सवाई

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

सवाई

सवाया हा एक काव्य प्रकार, जो श्री समर्थ ह्यांनी नव्याने आणला. त्या काळात मुसलमान फकीर वेगवेगळया प्रकारे त्यांच्या धर्माचा प्रसार करत होते. तेव्हा श्री समर्थ ह्यांनी सवाया म्हणत लोकांना जागृत केले. आपल्या धर्माची ओळख करून देत सवाया खूप आवेशाने म्हटल्या जात. त्यामुळे लोकांमध्ये धर्माविषयी व देवाविषयी प्रेम निर्माण होत असावे. सवाया म्हणताना पहिली ओळ दोन वेळां म्हणावी लागते. ओवी म्हणताना सव्वा पटीने म्हटली जाते. श्री समर्थ म्हणतात :

तुझा भाट मी वर्णितो रामराया ।

सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया ।।

महाराज दे अंगीचे वस्त्र आता ।

बहु जीर्ण झाली देहेबुद्धी कंथा । ।

श्री समर्थ म्हणतात की, रामराया मी तुझा भाट आहे. मी तुझे गुण लोकांना सांगतो आहे. नेहमी मी सवाया विशिष्ट कारणांनी गाणार आहे. लोकांना धर्म आणि देश ह्यांची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे.

श्री समर्थ रामदास स्वामी कृत -

गणपतीची सवाई

वंदिला गजवदन । सुख सुखाचे सदन ।

जेणे जाळिला मदन । त्याचे अंतर धरा । । १। ।

राम राम राम । जन सज्जन विश्राम ।

साधकाचे निजधाम । हित आपुले करा । । २। ।

अखंडित निजध्यास । धरा अंतरी अभ्यास ।

बोले भागवत व्यास । हरिभजने तरा । । ३। ।

धीर उदार सुंदर । कीर्ती जाणतसे हर ।

सोडविले सुरवर । वरदायक खरा । । ४। ।

म्हणावा जयजय राम !


शंकराची सवाई

धन्य कैलासभुवन । शुभ्र शंकराचे ध्यान ।

पुढे नाचे गजानन । सिंहासनी बैसला । । १। ।

वाचे उच्चारिता हर । त्यासी देतो महावर ।

करी पातकांचा संहार । अंकी गिरिजा शोभली । । २। ।

कृष्णा गोदां भागीरथी । ज्याचे जटेतून निघती ।

पावन त्या त्रिजगती । स्नानपाना लाधल्या । । ३। ।

भैरवादी समुदाय । रामनाम नित्य गाय ।

भवभ्रम सर्व जाय । लक्ष पायी ठेविल्या । । ४। ।

म्हणावा जयजय राम !

मारुतीची सवाई

नयनी पाहता हनुमंत । ज्यासी वर्णिती महंत ।

ज्याचा महिमा अनंत । मुख्य प्राण रामाचा । । १। ।

स्वामी रामाचे वहन । केले लंकेचे दहन ।

त्याची कीर्ती गहन । बलभीम नामाचा । । २। ।

सदा बांधुनिया माज । करी रामाचे निजकाज ।

ज्याचे शिरी रघुराज । सेवक पूर्णकामाचा । । ३। ।

सर्व देवांचा वरिष्ठ । वारी दासाचे अरिष्ट ।

रामदास एकनिष्ठ । मारुती हा नेमाचा । । ४। ।

म्हणावा जयजय राम !

मारुतीची सवाई - २

हरी गिरीपरी ठाण । बळे चालिले फुराण ।

वरी घेतले किराण । अंतराळ जातसे । । १। ।

कपी लागवेगे धावे । मागे लांगुळ हेलावे ।

वैरसमंध आठवे । वज्र दाढा खातसे । । २। ।

मनोवेगे झेंपावाला । द्रोणागिरीस पावला । हात घाली औषधीला । आटघाट होतसे । । ३। ।

गिरी उत्पाटिला बळे । सळे बांधिला लांगुळे ।

मागे फिरे अंतराळे । लंकेवरी येतसे । । ४। । म्हणावा जयजय राम !

विठ्ठलाची सवाई

नाम विठ्ठल सुंदर । ब्रह्मा विष्णू आणि हर ।

गुणातीत निर्विकार । शुकादिकी गायिला । । १। ।

चंद्रभागा रम्यतीर । तेथे उभा कटिकर ।

दिंड्या पताका अपार । यात्रा घोष जाहला । । २। ।

तेथे येता रामदास । दृढ़ श्रीरामी विश्वास ।

रूप पालटोनी त्यास । रामरूपी भेटला । । ३। ।

पुन्हा विठ्ठल रूप । राम विठ्ठल येकरूप ।

पूर्व पुण्य हे अमूप । लक्ष पायी ठेविल्या । । ४। ।

म्हणावा जयजय राम !

श्रीरामांची सवाई

नाम श्रीराम सुंदर । ध्याती उमामहेश्वर ।

सिंहासनी रघुवीर । अंकी सीता शोभली । । १ । ।

लक्ष्मण महावीर । भरत शत्रुघ्न धीर ।

हनुमंत जोड़ी कर । देवर्षी गायिला । । २। ।

ज्याचे ध्यानी रामदास । तेच ध्यान कल्याणास ।

बंधू दत्तात्रयास । रामप्रेमा लाधला । । ३। ।

वर्णू राघवाचे यश । श्रीगुरुचा नामघोष ।

पूर्वपुण्य हे विशेष । लक्ष पायी ठेविला । । ४। ।

म्हाळसापतीची सवाई

नाम जेजुरीगड सुंदर । तेथे नांदे म्हाळसावर ।

संगे भैरवगण अपार । पूर्ण अवतार शिवाचा । । १। ।

पीत अश्वावरी स्वार । हाती घेऊनी तलवार ।

करी मणिमल्ल संहार । करी उद्धार जगाचा । । २। ।

चंपाषश्ठीचा उत्सव थोर । यात्रा मिळती अपार ।

येळकोट नामाचा गजर । भक्त आनंदे करिताती । । ३। ।

दास म्हणे रामराव । राम तोचि खंडेराव ।

जेथे भाव तेथे देव । लक्ष पायी जडलिया । । ४। ।

म्हणावा जयजय राम !

देवीची सवाई

धन्य तुळजापूर सुंदर । माता नांदे घरोघर ।

तेहेतीस कोटी सुरवर । उभे असती त्या ठाया । । १। ।

यात्रा येतसे अपार । उदो बोलाचा गजर ।

गोंधळ पोत निरंतर । चमत्कार पावती । । २। ।

तेथे येता रामदास । श्रीराम चरणी दृढ़ विश्वास ।

अंतरी धरोनी आस । रामध्यान करीतसे । । ३। ।

रामरूपी देवी जाली । शिवशक्ती आकारली ।

नामे अंतरी निवाली । लक्ष पायी ठेविल्या । । ४। ।

म्हणावा जयजय राम !

लक्ष्मीची सवाई

जय जगदंब सौख्यदानी । लक्ष्मीमाय जगज्जननी ।

जय करवीरवासिनी । नारायणी भगवती । । १। ।

मूळमाया वैष्णवी । अनंत ब्रह्मांडे नाचवी ।

नाना नाटके लाघवी । परब्रह्मशक्ती २

शास्त्रे पुराणे वेदस्मृती । अखंड जियेचे स्तवन करिती ।

अव्यक्त पुरुषाची व्यक्ती । चिद्रूपिणी । । ३। ।

विस्तारे वाढली इच्छाशक्ती । चराचरी जियेची व्याप्ती ।

प्राणी मात्रांची ज्ञानज्योती । जगन्माता । । ४। ।

रामदासाचा किंकर । सदा झाडी महाद्वार ।

रामनाम अलंकार । कंठी हर्षे नाचतो । । ५ । ।

विठ्ठलाची सवाई

नाम विठ्ठल सुंदर । ब्रह्मा विष्णू आणि हर ।

गुणातीत निर्विकार । शुकादिकी गायिला । । १। ।

चंद्रभागा रम्यतीर । तेथे उभा कटिकर ।

दिंड्या पताका अपार । यात्रा घोष जाहला । । २। ।

तेथे येता रामदास । दृढ़ श्रीरामी विश्वास ।

रूप पालटोनी त्यास । रामरूपी भेटला । । ३। ।

पुन्हा विठ्ठल रूप । राम विठ्ठल येकरूप ।

पूर्व पुण्य हे अमूप । लक्ष पायी ठेविल्या । । ४। ।

म्हणावा जयजय राम !

दत्तांची सवाई

सारासार नीति न्याय । मुख्य भक्तीचा उपाय ।

संतसंगेवीण काय । वाया जाय सर्वही । । १। ।

आधी कर्माचा प्रसंग । शुद्ध उपासना मार्ग ।

ज्ञाने उद्धरती जन । येथे संदेह नाही । । २। ।

देहे निरसन करावे । महावाक्य विवरावे ।

तेणे संसारी तरावे । काळ नासतो आहे । । ३। ।

ज्यास नाही येणे जाणे । नाही जन्म ना मरणे ।

सदय पाविजे श्रवणे । दास म्हणे हे सही । । ४। ।

म्हणावा जयजय राम !

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.