Jump to content

सप्तशती (मोरोपंत)/द्वितीय चरित्र - अध्याय दुसरा

विकिस्रोत कडून

देवीवरि बळनाशें धांवे कोपोनि म्हणत चिक्षुर, ‘ हा ! ’ जाणों करेणुसि म्हणे ‘ भंगाचा काम धरुनि ’ इक्षु ‘ रहा ! ’ १


मेरुशिरीं तोयदसा, देवीवरि तो महेषुवृष्टि करी. सिंहीतें माराया, वाटे, झटतो मदांधदृष्टि करी. २


देवी, ते शर तोडुनि, सोडुनि निज शत्रुकायहानिकर, लीलेनेंचि अरिसि करि विरथ, म्हणति देव, ‘ काय हा निकर ! ’ ३


हयसारथिचापध्वजनाशें अत्यंत पाप तो खवळे, अपराधकरीं जैसा, द्याया आशीस साप तोख, वळे. ४


तीव्रत्वें क्षुर चिक्षुर तो घेउनि खड्गचर्म नव धावे; देवी म्हणे, ‘ असे म्यां, न विलोकुनि शूरकर्म, न वधावे. ’ ५


आधीं करी हरिशिरीं तो समरीं चिक्षुर प्रहारातें, जरिही ल्याला होता हो !समरीचि क्षुरप्रहारातें. ६


मग जो वर तेज्याचा, लावण्याचाहि, सव्य भुज, गाभा, खड्गेंकरूनि हाणी चिक्षुर त्या परमभव्यभुजगाभा. ७


देवीबाहुस्पर्शें गेला तत्काळ उडुनि करवाळ, तरुण रवि ज्यांत लोपे, त्या तेजीं काय उडुनिकर बाळ ! ८


सोसे न तिची त्या, जसि काशीची नीच मद्रका, लीला, क्षेपी शूल क्षोभें, लक्षुनि तो क्षुद्र भद्रकालीला. ९


अहिवरि गरुड, तसा ती त्यावरि निजशूल अंबिका धाडी, ताडी त्या शूलातें, भस्म करुनि चिक्षुरासही पाडी. १०


महिषचमूपति मरतां, त्रिदशार्दन मर्रसिंधुरारूढ चामर पामर टाकी शक्ति महाशक्तिवरि महामूढ. ११


शक्ति पडे, कीं तीचा मद हुंकारेंचि चंडिका उतरी; वाटे, मूच्छित पडली ती सिंहीनें दटाविली कुतरी. १२


खंडी शूलहि दुर्गा, ज्यासि झुगारी अराति चामर तो, न वधी स्वयें तया, कीं सांपडतो मृगवरा तिच्या, मरतो. १३


तों तो चढला अरिच्या हस्तिशिरीं सिंह उडुनि वेगानें, ज्या उदयनगाग्रगशशिसदृशाच्या सर्व उडु निवे गानें. १४


असुरांची काळमुखीं, द्याया भय परमनीं, चमू ढकली जो हरि, करी तयासीं तो चामर परम नीच मूढ कली. १५


मेळविती सुभट यशें, करुनि तनुत्याग, ज्या वरुनि, महितें, भुजयुद्ध करित दोघे ते आले त्या गजावरुनि महितें. १६


हरि शिरला द्रुत, कंदुक महिवरुनि उडुनि जसा नभीं शिरतो, पुनरपि पडोनि, उडवी तत्काळचि त्या सुरारिचें शिर तो. १७


वधिला वृक्षशिळाहीं दुर्गेनें तो उदग्र समरांत, जेणें तेज मिरविलें होतें हो ! तें असह्य अमरांत. १८


मथिला कराळहि रणी व्यापारूनि स्वदंतमुष्टितळें; केलें सुयश, करावें जीवां द्यायासि जेंवि तुष्टि, तळें. १९


कोपोनि उद्धतातें चूर्ण करी ईश्वरी गदापातें, तें कुतुक देखत्यांचें बा ! एकहि न लवलें तदा पातें. २०


तैसेंचि भिंडिपालें रणरंगीं बाष्कळासि ती निवटी, जीची स्मृति न उरों दे दु:खासि पुढें, तमा जसी दिवटी. २१


चूर्ण करी बाणाहीं ताम्रासि, तसेंच अंधकालाही, पक्षीश्वरदृष्टिपुढें केवळ होतोचि अंध कालाही. २२


उग्रास्य; उग्रवीर्य, त्रिदशांचा रिपु महाहनुहि तिसरा, हे मारुनि त्रिशूळें, त्यांसि म्हणे, ‘ पूरव्कुमतिला विसरा. ’ २३


त्याहि विडलाक्षाचें केलें खड्गें शिरोब्जकर्तन, हो ! कीं हर्षें विधिहरिहरलोकपतिसभांत गान, नर्तन, हो. २४


दुर्धर, दुर्मुखहि, रणीं बाणाहीं यमगृहासि पाठविले, ज्यांचे अपकार सदा देवांहीं, ‘ हाय ’ म्हणुनि, आठविले. २५


बळनाशें महिषासुर खवळे, पापाग मोह ल्याला जो, तो कां न म्हणेल, ‘ निपट बाळ यमाचा गमो हल्य, लाजो ? ’ २६


तो कोप आंत बाहिर, म्हणवाया त्रिभुवना ‘ अहह ! ’ ल्याला; गणबळ मर्दी, तेव्हां प्रळयीचें लाजलें अह हल्याला. २७


किति गण तुंडाघातें वधिले महिषासुरें रणीं रागें, कितिक खुरक्षेपाहीं, पद्म जसे मर्दिले महानागें. २८


पुछें किति लोळविले, किति शृंगांहीं विदारिले क्रूरें, निश्वासवेगनादभ्रमणाहीं कितिक नाशिले शूरें. २९


झालें प्रमथबळपतन, सर्व सविस्तर न बोलवे गा ! तें; धावे हरिसि वधाया, पवनाच्या करुनि फ़ोल वेगातें. ३०


येतां निजसिंहावरि, पाहे कोपोनि अंबिका याला, ‘ झालेंचि ’ म्हणे ‘ याच्या मित्र जळ तृणाग्रलंबि कायाला. ’ ३१


तें महिश करी चेष्टित, करितो, सोडूनि सोय, रेडा जें; सुर म्हणति, ‘ सेवटींचे सुखवाया गृध्र - सोयरे डाजें. ’ ३२


शृंगांहीं गिरि उडवी, वेगभ्रमणेंचि भूमिला फ़ाडी, उसळोनि जलधि बुडवी, तो पुछें त्यासि जेधवां ताडी. ३३


त्याच्या शृंगाघातें बहु झाले खंड खंड, घन झडले, श्वासें उडोनि गगनीं गेले तृणासे, पुह्नां अचळ पडले. ३४


यापरी बळमायांच्या फ़ुगला होता मनीं लुलाय शतें, किति वर्णावें ? कथितों जगदंबेचें नृपा ! तुला यश तें. ३५


कोप करी, आंगावरि येतां पाहोनि चंडिका यातें, कांअवि बांधुनि पाशें, प्रबळाही जेंवि थंडि कायातें. ३६


तत्काळ, बद्ध होतां, असुरांचा भूप रूप तें सोडी, हरि होय, तोंचि खड्गें त्या शत्रुशिरास ती सती तोडी. ३७


तों खड्गचर्मधर तो होय पुरुष परम दक्ष मागावी, त्यासि शराहीं मारी, नच हरितां परमद क्षमा यावी. ३८


मग होय महागज तो, गर्जे, ओढी हरीस धरुनि करें, कर तोडिल कृपाणें, जैसा रंभाभिधानतरु, निकरें. ३९


पुनरपि हिता गमे त्या दुर्मतिच्या चाकरासि कासरता. दुरसा मागें, येतां अमरत्वचा करा सिका, सरता ? ४०


त्रैलोक्य तसेंचि पुह्नां तो महिष क्षोभवून भीनाच, बहुधा म्हणे शिवा सुरमुनिस, ‘ कलह लोभवू, नभीं नाच. ’ ४१


कोपोनि जगन्माता, पान करी, अरुणलोचना मग ती हांसे पुन:पुह्नां, परभर वारुनि, हर्शवावया जगती. ४२


बलवीर्यमदोद्धत तो असुरहि गर्जोनि शैल शृंगानीं उडवी तीवरि, वरिले जीचे पदपद्म साधुभृंगानीं. ४३


परमेश्वरीहि सोडुनि खरतरशरनिकर बहु तिहीं, तूर्ण द्वेषिप्रेषितपर्वत सर्व तदुत्साहसह करी चूर्ण. ४४


कविसुरगंधर्व जिच्या पदभक्तिप्राप्तपदनरा गाती, अस्पष्टाक्षर बोले पानमदोद्भूतवदनरागा ती. ४५


‘ पीत्यें मधु, तों मूढा ! गर्ज क्षणभरि, धरूनियां गर्वा; म्यां तुज बधितां, येथें गर्जतिल क्षिप्र देवता सर्वा. ’ ४६


वदुनि असें, उडुनि चढे पृष्ठावरि, जरिहि तो महिश झाडे; पादें आक्रमण करुनि, कंठीं शूळेंकरूनि ती ताडी. ४७


झाली त्रिभुवनसुखदा तें अति अद्भुत करूनि कर्म असी; तों निजवदनापासुनि असुर निघाला, धरूनि चर्म, असी. ४८


अर्धविनिर्गत होतां, केला तो आद्यशक्तिनें रुद्ध, शुद्धयशोर्थ तसाही श्रेदुर्गेसीं करी महायुद्ध. ४९


तेव्हां दिव्यकृपाणें मस्तक खंडुनि करूनि, असुरहित तो महिष पाडिला श्रीदेवीनें जो सदैव असुरहित. ५०


ज्या द्याया सुकविमनीं निर्दयपत्यंतकोपमा यावी, वधिला देवीनें यापरि तो अत्यंतकोप मायावी. ५१


महिषवधें खळबळलें, वातें बहु जेंवि तोय खळबळतें, ‘ हा ! हा ! ’ म्हणुनि पलायनपरचि निहतशेष होय खळबळ तें. ५२


सुरगण सकळ सबळखलमहिषवधें जाहले परम हर्षी, स्तविती जगदंबेतें नारदसनकादि जे पर महर्षी. ५३


जे नटति अप्सरोगण, ते मोरचि, गान तो अनघ टाहो, निववी यशोमृतातें वर्षुनि जी, ती शिवा घनघटा हो ! ५४


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.