Jump to content

साहित्यिक:नामदेव दामाजी रेळेकर

विकिस्रोत कडून
नामदेव दामाजी रेळेकर
(१२७०–१३५०)

    जन्म:- २६ आक्टोबर १२७० संत नामदेव यांचा जन्म शिवाजी महाराजांच्याही जवळपास चारशे वर्षं आधी. तेव्हा उत्तरेत मुस्लिम सत्ता स्थिर झाली होती. दक्षिणेत त्याचा पायरव ऐकू येत होता. धर्माच्या नावाने हिंदू धर्म मार्तंड आणि मुस्लिम शासक बहुसंख्य भारतीयांना दुय्यम दर्जाचं जिणं जगण्यास भाग पाडत होते. त्याविरुद्ध संतपरंपरेनं मोठी क्रांती घडवली. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या या क्रांतीचं नेतृत्व नामदेवांनी केलं. ते एका शिंपी परिवारात जन्मले. त्यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी गावात किंवा पंढरपुरात झाला. वडील दामाशेटी. आई गोणाई. आऊबाई बहीण. अकराव्या वर्षी लग्न झालं ते राजाईंशी. नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल ही चार मुलं. लिंबाई मुलगी. लाडाई, गोडाई, येसाई, साखराई या सुना. असा छान बहरलेला संसार त्यांनी केला. त्यांच्या देवपिसे होऊन केलेल्या भक्तीला सुरुवातीला विरोध झाला. पण नंतर त्यांनी सगळ्यांना आपलं बनवलं. या सगळ्या परिवारानेच नामदेवांच्या प्रभावात अभंगरचना केली आहे. अगदी लहानपणापासूनच नामदेव विठ्ठलमय झाले होते. पांडुरंगच त्यांचं सर्वकाही होता. आई बाप सोयरा सखा गुरू देव स्वामी तोच होता. विठ्ठलाशी ते संवाद साधत. या बालभक्ताच्या हट्टापायी विठ्ठलाने दुधाचा नैवेद्य सेवन केला, अशी स्रर्वात प्रसिद्ध कथा आहे. पुढे दगडाचा देव बोल नाही, अशी आपल्या अभंगातून ग्वाही देणा-या नामदेवांनी लहानपणीच अध्यात्मिक क्षेत्रात मोठाच अधिकार प्राप्त केला होता, एवढं मात्र यातून नक्कीच म्हणता येईल. पण नामदेवांची दुसरी कथा यापेक्षाही महत्त्वाची आहे. सुकी भाकरी पळवून नेणा-या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन जाणारे नामदेव, देवाला दूध पाजणा-या नामदेवांपेक्षा महत्त्वाचे आहे. ते लहान वयातच सर्वांभूती भगवंत पाहू शकत होते, हे महत्त्वाचं. नामदेवांनी सत्य समजून घेण्यासाठी वेदज्ञ, शास्त्रज्ञांकडे हेलपाटे घातले. पण ज्ञातिहीन नामदेवांना कोण उभं करणार? त्यामुळे त्यांनी भक्तीतून म्हणजे थेट भगवंतालाच आधार मानून स्वतःच बुद्धीचा कस लावत विश्वाचे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून ते लंगोटी नेसून चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करत सद्विचारांचा प्रसार करू लागले होते. ही वाट स्वतःच शोधायची होती. त्यातून साधनेची नवीनवी साधनं निर्माण होऊ लागली. श्रोत्यालाही सामावून घेणारी वारकरी सामूहिक कीर्तन भजनाची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली. त्यासाठी त्यांनी अभंग या छंदाची निर्मिती केली. अभंग हा छंद गाळला, तर मराठी वाङमयात काय उरतं, याचा विचार केलेला बरा. नामदेवांनीच वारक-यांचा लाडका काल्याचा सोहळाही सुरू केला. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी नुकतीच भगवद्गीतेची गंगा मराठीत आणली होती. त्यातून नामदेवांना आपल्या कामासाठी तत्त्वज्ञानाचं अधिष्ठानच मिळालं होतं. कुशल संघटक असणा-या निवृत्तीनाथांना आणि नामदेवांना एकत्र यावसं वाटणं स्वाभाविकच होतं. त्यासाठी वयाने आणि कर्तृत्वाने ज्येष्ठ असून नामदेव स्वतः आळंदीला गेले. तिथे संत गोरा कुंभारांच्या नेतृत्वात झालेल्या संतसंमेलनांमधल्या चर्चांमधून नामदेवांना भगवद्कार्यासाठी अधिक ज्ञान मिळवण्याची गरज लक्षात आली. त्यासाठी त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून देवाच्या सगुण निर्गुण रूपाविषयी स्पष्टता मिळवली. याच देवळात कीर्तन करताना त्यांचा पुरोहितांनी केलेला अपमानही त्यांच्यासाठी विचारांचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल इतका ताकदीचा आहे, हे देखील लक्षात ठेवायला हवं. नामदेव ज्ञानदेव भेटीतून विचारांचा नवा प्रवाह उदयाला येत होता. ज्ञान आणि भक्तीचा हा संगम होता. त्यातून कीर्तनाच्या रंगी नाचत देशभर ज्ञानदीप लावण्यासाठी दोघांच्याही प्रभावातली सगळी संतमंडळी एकत्र झाली. त्यांची एकत्र तीर्थयात्रा सुरू झाली. महाराष्ट्र पिंजून गुजरात, राजस्थान आणि पंजाबापर्यंत हे संत गेले. माणसाला माणूस बनवण्याची ही धडपड होती. नामदेव कीर्तन करत. चोखामेळ्यासारखे अस्पृश्यही टाळकरी बनून त्यांना साथ देत. जनाबाईंसारखी जातीने अतिशूद्र असणारी स्त्री कीर्तनाचं संचलन करत. ज्ञानदेव अभंग सूचवत. अशा जातीपातीच्या भिंती तुटत होत्या. गोरा कुंभार, सावता माळी, परिसा भागवत, चोखा महार आणि त्यांचा परिवार, जगन्मित्र नागा, नरहरी सोनार, दासी जनी सगळेच त्यात होते. पंजाबातून जाल्हण सुतारही पंढरपुरापर्यंत सोबत आले. हे संत म्हणजे टाळकुटे विरक्त नव्हते तर त्या त्या समाजांचे धार्मिक, वैचारिक आणि सामाजिक नेतेच होते. या ऐतिहासिक तीर्थयात्रेचं उद्यापन पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटावर झालं. स्पृश्य अस्पृश्य, उच्च नीच असे सगळे भेदाभेद सहभोजनात गळून पडले. धर्माच्या नावाखाली चालणा-या नीच जातिभेदांना दिलेला हा मोठा धक्का होता. पुढे नामदेवांनी पंढरपुरातल्या विठ्ठलमंदिराच्या दारात उभी केलेली चोखोबांसारख्या अस्पृश्याची समाधी त्यांच्या खंबीर क्रांतिकारत्वाचा पुरावाच आहे. यानंतर लवकरच ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. त्याचा अत्यंत हृदयद्रावक आंखो देखा हाल नामेदवांनी लिहून ठेवलाय. पुंडलिकापासून जनाबाईंपर्यंतच्या भक्तांचं चरित्र लिहून नामदेवांनी या क्रांतिकारक चळवळीचं मोठंच डॉक्युमेंटेशन करून ठेवलंय. ते महाराष्ट्रातले सगळ्यात महत्त्वाचे चरित्रकार मानायला हवेत आणि ते आद्य आत्मचरित्रकारही आहेत. त्यांनी एक कोटी अभंग लिहिले, असं मानलं जातं. याचा अर्थ त्यांनी विपुल संख्येने साहित्यरचना केली असा घ्यायला हरकत नाही. त्यांच्या साहित्याची भाषा खूपच सोपी आहे. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, चांगदेव या त्यांच्या समकालीनांच्या तुलनेत आज आपल्याला त्यांची भाषा लगेच कळते. त्यांनी कायम अत्यंत सर्वसामान्यांसाठी लिहिलं. त्यात संवाद आणि नाट्य आहे. लोककलांचे विविध फॉर्म त्यांनी हाताळलेत. श्रीकृष्णाच्या लीला सांगताना त्यांनी मराठीतल्या पहिल्या बालकविताही लिहिल्यात. मराठीतल्या गझलेची पहिलं पावलं शोधतानाही संशोधक त्यांच्यापर्यंत पोहोचतात, इतकं त्यांचं लिखाण वैविध्यपूर्ण आहे. तरीही त्यांचं खूपच कमी साहित्य आज उपलब्ध आहे. ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतरही नामदेवांनी तीर्थयात्रा करून रामेश्वरापासून मुलतानपर्यतचा भारत पालथा घातला. जिथे गेले तिथले बनले. लोकभाषांतून काव्य केलं. हिंदी साहित्याला नवं भान दिलं. त्यांच्या कामातूनच पुढे रामानंद, कबीर, नानक, दादू दयाळ, मीरा, नरसी मेहता, मलूकदास अशी संतांची मांदियाळी देशभर उभी राहिली. पंजाबात तर ते दोन दशकांहून अधिक काळ राहिले. तिथे त्यांनी केलेल्या मशागतीतून शीख धर्माचा वटवृक्ष उभा राहिलाय. नारायण आणि नामदेव एकच आहे असं मानणा-या शीख परंपरेच्या गुरू ग्रंथसाहेबातही नामदेवांची ६१ पदं आहेत. नामदेवांचा देशभरावरचा प्रभाव आजही पाहता येतो. महाराष्ट्र आणि पंजाबाबरोबरच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या राज्यांत त्यांची मंदिरं आहेत. तामिळनाडूपासून जम्मूपर्यंतचे लाखो लोक त्यांचं नाव एकतर आडनाव म्हणून किंवा जातीची ओळख म्हणून अभिमानाने मिरवतात. *मा.नामदेवांनी* ३ जुलै १३५० रोजी अत्यंत समाधानाने आपला देह ठेवला. त्यांची एक समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर आहे. तर दुसरी पंजाबमधील घुमान येथे आहे.

    साहित्य

    [संपादन]