साहित्य आणि संस्कृती
साहित्य आणि संस्कृती
(साहित्यिक लेखसंग्रह)
संपर्क
‘निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर - ४१६ ००७
मो. नं. ९८ ८१ २५ ०० ९३
drsklawate@gmail.com
www.drsunilkumarlawate.in
दुसरी आवृत्ती २०१८
☻ डॉ. सुनीलकुमार लवटे
प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर. फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com
मुखपृष्ठ
गौरीश सोनार
अक्षर जुळणी
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
मुद्रक प्रिमिअर प्रिंटर्स, कोल्हापूर
मूल्य ₹३००/-
रुंदावणाच्या सर्व लेखक
नि ग्रंथांना! प्रस्तावना
भारतामध्ये खोलवर असा संस्कृती विचार विविध भाषांमध्ये मांडण्यात आला आहे. मराठी भाषेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, आचार्य स. ज. भागवत दुर्गा भागवत, पु. ग. सहस्त्रबुद्धे आणि प्रा. इरावती कर्वे यांनी संस्कृतीच्या विविध अंगाची चर्चा केली. हिंदी भाषेमध्ये आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी रामधारी सिंह 'दिनकर' जैनेंद्रकुमार, गजानन माधव मुक्तीबोध, राहुल सांस्कृत्यायन, विष्णु प्रभाकर, डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांनी पण या विषयावर विपुल प्रमाणात लिखाण केले. हिंदीचा हा समृद्ध वैचारिक ठेवा भारतातील इतर भाषिकांना विशेषतः मराठी भाषिकांना प्राप्त व्हावा व त्याद्वारा राष्ट्रीय एकात्मतेचा आणि आंतरभारती'चा विचार दृढ व्हावा म्हणून हिंदीचे ख्यातनाम प्राध्यापक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी हजारीप्रसाद द्विवेदी, दिनकर, मुक्तीबोध, जैनेंद्रकुमार, राहुल सांस्कृत्यायन, विष्णु प्रभाकर व डॉ. देवराज यांच्या संस्कृती चिंतनाचा आपल्या साहित्य आणि संस्कृती या पुस्तकात परिचय करून देऊन मोठेच काम केले आहे. कारण वर सांगितलेल्या थोर अभ्यासकांच्या समृद्ध विचारवंतांची मराठी भाषिकांना फारशी माहिती नव्हती. भारतीय सांकृतीचा अतूट आणि चिवट धागा भारतीय भाषांमध्ये विद्यमान असला तरी प्रत्येक भाषिक गटांची व त्यांच्या संस्कृतीची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आहेत आणि हिंदीतील संस्कृती विचार वाचताना ती पृथगात्मता लक्षात येते. कारण त्यांच्या मांडणीत विशिष्ट प्रदेशाचे, भाषेचे आणि इतिहासाचे संदर्भ असतात.
डॉ. लवटे यांनी प्रस्तुत पुस्तकात डॉ. देवराज, दिनकर, मुक्तिबोध, राहुल सांकृत्यायन, विष्णु प्रभाकर आणि हजारीप्रसाद द्विवेदी यांच्या विचारांचा परामर्श घेतला. त्यात मुक्तीबोध आणि दिनकर हे श्रेष्ठ कवि, जैनेंद्र कादंबरीकार तर विष्णु प्रभाकर नाटककार, डॉ. देवराज श्रेष्ठ दर्जाचे तत्त्वज्ञ तर डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी इतिहास व संस्कृतीचे थोर भाष्यकार व कादंबरीकार. मुक्तिबोध व राहुल सांकृत्यायन मार्क्सवादी तर दिनकर, जैनेंद्र, विष्णु प्रभाकर यांच्यावर गांधी-नेहरू यांच्या विचारांचा प्रभाव, हजारीप्रसादावर रवींद्रनाथ टागोरांचा प्रभाव तर डॉ. देवराज काही प्रमाणात आदर्शवादी. या सर्व विचारवंतांनी त्यांच्या वैचारिक दृष्टिकोनातून संस्कृतीचा विचार मांडला आणि तो मुख्यतः भारतीय संस्कृतीच्या संदर्भात मांडला.
इंग्रजीत Culture व Civilization हे शब्द संस्कृतीसाठी वापरले जातात. हिंदीमध्ये त्यासाठी संस्कृती आणि सभ्यता हे शब्द वापरले जातात. मराठीत मात्र दोन्ही शब्दासाठी संस्कृती हा एकच शब्द वापरला जातो. वेगवेगळ्या शब्दकोशात पाहिले तर असे दिसते की अनेक वेळा हे शब्द समानार्थी वापरले जातात. Culture मध्ये कला साहित्य, काव्य, चित्र व शिल्पकला व सामाजिक आणि राजकीय संस्थांच्या कार्याचा समावेश होतो. समन्वय, जैव घटकांतील अंतःसंबंध व वाढ यांचापण त्यात समावेश केला जातो. Civilization मध्ये माणसाचा एक प्रकारे विकास अपेक्षित आहे. हा विकास सुधारलेल्या अवस्थेकडून अधिक नागर समाजाकडे होणे अपेक्षित आहे. संस्कृतीत ही वाढ आतून व जैव प्रक्रियेतून होते तर सभ्यतेत ती बाहेरून प्राप्त प्रभावांच्या व संस्करणाच्याद्वारा होते. त्यामुळे या दोन्ही शब्दात एक प्रकारचा व्यक्तीचा आणि समाजाचा उच्चतर अशा ध्येयाकडे, अधिक नागर वा सुसंस्कृत समाजाकडे जाणारा विकास अपेक्षित आहे. मनुष्याने आपल्यात असणारे पशुत्वाचे अवशेष कमी करून अधिक मनुषत्व प्राप्त करावे हे अधिक चांगले. हिंसा, द्वेष व मत्सर यांचा त्याग करणारे विश्व निर्माण करावे हाच सांस्कृतिक विचाराचा व सभ्यतेचा आशय असतो. प्रस्तुत पुस्तकातील विविध लेख संस्कृतीचा हा आशय स्पष्ट करतात.
या पुस्तकातील पहिला लेख थोर तत्त्वज्ञ देवराज यांचा आहे व त्यात त्यांनी आज आपल्या मानवी संस्कृतीसमोर कोणते पेचप्रसंग उभे राहिले आहेत याची चर्चा करून एकोणीसाव्या व विसाव्या शतकात निर्माण झालेल्या विविध तत्त्व प्रवाहांची चर्चा केली आहे. आजच्या पेचप्रसंग नव्या विज्ञाननिष्ठ आणि भौतिक तत्त्वज्ञानातून निर्माण झाला आहे. ते उद्दिष्टसापेक्ष आणि प्रयोजनमूलक आहे. खरे पाहता तत्त्वज्ञानाचे स्वरूप मानवकेंद्रित व मानवाचे सृजनशील मानणारे असले पाहिजे, पण आज मानव्य विद्याशाखांना वैज्ञानिक पद्धतीत गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण या शाखा अनुभवजन्य व कल्पनामूलक असतात व त्यांची खात्री संख्यात्मक नसून गुणात्मक असते. डॉ. देवराज यांच्या मते मानव सर्जनशील आहे व मानवी संस्कृती त्याचे एक रूप आहे. ते असे म्हणतात की, 'संस्कृती म्हणजे मानव जातीच्या सर्व ग्राह्य जीवन रूपांची निर्मिती आणि तिचा उपयोग करणे होय. ते असे मत व्यक्त करतात की, “एस.एन. वैद्य यांच्यासारखे विचारवंत हे भौतिकतावादी व मानवतावादी आहेत. त्यांना मोक्ष व अध्यात्म या कल्पना मान्य नाहीत. त्यांच्याद्वारे ऐहिक व नैतिक जीवन जगता येते. पण डॉ. देवराज यांना ते मान्य नाही. त्यांच्या मते मानवी व्यक्तिमत्वाचा विकास हा त्याच्या असंख्य संवेदनांचा व प्रेरणांचा विस्तार होय. या प्रगतीतून त्याचा विवेक जागृत होतो. ज्याच्या साह्याने ती व्यक्त सत्यासत्य, श्रेष्ठ व कनिष्ठ मूल्ये यांचा निवाडा करीत असते. मूल्यांच्या गुणात्मक प्रेरणांचे रूप आध्यात्मिक वृत्ती आहे. ज्यामधून परहिताकांक्षा, त्यागाची वृत्ती आणि सर्वभूतांप्रती समभाव निर्माण होतो. त्यांचे असे मत आहे की जोवर माणूस मूल्यांचा शोध घेत असतो व मूल्यांची निर्मिती करीत असतो तोवर तो सर्जनशीलच असतो. मानवी प्रगतीची दिशा ही उच्च अशा सांस्कृतिक मूल्य प्रेरणांचा विकास करण्याची राहिली आहे. डॉ. देवराज यांची अशा प्रकारे आदर्शवादी दृष्टिकोनातून संस्कृतीची तात्त्विक बाजू मांडली आहे.
भारतीय संस्कृती ही समन्वयावर आधारित असून येथील अनेक परंपरांनी ती सर्व समावेशक बनली आहे, असे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते म. गांधी व पं. जवाहरलाल नेहरू यांचे मत होते. आपल्या Discovery of India या पुस्तकात नेहरूंनी आपली ही भूमिका मांडली होती. पण ही समन्वयाची व समावेशनाची प्रक्रिया कशी झाली, विविध संस्कृतीचा संगम कसा झाला, याचे साधार व सविस्तर विवेचन करण्यात आले नव्हते. हिंदीतील प्रख्यात कवि रामधारी सिंह 'दिनकर' यांनी संस्कृती के चार अध्याय' या ग्रंथात हे काम केले आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पं. जवाहरलाल नेहरू यांनी त्यास प्रस्तावना लिहिली आहे. आपल्या प्रस्तावनेत ते म्हणतात की, “कोणतीही जिवंत संस्कृती ही परिवर्तनशील असते आणि परंपरेच्या आवरणाखाली ती आतून बदलत असते. भारत हा अनेक वंशांचा, धर्मांचा मिळून बनलेला देश असून तो सर्वांचा आहे. कोणताही एक गट भारतावर आपल्या एकाधिकार सांगू शकत नाही. या देशाच्या जडणघडणीत प्रत्येकाचे योगदान आहे. उदारता व सहिष्णुता ही तिची वैशिष्ट्ये आहेत."
‘संस्कृति के चार अध्याय' या पुस्तकात चार वेगवेगळ्या भागात दिनकरांनी भारतीय संस्कृती विकासाचे वर्णन केले आहेत. त्यातील पहिला अध्याय आर्य व द्रविड संस्कृतीच्या समन्वयाचा आहे. दुसरा अध्याय बौद्धिक परंपरेविरुद्ध जैन आणि बौद्ध धर्मियांचा विरोध कशा प्रकारे विकसित झाला व त्यांचे संस्कृतीच्या विकासात कोणते योगदान आहे याची चर्चा केली. तिस-या अध्यायात इस्लामचे आगमन व हिंदू व मुसलमान धर्मियांमधील विचार व आचार यांचे आदान-प्रदान यांची चर्चा केली आहे. तर चौथ्या अध्यायात युरोपीय व विशेषतः इंग्लिश संस्कृतीचे आगमन व तिचा भारतीय जनमनावर झालेला परिणाम यांची चर्चा केली आहे. दिनकरांनी खूप अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला. मात्र पहिल्या प्रकरणात आर्य व द्रविड यांच्यातील वांशिक द्वेष व संघर्ष याबाबत त्यांनी जी मांडणी केली आहे ती आता इतिहासकरांना मान्य नाही. नवे संशोधन अशा प्रकारच्या संघर्षाची शक्यता नाकारत आहे. पण त्या वेळच्या सर्वमान्य इतिहासविषयक भूमिकाच दिनकरांनी स्वीकारल्या आहेत.
गजानन माधव मुक्तिबोध हे हिंदीतील फार मोठे कवी. ते मार्क्सवादी विचारांचे होते. डॉ. लवटेंनी त्यांचा फारसा परिचित नसलेला ग्रंथ शोधून काढून त्याचे विवेचन केले आहे. भारत-इतिहास आणि संस्कृती' या पुस्तकात त्यांनी भारतीय संस्कृतीचा विकास वर्णन केला आहे. त्यांच्यामते संस्कृतीत कला, धर्म, नीती व साहित्य यांचा समावेश होतो. ती उलथापालथ जीवनदायी शक्ती असते आणि राजकीय विकासाची प्रक्रिया चालूच राहते. या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचे प्रकरण मध्य युगातील हिंदू-मुस्लीम समन्वयाबद्दलचे आहे आणि डॉ. लवटे यांनी या प्रकरणाचे भाषांतर करून या पुस्तकात समाविष्ठ केले आहे. या प्रकरणात मुक्तिबोधांनी अनेक नवनवे संदर्भ देऊन असे प्रतिपादन केले आहे की सुरुवातीच्या काळात हिंदू-मुस्लीम राज्यात संघर्ष झाले मात्र समाजाच्या पातळीवर समन्वयाची प्रक्रिया चालू राहिली. कला, संगीत, साहित्य, शिल्प, तत्त्वज्ञान, धर्म या सर्वच क्षेत्रात देवाणघेवाण झाली. त्यातून मानवतावादी व्यक्ती संप्रदायाचा उदय झाला. सांप्रदायिकता मागे पडली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचेपण त्यांनी चित्तवेधक असे विवेचन केले आहे.
आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी हे मोठे संशोधक, कादंबरीकार व ललित लेखक. त्यानी शांतिनिकेतनमध्ये काम केले. द्विवेदींच्या मते भारतात विविध भाषा, धर्म, वंश व संप्रदाय यांच्यात प्रचंड भिन्नता आहे. पण त्याचबरोबर त्यांना आतून जाडणारी एकतेची भावनापण आहे. ही एकतेची भावना तीन कारणामुळे निर्माण झाली. एक म्हणजे येथील विविध धर्मातील संतांनी एकात्मतेचीच शिकवण दिली. सर्व धर्मग्रंथांची शिकवण एकच आहे, हे दारा शिकोह याने सांगितले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कला साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झाली व त्यातून अनेक नवे प्रकार जन्मास आले. तिसरी गोष्ट म्हणजे विज्ञान, ज्योतिष आणि आयुर्वेद यांच्यामध्येपण देवाणघेवाण झाली व या समन्वयातून एकतेची भावना अधोरेखित करणारी भारतीय संस्कृती निर्माण झाली. त्यांच्यामते ही एकता हे साध्य नसून साधन आहे, ज्या द्वारे आपण उच्चतर जीवन आदर्श प्राप्त करू शकू.
आपल्या एका निबंधात हजारीप्रसादांनी सभ्यता व संस्कृती यातील भेद स्पष्ट केला आहे. त्यांच्या मते सभ्यताही आर्थिक व्यवस्था, राजकीय संघटना, भौतिक परंपरा व ज्ञान-कला या चार स्तंभांवर उभी असते. समाजातील सर्वसाधारण माणसांचे भय दूर होऊन त्याने सामंजस्याने व सहकार्याने राहणे हे सभ्यातेचे वैशिष्ट्ये असते. संस्कृती माणसाच्या आंतरिक विकासास साह्य करते. सभ्यता व संस्कृती परस्परपूरक आहेत. भारतीय संस्कृतीच्या वेगवेगळ्या घटकांचा विचार करताना त्यांनी वेदांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. कारण त्यांच्यामते वेद सत् व असत मधील फरक स्पष्ट करतात. अहिंसा विश्वबंधुत्व, चित्तशुद्धी व सर्वहितपरायणतेवर भारतीय संस्कृती आधारलेली आहे, असे त्यांचे मत होते.
तेराव्या शतकात भारतावर इस्लामचे आक्रमण झाले व हिंदूच्या हातातील राजकीय सत्ता नष्ट झाली. त्यानंतरच्या बदलत्या काळात आक्रमक व विजिगीषु इस्लामला तोंड देताना हिंदू समाजाने आपल्या धर्म व्यवहारात कशा प्रकारे बदल केले याचे अभ्यासपूर्ण विवेचन हजारीप्रसादांनी केले आहे. त्यांच्या कबीरावरील पुस्तकातील एका प्रकरणाचा डॉ. लवटे यांनी अनुवाद केला आहे. त्यांच्यामते इस्लामच्या आगमनानंतर हिंदू स्मृतिकारांनी व निबंध ग्रंथांनी मतामतांच्या वलयातून एक हिंदू आचार पद्धती तयार केली. तिला मान्यता मिळाली नाही पण ती लागू झाली. त्याचबरोबर त्यामुळे हिंदू अधिक कर्मठ, बंदिस्त व कर्मकांडी बनला. इस्लाम हिंसक पण ग्रहणशील आणि समावेशक धर्म होता. हिंदू धर्म कमी ग्रहणशील होता. याच काळात सूफी संतांचा व नाथपंथाच्या योग्याचा उदय झाला. त्यांनी प्रेमाला, आंतरिक जागृतीला महत्त्वाचे स्थान दिले व कर्मकांडाचा अव्हेर केला. कबीरदासांनी या दोन्ही पंथांचा समन्वय केला नाही. ते क्रांतिकारक विचारवंत होते. त्यांनी कर्मकांडास व बाह्योपचारास रजा दिली आणि मनुष्याप्रती प्रेम व त्याचे उन्नयन महत्त्वाचे मानले. हे महत्त्वाचे प्रकरण मराठीत आणून डॉ. लवटे यांनी आपल्या भाषेची सेवा केली आहे.
राहुल सांस्कृत्यायन हे मार्क्सवादी विचारवंत व संशोधक. ते बौद्ध धर्माचे अभ्यासक होते. बौद्ध संस्कृती व बौद्ध यांचा प्रसार या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात त्यांनी बौद्ध संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये सांगून तिचा चीन, इंडोचीन, म्यानमार, कोरिया वगैरे देशात कसा प्रसार झाला याचे विवेचन केले आहे. त्यांच्यामते बौद्ध धर्माचा प्रसार अहिंसेच्या मार्गाने भिक्षंनी केला. तिबेटमध्ये बौद्धांनी भारतात नष्ट झालेले बौद्ध वाङ्मय जिवंत ठेवले ही महत्त्वाची गोष्ट आहे.
जैनेंद्रकुमार हे हिंदीतील मोठे कादंबरीकार व विचारवंत. त्यांनी युरोप आणि भारत सांस्कृतिक चिकित्सेचे एक प्रश्नोपनिषद ‘समय और हम' या पुस्तकात ग्रंथित केले आहे. जैनेंद्र यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा सखोल असा प्रभाव होता. हे पुस्तक प्रश्न व उत्तर या स्वरूपात असून संस्कृतीविषयक प्रश्नांना जैनेंद्र यांनी समर्पक उत्तर देत आपले संस्कृतीविषयक विचार स्पष्ट केले आहेत. या पुस्तकास आचार्य दादा धर्माधिकारी यांची प्रस्तावना आहे. या पुस्तकात जैनेंद्र यांची वर्ग व राष्ट्र कल्पनांमुळे युरोपीय समाज कसे हिंसक व विभाजित बनले आहेत, हे सांगितले आहे. या समजात भौतिक समृद्धी आहे, पण मानसिक शांतता नाही. कारण ते अर्थ व काम पुरुषार्थाचे दास बनले आहेत. विज्ञानाचा उपयोग ते संहारासाठी करीत असून त्यातून हिंसक राष्ट्रवादास बळ मिळत आहे. भारतातील जातीयता संकीर्णता व हिंदू जमातवाद उदार व समन्वयवादी भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असून त्याच्या समाजात प्रचारामुळे व प्रसार समाजाचे स्थैर्य नष्ट करील असे त्यांचे मत होते. भारतीय भाषांना विशेषतः हिंदीला प्रतिष्ठा प्रदान करणे आवश्यक आहे. जैनेंद्रांच्या मते ‘‘साहित्य आणि संस्कृती यात जवळचे संबंध आहेत. साहित्याचे श्रेष्ठपण ते विशिष्ट काळ वा समाज यांचे किती चांगल्या प्रकारे चित्रण करते यात सामावलेले असून ते मानवी आत्म्याची स्पंदने किती गंभीरपणे चित्रित करते यावर अवलंबून असते.”
विष्णु प्रभाकर या ज्येष्ठ हिंदी लेखकाच्या संस्कृतीवरील दोन लेख संग्रहाचे आधारे डॉ. लवटे यांनी त्यांचा संस्कृती विचार समजावून सांगितला आहे. विष्णु प्रभाकर यांच्यामते संस्कृती हा शब्द संस्कार व सृजन यावर आधारलेला आहे. ज्या समाजात सृजनशीलता व प्रगल्भता आहे, त्याची संस्कृती वरच्या दर्जाची असते व तो समाज आंतरिक शांतता व समाधान उपभोगतो. संस्कृतीचा समाज, संस्कार व विज्ञान यांच्याशी जवळचा संबंध असतो. धर्म व संस्कृती यांच्याबाबत ते म्हणतात की, ज्या वेळी धर्म कट्टर व दुराग्रही बनतो त्या वेळी त्याचा संस्कृतीशी संबंध तुटतो. हीच गोष्ट विज्ञानाच्या बाबतीतही खरी आहे. धर्म आचारांच्या व कर्मकांडाच्या कचाट्यात सापडल्यानंतर कर्मठ बनतो. पण धर्मात नवविचारांचे पंथ विलीन होतात व त्याला प्रेरणा संस्कृती देत असते. विज्ञानामुळे समाजात नवे विचार निर्माण होतात. भौतिक समृद्धी निर्माण होते पण संस्कृतीशिवाय जीवन आशयघन होत नाही. कला, साहित्य, संगीत जीवनात आनंद निर्माण करतात. कारण कलेचा उद्देश मनोरंजन असतो.
या प्रकरणातील दोन महत्त्वाचे लेख म्हणजे ‘पं. नेहरूंचे संस्कृतीविषयक विचार’ आणि ‘कलेच्या वळचणीतील संस्कृती. त्यांच्या मते पंडित नेहरूंच्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव असला तरी भारतीय संस्कृतीचे यथार्थ स्वरूप त्यांनी जाणले होते व त्यांच्या व्यक्तिगत आचरणात भारतीयता प्रकट होत होती. म्हणून त्यांनी संस्कृती संवर्धनासाठी अनेक संस्थांची निर्मिती केली. डॉ. लवटे यांनी ‘सत्तेच्या वळचणीत संस्कृती' या लेखाचे भाषांतर पण या पुस्तकात समाविष्ट केले आहे.
थोडक्यात सांगायचे झाले तर हिंदीतील हा संस्कृती विचार आपली भारतीय संस्कृतीबद्दलची जाण समृद्ध करतो. भारतीय संस्कृतीचे मूळ स्वरूप करताना हे अभ्यासक सांगतात की ही संस्कृती ही उदार, ग्रहणशील आणि बहलतावादी होती. परिवर्तन हा तिचा आत्मा होता आणि भारतीय समाजाच्या अंतर्यामी तो सतत प्रगतीची प्रेरणा देत होता. पण त्याचबरोबर या संस्कृतीत जातीवाद, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, स्त्रीदास्य आणि धर्मभोळेपणा हे दोष होते. धर्म यातुप्रधान असल्यामुळे सकाम भक्तीवर लोकांचा विश्वास होता. त्यामुळे भारतीय संस्कृती भारतीय समाजाची प्रगती साधल्यास तेवढ्या प्रमाणात साह्यकारक ठरली नाही, म्हणून या परंपरेतील टाकाऊ गोष्टी नष्ट करून तिच्यातील टिकाऊ व शाश्वत मूल्यांचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे व हाच या पुस्तकांचा संदेश आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या या पुस्तकाचे वाचक चांगले स्वागत करतील अशी उमेद मी बाळगतो.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
मनोगत
एकात्म भारताचे स्वप्न
सन २०१४ मध्ये संपन्न झालेल्या सार्वजनिक निवडणुकीत गेली दहा वर्षे कार्यरत असलेले केंद्र सरकार ज्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे होते, त्या आघाडीचा पराभव झाला. लोकसभेत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणा-या डॉ. मनमोहन सिंगांच्या सरकारने राजीनामा दिला. त्याजागी मे, २०१४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केंद्रीय सत्तेत बहुमत मिळविले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यामुळे आजवर प्रतिगामी म्हणून दुर्लक्षिलेल्या विचार संघटनांमध्ये उत्साह संचारला. त्या उत्साहाच्या भरात हिंदू-मुस्लीम व देशाच्या बहुसांस्कृतिक ओळखीस तडे जाणाच्या घटना एकामागून एक घडत गेल्या.
तमिळ कादंबरीकार पेरूमल मुरूगन यांनी सन २०१० मध्ये लिहिलेल्या ‘मधोरूबागन' कांदबरीचे इंग्रजी भाषांतर ‘वन पार्ट वुमन' शीर्षकाने इंग्रजीत प्रकाशित झाले. त्याची चर्चा देशभर होऊ लागल्यावर आमच्या हिंदू रूढी, परंपरांवर हा हल्ला मानून प्रतिगामी शक्तींनी रान उठवले. पुस्तकावर बंदीची मागणी करण्यात आली. प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. या सर्व प्रकारांनी दुखावलेल्या मा. पेरूमल मुरूगन यांनी डिसेंबर २०१४/जानेवारी २०१५ च्या दरम्यान आपल्या लेखकाची आपण आत्महत्या केल्याचे फेसबुकवर जाहीर केले. याची प्रतिक्रिया जगभर उमटली. पुढे मद्रास उच्च न्यायालयाने आविष्कार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करून पेरूमल मुरूगन यांना निर्दोष मुक्त केले व पुस्तकावरील बंदी उठवण्यात आली. यापूर्वीही पण भारतात पुस्तकांवर बंदी आणण्याच्या घटना अनेक घडलेल्या होत्या. त्या वेळीही अशी प्रकरणे अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली होती. सन १९७४ ते १९७७ काळात देशात जाहीर झालेल्या आणिबाणीच्या काळात तर मुख्य मुद्दा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच होऊन बसला होता. जगात इतिहासाची पाने उलटताना हे लक्षात येते की, जेव्हा जेव्हा देशात निरंकुश सत्ता अस्तित्वात येते, तेव्हा एक तर ती भ्रष्ट होत असते किंवा हुकूमशाही प्रवृत्तीने मनमानी कारभार सुरू होऊन एककल्ली निर्णय व अंमलबजावणीचे सत्र सुरू होते. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता, जाती-धर्मानिरपेक्षता लोकशाही मूल्ये धोक्यात येतात. परिणामी सामान्यांचे जिणे जिकिरीचे होते.
वरील घटनेची प्रतिक्रिया म्हणून देशभराच्या बुद्धिजीवी वर्गात अस्वस्थतेचे वातावरण पसरणे स्वाभाविक होते.या दरम्यान काही निमित्ताने मी समाज प्रबोधन पत्रिकेचे संपादक प्रा. डॉ. अशोक चौसाळकरांना भेटण्यास गेलो होतो. जानेवारी, २०१५ चा सुमार असावा. या विषयावर चर्चा होत असताना हिंदी कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या संस्कृति के चार अध्याय या साहित्यकृतीस सन १९६० ला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला होता. त्यास भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंची प्रस्तावना लाभली आहे. तो ग्रंथ सध्याच्या असहिष्णू वातावरणात वाचला गेला पाहिजे, अशी चर्चा उभयतांत झाली. त्याची सुवर्ण जयंतीही नुकतीच साजरी झाली होती. यावर लिहिलं गेलं पाहिजे ही मूळ कल्पना डॉ. चौसाळकर यांची. मग मी असे अनेक ग्रंथ हिंदीत असल्याची पुस्ती जोडली. त्यातून ‘संस्कृती' विषयावर हिंदीत लिहिल्या गेलेल्या ग्रंथांचा ‘समाज प्रबोधन पत्रिकेतून' परिचय करून देणारी माला सुरू करण्याचे उभयपक्षी मान्य होऊन मी लिहिण्यास संमती दिली. लगेचच एप्रिल-जून २०१५ च्या अंकात ‘संस्कृति के चार अध्याय : सामायिक संस्कृतीचे स्वप्न आणि सत्य' शीर्षक लेख प्रसिद्ध झाला. वाचकांनी त्याचे चांगले स्वागत केले. अपवाद मतांतरही झाले.
दुसरा अंक प्रकाशित होण्याच्या दरम्यान असहिष्णुता रेखांकित करणारी आणखी एक घटना घडली. सप्टेंबर-ऑक्टोबर, २०१५ च्या सुमारास उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध जिल्ह्यातील दादरी गावी गोमांस भक्षण साठवण करण्याच्या संशयावरून काही हिंदुत्त्वावादी कार्यकर्त्यांनी एक मुस्लीम कुटुंबाला मारहाण केली. त्याचे पर्यावसान पुढे सामुदायिक हल्ल्यात झाले. प्रत्यक्षात असे काही गोमांस भक्षण व साठवण झाले नसल्याचे नंतर झालेल्या चौकशीत उघडकीस आले. पण दरम्यान केवळ वहिमापोटी एक कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले.याची प्रतिक्रिया म्हणून देशभर नव्याने सत्तेवर आलेले सरकार धार्मिक असहिष्णू असल्याचा संदेश सर्वत्र पोहोचला व देशाच्या बहुसांस्कृतिक, बहुजातीय, बहुधर्मीय, बहुभाषी संस्कृतीची एकात्मतेची परंपरा अखंड राखावी अशी अपेक्षा सर्व थरांतून व्यक्त होऊ लागली. त्यातूनही ‘संस्कृती' विषयावर विचार करणे आवश्यक असल्याचे वाचकांच्या मनावर ठसत गेले. वाचक ‘संस्कृती माला गंभीरपणे वाचतात हे लक्षात आले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीप्रणित नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत झाल्यापासून हिंदुत्ववादी व प्रतिगामी शक्ती डोके वर काढत आहेत. त्या देशाची बहुसांस्कृतिक वीण उसवू पाहात असल्याची भावना देशात वाढत जाऊन अस्वस्थता पसरत निघाली. तिचा स्फोट ९ ऑक्टोबर, २०१५ रोजी झाला. हिंदीतील प्रख्यात साहित्यिक उदय प्रकाश, नयनतारा सहगल व अशोक वाजपेयी यांनी वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली. पाठोपाठ भारतातील विविध भाषांमधील सुमारे ४० साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले. त्याचे लोण चित्रपट, संगीत, कलाक्षेत्रात पोहोचले. तिथेही जवळ जवळ इतक्याच अभिनेते, दिग्दर्शक, कवी, पटकथाकार यांनी या पुरस्कार वापसी'स आंदोलनाचे स्वरूप आणले. या घटनेतून परत एकदा भारत हा बहुसांस्कृतिक देश आहे. इथे सत्तेच्या बळावर कुणास निरंकुश सत्ता गाजवता येणार नाही. इथले एकात्म वातावरण हे पारंपरिक बहुवंशीय, बहजातीय, बहप्रांतीय, बहुभाषिक, बहुधार्मिक समन्वय, सामंजस्य व समादरावर उभे आहे. त्यात कोणत्याही एका घटकाचा वरचष्मा वा आक्रमण सहन केले जाणार नाही. इथे सर्व जाती, धर्म, वर्गसमूहाला घटनेने समान नागरिक हक्क व स्वातंत्र्य दिले आहे. गोवंश पूजेचे स्वातंत्र्य येथे आहे, तसेच गोमांस भक्षणाचेही आहे, हेही विसरता येणार नाही. हिंदू-मुसलमान धर्म एकता मध्ययुगापासून इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. महाराष्ट्रातील वारी ही भागवत संप्रदायाने धर्मांतर्गत घडवून आणलेली जातीय एकता म्हणूनही पाहाता येते. इथे अस्पृश्योद्धार, मंदिरात सर्व जातीच्या लोकांना प्रवेश, सर्व धर्म बांधवांना मंदिर, मशीद, गुरूद्वार, चर्च, अग्नीगृहादि मंदिरे उभारण्याचे व आपापल्या पूजा विधी, खानापान, सवयीचे स्वातंत्र्य आहे अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक आक्रमण अत्याचार, हिंसाचार, जबरदस्ती, धर्मांतर लादता येणार नाही व सत्तेचा दुरुपयोग करुन राष्ट्रीय एकात्मतेस बाधा आणणारी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही, हे जनतेने सत्ताधा-यांना दाखवून दिले.
सन २०१५ ते २०१७ अशी दोन वर्षे ही ‘संस्कृती माला' समाज प्रबोधन पत्रिकेत अखंडपणे प्रकाशित होत राहिली. एकूण १० लेख प्रकाशित झाले. पैकी सहा लेखातून ग्रंथांचा परिचय करून देण्यात आला. या ग्रंथांतील
काही महत्त्वाच्या लेखांची भाषांतरे करून प्रकाशित करण्यात आली. हेतू हा की मूळ ग्रंथातील काही भाग थेट वाचकांपर्यंत पोहोचावा व त्यांनी जिज्ञासेने मूळ ग्रंथ वाचावेत. या मालेत पुढील ग्रंथ व त्यातील काही लेखांची प्रामुख्याने चर्चा करण्यात आली-
१. संस्कृति के चार अध्याय - रामधारी सिंह 'दिनकर. (१९५६)
२. भारत : इतिहास और संस्कृति- गजानन माधव मुक्तिबोध (१९८३)
३. बौद्ध संस्कृति - डॉ. राहुल सांस्कृत्यायन (१९५२)
४. जन, समाज और संस्कृति - विष्णु प्रभाकर (१९८६)
५. संस्कृति क्या है? - विष्णु प्रभाकर (२०१५)
६. समय और हम - जैनेंद्रकुमार (१९६२)
७. संस्कृति का दार्शनिक विवेचन - डॉ. देवराज (१९५७)
८. कबीर - डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी (१९४२)
९. अशोक के फूल - डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी (१९४८)
१०. कल्पलता - डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी (१९५१)
११. विचार और वितर्क - डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी (१९५४) १२. कुटज - डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी (१९६४)
समाज प्रबोधन पत्रिका त्रैमासिकाचा बहुसंख्य वाचक मराठी भाषी व अभ्यासक आहे, हे लक्षात घेऊन ज्या ग्रंथांचा परिचय करून देण्यात आला त्या ग्रंथलेखकाचे साहित्यिक योगदान प्रारंभी देण्यात येऊन मग ग्रंथ परिचय वा भाषांतर देण्यात येत असे. त्यामुळे लेखकाचे श्रेष्ठत्व, वेगळेपणा, विचारधारा, व्यासंग, साहित्य रचना यांची माहिती होत असे. मग वाचक त्या आकलनाधारे पुढील ग्रंथ समजून घ्यायचा. या ग्रंथांविषयी वाचक उत्सुक होऊन त्यांनी तो मिळवून वाचावा असा उद्देश होता. त्यामुळे वाचक समाजात भारतीय संस्कृती ही प्रारंभापासूनच सामायिक संस्कृती आहे. इथे पूर्वापार अनेक जात, धर्म, वंश, संस्कृती, देशातील लोक राहात आल्याने आणि त्यांच्या प्रारंभापासूनच रोटी-बेटी व्यवहार होत आल्याने इथे एक वंश, शुद्ध जात, पवित्र धर्म असे काही नसून सर्व धर्म समभाव, जातीय ऐक्य, सांस्कृतिक देवाणघेवाण चालत आलेली आहे. सामाजिक सहिष्णुता व सांस्कृतिक सामंजस्यावरच या देशाची एकता व अखंडता टिकून आहे. हे परोपरीने अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे संस्कृती म्हणजे नदीकाठची मानव वस्ती व प्राचीन संदर्भ इतकेच नसून ती कालौघात बदलत, विकसित होत जाणारी आहे. हे उपरोक्त ग्रंथ परिचय व लेख भाषांतरातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
‘संस्कृती माला' प्रकाशित करताना केवळ ग्रंथ परिचय व संस्कृती ओळख हा उद्देश होता. नंतर या सर्व ग्रंथ परिचय व भाषांतराचे संकलन करून त्याला ग्रंथ रूप देण्याची कल्पना पुढे आली. ती कल्पना पण ‘समाज प्रबोधन पत्रिका' त्रैमासिकाचे संपादक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांचीच. मी निमित्त मात्र म्हटले तरी ते अतिशयोक्त होऊ नये. या उपक्रमामुळे मी पूर्वी केव्हातरी अभ्यास, व्यासंग म्हणून वाचलेले ग्रंथ पुनः एकदा कोळून प्यालो. त्यामुळे फायदा असा झाला की माझे भारताविषयाचे इतिहास, संस्कृती, समाजरचना, वर्तमान परिवर्तन इत्यादी संदर्भातील आकलन विस्तारून अन्विती लावणे शक्य झाले. मी या वाचन, लेखन, भाषांतराने स्वतः समृद्ध झालो. याचे श्रेय ‘समाज प्रबोधन पत्रिका संपादकांनाच द्यावे लागेल.
इकडे मी ‘समाज प्रबोधन पत्रिका' त्रैमासिकात संस्कृतीविषयक ग्रंथ परिचय व भाषांतरासंबंधी वाचन, लेखन, विचार करत होतो. त्याचवेळी त्याच काळात मी सन २०१५ मध्ये जानेवारी ते डिसेंबर असे अखंड बारा महिने, ‘आंतर भारती' हे भारतीय भाषा व साहित्याचा परिचय करून देणारे पाक्षिक सदर ‘दैनिक दिव्य मराठी' च्या 'रसिक' पुरवणीसाठी लिहीत होतो. भारतीय भाषा व साहित्य परिचयाद्वारे या देशात राष्ट्रीय एकात्मता कशी नांदते आहे, ते समजावित होतो. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशास आपण राज्यघटना तयार करून प्रजासत्ताक राष्ट्र बनविले. ते करत असताना आपण भाषावार प्रांतरचना, राजभाषाविषयक धोरण ठरवले. भारतीय राजघटनेने हिंदी देशाची राजभाषा बनवून तिला भारतीय भाषांची संपर्कभाषा बनविले. मूळात ती राष्ट्रभाषाच बनायची, पण दक्षिण प्रांतीयांच्या विरोधामुळे ते घडू शकले नाही. तरी लोकव्यवहार, भाषांतर, सांस्कृतिक आदानप्रदान, भाषिक व साहित्यिक देवाण-घेवाण, चित्रपट, वहिन्या, वृत्तपत्रे सर्व तव्हेने ती लोकसिद्ध राष्ट्रभाषाच आहे. जगभरातील विविध देशात तिला भारताची प्रतिनिधी भाषा म्हणूनच ओळखले जाते. या अनुषंगाने केलेल्या अभ्यासातून भाषा, साहित्य व संस्कृतीविषयी मला एक विश्वभान आले.
योहान वॉल्फगांग फॉन गटे (गोएथ) चा काळ इ. स. १७४३ ते १८३२ चा. तो जगप्रसिद्ध नाटककार, कवी, समीक्षक. त्याचे ‘फास्ट' हे महाकाव्यात्मक नाटक जगप्रसिद्ध आहे. त्याने त्या काळात विश्वसाहित्य (Weltliteratur) संकल्पना विशद केली होती. ती कल्पना वैश्विक संस्कृती निर्मिती आणि साहित्यिक एकतेचीच होती. आज आपण जे जागतिकीकरण अनुभवतो आहोत, त्याची मुळे या संकल्पनेत दिसून येतात. या कल्पनेच्या अभ्यास व प्रभावातून आपल्याकडे विसाव्या शतकाच्या प्रारंभी (इ. स. १९०५) कवींद्र रवींद्रनाथ टागोर यांनी ‘विश्वभारती' ची कल्पना मांडली इतकेच नव्हे तर विश्वभारती विद्यापीठाची सुरुवात शांतीनिकेतन आश्रमात करून भाषा, साहित्य, कला, संगीत व संस्कृतीचा आंतरशाखीय अभ्यासक्रम विधिवत सुरू केला. या ग्रंथात डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी यांच्या निबंध व समीक्षा लेखांचा जो परिचय करून देण्यात आला आहे, ते रवींद्रनाथांकडे त्या काळात हिंदी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते, हे आपण या संदर्भात लक्षात अशासाठी घ्यायला हवे की रवींद्रनाथांची पाश्र्वभूमी वैश्विक ऐक्याची होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर याच ध्येयाने महाराष्ट्रात सन १९४८ ला साने गुरुजींनी स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्यांच्या प्रचार, प्रसारार्थ जेव्हा ‘साप्ताहिक साधना' सुरू केले, तेव्हा त्यांनी ‘प्रांतभारती' सदर सुरू केले होते. पुढे त्याचे रूपांतर आंतरभारती' मध्ये करून महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, गुजरातमध्येही आंतरभारती केंद्रांचा प्रारंभ झाला होता. नंतर १९५० नंतरच्या काळात पंडित नेहरूंनी या संकल्पनेचा पुरस्कार करून साहित्य अकादमी (१९५४), राष्ट्रीय पुस्तक न्यास(एनबीटी) (१९५७) सुरू करून भाषा, साहित्य, संस्कृती एकतेस गती दिली. १९४४ साली स्थापन झालेल्या भारतीय ज्ञानपीठाने १९६१ पासून भारतीय साहित्याचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन या प्रयत्नास बळकट आणली. जिज्ञासूंनी यासाठी साधना प्रकाशन, पुणे यांनी नुकतेच प्रकाशित केलेले माझे पुस्तक ‘भारतीय भाषा व साहित्य' वाचावे.
या सर्व पार्श्वभूमीवर वरील संस्कृतीमालेच्या ग्रंथरूप दिलेल्या 'साहित्य आणि संस्कृती' या पुस्तकाकडे पाहावे लागेल. संस्कृती संकल्पनेच्या इथे करण्यात आलेल्या विस्तृत चर्चेमुळे लेखन प्रक्रियेमागील विचार व प्रयत्न स्पष्ट होतील. संस्कृतीमालेचे पुस्तकरूप करायचे ठरल्यावर पत्रिकेचे संपादक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांना मी सदर ग्रंथास प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. त्यांनी ही मान्य केल्याबद्दल व या लेखनास संधी देणे, उद्युक्त करणे, प्रोत्साहन देणे इ. सर्वांबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहेत. त्यांची प्रस्तावना वाचली तरी हे पुस्तक वाचल्यासारखे आहे, इतकी ती अल्पाक्षरी व सारग्राही आहे, हे वेगळे सांगायला नको.
या ग्रंथातील प्रारंभिक दीर्घ लेख हा डॉ. देवराज यांनी आपल्या 'संस्कृति का दर्शनिक विवेचन' (१९५७) ग्रंथास लिहिलेल्या ‘भूमिका' चे भाषांतर आहे. सदर ग्रंथात त्यांनी ‘सर्जनात्मक मानवतावाद' ची संकल्पना स्पष्ट केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मानवी संस्कृती ही मानवी मूल्यांच्या विकास व परिवर्तनाची गाथा होय. मनुष्य निरंतर मूल्यांचा शोध घेत आपले जीवन बोधप्रद व सार्थक बनवत असतो. ही त्याची कृती, प्रवृत्ती त्यांची सर्जनशीलता होय. सृजन म्हणजे नित्य नव्याचा ध्यास व रचना होय.यात त्याला परमसुख व संतोष लाभत राहिल्यानेच तो निरंतर नूतन निर्मिती करत जग बदलत राहातो.त्यातून संस्कृतीचा कायाकल्प घडून येत राहातो. म्हणून आपणाला काळाच्या ओघात संस्कृती बदलल्याची, विकसित झाल्याची अनुभूती येते.यातून माणसांचे जीवन व व्यक्तिमत्त्वही आपसूक बदलत राहाते.यात काळाच्या राजनैतिक, आर्थिक, शैक्षणिक प्रयत्नांचे योगदान असते.माणूस केवळ साधनसंपन्न होण्यासाठी धडपडत नसतो.त्याला संस्कारसंपन्न व्यक्ती म्हणून जीवन व संस्कृतीसमृद्ध समाजजीवनही हवे असते.
रामधारी सिंह 'दिनकर' हिंदीचे भारतीय ज्ञानपीठ विजेते साहित्यिक होत.त्यांनी लिहिलेल्या 'संस्कृति के चार अध्याय' (१९५६) ग्रंथात हिंदू, जैन, बौद्ध, इस्लामी, ख्रिश्चन संस्कृतीची चर्चा धर्म, कर्मकांड, आदानप्रदान या अंगाने करण्यात आली आहे.पण सरतेशेवटी ते स्पष्ट करण्यात आले आहे की, संघर्षानंतर इथे समन्वयच होत राहिला आहे. सामायिक संस्कृतीचे स्वप्न सत्यात उतरवत राहण्यातच शहाणपण आहे. हिंदीतील दुसरे कवी गजानन माधव मुक्तिबोध, मूळ महाराष्ट्रीय पण पुढे मध्यप्रदेश त्यांची लेखन व जीवनभूमी बनली. त्यांनी लिहिलेल्या 'भारत : इतिहास और संस्कृति' ग्रंथ परिचयातून उमजते की इतिहास हा भूतकाळाचे कठोर वास्तव असते. इतिहासाची गैरसोय अशी असते की तो वर्तमानात आपल्या विचार, दृष्टीने तो बदलता येत नाही. भले कुणाची काहीही इच्छा असो लोक इतिहासाचे पुनर्लेखन करतात, पण त्यांना तथ्य व सत्य नाकारता येत नाही. विश्लेषण ही सापेक्ष गोष्ट असते खरी. मुक्तिबोधांचे हे पुस्तक वास्तववादी तत्त्वज्ञान म्हणून महत्त्वाचे ठरते.
डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी समीक्षक व निबंधकार त्यांनी असून संस्कृतीवर स्वतंत्र असा ग्रंथ लिहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या ‘अशोक के फूल (१९४८), 'कल्पलता' (१९५१), ‘विचार और वितर्क' (१९५४) आणि ‘कुटज' (१९६४) या ग्रंथात संकलित संस्कृतीसंबंधी लेखांच्या आधारे संस्कृतीविषयक त्यांच्या धारणेची चर्चा एका लेखात करण्यात आली आहे. याच अनुषंगाने त्यांच्या 'कबीर' शीर्षक लेखाच्या संपादित भागाचे भाषांतर देण्यात आले आहे. या विविध लेखांतून डॉ. द्विवेदींचा व्यापक व्यासंग लक्षात येतो. त्यांचे म्हणणे आहे की माणसाची मूल्यधारणा प्रवाही असते. या प्रवाहात संस्कृती काळाप्रमाणे नव्या शक्ती आत्मसात करते. अभिनिवेश मुक्त सांस्कृतिक आकलन व व्यवहारातच मानवी सभ्यतेचं हित सामावलेले आहे. बौद्ध धर्माचे अभ्यासक म्हणून डॉ. राहुल सांकृत्यायन यांचा लौकिक सर्वदूर पसरलेला आहे. त्यांना हिंदीपेक्षा भारतीय साहित्यिक म्हणावे असा अन्य अनेक भाषांचा त्यांचा अभ्यास आहे. संस्कृत, पाली, प्राकृत, अर्धमागधी, हिंदी, इंग्रजी असा त्यांचा व्यापक भाषिक व्यासंग त्यांना महापंडित सिद्ध करतो. त्यांनी लिहिलेला ‘बौद्ध संस्कृति' (१९५२) ग्रंथ एका अर्थाने बौद्ध धर्माच्या जागतिक प्रचार, प्रसाराचा इतिहास होय. पण त्यातून त्यांनी उभी केलेली बौद्ध संस्कृती आपणास हिंदू धर्माच्या कर्मकांडांपासून दूर नेणारी व मानवता भेदातीत करणारी म्हणून महत्त्वाची वाटते. हा ग्रंथ जागतिक संदर्भ वैविध्याने भरलेला असल्याने संस्कृतीविषय एक वैश्विक परिदृश्य हा ग्रंथ उभा करतो नि लक्षात येते की वैश्विक तेच शाश्वत!
जैनेंद्रकुमार हिंदी साहित्यात कथाकार, कादंबरीकार म्हणून जितके महत्त्वाचे तितकेच गांधीवादी विचारवंत म्हणूनही. ‘समय और हम' (१९६२) हा ग्रंथ संस्कृतीविषयक नवे भान देणारा म्हणून महत्त्वाचा. अधिकांशांची धारणा असते की संस्कृती म्हणजे भूतकाळाचे प्रतिबिंब. पण ते वर्तमानाचे वास्तव चित्र असते असे नवे भान हा ग्रंथ देतो. वर्तमानातला मनुष्याचा काम, विज्ञान, साहित्य, भाषाविषयक व्यवहार संस्कृतीच सांगत असतो हे त्यांनी समजावले आहे. जैनेंद्रकुमारांचे समकालीन साहित्यिक विष्णु प्रभाकर कथा, कादंबरी शिवाय नाटक, एकांकी, आठवणी, आत्मचरित्र लिहिणारे म्हणून समग्र लेखक. त्यांच्या ‘जन, समाज और संस्कृति' (१९८६) आणि ‘संस्कृति क्या है?' (२०१५) या दोन ग्रंथांतून स्पष्ट होते की वर्तमान संस्कृती संकट हे चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूची आठवण करून देणारे आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाचे वरदान त्याला आकर्षित करते खरे पण त्यांच्याच अभिशापाने त्याचा जीव गुदमरतो आहे. मानवी विकासाचा प्रारंभ अशाच संभ्रमाने झालेला. अॅडाम आणि ईव्हच्या कथेतले सफरचंद सर्वांना माहीत आहे. प्रलोभन व पश्चात्ताप या मानवी जीवनरूपी एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. महाभारतातला अभिमन्यू मारला गेला, पण वर्तमानातला अभिमन्यू मरणार नाही. कारण तो मृत्युंजयी संस्कृतीचा-वैश्विक संस्कृतीचा समर्थक व उपासक आहे, हा विष्णु प्रभाकरांचा आत्मविश्वास या ग्रंथास वर्तमानाची संजीवन औषधी बनवेल असा मला विश्वास वाटल्यावरूनच हा ग्रंथ प्रपंच केला आहे. त्याचा समारोप मी विष्णू प्रभाकरांच्याच शब्दात करणे पसंत करेन. ते म्हणतात, "अभिमन्यू इस युग में चक्रव्यूह में प्रवेश करने के बाद मरेगा नहीं बल्कि वह इस चक्रव्यूह को छिन्न भिन्न कर देगा और उन सप्त महारथियों को कही ठोर (स्थान) नहीं मिलेगी। वे अपनी मौत मर जायेंगे और आस्था का नन्हा-सा दिया मौसम के तूफानों को झेलता हुआ उसी तरह प्रकाश बिखरता रहेगा सूर्य के आगमन की प्रतीक्षा करता हुआ।"
सदर ग्रंथातील शेवटचा लेख 'एकात्म भारताचा विचार' समारोपपर असून तो स्वतंत्रपणे लिहिण्यात आला आहे.
- डॉ. सुनीलकुमार लवटे
दि. २५ जून, २०१७
अनुक्रम
१. संस्कृतीचे तात्त्विक स्वरूप : सर्जनात्मक मानवतावाद/२१
२. संस्कृतीचे चार अध्याय : समन्वित संस्कृतीचे स्वप्न आणि सत्य/५८
३. भारत : इतिहास आणि संस्कृती- मानवोदय ते प्रजासत्ताक भारत/७५
४. भारतीय संस्कृती : प्रश्न आणि योगदान १०१
५. मध्ययुगीन सांस्कृतिक विकास आणि मानव सामंजस्य/११७
६. बौद्ध संस्कृती : धर्मप्रसाराचा इतिहास/१३५
७. युरोप आणि भारत : सांस्कृतिक चिकित्सेचे प्रश्नोपनिषद/१४६
८. संस्कृती : प्रतिकूल परिस्थितीतील आशावाद/१६४
९. भारतीय धर्मसाधनेत कबीराचे स्थान/१७५
१०. सत्तेच्या वळचणीतील संस्कृती/१८४
११. एकात्म भारताचा विचार/१८९
- पूर्वप्रसिद्धी सूची/१९५
- चर्चित ग्रंथसूची
(टीप : मूळ प्रसिद्ध लेख शीर्षके ग्रंथानुकूल करण्यात आली आहेत.)