Jump to content

साथ

विकिस्रोत कडून



साथ






जाई निंबकर






देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.











बाई, तुम्ही मागे लागल्यामुळेच केवळ ही
कादंबरी माझ्या हातून लिहून झाली.तेव्हा ही
तुमच्या साठीच आहे.

जाई




 केवळ दीर्घ सहवासामुळे दोन माणसांतलं नातं
कणखर, परिपक्व आहे असं पहाणाऱ्यांना वाटतं.
पण ते खऱ्याखुऱ्या संवादावर आधारलेलं नसलं
तर कणखरपणाच्या दर्शनी भिंतीमागे ते हळूहळू
कमकुवत होत ढासळत राहतं.

रेशीम गुंता

 शतकानुशतके परंपरेने झालेले सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक संस्कार व लग्नमंडपात आप्तस्वकीयांच्या साक्षीने डोक्यावर पडलेल्या मंत्राक्षदा किंवा सप्तपदी यामुळे श्रद्धा किंवा कर्तव्यबुद्धी जागी होईल. पण या संस्कारांत किंवा बाह्योपचारांत पति-पत्नींनी परस्परांना समजावून घेऊन, हे नवे नाते, नवे बंध सुखकर करण्याचे सामर्थ्य आहे का?

 'पश्चिमेचे वारे' वाहू लागल्यापासून, भारतीय स्त्रीची अस्मिता नव्याने जागृत होऊन साकारू लागली आहे. ती आता सर्वच क्षेत्रांत पुरुषाबरोबरीने आपले कर्तृत्व सिद्ध करू लागली आहे.
 संसार म्हणजे स्त्री-पुरुषाचे नुसतेच एकत्र राहणे नसते, तर सर्वार्थाने स्वतंत्रपणे घडलेली दोन व्यक्तिमत्त्वे आपली वाटचाल एकमेकांच्या सहकार्याने करू इच्छित असतात.
 आजच्या काळात, विशेषतः सुशिक्षित समाजात, दोन स्वतंत्र व्यक्ती जेव्हा पति-पत्नी म्हणून एकत्र येतात तेव्हा प्रेमाबरोबर, व्यवहारही जीवनाचा एक भाग होतो.
 आर्थिक व्यवहार, नातीगोती, वेगळाले विचार, प्रवृत्ती, भावना आणि संवेदनक्षमता यांतून मग मतभेद, ताणतणाव, कळत नकळत एकमेकांचा केला गेलेला अधिक्षेप वा झालेला अन्याय यांची मालिकाच सुरू होते.
 मग या सगळ्यामधून परस्परांना साथ देण्याची प्रेरणा कशातून मिळत असते आणि कशी यशस्वी होत असते ?
 या संबंधातले परस्परांचे पहिले-वहिले आकर्षण. त्यातील गोडवा, मुलांमुळे निर्माण झालेले मायेचे अनुबंध आणि एकमेकांबद्दल विश्वास आणि त्यातून मिळणारा आधार, यांतला कोणता बंध प्रभावी ठरत असेल ?
 खरं तर हा प्रश्न ज्याचा त्याने स्वत:च्या मनांत डोकावून स्वतःलाच विचारायचा आहे.

एस


  शेवटचा पाहुणा बाहेर पडला तशी रामनं पुढचं दार लावून बोल्ट सरकवलेले ज्योतीला ऐकू आले. बैठकीची खोली सिगरेटचा धूर, दारू आणि माणसं यांच्या संमिश्र वासानं भरून गेली होती. त्याच्या शिसारीनं ज्योतीने ओठ मुडपले. त्यात समाधानाची बाब एवढीच की, अशा रात्रीनंतरच्या सकाळी ती आणि राम उठण्यापूर्वीच खोली पुन्हा निर्मळ, प्रसन्न करून ठेवण्याचं काम नामदेव आणि पार्वती चोखपणे बजावीत. इथे शहरातसुद्धा चोवीस तास घरात नोकर ठेवण्याचा रामचा अट्टाहास होता. त्यांच्यावर फार खर्च होतो, असं ज्योतीला वाटायचं. शिवाय फ्लॅटमध्ये सदैव त्यांचा वावर, लुडबूड कधीकधी नको वाटायची. तरीपण ती दोघं हाकेला ओ द्यायला कधीही तयार असण्याची सोयही होतीच.

 कॉरिडॉरमधून झोपायच्या खोलीकडे जाताना तिला एकदम जाणवलं की, आपण प्रत्येक गोष्टीकडे तिऱ्हाइताच्या अलिप्ततेनं पहातोयत. जणू आपण इथल्या राह्यलोच नाही. मग हा विचार झटकून टाकल्यासारखी तिनं किंचित मान हलवली. ती इथली राहिली नाही, असं म्हणणं खरं म्हणजे अचूक नव्हतं. कारण खऱ्या अर्थाने ती इथली कधी झालीच नव्हती. ते दुसरं घर जसं तिनं सर्वांशानं आपलं म्हणून स्वीकारलं तसं हे स्वीकारलंच नाही. तिला हे आवडलं नव्हतं असं नव्हे. पण इथे ती तात्पुरती म्हणून आली न शेवटपर्यंत तशीच राहिली.
 त्या दुसऱ्या घराच्या समोर, कामाच्या मोठ्या थोरल्या व्यापातून वेळ काढून, तिने एक लहानशी बाग केली होती. त्यात हौसेनं कर्दळ, शेवंती, जास्वंद, गुलाब लावले होते. बागेची निगा तीच राखायची. त्याची मशागत, छाटणी, खतपाणी आपल्या हाताने करायची. राम त्या बागेला तिचं तिसरं मूल म्हणे. ह्या ठिकाणी रहायला आल्यावर एकदा बाल्कनीत कुंडयांची बाग कर असं राम म्हणाला तेव्हा ती नुसतीच हसली होती.
 तो म्हणाला होता, "जमिनीत बाग लावणं वेगळं न हे वेगळं हे कबूल आहे मला पण काहीच नसण्यापेक्षा कुंडया बऱ्या की."
 आता तिला वाटलं की इथे बाग करण्याचे कष्ट घेण्याची तिची अनिच्छा प्रतीकात्मक होती. ह्या जागेबद्दलची तिची भावना त्यातनं प्रकट झाली होती. ही जागा बरड होती. वाढणाऱ्या गोष्टी आणि सुखावणाऱ्या आठवणी ह्यांची उपज नसलेली. आता ती ही जागा तर सोडून चाललीच होती, पण हिच्याबरोबर ती दुसरीही. त्या घरी ती पुन्हा कधीही जाणार नव्हती. ह्यात बाहेरून येऊन पाऊल टाकणारी तीच, आणि आता निघून जाणारीही तीच. हे रामचं घर, रामचं आयुष्य. ती फक्त काही काळ त्यात वाटेकरी होती. आपल्याला आपलं असं वेगळं आयुष्य उभारता येईल का, अशा शंकेनं ती व्याकुळ झाली. इतके दिवस ती रामचं आयुष्य जगली होती. त्याच्या आवडीनिवडी तिच्या झाल्या होत्या. त्याचे विचार, त्याची मतं ही खास ठरविल्याविना सहज उचलली जाऊन आमचे विचार, आमची मतं झाली होती.
  तिनं बाथरूममध्ये जाऊन सावकाश रेंगाळत कपडे बदलले, दात घासले, तोंड धुतलं. आता वेळ येऊन ठेपल्यावर रामशी मुकाबला करण्याचा क्षण ती शक्य तितक्या लांबणीवर टाकत होती. राम तिचं होईपर्यंत शांतपणे थांबेल, तिला घाई करणार नाही आणि आत यायलाही मागणार नाही, हे तिला माहीत होतं.
  विनीची आठवण होऊन तिला हसू आलं. त्या दोघी मिळून कुठेतरी जाणार होत्या आणि विनीचे कपडे बदलून व्हायचे होते. बेडरूममधे तिच्या समोरच विनीने फक्त चड्डी आणि ब्रा ठेवून बाकी सगळे कपडे काढले, आणि मग ज्योतीच्या तोंडाकडे बघून ती हसतच सुटली.
  " तुला एवढा धक्का बसला ? लग्न होऊन इतकी वर्ष झाली तरी तू इतकी लाजरी-बुजरी कशी गं ? "
  " लग्नाचा त्याच्याशी काय संबंध?".
 " तू अन् राम एकमेकांसमोर कपडे बदलत नाही ?"
 " नाही."
 " एकाच बेडरूममधे झोपता ना ? "
 "अर्थात."
 " मग करता तरी काय ? एकाचे कपडे बदलून होईपर्यंत दुसऱ्यानं बाहेर थांबायचं का ? "
 " आम्ही बाथरूममधे कपडे बदलतो."
 " माय गॉड. तू तर अगदीच पुराण्या जमान्यातली आहेस."
 ह्यानंतर बरेचदा तिच्या मनात यायचं की असं काही करून बघावं. रामच्या देखत कपडे बदलावे, किंवा तो अंघोळ करीत असताना त्याच्याबरोबर शावरखाली उभं रहावं. पण प्रश्न फक्त सवयीपेक्षा वेगळं करण्याचा, जास्त जवळीक साधण्याचा नव्हता. रामचं मत होतं की प्रत्येकाला आपला गाभा अतूट, अखंड ठेवण्यासाठी इतरांपासून एका ठराविक अंतरावर रहाण्याची गरज असते. त्याची अशी अनेक बाबतीत अगदी ठाम मतं होती, आणि तिची नव्हती. तेव्हा त्यांच्यातल्या नात्याचा पोत, त्याचं स्वरूप हे त्यानंच ठरवलं होतं आणि खरं म्हणजे त्या नात्याच्या चौकटीत ती आनंदात राहिली होती. पण त्याच वेळी ती जाणून होती की त्यात काही बदल करण्याची शक्यता नव्हती. सहज बारीकसारीक फेरफार करायला जावं तर सबंध इमल्यालाच तडा जायचा.
  राम बाथरूममधून " छान पार्टी झाली. सगळ्यांना खूप मजा आली " असं म्हणत बाहेर आला. दर पार्टीनंतर तो जवळजवळ ह्याच शब्दात असंच म्हणायचा. तिच्या मनात आलं, हे ऐकण्याची माझी ही शेवटचीच वेळ. रामने दिलेली पार्टी अर्थात सर्व दृष्टींनी उत्तम असायची. पार्टी देण्यात त्याचा हातखंडा होता. कुठल्या पाहुण्यांना एकत्र बोलवायचं, पदार्थ कोणते मागवायचे, मरगळ आलेल्या पार्टीत चैतन्य आणण्यासाठी कोणते वाद सुरू करायचे, कोणत्या क्षणी हळूच एक थोडासा आचरट विनोद टाकून त्यांची साखळी सुरू करायची ह्या सगळ्यात तो पारंगत होता.
 ज्योती नुसतीच म्हणाली, " हं!"
 तो बिछान्यात शिरून त्याच्या बाजूचा दिवा मालवीपर्यंत थांबून मग ती म्हणाली, "राम, मला काही सांगायचंय तुला."
 "बाप रे, तू म्हणजे एकदमच सीरियस झालीस. काय आहे एवढं?"
 तिला जे सांगायचं होतं ते एकदम तिला नाटकात-बिटकात फेकतात तसलं वाक्य वाटलं. पण मग जास्त विचार न करता तिनं घाईघाईन म्हणून टाकलं, "मी तुला सोडून जाणार आहे."
 " म्हणजे म्हणायचंय काय तुला, ज्यो?" त्याच्या आवाजात अजिबात धास्ती नव्हती.
 त्यांच्या मित्रमंडळींत एक पद्धत होती. आपल्या नावाचा अशा तऱ्हेनं संक्षेप करायचा की, जणू इंग्रजी नावं वाटावी. रणधीरचा रॉन व्हायचा. विनयाची विनी, विक्रमचा विक. प्रथम जेव्हा राम तिला ज्यो म्हणायला लागला. तेव्हा ते तिला आवडल, खास त्यांच्यातच वापरायचं नाव म्हणून.
 " जे म्हणायचंय तेच म्हटलंय मी"
 " एकदम हे काय काढलंयस मला कळत नाहीये." आपल्यावर मोठा अन्याय होतोय, असा स्वर काढून तो म्हणाला.
 ह्याबद्दल खूप दिवस विचार करून शेवटी आज पार्टी चालू असतानाच्या एका क्षणी तिनं पक्का निश्चय केला. जेवणापूर्वीची ड्रिंक्स घेताना आणीबाणीचा विषय निघाला. कुणीतरी रामला विचारलं, "तुम्ही सेलबर्नचं पुस्तक वाचलं का? माझ्या मते आणीबाणीवरच्या सगळ्या पुस्तकांत ते सरस आहे. तुम्हाला काय वाटतं ?"
 राम म्हणाला, " तो प्रांत माझ्या बायकोचा आहे. मी वाचतबिचत नाही. मी आपला बिचारा अडाणी शेतकरी आहे."
 अर्थात त्या वर्तुळातल्या लोकांच्या कपाटात जी पुस्तकं दिसायला पाहिजेत ती तो आवर्जून विकत घ्यायचा, त्यातच त्याने आणीबाणीबद्दल प्रसिद्ध झालेली सगळी पुस्तकं घेतली होतीच. वर्षातनं दोनेकदा तो मॉडर्न बुक डेपोत जायचा आणि दुकानाच्या मालकांशी पुस्तकांबद्दल आपण त्यातले दर्दी असल्यासारखं चर्चा करीत एकीकडे शेल्फांतली पुस्तकं चाळायचा. पण खरं म्हणजे हा नुसता देखावा असायचा. पुस्तकं चाळण्याची त्याला काही गरज नसे; कारण दुकानात पाय ठेवतानाच काय काय घ्यायचं हे त्याचं ठरलेलं असे. तो वाचनावर इतका कमी वेळ खर्च करायचा की, उत्तम पुस्तकांच्या बरोब्बर याद्या करण्यातल्या त्याच्या कौशल्याचं ज्योतीला कौतुक वाटायचं. पुस्तकं विकत आणल्यावर तो एखादं सबंध वाचायचा, थोडीशी नुसता चाळायचा आणि बहुतेक सगळी तशीच ठेवून द्यायचा. ज्योतीनं पुस्तकं वाचून त्याबद्दल काही म्हटलं, की ते लक्षात ठेवून पुढे कधीतरी संभाषणाच्या ओघात ते जणू काही आपण स्वतः वाचून बनवलेलं मत आहे, अशा तऱ्हेने तो मांडायचा. मात्र मी ते पुस्तक वाचलंय, असं धडधडीत खोटं विधान त्यानं कधी केलं नाही. एखाद्या पुस्तकाबद्दल काही बोलता आलं नाही-म्हणजे ते ज्योतीनं वाचलं नसलं किंवा त्या दोघांचं त्याबद्दल काही बोलणं झालं नसलं तर-की मग तो साध्याभोळया अडाणी शेतकऱ्याचं कातडं पांघरायचा. पण त्याच्याआडून त्याचा रोख स्पष्ट असायचा. पुस्तकं वाचण्यासारख्या थिल्लर गोष्टी करायला वेळ नसतो मला.
 नवऱ्याचे तेच तेच विनोद ऐकणाऱ्या बायकोसारखं एक खोट्या कौतुकाचं हसू तोंडावर ओढून ज्योतीनं हे पन्नासदा ऐकून घेतलं होतं. पण आज तेच ऐकल्यावर तिनं एकदम ठरवलं, हे आता बास! ह्यातनं बाहेर पडायचंय मला. सगळ्याचाच उबग आलाय. तो खोटेपणा, काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी घातलेले मुखवटे, सरळ साध्या संभाषणाऐवजी चालणारे छुपे टोले आणि प्रतिटोले, सुसंस्कृततेच्या बुरख्याखाली एकमेकांवर कुरघोडी करण्याचे सतत चाललेले प्रयत्न. सगळया-सगळ्याचाच वीट आलाय.
  ती म्हणाली, " हे एकाएकी नाहीये, राम. हयाची तुला काही तरी कल्पना आली असली पाहिजे.”
 " तशी अलीकडे तू जरा चिडचिड करत्येयस असं वाटलं मला, पण मला वाटलं ते कामाच्या ताणामुळे. वर्ष-अखेर आलीय त्यामुळे खूप काम पडतं तुला, होय ना? खूप दमत असली पाहिजेस.”
 " कामाचं नाही मला काही वाटत."
 "मग काय झालंय तुला?"
 तिच्या मनात आलं, अलीकडे आपल्या वारंवार होणाऱ्या मतभेदांतून, वादांतून काहीच का कळलं नसेल हयाला ? हया पार्टीबद्दलच त्यांचा वाद झाला होता.
 ती म्हणाली होती, " राम, ही पार्टी दिलीच पाहिजे का?"
 " अर्थात." त्याच्या आवाजात खूप आश्चर्य होतं. "
 म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की, हया लोकांना तू एखाद्या रेस्टॉरंटमधे किंवा क्लबमधे बोलावू शकणार नाहीस का?"
 " त्यात नि घरी बोलावण्यात फरक आहे, ज्योती. तूही कबूल केलंयस ते. आपण खूप मागेच ठरवलं होतं की, घरी बोलावलेलं लोकांना जास्त आवडतं. विशेषतः परदेशी माणसांना. आणि हे दोघं आपल्या खूप उपयोगी पडणार आहेत."
 "कबूल आहे रे मला, पण आज पार्टी द्यायचा माझा मूडच नाहीये."
 "पण तुला त्याची काही कटकट होणार नाही. हव तर तू जेवणाची ऑर्डरही देऊ नको. मी सगळी व्यवस्था करतो. पाहुणे हजर होईपर्यंत तू बैठकीच्या खोलीत येऊसुद्धा नको. मग झालं ?"
 खरं म्हणजे हया वरच्यावर दिल्या जाणाऱ्या पार्ट्यांची तिला कधीच फारशी तोशीस पडत नसे. तिने प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर देखरेख केली पाहिजे, असा त्याचा कधीच अट्टाहास नसे. बाहेरून पदार्थ मागवले तर त्याच्या खर्चाबद्दल त्याने कधी कूरकर केली नाही. पण आज तिचा मूड नव्हता, तो लोकांना तोंड देण्याचा आणि हजारदा ऐकलेल्या गोष्टी नव्यानेच ऐकत असल्यासारखा चेहरा करून ऐकायचा आणि त्यांना हजारदा दिलेला प्रतिसाद पुन्हा एकवार उत्साहाने द्यायचा. पण हे रामला पटण्याची काही शक्यता नव्हती. पार्टीत भाग न घेणं त्यानं फक्त आजारपणाच्या सबबीवर ऐकून घेतलं असतं, आणि नसलेली डोकेदुखी पुढे करण्याची तिची तयारी नव्हती.
 तिच्या मनात आलं, आमची सगळीच भांडणं, सगळेच मतभेद केवळ मी कामामुळे थकलेली, चिडचिडी झालेली आहे म्हणून झाले असं खरंच का वाटतं याला ? तो इतका गेंड्याच्या कातडीचा आहे ?
 ती म्हणाली, "झालं काही नाही. फक्त हयापुढे तुझ्याबरोबर राहणं अशक्य आहे मला."
 "काहीतरी झालंय नक्कीच. माझ्या हातनं काही तरी झालंय, किंवा करायला पाहिजे ते काहीतरी केलं गेलं नाही, त्यामुळे तू दुखावली गेलीयस. काहीही असलं तरी तुला माहीताय, ज्यो, तुला वाईट वाटेल असं मी जाणूनबुजून कधी काही करणार नाही. तर जो काही अपराध माझ्याकडून घडला असेल त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो. आता झालं ?"
 " तसं काही नाहीये रे !" ती हताशपणे म्हणाली. क्षणभरात तो म्हणणार होता, तू दमलीयस. झोप आता. उद्या दिवसाउजेडी आपण बोलू काय ते. ते त्यानं म्हणायच्या आत तिनं एक शेवटचा प्रयत्न केला. " राम, तुला माहीताय, हा चर्चा करून किंवा क्षमा मागून सुटण्यातला प्रश्न नाहीये. हा निव्वळ पोरकट हट्ट नाही. त्यात काहीतरी जास्त महत्त्वाचा, मूलभूत विचार आहे."
 "ज्यो, प्लीज! आत्ताच हे भांडण भांडलं पाहिजे का?" त्यानं हळुवार सुरात विचारलं, आणि तिला जवळ ओढायसाठी हात लांबवला. तिनं स्वत:ला आखडून घेतलं आणि त्याने लगेच आपला हात काढला. " जे काही तुला म्हणायचंय ते उद्यापर्यंत थांबू शकणार नाही का ? आत्ता आपण दोघंही दमलोयत"
  ती काही बोलली नाही. तिच्या मौनानं त्याला जरा अवसान आलं आणि तो म्हणाला, "तुला हवं तर आपण सुट्टीवर जाऊ. अगदी लगेच. थोडे दिवस ऑफिसचे लोक बघतील सगळं. जाऊ या?"
 " नाही, राम. त्यामुळे काहीच साधणार नाही." ती शांतपणे म्हणाली.
 "का?"
 " मी काय म्हणतेय त्याच्याकडे तुझं लक्षच नव्हतं का?"
 " तू म्हणालीस की तू मला सोडून जाणारेस."
 " झालं तर मगः आपण दोघांनी एकत्र सुट्टीवर जाण्यात काय अर्थ आहे ?"
 " म्हणजे तुझ्या ज्या काही अडचणी आहेत त्यांच्यावर आपण तोडगा काढू शकू."
 " माझ्या काहीही अडचणी नाहीत. मला फक्त एवढं कळून चुकलंय की, मी आता हयापुढे तुझ्याबरोबर राहू शकणार नाही."
 "पण का ? तुला काय वाटतं, तुझा हा असला निर्णय तू काही रास्त, पटतील अशी कारणं दिल्याशिवायच मी स्वीकारावा?" तो रागावला होता. ज्योतीला वाटलं, हे बरं झालं. तो रागावलाय याचा अर्थ मी जे काही बोलले त्याचा तो गंभीरपणे विचार तरी करायला लागलाय. केवळ एक क्षणिक लहर म्हणून सोडून देत नाहीये.
 ती म्हणाली, " तुला काहीच का कल्पना नाहीये राम ? जरा गेल्या काही महिन्यांवर नजर टाकून बघ ना."
 " तशा तुझ्या लहानसहान बाबींबद्दल तक्रारी चालल्या होत्या, पण एकदम हा असा पवित्रा घेण्याइतपत महत्त्वाचं त्यात काही होतं असं मला वाटलं नाही. अपराध तरी काय केलाय असा मी ? का मी तुला मारतो, का उपाशी ठेवतो, का इतर कोणत्या तऱ्हेने तुझा छळ करतो?"
 त्याच्या बाळपणच्या अगदी साध्यासोप्या गृहीतांकडे झुकणारा हा प्रश्न ऐकून तिला हसू आलं. त्यात त्यानं आणखी एक कलम घालायला हवं होतं. का मी षंढ आहे ?
 " अर्थातच नाही." ती म्हणाली.
 " मग असं एकतरी कारण दे ना, की ज्यामुळे तू आपलं तीस वर्षांचं बऱ्यापैकी सुखी लग्न मोडायला निघालीयस. की ते सुखी नव्हतंच ? सुखी होतं, आहे, असं गृहीत धरलं हीच माझी चूक झाली?"
 " चूक झाली नाही, राम. ते सुखी होतंच."
 "मग का?"
 " नक्की का ते सांगायला मला नेमके शब्द सापडत नाहीयेत."
 " सांगण्याचा प्रयत्न तरी कर. मग ते माझ्या डोक्यात शिरलंच नाही तर मी मूर्ख आहे म्हणून सोडून दे."
 " सगळंच बदललंय, राम. तुला ते दिसत नाही का?"
 " अर्थातच बदललंय. हे बदल घडवून आणण्यासाठीच तर सगळा आटापिटा होता. तुला आयुष्य एका ठिकाणी थिजून रहायला हवं होतं का ?"
 " तसं नाही रे-राम, तू सगळंच फार अवघड करतोयस माझ्यासाठी."
 " अवघड मी नाही करत, तूच करत्येयस. आयुष्यात बदल घडत जाणं अपरिहार्यच आहे ज्यो. तुझं चुकलं इथेच की तू ते बदल स्वीकारले नाहीस. का ? कितीतरी बाबतीत आपलं आयुष्य आता जास्त चांगलं नाहीये? त्याचे थोडे जास्त ताणतणाव असतात, कबूल आहे मला. पण ते टाळण्यासाठी हे सगळं सोडून परत पूर्वीसारखं आयुष्य जगण्यानं आपण जास्त सुखी होऊ असं तुला खरंच वाटतं का? विचार कर जरा. आणि भूतकाळाबद्दल नुसतंच भावनाविवश न होता नीट विचार कर."
 " राम, मी-" ती बोलताबोलता एकदम थांबली कारण तिला वाटलं, आपल्याला आता रडायला येणार. आणि हया संभाषणाचा शेवट अश्रूंत होता कामा नये, असं तिनं आधीच ठरवलं होतं. तिनं हया सगळ्याबद्दल खूप दिवस आणि खूप खोल विचार केला होता, आणि त्यानं मांडलेले मुद्दे वरवर कितीही तर्कशुद्ध वाटले तरी त्यामुळे तिला जे असह्य वाटत होतं ते सह्य होणार नव्हतं.
 "हे बघ ज्यो, मी एक तडजोड सुचवतो. तू एकटीच सुट्टीवर जा कुठेतरी. कबूल आहे का ? महाबळेश्वरला जा. एखादा आठवडाभर तिथे रहा. हवं तर जास्त दिवस: तुला जितकं पाहिजे तितकं रहा. आणि नीट सगळ्या बाजूंनी विचार कर."
 खरं म्हणजे त्यानं सुचवलं होतं त्यात गैरवाजवी काहीच नव्हतं. त्यानं फक्त आणखी थोडासा वेळ मागितला होता आणि तो देणं तिला भाग होतं. काहीतरी कुठेतरी बिनसलंय एवढं जरी त्याला कळलेलं असलं तरी ते एकदम असं स्वरूप घेईल याची त्याला कल्पना आलेली नसणार.
 ती म्हणाली, " ठीक आहे. मी जाते थोड्या दिवसांसाठी."
 " कुठे जाशील ? महाबळेश्वरला? मी ब्लू व्हॅली हॉटेलला फोन करून तुझ्यासाठी खोली रिझर्व्ह करतो. किती दिवसांसाठी करू ? एक आठवड्यासाठी ? अर्थात नंतर तुला वाढवून घेता येईल. सुदैवाने अजून सीझन सुरू व्हायला वेळ आहे तेव्हा जागा मिळण्यात काही अडचण यायची नाही."
 कशाला एवढी कटकट करायची? मी आपली जाईन नि जागा मिळेल तिथे राहीन.”
 " त्यात कटकट कसली? सकाळी उठल्याउठल्या फोन लावीन. तू किसनला घेऊन फियाट घेऊन जा नि गाडी तिथेच ठेव."
 " मला वाटतं बसनं गेलेलं बरं."
 "बस?" तिनं असं काही म्हटलं हे त्याला खरंच वाटलं नाही. "काहीतरीच काय? इथे दोन गाड्या नुसत्या उभ्या असताना बसनं धडपडत प्रवास करायचं काही अडलंय का?"
 ज्योतीनं ऐकू न येईलसा सुस्कारा सोडला. "ठीक आहे, गाडी घेऊन जाते. पण ड्रायव्हर नकोय मला."
 "ज्योती, प्लीज, तू ड्रायव्हर घेऊन गेलीस तर मला जास्त बरं वाटेल."
 ज्योतीच्या मनात आलं, राम सुखी आहे. या नव्या परिस्थितीशी त्यानं इतकं छान जुळवून घेतलंय की आपण कधी वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगत होतो हेही तो विसरलाय. आणि असं नेहमीच होत आलंय. आयुष्यातला प्रत्येक बदल त्यानं अगदी सहजपणे स्वीकारला आणि तो आधी जिथे होता, ती जागा त्याने तितक्याच सहजपणे सोडली. फार पूर्वीच भविष्यात नजर टाकून त्यानं कल्पनेत स्वत:ला आता जिथे आहे तिथे पाहिलं असलं पाहिजे आणि मग धीमेपणाने एकेक पाऊल टाकीत तिथपर्यंत पोचला असला पाहिजे, किंवा कदाचित अजून तो तिथपर्यत पोचला नसेलही. अजून त्याची त्या भविष्याकडे चाल सुरूच राहणार असेल.


 जांभळीच्या शेवाळलेल्या बुंध्याला टेकून ती निवांत बसली होती. जांभळीच्या मोहोराचा आणि तिच्या पायांनी चुरगळल्या गेलेल्या पुदिन्याचा वास दरवळत होता. जंगलातली शांतता फक्त मधमाश्यांच्या गुणगुणीने भंग पावत होती.
 तिच्या मनात आलं, किती मजा असते असं करण्यात. पाय नेतील तिकडे चालत सुटायचं आणि कधी न पाहिलेल्या जागी येऊन ठेपायचं. पाऊलवाट पाहून चालायला लागायचं. पण थोड्याच वेळात ती कुठेतरी गवतात, झुडपात हरवून जाते. मग तशीच पुढे मुसंडी मारायची, आतापर्यंत तुडवला न गेलेला चुरचुरीत पाचोळा पायाखाली तुडवीत. झाडी जास्त जास्त दाट होत जातेयसं जाणवतं. कमरेएवढाल्या उंच झुडपांतून अडखळत वाट काढताना विचवीच्या काट्यांनी ओरबाडून घ्यायचं. आणि सगळ्या भटकंतीत दिशा इतक्यांदा बदललेली असते, की शेवटी अगदी ध्यानीमनी नसलेल्या अशा ठिकाणी उमटायचं.
 रामला पॉइंट जास्त आवडायचे. झाडांच्या दाटीत त्याला घुसमटल्यासारखं व्हायचं, आणि काही देखावाही दिसायचा नाही. त्याला आवडायचं एखाद्या उंच टोकावर मोकळं उभं राहून पायाशी पसरत क्षितिजापर्यंत जाणाऱ्या दऱ्याखोरी आणि डोंगरांच्या रांगा पहायला. संध्याकाळी बाँबे पॉइंटलासुद्धा जायला आवडायचं त्याला. तो आइस्क्रीम नि भेळपुरीच्या गाड्या, दूर अरबी समुद्रात बुडणारा सूर्य भावपूर्ण नजरेने पहाणारे मुंबईकर आणि त्यात काही रस नसलेली भाडोत्री घोड्यावरून फेऱ्या मारणारी त्यांची पोरं ह्यांच्या गर्दीने काबीज केलेला असला तरी.
 ज्योतीला पॉइंटही आवडायचेच. तिनं हनीमूनला आली असताना प्रथमच जेव्हा एकेक पॉइंट आणि तिथनं दिसणारा देखावा पाहिला तेव्हा ती रोमांचित झाली होती. त्या वेळी महाबळेश्वरचं सगळंच जादूचा स्पर्श झालेलं वाटलं होतं तिला, तिथली हवा, तिथल्या जंगलातल्या पायवाटा, तिथून दिसणारे श्वास रोखायला लावणारे देखावे. सूर्यास्तानंतर खालच्या दरीतून तरंगत तरंगत धुकं वर येऊन आसमंतात पसरलं की, सगळ्याभोवती एक गूढतेचं वलय निर्माण व्हायचं. मग तिला वाटायचं की, आपण एका स्वप्नातल्या जगात वावरतोय आणि ते सकाळी सूर्यकिरणांच्या स्पर्शाने विरून जाणार आहे.
 तिने आणि रामने हे आपलं खास ठिकाण बनवलं होतं. जगापासून लांब पळण्यासाठी, रोजच्या धकाधकीने शिणलेल्या शरीराला आणि मनाला तजेला देण्यासाठी. दरवर्षी एखादा आठवडा तरी ते हॉलिडे कँपमधे येऊन राहायचे कामाचा व्याप जसा वाढला तसे ते हॉटेलमध्ये राहायचे म्हणजे मग आधीपासून बेत आखायचे, खोलीसाठी अर्ज करायचा, ह्या कटकटी कराव्या लागायच्या नाहीत. अलीकडे काही वर्ष ते महाबळेश्वरातल्या सर्वांत अलिशान आणि सर्वांत महागड्या ब्लू व्हॅली होटेलमध्ये यायला लागले होते. पण ह्या सगळ्या प्रगतीच्या टप्प्यात मधे कुठेतरी महाबळेश्वरच्या सुट्टीतली जानच हरवली होती. एखादं अनिवार्य कर्मकांड करीत असल्यासारखं ते पॉइंट्सवर जायचे, बाजारातनं एक फेरी मारून यायचे, होटेलमधले नोकर आणि वारंवार गाठ पडल्याने ओळखीचे झालेले इतर पाहुणे ह्यांच्याबरोबर तीच ती शाब्दिक देवघेव करायचे. पण त्यात काही मजा उरली नव्हती.
 महाबळेश्वरात येणाऱ्या लोकांची संख्याही दिवसेंदिवस प्रमाणाबाहेर वाढत चालली होती आणि त्याचबरोबर तिथला धंदेवाईकपणाही. आपल्या मित्रमंडळींबरोबर ज्योती आणि राम बाजारपेठेत सतत पडणारी नव्या दुकानांची भर, भूछत्राप्रमाणे उगवणारी नवनवी होटेल्स, नितळ चेहऱ्यावरच्या मुरुमांप्रमाणे कुरूप दिसणान्या कॉलन्या आणि त्यांना जागा करून देण्यासाठी तुटणारी जंगलं ह्या सगळ्यांविरुद्ध उच्चरवाने तक्रार करीत. ज्योतीचा आवाज इतरांच्या इतकाच ठाम असला तरी आत कुठेतरी एक लहानसा आवाज तिला विचारायचा की तुला जे आवडतं तेच इतरांना आवडतं म्हणून तक्रार करायचा तुला काय हक्क आहे ? आम्ही पहिल्यापास्नं इथे येतोय, मागून उशिरा येणाऱ्यासाठी इथे सोय करायचं काही कारण नाही. असं कसं म्हणता येईल ? वाढत्या लोकसंख्येला सध्याची हिल स्टेशनं अपुरी पडत असली तर त्यांची वाढ व्हायलाच पाहिजे. मग ज्यांना गर्दी आवडत नसेल त्यांनी नवी ठिकाणं शोधून काढून तिथं हिल स्टेशनं वसवावीत. सह्याद्रीच्या माथ्यावर अशा ठिकाणांची काही कमतरता नाही.
 लवकरच अंधार पडणार, परत निघायला पाहिजे म्हणून ती उठली. होटेलात येईस्तोवर खूप चालण्याने दमल्यामुळे छान वाटत होतं आणि सपाटून भूक लागली होती. तिनं तोंड धुतलं आणि केस विंचरायला आरशासमोर उभी राहिली. तिनं स्वत:च्या जाड कमरेकडे आणि जुळ्या हनुवटीकडे काही खंत न वाटता पाहून घेतलं. ती चवळीच्या शेंगेसारखी कधीच नव्हती, आणि पंचवीस वर्ष आणि दोन बाळंतपणानंतर तिची जाडी फक्त डझनभर पौंडांनी वाढली होती. तिला चांगलंचुंगलं खायला आवडायचं आणि मध्यम वयातही विशीच्या तरुणीसारखी शरीर यष्टी ठेवण्यासाठी अखंड अर्धपोटी राहण्यावर तिचा विश्वास नव्हता. रामने तिच्या वजनाबद्दल कधीच कुरकुर केली नव्हती किंवा ती त्यामुळे बेढब दिसते असं दूरान्वयानेही कधी सुचवलं नव्हतं. त्यांचं लग्न झालं त्यावेळी तो सडपातळच काय, हडकुळा होता आणि बरीच वर्ष तसाच राहिला. मग अगदी अलीकडे त्याचं वजन एकदम वाढायला लागलं आणि त्याचं पोट सुटलं. हे त्याच्या पिण्यामुळे असलं पाहिजे, अशी तिची खात्री होती. तसं तिनं एकदोनदा त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. शेवटी तिनं ठरवलं की, त्यानं जर आपल्या वजनाबद्दल आपल्याला टोचलं नाही, तर आपण त्याच्या वजनाबद्दल गप्प बसलं पाहिजे. पण तिला काळजी वाटत राहिली. कारण ह्या वयात एकदम वजन वाढणं प्रकृतीला वाईटच.
  ज्योतीनं तिचे खांद्यापर्यंत कापलेले केस रबर बँडने मागे बांधले, साडी ठीकठाक केली. आरशात स्वतःच्या हसऱ्या तोंडाकडे पाहताना तिला एकदम जाणवलं की, आपल्याला प्रसन्न वाटतंय. तिला थोडंसं अपराधी वाटलं, पण एकूण बरंच वाटलं. जेवायच्या खोलीत जाऊन ती एकटीच एका टेबलाशी बसली. तिला अनुभवाने माहीत झालं होतं की नेमकं जेवण तयार झाल्यावर पण इतर कुणी जेवायला यायच्या आत गेलं की आपल्याला चटकन जेवण मिळतं.
 तिचं जेवण अर्धमुधं होतंय तोवर मॅनेजरच्या ऑफिसातनं निरोप आला की तिला फोन आला होता. ती जरा अनिच्छेनेच उठली, तिनं कोपऱ्यातल्या वॉशबेसिनमधे हात धुतले, आणि तिथे ठेवलेल्या टॉवेलाचं रंगरूप पाहून साडीच्या पदरालाच पुसले.
 मॅनेजरने रिसीव्हर तिच्या हातात दिला आणि तो तिथेच बसून राहिला. खरं म्हणजे त्यानं तिथन उठायचं काही कारण नव्हतं, पण का कुणास ठाऊक, तो खोलीबाहेर जाईल असं तिला वाटलं होतं.
 ती हॅलो म्हणाली
 "ज्योती!"  " ज्योतीच. काय राम ?"
 " तू ब्लू व्हॅली होटेलमधनं का हललीस?"
 " तिथे रहावंसं वाटलं नाही म्हणून." ती तुटकपणे म्हणाली.
 " कसल्यातरी कळकट हॉटेलात रहायची काय गरज आहे ?"
  मॅनेजरने हे ऐकलं असलं तर त्याला काय वाटलं असेल कोण जाणे! असं ज्योतीच्या मनात आलं.
 ती म्हणाली, " मी इथे राहिल्याने तुझ्या पोझिशनला धक्का लागेल असं वाटतं का तुला?"
 " काहीतरी बोलू नको."
 तिला आठवलं, एकदा ती जुनी विटकी साडी नेसून बाहेर गेली होती परत आली तेव्हा राम म्हणाला, "तू ही साडी नेसून बाहेर गेली होतीस ?"
 "फक्त कोपऱ्यापर्यंत." ती केक करीत होती नि एकदम बेकिंग पावडर संपल्याचं तिच्या ध्यानात आलं. तेव्हा दुसरं कुणी घरात नव्हतं पाठवण्यासारखं म्हणून ती होती तशीच कोपऱ्यावरच्या दुकानातनं बेकिंग पावडर आणायला गेली.
 राम म्हणाला, "कोपऱ्यापर्यंत का होईना, कुणी असल्या कपड्यांत तुला पाहिलं तर त्यांना वाटायचं, माझा धंदा बुडलाय की काय. म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की तू अगदीच कुणी सोमीगोमी नाहीयेस. तुझं एक स्थान आहे समाजात. खरं म्हणजे असले कपडे घरातसुद्धा घालण्यात काय स्वारस्य आहे मला कळत नाही. जुनेपाने कपडे देऊन का नाही टाकत तू ?"
 तो हे सगळं हसतहसत म्हणाला, पण त्याच्याआड त्याला वाटलेली नाखुषी तो लपवू शकला नाही. त्याने एवढ्याशा गोष्टीचं इतकं अवडंबर माजवावं हयाचा तिला अचंबाच वाटला. पण तेव्हापासून निदान बाहेर जाताना तरी आपल्या 'स्थाना'ला योग्य असे कपडे करण्याची ती काळजी घेत असे.
 आता ती म्हणाली, "त्यामुळे तुझ्या पोझिशनला धक्का लागत नसला तर मग माझ्या इथे राहण्याबद्दल तुझा आक्षेप असायच काही कारण नाही."
 थोडा वेळ गप्प राहून तो म्हणाला, " आणि गाडी परत कशाला पाठवलीस? मी सांगितलं होतं. मला लागायची नाही म्हणून."
 " मला पण लागायची नाही."
  "पोरकटपणा करू नको."
  तिनं मॅनेजरकडे नजर टाकली. तो टेबलावरच्या कशाशी तरी चाळा करीत आपलं लक्ष नसल्यासारखं दाखवीत होता, पण ज्योतीची खात्री होती, तो सगळं लक्षपूर्वक ऐकतोय म्हणून. तिनं विचार केला, मरूदे. रामच्या डोक्यात जर एवढं शिरत नसलं की फोन सार्वजनिक ठिकाणी आहे, तर कोण ऐकतंय याची मी तरी काळजी कशाला करू ?
 " हे बघ राम," ती म्हणाली, " पोरकटपणा मी करीत नाहीये, तू करतोयस. मी इथे आलेय ती शांतपणे विचार करायला. तू जर ऊठसूट फोन करून मला डिस्टर्ब करायला लागलास तर त्यात काही अर्थच नाही."
 " आयम सॉरी. फक्त तू स्वतःची गैरसोय करून घेऊ नयेस, एवढंच मला सांगायचं होतं. म्हणजे खर्चा बिर्चाचा विचार करून जर-"
 "नाही केला."
 " असं."
  एकदम त्याचा चेहरा स्पष्ट तिच्या डोळ्यासमोर आला. नेहमीच्या कर्त्या करवित्या स्वरूपात नव्हे, पण जरा गडबडलेला, जरा दुखवला गेलेला, जे घडतंय त्याच्यावर आपला काही ताबा राहिलेला नाही अशी जाणीव झालेला. चटकन गुडनाइट म्हणून ती मॅनेजरच्या ऑफिसातनं बाहेर पडली. ती जेवणाच्या खोलीत परत गेली पण गारगोट्या झालेलं जेवण संपवण्याची तिला इच्छा नव्हती. दारापाशी ठेवलेल्या तबकातून एक विडा उचलून तिनं तोंडात टाकला आणि ती आपल्या खोलीकडे गेली.
  ती रहात होती त्या भागात खोल्यांची एकेरी रांग आणि त्यांच्यासमोर लांबचलांब व्हरांडा होता. ती आपल्या खोलीसमोरच्या आरामखुर्चीत बसली. समोर निऑन ट्यूबच्या प्रकाशात बाग हे नाव धारण करणारी दोनचार जातीच्या फूलझाडांची खिचडी दिसत होती. त्याच्यापलिकडे अंधार होता, पण त्याही पलिकडे गावातले दिवे, माणसांचे आवाज, गाड्यांचे दिवे दिसत होते. ब्लू व्हॅली होटेल सोळशी खोऱ्याच्या काठावर होते आणि त्याच्या व्हरांड्यातून ते खोरं, त्यातली झाडी, धबधबे आणि लांबवर खाली नदीची धांदोटी दिसायची. प्रथम जेव्हा तिनं ब्लू व्हॅली हे नाव ऐकलं तेव्हा तिला वाटलं होतं की, हे आपलं काहीतरी नाविन्याच्या सोसाने ओढूनताणून दिलेलं नाव आहे. पण मग तिनं पाहिलं की विशिष्ट प्रकाशात, दिवसाच्या विशिष्ट वेळेला सोळशीचं खोरं खरोखरीच निळं दिसतं. ब्लू व्हॅली होटेल बाजारापासून आणि सगळ्या मुख्य रस्त्यांपासून पुरेसं दूर होतं त्यामुळे रात्री त्याच्या व्हरांड्यात बसून फक्त रातकिड्यांची किरकिर ऐकू यायची. आणि कधीकधी दारू पिऊन सैल सुटलेल्या पाहुण्यांचा गोंधळ, ज्योतीच्या मनात आलं. पण बहुतेकदा ते होटेल खूपच शांत असायचं, विशेषत: आपल्याला सुदैवाने स्वतंत्र ब्लॉक मिळाला तर.
 तेव्हा हे सगळं सोडून तिनं गुलमोहोर होटेलमध्ये राहणं पसंत करावं ह्याचं रामला आश्चर्य वाटणं साहजिक होतं. खरं म्हणजे तिनं मुद्दामहून हेच होटेल काही निवडलं नव्हतं. ब्लू व्हॅली सोडायचं ठरल्यावर हे पहिलंच तिला सापडलं की जिथे एक सिंगल रूम मोकळी मिळाली. तिनं लगेच ऑफिसात जाऊन रजिस्टरमध्ये नाव लिहिलं आणि तिथल्या रूम-बॉयला चिट्ठी देऊन ब्लू व्हॅलीतनं तिचं सामान आणायला पिटाळलं. हा जरासा बालिशपणाच झाला, पण ब्लू व्हॅलीमधे परत जाऊन तिथल्या लोकांना तोंड द्यायचं तिला एकदम संकट वाटायला लागलं. ती तिथे पोचल्यापासून चौकीदार, रूम बॉय, तिला जेवण वाढणारा वेटर, नेहमीप्रमाणे तिला गुलाबाचं फूल देणारा माळी, अगदी मॅनेजरसुद्धा, प्रत्येकानं तिला अगदी तेच तेच प्रश्न विचारले. 'बाई, ह्यावेळी एकटयाच ? साहेब नाही आले ? मागून येणारेत का ?' कदाचित हा नुसताच शिष्टाचार असेल. 'नमस्कार, कसं काय ह्याचाच आविष्कार किंवा बरेच दिवसांच्या संबंधापोटी येणारं कुतूहल असेल. ती इथे एकटी येण्याची ही पहिलीच वेळ होती, तेव्हा त्यांना सगळ्यांना ह्यात काहीतरी वेगळं, विचित्र आहे असं वाटणं साहजिक होतं. पण तिला मात्र त्या सगळ्यांच्या बोलण्यात पैशाची मुक्त पखरण करणाऱ्या धनवानाला जी आदब दाखवतात त्याचा वास आला.
 राम तिथं राहून जाताना दर वेळी सढळ हातानं बक्षिशी वाटायचा. मॅनेजरलासुद्धा तो बक्षिसादाखल अधनंमधनं एक व्हिस्कीची बाटली आणायचा. आठवडाभर राहून दोनेकशे रुपयांची बक्षिशी दिली म्हणजे ज्योतीला धक्काच बसायचा. राम म्हणायचा की, होटेलमध्ये ज्यांच्यावर आपलं स्वास्थ्य-समाधान अवलंबून असतं त्यांनाच नेहमी सगळ्यात कमी पैसे मिळतात. शिवाय बक्षीस दिलं की ते लोक आपली जास्त चांगली देखभाल करतात. हे मात्र खरं असल्याचा ज्योतीला पुरावा मिळाला होता. अगदी गर्दीच्या सीझनमधेसुद्धा आधी राखून न ठेवता त्यांना खोली मिळत असे, आणि होटेल संपूर्ण भरलेलं असताना आणि सगळ्यांच्या हाकेला ओ द्यायला रुमबॉईजना वेळ पुरा पडत नसतानाही रामने घंटा वाजवल्याबरोबर कुणीतरी हजर होत असे. ती सगळी राम पेरीत असलेल्या पैशाची किमया होती. पण जे हक्कानं मिळालं पाहिजे ते विकत घेण्याचा प्रकार ज्योतीला मंजूर नव्हता. आपण काहीतरी चोरटा व्यवहार करीत असल्यासारखं वाटायचं. आणि त्या पैशासाठी हांजी हांजी करणाऱ्या होटेलातील नोकरांचा तिला तिटकारा यायचा. एकटी असताना आपण एवढ्या मोठ्या टिप्स देणे शक्य नाही, हे ती जाणून होती. आणि खरं म्हणजे हया क्षुद्र कारणासाठीच ब्ल्यू व्हॅली होटेलला परत जायचं तिनं टाळलं होतं.
 ती खोलीत जाऊन कपडे बदलून पलंगावर पडली, पण तिला झोप येईना. तिचा आधीचा मूड विरून गेला होता. नाही म्हटलं तरी रामच्या फोनने तिला विचलित केलं होतं. तिच्या मनात चंचूप्रवेश करून त्याने आता तिच्या विचारांचा ताबा घेतला होता. आयुष्यातला एक फार मोठा निर्णय आपण घेतो आहोत, याची तिला पुन्हा एकदा जाणीव झाली. हा निर्णय तिला ज्या दिशेने नेणार होता तिथून परत फिरण्याची शक्यता नव्हती. आणि इतकं असूनही आपण असं का करतो आहोत, याचं नेमकं उत्तर आपल्याला देता येईल, असं तिला वाटत नव्हतं. निदान मी अमुक एक-दोन-तीन हया कारणांसाठी तुझ्याबरोबर राहू शकत नाही, असं रामला पटेलशा तऱ्हेने रीतसर विवरण तिला करता येत नव्हतं.
 तिला वाटलं, वर्तमानपत्रांतून मानसशास्त्रीय लेख लिहिणाऱ्यांचं कदाचित बरोबर असेल. कुठल्याही दोन माणसांना वीस वर्षांपेक्षा जास्त काळ गोडीगुलाबीने एकत्र रहाणं शक्य नसतं असं तिनं कुठेतरी वाचलं होतं; पण तिला यापेक्षा जास्त वर्ष एकत्र राहिलेली थोडीथोडकी नाही, पुष्कळ जोडपी माहीत होती. त्यातल्या काहींचे एकमेकांशी मूलभूत मतभेद असूनसुद्धा.
 तिनं पुन्हा दिवा लावला आणि वाचण्याचा प्रयत्न केला. पण पुस्तकात तिचं मनच लागेना, ते विचारात भरकटत जायचं आणि कुठूनही सुरुवात झाली तरी शेवटी अटळपणे रामच्या आणि तिच्यापाशी येऊन थांबायचं.
 त्यांच्या एकत्र आयुष्याची सुरुवात महाबळेश्वरातच झाली होती. ती महाबळेश्वर पहिल्यांदाच पहात होती आणि रुक्ष, कंटाळवाण्या आयुष्यातून सुटका करून आपल्याला कुणीतरी स्वर्गात आणून टाकलंय असं तिला वाटत होतं. राम तिचा वाटाड्या होता आणि जणू तिच्या खास खुशीसाठी आपणच द्या वृक्षवेली, ही दऱ्याखोरी, धबधबे, ताजी थंड हवा सगळं निर्माण केलंय अशा थाटात तो तिला सगळं दाखवीत होता. बाजारातनं हिंडताना तिच्यासाठी कुठे चिटुकला बोटाएवढा चपलांचा जोड, कुठे कानात घालायचे लाल खडे, कुठे कोरलेले शिंग अशा शक्य तितक्या निरुपयोगी वस्तू विकत घेत होता. तिला तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ खाऊ घालत होता. ती जरा जरी दमल्यासारखी दिसली तरी ताबडतोब तिला बसून विश्रांती घ्यायला लावीत होता. नवसासायासाने झालेल्या मुलाचे करावे तसे तिचे लाड करीत होता. तिच्या आठवणीत तरी तिला असं कुणी वागवलं नव्हतं, आणि त्याच्या वागण्याने ती मनोमन सुखावत होती.
 पण मुळात ती स्वप्नसृष्टीत वावरतानासुद्धा जमिनीवर पाय ठेवणारी बाई होती, आणि त्याच्या प्रेमाच्या वर्षावात न्हाताना सुद्धा त्याच्या कुटुंबातले आपल्याला कसं वागवतील, आपलं आयुष्य कशा स्वरूपाचं असेल, असल्या गोष्टी तिच्या मनात यायच्या. त्याचं गाव, घर, माणसं हयांबद्दल ती सारखे प्रश्न विचारायची. शेवटी जरासं चिडून तो म्हणाला, "ज्यांची उत्तरं थोड्याच दिवसांत तू स्वतः देऊ शकणार आहेस असे प्रश्न तू मला का विचारत्येयस?"
 जरासं ओशाळून ती म्हणाली, "मला फक्त मी कसं वागावं, त्या लोकांची माझ्याकडून काय अपेक्षा आहे, याची कल्पना हवीय. त्यांचं प्रथमच माझ्याबद्दल वाईट मत होऊ नये."
 तो हसून म्हणाला, "तुझ्याशी लग्न त्यांनी नाही केलं, मी केलंय. आणि तू काहीही केलंस तरी माझं मत काही तुझ्याबद्दल वाईट होणार नाहीये. मग इतर कुणाशी तुला काय देणं-घेणं आहे ?"
 पण त्याच्या बोलण्यानं ज्योतीचं पुरेसं समाधान झालं नव्हतं. तिला वाटलं, असं सगळेच नवरे हनीमूनवर असताना म्हणत असतील. पण पुढे काय ? पुढे ते बोलले तसं करतात ? लग्न झाल्यावर वर्षभराने तुझा फक्त माझ्याशी संबंध आहे, दुसऱ्या कुणाशी काही देणं-घेणं नाही असंच म्हणतात ?




 " नमस्कार, बाई."
 " अरे, चंदर, मी तुला पाहयलंच नव्हतं." तिच्या शेजारच्या खोलीतल्यांना तो स्ट्रॉबेरीची करंडी देत होता. मग तिच्याकडे वळून म्हणाला, " कधी आलात बाई ?"
 महाबळेश्वरला आलेल्या प्रत्येकाला हा प्रश्न विचारलाच जातो.
 " थोडे दिवस झाले." ती म्हणाली.
 " किती दिवस राहणार ?"
 " बघू. आठवडा-दहा दिवस राहीन."
 " साहेब कुठेयत ?"
 " हयावेळी नाही आले."
 " तुम्ही ब्लू व्हॅलीला नाही राहयलात हयावेळी ?"
 "नाही राहिले.”
 " करंडी आणू का एखादी ? यंदा स्ट्रॉबेरीची क्वालिटी फार चांगली आहे."
 " ह्यावेळी नको."
 " घरी जाताना न्यायला तरी ?"
  तिनं मान हलवली.
 चंदरच्या स्ट्रॉबेरीज् दरवर्षीच अगदी बेष्ट क्वॉलिटी असायच्या. लिंगमळा फॉल्सच्या खालच्या बाजूला त्याचा लहानसा जमिनीचा तुकडा होता. त्यात तो स्ट्रॉबेरी, तुती, श्रावणघेवडा, कोबी, फ्लॉवर अशी पिकं घ्यायचा. महाबळेश्वरमध्ये भाज्यांच्या बियाणाचे प्लॉट घेईल अशा कुणाचा तरी शोध घेताना तो त्यांना भेटला होता. शेवटी त्यांनी तो विचार सोडून दिला, कारण त्यांना कळून चुकलं की, महाबळेश्वरच्या पर्यटकांना फळं आणि भाजी विकून तिथल्या शेतकऱ्यांना जो पैसा मिळतो तेवढा देणं त्यांना परवडणार नव्हतं. पण चंदर त्या वेळेपासून रामचा खास स्ट्रॉबेरी देणारा बनला होता. खरं म्हणजे त्यांना कुणालाच स्ट्रॉबेरी अगदी मनापासून आवडत नसत. पण स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये ते आले की दरवेळी न चुकता राम एक स्ट्रॉबेरीची करंडी घेऊन जायचा. आल्या आल्या तो चंदरला बोलावणं पाठवून ऑर्डर द्यायचा. आणि ते निघायच्या आदल्या संध्याकाळी चंदर करंडी आणून द्यायचा. तो म्हणेल ती किंमत राम घासाघीस न करता त्याच्या हातावर ठेवायचा आणि चंदर पण नेहमीच उत्तम, निवडक स्ट्रॉबेरीज त्याला द्यायचा. ज्योतीनं काढलेल्या कुरकुरीच्या सुराकडे तो अर्थातच संपूर्ण दुर्लक्ष करायचा. आधी आधी तिला वाटायचं की, मुलांना एकटं सोडल्याबद्दल त्याला अपराधी वाटायचं म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी नेलंच पाहिजे, अशा भावनेतून तो स्ट्रॉबेरी न्यायचा. पण मग तिला कळून चुकलं की, अमुक संदर्भात अमुक केलंच पाहिजे, असे त्याचे जे अनेक आडाखे असायचे त्यातलाच हा एक होता. महाबळेश्वरहून स्ट्रॉबेरी, मध असं काही घेतल्याशिवाय जाणं हे बरोबर नाही. शेवटी ज्योतीनं त्याला विरोध करायचं सोडून दिलं.
 तो जेव्हा मी सोडून तुला दुसऱ्या कुणाशी काही देणं-घेणं नाही, असं म्हणाला होता तेव्हा ते नुसतं अलंकारिक बोलणं नसून खऱ्या परिस्थितीचं वर्णन होतं असं ज्योतीला लवकरच कळून चुकलं होतं. याचं कारण म्हणजे त्यांच्या चिमुकल्या कुटुंबाचा तो कर्ता होता. त्यांच्या घरात रामचे वडील, त्यांची बायको वारल्यानंतर त्यांनी घरातलं करायला आणून ठेवलेली त्यांची विधवा बहीण आणि तिचा मतिमंद मुलगा एवढी माणसं होती. रामचे वडील म्हातारे होते, आणि फारसं बोलत नसत. पण प्रकृतीनं खुटखुटीत आणि स्वतंत्र वृत्तीचे होते. अधिकार गाजवणारे नसले तरी दुबळेही नव्हते. त्यांच्या तरुणपणी ते त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून वावरले असले पाहिजेत आणि बाकीच्यांनी, रामनेदेखील त्यांचा अधिकार मान्य केला असला पाहिजे. त्यांनी आता कर्तेपण आपण होऊन रामवर कसं सोपवलं हयाचं ज्योतीला आश्चर्य वाटलं. पण मग जसजशी रामची पुरी ओळख होत गेली तसं तिला कळून चुकलं, की त्यांच्या स्थानांची अदलाबदल रामनंच घडवून आणली असली पाहिजे कारण कोणत्याही समूहातलं दुय्यम स्थान स्वीकारण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. खरं म्हणजे कुटुंबाचा एक घटक म्हणून तो जगतच नव्हता. तो त्याच्या मार्गाने जायचा, त्याचे स्वतःचे निर्णय घ्यायचा आणि त्यांच्याबद्दल कुणाचाही सल्ला विचारायची त्याला गरज वाटत नसे. ज्योतीला पहिल्यापासून त्याच्यातल्या ज्या आत्मविश्वासाचं आणि करारी स्वभावाचं आकर्षण वाटलं त्याच्या मुळाशी हीच परिस्थिती होती. राम माणसांच्या गर्दीमध्ये एकटाच असे. त्याला जशी कुणाचा सल्ला घ्यायची जरूर वाटत नसे, तशी त्याच्या कुटुंबियांशी गप्पा मारण्याची, आज काय काय झालं त्याचा ऊहापोह करण्याचीही वाटत नसे. त्याच्या एकाकी आयुष्यात फक्त ज्योतीलाच प्रवेश होता, आणि त्यानं आपल्याला हा फार मोठा सन्मान बहाल केलाय असं तिला वाटायचं.
 तिनं एकदा त्याला विचारलं, " तुला कोणी मित्र नाहीत का?"
 "इथं ?"
 " इथं नसतील; पण पुण्यात तरी? कॉलेजातले मित्र वगैर कुणी इथे येत नाहीत का?"
 " तसे कुणी नाहीयेत मित्र मला. निदान इथे येऊन राहिलेले आवडतील असे तर नाहीतच."
 " कॉलेजात इतक्या वर्षांत कुणी मित्र नाहीत झाले तुझे?"
 " माझी कुणाशीच तितकी जवळीक झाली नाही. मी त्यांच्यापेक्षा वेगळा होतो, खेडवळ होतो. मला नेहमी वाटायचं, माझ्यापाठीमागे ते माझी टर उडवतायत म्हणून."
 लोकांनी कुचेष्टा करण्याची, अपमान करण्याची रामला सगळ्यात जास्त भीती वाटायची. म्हणूनच आपल्या शहरी मित्रांचं बारकाईनं निरीक्षण करून त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करताकरताच तो त्यांच्यापासून चार हात दूर रहात असे. आपलं बाहयस्वरूप त्यांच्यापासून वेगळं ओळखू येणार नाही आणि आपण त्यांच्यात सर्वस्वी सामावून जाऊ शकू, अशी खात्री झाली तोपर्यंत त्यांच्यातला एक होण्याची त्याची इच्छा मावळली होती. आता त्याला त्यांच्याबद्दल तुच्छता वाटायला लागली होती. परीक्षेतल्या मार्कात ते त्याच्यापेक्षा वरचढ असतील, पण शेतीतलं प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुभव त्याच्या गाठीशी जास्त होते. त्याच्याबरोबरीचे बहुतेक विद्यार्थी शेतकी खात्यातल्या नोकरीवर डोळा ठेवून शेतकी कॉलेजात शिकत होते. रामची धारणा होती की कारकुनी वृत्तीच्या माणसाला हे ध्येय ठीक असलं तरी महत्त्वाकांक्षा आणि नवनिर्मितीची क्षमता असलेल्याच्या दृष्टीने ते क्षुद्रच.
 तो कायम घरी आला तोवर त्याला कळलं होतं की, आपल्याला माणसांची गरज नाही. निदान माणसांशी फारशी जवळीक असण्याची गरज नाही. हे त्याच्या दृष्टीने सोयीचं होतं, कारण तो जिथे रहात होता तिथे बरोबरीची वाटावीत अशा लोकांशी संबंध यायची फारशी शक्यता नव्हती. आधी शिरगाव हे खेडेवजाच गाव. त्यातून त्यांची वस्ती गावाबाहेर दोन-तीन मैल होती. खरं म्हणजे हे अंतर काही फार नव्हतं, पण तरी महात्मा गांधींच्या खुनानंतरच्या सूडाग्नीत हिंसक जमावाचं लक्ष्य बनण्याइतपत त्यांची वस्ती एकाकी होती. श्रीपादरावांना हा उद्रेक आपल्यापर्यंत पोचणार हयाची कल्पना आली. या परिस्थितीत आपले जीव आणि काही थोड्या किमती वस्तू एवढंच वाचवता येईल हे कळण्याइतके ते सूज्ञ होते. तेव्हा त्यांनी आपली बायको, मुलं, म्हातारी आई हयांच्याबरोबर थोडे कपडे आणि चार सोन्याचे दागिने होते ते, एवढयानिशी पळ काढला. बैलगाडीनं रातोरात प्रवास करून ते त्यांच्या एका मित्राच्या वस्तीवर पोचले. मित्र त्या काळात सुरक्षित असणाऱ्या जातीचा होता, पण तो आपल्याला आसरा देईल, अशी श्रीपादरावांची खात्री होती. रात्री चोरासारखा त्यांनी त्याच्या घरात प्रवेश केला आणि कोठारात लपून राहिले. एक आठवडाभर दिवसा लपून राहयचं आणि फक्त रात्री बाहेर पडायचं. दिवसभर कोठाराला बाहेरून कुलूप घातलेलं असायचं. मुलांना आवाज न करण्याबद्दल सक्त ताकीद होती. धाकटया बाळाने रडू नये म्हणून त्याला अफूची गोळी द्यायची. वातावरण पुरेसं निवळल्यावर ते गावी परतले ते घरादाराची राखरांगोळी पहायला. वस्तीवर मागे राहिलेले गडी होते त्यांच्या मदतीने श्रीपादरावांनी राखेतून सगळं पुन्हा उभं केलं. कुणी म्हणत त्या गड्यांनी जाळपोळीत भाग घेतला होता. श्रीपादरावांनी कशाची चौकशी केली नाही की कुणाला जाब विचारला नाही. देवाची मर्जी म्हणून जे झालं होतं ते त्यांनी सोसलं. हा देव आपल्यावर खार खाऊन का आहे, असा विचार त्यांनी केला नाही. त्यांचं जीवन हळूहळू पूर्वस्थितीला आलं. आपण इथे राहतो तर आपल्याला वाचवायला ज्यांनी हात उचलला नसता अशी खात्री होती, त्या शेजाऱ्यांशी ते नेहमीसारखे मित्रत्वानेसुद्धा वागायला लागले. राम सगळया भावंडांत थोरला आणि जे काय घडलं ते थोडंफार कळण्याइतका मोठा. त्यानं झाल्या गोष्टीबद्दल द्वेषाची भावना जन्मभर मनात वागवली. तो आसपासच्या शेतकऱ्यांशी फटकून वागला की श्रीपादराव त्याला म्हणत, "असं करू नये, राम. शेजारधर्म म्हणून असतो. त्यांच्याशी मैत्रीच केली पाहिजे असं नाही म्हणत मी. पण गोडीनं वागावं. त्यांना काही कामासाठी बैलजोडी लागली, एखादं अवजार लागलं, तर द्यावं. त्यांच्याकडे लग्न असलं तर आहेर घेऊन जावं. मग एखाद्या वेळी आपल्याला मदत लागली तर बिनदिक्कत मागता येते."
 " तुम्हाला मदतीची गरज होती तेव्हा आला होता का एकतरी हरीचा लाल मदत करायला? त्यांच्यापैकी कुणी तुम्हाला घरात घेतलं ? तुमचं घर वाचवलं? तुमची पिकं उद्ध्वस्त करणाऱ्यांना थांबवलं? त्यांच्याशी शेजारधर्म पाळून काय फायदा झाला तुमचा ?"
 " अशावेळी त्यांनी मला मदत केली असती तर त्यांच्याच जिवावर बेतलं असतं. त्यांच्या घराची राखरांगोळी झाली असती. असं माहीत असताना तू तरी मदत केली असतीस कुणाला?"
 " अर्थात."
 श्रीपादराव नुसतेच हसले. खरं म्हणजे राम शेजाऱ्यांशी फटकून वागत असला तरी बेमुर्वतपणे वागत नसे. इकडे-तिकडे कुणी भेटला तर त्याच्याशी हवा-पाणी-पीक हयाबद्दल गप्पा मारायचा. कुणी मागितली तर बैलजोडी द्यायचा, मळणीयंत्र द्यायचा. त्यांना बी-बियाणं विकायचा. एक मात्र होतं. तो त्यांच्याकडून कधी काही मागायचा नाही. ते जाणून होते की, शेजाऱ्यांचं नातं हे देवघेवीचं नातं असतं, आणि जो तुमच्याकडून कधी काही मागत नाही तो स्वतःला तुमच्यापेक्षा श्रेष्ठ समजतो. शेजाऱ्यांशी मैत्री ठेवण्याने आपण बिनधोक राहतो, यावर रामचा विश्वास नव्हता. संरक्षणासाठी त्यानं दोन अल्सेशियन कुत्री आणि एक दुनळी बंदूक ठेवली होती.
 "बंदुकीनं सगळ्याचं उत्तर देता येत नाही," त्याच्या वडिलांनी सांगितलं. " किती माणसं मारू शकशील तू ? शेवटी ते तुझ्यावर मात करतीलच."
  " हरकत नाही. कधीतरी एक दिवस मरायचंच आहे. पण मी लढत मरेन. पळून जाणार नाही."
 वडील सुस्कारा सोडून म्हणाले, " ती वेळ कधी येऊ नये एवढंच माझं देवाजवळ मागणं आहे."
 रामने लग्न हया गोष्टीचा स्वतःच्या संदर्भात कधी विचार केला नव्हता. त्याच्या वडिलांनी आणि आत्याने लग्नाचा प्रस्ताव प्रथम त्याच्यापुढे मांडला तेव्हा त्याला नवल वाटलं. त्यानं बराच काळ विचार केला. त्यानं अगदी जवळून पाहिलेलं असं एकच जोडपं होतं, ते म्हणजे त्याचे आईबाप. त्यांच्या नात्यात असं काही त्याला आढळलं नव्हतं, की त्यामुळे त्याला स्वतःला लग्न करण्याची तीव्र इच्छा व्हावी. तसं ते दोघं भांडत-तंडत असत असं नाही, पण त्यांचा एकमेकांशी फारसा संबंधच नाही असं रामला वाटायचं. ते शेती नि बियाणाचा धंदा बघायचे. ती घर, मुलं नि दूधदुभत्याचं बघायची. एकत्र आली की त्यांचं संभाषण ह्या सगळ्या दिनक्रमाभोवतीच फिरायचं. त्यांचा एकमेकांवर फार जीव असल्याचा पुरावा रामला कधी मिळाला नव्हता. ती मेली तेव्हा त्यांनी अश्रू ढाळले होते पण त्याच्यामागे प्रचंड दुःखाचे कढ नव्हते. ती मेल्यानंतर थोड्याच दिवसांत त्यांनी आपल्या विधवा बहिणीला घरी आणलं, आणि मग त्यांचं घर पूर्ववत चालू झालं. लग्न म्हणजे हे एवढंच असलं तर लग्न करण्यात काय हशील आहे, असा रामला प्रश्न पडला.
 तो म्हणाला, "मला इतक्यात लग्न करायचं नाही."
 वडील म्हणाले, "फार दिवस थांबलास तर मनासारखी बायको मिळणं जड जाईल."
 "नाही मिळाली तर नाही करणार लग्न." " आत्ता असं म्हणायला सोपं आहे, पण दहा वर्षांनी मलाच नावं ठेवशील तुझं लग्न जमवलं नाही म्हणून."
 " नावं ठेवलीच तर ती तुम्हाला ठेवणार नाही. मग झालं ?"
 " पण लग्नाविरुद्ध काय आहे तुझं?" त्याच्या आत्यानं विचारलं.
 तिला लग्नाच्या बाजूने काय आहे तुझं म्हणून विचारायचं त्याच्या जिभेवर होतं, पण तो बोलला नाही. तिचा नवरा 'दिवसा खोकला न रात्री हिवज्वर' असल्यातला होता. शिवाय खत्रुडही होता. तिला मागे काही न ठेवता तो मरून गेल्यावर सासूसासऱ्यांकडे बिनपगाराची मोलकरीण म्हणून राबायचं अन् वर पुन्हा तिला न् तिच्या कारटयांना पोसणं किती महागात पडतं हे ऐकायचं, अशी तिनं बरीच वर्ष काढली. तिची मुलगी कसल्यातरी आजाराने मेली तेव्हा तिला कुणी धड औषधपाणीही केलं नाही.
 राम फक्त म्हणाला, " बायको निवडायची पद्धत मला पसंत नाही. जिला पूर्वी कधी पाहिलं नाही अशा एका मुलीला बघायला जायचं, तिला चार निरर्थक प्रश्न विचारायचे आणि तेवढ्यावर आपल्याला तिच्याबरोबर सबंध आयुष्य काढायला आवडेल की नाही ते ठरवायचं. एखादी मुलगी कशी आहे हे दहा मिनिटांत पारखणं शक्य आहे का ? आणि मी कसा आहे हे तिला तरी कसं कळणार ? शुद्ध रानटी पद्धत आहे ही.
 " तुला दुसरी हयाच्यापेक्षा चांगली पद्धत माहीताय का?" आत्यानं विचारलं.
 हे संभाषण तेवढ्यावरच थांबलं, पण लग्न ही कल्पना रामच्या मनात शिरली होती आणि आपल्या बाबतीत ती प्रत्यक्षात येणं शक्यतेच्या कोटीतलं आहे, असं त्याला वाटायला लागलं. तरी पण श्रीपादरावांनी त्याला एका मुलीबद्दल सांगितलं तेव्हा त्यानं ते नाखुषीनंच ऐकून घेतलं. ते पुण्यातल्या एका व्यापाऱ्याकडून बियाणं खरेदी करीत, त्याच्या मित्राची ही मुलगी.
  " शिकलेली आहे ?" रामनं विचारलं.
 " बी. कॉम. झालीय. बँकेत नोकरी करते."
 " मग तिला इकडे येऊन रहायला कशावरून आवडेल ? बहुतेक शहरी मुलींना आवडणार नाही."
 " माझा मित्र म्हणाला तिची काही हरकत नाही."
 " तिच्या कुटुंबात इतर कोण कोण आहे ? तिचे वडील काय करतात ?"
 "तिचे वडील एका डॉक्टरकडे कंपाउंडर म्हणून होते. काही वर्ष झाली त्यांच्या अंगावरनं वारं गेलं. तीन मुलं आहेत. ही सगळयांत थोरली. तिच्या पाठचा भाऊ आणि धाकटी बहीण आहे."
 " बाबा, तुम्ही मुलगी आधीच पाहिलीय का ?"
 "हो." जरासं घुटमळत त्यांनी कबूल केलं.
 " मग तुमचं तिच्याबद्दल काय मत झालं ?"
 " तुला बायको म्हणून चांगली साथ देईल. कर्तबगार, जबाबदारी पेलायला समर्थ वाटली. उगीच शोभेची बाहुली नाहीये."
 " म्हणजे कुरूप आहे असं सरळच म्हणा की." तो हसला आणि वडील काही बोलायच्या आतच म्हणाला, "तुमचं बरोबर आहे, बाबा. साड्या न दागिने ह्याच्यापलीकडे विचार न करणाऱ्या रिकाम्या डोक्याच्या नि सुंदर तोंडाच्या बायकोला घेऊन मी काय करू ?"
  पण हे बोलून दाखवलंन तरी प्रथम जेव्हा त्याने काळयासावळया, जरा जाडीकडेच झुकणाऱ्या बांध्याच्या, दहाजणीतसुद्धा उठून न दिसेल अशा ज्योतीला पाहिलं तेव्हा चुटपुटतच त्याने प्रत्येक पुरुषाच्या स्वप्नातली गोरी, सुंदर, शेलाटी मुलगी आपल्या मनातून काढून टाकली.
 ह्या पहिल्या भेटीत त्याने ज्योतीशी एकटीशीच बोलण्याची इच्छा व्यक्त केली. ज्योतीच्या आईला ही कल्पना जरा चमत्कारिक वाटली, पण शेवटी त्यांना दोघांना त्यांच्या दोन खोल्यांच्या ब्लॉकच्या बाहेरच्या खोलीत बसून बोलायला तिनं परवानगी दिली. मधलं दार लावलेलं होतं आणि रामची खात्री होती की, सगळ्यांचे कान त्या दाराला लागलेले असणार पण त्याला त्याची हरकत नव्हती. त्याला फक्त त्याच्या समोर ज्योतीशिवाय दुसरं कुणी नको होतं. त्याला आपल्याशी एकटीशीच काय आणि कशासाठी बोलायचंय, ह्याची काहीच कल्पना नसल्यामुळे ती जराशी बावरली होती.
 तो म्हणाला, " तू माझ्या वडिलांना भेटली होतीस का?"
 "हो."
 "आम्ही कुठे राहतो, ते कसलं ठिकाण आहे, तू माझ्याशी लग्न केलंस तर तुझं आयुष्य कशा तऱ्हेचं असेल ह्या सगळ्याची कल्पना त्यांनी तुला दिली का ?"
 "हो."
 " तिथे येऊन रहायला तुझी खरंच हरकत नाहीये का?" तिनं मान हलवली.
 " तिथे शहरातल्या सुखसोयी नाहीत. कष्ट करावे लागतील. आणि एकटं वाटेल. मित्रमैत्रिणी मिळणार नाहीत. सिनेमा बघायला मिळणार नाही. तसं शिरगावमध्ये एक मोडकं-तोडकं थिएटर आहे, पण आम्ही सहसा तिथे जात नाही."
  ती काहीच बोलली नाही.
 " हे सगळं चालेल तुला?"
 "हो."
 "नोकरी सोडायला वाईट नाही वाटणार?"
  " नाही."
  " पुण्याला महिनेन महिने यायला मिळणार नाही."
  " चालेल मला."
 " मग मी तक्रारी ऐकून घेणार नाही."
 ज्योतीला आता त्याचा रागच आला. तिला वाटलं, हे असं आणखी काही वेळ सुरू राहिलं तर दुसरी मुलगी बघ म्हणून सांगणाराय मी त्याला.
 ती म्हणाली, " मी तक्रार करणार नाही."
 " तुला काही प्रश्न विचारायचेत ?"
 " नाही."
 "ठीक आहे. बोलाव आता सगळ्यांना."
 तिला त्याच्या एकाएकी असं सांगण्याचं इतकं आश्चर्य वाटलं, की जाऊन दार उघडण्यापूर्वी काही क्षण ती नुसती त्याच्याकडे बघतच राहिली. मग त्यानं तिथल्या तिथं तिच्या आईला सांगितलं की ज्योती त्याला पसंत आहे आणि लग्न शक्य तितक्या लवकर, जास्त अवडंबर न माजवता आणि कमीत कमी खर्चात करायचं, तेव्हा ज्योतीच्या आईला धक्का बसला.
 तो म्हणाला, "मला हुंडा नको आहे. आणि हुंडा नकोय म्हणजे काहीच नकोय. इतर मार्गांनी मी तुमच्याकडून पैसा उकळणार नाहीये. लग्नाचा समारंभ शक्य तितका साधा ठेवा. आणि खर्च तुम्ही-आम्ही निम्मेनिम वाटून घेऊ."
 आता मात्र ज्योतीच्या आईला काळंबेरं दिसायला लागलं. नवऱ्या मुलानं सगळं आपल्या आपणच ठरवून टाकायचं ही काय रीत झाली ? त्याच्या घरात कुणी वडीलधारं नाही की काय? आणि मुलगा हुंडा मागत नाही म्हणून तिचा जीव भांड्यात पडला असला तरीसुद्धा ही गोष्ट काहीतरी अस्वाभाविक आहे असं तिला वाटलं. चांगलं सुखवस्तू कुटुंब, जमीनजुमला असलेलं. धाकटया भावाला चांगली उत्तम पगाराची नोकरी. एकुलत्या एक बहिणीचं लग्न झालेलं. त्यामानाने ज्योतीची बाजू फारच लंगडी होती. असं असताना त्यानं तिला हुंड्याशिवाय का पत्करावं ? मुलात काहीतरी दोष असला पाहिजे.
 ज्योतीला हसूच आलं. तिला रामचं सरळ मुद्याला हात घालणं आणि स्वतंत्र वृत्ती आवडली. माझा हुंड्यावर विश्वास नाहीये, पण...असं म्हणून आईबापांच्या आड लपून हुंडा मागणान्या शेळपटांच्यातला तो नव्हता. आणि तिला त्याचं रूपही आवडलं. उंच - ती फक्त पाच फूट दोन इंच होती त्यामुळे साडेपाच फूट उंचीचा माणूस तिला चांगला उंच - निच वाटला - सडपातळ, काळासावळा आणि खूप दाट केसांचा. अगदी देखणा म्हणण्यासारखा नसला तरी ती तरी कुठे मोठी सुंदर लागून गेली होती ! शिवाय सुंदर पुरुष बायकी दिसतात असं तिचं मत होतं.
 लग्न म्हटलं की ज्योतीच्या मनात भुतं उभी रहायची. तिचं एक दुःस्वप्न होतं की एका स्थळानं आपल्याला पसंत केलंय आणि भला मोठा हुंडा थाटामाटात लग्न, अशी मागणी केलीय. ना रूप, ना रंग, ना बापाची इस्टेट, अशा परिस्थितीत आहे ते स्थळ हातचं घालवलं तर मुलगी बिनलग्नाची राहील म्हणन आई सगळ्या मागण्या कबूल करून बसलीय मग अर्थातच ज्योतीच्या काका-मामा समोर हात पसरतेय. आपल्याला या सगळ्याची घृणा आहे, पण सरळ मी हे लग्न करणार नाही, असं म्हणण्याची धमक नाहीये.
  प्रत्यक्षात गोष्ट कधी इतक्या थरापर्यंत आलीच नव्हती. ज्या डझनभर स्थळांनी तिला पाहयलं होतं त्यांनी ताबडतोब नाही म्हटलं होतं. याचं ज्योतीला फारसं आश्चर्य वाटलं नव्हतं. लहानपणापासून जरी लग्न हा प्रत्येकीच्या आयुष्यातला अटळ टप्पा आहे असं ती धरून चालली होती, तरी आपलं स्वत:चं लग्न कदाचित होणार नाही हे तिला अनुभवानं पटलं होतं.
 ती अभ्यासात हुशार होती आणि निबंध-स्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा ह्यांतही तिनं बरीच बक्षिसं मिळवली होती. तिचे सहाध्यायी तिच्याकडे यायचे ते नोट्स मागायला किंवा ते स्पर्धेत भाषण करणार असले तर त्यासाठी तिला मुद्दे विचारायला किंवा अशाच काही कारणासाठी. त्यांना तिच्याबद्दल काही वाटत असलंच तर त्यात लैंगिक आकर्षणाचा काही भाग नव्हता. विनाकारणच ओळख काढून बोलायला किंवा बरोबर मिरवायला त्यांना सुंदर आणि नखरेल मुली हव्या असायच्या. पहिल्यापहिल्याने तिला राग यायचा आणि पुन्हा येऊ दे तर खरं नोट्स मागायला, मी देणारच नाही, असं ती ठरवायची. पण मुळात ती सुस्वभावी होती. तेव्हा कुणाला पटकन नाही म्हणणं तिला जमायचं नाही. शिवाय असं केल तर आपल्या जवळपास कुणी फिरकायचं नाही हे कळण्याइतकं शहाणपण तिला होतं.
 बी. कॉम. च्या परीक्षेत तिला डिस्टिक्शन मिळालं आणि ती कॉलेजात पहिली आली. तिला बरीच बक्षिसं आणि शिष्यवृत्त्या मिळाल्या. त्यांच्या मदतीनं तिनं शिक्षण चालू ठेवायचं ठरवलं. आणि मग एकाएकी तिच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. ते संपूर्णपणे गलितगात्र झाले. ती सर्वांत मोठी म्हणून कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर पडली. मग शिक्षणा-बिक्षणाचा विचार सोडून तिनं नोकरी धरली. आधीच फारसं शक्यतेच्या कोटीतलं नसलेलं लग्न आता आणखीच आवाक्याबाहेर गेलं. जेव्हा मग राम तिच्या आयुष्यात आला तेव्हा तिनं स्वत:ला एक सरळ व्यावहारिक प्रश्न विचारला. इतपत चांगलं स्थळ दुसरं कुठलं मिळणार आहे मला ? इथे हो म्हणण्यात काही धोका असला तर तो पत्करायला काय हरकत आहे ?
 राम वेगळ्या वाटेनं पण ह्याच ठिकाणी येऊन पोचला होता. त्याच्या मनात काही भुतं नव्हती. पण एकदा लग्न करायचं ठरवल्यावर आणि मुली बघणं वगैरे प्रकार मुळीच आवडत नसल्यामुळे त्यानं विचार केला की, ज्योती काय वाईट आहे ? एखाद्या जास्त सुखवस्तू घरातल्या मुलीपेक्षा बरी कारण तिची कष्टाला तयारी आहे आणि तिनं जबाबदारी पेललेली आहे. श्रीमंताघरच्या लाडावलेल्या मुलीबरोबर संसार करणं कठीण. शेवटी कसंही पाहिलं तरी लग्न जुगारच आहे. तेव्हा ह्या मुलीबद्दल आपल्याला मनोमन जे वाटतंय त्याच्यावर विसंबून निर्णय घ्यायला काय हरकत आहे? आता तिला आपलं साम्राज्य दाखवताना त्याच्या मनात आलं, लग्न हे छान असतं. आत्तापर्यंत आपण किती एकटे होतो, आपल्याला साथी-सोबती नसल्यामुळे आपल्या आयुष्यात केवढी उणीव होती ते कळलंच नव्हतं त्याला. आपल्या शेजारून चाललेल्या ज्योतीला स्पर्श करावा, तिच्या नितळ त्वचेवरून हात फिरवून ती खरोखर तिथं आहे ह्याची खात्री करून घ्यावी, अशी त्याला तीव्र इच्छा झाली.
 तो म्हणाला, " इथे बसू या जरा. दमलीस का?"
 "थोडीशी.”
  विहिरीशेजारी आंब्याचं झाड होतं. त्याच्याखाली ती बसली. मिरचीच्या प्लॉटवर पाणी चाललं होतं. विजेच्या मोटरची गुणगुण ज्योतीच्या कानाला गोड वाटत होती. इथे किती शांत होतं आणि किती मोकळं. शहरात असं कधीच अनुभवायला मिळत नाही. थेट क्षितिजापर्यंत जाऊन भिडणारी हिरवीगार शेतं, तयार होत आलेला सोनेरी गहू, मधनं मधनं दिसणाऱ्या छोट्या छोट्या वस्त्या, झाडं सगळं ती अधाशीपणे डोळ्यांत साठवीत होती.
 " ही एवढीच जमीन. लहानसाच तुकडा आहे. कसं काय आवडलं सगळं तुला?"
 " ह्यात काही न आवडण्यासारखं आहे का?"
 " इतक्यात एवढी हुरळून जाऊ नको. इथे थोडे दिवस राहून बघ आधी."
  "आणखी एका वर्षानेसुद्धा मला आत्ता वाटतंय त्यापेक्षा काही वेगळं वाटणार नाही. माझी खात्री आहे. शेती करण्यात मजा असेल नाही?"
 "हं. सुरुवातीला थोडे दिवस वाटते मजा. मग सगळं तेच तेच वाटायला लागतं. लेबरवर देखरेख ठेवण्यापलीकडे फारसं काही करायचं नसतंच."
  पुढे पुढे तिला कळलं की, कामगारांना किंवा मजुरांना लेबर - तेसुद्धा नपुसकलिंगात - म्हणण्याचा शिरस्ताच आहे इथला. आज जास्तीचं लेबर बोलावलंय. लेबरचा पगार करायला जायचंय. जसं काही ती वेगवेगळी माणसं नसून काम करणाऱ्या शरीरांचा एक मोठा गठ्ठा असतो. तिला तसं म्हणायची कधी सवय झाली नाही.
  ती म्हणाली, " सगळं तेच तेच असलं तर मग देखरेखीची तरी काय गरज? त्यांना कामं माहीतच असतील."
 " देखरेखीशिवाय ते करतात त्याच्या निम्म्यानेसुद्धा काम करणार नाहीत.
 " सगळेच काय चुकार असतात?"
 " असतात. थोडाफार चुकारपणा निकृष्ट अन्न, अशक्तपणा ह्यामुळे असेल. पण ह्यातले काहीजण तरी कंत्राटावर दिलं तर दुप्पट काम करू शकतात."
 " कंत्राटावर काम करून ते जास्त पैसे मिळवतात का ?"
 "जे चांगले कामगार असतात ते खूपच जास्त मिळवू शकतात. पण जे मुळातच सुस्त असतात ते रोजच्या हजेरीएवढे तीन रुपयेसुद्धा मिळवू शकत नाहीत आणि बाबा मला त्यांना कामावरून कमी करू देत नाहीत, कारण ते आमच्याकडे पुष्कळ वर्ष आहेत. मी काही बाबांशी वाद घालीत बसत नाही. शेतीचं सगळं ते त्यांच्या पद्धतीनं बघतात. मी त्यात लक्ष घालत नाही. बियाणाचा धंदा आता मी जवळजवळ संपूर्णपणे बघतो. खरं म्हणजे मला शेतीपेक्षा त्याचीच जास्त आवड आहे. नवीन जाती, हायब्रिड, ह्यांच्यामुळे ह्या धंद्याला फार चांगले दिवस येणार आहेत. फक्त एकच आहे. हा धंदा काय किंवा कुठलाही धंदा, मोठ्या प्रमाणावर करायचा म्हणजे आम्ही आतापर्यंत केला तसा काही नीट आखणी न करता, गैरहिशोबीपणानं चालवून जमणार नाही. त्यासाठी कच्च्या मालाची किंमत, प्रक्रियेचा खर्च, नफ्याचं प्रमाण ह्या सगळ्यांची मांडणी केली पाहिजे. मार्केटचा आढावा घेतला पाहिजे, विक्रीसाठी योग्य प्रकारची यंत्रणा उभी करायला पाहिजे. हया सगळ्यात मला तुझी मदत हवीय."
  " माझी ?" तिनं आश्चर्यानं विचारलं, " बी. कॉम. होऊन बँकेत नोकरी करून एखादा स्वतंत्र धंदा चालवण्याची कुवत येत नाही माणसाला."
 " पण तू शिकू शकशील. पुस्तकी ज्ञान तर तुला आहे ना ? मग त्याचा प्रत्यक्षात वापर करायला सुरुवात करायची. आधी मुख्य म्हणजे रीतसर हिशेब ठेवणे. मी आणि बाबा नेहमी आता पुढल्या वर्षीपासून नीट हिशेब ठेवायचे असं घोकत आलोत. पण ते पुढलं वर्ष कधी उगवलंच नाही."
 "हं. हिशेब ठेवणं, जमाखर्च लिहिणं, हयात मात्र मी मदत करू शकेन."
 " असं बोल. आमचं काय झालं, रीतसर धंदा म्हणून आम्ही हे सुरू केलंच नाही. बाबा पुण्याहून आम्हाला लागणारं बी खरेदी करून आणायचे. मुख्य म्हणजे वेगवेगळ्या जातींचा घेवडा. हया भागात घेवडा मोठया प्रमाणावर करतात. बाबा पुण्याला निघाले की शेजारपाजारचे शेतकरी आपल्यासाठी बी आणायला सांगायचे. एक दिवस ज्याच्याकडनं ते बी घ्यायचे तो व्यापारी म्हणाला, त्यापेक्षा तुम्ही माझ्याकडून घाऊक बी घेऊन ते किरकोळीनं इतरांना विकीत का नाही ? थोडा फायदा तरी होईल. तेव्हा ते तशी विक्री करायला लागले. मग ते इतर भाज्यांचं बी आणून त्याची विक्री करायला लागले. पुढे काही तऱ्हेच बी इथेच तयार करायला सुरुवात केली. असा हा धंदा नीट आराखडा न करता आपला वाढत वाढत गेला. आता तो रांगेला लावायचा म्हणजे कठीणच जाणार आहे, पण तुझ्या मदतीने मी ते करू शकेन. मला अगदी मनोमन खात्री आहे की, आपण दोघांनी मिळून काम केलं तर आपल्याला अशक्य असं काहीच नाही."
 तिच्या मनातसुद्धा असं आलं नाही की, आपल्याला हेच करायला आवडेल का असं त्यानं विचारलं नाही. आणि त्यावेळी जरी त्यानं विचारलं असतं तरी ती नक्की होच म्हणाली असती. कारण लग्नाचा हाच अर्थ असतो. बाईनं आपलं त्या क्षणापर्यंतचं अस्तित्व पुसून टाकून नव्या आयुष्याला सुरुवात करायची. हा निसर्गनियम आहे. ज्योतीनं कसलाही किंतु मनात न ठेवता, एवढंच काय, अगदी उत्साहाने आणि अभिमानाने त्याचा स्वीकार केला. रामच्या सळसळत्या उत्साहाचा, जादूचा स्पर्श तिलाही झाला. अतीव आनंदानं तिचं मन भरून आलं.



 आत्ता सगळीकडे कोरडं होतं, पण दिवाळीच्या नंतर ती धोबी वॉटरफॉलच्या वरच्या बाजूला हयाच जागी बसलेली असताना जळवांनी तिच्यावर हल्ला केला होता. पायावर काहीतरी आहेसं वाटलं म्हणून साडी वर करून पाहिलं तर पोटरीला पाच-सहा जळवा चिकटल्या होत्या. तिनं इकडेतिकडे पाहिलं तर खूपशा जळवा त्यांच्या दिशेनं अक्षरशः चाल करून येत होत्या. तिनं किंकाळी फोडून पळायला सुरुवात केली.
 राम हसायला लागला. " पळत्येस कशाला ? त्या काही करीत नाहीत."
 " हं, करत नाहीत कशा ? माझं रक्त पितायत म्हणजे काही करत नाहीत?"
 " तुला माहीताय, पूर्वीच्या काळी सूज उतरवण्यासाठी जळवा लावायचे.
 " पूर्वीच्या काळी काय वाटेल ते असो. आत्ता उठून माझ्यावर हल्ला करायचं त्यांना काही कारण नव्हतं. शी: !"
 जळवा काढून टाकल्यावर बराच वेळ तिच्या पायावरून रक्ताचे ओघळ वहात होते. हॉटेलातल्या सगळ्या लोकांनी 'ई', 'अगं बाई', 'माय गॉड' असे तऱ्हेतऱ्हेचे उद्गार काढून तिच्याभोवती गर्दी केली तेव्हा तिला आपण फारच शूर आहोत, असं वाटायला लागलं. पुन्हा कधी तिला इतक्या मोठ्या प्रमाणावर हया रक्तपिपासू जळवा दिसल्या नाहीत.
  नुसत्या जळवांबद्दलच्या विचारानेसुद्धा ती शहारली. तिनं पटकन इकडे तिकडे बघितलं आणि मग तिला स्वतःच्याच भेदरटपणाचं हसू आलं.
 तिच्या मनात आलं, माझी प्रत्येक आठवण रामशी निगडित आहे. जणू तो भेटण्यापूर्वीचं माझं आयुष्य अर्थहीन, वैराण होतं. त्या काळातल्या काही आठवणी कशा येत नाहीत मला ? याचा अर्थ असा धरायचा का की, त्याला जर मी हद्दपार केलं तर माझ्या आयुष्याचं वाळवंट होईल ? छे:, असं शक्यच नाही. तो माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मी अर्थपूर्ण आयुष्य जगत होतेच आणि त्याला सोडल्यावर तसं जगता यायला हरकत नाही. त्यातली मेख अशी आहे की, एकदम सबंध भविष्यकाळाचा विचारच करायचा नाही. फक्त लहान लहान निर्णय घ्यायला सुरुवात करायची. उदाहरणार्थ, रामला सोडल्यावर मी कुठे राहणार आहे?
 पहिले थोडे दिवस तरी आईकडे राहण्याचा विचार मनात आल्या आल्याच तिनं बाद केला. हयाचं मुख्य कारण म्हणजे ती जे पाऊल टाकणार होती त्याबद्दल तिच्या आईची प्रतिक्रिया काय असणार याबद्दल ज्योतीची खात्री होती. आईच्या मनात रामबद्दल अढी असली तरी ज्योतीनं त्याला सोडण्याचा विचार करावा, हे तिला पटू शकलं नसतं. ती म्हणाली असती, " मला तुम्हा नव्या मुलींचं काही कळत नाही बाई. ज्या माणसाबरोबर इतकी वर्ष चांगला सुखानं संसार केला, त्याला काहीतरी क्षुल्लक कारण काढ्न सोडायचं? " सर्वसाधारणपणे लग्न हे पवित्र बंधन असतं. असहय झालं तरच ते मोडायचा विचार करायचा किंवा नवऱ्यानं हाकलूनच दिलं तर ! पण कुणाला काय असहय वाटेल ते कसं ठरवायचं ?
  आणि ह्याशिवायसुद्धा आईकडे जाऊन राहणं ही शक्य कोटीतली गोष्ट नव्हतीच. निशा लग्न होऊन गेलेली होती, पण आता घरात संजय, त्याची बायको आणि त्यांची दोन मुलं होती. नव्या परिस्थितीचे नवे ताणतणाव होते. संजय आणि त्याची बायको दोघंही नोकऱ्या करीत होते. एखादी मोलकरीण ठेवण्याइतपत पगार दोघांचा मिळून सहज होता. पण आईचं म्हणणं, एवढया थोड्या कामासाठी मोलकरीण कशाला ? भांड्या-धुण्याला बाई होतीच. मग बाकीची कामं आपली आपण केली तर कुठं बिघडलं? पण आईचं आता वय झालं होतं. तिचे सांधे दुखत, तिची दृष्टी क्षीण झाली होती. तेव्हा आपली आपण कामं करणं याचा अर्थ संजयच्या बायकोनं कामं करणं असाच व्हायचा. अर्थातच जादा काम पडल्यामुळे ती अखंड चिडचिड करायची आणि घरात दोन बायकांच्या सदैव कुरबुरी चालायच्या.
 एकदा ज्योती संजयला म्हणाली होती, " तू काहीतरी बोलत का नाहीस? तू ठामपणे तसं म्हटलंस तर आई नक्की पूर्णवेळ कामाची बाई ठेवू देईल."
 "हं ! आणि मग पदोपदी मला त्याबद्दल ऐकवील."
 " मग हे जे चाललंय ते त्यापेक्षा बरं आहे का ?"
  त्यानं नुसते खांदे उडवले आणि ज्योती गप्प बसली. आपण त्यांच्या घरात नाक खुपसणं संजयला आवडत नाही, हे तिला कळून चुकलं होतं. इतकं तणावाचं आणि विसंवादाचं वातावरण तो कसं सहन करू शकतो, हे तिला समजत नसे. तिला स्वतःला तिथे इतकं उदास वाटायचं, की ती सहसा आईकडे रहायला जातच नसे.
 एकदा निशा तिला म्हणाली होती, " ताई, तू लकी आहेस. सुनेला शत्रूसारखं वागवणाऱ्या सासरच्या माणसांना तुला कधी तोंड द्यावं लागलं नाही." मग तिला अपराध्यासारखं वाटलं की, एकत्र कुटुंबातले हेवेदावे, क्षुल्लक कारणांवरून रंगणारी भांडणं, सत्तेचं राजकारण ह्या प्रकारांशी तिला कधी झुंज द्यावी लागली नाही. असं काय पुण्य तिनं केलं होतं की तिचं आयुष्य इतकं सुरळीत जावं ? आपली सासू जिवंत असती तर आपलं आयुष्य वेगळं झालं असतं का, असा विचार बरेचदा तिच्या मनात यायचा.
 मग आईकडे रहायचं नाही म्हटलं म्हणजे एखादी खोली भाड्याने घ्यायला हवी. त्यात काही अवघड नव्हतं. प्रश्न होता तो पोट भरण्याचा, नोकरीचा. जरी जगण्यापुरते पैसे असले, तरी काहीतरी काम केल्याशिवाय ती राहू शकली नसती. पण कसलं काम ? तिला चांगल्या प्रकारे जमणारं काम एकच होतं, ते म्हणजे एखाद्या सीड कंपनीत नोकरी. पण रामच्या एखाद्या स्पर्धकाकडे नोकरी करणं शक्य नव्हतं. मग राहता राहिल्या कारकून, अकाउंटंट असल्या नोकऱ्या. पण जवळ जवळ रिटायर व्हायच्या वयाला येऊन ठेपलेल्या बाईला कोण नोकरी देणार ? आणि तिनं ज्या स्वरूपाचं काम केलं, जी आव्हानं पेलली, त्यानंतर साधी कारकुनी नोकरी करणं हे इतकं मठ्ठ आणि कंटाळवाणं वाटणार होतं.
 अर्थात तिनं जे काम केलं होतं ते मुद्दाम स्वतःच्या आवडीचं क्षेत्र निवडून वगैरे केलं नव्हतंच. रामची इच्छा होती त्याप्रमाणे ती वागली. समजा, तिनं गृहिणी व्हावं, अशी इच्छा त्यानं व्यक्त केली असती तर तिनं गृहिणी होण्यातच समाधान मानलं असतं.
 शिरगावला गेल्यावर पहिले काही दिवस कर्तव्यदक्ष सून अशी जी एक प्रतिमा तिच्या मनात तयार केली गेली होती त्याप्रमाणे ती वागायला पहायची.
 एकदा ती रामला म्हणाली, "मला अगदी अडाण्यासारखं वाटतं. इथली कितीतरी कामं मला करता येत नाहीत."
 " स्वयंपाकात वगैरे मदत करतेस की. आणखी काय करायचं असतं?"
 "मला गाईच्या धारा काढता येत नाही. त्यांना खायला टाकता येत नाही. पिकांना पाणी द्यायला येत नाही."
 तो हसायला लागला. " हात्तिच्या! एवढंच ना? मी शिकवीन तुला गाईची धार काढायला. त्यात काय विशेष आहे ? कुणीही बावळट गाईची धार काढू शकेल. तू उद्यापासून सीड प्रॉसेसिंगबद्दल शिकणार आहेस. इतर शंभर लोक जी कामं करू शकतील ती करण्यात तू तुझा वेळ कशाला घालवतेस ?"
  पण आत्याबाई काय म्हणतील?"
 " ती कशाला काही म्हणेल?" तो आश्चर्याने म्हणाला. " सगळं काम त्यांनाच करावं लागतं ना.”
 " तिच्या मदतीला आहेत की माणसं. आणि केव्हाही आणखी मदत हवी असली तर लेबरमधून एखाद्या बाईला हाक मारायची."
 रामला आपल्या बोलण्याचं इतकं आश्चर्य का वाटलं ते पुढे ज्योतीला कळलं. आत्याबाई हया जरी बाबांची बहीण होत्या तरी त्या घरात त्यांचं स्थान आश्रितासारखं होतं. त्या विधवा होत्या आणि त्यांना दुसरीकडे कुठे थारा नव्हता. त्यांना आपल्या घरी आणून त्यांच्या भावाने, त्यांच्यावर उपकार केले होते. तेव्हा त्या उपकारांच्या बदल्यात त्या भावाच्या कुटुंबासाठी राबल्या तर त्यात कुणालाच काही वावगं वाटत नाहतं.
 कारण काही का असेना, घरकामाची काही जबाबदारी घ्यायची गरज नाही हयात ज्योतीला आनंदच होता. तिला घरकाम या प्रकाराचा कंटाळाच होता. ती नोकरी करून तिच्या कुटुंबाचा बराचसा आर्थिक भार पेलत असतानाही, कामावरून घरी आलं की तिनं घरकामाला हातभार लावला पाहिजे, अशी तिच्या आईची अपेक्षा असे. संजय मात्र शाळेतून घरी आला की, लगेच खेळायला बाहेर निघून जायचा. एकदा ज्योतीने हयाबद्दल जरा कुरकुरीचा सूर काढण्याचं धाडस केलं तेव्हा तिची आई पटकन म्हणाली, " तो मुलगा आहे. त्याला काही स्वैपाक करावा लागणार नाहीये पुढे. पण तुला मात्र आयुष्यभर त्यातनं सुटका नाही. बाहेर नोकरी करीत असलीस तरी."
 घरकामातनं सुटका झाल्यानं ज्योतीला हायसं वाटलं तरी शेतावर काम करायला मात्र तिला आवडायचं. तिनं सासऱ्याला विचारलं, " बाबा, तुम्ही मला शेतीतली कामं शिकवाल ?"
 त्यांनी हसून विचारलं, " काय शिकायचंय तुला?"
 तिला एकदम वाटलं की ज्या माणसानं शेती करण्यात आयुष्य घालवलं त्याला माझ्यासारख्या नवख्या शहरी बाईनं, जणू ही काय अगदी सोपी गोष्ट आहे, अशा सुरात हे विचारणं म्हणजे त्याचा अपमान करणंच झालं.
 ती घाईघाईने म्हणाली, " म्हणजे सगळं अगदी ताबडतोब शिकता येईल असं नाही म्हणायचं मला. पण शिकायला सुरुवात करायची आहे. निदान पाणी द्यायचं, खतं टाकायची, काढणी, अशा नेहमीच्या कामात मदत करण्याइतपत तरी शिकायला आवडेल मला."
 हया वेळेला त्यांचा बियाणाचा धंदा अगदी आटोपशीर होता. त्यात सुमारे वीस माणसं कामाला होती. त्यातल्या बहुसंख्य बाया होत्या. त्यांचं काम म्हणजे बी साफ करणं, ते निवडून त्यातलं खराब, फुटकं, पोचट बी काढून टाकणं, उरलेल्याला औषध लावणं, ते पिशव्यांतून भरणं आणि पिशव्यांना लेबलं लावणं. सगळी कामं हातानंच व्हायची. ज्योतीचं काम मुकादमाचं होतं, पण बरेचदा ती बायांबरोबर काम करू लागायची. कुणीतरी आपल्यासमोर काम करतंय आणि आपण रिकामं उभं राहून त्यांच्यावर नुसती देखरेख करायची, हे तिला चमत्कारिक वाटायचं. शिवाय तीही मदतीला लागली की काम तेवढंच भरभर व्हायचं. काम झालं की फावल्या वेळात ती शेतावर जायची.
 तिला वाटायचं की, हे असंच आयुष्य जगण्यासाठी तिचा जन्म झाला होता. इतकं सुख तिनं कधी कल्पनेतही अनुभवलं नव्हतं. तिच्या आईबापांच्या गर्दीदाटीतल्या दोन खोल्यांतलं आयुष्य, कदाचित अति-सान्निध्यामुळे त्यात होणाऱ्या कुरबुरी, पुढे वडिलांच्या आजारपणामुळे सगळ्यांवर पडणारी उदासवाणी छाया हे सगळं तिच्यापासून फार दूर गेलं होतं. त्यावेळची पैन् पै काळजीपूर्वक खर्च करण्याची गरज आणि त्या मानाने असलेली आताची समृद्धी यांची तुलना करून तिला अपराधी वाटायचं. पण ती कामात इतकी बुडाली होती, की हे अपराधीपणाचं शल्य तिला फार वेळ बोचत राहू शकत नसे.
 राम तिला विचारायचा, "तू आनंदात आहेस ना, ज्योती ?"
  " अर्थात. तुला दिसत नाही का?"
 " तुला इथे कंटाळा येईल म्हणून मला काळजी वाटते. इथे तशी करमणुकीची साधनं काहीच नाहीत. आणि संगत सोबत फक्त अडाणी कामगारांची."
 " मला आवडते अडाणी कामगारांची सोबत."
  " तुला तुझ्या नातेवाईकांची किंवा मित्रमंडळींची आठवण होत असली तर त्यांना इथे रहायला बोलाव ना कधीमधी."
 पण खरं म्हणजे तिला कुणाचीच आणि कशाचीच आठवण होत नव्हती. फारच थोड्या अवधीत ती आपल्या नव्या आयुष्यात पूर्णपणे रमली होती, आणि हे असं होणं अगदी योग्य आहे, असं तिला मनापासून वाटत होतं. रामनं बोलून दाखवल्यावर तिनं एकदा आपल्या भावाला आणि बहिणीला रहायला बोलावलं. तिनं अभिमानानं त्यांना सगळं दाखवलं आणि तिचं वैभव पाहून तेही दिपून गेले. खरं म्हणजे त्या काळात अजून त्यांचा बियाणाचा धंदा फारसा तेजीत नव्हता. पण साधंसुधं असलं तरी मोठंसं घर, शेती, गाईगुरं, इतके सगळे कामावरचे लोक हे संजय आणि निशाच्या दृष्टीने वैभवच होतं. पहिले काही दिवस गेल्यावर मात्र ती पुन्हा नेहमीप्रमाणे कामाला लागली आणि मग त्या दोघांना कंटाळा आला. शिवाय रामने त्यांच्याकडे जवळ जवळ संपूर्ण दुर्लक्षच केलं. ज्योतीची अपेक्षा होती की, तो त्यांच्याबरोबर गप्पा मारील, त्यांच्या अभ्यासाबद्दल काही विचारील, इकडे तिकडे हिंडवील, धाकटया भावंडांशी करावी तशी थोडी चेष्टामस्करी करील. पण त्यानं ह्यातलं काहीच केलं नाही. म्हणजे तसा तो त्यांच्याशी तुटकपणे वागला असं नाही. ते आल्याआल्या त्यांचं चांगलं तोंडभर हसून स्वागत केलं. पण नंतर मात्र त्यांची फारशी दखलच घेतली नाही. ज्योतीला जरा दुखावल्यासारखं वाटलं.
 " पुन्हा कुणाला बोलवू नको का आपल्याकडे ? "
 " असं का विचारतेस ?" त्याने खऱ्याखुऱ्या आश्चर्यानं विचारलं.
 " संजय आणि निशा इथे आलेत ते तुला फारसं आवडलं नाहीसं दिसतंय."
 " असं कुणी सांगितलं? मला न आवडण्याचं कारणच काय?"
  हळूहळू ज्योतीच्या लक्षात आलं की, ही त्याची पाहुण्यांशी वागायची रीतच होती. त्याच्या स्वतःच्या नातेवाइकांशीही तो तसाच वागायचा. संजय आणि निशाकडे दुर्लक्ष केलं ह्यात त्यांचा अपमान करण्याचा त्याचा मुळीच हेतू नव्हता. अगदी जवळच्या लोकांशीसुद्धा कसं वागावं, हेच त्याला समजत नसे. ह्याला अपवाद फक्त ती एकटी. अर्थात या गोष्टीला तिच्या लेखी फार महत्त्व होतं.
 ह्यानंतर तिनं कुणालाच परत शिरगावला बोलावलं नव्हतं. रामच्या वागण्यामुळे नव्हे, पण तिचं तिलाच पूर्वाश्रमीच्या सगळयांपासून आपण फार दूर आहोत, असं वाटायला लागलं. कॉलेजातल्या मैत्रिणी लग्नं करून दूर दूर पांगल्या होत्या, आणि बँकेतल्या सहकाऱ्यांशी झालेली ओळख फारच वरवरची होती. आपल्या नव्या घरी आवर्जून बोलवावं, असं कुणीच नव्हतं. संजय-निशा येऊन गेल्यावर ते आणि आपण अगदी वेगवेगळ्या जगांत राहतो हे तिला उमजलं. तिच्या आयुष्याचे सगळे संदर्भच इतके वेगळे झाले होते, की तिच्यात आणि त्यांच्यात देवाण-घेवाणसुद्धा अवघड झाली होती.
 ज्योती इतरांपेक्षा वरचढ असण्यात काही विशेष अभिमान बाळगणाऱ्यांतली नव्हती. पण आपल्याबरोबरीच्या इतर मुलींपेक्षा आपण वेगळं काहीतरी करतो आहोत, त्यांच्यासारखं चाकोरीतलं आयुष्य जगत नाही, ही भावना तिला सुखवीत असे. रामला काळजी वाटायची की, तिला तिच्याबरोबरीच्या मैत्रिणी नाहीत म्हणून एकटं वाटत असेल. पण त्यांच्याकडे काम करणाऱ्यांची, विशेषकरून बायकांची सोबत तिला आवडायची. त्या तिच्या अनुभवविश्वाच्या इतक्या बाहेर होत्या, की त्यांची सुख कामात इतकी बुडाली होती, की हे अपराधीपणाचं शल्य तिला फार वेळ बोचत राहू शकत नसे.
 राम तिला विचारायचा, " तू आनंदात आहेस ना, ज्योती ?"
 " अर्थात. तुला दिसत नाही का ? "
 " तुला इथे कंटाळा येईल म्हणून मला काळजी वाटते. इथे तशी करमणुकीची साधनं काहीच नाहीत. आणि संगत सोबत फक्त अडाणी कामगारांची.”
 "मला आवडते अडाणी कामगारांची सोबत.”
 " तुला तुझ्या नातेवाईकांची किंवा मित्रमंडळींची आठवण होत असली तर त्यांना इथे रहायला बोलाव ना कधीमधी."
 पण खरं म्हणजे तिला कुणाचीच आणि कशाचीच आठवण होत नव्हती. फारच थोड्या अवधीत ती आपल्या नव्या आयुष्यात पूर्णपणे रमली होती, आणि हे असं होणं अगदी योग्य आहे, असं तिला मनापासून वाटत होतं. रामनं बोलून दाखवल्यावर तिनं एकदा आपल्या भावाला आणि बहिणीला रहायला बोलावल. तिनं अभिमानानं त्यांना सगळं दाखवलं आणि तिचं वैभव पाहून तेही दिपून गेले. खरं म्हणजे त्या काळात अजून त्यांचा बियाणाचा धंदा फारसा तेजीत नव्हता. पण साधंसुधं असलं तरी मोठंसं घर, शेती, गाईगुरं, इतके सगळे कामावरचे लोक हे संजय आणि निशाच्या दृष्टीने वैभवच होतं. पहिले काही दिवस गेल्यावर मात्र ती पुन्हा नेहमीप्रमाणे कामाला लागली आणि मग त्या दोघांना कंटाळा आला. शिवाय रामने त्यांच्याकडे जवळ जवळ संपूर्ण दुर्लक्षच केलं. ज्योतीची अपेक्षा होती की, तो त्यांच्याबरोबर गप्पा मारील, त्यांच्या अभ्यासाबद्दल काही विचारील, इकडे तिकड हिडवील, धाकटया भावंडांशी करावी तशी थोडी चेष्टामस्करा करील. पण त्यानं हयातलं काहीच केलं नाही. म्हणजे तसा तो त्यांच्याशी तुटकपणे वागला असं नाही. ते आल्याआल्या त्याच चांगलं तोंडभर हसून स्वागत केलं. पण नंतर मात्र त्यांची फारशी दखलच घेतली नाही. ज्योतीला जरा दुखावल्यासारखं वाटल.
 " पुन्हा कुणाला बोलवू नको का आपल्याकडे ?  " असं का विचारतेस ? " त्याने खऱ्याखुऱ्या आश्चर्यानं विचारलं.
 " संजय आणि निशा इथे आलेत ते तुला फारसं आवडलं नाहीसं दिसतंय."
  " असं कुणी सांगितलं? मला न आवडण्याचं कारणच काय ? "
 हळूहळू ज्योतीच्या लक्षात आलं की, ही त्याची पाहुण्यांशी वागायची रीतच होती. त्याच्या स्वतःच्या नातेवाइकांशीही तो तसाच वागायचा. संजय आणि निशाकडे दुर्लक्ष केलं हयात त्यांचा अपमान करण्याचा त्याचा मुळीच हेतू नव्हता. अगदी जवळच्या लोकांशीसुद्धा कसं वागावं, हेच त्याला समजत नसे. याला अपवाद फक्त ती एकटी. अर्थात या गोष्टीला तिच्या लेखी फार महत्त्व होतं.
 हयानंतर तिनं कुणालाच परत शिरगावला बोलावलं नव्हतं. रामच्या वागण्यामुळे नव्हे, पण तिचं तिलाच पूर्वाश्रमीच्या सगळयांपासून आपण फार दूर आहोत, असं वाटायला लागलं. कॉलेजातल्या मैत्रिणी लग्नं करून दूर दूर पांगल्या होत्या, आणि बँकेतल्या सहकाऱ्यांशी झालेली ओळख फारच वरवरची होती. आपल्या नव्या घरी आवर्जून बोलवावं, असं कुणीच नव्हतं संजयनिशा येऊन गेल्यावर ते आणि आपण अगदी वेगवेगळ्या जगांत राहतो हे तिला उमजलं. तिच्या आयुष्याचे सगळे संदर्भच इतके वेगळे झाले होते, की तिच्यात आणि त्यांच्यात देवाण-घेवाणसुद्धा अवघड झाली होती.
  ज्योती इतरांपेक्षा वरचढ असण्यात काही विशेष अभिमान बाळगणान्यांतली नव्हती. पण आपल्याबरोबरीच्या इतर मुलींपेक्षा आपण वेगळं काहीतरी करतो आहोत, त्यांच्यासारखं चाकोरीतलं आयुष्य जगत नाही, ही भावना तिला सुखवीत असे. रामला काळजी वाटायची की, तिला तिच्याबरोबरीच्या मैत्रिणी नाहीत म्हणन एकटं वाटत असेल पण त्यांच्याकडे काम करणाऱ्यांची, विशेषकरून बायकांची सोबत तिला आवडायची. त्या तिच्या अनुभवविश्वाच्या इतक्या बाहेर होत्या, की त्यांची सुख दु:खं, त्यांचे प्रश्न, त्यांच्या श्रद्धा सगळंच तिच्यापेक्षा वेगळं होतं. जीवनापासून त्या फार थोड्याची अपेक्षा करीत, आणि बरेचदा ते थोडकंसुद्धा त्यांना लाभत नसे, तरी त्या हसतमुखाने आला दिवस पार पाडीत. त्यांच्या मनात जे काही असेल ते सगळं स्पष्ट वाचता यायचं, अगदी त्यांचा खोटेपणासुद्धा, कारण त्यालाही एक ठराविक रीत होती.
 राम म्हणायचा, "एका ठराविक मर्यादेपर्यंत त्यांच्याशी सलगी ठीक आहे, पण त्यामुळे त्या तुझ्याकडून नको ते फायदे उपटत नाहीत ना ते बघ. तुला वाटतं तितक्या त्या सरळ आणि भोळया मुळीच नाहीत. तू मऊ आहेस असं एकदा त्यांना वाटलं की त्या कोपरानं खणायला सुरुवात करतील. कुठे उचल माग, नाहीतर आजारी असताना कामावर ये आणि गुपचुप कोपऱ्यात झोपून रहा, असल्या गमजा सुरू होतील. मग मात्र त्यांच्याशी कडकपणे वागणं तुला शक्य होणार नाही."
 " त्यांना असा माझा फायदा घेऊ द्यायला मी काही दूधखुळी नाहीये."
 पण त्याचं थोडंफार बरोबर होतं हे तिला कबूल करावं लागलं. नियमावर बोट ठेवल्यामुळे एखादीचे हाल होणार आहेत हे दिसत असलं की ते कठीण जायचं. एक बाई एक दिवस लहान मूल बरोबर घेऊन आली. त्याला प्रोसेसिंग शेडच्या बाहेर झोपवलं. आणि मग ती वरच्यावर त्याला पाजण्यसाठी बाहेर जायला लागली.
 ज्योती रागावली तेव्हा ती म्हणाली, 'बाई, पोर लई आजारी हाय. सारखं रडतं. जरा पाजलं की तेवढ्यापुरतं गप बसतं. जास्त वेळ नाही जात मी बाहेर. नुसतं पाजण्यापुरतं. तेवढा वेळ भरून काढीन मी जादा काम करून."
  ज्योतीनं मान हलवली. " ते चालायचं नाही पुष्पाबाई. पोर आजारी असलं तर थोरल्या मुलीला त्याच्यापाशी बसायला सांगा, नाहीतर मग तुम्ही घरी रहा."
 ज्योतीला माहिती होतं की त्यांची थोरली मुलगीसुद्धा कामाला जायची. नवरा दारू पिऊन पडायचा. थोरला एक मुलगा होता तो लहर लागली तर काम करायचा, नाहीतर बसून खायचा. दोन शाळकरी मुलं होती. आई न मुलीच्या मिळकतीवर घर चाललं होतं. त्यांच्यातल्या एकीनं घरी रहायचं थोडे दिवस म्हणजे उपासमारीचीच पाळी. पण तरी कामातनं मधेच इतक्यांदा बाहेर जायची तिला परवानगी देणं शक्यच नव्हतं. ती मधेमधे नाहीशी झाल्यामुळे कामाची लय बिघडून सगळ्यांचीच कार्यक्षमता कमी होत होती. शिवाय तिला परवानगी दिली की इतरांना नाही म्हणणं शक्य झालं नसतं. अडचणी सगळ्यांच्याच होत्या. पण त्यांचा कामावर परिणाम होऊ देऊन चालण्यासारखं नव्हतं. मग लवकरच ज्योती दोन निरनिराळ्या पातळ्यांवर जगायला शिकली. एक वैयक्तिक पातळी, जिथे ती बायांशी बोलायची, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायची, त्यांना शक्य तेवढी मदत करायची. दुसऱ्या पातळीवर ती फक्त धंद्याच्या दृष्टीने विचार करायची. इथे फक्त कार्यक्षमता आणि नफ्याचं प्रमाण एवढेच निकष होते. ही तारेवरची कसरतच होती. पण तरी रामसारखं ती वागू शकत नव्हती. तिच्या पद्धतीने काम करण्याचा एक परिणाम म्हणजे तिनं शिस्त लावण्यासाठी पाऊल उचललं की, त्या बाया चिडायच्या आणि आपला राग तिला जाणवेल अशा तऱ्हेने व्यक्त करायच्या. पण मालक-नोकर संबंधातली एक अटळ बाब म्हणून ते ती पचवायला शिकली. एकूण तिच्या नव्या आयुष्यात ती इतकी रमली होती की, हे छोटंसं शल्य तिला फार वेळ खुपत नसे.
 तिला सगळ्यात जर कशाचा आनंद होत असला तर तो म्हणजे तिचं काम आणि वैयक्तिक आयुष्य ज्या तऱ्हेने एकमेकांत गुंफलं गेलं होतं त्याचा. तिचं आयुष्य वेगवेगळ्या एकमेकांशी काही संबंध नसलेल्या पुडांत विभागलं गेलं नव्हतं. त्याचे निरनिराळे भाग एकमेकांत सुरेख मिसळून त्यांचा एकत्रित प्रवाह झाला होता. घर, शेत, बियाणाचा धंदा ह्यांत इकडून तिकडे करताना दुभाजक ओलांडल्याचा प्रत्यय तिला येत नव्हता. आणि अर्थात हया सगळ्या सूत्रांच्या केंद्रस्थानी राम होता. त्याला स्वतःला कामाचा प्रचंड उत्साह आणि उरक होताच, पण इतरांनाही त्याच्याकडून अथक परिश्रमाची प्रेरणा मिळत असे. त्याच्याबरोबर काम करताना ज्योतीला कधी दमल्याची, कंटाळल्याची जाणीव होत नसे.
 कधी राम म्हणायचा, " कधीतरी तुला सुट्टी द्यायला पाहिजे खरं म्हणजे. मी म्हणजे अगदी गुलामासारखं राबवतो तुला. चांगल्या मोठ्या शहरातनं ह्या खेड्यात तुला आणून टाकलं न त्याची भरपाई म्हणून काय दिलं, तर सारखं काम काम काम."
 " पण मला काम करायला आवडतं, राम."
 " खरंच आवडतं का? नाहीतर एक दिवस तुला जाग येईल, कसलं हे कंटाळवाणं आयुष्य असं वाटेल, नि जाशील पळून."
 " कुठे पळून जाईन, उदाहरणार्थ ? " हे तिनं मजेमजेनंच विचारलं. आपण एक महत्त्वाचा प्रश्न उभा करतोय, असा विचार तिच्या मनाला शिवलाही नाही आपण रामला सोडलं तर आपल्याला जायला ठिकाण नाही आणि करायला काम नाही हे तिनं नकळत गृहीतच धरलं होतं. लग्न केलं तेव्हा हा माणूस, हे घर, हे कार्यक्षेत्र सगळं एकत्र तिच्या झोळीत पडलं होतं. आणि आता रामला सोडायचं म्हणजे बाकी सगळंही तिला सोडावं लागणार होतं. हे एकत्र बांधलेलं गाठोडं आहे, घ्यायचं तर सबंध उचल नाहीतर सगळंच ठेवून चालती हो. हे खरं म्हणजे किती अन्याय्य होतं.
 तिच्या मनात आलं, आयुष्यात बदल का घडतात? पुष्कळ कारणांमुळे, पण मुख्य म्हणजे ते कुणाला तरी हवे असतात म्हणून. रामला हे बदल घडायला हवे होते. जिथे ती सुखासमाधानाने राहू शकत होती, तो त्याच्या दृष्टीने फक्त शिडीचा पहिला पायटा होता. अर्थात तो महत्त्वाकांक्षी आहे याची तिला नेहमीच जाणीव होती. तो नेहमी वाढ, विस्तार, नवनव्या योजना ह्याबद्दल बोलायचा, आणि तिला त्याच्या गप्पा ऐकायला आवडायचही. पण तो जी स्वप्नं पहात होता ती अगदी उद्याच प्रत्यक्षात उतरतील अशी तिची कल्पना नव्हती. त्यांची कंपनी वाढत होती, नवी क्षितिजं काबीज करीत होती, तेव्हासुद्धा या प्रवासाचा शेवटचा टप्पा कुठला आणि तिथे पोचण्याचा नेमका अर्थ काय याची तिला जाणीव नव्हती.
 त्यांच्या कंपनीची उलाढाल वेगाने वाढत होती, त्यांच्या नोकरवर्गात सारखी भर पडत होती, ते नवनव्या जातींच्या बियाणांचं उत्पादन आणि विक्री करीत होते, कंपनीत संशोधन विभाग सुरू झाला होता. सगळं क्रमाक्रमानं चाललं होतं, आणि ते घडत असताना त्याला हातभार लावायला ज्योतीला हुरूप वाटत होता. रामइतक्याच हिरिरीने ती स्वतःला त्यात झोकून देत होती. तरीसुद्धा आज तिला वाटत होतं की नेमकं कुठं जातोयत ह्याचं आकलन होण्यापूर्वीच आपण इथपर्यंत येऊन ठेपलोत.
 आणि आता इथून पुढचा मार्ग कोणता ? कुठे जाणार होती ती ? काहीतरी नोकरी करायची हे ती गृहीत धरूनच चालली होती. तशी पोटासाठी मिळविण्याची तिला गरज नव्हती, पण शरीराला आणि बुद्धीला काहीतरी खाद्य हवंच. घरी बसायचं आणि मग केवळ वेळ काढण्यासाठी करायला काहीबाही शोधायचं हे तिला करायचं नव्हतं. पण नोकरी मिळवायची कुठून ? तशा पुण्यात आता तिच्या पुष्कळ ओळखी होत्या. पण मित्रमंडळींकडे नोकरीची भीक मागण्याची कल्पना तिला कशीशीच वाटली. नोकरी मागायला गेल्यावर ती रामपासून वेगळी झाल्याचं त्यांना कळणारच. मग त्यांना बसलेला धक्का, तिच्यावर अटळपणे होणारा प्रश्नांचा भडिमार, राम आणि ती ह्यांच्यात समेट घडवून आणण्याचे प्रयत्न हया सगळ्याला तोंड देणं अशक्यच होतं.
 तिला मंगलची आठवण झाली. मंगलच्या नवऱ्यानं तिला टाकलं तेव्हा ज्योती म्हणाली होती, " बिच्चारी! " राम म्हणाला होता, " तुला वाटतं एवढं काही मोठं संकट नाही ते. इतक्या बायकांवर असा प्रसंग येतो की त्याचा फारसा बाऊ न करता त्या तो स्वीकारतात."
 बाराएक वर्षांची असल्यापासून मंगल त्यांच्या मळयात कामाला यायची. ज्योती शिरगावला आल्यावर थोड्याच अवधीत मंगलचं लग्न झालं. सहा महिन्यांनी ती पुन्हा कामाला यायला लागली. ज्योतीनं चौकशी केली तेव्हा तिला कळलं की मंगल आजारी आईला भेटायला म्हणून थोडे दिवस माहेरी आलीय. काही दिवसांनी ती येईनाशी झाली, मग पुन्हा दिसली. शेवटी तिला सासरी नांदवणारच नाहीत असं निष्पन्न झालं. मंगल आपली पूर्वीसारखी इतर बायांबरोबर खुरपं घेऊन कामाला नियमित यायला लागली. ज्योतीला आता वाटलं, जो प्रसंग माझ्या आयुष्यात इतकी उलथापालथ घडवून आणतोय, तो तिनं किती सहज पचवलान.



 ज्योती दचकून जागी झाली. तिला वाटलं की हा कर्णकर्कश गोंगाट आपल्या खोलीतच चालला असला पाहिजे. थोड्या वेळाने तिला जाणवलं की आवाज गावातनच येत होता. लग्नबिग्न असणार. आपण काहीतरी साजरं करतोयत हे पहाटेपासून लाउडस्पीकर लावून जगाला ओरडून कशाला सांगावं लागतं हे तिला कधीच कळलं नव्हतं. बहुसंख्य लोकांसारखंच तक्रार न करता ती हा आवाज सहन करायची. तिनं मनात खूणगाठ बांधलेली होती की असं शांततेवर आक्रमण फक्त अडाणी, गावंढळ, असंस्कृत लोकच करतात. आणि मग रामने अप्रत्यक्षपणे का होईना, तिला अशांच्या पंक्तीत नेऊन बसवलं.
 त्या पहाटे ती जागी झाली ती बिसमिल्लाखानच्या सनईचे सूर ऐकून. त्यांच्या बियाणाच्या प्रॉसेसिंग प्लॅंटचं उद्घाटन होतं त्या दिवशी. आणि जागी झाल्यावर ज्योतीनं मनातल्या मनात कुरकूर केली ती केवळ तिच्या कानावर झालेल्या तीव्र आघाताबद्दल नसून त्या दिवसाला तोंड देण्याबद्दलही होती.
 तिनं खिडकीतनं बाहेर पाहिलं. जमीन रात्रीच्या पावसाने ओली होती, पण पश्चिमेकडचं आकाश नितळ निळसर राखी होतं आणि त्यात प्रकाशणाऱ्या पिवळ्याधमक चंद्राची किरणं अंगणातल्या ओल्या गुळगुळीत फरशीवर पडल्याने फरशी चकाकत होती.
 ती पुष्कळदा अशीच फटफटल्याबरोबर उठायची नि मळयात जायची. कुठेतरी पाणी चालू असायचं. ती थांबून थोडा वेळ भरणं बघायची. लहान मूल दुधाची बाटली रिती करताना पहाण्याचं जे समाधान असतं तेच तिला जमीन पाणी पिताना बघताना वाटे. मग ती दाऱ्यावरच्या गड्याशी चार शब्द बोलायची भेंडीची उगवण कशी झालीय, पुन्हा पाऊस कधी येणार, असलं काही तरी. बहुतेक रामचे वडील एव्हाना उठून बाहेर आलेले असत. ते राउंड घ्यायचे आणि ती त्यांच्याबरोबर फिरत आज काय कामं करायची ह्याबद्दल त्यांचा आराखडा ऐकायची. तिने प्रश्न विचारले तर ते मूर्ख आहेत असं किंचितही भासू न देता ते त्यांची उत्तरं देत. कामाचा दिवस सुरू व्हायच्या आत सकाळच्या शांत प्रहरी सासऱ्याबरोबर घालवलेला हा वेळ तिच्या फार आवडीचा होता.
 त्यांचं आणि रामचं नातं नेमकं काय होतं ह्याचा तिला कधी थांग लागला नाही. विशेष जवळचं नव्हतं, पण त्यात काही कटुता वगैरे तिला जाणवली नव्हती. ते कामापुरताच एकमेकांशी संबंध ठेवायचे आणि कामापुरतंच बोलायचे. त्याव्यतिरिक्त काही गप्पा मारलेल्या तिनं ऐकल्या नाहीत.
 आज तिला बागेत जायला वेळ नव्हता. लवकर तयारी व्हायला हवी होती. राम नेहमीसारखा अंथरुणात लोळत न पडता तिच्याआधीच उठला होता. आज त्याचा मोठा महत्त्वाचा दिवस होता. पुढे तो जे यशाचं शिखर गाठणार होता त्याची नांदी होती. सगळं नीट होईल ना, की कुठेतरी काही बिनसेल ह्याचा ताण गेले काही दिवस त्याच्या मनावर होता. पुढे पुढे असल्या समारंभाचं आयोजन करणं हा त्याच्या हातचा मळ झाला, पण हा त्याचा पहिलाच समारंभ होता. आणि तिला माहीत होतं की हया बाबतीत तिची कितीही नाखुषी असली तरी ती त्याच्या खांद्याला खांदा लावून प्रसंग साजरा करण्यासाठी पडेल ती मदत करणार होती.
 रामने बियाणावर प्रक्रिया करण्याच्या कारखान्याचा विषय प्रथम काढला तेव्हाच ती बिचकली होती. त्याच्याप्रमाणे तिलाही आपला धंदा वाढायला पाहिजे हे पटत होतं आणि त्याबरोबर येणारी आव्हानं ती हसत स्वीकारीत होती. पण ही एकदमच मोठी उडी होती. अर्थात त्यात धोकाही पत्करावा लागणार होता. डोक्यावर कर्जाचा बोजा पडणार होता.
 ती म्हणाली होती, " धंदा वाढलाय तेव्हा पाहिजे तितकं बियाणं हातानं प्रक्रिया करून तयार होणार नाही हे उघड आहे. पण यांत्रिकीकरण हळूहळू नाही का करता येणार? सगळी यंत्रं एकदम घेण्यापेक्षा एखादं एखादं घ्यावं असं मला तरी वाटतं."
 राम म्हणाला, "तसं केलं तर यांत्रिकीकरणाचा उद्देशच विफल होईल. आता असं बघ, समजा आपण फक्त बियाणं साफ करण्याचं यंत्र घेतलं, तर त्यातनं निघणारं बी औषध लावून पिशव्यांत भरण्यासाठी आपल्याला सैन्यच उभं करावं लागेल. म्हणजे लेबर अवाच्या सवा वाढणार. नाहीतर मग ते यंत्र पूर्ण क्षमतेपेक्षा फारच कमी वेळ चालवावं लागेल. म्हणजे ते परवडणार नाही कारण त्याची किंमत भरून निघणार नाही. शेवटी सगळं यांत्रिकीकरण एकदम करणंच सर्वात स्वस्त पडेल."
 " ते खरं. तरी पण एकदम इतकं थोरलं कुणाचं तरी कर्ज काढायचं म्हणजे माझी छातीच दडपते.”
  "कुणाचं तरी नाही, बँकेचं. बँकांचं कामच आहे ते. काही उपकार करीत नाहीत आपल्यावर. मग तू कॉमर्स कॉलेजात काय शिकलीस?"
 " ते पुस्तकातलं ज्ञान पुस्तकात ठीक आहे रे, पण खऱ्या आयुष्यात कितीतरी गोष्टी अपेक्षेविरुद्ध जाऊ शकतात. कदाचित यंत्रं नीटपणे चालणार नाहीत, वरच्यावर बिघडतील. मग त्यांची दुरुस्ती म्हणजे पुन्हा खर्च आला. शिवाय ती दुरुस्तीसाठी बंद राहिली म्हणजे काम ठप्प. म्हणजे प्रॉसेसिंगचा खर्च वाढत जाणार. मग पुन्हा विक्रीचा प्रश्न आहे. आपण तयार केलेलं जवळजवळ सगळं बियाणं जर विकलं नाही तर बँकेचे हप्ते भरणं जड जाईल."
 राम हसत सुटला. "बास, बास. तू हे असं आणखी थोडा वेळ चालू ठेवलंस तर आपल्यावर भयंकर संकट कोसळणार आहे अशी माझीसुद्धा खात्री पटेल. तू त्या विहिरीत डोकावून ओक्साबोक्शी रडणाऱ्या बाईसारखी आहेस. तिला विचारलं, बाई, काय झालं तुला ? का रडतेस ? तर ही म्हणाली, उद्या माझं लग्न होईल, मग मला मूल होईल, नि ते मूल रांगत रांगत इथपर्यंत आलं तर ह्या विहिरीत पडेल. म्हणून मी रडत्येय. ज्योती, तू पैशाच्या बाबतीत तुझी मध्यमवर्गीय मनोवृत्ती सोडून दे. धंदा करायचा म्हणजे प्रथम आत्मविश्वास पाहिजे. धोका पत्करायची धमक पाहिजे. धोके पत्करल्याशिवाय मोठं होता येत नाही. आहे तेवढा धंदा रुटुखुटु चालवत बसण्यासाठी मी ह्यात पडलो नाही. मला खूप मोठं व्हायचंय. सगळ्यांना मागे टाकायचंय."
  तो असं बोलायला लागला की आपल्या भेदरटपणाची तिला लाज वाटायची. आपण त्याच्या बरोबरीने वाटचाल करू शकत नाही, मागे पडतोय असं वाटायचं.
  त्यांचं हे बोलणं झाल्यावरही तिच्या मनावरचं दडपण कायमच राहिलं, पण ठीक आहे, इतक्यात काही होत नाही, अजून वेळ आहे असं म्हणून तिनं ते झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात इमारत उभी राहून त्यात यंत्रं बसवण्याचं वगैरे काम वर्षाच्या आत पुरं झालं. आणि मग रामने त्याचे उद्घाटन समारंभाचे बेत आणि त्यावर करायच्या खर्चाचा आकडा सांगितला तेव्हा तिला आणखी एक धक्का बसला.
 ती म्हणाली, " एवढा थोरला खर्च उद्घाटनावर करायच्या पेक्षा त्याच पैशांनी कर्जफेड करायला सुरुवात करता येईल की ."
 " बँकेला हप्ता लगेच मिळण्यापेक्षा प्रसिद्धीची जास्त हाव आहे, ज्योती. ते खर्चाचा थोडा वाटाही उचलणार आहेत. आम्ही हे कर्ज देऊन समाजाचं केवढं भलं करतो आहोत असा डांगोरा पिटायचाय ना त्यांना. आणि अर्थात जेवढी जमेल तेवढी प्रसिद्धी आपल्यालाही हवीच आहे, पुढच्या विक्रीच्या दृष्टीनं."
 राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं हे ऐकून तिचे डोळे विस्फारले.
 " ते आमंत्रण स्वीकारतील का पण ?"
 " अर्थात स्वीकारतील. राजकारण्यांना तरी काय हवं असतं? पेपरात नाव आलं म्हणजे झालं."
 त्यानं मंत्र्यांबद्दल इतकं तुच्छतेनं बोलावं नि तरीसुद्धा त्यांना कारखान्याचं उद्घाटन करायला बोलवावं हे ज्योतीला खटकलं. मंत्र्यांचा पुतण्या म्हणे त्याच्याबरोबर कॉलेजमध्ये होता. तसा तो खास मित्र वगैरे नव्हता, पण चुलत्याकडे वशिला लावण्यासाठी त्याचा पत्ता काढून रामने मुद्दाम ओळख उकरून काढली होती हेही तिला फारसं आवडलं नव्हतं. पुढे रामला असं करताना तिनं पुष्कळ वेळा पाहिलं होतं. त्याच्या मनात छोटया छोटया कप्प्यांचं एक मोठं थोरलं कपाट होतं. त्या कप्प्यांतून तो निरनिराळया तऱ्हेची माहिती व्यवस्थित ठेवून देत असे. मग कधी कशाचा किंवा कुणाचा नेमका उपयोग होईल, ते हेरून ती माहिती तो वापरायचा. यासाठी अतिशय तल्लख बुद्धीची गरज असते आणि ती रामकडे निर्विवादपणे होती. तिचा उपयोग करून त्याने वेळोवेळी काहीतरी घबाड पदरात पाडून घेतलं होतं किंवा प्रतिस्पर्ध्यावर मात केली होती. असं करण्यात गैर काही नाही, किंबहुना व्यवसायात यश मिळवायचं म्हणजे सामान्य नीतिमत्तेच्या कल्पना धरून बसण्यात हशील नसतं हे ज्योतीला तात्त्विक पातळीवर पटत होतं. तरी पण आपल्या गरजेप्रमाणे माणसांचा उपयोग करून घेणं हे ती व्यवहारात कधीही स्वीकारू शकली नाही.
 उद्घाटन समारंभाच्या बाबतीत रामशी तिचे आणखीही मतभेद होते. एक म्हणजे लाउडस्पीकर लावून दिवसभर गाणी वाजवायची हा प्रकार तिला पसंत नव्हता. पाहुण्यांना चहाफराळाचं द्यायला पुण्याहून खास केटरर्स बोलवायचे म्हणजे तिच्या मते उधळपट्टीची परिसीमाच होती. पण तिला सगळ्यात धक्का बसला म्हणजे वार्ताहरांना ओली पार्टी देण्याच्या बेताने. आधी ती ज्या वातावरणात वाढली होती त्यात पिणंबिणं तर लांबच राहिलं, पण दारू ह्या विषयावर बोललंही जात नसे. दारू हा सभ्य लोकांचा प्रांत नाही अशी ठाम कल्पना.
 राम म्हणाला, " मलाही ते विशेष पसंत आहे असं नाही, पण बातमी छापून यायला हवी असली तर करावं लागतं."
 " त्यांनी तुला असं स्पष्ट सांगितलं?"
 " ज्याला मी वार्ताहरांशी संपर्क साधायला सांगितलं होतं तो तसं म्हणाला. तो म्हणाला त्यांची तशी अपेक्षा असते. आणि ती पुरी झाली नाही तर ते बातमी दडपून तरी टाकतात नाही तर दडपून टाकण्याएवढी क्षुल्लक वाटली नाही तर कुठल्या तरी मागल्या पानावर लक्षातसुद्धा येणार नाही अशा बेतानं दोन ओळींत छापतात."
 " माझा नाही विश्वास बसत."
  " विश्वास ठेवावाच लागेल तुला. तू असं बघ, पेपरमधे ठराविकच जागा असते, आणि तिथे छापण्यासाठी हजारो बातम्यांची अहमहमिका असली पाहिजे. तेव्हा एक विशिष्ट बातमी देण्यात बातमीदाराला काहीतरी स्वारस्य वाटलं पाहिजे.”
  " म्हणजे आपण पेपरमधे जी बातमी वाचतो त्या प्रत्येकीसाठी कुणातरी बातमीदाराला कुणीतरी दारू पाजलेली असते ? "
 " अगदी असंच नाही. काही बातम्या इतक्या महत्त्वाच्या असतात की त्या विनासायास छापल्या जातात."
 " मग ही त्यातलीच नाही का ? "
  " असं तुला वाटतं. सगळ्यांनाच वाटेल असं नाही."
  शेवटी प्रत्येक बाबतीत तिचे आक्षेप खोडून काढून रामन आपल्या मनासारखंच केलं. पुढे पुढे दारू पिण्यात नैतिक अधःपतन आहे ही कल्पना सोडून देऊन मेजवानीच्या वेळी पाहुण्यांना दारू द्यायला एवढंच नव्हे तर एखादा ग्लास प्यायलासुद्धा ज्योती सरावली तरीसुद्धा वार्ताहरांना ओली पार्टी देणं हा प्रकार तिला, खटकतच राहिला.
 रामने समारंभाच्या सबंध दिवसाची योजना इतकी चोख बनवली होती की सगळं एखाद्या वंगण केलेल्या यंत्राप्रमाणे सुरळीत पार पडलं. वीज बोर्डानेसुद्धा सहकार्य दिलं आणि मंत्र्यांनी बटन दाबल्याबरोबर वीज बंद न पडता सगळी यंत्रं व्यवस्थित चालू झाली.
 मंत्र्यांनी अर्थातच अपेक्षेप्रमाणे आपल्या देशात शेतीचं किती महत्त्व आहे, उत्तम शेतीचा पाया खात्रीचे बियाणे कसा आहे, आणि रामसारख्या उद्योजकांची देशाला कशी गरज आहे हे आपल्या भाषणात सांगितलं. आपल्या आभारप्रदर्शनाच्या भाषणात राम म्हणाला की बियाणावर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यामुळे शेतकऱ्यांना जास्त चांगली सेवा देता येईल ह्याचाच त्याला मुख्यत्वाने आनंद झाला होता. रामला तिने कधी 'जगाच्या कल्याणा' वगैरे मुखवटे घालताना पाहिलं नव्हतं. तिनं जरा आश्चर्यानेच त्याच्याकडे बघितलं पण त्याच्या चेहऱ्यावर तिला संपूर्ण गंभीरतेखेरीज दुसरा कुठलाच भाव दिसला नाही. आणखी त्याने तिचे पण आभार मानून तिच्या मदतीशिवाय हे काहीच शक्य झालं नसतं असं सांगितलं.
 त्या रात्री तिला मिठीत घेऊन तो म्हणाला, " चला, आपली वाटचाल तर सुरू झाली."
 " वाटचाल ? "
 "हं. राज्यातली सगळ्यात मोठी बियाणांची कंपनी होण्याच्या दिशेनं."
 "श् अशी प्रौढी मिरवणं अशुभ असतं."
  " तुझा असल्या मूर्ख समजुतींवर विश्वास आहे ?"
  " नाही खरं म्हणजे, नाही, तरी पण-"
 " तरी पण बिरी पण काही नाही. बरं, ते जाऊ दे. आता हा मुहूर्त साधून आपल्या मुलाच्या जन्माची तयारी करायला हरकत नाही. म्हणजे तो जन्मेपर्यंत आपला नवा कारखाना चांगला मार्गाला लागला असेल."
 " आपलं मूल मुलगाच असेल असं का तू धरून चालतोस ?"
  " कारण माझं तसंच प्लॅनिंग आहे."
 तिला हसू फुटलं. "तू कुटुंबनियोजनाचा जनकच आहेस म्हणायचा."
  त्यानं तिच्या ओठावर ओठ टेकवून तिचं तोंड बंद केलं. त्याच्या प्रेमाचा आविष्कार त्या दिवशी तिला विशेषच मृदू, स्नेहमय वाटला. त्यांच्यातल्या शारीर प्रेमाच्या परिपूर्णतेबद्दल तिला नेहमीच आश्चर्यानंद वाटायचा. लग्न झालं तेव्हा ती हया बाबतीत बुजरी, संकोचलेली होती. स्त्री-पुरुष संबंधाविषयी विचार करताना तिच्या कल्पनेची भरारी प्रेमभरा स्पर्श, मिठी, चुंबन यापलिकडे कधी गेली नव्हती. संभोगाविषयी थोडीफार माहिती होती तरी ती तिनं मनाच्या कोपऱ्यात ठेवून दिली होती. असल्या गोष्टी माझ्या आयुष्यात बहुतेक येतील, येणारच हे तिनं स्वतःशी कधी कबूल केलं नव्हतं. आणि मग जेव्हा तिचं अंग रामच्या किमयेनं फुललं, पेटून उठलं आणि रामला सर्वस्वानिशी प्रतिसाद देऊ लागलं तेव्हा तिला स्वतःची शरम वाटायला लागली. मग हळूहळू हे सगळं घडणं उचित आहे, सुंदर आहे हयाचा तिनं स्वीकार केला.
  " ज्योती, तुला मुलगी जास्त आवडेल ?"
  " मुलगा मुलगी अमुकच पाहिजे असा माझा काही हट्ट नाही."
  " माझाही नाही."
  " तरीपण तुला मुलगा जास्त आवडेल."
 "अं-हो."
  ती हसली पण तिला जरासं हिरमोडल्यासारखं वाटलं.
 ती म्हणाली, " राम."
  "अं?"
 " तू तुझ्या भाषणात माझा उल्लेख करायला नको होतास. मला अगदी कानकोंडं झालं. मी एवढं काय केलंय?"
 " काय केलं नाहीस? मी बोललो ते अगदी खरं आहे. तुझ्याशिवाय हे काहीच माझ्या हातनं झालं नसतं."
 " तू जर करायचं ठरवलं असतंस तर नक्की झालं असतं."
  " मग इतक्या वर्षांत का नाही झालं?"
  "तू अगदी मनापासून प्रयत्नच केला नसशील."
 " तसं काही नाही. त्यातली मेख अशी आहे की तुला माझ्यापेक्षा जास्त बुद्धी आहे."
 "हा निष्कर्ष तू कशावरून काढलास ? "
 " तुझं शिक्षण माझ्यापेक्षा जास्त झालेलं आहे."
 "तुला नक्की काय सिद्ध करायचंय मला कळत नाहीये, तेव्हा हा वाद आपण आता इथेच थांबवूया."
 काही वेळानं तो म्हणाला, “ झोपलीस, ज्योती ?"
 " अंहं."
  " मला एक कबुली द्यायचीय."
 " काय ? " तिने भीतभीतच विचारलं. पूर्वायुष्यात घडलेली काहीतरी गोष्ट त्याने सांगू नये अशी तिने मनोमन प्रार्थना केली. ज्या गोष्टीशी तिला काही देणंघेणं नव्हतं ती ऐकायची तिला काही इच्छा नव्हती.
 तो म्हणाला, "मी तुझा असा समज करून दिला की मी ग्रॅज्युएट आहे. पण मी फायनलला बसलोच नव्हतो. आईची तब्बेत एकदम बिघडली म्हणून मी घरी आलो. मग ती वारली नि मी परत कॉलेजला गेलोच नाही. शेतीचं काम बघायला सुरुवात केली, मग परत जाऊन परीक्षेला बसायचं काही महत्त्व वाटेनासं झालं."
 ज्योतीला जीव भांड्यात पडल्यासारखं झालं ती म्हणाली, " एवढंच ना ? "
 " एवढंच ना म्हणजे काय ? " आपल्या कबुलीजबाबाला तिनं इतकं क्षुल्लक ठरवावं याचा त्याला राग आला. " तुला काय वाटलं मी कशाची कबुली देणाराय म्हणून ?"
 " काहीतरी भयानक."
 " उदाहरणार्थ ?"
 " की तुझं दुसऱ्याच कुणावर प्रेम होतं पण तुझ्या बाबांना ती पसंत नव्हती म्हणन तू माझ्याशी लग्न केलंस."
 " बिनडोक आहेस. माझ्या मनात कुणाशी तरी लग्न करायचं असतं तर बाबांनी आकाशपाताळ एक केलं असतं तरी ते मला थांबवू शकले नसते एवढं तुला अजून कळलं नाही ? माझं तुला भेटण्याआधी कुणावरही प्रेम नव्हतं. तुझं होतं ?"
 “ नाही." एका लांबलांबच्या भावावर ती काही काळ मरत असे पण त्याचा आत्ता उल्लेख करायचं कारणच नव्हतं.
 " झालं तर. म्हणजे आपलं फक्त एकमेकांवरच प्रेम आहे. हो ना?"
 ती हसत हसत म्हणाली, " हे सगळं तू किती कोरडेपणानं एखादं भूमितीचं प्रमेय सिद्ध केल्यासारखं म्हणतोयस रे.”
 ह्या सगळ्यात तिला जे सांगायचं होतं ते राहूनच गेलं, की त्याच्या बुद्धीचा डिग्रीशी अर्थाअर्थी काही संबंध नाही म्हणून. बऱ्याच दिवसांनी अवचित तिला कळून आलं की त्याचा कबुलीजबाब खरा नव्हताच. एक तर घटनांचा क्रम त्याने दिल्याप्रमाणे नव्हता. फायनलला न बसण्याचा निर्णय घेऊन तो घरी आला त्याच्यानंतर किती तरी दिवसांनी त्याच्या आईचा शेवटचा आजार उद्भवला. आणि परीक्षेला बसलो असतो तर नक्की पास झालो असतो असं जे त्यानं सूचित केलं तेही बरोबर नव्हतं. खरं म्हणजे अभ्यासात त्याची म्हणावी तशी प्रगती नव्हतीच. आधीच्या एका वर्षी तो एकदा नापास झालेला होता. शेवटच्या परीक्षेची त्याची काही तयारी झालेली नव्हती. तो नापास होणार हे जवळजवळ ठरल्यातच जमा होतं. तेव्हा हात दाखवून अवलक्षण करून घेण्यापेक्षा परीक्षेला बसूच नये असं त्यानं ठरवलं.
 ज्योतीला दुःख झाल ते त्याने केलेल्या प्रतारणेचं. त्यानं कॉलेजची डिग्री मिळवली नव्हती ह्याचं तिला काही विशेष वाटल नाही. तिला नेहमीच वाटत राहिलं की अभ्यासात त्याची गती नसण्याचं कारण बुद्धीचा अभाव नसून इच्छाशक्तीचा अभाव हे होतं. बुद्धी नसती तर तो धंद्यात इतका यशस्वी कसा होऊ शकला असता? पण व्यवहारात यश मिळवणं वेगळं आणि वाचून, अभ्यास करून एखाद्या विषयावर प्रभुत्व मिळवणं वेगळं हे राम जाणून होता. बरं, एका बाबतीत माझं श्रेष्ठत्व सिद्ध झालय, बाकी सगळं मरेना का असं म्हणायलाही तो तयार नव्हता. पुढे त्याचा आपल्यापेक्षा जास्त शिकलेल्या, अभ्यासात चमक दाखवलेल्या लोकांशी संबंध आला तेव्हा तर आपल्या अडाणीपणाबद्दल त्याचं मन त्याला जास्तच खात राहिलं. एकदा ज्योती त्याला म्हणाली, " तू बाहेरून परीक्षेला बसून कॉलेज डिग्री का नाही घेत?".
  ' आत्ता हया वयात ?"
 " वयाचा काय संबंध आहे त्याच्याशी? माणसं कुठल्याही वयात अभ्यास करू शकतात."
 " वेळ कुठाय मला ? आणि मुख्य म्हणजे मला डिग्री आहे की नाही ह्याला काय एवढं महत्त्व आहे ?"




 धंद्याचा व्याप वाढला त्यात आपल्याला नेमकं काय खुपतंय असा तिने बरेचदा विचार केला होता. धंद्याच्या वाढलेल्या आकारमानामुळे आपलं स्थान त्यात नगण्य राहतं हे खुपत होतं ? तिचं स्थान मुळीच नगण्य नाही, फार महत्त्वाचं आहे असं रामने तिला कितीदा तरी बोलून दाखवलं होतं. तिला सुद्धा ते पटत नव्हतं असं नाही, तरी पण धंद्याच्या सर्व निरनिराळ्या अंगांशी आपला पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष संबंध येत नाही हे तिला डाचत राहिलं.
 राम एकदा हसत तिला म्हणाला होता, " तुझ्या त्या डझनभर बाया हातानं बी निवडतायत अन् तू त्यांच्यावर मुकादमी करत्ययस असंच तुला सगळ्यात आवडेल ना?"
 एकदा जरा गंभीरपणे धंद्याची सारखी वाढ होत का राहिला पाहिजे हे त्याने तिला समजावून सांगितलं होतं. कामगारांचे पगार वाढवीत न्यावे लागतात, त्यांना पगाराव्यतिरिक्त इतर सवलती, बोनस द्यावे लागतात. त्याकरता कंपनीचा नफा वाढता असावा लागतो. म्हणजेच उलाढालीचं प्रमाण वाढत जावं लागतं. आपण एका फिरत्या चक्रावर उभे आहोत आणि त्याच्यावरनं खाली उतरण्याची काही शक्यता नाही असं ज्योतीला वाटलं. धंद्याच्या वाढत्या व्यापामुळे तिला जरा काळजीही वाटायची, कारण आता ते जास्त जास्त कामगारांवर अवलंबून होते, आणि ते कामगार लहरीनुसार कंपनीच्या कामाला खीळ घालू शकत होते. जास्त उलाढालीमुळे जास्त पैसा मिळण्याची शक्यता जशी वाढली होती तशी एकदम मोठं नुकसान होण्याचीसुद्धा.
 रामने बियाण्यावर संपूर्ण प्रक्रिया करण्याचा कारखाना टाकण्यात खूप दूरदर्शित्व दाखवलं होतं. ते साठ ते सत्तरचं दशक होतं. बियाण्याचा धंदा खूप तेजीत होता, नुकताच आपलेपणात येत होता. हायब्रीड जाती त्यावेळी नुकत्याच आल्या होत्या. काही शहाण्यांनी उपरोधाने म्हटल्याप्रमाणे, हायब्रीड ही बियाणं विकणाऱ्याची कामधेनूच. कारण शेतकऱ्याला आपलं स्वतःचं बी राखता येत नाही, दरवर्षी विकतच घ्यावं लागतं. ह्यातला उपरोध सोडला तरी उत्तम प्रतीचं बियाणं तयार करणं हे कोणाही सोम्यागोम्याचं काम नसून त्याला खास ज्ञान आणि तंत्राची आवश्यकता असते हे तत्त्व ह्या सुमाराला स्वीकारलं गेलं होतं. हे नवे वारे ओळखण्यात पुढाकार घेणाऱ्यांच्यात राम होता. त्याच्या बीज - प्रक्रिया कारखान्यामुळे त्याला सुरुवातीला आपल्या स्पर्धकांच्यावर मात करणं सहज शक्य झालं. ते त्याची बरोबरी करायला येईतो त्याची पुढला टप्पा गाठण्याची तयारी झाली होती.
 बियाणाच्या विक्रीचं प्रमाण वाढत गेलं तसतसं इतर शेतकऱ्यांकडून बी तयार करून घ्यावं लागलं. प्रथम फक्त ओळखीचे शेतकरी, मग त्यांना फायद्यात पडतं हे बघून इतर काही अशांनी बियाणाचे प्लॉट घ्यायला सुरुवात केली. पण एकतर हे प्लॉट जिकडेतिकडे विखुरलेले असल्यामुळे त्यांची देखरेख करणं खर्चाचं व्हायला लागलं. दुसरं म्हणजे शुद्ध बियाणासाठी बियाणाच्या प्लॉटपासून त्याच जातीच्या इतर पिकांचं अंतर ठराविक असणं जरूर असतं, ते ठेवणं कठीण जायला लागलं. एखाद्याचं पीक त्या अंतराच्या आत असेल तर ते फुलावर येण्याआधीच उपटून टाकण्यासाठी त्या माणसाला अवाच्या सवा नुकसानभरपाई द्यावी लागे. तरीही तो राजी झाला नाही तर मग सीड प्लॉटवर पाणी सोडावं लागे.
 ह्या सगळ्या अडचणींवर मात करायला रामने एक शक्कल काढली. एका सबंध गावालाच बीजोत्पादक बनवायचं. म्हणजे इतर पिकांच्या लुडबुडीचा प्रश्न नाही. आणि एकाच ठिकाणी बऱ्याच क्षेत्रावर बियाणाचं उत्पादन केलं म्हणजे तिथे एक सुपरवायझर कायमच ठेवून देणं परवडेल. तो तिथेच असला म्हणजे पिकाची देखभाल उत्तम होऊ शकेल. उत्पन्नही वाढेल. शिवाय बियाणाच्या जास्तीत जास्त शुद्धतेची हमी मिळेल. कंपनीतर्फे फाउंडेशनचे बियाणे, खते, कीटकनाशके वगैरे पुरवून मग खरेदी केलेल्या बियाणाच्या किमतीतून त्यांचे पैसे वळते करून घ्यायचे, म्हणजे शेतकऱ्याने नको तिथे काटकसर करून उत्पन्नात मार खाल्ला असं व्हायला नको.
 योजना छान होती, आणि शिरगावपासून पन्नासेक किलोमीटरवर बिरवाडी म्हणून एका गावातले दीडशे शेतकरी सहाशे एकर क्षेत्रावर बियाणाचे प्लॉट घ्यायला तयार झाले. दोन वर्षं सगळ सुरळीत चाललं नि मग एकदम एक दिवस योजना कोलमडला. कुणाचा तरी लोभ हे अपेक्षितच कारण. बातमी आणली रामन बिरवाडीला सुपरवायझर म्हणून नेमलेल्या कांबळेनं.
 तो रामच्या ऑफिसात आला तशी तो का आला ह्याचा चौकशीही न करता राम खेकसला, "तू आता इथे का ? मळणी संपून सगळं बी पोत्यांत सीलबंद झाल्याशिवाय तिथून हलू नको म्हणून सांगितलं होतं की नाही तुला?"
 कांबळेला आधीच रामची जबरदस्त भीती वाटायची. आता तर त्याची बोबडीच वळली. कसंबसं तत - पप करीत तो म्हणाला, " शेतकरी त्यांचं बी जिल्हा परिषदेला विकतायत.
 " त्यांचं बी नाही, माझं बी."
 कांबळेने आवंढा गिळून होकारार्थी मान हलवली.
 " असं कसं ते करू शकतात ?”
 “ जिल्हा परिषद त्यांना चार रुपये किलो देऊ करतेय.”
 " जिल्हा परिषद त्यांना काय देऊ करतेय ह्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. जिल्हा परिषद त्यांना शंभर रुपये देईल. पण त्यांनी माझ्याशी करार केला आहे. तो मोडून त्यांना दुसऱ्या कुणाला बी विकता येणार नाही."
 " ते म्हणतात झेड. पी. देतेय तेवढी किंमत दिल्याशिवाय ते बी आपल्याला देणार नाहीत. मी त्यांना सांगितलं आम्ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू म्हणून. पण ते म्हणतात काय करायचं ते करा. आम्ही बी देणार नाही."
 " यशवंतराव काय करतायत?"
 " ते म्हणतात गावकरी जिद्दीला पेटलेत, त्यांचं ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत."
 " त्यांना इकडे घेऊन ये. आत्ताच्या आत्ता मोटरसायकल घेऊन जा न त्यांना त्याच्यावर घालून घेऊन ये."
 "ठीक आहे, साहेब.”
 राम रागाने नुसता धुमसत होता.
  “साले हरामखोर! मी बघतो कसं माझं बी जिल्हा परिषदेला विकतात ते. कोर्टात खेचीन एकेकाला."
 ज्योती म्हणाली, " सबंध गावाला काही तू कोर्टात खेचू शकत नाहीस."
 "कोण म्हणतं ?"
 "जिल्हा परिषद म्हणेल आम्ही कंपल्सरी प्रोक्युरमेंट केली म्हणून. त्यांना तसा अधिकार आहे."
 "मी आव्हान देईन त्या अधिकाराला. त्यांना स्वत:ला बी तयार करायला शेकडो एकर जमीन पडलीय जिल्ह्यात. माझ्यासाठी तयार झालेलं बी घ्यायचं काही अडलंय का त्यांना ?"
  " सरकार म्हटलं म्हणजे ते काहीही करू शकतात."
 "सरकार जरी झालं तरी लोकशाहीत बेकायदा गोष्ट करू शकत नाही. मी कोर्टात जाऊन स्टे आणीन. मला बी मिळालं नाही तरी तेही विकू शकणार नाहीत असं मी पाहीन."
 " पण तसं झालं तर आपलं फाउंडेशन सीड, खतं ह्याचे पैसे आपल्याला कधीच वसूल करता येणार नाहीत."
 " ते मी वसूल करीनच. वसुलीसाठी जप्त्या आणवीन त्यांच्या घरादारांवर. म्हणजे चांगला धडा शिकतील."
 सरकारशी दोन हात करू पाहणं किंवा कोर्टाची पायरी चढणं हया गोष्टींची ज्योतीला मनापासून भीती होती. राम ह्याला उपहासाने तिची मध्यमवर्गीय मनोवृत्ती म्हणायचा. शहाणे असल्या गोष्टींच्या नादी लागत नाहीत. आपण बरे की आपलं काम बरं असं जगतात. त्यात आपल्यावर अन्याय झालाय असं वाटलच तरी भांडण्यात वेळ, पैसा खर्च करण्यापेक्षा अन्याय पचवून पुढे चालू लागतात. ह्याउलट राम ज्या संस्कृतीत वाढला होता त्यात जमिनीची दोन फूट रुंद पट्टी किंवा समाईक बांधावरचं एक झाड यांच्यावरून वर्षानुवर्ष कोर्टकचेऱ्या करण्यात किंवा एकमेकांचे गळे घोटण्यात माणसांना काही विशेष आहे असं वाटत नसे. तेव्हा तो अस्तन्या सारून लढायला सज्ज झाला.
 दुपारी यशवंतराव येऊन हजर झाले. पांढरं शुभ्र धोतर, पांढरा कडक इस्त्रीचा खादीचा सदरा, डोक्यावर तिरक्या ऐटीत बसवलेली गांधी टोपी, गोडबोल्या स्वभाव, किंचित लाचारीचं हसू. अजून फारसा उंचीवर न पोचलेला पण पोचण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा असलेला छोटया गावातला छोटा राजकारणी. पंचायत समितीचे सभासद आणि राम आणि बिरवाडीचे बीजोत्पादक शेतकरी ह्यांच्यातला दुवा. ते स्थानिक नेते असल्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून बियाणाचे प्लॉट घेणं त्यांच्या फायद्याचं आहे हे त्यांना पटवून देऊन त्यांच्याकडून करारावर सह्या घ्यायच्या हे काम त्यांनीच केलं. नंतरसुद्धा काही अडचण आली तर निवारायची, कशाबद्दल वाद निर्माण झाला तर मध्यस्थी करायची हे सगळं ते करीत. त्यासाठी कंपनीकडून त्यांना शेतकऱ्यांकडून खरीदलेल्या बियाणाच्या किलोमागे ठराविक कमिशन मिळत असे. त्याशिवाय शेतकऱ्यांकडून ते काही रक्कम घेतात की नाही याबद्दल राम चौकशी करीत नसे.
  ते ऑफिसात आले. " नमस्कार, साहेब. मला बोलावलं होतं? बोला, काय सेवा करू ?"
 "वेड पांघरणं बास झालं. तुम्हाला चांगलं माहीताय मी का बोलावलंय ते."
 " त्याचं असं आहे साहेब-"
  यशवंतरावांच्या रामशी बोलण्याच्या आवाजात, हे बाकीचे सगळे गावंढळ आहेत, पण तुम्ही न मी चार गावचं पाणी प्यालेलो आहोत, आपण एकमेकांना समजू शकतो, असं अध्याहृत असे. रामला त्याचा नेहमीच राग यायचा, कारण तो यशवंतरावांना आपल्याबरोबरीचं समजत नसे.
 तो त्यांचं वाक्य मधेच तोडीत म्हणाला, " मला कसल्याही सबबी ऐकायच्या नाहीयेत. मला एवढंच सांगा, तुम्ही लोक तुमचे करार पाळणार आहात की नाही ?"
  " मी त्यांना समजावायचा पुष्कळ प्रयत्न केला साहेब, पण ते काही ऐकून घ्यायला तयार नाहीत. शेवटी काय आहे, किलोमागे पन्नास पैसे म्हणजे त्यांना पुष्कळ वाटतात. ते लोक गरीब आहेत, साहेब."
 "काहीतरी बोलू नका. ते लोक गरीब वगैरे काही नाहीयेत. होते गरीब, पण आता नाहीयेत. का माहीताय ? कारण मी त्यांना खूप पैसा मिळवून दिलाय. बियाणाचं उत्तम पीक कसं काढायचं हे मी त्यांना शिकवलंय, आणि त्यांचं बी उत्तम भाव देऊन विकत घेतलंय. पूर्वी त्यांच्या जमिनीतून मिळायचं त्याच्या दसपट उत्पन्न मी त्यांना देतो. आणि आता त्यांनी माझा गळा कापला तर ते गरीब आहेत ह्या सबबीखाली तुम्ही त्याचं समर्थन करता? गरिबी तुम्हाला वाटेल ते गुन्हे करायची मुभा देते ? आणि हो. तुमच्या स्वत:च्या प्लॉटचं काय ? तुम्ही कुणाला विकताय बी ?"
 " मी गावाच्या मताबाहेर जाऊ शकत नाही, साहेब."
  " अर्थातच नाही," राम एकदम खालच्या पट्टीत म्हणाला. " तुम्ही त्यांच्याविरुद्ध कसं जाऊ शकाल ? तुम्ही त्यांच्यातलेच एक. तेव्हा तुम्ही त्यांच्याइतकेच लोभी आणि बेइमान असायला पाहिजे. बरं, मला एवढंच सांगा, त्यांचं बी तिकडे वळवण्यासाठी जिल्हा परिषद तुम्हाला किती देतेय?"
 यशवंतरावांचा चेहरा धक्का बसल्यासारखा झाला. “साहेब, असं कसं तुम्ही म्हणता ? मी असं करीन असं तुम्हाला वाटलं तरी कसं?" मग समजूतदार आवाजात ते म्हणाले," हे बघा साहेब, तुम्ही अगदी थोडा जरी दर वाढवून दिला ना, म्हणजे वीस किंवा पंचवीस पैसे, जास्त नाही, तरी मी लोकांची समजूत घालू शकेन.'
 " मी सौदेबाजी करणार नाही, यशवंतराव." रामचा आवाज चाबकाच्या फटकाऱ्यासारखा आला."मला जे म्हणायचं होतं ते सगळं तुम्हाला सांगितलंय, आता चर्चा करण्यासारखं काही उरल नाहीये. तुम्ही जाऊ शकता. आणि तुमच्या शेतकऱ्यांना सांगा की मी हे गप्प बसून ऐकून घेणार नाही. प्रत्येकाला कोर्टात खेचीन. तुम्ही धरून.”
 " ऐकून तर घ्या साहेब."
 " मी कामात आहे. मला बसून तुमच्याशी गप्पा मारायला वेळ नाहीये."
 शेवटी रामशी आणखी बोलण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नाही हे यशवंतरावांना कळून चुकलं आणि ते निघून गेले. रामने कांबळेला सांगितलं की असाच्या असा परत बिरवाडीला जा, आणि मळणीचं काम थांबवून आपला थ्रेशर परत घेऊन ये.
 ज्योती म्हणाली, "मला वाटतं त्यांना भाव थोडासा वाढवून द्यायला हवा होतास."
 " त्यांची ब्लॅकमेल मुकाट्यानं ऐकून घ्यायची ?"
 " त्यांच्या भल्यासाठी नाही, आपल्या धंद्याच्या दृष्टीनं ते बर झालं असतं."
 " त्यांनी बहुतेक ऐकलंच नसतं. ज्याला लोभच सुटलाय तो कमी पैसे घ्यायला का म्हणून तयार होईल ? ते कराराशी इमान राखणं वगैरे काही जाणत नाहीत. इतके दिवस त्यांनी करार पाळला कारण ते त्यांच्या फायद्याचं होतं. आता करार मोडून जास्त फायदा होतोय म्हणून ते करार मोडतायत. तेव्हा थोडासा भाव वाढवून ते काही ऐकणार नाहीत. शिवाय थोडा जरी भाव वाढवला तरी आपली मार्जिन खूप कमी होते. मग आपल्याला परवडणं कठीण आहे."
 "पण बी हातचं जाऊ दिलं तर आतापर्यंत पिकावर केलेला खर्चसुद्धा भरून निघणार नाही."
 " बघतो ना कसा निघत नाही."
  "पण मी म्हणते झेड.पी.ला इतका भाव देणं कसं परवडतं?"
 " का नाही परवडणार ? समजा ह्या व्यवहारात तोटा झाला तरी तो काही झेड.पी. च्या अधिकाऱ्यांच्या खिशातनं येत नाही."
 काही दिवसांनी यशवंतरावांनी ज्योतीला भेटून सांगितलं की रामने जर कोर्टात खेचण्याची भाषा सोडून दिली तर पिकावर झालेला खर्च शेतकरी देतील असं ते बघतील. पहिल्यांदा राम ऐकून घ्यायला तयार नव्हता. तो म्हणाला जरी खटला जिंकण्याची शक्यता कमी असली तरी त्या लोकांना कोर्टात तारखेसाठी खेटे घालावे लागतील, खर्च करावा लागेल. तेवढंही काही कमी नाही. शेवटी कसंबसं ज्योतीनं त्याला पटवलं की त्यात त्याचा स्वत:चाही वेळ आणि पैसे खर्च होतील, तेव्हा समझोता करणं जास्त शहाणपणाचं. त्यानं ऐकल्यावर तिने सुटकेचा निःश्वास टाकला.
 ती म्हणाली, " बघ, खूप लोकांवर अवलंबून राहिलं म्हणजे हे असं होतं."
 "पण मग काय करायचं? जरी समजा आपण विकतो तेवढं सगळं बियाणं तयार करण्यासाठी लागेल तेवढी जमीन घेण्याइतके पैसे आपल्याकडे असते तरी सीलिंगमुळे आपण घेऊ शकणार नाही. तेव्हा आपल्याला इतरांच्या जमिनीवर बी करावंचलागणार."
 " आपण धंदा जरा आटोपशीर करू शकतो."
 "पण का? चांगला फायद्यात चाललाय. मागे पाऊल कशासाठी घ्यायचं?"
 " ज्यांच्याशी व्यवहार करायचा ती माणसं अशी वागली म्हणजे मग पाऊल मागे घ्यावंच लागतं ना?"
 " हॅ:! हे घडलं ते काहीच नाही. असं चालायचंच. माणसं अशीच असतात. पण एवढं मात्र लक्षात ठेव. ह्या प्रकरणावर अजून पडदा पडला नाहीये.”
 पडदा पडण्यापूर्वीच्या शेवटच्या अंकात यशवंतराव नंतरच्या वर्षी बिरवाडीच्या शेतकऱ्यांच्या वतीने बीजोत्पादनासाठी पुन्हा करार करायची भाषा बोलत रामकडे आले. तोपर्यंत सगळ्यांनाच माहीत झालं होतं की जिल्हा परिषदेने खरेदी केलेल्या बियाणापोटी शेतकऱ्यांना थोडासा ॲडव्हान्स दिला होता तेवढेच पैसे त्यांच्या पदरात पडले होते. उरलेले पैसे पेरणीचा हंगाम झाल्यावर द्यायचे असं ठरलं होतं. पण त्या वर्षी त्या सबंध भागात दुष्काळ पडला, पाऊस झाला नाही आणि पेरण्याही झाल्या नाहीत. बहुतेक कुणाचंच बी विकलं गेलं नाही.
 एरवी रामने यशवंतरावांना आल्या पावली हाकलून दिलं असतं, पण आता त्यांना खोचून बोलण्याची संधी तो दवडणार नव्हता.
 " अतिशहाणपणाचं हे असं फळही मिळू शकतं लक्षात ठेवा यशवंतराव. खरं म्हणजे मी तुमचे आभार मानायला हवेत. ते बी मला मिळू न देऊन तुम्ही माझ्यावर उपकार केले, नाहीतर आता ते सगळं माझ्या अंगावर पडलं असतं. आणि पुन्हा करार करण्याबद्दल म्हणाल तर तुम्ही विचारण्याआधीच माझं उत्तर तुम्हाला माहीत असायला हवं होतं. तितपत हुशार असाल असं वाटलं होतं मला. आता सगळ्यांकडे गेल्या वर्षीचे बियाणाचे स्टॉक असताना पुन्हा यंदा बी तयार करण्याइतका मी मूर्ख आहे असं तुम्हाला खरंच वाटलं का? आणि पुन्हा पुढल्या सीझनला समजा मी ज्वारीचं बी केलं तरी जगाच्या पाठीवर असं एक गाव आहे की तिथे कधीही करणार नाही. त्या गावाचं नाव तुम्हाला ठाऊकच आहे."
 " माझं ऐकून तरी घ्या, साहेब."
 राम हसून म्हणाला, " मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये, यशवंतराव. तुम्ही आपले आता परत जा आणि बिरवाडकरांना सांगा की मी तुम्हाला तुमची गेलेली पत परत मिळवायची संधी नाकारली म्हणून."



  ती आर्थर सीटवर उभी राहून कड्याच्या खाली एक घार संथ लयीत डौलदार घिरट्या घालीत होती तिच्याकडे बघत होती. खाली सावित्रीच्या खोऱ्यापर्यंतचं अंतर पंधराशे फूट आहे हे खरंच वाटत नव्हतं. ती महाबळेश्वरला प्रथम आली तेव्हा ह्या एकाच जागेबद्दल तिनं ऐकलं होतं. त्याआधी काही दिवस एका तरुणाने प्रेमभंगापायी इथून उडी घेऊन आत्महत्या केली होती.
 ती रामला म्हणाली होती, " किती रोमँटिक कल्पना आहे ना? "
 तिचं डोकं फिरलंय की काय अशा आविर्भावात तिच्याकडे बघून तो म्हणाला, " कड्यावरून उडी मारून जीव देण्यात काय रोमँटिक आहे ? "
 " आपल्या प्रेमाला प्रतिसाद मिळत नाही म्हणून जीव द्यायचा आणि तोही अशा भीषण-सुंदर ठिकाणी, हे रोमँटिक नाही का?"
 "मला त्यात काहीही रोमँटिक वाटत नाही. आणि हे जीवबीव देण्याबद्दल बोलणं बास "
 पुढे पुढे तिला कळलं की रामला मरण ह्या विषयावर बोललेलं मुळीच आवडत नसे. तिला याचं जरा आश्चर्यच वाटलं होतं. कारण खेड्यातल्या लोकांना तिनं कुणाच्याही मृत्यूबद्दल अगदी बीभत्स तपशीलात शिरून चर्वितचर्वण करताना ऐकलं होतं. रामचा ह्या विषयाबद्दलचा तिटकारा हा एकूणच आजार, अपघात, मृत्यू हे जीवनाचे अविभाज्य अंग आहेत ह्या सत्याचा अस्वीकार होता. अशा प्रसंगांना सामोरं जाण्याऐवजी त्यांच्याकडे पाठ फिरवून त्यांचं अस्तित्व तो पुसून टाकायला पाही. अशाच एका प्रसंगातून तो आणि ज्योतीची आई ह्यांच्यात कायमचा दुरावा निर्माण झाला.
 प्रसंग होता ज्योतीच्या वडिलांच्या मृत्यूचा. तशी मृत्यूच्या बातमीने धक्का बसण्यासारखी परिस्थिती नव्हती, कारण बरीच वर्षं ते विकलांग अवस्थेत अंथरुणावर पडून होते, आणि इतरांशी त्यांचा संबंध फारच मर्यादित होता. भरवलेलं अन्न गिळण्याची क्रिया आणि घशातून एक चमत्कारिक घुरघुरणारा आवाज एवढया दोनच गोष्टी ते अजून माणसांत असल्याची साक्ष देत असत. त्यांचे डोळे संपूर्ण भावहीन होते. त्यांत समोरच्या माणसाला ओळखल्याची. तो काय बोलतो आहे ते कळल्याची चमक कधीच दिसत नसे.
 अंत्यसंस्कारांनंतरच्या दिवसांत लोक दुखवटयाच्या भेटीला यायचे. मेलेला माणूस कसा सर्व सद्गुणांचा पुतळा होता. प्रत्येक बोलणाऱ्या व्यक्तीशी त्याचं कसं खास नातं होतं हे गंभीर चेहरा, पाणावलेले डोळे यांसहित म्हणून झालं की त्यांच्या शेवटच्या आजाराची तपशीलवार चर्चा व्हायची, आणि इतका दीर्घ काळ त्यांची इतक्या मनोभावे सेवा करणाऱ्या बायकोची श्रेष्ठता कौतुकानं उल्लेखली जायची. हया सगळ्याचं पुन्हापुन्हा दळलेलं दळण रामइतकंच ज्योतीलाही कंटाळवाणं झालं होतं. पण अटळ प्रसंगाला स्थितप्रज्ञपणे तोंड देण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. तो दगडासारखा चेहरा करून शून्यात नजर लावून बसायचा नि नंतर ज्योतीजवळ कुरकूर करायचा. त्याला सगळ्यात असह्य व्हायचं ते त्याच्या सासूचं 'नाटक'. तिच्या नवऱ्याबद्दल बोलणं सुरू झालं की ती कण्हल्यासारखा आवाज काढायला सुरुवात करायची. मग हळूहळू गळा काढायची. शेवटी आक्रोश करीत जमिनीवर डोकं आपटून घ्यायची. कोणी तिला धरायला गेलं तर धडपडून सुटका करून घ्यायची नि ओरडायची, "जाऊ दे मला. डोकं फुटून मेले तर बरंच होईल. कशाला राहयलेय मी त्यांच्यामागं !"
 ती हे सगळं मुद्दामच करते असं राम ठासून म्हणायचा. ज्योती अगदी तसं म्हणायला तयार नव्हती तरी तिलाही आईचं आश्चर्य वाटत होतं. तिच्या आठवणीत तिची आई शांत, आत्मनिर्भर, कामाचा विलक्षण उरक असलेली बाई होती. ती तिखटपणे किंवा कडवटपणे बोले, पण त्रागा, आदळआपट करीत नसे. अशा तऱ्हेने तिनं आपल्या भावनांचं जाहीर प्रदर्शन केलेलं तर ज्योतीनं कधीच पाहिलं नव्हतं. नवऱ्याला अर्धांगवायूचा झटका आल्यावर मुलांना कुटुंबाचा कर्ता नाहीसा झाला असं तिनं कधी भासू दिलं नाही. त्याला खाऊ घालणं, त्याचं अंग पुसणं, त्याच्या पायांना मालिश करून पायांचे व्यायाम करून घेणं, अंगाला व्रण होऊ नयेत म्हणून दर काही तासांनी त्याची कूस बदलणं ही सगळी तासन् तास खाणारी कामं अंगावर पडूनही ती घरकामात काही उणं पडू देत नसे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप नाही तर आपला आधार गेला असं मुलांना कधी वाटलं नाही. संकटात इतकं समर्थपणे उभं राहण्याची शक्ती तिला कुठून आली ह्याचा ज्योतीला नेहमी अचंबा वाटत असे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, तिचं दुःख जरी समजण्याजोगं होतं तरी त्या दु:खाचं धरबंध सोडून केलेलं प्रदर्शन ज्योतीला चमत्कारिक वाटत होतं.
 राम म्हणाला, " कुणी भेटायला आले म्हणजे त्यांच्या समोरच फक्त त्या असं कसं करतात? याचा अर्थ त्या मुद्दामच करीत असल्या पाहिजेत."
 "पण कशासाठी?"
  " मला काय माहीत ? लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी, आयुष्यात काहीतरी नाटय निर्माण करण्यासाठी."
 " राम, ती नक्की असा अगदी विचार करून मुद्दाम हे करते असं मला नाही वाटत."
 " पण हा मेलोड्रामा तुलाही आवडत नाही ना?"
  " नाही."
 " मग आपण हया दुखवटयाच्या भेटीच थांबवू. लोकांना सांगू डॉक्टरांनी त्यांना कुणाला भेटू देऊ नका म्हणून सांगितलंय."
 " असं कसं आपण करू शकू ? एवढया लहानशा घरात कुणाला बाहेरच्या बाहेर घालवून द्यायला जमणार नाही. आणि तिला ते मुळीच आवडणार नाही."
 " मग त्यांना शिरगावला घेऊन जाऊ."
  " राम, तुला माहीताय श्राद्ध झाल्याशिवाय ती इथून हलणार नाही."
 " मग मी आपला जातो. मला हा तमाशा असहय होतोय."
 "तू दुर्लक्ष का करीत नाहीस तिच्याकडे ?"
  " ते कसं शक्य आहे ?"
 " मग जा तर तू."
 " अशा प्रसंगात तुला एकटं सोडून जायला खरं म्हणजे माझं मन घेत नाहीये-"
 " माझी काळजी करू नको. माझं मी बघून घ्यायला समर्थ आहे. तुला इथं राहणं सहन होत नाहीये ना? मग तू जा."
 ज्योतीला थोडासा राग आला, पण तो गेल्यावर एकूण तिला हायसं वाटलं. म्हणजे आता आई आणि नवरा यांच्या कात्रीत सापडायला नको. पण तिचं मनावरचं ओझं उतरलंसं वाटणं अल्पकाळच टिकलं. एक दिवस तिच्या आईचं नाटक (आता ज्योतीही स्वतःशी हाच शब्द वापरायला लागली होती) जरा अतीच झालं. आलेली माणसं चमकली. ज्योतीलाही लाजल्यासारखं झालं. माणसं निघून गेल्यावर तिनं आईला समजावण्याचा प्रयत्न करण्याची घोडचूक केली. " आई, तुझं दुःख मी समजू शकते, पण किती दिवस तू हा असा आक्रोश करणार आहेस ? काही झालं तरी बाबांचं मरण काही अगदी सर्वस्वी अनपेक्षित नव्हतं. आणि शेवटी तू असाही विचार करायला पाहिजेस की एक प्रकारे ही त्यांना सुटकाच होती. विकलांग अवस्थेत शरीराची प्रत्येक गरज भागवण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणं काही त्यांना विशेष सुखाचं नसलं पाहिजे आणि तुझीसुद्धा सुटकाच नाही का झाली?"
 आई इतक्या त्वेषानं तिच्याकडे वळली की तडाखा चुकवण्यासाठी सरावं तसं ज्योती नकळत मागे सरकली.
  " सुटका म्हणे ! आमच्या नात्याची तुला इतकीच किंमत वाटली ? तुला काय कळणार म्हणा, पण ऐक. तुझे वडील हे माझं जगण्याचं कारण होतं. आता ते गेले. आता कशासाठी जगायचं मी ? मेले तर त्यात आनंदच आहे मला. तुला न तुझ्या नवऱ्याला काय वाटतं दुःख फक्त तुमच्यासारख्या श्रीमंतांनाच असतं ? आम्हाला नसतं ? तो आम्हाला तुच्छ मानतो माहीत आहे मला. पण-"
 " आई, असं का तू म्हणतेस ? रामनं मुळीच कधीही तुम्हाला तुच्छ मानलेलं नाही."
 " नाही ? मग तो असा तडकाफडकी निघून का गेला ? माणुसकी असलेल्या कुणीही अशा प्रसंगी इथे राहून आधार दिला असता."
 " मग राहिला की तो. पण आता तसं त्याला करण्यासारखं काही नाहीये, आणि तिकडे महत्त्वाची कामं तुंबलीयत."
 “ महत्त्वाची कामं असलेला जगात तो काय एकटाच आहे ? अशा वेळी माणसं महत्त्वाची कामंसुद्धा बाजूला सारतात माहिताहे ? पण माझा जावई नाही ते करणार. का नाही ? कारण त्याच्या लेखी आम्ही कुणीच नाही. आम्ही बिचारे गरीब लोक, छोटे लोक. आम्ही मेलो तर ती काय दखल घेण्यासारखी गोष्ट आहे ? छे: ! आता उद्या तुझ्या बापाच्या श्राद्धाला तो का नाही असं कुणी विचारलं तर काय सांगू ? की माझा जावई फार मोठा माणूस आहे, त्याला सासऱ्याच्या श्राद्धाला यायला वेळ नाही?"
 ज्योतीनं रामला श्राद्धाला ये म्हणून बजावलं होतं पण तो येईलच अशी काही तिची खात्री नव्हती. ती काहीच बोलली नाही.
 "आणि तू ? तूही फिरलीस. तू मला सांगायला धजतेस कशी की माझा नवरा मेला, मी विधवा झाले ह्यात मी आनंद मानावा ? का तर म्हणे तो विकलांग होता. विकलांग असला म्हणून त्याला काय इतर माणसांसारख्या भावना नव्हत्या ? जगण्याचा हक्क नव्हता ? तू, त्याची मुलगी, तो मरावा अशी इच्छा करीत होतीस ? "
 " काहीतरीच काय बोलतेस ? "
  पण तिच्या आईनं काही न ऐकता आपलं चालूच ठेवलं. " का ? त्याचा भार काय तुझ्यावर होता? तू त्याला सांभाळत होतीस ? त्याला भरवत होतीस, त्याचं अंग पुसत होतीस, त्याची विष्ठा साफ करत होतीस ? की तुला वाटायचं तुम्ही त्याला पोसता म्हणून ? आम्ही नव्हते तुझ्याकडून कधी पैसे मागितले."
 "मी कुठं तसं म्हटलं ? काय जी थोडीफार मदत आम्ही करत होतो ती करण्यात आनंदच होता आम्हाला."
 " मग आता नकोयत आम्हाला तुझे पैसे. संजयला नोकरी लागेल आता, आणि आम्ही त्याच्या पगारात भागवू. तुझ्यावर भार टाकायचा नाहीये आम्हाला."
 लग्न झाल्यावर एकदा रामनं तिला तिच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल विचारल होतं. त्यानं जेव्हा ऐकलं की तिच्या वडलांनी ज्याच्याकडे बरीच वर्षे नोकरी केली तो डॉक्टर त्यांना पेन्शन द्यायचा ते आणि तिच्या आईचा एक भाऊ अधनंमधनं थोडी फार मदत करायचा ती ह्यातच त्यांचा संसार चालला होता, तेव्हा त्याला धक्काच बसला.
 " म्हणजे तुझ्याशी लग्न करून मी त्यांचं चरितार्थाचं साधनच काढून घेतलं म्हण ना. हे बरोबर नाही. आपण त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे."
 तो हे म्हणाला त्यावेळी त्याची परिस्थिती ज्योतीच्या कुटुंबापेक्षा बरी होती तरी फार काही उत्तम नव्हती. बायकोच्या माहेराकडून पैसे कसे उकळायचे असं अनेक पुरुष पहात असताना ह्याने त्यांना मदत करण्याची भाषा करावी, ह्याचं ज्योतीला फार कौतुक वाटलं. दुर्दैवाने उपकारकर्त्याबद्दल बरेचदा असते त्याप्रमाणे ज्योतीच्या आईच्या मनात रामविषयी अढीच निर्माण झाली.
 तसं पाहिलं तर रामविषयी तिला पहिल्यापासूनच संशय वाटत आला होता. त्याच्यासारख्या सुस्थितीतल्या माणसानं ज्योतीसारख्या रूप, पैसा, जमीनजुमला, उच्चपदस्थ नातेवाईक ह्यांपैकी काहीच नसलेल्या मुलीशी लग्न का करावं ? त्याच्यात काहीतरी उणं असलंच पाहिजे. तो कदाचित नपुंसक असेल किंवा त्याला महारोग झाला असेल अशा शंकासुद्धा तिनं बोलून दाखवल्या होत्या. मग पुढे राममधे काही चूक नाही, तो चार माणसांसारखा आहे हे कळून चुकल्यावर तिनं असं ठरवलं की आपल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या खालच्या पातळीवर असलेल्या कुटुंबाशी त्याने संबंध जोडला कारण त्यांचा पदोपदी अपमान करण्यात त्याला विकृत आनंद मिळत होता. असली अफलातून कल्पना तिची आई सोडून दुसऱ्या कुणाला सुचली नसती अशी ज्योतीची खात्री होती.
 लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीला त्यांच्याकडं जायचं आमंत्रण जेव्हा रामनं स्वीकारलं नाही तेव्हा ज्योतीच्या आईनं लिहिलं होतं, " बरोबरच आहे. तुम्ही मोठे लोक, आमच्या गरिबाघरच्या दिवाळीचं तुम्हाला काय कौतुक ?" काही काळानंतर गाठ पडली तेव्हा ज्योतीनं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तशी तिची आई म्हणाली, " उगाच तोंडची वाफ कशाला दवडतेस? तुझं त्याच्याशी लग्न झालंय तेव्हा त्याच्या प्रत्येक कृतीचं तू समर्थन करणारच. पण तो का आला नाही हे तुला माहीत आहे नि मला माहीत आहे. तेव्हा खोटं बोलायचे श्रम तू घेऊच नयेस."
  अर्थात एका बाजूने आईचा हा पवित्रा, तर दुसऱ्या बाजूने रामचं वागणं काही ज्योतीची वाट जास्त सुकर करीत नव्हतं. त्याला लोकांशी कसं वागायचं ही कला नव्हती, आणि ती शिकण्याची इच्छाही नव्हती. तो नेहमी फटकून वागत असल्यामुळे लोकांना त्याच्या उदारपणातही अपमानित करण्याची चाल दिसत असे.
 आता रामविषयी रदबदली करण्यात फारसा अर्थ नाही असं वाटत असूनसुद्धा ज्योती म्हणाली, " राम खरंच तसा नाहीये, आई. तो तुमच्यावर उपकार करतो असं त्याला मुळीच वाटत नाही, किंवा तुम्ही अगदी त्याच्या मदतीच्या ओझ्याखाली दबून जावं अशीही त्याची अपेक्षा नाही. तो असं वागतो तो अरेरावीनं वागतो असं नाही, त्याला कळतच नाही चार लोकांत कसं वागावं, कसं बोलावं ते. नसतं काही लोकांना ते अंग. पण म्हणून त्याला तुमच्याबद्दल, तुझ्याबद्दल काही वाटत नाही असं समजू नकोस. तुझी काय अवस्था झालीय ती बघून तो तुला इथनं घेऊन जायला निघाला होता."
 " घेऊन जायला? कुठे ? त्याच्या घरी? त्याला वाटलं मी इथल्यापेक्षा तिथे जास्त सुखात राहीन ? नको बये, माझी इथून कुठे जाण्याची इच्छा नाही. तुझ्या बापाबरोबर इथे मी इतकी वर्ष काढली. आता मरेपर्यंत त्यांच्या आठवणी जपत इथेच रहायचंय मला."
 आपण काहीही बोललो तरी प्रकरण जास्तच चिघळणार हे जाणून ज्योती गप्प बसली. बापाच्या प्रदीर्घ आजारपणातून आईची सुटका झाली असं म्हणण्यात आपण चूकच केली असं तिला वाटलं. पण एखाद्या लहान मुलाची करावी तशी त्याची देखभाल करण्याचं तिला संकट वाटत नसेल अशी ज्योतीची कल्पनाच नव्हती. तिच्या आईच्या दृष्टीने तो चेतनाहीन गोळा हा अजूनही तिचा नवराच होता. केवळ नवराच नव्हे तर तिचं मूलसूद्धा. आणि हे मूल तीच संभाळीत असल्यामुळे तिची त्याच्यावर संपूर्ण सत्ता होती. ही त्यांच्या स्थानांतली अदलाबदल तिला भावली होती का? हा माणूस, तिचा नवरा, कुटुंबाचा कर्ता, घराचा मालक, ज्यानं लहानसहान कारणांसाठी तिच्यावर तोंड टाकलं, पदोपदी तू किती मूर्ख आहेस म्हणून तिला हिणवलं, तो आता प्रत्येक गोष्टीसाठी तिच्यावर अवलंबून होता, फक्त तीच त्याचं अंग पुसून त्याला कपडे घालायची, जेऊ घालायची, आणि लहान मुलाचे बोबडे अडखळणारे बोल जसे फक्त आईलाच समजतात तसं त्यांच्या घशातनं निघणाऱ्या विचित्र खरखर आवाजातनं तो काय म्हणू पहातोय हे समजण्याची कुवत फक्त तिलाच होती ह्याचंच तिला सुख होतं? की कधी एके काळी त्यांच्यात खरोखरच प्रेमाचा धागा होता? ज्योती कळण्याइतकी मोठी असल्यापासून तिला तिचा बाप एक खत्रूड, रागीट माणूस म्हणून आठवत होता. बायकोशी बोललाच तर काहीतरी वाकडं, टोमणेवजा. कधी बसून दोघांनी गप्पा मारल्यायत असं ज्योतीला आठवतच नव्हतं. तसं त्या दोघांच्यात बोलणं कमीच होतं, आणि जे व्हायचं ते असं टोचून-खोचून. तिच्या आईनं ह्या माणसावर कधी प्रेम केलं असेल हे विश्वास ठेवायला कठीण होतं. की हिंदू बाईच्या मनात जन्मल्यापासून बिबवली गेलेली विधवापणाची भयंकर भीती तिच्या आक्रोशाच्या मुळाशी होती ? तो कसा का असेना, जिवंत होता तोपर्यंत ती सधवा, सुवासिनी होती. तो मरताक्षणीच ती विधवा झाली – दयनीय, धार्मिक – सामाजिक समारंभांत काही स्थान नसलेली, दुर्लक्षित व्यक्ती.
 आईशी झालेल्या बोलण्याबद्दल ज्योतीने रामला काही सांगितलं नाही. तो पाठवीत असे त्याप्रमाणे पैसे पाठवीत राहिला, आणि तिची आई ते मुकाटयाने, कोणत्याही तऱ्हेने त्याचा उल्लेखसुद्धा न करता घेत राहिली. रामने ह्यावर कोणतीच प्रतिक्रिया दर्शविली नाही. कर्तव्यबुद्धीने तो पैसे पाठवीत राहिला, आणि त्याबद्दल कृतज्ञता मिळावी अशी त्याची अपेक्षाही नव्हती. अर्थात ह्याचा अर्थ उघड होता. ज्योती काहीही म्हणाली तरी सासू म्हणून किंवा एक माणूस म्हणून त्याला तिच्या आईशी काही देणंघेणं नव्हतं. शेवटी कधीतरी आपली आई आणि नवरा ह्यांच्यात कधीच मैत्रीचं नातं असू शकणार नाही ही गोष्ट ज्योतीनं स्वीकारली.



 हे होटेल काही आपल्याला मानवत नाही असं ज्योतीने अनिच्छेनेच स्वतःशी कबूल केलं. हे अगदी नव्या बांधणीचं होतं. लहानात लहान खोल्या, त्यात कुठेतरी एकदम ऑर्डर देऊन करवून घेतलेलं स्वस्तातलं फर्निचर, भडक रंगाचे पडदे आणि पलंगपोस, भिंतीवर चकाकणारा इनॅमल रंग, टेबलांवर लावलेलं फॉर्मायका हे सगळं तिला खुपत होतं. पण सगळयात तिला उबग आला होता तो म्हणजे स्वच्छतेबद्दल तिथे फारसा उत्साह नव्हता त्याचा. तसं जेवणखोलीतला टॉवेल सोडला तर बाकी काहीच अगदी अस्वच्छ होतं असं नाही, पण अगदी प्रसन्न वाटेल इतकं स्वच्छही नव्हतं.
 तिला वाटलं, श्रीमंती सवयी काही फक्त रामलाच लागतात असं नाही ब्ल्यू व्हॅली होटेलातल्या प्रशस्त आरामशीर खोल्या, सुरेख जुनं फर्निचर, कुशल स्वैपाक्यांनी बनवलेलं उत्तम जेवण, हवं नको विचारण्याची नोकरवर्गाची तत्परता ह्या सगळ्याची तिला तीव्रतेनं आठवण होत होती. सुरुवातीला ती आणि राम गुलमोहोरसारख्या होटेलात राहात असत आणि त्याची त्यांना काही क्षिती वाटत नसे. पुढे पैसा पुष्कळ मिळायला लागल्यावर राम म्हणे, " सगळ्यात उत्तम होटेलात राहण्याची ऐपत असताना कमी दर्जाचं का पत्करायचं ? "
 ज्योतीला आपण समाजाच्या ज्या थरातून आलो त्याच्याशी प्रतारणा केल्यासारखं वाटायचं. आत्ता ती रामच्या म्हणण्याला आव्हान म्हणून मुद्दाम गुलमोहोरमधे रहायला आली होती, आणि त्याचा पश्चात्ताप होतो म्हणून तिचं मन तिला खात होतं. हा त्या दोघांमधला फरक तिला पहिल्यापासूनच जाणवला होता पण आता तिला आठवण झाली प्रतापला घेऊन ती बाळंतपणानंतर शिरगावला परत आली त्या दिवसाची.
 खरं म्हणजे बाळंतपणासाठी पुण्याला जायची तिची मुळीच इच्छा नव्हती, पण रामनेच आग्रह धरला म्हणून तिनं जायचं ठरवलं. तो म्हणाला शिरगाव खेडं आहे, तिथे चांगले डॉक्टर, सुसज्ज हॉस्पिटल अशा काही सोयी नाहीत. त्याची आत्या म्हणत होती की बाळंतपणाचं ते काय करायचं असतं ? मी घरीसुद्धा करीन. पण राम म्हणाला आयत्या वेळी काय होईल सांगता येत नाही. काही इमर्जन्सी आलीच तर जिथे त्याच्याबद्दल काही करता येईल अशाच ठिकाणी असलेलं बरं.
 मग तिला आईकडे सोडून परत जाताना तो म्हणाला, “ मला तुझ्याशिवाय फार एकटं वाटेल ग. इतके दिवस मी कसे काढणार आहे कुणाला ठाऊक. आत्याबाईंचं ऐकून तुला तिथेच ठेवलं असतं तर बरं झालं असतं."
 " मग चल येते मी तुझ्याबरोबर परत."
 " छे:, त्याबद्दल बोलूच नको. तुझ्या दृष्टीनं तू इथे राहणंच चांगलं. तुला तिकडे नेलं न् काहीतरी बरंवाईट झालं तर मी जन्मभर स्वतःला दोष देत राहीन. बरंय, मी येतो. काळजी घे. आणि मला रोज पत्र लिही."
 ज्योती हसायला लागली. “ रोज काय राम ?"
 " मग एक दिवसाआड.” .
 आई कशी असेल, कशी वागेल याची ज्योतीला जरा धाकधूक वाटत होती. पण आईला नेहमीप्रमाणे कामाच्या गडबडीत असलेली, मोजून - मापून आणि जरा कोरडेपणानेच बोलणारी अशी पाहून तिच्या मनावरचा ताण नाहीसा झाला. आई आपल्या नवऱ्याबद्दलही काही विशेष बोलत नव्हती. एकदाच फक्त म्हणाली, " ते गेले तेव्हा तुला दिवस गेले असले पाहिजेत, ना ? आता मुलगा झाला तर त्यांचं नाव ठेव." ज्योतीचा आपल्या मुलाचं सदाशिव नाव ठेवण्याचा काही इरादा नव्हता, पण आत्ता त्याबद्दल वाद कशाला म्हणून ती गप्प बसली.
 आपल्या आईबापांमधलं नातं नक्की काय होतं याबद्दल ती बरेचदा विचार करायची. त्यांच्यासाठी एवढा शोक किंवा शोकाचं प्रदर्शन केल्यावर आता काही महिन्यांतच तिनं त्यांचं अस्तित्व पुसून टाकलं होतं. याबद्दल आईशी बोलण्याचं धाडस काही तिच्यात नव्हतं. एखादा अधिक - उणा शब्द तोंडून निघाला तर आई संतापायची. त्यातून ती खरंखरं काय ते बोलेल अशी शक्यता नव्हतीच. तशी ज्योती नि तिची आई यांच्यात खास अशी जवळीक कधीच नव्हती. आणि आता वडील गेल्यापासून आणखी दुरावा निर्माण झाला होता. वडील गेले तेव्हा ज्योतीला दिसून आलं होतं की आईच्या आपल्या स्वतःबद्दलच्या, स्वतःच्या इतरांशी - विशेषतः नवऱ्याशी - नात्याबद्दलच्या काही कल्पना होत्या. त्या सत्यपरिस्थितीशी सुसंगत होत्या की नव्हत्या हा प्रश्न नव्हता. तिला आत्मसन्मानाने जगण्याची उभारी मिळण्यासाठी त्यांची गरज होती, आणि ती त्यांना घट्ट धरून बसणार होती. खाजगीत सुद्धा त्यांना धक्का लागेल असं बोलणं - वागणं तिच्याकडून अपेक्षितच नव्हतं.
 आईच्या बाबतीत हे असं, तर बहीणभावाशी अगदी संबंधच तुटल्यासारखं ज्योतीला वाटलं. संजयने बी. एस्. सी. पूर्ण करून कॉलेज आणि संशोधन संस्थांना प्रयोगशाळांसाठी उपकरणं आणि रसायनं यांचा पुरवठा करणान्या एका कंपनीत नोकरी धरली होती. त्याला शिक्षण पुढे चालू ठेवायचं होतं, तेव्हा नोकरी करावी लागल्यामुळे तो नाराज झाला होता. तो फारसा घरी राहातच नसे. कामावरून यायचा आणि चहा घेऊन कपडे बदलून मित्रांच्या बरोबर भटकायला जायचा तो जेवणाच्या वेळेपर्यंत परत येत नसे. मिळवून आणून कुटुंबाचं पोषण करतो तेवढं पुरे, आता त्याची आणखी दखल घ्यायचं कारण नाही असा त्याचा खाक्या असे. निशा बी. कॉम्.च्या शेवटच्या वर्षाला होती. मैत्रिणी, कपडे, कॉलेजातली खरी वा काल्पनिक प्रेमप्रकरणं यांखेरीज तिला गप्पांना विषय नसे. ज्योतीला वाटायचं, आपण कॉलेजात असताना इतक्या उथळ आणि बिनडोक होतो का?
 एखाद्या बऱ्याच वर्षांनी परदेशातनं आलेल्या माणसासारखं तिला तिच्या जुन्या घराशी काही बंध नसल्यासारखं झालं. मग तिला वाटलं, हे बरं नाही. मी आता रामसारखी व्हायला लागले, आपल्या आपल्या जगात मश्गूल होऊन राहयचंन् त्याच्याबाहेरच्या सगळ्यांना परकं मानायचं.
 तिला कंटाळाही खूप आला. दिवसभर कामात बुडून जायची सवय झाल्यावर काही न करता नुसतं बसून रहाण्याचं संकटच वाटायला लागलं. आणि हे सगळं पुरं नाही म्हणून तिला रामची सारखी आठवण यायची, त्याच्याशिवाय सगळं नीरस वाटायचं. तेव्हा शेवटी जेव्हा बाळंतपणानंतर दोनच आठवड्यांत तो तिला न्यायला आला तेव्हा तिला हायसं वाटलं.
 तिची आई म्हणाली, " हे काय ? अवघ्या पंधरा दिवसांत तू प्रवास करणार ? अजून तेवढी शक्ती तरी आलीय का तुला ?"
 " आई, मी अगदी ठाकठीक आहे. पळत पर्वती चढून दाखवते तुला हवं तर."
 " मला कशाला दाखवतेस? तुला माघारी जायचं तर जा बापडी. त्याला वाटत असेल की इथे त्याच्या बायकोचं न् मुलाच कुणी नीटपणे करणार नाही, तर कशाला रहायचं इथे ?"
 " तसं नाही ग. तू अगदी प्रत्येक गोष्टीचा वाकडा अर्थ लावतेस."
 "मी कोण वाकडा अर्थ लावणार ? बायकोला बाळंतपणासाठी माहेरी पाठवून ती बाळंत झाल्यावर बारसंसुद्धा न करता घाईघाईने तिला परत घेऊन जाण्याचा दुसरा काही अर्थ असला तर तू लाव हो."
 रामने तिला न्यायला टॅक्सी ठरवली होती. त्याच्या खर्चाबद्दल ज्योतीने कुरकुर केलीच, पण रामने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. निघताना आईचा रोष पत्करावा लागल्याने जराशी हिरमुसली असूनसुद्धा शिरगाव जवळ यायला लागलं तशी ज्योती सुखावली, मनोमन फुलली. तिनं शिरगाव सोडलं तेव्हा शेतं हिरवीगार होती, हवा थंड होती. आता फक्त मार्चचा मध्यच असूनसुद्धा येणाऱ्या उन्हाळ्याची चाहूल जाणवत होती. ज्वारीच्या काढण्या झाल्या होत्या आणि रानं मोकळी पडली होती. कुळवून पडलेली काळी, करडी, तपकिरी, विटकरी माती ऊन पीत पावसासाठी आसुसली होती, पाऊस पिऊन तरतरली की बी पोटात घेऊन प्रजननाचं नवं चक्र सुरू करणार होती.
 हवा अगदी कोरडी झाली होती, आणि येणाऱ्या गाड्यांना वाट देण्यासाठी टॅक्सी रस्त्याच्या कडेला गेली की धुळीचे लोट उडत होते.
 " मी तुला इतक्या लवकर घरी आणली म्हणून रागावलीस?"
 "नाही रे, उलट मला खूप आनंद झाला."
 " मग काही बोलत नाहीस ती?".
 " सगळं डोळे भरून पहातेय, सुखाचा अनुभव चाखतेय."
  पण ते घरी पोचले तेव्हा बाळाला घेऊन टॅक्सीतून उतरून अवघडलेलं अंग मोकळं करण्याच्या गडबडीत तिनं घराकडे मात्र पाहिलं नाही. तिला जाणवलं की राम काहीतरी अपेक्षेनं तिच्याकडे पहातोय. मग शेवटी तिनं घराकडे पाहिलं आणि ती चीत्कारली. 'राम, तू घर वाढवलंयस. आणि काही बोललाही नाहीस ना त्याबद्दल ?"
 "तुला एकदम दिसल्यावर तुझी प्रतिक्रिया पहायची होती मला."
 आत्याबाई बाहेर आल्या. बाळाला आत नेण्याआधी काही तरी छोटासा धार्मिक विधी त्यांना करायचा होता, पण राम त्याला तयार झाला नाही. शेवटी म्हातारीची समजूत काढायला ज्योतीने बाळाला त्यांच्या हातात दिलं: " मी जरा हातपाय धुऊन येते तवर बाळाला घेता का तेवढं ?" आत्याबाई खूष झाल्या नि बाळाशी बोबडं बोलत त्या आत निघुन गेल्या.
 " तू तरी अगदी फारच हट्टीपणा करतोस हं, राम."
 " तुझा विश्वास आहे का ह्या मंत्रातंत्रावर ?"
 " नाही, पण त्यांचा आहे. लहानशा गोष्टीत त्यांचं मन कशाला मोडायचं? काय त्यांना करायचं होतं त्यानं कुणाचं काय वाकडं झालं असतं ?"
 " झालं असतं. असल्या गोष्टींनीच अंधश्रद्धा जोपासली जाते."
 आत गेल्यावर ज्योतीनं पाहिलं की नवीन केलेलं बांधकाम म्हणजे एकच मोठी खोली आणि त्याला लगत बाथरूम. खोलीत नवं कोरं फर्निचर होतं. दोन पलंग, एक पाळणा, एका कोपऱ्यात एक टेबल आणि तीन खुर्च्या . खिडक्यांना फुलाफुलांचे पडदे होते आणि जमिनीवर एक लहानशी सतरंजी होती. पलंगावर नक्षीदार रंगीत चादरी आणि अभ्रे घातले होते. रामने मोठया अभिमानान बाथरूमचं दार उघडून आतल्या पांढया टाइल्स आणि आधुनिक सॅनिटरी फिटिंग्ज दाखवली.
 "कसं काय आवडलं तुला?"
 " मला काय म्हणावं हे कळत नाहीये. इतकं सुंदर घर मी कधी पाहिलं नाही. पण राम, हे सगळं करायला भरपूर पैसे पडले असले पाहिजेत ना?"
 " मग काय झालं ? धंद्यात चांगला फायदा होतोय, त्यातला थोडा खर्च केला तर कुठे बिघडलं ? काही सोयी नसलेल्या जुनाट घरात राहण्यापेक्षा हे चांगलं नाही का ?"
 " बाबा न आत्याबाईंचं काय ? त्यांनी जुनाट घरात राहिला चालतं वाटतं?"
 तो हसला. "ते असल्या ठिकाणी स्वस्थपणे राहू शकणार नाहीत.”
 "तू शकतोस तर ते का नाही शकणार?"
 " शिवाय बाबा सारखे हे बांधायला पैसे किती पडले त्याचा विचार करून त्रास करून घेतील.”.
 " पण मग तू हे पैसे खर्च केलेस हे त्यांना आवडलं नसणारच. आणि आपण हे असं वेगळंच रहायचं ह्याचं त्यांना काय वाटेल?"
 " का म्हणून काही वाटावं ? त्यांच्या मर्जीप्रमाणे ते त्यांचे आयुष्य जगलेत, आता आपल्या मनासारखं आपलं आयुष्य जगायला आपल्याला मोकळीक असली पाहिजे. प्रत्येक पिढीच्या वेगळ्या कल्पना असतात, त्याप्रमाणे ते वागणारच."
 खरं म्हणजे ज्योतीलाही आत्ता ह्या क्षणी धंद्यातून इतके पैसे काढ्न ते अनावश्यक बाबींवर खर्च करणं शहाणपणाचं नाही असं वाटत होतं. पण जास्त वाद घालून त्याला नाराज करण्यात अर्थ नव्हता. त्याला आपल्या हातांचा विळखा घालून ती म्हणाली, " थॅक यू. तुझं होमकमिंग प्रेझेंट मला खूप आवडलं."
  त्यानं तिला अगदी घट्ट धरून तिचं दीर्घ चुंबन घेतलं. शेवटी तिनं त्याला दूर ढकललं, " राम, तुला वेड लागलंय. कुणी आत आलं म्हणजे?"
 " ज्योती, किती दिवस झाले तुला असं भेटल्याला. तू नव्हतीस तर माझं कशात मनच लागत नव्हतं."
 त्यानं असं बोलून दाखवलं म्हणून तिचं मन भरून आलं. डोळयांत उभे राहिलेले अश्रू पुसत ती म्हणाली, " हॉस्पिटलमधे तू भेटायला आलास तेव्हा काही धड बोललाही नाहीस. एखाद्या अनोळखी माणसासारखा लांब खुर्चीवर बसलास नि निघून गेलास. मला वाटलं तुझं आता माझ्यावर प्रेमच राहिलं नाही."
  " तिथे इतर लोकांची इतकी येजा चालली होती. आणि तुझं सगळं चित्त बाळाकडे होतं. मला वाटलं आता सगळं बदललंय. आता आपल्यात पूर्वीचं नातं रहाणार नाही."
 तिनं काही म्हणायच्या आत आत्याबाई बाळाला घेऊन आल्या.
  " मला वाटतं त्याला पाजायची वेळ झालीय. तो काही रडायचा रहात नाही."
 राम म्हणाला, " बघ, आता हे नेहमी असंच होणार. तुझ्याशी बोलायला वेळ काढायचा तर त्याच्याशी स्पर्धा करावी लागणार."
 " असं का म्हणतोस ? तुझाही मुलगा नाही का तो?"
 " अगं नुसती चेष्टा करत होतो."
 पण ज्योतीला कळलं की ती संपूर्ण चेष्टा नव्हती. तिच्या वेळात, प्रेमात वाटेकरी आलाय ही गोष्ट स्वीकारणं रामला जड जाणार आहे. त्याच्यासमोर मुलाला पाजायला तिला जरा संकोच वाटत होता हे कळून की काय रामने उठून येरझारा घालायला सुरुवात केली.
 तो म्हणाला, " नाव शोधलंयस त्याच्यासाठी ?"
 " नाही खरं म्हणजे."
 " प्रताप कसं वाटतं तुला?"
 " ठीक आहे." त्याने मुलाचं नाव काय ठेवायचं हयावर विचार केला होता याचं तिला कौतुक वाटलं.
 " मग ठरलं तर. प्रतापच ठेऊ या. तो बलवान आणि शूर व्हायला पाहिजे." नावाबद्दल आणखी काही ऊहापोह न करता किंवा तिची पसंती न विचारता एकदम त्यानं नाव नक्की सुद्धा केलं म्हणून ती चकितच झाली. तिनं अमोल, सिद्धार्थ अशा रोमँटिक वाटणाऱ्या नावांचा विचार केला होता. तिला वाटल, शौर्यसूचक नावच हवं तर रणजित किंवा वीरेंद्र अशी सुंदर नाव टाकून प्रताप कसलं निवडलंन ह्यानं ? पण मग एक सुस्कारा टाकून ती गप्प बसली. रामने बराच विचार करून हे नाव निवडल होतं आणि अमुकच नाव हवं म्हणून ती काही हट्ट धरणार नव्हती.
 त्या रात्री झोपताना ज्योती म्हणाली, " हया खोलीत ऊठबस करताना मला सारखं आपण नको इतक्या चैनीत रहातोय अस वाटतं. लोकांच्या डोळ्यावर येईल असं कशाला रहायचं ?"
 राम अगदी मृदू, लहान मुलाला समजावावं तशा आवाजात म्हणाला, " बरं का ज्योती, खूप कष्ट करायचे, प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन धंदा उभा करायचा ही यशस्वी होण्याची एक बाजू झाली. दुसरी बाजू म्हणजे यश आणि त्याच्याबरोबर पैसा मिळाला की ते स्वीकारून त्यानुसार आपली राहणी बदलणं. तुम्ही जर यश मिळवल्यावर पूर्वीसारखंच रहाणार वागणार असलात, तर यश मिळवायचं तरी कशासाठी ?"



 बराच उशीर झाला होता तरी तिनं फिरायला जायचं ठरवलं. दुपारभर हिशेब तपासत बसल्यामुळे तिचं डोकं भणभणत होतं, आणि भराभर चालून त्याचा शीण घालवावासा वाटत होता. खरं म्हणजे हा विनोदच होता, पण त्यांचे चीफ अकाउंटंट मंत्री एवढंसं तोंड करून आले तेव्हा माझा त्रिवेणी सीड्सशी आता काही संबंध नाही असं त्यांना निक्षून सांगणं काही तिच्याच्यानं झालं नाही. रामला हिशेब, बॅलन्स शीट वगैरे दाखवायच्या आधी तिनं ते नजरेखालन घालावे अशी त्यांची इच्छा होती. ती साहजिक होती, कारण ज्योतीला थोड्या चुका सापडल्याच. किरकोळ होत्या, पण अनुभवी हिशेबनिसाकडून राहून जायला नको होत्या. त्यांनी हिशेब होते तसेच रामसमोर ठेवले असते तर रामने त्यांना चावून खाल्लं असतं. स्टाफचे लोक त्याला भयंकर वचकून असायचे आणि ते तसे असावेत अशीच त्याची अपेक्षा होती. तेव्हा तो रागावण्याची भीती असली की ते ज्योतीला मधे घालून त्याच्याशी बोलायचे.
  राम ज्योतीला म्हणायचा, " तू त्यांना फारच सैल सोडतेस. आणि त्यांना पक्क माहीत झालंय की त्यांनी वाटेल ते केलं तरी तू खपवून घेशील म्हणून."
  " मी मुळीच वाटेल ते खपवून घेत नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपली त्यांच्याकडून अपेक्षा आणि त्यांची कुवत हयांच्यात काही तरी मेळ असला पाहिजे. ज्या माणसाची बुद्धी आणि कुवत सामान्य आहे त्याच्याकडून अतिशय उच्च दर्जाच्या कामाची अपेक्षा करायची नि मग त्याला ते जमलं नाही की त्याच्यावर आरडाओरडा करायचा ह्यात त्याचा तर फायदा नाही पण आपलाही नाही."
 रामच्या मते कामगारांशी मऊपणाने वागलं तर ते त्याचा गैरफायदा घेऊन चुकारपणा करतात. त्यानं पहिल्यापासून कामगारांशी कसं वागावं ह्याचे ज्योतीला धडे देण्याचा प्रयत्न केला होता.
 " त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने कधी वागू नये. तुम्ही त्यांचे वरिष्ठ आहात, त्यांच्यातले एक नाही असं त्यांच्या मनावर ठसलं पाहिजे. नाहीतर धंदा चालवणं शक्यच होणार नाही."
 तो असं बोलायला लागला की ज्योतीला तिच्या एका चुलतभावाची आठवण व्हायची. तो एका मालवाहू जहाजाचा कॅप्टन होता. एकदा तो म्हणाला, " समुद्रावर असलं की खूप वाचून होतं कारण गप्पा मारायला कुणी नसतं आणि फारसा काही उद्योग नसतो."
 तिनं विचारलं, " इतर ऑफिसर असतात ना?"
 "असतात, पण कॅप्टनला हाताखालच्या ऑफिसर्सशी फारसं मैत्रीनं वागून चालत नाही. एकदा बरोबरीचं नातं निर्माण झालं की मग तुमच्या ऑर्डर्स असं का म्हणून न विचारता तंतोतंत पाळण्याची काही गरज नाही असं त्यांना वाटायला लागतं. हयामुळे वादळाच्या किंवा इतर काही संकटाच्या वेळी धोका निर्माण होऊ शकतो."
 ज्योतीला वाटायचं की वरिष्ठ अधिकाऱ्याला हाताखालच्या माणसांशी किमान संपर्क तरी ठेवायला हवा. त्यांच्या - आपल्यात एक न ओलांडण्यासारखी दरी निर्माण करून कसं चालेल ? शिवाय बियाणाची कंपनी चालवणं हे काही वादळात बोट चालवण्यासारखं नसतं. तिथं सदैव आंधळं आज्ञापालन करण्याची काय गरज आहे ?
 खरं म्हणजे हाताखालच्या लोकांशी वागण्याचे हे आडाखे रामच्या स्वभावानुसार होते. त्याला निरनिराळ्या माणसांत सहजपणे वावरण्याचं कौशल्य नव्हतं, आणि एकूणच माणसांचा कंटाळा, अगदी माणूसघाणेपणा म्हणावा इतका, होता. आता तो माणूसघाणा राहिला नव्हता, पण त्याच्यातला बदल वरवरचा होता. गप्पा मारणं. हास्यविनोद करणं इथपर्यंतच त्याची धाव होती. इतरांच्या अंतरंगात डोकावून बघायला तो अजूनही बिचकत असे आणि स्वत:चं मन तर त्यांच्यापैकी कुणाजवळच उघडं करीत नसे. कुणी आपल्या समस्या घेऊन त्याच्याकडे आलं तर तो त्यांचं ऐकून घ्यायचा, त्यांना सल्ला द्यायचा, पण तो स्वतःचे प्रश्न, अडचणी त्यांच्यासमोर कधी मांडीत नसे. एका तऱ्हेनं ज्योतीला त्याचा पूर्वीचा तुसडेपणा ह्या असल्या वागण्यापेक्षा जास्त प्रामाणिक वाटायचा.
 झपाझप चालण्याच्या व्यायामाने आणि थंड हवेने ज्योतीला लवकरच पुन्हा प्रसन्न आणि ताजंतवानं वाटायला लागलं. अशा थंड, ताजी, निर्मळ हवा पुण्यात कधी अनुभवायला मिळत नसे. झाडांच्या गर्दीतून बाहेर पडते तो तिला कळून चुकलं की बराच उशीर झालाय आणि परत पोचेपर्यंत चांगलाच अंधार पडणार. पुन्हा जंगलात शिरलं तर जास्तच काळोख भासणार. पण मोकळा रस्ता फार लांब वळणं वाकणं घेऊन जात होता. शेवटी हिय्या करून ती आल्या वाटेने परत फिरली. अपेक्षेप्रमाण लवकरच अंधारलं आणि तिला जराशी भीती वाटायला लागली. ती झपाझप पावलं उचलायला लागली आणि शेवटी जवळजवळ पळायला लागली. एका पडलेल्या वाळक्या फांदीला तिची साडी अडकली आणि ती पडली. चटकन उठून तिनं हा काय मूर्खपणा चालवलायस असं स्वत:ला बजावलं. मग तिनं मुद्दाम शक्य तितकं संथपणे चालायला सुरुवात केली तशी तिला आपल्यामागे कसली तरी चाहूल लागली. कोण असणार ? लाकूडतोडे इतक्या उशिरानं काही घरी जात नाहीत, पर्यटक तर नाहीच नाही. मग कोण ? ती अजून मुख्य रस्त्यापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर होती. तिच्या अंगावर तिचे नेहमीचेच दागिने होते. चार-चार पातळ सोन्याच्या बांगड्या, गळयात सोन्याची साखळी, रामने तिला पन्नासाव्या वाढदिवशी बक्षीस दिलेलं सोन्याचा पट्टा असलेलं घड्याळ. किंकाळी फोडली तर कुणाला ऐकू जाईल ? तिच्या हृदयाची धडधड तिच्या कानांत घुमत असताना एका बाजूने आपल्यावर एखादा दरोडेखोर किंवा बलात्कारी हल्ला करील ह्या कल्पनेची तिला मजा वाटत होती. असल्या गोष्टी आपल्याला होतील ह्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. आणि तरीही मनातली भीती जात नव्हती.
 तिच्यामागे एक आवाज आला, " नमस्कार."
 तिच्या मनात आलं, माझे दागिने चोरू पाहणारा किंवा माझ्यावर बलात्कार करणार असलेला माणूस काही मला नमस्कार म्हणणार नाही. तिनं वळून पाहिलं. मागनं येणारा माणूस ओळखीचासा वाटत होता. जरा जाडजूड होता मध्यम उंचीचा आणि गडद रंगाची पँट आणि पांढरा सदरा घातलेला. हातात काठी, डोळ्याला चष्मा."
  " एकदम बोललो म्हणून दचकला नाहीत ना?"
 "खरं म्हणजे चांगलीच दचकले, " ती एकदम हसून म्हणाली.
  " मग तुमची क्षमा मागायला पाहिजे. मी तुमच्याबरोबर परत गेलो तर हरकत नाही ना ? तुमच्याच होटेलात आहे मी. तुमच्या शेजारच्या खोलीत."
 "हं, म्हणजे तिथेच मी तुम्हाला पाहिलं असलं पाहिजे "
 पायवाट दोघांनी एकमेकांशेजारी चालण्याइतकी रुंद नव्हती, म्हणून ज्योती त्या माणसाच्या पुढे चालली होती. ती विचार करीत होती की त्याने तिचं बावळटासारखं पळणं , पडणं पाहिलं असलंन तर त्याला तिच्याबद्दल काय वाटलं असेल. केवळ त्याची सोबत असल्यामुळे आपली भीती पार पळून गेलीय आणि आपल्याला अगदी निर्धास्त वाटतंय हया गोष्टीची तिला लाज वाटली.
 तो म्हणाला, " दुपारी तुम्हाला भेटायला माणूस आला होता त्याचं न तुमचं बोलणं मी ऐकलं."
 " त्यात काही गुप्त ठेवण्यासारखं नव्हतं.”
 " तसं नाही. पण लोकांना नकळत त्यांचं बोलणं ऐकणं सभ्य समजत नाहीत. तरी आता ऐकलंच आहे तर तुम्हाला त्याबद्दल आणखी विचारलं तर चालेल? तुम्ही कुठल्या लाइनमधे आहात?"
 "बी-बियाणं.”
 "कसलं?"
 " धान्य, कडधान्य, कापूस, काही भाज्या."
 " म्हणजे तुम्ही विकत घेऊन फेरविक्री करता का?"
 " नाही. तयार करतो, पण स्वतःच्या जमिनीवर नाही. इतरांकडून आमच्या देखरेखीखाली करवून घेतो."
 " म्हणजे नक्की कसं?"
 " शेतकऱ्यांशी करार करतो. आम्ही त्यांना फाउंडेशन सीड, आणि कधी कधी खतं, औषधं वगैरे देतो. मग आमचा माणूस पिकाची ठराविक वेळांना तपासणी करतो, पिकाच्या काढणीच्या वेळी हजर रहातो. काढणी झाली की ते आमच्याकडे आणून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. म्हणजे कचरा वगैरे काढून बी साफ केलं जातं. मग त्याला चाळणी लावून जे ठराविक आकारापेक्षा कमी असेल ते शेतकऱ्याला परत केलं जातं. जे बी म्हणून वापरण्याजोगं असेल त्याला बुरशीनाशक औषधं लावून ते पिशव्यांत भरून त्याला लेबल लावलं जातं. आम्ही जे बी म्हणून स्वीकारतो त्याचे किलोमागे कराराप्रमाणे पैसे शेतकऱ्याला दिले जातात.”
 “ बी म्हणून वापरत नाही त्याचं शेतकरी काय करतो?"
 " खायला वापरतो किंवा गुरांचं आणि कोंबड्यांचं खाद्य करण्यासाठी विकतो.”
 " मी फारच अडाण्यासारखे प्रश्न विचारतोय असं तुम्हाला वाटत असेल ना? पण मला बियाणाच्या धंद्याबद्दल काहीच माहिती नाही. तुम्ही सांगताय ते फारच इंटरेस्टिग आहे. म्हणजे आपण भाजी-भाकरी खातो त्याच्यामागे इतके कष्ट असतील असं शहरातल्या माणसाच्या डोक्यात येत नाही."
 खरं म्हणजे त्याने प्रश्न विचारले हे ज्योतीला आवडलं होतं. आपण सहज आत्मविश्वासानं अशा प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो हयाचा तिला अभिमान वाटला. एरवी नवीन माणूस भेटायचं म्हणजे राम असतानाच. प्रश्न त्यालाच विचारले जायचे आणि उत्तरंही तोच द्यायचा. तो नेहमी 'आम्ही' म्हणायचा पण पाहुणे तिच्याकडे पहिला नमस्कार ठोकल्यावर दुर्लक्ष करायचे. तिच्याकडे रामची बायको म्हणून पहायचे, सहकारी म्हणून नाही. पण ह्याचा दोष ती केवळ रामला देऊ शकत नव्हती. दोष द्यायचाच तर दोघांना सारखाच द्यायला हवा होता, कारण पहिल्यापासूनच तिने प्रत्येक गोष्टीत रामला पुढाकार घेऊ दिला. खरं म्हणजे घेऊ दिला असंही नव्हे. त्याने घेतला आणि तिने त्याबद्दल काही आक्षेप घेतला नाही, किंवा स्वतःहून कशात पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित हेच चुकलं असेल. आयुष्याला ठरवून आखून मुद्दाम आकार द्यायला पाहिजे होता. ते आपलं घडतंय तसं घडू द्यायचं असं नाही करता कामा.
 तिच्याबरोबरचा माणूस म्हणाला, " आपण बरोबर जेवण घेऊन जेवता जेवता आणखी गप्पा मारू या. चालेल तुम्हाला? अरे हो, एक राहिलंच. माझं नाव आदित्य रेगे "
 " ज्योती देशमुख."
 त्याचं निमंत्रण स्वीकारावं की नाही, ते रामला कितपत आवडेल याचा ती विचार करीत होती. खरं म्हणजे त्याला आवडणार नाही असं दर्शवणारं काहीच तो कधी बोलला नव्हता. पण असा प्रसंग पूर्वी कधी आलाच नव्हता तेव्हा त्याबद्दल रामला काय वाटेल ह्याचा तिला अंदाज येण्याचं काही कारण नव्हतं. बहुतेक पुरुषांचा उदारमतवाद बायको जोवर ठराविक चौकटीत वावरतेय तोपर्यंतच टिकतो. मग तिला स्वतःचंच हसू आलं. त्या माणसानं बिचाऱ्यानं सरळपणे जेवायचं आमंत्रण दिलं. तेसुद्धा इथे होटेलातल्या डायनिंग रूममधे. त्यात काय एवढं खास ? शिवाय रामला काय वाटेल याचा विचार करण्याचं तिला काय कारण होतं?
 ती म्हणाली, "ठीक आहे."
 " जेवणापूर्वी ड्रिंक्स घेणार? "
 " नको."
 खोलीत गेल्यावर तिने तोंड धुतलं, तोंडावरून हलकेच पावडर फिरवली आणि केस विंचरून पुन्हा बांधले. मग साडी फारच चुरगळलेली दिसली म्हणून तिने एक खळ केलेली चुरचुरीत साडी पेटीतनं काढली.
 डायनिंग रूममध्ये तो आधीच येऊन बसला होता, आणि ती बसेपर्यंत उठून उभा राहिला. दिव्याच्या उजेडात तिनं पाहिलं की तो तिला वाटलं त्यापेक्षाही कूरूप होता. त्याच्या पोटाच्या घेरावरून त्याचा सदरा ताणला गेला होता त्याच्या चेहऱ्याची कातडी मुरुमांनी खरबरीत झाली होती, आणि कपाळावर हळूहळू टक्कल पडत चाललं होतं.
 जेवताना त्याने तिला विचारलं, " तुम्ही ह्या बी-बियाण्याच्या लाइनमधे कशा काय पडलात ?"
 " पडले हे बरोबर आहे. माझ्या सासऱ्यांचा बिझनेस होता. छोटाच होता आधी, मग आम्ही वाढवत नेला."
  " तुम्ही नक्की काय करता?"
 " मुख्य म्हणजे अकाऊंट्स बघते."
 " तो कुठल्याही धंद्याचा फार महत्त्वाचा भाग असतो. हे मला वाईट अनुभवावरनं कळलंय."
  तिला एकदम जाणवलं की तो कोण आहे, काय करतो हयाबद्दल तिनं त्याला काहीच विचारलं नव्हतं.
 " तुम्ही काय करता? "
 "मी इंपोर्ट - एक्सपोर्टमधे आहे. चामड्याच्या वस्तू, तयार कपडे, कॉस्ट्यूम ज्युवेलरी एक्सपोर्ट करतो. पण ह्यात पडायच्या आधी मी काही कारखान्यांसाठी सुटे भाग बनवत होतो. माझा एक वर्कशॉप होता. तसा धंदा चांगला चालला होता, म्हणजे माझी बाजू मी संभाळीत होतो - मी इंजिनियर आहे - पण अकाउंट्सची बाजू लंगडी पडली. फार पगार द्यावा लागतो म्हणून चांगला ट्रेंड अनुभवी माणूस नेमला नाही. ती काटकसर महागात पडली. कच्च्या मालाच्या खरेदीपासून पार्ट बनवण्यापर्यतचं कॉस्टिंग, वेळच्यावेळी बिलं करणं, ती लवकर वसूल होतात की नाही याच्यावर नजर ठेवणं, तगादे लावणं ही कामं होत नव्हती. शेवटी तोटा इतका वाढायला लागला की तो भरून काढून पुन्हा मी आपल्या पायावर उभा राहीन ह्याची शक्यताच राहिली नाही. मग बंद करायचं ठरवलं. माझा एक मित्र हया इंपोर्ट - एक्सपोर्टमधे होता. त्यानं मला नोकरी आणि पार्टनरशिप देऊ केली. अर्थात त्या वेळी माझ्याकडे गुंतवायला पैसे नव्हतेच, पण आता माझी गुंतवणूक जवळजवळ निम्मी झालीय. त्यानं संकटात मला हात दिला त्याची भरपाई मी खूप कष्ट करून मला मिळालेले शक्य तेवढे पैसे धंद्यात गुंतवून केलीय." तो थोडासा हसला. " गोष्टीचं तात्पर्य एवढंच की तुमचं महत्त्व कमी लेखू नका. तुमच्या धंद्यातल्या यशाचा सगळ्यात मोठा वाटा तुमचा आहे."
 ज्योतीनं एक सुस्कारा सोडला. " माझा नवराही मला तेच सांगतो."
 पण ते तिला पुरेसं वाटत नव्हतं. थातुरमातुर सुरुवातीपासून धंदा आकाराला आणताना तिला जो हे माझं कर्तृत्व आहे असा अभिमान वाटत असे, तो आता वाटत नव्हता. त्रिवेणी सीड्सची वार्षिक उलाढाल आता दोन कोटीपर्यंत पोचली होती आणि त्यांचं कार्यक्षेत्र चार राज्यांत पसरलं होतं. तिच्या आयुष्याची सव्वीस वर्ष तिनं हया कामाला दिली होती आणि मागे बघताना ती वर्ष फार चांगली गेली असं तिला वाटत होतं. मग आताच असा काय बदल झाला होता की ज्यामुळे तन - मन कसाला लावून काम करण्यातला तो आनंद, नवनवी आव्हानं स्वीकारण्याची उत्सुकता सगळं लयाला गेलं होतं ? आपल्या आयुष्यातल्या एका मोठ्या कालखंडाची जी किंमत दिली त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळालं असा विचार आताच का तिच्या मनात यायला लागला?
 तिनं आदित्यकडे पाहिलं. तो तिच्याकडेच रोखून बघत होता.
  " कसलातरी गहन विचार चालला होता तुमचा."
 " माझा नवरा म्हणतो माझी मध्यमवर्गीय वृत्ती आहे -अल्पसंतुष्ट. त्याचं बरोबर आहे. आमचा धंदा लहानसा होता तेव्हाच मी सगळ्यात सुखी होते. त्यात चालणाऱ्या सगळया कामांत माझा प्रत्यक्ष भाग असे. बी प्लॅंटवर आल्यापासून तो त्याची विक्री होईपर्यंत. आता मी एका लहानशा एयर कंडिशन्ड कॅबिनमध्ये माझ्या हिशेब वह्या घेऊन बसते. मी महत्त्वाचं काम करते हे निर्विवाद आहे. हिशेब बघणं, ऑडिट, टॅक्सच्या सगळ्या बाबी सगळं माझ्याकडे आहे. मला इतकं काम असतं की बहुतेक दिवशी दुपारचं जेवण नीटपणे घ्यायलासुद्धा वेळ मिळत नाही. तरीपण आमच्या धंद्याचा मुख्य जो भाग आहे - म्हणजे बी आणि त्याच्यावरची प्रक्रिया वगैरे - त्याच्याशी माझा संबंध तुटलाय. मी एका पोकळीत काम करते असं मला वाटायला लागलंय."
 ती एकदम गप्प बसली. आपण हया सर्वस्वी अनोळखी माणसासमोर आपलं मन उघडं करून दाखवतोय हया विचाराने तिला अगदी कानकोंडं झालं.
 तो म्हणाला, " तुम्हाला वाटतंय ते अगदी साहजिक आहे. आधुनिक मोठमोठ्या उद्योगांत काम करणाऱ्या सगळ्यांनाच अस वाटतं ते एका प्रचंड यंत्रणेतला छोटासा भाग असतात. दिवस न दिवस तेच तेच कंटाळवाणं काम करतात. अर्थातच त्यातन त्यांना काही समाधान मिळू शकत नाही."
 " तुम्ही म्हणताय ते अगदी वेगळंच."
 " नाही. तुमचं काम अगदी रोज बसून एकच स्क्रू आवळणाऱ्यापेक्षा वेगळ्या पातळीवर असेल, पण तुमची समस्या तीच आहे."
 " असेलही."
 तो म्हणत होता त्यात थोडंफार तथ्य होतं, पण तिला आता हया विषयावर संभाषण चालू ठेवायचं नव्हतं.
  त्याने विचारलं, " तुम्ही सुट्टीवर आलायत का?"
 " तसं म्हणता येईल."
 " नेहमी एकटयाच सुट्टी घेता?"
  " नेहमीच नाही."
 तो तिच्याकडे शोधक नजरेने पहात होता, आणि तो जणू आपल्या खाजगी आयुष्यात डोकावू बघतोय, आपल्या आवाजातून, आपल्या चेहऱ्यावरून, आपण न बोललेल्या शब्दांतून आपण इथे का आलोयत त्याचं अचूक कारण त्याला कळलंय असं तिला वाटलं.
 ती म्हणाली, " आणि तुम्ही ?"
 " मी कामासाठी आलोय. एक सांबर लेदरची ऑर्डर आहे माझ्याकडे. बुटांची. इथल्या दोघातिघांशी त्याच्याबद्दल बोलणी करायला आलोय मी."
 " पण सांबर मारणं, त्याचं कातडं वापरणं बेकायदा आहे ना?"
 " कायदे करून असल्या गोष्टी कधी थांबवता येतात का?"
 " नाही येत." तिनं आपला राग दाखवला नाही कारण त्यामुळे काहीच साध्य झालं नसतं. कायद्याने नाही थांबवता येत, पण असे कायदे का करतात ते समजून त्याच्यासारख्यांनी ते पाळले तर थांबवता येतात असं तिनं त्याला म्हटल्याने तो त्याची ऑर्डर पुरी केल्याशिवाय काही इथून जाणार नव्हता.
 जेवण संपल्यावर परत जाताना ती तिच्या खोलीकडे वळली तशी त्याने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला त्याच्या खोलीच्या दिशेने वळवलं. "चला ना, एक रात्रीचं शेवटचं ड्रिंक घेऊ या."
 आपल्या उघड्या कमरेला त्याचा हात लागला हया विचाराने तिच्या अंगावर शहारा उठला. तिला त्याची किळस आली. त्याचे शब्द तसे साधे सरळ होते, पण त्यांचा अर्थ साधा सरळ नव्हता. त्याने एकदम तिला स्पर्श केला त्यातूनच ते कळत होतं. तिच्याशी बोलताना, पृष्ठभागाखाली काहीतरी उलघाल चाललीय एवढं त्याला जाणवलं होतं, आणि केवळ त्यामुळे ती आपल्या निमंत्रणाला दाद देईल असा निष्कर्ष त्याने काढला होता.
 आवाज शक्य तितक्या खालच्या पातळीवर ठेवून ती म्हणाली, " थॅंक यू. पण मी दमलेय. आता जाऊन झोपणार. गुड नाइट."
 आदल्या रात्री कांदा खाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जशी घाणेरडी चव येते तशी तिच्या तोंडाला आली होती. त्याला ती इतकी एकाकी वाटली होती का की त्याच्यासारख्या कुणाही सहज भेटलेल्या माणसाने तिच्यावर जाळं फेकण्याचा प्रयत्न करावा?
 खोलीत आल्यावर खोली तिला रिकामी रिकामी वाटली. बिछान्यावरची चादर अंगाला गार लागली. काही असलं तरी राम तिचा सोबती होता. तिने केलेली बडबड ऐकणारा कान, मोकळी हवा घुमविणारा आवाज, बिछान्यात बिलगून झोपायला उबदार शरीर. अंगावरची चादर ओढता ओढता तिला शिरशिरी आली. आत्ता थोड्या काळापुरतं ही सुट्टी आहे असं मी मानू शकते, एकटेपणातलं स्वातंत्र्य उपभोग शकते. पण मग कायम एकटेपणा स्वीकारल्यावर कंटाळा आल्यामुळे किंवा कुणाच्या तरी सोबतीचा गरज वाटल्यामुळे या आजच्यासारख्या अवचित भेटलेल्या माणसाबरोबर मी संधान बांधीन का? कदाचित त्यालाही एकट वाटत असेल म्हणून त्याने खडा टाकून पाहिला. केवळ माझ्या एकटेपणाचा फायदा घ्यायचा म्हणून नसेलही.
 ही भीतीच माणसांना लग्नाच्या बंधनात ठेवते का ? एका विशिष्ट नात्याच्या चौकटीत तुमच्या सगळ्या मूलभूत गरजा पुरवायच्या एवढाच लग्नाचा अर्थ असतो का? याचा अर्थ असा होतो का की कोणत्याही तडजोडी स्वीकारून ज्या नात्यातून मला आता काही सुख मिळत नाही ते जिवंत ठेवावं? नाही, असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही. माणसं एकटी राहतात, मीही राहूं शकेन. प्रश्न फक्त सवयीचा आहे.
 एकटेपणाची भीती वाटत होती तरी त्या भीतीपोटी परत रामकडे जायला मन होत नव्हतं. दोन माणसांतलं नातं बदलतं कसं? का? हयाचा ती विचार करीत होती. स्मिता, तिची मुलगी, म्हणायची की लग्न हेच दोन माणसांतलं सुंदर नातं नासवून टाकतं. पण ज्योती आणि रामचं नातं त्यांच्या लग्नापासून सुरू झालं. ज्योतीला नाटकी शब्द आवडत नसत. त्यांच्यातलं नातं सुंदर होतं की नाही कोण जाणे, पण जे काय होतं त्यात ती सुखात होती. इतकं की कधी कधी ती स्वतःला विचारायची, " मी असं काय पुण्य केलं होतं म्हणून हे सगळं मला मिळालं?" हे सगळं मिळण्याला आपण लायक नाही असं कुठेतरी वाटत राहिल्यामुळे काहीतरी होईल आणि हे सगळं फटक्यात नाश पावेल अशी तिला भीती वाटायची. पण तिचं सुख असं संकटाच्या एका फटक्यासरशी नष्ट झालं नाही. ते इतक्या हळहळ आणि चोर पावलांनी विरत गेलं की कड्यावर उभं राहून समोरची खोल दरी दिसेपर्यंत ते विरलंय हे तिला कळलंच नाही.

१०



 एक दिवस सकाळी फिरून परत येतेय तो तिला प्रताप येऊन तिच्यासाठी थांबलेला दिसला. तिला रात्री चांगली झोप लागली नव्हती आणि सकाळी उठायला उशीर झाला होता. तरीही ती फिरायला गेली आणि मग वाटलं त्यापेक्षा लांबवर भटकत गेल्यामुळे परत येईतो जवळजवळ जेवायची वेळ झाली होती.
 मुलांपैकी कुणालाही पाहून तिच्या हृदयात आनंदाची ऊमा उसळायची तशी आताही उसळली, आणि त्याच्यामागोमाग एक वेदनाही जाणवली.
 " प्रताप, तू इथे कसा?"
 " तुला भेटायला आलो. यायला नको होतं का?"
 का कोणास ठाऊक ती त्याला नेहमी नको ते काहीतरी म्हणे. किंवा ती काहीही बोलली तरी त्याच्या कुत्सित हसण्याने, छद्मी बोलण्याने तो त्याचा विपर्यास करी. लहानपणी जरासा बुजरा, लाडिक, मनातलं सगळं विश्वासानं तिच्यापाशी बोलून टाकणारा हा मुलगा एकाएकी इतका परका कसा झाला हे तिला कधी कळलं नाही. त्याच्या मनाचा ठाव घेणं तर राहिलंच पण त्याला प्रेमानं स्पर्श करणंसुद्धा आता तिला शक्य झालं नसतं.
 " डॅडींनी सांगितलं का मी कुठेय ते?"
  "जरा दबाव आणावा लागला त्यांच्यावर, पण शेवटी सांगितलं."
  " म्हणजे?"
 त्यानं खांदे उडवले. " मी म्हटलं मला तुझ्याशी बोलायचंय. ते म्हणाले तू घरी नाहीयेस. मी विचारलं तू परत कधी येणार? तेव्हा ते म्हणाले त्याच्याशी तुला काय करायचंय. तेव्हा मग मी म्हटलं मला तुझा काही महत्त्वाच्या बाबतीत सल्ला विचारायचाय. ते म्हणाले नंतर विचारता येणार नाही का. मी म्हटलं नाही. शेवटी त्यांनी सांगितला तुझा पत्ता. आता त्यांच्यासारखा जबाबदार बाप मुलाच्या गरजेच्या वेळी त्याला मदत करणार नाही तर काय करणार?" तो हसला. " त्यांना नक्की वाटतंय की मी कोणा मुलीच्या प्रेमात पडलोय आणि तिच्याशी लग्न करावं की नाही ह्याबद्दल तुझा सल्ला विचारायचाय. आणि लग्न हा दारूच्या व्यसनापासून होमोसेक्शुॲलिटीपर्यंत सर्व गोष्टींवर रामबाण उपाय आहे असं मानणाऱ्यांपैकी ते असल्यामुळे माझं लग्न व्हावं अशी त्यांना तीव्र इच्छा असणं साहजिक आहे."
 त्याचं बोलणं तिला बोचलं कारण तिला पुष्कळदा एखादी शहाणी मुलगी ह्याच्याशी लग्न करून ह्याला सरळ करील तर किती बरं होईल असं वाटायचं.
 ती म्हणाली, "तू गलिच्छ भाषा केवळ दुसऱ्यांना धक्का देण्यासाठी वापरतोस का?"
 " माझ्या भाषेत गलिच्छ काय होतं बुवा ?"
  "जाऊ दे. चल, जेवायला चलतोस ना?"
 तो पुन्हा हसला. "मी वाटच बघत होतो तू विचारतेस की नाही म्हणून. नसतंस विचारलं तर मला माझे कष्टाने मिळवलेले पैसे खर्चून जेवावं लागलं असतं."
 "हे बघ प्रताप, एक लक्षात ठेव. माझे पैसे तुझ्याइतकेच कष्ट करून मिळविलेले आहेत."
 " ठीक आहे, त्याबद्दल आपण वाद घालूया नको. नाहीतरी जेवणाच्या आधी वादावादी करणं पचनाला चांगलं नसतंच."
 तिनं त्याच्या स्मिताला प्रत्युत्तर दिलं नाही. तिला राग आला होता. सगळ्याचाच राग आला होता. त्याची फाटलेली विटलेली जीन आणि खादीचा कुडता, न कापलेले विस्कटलेले कधी कंगवा लागला असेल की नाही असं वाटणारे केस, त्याची दाढी, त्याच्या खांद्यावर अखंड लटकलेली मळकट शबनम पिशवी – एकदा तिनं त्याला विचारलं होतं ही तू कधी धूत नाहीस का, आणि तो प्रचंड आश्चर्याने म्हणाला होता, धुवायची कशाला ? – रेलून हातपाय पसरून खुर्चीत बसण्याची त्याची तऱ्हा, आणि ज्याला तो आपलं आयुष्याचं तत्त्वज्ञान म्हणायचा ती अनेक राजकीय - आर्थिक तत्त्वांची खिचडी.
 ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तक्रारी करण्यात रामने पुष्कळ रक्त आटवलं होतं. अर्थात आपल्या बापाच्या कुठल्याही मतांशी प्रतापला काही देणं-घेणं नव्हतंच. फक्त एकदा रामने रागाच्या भरात फारच आरडाओरडा केला तेव्हा तो म्हणाला होता, " मी जसा आहे त्याची तुम्हाला लाज वाटत असली तर मी पुन्हा इथे येणार नाही, आणि मी तुमचा मुलगा आहे म्हणून लोकांना सांगणार नाही." पण तो घरी येतच राहिला. मग एकदा त्याने त्यांची आळशी श्रीमंत म्हणन संभावना केली तेव्हा मात्र ज्योतीन त्याला फटकारलं.
  " आमच्याकडे आज जे सगळं आहे ते आमच्या आईबापांनी मागे ठेवलेलं नाही, त्यातला पैसा न पैसा आम्ही स्वतःच्या कष्टान मिळवला आहे."
 " कष्ट आणि जात, शिक्षण, समाजातलं स्थान ह्यांचे फायदे."
 " त्याबद्दल तू काही आम्हाला दोष देऊ शकत नाहीस. "
 " पण तुमच्या यशात ह्या गोष्टींचा वाटा आहे हे कबूल न करण्याबद्दल मात्र मी जरूर तुम्हाला दोष देतो. तुम्हाला मिळालेलं यश हे तुमच्या कष्टांच्या प्रमाणात नाही, त्याच्या कितीतरी पटीने जास्त आहे. तुमच्याइतकेच किंवा तुमच्यापेक्षा जास्त कष्ट करणाऱ्या कितीकांना तुमच्याचा दहावा हिस्सासुद्धा यश मिळत नाही कारण ह्या इतर गोष्टींचं त्यांना पाठबळ नसतं."
 "कोण उदाहरणार्थ ? "
 " लांब कशाला जा? तुमच्या कारखान्यातले कामगारच."
 " कामगार आम्ही घेतो ते धोके पत्करत नाहीत. आम्ही त्यांना धंद्यात भागीदारी देऊ केली पण त्यांना ती नकोय. धंदा तोट्यात का चालेना, त्यांना त्यांचा सबंध पगार, बोनस, प्रॉव्हिडंट फंड सगळं हवंच. त्यातलं काहीही सोडायला ते तयार नाहीतच, पण संपाच्या धमक्या देऊन वाढवून मात्र घेणार. मग कसलाही धोका पत्करायला जर ते तयार नाहीत तर नफ्यातला भरपूर वाटा त्यांना का मिळावा ?"
 " धोका पत्करणं त्यांना परवडणारच नाही. धंदा चांगला चालला नाही तर ते उपाशी मरतील. तुमचं तसं नाहीये. धंदा जरी बुडला तरी व्यक्तिशः तुम्हाला ते जाणवणारसुद्धा नाही; कारण तुम्ही त्यातनं पुरेसे पैसे काढून स्वतःची आर्थिक स्थिती मजबूत केली आहे."
 " ते अगदी अलिकडे. पहिल्यांदा आम्ही शक्य तेवढे सगळे पैसे धंद्यात टाकत होतो. एकदा अशी वेळ आली होती की वसुलीसाठी बँकेनं आमच्या घरावर, जमिनीवर जप्ती आणली असती तर आमचं सगळंच गेलं असतं."
 प्रताप हसला. " ही अशी आपली तुम्ही स्वतःची समजूत करून घेतलीय. आपल्या आयुष्यात काहीतरी नाट्यमय घडतंय अशी कल्पना छान वाटली. आपलं जादा थ्रिल. ममी, तुला माहीताय बँका तुमच्यासारख्यांवर जप्ती आणत नाहीत. सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ते कशाला मारून टाकतील?"
  राम इतका वेळ गप्प बसून ऐकत होता. तो म्हणाला, " ज्यो, तू कशाला त्याच्याशी निष्कारण वाद घालतेस ? त्यात काही अर्थ नाही हे तुला अजून कळलं नाही का ? "
 " रामचं बरोबर आहे. तुझ्याशी वाद घालणं निष्फळ आहे कारण आमची बाजू समजून घेण्याची तुझी इच्छाच नाहीये. फक्त एकच गोष्ट मला सांगायचीय. तुला जर आमच्याबद्दल असं वाटत असलं तर तू इथे कशाला येतोस ? आम्हाला वाममार्गाने, लायकी नसताना मिळालेल्या संपत्तीचा उपभोग घेऊ नये असं नाही का वाटत तुला?"
 ह्यानंतर मात्र तो बरेच दिवस आला नाही. मग ज्योतीचं मन तिला खायला लागलं. आपण इतकं तोडून बोलायला नको होतं. काही झालं तरी मूलपणा आहे त्याच्यात अजून. त्याचं बोलणं इतकं लावून घ्यायला नको होतं.
 एक दिवस त्याने तिला ऑफिसात फोन केला, जेवायला कुठेतरी भेट म्हणून. खरं म्हणजे तिनं डबा आणला होता, आणि तिला फारसा वेळही नव्हता. तरी ती वेळ काढून गेली. मग हे नेहमीचंच झालं. दर काही दिवसांनी तो फोन करायचा. प्रथम तिनं स्वतःला सांगून पाहिलं की मला भेटायच्या आचेनं तो येतो. पण स्वतःची फसवणूक करणं तिच्या स्वभावात नव्हतं. तो आपल्याला भेटायला येतो तो फक्त पैसे मागायला हे तिला कळून चुकलं. एखाद्या वेळी तिला वाटायचं, त्याने फोन केला की त्याला विचारावं, किती पाहिजेत ? आणि तेवढे पाठवून द्यावे किंवा नेऊन द्यावे. उगीच बरोबर जेवण घेण्याचा देखावा कशाला ! त्याचाही पुन्हा भुर्दंड तिलाच. पण असं करणं तिच्यानं झाल नाही. त्याला खरं म्हणजे त्याच्या गरजांपुरेसा पगार होता. तेव्हा वरच्यावर माझ्याकडून पैसे कशाला मागतोस असं खडसून विचारता आलं असतं पण ते तिनं विचारलं नाही. पैसे कशासाठी हवेत हेही तिनं विचारलं नाही.
 एकदा तिला वाटलं की त्याला काहीतरी ठराविक रक्कम दर महिन्याला द्यावी. पण ती घेऊन वर आणखी पैसे त्यान मागितले नसते याची काही हमी नव्हती. खरं म्हणजे त्याला पैसे द्यायचे हेच तिला पटत नव्हतं. रामला तर मुळीच पसंत पडलं नसतं. तेव्हा ती रामच्या अपरोक्ष, त्याला नकळत हे करीत होती हयाचंही तिला वाईट वाटत होतं. पण पैसे आपण दिले नाहीत तर ते मिळवायसाठी तो कोणते मार्ग काढील याची भीती वाटत होती. पैशांसाठी का होईना, आज तो माझ्याकडे येतो. तेवढाही बंध तुटला म्हणजे कुठे भरकटेल कोण जाणे. तेव्हा ती एखाद्या ब्लॅकमेलरला द्यावेत तसे त्याला पैसे देत राहिली.
 जेवता जेवता प्रतापने विचारलं, "तू ह्या होटेलात कशी काय?"
 " ह्यात काय वाईट आहे ? चांगलं चार होटेलांसारखं होटेल आहे."
  " मी हे वाईट आहे असं म्हटलंच नव्हतं. फक्त तू इथे राहिलीयस ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. म्हणजे हे काही ब्ल्यू व्हॅलीच्या पातळीवर नाही."
 " दर वेळी ब्ल्यू व्हॅलीला जायचा कंटाळा आलाय मला."
 " ममी ! तुला सोनेरी पिंजऱ्यात चक्क कोंडल्यासारखं वाटायला लागलंय ?"
 " तू मला शांतपणे जेवू देणारायस की नाही ?"
 " ठीक आहे, मन लावून जेव. नंतर बोलू आपण."
 " बोलायसारखं काही नाहीच आहे. की तुला काही सांगायचंय खरोखरच ?"
  " म्हणजे ते मुलीबद्दल म्हणतेस? नाही ग. माझ्या आयुष्यात काही सनसनाटी घडतच नाही."
 तो अगदी हात मारून जेवत होता आणि तो लहानपणी जेवणाबद्दल किती कटकट करायचा ते आठवत होतं तिला. तो एकेक घास तोंडात घोळवीत इतका चेंगटपणा करायचा की रोज रामकडून रागवून घ्यायचा. आणि राम ओरडला किंवा त्याने माराच्या धमक्या दिल्या की प्रताप आणखीच सावकाश जेवायचा. रामने खरोखरच हात उगारला की तो ओकारी काढायचा. शेवटी हा रोजचा तमाशा असह्य होऊन ज्योतीनं त्यांच्या जेवणाच्या आधी प्रतापला स्वैपाकघरात नेऊन जेवण भरवायला सुरुवात केली. एकदा रामने ते पाहिलं नि म्हणाला, " भरवतेयस काय त्याला? चांगला तीन वर्षांचा घोडा झालाय." तिनं त्याच्याशी वाद घातला नाही. तिला वाटत होतं की बिचाऱ्या पोराला दिवसभर एकटं ठेवण्याची भरपाई म्हणून काहीतरी करायला पाहिजे. त्याला जेवण भरवल्यामुळे त्याला जर आई आपल्याकडे जास्त लक्ष देतेय असं वाटलं तर कुठे बिघडलं ? शिवाय तो जास्त चांगला जेवायचा पण.
 प्रताप पहिल्यापासूनच हडकुळा, अशक्त, फिकट दिसायचा. दिसायलाही नाजूक होता. इतर मुलांबरोबर बाहेर खेळायला जाण्याऐवजी त्याला घरात बसून वाचायला, रेडिओ ऐकायला आवडायचं. त्याला अंधाराची भीती वाटायची, पळताना पडून गुडघे खरचटले म्हणजे तो रडायचा आणि राम कितीही हॅ:, रडतोस काय, मुलगी आहेस का असं म्हणाला तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नसे. स्मिता प्रतापपेक्षा दोन वर्षांनी लहान होती. ती दोघं एकमेकांपेक्षा इतकी वेगळी होती की त्यांच्याकडे बघून रामला सारखी आपलं स्वप्न आणि सत्य ह्यांच्यातली दरी जाणवायची. स्मिता दिसायला प्रतापइतकी नाजूक नव्हती. त्याच्यापेक्षा काकणभर काळीच आणि दणकट होती. तिला भीती म्हणून कशाचीही वाटत नसे. एखाद्या गेंड्यासारखी मुसंडी मारून पळायची, झाडावर चढायची. जपून कोणतीही गोष्ट करणं तिच्या कोशातच नव्हतं. मग सारखी पडायची. हातापायाला पट्टया, बँडेजं हा तिच्या पोशाखाचा भागच होता. रामने प्रतापला हवेत उडवलं की तो घाबरून किंचाळायचा. स्मिताला उडवलं की तिला मजा वाटायची. ती खिदळून रामला पुन्हा पुन्हा उडवायला लावायची. रामला मुलं लहान असताना त्यांच्याशी खेळायला आवडायचं. पण त्याचं खेळणं जरा धसमुसळंच असायचं आणि प्रतापला त्याची भीती वाटायची. पण त्याला भीती वाटते म्हणून त्याच्याशी जरा जपून खेळावं असं रामला कधी वाटलं नाही.
 तो म्हणायचा, “ त्यांना बनवताना देवाचा घोटाळाच झाला. त्यानं स्मिताला मुलगा करायला हवं होतं."
 " ती जशी आहेत तसं तू त्यांना का पत्करत नाहीस !"
  पण रामला त्यांच्याशी-विशेषत: प्रतापशी- कसं वागायच कळतच नसे. त्यानं त्या दोघांना पोहायला शिकवायचा प्रयत्न केला. स्मिता सहज पाण्यात उतरली आणि भोपळा पाठीला बांधून हातपाय पाण्यावर आपटायला लागली. प्रतापला पाण्याची भयंकर भीती वाटली. थोडे दिवस थांबून त्याला हळूहळू पाण्यात खेळायला लावून त्याची भीती घालवायच्या ऐवजी रामने त्याला एकदम विहिरीत टाकलं. प्रताप नाकातोंडात पाणी जाऊन आणखीच घाबरला. त्याला बाहेर काढून पुन्हा रामने तेच केलं
 शेवटी ज्योती म्हणाली, " राम, तो बिचारा किती घाबरलाय दिसत नाही का तुला? किती छळणारेस त्याला ? अशाने त्याला कायमच भीती बसेल."
 " कधीतरी भीती सोडून तो हातपाय मारायला लागेल. सगळे असंच शिकतात.”
 पण प्रतापची भीती कधीच गेली नाही, आणि शेवटी कंटाळून रामने त्याचा नाद सोडून दिला.
 प्राथमिक शाळा झाल्यावर प्रतापला शिक्षणासाठी पाचगणीला इंग्लिश मीडियमच्या शाळेत घालायचं ही रामचीच कल्पना होती. ज्योतीला ते तितकंस पसंत नव्हतं.
 " त्याला उत्तमातलं उत्तम शिक्षण मिळावं असं तुला नाही वाटत?"
 " अर्थातच वाटतं."
 " मग शिरगावचं हायस्कूल ही सगळ्यात उत्तम शाळा आहे असं तुला म्हणायचंय का?"
 " तसं नाही, पण इतक्या लहान वयात त्याला लांब पाठवायचं म्हणजे जरा जिवावर येतं. थोडी वर्ष थांबलं तर चालणार नाही का?"
 " एवढा काही तो लहान नाहीये. नऊ वर्षांची पुष्कळ मुलं आईबापांपासून लांब बोर्डिंग शाळांत जातात. खरं म्हणजे त्याला एकटं ठेवलं तर बरंच. जरा धीट बनेल. आणि कॉन्व्हेन्ट शाळेत जाणं महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे. अस्खलित इंग्रजी बोलायला यायला पाहिजे. म्हणजे माझ्यासारखं व्हायला नको."
 " तुझं काय वाईट झालंय रे?"
 पण शेवटी तिला माघार घ्यावी लागली.
 एकदा काही वर्षांनी- हा वेळपर्यंत स्मितासुद्धा पाचगणीला शाळेत गेलेली होती - मुलं नाताळच्या सुट्टीनंतर परत शाळेत जायची म्हणून बांधाबांध चालली होती प्रताप रडत होता.
 राम खोलीत येऊन म्हणाला, " रडतोयस? अरे, आता तू मोठा झालास, प्रताप. ती स्मिता बघ. तुझ्यापेक्षा लहान असून ती रडत नाहीये ना ? मग तुला एवढा मोठा असून रडायची लाज नाही वाटत?"
 नंतर तो ज्योतीला म्हणाला, " मला चुकल्याची कबुली द्यायला पाहिजे. तो पोरगा कशानंही घट्ट बनणार नाही. सदा रड्याच राहणार."
 ज्योतीला वाटलं, शेवटी राम हे असंच म्हणणार होता तर मी प्रतापला हट्ट करून इथंच ठेवून घेतलं असतं तरी बरं झालं असतं. म्हणजे दर वेळी हे प्रतापचं रडणं आणि माझ्या मनात कालवाकालव होणं हे तरी टळलं असतं. पण एका तऱ्हेनं झालं हेच बरं. प्रताप इथे राहिला असता तरी सुखानं राहू दिलं नसतं रामनं त्याला. सारखं डिवचलं असतं, प्रत्येक बाबतीत त्याच्यावर टीका केली असती. त्याचं काहीच रामच्या मनाला आलं नसतं, आणि तो सतत रामच्या अपेक्षांच्या आणि अपेक्षाभंगाच्या ओझ्याखाली गुदमरला असता.
 " मग काय प्रकार आहे हा सगळा ?" प्रतापनं विचारलं. जेवण झाल्यावर ती दोघं व्हरांड्यात बसली होती. प्रताप नेहमीप्रमाणे खुर्चीत खाली घसरून पाय पसरून पहुडला होता. डोळे अर्धवट मिटलेले. जेवण अंगावर येऊन सुस्तावल्यासारखा.
  " कसला प्रकार ?" ज्योतीनं पान चघळीत विचारलं.
 प्रतापनं सिगारेट काढून शिलगावली.
 " सिगारेट ओढायला कधीपासून शिकलास?"
 ही एक गोष्ट ज्योतीच्या कधी अंगवळणी पडली नाही. पुष्कळ दिवसांनी सुट्टीला आली की मुलं भेटायची तेव्हा त्यांच्यात एक दम काही बदल जाणवायचा. एकदम उंची वाढलेली वाटायची, केसांचं वळण बदललेलं असायचं, वागण्यात एखादी नवीनच लकब असायची, एखादा नवीन शब्द बोलण्यात वारंवार डोकवायचा. कधीकधी तिला वाटायचं की दरवेळी त्यांच्याशी नव्यानं ओळख करून घ्यायला लागते.
 " पुष्कळ दिवस झाले, " तो म्हणाला.
 " का ? तुला माहीताय ते चांगलं नाही म्हणून."
 " ममी, आता हे सुरू करू नकोस हं मी पुरेसा मोठा झालोय आता, एखादी गोष्ट केल्यामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होतो हे माहीत असूनसुद्धा जाणूनबुजन ती करण्याइतका. तेव्हा आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे बरं टाळाटाळ न करता."
 ज्योतीच्या अगदी ओठावर आलं होतं की तू पुरेसा मोठा असशील पण पुरेसा मिळवता नाहीस. तेव्हा हे महागडं व्यसन तू माझ्या जिवावर लावून घेतलंयस. पण तिला ते काही म्हणवलं नाही.
 " हं, सांग," प्रताप म्हणाला.
 " तू कशाबद्दल बोलतोयस? काय सांगायचं?"
 " ममी, हे जे सगळं घडतंय ते अगदी नॉर्मल आहे असं तुला म्हणायचंय का? एक म्हणजे, तू महाबळेश्वरला आतापर्यंत कधीही एकटी आलेली नाहीस."
 " आतापर्यंत न केलेली गोष्ट पुढे कधीही करू नये असा नियम आहे का?"
 " दुसरं. मी डॅडींना फोन करून विचारलं, की तू कुठे आहेस तर त्याच्याशी तुला काय करायचंय असं चमत्कारिक उत्तर मला मिळालं. तिसरं. तुला शोधीत इथपर्यंत पोचलो तेव्हा मला काय आढळलं? की तू एकटीच इथे हया बेकार होटेलात रहातेयस. सुट्टीवर असल्यासारखी. पण आत्ता सबंध वर्षातली तुमच्या लेखी सर्वांत महत्त्वाची वेळ आहे. आर्थिक वर्षाचा शेवट. आता हया सगळ्या गोष्टी मिळून काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय असं मला वाटलं तर ती काही आश्चर्याची गोष्ट नव्हे. काहीतरी खास आहे, होय ना?"
 "असेल."
 " म्हणजे मला त्याबद्दल प्रश्न विचारायचा हक्क नाही असंच ना?"
 तो दुखावला गेला होता. म्हणजे त्याच्या बिनधास्त आवरणाखाली त्याला काळजी, असुरक्षितता वाटत होती तर. म्हणूनच तो आला होता तिला भेटायला. आईबापांपासून कितीही दुरावला असला तरी त्यांच्या अस्तित्वाचा त्याच्या आयुष्याला एक संदर्भ होता. तो स्वत: बदलला असला तरी हा संदर्भ बदलला नव्हता. आणि तो बदलू नये असंच त्याला वाटत होतं. रामनं त्याला झाडून टाकायचा प्रयत्न केला होता तसाच ज्योतीनं केला. आमच्यातलं नातं हा आमचा प्रश्न आहे, त्यात तू नाक खुपसू नको असाच तिच्या म्हणण्याचा अर्थ होता. पण खरं म्हणजे असं म्हणण्याचा तिला अधिकार होता का ? मुलं झालेल्या माणसांना असतो का?
 ती म्हणाली, "नाही, तसं म्हणायचं नाहीये मला. तुला विचारायचा हक्क आहे, जरूर आहे. फक्त तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. माझ्यापाशी सुद्धा काही उत्तर नाहीये अजून. म्हणूनच मी इथे एकटी आलेय, सगळ्या गोष्टींचा नीटपणे विचार करायला."
 " असं. पण हे झालंय ते का झालं?"
 " आत्ता एकाएकी काही झालं नाही, बरेच दिवस चालू आहे. अनेक गोष्टी मला पटत नाहीत, मी स्वीकारू शकत नाही. प्रताप, हे बघ, आत्ता खरोखरच मला कशाबद्दल बोलावं, ऊहापोह करावा असं वाटत नाहीये. पुन्हा कधीतरी आपण बोलू."
 " ठीक आहे. तुझी मनःस्थिती मी समजू शकतो. मग मी जाऊ आता ?"
 " आलाच आहेस तर आजचा दिवस राहून उद्या का नाहा जात? मी खोलीत तुझ्यासाठी कॉट टाकायला सांगते."
 " ओ. थँक यू ममी. कधी नव्हत ते मला महाबळेश्वरमधे राहायचा चान्स दिल्याबद्दल."
 हे नेहमीचंच. जरा त्याच्याशी सूर जुळतोय असं वाटलं की तो विसंवादी सूर काढणारच. ती रागातच त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिली. हात खिशात, पोक काढून चालणं, रामसारखे दाट काळे केस, पण भरभरीत, विस्कटलेले, कोंडा झालेले. ज्योतीच्या मनात आलं, या मुलांना असं गबाळ रहायला खरंच आवडतं का? की आईबापांना डिवचण्यासाठी केलेल्या गोष्टी कायमच्या सवयी बनून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होतात?
 आणि खरं म्हणजे तो जाता जाता जे उद्गार तिच्या तोंडावर फेकून गेला ते काढायला पुरेसं कारण होतं. महाबळेश्वरला जायचं म्हणजे मुलांना घेऊन ती क्वचितच जात.
 राम म्हणायचा, “आपण कामातून अंग काढून विश्रांती घ्यायला जातो. मुलं बरोबर असली की कुठे विश्रांती मिळते ?"
 " पण राम, मुलं आपल्याबरोबर किती थोडा वेळ असतात. मग ती सुट्टीसाठी घरी आली असताना त्यांना एकटं टाकून आपण कशाला जायचं ?"
 " मुलांना घेऊन जायचं तर जाण्यातच अर्थ नाही. ती भांडतात, रडतात, कंटाळा आला म्हणून तक्रारी करतात, त्यांना होटेलातलं जेवण आवडत नाही. मग आपला सगळा वेळ त्यांना इकडे - तिकडे घेऊन जा, त्यांच्यासाठी खरेद्या कर ह्यातच निघून जातो. म्हणजे तुला तर खरी विश्रांती मिळण्याची सुतराम शक्यता नाही. शिवाय आपण दोघांनीच एकमेकांबरोबर कधी वेळ घालवायचा ? तीनचार दिवसांचा तर प्रश्न आहे. मग आहोतच की आपण घरी."
 आहोत म्हणजे दिवसभर घराबाहेर राहून काम करायला, त्यांच्याबरोबर वेळ घालवायला नाही. पण ती त्याच्याशी फारसा वाद न घालता त्याचा हट्ट चालवून घ्यायची, आणि मग महाबळेश्वरमधला सगळा वेळ तिला अपराधी वाटत रहायचं.
 बाळंतपणानंतर प्रतापला घेऊन घरी आल्यावर दुसऱ्याच दिवशी रामनं तिला विचारलं होतं, “ कामाला कधी सुरुवात करणार तू ?"
 तिला त्याच्या विचारण्याचं जरा आश्चर्यच वाटलं. ती म्हणाली, " लवकरच करीन. बाळाला संभाळायला कोणी तरी पहावं लागेल ना?"
 "एक बाई पाहून ठेवलीय. स्वच्छ नि हसतमुख वाटते मला. तुझी गाठ घ्यायला सांगतो तिला, मग तुला बरी वाटली तर लगेच कामाला लाव, थोड्या दिवसांत सगळं शिकली म्हणजे तुला कामाला सुरुवात करता येईल."
 ज्योतीला वाटलं, आपण कितीही जोराने धावलो तरी राम सदा आपल्यापुढे काही पावलं असतोच. एकीकडून तिला हायसं वाटलं. तिची आई म्हणाली होती, आणखी काही महिने तरी तू काही परत कामाला लागणार नाहीस. तू बघ, राम तुला काम करू देणार नाही. घरी राहून मुलाला संभाळ म्हणेल. पुरुषांचं असंच असतं. ते स्वतः त्या मुलाचं तोंडही पहाणार नाहीत, पण बायकोनं त्याची हेळसांड करता कामा नये. त्यातून मुलगा असला तर विचारायला नको."
 सुदैवाने रामची मतं तिच्या आईच्या अपेक्षेसारखी निघाली नाहीत. महिनेन महिने घरी रहायचं म्हणजे मरणच. पण तरी रामने तिच्या आयुष्याची अशी सगळी आखणी करावी, तिला काही न विचारता बाई बिई बघूनसुद्धा टाकावी हेही तिला जरा खटकलं. मग तिनं स्वतःला समजावलं. ह्यात खटकण्यासारख काय आहे ? तू आपणहून जो निर्णय घेतला असतास तोच त्यान तुझ्यासाठी घेतला तर त्यात तक्रार करायला कुठे जागा आहे ?
 प्रताप तीन आठवड्यांचा असताना अर्धा दिवस आणि दीड महिन्यांचा असताना सबंध वेळ कामाला तिने सुरुवात केली. तो न रडता, हट्ट न करता एकटा रहायचा. पण सुमारे दोन वर्षांचा असताना तो एकदम हट्टीपणा करायला लागला. तिने भरवल्याशिवाय जेवणार नाही म्हणून हटून बसायचा. तिला कितीही उशीर झाला तरी ती घरी येईपर्यंत बाहेरच्या पायरीवर बसून तिची वाट बघत रहायचा. ती घरी आली की तिला जो चिकटायचा तो सोडायचाच नाही. त्याला कडेवर घेऊन तिला इकडे तिकडे करावं लागायचं. अंघोळ करून येते म्हणून खाली ठेवलं की हातपाय आपटून मोठमोठ्याने रडायला लागायचा तो ती मोरीतून बाहेर येईपर्यंत. एरवीसुद्धा एवढंसं मनाविरुद्ध झालं की आक्रस्ताळेपणा करायचा. त्याला एकदम असं काय झालं ते ज्योतीला कळेना. आपण कामाचा वेळ कमी करून त्याच्याबरोबर थोडा जास्त वेळ काढला तर कदाचित तो वळणावर येईल असा ती विचार करायला लागली.
 राम म्हणाला, " मला नाही वाटत तू तसं करावंस म्हणून. एकदा हातपाय आपटून गळा काढला की हवं ते मिळतं असं त्याला समजलं की मग त्याच्या हट्टीपणाला अंतच रहाणार नाही. मग तू त्याच्या लहरीची गुलाम होऊन बसशील."
 " तो फक्त दोन वर्षांचं मूल आहे, राम. तू म्हणजे अगदी तो हे सगळं कळून-सवरून करतोय अशा तऱ्हेनं बोलतोयस."
 " त्याला कळत नाही असं तुला वाटतंय ? काही नाही, मुलांना फार लहानपणापासून ही समज येते. आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी आईबापांना कसं वाकवायचं ते त्यांना बरोब्बर कळतं."
 " पण आईनं आपल्याकडे जरा जास्त लक्ष द्यावं, आपल्याबरोबर जरा जास्त वेळ घालवावा अशी मागणी मुलानं करणं अनैसर्गिक आहे का?"
 " विशिष्ट मर्यादेपर्यंत अशी मागणी अनैसर्गिक नाही. पण तू पहिल्यापासून त्याच्याबरोबर जितका वेळ घालवत असस तेवढाच आता घालवतेस. काही कमी नाही. मग एकदम आताच तो असं का वागायला लागला? काही नाही, तू मुळीच त्याचा हट्ट चालवून घेऊ नको. मग पुढे तुलाच पस्तावायची पाळी येईल."
 कदाचित ह्या वयात सगळी मुलं असं करीत असतील, पण प्रतापचं वागणं आपोआपच हळूहळू निवळलं एवढं खरं.
 राम अर्थातच म्हणाला, " बघ, मी सांगितलं नव्हतं तुला? माझंच बरोबर होतं. मुलांची अधिकारशाही ऐकून घेतली नाही की ती चट सूवळ येतात."
 पण कधी कधी त्याच्या डोळ्याला डोळा देताना ज्योतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं असल्यासारखं वाटायचं. कधी शांत बसला असला तर तो इतर मुलांसारखा आनंदी दिसायचा नाही. मग तिला अपराधाचा उमाळा यायचा. तिला अपराधी वाटतं हे प्रतापला उमजत असलं पाहिजे कारण तो फार लवकर त्याचा फायदा घ्यायला शिकला. एरवी ज्या वयात तिनं त्याला दिल्या नसत्या त्या मनगटी घड्याळ, छोटा ट्रॅन्झिस्टर रेडिओ, कॅमेरा असल्या गोष्टी तो मागण्याचा अवकाश की ती त्याला द्यायची. त्याही रामच्या नकळत. तिला समजत होतं की असं करणं चूक आहे, कारण ते करूनसुद्धा तिची अपराधी भावना नाहीशी होत नव्हतीच. तिला कळत होतं की प्रतापला जे तिच्याकडून मिळत नव्हतं त्याची भरपाई घड्याळ आणि कॅमेऱ्याने होण्यासारखी नव्हती.
 राम म्हणायचा, “ मूल झालं म्हणजे दिवसाचे चोवीस तास त्याच्याच तैनातीत घालवले पाहिजेत असं कुणी सांगितलंय ! मुलं हा आपल्या आयुष्याचा फक्त एक भाग आहे, आपलं सबंध आयुष्यच त्यांना व्यापू दिलं तर काय राहिलं ?"
 प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याची भावनिक गरज वेगळी असते हे रामने कधी समजून घेतलं नाही. पुष्कळ गोष्टी अशा होत्या की त्या त्याने समजून घेतल्या नाहीत. तो आणि मुलं ह्यांच्यात तिची किती ओढाताण व्हायची हे त्याला कधी कळलं की नाही ह्याची तिला शंका होती. कितीदा तरी तिनं त्याच्या नकळत गपचूप अश्रू ढाळले होते, कारण समजा तिला रडताना त्यान पाहिलं असतं तर त्याला पटेल असं रडण्याचं कारण देण शक्य नव्हतं. तो तिच्या विसाव्याचं ठिकाण बनू शकत नव्हता कारण तिचं दु:ख तो जाणू शकत नव्हता. तिच्या मनात आलं, दोघांच्यातला हा अडसर दूर करून त्याला आपल्या वेदनेची जाणीव करून दिली नाही हे चुकलं का ?
 तिनं सुस्कारा टाकला. दोषाचं असं वाटप करता आलं असतं तर किती बरं झालं असतं. मी ह्या अडचणीच्या जागी येऊन पोचलेय कारण मी अमुक वेळी अमुक केलं. किंवा केलं नाही. किवा त्यानं केलं किंवा केलं नाही. पण आयुष्य म्हणजे काही प्रसंगांची तार्किक मांडणी नसते. किंवा असेलही, पण त्यातलं सूत्र फार उशीर होईपर्यंत आपल्याला कळतच नाही. आणि वेळेवर कळलं तरी त्याचा उपयोग काय म्हणा? कारण त्यात काही बदल करणं आपल्याला शक्य नसतंच. सगळ्या दोऱ्या काही आपल्या हातात नसतात.

११



 त्यांच्या आयुष्यातले सगळे बदल घडून यायला मुख्यत्वाने कारणीभूत काय झालं असं विचारलं असतं तर ज्योती बहुतेक म्हणाली असती पुण्याचा फ्लॅट. त्या फ्लॅटमधे रहायला गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी हे नक्की घडलं कसं त्याची संगती लावण्याचा ती प्रयत्न करी.
 पहिल्यांदा रामने नुसती आपली एक कल्पना म्हणून तिच्या समोर टाकली.
 " पुण्याला जाऊन रहाण्याबद्दल तुझं काय मत आहे ?"
  "आपण ?"
 " नाहीतर कोण ?"
 " कंपनी बंद करायचीय का?"
  " गुड गॉड. असलं काहीतरी तुझ्या डोक्यात कुठून आलं "
 नाहीतर मग पुण्याला जाण्याचा अर्थ काय? हे सगळं तिथे हलवणं तर शक्य नाही."
 "अर्थातच नाही. असं बघ. तुला माहीताय इथून कुणाशीही पटकन संपर्क साधणं किती कठीण आहे ते. फोन बहुतेक वेळ चालू नसतातच. आपल्या जवळ रेल्वे नाही, ट्रक पाहिजे त्या वेळी मिळत नाहीत. अशामुळे आपला धंदा दुसऱ्यांच्या हातात जाणार."
  " सगळा धंदा काही जात नाही. आपल्याकडून वीस वर्ष बी घेणारे लोक काही एकदम आपल्याला सोडून जाणार नाहीत. आपलं बियाणं खात्रीचं असतं हे त्यांना माहीत आहे."
 " बियाणं कितीही खात्रीचं असलं तरी ते पेरणीच्या वेळेवर पोचलं नाही तर आपलं गिऱ्हाईक नक्कीच दुसरीकडून खरेदी करील. तुला माहीत आहे, पाऊस पडेपर्यंत डीलर काही बी ऑर्डर करीत नाहीत. ऑर्डर पाठविल्यावर मात्र त्यांना बी ताबडतोब हवं. कारण ते नाही मिळालं तर शेतकरी दुसऱ्यांकडून खरीदणार. तेव्हा आपण जर त्यांची ऑर्डर लगेच पुरी करू शकलो नाही तर ते दुसरीकडे जाणार. आपण ह्या धंद्यात पडलो तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता स्पर्धा इतकी तीव्र आहे की जुने संबंध आहेत म्हणून केवळ आपलं गिऱ्हाईक आपल्याला चिकटून राहील असं मानणं मूर्खपणाचं आहे."
 " समजा, तुझं बरोबर आहे. तरी आपण पुण्याला जाण्याचं काय कारण आहे ? आपण तिथे गोडाउन भाड्यानं घेऊन त्यात माल ठेवू शकतो. एक लहानसं ऑफिस फक्त तिथे ठेवायचं. आपण तिथं गेलो तर इथलं सगळं कोण बघेल ?"
 " आता आपल्या हाताखाली तयार झालेली चांगली माणसं आहेत की आपल्याकडे. आणि आपण येऊन जाऊन असूच."
 " आणि अकाउंट्सचं काय ? तिथे राहून मी कसे ते बघू शकणार?"
 " अर्थातच नाही. ते सबंध खातंच आपण पुण्याला हलवू. तिथे तुला जास्त चांगला स्टाफ पण मिळू शकेल आणि तुझा भार थोडा हलका होईल."
 "राम, हे सगळं इतकं अनपेक्षित आहे. मला जरा विचार करू दे त्याच्याबद्दल. एवढा महत्त्वाचा निर्णय घाईगर्दीने घ्यायला नको."
 " घाईगर्दीने नाहीच घ्यायचा. तू सावकाश विचार कर."
 मग पंधरा दिवसांनी काही कामासाठी ती दोघं पुण्यात आली होती तेव्हा तो म्हणाला, " एक फ्लॅट बघायला चल."
  पुढे अर्थातच तिला उमजलं की त्यानं आधी फ्लॅट बघितला होता. एवढंच नव्हे तर बिल्डरशी बोलून कदाचित करार वगैरेही केला असला पाहिजे. आणि मुळात तिचं मत अजमावण्याचं वगैरे त्यानं जे नाटक वठवलं त्याआधीच पुण्याला जाण्याचा निर्णय त्यानं पक्का करून टाकला असला पाहिजे. हा पहिलाच मोठा निर्णय होता की तो त्यानं तिला विश्वासात न घेता आपणच घेऊन टाकला होता. तरी त्यावेळी काय किंवा नंतर काय त्यानं हा आपला अपमान केला असं तिला वाटलं नाही. हया एकाच निर्णयामुळे त्यांचं आयुष्य मुळापासून ढवळून निघालं, त्याचा चेहराच बदलून गेलाः पण तिला नंतरसुद्धा एवढं मात्र वाटत राहिलं की हा बदल त्या निर्णयाचा अपरिहार्य परिणाम नव्हता. प्रत्येक वळणावर कुठल्या दिशेनं जायचं हे ठरवायला वाव होता आणि प्रत्येक वेळी ठामपणे निर्णय घेऊन रामने दिशा निश्चित केली होती.
 ज्योतीला फ्लॅट प्रथमदर्शनीच आवडला होता. फेअर रोडवर एका नवीनच बांधलेल्या ब्लॉकमधे तो होता. शेजारी त्याच सोसायटीच्या पाच - सहा आणखी इमारती होत्या. पण सोसायटीला मोठं आवार होतं आणि त्यात बरीच झाडं असल्यामुळे इमारतींची दाटी वाटत नव्हती. त्यांचा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर होता आणि तिथून नदीच्या काठची झाडी आणि नदीचा प्रवाह दिसत होता. अर्थात स्वतःच्या प्रशस्त जागेत, शेतावरच्या वस्तीवर रहाणं वेगळंच. पण फ्लॅटमधेच रहायचं तर हा काही वाईट नव्हता. आणि ते कायमचे थोडेच इथे रहाणार होते ?
 " मग, आवडला का तुला?"
 " आवडला रे, पण -"
 " तुझे पण बास झाले."
 ती हसली. " मला म्हणायचंय ते मी म्हणणारच आहे. राम, याची किंमत अवाढव्य असली पाहिजे. मला माहीताहे तू काय म्हणशील, की आज आपल्याला कितीही किंमत असली तरी हा फ्लॅट घेणं परवडेल. ठीक आहे, परवडेल, पण तो घ्यायची गरज आहे का ? त्याच पैशाने आपण इतर काही करू शकू."
 " उदाहरणार्थ काय ? आपण मागे काही ठेवावं अशी आपल्या मुलांची तर नक्कीच अपेक्षा नाही. आधी आपला पैसा अन्यायाने मिळवलाय असं त्यांचं म्हणणं आहे, तेव्हा त्यात त्यांना वाटा नकोच असणार. मग आपण हवा तेवढा खर्च करायला काय हरकत आहे ?"
 ज्योतीची कल्पना ते एक लहानसा फ्लॅट घेऊन त्यात एका भागात ऑफिस नि एका भागात रहायची सोय करणार अशी होती. असला अलिशान दोन बेडरूमचा फ्लॅट तिच्या ध्यानी - मनीदेखील नव्हता. तोही शहराच्या श्रीमंत भागात. तिच्या आईने अर्थात वास्तुशांतीसाठी दिलेल्या पार्टीच्या वेळी हे बोलून दाखवलंच. " तू आता जरी पुण्यात असलीस तरी तुझी भेट आम्हाला दुर्मिळच. तुझ्या नव्या श्रीमंत मित्रमंडळींतून तुला आमच्यासाठी कुठला वेळ मिळणार?"
 " काहीतरीच काय बोलतेस आई ?" ज्योती जरा रागावूनच म्हणाली.
 स्मिता म्हणाली, "तुला राग का आला माहीताय ? कारण आजी म्हणाली ते खरं आहे."
 मुलीनं असलं एखादं वाक्य फेकलं की ज्योती निरुत्तर होत असे. द्यायला उत्तर नाही म्हणून नव्हे, पण अशा विधानातून तिचं आपल्याबद्दलचं मत ऐकून दरवेळी नव्याने धक्का बसायचा म्हणून. स्मितानं आपल्याविरुद्ध आजीची बाजू घ्यावी ह्याचा तिला नाही म्हटलं तरी मत्सर वाटला. मुलं पुण्यात शिक्षणासाठी राहिल्यावर त्यांनी आजीशी संबंध ठेवावा, अशी खास अपेक्षा तिनं काही व्यक्त केली नव्हती. स्मिता अधनंमधनं आजीकडे जाते, सणासुदीला तिकडे जेवते हे ऐकून प्रथम तिला बरं वाटलं होतं.
 ती म्हणाली होती, " पुण्यात तुला एक घर आहे हे बरं आहे नाही ?"
 " हो, आणि आजी आवडते मला. ती सगळीच आवडतात. कशी साधी – सरळ माणसं आहेत. जशी आहेत तशी वागतात. आत एक बाहेर एक नाही. खरीखुरी माणसं.”
 “ आणि मी आणि राम सरळ नाहीयोंत असंच ना?"
 " मी कुठे तसं म्हटलं ? मी तुझ्याबद्दल आणि डॅडींबद्दल काही बोललेच नव्हते. तुला माझ्या बोलण्यातून नेहमी वाकडा अर्थच सापडतो."
 " पण ह्यावेळी तो अर्थ तू ध्वनित केला होतास. हो की नाही ? खरं सांग स्मिता. तू सच्चेपणा, प्रामाणिकपणाबद्दल एवढं अवडंबर माजवतेस. मग ह्या एका वेळेला तरी तू खरं बोल."
 स्मिता फक्त खांदे उडवून गप्प बसली होती. तिचं हे नेहमीचंच होतं. प्रताप वाद घालायचा, भांडायचा म्हणून ज्योतीला त्याचा राग यायचा. पण त्याला तोंड देणं सोपं होतं. जो भांडतो त्याच्याशी भांडता येतं. जो बिनबोलता तुम्हाला गुन्हेगार ठरवून गुन्हयाची शिक्षाही फर्मावतो त्याच्याशी भांडण कसं करायचं ? तू काहीही म्हण वा कर, माझं मत तू बदल शकणार नाहीस असाच तिच्या वागण्याचा अर्थ असे. ती एखादंच वाक्य अधनंमधनं असं काही बोलायची की त्यातनं तिच्या मनातला विखार व्यक्त व्हायचा. पण ते वाक्य पकडून तिच्याशी वाद घालायला लागलं किंवा तिचं बोलणं तर्कदुष्ट किंवा विसंगत असल्याचं माप तिच्या पदरात घालायला लागलं की ती माघार घेतल्यासारखं करून गप्प बसे. प्रत्यक्षात ती माघार नसेच कारण माघार घेणं तिच्या स्वभावात नव्हतं.
 ज्योती तिच्या नव्या आयुष्यात आकठ बुडाली आणि तिची आई म्हणाली ते खरं ठरल. तिला आईकडे जायला सहासहा महिन्यात वेळ होईना. आणि हे फक्त कामामुळेच असं नव्हे. तिला एखाद्या वावटळीत सापडल्यासारखं झालं. पुष्कळ दिवसांनी मागचा विचार करताना तिला उमगलं की वावटळीत सापडलेली ती एकटीच होती. रामने मनात बनवलेल्या आराखड्यानुसारच विचारपूर्वक पावलं टाकली होती.
 सुरुवातीला ज्योतीला आपल्या नव्या आयुष्यात मजा वाटली. शिरगावमधे त्यांची कुणाकडे ऊठबस नव्हती. सोशल लाइफ असं नव्हतंच त्यामुळे पुण्यात आल्यावर नवनवीन लोक भेटणं, त्यांना जेवायला बोलावणं, त्यांच्याशी बी, खतं, पाऊस, दुष्काळ आणि सरकारची शेतीविषयक धोरणं हे विषय सोडून इतर विषयांवर गप्पा मारणं यात ती खूप रस घेत असे. शिवाय नाटकं, सिनेमे, मैफली, पुस्तकं वाचणं हेही तिला आवडायचं. तिच्या आयुष्याला एकदम नवीन परिमाण लाभलं होतं.
 हळूहळू हे बदललं. बदल नक्की कसा घडून आला ते तिला जाणवलं नाही, पण या सगळ्या गोष्टी नुसत्या वेळखाऊ वाटायला लागल्या. त्यात आपण जो वेळ आणि जे श्रम घालवतो ते इतरत्र जास्त चांगल्या प्रकारे कारणी लावता येतील असंही वाटलं. आवडीनं करण्याऐवजी केवळ केलं पाहिजे म्हणून सगळं करता करता आपण ह्यातल्या नाही, बाहेर उभं राहून सगळं अलिप्तपणे न्याहाळतोय असा अनुभव वरच्यावर यायला लागला.
 एक दिवस ऑफिसमधून घरी जाताना रामने फुलांच्या दुकानाशी थांबून एक बराच महागडा गुलाबांचा गुच्छ विकत घेतला.
 " हे कशासाठी ?"
 " आचरेकरला द्यायला. तुला सांगितलं होतं का की त्याला हार्ट ॲटॅक आलाय म्हणून ? "
 " आपण त्यांना भेटायला जाणार आहोत ?"
 " हो."
 " राम, त्यांची आपली कुठे इतकी ओळख आहे ?"
 " अगं, ह्या गोष्टी नुसत्या रीत म्हणून करायच्या. हजेरी लावून यायचं. बास.”
 " इतक्यात व्हिजिटर्सना भेटायची परवानगी तरी आहे का?"
 " आजच दिली आहे."
 राम त्या स्पेशल रूममधे जाऊन गंभीर दुखणं झालेल्या माणसाशी एक खोटाखोटा खेळकर आवाज काढून बोलतात तसं अर्धा तास बोलत बसला. मग आचरेकरांच्या बायकोला त्यानं, " वहिनी, काहीही जरूर पडली तर फोन करायला संकोच करू नका हं, अगदी रात्री अपरात्री सुद्धा " असं सांगितलं. हे सगळं ज्योती जवळजवळ अक्षरशः आ वासून पहात होती. मनात तुलना चालली होती कदमशी आणि त्याला जिथे ठेवलं होतं त्या वॉर्डाशी. कदम त्यांच्या कारखान्यात फोरमन होता. बी सुकवण्याच्या यंत्राच्या पट्टयात सापडून त्याच्या हाताचा चेंदामेंदा झाला होता. इन्शुरन्स कंपनीकडून पैसे येणारच होते. त्याव्यतिरिक्त रामने त्याच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी आणि नंतर हाताच्या ऑपरेशनसाठी सढळ हाताने पैसे दिले. पण तो काही कदमला भेटायला हॉस्पिटलमधे गेला नाही. ज्योती जाऊन भेटून आली. ती फळं, मिठाई घेऊन गेली, थोडा वेळ बसून बोलून तिने त्याला नि त्याच्या बायकोला धीर दिला, राम टूरवर गेलाय तो परत आला की येईलच भेटायला, असं खोटं सांगितलं.
 राम म्हणाला होता, " मला ह्या असल्या प्रसंगात काय बोलावं, काय करावं कळतच नाही ग. नुसतं तिथे जाऊन त्याच्या तोंडाकडे बघत बसायचं तर जाण्यात तरी काय अर्थ आहे ?"
 एकदा प्रताप खूप आजारी होता तेव्हा रामची घालमेल होत होती. तो सारखा म्हणे, "आपण त्याला पुण्याला घेऊन जाऊ. चांगल्या हॉस्पिटलमधे ठेवू."
 " हॉस्पिटल कशाला? एवढं काही झालं नाही त्याला."
 " अग, पण किती ताप आहे ! "
 " इथल्या डॉक्टरांनी तपासलाय त्याला. ते म्हणाले काळजी करायचं कारण नाही, मुलांचं टेंपरेचर एकदम चढतं."
 " त्यांना काय कळतंय ? "
  " का कळू नये ? उण्यापुऱ्या वीस वर्षाच्या प्रॅक्टिसचा अनुभव आहे. त्यात त्यांनी शेकडो मुलं तपासली असतील."
 " बघ तू. पण मला अजून वाटतं तू त्याला पुण्याला घेऊन जावंस."
 मग ज्योतीला एकदम समजलं की ही केवळ प्रतापच्या प्रकृतीबद्दल काळजी नव्हती. त्याबरोबरच तो आजारी मुलगा आपल्या दृष्टीआड व्हावा अशी निकड होती. आजाराशी जवळचा संबंध हा त्याला जीवघेणा अनुभव वाटे. त्याच्या वडिलांच्या शेवटच्या आजारात ज्योती नि आत्याबाईंनी मिळून त्यांचं सगळं केलं. राम फक्त दिवसातनं दोनतीनदा डोकवायचा न विचारायचा, " बाबा, आज कसं काय वाटतंय? काही हवंय का ? " आणि म्हातारा म्हणायचा. " आज बरं वाटतंय." आणि " काही नकोय. अक्का न ज्योती सगळं अगदी प्रेमानं करतात हो माझं."
 गाडीत बसता बसता ज्योती म्हणाली, " राम, हे सगळं तू करतोयस ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये."
 " का बुवा ?" त्याच्या आवाजात खरंखुरं आश्चर्य होतं.
 " तुला आजारी लोकांना भेटायला जायचा नेहमी कंटाळा असे."
  " असं तुला का वाटायचं मला कळत नाही."
 " शिवाय तुला लग्नं, मर्तिक ह्यांना जायचाही कंटाळा असे नि ते तू शक्यतो टाळायचास."
 " मग मी बदललोय म्हण. किंवा परिस्थिती बदललीय. मी आजारी मित्रांच्या समाचाराला किंवा लग्नांना जायला तुझी काही हरकत आहे का? मला वाटलं मी ह्या गोष्टी उत्साहाने करीत नाही अशी तुझी तक्रार असायची."
  ज्योतीचं तोंड बंद झालं. तिनं अनेकदा त्याला असं बोलून दाखवलं होतं. तो आता आपली नवी भूमिका अगदी समरसून करीत होता आणि स्वतःकडे अलिप्तपणे पाहणं त्याला कधीच जमलं नव्हतं तेव्हा आपण आपल्या कल्पनेत जसे आहोत तसंच इतरांनी आपल्याला स्वीकारलं पाहिजे अशी त्याची साहजिकच अपेक्षा असे. पण यासाठी जी मानसिक कसरत करावी लागे ती ज्योतीला कधी कधी फार जड जाई. डझनभर निरनिराळ्या क्षेत्रांतल्या व्यक्तींशी कंटाळा न येता संभाषण करू शकणारा एका डायरीत असंख्य जणांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस वगैरेंची नोंद ठेवून त्या त्या तारखांना त्यांना शुभसंदेश किंवा छोट्यामोठया भेटी पाठविणारा, अगदी गंभीरपणे त्या अमक्याला एकदा जेवायला बोलावलं पाहिजे, इंपोर्ट लायसेन्सचा काही वांधा झाला तर तो आपल्या उपयोगी पडेल, असं म्हणणारा हा राम तिला काही ओळखीचा वाटेना. तिला वाटायला लागलं की त्याचे संबंध माणसांशी नसून ती माणसं कोण आहेत याच्याशी असतात. त्यांच्या नव्या मित्रमंडळींपैकी प्रत्येकजण त्याच्या क्षेत्रातलं किंवा समाजातलं उच्च स्थान किंवा महत्त्वाच्या राजकारण्यांशी असलेली घसट किंवा एखादी खास कला किंवा गुण ह्यांसाठी मुद्दाम पारखून जोडलेला होता हे आपल्या फार आधीच कसं लक्षात आलं नाही ह्याचं, एकदा लक्षात आल्यावर ज्योतीला नवल वाटलं.
 एकदा ती वैतागून म्हणाली, " सारखं सारखं काय कुणाकडे तरी जेवायला जायचं किंवा कुणाला आपल्याकडे बोलवायचं ? अधनंमधनं आपण दोघंच शांतपणे घरी बसलो तर काय होईल?"
 " ज्यो, मला वाटलं तुला हे आवडतं."
 " आवडतं, पण-"
 " आवडतं ना? मग झालं तर. तू आनंदात असावंस एवढीच माझी इच्छा आहे."
 राम असल्या गोष्टी अगदी मनापासून म्हणे. पण ते आपलं नुसतं म्हणायचं म्हणून की तसं त्याला खरंच वाटायचं म्हणून हे तिला कळलं नव्हतं. तिला फार वाटायचं की त्याला सांगाव, " राम, हा खरा तू नाहीस. तू जसा होतास तसाच मला हवास. तुझ्यातल्या बऱ्याच गोष्टींबद्दल मी कुरकुर करायची खरी, पण तझा सगळा खरखरीतपणा घासून घासून हे अगदी गुळगुळीत व्हावास अशी काही माझी इच्छा नव्हती." पण हे शब्द तिच्या ओठांतून कधी उमटले नाहीत. शेवटी काय, कुणी माघारी फिर म्हटलं तर फिरू शकतं का ? राम तर नाहीच नाही. तो एकदा म्हणाला होता, "चाकोरीत अडकण्यापूर्वीच पुढला टप्पा गाठायला निघालं पाहिजे."

१२



 होटेलच्या व्हरांड्यावरच्या आरामखुर्चीवर ज्योती पहुडली होती. डोळे मिटलेले, शरीर सैलावलेलं, पुस्तक चार ओळी वाचून पोटावर उपडं ठेवलेलं. तिला स्वत:चंच नवल वाटत होतं. कसल्या जबाबदाऱ्या नाहीत, कसले ताणतणाव नाहीत अशी सुट्टी आतापर्यंत कधी अनुभवल्याचं तिला आठवत नव्हतं. आणि ह्या मुक्ततेचा ती पुरेपूर आस्वाद घेत होती.
 तिच्या मनात आलं, सगळं दोघांनी मिळून करणं चूक आहे का? असा प्रश्न तिनं कधी स्वत:ला विचारला नव्हता, पण तरी तिच्या मनात खोल कुठेतरी असा विचार होता की एवढं सगळं काम मी स्वतंत्रपणे केलं असतं तर मला त्याचं स्वतंत्र श्रेय मिळालं असतं. आता जरी राम तिला श्रेय देत असे, अगदी सढळपणे देत असे, इतरांसमोर मुद्दाम तिच्या सहकार्याचा उल्लेख करीत असे, तरी ते तेवढ्यापुरतंच रहायचं. जगाची रीत वेगळी असल्यामुळे रामखेरीज दुसरं कुणी हा उल्लेख फारसा मनावर घेत नसे. त्यांचे कौतुकभरले कटाक्ष म्हणायचे, किती छान ! नवऱ्याला त्याच्या कामात अशी मदत करायला पाहिजे. म्हणजे ती एका बायकोचं कर्तव्य अतिशय उत्तम तऱ्हेनं बजावीत होती. एवढंच. ह्यापलिकडे तिच्या कामाची किंवा तिची स्वतःची किंमत नव्हती.
 ती शेतावरच्या गडी-बायांचे पगार करायची तेव्हा बायांना आपले पगार आपल्या नवऱ्यांच्या हातात दिलेले चालायचं नाही ह्याची ज्योतीला प्रथम गंमत वाटायची. मग असं का, ह्या बायांना असं करण्याची गरज का वाटते ते तिला कळत गेलं. आपल्या कष्टाचं फळ आपल्या हातात आलं पाहिजे हा आग्रह म्हणजे आपण स्वतंत्र आहोत हे ठासून सांगण्याचा एक मार्ग होता. नवऱ्याकडून शिव्या किंवा प्रसंगी मार खाणाऱ्या बाईने हा आग्रह धरण्याला एक विशिष्ट अर्थ होता. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे निम्मी लढाई जिंकणं. पण इथेही काही नवरे मारपीट करून किंवा धाकदपटशा दाखवून ह्या बायकांकडून पैसे काढून घ्यायचे. मग एखादवेळी पगारवाढ मिळाली की ह्या बायका ती मिळाल्याच नवऱ्यांना कळू देत नसत, आणि मिळालेला जादा पगार ज्योतीकड ठेवायला द्यायच्या अडीअडचणीला लागले तर असू देत पैसे म्हणून.
 ज्योतीला वाटलं, ही अक्कल माझ्यासारख्यांना का असू नये ! पहिल्यापासून तिनं पगार घ्यायला हवा होता पुढे ती घ्यायला लागली, पण तो हक्क म्हणून न घेता इन्कमटॅक्स खात्याला चकवण्यासाठी होता. आधीपासून खरं म्हणजे रामने ही कल्पना मांडली होती, पण तिनं ती धुडकावून लावली होती. स्वत:च्याच शेतावर आणि कंपनीत काम करण्यासाठी कसला पगार घ्यायचा? आता बायका घरकामाबद्दल, स्वतःचंच मूल संभाळण्यासाठीसुद्धा पगार मिळाला पाहिजे असं म्हणत होत्या. ते का ते तिला कळत होतं. ती जेव्हा आमची शेती, घर, कंपनी असं म्हणायची तेव्हा ती खरी रामची शेती, रामचं घर, रामची कंपनी होती हे तिला पुरं माहीत होतं तिनं रामला सोडल तर त्याबरोबरच हे सगळंही तिला सोडावं लागणार होतं. आणि ह्याचं एकमेव कारण म्हणजे तिनं आपलं आयुष्य रामच्या आयुष्यात बेमालूम मिसळून टाकलं होतं. तिनं जर दुसऱ्या कुठेतरी नोकरी केली असती तर आज रामला सोडल्यावर ती तरी नाहीशी झाली नसती.
 तिला अमरची आठवण झाली. आज खास आठवण व्हायचं कारण म्हणजे तो एकदा म्हणाला होता, "तुम्ही दोघं संपूर्ण आणि आदर्श जोडीदार आहात, कारण तुमच्यापैकी एकाचा विचार न करता दुसऱ्याचा करणं शक्यच नाही." हे ऐकून ती सुखावली होती. जणू हे तिचं कर्तत्व होतं आणि त्याबद्दल तो तिची प्रशंसा करीत होता. पण ह्यात तिचं असं कर्तृत्व नव्हतंच. जे जसं घडलं ते तसं तिनं घडू दिलं एवढंच. अमरचं मूळ विधान मात्र अचूक होतं. तिची आणि रामची भागीदारी परिपूर्ण होती कारण त्यात ती दोघं कार्यक्षम आणि आनंदीही होती, एकमेकांना पूरक होती.
 पण मग आता नक्की काय बदललं होतं ? वयामुळे, कामाच्या व्यापामुळे त्यांच्या नात्यात जे अटळ बदल झाले होते ते सोडले तर दुसरं काही बदललं होतं का? विनी एकदा म्हणाली होती, "लग्नाची गंमतच असते. आपण एका पुरुषाबरोबर वीस वर्ष राहतो, संसार करतो, दोन पोरं वाढवतो. हे करता करता दैनंदिन आयुष्यातल्या क्षुल्लक तपशिलातच इतक्या बुडून जातो की आपण एखादा काही संस्कार न झालेला अचेतन गोळा आहोत असं आपल्याला वाटायला लागतं. आणि मग शेवटी आपली काहीतरी फसगत झालीय, काहीतरी महत्त्वाचं आपल्या हातून सुटून गेलंय अशी खात्री होते. हे आपण का करतो? कशासाठी आपण सगळ्यावर पाणी सोडतो? तो पुरुष त्याचं काम, त्याचे मित्र. त्याचा क्लब या सगळ्यांतून आठवण झाली की आपल्यासमोर फेकतो त्या भाकरीच्या तुकड्यासाठी ? कारण हयात प्रेमाबिमाचा काही भाग नसतो. प्रेम नावाच्या गोष्टीला पुरुषाच्या विश्वात काही स्थान नसतं."
 ज्या माणसाबरोबर वीस वर्ष संसार केला त्याच्याविषयी इतकी कटुता ? ज्योतीला हे ऐकून धक्काच बसला होता. अतुल आणि विनी हे एक बऱ्यापैकी सुखी जोडपं आहे अशी तिची कल्पना होती. विनी ही तिच्या मैत्रिणींच्यात सगळ्यात जास्त बडबडी, हसरी, उत्साही बाई होती. आपण स्वतः जशा आहोत अशी ज्योतीची कल्पना होती त्याच्या ती अगदी उलट होती. गोरी, गोल-गुबगुबीत, सदा मोठमोठ्याने हसणारी. भडक कपडे घालून तोंडाला भडक रंग फासणारी. अशा बाईला अचेतन गोळयासारखं वाटत होतं आणि आपल्याला वैवाहिक आयुष्यात जे हवं होतं ते न दिल्याबद्दल ती आपल्या नवऱ्याला दोषी धरीत होती. ज्योतीला असा जीवनानं चकवल्याचा अनुभव कधीच आला नव्हता. आपण सामान्य, कुरूप, सर्वस्वी अनाकर्षक आहोत अशी तिची पहिल्यापासून कल्पना असल्यामुळे तिच्या जीवनाबद्दलच्या अपेक्षा फार मामुली होत्या, आणि म्हणून तिला जे काही मिळालं ते म्हणजे एक अलौकिक चमत्कार आहे असं म्हणून तिन स्वीकारलं.
 विनीनं असं म्हटल्यावर तिनं विनीला विचारलं होतं, " तुला हे असं वाटतं असं तू अतुलला कधी बोललीयस ?"
 विनी हसली. " त्याचा विश्वासच बसणार नाही. त्याला वाटल माझं डोकंबिकं फिरलंय एकाएकी. त्याच्या मते मी अतिशय सुखी आहे, आणि नाही याचा पुरावा हातात आला तरी तो त्याला खोटाच समजेल."
 रामनेही तेच केलं नव्हतं का? की आपण सगळेचजण असे असतो, आपल्याला ज्याच्यावर विश्वास ठेवायचाय त्याच्यावरच ठेवतो आणि त्या विश्वासाला तडा जाणाऱ्या गोष्टी बघायला, ऐकायला नकार देतो?
 पुन्हा ती अमरबद्दल विचार करायला लागली. तो त्यांना जसा वाटला तसा कधी नव्हताच का ? पण असं कसं शक्य आहे ? मग काय तो एकदम ओळखसुद्धा येऊ नये इतका बदलला ? त्याचीही शक्यता कमीच.
 रामने सेल्समनसाठी जाहिरात दिली होती. त्या नोकरीसाठी अमरचा अर्ज आला होता. अर्जातल्या तपशिलावरून आणि मुलाखतीनंतर शेकडो अर्जदारांतनं तो उठून दिसला होता. हुशार होता, उत्साही होता, बोलताना विनाकारण बुजरेपणा वगैरे न करता नीट सरळ डोळ्याला डोळा देऊन बोलत होता, आत्मविश्वासाने वागत होता. त्याला मराठी, इंग्रजी आणि थोडंसं कानडी येत होतं. हया क्षेत्रातला काही अनुभव नसूनसुद्धा रामने त्याला सहा महिने उमेदवारीवर नेमलं. पण त्यावेळीच त्याला माहीत होतं की अमरची काम करण्याची इच्छा असली तर त्याची कायम नेमणूक नक्की होती. इतका चांगला माणूस मागून मिळणार नव्हता.
 अमरने एक खोली भाड्याने घेतली. शेजारची एक बाई त्याला डबा पाठवायची. स्वतः करून खायच्या भानगडीत तो पडला नाही. स्टाफशी बरोबरीच्या नात्याने वागायचं नाही असा रामचा नियम होता, पण अमरचा अपवाद करून ज्योतीनं त्याला जेवायला बोलावलं. त्यांच्याकडे काम करणाऱ्या इतरांसारखा तो नाही हे लगेचच राम आणि ज्योतीला कळून चुकलं. त्याच्याशी गप्पा मारण्यात त्यांचा वेळ इतका मजेत गेला की ज्योती त्याला वारंवार बोलवायला लागली. त्याला म्हणण्यासारखं कुटुंब असं नव्हतंच. आईबाप लहानपणीच मरून गेले होते आणि एका चुलत्याकडून दुसऱ्याकडे असं करीत तो वाढला. ज्यांनी त्याला सांभाळलं त्यांनी ते केवळ कर्तव्यबुद्धीनंच केलं, त्याच्याबद्दल विशेष आच होती म्हणून नव्हे. आणि तो एकदा आपल्या पायावर उभा राहिल्यावर ते हात झटकून मोकळे झाले होते.
 स्मिताचं त्याच्याशी अगदी सूत जमलं. ती सुट्टीला घरी आली असताना तो तिला पत्त्याचे खेळ शिकवायचा, दिवाळीचे कंदील बनवून द्यायचा, जादूचे खेळ कसे करायचे ते दाखवायचा. एक वेळ अशी होती की ज्योती तो आपला जावई होऊन धंदा चालवायला घेईल अशी स्वप्नं पहात होती.
 प्रतापला मात्र अमर मुळीच आवडत नसे आणि आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटतं ते लपवण्याचे श्रम तो कधी घेत नसे. त्याच्याशी तुसडेपणाने वागायचाच, आणि त्याच्या पाठीमागे संधी मिळाली की त्याच्याबद्दल कुत्सितपणे बोलायचा. एकदा तो सुट्टीला आला असताना अमर आठवडाभर आला नाही तेव्हा तो म्हणाला, " तुमचा लाडका मुलगा कुठेय ? नाही, आठवडाभर दिसला नाही म्हणून विचारतोय."
 " तो कुठेय ह्याची खरंच तुला फिकिर असली तर तो टूरवर गेलाय."
 " तरीच. म्हटलं एक सबंध आठवडाभर फेरा इकडे कसा वळला नाही ? "
 " त्याच्या इथे येण्यानं तुझं काय बिघडतंय रे? "
 " आपल्या फॅमिली लाइफवर त्याचं अतिक्रमण होतं."
 " तुला फॅमिली लाइफबद्दल इतकी आस्था कधीपासून उत्पन्न झाली?"
 सुट्टीतला बराचसा काळ प्रताप कुठेतरी सहलीला जाणं, मित्रांकडे रहाणं वगैरेत खर्चायचा. घरी आलाच तरी बहुतेकदा एकटाच भटकायला जाई किंवा कोपऱ्यात वाचत बसे. बसून सगळ्यांबरोबर गप्पा मारल्या असं सहसा कधी करीत नसे. अर्थात एका परीने हे बरंच होतं कारण गप्पांतून राम आणि प्रतापचा कशावरून तरी वितंडवाद सुरू व्हायला वेळ लागत नसे. पण आहे ह्या परिस्थितीत त्याला फॅमिली लाइफबद्दल बोलायचा मात्र हक्क पोचत नव्हता.
 तो म्हणाला, " मला आस्था आहे की नाही हे तुला काय माहीत ? तू दिवसाचे तास दोन तास तर घरी असतेस. मग अमर असतोच आणि तुम्ही सगळे मिळून कामाबद्दलच बोलता. मग मला कशाबद्दल आस्था आहे ते कळून घ्यायला वेळ कधी असतो तुला?"
 " हा मात्र अन्याय आहे हं, प्रताप. तुला ज्यात रस आहे अशा कोणत्याही विषयावर बोलायला तुला कुणी मज्जाव केलाय का?"
 " कुणीतरी परका माणूस सदैव समोर असताना मला नाही मोकळेपणानं बोलावंसं वाटत."
 " अमर काही आता परका राहिला नाहीये. आपल्या कुटुंबातलाच एक झालाय. तो हुशार आणि चांगला मुलगा आहे. त्याच्याशी जर मैत्री करायचा प्रयत्न केलास तर तुझं त्याचं चांगलं जमेल."
 " मला माहीताय मी त्याच्यासारखा असायला पाहिजे होतो असं तुम्हाला पदोपदी वाटत असणार."
  त्याच्या डोळ्यात आव्हान होतं, पण त्या आव्हानामागे तो तिची विनवणी करीत होता, तिच्याकडून आश्वासन मागत होता. तिच्या ओठावर आलं होतं, प्रताप, तुला त्याचा मत्सर का वाटतो ? तू माझा मुलगा आहेस. तो तुझी जागा कशी घेऊ शकेल ? पण शब्द काही तिच्या तोंडून बाहेर पडले नाहीत. ती फक्त म्हणाली, 'वेड्यासारखं बोलू नको."
 तो एकदम उसळून म्हणाला, " वेडा मी नाहीये. वेडे तू आणि डॅडी आहात. तुम्ही त्याचं एवढं स्तोम माजवता कारण तो तुमची खुशामत करतो, दुसरं काही नाही. तुम्ही इतके आंधळे आहात की त्याचं देखणं थोबाड आणि सफाईदार वागण्यापलिकडे तुम्हाला काही दिसत नाही."
 " त्याची बदनामी करण्याचं काही कारण नाही. त्याची कामातली हुशारी त्यानं सिद्ध केलीय. केवळ चार वर्षांत त्यानं कंपनीची विक्री दुप्पट केलीय. त्याचा काम करण्याचा उत्साह नवनव्या कल्पना हयांच्यामुळे सबंध सेल्स खात्यात त्यानं चैतन्य आणलं. त्याच्यासारखा माणूस मिळाला हे आमचं मोठं सुदैव. "
 पुढे ते पुण्याला गेल्यावर अमर जरी येत – जात राहिला तरी प्रतापचा नि त्याचा फारसा संबंध येत नसे. त्यामुळेच की काय, प्रताप त्याच्याबद्दल बोलत नसे. पण त्याने तो विषय सोडून दिला नव्हता हे एकदम बऱ्याच दिवसांनी ज्योतीला कळलं.
 त्यानं विचारलं, "अमरनं आपल्या कुटुंबाबद्दल जे सांगितलं त्याचा खरेपणा तुम्ही कधी पडताळून पाहिलाय ? त्यानं तुम्हाला वाट्टेल ते खोटेनाटं सांगितलंय."
 प्रतापनं हेरगिरी करून अमरबद्दल कुठूनतरी माहिती काढण्याचे कष्ट घ्यावे याचं तिला आश्चर्य वाटलं आणि रागही आला.
 ती म्हणाली, " त्याचं व्यक्तिगत आयुष्य हा त्याचा खाजगी मामला आहे."
 " मग त्याबद्दल काही बोलूच नये. खोटं कशाला सांगायचं ? आणि ह्या बाबतीत जर त्यानं खोटेपणा केलाय तर इतर बाबतीत कशावरून नसेल केला? "
 " कुठल्या बाबतीत ?"
 " ते मला काय माहीत ? कुठल्याही बाबतीत शक्य आहे."
 तिनं जरी अमरचा कैवार घेतला होता तरी प्रतापच्या बोलण्यामुळे तिच्या मनात संशयाचं बीज रोवलं गेलं होतं.
 ती रामशी बोलली तेव्हा तो म्हणाला, " तू प्रतापचं बोलणं काय मनावर घेतेस ? त्याला अमरचा हेवा वाटणं साहजिक आहे कारण तो जे जे होऊ शकत नाही, करू शकत नाही ते सगळं अमर होऊ शकतो, करू शकतो. प्रतापनं आयुष्यात काय केलंय?"
 " असं मात्र तू म्हणू शकत नाहीस, राम. केवळ तुला जे हवं ते त्यानं केलं नाही म्हणून-"
 " त्यानं अमुकच करावं असं माझं मुळीच म्हणणं नाही. तो माझ्या धंद्यात काही रस घेत नाही म्हणून एकेकाळी मला वाईट वाटायचं. आता नाही वाटत. मुलानं बापाच्या धंद्यातच लक्ष घालावं असं नाही हे मला पटू शकतं. पण त्यानं कशात तरी मन घालावं, काहीतरी करून दाखवावं अशी अपेक्षासुद्धा अती आहे ! त्यानं काहीही केलं तरी मला चालेल. शिक्षक व्हावं, गायक व्हावं, सुतार व्हावं. पण ज्या क्षेत्रात जाईल तिथे नाव मिळवावं. मला त्याचा अभिमान वाटेल. पण त्याला काही करायचंच नाहीये. त्याला आयुष्यात काही ध्येय नाही, कसली महत्त्वाकांक्षा नाही. अगदी नुसतं स्वतःचं पोट भरावं इतकीसुद्धा नाही."
 " लहान आहे रे तो अजून."
 " पंचवीस वर्षांचा म्हणजे लहान ? त्याच्यापेक्षा अमर काही फारसा मोठा नाहीये."
 " अमरची गोष्ट वेगळी आहे. त्याला लहानपणापासून स्वतःच्या पायावर उभं रहायची गरज होती."
 " हं. तिथेच चुकलं माझं. मी तुझं ऐकायला नको होतं. सुट्टीत घरी आला की काहीतरी काम करायला लावायला हवं होतं. बी. एस्सी. झाल्यावर निदान पार्टटाइम नोकरी केली पाहिजे असा आग्रह धरायला पाहिजे होतं. त्याच्याकडून कसलीच अपेक्षा न धरता त्याला पैसे पुरवल्यामुळे त्याच्या आळशीपणाला उत्तेजन दिल्यासारखं झालं."
 " तो काही निरुद्योगी नव्हता इतकी वर्ष."
 " निरुद्योगीच नाही तर काय ? एका विशिष्ट मर्यादेपलिकडे - शिक्षण घेत बसणं म्हणजे आयुष्यातल्या जबाबदाऱ्यांपासून पळून जाणंच आहे."
 " तो संशोधन करतोय."
 " संशोधन ! कसलं संशोधन ? तुला माहीताय कशावर संशोधन करतोय ? तो कधी बोलतो त्याबद्दल ? ज्याला एखाद्या विषयात वर्षानुवर्ष संशोधन करण्याइतकी गोडी आहे तो त्याबद्दल काहीतरी बोलणार नाही ? काही न करण्यासाठी ती सबब आहे नुसती, दुसरं काही नाही. तू अमरशी तुलना करू नको पाहिजे तर, स्मिताशी कर. ती त्याच्यापेक्षा लहान आहे, अजून कॉलेजात शिकतेय. पण ती स्वतःपुरतं मिळवण्याची धडपड करते, नुसता आपल्यापुढे हात पसरत नाही."
 " ती वेगळी आहे. सगळ्यांना एकच निकष लावून कसं चालेल?"
 " तेच मी म्हणतोय. ती वेगळी आहे, स्वतंत्र वृत्तीची आहे. तिचं सगळं भंकस साम्यवादी तत्त्वज्ञान मला पटत नाही, पण तरी तिच्याबद्दल आदर वाटतो कारण ती दुसऱ्याच्या जिवावर आयतोबासारखी जगू पहात नाही."
 ते नेहमीच्या युद्धभूमीवर येऊन ठेपले होते. इथे दोन शत्रूसैन्यांच्या मधे ती सापडायची. राम आणि मुलं, राम आणि कंपनीतले कामगार. त्यांनी भांडायचं, शिव्या द्यायच्या. मन मानेल तसे आरोप करायचे, आणि तिनं एकाला पाठीशी घालायचं, एकाचं दुसऱ्याला पटवून द्यायचा प्रयत्न करायचा, एकाची समजूत घालायची, दुखावलेल्या अहंकारावर फुंकर घालायची. ती स्वतःला सांगायची की एक दिवस मी मधे पडायची थांबणार आहे. त्यांना एकमेकांची डोकी फोडायचीत ना ? मग फोडू दे. मी काही त्यांना थांबवायचा प्रयत्न करणार नाही. नुसती बाजूला बसून प्रेक्षकाचं काम करणार आहे.
 म्हणून तिला अमर घरी आलेला आवडायचा. तो असला म्हणजे काही ताणतणाव नसायचे. तिचे पाय जमिनीवर रोवलेले असल्यामुळे प्रताप किंवा स्मिता अमरच्या जागी असते तर असा कल्पनाविलास तिनं कधी केला नाही. ती दोघं जन्मताना जे गाठोडं घेऊन आली होती त्याच्यामुळे म्हणा, किंवा त्यांना ज्यांनी आकार दिला त्या माणसांमुळे म्हणा, जशी होती तशी झाली होती. ती तशी होणं हे अटळ होतं. मग त्याचमुळे अमरला रामच्या आयुष्यात विशिष्ट स्थान प्राप्त होणं अटळ होतं. आणि ह्याची तार्किक परिणती म्हणजे अमर जसा होता तसा होता म्हणून त्याने ह्या गोष्टीचा फायदा उठवणं अटळ होतं.
 प्रकरणाची सुरुवात एका निनावी पत्राने झाली. निनावी पत्रं ही केराच्या टोपलीत फेकून देण्यासाठी असतात असं रामचं मत होतं. पण हे पत्र नेहमीच्या निनावी पत्रांपेक्षा वेगळं होतं. नेहमी असे पत्रलेखक विनाकारण पाल्हाळ लावीत, पुनःपुन्हा तेच तेच लिहीत, आणि काहीतरी अतिशयोक्त आरोप करीत. हे पत्र थोडक्यात, मुद्देसूद होतं आणि जो आरोप केला होता तो सहज विश्वास बसण्यासारखा होता. आरोप ज्या माणसाविरुद्ध होता तो असं काही करील ह्यावर विश्वास बसत नव्हता पण पत्राचा एकूण सूरच असा होता की त्याने रामला पत्राची दखल घेण भाग पडलं. ज्योती आणि तो न कळवता अचानक कर्नाटकातल्या कंपनीच्या हेडक्वार्टर्सला गेले आणि अमरच्या गुन्हयाबद्दल काही संदेह राहू नये इतका पुरावा त्यांना मिळाला.
 कपाशीचं बी विकलं जात नाही असे त्याचे रिपोर्ट येत होते. त्यावर्षी पाऊस चांगला झाला होता आणि दोन नवीन कंपन्या आपलं बी विकण्याचा आक्रमक प्रयत्न करीत होत्या. रामच्या त्रिवेणी सीड्सच्या डीलर्सनी ऑर्डर केलेलं बियाणं उचललं नव्हतं. निनावी पत्रात लिहिलं होतं की वस्तुस्थिती अशी होती की त्रिवेणीचं जवळ जवळ सगळं बी खपलं होतं. अमरनं भाव कमी केले होते, डीलर्सना जास्त विक्रीवर जादा कमिशन कबूल केलं होतं आणि त्यामुळे त्याच्या जवळजवळ सगळया बियाणाचा उठाव झाला होता. अर्थात त्याने अशी पावलं उचलावीत आणि बी खपवावं हे प्राप्त परिस्थितीत अपेक्षितच होतं. पण मग त्यानं खोटे रिपोर्ट का पाठवले ? ह्याचं उत्तर एकच असू शकत होतं.
 रामने विचारलं, "अमर, विक्रीचे पैसे कुठेयत ? " त्याने आधीच चौकशी करून सगळ्या गोष्टींची खात्री करून घेतली होती. तेव्हा अमर भेटल्यावर कसलाच घोळ न घालता त्याने एकदम मुद्याला हात घातला.
 अमरचा चेहरा पांढराफटक पडला पण तो डगमगला नाही. नंतर राम म्हणाला, "पोरगा घाबरला नाही. त्याला हिंमत आहे हे कबूल करायला पाहिजे."
 ह्यातून सुटका करून घेणं शक्य नाही हे ओळखून अमरने पैसे घेतल्याचं कबूल केलं. त्याचं काय केलं हे तो सांगेना. अर्थात रक्कम एवढी मोठी होती की ती कुणा व्यापाऱ्याला व्याजाने दिली असती तरी महिन्या दोन महिन्यांत हजारो रुपये व्याज गोळा झालं असतं.
 राम म्हणाला, " तुझ्यावर फौजदारी करता येईल मला."
 " मी सगळे पैसे परत देईन."
 " केव्हा ?"
 " एका आठवड्यात.”
 "तू पैसे देशील कशावरून ? "
 " माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला."
 राम कडवटपणे हसला. “ विश्वास ! केवळ काही हजार रुपयांसाठी तू माझा विश्वासघात केलास. आता विश्वास हा शब्द उच्चारायचासुद्धा तुला अधिकार नाही. तू का असं केलंस अमर ? "
 अमर गप्प होता. "तू हे पाहिल्यापासनं करीत होतास ? ह्यासाठीच तू ही नोकरी धरलीस का?"
 तरी अमर गप्पच होता.
  " तुला जावं लागेल हे तुला माहीतच आहे, कारण आता पुन्हा कधीच मी तुझ्यावर विश्वास टाकू शकणार नाही."
 राम हे अगदी अनिच्छेनं म्हणाला. अजूनही अमरला हाकलून देण्याची पाळी येऊ नये असं त्याला वाटत होतं. अजूनही अमरनं पश्चात्ताप व्यक्त केला असता, पुन्हा असं कधी होणार नाही, मला एकवेळ संधी द्या, असं काही म्हटलं असतं तर कदाचित रामने आपला निर्णय बदललाही असता. पण अमरने स्वतःचं समर्थनही केलं नाही की क्षमाही मागितली नाही. ज्योती हा सगळा वेळ काहीच बोलली नाही. ती नुसती त्याच्याकडे विषण्णपणे पहात होती. त्याला अपराधी वाटत असलं पाहिजे कारण तो तिच्या डोळ्याला डोळा देत नव्हता.
 राम नंतर म्हणाला, " त्याला पैशाचीच जरूर होती तर माझ्याकडे मागायचे होते. मी त्याला उसने दिले असते. बक्षीससुद्धा दिले असते. मुलासारखा वागवला मी त्याला. आपल्याला त्याच्याबद्दल किती वाटतं हे काय त्याला कळलं नसेल ? पुढच आयुष्य, आपल्याशी नातं हया सगळ्याची नासाडी होईल अस कृत्य त्यानं केलंच कसं ? की आपल्याबद्दल त्याला काही वाटतच नव्हतं ? सगळा देखावाच होता?"
 त्याची वेदना ज्योतीला कळत होती. त्याला तिच्यापेक्षाहा जास्त दुःख झालं असलं पाहिजे. कारण तो कधी कुणाला आपल्या जवळ येऊ देत नसे. ह्या एका बाबतीत त्याने अपवाद केला होता आणि त्याची परिणती ही अशी झाली होती. हा घाव खूप खोलवर लागला असला पाहिजे.
 ती म्हणाली, " चांगल्याबरोबर वाईटाचाही स्वीकार करावा लागतो आयुष्यात."
 " मी पुन्हा कधी कोणावरही विश्वास टाकणार नाही."
 "एका माणसाने तुझा विश्वासघात केला म्हणून तू सबंध मनुष्यजातीला त्याची शिक्षा देतोयस?".
 " बरोबर आहे तुझं. ज्यो, तू माझ्याबरोबर आहेस तोवर मी इतर कुणाचीही कदर का करावी ? तू कधी माझ्या विश्वासाला तडा जाईल असं काही करणार नाहीस ना?"
 " अर्थातच नाही."
 " वचन दे मला."
 " मी वचन देते की मी कधीही तुझा विश्वासघात करणार नाही."
 ज्योती अंधारात स्वतःशीच हसली. आपण असली विधानं किती सहजपणे करतो ! रामला काय वाटत असेल आत्ता ? मी खरंच त्याला सोडून गेले तर तो ते कसं सहन करील? मग तिनं स्वतःला फटकारलं. मूर्खपणा करू नको. राम पुरेसा खंबीर आहे. त्याने आतापर्यंत अनेक वादळांना तोंड दिलं, यालाही देईल. आणि माझ्यावर कुणीतरी इतकं अवलंबून आहे, माझ्यावाचून कुणाचं अगदी अडेल अशी मी स्वतःची गोड समजूत का करून घ्यावी?

१३



 तारेत फक्त एकच शब्द होता. " अभिनंदन." ही खास स्मिताची स्टाइल. तिचं संभाषण किंवा पत्र म्हणजे तिच्या इतरांशी - विशेषतः आईबापांशी - सतत चालू असलेल्या युद्धातला एक नवा डावपेच असायचा.
 तिनं तार पाठवली हयाचा अर्थ तिची प्रतापशी गाठ पडली असली पाहिजे. ती दोघं एकमेकांना वरच्यावर भेटायची- प्रतापमधे अशा पुष्कळ गोष्टी होत्या की त्या दुसऱ्या कुणाच्या असत्या तर तिने त्यांच्यावर कडाडून टीका केली असती. पण ती इतरांना लागू करत असलेले निकष प्रतापला लागू नसत. ती त्याची धाकटी बहीण होती तरी ती त्याच्या बचावाला धावून जाण्यात आणि त्याच्या दोषांवर पांघरूण घालण्यात तत्पर होती. प्रताप येऊन गेल्यावर स्मिताकडून काही पत्र येतंय का किवा स्वतःच येते की काय याची ज्योती वाटच पहात होती. बहुतेक येणार नाही असं वाटत होतं.आणि पत्राऐवजी ही तार आली.
 अभिनंदन ! हंः, अभिनंदन कशाबद्दल ? मी तिच्या बापाला सोडतेय हे तिला खरोखरच अभिनंदनीय वाटतंय, तिला त्याचा आनंद होतोय ? की प्रतापसारखी तिच्या बेफिकिरीच्या आड असुरक्षितता, चिंता दडली होती? पण स्मिता तशी नव्हती. कधी कधी ज्योतीला वाटायचं, ही मुलगी कशानेही दुखवली जाऊ शकत नाही का? अगदी लहान असताना काही लागलं, खरचटलं तर ती आईकडे रडत यायची नाही. ती अगदी बेडर होती म्हणून तिला पुष्कळदा गंभीर जखमा व्हायच्या आणि त्यांचे वण आजतागायत तिच्या अंगावर होते. विटीदांडू खेळताना डोळयाच्या वरच्या बाजूला विटी लागली होती त्याची खूण, मोठया वजनाच्या काट्यावर उड्या मारीत असताना पाय घसरून काट्याच्या एका हुकामुळे कापलं होतं त्याची कोपरावर खूण. गुडघ्यांवरच्या वणांना तर गणतीच नव्हती. आणि सगळ्यात भीषण जखमेचा लांबच्या लांब वण उजव्या मांडीवर. त्या प्रसंगाच्या नुसत्या आठवणीने आजसुद्धा ज्योतीचा थरकाप व्हायचा. ही जखम म्हणजे एका माजलेल्या बैलाच्या शिंगाचा प्रसाद होता. बैल देवाला सोडलेला पोळ होता, आणि कुठेही चरायला कुणी अटकाव करीत नसल्यामुळे धष्टपुष्ट झाला होता. मुलंबाळं त्याला घाबरून लांबच रहात. पण आपण इतरांसारखे नाही, भेदरट नाही हे दाखविण्याच्या हव्यासापोटी तो बैल ज्या चिंचेच्या झाडाखाली चरत होता त्या झाडाच्या चिंचा पाडायला स्मिताने दगड मारायला सुरुवात केली. बैलाला एखादा दगड लागून तो चिडला असावा किंवा तिनं त्याच्या हद्दीत पाऊल टाकलेलं त्याला आवडलं नसावं. तो शिंग रोखून तिच्या अंगावर धावला. स्मिता भीतीने थिजून क्षणभर जागीच उभी राहिली. दुसऱ्या क्षणी तिनं वळून पळायला सुरुवात केली, पण तोवर बैलाने तिला गाठलं होतं. तिच्या मैत्रिणींनी रडत ओरडत सांगितलेली हकिगत ऐकून ज्योती धावत गेली, तो स्मिता बेशुद्ध पडलेली आणि तिच्या मांडीतून भळाभळा रक्त वाहात होतं.
 ती हॉस्पिटलमधे असताना रामने तिला विचारलं, " हा मुर्खपणा तू कशासाठी केलास? काय मिळालं तुला त्यातनं ? तुला काय वाटतं लोक तुला फार शूर समजत असतील म्हणून ? "
 स्मिता काहीच बोलली नाही. तिनं फक्त रामकडे अशा नजरेनं पाहिलं की रामने तिची नजर जोखली असती तर तो थिजूनच गेला असता.
 ज्योती नंतर म्हणाली, " असं का म्हणालास तिला राम ? "
 " मग बरोबरच आहे मी तिला म्हटलं ते."
 " असलं तरी ते म्हणायची ही वेळ नव्हती. ती केवढया दिव्यातनं पार पडलीय. तिला प्रेमाची, जिव्हाळ्याची गरज आहे."
 "बरं, सॉरी."
 हॉस्पिटलमधून सोडल्यावर स्मिताला काही दिवस पुण्यातच ठेवावं असं डॉक्टरांचं मत होतं, म्हणजे जखम नीट बरी होतेय ना, त्यात पू वगैरे होत नाही ना ह्याच्यावर नजर ठेवता येईल. रामच्या मनात होतं ज्योतीनं त्याच्याबरोबर शिरगावला परतावं. ज्वारीचं प्रोसेसिंग जोरात सुरू होतं, सरकीची विक्री अजून चालू होती. काम खूप होतं.
 ज्योती म्हणाली, " मला वाटतं मी तिच्याजवळ रहायला हवं. पोर तसं दाखवीत नसली तरी हबकली असली पाहिजे."
 " आपण काही तिला एकटं सोडीत नाहीयोत. तिची आजी आहे की तिच्यापाशी."
 पण ह्यावेळी ज्योतीनं आपला हट्ट सोडला नाही. शेवटी तो म्हणाला, "ठीक आहे. तुला रहायचं असलं तर रहा इथे. मी पुढे जातो, तू शक्य तितक्या लवकर ये " मग तो एकदम मोठ्याने म्हणाला, " गाढवपणा करायचाच होता तर तिनं अगदी हीच वेळ कशी शोधली? जणू काय आपल्याला आत्ता पुरेसे वेध नाहीत म्हणून ह्याची आणखी एक भर."
 "राम !"
  स्मिता शेजारच्याच खोलीत होती. तिला ऐकून जाईल अस बोलण्याइतका राम संवेदनाशून्य बनू शकतो याचा ज्योतीला धक्काच बसला. तिच्या चेहऱ्याकडे पाहून रामचा उद्रेक जितका चटकन उफाळला तितक्याच लवकर शमला. तिला जवळ घेत तो म्हणाला, “ आयॅम सॉरी. तू रहा इथे निश्चिंतपणे. मी तिकडचं सगळं बघतो. तुला रहायचंय तितके दिवस रहा.
 ती स्मिताकडे गेली तेव्हा स्मिता जागीच होती. म्हणाली, " ममी, तू जा परत शिरगावला. मी राहीन आजीपाशी."
 रडणं नाही, विनवणं नाही. समजूतदारपणासुद्धा इतक्या कोरडेपणानं दाखवलेला की तो लहान मुलाचा समजूतदारपणा वाटू नये.
 ज्योती म्हणाली, " मी रहाणार आहे इथंच."
 " माझ्यासाठी काही रहायला नको."
 " तुझ्यासाठी नाही, मला हवंय म्हणून मी रहातेय."
 मग मात्र तिला मिठी मारून स्मिता हमसाहमशी रडली. जणू शारीरिक वेदना, मानसिक धक्का या सगळ्याचं ती एकदम रडून घेत होती.
 ज्योतीच्या मनात आलं, राम म्हणाला तुला रहायचंय तितके दिवस रहा. स्मिताला तुझी गरज आहे तोवर रहा असं नाही म्हणाला. मुलांच्या काही खास गरजा असतात हे त्यानं कधी मानलंच नव्हतं, आणि त्यांच्या तिच्याकडून काही अपेक्षा असतात असंही. तिनं फक्त त्यांना जन्म द्यायचा. मग बाकीचं सगळं करायला इतरजण असतात. त्यांना खाऊपिऊ घालणं, त्यांची दुखणी काढणं, त्यांना शिकवणं हे सगळं. तिला जर कधी असं वाटलं की मुलांना आपली, आपण त्यांच्यापाशी असण्याची, त्यांचं काही करण्याची गरज आहे, तर तो तिच्याशी वाद घालून तिला पटवून द्यायचा की ह्या नुसत्या परंपरागत कल्पना आहेत. मुलांचं सगळं व्यवस्थित झालं म्हणजे पावलं, मग ते आईनं स्वतः जातीनं राबूनच केलं पाहिजे असं नाही. तिचं प्रेम, तिची निष्ठा, वेळ, शक्ती या सगळ्यांवर त्याचा अधिकार होता. तिनं नेहमी हे सगळं भरभरून त्याला दिलं होतं पण ते मुलांचं कमी करून त्याला दिलं अशी एक बोच तिच्या मनात राहून गेली.
 पुण्यातला फ्लॅट त्यांनी घेतला तो स्मिता कॉलेजला गेली त्यावर्षी, आणि मुलं तिथे येऊन राहतील हया विचारानेच ज्योतीचा फ्लॅट घेण्याला विरोध विरघळला होता. पण त्या दोघांनी आपल्याला हॉस्टेलमधेच राहणं पसंत आहे असं सरळ सांगितलं. स्मिता म्हणाली, " तुमच्याबरोबर राहणं विचित्र वाटेल आता. कसं वागावं याचा प्रश्न पडेल !" ती हे विनोदाने म्हणाली की त्यात काही खोच होती ते ज्योतीला कळलं नाही. कदाचित तिला असं सांगायचं असेल की पहिल्यापासून शिक्षणाच्या नावाने आम्हाला दूर ठेवल्यावर आता जणू काही आम्ही तुमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहोत असं वागण्याची अपेक्षा तुम्ही आमच्याकडून करू शकणार नाही. किंवा कदाचित तिच्या मनात असं काही नसेल आणि ती नुसतं एक सरळ विधान करीत असेल.
 राम म्हणाला होता, त्यांनी घरी राहावं असं जर तुला खरंच वाटत असलं तर त्यांना ते करायला लावायचा सोपा मार्ग आहे. हॉस्टेलची फी भरणार नाही म्हणून सांग." आणि ती म्हणाली होती, " त्यांनी घरी राहिलेलं मला आवडेल, पण तस करायला त्यांना भाग पाडावं लागत असलं तर नाही."
 पण तरी पुण्याला आल्यावर मुलांची भेट जास्त वेळा व्हायला लागली आणि ज्योतीला तेवढयात समाधान होतं. स्मिता प्रतापइतकी घरी यायची नाही, पण रविवारी संध्याकाळी पुष्कळदा यायची, कारण त्यांच्या हॉस्टेलच्या मेसला सुट्टी असे आणि जेवण मिळत नसे. ती आता लहानपणासारखी दणकट राहिली नसून खूपच सडपातळ झाली होती. तिचा चेहरा जरा जास्त रेखीव पण धारदार झाला होता आणि त्याच्यावर थोडी करडेपणाची झाक आहे असं ज्योतीला वाटायचं. ती सामाजिक बांधिलकीसारख्या विषयांवर अभिनिवेशपूर्ण बोलत असे, आणि कसलेही निर्णय घेताना आईबापांचा सल्ला घेत नसे.
 कॉलेजची दोन वर्ष पुरी झाल्यावर तिनं एकदम हॉस्टलमध्ये राहून गुदमरल्यासारखं होतं असं ठरवून बाहेर एक खोली भाड्याने घेतली. एका घरमालकाने गॅरेजमधे पार्टिशन्स घालून विद्यार्थ्यांना भाड्याने देण्यासाठी खोल्या बनवल्या होत्या त्यातली ही एक होती. खोलीला स्वतंत्र संडास तर नव्हताच, फक्त कोपऱ्यात एक लहानशी मोरी होती. त्यातही पाणी बादलीने भरून आणून ठेवावं लागे. सगळ्या चार खोल्यांना मिळून एक संडास आणि एक आंघोळीची खोली होती.
 ही मुलगी इतकी स्वतंत्र वृत्तीची आहे की घरी राहणं तिला जमणारच नाही हे एकदा ज्योतीने मान्य केल्यावर मग स्मिताची नवी खोली सजविण्यात तिने हिरिरीने भाग घेतला. तिनं एक स्टो, स्वैपाकाची भांडी, बश्या, कपबश्या, डबे असं खूपसं सामान घेतलं. मग फरशीवर टाकायला एक छोटासा हातमागाचा गालिचा आणि बिछान्यावर पसरायला एक ठळक रंगांचा पलंगपोस घेतला. दाराला आणि एकाच खिडकीला पडदे करण्यासाठी कापड घेतलं. शेवटी स्मिता म्हणाली, " आता बास हं ममी ! आणखी मी काहीही तुझ्याकडून घेणार नाही. ह्यापुढे रिकाम्या हाताने आलीस तरच तुला इथे प्रवेश मिळेल."
 पुढच्या खेपेला ज्योती गेली तेव्हा स्मिता म्हणाली, " हात बघू तुझे."
 " फक्त हलवा आणलाय तुला आवडतो म्हणून. घरी केला होता आज."
 " तुझ्यापुढे हात जोडले बाई."
  " खाऊन बघ ना."
 " मग खाईन. आता भूक नाहीये मला. ठेव तिथे."
 काही दिवसांनी स्मिताने डबा परत आणून दिला तेव्हा हलवायाकडून विकत आणलेली मिठाई त्यात होती.
 " हे काय स्मिता? काहीतरी परत आणून द्यायला पाहिजे का?"
 " का नाही ? असा काही नियम आहे का की मुलांनी आईबापांकडून सारखं घ्यावं पण त्यांना कधी काही देऊ नये?"
 स्मिताचा युक्तिवाद बिनतोड होता, पण तरी का कुणास ठाऊक, तिचं असं करणं ज्योतीच्या मनाला लागलं. तिनं पुन्हा स्मितासाठी काही खाऊ नेला नाही. स्मिताचं जेवण कधी धड नसे. वेळ झाला तर थोडाफार स्वैपाक करायचा, नाहीतर काय असेल ते शिळंपाकं खायचं. कधी नुसती लोणच्याशी पोळी खायची तर कधी दोन केळी खाऊन दूध प्यायचं. ज्योती तिच्याबद्दल काळजी न करण्याचा प्रयत्न करायची.
 खोलीवर राहायला गेल्यापासून स्मिताचं येणंजाणं खूप कमी झालं. एकदा बऱ्याच दिवसांनी ती आलेली पाहुन राम म्हणाला, " वाः ! आज पुष्कळ दिवसांनी घराची आठवण झाली!"
  " डॅडी, आता हे माझं घर नाही, मला माझं स्वतःचं दुसर घर आहे."
 " मग हे काय आहे ? तुला नको असलेली अडगळ ठेवण्यासाठी गुदाम ? हे जर तुझं घर नसलं तर तुझ्या सगळ्या वस्तू इथ कशासाठी पडल्यायत?"
 " मी नेईन त्या इथनं."
 ज्योतीनं नंतर तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण ती तिच्या सगळ्या वस्तू घेऊन गेलीच. तिचे नेहमीच्या वापरात नसलेले कपडे , पुस्तकं, कुणाकुणाकडून बक्षिसादाखल मिळालेल्या वस्तू, खोलीत फार जागा नाही म्हणून ठेवलेलं काही सामान सगळं काही घेऊन गेली. आणि तिच्या नेहमीच्या खाक्याप्रमाणे ज्योती आणि राम घरी नसताना ती आली. ऑफिसमधून परत आल्यावर जणू आपल्या जीवनातून स्मिताचं अस्तित्व पुसल गेल्यासारखं ज्योतीला वाटलं.
 तरी पण स्मितानं आईबापाशी जवळजवळ संपूर्णपणे संबध तोडून टाकले ते ह्यानंतर नव्हे, तर वाढदिवसाच्या पार्टीला कृष्णमूर्तीला बोलवायचं की नाही ह्या वादानंतर. कृष्णमूर्ती पत्रकार होता, आणि रामने कसल्यातरी समारंभाच्या निमित्तान बोलावलेल्या पत्रकारांच्यातून ज्योतीला तो एकदम आवडला होता. त्या वर्षी तिनं त्याला मुलांच्या वाढदिवसाला बोलावलं होत. दोन्ही मुलांचे वाढदिवस ती नाताळच्या सुट्टीत घरी असताना साजरे केले जायचे. त्या दिवशी वस्तीवरच्या, शेतावरच्या आणि कारखान्यातल्या कामगारांच्या मुलांना खाऊ वाटायचा कार्यक्रम असे. रात्री आतषबाजी, आणि मग मोठी मेजवानी. एकूण ते एक प्रस्थच असायचं. कृष्णा रामला म्हणाला, " तुम्ही एखाद्या मोठ्या जमीनदारासारखं वागताय की.” पण तो सगळ्या मुलांच्यात रमून गेला आणि त्यांना चित्रं काढून दाखवून, नकला करून, निरनिराळ्या जनावरांचे आवाज काढून त्याने खूप मजा आणली. तेव्हापासून तो दर वाढदिवसाला आवर्जून हजर राहायचा.
 त्याचं लग्न झालं नव्हतं आणि ज्योतीनं त्याला एकदा असं का म्हणून विचारलं तर तो म्हणाला, " मी नेहमी प्रस्थापिताविरुद्ध लढा देत असतो तेव्हा सरकार माझ्यावर चिडलं तर त्याचा प्रसाद माझ्या कुटुंबाला मिळू नये म्हणून मी एकटंच राहिलेलं बरं." राम म्हणाला, " काहीतरी बडबडतो हा. कोण त्याला त्रास द्यायला बसलंय ? त्याला उगीचच अतिशयोक्ती करायची सवय आहे."
 आणि मग आणीबाणी जाहीर झाली आणि हिंदुस्थानात कधी घडणं शक्य नाही अशा वाटणाऱ्या घटना घडायला लागल्या. कृष्णाला अटक काही झाली नाही. तो महत्त्वाचा राजकारणी नव्हता, आणि तो मराठी वर्तमानपत्रात लिहायचा म्हणून दिल्लीत तो फारसा धोकादायक वाटत नव्हता. शिवाय त्याचे राजकारणावरचे लेख आणि व्यंगचित्रं छापायला बंदीच असल्यामुळे तो सत्ताधाऱ्यांना फारसा उपद्रव देऊ शकत नसे. पण तो आता त्यांना भेटायला येत नसे. ज्योती आणि रामनं उडत उडत ऐकलं की तो एका भूमिगत संघटनेत काम करतो. ते वस्तुस्थितीबद्दल पत्रक छापून वाटत असत आणि तुरुंगात टाकलेल्यांच्या कुटुंबियांसाठी मदत जमवत. रामचं अजूनही मत होतं की हे लोक उगीचच नाटयमय, थरारक वातावरण निर्माण करताहेत.
 ज्योती म्हणाली, " त्याला जे पटतं ते तो करतोय. तुला त्याच्यावर टीका करायचा काय हक्क आहे ?"
 " ही पत्रकं वाटून काय साधणार आहे ?"
 " धोका ? कशाचा?"
 " कदाचित तुरुंगाचासुद्धा."
 ज्योती म्हणाली, " काहीतरीच काय राम?"
 " काहीतरीच नाही. हल्ली कुणालाही कसल्याही थातुरमातुर कारणावरून तुरुंगात टाकताहेत."
 स्मिता म्हणाली, " कृष्णाकाकांशी संबंध ठेवल्याबद्दल जर मला कुणी तुरुंगात टाकणार असलं तर खुशाल टाकावं."
 " तुझं ठीक आहे. तुझ्यावर कुणी अवलंबून नाही. पण आम्ही जे करतो त्याचा परिणाम आमच्या कामगारांना भोगावा लागेल. समजा सरकारने आमची इंडस्ट्री बंद केली तर ते बिचारे काय करणार?"
 स्मिता त्यावेळी काही बोलली नाही, कारण लहानपणी वाटत असलेली रामच्या रागाची तिची भीती अजून पुरी गेली नव्हती. पण ज्योतीजवळ मात्र ती रागाने म्हणाली, " आपली कातडी बचावायला डॅडी कामगारांचं बुजगावणं पुढे करताहेत."
 कामगारांची आपल्यावर जबाबदारी आहे हे ज्योतीला कबूल होतं पण तरी रामचं करणं तिला पटत नव्हतं. रामची बाजू घेऊन स्मिताशी ती वाद घालू शकली नाही. नंतर ज्योतीला जे कळलं ते स्मिताला माहीत झालं असतं तर स्मिता आणखीच खवळली असती.
 ज्योतीला रामच्या बोलण्यातून एक शंका आली होती. ती नंतर म्हणाली, " राम, तू कृष्णाला आपल्याकडे यायला बंदी केलीस का? म्हणून तो इतके दिवस आला नाही ?"
 " हो."
 " असं तुझ्यानं करवलं तरी कसं? त्याला काय वाटलं असेल ?"
 " त्याला काही वाटलं नाही. तेवढा तो समंजस आहे. शेवटी त्याला पटतं की आपलं आयुष्य धोक्यात घालायचा त्याला काही हक्क नाही. आणि सगळेच काही राजकारण करीत नाहीत, राजकारणापासून दूरच राहतात हेही त्याला माहीत आहे. शेवटी देशातलं राजकारण काहीही असलं तरी बहुसंख्य लोकांना आपापलं आयुष्य सुरळीतपणे जगता आलं पाहिजे नाहीतर देशात बेबंदशाही माजेल."
 ज्योतीच्या मनात आलं, स्मिताचं बरोबर आहे. हया सगळ्या सबबी आहेत. एखाद्या तत्त्वावर त्याचा पुरेसा विश्वास असता तर त्याच्यासाठी लढण्यापासून त्याला कुणीही परावृत्त करू शकलं नसतं. ती त्याच्याकडे विमनस्कपणे बघत होती, त्याच्यात तिला माहीत असलेल्या रामचा शोध घेत होती. तो राम परिणामाचा विचार न करता त्याला जे बरोबर वाटेल ते धडकून करायचा. कधी कधी रागाच्या भरात वेडंवाकडं करून बसू नको, मागनं पस्तावायची वेळ येईल असा तिलाच त्याला सबुरीचा सल्ला द्यावा लागायचा.
 आणि हा राम म्हणत होता, " तू माझ्याकडे असं का बघत्येयस ज्यो? तुला नाही का पटत की भलत्या ठिकाणी शूरपणाच प्रदर्शन करून आपली सबंध जीवनपद्धती धोक्यात टाकणं मूर्खपणाचं आहे म्हणून ?"
 " असेलही. मला नाही समजत.”
 पण रामचं तेवढ्यानं समाधान झालं नाही. तो म्हणाला, " त्यात न समजण्यासारखं काय आहे ?"
 " राम, महात्मा गांधींच्या खुनानंतर तुम्हाला आसरा देणारा बाबांचा मित्र त्याची आणि त्याच्या कुटुंबाची सुरक्षितता, कदाचित जीवितसुद्धा धोक्यात घालीत नव्हता का? मग त्याच चुकलं, तो मूर्ख होता असं का तुला म्हणायचंय?"
  " त्यावेळची परिस्थिती वेगळी होती."
 " काय वेगळी होती ?"
 " तो देशाच्या सरकारला आव्हान देत नव्हता. फक्त काही माथेफिरू गुंडांना देत होता. आणि त्याच्यावर काहीशे लोकांचं पोट अवलंबून नव्हतं."
 ज्योतीने काही न बोलता नुसतीच होकारार्थी मान हलवली.
 त्या वर्षीची वाढदिवसाची पार्टी मग बेत आखण्याच्या पुढे सरकलीच नाही. त्या निमित्ताने फार दिवसांनी एकत्र आलेले ते सगळे पुन्हा दूर गेले. सगळं पचवण्याची सवय झालेली असूनसुद्धा हया निराशेने ज्योतीच्या मनाला एक न बुजणारी जखम केली.
 काही दिवसांनी स्मिताचा फोन आला, " ममी, कृष्णाकाका मला आणि प्रतापला रेलचेलमधे वाढदिवसाची पार्टी देणार आहेत. तू येशील?"
 ज्योती घुटमळली. निमंत्रण फक्त तिलाच होतं. अर्थात राम आलाच नसता. पण असं असताना मी मुलांच्या बर्थडे पार्टीला जातेय असं सांगून एकटीनं जायचं किंवा हे रामला फारसं आवडणार नाही हे माहीत असताना त्याला न सांगता जायचं हयातलं कोणतंच तिला प्रशस्त वाटेना.
 " तुला यायचं नसलं तर नको येऊ."
 " यायचं नाही असं नाही स्मिता, पण..."
 " ठीक आहे."
 " स्मिता -"
 " ममी, डॅडींचं म्हणणं तुला पटतं तरी किंवा पटत नाही तरी त्यात मधला मार्ग काही असू शकत नाही. आणि तुला पटत नसलं तर तुझ्या बुद्धीप्रमाणे तुला वागायला पाहिजे. नुसतं आंधळेपणानं डॅडींच्या मागोमाग फरफटत जायचं असंच का तू आयुष्यभर करीत राहणार आहेस ?"
 मुलीनं आपल्याला असं बोलावं हे ज्योतीला फार झोंबलं. स्मिताला काहीही वाटत असलं तरी पूर्वी ती कधी अशा तऱ्हेने बोलली नव्हती. आपल्या श्रद्धा नेमक्या काय आहेत हे तपासून पाहण्याची आईच्यात कुवत नाही, ती बावळटासारखी स्वत:ची फरफट होऊ देते असं म्हणून शहाणपणाचा आव आणून तिला सल्ला देण्याचं धाडस आतापर्यंत तिनं केलं नव्हतं.
 ती स्मिताच्या पार्टीला गेली नाही, आणि कृष्णाला भेटून त्याची क्षमा मागण्याचा निश्चय पण तिनं अमलात आणला नाही. हयानंतर स्मिता कधी त्यांच्याकडे आली नाही, आणि ज्योती तिला भेटायला गेली नाही. एक दिवस स्मिताच्या घरमालकिणीचा फोन आला की स्मिता बरीच आजारी आहे.
 ज्योती गेली तेव्हा स्मिता अंथरुणातच होती. गालाची हाडं निघाली होती, डोळे निस्तेज दिसत होते आणि कातडी सुकल्यासारखी दिसत होती.
 " हे काय हे स्मिता? मला कळवायचं तरी."
  " ममी, दर वेळी गुडघ्याला जरा खरचटलं की तुझ्याकडे रडत यायला मी लहान का आहे आता? मला फक्त थोडा फ्ल्यू झाला होता."
 " मी येऊन तुझी देखभाल केली असती."
 " माझी देखभाल उत्तम झाली. खरं म्हणजे जरा अतीच चांगली झाली. एका डॉक्टरनंसुद्धा येऊन मला तपासलं," जणू काही डॉक्टरनं तपासणं ही मोठी चैन आहे अशा सुरात स्मिता म्हणाली.
 ज्योती आपण इकडे तिकडे बघतोय हे कळू नये अशा बेतानं खोली न्याहाळत होती. स्मिताच्या खोलीत नेहमी असे तसा पसारा होताच. पण लहानपणी ती सगळा पसारा करायची त्यात मूलपणा होता. या खोलीचा विस्कटलेपणा आणि कळकटपणा हा केवळ घरकामाच्या आळसाचा पुरावा होता. खोली कितीक दिवसांत झाडली - पुसली नव्हती देव जाणे. पारोशा कपड्यांचे बोळे जिकडे तिकडे विखुरले होते. पलंगावरच्या चादरी वर्षभरात धुतलेल्या नसाव्यात. कोपऱ्यातल्या स्टोवर काहीतरी उतू जाऊन तसंच वाळलं होतं. मोरीत खरकटया भांड्यांचा ढीग होता.
  स्मिता म्हणाली, " ममी, मला माहीताय खोली साफ करून नीट लावायला तुझे हात शिवशिवतायत, पण मी तुला ते करू देणार नाही."
 आपल्या मनातलं आपल्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झालं होतं हे कळून ज्योती जराशी ओशाळली. ती म्हणाली, " का ?"
 " एक म्हणजे घरीसुद्धा तू हे काम करीत नाहीस. आणि दुसरं म्हणजे ही तुझी जबाबदारी नाहीये. माझी खोली साफ करणं हे माझं काम आहे नि सवडीनं मी ते करीन."
 म्हणजे थोडक्यात तू माझ्या आयुष्यात नाक खुपसू नको. अत्यंत नीटनेटक्या आणि स्वच्छ घरात वाढलेल्या या मुलीला अशा घाणीत राहणं कसं सहन होतं हे ज्योतीला कळेना. तिची खात्री होती की खोलीची ही अवस्था कायमचीच होती, केवळ स्मिताच्या आजारपणामुळे नव्हती. स्मिता आता जवळजवळ संपूर्णपणे स्वतःच्या पायावर उभी होती. ती शिकवण्या घ्यायची, एका वकिलासाठी लायब्ररी रिसर्च करायची, परदेशी संशोधकांसाठी भाषांतराचं काम करायची. आणि हे सगळं लॉ कॉलेजच्या टर्म्स भरत असताना. तेव्हा तिला घरकामाला फारसा वेळ राहात नसे ही काही आश्चर्याची गोष्ट नव्हती. पण ज्योतीला माहीत होतं की कामाला बाई लाव म्हणून ती म्हणाली असती तर स्मिताने मला परवडत नाही म्हणून सांगितलं असतं. आणि ज्योतीने बाईचा पगार द्यायचा हे तिला मान्य झालं नसतं.
 बोलायचं ते बोलून झालं होतं. आता काही उरलं नव्हतं. पण तरी ज्योतीचा पाय तिथून निघत नव्हता. तिच्या मनात आलं, तिच्यापर्यंत पोचण्याचा काहीतरी मार्ग असला पाहिजे. काही झालं तरी ती माझी मुलगी आहे. असं कसं होऊ शकतं की आम्ही एकमेकींसमोर बसून नुसत्या एकमेकींच्या तोंडाकडे पहातो आहोत ? इतक्या का आम्ही दुरावलो आहोत की दोघींना ज्यात रस वाटेल असा विषय आम्हाला बोलायला सापडू नये?.
 ती एकदम म्हणाली, " स्मितू, थोड्या दिवसांसाठी घरी राहायला येतेस ? जरा चांगलं खाऊपिऊ घालीन तुला. हया हाडांवर मास चढूदे ना."
 स्मिता हसली, " मला वाटलं आपण आता ठरवलंय की ते माझं घर नाहीये."
 " तुझ्या आईचं घर हे नेहमी तुझं घरच आहे."
 ते फक्त माझ्या आईचं घर नाही, बापाचंही आहे, आणि त्याला मी ते घर म्हणून समजलेलं आवडत नाही."
 " तसा नव्हता त्याच्या म्हणण्याचा अर्थ."
 " ते तसंच म्हणाले."
 " तू मुद्दाम त्याच्या बोलण्याचा विपर्यास करत्येयस. तू जे म्हटलीस ते त्याला लागलं, आणि रागाच्या भरात तो तसं बोलून गेला."
 " ठीक आहे, तुझंच खरं. पण डॅडींना वाईट वाटेल असं काहीही मी बोलू शकेन ह्याच्यावर माझा विश्वास नाही. माझ्या बोलण्याची ते तितपत फिकीर करीत नाहीत."
 " स्मिता, प्लीज-"
 " जाऊ दे ममी, ते आता उकरून काढुयाच नको. इतकी जुनी घटना आहे, आता काय एवढं त्याचं ? ममी, तू रडत्येयस ? रडू नको."
 ज्योतीने निग्रहाने अश्रू आवरले. तिला मुलीकडे. भीक मागायची नव्हती. तिला तिचा तिरस्कारही नको होता आणि दयाही नको होती.
 " तुझं बरोबर आहे," ती शांतपणे म्हणाली. " भूतकाळातल्या गोष्टी कशाला उकरून काढायच्या?" तिला जरा गम्मत वाटली की स्मिता जिला फार जुनी घटना म्हणत होती ती काही महिन्यांपूर्वीच घडलेली होती. ती आणखी म्हणाली, " आणि मी तुझ्याबद्दल काळजी करू नये हेही तुझं बरोबर आहे. तू आता स्वतःची स्वत: काळजी घेण्याएवढी मोठी झालीयस."
 स्मिता अनपेक्षितपणे म्हणाली, " रागावली नाहीस ना माझ्यावर?"
 " वेडे, रागवायचं काय त्यात?" ती हसत हसत म्हणाली, आणि स्मिताच्या चेहऱ्यावरचं सावट दूर झालेलं पाहून तिला कळलं की हेच स्मिताला हवं होतं.
 तिला लहानपणी पाहिलेल्या सिनेमातलं एक गाणं आठवलं. " तुझ्या प्रीतीचं दुःख मला दावू नको रे.” स्मिता हेच तिला सांगत होती. माझ्याबद्दल काळजी करू नको, माझ्यावर रागावू नको, माझ्यासमोर डोळयांतनं पाणी काढू नको. हया सगळ्यांचं मला ओझं होतं. तुझ्या दुःखानं मला बांधून ठेवू नको. मला मोकळं सोड, मला जाऊ दे.

१४



 " ज्यो, तू इथं कशी ? की तुम्हीही पुण्याच्या उकाड्यातनं वीकेण्डसाठी पळून आलायत ? राम कुठेय ?"
 ही अर्थात विनी शहा होती. एखाद्या समारंभाला निघाल्यासारखे कपडे, तोंडाला भरपूर रंग, अंगावर किलोभर सोन्याचे दागिने. ज्योतीला वाटलंच होतं की बाजारात गेलं की ओळखीचं कुणीतरी भेटणार. पण तिची कोल्ड क्रीम संपली होती, आणि वयपरत्वे शुष्क झालेल्या कातडीमुळे तिला कोल्ड क्रीमशिवाय राहणं अशक्य होतं, तेव्हा ती आणायला बाजारात जाणं भाग होतं.
 " मी एकटीच आलेय इथे, "
 ती म्हणाली. विनीनं आधीच कोरून बाक दिलेल्या भुवयांना आणखीच वाकवीत विचारलं, " खरं? हे कसं झालं?"
 " मला जरा थकवा वाटत होता. गेल्या महिन्यात फ्लू झाला होता ना, त्यातनं मी अगदी संपूर्ण बरी झालेच नव्हते. शेवटी राम म्हणाला तिथे राहून विश्रांती मिळणं अशक्य आहे. घरी जरी राहिले तरी काहीतरी निघतं, मग ऑफिसमधे जाणं होतं. तेव्हा त्यानं मला तिथनं हाकलूनच दिलं."
 ज्योतीला वाटलं, आपण खुलासा जरा अतीच पाल्हाळ लावून केला. तिला खोटं बोलण्याची गरज का भासली हे तिचं तिलाच कळेना. विनया तिची बरीच जवळची मैत्रीण होती, आणि कुठेतरी पाणी मुरत असलं की त्याचा अचूक वेध घेण्याची कला तिला अवगत होती. तेव्हा शेवटी तिनं सत्य शोधून काढलंच असतं. शिवाय ज्योतीनं रामशी फारकत घ्यायचं ठरवलं असतं तर ते त्यांच्या मित्रमंडळीत पसरायला वेळ लागला नसता. तरी पण आपोआपच तिच्या तोंडून असत्य बाहेर पडलं.
 विनी म्हणाली, " नशीबवान आहेस. माझा नवरा माझी इतपत चिंता वाहणारा असता तर !"
 अतुल म्हणाला, " रामला तिची चिंता वाहावीच लागते, कारण ती त्याच्यासाठी महत्त्वाचं काम करते."
 " आणि मी जे करते ते महत्त्वाचं नसतं अर्थातच,” विनी म्हणाली. तो नुसताच मोठ्याने हसला. विनी म्हणाली, " गृहिणीची शोकांतिका. ती जे करते त्याला काम म्हणायला कुणाची तयारी नसते."
 डोळे फिरवीत ओठ मुडपून ती हसली, पण ज्योतीने तिच्या तोंडावरनं भर्रकन निघून गेलेला राग आणि दुःख पाहिलं होतं. तिच्या ओळखीची कितीतरी जोडपी असं वागताना तिनं पाहिली होती. वरवर असं हसत - खेळत भांडण करायचं, पण ओरबाडणं मजेत असलं तरी त्यानं रक्त निघायचं ते निघतंच.
 ज्योती घराबाहेर काम करते म्हणून विनयाला नेहमीच तिचा हेवा वाटत असे. ती म्हणायची, “घरकाम करणाऱ्या बायकांबद्दल कुणालाच आदर वाटत नाही. तसं मी कबूल करते की मी प्रत्यक्ष कष्ट फारसे करीत नाही, कारण माझ्याकडे नोकरचाकर आहेत पण नसते, आणि सगळं काम मी स्वतःच केलं असतं तरी काही फरक पडला नसता. घरकामाला काम म्हणायलाच कुणी तयार नसतं."
 " मग तू दुसरं काहीतरी करीत का नाहीस?" ज्योतीनं विचारलं.
 " काय करणार? मला काहीच करता येत नाही. माझ्या पदरात फक्त एक यूसलेस बी. ए. डिग्री आहे. शिवाय कामाला जरी माणसं असली तरी इतर सगळं मलाच पहावं लागतं. त्यातनं पार्टटाईम नोकरी करायलासुद्धा वेळ नसतो. रोज अमुक वेळ मला मोकळा मिळेल असं काही मी धरून चालू शकत नाही."
 " नोकरीच केली पाहिजेस असं नाही. पण फावल्या वेळात काहीतरी हॉबी किंवा काही वस्तू बनविणं असं काही घरकामाशी ज्याचा संबंधच नाही असं करायला काय हरकत आहे ?"
 " वस्तू ! म्हणजे उदाहरणार्थ कागदाची फुलं, लोणची, ॲक्रिलिकने रंगविलेल्या साड्या असलं ? अतुल तर हसतच सुटेल मी असं काही करायला लागले तर."
 " हसायचं काय कारण? काही नाही, तुला आपलं उगीच वाटतं. आपण कुठलीही गोष्ट मनापासून करून त्यात यश मिळवलं की कुणी हसत नाही."
 " पण मग मला आताच्या दुप्पट काम पडेल. सगळेच नवरे काही रामसारखे नसतात, बायको बाहेर काम करतेय तर तिला घरी कमी काम पडावं म्हणून झटणारे. उलट माझ्या नवऱ्याला जरा जरी शंका आली की बाहेरच्या कामामुळे बायको घरकामात अंगचोरपणा करतेय तर तो मला तसं पदोपदी ऐकवील. मला बागकामाची आवड आहे तुला माहीताय ? मी भाजीबाग करीत असे आणि घरगुती भाजीबाग लावणाऱ्यांची एक संघटना आहे, तिची मेंबर पण झाले होते. दर रविवारी सकाळी आमच्या सभा असायच्या आणि पुष्कळदा अतुल आणि मुलं उठायच्या आत मी बाहेर पडायची. तर ब्रेकफास्ट करून द्यायला मी नसे म्हणून कोण धुसफूस चालायची. म्हणजे अतुलला हातानं करून घ्यायला लागत नसे, पण रविवार म्हणजे स्पेशल दिवस, तर आम्हाला स्वैपाकिणीच्या हातची ब्रेकफास्ट खावी लागते म्हणून तक्रारी. मी लक्षच दिलं नाही. तर मग अतुल माझी टर उडवायला लागला. मुद्दाम मुलांसमोर म्हणायचा, चेतन, तेवढी पालकची भाजी संपवायची बरं का पानातली. अरे, ही अगदी खास भाजी आहे. तुझी आई आपल्यावर जेवढा करत नाही तेवढा प्रेमाचा वर्षाव त्या भाजीवर करते, माहीताय ? हे असं टोचून खोचून बोलणं सारखं चालायचं. शेवटी मला असहय झालं. त्याच्याकडे कानाडोळा करीत माझं काम चालूच ठेवण्याइतकी निगरगट्ट होऊ शकले नाही मी."
 ज्योतीला माहीत होतं की, तू असल्या दबावाला बळी पडता कामा नये असं विनीला सांगणं सोपं होतं. पण ह्या दबावतंत्राविरुद्ध अखंड लढत राहणं किती अवघड आहे ह्याची तिला कल्पना होती. शिवाय ती जाणून होती की स्वतःची अस्मिता जागी ठेवण्याच्या अट्टाहासापायी आपल्या वैवाहिक जीवनाची चौकट उद्ध्वस्त करून टाकायला विनी कधीच तयार झाली नसती. लग्नामुळे मिळणाऱ्या पैसा, सुरक्षितता, समाजातलं स्थान ह्या गोष्टी तिनं कधीच सोडल्या नसत्या.
 पुण्याला येण्याआधी ज्योतीला कुणी विचारलं असतं, की तुझी जिच्याशी मैत्री होणं अशक्य कोटीतलं आहे अशी बाई कुठली तर तिनं विनीकडे बोट दाखवलं असतं. पण तरी तिची आणि विनीची मैत्री झाली होती. ज्योतीच्या धावपळीच्या दिनक्रमात खरं म्हणजे कुणाशीही फारशी जवळीक होण्याइतकी घसट वाढणं कठीण होतं. त्यातून पार्ट्यांमधे वगैरे ज्या ओळखी व्हायच्या त्या सदैव वरवरच्या राहायच्या, एकाच पातळीवर राहायच्या. कुणाशीच वैयक्तिक संबंध राहात नसे. शिवाय ज्योतीला ह्या सगळ्या लोकांच्यात उपरं वाटायचं. टीव्ही दुरुस्त करणाऱ्यांची वानवा, भारतात बनवल्या जाणाऱ्या मोटारीचा सुमार दर्जा, कॅपिटल गेन्स टॅक्सचे जाचक नियम ह्या त्यांच्या संभाषण-विषयांत ज्योतीला फारशी गोडी नव्हती. ह्या विषयांत तिला अजिबात रस नव्हता किंवा तिची मतं त्यांच्यापेक्षा वेगळी होती असं नव्हे, पण चार लोकांत असल्या फालतू विषयांचं चर्वितचर्वण करण्याचा तिला कंटाळा यायचा. ह्या संभाषणांतून नवीन काहीच निष्पन्न होत नसे. तीच तीच वाक्यं उगाळली जायची, तेच तेच किस्से सांगितले जायचे, आणि या सगळ्यात आपल्या देशाचं सरकार मूर्ख आहे, आम्ही किती शहाणे आणि सर्वज्ञ आहोत, आम्हाला संधी दिली तर आम्ही सरकारला योग्य दिशा दाखवू, अशी उबग आणणारी आत्मतुष्टता असायची.
 फक्त विनीनं पृष्ठभागाखाली बुडी मारून ज्योतीचा शोध घेण्याइतपत कुतूहल दाखवलं होतं. ज्योती वेगळ्याच वातावरणातून आली असल्यामुळे आपल्यासारख्या लोकांच्यात वावरताना जरा बुजते, दबकते हे तिनं हेरलं, आणि हळूहळू ज्योतीला कुठे कसले कपडे घालायचे, तोंडाला मेकप कसा लावायचा, पार्टीत हलकफुलकं संभाषण कसं करायचं, महागड्या रेस्टॉरंटमधे जणू काही आपण त्यातले मुरब्बी आहोत अशा ढंगाने जेवणाची ऑर्डर कशी द्यायची हे सगळं शिकवलं. मात्र शिकवीत असताना आपण फारच गावढळ आहोत असं ज्योतीला तिनं भासू दिलं नाही. ज्योती बऱ्यापैकी तयार झाल्यानंतर सुद्धा धंद्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या पण वैयक्तिक पातळीवर ज्याच्याबद्दल आपल्याला काडीचीही आत्मीयता वाटत नाही अशा माणसासाठी कसली आणि कितपत किमती भेटवस्तू घ्यायची, परदेशीयांना जेवायला बोलावलं की जेवणाचा बेत काय ठेवायचा असल्या बाबींबद्दल विनीचा सल्ला घेत असे.
 आता विनी तिला विचारीत होती, " मग राम का नाही आला तुझ्याबरोबर ?"
 " बरंच काम आहे. आम्हाला दोघांना एकदम निघून येणं शक्यच नव्हतं."
 " अच्छा मग, आम्ही परत गेल्यावर रामला फोन करून सांगते तू भेटली होतीस म्हणून."
 अतुल म्हणाला, " ए चल, विन. दिवसभर इथे रस्त्यात गप्पा मारीत उभी राहणार आहेस का?"
 तरी विनी थोडीशी घोटाळली. " ज्यो, तू होटेलला परत जात असलीस तर आम्ही थोडा वेळ थांबतो. एकत्रच जाऊ.”
 " मी वेगळ्या होटेलात आहे."
 " असं ? कुठल्या ?"
 " गुलमोहोर." विनीचे डोळे विस्फारले. सुदैवाने अतुलने विनीचा हात धरून तिला ओढूनच नेलं म्हणून ज्योतीला आणखी काही खुलासा देत बसावं लागलं नाही.
 विनी मागे वळून म्हणाली, " बाय, ज्यो. चांगली विश्रांती घे. तू फारच ओढल्यासारखी दिसत्येयस."
 लोकं किती भोळे असतात ह्याची ज्योतीला गंमत वाटली. तुमची प्रकृती उत्तम असली तरी तुम्ही आजारी आहात असं नुसतं सुचवलं की तुम्ही ओढल्यासारखे, खराब झाल्यासारखे दिसायला लागता.
 त्या रात्री विनी गुलमोहोरमधे उगवली.
 " काय चाललंय काय, ज्यो?"
 " म्हणजे?"
 " तू सांगितलंस ते मला खरं वाटेल अशी तुझी खरंच कल्पना होती का? तू आजाऱ्यासारखी दिसतसुद्धा नाहीस."
 ज्योतीला हसू आवरेना. " आणि मला वाटलं तू फसलीस म्हणून."
 " मी तुला काही आज ओळखत नाही, ज्यो. पण अतुलची घाई चालली होती आणि बाजारात काय बोलायचं, म्हणून मी निवांत भेटायला आले."
 ज्योतीनं एक मोठा सुस्कारा सोडला.
 " तुझ्या खाजगी आयुष्यात मुद्दाम नाक खुपसायची माझी इच्छा नाहीये. तुला काही सांगायचं नसलं तर सांगू नको. फक्त तुला काही हवं असलं, माझी मदत हवी असली तर तू कधीही मागू शकतेस एवढं लक्षात ठेव."
 विनी दुखावली होती तिला उडवून लावण्याचा ज्योतीचा इरादा नव्हता, पण खाजगी आयुष्याबद्दल कुणाशीही बोलायला ती अनुत्सुक असे. तिच्या जागी विनी असती तर तिनं रागारागाने पुष्कळ बडबड केली असती, अतुलला शेलकी विशेषणं बहाल केली असती. पण अतुलला सोडून बिडून जाण्याचा विचार केला नसता. परिस्थितीनं घातलेल्या मर्यादांच्या आत आपल्याला काय हवं ते तिला नेमकं माहीत होतं. अतुल कसाही असला तरी तो तिला एकाकीपणा, कंटाळवाणं किंवा कष्टाचं आयुष्य यांच्यापासून दूर ठेवीत होता. त्याच्याशिवायचं खडतर आयुष्य ती कल्पूच शकत नव्हती. तेव्हा ती जरूर त्या तडजोडी करायची, पण त्या करताना आलेला कडवटपणा, संताप, वैताग हयांना ती खुलेपणाने वाट करून देऊन स्वत:चा मानसिक तोल राखायची. कदाचित हा जास्त शहाणपणाचा मार्ग असेल, पण आपण तसं वागू शकणार नाही अशी ज्योतीची खात्री होती.
 ती म्हणाली, " थॅंक यू, विनी. तुझ्यापासून काही लपवायचंय - असं नाही. काही सांगायचं-विचारायचं असलं तर तुलाच. तूच तेवढी माझी जवळची मैत्रीण आहेस. पण आत्ताच्या परिस्थितीत तू मदत तरी काय करू शकणार ?"
 एकाएकी ज्योती रडायला लागली.
 " काय झालं ज्यो? सांग ना मला. नुसतं बोलून सुद्धा कधी कधी हलकं वाटतं.”
 " सॉरी. तुझ्यासमोर रडायबिडायचा इरादा नव्हता माझा. तुझ्याकडून मदत मागण्यासारखं काही राहिलंच नाहीये. मी रामला सोडून जात्येय, विनी."
 " अशक्य. मी हयाच्यावर विश्वास ठेवणं शक्य नाही."
 विनयाचा धक्का बसलेला चेहरा पाहून ज्योतीला हसू आलं.
 " तुला विश्वास ठेवावाच लागेल. "
 "पण-मला काही कळेनासं झालंय. तुमचं लग्न म्हणजे नेहमीच्या नियमाला अपवाद आहे. प्रत्येकाच्या स्वप्नातलं आदर्श लग्न."
 " मग ते इतकं आदर्श असतं तर लग्न झाल्यानंतर तीस वर्षांनी आज मला आयुष्यात जे हवं होतं ते सगळं माझ्या हातून निसटलंय असं का वाटतंय ?"
 " असं कसं म्हणतेस तू? तुला काय नाहीये? तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा नवरा, दोन छान मुलं, तुझं काम-
 " माझं काम नाही, रामचं काम."
 " पण ते तुझं समजून आयुष्यभर केलंस ना तू ?"
 " हो, पण आवडीचं म्हणून मुद्दाम काही मी हे कार्यक्षेत्र निवडलं नाही. एका योगायोगानं ते माझ्यावर लादलं गेलं. राम कोष्टी असता तर मी माग चालवायला शिकले असते."
 " हा सगळा विचार फार पूर्वीच करायला हवा होतास. आता जरा उशीरच झाला असं वाटत नाही का तुला?"
 " उशीर झालाय, पण वेळ पार निघून गेली नाही. म्हणूनच मला तरुणपणी फारशी अक्कल नसताना केलेली चूक आता दुरुस्त करायचीय. "
 " रामला काय वाटेल याचा तू विचार केलायस? तू म्हणजे त्याचं सर्वस्व आहेस."
 " वाईट वाटेल, पण तो ते सहन करू शकेल. माझ्याखेरीज त्याच्या आयुष्यात इतर पुष्कळ गोष्टी आहेत."
 " आणि तुझं काय? तू खरंच एक नवं आयुष्य उभारू शकशील असं तुला वाटतं ?"
 " का नाही ? माझ्याआधी इतरांनी उभारलेलं आहे."
 " ज्यो, तू रामशी बोललीस का? आत्ता मला जे सांगितलंस ते त्याला सांगितलंस? मला वाटतंय तू मनातल्या मनात कुढत बसून राईचा पर्वत केलायस. तुम्ही दोघांनी बसून एकमेकांशी बोललात तर त्याचं वागणं तुला कुठे खुपतंय ते त्याला कळेल तरी. तो अतुलसारखा नाहीये. त्याला तुझ्याबद्दल नुसतं प्रेमच वाटतं असं नाही तर आदरही वाटतो. तो तुझं बोलणं नीट ऐकून घेईल, त्याच्यावर विचार करील."
 " तो ऐकून घेईल, पण समजून घेणार नाही. समजून घ्यायचा प्रयत्नच करणार नाही. तुला खरंच वाटतं का, की मी त्याला समजून सांगायचा प्रयत्न केलाच नाही? तू म्हणतेस त्याचं माझ्यावर प्रेम आहे. शेवटी प्रेम म्हणजे काय? आपण ज्याचा आधार घेतो किंवा जो आपला आधार घेतो त्याच्याबद्दलची आपली भावना ? की जो स्वतःच्या ऊर्मी दाबून ठेवून आपल्या मनाप्रमाणे वागतो त्याच्याबद्दल वाटतं ते ? ज्याला तुमच्याबद्दल प्रेम वाटतं त्यानं न सांगता तुमच्या भावना, तुमच्या गरजा जाणायला नकोत ?"
 " असं नेहमीच होत नाही, ज्यो. तुमच्या गरजा तुम्हाला सांगाव्या लागतात. तितकं संवेदनाशील कोण असतं? पुरुष तर नाहीच, कारण त्याला केंद्रबिंदू होऊन राहण्याची सवय असते, दुसऱ्याने त्याच्या गरजा जाणून घ्यायची धडपड करण्याची सवय असते. कधी कधी मी हिरमुसलेली पाह्यली की अतुल म्हणतो, काय झालंय तुला? मग मी म्हटलं की तू अमुक केलंस म्हणून किंवा करायला विसरलास म्हणून मला वाईट वाटलं. तर तो म्हणतो, तू सांगितलं का नाहीस मला? मी बोलून दाखवीपर्यंत त्यानं मला दुखवण्यासारखं काही केलंय याची जाणीवच नसते त्याला."
 " तरी पण त्यानं तुला दुखवलंय ही वस्तुस्थिती बदलत नाही ना? उलट अजाणता केलं तर ते जास्तच वाईट. तुझ्याबरोबर इतकी वर्ष काढल्यावर तू कशाने दुखवली जातेस हे जाणण्याचे सुद्धा कष्ट त्यानं घेतले नाहीत, तर त्याचा अर्थ काय होतो? त्याला तुझ्या बद्दल काही आच नाही असाच ना?"
 विनया बराच वेळ ज्योतीकडे बघत राहिली. मग हळूहळू म्हणाली, " तुझं खरं असेलही. पण असली समीकरणं मांडत बसण्याचा काही फायदा नसतो. व्यवहारात इतका काटेकोरपणा करताच येत नाही. मला अजूनही वाटतं की तू फार घाई करत्येयस. रामला त्याची बाजू मांडण्याची संधीसुद्धा देत नाहीयेस. पिंजऱ्यात उभ्या असलेल्या आरोपीलासुद्धा त्याची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिक्षा फर्मावीत नाहीत."
 जाता जाता विनी म्हणाली, " तू आणि राम - माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. आयुष्यात जे शाश्वत समजावं त्यालाच धक्का लागावा असं झालंय."
 ज्योती हसून म्हणाली, “ विनी, एखादं लग्न मोडायच्या बेताला आलं तरी मुलांसाठी ते सांधून घेतलं जातं. तसं मित्र-मैत्रिणींसाठीसुद्धा सांधायचं म्हणजे फारच झालं."

१५



 बंधनं जो मानतो त्यालाच जाचतात. एकदा ज्योतीची एक मैत्रीण म्हणाली होती, “ मुलं असली म्हणजे अगदी बांधल्यासारखं होतं नाही?" ज्योती म्हणाली होती, " नाही बाई." तेव्हा ती मैत्रीण पटकन म्हणाली होती, " हो बरोबर ! तू काही आमच्यातली नाहीस. तुझं सगळं वेगळंच आहे." तिच्या आवाजातलं थोडा हेवा, थोडी कीव, थोडा टीकात्मक सूर ह्यांचं मिश्रण ऐकून ज्योतीला गंमत वाटली होती. कुठल्याही गोष्टीनं आपल्याला बांधून ठेवण्यासाठी आधी आपण बांधून घ्यायला राजी असलं पाहिजे. प्रत्येकाला एक पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य असतं. ज्योतीनं आपल्या मुलांना आपल्या कामात व्यत्यय आणू दिला नव्हता. आज तिला थोडंसं असं वाटत होतं की हा निर्णय सर्वस्वी आपला नव्हता. तरी पण रामनं त्याचा निर्णय तिच्यावर लादला होता असंही तिला म्हणता येईना. पहिल्यापासून त्यानं पुढे जायचं नि तिनं त्यानं आखलेल्या वाटेनं मुकाट्यानं चालायचं असा पायंडाच पडून गेला. तशी त्याच्या निर्णयापुढे मान तुकवण्याची तिला कोणी- त्याने सुद्धा – सक्ती केली नव्हती, तिनं आपणहूनच काही उलटसुलट विचार न करता हा मार्ग पत्करला होता. मग आता तिला त्याचं ओझं का वाटत होतं ? कारण ती बदलली होती? की राम बदलला होता?
 अर्थात हे शक्य होतं की माणसं बदलत नाहीत, आणि राम आज जसा होता तसाच पहिल्यापासून होता. पण काहीतरी बदललं होतं यात शंका नव्हती. परिस्थिती बदलली होती, म्हणून संदर्भ बदलले होते. कणखरपणा, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा आणि ती पुरी करण्याच्या मार्गात येणारे अडथळे लाथाडून जाण्याचा बेगुमानपणा हे शिडीच्या पहिल्या पायट्यावर उभ्या असलेल्यात गुण समजले जातात, पण शेवटच्या पायट्यावर सुरक्षितपणे आरूढ झालेल्यात नाही. ज्याला यश मिळालेलं आहे त्याचा कणखरपणा म्हणजे प्रसंगी संवेदनाशून्यता वाटायला लागते, आणि त्याची महत्त्वाकांक्षा म्हणजे हाव. अशी कुठलीच जागा नव्हती की जिथे राम म्हणणार होता, पुरे, आता मी जिथे जायला निघालो तिथे पोचलो. ज्योतीला हे समजू शकत नव्हतं. एखाद्या घृणास्पद माणसाला मोठ्या अगत्याने घरी जेवायला बोलवून शिवाय तिनं कुरकूर केली की, " त्यात काय आहे ज्यो? हे नुसतं धंद्यासाठी आहे. व्यवहाराचा भाग आहे हा " असं म्हणणारा राम तिच्या पचनी पडू शकत नव्हता.
 विनी म्हणाली तसं ती रामबरोबर ह्या सगळ्याबद्दल बोलली असती तर कदाचित गोष्टी ह्या थराला आल्या नसत्या. पण आता त्याला फार उशीर झाला होता. एकदा तिनं बिनतक्रार त्याच्या पावलावर पाऊल टाकण्याची, त्यानं केलेला निर्णय पटला नाही तरी त्याविरुद्ध फारसा मोठा आवाज न उठवण्याची, त्यानं केलेल्या माफक कौतुकातच सार्थक मानण्याची भूमिका स्वीकारल्यावर खऱ्याखुऱ्या संवादाचा मार्गच खुंटला होता. त्यांचं नातं ह्याच पायावर उभारलं गेलं होतं आणि वर्षानुवर्ष एकत्र राहिल्यामुळे, काम केल्यामुळे ते जास्त जास्त जोमदार आणि परिपक्व होतंय असा आभास निर्माण झाला होता. पण खरंतर हया दर्शनी भिंतीच्या मागे त्यांच्या नकळत ते हळूहळू कमकुवत होत ढासळत होतं. आयुष्यातल्या बाकी सगळया बाबींचे अत्यंत काळजीपूर्वक तपशीलवार आराखडे आखणारा राम ह्या बाबतीत अपयशी ठरला होता. पण कदाचित असंही असेल की माणसा - माणसांतल्या नात्याचे आराखडे आखता येत नाहीत. मग करायचं काय ? नातं जसा आकार घेईल तसा त्याला घेऊ द्यायचा आणि अशी वेळ आली की ते आपल्याला स्वीकार्य वाटत नाही, की ते सोडून निघून जायचं? हे फारच लहरी आणि विक्षिप्त झालं. ज्योतीची खात्री होती की आपण लहरी नाहीयोत. आल्या परिस्थितीत आपला निर्णय विचारपूर्वक घेतलेला आणि अटळ आहे. जिथे मला आयुष्यात मिळाव्या असं वाटत असलेल्या कुठल्याच गोष्टी मिळू शकत नाहीत तिथे मी रहाणार नाही. एवढं नक्की. आणि एवढं सध्या पुरे आहे. मग मी पुढे काय करणार, कुठे जाणार हे सगळं आपोआप सुचत जाईल, एवढे सगळे दिवस हे ठरवण्याचा प्रयत्न करण्यात मी वाया घालवले. आता तिला कळून चुकलं की ज्या भविष्यकाळाशी मुकाबला करायचा तो येऊन ठेपल्याशिवाय त्याच्याबद्दल नुसता विचार करणं व्यर्थ आहे. एकदा त्यात स्वतःला झोकून दिलं म्हणजे येणाऱ्या परिस्थितीला कसकसं तोंड द्यायचं ते आपोआप सुचत जाईल.
 त्या रात्री तिला झोप आली नाही, पण झोपेची गोळी वगैरे न घेता ती खोलीत येरझारा घालीत किंवा डोळे मिटून बिछान्यावर स्वस्थ पडून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पेटीत कपडे भरताना ती शांत होती. तिच्या इतक्या दिवसांच्या विचारमंथनातून फारसं काही निष्पन्न झालं नसलं तरी आता तिनं ठाम निर्णय घेतला होता आणि त्यामुळे ती स्थिरचित्त होती.
 नाश्ता घेत असताना तिला फोन आहे म्हणून निरोप आला. क्षणभर मी नाहीये असं सांगा असं म्हणण्याचा तिला मोह झाला. तिनं जो निर्णय घेतला होता तो असा फोनवर त्याला सांगण्याची तिची इच्छा नव्हती. मग तिनं विचार केला. नुसतं मी आज परत येतेय म्हणून सांगेन त्याला. पण मग तो त्याचा अर्थ नक्कीच नको तो लावील.
  फोन विनीचा होता, आणि ज्योतीनं सुटकेचा नि:श्वास सोडला. पण लगेच तिला वाटलं, विनी फोन कशासाठी करणार ? रामला काहीतरी झालं असेल. तो आजारी बिजारी असेल. देवा, असं असू नये.
 विनी म्हणाली, " ज्यो, काय चाललंय हे सगळं ?"
 " म्हणजे?"
 " तू पेपर वाचला नाहीस का?"
 " गेल्या काही दिवसांचे नाही वाचले. का?"
 " त्रिवेणी सीड्सने खराब बी विकलंय अशा बातम्या आहेत. शेतकऱ्यांनी पुष्कळ तक्रारी केल्यायत उगवण होत नाही म्हणून, आणि सरकारने चौकशी सुरू केलीय. आणि आता मी अशा वावड्या ऐकल्यात की त्रिवेणीचं दिवाळं निघतंय."
 " शक्य नाही, विनी. हे धादांत खोटं आहे."
 " मी फक्त तुला लोक काय म्हणतायत ते सांगतेय. लोक म्हणतायत राम फ्लॅट विकतोय पैसे उभे करायला."
 " हे सगळंच अशक्य कोटीतलं आहे. एनी वे, मी आज घरी जातेच आहे, तर काय प्रकार आहे तो कळेलच. फोन केल्याबद्दल थँक्स."
 " आज येत्येयस तू इकडे ? मग फार बरं झालं."
 " तुला वाटतंय तो त्याचा अर्थ नाहीये."
 " लोक असंही म्हणतायत की कंपनी बुडतेय म्हणून तू रामला सोडलंयस."
 " नॉनसेन्स."
 " मला माहीताय ग. पण लोकांना नुसत्या घडलेल्या गोष्टी दिसतात. त्यांच्यातून ते त्यांना वाटेल तो अर्थ काढणार. "
 " विनी, तू मला ब्लॅकमेल करत्येयस. लोक काय वाटेल ते बोलतील. म्हणून मी माझा निर्णय बदलावा असं तुझं म्हणणं आहे ? केवळ लोकांखातर ? लोक कोण लागतात माझे ? फार तर खरंच काही झालं असलं आणि रामला माझ्या मदतीची गरज असली तर मी तेवढ्यापुरतं थांबेन."
 " त्याला फोन करून सांगू का तू येत्येयस म्हणून ?"
  " नको."
 विनी मोठ्याने हसली. " मी काही विनोदी बोलले का ?"
 " ज्यो, तू खरंच त्याला सोडण्याचा निर्णय घेतला असलास, तर अवचित येऊन त्याला धक्का देण्याचं कारण काय ? बरंय, भेटू आपण. बेस्ट ऑफ लक."
 जरा उशिराची बस घेऊन ज्योती दुपारी घरी पोचली. घरात कुणीच नव्हतं, तेव्हा ती आपल्या किल्लीनं कुलूप काढून आत गेली. आत गेल्या गेल्या दारातच उभं राहून तिनं सावकाश इकडे तिकडे बघून घेतलं, मग दार ओढून घेऊन ती बेडरूममधे गेली.आंघोळ करून तिनं एक सैल काफ्तान घातला. मग स्वैपाकघरात जाऊन टोस्ट आणि कॉफी बनवली. फ्रिज उघडून पाहिला तर त्यात पपई होती. त्याची एक फोड तिनं कापून घेतली. रामला पपई इतकी आवडत असे की रोज उठून पपई खायला त्याची हरकत नसे. फ्रिजमधे पपई असणं याचा अर्थ त्याचं आयुष्य तिच्याविना सुरळीत चाललं होतं.
 ती जेवण ट्रेवर घालून बैठकीच्या खोलीत घेऊन आली, आणि सकाळचा पेपर वाचीत तिनं ते खाल्लं. घरी येण्याच्या अनुभवाचा ती आस्वाद घेत होती. तिच्या मनात आलं, आणि मी स्वत:ला इथून हद्दपार करत्येय. खरंच का? की विनी म्हणतेय तसं मी स्वतःशीच एक लुटुपुटीचा खेळ खेळतेय ? तिनं जोराजोराने मान हलवली. छेः, तसं मुळीच नाही. खरं म्हणजे काही बदललं नाहीये. नुसतं बऱ्याच दिवसांनंतर घरी येण्याच्या अनुभवाने मी हळवी बनलेय. पण घर म्हणजे अमुकच वास्तू असं नसतंच मुळी. आणि मला माझ्या घराची आठवण होत होती तरी घराला माझी होत नव्हती हे कबूल करायला पाहिजे मला. बाईविना सुनं सुनं असं काही हे घर दिसत नाहीये. आपला अहंकार थोडासा दुखावलाय हे कबूल करताना तिला स्वत:चं हसू येत होतं.
 पार्वती काहीतरी बाजार करून परत आली. तिचे डोळे चमकले. " बाई, तुम्ही आलात !"
 बरेच दिवस आपण कुठे गेलो होतो ह्याचा तिला प्रश्न पडला असेल का असं ज्योतीच्या मनात आलं. तिनं रामला विचारलं असेल का? रामनं तिला काय सांगितलं असेल?
 " कशी आहेस, पार्वती ? सगळं ठीक आहे ना?"
 " सगळं ठीक आहे. बाई, मला माझ्या नणंदेच्या घरी जायचंय. तिच्या मुलीचा साखरपुडा आहे आज. ते आधीच गेलेत साहेब म्हणाले होते जेवण करून ठेव नि तू जा."
 " मग जा ना तू. स्वैपाक करून ठेवायची गरज नाही. मी करीन."
 साहेब रागावतील, तुम्ही प्रवासाहून आल्या आल्या तुम्हाला स्वैपाक करावा लागला म्हणून. मी करते. असा किती वेळ लागणाराय ?"
 " अगं जा तू. काही रागवत नाहीत साहेब. मी सांगते त्यांना मी तुला पिटाळलं म्हणून. जा. खरंच जा."
 राम घरी येईल त्यावेळी ही नवराबायको घरी नसतील म्हणून ज्योतीला बरं वाटलं. काहीतरी विचित्र चाललंय इतपत त्यांना कळलंच असलं पाहिजे. बहुतेक इतर फ्लॅट्समधल्या नोकरांबरोबर त्याच्याबद्दल चर्वितचर्वणही झालं असणार. त्याची ज्योतीला परवा नव्हती. आणि ती आणि राम मोठमोठ्याने भांडणार किंवा एकमेकांना वस्तू फेकून मारणार अशीही फारशी शक्यता नव्हती. तरीही त्या दोघांच्या संवादाच्या वेळी तिसरं कुणी माणूस हजर असणार नाही ह्याचं तिला बरं वाटलं.
 साडेसात वाजले तरी राम आला नाही तेव्हा तिला जरा अस्वस्थ वाटायला लागलं. एकदा लवकरात लवकर काय ते बोलून संपवावं हे बरं. शिवाय जास्त वेळ जायला लागला तसं तिला आपले पाय इथे जास्त घट्ट रोवले जातायत असं वाटायला लागलं. शेवटी तिनं त्याला फोन करायचं ठरवलं. ह्यावेळी टलिफोन ऑपरेटर काही ड्यूटीवर नसणार, तेव्हा बाहेरची लाइन सरळ ऑफिसला जोडलेली असेल अशी आशा करीत तिनं नंबर फिरवला.
 फोन तीनदा वाजला, मग राम म्हणाला, "हॅलो."
 " राम.”
 " ज्यो, कुठेयस तू ?"
 " घरी."
 " मी आत्ताच्या आत्ता निघतोय. दहा मिनिटांत घरी पोचेन. कुठे जाऊ नकोस. तिथेच थांब. आलोच मी."
 त्याचा आवाज, तोही आनंदाने ओतप्रोत भरलेला, ऐकून तिच्या हृदयात धडधड व्हायला लागली. भूतकाळात जाणं किती सोपं होईल ! पण त्यात काही अर्थ नव्हता. कारण तसं करून पुन्हा ती होती तिथपर्यंत येऊन ठेपली असती. आणि मग मिनिटांमागून मिनिटं चालली तशी त्याच्याशी होणाऱ्या भेटीची तिला धास्ती वाटायला लागली. परत येणं ही खरंतर चूकच झाली. तिला जे सांगायचं होतं ते ती कसं सांगणार होती? कुठल्या शब्दांत ? आणि त्याच्याशी वागणार कसं होती ? त्रयस्थासारखं ? की खेळीमेळीनं, पण ठामपणे? आणि मग काय ? जेवण करून " येते मी" असं सांगून जायचं? की रात्र इथेच काढायची? कुठे ? त्याच्या शेजारी?
 राम आत आला तो अगदी सहजपणे म्हणावं तसं "हॅलो, ज्यो" म्हणत. त्याचा फोनवरचा उसळता उत्साह मावळला होता.
 " कसा आहेस?"
 " मी ठीक आहे. आणि तू?"
  तिला एकदम हसू फुटलं. " हा कसला वेड्यासारखा औपचारिकपणा?" तो अवघडल्यासारखं वागल्यामुळे तिला त्याच्याशी जेवढी जवळीक वाटली तेवढी त्यानं तिला आवेगाने मिठीत घेतली असती तर वाटली नसती.
 ती म्हणाली, " हा खराब बियाणाचा काय प्रकार आहे ?"
 " ओ: ! काही नाही. ते आपलं बी नाहीच आहे मुळी. आपल्या पिशव्यांत दुसरंच बी भरून विकलंय कुणीतरी."
  " ते कसं शक्य आहे. "
 तो दारू ठेवलेल्या कपाटाशी गेला आणि त्याने एका ग्लासात व्हिस्की ओतून थर्मासमधून बर्फाचे खडे काढून त्यात टाकले.
 " ड्रिंक घेणार ?"
  " नको."
 तो आपलं ड्रिंक घेऊन तिच्यासमोर येऊन बसला.
 " आधी मला वाटलं, कुणीतरी आपल्यासारख्या पिशव्या छापून घेतल्यात. पण ते तितकं सोपं नाही. तेच मटीरियल घेऊन पिशव्या शिवता येतील, पण अगदी तसलाच ब्लॉक करवून घेणं कठीण आहे. अर्थात कापड, दोरा हयाचे सप्लायर्स, ब्लॉकमेकर, पिशव्यांची शिलाई करणारे, सगळयांकडे चौकशी सुरू केलीच आहे. पण कुणीतरी इतके कष्ट घेऊन अगदी हुबेहुब आपल्यासारख्या पिशव्या बनवल्या असल्याची शक्यता जरा कमीच आहे. कुणीतरी आतल्या माणसाने बोगस बी विकणाऱ्यांना आपल्या पिशव्या विकल्या असल्या पाहिजेत. प्रत्येक लॉटमधून थोड्या थोडया चोरून ठेवल्या असणं शक्य आहे."
 " पण मग स्टोअरकीपरला ते कळायला पाहिजे."
 " अर्थात. जरी समजा प्रत्येक लॉटमधल्या काही पिशव्या बाद कराव्या लागल्या तरी ते त्याच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही. तेव्हा प्रत्येक लॉटमधे थोड्या पिशव्या कमी आल्या आणि त्याने त्याबद्दल काही नोंद केली नाही तर त्याचा अर्थ त्याला तोंड बंद ठेवण्यासाठी कुणीतरी लाच चारली असली पाहिजे, नाहीतर तोच हे करतोय. काहीही असलं तरी त्याच्या संगनमताशिवाय असं काही होणार नाही."
 " मग तू काय करणारेस आता?"
 " मी कोरेला सप्लायर्सकडे पाठवलंय, जास्त मटीरियल त्यांनी दिलेलं आहे का ते पहायला. मग शिवून आलेल्या पिशव्या, भरलेल्या पिशव्या, विक्री झालेल्या आणि गोडाउनमधे शिल्लक असलेल्या अशी सगळी आकडेवारी काढतोय. सगळी माहिती माझ्या हातात आली की स्टोअरकीपरच्या गळ्याभोवती फास आवळलाच म्हणून समज. मग तो इतर कोणकोण त्यात गुंतलंय त्यांची नावं देईल. आणि मी नुसतं सगळ्यांना हाकलून देणार नाही, त्यांच्यावर फौजदारी करणार आहे. चांगला धडा शिकवणार आहे त्यांना."
 " कंपनीविरुद्ध कोणीतरी केस केलीय ना? त्याचं काय?"
 " त्यात काही अर्थ नाही. त्या पिशव्यांच्या टॅग्जचे नंबर आपले नाहीत हे आपण सहज सिद्ध करू शकू." तो हसला. " शेवटी त्यांची अक्कल कमी पडली."
 तिच्या मनात आलं, म्हणजे हे काही खरंखुरं संकट नाही. त्यासाठी मी मुद्दाम इथे राहायची गरज नाही.
 ती म्हणाली, " ज्यांना तुम्ही चांगली वागणूक दिली, ज्यांच्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवली, त्यांनी विश्वासघात करावा हे किती वाईट."
 " माणसं अशीच असतात. ज्यो. निष्ठा, प्रामाणिकपणा हे शब्द जुनेपुराणे झाले आता. शक्य आहे तेवढं आपल्या घशात घालायचं ही आजची संस्कृती आहे. पण आपल्या लोकांचा एक हिशेब चुकला. त्यांना काय वाटलं मी गप्प बसून ऐकून घेईन म्हणून ? माझ्या पाठीत खंजीर खुपसून ते सहीसलामत सुटतील म्हणून?"
 राम नेहमी बोलायचा तसंच बोलत होता. तरीपण त्यात ज्योतीला काहीतरी वेगळं वाटलं. सत्ता हातात असलेल्या माणसाच्या बोलण्यातल्या कणखरपणाऐवजी आरडाओरडा करून धमक्या देणाऱ्याच्या बोलण्यातला पोकळपणा त्यात जाणवत होता. अर्थात रामच्या हातात सत्ता होती आणि तो म्हणाला तसं करून दाखवणं त्याला सहज शक्य होतं. तरीही तिला हा सूक्ष्म फरक जाणवला. आणि हा फरक काही चारदोन दिवसांत पडला नव्हता. तो बरेच दिवस पडत गेला असला पाहिजे. पण ती सदैव त्याच्याजवळच रहात असल्यामुळे तिला तो आतापर्यंत जाणवला नव्हता.
 तिनं त्याच्याकडे अगदी अलिप्त नजरेनं पाहिलं. ज्याचा माझ्या आयुष्यावर गेली तीस वर्ष प्रभाव होता अशा ह्या माणसाबद्दल मला नक्की काय वाटतं? प्रेम? पण प्रेम म्हणजे तरी काय ? ते निरनिराळ्या माणसांच्या लेखी निरनिराळं असू शकतं. त्याच माणसालासुद्धा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं भासतं. दोन माणसांतल्या नात्याचं वर्णन करायला प्रेम हा शब्द पुरेसा नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी अमक्याबरोबर राहते कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. तुम्ही कुणाबरोबर तरी राहता ह्याचं कारण एकमेकांशी अमुक नातं असलेली दोन माणसं एका घरात राहतात अशी परंपरा आहे. हे कुठलं नातं? प्रेमाचं नातं एवढं म्हणून भागत नाही. मग काय ? एकमेकांवर अवलंबित्व ? एकमेकांबद्दल आदर ? एकमेकांची कदर ? पण हयातल्या कुठल्याही भावना एकमेकांविषयी वाटत नसूनही दोन माणसं एका छपराखाली राहू शकतात, रहातात. माझ्या मनात रामविषयी राग, द्वेष असं काही नाही. मला त्याला सोडून जायचंय कारण त्याच्याबरोबर राहून मला सुख, शांती मिळू शकत नाही. एवढंच.
 त्यांच्या एकत्र आयुष्याला वेगळं वळण देण्याचा तिनं प्रयत्न केला नाही हे तिचं चुकलं का ? पण तिला हवं तसं वळण तिनं दिलं असतं तर मग तो असुखी झाला असता. त्यांना मुळी आयुष्यात अगदी वेगळ्याच गोष्टी हव्या होत्या त्याला काय करणार? त्याला हवंय ते सगळं त्याला मिळालं, त्यानं घेतलं. पण तिला हवं असलेलं बरंच काही तिच्या हातून निसटून गेलं. आणि आता ते परत मिळवणं शक्य नव्हतं. ही साधीसोपी गोष्ट त्याला समजावून सांगणं इतकं का कठीण होतं ?
 ती म्हणाली, " हात – तोंड धुऊन जेवायला येतोस ना?"
 तो जेवायच्या टेबलाशी आला तेव्हा ती म्हणाली, " तुझ्या पँटचं झिपर लागलेलं नाहीये."
 "ओ." त्यानं झिपर वर ओढलं. त्याचा चेहरा जरासा ओशाळवाणा झाला. त्या क्षणी तिला तो एकदम लहान मुलासारखा अगतिक, जगाचा प्रतिकार करायला असमर्थ असा भासला. हा नवीनच अनुभव होता कारण तिला त्याच्याबद्दल असं कधीच वाटलं नव्हतं. आणि मग तिला उमजलं की हे अटळ आहे. तिच्या बापाच्या शेवटच्या आजारपणात न कंटाळता त्याची शुश्रूषा करणारी आई तिला दिसली. हे केवळ प्रेम आणि निष्ठेच्या पोटी नसतं. इथे एक भूमिकांची अदलाबदल झालेली असते. पुरुष पहिल्यापासून वरचढ असतो, आघाडीवर राहून जगाला तोंड देतो आणि देत देत संपून जातो. तडफदार तरुण अशी त्याची प्रतिमा मध्यमवयात तडफदार राहात नाही. यशाचं शिखर गाठण्यासाठी आवश्यक असलेले त्याचे गुण आयुष्याच्या उतरणीला लागल्यावर गैरलागू, प्रसंगी हास्यास्पदही ठरतात. आणि ह्याचवेळी बाईच्या बाबतीत उलटं घडत असतं. ती दुय्यम भूमिका स्वीकारते. अगदी ज्योतीसारखी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून अंगचोरपणा न करता काम करणारी बाईसुद्धा दुय्यम भूमिकेतच राहाते कारण निर्णय घेण्याचा, अंतिम जबाबदारी स्वीकारण्याचा भार तिला पेलावा लागत नाही. आणि तिला आधार देणाऱ्या, लाडाने, कौतुकाने, प्रसंगी तुच्छतेने वागवणाऱ्या, अपमानितसुद्धा करणाऱ्या तिच्या नवऱ्याला एकाएकी तिच्या आधाराची गरज वाटायला लागते. सर्वशक्तीनिशी आयुष्य न जगता ती चिवटपणा, कणखरपणा, शहाणपणा ह्यांचा कणाकणाने संचय करून ठेवते, आणि आयुष्याच्या संध्याकाळी जास्त समर्थ बनते. मग तिच्या सहचराबद्दल वाटत असलेल्या आदराची, धाकाची जागा मायेने, अनुकंपेनेसुद्धा घेतली जाते. जेवण वाढून घेऊन ती दोघं जेवायला बसली. तो म्हणाला, " हे जेवण काही पार्वतीनं शिजवलेलं नाहीये."
 " नाही."
 " पण मी तिला जायच्या आधी स्वैपाक करून जा म्हणून सांगितलं होतं.”
 " ती जरा घाईत दिसली, तेव्हा मीच तिला जायला सांगितलं."
 " तरी पण तिनं स्वैपाक तुझ्यावर टाकायला नको होता."
 " राम, एका वेळचं जेवण शिजवल्यामुळे माझं काही बरंवाईट होणार नाहीये," ती चिडूनच म्हणाली.
 त्यानं तिला पहिल्यापासून सांगितलं होतं, " तुला किती हवे तितके नोकर ठेव, पण तुला घरकामात वेळ घालवायला लागता कामा नये. जास्त महत्त्वाचं काम करायला तू समर्थ असताना झाडलोट, भांडीधुणी, स्वैपाक ह्यात तुझा वेळ आणि शक्ती का खर्च होऊ द्यायची ?" आधी तिला घरकामाची हौस नव्हतीच. तेव्हा रामने असं सांगितल्यावर तिला फारच आनंद झाला. पण मिळालेलं स्वातंत्र्य अगदी काही झालं तरी घरकामाला हातच लावायचा नाही इतकं टोकाला नेलं की त्याचंसुद्धा बंधन होऊ शकतं.
 तिला एकदम विनीनं फ्लॅटबद्दल काय सांगितलं ते आठवलं. " तू फ्लॅट विकायला काढलायस?
 " हो."
 " का ?" याहून चांगला किंवा जास्त अलिशान वस्तीतला फ्लॅट घेण्यासाठीच असणार असंच तिला वाटलं.
 " आपण शिरगावला परत जाऊ. तेच तुला हवंय ना?"
 " काय ?" तिला बसलेला धक्का इतका जोरदार होता की क्षणभर तिचं डोकं चालेनासं झालं. मग तिच्या मनात आलं, देवा, हे मी काहीतरी चुकीचं ऐकलेलं असू दे. त्याच्याकडून एवढा त्याग मी स्वीकारू शकत नाही. आणि आता फार उशीर झालाय. परत जाण्यानं काय फरक पडणार आहे ?
 ती भानावर आली तेव्हा तो म्हणत होता, "ज्यो, तू माझ्याकडे परत आलीयस ना?"
 " पण राम, मला कळत नाहीये काही. शिरगावला परत जायचं?"
 " हेच सगळं तुला आवडत नाही ना? असं राहणं ? मग ते आपण सोडून देऊ."
 " असं एकदम सोडून द्यायचं ?"
 " काय हरकत आहे त्याला?"
 " तूच नेहमी म्हणतोस ना की घड्याळाचे काटे उलटे फिरत नाहीत, आपण नेहमी पुढेच पाऊल टाकलं पाहिजे, मागे वळून पाहता कामा नये म्हणून ?
 " ते आपलं नुसतं म्हणायचं असतं. आपण जाऊ परत नि तिथन सगळं काम बघू. तू पहिल्यांदा म्हणाली होतीस तसं इथे नुसतं एक लहानसं ऑफिस ठेवू. आठवड्यातनं एकदा येऊन गेलं तरी पुरे. बाकी सगळं तिकडे हलवू."
 " पण तू तिथे आनंदाने राहू शकशील ? केवढी धडपड केलीस, किती कष्ट केलेस इथपर्यंत येण्यासाठी."
 " एक गोष्ट तू ध्यानात घेत नाहीयेस, ज्यो. हया सगळ्याचं मला काही अप्रूप नाही. जर तू त्यात नसलीस तर त्याला काही अर्थ नाही. मान हलवू नको. मी काही अतिशयोक्ती करीत नाही. अगदी खरं तेच सांगतोय. मीसुद्धा गेले काही आठवडे खूप विचार केला. आपण धंदा वाढवीत नेला, इथे आलो ते तुला फारसं आवडलं नाही, इथलं आपलं आयुष्य तुला आवडत नाही हे सगळं मला कळत होतं. मी काही अगदीच आंधळा - बहिरा नाही. पण मला वाटलं की हळूहळू ते तुझ्या अंगवळणी पडेल, आणि तुला उमजून येईल की हया सगळ्या गोष्टी वरवरच्या आहेत, त्या आपल्याला खरा स्पर्श करू शकत नाहीत."
 " पण तरी करतातच, होय की नाही?"
 " आपण करू दिला तर करतात. पण तो वाद आता कशाला? मला फक्त एवढंच माहीत आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी माझं आयुष्य एकसुरी होतं. त्यात ज्या काही चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी घडल्या त्यांचा सगळ्यांचा उगम तू आहेस. फक्त तू माझ्यासाठी जे केलंस त्यांच्या बदल्यात मी तुला काहीच देऊ शकलो नाही एवढंच मला वाईट वाटतं.”
 " असं म्हणू नको. असं कसं शक्य आहे ?"
 " नाहीतर मग तू मला सोडून जायच्या गोष्टी का करत्येयस ? पण तू बघशील. आता हे सगळं मी बदलून टाकीन."
 तिला काय म्हणावं ते कळेना. तिनं नुसतीच मान हलवली. आपल्याला जे हवंय त्याचा तो नेहमीच एकचित्ताने पाठपुरावा करायचा. आता मी त्याला हवीय, मला जाऊ देता कामा नये असं त्यानं ठरवलंय. का? कारण माझ्याशिवाय तो जगू शकणार नाही असं त्याला वाटतंय ? की बायको सोडून गेली म्हणून लोकांत आपलं हसं होईल असं वाटतंय ? की ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत ?
  " नुसतं डोकं हलवू नको, ज्यो. काहीतरी बोल ना."
 " हे जमणं शक्य नाही, राम. त्यावेळी होतो तसे आपण राहिलोत का ? आपल्यात कितीतरी बदल झालेत. आपण ही मधील सगळी वर्ष पुसून कशी टाकू शकू ?"
 " तसा प्रयत्न तर करता येईल ? आता तू परत आलीयस तर तू आनंदात राहाशील असं काहीही करायला मी तयार आहे. बोलत का नाहीस, ज्यो? तू परत आलीयस ना? ज्यो?".
 तिनं त्याच्या डोळ्यांत निरखून बघितलं. तो बोलतोय ते खरंच मनापासून बोलत असेल का? नसेल असं वाटायला तस काही कारण नव्हतं, कारण तो तिच्याशी तरी आत एक बाहेर एक असं कधीच वागला नव्हता. कदाचित तो म्हणतोय ते बरोबर असेलही. शेवटी आयुष्याच्या समीकरणाचे दोन सम भाग आम्हीच दोघं होतो आणि आहोत. बाकी कशाचा विचार करायचं काय कारण आहे ?
 अनोख्या प्रदेशात प्रवास करून परत आल्यावर थोडीशी हुरहुर वाटावी, पण ओळखीच्या खुणा पाहून आनंद व्हावा, तसं तिला वाटलं.
 ती सावकाश निःश्वास सोडीत म्हणाली, " होय, राम, मी परत आलेय. घरी परत आलेय."