Jump to content

सुंदर कथा/शहाणा झालेला राजपुत्र

विकिस्रोत कडून

एक होता राजा. त्याला एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा म्हणून राजा-राणी त्याला जीव की प्राण करित. परंतु लाडामुळे तो बिघडला. राजा मनात म्हणाला, 'याला घालवून द्यावे. टक्केटोणपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल.' राजाने राणीला हा विचार सांगितला.

"आज ना उद्या सुधारेल तो. नका घालवू त्याला दूर!" ती रडत म्हणाली.

"तुम्हा बायकांना कळत नाही. आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे." तो म्हणाला. राणी काय करणार, काय बोलणार? रात्रभर तिला झोप आली नाही. सकाळी राजा मुलाला म्हणाला, "राज्यातून चालता हो. आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हा घरी ये!"

"तुमची आज्ञा प्रमाण," असे म्हणून पित्याच्या पाया पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला. तो आईच्या पाया पडला. आईने त्याला पोटाशी धरले.

"हे घे चार लाडू. भूक-तहानेचे लाडू." ती म्हणाली. आईचा आशीर्वाद घेऊन, ते लाडू घेऊन, धनुष्यबाण नि तलवार घेऊन तो निघाला. पायी जात होता. दिवस गेला, रात्र गेली. चालत होता. थकल्यावर दगडाची उशी करून वडाखाली झोपे. पुन्हा उठे नि चालू लागे. त्याला भूक लागली. त्या लाडूंची त्याला आठवण झाली. एक झरा खळखळ वाहत होता. हातपाय धुऊन तेथे बसला. त्याने एक लाडू फोडला तो आतून एक रत्न निघाले. त्याला आनंद झाला. आईला किती चिंता ते मनात येऊन त्याचे डोळे भरून आले.

लाडू खाऊन, पाणी पिऊन तो पुढे निघाला, तो त्याला एक हरिणी दिसली. तिच्याभोवती तिची पाडसे खेळत होती. राजपुत्राने धनुष्याला बाण लावला. तो त्या हरिणीला मारणार होता; परंतु त्याला स्वत:ची आई आठवली. माझी आई मला, तशी ही हरिणी या पाडसांना. त्याचे हृदय द्रवले. त्याने बाण परत भात्यात ठेवला. तो पुढे निघाला. काही अंतर चालून गेल्यावर मागून कोणीतरी माणूस येत आहे, असे त्याला वाटले. एक स्त्री येत होती. साधीभोळी, निष्पाप दिसत होती. तो थांबला. ती स्त्री जवळ आली.

"कोण तुम्ही, कुठल्या? या रानावनातून एकट्या कुठे जाता?"

"मी तुझी बहीण होऊ इच्छिते. मला नाही म्हणू नकोस." ती म्हणाली.

"ये माझ्याबरोबर. भावाला बहीण झाली." तो म्हणाला.

दोघे जात होती. दोघांना भूक लागली. एका खळखळ वाहणाऱ्या झऱ्याच्या काठी दोघं बसली. त्याने एक लाडू फोडला. त्यातून पुन्हा एक रत्न निघाले. अर्धा अर्धा लाडू दोघांनी खाल्ला. इतक्यात केविलवाणा शब्द कानी आला. एका सापाने बेडकाला तोंडात धरले होते. बेडूक वाचवावा तर सापाची भूक कशी शमवायची? राजपुत्राने जवळच्या तलवारीने मांडीचे मांस कापून सापाकडे फेकले. तो लाल तुकडा पाहून बेडकाला सोडून साप तिकडे धावला. बेडूक टुणटुण उड्या मारीत गेला. सापाची भूक शमली, बेडकाचेही प्राण वाचले. भावाची रक्तबंबाळ झालेली मांडी पाहून बहिणीचे डोळे भरून आले. ती पटकन कुठेतरी गेली नि पाला घेऊन आली. तिने त्या पाल्याचा चोळामोळा करून तो पाला आपला पदर फाडून जखमेवर बांधला. दोघे पुढे जाऊ लागली. तो पाठीमागून कोणी येत आहे असे त्यांना वाटले. दोघे थांबली. एक तरुण येत होता.

"कोण रे तू? कुठला? रानावनात एकटा का?" राजपुत्राने विचारले.

"मला तुमचा भाऊ होऊ दे." तो म्हणाला.

"ठीक. हरकत नाही." राजपुत्र म्हणाला.

तिघे चालू लागली. तो आणखी एक तरुण धावत आला.

"तू रे कोण?" राजपुत्राने विचारले.

"मला तुमचा भाऊ होऊ दे. नाही म्हणू नका." तोही म्हणाला. राजपुत्राने त्यालाही आपल्याबरोबर घेतले. ती चौघे जात होती. सर्वांना भुका लागल्या. दोन लाडू शिल्लक होते. एका सरोवराच्या काठी चौघे बसली.

राजपुत्राने दोन्ही लाडू फोडले. त्यांतूनही दोन रत्ने बाहेर निघाली. अर्धा लाडू सर्वांनी खाल्ला. सर्वांना ढेकर निघाली. आईच्या हातचा लाडू, त्याने नाही तृप्ती व्हावयाची तर कशाने?

जवळच एक शहर दिसत होते. प्रासादांचे, मंदिरांचे कळस दिसत होते. राजपुत्र दोन भावांना म्हणाला, "त्या राजधानीत जा. ही रत्ने विकून एक राजवाडा खरेदी करा. तेथे नोकरचाकर ठेवा आणि हत्ती, घोडे विकत घ्या. घोडेस्वार तयार करा. मला सन्मानाने मिरवत नेण्यासाठी या!"

दोघे भाऊ त्या नगरीत गेले. दोन रत्ने त्यांनी विकली. त्यांचे दहा लाख रुपये मिळाले. दुसरी दोन विकावी लागली नाहीत. त्यांनी राजवाडा खरेदी केला, नोकरचाकर ठेवले. राजवाडा शृंगारला गेला. ठायी ठायी गालिचे होते, ठायी ठायी आसने, फुलांचे गुच्छ होते, पडदे सोडलेले होते. चांदी-सोन्याची भांडी होती. त्या दोघा भावांनी घोडेस्वार तैनातीस ठेवले आणि हत्ती सजविला. त्याच्यावर अंबारी ठेवण्यात आली. राजपुत्राला आणायला घोडेस्वारांसह, त्या हत्तीसह ते दोघे भाऊ गेले.

आली सारी मंडळी वनात. राजपुत्र अंबारीत बसला. बहीण एका पालखीत बसली. दोन भाऊ दोन उमद्या घोड्यांवर बसले. मिरवणूक निघाली. शहरात आली. दुतर्फा लोक बघत होते. घरांतून, गच्चीतून लोक बघत होते. राजपुत्र राजवाड्यात उतरला. तेथील जीवन सुरू झाले. राजाच्या कानावर वार्ता गेली. राजाचा एक खुशमस्कऱ्या होता. राजाने त्याला विचारले,

"कोण आला आहे राजपुत्र?"

"मी बातमी काढून आणतो." तो म्हणाला. खुशमस्कऱ्या राजपुत्राकडे गेला. पहारेकऱ्यांनी त्याला हटकले. तो म्हणाला,

"मी येथल्या राजाची करमणूक करणारा. तुमच्या राजपुत्राची करमणूक करायला आलो आहे." नोकराने राजपुत्राला जाऊन विचारले.

"पाठवा त्याला." राजपुत्र म्हणाला. खुषमस्कऱ्या आला. राजपुत्राची तो करमणूक करू लागला. तो तेथील हास्यविनोद ऐकून त्याची बहीणही आली. थोड्या वेळाने खुशमस्कऱ्या जायला निघाला.

"येत जा!" राजपुत्र म्हणाला.

"राजाने येऊ दिले तर!" तो म्हणाला. खुशमस्कऱ्या राजाकडे गेला व म्हणाला,

"राजा, राजा, त्या राजपुत्राची बहीण फार सुंदर आहे. ती तुम्हालाच शोभेल. तुम्ही तिच्यासाठी मागणी करा!"

"ठीक आहे." राजा म्हणाला. दुसऱ्या दिवशी राजाने राजपुत्राला बोलावणे धाडले. राजपुत्र आला, आसनावर बसला. कुशल प्रश्न झाल्यावर राजा म्हणाला,

"तुमची पत्नी फार लावण्यवती आहे असे ऐकतो."

"ती माझी बहीण!"

"ती माझी राणी होऊ दे!"

"मी तिला विचारीन!"

"कळवा मला काय ते!"

राजपुत्र माघारी आला. त्याने बहिणीला सारी हकीगत सांगितली. ती म्हणाली,

"राजाला सांग मी व्रती आहे. मी कोणाची राणी होऊ शकत नाही!" राजपुत्राने राजाला त्याप्रमाणे सांगितले नि तो परत आला. राजा विचार करू लागला. इतक्यात तो खुशमस्कऱ्या आला.

"काय उपाय?" राजाने विचारले.

"त्याला म्हणावे, तुझी बहीण तरी दे, नाहीतर रात्री पायी चाळीस कोस चालत जा व त्या अंधाऱ्या दरीतील पांढरी फुले घेऊन उजाडत हजर हो, नाहीतर डोके उडवण्यात येईल!"

राजपुत्राला निरोप कळविण्यात आला. तो रडत बसला. बहीण येऊन म्हणाली,

"दादा, का रडतोस?"

त्याने तो वृत्तान्त सांगितला.

ती म्हणाली, "गावाबाहेर जाऊन दोन कोसांवर बसून राहा. चिंता नको करूस!"

राजपुत्र पायी निघाला व जाऊन बसला. बहीण घरातून बाहेर पडली आणि शहराबाहेर पडल्यावरती हरिणी बनली. वाऱ्याप्रमाणे ती पळत सुटली. अंधाऱ्या दरीतील पांढरी फुले तिने तोडली. ती फुले दातात धरून सूर्योदयाच्या आत ती आली. पुन्हा बहीण बनून राजपुत्राजवळ ती फुले देऊन ती म्हणाली,

"जा, राजाला ही नेऊन दे!"

राजपुत्राने ताऱ्याप्रमाणे चमकणारी फुले राजाला नेऊन दिली. निरोप घेऊन तो परत घरी आला. राजा खुशमस्कऱ्याला म्हणाला,

"आता कोणता उपाय?"

"त्याला सांगा की, बहीण तरी दे किंवा मागील राणीची समुद्रात पडलेली नथ आणून दे, नाही तर डोके उडवीन!"

खुशमस्कऱ्याने सुचविले. राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली. राजपुत्र रडत बसला. एक भाऊ येऊन म्हणाला,

"दादा, का रडतोस?"

राजपुत्राने वृत्तान्त निवेदिला.

"रडू नकोस, दादा. शहराबाहेर जाऊन बस. चिंता नको करूस!"

राजपुत्र शहराबाहेर जाऊन बसला. तो भाऊही बाहेर गेला नि तो बेडूक बनला. डराव, डराव करून त्याने बेडकांना हाका मारल्या. लाखो बेडूक जमा झाले. तो त्यांना म्हणाला, "त्या राजपुत्राने माझा प्राण वाचविला आहे. आपण त्याच्यासाठी काही करू या. आपण समुद्रात रात्रभर पुन:पुन्हा बुड्या मारू. मिळतील ते मोती तोंडात धरून आणू, राजाच्या अंगणात ढीग घालू!"

साऱ्या बेडकांनी ऐकले आणि त्याप्रमाणे त्यांनी केले. राजाच्या दारात झळाळणाऱ्या मोत्यांचे ढीग पडले. भाऊ राजपुत्राकडे येऊन म्हणाला,

"राजाला अंगणातील मोत्यांपैकी राणीच्या नथीचे मोती निवडून घ्यायला सांग. लाटांनी नथ मोडली. मोती अलग झाले. घ्या म्हणावे ओळखून!"

राजपुत्र राजाला तसे सांगून आपल्या राजवाड्यात परत आला. राजाने खुशमस्कऱ्याला विचारले, "आता काय?"

"त्या राजपुत्राला म्हणावे, बहीण दे, नाहीतर स्वर्गात जाऊन तेथे आमच्या वडिलांची करमणूक करावयाला कोणी आहे की नाही ते विचारून ये." खुशमस्कऱ्याने सुचविले.

"तो स्वर्गात कसा जाणार?"

"तुमच्या वडिलांना मेल्यावर सरणावर घालून स्वर्गात पाठविले. त्याच रस्त्याने राजपुत्राला पाठवू!" राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली. राजपुत्र सचिंत होऊन बसला. तो दुसरा भाऊ येऊन म्हणाला, "दादा, का दु:खी?" राजपुत्राने सारी कथा सांगितली.

"रडू नका. मी देतो तो रस अंगाला लावा नि चितेवर निजा. तुम्हांला वेदना होणार नाहीत; परंतु जळून तर जाल. राजाला सांगून ठेवा, की माझी राख मात्र माझ्या घरी पाठवा!" राजपुत्र तो रस अंगाला लावून राजाकडे गेला. माझी राख माझ्याघरी पाठवा असे त्याने सांगितले. हजारो लोक तो प्रकार पाहत होते. चितेवर राजपुत्र निजला. अग्नी देण्यात आला. गहरी पेटली चिता. राजपुत्र जणू शांत झोपला होता. त्याच्या देहाची राख त्याच्या घरी पाठविण्यात आली. रात्रीच्या वेळेस तो एक भाऊ ती राख घेऊन बाहेर पडला. तो सर्प बनला. राखेचे भांडे तोंडात धरून तो पाताळात गेला. त्याने शेषाला सारा वृत्तान्त निवेदला.

"महाराज, या राखेवर शिंपायला अमृताचे चार बिंदू द्या." सर्प म्हणाला.

"हा साप तुझ्याबरोबर अमृतबिंदू घेऊन पृथ्वीपर्यंत येईल." शेष म्हणाला. एक सर्प या सर्पाबरोबर निघाला. दोघे पृथ्वीवर आले. पाताळातील सर्पाने राखेवर अमृत शिंपले नि तो निघून गेला. राखेतून राजपुत्र उभा राहिला. जवळ भाऊही होता. तो म्हणाला, "दादा, जा व राजाला सांगा की, त्याच्या वडिलांना स्वर्गात करमत नाही. खुशमस्कऱ्याची आठवण येते. त्याला लवकर पाठवून द्या!" राजपुत्र परत आलेला पाहून सारे आश्चर्यचकित झाले. राजवाड्यासमोर ही गर्दी! राजपुत्राने राजाला त्याच्या वडिलांचा निरोप सांगितला. राजाने खुशमस्कऱ्यास बोलावले व सांगितले,

"अरे, माझे बाबा तुझी आठवण काढीत आहेत. जा तू त्यांच्याकडे!"

"मी कसा जाऊ?"

"या राजपुत्रास पाठविले त्याच मार्गाने तूही जा!"

लोकांनी टाळ्या पिटल्या. "दुष्टाची बरी जिरली!" कोणी म्हणाले. राजपुत्र लगबगीने आपल्या राजवाड्यात आला व भावंडांना म्हणाला, "हा राजा लहरी दिसतो. वेडपट दिसतो, येथे राहण्यात अर्थ नाही चला आपण जाऊ."

रात्री चौघे भावंडे निघाली. रात्रभर चालत होती. बरोबर फराळाचे होते. सकाळी प्रातर्विधी करून सर्वांनी फराळ केला. ती पुन्हा चालू लागली. तो एक भाऊ म्हणाला,

"दादा, मला निरोप दे! मी जातो!"

"मला कंटाळलास?"

"दादा, मी साप होतो. तुम्ही माझी भूक शमविण्यासाठी मांडीचा तुकडा कापून फेकलात. तुमचे उपकार फेडावे म्हणून तुमचा काही दिवस मी भाऊ झालो. आम्ही सापही केलेले उपकार स्मरतो. येतो दादा, सुखी व्हा!" असे म्हणून तो भाऊ साप बनला व थोड्या अंतरावर फण् फण् करीत निघून गेला. थोड्या अंतरावर दुसरा भाऊ म्हणाला,

"दादा, मलाही निरोप दे!"

"का रे जातोस?"

"दादा, मी तो बेडूक. सापाला मांडीचा तुकडा कापून देऊन माझे प्राण तुम्ही वाचविले. तुमचे उपकार फेडण्यासाठी मी तुमचा भाऊ बनलो. आम्ही य:कश्चित बेडूक परंतु केलेले उपकार आम्ही स्मरतो!" असे म्हणून तो भाऊ बेडूक बनला व टुणटुण उड्या मारीत निघून गेला.

पुन्हा थोड्या अंतरावर बहीण म्हणाली,

"दादा, मलाही निरोप दे!"

"तूही चाललीस?"

"होय दादा. पाडसे वाट पाहत असतील. मी ती हरिणी. तू माझ्यावर बाण सोडणार होतास; परंतु तुझे मातृप्रेम जागे झाले. तू मला मारले नाहीस. तुझे उपकार फेडायला मी बहीण झाले. आता जाते. सुखी हो. असाच दयाळू-मायाळू हो!"

बहीण हरिणी बनून कृतज्ञतेने मधून मधून मागे बघत वाऱ्याप्रमाणे पाडसांकडे पळत गेली. राजपुत्र आता एकटाच राहिला. विचार करीत तो निघाला. पशु-पक्ष्यांतही केवढी कृतज्ञताबुद्धी! असे त्याच्या मनात येत होते. मग माणसाने किती चांगले असले पाहिजे, असा विचार त्याच्या मनात आला आणि या विचारात तो आपल्या घरी आला. पहाटेची वेळ होती. मुलगा गेल्यापासून राणीला झोप येत नसे. ती गच्चीत उभी होती. देवाला प्रार्थना करत होती.

"कोण आहे?" पहारेकऱ्यांनी दरडावले.

"मी राजपुत्र."

"माझा बाळ! माझा बाळ!" म्हणत राणी धावतच खाली आली. तिने राजपुत्राला हृदयाशी धरले. राजाही आला. पुत्र पित्याच्या पाया पडला.

"शहाणा होऊन आलास?" राजाने विचारले.

"होय तात!" तो नम्रतेने म्हणाला. राजाने राजपुत्राला गादीवर बसविले. त्याचे लग्नही करून दिले. राजा-राणी मुलाला व सुनेला आशीर्वाद देऊन तपश्चर्येसाठी वनात निघून गेली. नवीन राजा-राणी उत्कृष्ठ राज्यकारभार चालवू लागली. सारी प्रजा सुखी झाली. तुम्ही आम्ही होऊया. गोष्ट आमची संपली. शेरभर साखर वाटली.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.