,आहेरे-नाहीरे या वर्गगटांच्या कल्पनांवर आधारलेले आहेत,तो आधार मुळात लुटीची वाटणी अशा प्रकारचा आहे.केकची वाटणी कशी करायची असा तो विचार आहे.खायचे हिस्से ठरवण्याचा भाग आहे.केक कसा तयार करायचा,त्याचा आकार कसा वाढवायचा याचा त्यात विचार नाही.केकचा आकार सामूहिक श्रमाने वाढत असतो किंवा निदान वाढायला हवा हे त्यात बसत नाही.
 १४.१६ कायद्याने स्वयंपाक होत नाही,जेवायला वाढले जात नाही,आजाऱ्याची शुश्रूषा होत नाही,घर चालत नाही,घराची बरकत होत नाही,हा प्रत्यक्ष अनुभव आहे.याउलट,आमचे कायदे मात्र उत्पादनवाढ,उत्पादकता कायद्याने वाढेल अशा कल्पनेवर आधारलेले आहेत.
 १४.१७ अमेरिका या वर्गकलहाच्या जोखडातून १९३३ सालापर्यंत सुटलेली नव्हती.अमेरिकेजवळ नैसर्गिक साधनसंपत्ती खूप होती,पण तयार केक नव्हता.त्यांच्याही कायद्यांवर लुटीचा केक वाटण्याच्या ब्रिटिश विचारपद्धतीचे जोखड होते.ते त्यांनी १९२९ सालच्या सार्वत्रिक मंदीनंतर झुगारून दिले,तर भारतातल्या पुढाऱ्यांनी रशियन समाजवादी स्वर्गाच्या स्वप्नाच्या आधारावर त्याच सुमारास ते जोखड उचलून मानेवर स्वखुशीने चढवून घेतले! अमेरिकेत कामगारांच्या करारांना नित्याच्या व्यापारी करारांचे (कॉण्ट्रॅक्टचे) स्वरूप आहे.सरकार त्यात सहसा पडत नाही.युनियन्स जबाबदारीने वागतात आणि सामूहिक सौद्याच्या करारावर काम चालते.कामगार कठीण काळात पगारकपातही स्वीकारतात.नोकरीची शाश्वती कामाच्या शाश्वतीवर ठरते.नेमणूक-पत्रावर नाही.श्रमाचा पुरवठा हा लवचीक असतो.युनियनने किंवा कामगाराने कराराचे पालन केले नाही तर त्यांना दंड होऊ शकतो.सारांश,केकची निर्मिती ही प्रथम व तिचे वाटप नंतर असा व्यावहारिक मार्ग तिथे पाळला जातो.मागरिट थेंचर १९८० साली पंतप्रधान होईपर्यंत ब्रिटनमधले नेतेसुद्धा त्याच जोखडाखाली वावरत होते.ब्रिटनची प्रगती वरच्या दर्जाच्या औद्योगिक राष्ट्रापासून खालच्या दर्जाच्या पायरीवर घसरेपर्यंत वर्गकलहाचा मंत्र हा कामगार मालक संबंधातला मूलमंत्र होता.तेच पायाभूत तत्त्वज्ञान होते.
 १४.१८ ब्रिटिश संकल्पनेची आणि रशियन साच्याची ही चौकट आमच्या नवस्वातंत्र्याच्या सुरुवातीलाच आमच्या शहाण्यासुर्त्या देशभक्त पुढाऱ्यांनी इंग्लिशमध्ये विचार करून,आमच्या सामाजिक वास्तवाचा विचार न करता आमच्यावर लादली.मी पश्चिम व पूर्व जर्मनीत १९९६ साली गेलो होतो. त्यावेळी पूर्व जर्मनी रशियन जोखडातून नुकताच मोकळा (१९९२) झाला होता.त्यामुळे जुन्या लादलेल्या राजवटीच्या खुणा उपलब्ध होत्या.माझ्यासारख्या सामान्य प्रवाशाला रेल्वेतून प्रवास करताना दोन पद्धतीतला फरक स्पष्टपणे खिडकीतून दिसत होता.एकाच वंशाचे,हवामानाचे,धर्माचे दुभंगलेले राष्ट्र डोळ्यांसमोर सांधत होते.प्रयोगशाळेसारख्या स्थितीत समाजवादी पद्धतीच्या व खुल्या बाजारपेठेच्या आर्थिक विचारांचा फरक दिसत होता.आमच्या सर्व पुढाऱ्यांना खुली बाजारपेठ व समाजवाद यांचे एकाच देशातले दोन्ही प्रयोग पाहायला १९५० सालापासून उपलब्ध होते,पण त्यांनी ते पाहायचे नाकारले.माझ्याच एका आयुष्यात रेशनिंगपासून आजपर्यंत गेल्या पंधरा वर्षां भारतात झालेले बदल मी पाहतो आहे.फुकट गेलेल्या वर्षांची जाण मनाला जास्त झोंबते.
 १४.१९ ब्रिटिश विचारपद्धतीच्या जोखडाला पहिला धक्का महात्मा गांधी या, लंडनमध्ये कायद्याची पदवी संपादन केलेल्या एका द्रष्टयाने दिला होता.त्यांच्या स्वातंत्र्यचळवळीत ती सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्याचा जसा विचार होता तसा कोर्टापेक्षा समझौत्याला,तडजोडीला महत्त्व देण्याचा आग्रह होता.अहमदाबादमधली मजूर महाजन ही कामगार संघटना त्यामुळेच कामगारांच्या संघटित शक्तीच्या जोरावर द्विपक्षीय करार करत आली.महात्माजींच्या चळवळीत सरकारी कोटींवर बहिष्कार हा मोठा मुद्दा होता,पण त्याचा विचार स्वातंत्र्यलढ्यातले एक साधन एवढाच झाला.कोर्ट शाबूत राहिली व स्वातंत्र्योत्तर काळात तर प्रचंड प्रमाणात फोफावली. कोटींवर उपजीविकेसाठी अवलंबून राहणाऱ्या न्यायाधिशांची,वकिलांची,कारकुनांची,शिपायांची मोठी फौजच गेल्या पन्नास वर्षांत भारतात वाढली आहे.कोर्ट अक्षरशः तुडुंब भरून राहिली आहेत व सारे जण त्यांच्यात वाढ करण्याची मागणी करत आहेत.अनुत्पादक लोकांची,वकिलांची एवढी फौज अमेरिका सोडून क्वचितच कुठे असेल! वकील ही अमेरिकेचीसुद्धा मोठीच डोकेदुखी आहे.महाराष्ट्र सरकारची गेल्या काही वर्षांत चालू झालेली तंटामुक्त गावांची आबा पाटलांची योजना शहरी लोकांना माहीतच नाही!
 १४.२० विनोबा भावे यांनी 'आहेरे' आणि 'नाहीरे' या सामाजिक विभागणीला नेटका नकार दिला.शंभर टक्के भारतीय मुशीतून घडलेल्या या अद्वितीय विचारवंताने ही परस्परविरोधी,मूळ दोन वर्षांची द्वैताधारित कल्पनाच नाकारली.प्रत्येक माणूस हा आहेरे असतो.त्याच्याजवळ समाजाला देण्यासारखे काहीना काही असते.तो केवळ घेणारा,लाचार नाही.तो देणाराही आहे.तो स्व-तंत्र असतो.तो केवळ यंत्रातला निर्जीव खिळामोळा नसतो.भारतीय तत्त्वज्ञानाच्या भक्कम अद्वैती पायावर सर्व समाज हा एखाद्या शरीरासारखा आहे.सर्व जीव हे त्याचे घटक किंवा अवयव आहेत.ह्या पायावर त्यांनी त्यांच्या भूदान,ग्रामदान या विचारांची मांडणी केली आणि कोणी कल्पनाही केली नव्हती एवढी म्हणजे पंचेचाळीस लाख एकर जमीन केवळ माणसातल्या चांगुलपणाला आवाहन करून विनामूल्य मिळवून दाखवली!त्यांनी हे प्रत्यक्ष घडवून दाखवले.माणूस केवळ आर्थिक पशू नाही,तर संपूर्ण मानव आहे याचा नमुना तयार करून दाखवला.परम साम्य शोधण्याची दिशा दाखवली.त्यानंतर झालेल्या सरकारी कायद्यांनीही एवढी जमीन मिळवता आलेली नाही.
 १४.२१ मी या नव्या भारतीय नजरे'ने १९७२ सालापासून पाहू लागलो.मला इंग्लिश संकल्पनांची झापडे जाणवू लागली.त्यानंतरच्या पंधरा वर्षांत मी फक्त द्विपक्षीय करारांचा आग्रह धरून कोर्टाची पायरी न चढता मालक-मजूर संबंधांची चांगली मालिकाच पंधराशे कामगारांच्या दोन कारखान्यांत राबवू शकलो.माझे विचार प्रत्यक्ष प्रयोगाने तपासून घेतले.त्यासाठी १९६६ सालापासून १९९० सालापर्यंत सतत दर महिन्याला कामगारांशी संपर्क माध्यम म्हणून मासिक पत्रिका चालवली.माझ्या स्वतःच्या विचारात व नंतर आचारात संपूर्ण बदल (ट्रान्स्फॉर्मेशन) झाला आणि घडवलाही.

संप व बंदकाम




 १५.०१ कामगार संप का करतात?कुठल्याही उद्योगधंद्याशी,कारखान्याशी संबंध असलेल्या व्यवस्थापकासमोर हा प्रश्न कधी ना कधी येत असतो.मुळात माणसे काम का करतात ? हा प्रश्न मनासमोर यायला हवा,पण आपण त्याचा विचार करत नाही.आपण त्याची जाणीव ठेवत नाही.जोपर्यंत माझा पाय,हात,पाठ,मान,दुखत नाही तोवर मला पाय,हात,पाठ,मान आहे याची स्पष्ट जाणीव नसते.त्या त्या अवयवांची कामे चालू असतात तोपर्यंत आपण ती गृहीत धरून चालतो.त्यांची फिकीर करत नाही,पण हे कुठवर? जोपर्यंत सर्व शरीर तंदुरुस्त आहे तोवर.जरा का पायात काटा मोडला,ठणका बसू लागला की आपल्याला लगेच पाय आहे,त्याला बोटे आहेत हे जाणवू लागते.आपले लक्ष तिकडे लागते.जणू काही पायातला काटा हा आपल्या दृष्टीने जगातला सर्वांत महत्त्वाचा प्रश्न बनून जातो.दुसरे काही सुचत नाही,समजत नाही.व्यवस्थापनात कामगारांचा संप,त्यांची कुरबूर हा प्रकार असाच असतो.शरीराच्या एका लहानशा भागाचे दुखणे हे साऱ्या शरीराचे,साऱ्या संवेदनांचे केंद्र बनते.
 १५.०२ दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली गोष्ट आहे.जनरल माँटगोमेरीने एका स्वारीच्या सामानाच्या तयारीची यादी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्याकडे पाठवली.त्यांत दोन डेंटल खुर्त्यांसाठी मागणी होती.ती पाहून चर्चिल रागावले.त्यांनी माँटगोमेरींना विचारले,की तुमचे सैनिक लढायला जात आहेत,त्यांच्या लढाईची ही तयारी आहे की दुसरेच काही आहे?आपले सैनिक आपण लढायला पाठवत आहोत,कँप ठोकायला नव्हे.पण माँटगोमेरींचे पाय घट्ट जमिनीवर वावरणाऱ्या जनरलचे होते.रोज,तो त्याच्या जवानांबरोबर राहात होता,फिरत होता,बोलत-चालत होता.त्यांने चर्चिलना ताबडतोब जबाब दिला.तो म्हणाला,महोदय,आपले सैनिक लढायलाच जात आहेत,सारी तयारी त्यासाठी आहे.पण लढायांच्या इतक्या वर्षांच्या अनुभवावरून सांगतो,की दाढदुखीची ठुसठुस लागलेला सैनिक बंदुकीचा नेम धरून तिचा वापर करू शकत नाही किंवा रणगाड्यातल्या तोफेला बत्ती देऊ शकत नाही.त्याच्यासाठी दाढदुखीवर त्वरित उपचार करूनच त्याला लढायला पाठवावे लागते.चर्चिल समजून चुकले व माँटगोमेरींनी मागितलेल्या डेंटल खुळ मंजूर झाल्या.
 १५.०३ जनरल माँटगोमेरींना जे समजले तसे ते प्रत्येक कारखान्याच्या व्यवस्थापकाने समजून घेण्याची आवयकता असते.हे प्रत्यक्षाचे भान,जमिनीचे भान महत्त्वाचे आहे.भारतातल्या बऱ्याचशा नेत्यांचे ज्ञान पुस्तकी होते.बहुतेक सारे डॉक्टर,वकील,शिक्षक,प्राध्यापक पुस्तकी पेशातले होते.वस्तूंच्या उत्पादनाचा किंवा पानाची गादी चालवण्याचाही अनुभव त्यांच्यापाशी नव्हता.त्यामुळे शाब्दिक चिकित्सेचे कौशल्य व पुस्तकी किंवा शब्दांचे ज्ञान होते.त्या जोरावर त्यांनी पुस्तकी उत्तरे शोधली.घटपटाची चर्चा हा तर परंपरेतून चालत आलेला वारसा होता.जग जिंकावे,राज्य वाढवावे,व्यापार वाढवावा,ही प्रेरणाच हजार वर्षांच्या राजकीय गुलामगिरीमुळे नष्टप्राय झालेली होती.त्यामुळे त्यांनी कायदे बनवले ते मुळात उत्पादनप्रेरणेच्या विरोधी.कुठलाही उत्पादन करणारा हा जणू शत्रू,गुन्हेगार असे समजून सारी रचना आखण्यात आली.केक तयार करणे किंवा वाढवणे यात कुणालाच रस नव्हता.सारा जोर वाटणीवर व हिस्सा मागण्यावर,मग भाउबंदकीपेक्षा वेगळे काय निष्पन्न होणार?
 १५.०४ त्यामुळे संप,काम न करणे,बंद,घेराव,मंद काम ही नुसती राजमान्य नव्हे तर लोकप्रिय आणि भूषणाची साधने झाली.समाजापुढे पाच हजार माणसांना काम देणारा उद्योगपती हा आदर्श न ठरता पन्नास हजार लोकांना संपावर नेणारा आदर्श व हिरो ठरू लागला.हिंसक निदर्शने,बसेस जाळणे,माणसांना मारणे हे नित्याचे होऊन बसले.औद्योगिक व्यवस्थापनात.सारे महत्त्व 'लेबर प्रॉब्लेम'ला प्राप्त झाले.उत्पादनातील सुधारणा,कमीतकमी किंमतीत जास्त उत्पादन,जास्त चांगला दर्जा या गोष्टींना महत्त्व उरले नाही.या गोष्टी बाजूला पडल्या.औद्योगिक शांतता टिकवणे किंवा विकत घेणे हे व्यवस्थापनासमोरचे पूर्णवेळचे काम होऊन बसले.
 १५.०५ कुठलाही उद्योग सुरू करणाऱ्याचा वा व्यवस्थापन करणाऱ्याचा रस तो उद्योग चालण्यात असतो.कारखाना चालला तर पगार मिळणार हे सत्य सर्वांना माहीत असते.पण व्यवस्थापन व कामगार यांच्या संबंधात सदैव संपाबंदामंदकाम,म्हणजेच कुठल्याही प्रकारे उत्पादनात घट किंवा खीळ हीच शक्तिप्रदर्शनाची साधने का असावीत?संपाला उत्तर म्हणजे टाळेबंदी म्हणजे पुन्हा काम थांबवण्याचीच गोष्ट!
 १५.०६ संप,बंद,विध्वंस,उत्पादनात खीळ या गोष्टी समाजाच्या हिताच्या नाहीत,याबद्दल सर्वांचे व राजकारणी लोकांचेही एकमत असते.मग संप का होतात?तर त्याचे सोपे उत्तर तो व्यवस्थापनावर दबाव टाकण्याचा प्रकार हेच असते.कुठल्याही मालकाला,व्यवस्थापकाला तुम्ही विचारलेत तर तो तत्परतेने सांगेल की संप हा वाईट मार्ग आहे.मग कामगारांनी त्याच्या अडचणी,अपेक्षा किंवा त्यांच्या श्रमाची किंमत वाढवून मिळवण्यासाठी काय करावे? त्यासाठी व्यवस्थापनावर दबाव कसा आणावा? घरातली गृहिणी तिच्या स्वतःच्या अपेक्षा पुऱ्या झाल्या नाहीत तर मनातला असंतोष,राग,अबोला धरणे,स्वयंपाक बिघडवणे,भांड्यांचा आवाज जास्त वाढवणे अशा मार्गाने व्यक्त करते ना? व्यवस्थापन-कामगार संबंधात सतत मतभेद,अपेक्षाभंग,गैरसमज हे होतच राहणार. कामगार त्यांचे प्रश्न समूहात्मक कृतीने सोडवणार,कारण त्यांची परिणामकारक शक्ती समूहरूपात असते,वैयक्तिक रूपात नव्हे.संप,बंद, मंदकाम यांचा हा अर्थ असतो.ती कृती प्रतीकात्मक असते.त्यामुळे होणारे नुकसान हे कामगार व मालक या दोघांचे असते.
 १५.०७ तुम्ही वर्गयुद्ध मानणारे,मालक हे शत्रूवर्गाचे असतात असे मानणारे असाल तर तुमचा मार्ग सोपा असतो.संप यशस्वी झाला तर कामगारांच्या मागण्या मान्य होऊन त्यांच्या पदरात आर्थिक फायदा पडतो.पण संप अयशस्वी झाला तर भांडवलदारांचे नुकसान म्हणजे भांडवलशाही या वर्गशत्रूचे वर्ग म्हणून नुकसान होते,अशी तत्त्वज्ञानात्मक मांडणी करता येते.कारखाना संपांनी बेजार होऊन बंद पडला तर एका मालकाबरोबर शंभर कामगार उघडे पडतात हे वास्तव कोणी लक्षात घेत नाही.वर्गयुद्ध वगैरे गोष्टी पुस्तकात स्पष्ट व सोप्या वाटतात,नको इतक्या सोप्या असतात.रोजच्या दुपारच्या भुकेची सोय प्रत्येक व्यक्तीला महत्त्वाची असते.त्याची व्यवस्था रोजच्या रोज तिला करावी लागते.कारण दुपारी भूक लागण्याची वाईट सवय त्याला व त्याच्या घरच्यांना असते.१९८२ साली सुरू झालेला गिरणी कामगारांचा संप कायदेशीर दृष्टीने अजूनही चालूच असेल.खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या म्हणीतली अटीतटीची भाषा पुढाऱ्यांना परवडते,कारण त्यांचा संबंध म्हणीच्या पहिल्या भागाशी येतो,पण हजारो लोकांचा संबंध दुसऱ्या भागाशी येतो.ते उपाशी राहतात आणि त्यांचे हाल कुत्रा खात नाही.
 १५.०८ पण मग दबावाचे साधन म्हणून पर्याय काय? असंतोष कसा व्यक्त करणार? ह्याचे जपानमधले उत्तर वेगळे आहे.जपान हा स्वयंप्रज्ञ देश आहे.त्यांच्या काही परंपरा आहेत.जपानमध्ये औद्योगिक संबंधात काही असमाधान निर्माण झाले तर कामगार संप करत नाहीत.ते काळ्या पट्टया लावून काम करतात,पण उत्पादन बंद पाडत नाहीत.जर कारखान्यात लोकांनी काळ्या पट्टया लावल्या तर व्यवस्थापकांना ते लांच्छनास्पद वाटते.ते काळी पट्टी ही मेलेल्या औद्योगिक समन्वयाची खूण मानतात.अतिरेक झालाच तर व्यवस्थापक त्यासाठी आत्महत्याही करतात.पण अन्यथा व्यवस्थापक काळ्या पट्टीचा हा निषेध,संप समजून असंतोष मिटवण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नास लागतात.औद्योगिक विवाद संपवतात,तडजोड करून प्रश्न मिटवतात.कोणत्याही परिस्थितीत मालक किंवा मजूर उत्पादन बंद पाडत नाहीत.हा आहे कन्फ्युशियन परंपरेवर आधारलेला समन्वयाचा मार्ग.
 १५.०९ पाश्चात्य विचारात संघर्ष अटळ समजून,दोन पक्ष म्हणजे विरोधक किंवा शत्रू असे मानणाऱ्या परंपरेत संप हे न्याय्य शस्त्र मानतात.विरोधातून,संघर्षातून विकास या सूत्रावर सारे चालते. त्याबरोबरच करार पाळण्याचे पावित्र्यही महत्त्वाचे मानले जाते.करार दोन्ही बाजूंनी पाळतात.नफा-नुकसान काहीही झाले तरी करार पाळतात.कामाचे तास कराराने कमीअधिक होऊ शकतात.उत्पादन कमी तर पगार कमी,उत्पादन जास्त तर पगार जास्त,मंदी आली तर कामगारसंख्येत कपात किंवा पगारात कपात,असली बंधने युनियन्स मान्य करू शकतात व असल्या अप्रिय गोष्टी पाळतात.करार न पाळण्याचे परिणाम दोन्ही बाजूंना भोगावे लागतात.कोर्ट मालकांना व युनियन्सना दंड करतात व तो भरावा लागतो.भारतात करार पाळणे कुणालाच महत्त्वाचे वाटत नाही.कामगार कायदे मुळात कामगारांना जास्त न्याय देणारे बनवून,करार या गोष्टीची किंमतच नाहीशी केलेली आहे.कारण मुळात,सरकार हे मायबाप आणि कामगार हे फक्त मागणारे अशी भूमिका कायदे करणाऱ्या लोकांच्या मनात असते.कामगार म्हणजे श्रम विकणारे ही भूमिकाच नसते.त्यामुळे सामुदायिक सौद्याचा करार कामगारांकडून अमलात आणण्याचा युनियनने प्रयत्न केलाच तर दुसरी युनियन तिथे घुसून बसण्याची शक्यता असते.मालकांच्या दृष्टीने सारे करार एकतर्फी बनतात.कराराचा कायदा सोडून,त्याला कल्याणकारी कायदा म्हणून राज्यकर्त्यांनीच हे कुरण मोकळे करून दिले आहे.
 १५.१० युनियन ही कामगारांच्या वतीने सामूहिक सौदा करणारी संस्था असते.श्रमाची बाजारभावाने किंमत मिळवून देणे हे तिचे काम असते.पगार कंपनी देत नसते तर कंपनीने उत्पन्न केलेला माल पगार देत असतो.कंपनी स्पर्धेत टिकली तरच पगाराची शाश्वती असते.उत्पादन केलेली वस्तू बाजारात खपली तर कंपनी चालते.तिथे सतत नवे स्पर्धक येत असतात.जागतिकीकरणाच्या विरुद्ध ओरडा केला जातो,तो संरक्षित वर्गाकडून.त्यात मालक आले व कामगारही आले.भारतीय शेतकऱ्यांशी स्पर्धेत टिकू शकणार नाही म्हणून युरोपीयन शेतकरी संप करतात.अमेरिकन कामगार त्यांच्या सरकारवर दबाव आणून आयात निर्बंध आणू पाहतात.जगातले सर्व कामगार एक नाहीत हे सिद्ध करतात.कंपनी पगार देत नाही तर ती पगार वाटत असते हा विचार सर्वोच्च भांडवलशहा म्हणून ज्याची गणना केली जाते त्या हेन्री फोर्ड या अमेरिकन उद्योगपतीचा आहे.कारखाना सरू करणे वा बंद करणे हा मालकांचा अधिकार असतो,जसा श्रम विकणे किंवा न विकणे हा हक्क कामगारांच्या सामूहिक निर्णयाचा असतो.कच्चा माल,यंत्रे,जमीन,व व्यवस्थापन हे उत्पादनाचे जसे घटक आहेत तसाच श्रप हा घटक आहे.त्याच्याही किंमतीत चढउतार होणे हे बाजारव्यवस्थेत अपरिहार्य असते.त्यात लवचीकता असेल तरच स्पर्धेत टिकता येते.मालकाच्या कंपन्या सुरू करण्याचा,वाढवण्याचा,तसेच बंद करण्याचा हक्क पाश्चात्य देशात मान्य केला गेलेला असतो.
 १५.११ भारतातली परिस्थिती त्रिशंकूसारखी लटकणारी आहे.भारतीय परंपरा समन्वयाची आहे,झगड्याची नाही.असे असल्याने कारखाना बंद पाडणे हा कोणाचा अधिकार असू शकतो असे लोकांना वाटत नाही.तडजोड व्हावी ही सगळ्यांची भावना असते.सर्व माणसेच काय,पण सर्व सजीव हे एकमेकांची भावंडे आहेत,कारण ते एकाच परमतत्त्वाचे अवयव आहेत असे मानणाऱ्यांची भारतीय परंपरा आहे.औद्योगिक संबंधातले तंटे कौटुंबिक कलहाप्रमाणे सोडवले जावेत ही लोकांची अपेक्षा असते.काळ्या पट्टयांचा संप ही कल्पना खरे तर भारतीय व्यवस्थापकांना व मालकांना जवळची वाटायला हवी.
 १५.१२ महात्मा गांधींचा उपोषणाचा किंवा आत्मक्लेशाचा भारतीय मार्ग,त्यांचे अनुयायी म्हणवणाऱ्यांनी त्याचा ऊठसूट वापर करून बदनाम केला.इंग्लिश विद्येवर पुष्ट झालेल्या भारतातल्या अभिजन वर्गाने महात्मा गांधींची उपोषणाची कल्पना ही चेष्टेची गोष्ट मानली.त्यानंतरच्या काळात पुढच्या पिढीने उपोषणाचे साखळी उपोषण करून त्या संकल्पनेचा कचरा करण्याचे काम केले.अहमदाबादच्या कापड गिरणी मालकांच्या पढायच्या समोर त्याचीच बहीण कामगारांच्या बाजूने आत्मक्लेशासाठी उपोषणाला बसली तेव्हा ते धर्मयुद्धच बनले.त्या गृहस्थधर्मी भावाला त्याची घरातलीच बहीण उपाशी असताना जेवता कसे येणार?अशा स्वरूपाचा उपाय,इतर सर्व उपाय थकल्यावर योजणारा महात्मा एखादाच असतो.हा मार्ग भारतीय विचारधारेशी जास्त जवळचा होता.इंग्लिश वाघिणीचे दूध प्यालेल्या व्यवस्थापकांना खुळा वाटणारा होता.
 १५.१३ 'युनिकेम' कंपनीचा रायगड जिल्ह्यात रोह्याला एक कारखाना आहे.वसंतराव खानोलकर हे तिथल्या कामगारांचे नेमस्त प्रवृत्तीचे पुढारी होते.त्यांची युनियन त्या कारखान्यात मान्यताप्राप्त असताना ते जपानला जाऊन आले.त्यांनी तिकडे कामगारांचे हे काळ्या पट्टयांचे तंत्र पाहिले.मी रोह्याच्या 'युनिकेम'च्या कारखान्यात वेतनविषयक करारांची परंपरा निर्माण केली होती, पण त्यावेळी वाटाघाटी अडकून पडल्या होत्या.तिथे मागण्या धसास लावण्यासाठी त्यांनी नोटीस लावून काळ्या पट्टयांनी निषेध व्यक्त करणे आरंभले.मला ही बातमी फोनवर समजली.रोह्याचे तेव्हाचे व्यवस्थापक बारदेशकर हे तरुण उमदे ख्रिश्चन गृहस्थ होते.त्यांनी मला सांगितले,की उत्पादन चालू आहे,संप नाही,पण कामगारांनी काळ्या पट्टया लावून काम चालू ठेवले आहे.मी त्यांना सांगितले,की याचा अर्थ तुम्ही प्रत्यक्ष संप सुरू आहे असाच समजा.संप सुरू असताना तुम्ही व ज्या वेगाने कारवाई केली असती ती लगेच करा.बोलणी अडकली आहेत ती त्वरित सुरू करा आणि तंटा संपवण्याचा प्रयत्न करा.माझ्या मंबईतल्या काही सहकाऱ्यांचे मत निराळे होते.त्यांचे म्हणणे असे होते,की काळ्या पट्टयाच काय पण काळे कपडे घालून जरी लोक कामावर आले तरी चिंता करू नका.संप करण्याची त्यांची ताकद नाही म्हणून त्यांनी ही नाटके सुरू केली आहेत.काहीही करण्याची आवश्यकता नाही.मला हे पटले नाही.रोह्याचे व्यवस्थापक बारदेशकर ख्रिश्चन असल्यामुळे काळ्या पट्टयांचा औद्योगिक संबंधांच्या मृत्यूचा संदर्भ त्यांना जास्त जाणवला असेल पण त्यांनी माझा मुद्दा मानला व अंमलात आणला.तातडीने समझौता झाला.उत्पादनात खंड न पडता त्रैवार्षिक वेतन करार करण्यात आला!'युनिकेम'च्या रोह्यातल्या कामगारांनी संपाला काळ्या पट्टयांचा वापर हा पर्याय मान्य केला व वापरला.
 १५.१४ वसंतराव खानोलकरांसारख्या नेतृत्वाने संपाचा वेगळा प्रयोग केला; एक नवीन पायंडा पाडला आणि त्याचा उपयोग पुढेही चालू राहिला.मला स्वतःला या नव्या कल्पनेचे कौतुक वाटले.मी या कल्पनेचे नवेपण आणि परिणामकारकता याबद्दल 'युनिकेम परिवार' या कंपनीच्या मासिक पत्रिकेत स्वागतपर लिहिले.मुंबईतल्या कामगारांसमोर सणासमारंभात बोलण्याची वेळ येई तेव्हा त्या गोष्टीचे अनेक वेळा कौतुक केले.मला असे वाटले की सामान्यतः मालक मंडळी किंवा संचालक की जे इतरत्र मालक किंवा उच्च व्यावसायिक होते,त्यांनाही या नव्या प्रकाराचे कौतुक वाटेल.ते संप या प्रकाराबद्दल नेहेमीच निषेध व्यक्त करत असायचे.उत्पादनातल्या खंडाबद्दल किंवा अडथळ्यांबद्दल पोटतिडिकेने बोलायचे,कामगारांना व त्यांच्या पुढाऱ्यांना दोषी ठरवायचे.वसंतराव खानोलकरांनी नवी वाट पाडली,नुकसान न करता दबाव वाढवण्याची अहिंसक पद्धत वापरली,एखाद्या बारदेशकरांनी ती वाट जास्त रुंद केली तर या मंडळींना त्या प्रयत्नाचे कौतुक वाटायला हवे.म्हणून त्यानंतरच्या संचालकांच्या वार्षिक अहवालात या नव्या गोष्टीबद्दल,या नव्या उपक्रमाची नोंद करून कौतुकाचा मजकूर लिहून,तसा मसुदा त्यांच्यासमोर प्रतिवर्षाप्रमाणे ठेवला.मला वाटले होते,की प्रतिवर्षी जसा माझा मसुदा मान्य होत असे तसाच तो त्या वर्षीही होईल.पण तसे घडले नाही.संचालकांचा वार्षिक अहवाल हा कंपनीच्या दृष्टीने महत्त्वाचा दस्तावेज असतो.तो कंपनीच्या सर्व भागधारकांकडे जातो.त्यातली विधाने व हिशेब ह्यांना बँका,सरकारी खाती,शेअरबाजार म्हणजेच कंपनीचे मालक,सावकार या साऱ्यांकडे अधिकृत म्हणून मान्यता असते.त्याला ऐतिहासिक मूल्य असते.मी या नव्या,विघटनकारी नसलेल्या,उत्पादनांत खीळ न घालणाऱ्या पण संपाइतक्याच प्रभावाचा हा मार्ग मी नोंदला होता.
 १५.१५ आमच्या त्यावेळच्या संचालक मंडळाने माझा हा उल्लेख गाळला.त्याच्यावर फारशी चर्चाही केली नाही.त्यांची भूमिका माझ्या सहकाऱ्यांसारखीच असावी.बाकीचा मसुदा मान्य झाला पण मला जाणवलेला हा मुद्दा त्यांना पसंत पडला नाही.त्यांची सूचना मानणे मला क्रमप्राप्तच होते.कारण हा अहवाल त्यांचा होता.मी फक्त मसुदा बनवणारा होतो.मला वाटलेले त्याचे मूल्य व पृथगात्मता त्यांना जाणवली नाही,एवढे मात्र खरे.
 १५.१६ तेव्हा मला एका वेगळ्याच सत्याचे दर्शन झाले. कंपनीचे संचालक,अधिकारी ही सारी उच्चविद्याविभूषित,सजन,गुणी व उत्पादनाचे महत्त्व जाणणारी माणसे होती.पण म्हणून अशा नव्या वाटेचे महत्त्व त्यांना जाणवते किंवा कळतेच असे नाही.त्यांना जशास तसे,संप,मोडतोड ही दबावाची भाषाच जास्त झटकन समजते.गांधींचा सत्याग्रहाचा मार्ग हा त्यांच्या समकालीन विद्याविभूषितांना बावळटपणाचा वाटत होता.
 १५.१७ व्यवस्थापनाच्या भारतीय पायावरच्या पद्धतीचा मार्ग अशाच डोंगरांना उल्लंघून पार करायचा आहे.

कँटिनची सोय व व्यवस्थापन


 १६.०१ कोकणात माझ्या लहानपणी शेतातल्या हंगामी कामासाठी पयरे म्हणजे तात्पुरते मजूर बोलावण्याची पद्धत होती.त्यांचे दोन प्रकार होते.एक म्हणजे सर्व मजूरी रोख पैशांच्या रूपात घेणारे आणि दुसरा सपोटी दुपारचे जेवण घेऊन थोडी मजुरी घेणारा.मजुरीचा दर वेगवेगळा असायचा.माझे मामा १९५७ च्या सुमारास निवृत्त झाल्यावर माझ्या आजोळी शेजारच्या गांवी राहायला गेले.त्यापूर्वी माझी आई त्यांच्या जमीनजुमल्याची व्यवस्था पाहत असे.माझे मोठे मामा होते तोपर्यंत त्यांच्याकडे बोलावलेले पयरे जेवूनखाऊन पद्धतीचे असत.त्यांचे दुपारचे जेवण माझी आई शिजवत असे.माझे धाकटे मामा आल्यावर त्यांनी रोख पैसे देण्याची पद्धत पसंत केली.माझ्या आईकडून त्या पयांना रोख पैसे कमी मिळायचे,पण एक वेळचे जेवण पोटभर मिळत असे.ती रोजच्या रोज पैसे देत असे असेही नाही.पण तिला गरज लागेल तेव्हा आणि तितके पयरे मिळायचे.माझ्या मामाना मात्र सर्व पैसे रोजच्या रोज रोख देऊनही पयरे मिळत नसत.मी घरी जायचा तेव्हा या विषयावर चर्चा व्हायची,पण ही माहिती माझ्या मनांत माहितीच राहिली होती.ती माझ्या ज्ञानाचा भाग झाली नव्हती.
 १६.०२ 'युनिकेम'मध्ये युनियन जेव्हा जेव्हा कँटिनचा प्रश्न उपस्थित करायची तेव्हा माझी भूमिका सरळ व पुस्तकी असायची.कारण कँटिन ही कायम डोकेदुखीची गोष्ट होती व असते.माझे म्हणणे असे होते,की कँटिनमध्ये जेवायचे की घरून डबा आणायचा हे कामगारांनी स्वतःचे स्वतः ठरवावे.कँटिनसाठी जागा,भांडी,वीज,पाणी हे सारे कंपनी देईल,पण प्रत्यक्ष अन्नाची किंवा खाद्यवस्तूंची किंमत कामगारांनी स्वतःच्या खिशातून बाजारभावाने भरली पाहिजे.त्यात कुठलेही अनुदान नसावे.
 १६.०३ अन्न,वस्त्र व निवारा ह्या प्रत्येक माणसाच्या प्राथमिक गरजा असतात.मीही हा पाढा पाठ केलेला होता,पण त्याचे सारे श्लेष मला उलगडलेले नव्हते.पहिला धक्का,मला दिल्लीला झालेल्या एका कंपनी सेक्रेटरीज व फायनॅन्शीयल मॅनेजर्सच्या संमेलनात मिळाला.आम्ही सगळे ओबेरॉय या मोठ्या शाही हॉटेलात जमलो होतो.सगळेजण माझ्यासारखे मोठ्या आर्थिक पदांवरचे लोक होते.बऱ्याच जणांना माझ्यासारखी सक्त आहारनियमनाची आरोग्यदृष्टया गरज स्पष्ट दिसत होती.सारे वजनदार दिसत होते.पहिलेच सत्र जरा बऱ्यापैकी लांबले.आलेले सर्व प्रतिनिधी भुकेले असण्याची काही शक्यता नव्हती. लांबलेले सत्र संपले आणि आमचा सर्वांचा मोर्चा जेवणाच्या प्रशस्त दिवाणखान्याकडे वळला.समोर,त्या आलीशान हॉटेलच्या लोकांनी फार मोठ्या लांबलचक टेबलांवर नाना प्रकारचे चवदार,सुवासिक खाद्यपदार्थ ताजे ताजे व आकर्षक पद्धतीने मांडलेले होते त्याचा घमघमाट सुटलेला होता.त्या दिवाणखान्यात जाताच आमच्याबरोबरच्या सर्व लोकांनी.ज्या पद्धतीने त्या अन्नावर जसा तुटून पडून ताव मारला तो मला तरी एक अविस्मरणीय अनुभव होता.तो सारा प्रकारच अन्नाच्या प्राथमिकतेचा वस्तुपाठ होता.काही मिनिटांतच, सारी टेबले रिकामी झाली आणि त्यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी जो गोंधळ घातला व धक्काबुक्की केली तो प्रसंग अविस्मरणीय होता.त्यानंतरही त्याच प्रकारचे अनुभव अनेक अधिवेशनांत आले.
 १६.०४ माझे अनेक मित्र टाटा,मफतलाल अशासारख्या ख्यातनाम कंपन्यांत वरिष्ठ पदावर काम करत होते.त्यांच्या बोलण्यात त्यांना कंपनीच्या खर्चाने मोठमोठ्या हॉटेलांमध्ये दुपारचे जेवण मिळण्याची सोय असते ह्याचा आवर्जून उल्लेख असायचा.त्यासाठीच्या लंचकूपन्सचा गौरव त्यांच्या बोलण्यात असायचा,माझ्या मनात हळुहळू चांगल्या अन्नाचे पैशापेक्षा जास्त असलेले वेगळे व स्वयंभू महत्त्व ध्यानात आले.चांगले अन्न मिळणे व जास्त पैसे मिळणे यांत लोकांची पसंती चांगल्या अन्नाकडे जास्त असते हे माझ्या मनात ठसले.
 १६.०५ 'युनिकेम'चे कामगार ताज,ओबेराय यांच्यासारख्या जेवणाची अपेक्षा त्यांच्या कैंटिनमध्ये करत नव्हते.मी माझा सारा विचार त्या अन्नाचा खर्च रुपयांत किती होतो एवढ्यापुरता करत होतो.कामगारांची अपेक्षा चांगले, स्वच्छ व सकस अन्न, जेवायला-बसायला चांगली जागा एवढीच होती. माझ्या दृष्टीने त्यांच्या पगाराची रुपयांतली किंमत फक्त मला दिसत होती. हा माझा दृष्टिदोष होता. कामगारांच्या दृष्टीने चांगल्या कँटिनचे महत्त्व पैशांपेक्षा वेगळे व स्वयंभू होते. कितीही पैसे दिले तरी प्रत्येक कामगाराला कँटिनइतके चांगले अन्न घरून आणणे शक्य नव्हते.
 १६.०६ माझ्या मामांना न मिळणारे पण आईला सहज मिळणारे पयरे,ओबेरायच्या जेवणाच्या वेळी मोठमोठे वरिष्ठ व्यवस्थापक अनावर का तुटून पडले,टाटा-मफतलाल मधले वरिष्ठ अधिकारी मित्र मोठ्या हॉटेल्समधल्या लंचकूपन्सची आठवण व कौतुक का करत,या सर्वातला समान धागा माझ्या लक्षात आला.माझा कॅटिनच्या प्रश्नाबद्दलचा रोख बदलला.मी सहा महिन्यांच्या आत 'युनिकेम'च्या जोगेश्वरीतल्या कारखान्यातले कँटिन तिथली यंत्रसामग्री,भांडी,फर्निचर,बसण्याची व्यवस्था बदलून,टाकले.विक्रीच्या प्रमाणावर सब्सिडीची नवी पद्धत सुरू करून कंत्राटदाराकडून मिळणाऱ्या पदार्थांच्या दर्जाची सोय लावून टाकली.कारण अन्न चवदार असल्याशिवाय कोणी खात नाही.विक्री जास्त तर सब्सिडी अनेक पर्टीनी जास्त करून कंत्राटदाराला त्याचे आकर्षण निर्माण केले.औषधांचे दर्जा नियंत्रण उपकरणातून तपासता व राखता येते.अन्नाची चव तपासण्याची यंत्रणा उपलब्ध नाही.खाणाऱ्यांचा प्रतिसाद हा एक निकष असू शकतो.बटाटावड्याचा आकार तपासता येतो,चव तपासणे शक्य नसते.माणसाला जो पदार्थ चवीला आवडतो तोच तो खातो,कोणी बेचव पदार्थ खात नाही.मी कँटिनची सब्सिडी माणसांच्या संख्येवर किंवा महिन्यांवर न ठरवता विक्री झालेल्या कूपन्सच्या प्रमाणात ठरवून तो प्रश्न मार्गी लावला.'युनिकेम'चे कँटिन हे त्या परिसरातले उत्तम कँटिन बनवले.ह्या साऱ्याच्या मागे मनातला चौकटीतला बदल हा महत्त्वाचा होता असे मला वाटते.माझ्या मनाची चौकट बदलली हा माझ्या शिक्षणाचा भाग होता.
 १६.०७ मित्रांशी चर्चा करताना मुद्दा अधिक स्पष्ट झाला.त्यानंतर कोठल्याही अधिवेशनात, लग्नकार्यात केटरर्स त्या कार्यक्रमांचे यशापयश ठरवतात हे स्पष्ट झाले.'मिष्टान्नं इतरेजनाः' हे लग्नकार्यात लक्षात ठेवले जातेच.अधिवेशनातले वक्ते.त्यांची भाषणे.मिळणारी माहिती चर्चा यांच्याबद्दल जेवढे बोलले जाते,त्यापेक्षा जास्त चर्चा तिथे मिळालेल्या जेवणाबद्दल असते.चांगल्या जेवणाची चर्चा जास्त होते.मराठी साहित्य संमेलनात तर साहित्यविषयक चर्चेपेक्षा राहण्याजेवणाच्या व्यवस्थेबद्दल वर्तमानपत्रांत जास्त लिहून येते.संमेलनांत किती क्विंटल भाज्या,फळे,दूध,मटण आणले गेले याचे आंकडेही प्रसिद्ध करण्यात येतात.चांगले भोजन,निवासव्यवस्था,चांगली आंथरुणपांघरुणे,स्वच्छतागृहे यांसारख्या लोकांच्या गरजेच्या गोष्टी किंवा 'क्रीचर कंफर्टस' यांनी संमेलनाचे तीनचतुर्थांश यश नक्की होते असे म्हणतात ते उगीच नव्हे.बाकी कार्यक्रम तोंडी लावण्याच्या पातळीवर लोकांच्या लक्षात राहतात.केवळ साहित्यसंमेलने नव्हे तर वैज्ञानिक परिषदा,परिसंवाद यांतही भोजनाचा मुद्दा महत्त्वाचा बनतो.संयोजकांचे आभार त्यावर ठरतात.ज्यांना ज्यांना अशा आयोजनांचा अनुभव आहे त्या सर्वांचे,मला या विषयावर एकमत आढळले आहे.
 १६.०८ मी अनेक आत्मचरित्रे वाचली आहेत.त्यातही ते लेखक त्यांच्या उतारवयात,बराच कालावधी लोटून गेल्यानंतरही,आठवणीने त्यांच्या आयुष्यात,विशेषतः प्रतिकूल परिस्थितीत मिळालेल्या चांगल्या अन्नाची नोंद करत असतात.माझ्याकडे महत्त्वाची चर्चा करायला आलेले लोक माझ्या घराची आठवण माझ्या बायकोने केलेल्या रुचकर खाद्यपदार्थांवरून काढतात.मी केलेली चर्चा कोणाच्या खिसगणतीतही नसते ! 'अन्नं बहु कुर्वीत' हे वैदिक वचनही या सनातन अनुभवावर आधारलेले असावे.सारांश,औद्योगिक व्यवस्थापनातले कँटिनचे महत्त्व मी असे शिकलो.आपल्या मनात माहिती म्हणून अनेक गोष्टी जमा झालेल्या असतात.त्याची सूत्रबद्ध जुळणी जेव्हा मनात होते तेव्हाच त्याला ज्ञान म्हणता येते.आईच्या जेवुनखाऊनच्या पयांपासून युनिकेमच्या कँटिनपर्यंत माझा मानसिक प्रवास हा असा झाला.तिथे सर्वांसाठी एकाच रसोईघरात एकत्र शिजवलेले भात,पुऱ्या,भाजी,आमटी हे पदार्थ सर्व कर्मचाऱ्यांसाठी सारखे सुरू केले.
 १६.०९ जोगेश्वरीतल्या कारखान्यातल्या कॅटिनमध्ये जेव्हा सुधारणा केल्या त्यावेळी सर्वांना एकाच प्रकारचे अन्न शिजवले जावे ही माझी भूमिका होती.व्यवस्थापनातल्या माझ्या सहकाऱ्यांना सर्वांनी (कामगार व अधिकारी) एका जागेत एकत्र जेवणे ही कल्पना साफ नापसंत होती.त्यांचा विरोध टाळणे अशक्य होते.आमच्या मॅनेजिंग डायरेक्टरांना समानता हे माझे खूळ वाटत होते,तरी त्यांनी ते चालवून घेतले.पैसे खर्च करायला आडकाठी आणली नाही.त्यांनी स्वतःच्या वापरासाठी वेगळे स्वच्छतागृह बनवून सुरुवात केलीच होती.म्हणून जोगेश्वरीच्या कारखान्यातल्या कँटिनमध्ये अधिकारी वर्गासाठी तेच जेवणाचहा पण वेगळ्या खोलीत बसून खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागली.लहानपणी गावात जातीप्रमाणे पंगती पाहिल्या होत्या,त्यांची सहज आठवण होणे अपरिहार्य होते.अन्नपदार्थ एकाच ठिकाणी व एकाच स्वयंपाकघरात बनवलेले पण खाण्याची जागा वेगवेगळी झाली.पुढे तर सहा-सात उच्च अधिकाऱ्यांसाठी वेगळे अन्न शिजवून वेगळ्या पद्धतीचे पदार्थ हा प्रकार सुरू झाला.तोपर्यंत माझा मानव-संसाधनखात्याशी संबंध संपला होता.
 १६.१० काही सामाजिक सत्ये माझ्या प्रत्ययास आली.व्यवस्थापनाच्या भिन्नभिन्न पातळीवरची माणसे स्वतःचा वेग वेगळा वर्ग मानत नसली तरी त्यांच्यामध्ये आपली 'जात' वरची आहे ही भावना असल्याचा सूक्ष्म भास मला झालेला आहे.कामगार म्हणजे 'शूद्र',आपण वेगळे असा संकेत त्यांच्या मनात आढळला.ही गोष्ट 'युनिकेम'च्याच नव्हे तर अन्य कंपन्यांच्या व्यवस्थापकांशी बोलताना मला आढळलेली आहे.कॅटिनमध्ये समान हॉलमध्ये बसण्याबद्दल नाखुशी असल्यामुळे वेगळ्या पंगतीचा आग्रह असावा.हे सारे जण शिक्षित,बुद्धिजीवी,कार्यक्षम लोक होते.पण लेबर किंवा कामगार ही वेगळी जात असा प्रवाह त्यांच्या मनात मला आढळला.मॅनेजिंग डायरेक्टरांनी समानतेच्या पातळीवर मला बोलण्याची संधी द्यायला हवी,माझे म्हणणे समजून घ्यावे,अधिकाराचा वापर करून निर्णय लादू नयेत हे या साऱ्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांचे मत होते.त्यांच्या वरिष्ठांकडून ते तशी अपेक्षा करत होते.अमेरिकन मॅनेजमेंटच्या पुस्तकातली विचारसरणी 'थियरी वाय'ची गोष्ट त्यांना अगदी स्वाभाविक व आवश्यक वाटत होती,पण तोच न्याय त्यांच्या हाताखालच्या लोकांसाठी वापरायला त्यांची तयारी नसते.विनोदाने सांगायचे तर ते खरे 'मुकादम' असतात.म्हणजे वरिष्ठांच्या पदकमलांचा 'मुका' घ्यायची तयारी असणारे आणि हाताखालच्या लोकांना 'दम' देणारे मुकादम.
 १६.११ मी ही पंक्तिप्रपंचाची भावना सगळ्या कंपन्यांतून पाहिली आहे.मॅनेजर्सची,आपल्यासाठी वेगळी कँटिन्स,वेगळी स्वच्छतागृहे,अधिकाराच्या श्रेणीप्रमाणे जेवणाची सोय असावी अशी अपेक्षा असते.कंपनीतल्या सर्वांना चांगले अन्न मिळावे,सर्वांची स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत असा आग्रह नसतो.माझी पंगत वेगळी-सोवळ्याची असावी असा आग्रह असतो.हेही भारतीय वास्तव आहे आणि ते बदलण्याची आवश्यकता आहे.
 १६.१२ वर्गकल्पनेचा भारतीय जन्मजात जातिव्यवस्थेशी झालेला संकर भयानक आहे.पौर्वात्य व पाश्चात्य पद्धतीतल्या त्याज्य भागांचे हे मिश्रण भयानक आहे.भयानक असले तरी ते वास्तव आहे.तो डोंगर ओलांडायला खूप कठीण आहे म्हणून कोणी त्या दिशेने जरासाही प्रयत्न केला तरी त्याचे मला कौतुक वाटते.
 १६.१४ 'युनिकेम'च्या शेजारी एक्सेल इंडस्ट्रीज हा कारखाना जोगेश्वरीत होता.कांतिभाई श्रॉफ हे त्याचे कार्यकारी संचालक होते.ते त्यांच्या कामगारांबरोबरच जेवत.स्वतः थाळी उचलून घेत व उष्टी थाळी परत नियोजित जागी ठेवत.अर्ध्या चड्डीवर कारखान्यात फिरत,मॅनेजर्सना वातानुकूलित नवीन इमारतीत बसवत.स्वतः मात्र त्यांचे काम अक्षरशः जुन्या गोठाच्या छपराखाली झाडापेडांच्यामध्ये,उघड्या सावलीत बसून करत.प्रदूषण निवारणासाठी झाडे लावून हमरस्त्यापासून केवळ तीस फुटांवर बसत.त्यांच्या कंपाउंडच्या बाहेर अनधिकृत सार्वजनिक मुतारी होती.त्यांच्या झाडापेडांच्या पडद्याने त्यांच्या टेबलापाशी जराही घाण येत नसे.त्यांच्या कारखान्यातल्या परिसरातल्या हवेत प्रदूषण नाही हे स्पष्ट करणारी पिंपळाची कोवळी पाने कारखान्याविषयी खूप काही सांगून जात.कांतिभाई हे अजब रसायन आहे.माझ्या अनेक गुरूंतले ते एक असल्याने त्यांची कीर्ती सांगणे आत्मप्रौढीचे ठरेल,पण त्याची पृथगात्मता जाणवण्यासारखी आहे.ते आर्थिक तराजूत भारंभार यशस्वी व कामगार- मालक संबंधातला आदर्श आहेत.अर्थात तो माझा परोक्ष अनुभव आहे.पण संपूर्ण पाश्चिमात्य व्यवस्थापन तंत्रातल्या सर्व अद्ययावत कल्पना पचवून संपूर्ण भारतीय राहिलेले ते एक श्रेष्ठ व्यवस्थापक आहेत एवढे मात्र सर्वमान्य आहे.
 १६.१५ 'युनिकेम'च्या गाझियाबाद येथल्या कारखान्यात कँटिनव्यवस्था जुनीच आहे.मी तेथे बदल करू शकलो नाही.त्यासाठी पैसे उपलब्ध करणे माझ्या हातात होते.ते मी केले पण त्याची अंमलबजावणी स्थानिक मॅनेजरच्या हाती होती.अजूनतरी कोठल्याही प्रकारची गुणवत्ता असलेले कँटिन 'युनिकेम'च्या गाझियाबाद कारखान्यात आहे की काय याबद्दल मला शंका आहे.मी हे माझे अपयश समजतो.
 १६.१६ जो स्थानिक व्यवस्थापक असतो त्याच्या मूल्यव्यवस्थेच्या कल्पनांवरच अंमलबजावणी अवलंबून असते.कंपनी भारतीय असो,अमेरिकन असो,तिच्या व्यवस्थापनाविषयीच्या धोरणांचे रूप कोणीतरी माणसेच ठरवतात,कारण अंमलबजावणीत त्यांच्याच मूल्यांचा विचार कृतीत दिसून येतो.अवकाश एकच असला तरी घटाघटाप्रमाणे त्याचा आकार वेगळा दिसतो हे तर आध्यात्मिक सत्य सांगितले गेलेले आहेच.



 १७.०१ आपल्याच घरात व आपल्याच देशात आपण कसे परके होतो याचे अनेक अनुभव मी माझ्या व्यवस्थापकीय आयुष्यात घेतले.अगदी सुरुवातीसुरुवातीला काही नवीन सत्ये उमजली.मी 'युनिकेम'च्या जोगेश्वरी कारखान्यात काम करायला एप्रिल १९६४ मध्ये सुरुवात केली,तेव्हाच काही काळाने न्या.मेहेर यांचा बोनस निवाडा प्रसिद्ध झाला.त्याबद्दल कामगारव्यवस्थापन व्यावसायिकांत चर्चा चालायची.युनियन्सची घोषणाच मुळी बारा महिन्यांचे काम व तेरा महिन्यांचा पगार अशी होती.ती त्या लवादाने मान्य केली व ८.३३ टक्के बोनस हा कमीत कमी बोनस म्हणून मान्य केला गेला,त्याच्यावर आधारलेला कायदा १९६५ साली पारित झाला.नोंदण्यासारखी गमतीशीर गोष्ट आहे.भारतात १९५७ साली दशमान चलन अस्तित्वात आलेले होते.तरीही बोनसचे प्रमाण ८, ८.५, ९, ९.५ किंवा १० टक्के कमीतकमी असे ठरवले गेले नाही.ते जुन्या घोषणेला चिकटून एकबारांश म्हणजेच ८.३३ टक्के असे झाले.हा शब्दच्छल वाटेल पण तो तसा नाही.एक महिन्याचा बोनस ह्या घोषणेने एकदा का तुमच्या मनाचा कबजा घेतला की मग ८, ८.५ असे त्याचे रूपांतर होऊ शकत नाही.यामुळे त्या संगणक-पूर्व जगात आकडेमोड उगीचच वाढून बसली.अनेक अनुत्पादक कारकुनी नोकऱ्या निर्माण झाल्या.घोषणा कालबाह्य झाल्या तरी ते जोखड मानेवरून सहजासहजी उतरवणे कठीण असते.शास्त्रकारांनी 'शब्दो नित्यः' असे जे म्हटले आहे ते उगाच नव्हे.शब्दप्रामाण्य हे तर मोठे शस्त्र आहे.माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की जो शब्दांसाठी स्वजातीयांची हत्या करायला मागेपुढे पाहत नाही.ऑर्थर कोस्लरने म्हटले आहे,की शब्दांशिवाय काव्य जन्माला येऊ शकत नाही आणि युद्धेही!शब्दांचा अर्थ बदलण्याची किंवा त्यांत नित्य नवा अर्थ भरण्याची भारतीय पद्धत त्यांतल्या त्यात खूप अहिंसक आहे.
 १७.०२ बोनस निवाड्यातच स्पष्टपणे असे मान्य केले गेले,की बोनस हे डिफर्ड केज म्हणजेच पुढे ढकललेला पगार आहे; नफ्याचा भाग नव्हे.म्हणून धंद्यात नफा होवो वा न होवो,तो पगार म्हणून देण्याची जबाबदारी मालकांवर आहे.तो जर पगारच आहे तर तो देणे पुढे का ढकलायचे?जेव्हाचे काम तेव्हा व्हायला हवे हे जर खरे तर जेव्हाचा पगार तेव्हा का नको?किंबहुना त्यावेळी ख्यातनाम उद्योगपती नवल टाटा यांनी तर अशी सूचना केली होती,की बोनस हे डिफर्ड वेज आहे ना मग ते सरळ महिन्याच्या पगारात मिळवून बोनस हा भांडणाचा प्रश्न कायमचा मिटवून टाका.त्यांतला डिफर्डपणा काढून टाका.ते वेजमध्येच मिळवा.मग बोनस,बोनसचे लढे,त्यासाठी संप ह्या सगळ्या भानगडी कायमच्या संपवून टाका.जे झगडे व्हायचे ते वेजवरच होऊ देत,बोनससाठी दरवर्षीचे वेगळे झगडे टळतील.
 १७.०३ कुठल्याही अर्थशास्त्र्याच्या दृष्टीने किंवा हिशेबनिसाच्या दृष्टीने नवल टाटांचा तोडगा बिनतोड होता.मलाही तो पटायचा.तर्कशास्त्राच्या दृष्टीने तो बिनतोड तोडगा होताच,पण जमिनीवरच्या व्यवहारापासून तो दूर होता.हे समजायला मला वेळ लागला.
 १७.०४ मी बोनसवरच्या एका परिसंवादात भारतीय मजदूर संघाच्या गजाननराव गोखल्यांना मला बिनतोड वाटणारा प्रश्न विचारला.त्यांनी मला जमिनीवर आणले.ते म्हणाले,की आपल्याकडच्या सर्वसामान्य कामगाराला पगारातून महिन्याच्या महिन्याला पैसे शिल्लक टाकून वार्षिक खर्चासाठी तरतूद करून ठेवायची सवय नाही आणि बहुसंख्यांना ते जमतही नाही.पगाराचे जे पैसे हातात येतात ते सर्व लगेच खर्च होऊन जातात.मग गणपतीच्या वेळी,दिवाळीला,होळीला,सणासुदीला एकरकमी रक्कम मुलांना आणि स्वतःला कपडे शिवायला,भांडीकुंडी घ्यायला लागते,ती कोठून आणणार?ती कोण देणार? गणिती पद्धतीने विचार केला तर ही वेगळी शिल्लक दरमहा वेगळी ठेवायला काहीच हरकत नाही,पण व्यवहारात ते तसे जमत नाही.प्रॉव्हिडंट फंड सरकारजमा का केला जातो तर ती सक्तीची गुंतवणूक दरमहा करणे,ते पैसे वेगळे गुंतवणे हे सर्वसामान्य कामगाराला जमत नाही.सरकार ते काम कामगारांच्या वतीने करते व त्या गुंतवणुकीवर व्याज मिळवून निवृत्तीच्या वेळी घसघशीत रक्कम एकरकमी हातात मिळण्याची व्यवस्था करते.माझ्यासारख्या अकाऊंट्स शिकलेल्या लोकांना तर सरकारी प्रॉव्हिडंट फंड,सुपरअॅन्युएन फंड,ग्रॅच्युइटी फंडापेक्षा आपण स्वतःच गुंतवणूक केली तर नक्कीच जास्त व्याज मिळवून ह्या रकमा वाढवू असे वाटत असे.एकाददुसऱ्या माणसाला ते साधतेही,पण सर्वसामान्य नियम असा की कटकटीचे हे काम करणे सर्वांना जमत नाही.म्हणून तर लोक म्युच्युअल फंडात त्यांच्या फंडाची रक्कम गुंतवतात.जास्त व्याजाच्या लोभाने खंक होणारेही कमी नाहीत.सर्वसामान्य माणसाच्या हातात आलेला पैसा लगेच खर्च होऊन जातो.त्याला अशी सक्तीची गुंतवणूक करायला लावणे हे सामाजिकदृष्ट्या आवश्यक असते.कामगारांच्याही ते हिताचे असते.बोनस हे डिफर्ड वेज म्हणून एकरकमी वर्षातून एकदा त्याच्या हातात घसघशीतपणे रक्कम पडणे ही त्याची गरज असते.ती गरज दरमहा पगारातून ते पैसे देऊन भागणार नाही.
 १७.०५ एकदा हा विचार मनात रुजला की पगाराची घासाघीस प्रचंड,पण बोनस देताना सढळ हात सोडणारा मालक कामगारांना जास्त का आवडतो हे समजायला सोपे होते.या सामाजिक वास्तवाचे भान ठेवल्यावर मग पगाराचे करार,बोनसचे करार करण्याचा मार्ग सुलभ होतो.माझ्यासारखे अनेकजण हे अनुभवाने शिकतात पण अजूनही तत्त्वपातळीवर यास मान्यता नाही.हे सूत्र, हे जमिनीवरच्या वास्तवाचे भान महत्त्वाचे होते.करार उशिरा झाला तरी त्याबद्दल तक्रार नसते पण एकरकमी मिळणारी थकबाकी पूर्वलक्ष्यी प्रभावाने मोठी रक्कम मिळण्याचे महत्त्व कामगारांना,त्यांच्या पुढाऱ्यांच्या आणि मालकांच्या सोयीचे वाटते व होते.त्याचा बोध होणे मग सोपे होते.
 १७.०६ आदर्शवादी किंवा पुस्तकी दृष्टीने हे पटणारे नाही.मलाही ते पटत नसे. पण हळहळू हे शिकायला मिळाले व शिकावे लागले.शिक्षणाने,पुस्तकातल्या गृहीत प्रमेयांनी व तयार तात्त्विक उत्तरे काढण्याच्या सवयीने आपण व्यवहारात का अडखळतो ते ध्यानात येऊ लागले.दर महिन्याला द्यायची उचल आणि गौरीगणपती व होळीच्या वेळी जादा उचल का द्यायची याचे महत्त्व समजू लागले व सोपे झाले.ज्या समाजात मी जगतो व वावरतो त्याचे धागेदोरे माझ्या व्यवस्थापकीय वर्तनात व वागणुकीत दिसू लागले.या साऱ्या गोष्टींचा अंतर्गत संबंध स्पष्ट झाला.वरवर खुळ्या व अतार्किक वाटणाऱ्या गोष्टीचे वेगळे,स्वयंभू तर्कशास्त्र लक्षात आले.
 १७.०७ माझ्या व्यवस्थापकीय घडणीत एडवर्ड डी बोनो या लेखकाच्या 'बियांड येस/नो:पो' या पुस्तकाचा भाग मोठा आहे.'येस' किंवा 'नो' या वर्गीकरणात आतले।बाहेरचे, इन्क्लुडेड।एक्स्लुडेड यांच्या सीमा किंवा भिंती स्पष्ट असतात.स्वच्छ विचार करताना त्याचा उपयोग असतो.मनातला,विचारातला गुंता स्पष्ट होतो.आपल्या चुका लक्षात येतात.जगातल्या घडणाऱ्या सर्व गोष्टी या आहे।नाही किंवा अरत्र वा परत्र इतक्या स्पष्टपणे वेगळ्या गटात घालता येत नाहीत.तार्किक उत्तर हे साऱ्यांचे एकच येणार पण प्रत्येकाचा संदर्भ,चौकट किंवा कॉण्टेक्स्ट वेगवेगळा असतो.त्याप्रमाणे त्याचे दर्शन त्यांना वेगळे होत असते.त्याने काढलेला अर्थ निदान त्याच्यापुरता खरा असतो.हे एकदा लक्षात आले व भारतातल्या प्रमुख षट्दर्शनांचे आणि मुळात एकाच सर्वकष तत्त्वज्ञानाऐवजी विविध दर्शनांचे महत्त्व माझ्या मनात ठसले.बोनोकडून विनोबांकडे येणे सोपे झाले.
 १७.०८ माझ्या आयुष्यातला अनलर्निंगचा हा प्रयास होता.शिक्षणामुळे एवढ्या काही चौकटी आपण आपल्या मनावर दाबून बसवतो की त्यापलीकडे काही जग आहे,त्या जगाला तसे असण्याचा अधिकार आहे,स्वातंत्र्य आहे हे आपण विसरून जातो.चूक। बरोबर यांचे घट्ट वर्गीकरण शिक्षणामुळे एवढे घटवले जाते,की या लर्निंगपासून अनलर्निंगपर्यंत पोचायला वेळ लागतो.
 १७.०९ विनोबा वाचताना,सु-राज्याची भीती स्वराज्यापेक्षा जास्त असते,कारण सु-राज्यामुळे आपण स्व-राज्यापासून दूर जातो व सुखासीन होतो हे समजायला कठीण असणारे प्रमेय होते,पण बोनो वाचल्यावर ते सोपे झाले.कामगार असे का वागतात यांतला संभ्रम संपला.मला तार्किक दृष्ट्या जी गोष्ट बिनतोड वाटते,ती माझ्या चौकटीस मान्यता दिली तरच बिनतोड असते.चौकट बदलली तर बिनतोड उत्तरे बदलतात हे समजायला बरीच वर्षे जावी लागली.
 १७.१० कामगार-व्यवस्थापन संबंधात या चौकटी फार त्रासदायक असतात.माणसे काम का करतात? पैशांसाठी, स्थैर्यासाठी,पोटासाठी,अन्य मार्ग नाही म्हणून ही वरवर पाहता पूर्ण उत्तरे वाटतात.प्रत्येकाची त्यासंबंधी ठाम धारणा असते.बऱ्याच वेळा त्याची वैयक्तिक भूमिका तो लोकांच्या ठिकाणी कल्पित असतो आणि तिथेच घोटाळा होतो.
 १७.११ माझा अनुभव असा आहे,की वर्गसंघर्षाची मालक-मजूर हे विरुद्ध पक्ष आहेत,त्यांच्यात वैरच असणार,त्यांत एकत्वाची भावना असणारच नाही हा-विचार जे कामगार म्हणजे नाहीरे-वाले आहेत त्यांच्यापेक्षा जे व्यवस्थापक आहेत,म्हणजे जास्त पगार घेणारे नोकर आहेत त्यांच्या मनात जास्त असतो.कापड गिरणी कामगारांपेक्षा पेट्रोलियम कंपन्यांत काम करणारे किंवा औषध उद्योगातले मेडिकल रिप्रेझेंटेटिव हे सुशिक्षित कामगार जास्त वर्गसंघर्षवादी असतात.वेगळी कॅटिन्स, वेगळ्या मुताऱ्या,वेगळ्या सवलती हा त्यांच्या मनातल्या आपण उच्च जातीतले आपण आहोत या भावनेचा आविष्कार असतो.वर्गभावनेचा नव्हे.
 १७.१२ वर्कर हा शूद्र आहे, मुख्य म्हणजे तो आपल्यासारखा हाडामांसाचा माणूस आहे आणि माणूस म्हणून समान आहे हे तत्त्व उच्च विद्याविभूषित अधिकाऱ्यांच्या मनाच्या चौकटीतच नसते.माझ्या वरिष्ठांनी मला अमेरिकन पुस्तकांतल्या 'थियरी वाय','ह्यूमन साइड ऑफ मॅनेजमेंट' प्रमाणे वागावे व मला वागवावे म्हणजे द्विज आहे त्यामुळे माझ्या पोळीवर सर्व तूप हवे.खरा कट्टर मालकही वागणार नाही एवढ्या अनुदारपणे हीच माणसे हाताखालच्या माणसांशी वागताना मी पाहिले आहे. ह्या शैलीचा या भूमीशी संबंध नाही.हजार वर्षांच्या पारतंत्र्याने घट्ट झालेल्या जातींच्या भिंती व उतरंड ह्यांनी हे गंड निर्माण झालेले आहेत.ही काजळी किंवा डोळ्यांवरची ढापणे काढून आपल्याला त्यांच्या मूळ विष्णुरूपाची जाणीव करून द्यायला हवी आहे.
 १७.१३ प्रश्न या चौकटी बदलण्याचा आहे. ट्रान्स्फॉर्मेशनचा अळीतून-सुरवंटातून फुलपाखरू, बनण्यास मदत करण्याचा,आहे.माणसे चांगली-वाईट ठरवण्यात वेळ घालवण्याऐवजी त्यांच्यातूनच आपण सुसंवादी संघटना कशा बनवू याचा विचार करण्याचा आहे.प्रश्न या दृढबद्धमूल झालेल्या चौकटी कशा बदलायचा याचा आहे आणि तो सुद्धा दडपणाने नव्हे तर माणसांची मने बदलून.माणसे घडवण्याचा हा प्रश्न आहे.विवेकानंदांनी याला 'मॅनमेकिंग प्रोजेक्ट' असे म्हटले आहे.




 १८.०१ जेव्हा मी एक व्यवस्थापक म्हणून विचार करू लागलो व अनुभवाने जसजसा माझ्या या मूळ परंपरेशी जोडला गेलो,तशा अनेक गोष्टी मला करता आल्या.बऱ्याच वेळा आपल्यासमोर प्रश्न पडतो,की आपण फार छोटे आहोत,प्रश्न फार मोठा आहे,म्हणून आपण काही करू शकणार नाही. तेव्हा सुस्कारे सोडणे एवढेच आपल्या हाती आहे.पण जर काही करायचेच ठरवले तर अनेक छोट्याछोट्या गोष्टी करता येतात.
 १८.०२ मी ज्या कंपनीत काम केले ती जोगेश्वरीत आहे.१९६४ साली संपूर्ण पूर्व जोगेश्वरी हा भाग ही एक मोठी झोपडपट्टी होती.आमच्या कंपनीत काम करणारे अनेक कामगार त्या झोपडपट्टीत राहात असत.मी त्या कंपनीत काम करायला सुरुवात केली त्याच्या आधी तिथे उत्तर-हिंदुस्थानी झोपडीमालक व कोकणातले कामगार यांच्यामध्ये मोठी दंगल झाली होती.ही सर्व गावच्या गाव जमीन-जागा कागदोपत्री जमशेटजी जिजीभाय ट्रस्टच्या मालकीची होती.प्रत्यक्ष ताबा जोगेश्वरी पश्चिमेला राहणाऱ्या दुधाच्या तबेल्याच्या मालकांनी व त्यांच्या नोकरांनी लाठीच्या जोरावर घेतलेला होता.तिथे त्यांनी झोपड्या बांधल्या होत्या.आमच्या कंपनीतले बरेच कामगार तिथे भाडेकरू म्हणून राहात.त्यावेळी त्या भागात पाण्याचे नळ,संडास,वीज वगैरे काहीच सोयी नव्हत्या.सकाळी सात वाजता पहिली पाळी सुरू व्हायची व तिसरी पाळी संपवून लोक घरी जात.पहिल्या पाळीचे कामगार लवकर यायचे म्हणून व्यवस्थापकांची तक्रार असायची.ते लवकर यायचे ते कंपनीत संडासांची सोय होती व घरी नव्हती यासाठी.पण हे समजून न घेतल्यामुळे सुपरवायझर तक्रार करायचे.समजावून सांगितल्यावर मग ह्या तक्रारी संपल्या.
 १८.०३ पन्नास दिवसांचा संप झाला.तो पूर्णपणे फिस्कटला पण त्यातून जे नेतृत्व निर्माण झाले होते,त्यांच्या नेतृत्व-ऊर्जेचा वापर होणे आवश्यक होते.त्यांच्यातल्या पुढाऱ्यांनी गृहनिर्माण सोसायट्यांची कल्पना पुढे आणली.त्यासाठी कंपनीने थोडे पैसे बिनव्याजी कर्जाऊ दिले पण त्यांना कंपनीच्या हमीवर इतरत्र कर्जे मिळाली.या साऱ्या उलाढालीत कंपनीचा एकही पैसा बुडाला नाही.यामुळे जवळजवळ एकशेवीस लोकांना माझ्या कार्यकाळात डोक्यावर छप्पर मिळाले.त्यांची मुले शिकलीसवरली,त्यांतले बरेचसे सुस्थितीत आहेत.डोक्यावर स्वतःचे छप्पर असण्यामुळे हा फरक पडला.
 १८.०४ इतक्या कुटुंबांशी असे संबंध निर्माण झाल्यामुळे आम्ही एक नवीनच गोष्ट सुरू केली.कामगारांच्या ज्या मुलांना त्यांच्या त्यांच्या वर्गात पहिल्या दहात क्रमांक मिळायचा त्यांना बक्षिसे द्यायला सुरुवात केली.बक्षिसांची रक्कम नगण्य होती.त्या मुलांसाठी बालनाट्याचा कार्यक्रम दाखवायला सुरुवात केली.१९७८ साली बालनाट्य चळवळीतल्या अग्रणी सुधा करमरकर यांनी पंतप्रधानांसमोर तक्रार केली होती,की बालनाट्य चळवळीला कोणी स्पॉन्सर मिळत नाहीत.मी आमच्या मुलांना चांगली मराठी बालनाट्ये दाखवण्याचा आणि त्यांचे बक्षिसे देऊन सन्मान थोडासा खाऊ व नाटकाचा प्रयोग असा जोड कार्यक्रम सुरू केला.ह्या मोठ्या खर्चाच्या गोष्टी नव्हत्या पण इतरत्र तशा कोणी केल्याचे त्या काळात तरी मला आढळलेले नाही.कामगार माझे बांधव आहेत,माझ्या मुलांइतक्या संधी त्यांच्या मुलांना मिळत नाहीत तर त्यांच्यासमोर या गोष्टी याव्यात ह्या भावनेने हे मी करू शकलो.
 १८.०५ त्याच प्रकारात आणखी भर घातली,ती म्हणजे ही बक्षिसे कंपनीच्या माझ्यासारख्या किंवा वरिष्ठ डायरेक्टरांच्या हस्ते न देता पहिल्या क्रमांकाने त्या त्या वर्षी एसेस्सीला मुंबईतून आलेल्या मुलांच्या हस्ते देऊन त्यांचेही कौतुक त्यांच्याच समवयस्कांच्या हस्ते करून एक नवीन प्रथा सुरू केली.करता करता,या गोष्टी घडत गेल्या.युनियनकडून चांगले सहकार्य मिळाले.घराघरात केवळ आमचे 'मासिक बुलेटिन नव्हे तर या गोष्टीही पोचायच्या.त्यातून कंपनी मुंबईसारख्या महानगरात परिवारभावना निर्माण करू शकली.  १८.०६ आमच्या कंपनीत एकदा मंदकाम आंदोलन चालू होते.मी कंपनीतच राहात होतो.कंपनीच्याच बागेत माझी मुले खेळत.लोक दरवाजावर उभे राहून जोरजोराने घोषणा द्यायचे.'एवढे लोक कशाला? गोडबोलेच्या मढ्याला' अशी ही घोषणा त्यात असायची.माझी छोटी मुलगी ही सारी धामधूम बघायला गेटवर गेली.तिला थोड्या वेळाने कंटाळा आल्यावर तिथल्याच पेरूच्या झाडावर चढून ती पेरू काढण्याच्या प्रयत्नात होती.ती खाली पडली.मी कंपनीच्या बाहेर गेलेला होतो.पण घोषणा देणाऱ्या लोकांनी झटपट आत येऊन तिला डॉक्टरकडे नेले,ड्रेसिंग करून आणले,तिला घरी आणून सोडले आणि ते परत त्याच घोषणा द्यायला गेटवर गेले! मला हे नंतर समजले.मी त्याच कामगारांचे दोन रोल्स हे अनुभवलेले आहेत.आरतीला उभे राहिल्यावर जितक्या सहजपणे लोक टाळ्या पिटत तेवढ्याच सहजतेने माझी मय्यत काढण्याची गोष्ट करत.हा रिच्युअलचा भाग आहे,हे एकदा समजले की मग काम करणे सोपे होते.
 १८.०७ सामाजिक व्यवहारात रिच्युअल्सचे महत्त्व आजकाल आपण कमी लेखतो,शिकलेली माणसे कर्मकांडाबद्दल तिटकारा दाखवतात.तीच रिच्युअलची गोष्ट झालेली आहे.मुळात ती सुद्धा आम्हाला कुठलीही गोष्ट शिस्तशीर करणे नको वाटते.मग ते बॅचकाई भरणे असो,पूजा करणे असो की वेळेवर सभा सुरू करून संपवणे असो.आमच्या कंपनीत दसऱ्याला पूजा असायची.आमच्या वर्क्स मॅनेजरना लोक आरतीचे ताट धरायला लावायचे व मग ज्या आरत्या सुरू करायचे त्या बराच वेळ चालायच्या.त्यांचे हात आरतीचे ताट फिरवून फिरवून दुखायला लागत. जणू कामगार लोक सगळ्या वर्षातला राग लोक असा काढायचे! हे लक्षात आल्यावर मी बुलेटिनमधून त्याबद्दल लिहिले व हा प्रकार जसा सुरू झाला होता तसा तो संपला.याबद्दल चार्जशीट,वॉर्निंग वगैरे काही शक्य नव्हते.
 १८.०८ कुठलीही सामाजिक किंवा सामूहिक कृती म्हटली की तिचा फॉर्म ठरून जातो.हा राग व्यक्त करण्याचा भाग आहे हे समजले की मग त्याच्यावरची उपायोजना वेगळी ठरते.संप करणे,काम बंद करणे,उपोषण करणे हा राग व्यक्त करायचा मार्ग आहे हे समजले की मग तो भले महात्मा गांधींनी पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांविरुद्ध वापरलेला मार्ग असला तरी त्याला लोकशाहीत स्थान नाही हे भल्याभल्यांना समजत नाही.अनेक गांधीजनांनी विनोबा भाव्यांना याबद्दल धारेवर धरलेले होते.
 १८.०९ मुंबईसारख्या शहरात लग्नाची सारी व्यवस्था साधारणपणे कंत्राटदाराकडे सोपवतात.त्याच्याशी घासाघीस करून काय ते ठरवले जाते.मुंबईतल्या कामगारांनी सध्याच्या कामगार कायद्यांप्रमाणे शक्य असल्यामुळे अनेक औद्योगिक शांततेचे कंत्राटदार असलेल्या युनियन्स वर्गणी देऊन आपल्याशा केलेल्या असतात.जो जास्त पैसे मिळवून देण्याची भाषा करील तो पुढे जातो.तेव्हा कामगार वर्गयुद्ध वगैरे काही करत नसतात.कामगार म्हणून त्यांची वर्ग अशी आयडेंटिटी नसते.ती एक सोय असते.दोन पैसे जास्त देईल तो आपला हे लोकांना सहज कळते.माझ्यासारखेच,माझ्याअनुभवाविरुद्धचे किंवा सर्वस्वी वेगळे असे अनुभव अनेकांना आलेले असतील.त्यांची नोंद होणे हे मला महत्त्वाचे वाटते.म्हणून माझ्या या पुस्तकाचा मी हा शेवट न समजता सुरुवात मानतो.
 १८.१० भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे मूलाधार कसे वेगळ्या पायावरचे असायला हवेत याचा ऊहापोह करून त्याप्रमाणे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात या संकल्पनांचा केलेला वापरही लिहिला,एका भारतीय माणसाने त्याला समजलेल्या भारतीयत्वाच्या संदर्भात त्याने केलेले व्यवस्थापनातले काही प्रयोग एवढ्या सीमित अर्थाने ही मांडणी आहे.भारतासारख्या मोठ्या देशात अनेक भाषिक,प्रांतिक विचारधारा अस्तित्वात असणार आणि तिथले व्यवस्थापक त्यांच्या संदर्भात व्यवस्थापन करत असणार.मी माझ्या अनुभवांचा या प्रदेशाच्या संदर्भात विचार करून काही गोष्टी केल्या व त्यातल्या ज्या यशस्वी किंवा अयशस्वी झाल्या त्यांची ही नोंद आहे.
 १८.११ माझ्यासारख्या अनेक व्यवस्थापकांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रयोग केले असतील.मुळाशी जोडणारे असे लेखन मी वाचलेले नाही.भारतीय लेखकांनी इंग्लिशमध्ये लिहिलेल्या व्यवस्थापनशास्त्रावरच्या पुस्तकांतही हा शोध आढळलेला नाही.'उपक्रमोपसंहारौ अभ्यासोऽपूर्वताफलम् ।अर्थवादोपपत्तीच लिंगं तात्पर्य निर्णये' या दृष्टीने विचार करता माझ्या या लेखनाची अपूर्वता वा उपलब्धी ही एवढीच आहे.कोठल्याही सामाजिक व्यवहाराच्या संदर्भात कोठलीही पूर्वसूरींच्या सारांशाची झापडे जर डोळ्यांवर बांधून आपण लोकांच्या व्यवहारांकडे किंवा वागणुकीकडे पाहिले तर आपल्या झापडांचा किंवा चष्म्याचा रंग हा त्यात अडथळा ठरतो.तेच सामाजिक वास्तव वेगळ्या चौकटीतून पाहिले,वेगळ्या चष्म्यातून पाहिले तर वेगळे दिसते व ज्याला.व्यवस्थापन करायचे आहे म्हणजेच माणसांकडून कामे करवून घ्यायची आहेत त्याला या चौकटींचे,चष्म्यांचे सजग भान असायला हवे.
कायद्याची, न्याय करण्याची सारी प्रक्रिया मुळात वांझोटी आहे. त्यातून हक्क शाबीत होतात, जय- पराजय नक्की होतो, मी बरोबर की तो बरोबर हे। जाहीर होते, पण काहीतरी उत्पादन, काहीतरी मूल्यवर्धन (व्हॅल्यू अॅडिशन) हा जो कुठल्याही कारखान्याचा किंवा कंपनीचा मूळ उद्देश तो मात्र साध्य होत नाही. काहीही घडवायचे असेल तर त्याला या प्रक्रियेचा उपयोग होत नाही. यात मुळात निर्मितिक्षमतेची बीजे च नाहीत. उत्पादकतेतली वाढ, उत्पादनातली वाढ ही त्यांतून प्राप्त होत नाही. कारण मुळात हे समाजवादी कायदे ज्या वर्गकलहाच्या, आहेरे-नाहीरे या वर्गगटांच्या कल्पनांवर आधारलेले आहेत, तो आधार मुळात लुटीची वाटणी अशा प्रकारचा आहे. केकची वाटणी कशी करायची असा तो विचार आहे. खायचे हिस्से ठरवण्याचा भाग आहे. केक कसा तयार करायचा, त्याचा आकार कसा वाढवायचा याचा त्यात विचार नाही. केकचा आकार सामूहिक श्रमाने वाढत असतो किंवा निदान वाढायला हवा हे त्यात बसत नाही. थामXII