समाजात नटाची जागा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

हवेत उष्णता किती आहे हे समजण्यासाठी जसे उष्णतामापकयंत्र (Barometer) असते त्याचप्रमाणे समाजात प्रत्येक मनुष्याची अगर त्याच्या व्यवसायाची योग्यता किती आहे हे समजण्याचेही एक यंत्र आहे. लोकशिक्षणाच्या पार्‍यावर या यंत्राची रचना झालेली आहे. मनुष्याच्या कृतीत अथवा व्यवसायात हेतूपूर्वक वा यदृच्छाया हा लोकशिक्षणाचा पारा ज्या प्रमाणात खाली-वर स्थित असेल त्या प्रमाणात समाजात त्याची कमी-अधिक योग्यता ठरत असते. लोकशिक्षणाचा पर्यायाने 'परहित' हा जरासा व्यापक परंतु सयुक्तिक असा अर्थ घेतल्यास वर सांगितलेल्या योग्यतामापक यंत्राचे सुंदर व मार्मिक शब्दचित्र भर्तृहरीच्या 'एते सत्पुरुषा: परार्थघटका:' एकदादि लोकविश्रुत श्लोकांत सापडते. या दृष्टीने पाहू गेले असता केवळ 'जगाच्या कल्याणा' उपकारे देह कष्टविणार्‍या 'संतांच्या विभूती' समाजातील अत्यंत उच्चतम स्थानी बसाव्या लागतात. निरपेक्ष लोकशिक्षण हाच असल्या विभूतींच्या आयुष्याचा प्रधान हेतू असतो. यांच्या प्रत्येक कृतीत लोकांस सज्ञान करण्याचा हेतूच प्रमुखत्वाने दिसून येतो. स्वहिताची यास तिलमात्र पर्वा नसते. स्वत:च्या अज्ञानाच्या सम्यग् ज्ञानातच यांच्या ज्ञानाची संपूर्ती होते आणि स्वार्थावर तिरस्काराने लाथ मारताक्षणीच यास अनपेक्षितरित्या खर्‍या स्वार्थाची प्राप्ती होते. तेव्हा जगत्सूत्रधरप्रयुक्त विश्वनाटकाच्या प्रेक्षक समुदायात साधुसंतांनाच 'रिझर्व्हड्'च्या जागा देणे रास्त आहे. यांच्यानंतर ज्यांचा व्यवसायच लोकशिक्षणात्मक असतो ते लोक येतात. हे लोक स्वत:च्या विशिष्ट कर्तृत्वाच्या जोरावर पुढे येऊन लोकशिक्षणाच्या निरनिराळया बाजू आपल्या अंगावर घेत असतात. परंतु यांची लोकसेवा पुष्कळशा अंशी सापेक्ष असते. हे आपण केलेल्या लोकसेवेबद्दल समाजाजवळ काहीतरी वेतन मागतात. यांची जीवनार्थवृत्ती व लोकशिक्षण ही अगदी 'वागर्थाविव' संपृक्त व अतएव परस्परांपासून अभेद्य अशी असतात. त्या दोहोंमध्ये कार्यकारणभाव असतो. त्यांच्या जीवनकलहार्थ प्रयत्नातच लोकसेवेचा संभव असतो. साधूसंतांच्या निरपेक्ष लोकसेवेपुढे यांची सापेक्ष लोकसेवा फिक्की पडते व म्हणूनच समाजात यांच्या वाटणीस दुसर्‍या प्रतीची जागा येते. कवी, ग्रंथकार, वर्तमानपत्रकर्ते, पुराणिक, शिक्षक हे या दुसर्‍या वर्गाचे घटक होत आणि याच माननीय वर्गात वास्तविक पाहू गेले असता प्रस्तुत लेखाच्या विषयाची ही जागा आहे.

'गण्या', 'बाळया', 'भावडया' याप्रमाणे एकेरी- नव्हे, नुसत्या अर्धवटच नावाने ओळखल्या जाणार्‍या व सर्व समाजाने टाकाऊ मानलेल्या व्यक्तींना इतक्या उंच जागी बसविलेले पाहून पुष्कळ वाचक या लेखावर एकपक्षीयत्वाचा आरोप करतील. आमच्या नटांची आधुनिक स्थिती लक्षात घेतली असता वरील आरोप पुष्कळसा खरा वाटतो. वर सांगितलेल्या उंच वर्गात बसण्याची पात्रता आमच्या नटवर्गात खरोखरीच आहे काय? सत्याला सोडावयाचे नसल्यास या प्रश्नाला नकारात्मक उत्तर मिळाले पाहिजे. तर मग उपरिनिर्दिष्ट विधान चुकीचे असले पाहिजे असे कोणासही वाटेल. परंतु तसेही नाही. 'नट' या शब्दाच्या अर्थाकडे- खर्‍या अर्थाकडे- थोडीशी नजर फेकल्यास हा विरोधाभास नाहीसा होणार आहे. वर जे विधान केले आहे ते 'नट' या जोखमीच्या व माननीय पदवीला जे खरोखरीच पात्र असतील त्यांच्यासंबंधी होय. नटाचे मनोरंजनद्वारा लोकशिक्षण देण्याचे कार्य फार जोखमीचे आहे. खर्‍या 'नटां'पासून आमच्या सध्याच्या नटांना ओळखण्यासाठी हल्लीचे त्यांचे प्रचलित नाव चांगले उपयोगी पडेल. सध्याचे नट हे 'नट' नसून 'नाटकवाले' आहेत. 'नट' होणे हे आमच्या 'नाटकवाल्यांचे साध्य आहे' निदान असावे अशी समाजाची इच्छा आहे. आमच्यात सध्या नट मुळीच नाहीत असे म्हणण्याचा हेतू नाही. असतील; परंतु अगदी थोडे! त्यांची गणती करू गेल्यास अंगुष्ठाची व त्याच्या शेजार्‍याचीसुध्दा गाठ पडण्याची मारामार पडेल असे मोठया दु:खाने लिहावे लागत आहे. ही गोष्ट आमच्या नटवर्गाची उपमर्द करण्याच्या हेतूने मुद्दाम येथे नमूद केली नाही. त्याला जर यामुळे वाईट वाटले तर तेथे लेखकाचा नाइलाज आहे. कारण सत्यापलाप करणे केव्हाही इष्ट नाही. असो.

मनोरंजनाद्वारा लोकशिक्षण देण्याचे 'नटा'चे कार्य फार जोखमीचे, महत्त्वाचे व दुष्कर आहे यामुळे त्यास एवढया मानाच्या जागी बसविणे योग्य आहे असे वर म्हटले आहे. आता या म्हणण्यात कितपत तथ्य आहे हे पाहू. खरोखरीच नटाची कामगिरी इतकी जोखमीची आहे काय? त्याची कार्यसिध्दी इतकी आयाससाध्य आहे काय? 'नट' या पदवीला पात्र होण्यासाठी कवीप्रमाणे त्यालाही काही नैसर्गिक शक्ती आवश्यक असते काय? वर्तमानपत्रकर्त्याप्रमाणे त्यालाही काही ज्ञान संपादन करून घ्यावयाचे असते काय? शिक्षकाप्रमाणे त्यालाही काही विवक्षित 'ट्रेनिंग' मिळवावे लागते काय? किंवा पुराणिकाप्रमाणे त्यालाही काही शास्त्रे पढावी लागतात काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यासाठी नटाच्या वाटणीस आलेली कामगिरी, ती पार पाडण्यासाठी त्यास करावे लागणारे प्रयास व त्या कामगिरीचा समाजास होणारा उपयोग- या सर्वांचा विचार करावयास हवा. जर ही उत्तरे समाधानकारक मिळाली तर नटास वर सांगितलेल्या वर्गात जागा द्यावयास काही प्रत्यवाय नाही असे कोणीही कबूल करील; तर आता त्यासंबंधी स्थूलदृष्टया विचार करू.

नटाचे मुख्य काम मनोरंजनाद्वारा अनेकविध लोकशिक्षणाचा प्रसार करणे हे होय. कवीने- वस्तुत: नाटककर्त्याने- आपल्या कृतीत गोविलेल्या नीतितत्त्वांचा लोकांच्या मनावर न पुसून टाकण्याजोगा ठसा उमटविणे, त्याप्रमाणे समाजाची नीतिमत्ता बनविणे, कवीच्या अर्थावर अभिनयाचा प्रकाश पाडून तो यथातथ्याने लोकांस कळविणे, प्रसंगी कवीचा अर्थ दुर्ज्ञेय असल्यास आपल्या अभिनयचातुर्याच्या आणि उच्चारकौशल्याच्या साह्याने त्याला सुबोध स्वरूपात लोकांच्या पुढे मांडणे, वगैरे कामे नटास रंगभूमीवर असताना चोख बजवावी लागतात. लोकांस शिक्षण द्यावयाचे ते त्यांचे मनोरंजन करीत असताना द्यावयाचे असते. लोक नाटक पाहावयास येतात ते नीतिशिक्षण घेण्याच्या उद्देशाने नाही, तर आपल्या नित्य व्यवसायाच्या श्रमाने त्रासलेल्या मनाची घटकाभर करमणूक करून घेण्याच्या उद्देशाने येतात. नाटकगृह म्हणजे नीतिपाठ शिकण्याची पाठशाला आहे ही कल्पनाही लोकांच्या मनात नसते; परंतु लोक नाटकास येतात त्या वेळी करमणुकीसाठी मनोमंदिराची द्वारे अगदी मोकळी असल्यामुळे करमणुकीबरोबरच उपदेशासही तेथे सहज प्रवेश करण्यास काही अडचण पडत नाही. हे पाहून चतुर लोकाग्रणींनी नाटकाच्या उपयुक्ततेची व्याख्या केवळ 'मनोरंजनाचे साधन' या आकुंचित मर्यादेच्या पुष्कळ बाहेर पसरविली. नाटकग्रंथास नीतिशाळेतल्या 'टेक्स्टबुकां'चे महत्त्व येऊन त्यासंबंधी नियमही झाले. नटाकडे शिक्षकांची कामगिरी आली. आपल्या कौशल्याने स्वाधीन झालेल्या प्रेक्षकांच्या तल्लीनतेचा फायदा घेऊन त्यांच्या नकळत त्यांना नीतितत्त्वे शिकवून मनोरंजनाच्या साखरेबरोबर उपदेशाचे औषध देण्याचे श्रेय घेणे हे नटाचे कर्तव्य झाले. ही जबाबदारी नटावर आली ती त्याच्या संमतीनेच आली असे मात्र संभवनीयता वाटेल तेथे तेथे ती घडवून आणण्याकडे लोकग्रणींची सदैव प्रवृत्ती असते; मग त्यासाठी ते वाटेल तो उपाय योजितात. नटांकडून लोकशिक्षणाची अपेक्षा सारखी होत गेल्याने अखेर हळूहळू नटासही ती अपेक्षा योग्य वाटू लागली व लोकशिक्षणाकडे आपले कर्तव्य या दृष्टीने ते पाहू लागले. त्यांना लोकनायकांची ही अपेक्षा झुगारून देण्यापेक्षा तिची पूर्ती करणेच अधिक योग्य वाटले किंवा लोकनायकांनी त्यास तसे वाटावयास लाविले असे म्हणणेच विशेष बरे दिसेल. असो.

रंगभूमीवर जाण्यासाठी जी तयारी करावयाची तीत स्वभाषेच्या ज्ञानाची प्रमुखत्वाने गणना केली पाहिजे. नट म्हटला म्हणजे त्याला कोणतेही नाटक साधारणपणाने समजावयास पाहिजेच. नाटकातील विविध प्रकृती त्याला उत्तम रीतीने कळण्याजोगी त्याची भाषेची तयारी असली पाहिजे. नाटकातली अंगी व अंगीभूत रस, विशिष्ट प्रसंग, नानाविध मुद्दे वगैरे सर्व काही गोष्टींचा तो मार्मिक ज्ञाता असावयास पाहिजे. काव्यस्वाद घेण्याइतकी रसिकता त्याच्यात असली पाहिजे. योग्य प्रसंगी शब्दांवर जोर देणे, आपल्या भूमिकेचे स्वरूप जाणणे, नाटकाच्याद्वारे- विशेषत: आपल्या भूमिकेच्याद्वारे- कोणता उद्देश कवी समाजापुढे आणू इच्छितो हे समजणे व त्या उद्देशाच्या सिध्दिस्तव झटणे वगैरे सर्व गोष्टी त्याला कार्य आहेत आणि या सर्व गोष्टींची यथायोग्य व्यवस्था व्हावयास त्याचे भाषाज्ञान चांगलेच असले पाहिजे. अर्थात तो पुष्कळसा सुशिक्षित असला पाहिजे; कारण वाङ्मयातील या एकाकी अंगाचा चांगला परिचय व्हावयास इतर अंगांचीही साधारण ओळख असणे अवश्यमेव आहे, म्हणजे जवळजवळ तो अगदी विद्वान नसला तरी समाजातील साधारण सुशिक्षित लोकांत त्याने बरीच वरची जागा मिळवावयास पाहिजे. याशिवाय कवित्वशक्तीप्रमाणेच उपजत अंगी असणारी रसिकता त्याला असून अभ्यासाने त्याची मार्मिकता बरीच वाढलेली असणे जरूर आहे. हे त्याच्या सुविद्यतेबद्दल झाले. या साधनांचा उपयोग त्याला आपले कार्य स्वत: चांगले समजून घेण्यात होते. येथून पुढे हे कार्य लोकांपुढे मांडण्याची म्हणजे आपणास जे समजले आहे ते प्रेक्षकांस समजून देण्याची त्याची साधने कोणती आहेत हे पाहणे आहे.

या कामात त्याला शारीरिक साह्य बरेच लागते. खणखणीत आवाज, मधुर स्वर, दुसर्‍यावर छाप बसेल असा चेहेरा, अंगाची सुबक ठेवण वगैरे गोष्टी या सदरात येतात; परंतु या असल्याने त्याची व्यक्तिदृष्टया योग्यता वाढत नाही, कारण थोडयाबहुत प्रमाणाने या गोष्टी ईश्वरदत्त व म्हणून नैसर्गिक असतात.

परंतु त्यापैकी काही त्याला कमी प्रमाणात मिळाल्या असल्यास त्या त्याला प्रयत्नाने वाढवाव्या लागतात व वाढविता येतातही. अस्खलित वाणी प्रयत्नाने साध्य करून घेता येते. तिच्यात मार्दव आणता येते. 'रंगा'समोर भीतीने आपला बेरंग न व्हावा म्हणून त्याच्या अंगी धीटपणा अवश्य असावा लागतो. तसेच, रंगभूमीवरील त्याचे वर्तन अगदी साहजिक झालेले असे दिसले पाहिजे; त्यात कृत्रिमता असता कामा नये. परंतु धीटपणा व सहजपणा सर्वांच्याच अंगी असतात असे नाही. म्हणून काही नटांस ते गुण प्रयत्नाने मिळवावे लागतात. येथे त्याचे प्रयत्न साधारणपणे वक्त्याच्या प्रयत्नांसारखेच असतात. मधून मधून नटाचे अमुक कार्य कवीप्रमाणे असते, अमुक वक्त्याप्रमाणे असते, अशी वाक्ये देण्याचा हेतू एवढाच आहे की, त्यामुळे नटाच्या कार्याच्या व त्याच्या प्रयत्नाच्या महत्त्वाची वाचकांस बरोबर कल्पना व्हावी.

याप्रमाणे कार्यक्षम वाक्साधन नटास मिळाल्यावर त्याला त्याच्या जोडीला अभिनय हे त्याहून फारच अधिक महत्त्वाचे साधन मिळवावे लागते. हे निवळ प्रयाससाध्य आहे. हे नटाच्या कौशल्याने जीवित आहे. हे साध्य करून घेण्यास त्याला फारच श्रम करावे लागतात. वाणी मनोगत विचाराचे मूर्त स्वरूप आहे; परंतु ते स्पष्ट दिसण्यासाठी अभिनयाचा प्रकाश त्यावर पडावयास पाहिजे. अर्थाच्या स्वरूपाहून अभिनयाचे स्वरूप जर भिन्न प्रकारचे असेल तर श्रोतृमंडलावर त्या भाषणाचा परिणाम संकरोत्पन्न होईल. म्हणून जसा अर्थ असेल तत्सदृशच अभिनय असला तर तो त्याला पोषक होतो. पुष्कळ प्रसंगी साध्या शब्दापेक्षा अभिनयानेच वाच्य उद्देश विशेष स्पष्ट होतो. आता असा योग्य अभिनय कसा साध्य करून घेता येईल हे पाहू या. अर्थात् यासाठी मनुष्याच्या आयु:क्रमातील निरनिराळया प्रसंगांचा अनुभव असला पाहिजे. परंतु एकाच व्यक्तीला निरनिराळया सर्व प्रसंगांचा अनुभव असणे शक्य नाही. आणि असा स्वानुभव यद्यपि प्रसंगवशात् एखाद्याला बराच असला तरी त्याचा तादृश उपयोगही नाही. कारण, दु:खदायक प्रसंगाखाली अंत:करण दडपून गेले असताही त्या काळच्या आपल्या स्थितीचा अभिनयाची अभ्यास करण्याइतकी मनुष्याच्या मनाची समता कायम राहील हे म्हणणेही हास्यास्पद होईल. या द्विविध कारणांमुळे अभिनयाच्या अभ्यासासाठी स्वत:वरील प्रसंगांपेक्षा दुसर्‍यावर पडलेल्या प्रसंगांचाच अधिक उपयोग होतो हे उघड आहे. म्हणून आपल्या भोवतालच्या मंडळींच्या स्थितीकडेसच त्याने लक्ष दिले पाहिजे. परिस्थिती हीच त्याची शाळा, सृष्टी हेच अभिनयाच्या अभ्यासाचे पुस्तक व सूक्ष्मावलोकन हेच या पुस्तकाचे वाचन होय. या पुस्तकाचे नेटाने सदैव मननपूर्वक वाचन करावयास हवे. अवलोकनशक्ती हा गुण सामान्य गुणांपैकी नव्हे. बहुतकरून ही शक्ती उपजतच असावी लागते, व सवयीने ही वाढवावी लागते. अमुक व्यक्ती अमुक प्रसंगी कसे आचरण करिते, अमुक मनोविकार प्रकट होत असता चेहेर्‍यात काय बदल होतो, विवक्षित स्वभावाची माणसे सामान्यत: कशी वागतात व विशेषप्रसंगी कशी वागतात, त्यांच्या या दोन प्रकारच्या स्थितीतील अंतर स्फुटत्वाने दर्शविण्याची साधने काय आहेत, वगैरे गोष्टीने त्याने मोठया मार्मिकतेने निरीक्षण केले पाहिजे. स्वभाववैचित्र्याच्या सर्व आनुषंगिक क्रिया त्याला पाहावयास मिळाल्या पाहिजेत. आता हे निरीक्षण करावयास त्याला समाजात अवसर मिळाला पाहिजे, म्हणजे समाजातील कोणत्याही भागात स्वैर संचार करण्यास मज्जाव नसण्याइतकी पात्रता त्याच्या अंगी असली पाहिजे. विशेषत: समाजातील श्रेष्ठ प्रतीच्या लोकांशीच त्याचा परिचय असला पाहिजे; कारण, बहुतेक नाटकांतील प्रकृती (Characters) साधारपणे वरिष्ठ वर्गांतील असतात. अर्थात् समाजात अशा प्रकारची पात्रता असण्यासाठी मनुष्याचे नीतिबल व तदनुषंगिक मानमान्यता ही फार मोठी असली पाहिजेत. एरवी समाजात सर्वत्र प्रवेश सुगम नाही. केवळ सद्गुणी मनुष्यासच कोठेही फिरण्यास अडचण पडत नाही. म्हणून नटाने नीतिमत्तेत समाजातील कोणत्याही सभ्य गृहस्थास हार जाता कामा नये. त्याची परिस्थिती वरिष्ठ प्रतीची असली पाहिजे. हलक्या लोकांशी त्याला परिचय ठेवता येणार नाही. समाजशास्त्राचे सर्व नियम त्याने कडकडीत पाळिले पाहिजेत. नाही तर समाजाच्या उच्चतर भागात त्याला जाता यावयाचे नाही व त्या योगाने त्याच्या निरीक्षणाला योग्य अवकाश मिळणार नाही. म्हणून प्रत्येक नट पूर्ण सद्गुणी असला पाहिजे.

अशा रीतीने हे कष्टसाध्य निरीक्षण झाल्यानंतर मननाने ते दृढ करावयास हवे. नंतर योग्य प्रसंगी निरीक्षित गोष्टींची पुनरावृत्ती करावयाची अनुकरणशक्ती संपादन केली पाहिजे. ही शक्ती साध्य व्हावयास साधकाने फारच श्रम घेतले पाहिजेत. आपण जे नाही जे आहो असे दाखविणे किती दुष्कर आहे याबद्दल लिहिलेच पाहिजे असे नाही. चेहेर्‍यातील प्रत्येक स्नायूवर आपला पूर्ण ताबा असल्याखेरीज हे होणे नाही. अभिनयाच्या थोडयाशा चुकीनेसुध्दा अतिप्रयासाने उत्पन्न झालेली प्रेक्षकांची तल्लीनता द्विधा होण्याचा फार संभव असतो; आणि असे झाले म्हणले नटाचे कर्तव्य पार पडणे शक्य नाही. असो.

याप्रमाणे अगदी धावता धावता पाहणारासही नटाने कर्तव्य किती महत्त्वाचे व जोखमीचे आहे व त्याबरहुकूम 'नट' होणे किती कठीण आहे हे सहज कळून येण्यासारखे आहे. वर सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरे नटाच्या बाजूला हितकर अशीच मिळतात याबद्दल दोन मते असण्याचा फारसा संभव नाही. म्हणून नटाला आरंभी सांगितलेल्या माननीय जागी बसविण्यास विशेष प्रत्यवाय दिसत नाही.

नटाची समाजात जागा मुकर झाल्यावर आता सध्याचा 'नट' म्हणजे 'नाटकवाला' हा प्रस्तुत समाजात कोठेसा बसला आहे व तो स्वपदच्युत असल्यास त्याला आपल्या वास्तविक पदी जाण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील याचा पुढे क्रमाक्रमाने विचार करू.

हल्लीची जागा: मागील खेपेस 'नट' या शब्दाचा खरा अर्थ व ते नाव सार्थ धारण करणार्‍या व्यक्तींची समाजातील वास्तविक योग्यता ठरविण्याचा प्रयत्न केलेला आहे. 'नटा'च्या अंगी अवश्य लागणार्‍या गुणांचाही उल्लेख यथाशक्ती केला आहे. त्या कसोटीला सध्याचा 'नाटकवाला' कसा काय उतरतो, त्याच्या गुणावगुणाचा ठोकळ मानाने तपशील काय आहे व त्या मानाने समाजात त्याची स्थिती कोठे कशी आहे हे ठरविण्याचा प्रयत्न करणे हेच प्रस्तुत निबंधाचे कार्य आहे. पुष्कळ अंशी हे कार्य स्वजातीयांचे देह फाडून त्यातील अमंगल पदार्थ उजेडात आणणार्‍या डॉक्टराच्या कार्यासारखेच आहे. आमच्या नटवर्गाची सध्याची स्थितीच अशी आहे की, त्यासंबंधी बोलणारास गुणांपेक्षा अवगुणांबद्दलच जास्त उल्लेख करावा लागेल. निरुपायाने का होईना, पण सत्यासाठी कोणाही नि:पक्षपाती मनुष्यास असेच म्हणावे लागेल की, आमच्या नटवर्गाचे सद्गुण आपल्या अल्पत्वामुळे जगापुढे येण्याच्या लायकीचे नाहीत व उलटपक्षी अवगुणांची संख्या डोळेझाक करण्याच्या मर्यादेबाहेर गेलेली आहे. म्हणून ज्याला आपल्या नटवर्गात सुधारणा व्हावी असे मनापासून वाटत असेल त्याला नटवर्गाच्या अवगुणांवर टीका - नाइलाजास्तव पुष्कळ ठिकाणी कडक देखील - करणे भाग पडेल. या विषयावर अनेकदा नटेतर लोकांनी पुष्कळ खरमरीत लिहिले आहे; परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणून प्रस्तुत निबंध लिहिण्याची वेळ आली आहे. 'सोनारानेच कान टोचलेला बरा' ही व्यवहारात नेहमी पटणारी म्हण आमच्या नाटकी सृष्टीत मात्र खोटी ठरली आहे. तेव्हा आपला कान आपणच टोचून घेणे भाग पडत आहे; प्रस्तुत निबंधामुळे आमच्या नटवर्गाची मने क्षुब्ध होण्याचा बराच संभव आहे; परंतु याचा उद्दिष्ट हेतू छिद्रान्वेषण नसून सुधारणा हा आहे असे मन:पूर्वक सांगितल्यावर तरी यातील टीकेची तीव्रता कमी वाटेल अशी उमेद आहे.

मागे नटाला अवश्य लागणार्‍या गोष्टीत विद्येला प्रधान स्थळ दिलेले आहे. त्या दृष्टीनेही अत्यंत आवश्यक गोष्टी हल्लीच्या नटवर्गात कोणी शोधू लागल्यास त्याची कल्पनातीत निराशा झाल्याशिवाय राहणार नाही. नाटयकलेचे पुत्र विद्येला आपली सापत्न माता समजून तिच्या वार्‍याससुध्दा उभे राहात नाहीत. साधारणपणे मराठी तिसरी इयत्ता हाच आमच्या नटाचा Asse's bridge आहे. बहुतेक नटांना ट, फ करूनच आपल्या पाठयाशी परिचित व्हावे लागते. कवित्व समजण्याइतकी रसिकता, कवीचे नाटकातील उद्देश समजण्याची पात्रता, नाटकातील प्रकृती (Characters) समजण्याइतकी मार्मिकता वगैरे गोष्टी तर दूरच राहिल्या, परंतु साध्या मराठी भाषेत लिहिलेला नाटयभाग समजण्याइतकी विद्वता देखील आमच्यातील पुष्कळ नटांत नाही. अगदी सोप्या कवितांचा अन्वय लावणेसुध्दा बहुतेकांना साधत नाही. आंबरस आणि 'सोमरस' यांच्या पलीकडे सृष्टीत आणखी काही रस आहेत अशी कल्पनादेखील शेकडा ऐशीहून अधिक नटांना नाही. 'वन्समोर' आणि 'टाळया' मिळविण्यापलीकडे आपणास जास्त काहीसुध्दा साध्य नाही हीच बुहधा सार्वत्रिक समजूत झालेली दिसून येते. शोधांती पुष्कळ ठिकाणी - असे दिसून आले आहे की, दोन दोन, तीन तीन वर्षे एखाद्या नाटकात भूमिका घेऊनसुध्दा नटाला त्या नाटकाचे नुसते कथानकही (Plot) माहित नसते. या एका लहानशा गोष्टीवरून नटाचे अज्ञान जितके दिसून येते त्याहीपेक्षा अधिक स्फुटत्वाने त्याची कर्तव्याविषयीची अनास्था दिसून येते. नटवर्गात इतके अज्ञान का असावे हा प्रश्न काही फारसा कठीण नाही. सुशिक्षित लोक अजून या कलेशी आपला संबंध जोडण्यास योग्य कारणांमुळे तयार नाहीत. व्यसनितेचे अपराध क्षमा करून तिला सुधारण्याच्या हेतूने तिच्याशी निकट परिचय ठेवून स्वत: कलंकित झाल्यावाचून आपला उद्देश आपण नि:संशय पार पाडू अशी उदारता, कर्तव्यप्रियता व स्वप्रत्यय ही अजून आमच्या विद्येच्या अंगी यावयाची आहेत. आमची विद्या अद्यापि चुकलेल्यांच्या चुकांचा तिरस्कार करून त्यांना दूर लोटून देण्यातच समाधान मानीत आहे. कुमार्गगामी जनांस सन्मार्गी लावण्याचे प्रयत्न करण्याकडे तिची प्रवृत्ती नाही. परंतु या गोष्टीचा विचार पुढे करावयाचा आहे. प्रस्तुत तिच्यामुळे विषयांतर होत आहे, सबब ती एका बाजूस ठेवून चालू मुद्दयाकडे वळू.

सारांश, नटाला आवश्यक अशा विषयांचा नट होण्यासारखा अभ्यास करून कोणीही या कलेत पडत नसल्यामुळे वेळेवर सापडतील अशा लोकांवरच तिला सारी भिस्त ठेवावी लागत आहे आणि यामुळे समाजातील निर्विद्य व इतर बहुतेक धंद्यांना अपात्र ठरलेले असे लोकच या कलेला केवळ निर्वाहाचे साधन समजून तिच्याशी आपला संबंध जोडतात व पुढे या समजुतीबरहुकूम आपले वर्तन निव्वळ भाडोत्री ठेवतात. आपले कर्तव्य अमुक आहे, आपली व्यक्तिदृष्टया योग्यता अमुक आहे, आपण समाजाचे एक घटक आहो, समाजात आपण मान्य असलो पाहिजे, समाज आपल्याकडून अमुक अपेक्षा करतो वगैरे गोष्टींची नटाला कल्पनाही नसते. या कलेचा घटक होण्यापूर्वी त्याला विद्येचा गंध नसतो, किंवा खरे म्हटले असता विद्येचा गंध नसतो म्हणूनच तो या कलेचा घटक होतो, व घटक झाल्यानंतर त्याला विद्येची आवश्यकता ही स्थिती असल्यावर नाटक समजणे, स्वत:ची भूमिका जाणणे, तिचे विशिष्ट कार्य लक्षात घेऊन तत्सिध्यर्थ यत्न करणे, शुध्द शब्दोच्चार व योग्य शब्दाघात यांकडे लक्ष देणे वगैरे गोष्टींचा काय निकाल लागत असावा याविषयी अंदाज बांधणे फारसे कठीण नाही. या गोष्टीची नटांना बहुधा कल्पनाही नसते. कोणताही एखादा नाटयप्रयोग पाहिला असता निर्विद्यतेचे हे परिणाम ढळढळीत दिसून येतात. शब्दाचा भलताच उच्चार करणे, वाक्यात भलत्याच शब्दावर जोर देणे, भलत्याच वेळी भलताच आविर्भाव करणे, स्वत:च्या भूमिकेला व शोभतीलसे प्रकार करणे वगैरे गोष्टी म्हणजे आमच्या नटांच्या नेहमीच्या लीला आहेत. स्वत:च्या भूमिकेच्या प्रकृती (Character) विषयी विचार करण्याची तर गोष्टच नको. पंरतु पुष्कळ नटांना आपली 'नक्कल'सुध्दा नीटशी पाठ नसते. ही स्वत:च्या कर्तव्याविषयी कल्पना व ही अवस्था ! तेव्हा कर्तव्य जरी कितीही महत्त्वाचे असले तरी त्याची बजावणी इतक्या शोचनीय रीतीने होत असल्यामुळे या दृष्टीनेही आमचा कर्तव्यपराडमुख 'नाटकवाला' फारच कमी योग्यतेचा ठरतो.

यानंतर निरीक्षणाबद्दल पाहणे आहे. मागे सांगितलेच आहे की निरीक्षणाला योग्य अवसर मिळण्यासाठी प्रत्येक नट पूर्णपणे सद्गुणी असावा लागतो, तो सद्गुणी असेल तरच त्याला समाजात स्वैर करिता येईल. म्हणून सद्गुणांच्या बाबतीत त्याची वस्तुस्थिती कशी काय आहे ह्याचा विचार केला म्हणजे निरीक्षणाविषयी पुन्हा स्वतंत्र विचार करावयास नको; कारण ते शीलावलंबी आहे.

या गोष्टींचा होत होईल तो थोडक्यातच विचार करणे योग्य आहे. कारण कोणाच्याही दुर्गुणाविष्करणापासून सुशील वाचकांना आनंद वाटणे शक्य नाही.

सद्गुणांपेक्षा 'नाटकवाला' दुर्गुणांचाच जास्त संबंधी आहे. निर्विद्यता व यथेच्छ स्वातंत्र्य यांच्यापासून उत्पन्न होणारे सर्व दुर्गुण थोडयाबहुत प्रमाणाने आमच्या नटवर्गात दिसून येतात. आठवडयातून दोन किंवा तीन रात्रीखेरीज एरवी काही कर्तव्य नसल्यामुळे या सर्व प्रकारच्या व्यसनाचे परिशीलन करावयास अवधीही मुबलक सापडतो. बहुतेक नटांचा परिचय म्हटला म्हणजे खालच्या वर्गांशी संभावित लोकांचा व त्यांचा परिचय फारसा दिसून यावयाचा नाही. अशा एक ना दोन, हजारो गोष्टी सांगता येतील.

अशा प्रकारचे शील असल्यावर तदवलंबी निरीक्षणही तसेच असले पाहिजे हे सांगणे नकोच. आपल्या परिस्थितीमुळे नाटकवाला कुलस्त्रीचा अभिनय शिकण्यासाठी वेश्येच्या हावभावांचे निरीक्षण करतो व त्यांचेच रंगभूमीवर अनुकरण होते. यामुळे कवीच्या कल्पनेतून जन्मास आलेली शुध्द नायिका नाटकवाल्याच्या अंगात संचरून रंगभूमीवर येताच कुलस्त्रीस न शोभणारा हावभाव करू लागते. सारांश ज्या ज्या गोष्टी म्हणून 'नटास' आवश्यक, त्या सर्वांचा आमच्या 'नाटकवाल्या'जवळ पूर्ण अभाव आहे.

आमच्या सर्वच नटांना हे वर्णन - त्यातूनही सर्वच वर्णन - लागू पडेल असे म्हणण्याचा हेतू नाही. सुदैवाने या वर्णनाला अगदी अपात्र असे अपवादभूत नटही बरेच सापडतील; परंतु एकंदरीत पाहू गेले तर हे वर्णन अतिशयोक्तीचे आहे असे म्हणता यावयाचे नाही.

याप्रमाणे सध्याचा 'नट' आपल्या माननीय जागेपासून च्युत होऊन फारच खाली घसरला आहे. त्याला पूर्वपदी जाण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील याचा पुढील खेपेस विचार करु.

सुधारणेचे मार्ग: सध्याच्या स्थानभ्रष्ट नटाचा योग्य-पदस्थित होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील याचा सांग्रत विचार करावयाचा आहे. मागील खेपेस नटाच्या शोचनीय पदच्युतीचे अगदी पुसट चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. त्या चित्रात रंगाची छटा इतकी थोडी दाखविली आहे की, त्याला मूल स्वरूपाचा फक्त सीमालेख्य असेच म्हणावे लागेल. परंतु तेवढयावरूनच अनुमानशक्तीच्या साह्याने कोणासही मूलस्वरूपाची यथार्थ कल्पना घेण्यास फारशी अडचण पडेल असे वाटत नाही.

मनुष्याच्या अत्यंत उच्चतम ऐहिक स्थितीपासून नटाची वास्तविक जागा जितकी दूर आहे तितकीच मनुष्याच्या अगदी नीचतम ऐहिक स्थितीपासून त्याची हल्लीची जागा दूर आहे. म्हणून नटवर्गाची सुधारणा म्हणजे जवळजवळ अध:स्वस्तिकांपासून खस्वस्तिकांपर्यंतचा प्रवासच होय. शिवाय असल्या मोठया प्रवासात कोणी मार्गदर्शक देखील नाही. राष्ट्रातील सर्व बुध्दिमत्ता एका पवित्र केंद्रात स्थित झालेली असल्याकारणाने बिचार्‍या सामाजिक सुधारणेलाही कोणी खंबीर नेता मिळेनासा झाला आहे! सगळया समाजाची जर ही स्थिती तर मग त्याच्या एक घटकाची काय कथा? म्हणून या घटकाने-नटवर्गाने-स्वत:च आत्मोध्दारासाठी तयार झाले पाहिजे; इतकेच नव्हे तर आत्मसुधारणा फार लवकर करून घेऊन राष्ट्रोध्दाराच्या पवित्र कार्याला यशाशक्ती हातभार लावण्यासही त्याने तयार झाले पाहिजे. हे बिकट कार्य साधण्याची साधने काय काय आहेत याचा विचार करू.

नटवर्गाने आत्मोध्दारासाठी झटले पाहिजे असे आताच म्हटले आहे; परंतु या म्हणण्यावर एक यथार्थ आक्षेप आणता येईल. स्वपदच्युत झालेल्या मनुष्यास कोणाच्याही उपदेशावाचूनच पुन्हा आपल्या पूर्वस्थळी जाण्याची आपोआप स्फूर्ती होईल असा जगाचा अनुभव नाही. उलट, अनीती व अज्ञान यांच्या तडाक्यात सापडलेला बळी कूपमंडूकाप्रमाणे नीती व ज्ञान यांनी युक्त असलेल्या सृष्टीच्या स्वयंसुखावहतेबद्दल अंध असतो. अज्ञानाचा नीतीमिय आचारण रुक्ष वाटते; अनीतीला ज्ञान निरुपयोगी वाटते . 'Virtue for virtue's sake', 'Virtue is its own reward ही किंवा अशीच दुसरी तत्त्वे सद्गुणाचे महत्त्व समजावून देण्याच्या कामी तादृश उपयोगी पडणारी नसून सदाचरणी मनुष्याच्या समाधानार्थ बक्षिसांदाखल मात्र उपयोगी पडतात. म्हणून कुमार्गगामी मनुष्याला योग्य मार्गाने नेण्याची कामगिरी केवळ त्याच्या मनाच्याच साह्याने होत नाही; त्यावर बाह्यसंस्कार घडावा लागतो. नीतिमान व ज्ञानी मनुष्याचा उपदेश व देखरेख यांखेरीज पतिताचा उध्दार होणे शक्य नाही. एका रळावरून (rails) चालत असलेल्या आगगाडीला दुसर्‍या रुळावर नेणे हे ज्याप्रमाणे स्वत: तिच्या किंवा तिच्या ड्रायव्हरच्या हाती नसून सांधेवाल्याच्या मदतीवर अवलंबून असते, त्याप्रमाणे अनीती व अज्ञान यांच्या अनुषंगाने जाणार्‍या मनुष्याच्या वर्तनक्रमाला मार्गांतरगामी करण्यास स्वत: त्याच्याशिवाय दुसरा कोणी सांधेवाला लागतो. या दृष्टीने पाहिले असता प्रत्येक नट आपली सुधारणा आपणच करील या म्हणण्याची अयथार्थता दिसून येते. परंतु नटवर्गाने स्वसुधारणा केली पाहिजे या म्हणण्याचा वास्तविक अर्थ असा नाही. स्वत: नटवर्गाने म्हणजे नटांतील पुढाऱ्यांनी वा नटाग्रणींनी समाजनायकांच्या साह्याची फारशी अपेक्षा न बाळगता आपल्यातील पतितांचा उध्दार केला पाहिजे असे या आत्मसुधारणेचे लक्षण आहे.

नटाच्या सुधारणेची प्रधान अंगे दोन आहेत; एक 'नट' या दृष्टीने कर्तव्यदृष्टया सुधारणा व दुसरे 'समाजघटक' या नात्याने नीतिदृष्टया व ज्ञानदृष्टया सुधारणा.

यापैकी पहिल्या प्रकारची सुधारणा घडून येण्यास तीन निरनिराळया बाजूंनी प्रयत्न व्हावयास पाहिजे आहेत. एक नाटककाराकडून, दुसरा अभिनय शिक्षकांकडून (तालीम मास्तर) व तिसरा प्रेक्षकांतील मार्मिक भागाकडून. पहिल्याने नटाला त्याच्या कर्तव्याचा धडा घालून द्यावयाचा, दुसर्‍याने त्याच्याकडून तो घडवून घ्यावयाचा व तिसर्‍याने त्यात त्याची परीक्षा घ्यावयाची. सांप्रत नटाच्या कामगिरीबद्दलचे हे तिन्ही जबाबदार आपापल्या कर्तव्याविषयी अगदी उदासीन असलेले दिसून येतात.

वस्तुत: कोणतेही नाटक 'बसवावयाचे' असल्यास त्याच्या कर्त्याने प्रयोजक मंडळीस ते चांगल्या तऱ्हेने समजावून दिले पाहिजे; त्यांतील मुख्य मुख्य गोष्टी व अभिनयाची स्थळे त्याने नटांच्या निदर्शनास आणून दिली पाहिजेत. नाटक सहेतुक असल्यास त्या हेतूच्या पोषक भागांकडे त्याने नटांचे लक्ष खेचले पाहिजे. नाटक लिहून झाल्यानंतर त्याचे 'चोपडे' मंडळींच्या अंगावर फेकून देणे व पारितोषिकाची रक्कम घेऊन घरी जाणे एवढयानेच त्याची कामगिरी संपत नाही. पश्चिमेकडे नाटककार व सांगितलेली कामगिरी बजावीत आले आहेत असे विधान शेरिडन, मोलिअर, व्हिक्टर ह्यूगो, जुन्या काळातला शेक्सपियर वगैरे नाटककारांच्या चरित्रांवरून काढता येण्याजोगे आहे. फार कशाला आपल्या भवभूतीलाही 'भरतवर्गाशी विशेष सहृद्भावाने ' वागण्याचे यापेक्षा निराळे कारण असेल असे दिसत नाही. परंतु आमचे सध्याचे नाटककार मात्र मरणोन्मुख व निराश झालेल्या औरंगजेबाप्रमाणे 'मी आपले जहाज समुद्रात लोटले आहे; आता त्याचे काहीही होवो' असे म्हणून आपल्या अपत्याविषयी उदासीन राहतात. आपल्या नाटकांचे प्रयोग कोणकोणत्या मंडळयांकडून होत असतात याचीही त्यांना प्रसंगी दाद नसते. उलटपक्षी, आपल्या नाटकांना कोणी कर्ते आहेत किंवा तीही वेदांप्रमाणेच अपौरुष आहे याची नटांना खात्री नसते. परवानगीवाचून किंवा नाव बदलून नाटकाचे प्रयोग केल्यामुळे नटांची व लेखकाची पहिली भेट न्यायाच्या समरांगणात झाल्याची उदाहरणे मात्र कित्येक प्रसंगी घडून येतात. अशा प्रकारे जे नाटक मिळविण्यात येते त्याचे प्रयोग पुढे कसे होत असतील, खुद्द नटांना ते नाटक कितपत समजत असेल व पुढे ते प्रेक्षकांस कितपत समजावून देत असतील वगैरे सरळ गोष्टींची कल्पना करणे फारसे अवघड नाही. व्हिक्टर ह्यूगोच्या एका नाटकाचा प्रयोग बसत असताना तालमीच्या वेळी एके ठिकाणी एक विवक्षित शब्द असावा किंवा नसावा याबद्दल त्याचा व नटांचा बराच वेळ वाद चालल्याचा एके ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तात्पर्याने या गोष्टीपासून एवढेच समजून घ्यावयाचे की, तिकडे नाटक बसावयाचे वेळी अशा प्रकारचे खल होत असतात. आमच्याकडेही याप्रमाणेच नाटकमंडळयांतून आपापल्या नाटकांबद्दल विवेचन झाले पाहिजे. नटाच्या भूमिकेचा नाटकाच्या मुख्य भागाशी संबंध, इतर पात्रांशी त्याचा असणारा संबंध, नाटकाचा हेतू, रस, भाव, योग्य अभिनय व शब्दाघात, भिन्नभिन्न स्थळांचे व भाषणांचे महत्त्व वगैरे यच्चयावत गोष्टी नाटककाराने प्रत्येक नटास विस्ताराने समजावून दिल्या पाहिजेत. सारांश, जितक्या मार्मिकतेने पाठशाळांतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नेमलेल्या नाटकांचे परिशीलन करावे लागते- निदान त्यांनी करावे अशी परीक्षकांची अपेक्षा असते. तितक्याच मार्मिकतेने नटांकडून प्रयोगासाठी घेतलेल्या नाटकाचे परिशीलन झाले पाहिजे व या कामी स्वत: नाटककाराने पाठशाळातील गुरूची कामगिरी बजावली पाहिजे.

यापुढील कार्यभाग अभिनयशिक्षकाने उरकावयाचा आहे. प्रथम नाटकाची ओळख करून देऊन नाटककार निघून गेला म्हणजे त्याची जागा या शिक्षकाने भरून काढावयाची असते. नाटककार नाटक समजावून देत असताना प्रत्येक नटाने आपापल्या स्वत:च्या भूमिकेपुरते जे विशेष लक्ष द्यावयाचे असते ते याने सबंध नाटकापुरते दिले पाहिजे. नाटककाराने घालून दिलेला धडा प्रत्येक नटाकडून कोणत्या रीतीने घडविला जातो याची अभिनयशिक्षकाने वरचेवर तपासणी करावयाची असते. योग्य अभिनय याने स्वत: करून दाखविला पाहिजे. प्रसंगविशेषी एखादी भूमिका दुसर्‍या पात्राकडून आली असता गैरहजर नाटककाराची कामगिरी याने केली पाहिजे. प्रसंगी नाटककाराच्या हातून एखादा प्रमाद झाला असेल तर तोही झाकून टाकण्याचा होईल तितका प्रयत्नही यानेच केला पाहिजे. सर्कशीतील विदूषकाला ज्याप्रमाणे सर्कशीतील प्रत्येक बाबतीची चांगलीच माहिती असावी लागते, त्याप्रमाणे या शिक्षकालाही नाटयविषयक प्रत्येक गोष्टीची खडान्खडा माहिती असली पाहिजे. जवळजवळ असेही म्हणता येईल की, साहित्यशास्त्रातून सूत्रधाराच्या अंगी जो गुणसंच असावा लागतो म्हणून सांगितले आहे, तोच सध्याच्या अभिनयशिक्षकाच्या अंगी असला पाहिजे. नटाची बरीचशी सुधारणा एकटया अभिनयशिक्षकावर अवलंबून आहे. दररोज नेमाने तालीम घेत राहिल्याने प्रयोगातही उत्तरोत्तर सुधारणा होत जाईल व सर्व दुर्गुणांची जननी जी निरुद्योगिता तिचाही नाश होत जाईल. रोज उठून त्याच त्याच नाटकांची उजळणी करीत बसणे नि:संशय कंटाळवाणे वाटेल व सकृतदर्शनी फारसे हितावहही वाटणार नाही. परंतु परिणामी दृष्टी दिल्याने असे करण्याचा फायदा कळून येणार आहे. 'श्रीमंत सकल' ही अक्षरे काढता येऊ लागल्यानंतर ती वळणदार होत जाण्यासाठी सत्राशे पन्नास वेळा घटवीत बसणे किंवा त्रैराशिकाची उपपत्ती समजल्यानंतर ती मनात कंटाळवाणी तर खरीच, परंतु धर्तीची शेपन्नास उदाहरणे सोडवीत बसणे ही कामे कंटाळवाणी तर खरीच, परंतु एवढयासाठी ती टाकून देण्याइतकी त्यांची अपात्रता मात्र अजून कोणाला दिसून आली नाही; तसेच तालमीचेही आहे. प्रत्येक नटाची 'नक्कल' तोंडपाठ असल्याने तालमीची आवश्यकता संपते अशातला प्रकार नाही. 'क्रिकेटच्या खेळात फील्डिंगमध्ये एकेकश: प्रत्येक गडी जरी आपले काम बजाविण्यात वाकबगार असला तरी अन्योन्यसंबंध कळण्यासाठी ज्याप्रमाणे त्यांना सामना होण्यापूर्वी काही दिवस संघश: खेळावे लागते, त्याप्रमाणे नाटकांतील भूमिकांचे परस्परसंबंध लक्षात येण्यासाठी तालमी करणेही जरुरीचे आहे. सध्या आपल्यातील बहुतेक मंडळींतून तालीम मृत-किंवा आसन्नमरण झालेली असल्यामुळेच रंगभूमीवर गद्यभागाची अशी दाणादाण उडालेली दिसून येते. प्राय: निरपवादात्मकरीत्या सर्वत्र एका पात्राचे भाषण चालू असता इतर पात्रांवर होणारे तद्नुषंगी परिणाम केवळ आपल्या अभावानेच आपले अस्तित्व प्रगट करितात याचे कारण तरी ही पूर्वप्रयोगाची अनास्थाच होय. नटांच्या मुखावरील ही सध्याची विवर्णता घालविण्यासाठी पूर्वप्रयोगासारखे औषध नाही. कित्येक नाटकमंडळयांतून नटांना आपापली कामे कोणकोणत्या वेळी आहेत हेसुध्दा माहीत नसते. कोठे कोठे तर प्रयोगाच्या दिवशी अगदी संध्याकाळी कामे निश्चित करण्याची वहिवाट आहे. चालत असताना अंतर्भागात बसून नाटक पाहणाराला, अरे, पुढे तू असे म्हण आणि नंतर तू असे म्हण, नाहीतर तू शिपाई हो, मी सेनापती होतो, अशी किंवा यासारखीच दुसरी हातघाईची भाषणे ऐकण्याचा प्रसंग येतो ! यामुळे त्या मंडळीतील उत्तमतेचा सुध्दा क्षणभर विसर पडून या अव्यवस्थेचा मनावर फारच वाईट परिणाम होत असतो. तेच महाराष्ट्र नाटक मंडळीचे उदाहरण घ्या ! बहुतेक प्रमुख नटांची चिरस्थायिता आणि पूर्वाभिनयाचा परिपाठ या दोन गोष्टींमुळे या मंडळींचे बहुतेक प्रयोग खरोखरीच प्रशंसापात्र होत असतात. प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे होत असलेली पाहून प्रेक्षकांच्या मनाचा जो आनंद होतो तो एखाद्या मुख्य पात्राचे उत्कृष्ट काम व बाकीच्या पात्रांच्या नावाने 'हळक्षज्ञ' पाहून कधीही व्हावयाचा नाही. आमच्याकडे सध्या राजकीय बाबतीत ज्याप्रमाणे नव्या पिढीपासून जुन्या पिढीनेच पुष्कळसे शिकण्यासारखे आहे, त्याप्रमाणे रंगभूमीवरही नवीन जन्मलेल्या बालिकेपासून वृध्द आजीबाईंनी उपदेश घेण्याची वेळ आली आहे!

अशा रीतीने ज्या पूर्वप्रयोगाचे महत्त्व आहे त्याचा नेता अभिनयशिक्षक किती जोखीमदारीच्या कामावर असतो हे त्याने केव्हाही विसरता कामा नये. प्रयोगाच्या वेळी होणार्‍या चुका पाहण्याकरिता याने धोक्याच्या जागेत सापडलेल्या गलबताच्या कर्णधाराप्रमाणे सावध असले पाहिजे. त्या सर्व चुकांबद्दल तोच एकटा जबाबदार आहे. पण जबाबदार तरी कोणाला? त्याच्याप्रमाणेच कर्तव्यपराङ्मुख झालेल्या प्रेक्षकसमुदायाच्या मार्मिकाला! नटाच्या कर्तव्याची सुधारणा ज्याच्यावर अवलंबून आहे असा शेवटचा व अती महत्त्वाचा वर्ग. याने स्वत:च्या मार्मिकतेच्या साहाय्याने नटाची कृती परीक्षावयाची असते. हे परीक्षणही प्रेक्षकांचे केवळ कर्तव्यच आहे असाही प्रकार नाही. ऍरिस्टॉटल् म्हणतो की, मनुष्याची नैसर्गिक प्रवृत्ती वाईटाचा त्याग करून चांगले असेल ते घेण्याकडे असते. त्या दृष्टीने पाहिले असता नटपरीक्षण हे प्रेक्षकांनी कर्तव्याची बजावणी नसून निसर्गप्रवृत्तीचे अनुसरणच ठरते. पण आमच्या प्रेक्षकांनी ऍरिस्टॉटल्च्या या सिध्दांतालाही हरताळ लाविला आहे. आपणास सुखदर्शन व्हावे म्हणून सुध्दा कोणी नटाची सुधारणा करण्याकडे लक्ष देत नाही. नटाच्या स्वकर्तव्यच्युतीचा उगम प्रेक्षकांच्या या अनास्थेतच आहे. ज्यांच्यासाठी सारे प्रयत्न करावयाचे तेच जर सद्संतांविषयी उदासीन राहू लागले तर निव्वळ कर्तव्य म्हणून तितक्याच प्रमाणाने, दक्षतेने व उल्हासाने प्रयत्नपरायण होणे हे मनुष्य ह्या नात्याने नटास असाध्य आहे. घरून करून आणावयास सांगितलेली उदाहरणे शिक्षक नेमाने लक्षपूर्वक तपाशीत नाही असे बरेच वेळा नजरेस आल्यावर मग मुलेही तितक्या काळजीने ते काम करण्याचे सोडून देऊन उदाहरणांच्या ऐवजी काही तरी आकडे मांडून आणण्यावरच वेळ मारून नेतात; तसाच प्रकार आमच्या नटांचाही झालेला आहे. जी परीक्षा कधीच व्हावयाची नाही तिच्यासाठी अभ्यास तरी कोण करीत बसतो? ज्या अपराधाकडे नेहमी दुर्लक्षच करण्यात येते त्याची पुनरावृत्ती बिनदिक्कतपणे होत गेल्यास त्यात विशेष आश्चर्य ते काय? पाठस्खलन, रंगवैचित्र्य, विजातीय वेषोपचार वगैरे प्रचलित प्रकार रंगभूमीवर पहिल्याने येऊ लागले त्याच वेळी चार टाळयांच्या आवाजाने हुसकावून देता आले असते व सध्याही तितक्याच सौकर्याने हे कार्य साध्य आहे; 'पण लक्षात कोण घेतो?' वर्तमानपत्रकर्ते व मार्मिक नागरिक यांनी प्रयोगात होणार्‍या चुकांबद्दल हरतऱ्हेने विवेचन करीत असले पाहिजे. हल्ली दोन चार वेळा 'वन्समोर' करून रसहानी करण्यापलीकडे प्रेक्षक कसलीही कामगिरी करीत नाहीत. सोडा, विडी वगैरे गोष्टींचा पसारा मात्र दिवसानुदिवस वाढत चाललेला दिसून येत आहे. एका चांगल्या जत्रेला पुरतील इतकी या पदार्थांची दुकाने अलीकडे नाटकगृहाभोवती जमत असतात. आपल्या अभिनयकौशल्याची ऐन बहार चालत असता प्रेक्षकांतील प्रमुखांना गप्पा मारताना, स्वस्थ घोरताना, चहा प्यावयास जाताना, विडीच्या धुराचे लोट सोडताना किंवा लिहिले हे पाहिजेच-प्रसंगी वारयोषितांकडे नजर फेकताना पाहून बिचार्‍या नटाला काय वाटत असेल याची कधी कोणी कल्पना तरी केली आहे? इतक्या अल्पसंतुष्ट आणि निर्बूज प्रेक्षकांबद्दल भीती व आदर कोणत्या नटाच्या मनात राहू शकतील ? असे म्हणतात की, इंग्लंड वगैरे सुधारलेल्या देशांतून नाटकाचा एखादा प्रयोग चालू असला तर रसभंग होईल या भीतीने उशिरा आलेले प्रेक्षक तसेच बाहेर उभे राहतात व आत बसलेल्यांपैकी मधूनच कोणी उठत नाही; यापासून आमच्या प्रेक्षकांनी किती तरी शिकावयाजोगे आहे! मागे पुणे शहराची मार्मिकतेबद्दल मोठी ख्याती असे. 'फाल्गुनराव' या नाटकाचा प्रयोग होत असताना त्यातील काही अश्लील वाक्यांबद्दल प्रेक्षकांनी अशा रीतीने आपली नाखुषी प्रदर्शित केली की, पुढे त्या प्रजोयक मंडळीला तो प्रयोग टाकून द्यावा लागला. परंतु हल्ली त्या शहरातील लोकांचीही अनास्थेकडे बरीच प्रवृत्ती होत चालली आहे असे मोठया दिलगिरीने म्हणावे लागते ! मार्मिक प्रेक्षकांत हल्ली अनास्थेखेरीज आणखी एक दोष दिसून येतो, तो म्हणजे लाच खाणे हा होय ! काही नाटकवाले गावातील समजूतदार लोकांना सन्मानाने बोलावून आणून खड्डयांतील खर्ुच्यांवर बसवितात. सकृद्दर्शनी ही गोष्ट बरीशी दिसते; पण अशा रीतीने त्या प्रेक्षकांबरोबर त्यांची मार्मिकताही खड्डयातच पडते. तिचा उपयोग करण्याइतकी निर्भीडता पुढे मनुष्याच्या अंगी साहजिकपणे उरत नाही. राज्यव्यवस्थेविरुध्द ओरड करणार्‍या मनुष्यांना बर्‍याच पगाराच्या जागा देऊन अडकवण्याची सरकारची कल्पना व नाटकवाल्यांची ही कल्पना या दोन्ही एकरूपच होत. वर्तमानपत्रकर्त्यांस सन्मानपत्रिका पाठविण्याच्या सौजन्याचा आरंभही याच हेतूपासून झालेला आहे. अशा रीतीने सामोपचाराने हे भावी टीकाकार निर्बीज करून टाकल्यानंतर नटाच्या स्वैर क्रीडेला कसलाही प्रत्यवाय राहत नाही. आमच्यातील चांगल्या चांगल्या लोकांना आपली मार्मिकता दीड दोन रुपयाला विकताना पाहून कोणासही वाईट वाटल्यावाचून राहाणार नाही. हेच लोक प्रमुख नटांवर नसत्या गुणांचा आरोप करून त्यांची स्तुती करीत असतात. या स्तुतीचे पर्यवसान नटाच्या बेपर्वाईत व मदांधतेत झाल्यास त्या बिचार्‍या नटाचा तरी काय दोष? पुष्कळसे नट सुधारणामार्गाच्या 'रोड बाउंडरीच्या' पलीकडे जाऊन उभे राहिलेले दिसतात. त्याचे कारण याच गोष्टीत आहे. मोठमोठे लोक एखाद्या सामान्य नटाच्या स्तुतिपाठकाचे काम करावयास कसे प्रवृत्त होतील या आशंकेने कोणी प्रस्तुत विधानावर असत्यतेचा आरोप करील. परंतु तो आरोपाभास होईल हे अनुभवी मनुष्य ताबडतोब सांगू शकेल. आमच्यातील सत्यवक्तृत्वाचा व निर्भीडतेचा हा असद्वय जेव्हा बंद पडेल तेव्हाच नटाला स्वतःची जबाबदारी व प्रमादकौशल्य ही स्फुटत्वाने कळू लागतील. ठिकठिकाणच्या वर्तमानपत्रांतून नाटकप्रयोग टीकाविषयक व्हावयास पाहिजे आणि विशेषतः तात्कालिक शिक्षा अंमलात येत गेली पाहिजे. नट आपले भाषण चुकला किंवा गौण अभिनय करू लागला की ताबडतोब टाळयांच्या आवाजाने त्याबद्दलची तिरस्कारबुध्दी व्यक्त होत गेली पाहिजे. अशा रितीने अनेक लोकांनी अनेकदा प्रयत्न केल्यास त्यांना सुप्रयोगदर्शनाचा लाभ मिळणार आहे.

आमच्या वाचकांची खात्री झालीच असेल की, नटाची नट या दृष्टीने सुधारणा होण्याला वर सांगितल्याप्रमाणे विविध प्रयत्न झाले पाहिजेत. एक नाटककारांकडून व एक अभिनयशिक्षकांकडून व एक मार्मिक प्रक्षकांकडून. हे प्रयत्न यथोचित होऊ लागल्यास सध्याचा 'नाटकवाला' 'नट' या पदास पात्र होण्यास फारसा अवधी लागणार नाही. 'नाटयसंमेलनासारख्या' संस्थांनीही या गोष्टीचा विचार करावयास हवा.

आता 'मनुष्य' या नात्याने 'नाटकवाल्या'ची नैतिक सुधारणा कशी होईल या प्रश्नाबद्दल विचार करू. हा प्रश्न एकपक्षी इतका सोपा व उघड आणि एकपक्षी इतका बिकट व नाजूक आहे की, त्याबद्दल खात्रीपूर्वक लिहिताना मूर्खपणाच्या व स्पष्टोक्तीने लिहिताना असभ्यतेच्या दोषाला पात्र व्हावे लागते. नाइलाजामुळे किंवा कुसंगतीमुळे मनुष्य पराधीन बनून कुमार्गरत कसा होतो, निरूद्योगीतेमुळे व्यसनितेला दुजोरा कसा मिळतो, बेपर्वाईमुळे मनुष्य परकृत टीकेला कसा झुगारून देतो वगैरे गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत की, त्यासंबंधी नुसता उल्लेख करण्यापलीकडे विशेष विवेचन करीत बसण्याचे कारण दिसत नाही. नटांची स्वतःच्या वर्तनाबद्दल जी बेपर्वाई दिसून येते तिचे खरे कारण त्यांची स्थलांतरशीलताच होय. एकाच गावात राहणारे लोक परस्परांच्या वर्तनाबद्दल परस्परांवर टीका करीत असतात. स्थायिक मनुष्याला स्थलांतर केल्याखेरीज ही टीका चुकविता येत नाही. परंतु हे स्थलांतर आम्हा हिंदू लोकांना इतके प्रिय नाही. सबब, ग्रामस्थांच्या निंदाभयामुळे स्थलांतर करण्याचा प्रसंग आणण्यापेक्षा सच्छीलतेने राहून ही निंदा चुकविण्याकडेच आमच्या लोकांची विशेष आसक्ती दिसून येते. परंतु नटाला हे बंधन नाही. एका गावात केलेल्या स्वैर वर्तनाबद्दल निंदात्मक फळे त्याला मिळण्यापूर्वीच त्याचा धंदा त्याला दुसर्‍या गावी नेतो. परलोकांची कल्पना व तज्जन्य भय या दोहोंसाठी फाटा देऊन निर्भयपणे यथाछंद वर्तन करणार्‍या चार्वाकपंथी मनुष्याप्रमाणेच नाटकवालाही स्वकृत दोषाच्या टीकाभयाबद्दल बिनघोर असतो. पुष्कळ अशी ही बेपर्वाईच त्याला अधोगतीस नेण्याला कारण होते. परंतु ही गोष्ट अशी चमत्कारिक आहे की, धंद्याच्या दृष्टीने तिचा प्रतिकार करणे अशक्य आहे. आता राहिली सुविद्या. हल्ली प्रचलित असलेल्या अशिक्षित नटांबद्दल विचार करण्याचे कारण नाही. परंतु येथून पुढे नाटकमंडळीच्या व्यवस्थापकांनी व मालकांनी नवीन मनुष्य मंडळीत घेताना त्याच्या इतर गुणांबरोबरच शिक्षणाकडेही थोडीशी परीक्षणदृष्टी पोहोचविल्याने हे संकट बर्‍याच अंशी कमी होण्याजोगे आहे. या व इतर अशाच बाबतीत नटाची सुधारणा होणे बहुतांशी नाटक मंडळीचे मालक व चालक यांच्या हाती असते.

सृष्टीत निरूपयोगी अशी वस्तू एकदेखील नाही. वृक्षगणात निर्माल्यवत् कल्पिलेला एरंडद्रुमही प्रसंगविशेषी उपयोगी पडतो. आणि जीवकल्पांतील श्रेष्ठतम अशा कोटीतील नटवर्गाकडून हल्ली होत आहे यापलीकडे मनुष्य या नात्याने अधिक कार्य घडून येऊ नये हे आश्चर्य आहे ! रंगभूमीवर नटांची कामगिरी ग्रथंकर्त्यांच्या हेतूप्रमाणे, प्रेक्षकांच्या समोर बरोबर वठली पाहिजे ही तर गोष्ट निश्चितच आहे व नटांचे ते कर्तव्य आहे. परंतु यापलीकडेही ह्यांना कार्य करता येण्याला हल्ली आहे यापेक्षा त्यांच्यात पात्रता वाढली पाहिजे. ती वाढल्याखेरीज समाजात ह्यांच्याकरिता जी जागा अवश्य ती मिळणे शक्य नाही. नट म्हणजे काही एखाद्या इंग्रजी बागेत, इंग्रजी इमारतीतून किंवा आपल्या इकडच्या देवालयातून, शोभा येण्याकरता उभे केलेले सुंदर, घडीव व घोटीव दगडाचे, शाडू मातीचे किंवा लाकडाचे पुतळे (Statue) नाहीत. त्यांनी आपल्या सौंदर्याचा (असेल तर) किंवा सुरेखपणाचा उपयोग रस्त्याने त्याचा नित्यशः संध्याकाळी भर पेठेतून मिरवणूक काढण्याकडे करावयाचा नाही. सौंदर्य हे ईश्वरदत्त आहे व ते त्याने एकटया नटाकरिताच उत्पन्न केलेले नाही. पृथ्वीच्या पाठीवर त्यांच्यापेक्षा किती तरी सुंदर पुरूष देवाने निर्माण केले आहेत. परंतु त्यांना समाजात ते सुंदर आहेत म्हणून मान नाही, तर त्यांनी काहीतरी निराळे कार्य केलेले असते म्हणून मान असतो. आमच्या नटवर्गात असा एकही स्वतःचा गुण नाही की, यांनी त्याचा अभिमान बाळगावा. सौंदर्याबद्दल आता सांगितलेच. कंठमाधुर्यादी काही गुण असतील तर ते देखील त्यांचे स्वतःचे आहेत म्हणून त्यास अभिमान केव्हा बाळगता येईल की, हे गुण अंगी असून तज्जन्य जे मोह व व्यसनासक्ती यांपासून तो अलिप्त राहून लोकरंजनाचे जे त्याचे कार्य ते तो यथासांग करील तेव्हाच त्यास स्वतःबद्दल अभिमान बाळगता येईल. तोपर्यंत वरील नुसत्या रूपसौंदर्यादी गुणांनी युक्त जो नट त्याची योग्यता लाकूड व पोलाद यांच्या संयोगापासून तयार झालेल्या तंतुवाद्याची योग्यता सारखीच. तंतुवाद्याला जसा मी लोकांच्या श्रोत्रेंद्रियांना रंजवितो म्हणून अभिमान बाळगता येणार नाही, त्याचे चांगुलपण जसे खुंटी पिळणाराच्या स्वाधीन, त्याप्रमाणेच नटाची बहुतेक अंशी गोष्ट आहे. त्याच्या नाटयनैपुण्याला त्याच्या सद्वर्तनाची अक्षय जोड पाहिजे. त्याशिवाय त्याची प्रभा फाकावयाची नाही. प्रत्येक नटाने आपल्यावरची जबाबदारी ओळखली, आपण कोण? आपणास करावयाचे काय? आपली समाजात गणना जेथे करण्यात येते त्याच्या वरच्या पायरीवर जाण्याला आपल्याला काय केले पाहिजे? या गोष्टीचे जर त्याने चिंतन केले तर त्याला खात्रीने समजून येईल की, आपला उपयोग या संसारी जगात अधिक महत्त्वाचा आहे. व त्याला सांप्रतच्या अधोगतीपासून मुक्त होण्याची खचित लवकरच पाळी येईल.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.