साहित्यिक:वासुदेव वामन खरे
←आडनावाचे अक्षर: ख | वासुदेव वामन खरे (१८५८–१९२४) |
वासुदेवशास्त्री खरे (५ ऑगस्ट १८५८-११ जून १९२४). मराठी ग्रंथकार व इतिहाससंशोधक. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे. घराणे संस्कृतज्ञ. सातारच्या अनंतशास्त्री गजेंद्रगडकरांकडे त्यांनी संस्कृत विद्याभ्यास केला. नंतर पुण्यास येऊन काव्येतिहाससंग्रह ह्या जुन्या ग्रंथांच्या जीर्णोद्धारास वाहिलेल्या मासिकाच्या संपादनकार्यात मदत करू लागले. त्यामुळे इतिहाससंशोधनाची आवड निर्माण झाली. विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक, आगरकर ह्यांनी स्थापिलेल्या 'न्यू इंग्लिश स्कूल' मध्ये काही काळ शिक्षक म्हणून नोकरी. त्यानंतर ते मिरजेच्या शाळेत शिक्षक झाले. त्यानंतरचे त्यांचे सारे आयुष्य मिरजेलाच गेले. इतिहाससंशोधन हे त्यांचे जीवितकार्य असले, तरी काव्य-नाटकादी साहित्यरचनाही त्यांनी केली आहे.
पंडिती काव्यरचनेचा आणि शीघ्रकवित्वाचा नाद त्यांना विद्यार्थिदशेपासूनच होता. त्यांनी स्वत:ही काव्यरचना केली आहे. समुद्र (१८८४), यशवंतराव महाकाव्य (१८८८) आणि फुटकळ चुटके (१८९०) हे त्यांचे काव्यग्रंथ.
शिवाजी-संभाजी ह्या पितापुत्रांच्या संबंधांवर लिहिलेले गुणोत्कर्ष (१८८५) हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर इतिहाससंशोधन करीत असता, आवश्यक ते आर्थिक स्थैर्य लाभावे, यासाठी त्यांनी बरेचसे नाट्यलेखन केले. तारामंडळ (१९१४), चित्रवंचना (१९१७), शिवसंभव (१९१९), उग्रमंगल (१९२२) आणि देशकंटक (१९३०) ही त्यांची काही नाटके, गुणोत्कर्ष आणि शिवसंभव ही नाटके ऐतिहासिक; परंतु त्यांच्या इतर नाटकांत अद्भुततेला व अतिरंजनाला स्वाभाविक वाव असूनही त्यांत संभाव्यता आणि प्रासादिकता राखण्यात ते यशस्वी झाले आहेत. नाना फडनविसांचे चरित्र (१८९२) हे इतिहासक्षेत्रातील त्यांचे पहिले पुस्तक. त्यानंतर संशोधन-संपादन प्रकाशनाचा प्रचंड उद्योग त्यांनी केला. १८९७ मध्ये ऐतिहासिक-लेख-संग्रह हे मासिक काढून ते तीन वर्षे चालविले. पटवर्धन जहागिरदारांच्या जुन्या चिटणीशी दप्तरांतील ऐतिहासिक महत्त्वाच्या कागदपत्रांतून ऐतिहासिक लेख संग्रहाचे चौदा खंड सिद्ध केले. पहिले अकरा खंड त्यांनी स्वत: आणि शेवटचे तीन खंड त्यांच्या निधनोत्तर त्यांचे चिरंजीव य. वा. खरे ह्यांनी संपादिलेले आहेत. ह्या लेखसंग्रहाच्या प्रस्तावना, तसेच न. चिं. केळकरकृत मराठे व इंग्रज (१९१८) ह्या ग्रंथाची प्रस्तावना ह्यांवरून वासुदेवशास्त्र्यांचा व्यासंग, विद्वत्ता आणि साक्षेपीपणा दिसून येतो.
अधिकारयोग अथवा नानास राज्याधिकार मिळाल्याचा इतिहास (१९०८), इचलकरंजी संस्थानचा इतिहास (१९१३), मालोजी व शहाजी (१९२०), मराठी राज्याचा उत्तरार्ध (खंड पहिला, १९२७) ही त्यांची इतर ग्रंथरचना. यांशिवाय हरिवंशाची बखर अथवा पटवर्धन सरदारांच्या हकिकती (१९०९) ह्या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले आहे.