सत्यार्थ प्रकाश/४. तिसरा समुल्लास

विकिस्रोत कडून

अध्ययन व अध्यापन

विद्या हेच खरे भूषण

    आता तिसऱ्या समुल्लासत अध्ययन-अध्यापनाविषयी आम्ही लिहित आहोत. संततीस उत्तम  विद्या, शिक्षण, गुण, कर्म आणि स्वभावरूपी आभूषणांनी अलंकृत करने हे माता पिता, आचार्य व संबंधित यांचे मुख्या काम आहे. सोने, चांदी, माणिक, मोती, मंगल वगैरे रत्नांचे दागिने धारण केल्याने माणसाचा आत्मा कधीही सुभूषित होऊ शकत नाही. कारण आभूषण धारण केल्याने केवल देहाभिमान व विषयासक्ति वाढते; आणि चोरांची भीति तसेच मृत्यूचीही शक्यता असते. आपण जगत असे पाहतो की अंगावर दागिने घातल्यामुळे दुष्टांच्या हातून बालकादिंचा मृत्युही होतो.

विद्याविलासमनसो धृतशीलशिक्षाः सत्यव्रता रहितमानमलापहाराः। संसारदुःखदलनेन सुभूषिता ये धन्या नरा विहितकर्मपरोपकाराः।।

   ज्या पुरुषांचे मन विद्या विलासत मग्न असते, जे सच्छील व सुस्वभावी असतात, जे सत्यव्रती असून गर्व व अपवित्रता यांपासून  मुक्त असतात, जे मालिन्याचा नाश करणारे, सत्योपदेश व विद्यादान यांच्या द्वारे संसारी माणसांची दुःखे दूर केल्याने सुभूषित, वेदविहित कर्मांद्वारे परोपकार करण्यात मग्न असतात, ते पुरुष व त्या स्त्रिया धान्य होत, म्हणून मुले आठ वर्षांची होताच मुलांना मुलांच्या व मुलींना मुलींच्या शाळेत घालावे. दुराचारी शिक्षक-शिक्षिकांकडून त्यांना शिक्षण न देवविता पूर्ण विद्यायुक्त आणि धार्मिक वृत्तीच्या स्त्री-पुरुष अध्यापकांकडून त्यांना शिक्षण मिळणे योग्य आहे .
    द्विजांनी आपल्या घरी मुलांचे उपनयन व मुलींचे यथायोग्य संस्कार करून वर सांगितलेल्या आचार्य कुलात म्हणजे मुलांना मुलांच्या व मुलींना मुलींच्या शाळेत पाठवावे. विद्याध्ययनाचे स्थान एकांत प्रदेशात असले पाहिजे आहि मुले व मुली यांच्या शाळां एकमेकांपासून दोन कोस दूर असल्या पाहिजेत. मुलींच्या शाळेतील शिक्षिका, नोकर सेवकादि सर्व स्त्रिया असाव्यात आणि मुलांच्या शाळेत शिक्षक, नोकर चाकर सगळे पुरुष असावेत. मुलींच्या शाळेत पाच वर्षाचा मुलगा आणि मुलांच्या शाळेत पाच वर्षाची मुलगी ही जात कामा नये. मुले व मुली जोपर्यंत ब्रह्मचारी व ब्रह्मचारिणी राहतील तो पर्यंत स्त्रीचे किंवा पुरुषाचे दर्शन,स्पर्शन,एकांतसेवन, भाषण, विषयवासनेच्या गोष्टी, परस्पर क्रीडा विषयवासनेचे चिंतन परस्परांचा संग या आठ प्रकारच्या मैथुनांपासून त्यांनी अलिप्त राहावे. अध्यापकांनी त्यांना या गोष्टीपासून सुरक्षित ठेवावे. त्यायोगे उत्तम विद्या, शिक्षण, शील, स्वभाव, शरीर व आत्मा सामर्थ्यवान होऊन त्यांना आपला आनंद सतत वृद्धिंगत करता येईल.
     शाळेपासून गांव अथवा शहर एक योजना म्हणजे चार कोस दूर असावे. शाळेत सर्वाना सामान अन्न, वस्त्र, निवारा आसनादी दिले जावे. मग तो राजकुमार असो कि राजकुमारी असो किंवा गरीबाची मुले असोत. सर्वांनी तपस्वी बनले पाहिजे. त्यांच्या आईबापांनी आपल्या मुलांना अथवा मुलींनी आपल्या आईबापांना भेटता कामा नये अथवा एकमेकांशी कसलाही पत्रव्यवहार करता कामा नये. त्यामुळे सांसारिक चिंतेपासून मुक्त होऊन त्यांना आपल्या केवळ विद्याभ्यासाची काळजी करता येईल. ते जेव्हा प्रवासाला जातील तेव्हा त्यांच्या बरोबर त्यांच्या शिक्षकांनी राहिले पाहिजे. त्यामुळे ते कसल्याही वाईट गोष्टी, आळस आणि चुका करणार नाहीत.

कन्यानां सम्प्रदानं च कुमाराणां च रक्षणम्।। मनु.अ. ७ श्लो. १५२


    याचा अर्थ असा कि वयाच्या पाचव्या अथवा आठव्या वर्षानंतर आपल्या मुलामुलींना आईबाप घरी ठेवू शकणार नाहीत, असा राजनियम व लोकनियम असला पाहिजे जेणेकरून त्यांना शाळेत पाठवतील. जे आईबाप मुलांना शाळेत पाठविणार नाहीत. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मुलांची पहिली मुंज घरी आणि दुसरी पाठशाळेत आचार्य कुलात व्हावी. माता पिता, अथवा अध्यापक यांनी मुलांना व मुलींना अर्थासह गायत्री मंत्राचा उपदेश द्यावा तो मंत्र असा-


गायत्री -मन्त्र

ओ३म् भूर्भुवः स्व: । तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् । यजु. ३६-३

     या मंत्रात प्रारंभी जो ओ३म् आहे. याचा अर्थ प्रथम समुल्लासात दिला आहे तेथे तो पाहावा. आता तीन महाव्याहृतींचे अर्थ थोडक्यात देत आहे. ‘भूरिति वै प्राणः’ ‘यः प्राणयति चराऽचरं जगत् स भूः स्वयम्भूरीश्वरः’ जो सर्व जगाच्या जीवनाचा आधार, प्राणाहून प्रिय आणि स्वयंभू आहे त्या प्राणाचा वाचक असल्याने 'भूः:' हे परमेश्वराचे नाव आहे. ‘भुवरित्यपानः’ ‘यः सर्वं दुःखमपानयति सोऽपानः’ जो सर्व दु:खांनी रहित आहे, ज्याच्या संगतीने जीव सर्व दु:खांपासून मुक्त होतात. म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'भुवः आहे. ‘स्वरिति व्यानः’ ‘यो विविधं जगद् व्यानयति व्याप्नोति स व्यानः’ जो नानाविध जगात व्याप्त होऊन सर्वांचे धारण करीत आहे म्हणून त्या परमेश्वराचे नाव 'स्वः आहे ही तीन्ही वचने तैत्तिरीय आरण्यकातील आहेत.
    (सवितुः) ‘यः सुनोत्युत्पादयति सर्वं जगत् स सविता तस्य’। जो सर्व जगाचा उत्पादक आणि सर्व ऐश्वर्य देणारा आहे, (देवस्य) ‘यो दीव्यति दीव्यते वा स देवः’। जो सर्व सुखे देणारा आहे आणि ज्याच्या प्राप्तची इच्छा सर्व करतात. परमेश्वराचे जे (वरेण्यम्) ‘वर्त्तुमर्हम्’ स्वीकार करण्यास योग्य अतिश्रेष्ठ (भर्गः) ‘शुद्धस्वरूपम्’ शुद्धस्वरूप आणि पवित्र करणारा चेतन ब्रह्मस्वरूप आहे (तत् ) त्याच परमेश्वराच्या स्वरूपाला आम्ही (धीमहि) ‘धरेमहि’ धारण करावे. कशासाठी? अशासाठी की (यः) जगदीश्वर' जो सविता देव परमेश्वर (नः) अस्माकम् आमच्या ‘बुद्धीः’ 'बुद्धी बुद्धींना (प्रचोदयात्) ‘प्रेरयेत्’ प्रेरणा करो. म्हणजे वाईट कृत्यांपासून सोडवून चांगली कामे करण्यास प्रवृत्त करो.
    ‘हे परमेश्वर! हे सच्चिदानन्दस्वरूप! हे नित्यशुद्धबुद्धमुक्तस्वभाव! हे अज निरञ्जन निर्विकार! हे सर्वान्तर्यामिन्! हे सर्वाधार जगत्पते सकलजगदुत्पादक! हे अनादे! विश्वम्भर सर्वव्यापिन्! हे करुणामृतवारिधे! सवितुर्देवस्य तव यदों भूर्भुवः स्वर्वरेण्यं भर्गोऽस्ति तद्वयं धीमहि दधीमहि ध्यायेम वा कस्मै प्रयोजना– येत्यत्रह। हे भगवन् ! यः सविता देवः परमेश्वरो भवान्नस्माकं धियः प्रचोदयात् स एवास्माकं पूज्य उपासनीय इष्टदेवो भवतु नातोऽन्यं भवत्तुल्यं भवतोऽधिकं च कञ्चित् कदाचिन्मन्यामहे।
    हे मनुष्यनो ! जो सर्व समर्थांमध्ये समर्थ, सच्चिदानन्दानन्तस्वरूप, नित्य शुद्ध, नित्य बुद्ध, नित्य मुक्त स्वभावी. कृपासागर, यथायोग्य न्याय करणारा, जन्ममरणादि क्लेशरहित, आकाररहित, सर्वांची अंत:करणे जाणणारा, सर्वांचा धर्ता (धारण करणारा) पिता, उत्पादक, अन्नादींनी विश्वाचे पोषण करणारा, सकल ऐश्वर्ययुक्त, जगाचा निर्माता, शुद्धस्वरूप असून प्राप्तची कामना करण्यास योग्य आहे; त्या परमेश्वराचे जे शुद्ध चेतनस्वरूप आहे तेच आम्ही धारण करावे. याचा उद्देश असा की आमचा आत्मा आणि बुद्धी यांचा अंतर्यामीस्वरूप असलेल्या त्या परमेश्वराने आम्हांला दुराचार व अधर्मयुक्त मार्गापासून दूर करून श्रेष्ठाचारी व सत्यमागनेि चालवावे. त्याला सोडून दुसऱ्या कोणत्याही वस्तूचे ध्यान आम्ही करू नये. कारण त्याच्या बरोबरीचा अथवा त्याच्याहून मोठा, असा कोणीही नाही. तोच आमचा पिता, राजा, न्यायाधीश व सर्व सुखे देणारा आहे.
   अशा प्रकारे गायत्री मंत्राचा उपदेश करून संध्योपासनाच्या क्रिया जे स्नान, आचमन, प्राणायाम वगैरे आहेत त्या शिकवाव्या. प्रथम स्नान अशासाठी की त्यायोगे शरीराच्या बाह्य अवयवांची शुद्धी होते आणि आरोग्य प्राप्त होते. याला आधार :-

अद्भिर्गात्रणि शुध्यन्ति मनः सत्येन शुध्यति। विद्यातपोभ्यां भूतात्मा बुद्धिर्ज्ञानेन शुध्यति।। मनू.अ.५ श्लो. १२१

    हा मनुस्मृतीतील श्लोक आहे. पाण्याने शरीराचे बाह्य अवयव, सत्याचरणाने मन, विद्येने आणि तपाने

म्हणजे सर्व प्रकारचे कष्ट देखील सहन करून धर्माचरण केल्याने जीवात्मा, ज्ञानाने म्हणजे पृथ्वीपासून परमेश्वरापर्यंतच्या सर्व पदार्थांच्या विवेकाद्वारे बुद्धी व दृढनिश्चय हे पवित्र बनतात. म्हणून जेवणापूर्वी स्नान अवश्य केले पाहिजे.

प्राणायाम दुसरा 'प्राणायाम' त्या बाबतीतील प्रमाण असे आहे :- प्राणायामादशुद्धिक्षये ज्ञानदीप्तिराविवेकख्यातेः।। योग्य.पा. २|सु.२

    हे योगशास्त्रातील सूत्र आहे. जेव्हा माणूस प्राणायाम करतो तेव्हा क्षणोक्षणी उत्तरोत्तर अशुद्धीचा नाश व ज्ञानाचा प्रकाश होत जातो. जो पर्यंत मुक्ती होत नाही तो पर्यंत त्याच्या आत्म्याचे ज्ञान सतत वाढत जाते.

दह्यन्ते ध्मायमानानां धातूनां च यथा मलाः। तथेन्द्रियाणां दह्यन्ते दोषाः प्राणस्य निग्रहात्।।मनू.या. ३| श्लो.७२

हा मनुस्मृतीत श्लोक आहे. ज्याप्रमाणे अग्नीत तापविल्याने सुवर्णवादी धातूंतील मळ नष्ट होऊन ते शुद्ध होतात त्या प्रमाणे प्राणायाम केल्याने मन आदी इंद्रियांचे दोष शिन होऊन ती निर्मल बनतात.


प्राणायामाचा विधि

प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य। योगसूत्र। पा. १. ३४

    ज्याप्रमाण अति वेगाने वमन झाल्यास पोटातील अन्न व पाणी बाहेर पडते त्याप्रमाणे प्राणाला वेगाने

बाहेर फेकून यथाशक्ती बाहेरच रोखून धरावे. जेव्हा बाहेर काढावयाचे असेल तेव्हा मुलेंद्रियाला वर ओढून वायू बाहेर फेकावा. जोपर्यंत मूलेंद्रियाला वर ओढून धरले जाते तो पर्यंत प्राण बाहेर राहतो. याच प्रमाणे प्राण जास्त वेळपर्यंत बाहेर राहू शकतो. जेव्हा गुदमरल्यासारखे होईल तेव्हा हळूहळू श्वास आत घ्यावा. परत हीच प्रक्रिया सामर्थ्य व इच्छा असेल तोपर्यंत करीत राहावे आणि त्याचवेळी मनातल्या मनात ओ३म् वा जप करीत राहिल्याने आत्मा व मन ह्यांची पवित्रता व स्थिरता होत असते.

    एक 'बाह्यविषय' म्हणजे प्राणाला बाहेरच जास्त वेळ रोखून धरणे, दुसरा आभ्यन्तर म्हणजे प्राणाला

आतच जितका वेळ रोखून धरता येईल तितका वेळ रोखून धरणे. तिसरी 'स्तम्भवृत्ति म्हणजे एकदाच जेथल्या तेथे प्राणाला यथाशक्ती रोखून धरणे. चौथा प्रकार बाह्याभ्यन्तराक्षेपी. म्हणजे प्राण आतून बाहेर जाऊ लागतो तेव्हा त्याच्या विरुद्ध त्याला बाहेरुन आत घ्यावे आणि तो बाहेरुन आत येऊ लागताच त्याला आतून धक्का मारून बाहेरच थोपवून धरावयाचे. अशा प्रकारे एकमेकांच्या विरुद्ध क्रिया केल्यास श्वास व उच्छवास यांची गती थांबून प्राण आपल्या स्वाधीन होतो. त्यायोगे मन व इंद्रिये ही आपल्या स्वाधीन राहतात. बळ व पुरुषार्थ वाढून बुद्धी तीव्र व सूक्ष्मरूप होत जाते त्यामुळे ती अत्यंत अवघड व सूक्ष्म विषयही चटकन ग्रहण करते. त्यायोगे माणसाच्या शरीरातील वीर्य संचय वाढतो आणि त्याला स्थिर बळ, पराक्रम व जितेंद्रियता प्राप्त झाल्याने तो थोड्याच काळात सर्व शास्त्र समजून प्रकट करण्यात प्रवीण होतो. अशाच प्रकारे स्त्रीनेही योगाभ्यास करावा. भोजन, कपडालत्ता, बसणे,उठणे, बोलणे, चालणे, लहानमोठ्यांशी योग्य प्रकारे वागणे या बाबतीत उपदेश करावा.

ब्रह्मयज्ञ

   संध्योपासनेला ब्रह्मयज्ञ असेही म्हणतात. तळहातावर 'आचमन' तेवढ्याच जलाने करावयाचे असते.

जेवढे पाणी एका घोटात घशातून हृदयापर्यंत जाऊन पोहोचेल तेवढे तळहातावर घेऊन तळव्याचे मूळ व मध्यभाग यांना ओठ लावून ते पाणी प्राशन करावे. त्याहून जास्त अथवा कमी पाणी घेऊ नये. त्यायोगे घशातील कफ व पित्त निवृत्ति थोडीफार होते. त्यानंतर 'मार्जन' म्हणजे मधले व करंगळीच्या जवळचे बोट (मध्यमा व अनामिका) यांच्या टोकांनी डोळे वगैरे अवयांवर पाणी शिंपडावे, त्याने आळस दूर होतो. आळस नसेल व पाणी नसेल तर मार्जन करू नये. त्यानंतर समंत्रक प्राणायाम, मनसापरिक्रमण, उपस्थान नंतर परमेश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना यांची रीत शिकवावी. मग ‘अघमर्षण’ म्हणजे पाप करण्याची इच्छादेखील कधीही मनात येऊ देऊ नये. ही संध्योपासना एकांत स्थळी एकाग्रचित्ताने करावी.

अपां समीपे नियतो नैत्यकं विधिमास्थितः। सावित्रीमप्यधीयीत गत्वारण्यं समाहितः।। मनु अ. २ श्लो. १०४

    हे मनुस्मृतीतील वचन आहे. अरण्यात म्हणजे एकांत ठिकाणी जाऊन, सावधान होऊन, जलाशया जवळ राहून सावित्री म्हणजे गायत्री मंत्राचा उच्चार अर्थ समजून आणि त्याप्रमाणे आपले आचरण ठेऊन नित्य कर्मे करावीत परंतु हे मनातून करणे उत्तम होय.

देवयज्ञ

    दुसरा देवयज्ञ. हा अग्निहोत्र आणि विद्वानांचा सत्संग व सेवा इत्यादींच्या द्वारे होतो. संध्या आणि अग्निहोत्र  सकाळी व संध्याकाळी असे दोनचवेळा करावे. दिवस व रात्र यांचे दोनच संधिकाळ असतात. इतर नाही. कमीत कमी एक तास ध्यान अवश्य करावे. ज्याप्रमाणे योगीजन समाधिस्थ होऊन परमेश्वराचे ध्यान करतात तशीच संध्योपासनाही करीत असावे. तसेच सूर्योदयानंतर आणि सूर्यास्ताच्या आधी, अग्निहोत्र करण्याची वेळ आहे. त्यासाठी धातूची किंवा मातीची वेदी बनवावी. ही वेदी वरच्या बाजूस १२ किंवा १६ अंगुळे चौकोनी व तितकीच खोल आणि तळाशी ३ किंवा ४ अंगुळे रुंद असावी. या प्रमाणात वेदी बनवावी. (१२ अंगुळे म्हणजे एकवीत) वरच्या बाजूस जेवढी सुंद असेल त्याच्या एक चतुर्थांश रुंदी तळाशी असावी. तिच्यामध्ये चंदन, पळस किंवा आंबा यांसारख्या श्रेष्ठ काष्ठांचे तुकडे वेदीच्या आकाराचे कापून रचावेत. त्यांच्यामध्यभागी अनी ठेवून पुनः त्यावर समिधा म्हणजे वर सांगितलेले लाकडाचे तुकडे रचावेत. त्यांच्या मध्यभागी अग्नी ठेवून पुनः त्यावर समिधा म्हणजे वर सांगितलेले लाकडाचे तुकडे रचावेत. एक प्रोक्षणीपात्र असे आणि तिसरे प्रणीतापात्र व तसेच एक अशा प्रकारची आज्यस्थाली म्हणजे तूप ठेवण्याचे भांडे व चमचा हे सोने, चांदी, अथवा लाकूड यांचा बनवून घ्यावा. प्रणीता व प्रोक्षणी पात्र पाणी ठेवण्यासाठी व हात धुण्यासाठी पाणी घेणे सुलभ व्हावे यांकरिता आहेत. नंतरते तूप नीट पाहून घ्यावे आणि पुढील मंत्रांनी होम करावाः

ओं भूरग्नये प्राणाय स्वाहा। भुवर्वायवेऽपानाय स्वाहा। स्वरादित्याय व्यानाय स्वाहा। भूर्भुवः स्वरग्निवाय्वादित्येभ्यः प्राणापानव्यानेभ्यः स्वाहा।।

इत्यादि अग्निहोत्राचा प्रत्येक मंत्र म्हणून एक-एक आहुती द्यावी.जास्त आहुत्या द्यावयाच्या असल्यास,

विश्वानि देव सवितर्दुरितानि परासवु । यद्भद्रं तन्न आ सवु ।। यजु. अ. ३० | मं . ३

हा मंत्र आणि पूर्वोक्त गायत्री मंत्र म्हणून आहुती द्यावी. 'ओं ' 'भू:' ' व 'प्राण' वगैरे सर्व परमेश्वराची नावे आहेत. त्यांचे अर्थ पूर्वी सांगितले आहेत. 'स्वाहा' या शब्दांचा अर्थ हा आहे की आत्म्यामध्ये जसे ज्ञान असेल तसेच वाणीने बोलावे. त्याहून वेगळे बोलू नये. ज्याप्रमाणे परमेश्वराने सर्व प्राण्यांच्या सुखासाठी या जगातील सर्व पदार्थ निर्माण केले आहेत त्याप्रमाणे माणसांनीही परोपकार केला पाहिजे.


होमाचे फळ

(प्रश्न) होमाने काय उपकार होतो? (उत्तर) सर्व लोक जाणतात की दुर्गंध युक्त वायु व पाणी यांपासून रोग होतात. रोगांमुळे प्राण्यांना दुःख होते. याउलट सुगंधित वायु व पाणी यांच्या पासून आरोग्य प्राप्त होते आणि रोग नष्ट झाल्याने सुख प्राप्त होत असते.

(प्रश्न) चंदन वगैरे घासून ते कुणाच्या अंगाला लावले अथवा तूपवगैरे खावयास दिले तर मोठा उपकार होईल. परंतु चंदन व तुप अग्नीत जाळून व्यर्थ नष्ट करणे ही काही शहाणपणाची गोष्ट नाही. (उत्तर) तुम्हांला पदार्थविज्ञानाचे ज्ञान असते तर तुम्ही असे कधीच बोलला नसता, कारण कोणत्याही दुव्याचा नाश होत नसतो. असे पाहा, जेथे होम होतो. तेथून दूर असणाऱ्या ठिकाणच्या पुरुषाचे नाक सुगंध ग्रहण करते. तसेच ते दुर्गधही ग्रहण करते. यावरून समजून घ्या की अग्नीत टाकलेला पदार्थ सूक्ष्म होऊन प्रसारीत होऊन वायुबरोबर दूरवर जाऊन दुर्गधाचा नाश करतो.

(प्रश्न)असे असेल तर केशर कस्तुरी, सुगंधी फुले, अत्तरे वगैरे घरात ठेवण्याने वायू सुगंधित होऊन सुखकारक होईल. (उत्तर) त्या सुगंधात ते सामथ्र्यं नसते. त्यामुळे घरातील दूषित वायु बाहेर काढून शुद्ध वायु आत घेणे शक्य होत नाही. कारण त्यामध्ये ती भेदक शक्ती नसते, ते सामर्थ्य अग्नीमध्ये असते. तो दूषित वायु व दुर्गंधयुक्त पदार्थ यांना छिन्नभिन्न व हलके बनवून बाहेर काढतो व पवित्र वायुला आत प्रविष्ठ करतो.

(प्रश्न) तर मग मंत्र म्हणून होम करण्याचे काय प्रयोजन ? (उत्तर) मंत्रांमध्ये जी वर्णने आहेत त्यांच्यावरून होमाचे फायदे कळतात आणि मंत्र वारंवार म्हटल्याने ते तोंडपाठ होतात शिवाय वेदग्रंथांचे पठण-पाठण व रक्षणही होते.

(प्रश्न) हा होम केला नाही तर पाप लागते काय? (उत्तर) होय, कारण ज्या माणसाच्या शरीरापासून जेवढा दुर्गंध उत्पन्न होऊन हवा व पाणी दूषित करून रोगांच्या उत्पत्तीचे निमित्त होऊन प्राण्यांना दुःख पोहचते, तेवढ्या प्रमाणात त्या माणसाला पाप लागते. म्हणून त्या पापाच्या निवारणार्थ तेवढा किंवा त्याहून अधिक सुगंध हवेत व पाण्यात पसरविला पाहिजे परंतु एखाद्या व्यक्तीला खाऊपिऊ घातल्याने फक्त तिलाच विशेष सुख मिळते. एक मनुष्य जेवढे तूप व सुगंधी पदार्थ यांचे सेवन करतो तेवढ्या द्रव्याच्या होमाने लाखो मनुष्यांवर उपकार होतो. अर्थात माणसांनी तूप वगैरे उत्तम पदार्थ खाल्ले नाहीत तर त्यांचे शरीर व आत्मा यांचे बळ वाढणार नाही. म्हणून उत्तमोत्तम पदार्थ खाणे व खाऊ घालणे हे ही इष्टच आहे. तरीपण होम करणे अधिक उचित व म्हणून अत्यावश्यक आहे.

(प्रश्न)प्रत्येक माणसाने किती आहुती द्यावी ? एका-एका आहुतीचे परिमाण काय असावे ? (उत्तर) प्रत्येक व्यक्तीने सोळा सोळा आहुत्या द्याव्यात. प्रत्येक आहुतीत सहा-सहामासे वजनाचे तूप असावे. आहुतीचे हे किमान परिमाण असून त्याहून जास्त केल्यास ते चांगलेच आहे. म्हणून आर्यवरशिरोमणी, महाशयऋषि, महर्षी, राजे, महाराजे हे पुष्कळ होम करीत व करवीत असत. जोपर्यंत या होमाचा प्रचार चालू होता तोपर्यंत या आर्यावर्त देशात रोगाचे नाव नव्हते आणि तो सर्व सुखांनी परिपूर्ण होता. अजूनही होम प्रचलित झाला तर तशी सुस्थिती येऊ शकेल. यज्ञाचे दोन प्रकार आहेत. पहिला ब्रह्मयज्ञ यामध्ये अध्ययन अध्यापन, संध्योपासन आणि ईश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना यांचा समावेश होतो. दुसरा देवयज्ञ यामध्ये अग्निहोत्रापासून अश्वमेधापर्यंतचे यज्ञ आणि विद्वानांची सेवा व सत्संग यांचा समावेश होतो. तरीपण ब्रह्मचर्याश्रमात केवळ ब्रह्मयज्ञ व अग्निहोत्रच करावयाचे असते.

ब्राह्मणस्त्रयाणां वर्णानामुपनयनं कर्तुमर्हति राजन्यो द्वयस्य वैश्यो वैश्यस्यैवेति। शूद्रमपि कुलगुणसम्पन्नं मन्त्रवर्जमनुपनीतमध्यापयेदित्येके।

हे सुश्रुताच्या सूत्रस्थानाच्या दुसऱ्या अध्यायातील वचन आहे. ब्राह्मण हे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन्ही वर्णांना, क्षत्रिय हा क्षत्रिय व वैश्य यांना आणि वैश्य हा केवळ वैश्य वर्णाच्या लोकांना मुंज करून शिकवू शकतो. जो कुलीन शुभ गुणयुक्त शुद्ध असेल तर त्यास मंत्रसंहिता सोडून सर्वशास्त्र शिकवावे. शुद्धाने अध्ययन करावे. परंतु त्याचे उपनयन करू नये असे हे मत पुष्कळ आचार्याचे आहे. नंतर शूद्राचे उपनयन आचार्यानि करून यथायोग्य शिकवावे.

    पाचव्या किंवा आठव्या वर्षापासून मुलांनी मुलांच्या शाळेत व मुलींनी मुलींच्या शाळेत जावे आणि

खाली दिलेल्या नियमानुसार अध्ययनास प्रारंभ करावा

ब्रह्मचार्याचा उपदेश

षट्त्रिशदाब्दिकं चर्य्यं गुरौ त्रैवैदिकं व्रतम्। तदिर्धकं पादिकं वा ग्रहणान्तिकमेव वा।। अनु, 3. श्लो. १

अर्थ : आठव्या वर्षापासून छत्तीसाव्या वर्षापर्यंत एकेका वेदाचे सांगोपांग अध्ययन करण्यास प्रत्येकी बारा बारा वर्षे लागतात असे मिळून छत्तीस अधिक आठ वर्षे बरोबर चव्वेचाळीस वर्षे किंवा अठरा वर्षे ब्रह्मचर्य व आधीची आठ मिळून सव्वीस वर्षे, किंवा नवव्या वर्षापासून अध्ययन पूर्ण होईपर्यंत ब्रह्मचर्य पाळावे.

पुरुषो वाव यज्ञस्तस्य यानि चतुर्विँ्शति वर्षाणि तत्प्रातःसवनं चतुर्विंश– त्यक्षरा गायत्री गायत्रं प्रातःसवनं तदस्य वसवोऽन्वायत्ताः प्राणा वाव वसव एते हीदँ् सर्वं वासयन्ति।।१।। छा. उ. प्रया.3। खंड १६। व.१

हे छांदोग्य उपनिषदातील वचन आहे. ब्रह्मचर्य तीन प्रकारचे असते. कनिष्ठ ब्रह्मचर्य: जो पुरुष अन्नरसमय देह आणि पुरि म्हणजे देहात शयन करणारा जीवात्मा आहे, जो यज्ञ म्हणजे अत्यंत शुभगुणांनी युक्त व सत्कर्तव्य करतो, त्याने वयाच्या २४ वर्षांपर्यंत जितेंद्रिय म्हणजे ब्रह्मचारी राहून वेदादि विद्या आणि सुशिक्षण ग्रहण करावे. आणि विवाह केल्यानंतरही त्याने लंपटपणा न केल्यास त्याच्या शरीरातील प्राण बलवान बनून सर्व शुभ गुणांचा वास करविणारे होतात॥१॥

तञ्चेदेतस्मिन् वयसि किञ्चिदुपतपेत्स ब्रूयात्प्राणा वसव इदं मे प्रातः– सवनं माध्यन्दिनँ् सवनमनुसन्तनुतेति माहं प्राणानां वसूनां मध्ये यज्ञो विलोप्सी– येत्युद्धैव तत एत्यगदो ह भवति।।२।। छा. उ. प्रया.3। खंड १६। व.२

आयुष्याच्या या प्रथम चरणात आचायनि त्याला विद्याभ्यासामध्ये गुंतवावे आणित्याला तसाच उपदेश करावा. ब्रह्मचार्यानेही असा निश्चय करावा की आयुष्याच्या या प्रथम अवस्थेत जर मी कडक ब्रह्मचर्य पाळीन तरच माझे शरीर आणि आत्मा दोन्ही निरोगी व बलवान बसतील आणि माझे प्राण शुभगुणांना धारण करणारे ठरतील. हे मनुष्यानो ! तुम्ही अशा प्रकारे सुखांचा विस्तार करा. जेणेकरून मी ब्रह्मचर्य नष्ट करू नये. २४ वर्षांनंतर मी गृहस्थाश्रमात प्रवेश करीन त्यावेळी मी नक्कीच रोगरहित असेन आणि माझे आयुष्य ७०-८० वर्षाचे असेल. ॥२॥


अथ यानि चतुश्चत्वारिँ्शद्वर्षाणि तन्माध्यन्दिनँ्सवनं चतुश्चत्वा– रिंशदक्षरा त्रिष्टुप् त्रैष्टुभं माध्यन्दिनँ्सवनं तदस्य रुद्रा अन्वायत्ताः प्राणा वाव रुद्रा एते हीदँ्सर्वं रोदयन्ति।।३।।छा. उ. प्रया.3। खंड १६। व.३

मध्यम ब्रह्मचर्य: जो मनुष्य ४४ वर्षांपर्यंत ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करतो त्याचे प्राण, इंद्रिये, अंत:करण व आत्मा बलिष्ठ बनून सर्व दुष्टांना रडविणारे व श्रेष्ठांचे पालन करणारे होतात॥३॥

तं चेदेतस्मिन्वयसि किञ्चिदुपतपेत्स ब्रूयात्प्राणा रुद्रा इदं मे माध्यन्दिनँ्– सवनं तृतीयसवनमनुसन्तनुतेति माहं प्राणाना रुद्राणां मध्ये यज्ञो विलोप्सी– येत्युद्धैव तत एत्यगदो ह भवति।।४।।छा. उ. प्रया.3। खंड १६। व.४

तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी या प्रथम वयात काही तपश्चर्या केली तर माझे हे रुद्ररूप प्राणयुक्त मध्यम ब्रह्मचर्य सिद्ध होईल. हे ब्रह्मचार्यानो! तुम्ही हे ब्रह्मचर्य वाढवा. ज्याप्रमाणे मी या ब्रह्मचर्याचा खंड न करता यज्ञस्वरूप बनतो आणि त्याच आचार्य कुलातून येतो व रोगरहित बनतो, जसा हा ब्रह्मचारी उत्तम कार्य करतो तसे तुम्ही करीत असावे. ॥४॥

अथ यान्यष्टाचत्वारिंशद्वर्षाणि तत्तृतीयसवनमष्टाचत्वारिँ्शदक्षरा जगती जागतं तृतीयसवनं तदस्यादित्या अन्वायत्ताः प्राणा वावादित्या एते हीदँ्सर्वमाददते।।५।।छा. उ. प्रया.3। खंड १६। व.५

उत्तम ब्रह्मचर्य: ४८ वर्षांपर्यंतचे तिसऱ्या प्रकारचे ब्रह्मचर्य होय. जसा ४८ अक्षरांचा जगती छंद आहे त्या प्रमाणे जो वयाच्या अठेचाळिस वर्षापर्यंत यथायोग्य ब्रह्मचर्याचे पालन करतो त्याचे प्राण अनुकूल बनून सर्व विद्यांचे ग्रहण करतात. ॥५॥

तं चेदेतस्मिन् वयसि किञ्चिदुपतपेत्स ब्रूयात् प्राणा आदित्या इदं मे तृतीयसवनमायुरनुसन्तनुतेति माहं प्राणानामादित्यानां मध्ये यज्ञो विलोप्सी– येत्युद्धैव तत एत्यगदो हैव भवति।।६।।छा. उ. प्रया.3। खंड १६। व.६


जे आचार्य आणि मातापिता आपल्या मुलांना प्रथम वयात विद्या व गुणग्रहण करण्यासाठी तपस्वी बनवितात व त्यांचाच उपदेश करतात; आणि जी मुले स्वयं अखंडित ब्रह्मचर्याचे पालनाने व तिसऱ्या उत्तम ब्रह्मचर्याचे सेवन करून पूर्ण म्हणजे चारशे वर्षांचे आयुष्य वाढवितात त्या प्रमाणे तुम्हीही आपले आयुष्य वाढवा. कारण जे लोक हे ब्रह्मचर्यं शाम केल्यावर त्याला खंडित करीत नाहीत ते सर्व प्रकारे निरोगी बनून धर्म, अर्थ, काम व मोक्ष प्राप्त करतात ।६।।


विवाहाचा काळ

चतस्रोऽवस्थाः शरीरस्य वृद्धिर्यौवनं सम्पूर्णता किञ्चित्परिहाणिश्चेति। आषोडशाद् वृद्धिः। आपञ्चविशतेर्यौवनम्। आचत्वारिशतः सम्पूर्णता। ततः किञ्चित्परिहाणिश्चेति।

पञ्चविशे ततो वर्षे पुमान् नारी तु षोडशे। समत्वागतवीर्यौ तौ जानीयात्कुशलो भिषक्।। सुश्रत सूत्रस्था० १-३५-१३ हे सुश्रुताच्या सूत्र स्थानातील वचन आहे. या शरीराच्या चार अवस्था आहेत, एक (वृद्धि). १६ व्या वर्षापासून २५व्या वर्षापर्यंत सर्व धातूंची वाढ होते. दुसरी (यौवन) २५ व्या वर्षाच्या अखेरपासून २६ व्या वर्षाच्या प्रारंभी युवावस्थेचा प्रारंभ होतो. तिसरी (संपूर्णता) २५ व्या वर्षापासून ४० व्या वर्षापर्यंत सर्व धातूंची पुष्टी होते. चौथी (किञ्चितपरिहाणि) जेव्हा संपूर्ण शरीरातील सांगोपांग सर्व धातू पुष्ट होऊन पूर्णत्वास प्राप्त होतात. त्यांनतर जो धातू वाढतो तो शरीरात राहत नाही. तो स्वप्नावस्था व घाम वगैरे द्वारे बाहेर निघून जातो. म्हणून ४० वे वर्ष ही विवाहासाठी उत्तम वेळ होय. तरी पण ४८ व्या वर्षी लग्न करणे हे उत्तमोत्तम होय.

(प्रश्न) हा ब्रह्मचर्याचा नियम स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समानपणे लागू होतो का? (उत्तर) नाही. पुरुष २५ व्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पाळतो तेव्हा कन्येने १६व्या वर्षापर्यंत ते पाळावे. पुरुष ३० व्या वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहिला तर स्त्रीने १७ व्या वर्षापर्यंत राहावे. पुरुष ३६ व्या वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहिला तर स्त्रीने १८ वर्षा पर्यंत. पुरुषाने ४० वर्षांपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन केले तर स्त्रीने २० वर्षांपर्यंत ते करावे, पुरुष ४४ वर्षांपर्यंत ब्रह्मचारी राहिला तर स्त्रीने २२ वर्षे ब्रह्मचारी राहावे. पुरुषाने ४८ वर्षे ब्रह्मचर्य पाळले तर स्त्रीने २४ वर्षे ब्रह्मचर्य पाळावे. ४८ वर्षाहून अधिक पुरुषाने आणि २४ वर्षांहून अधिक स्त्रीने ब्रह्मचर्याचे पालन करू नये. अर्थात ज्यांना लग्न करावयाचे आहे अशा स्त्रीपुरुषांसाठी हा नियम आहे. ज्यांना लग्न करावयाचे नसेल ते आमरण ब्रह्मचारी राहू शकत असतील तर त्यांनी खुशाल तसे राहावे. परंतु हे काम पूर्ण विद्या प्राप्त केलेल्या, जितेंद्रिय व निर्दोष योगी स्त्रीपुरुषांचे आहे. कामवासनेचा आवेग थोपवून धरून इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवणे हे अत्यंत अवघड काम आहे.

यम व नियम

ऋतं च स्वाध्यायप्रवचने च। सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। तपश्च स्वाध्यायप्रवचने च। दमश्च स्वाध्यायप्रवचने च। शमश्च स्वाध्यायप्रवचने च। अग्नयश्च स्वाध्यायप्रवचने च। अग्निहोत्रं च स्वाध्यायप्रवचने च। अतिथयश्च स्वाध्यायप्रवचने च। मानुषं च स्वाध्यायप्रवचने च। प्रजा च स्वाध्यायप्रवचने च। प्रजनश्च स्वाध्यायप्रवचने च। प्रजातिश्च स्वाध्यायप्रवचने च।

हे तैतिरीय उपनिषदातील वचन आहे. हे अध्ययन-अध्यापन करणाऱ्यांचे नियम आहेत. (ऋतं) यथार्थ आचरणाने शिकावे व शिकवावे. (सत्यं ) सत्याचरणाने सत्यविद्यांचे अध्ययन-अध्यापन करावे. (तपः) तपस्वी म्हणजे धर्मानुष्ठान करीत वेदादि शास्त्रे शिकावी व शिकवावीत(दमः ) बाह्य इंद्रियांना दुराचरणांपासून रोखून शिकावे व शिकवावे(शमः) मनाच्या वृत्तीला सर्व प्रकारच्या दोषांपासून अलिप्त ठेवून अध्ययन-अध्यापन करावे. (अग्नयः) आहवनीय अग्नी आणि विद्युत आदींची जाणून घेऊन शिकावे व शिकवावे. (अग्निहोत्र) अग्निहोत्र करीत अध्ययन-अध्यापन करावे. (अतिथयः) अतिथींची सेवा करीत शिकावे व शिकवावे. (मानुषं) मानवी व्यवहार यथायोग्य करीत शिकावे व शिकवावे. (प्रजा) संतान व राज्य यांचे पालन करीत अध्ययन अध्यापन करावे, (प्रजन) वीर्यांचे रक्षण व वृद्धी करीत शिकावे व शिकवावे. (प्रजातिः) आपली मुले व शिष्य यांचे पालन करीत अध्ययन-अध्यापन करावे.

यम पाच प्रकारचे आहेत

यमान् सेवेत सततं न नियमान् केवलान् बुधः। यमान्पतत्यकुर्वाणो नियमान् केवलान् भजन्॥ मनु. अ. ४। श्लो. २०४ तत्राहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमाः॥। योगसूत्र पा. २। सू. ३०

अर्थ : (अहिंसा) वैरत्याग, (सत्य), खरे मानणे, खरे बोलणे व खरे करणे, (अस्तेय) मन, वचन व कर्माद्वारे होणाऱ्या चोरीचा त्याग करणे. (ब्रह्मचर्य) जननेंद्रियाचा संयम आणि (अपरिग्रह) अत्यंत लोभ व लालसा न धरणे व स्वत्व-अभिमान रहित बनणे या पाच यमांचे अवलंबन नेहमी करावे. आता नियमांचे पालनकरणे, म्हणजे

शौचसन्तोषतपः स्वाध्यायेश्वर प्रणिधानानि नियमाः। योगसूत्र पा. २। सू. ३२

(शौच) म्हणजे स्नानादींनी पवित्रता, (सन्तोष) सम्यक प्रसन्न होऊन निरुद्यमी राहणे म्हणजे संतोष नव्हे तर होऊ शकेल तेवढा पुरुषार्थ करणे, हानी अथवा लाभ झाल्यास त्याबद्दल दु:ख किंवा आनंद न मानणे, (तप) म्हणजे कष्ट सहन करूनही धर्मयुक्त कृत्यांचे अनुष्ठान करणे, (स्वाध्याय) शिकणे व शिकविणे, (ईश्वरप्रणिधान) ईश्वराची विशेष भक्ती करून आत्म्याला समर्पित ठेवणे यांना पाच नियम म्हणतात. यमांखेरीज केवळ या नियमांचे पालन करू नये. यम व नियम या दोहोंचे पालन करावे. जो यमांचा त्याग करून फक्त नियमांचे पालन करतो त्याची उन्नती होत नाही, उलट त्याची अधोगती होते.

कामात्मता न प्रशस्ता न चैवेहास्त्यकामता। काम्यो हि वेदाधिगमः कर्मयोगश्च वैदिकः॥ मनु. अ. २ । श्लो. २

अर्थ : अत्यंत कामातुरता व निष्कामता कुणासही उत्तम नसते. कारण कामना (इच्छा) बाळगली नाही तर वेदांचे ज्ञान व वेदविहित कर्मादी उत्तम कामे कोणाकडूनही होणार नाहीत. म्हणून,

स्वाध्यायेन व्रतैर्होमैस्त्रैविद्येनेज्यया सुतैः। महायज्ञैश्च यज्ञैश्च ब्राह्मीयं क्रियते तनुः॥ मनु. ओ. २ । श्लो. २८

अर्थ : (स्वाध्याय) सर्व विद्यांचे अध्ययन-अध्यापन, (बुत) ब्रह्मचर्य, सत्य भाषण आदि नियमांचे पालन, (होम) अग्निहोत्रादी होम, सत्याचे ग्रहण, असत्याचा त्याग आणि सत्य विद्यांचे दान(त्रैविद्येन) वेदस्थ कर्मोपासना, ज्ञान व विद्या यांचे ग्रहण, (इज्यया) पाक्षिक इष्टादि(सुतैः) सुप्रजाजनन, (महायज्ञैः) ब्रह्म, देव, पितृ वैश्वदेव आणि अतिथी यांची सेवारूपी पंचमहायज्ञ आणि(यज्ञैः) अग्निष्टोमादी आणि शिल्पविद्याविज्ञानादि यज्ञांचे सेवन यांच्याद्वारे या शरीराला ब्राह्मी म्हणजे वेद व परमेश्वर यांच्या भक्तीचा आधार असणारे ब्राह्मणाचे शरीर बनवले जाते. या साधनांखेरीज ब्राह्मणशरीर बनू शकत नाही.

इन्द्रियाणां विचरतां विषयेष्वपहारिषु । संयमे यत्नमातिष्ठेद्विद्वान् यन्तेव वाजिनाम्।। मनु, अ . २ श्लो. ८८

अर्थ : ज्याप्रमाणे विद्वान सारथी घोड्यांना ताब्यात ठेवतो. त्याप्रमाणे मनाला व आत्म्याला असत्य, वाईट कामांमध्ये ओढणान्या विषयवासनांमध्ये विचरण करणाऱ्या इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सर्व प्रकारे करावा. कारण,

इन्द्रियाणां प्रसंगेन दोषम् ऋच्छत्यसंशयम् । सन्नियम्य तु तान्येव ततः सिद्धि नियच्छति।। मनु, अ . २ श्लो. ९३

अर्थ : जीवात्मा इंद्रियांच्या आधीन होऊन नकीच मोठमोठया दोषांना अंगीकारतो. परंतु जेव्हा तो इंद्रियांवर ताबा मिळवितो तेव्हाच त्याला सिद्ध प्राप्त होते.

वेदास्त्यागश्च यज्ञाश्च नियमाश्च तपांसि च। न विप्रदुष्टभावस्य सिद्धि गच्छन्ति कर्हिचित्।। मनु, अ . २ श्लो. ९७

जो दुराचारी अजितेंद्रिय पुरुष आहे. त्याची वेद, त्याग, यज्ञ,नियम, तप व इतर चांगली कामे कधीच सिद्धीस जात नाहीत

वेदोपकरणे चैव स्वाध्याये चैव नैत्यके। नानुरोधोऽस्त्यनध्याये होममन्त्रेषु चैव हि।।१।। मनु.अ२ श्लो. १०५

वेदांचे अध्ययन-अध्यापन, संध्योपासनादी पंचमहायज्ञ आणि होममंत्र यांमध्ये अनध्याय (सुटी) विषयक अनुरोध (आग्रह) नाही. ॥१॥

नैत्यके नास्त्यनध्यायो ब्रह्मसत्रं हि तत्स्मृतम्। ब्रह्माहुतिहुतं पुण्यम् अनध्यायवषट्कृतम्।।२।। मनु. अ . २ श्लो १०६

कारण नित्यकर्मांमध्ये अनध्याय नसतो. ज्याप्रमाणे श्वासोच्छवास सतत केला जातो, तो थांबविला जात नाही, त्याप्रमाणे नित्यकर्म दररोज केली पाहिजेत. एक दिवसही त्यांत खंड पडता कामा नये. कारण अनध्यास दिवशीही अग्निहोत्रादी उत्तम कर्म केल्याने पुण्य मिळते. ज्याप्रमाणे खोटे बोलणे हेनेहमीच पाप असते आणि खरे बोलण्यात सदा पुण्य असते त्याचप्रमाणे वाईट कृत्ये करण्यामध्ये नेहमी अनध्याय असतो आणि चांगली कृत्ये करण्यात सदैव स्वाध्यायच असतो. ॥२॥

अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः। चत्वारि तस्य वर्द्धन्त आयुर्विद्या यशो बलम्।। मनु. अ. २. श्लो. १२१

जो सदैव नम्र व सुशील असतो आणि विद्वान व वृद्ध यांची सेवा करतो त्याचे आयुष्य, विद्या, कीर्ती व बल या चार गोष्टी नेहमी वाढत राहतात. जो असे करीत नाही त्याच्या या चार गोष्टी वृद्धिंगत होत नाहीत.

अहिसयैव भूतानां कार्यं श्रेयोऽनुशासनम्। वाक् चैव मधुरा श्लक्ष्णा प्रयोज्या धर्ममिच्छता।।१।। मनु. अ. २ श्लो. १५९

विद्वान आणि विद्यार्थी यांना उचित आहे की त्यांनी वैरबुद्धी सोडून सर्व मानव कल्याणाच्या मार्गाचा उपदेश करावा; तसेच उपदेश करणार्याने नेहमी मधुर, सुशीतल वाणी बोलावी. धर्माची उन्नती इच्छिणाऱ्याने नेहमी सत्याचरण करावे आणि त्याचाच उपदेश करावा. ॥१॥

यस्य वाङ्मनसे शुद्धे सम्यग्गुप्ते च सर्वदा। स वै सर्वमवाप्नोति वेदान्तोपगतं फलम्।।२।। मनु, अ.२ श्लो. १६०

ज्या मनुष्याची वाणी आणि मग सदैव शुद्ध व सुरक्षित असते त्यालाच सर्व वेदान्त म्हणजे सर्व वेदांचे सिद्धांतरूपी फळ प्राप्त होते. ॥२॥

सम्मानाद् ब्राह्मणो नित्यमुद्विजेत विषादिव। अमृतस्येव चाकाङ्क्षेदवमानस्य सर्वदा।। अमनु, अ.२ श्लो.१६२

जो ब्राह्मण सन्मानाला विषाप्रमाणे सदा घाबरतो आणि अमृताप्रमाणे अपमानाची इच्छा बाळगतो तोच समग्र वेद व परमेश्वर यांना जाणतो.

अनेन क्रमयोगेन संस्कृतात्मा द्विजः शनैः। गुरौ वसन् सञ्चिनुयाद् ब्रह्माधिगमिकं तपः।।मनु, अ.२ श्लो.१६४

याचप्रमाणे ज्याचे उपनयन झाले आहे असा द्विज ब्रह्मचारी कुमार आणि ब्रह्मचारिणी कन्या यांनी हळू-हळू वेदार्थ ज्ञानरूपी उत्तम तप वाढवीत जावे.

योऽनधीत्य द्विजो वेदमन्यत्र कुरुते श्रमम्। स जीवन्नेव शूद्रत्वमाशु गच्छति सान्वयः।। मनु, अ.२ श्लो.. १६८

जो कोणी वेदांचे अध्ययन करण्याऐवजी दुसयाच गोष्टीसाठी श्रम करतो तो लवकरच आपल्या पुत्रपौत्रांसह शूद्रत्वास प्राप्त होतो.

ब्रह्मचार्याची विशेष कर्तव्ये

वर्जयेन्मधुमांसञ्च गन्धं माल्यं रसान् स्त्रियः। शुक्तानि यानि सर्वाणि प्राणिनां चैव हिसनम्।।१।। मनु, अ.२ श्लो.. १७७

ब्रह्मचारी आणि ब्रह्मचारिणी यांनी मद्य, मांस, गंध, माला, रस, स्त्री-पुरुषसंग, आंबट पदार्थ, प्राण्यांची हिंसा करणे सोडावे. ॥१॥

अभ्यंगमञ्जनं चाक्ष्णोरुपानच्छत्रधारणम्। कामं त्रफ़ोधं च लोभं च नर्त्तनं गीतवादनम्।।२।। मनु. अ. २। श्लो. १७८

अंगांचे मर्दन, विनाकारण जननेंद्रियाला स्पर्श, डोळ्यांत अंजन, पादत्राणे व छत्री यांचा वापर, काम

क्रोध, लोभ, मोह, भय, शोक, ईर्ष्या, द्वेष, नाच, गाणे व बजावणे सोडावे. ॥२॥


द्यूतं च जनवादं च परिवादं तथानृतम्। स्त्रीणां च प्रेक्षणालम्भमुपघातं परस्य च।।३।। मनु. अ. २। श्लो. १७९

जुगार, इतरांची चर्चा व निंदा मिथ्या भाषण, स्त्रियांचे दर्शन, आश्रय, इतरांचे नुकसान वगैरे कुकर्म कायमची सोडून द्यावीत. ॥३॥

एकः शयीत सर्वत्र न रेतः स्कन्दयेत्क्वचित्। कामाद्धि स्कन्दयन् रेतो हिनस्ति व्रतमात्मनः।।४।। मनु. अ. २। श्लो. १८०

नेहमी एकट्याने झोपावे कधीही वीर्यस्खलन करू नये; जो कोणी कामवासनेने वीर्यपात करील त्याने आपल्या ब्रह्मचर्यव्रताचा नाशच केला असे समजावे. ॥४॥



गुरूचा उपदेश

वेदमनूच्याचार्योऽन्तेवासिनमनुशास्ति। सत्यं वद। धर्मं चर। स्वाध्यायान्मा प्रमदः। आचार्य्याय प्रियं धनमाहृत्य प्रजातन्तुं मा व्यवच्छेत्सीः। सत्यान्न प्रमदितव्यम्। धर्मान्न प्रमदितव्यम्। कुशलान्न प्रमदितव्यम्। स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम्। देवपितृकार्य्याभ्यां न प्रमदितव्यम्।।१।। मातृदेवो भव। पितृदेवो भव। आचार्य्यदेवो भव। अतिथिदेवो भव। यान्यनवद्यानि कर्माणि तानि सेवितव्यानि नो इतराणि। यान्यस्माकँ् सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतराणि।।२।। ये के चास्मच्छ्रेयांसो ब्राह्मणास्तेषां त्वयासनेन प्रश्वसितव्यम्। श्रद्धया देयम्। अश्रद्धया देयम्। श्रिया देयम्। ह्रिया देयम्। भिया देयम्। संविदा देयम्।।३।। अथ यदि ते कर्मविचिकित्सा वा वृत्तविचिकित्सा वा स्यात् ये तत्र ब्राह्मणाः समदिर्शनो युक्ता अयुक्ता अलूक्षा धर्मकामाः स्युर्यथा ते तत्र वर्त्तेरन्। तथा तत्र वर्त्तेथाः।।४।। एष आदेश एष उपदेश एषा वेदोपनिषत्। एतदनुशासनम्। एवमुपासितव्यम्। एवमु चैतदुपास्यम्।।५।। तैति. उ, शिक्षा. अनु. ११


आचायनि आपल्या अंतेवासियांना म्हणजे शिष्य व शिष्या यांना असा उपदेश करावा की, तू नेहमी खरे बोल, धर्माचरण कर, प्रमादरहित बसून शीक व शिकव, पूर्ण ब्रह्मचारी राहून सर्व विद्यांचे ग्रहण कर, आचार्याला प्रिय धन देऊन विवाह करून प्रजोत्पादन कर, प्रमादाने सत्याला कधी सोडू नको, प्रमादाने धर्माचा त्याग करू नको. प्रमादाने आरोग्य व चातुर्य सोडू नको. प्रमादाने अध्ययन व अध्यापन कधी सोडू नको. देव, विद्वान आणि माता-पिता इत्यादींच्या सेवेत प्रमाद करू नको. विद्वानांप्रमाणेच माता, पिता, आचार्य व अतिथी यांची सदैव सेवा कर, सत्यभाषणादि जी आनंदित धर्मयुक्त कर्मे आहेत ती तू कर. त्याउलट मिथ्याभाषणादि कर्मे कधीही करू नको. आमची जी सुचरित्रे म्हणजे धर्मयुक्त कर्मे असतील त्यांचे ग्रहण कर, आमच्या पापाचरणाचे अनुकरण कधीही करू नको. आमच्या मध्ये जे कोणी उत्तम धर्मात्मा ब्राह्मण आहे, त्यांच्याजवळ बैस आणि त्यांच्यावरच विश्वास ठेव. श्रद्धेने द्यावे, अश्रद्धेने द्यावे, आपल्याला शोभेल असे द्यावे, लज्जेने द्यावे. भीतीने द्यावे आणि प्रतिज्ञेनेही द्यावे. जेव्हा कधी तुझ्या मनात कर्म, शील व उपासना ज्ञान यांच्या बाबतीत कसलाही संशय उत्पन्न होईल तेव्हा समदर्शी, पक्षपातरहित योगी-अयोगी, आर्द्रचित्त, धर्माची कामना करणारे, धर्मात्मे जसे धर्ममार्गावरून चालत असतील तसाच तूही वाग. हाच आदेश, हाच उपदेश, हीच वेद उपनिषदांची शिकवण आहे. याप्रमाणेच वागले पाहिजे आणि आपले आचरण सुधारले पाहिजे.


अकामस्य क्रिया काचिद् दृश्यते नेह कर्हिचित्। यद्यद्धि कुरुते किञ्चित् तत्तत्कामस्य चेष्टितम्।। मनु. अ.२। श्लो.४

माणसांनी निश्चय केला पाहिजे की, निष्काम पुरुषामध्ये नेत्रांचा संकोच व विकास होणे सुद्धा सर्वथैव । असंभव आहे. यावरून असे सिद्ध होते की जे कोणी जे जे काही करतो ते ते प्रयत्न व कामना यांच्या विरहित नसते.

आचारः परमो धर्मः श्रुत्युक्तः स्मार्त्त एव च। तस्मादस्मिन्सदा युक्तो नित्यं स्यादात्मवान् द्विजः।।१।। मनु. अ.१। श्लो.१०८

सांगणे, ऐकणे, ऐकविणे, शिकणे, शिकविणे यांचा निष्कर्ष हाच की वेद आणि वेदानुकूल स्मृती यांमध्ये प्रतिपादन केलेल्या धर्माचे आचरण करावे. म्हणून सदैव धर्माचरण करीत राहावे. ॥१॥

आचाराद्विच्युतो विप्रो न वेदफलमश्नुते। आचारेण तु संयुक्तः सम्पूर्णफलभाग्भवेत्।।२।। मनु. अ. १। श्लो. १०९

कारण जो धमचरण रहित असतो त्याला वेदप्रतिपादित धर्मजन्य सुखरूपी फळप्राप्त होऊ शकत नाही; आणि जो विद्या शिकून धर्माचरण करतो त्यालाच संपूर्ण सुख प्राप्त होते॥२॥

योऽवमन्येत ते मूले हेतुशास्त्रश्रयाद् द्विजः। स साधुभिर्बहिष्कार्यो नास्तिको वेदनिन्दकः।।१।। मनु . अ. २। श्लो. २१

जो वेद आणि वेदानुकूल आप्त पुरुषांनी रचलेली शास्त्रे यांचा अपमान करतो त्या वेदनिंदक नास्तिकाला जाति, पांति व देश यांतून बहिष्कृत केले पाहिजे. कारण,

श्रुतिः स्मृतिः सदाचारः स्वस्य च प्रियमात्मनः। एतच्चतुर्विधं प्राहुः साक्षाद्धर्मस्य लक्षणम्।। मनु अ. २ श्लो. १२

श्रुती वेद, स्मृती वेदानुकूल आप्तोक्त मनुस्मृती आदि शास्त्रे, सत्पुरुषांचे आचरण म्हणजे सनातन वेदांद्वारे परमेश्वर प्रतिपादित कर्मे आणि आपल्या आत्म्याला प्रिय ज्याची आत्मा इच्छा करतो जसे सत्य भाषण धर्माची चार लक्षणे आहेत. म्हणजे त्यावरूनच धर्म व अधर्म यांचा निर्णय होतो. पक्षपातरहित न्याय व सत्य यांचे ग्रहण करणारे आणि असत्याचा संपूर्ण त्याग करणारे जे आचरण त्याचेच नाव धर्म असून त्याच्या उलट असणारे पक्षपात सहित अन्यायाचरण, सत्याचा त्याग व असत्याचे ग्रहण करणारे जे कर्म त्यालाच अधर्म असे म्हणतात

अर्थकामेष्वसक्तानां धर्मज्ञानं विधीयते। धर्मं जिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुतिः।। मनु.अ. २. श्लो. १३

जे पुरुष (अर्थ) सुवर्णादि रत्ने आणि (काम) स्त्रीसंग आदिमध्ये आसक्त नाहीत त्यांनाच धर्माचे ज्ञान प्राप्त होते. जे धर्मज्ञानाची इच्छा बाळगतात त्यांनी वेदांद्वारे धर्माचा निर्णय करावा. कारण धर्म आणि अधर्म यांचा निर्णय वेदांशिवाय नीट होत नाही.

चारही वर्णास शिक्षणाची आवश्यकता

अशा प्रकारे आचार्यानेि आपल्या शिष्यांना उपदेश करावा. विशेषत: राजा, इतर क्षत्रिय, वैश्य आणि उत्तम शूद्र यांच्याकडूनही त्याने विद्याभ्यास अवश्य करवून घ्यावा. कारण फक्त ब्राह्मणांनीच विद्याभ्यास केला आणि क्षत्रियादी मंडळींनी तो केला नाही तर विद्या, धर्म, राज्य, व धन यांची वृद्धी कधीही होऊ शकत नाही. कारण ब्राह्मण केवळ अध्ययन-अध्यापनाने आणि क्षत्रियादिकांकडून उपजीविकेचे साधन मिळवू शकतात. उदर निर्वाहाचे आधिन आणि क्षत्रियादिकांना आज्ञा देण्याचे व यथावत परीक्षा करून त्यांना शिक्षा देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे ब्राह्मणादी सर्व वर्ण पाखंडात फसतात; आणि जेव्हा क्षत्रियादी विद्वान बनतात तेव्हा ब्राह्मणही अधिक विद्याभ्यास करतात व धर्माच्या मागनेि चालतात. शिवाय त्या क्षत्रियादी विद्वानांनसमोर ते पाखंड व खोटेपणाही करू शकत नाहीत. जेव्हा क्षत्रियादी अविद्वान असतात तेव्हा ब्राह्मण आपल्या मनाप्रमाणे वागतात व मनात येईल तसे करतात व करायला लावतात. म्हणून आपले कल्याण व्हावे असे ब्राह्मणांना वाटत असेल तर त्यांनी क्षत्रियादिकांना वेदादी सत्यशास्त्रांचा अभ्यास करावयास लावण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. कारण क्षत्रियादी लोकच विद्या, धर्म, राज्य आणि लक्ष्मी यांची वृद्धी करणारे असतात. ते कधी भिक्षांदेही करीत नाहीत. त्यामुळे ते विद्याव्यवहाराच्या बाबतीत पक्षपातीही होऊ शकत नाहीत आणि जेव्हा सर्व वणांमध्ये विद्येचा व सुशिक्षणाचा प्रचार झालेला असतो तेव्हा कोणालाही पाखंडरुपी, अधर्मयुक्त मिथ्या व्यवहार चालविणे शक्य नसते. यावरून असे सिद्ध होते की क्षत्रियादिकांना नियमानुसार चालविणारे ब्राह्मण व संन्यासी असतात तर ब्राह्मण व संन्यासी यांना सुनियमानुसार चालविणारे क्षत्रियादि असतात. म्हणून सर्व वर्णाच्या स्त्रीपुरुषांमध्ये विद्या व धर्म यांचा प्रचार अवश्य झाला पाहिजे

सत्यासत्याची पंचविध परीक्षा

आता जे काही अध्ययन-अध्यापन होत आहे ते चांगल्या प्रकारे परीक्षा करून होणे योग्य होईल. परीक्षा पाच प्रकारांनी होत असते. १) जे-जे ईश्वराचे गुण, कर्म, स्वभाव आणि वेदांना अनुकूल असेल ते-ते सत्य असून त्याच्या विरुद्ध असत्य आहे. २) जे-जे सृष्टिक्रमाला अनुकूल असेल ते-ते सत्य आहे; आणि जे जे सुष्टिक्रमाच्या विरुद्ध आहे ते सर्व असत्य आहे जसे कोणी म्हटले-माता पिता संयोगाशिवाय पुत्र उत्पन्न झाला हे कथन सृष्टिक्रम विरूध्द असल्याने सर्वथा असत्य आहे

३) 'आप्त' म्हणजे धार्मिक विद्वान, सत्यवादी, निष्कपटी यांचा सत्संग व उपदेश यांच्याशी जे काही अनुकूल असेल ते सारे ग्राह्य व प्रतिकूल असणारे ते त्याज्य आहे. ४) आपल्या आत्म्याचे पावित्र्य व विद्या यांना अनुकूल जसे मला सुख प्रिय असते व दुःख अप्रिय असते, तसेच सर्वत्र मानले पाहिजे. म्हणून मी कोणाला दु:ख अथवा सुख दिल्यास ती दुःखी अथवा आनंदी होईल असे समजावे. ५) प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, ऐतिह्य, अर्थापत्ति, संभव आणि अभाव या आठ प्रमाणांपैकी प्रत्यक्ष प्रमाणाच्या लक्षणादींची जी सूत्रे आम्ही खाली दिली आहेत ती सर्व न्यायशास्त्राच्या प्रथम व द्वितीय अध्यायांतील समजावीत.

अष्टविध प्रमाणाची व्याख्या

इन्द्रियार्थसन्निकर्षोत्पन्नं ज्ञानमव्यपदेश्यमव्यभिचारिव्यवसायात्मकं प्रत्यक्षम्। -न्याय० अध्याय १। आह्निक १। सूत्र ४।।

प्रत्यक्ष प्रमाणः- श्रोत्र, त्वचा, चक्षु जिह्वा व प्राण यांचा शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध यांच्याशी जो अव्यवहित म्हणजे आवरणरहित संबंध असतो आणि इंद्रियांशी मनाचा व मनाशी आत्म्याचा संयोग होऊन जे ज्ञान उत्पन्न होते. त्याला प्रत्यक्ष (ज्ञान) म्हणतात परंतु जे व्यपदेश्य म्हणजे संज्ञासंज्ञीच्या संबंधातून उत्पन्न होते ते ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान नव्हे उदाहरणार्थ, एकाने दुसऱ्याला सांगितले की, पाणी घेऊन ये. त्याप्रमाणे तो पाणी आणून त्याच्या जवळ ठेवून म्हणाला की, 'हे पाणी आहे', परंतु तेथे पाणी' या दोन अक्षरांची संज्ञा आणणारा किंवा मागविणारा पाहू शकत नाही. परंतु ज्या पदार्थाचे नाव पाणी असे आहे तोच प्रत्यक्ष असतो. अशाप्रकारे शब्दापासून जे ज्ञान उत्पन्न होते तो शब्द प्रमाणाचा विषय आहे. 'अव्यभिचारी' म्हणजे काय ? एखाद्याने रात्रीच्या वेळी खांब पाहून तो पुरुष आहे असे गृहीत धरले; परंतु दिवसा तो खांब पाहिल्यावर रात्रीचे पुरुषज्ञान नष्ट होऊन स्तंभज्ञान झाले. अशा विनाशी ज्ञानाला व्यभिचारी म्हणतात. प्रत्यक्ष ज्ञान असे नसते म्हणून त्याला 'अव्यभिचारी' असे म्हणतात व्यवसायात्मकः कोणी तरी दुरून नदीतील वाळू पाहून म्हणाला, तेथे वस्त्रे वळत घातली आहेत की पाणी आहे की आणखी काही आहे’ किंवा ’तो देवदत्त उभा आहे की यज्ञदत्त ?' याचा अर्थ असा की जो पर्यंत नक्की काही सांगता येत नाही तोपर्यंत ते प्रत्यक्ष ज्ञान नसते. मात्र जे ज्ञान अव्यपदेश्य, अव्यभिचारी व निश्चयात्मक ज्ञान असते त्यालाच प्रत्यक्ष ज्ञान असे म्हणतात.

दुसरे अनुमान :

अथ तत्पूर्वकं त्रिविधमनुमानं पूर्ववच्छेषवत्सामान्यतो दृष्टञ्च।। -न्याय० अ० १। आ० १। सू० ५।।

    प्रत्यक्ष पूर्वक अप्रत्यक्षाचे ज्ञान म्हणजे अनुमान. एखाद्या पदार्थाचा एक देश (अवयव) अथवा संपूर्ण पदार्थ एखाद्या ठिकाणी अथवा कोणत्याही काळी प्रत्यक्ष दिसला असेल तर त्यावरून दूरस्थ सहचारी एके ठिकाणी प्रत्यक्ष झाल्याने अदृष्ट अवयवीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याला अनुमान असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलाला पाहून त्याच्या पित्याचे, पर्वतादी ठिकाणी धूर पाहून अग्नीचे आणि जगातील सुखदुःखे पाहून पूर्वजन्माचे ज्ञान होते हे अनुमान तीन प्रकारचे असते.


१) 'पूर्ववतः कारणाला पाहून जेथे कार्याचे ज्ञान होते ते पूर्ववत् अनुमान होय. उदाहरणार्थ, ढग पाहून पाऊस, विवाह पाहून संतती होणार आणि विद्याभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहून त्यांस विद्या मिळणार असा निश्चय होतो. २) 'शेषवत: म्हणजे जेथे कार्य पाहून कारणाचे ज्ञान होते. उदाहरणार्थ,नदीचे पाणी वाढलेले पाहून वरच्या बाजूला पाऊस पडला असावा, मुलाला पाहून त्याला बाप असला पाहिजे, सृष्टीला पाहून तिचे अनादी कारण व कर्ता परमेश्वर असला पाहिजे आणि पाप-पुण्याचे आचरण पाहून ते सुख दु:खाचे कारण असले पाहिजे, असे ज्ञान होणे यालाच 'शेषवत' अनुमान म्हणतात. ३) ‘सामान्यतोदुष्ट: जेथे दोन गोष्टींमध्ये कार्यकारणभाव नसतो, परंतु एखाद्या प्रकारचे एकदुसऱ्याशी साधर्म्य मात्र असते त्याला 'सामान्यतो दुष्ट' अनुमान असे म्हणतात. उदाहरणार्थ, कोणीही चालल्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. यावरुन दुसऱ्याचेही स्थानांतर चालल्या शिवाय होऊ शकत नाही. म्हणून स्थलांतरावरून गमनाचे अनुमान काढता येते. अनुमान या शब्दाचा अर्थ हाच आहे की, अनु अर्थात प्रत्यक्षस्य पश्चान्मीयते ज्ञायते येन तदनुमानम्' म्हणजे जे प्रत्यक्षाच्या नंतर उत्पन्न होते ते अनुमान. उदाहरणार्थ, प्रत्यक्ष धूर पाहिल्याखेरीज अदृष्ट अग्नीचे ज्ञान कधीच होऊ शकत नाही.

तिसरे उपमान

प्रसिद्धसाधर्म्यात्साध्यसाधनमुपमानम्।। -न्याय० अ० १। आ० १। सू० ६।।

प्रसिद्ध अशा प्रत्यक्ष पदार्थाच्या साधर्म्याने साध्य म्हणजे सिद्ध करण्यास योग्य ज्ञानाची सिद्धी करण्याचे जे साधन त्याला उपमान म्हणतात. 'उपमीयते येन तदुपमानम् उदाहरणार्थ, एखाद्याने आपल्या नोकराला सांगितले की, 'देवदत्तासारख्या विष्णुमित्राला बोलावून आण' त्यावर तो नोकर म्हणाला, 'मी त्याला कधी पाहिलेलं नाही' तेव्हा त्याच्या मालकाने त्याला सांगितले, "जसा हा देवदत्त आहे तसाच तो विष्णुमित्र आहे." त्याप्रमाणे जेव्हा तो तेथे गेला आणि देवदत्तासारखा दिसणारा इसम पाहुन तोच विष्णुमित्र आहे हे त्याने ओळखले; व तो त्याला घेऊन आला. असेच आणखी एक उदाहरण 'जशी ही गाय आहे तशीच जंगलातली नीलगाय असते. असे सांगितल्यावर जंगलामध्ये गायीसारखे दिसणारे जनावर पाहून निश्चय केला की हीच नीलगाय होय,याचे ज्ञान होते.

चौथे शब्द प्रमाणः आप्तोपदेशः शब्दः।। -न्याय० अ० १। आ० १। सू० ७।।

जो आप्त म्हणजे पूर्ण विद्वान, धर्मात्मा, परोपकार प्रिय, सत्यवादी, पुरुषार्थी, जितेंद्रिय पुरुष असतो. ज्याने आपल्या आत्म्यामधील ज्ञान व त्यायोगे मिळणारे सुख प्राप्त केले आहे व आत्म्याच्याच कथनाच्या इच्छेने प्रेरित होऊन जो सर्व मानवांच्या कल्याणासाठी उपदेश करतो, म्हणजे ज्याला पृथ्वीपासून परमेश्वरापर्यंत असणाऱ्या सर्व पदार्थाचे ज्ञान झालेले असल्याने तो उपदेष्टा बनलेला असतो. असा पुरुष आणि पूर्ण आप्त परमेश्वर याचा उपदेश वेद आहेत. म्हणून वेदांचे शब्दप्रामाण्य मान्य करावे.

पाचवे ऐतिह्य प्रमाण

न चतुष्ट्वमैतिह्यार्थापत्तिसम्भवाभावप्रामाण्यात्।। -न्याय० अ० २। आ० २। सू० १।।


इति ह म्हणजे ‘अशा प्रकारचा होता' किंवा 'त्याने अस केले' म्हणजे एखाद्याच्या जीवनचरित्राला ऐतिह्य म्हणतात,

सहावे अर्थापत्ति प्रमाण: ‘अर्थादापद्यते सा अर्थापत्तिः केनचिदुच्यते ’सत्सु घनेषु वृष्टिः’ सति कारणे कार्य्यं भवतीति किमत्र प्रसज्यते, असत्सु घनेषु वृष्टिसति कारणे च कार्य्यं न भवति. जसे कोणी कोणाला तरी सांगितले की, 'ढग असले म्हणजे पाऊस, आणि कारण असले की कार्य उत्पन्न होते.' यावरून न सांगताही दुसरी गोष्ट सिद्ध होते की ढगांशिवाय पाऊस पडत नाही व कारणाशिवाय कार्य कधीही घडत नाही. याला अर्थापत्ति असे म्हणतात

सातवे संभव प्रमाण : ‘सम्भवति यस्मिन् स सम्भवः सृष्टि क्रमानुसार संभवते (घडते) ते 'संभव प्रमाण' होय. कोणी असे म्हटले की, 'आई बापांशिवाय मूल जन्मले, मेलेल्यास जिवंत केले, डोंगर उचलले, समुद्रावर दगड तरंगविले, चंद्राचे तुकडे केले, परमेश्वराचा अवतार झाला, माणसाला शिंगे फुटली आणि वांझेच्या मुला-मुलीचे लग्न केले वगैरे' पण या सर्व गोष्टी असंभव (अशक्य) आहेत. कारण त्या सृष्टिक्रमाच्या विरुद्ध आहेत. जी गोष्ट सृष्टिक्रमाच्या अनुकूल असेल तीच संभव मानावी.

आठवे अभाव प्रमाण : ‘न भवति यस्मिन् सोऽभावः' कोणी कोणाला सांगितले की, 'हत्ती घेऊन ये. तेव्हा तेथे हत्तीचा अभाव पाहून जेथे हत्ती होता तेथून तो घेऊन आला.अशी ही आठ प्रमाणे आहेत. यापैकी जर कोणी शब्द प्रमाणात ऐतिह्याचा आणि अनुमानामध्ये अर्थापत्ती, संभव व अभाव यांचा अंतर्भाव केला तर चार प्रमाणे उरतात. या पाच प्रकारच्या परीक्षांनी मनुष्य सत्यासत्याचा निर्णय करू शकतो. अन्यथा नाही.

षटतत्त्वांचे ज्ञान

धर्मविशेषप्रसूताद् द्रव्यगुणकर्मसामान्यविशेषसमवायानां पदार्थानां साधर्म्यवैधर्म्याभ्यां तत्त्वज्ञानान्निःश्रेयसम्।। -वै० अ० १। आ० १। सू० ४।।

जेव्हा मनुष्य धर्माचे यथायोग्य अनुष्ठान केल्याने पवित्र होतो आणि साधर्म्य वैधर्म्य यांच्या योगाने द्रव्य, गुण, कर्म सामान्य, विशेष, व समवाय या सहा तत्वांचे ज्ञान (तत्वज्ञान) म्हणजे स्वरूपज्ञान मिळवितो तेव्हा त्याला "नि:श्रेयसम्' म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. साधर्म्य म्हणजे समान धर्म असणे आणि वैधर्म्य म्हणजे विरुद्ध धर्म असणे. पृथ्वी आणि जल यांमध्ये जडत्व (अचेतनत्व) हे साधर्म्य आहे. तर पृथ्वी कठोर व जल कोमल असल्याने त्यांच्यात त्या बाबतीत वैधर्म्य आहे. या सहा तत्त्वांचे स्पष्टीकरण पुढे दिले आहे

द्रव्यांची गणना

पृथिव्यापस्तेजोवायुराकाशं कालो दिगात्मा मन इति द्रव्याणि।। -वै० अ० १। आ० १। सू० ५।।

पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा, मन ही नऊ द्रव्ये आहेत.


क्रियागुणवत्समवायिकारणमिति द्रव्यलक्षणम्।।-वै० अ० १। आ० १। सू० १५।।

‘क्रियाश्च गुणाश्च विद्यन्ते यस्मिंस्तत् क्रियागुणवत्’ ज्यामध्ये क्रिया व गुण आणि केवळ गुणही असतात त्याला द्रव्य म्हणतात त्यांपैकी पृथ्वी, जल, तेज, वायु, मन आणि आत्मा ही सहा द्रव्ये क्रिया व गुण असणारी आहेत. तर आकाश, काळ व दिशा ही तीन द्रव्ये क्रियारहित गुण असणारी आहेत. (समवायि) ‘समवेतुं’ शीलं यस्य तत् समवायि प्राग्वृत्तित्वं कारणं समवायि च तत्कारणं च समवायिकारणम् ।’ ‘लक्ष्यते येन तल्लक्षणम्’ जो मिसळण्याचा स्वभावयुक्त कार्यानि कारण पूर्व कालस्थ असतो त्यालाच द्रव्य म्हणतात त्याच्या योगे लक्ष्य जाणले जाते त्याला लक्षण असे म्हणतात. जसे, नेत्राने रूपाचे ग्रहन होते ते लक्षण आहेया नऊ द्रव्यांची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत:

रूपरसगन्धस्पर्शवती पृथिवी।। -वै० अ० २। आ० १। सू० १।।

रूप, रस, गंध व स्पर्श हे पृथ्वीचे गुण आहेत. यांतील रूप, रस, आणि स्पर्श हे गुण अग्नि, जल आणि वायू यांच्या योगाने आलेले आहेत.

व्यवस्थितः पृथिव्यां गन्धः।। -वै० अ० २। आ० २। सू० २।।

पृथ्वीमध्ये गंध हा स्वाभाविक गुण आहे. त्याचप्रमाणे जलामध्ये रस, अग्निमध्ये रूप, वायूमध्ये स्पर्श, आकाशामध्ये शब्द हे स्वाभाविक गुण आहेत.

रूपरसस्पर्शवत्य आपो द्रवाः स्निग्धाः।। -वै० अ० २। आ० १। सू० २।।

रूप, रस आणि स्पर्श द्रवरूप व कोमल हे गुण ज्यात आहे त्याला जल असे म्हणतात. मात्र यामध्ये जलाचा स्वाभाविक गुण सहा आहे, आणि रूप व स्पर्श हे गुण अग्नि व वायु यांच्या योगाने आले आहेत.

अप्सु शीतता।। -वै० अ० २। आ० १। सू० ५।।

पाण्यात शीतलता हा ही त्याचा स्वाभाविक गुण आहे

तेजो रूपस्पर्शवत्।। -वै० अ० २। आ० १। सू० ३।।

रूप व स्पर्श हे तेजाचे गुण आहेत. मात्र त्यातील रूप से स्वाभाविक असून स्पर्श हा गुण वायूमुळे आलेला आहे

स्पर्शवान् वायुः।। -वै० अ० २। आ० १। सू० ४।।

स्पर्श हा वायुचा गुणआहे परंतु त्यातही उष्णता व शीतलता हे गुण तेज व जल यांच्या योगाने असतात.

त आकाशे न विद्यन्ते।। -वै० अ० २। आ० १। सू० ५।।

रूप, रस, गंध व स्पर्श हे गुण आकाशात नाहीत. परंतु शब्द हाच आकाशाचा गुण होय.

निष्क्रमणं प्रवेशनमित्याकाशस्य लिंगम्।। -वै० अ० २। आ० १। सू० २०।।

ज्यात प्रवेश व निर्गमन होते ते आकाशाचे लिंग आहे.

कार्य्यान्तराप्रादुर्भावाच्च शब्दः स्पर्शवतामगुणः।। -वै० अ० २। आ० १। सू० २५।।


इतर पृथ्वी आदिकांच्या कार्याने शब्द हा गुण प्रकट होत नाही. तसेच स्पर्श गुण असणाच्या भूमी आदींचा शब्द हा गुण नाही, परंतु शब्द हा आकाशाचाच गुण आहे.


अपरस्मिन्नपरं युगपच्चिरं क्षिप्रमिति काललिंगानि।।-वै० अ० २। आ० २। सू० ६।।

ज्यामध्ये अपर, पर, (युगपत्) एकवार, (चिरम्) विलंब ,(क्षिप्रम्) शीघ्र इत्यादी प्रयोग होतात त्याला काळ असे म्हणतात.

नित्येष्वभावादनित्येषु भावात्कारणे कालाख्येति।।-वै० अ० २। आ० २। सू० ९।।

जो नित्य पदार्थामध्ये नसतो आणि अनित्य पदार्थात असतो, म्हणून कारणातच काळ असे नाव आहे

इत इदमिति यतस्तद्दिश्यं लिंगम्।। -वै० अ० २। आ० २। सू० १०।।

येथून ही पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर, वर, खाली असे जिच्यामध्ये व्यवहार होत असतो. तिला डिश म्हणतात.

आदित्यसंयोगाद् भूतपूर्वाद् भविष्यतो भूताच्च प्राची।।-वै० अ० २। आ० २। सू० १४।।

ज्या दिशेला प्रथम सूर्याचा संयोग आहे, होता व होणार तिला पूर्व असे म्हणतात. ज्या बाजूला सूर्यास्त होतो तिला पश्चिम म्हणतात. पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले असता उजव्या बाजूची दक्षिण व डाव्या बाजूची उत्तर दिशा म्हटली जाते

एतेन दिगन्तरालानि व्याख्यातानि।। -वै० अ० २। आ० २। सू० १६।।

पूर्व व दक्षिण यांमधील दिशेला आग्नेय, दक्षिण व पश्चिम यांमधील दिशेला नैऋत्य, पश्चिम व उत्तर यांमधील दिशेला वायव्य आणि उत्तर व पूर्व यांमधील दिशेला ईशान्य असे म्हणतात.

इच्छाद्वेषप्रयत्नसुखदुःखज्ञानान्यात्मनो लिंगमिति।।-न्याय० अ० १। आ० १। सू० १०।।

ज्याच्यामध्ये (इच्छा) प्रीती, (द्वेष) वैर,(प्रयत्न) पुरुषार्थ, सुख, दुःख व (ज्ञान) जाणीव हे गुण असतात तो जीवात्मा होय. वैशेषिकामध्ये एवढा विशेष आहे.

प्राणाऽपाननिमेषोन्मेषजीवनमनोगतीन्द्रियान्तिर्वकाराः सुखदुःखेच्छा– द्वेषप्रयत्नाश्चात्मनो लिंगानि।। -वै० अ० ३। आ० २। सू० ४।।

(प्राण) आतील वायू बाहेर टाकणे (अपान) बाहेरचा वायू आत घेणे, (निमेष) डोळे मिटणे, (उन्मेष) डोळे उघडणे, (जीवन) प्राण धारण करणे, (मनः) मनन, चिंतन करणे म्हणजे ज्ञान (गति) यथेष्ट गमन करणे (इन्द्रिय) इंद्रियांनी विषयांचे ग्रहण करणे, (अन्तर्विकार) क्षुधा,तृष्णा, ज्वर, पीडा, इत्यादी विकार होणे. तसेच सुख, दुःख, इच्छा, देव व प्रयल ही सर्व आत्म्याची लिंगे म्हणजे कर्म व गुण आहेत.

युगपज्ज्ञानानुत्पत्तिर्मनसो लिंगम्।। -न्याय० अ० १। आ० १। सू० १६।।

ज्याच्याकडून एका वेळी दोन पदार्थाचे ज्ञान ग्रहण होत नाही त्याला मन म्हणतात. या प्रमाणे द्रव्यांचे स्वरूप व लक्षण सांगितले. आता गुणांचे वर्णन करतो.

रूपरसगन्धस्पर्शाः संख्याः परिमाणानि पृथक्त्वं संयोगविभागौ परत्वा– ऽपरत्वे बुद्धयः सुखदुःखे इच्छाद्वेषौ प्रयत्नाश्च गुणाः।। -वै० अ० १। आ० १। सू० ६।।

रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, बुद्धी, सुख,दुःख, इच्छा, दोद्वेष, प्रयत्न, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, संस्कार,धर्म, अधर्म आणि शब्द हे चोवीस गुण आहेत.

द्रव्याश्रय्यगुणवान् संयोगविभागेष्वकारणमनपेक्ष इति गुणलक्षणम्।।-वै० अ० १। आ० १। सू० १६।।

जो द्रव्याच्या आश्रयाने राहतो. अन्य गुण धारण करीत नाही. संयोग व विभाग यासाठी जो कारण होत नाही. अनपेक्ष म्हणजे एक दुसऱ्याची अपेक्षा न करणे. त्याला गुण असे म्हणतात.

श्रोत्रेपलब्धिर्बुद्धिनिर्ग्राह्यः प्रयोगेणाऽभिज्वलित आकाशदेशः शब्दः।। -महाभाष्य।।

जो श्रोत्रांनी (कानांनी) प्राप्त होतो, बुद्धीने ज्याचे ग्रहण होते जो प्रयोगाने प्रकाशित होतो व आकाश हा ज्याचे स्थान आहे त्याला शब्द असे म्हणतात. नेत्रांनी ज्याचे ग्रहण होते ते रूप, जिव्हेने जो मिष्टान्नादि अनेक प्रकारचे ग्रहण होते तो रस, नाकाने ज्याचे ग्रहण होते तो गंध, त्वचेने ग्रहण होते तो स्पर्श, जिच्या योगे एक, दोन इत्यादी गणना होते ती संख्या, ज्याने वचनाचा म्हणजे हलकेपणाचा किंवा वजनदार पणाचा बोध होतो ते परिमाण, एकमेकांपासून वेगळे होणे म्हणजे पृथकत्व, एक दुसऱ्याशी मिळणे (मिसळणे) म्हणजे संयोग, एकमेकात मिसळलेल्याचे अनेक तुकडे होणे म्हणजे विभाग, यापासून पलीकडले ते पर, अपर, त्यापासून जे शेष ते सत व असत यांचे ज्ञान जिच्या योगे होते ती बुद्धि, आनंदाचे नाव सुख, क्लेशाचे नाव दु:ख, (इच्छा ) अनुराग, (देष) विरोध(प्रयत्न) अनेक प्रकारचा बलयुक्त पुरुषार्थ(गुरुत्व) भारीपणा, (द्रवत्व) पातळपणा किंवा वितळणे, (स्नेह) प्रीती आणि स्निग्धपणा, (संस्कार) दुसऱ्याच्या संयोगाने वासना होणे(धर्म) न्यायाचरण आणि कठिणत्व (अधर्म) अन्यायाचरण व काठिण्याच्या विरुद्ध कोमलता हे चोवीस गुण आहेत.

उत्क्षेपणमवक्षेपणमाकुञ्चनं प्रसारणं गमनमिति कर्माणि।।-वै० अ० १। आ० १। सू० ७।।

'उत्क्षेपण' म्हणजे वर फेकणे, 'अवक्षेपण' म्हणजे खालील चेष्टा, ‘आकुञ्चन' म्हणजे संकोच करणे, 'प्रसारण म्हणजे पसरविणे, गमन' म्हणजे येणे, जाणे, फिरणे वगैरे. ही कर्मे आहेत. आता कर्माचे लक्षणः-

एकद्रव्यमगुणं संयोगविभागेष्वनपेक्षकारणमिति कर्मलक्षणम्।।-वै० अ० १। आ० १। सू० १७।।

‘एकं द्रव्यमाश्रय आधारो यस्य तदेकद्रव्यं न विद्यते गुणो यस्य यस्मिन् वा तदगुणं संयोगेषु विभागेषु चाऽपेक्षारहितं कारणं तत्कर्मलक्षणं’ अथवा ‘यत् क्रियते तत्कर्म, लक्ष्यते येन तल्लक्षणम्, कर्मणो लक्षणं कर्मलक्षणम्’. जे द्रव्यश्रीत पण गुण रहित संयोग व विभाग होण्यामध्ये अपेक्षारहित कारण असते त्याला कर्म म्हणतात.

द्रव्यगुणकर्मणां द्रव्यं कारणं सामान्यम्।। -वै० अ० १। आ० १। सू० १८।।

जे कार्य द्रव्य, गुण व कर्म या कारण द्रव्य असते ते सामान्य द्रव्य होय.

द्रव्याणां द्रव्यं कार्यं सामान्यम्।। -वै० अ० १। आ० १। सू० २३।।

जे द्रव्यांचे कार्य द्रव्य आहे ते कार्यत्वाच्या दृष्टीने सर्व कार्यांमध्ये सामान्य आहे

द्रव्यत्वं गुणत्वं कर्मत्वञ्च सामान्यानि विशेषाश्च।।-वै० अ० १। आ० २। सू० ५।।


द्रव्यांमध्ये द्रव्यत्व, गुणांमध्ये गुणत्व, कर्मांमध्ये कर्मत्व सर्वांना सामान्य व विशेष म्हणतात. कारण द्रव्यांमध्ये द्रव्यत्व सामान्य आहे आणि गुणत्व व कर्मत्व यांच्याहून द्रव्यत्व विशेष आहे. याचप्रमाणे सर्वत्र जाणावे.


सामान्यं विशेष इति बुद्ध्यपेक्षम्।। -वै० अ० १। आ० २। सू० ३।।

सामान्य व विशेष हे बुद्धीच्या अपेक्षेने सिद्ध होते. उदाहरणार्थ, मनुष्यांमध्ये मनुष्यत्व सामान्य आहे आणि पशुत्वादींहून ते विशेष आहे. तसेच स्त्रियांमध्ये स्त्रीत्व आणि पुरुषांमध्ये पुरुषत्व ही सामान्य आहेत. परंतु ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व, वैश्यत्व व शूद्रत्व ही विशेष आहेत. ब्राह्मण व्यक्तीमध्ये ब्राह्मणत्व हे सामान्य आहे आणि ते क्षत्रियादिकांहून विशेष आहे. याप्रमाणेच सर्वत्र जाणावे.

इहेदमिति यतः कार्यकारणयोः स समवायः।-वै० अ० ७। आ० २। सू० २६।।

अवयवांमध्ये अवयवी, कार्यांमध्ये क्रिया-क्रियावान,गुण-गुणी, जाती-व्यक्ती, कार्य-कारण, अवयव- अवयवी यांचा नित्य संबंध असतो. म्हणून त्याला समवाय असे म्हणतात. जो दुसरा द्रव्यांचा परस्पर संबंध असतो त्याला संयोग म्हणजे अनित्य संबंध असे म्हणतात.

द्रव्यगुणयोः सजातीयारम्भकत्वं साधर्म्यम्।। -वै० अ० १। आ० १। सू० ९।।

द्रव्य व गुण यांपासून समानजातीय कार्याचा जो आरंभ होतो त्याला साधर्म्य असे म्हणतात. ज्याप्रमाणे पृथ्वीमध्ये जडत्व धर्म आणि घटादी कार्योत्पदकत्व स्वसदृश धर्म आहे त्याचप्रमाणे जलामध्येही जडत्व (अचेनत्व) व हिम (बर्फ) आदी स्वसदृश कायरिंभ पृथ्वी व जल यांचा परस्पर समान धर्म आहे. अर्थात द्रव्यगुणयोविंजातीयारम्भकत्वं वैधर्म्यम् , यावरून हे लक्षात आले की द्रव्य व गुण यांपासून विजातीय धर्म व कार्य यांचा जो आरंभ होतो त्याला वैधर्म्य असे म्हणतात. जसे पृथ्वीमध्ये कठिणत्व, शुष्कत्व आणि गंधत्व हे जलाच्या धर्माशी विरुद्ध आहेत आणि जलाचे द्रवत्व, कोमलत्व व रसगुणयुक्तत्व हे गुण पृथ्वीतत्वाच्या विरुद्ध आहेत. (म्हणून या दोन द्रव्यांमध्ये वैधर्म्य आहे.)

कार्यकारणसंबंध

कारणभावात्कार्यभावः।। -वै० अ० ४। आ० १। सू० ३।।

कारण असेल तरच कार्य घडते.

न तु कार्याभावात्कारणाभावः।। -वै० अ० १। आ० २। सू० २।।

कार्याचा अभाव असेल तर कारणाचा अभाव असतो असे नाही.

कारणाऽभावात्कार्याऽभावः।। -वै० अ० १। आ० २। सू० १।।

कारण नसेल तर कार्य कधीही होत नाही.

कारणगुणपूर्वकः कार्यगुणो दृष्टः।। -वै० अ० २। आ० १। सू० २४।।

कारणामध्ये जसे गुण असतात तसेच ते कार्यामध्ये असतात. परिमाण दोन प्रकारचा आहे :-

अणुमहदिति तस्मिन्विशेषभावाद्विशेषाभावाच्च।। -वै० अ० ७। आ० १। सू० ११।।

(अणू) सूक्ष्म व (महत्) मोठा असे दोन प्रकारचे परिमाण आहेत. ज्याप्रमाणे त्रसरेणू लिक्षाहून छोटा व द्वयणुकाहून मोठा आहे. तसेच पर्वत हे पृथ्वीपेक्षा लहान व वृक्षांहून मोठे असतात.

सदिति यतो द्रव्यगुणकर्मसु सा सत्ता।। -वै० अ० १। आ० २। सू० ७।।

द्रव्य, गुण, कर्मे यांमध्ये सत् शब्द अन्वित (संबद्ध) असतो. त्यांचे वर्तमानत्व म्हणजे अस्तित्व. त्यालाच सत्ता असे म्हणतात. ‘स द्रव्यम्, सन् गुणः, सत् कर्म म्हणजे सत्कर्म सत् द्रव्य, सतगुण, सत् कर्म याप्रमाणे वर्तमानकालवाचक शब्दाचा अन्वय सर्वांशी असतो.

भावोऽनुवृत्तेरेव हेतुत्वात्सामान्यमेव।। -वै० अ० १। आ० २। सू० ४।।

जो सर्वाबरोबर अनुवर्तमान असल्यामुळे सत्तारूप भाव आहे त्याला महासामान्य असे म्हणतात. हा क्रम भावरूप द्रव्यांचा आहे आणि अभाव जो आहे तो पाचप्रकारचा असतो.

क्रियागुणव्यपदेशाभावात्प्रागसत्।। -वै० अ० ९। आ० १। सू० १।।

क्रिया व गुण यांचे विशेष निमित्त अभावाने प्राक् म्हणजे आधी (असत्) नव्हता. जसे घट, वस्त्र आदी उत्पत्तिपूर्वी नव्हते. याचे नाव 'प्रागभाव दुसरा,

सदसत्। -वै० अ० ९। आ० १। सू० २।।

जे उत्पन्न होऊन रहात नाही. उदाहरणार्थ घट तयार होऊन नष्ट होतो. याला 'प्रध्वंसाभाव’ असे म्हणतात. तिसरा,

सच्चासत्।। -वै० अ० ९। आ० १। सू० ४।।

जे असते आणि नसते त्याला 'अन्योऽन्याभाव' असे म्हणतात उदाहरणार्थ, 'अगौरश्वोऽश्वो गौः, हा घोडा गाय नव्हेआणि ही गाय घोडा नव्हे. अर्थात् घोड्यांमध्ये गायीचा व गायीमध्ये घोड्यांचा अभाव आहे हा "अन्योऽन्याभाव ’ आहे. चौथा,

यच्चान्यदसदतस्तदसत्।। -वै० अ० ९। आ० १। सू० ५।।

जो पूर्वी सांगितलेल्या तीन्ही अभावांहून भिन्न आहे त्याला अत्यन्ताभाव' असे म्हणतात. उदाहरणार्थ ' नरशॄऺग " (माणसाचे शिंग), 'खपुष्प (आकाशाचे फूल) आणि 'वन्ध्यापुत्र (बांझेचा मुलगा) वगैरे पाचवा,

नास्ति घटो गेह इति सतो घटस्य गेहसंसर्गप्रतिषेधः।।-वै० अ० ९। आ० १। सू० १०।।

घरात माठ नाही. म्हणजे तो अन्यत्र आहे. घराशी माठाचा संबंध नाही. याला ‘संसर्गाभाव’ म्हणतात असे हे पाच प्रकारचे अभाव म्हटले जातात

इन्द्रियदोषात्संस्कारदोषाच्चाविद्या।। -वै० अ० ९। आ० २। सू० १०।।

इंद्रियांच्या व संस्कारांच्या दोषांपासून अविद्या उत्पन्न होते.

तद्दुष्टं ज्ञानम्।। -वै० अ० ९। आ० २। सू० ११।।

जे दुष्ट म्हणजे विपरीत ज्ञान असते त्याला अविद्या असे म्हणतात.

अदुष्टं विद्या।। -वै० अ० ९। आ० २। सू० १२।।

ने अदुष्ट म्हणजे यथार्थ ज्ञान आहे त्याला विद्या असे म्हणतात

पृथिव्यादिरूपरसगन्धस्पर्शा द्रव्याऽनित्यत्वादनित्याश्च।।-वै० अ० ७। आ० १। सू० २।। एतेन नित्येषु नित्यत्वमुक्तम्।। -वै० अ० ७। आ० १। सू० ३।।

पृथ्वी वगैरे कार्यरूप पदार्थ व त्यांमध्ये रूप, रस, गंध, स्पर्श हे गुण आहेत. हे सर्व द्रव्यांचे अनित्य

असल्यामुळे त्यांचे गुणही अनित्य आहेत आणि जे कारणरूप पृथिव्यादी नित्य द्रव्यांमध्ये गंधादी गुण आहेत ते नित्य आहेत.


सदकारणवन्नित्यम्।। -वै० अ० ४। आ० १। सू० १।।

जे विद्यमान असेल आणि ज्याचे कसलेही कारण नसेल ते नित्य आहे. अर्थात ‘सत्कारणवदनित्यम्’ म्हणजे जे कारणयुक्त कार्यरूप द्रव्यगुण आहेत त्यांना अनित्य म्हटले जाते.

अस्येदं कार्यं कारणं संयोगि विरोधि समवायि चेति लैंगिकम्।।-वै० अ० ९। आ० २। सू० १।।

याचे हे कार्य अथवा कारण आहे' इत्यादी समवायी, सयोगी, एकार्थ समवायी आणि विरोधी या चार प्रकारच्या लैंगिक म्हणजे लिंगलिंगी संबंधाने ज्ञान प्राप्त होते. समवायि जसे आकाश परिमाण युक्त आहे शरीर त्वचायुक्त आहे इत्यादी नित्य संयोग आहे. तो संयोगीसंबंध होय. एका अर्थामध्ये दोहोचे अस्तित्व असणे बाला 'एकार्थसमवायि' संबंध म्हणतात. जसे कार्यरूप स्पर्श कार्याचे लिंग म्हणजे कार्याची जाणीव करून देणारा आहे. तसेच, झालेल्या वृष्टिच्या चिह्नांचा होणाऱ्या दृष्टिच्या चिह्नांशी विरोध संबंध (लिंग) असतो. अशाप्रकारे हे चार प्रकारचे लिंगलिंगी संबंध जाणावे.

‘व्याप्ति’– नियतधर्मसाहित्यमुभयोरेकतरस्य व्याप्तिः। -सांख्यसूत्र अ.५ सू.२९ ।।

जे दोन ही साध्य साधणे म्हणजे जे सिद्ध करण्यास योग्य असते ते साध्य आणि ज्याच्या योगाने सिद्ध करावयाचे असते त्या दोन्ही अथवा एक साधन मात्राचा निश्चित धर्म सहचार आहे त्याला व्याप्ती असे म्हणतात. जसे धूर व अग्नि यांचे साहचर्य असते. ॥२९॥

निजशक्त्युद्भवमित्याचार्याः।। सांख्यसूत्र अ.५ सू. ३१

तसेच व्याप्य जो धूर स्वत:च्या शक्तीने उत्पन्न होतो. अर्थात धूर जेव्हा अन्य दूरच्या एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा तो अग्निच्या संयोगाशिवाय राहू शकतो. त्याचेच नाव व्याप्ती होय. अग्निच्या छेदन व भेदन या सामर्थ्याने जलादी पदार्थही धूर रूपाने उत्पन्न होतो.॥३१॥

आधेयशक्तियोग इति पञ्चशिखः।। -सांख्यसूत्र अ.५ सू. ३२।।

जसे महत्तत्वांमध्ये प्रकृतीची व्यापकता, बुध्दि इत्यादींमध्ये व्याप्यता धर्माचा जो संबंध असतो त्याचे नाव व्याप्ती. आधेयरूप शक्ती आणि शक्तिमान आधाररुप यांचा संबंध असतो त्याला व्याप्ती असे नाव आहे. इत्यादी शास्त्रांच्या प्रमाणादिकांनी परीक्षा करून शिकावे व शिकवावे नाही तर विद्यार्थ्यांना सत्याचा बोध कधीच होऊ शकणार नाही. म्हणून जो-जो ग्रंथ शिकवावयाचा त्याची पूर्वोक्त प्रकारांनी तपासणी करून जर तो खरा उतरला तरच तो शिकवावा. जेग्रंथ या परीक्षांच्या कसोटीला उतरणार नाहीत ते ग्रंथ वाचू नयेत व शिकवू नयेत. कारण,

लक्षणप्रमाणाभ्यां वस्तुसिद्धिः।।

“गन्धवती पृथिवी’ जी पृथ्वी आहे ती गंधवती आहे. म्हणजे पृथ्वीला गंध असतो हे तिचे लक्षण आहे. अशा प्रकारची लक्षणे आणि प्रत्यक्षादीप्रमाणे यांच्या आधारानेच सत्यासत्याचा व सर्व पदार्थाचा निर्णय होतो. यांच्याखेरीज काहीही होत नाही.

पठनपाठनविधि [अध्ययन व अध्यापन ]

आता अध्ययन व अध्यापनाचा प्रकार सांगतो. प्रथम पाणिनिमुनिकृतशिक्षा जे सूत्ररूप पुस्तक आहे ते शिकवावे त्यात अमुक अक्षराचे अमुक स्थान, अमुक प्रयत्न व अमुक करण आहे उदाहरणार्थ 'प' चे स्थान ओष्ठ असून स्पृष्ट प्रयत्न आणि प्राण व जीभ यांची जी क्रिया करावयाची तिला करण असे म्हणतात. याच पद्धतीने यथायोग्य सर्व अक्षरांचे उच्चारण आईबाप व शिक्षक यांनी शिकवावे. त्यानंतर व्याकरण अर्थात प्रथम पाणिनीचे अष्टाध्यायीसूत्र पाठ जसे

   ‘वृद्धिरादैच्’ प्रथम सूत्र आहे त्यामध्ये पदच्छेद 'वृद्धिः, आत्, ऐच् किंवा आदैच्’ नंतर समास

आच्च ऐच्च आदैच् असा आहे. त्याचा अर्थ असा की, ‘आदैचां वृद्धिसंज्ञा क्रियते’ म्हणजे 'आ,ऐ , औ यांना वृध्दि नाव आहे. ‘तः परो यस्मात्स तपरस्तादपि परस्तपरः तकार ज्याच्या पुढे आहे व जो तकाराच्याही पुढे आहे त्याला तपर म्हणतात. यावरून असे सिद्ध होते की जो आकाराच्या पलीकडे त् आहे आणि त् च्या पलीकडे ऐच आहे. हे दोन्ही तपर आहेत. तपरचे प्रयोजन हे आहे की र्हस्व व प्लुत यांची वृद्धी संज्ञा झाली नाही. उदाहरणार्थ (भागः) येथे 'भज्' धातूला 'घञ् ' प्रत्यय लावून 'भागः' हा शब्द बनविला आहे घञ्' प्रत्ययामध्ये ’घञ्' हे इत्संज्ञक असल्याने त्यांचा लोप झाला आहे व 'अ' हा प्रत्यय राहिला आहे. 'भज्+अ' अशी स्थिती झाल्यानंतर ‘ज’ कार पूर्व 'भ' कारातील 'अ' काराची वृद्धि होते; आणि 'ज्' काराच्या ठिकाणी 'ग् ' कार होतो; व ‘भाग्+अ मिळून 'भागःअसा शब्द तयार होतो.

    तसेच 'अध्याय' हा शब्द ‘अधि' उपसर्गपूर्वक 'इङ् धातूच्या र्हस्व 'इ' च्या ठिकाणी 'घञ्' प्रत्ययानंतर 'इऐ' अशी वृद्धि आणि त्यास आय मिळून नंतर 'अध्यायःअसा शब्द बनतो.
    नायकःयेथे नीञ् धातू दीर्घ 'इ' काराच्या ठिकाणी 'ण्वुल्' प्रत्ययानंतर 'ऐ' अशी वृद्धि आणि त्यास

आय होऊन नायक शब्द बनतो.

    तसाच 'स्तावकः' हा शब्द 'स्तु' धातूवरून ण्वुल्' प्रत्यय होऊन र्हस्व 'उ' काराची ‘औ’ अशी वृद्धी आणि आव् आदेश होऊन अ कारात मिळून स्तावक: शब्द बनला.
    तसेच 'कृञ्' धातूला ’ण्वुल्' प्रत्यय लागून त्यातील 'ण्,ल्' ची इत्संज्ञा होऊन लोप शेष राहिलेल्या

'वु' प्रत्ययाला 'अक' असा आदेश झाला आणि ऋकाराला 'आर्' अशी वृद्धि होऊन (कार्-अक) 'कारकः असे सिद्ध झाले

    अशा प्रकारे जी-जी सूत्रे मागील व पुढील प्रयोगांमध्ये लागू होतात त्यांची कार्ये दाखवीत जावी आणि दगडी पाटीवर किंवा लाकडी फळीवर ती लिहून दाखवून कच्चे रुप ठेवावे. उदाहरणार्थ 'भज+घञ्+सु' अशी स्थिती प्रथमतः होती. नंतर धातूतील 'अ' काराचा लोप झाला. त्यानंतर 'घ्' कार व मग 'ब्' कार यांचा लोप होऊन 'भज्+अ+सु' अशी स्थिती झाली. नंतर 'अ' ला वृद्धी होऊन 'आ कार बनला व 'ज्' च्या ठिकाणी 'ग्' झाल्याने आणि भाग्+अ=सु' अशी स्थिती झाली. अकार मिसळल्यानंतर भाग+सु असे झाले. आता उकाराची इत्संज्ञा होऊन 'स्' च्या जागी ' रुँ ' होऊन पुनः उकाराची इत्संज्ञा लोप पावली. त्यानंतर 'भागर्' असे रूप सिध्द झाले. आता रेफाच्या ठिकाणी विसर्ग (ः) येऊन भागःहे रूप सिद्ध झाले.
    ज्या ज्या सूत्राकडून जे-जे कार्य होते ते ते विद्यार्थ्यांना शिकवावे आणि त्यांच्याकडून ते बदलून घेऊन

त्यांना ते लिहावयास सांगावे. अशा प्रकारे शिकविले असता विद्यार्थ्यांना तो विषय लौकर व चांगला समजतो.

    एकदा अशा प्रकारे अष्टाध्यायी शिकविल्यावर धातुपाठ ही अर्थासह शिकवून झाल्यावर दश लकारांची रूपेही उत्तम प्रकारे करवून घ्यावीत. नंतर प्रक्रिया सहित उत्सर्ग म्हणजे सामान्य सूत्रे शिकवावीत. उदाहरणार्थ ‘कर्मण्यण्' हे उत्सर्गसूत्र आहे. याचा अर्थ असा की, कर्म उपपद असता धातूवरून 'अण्' प्रत्यय होतो. जसे, कुंभ हे कर्म उपपद असता 'कृ' धातूवरून 'अण्' प्रत्यय होऊन 'कुंभकारःहे रूप बनते. याला अपवाद सूत्र ‘आतोऽनुपसर्गे कः’ म्हणजे उपसर्गभिन्न कर्म उपपद लागल्यास आकारान्त धातूवरून 'क' प्रत्यय होतो. याचा अर्थ असा की जो बहुव्यापक सूत्रानुसार कर्मोपपद लागल्यास सर्व धातूंवरून 'अण्' प्राप्त होतो; परंतु त्यापेक्षा विशेष म्हणजे अन्य विषय त्याच पूर्व सुत्राच्या विषयातून 'आ' कारान्त धातूला 'क' प्रत्ययाने ग्रहन केले. उत्सर्गाच्या विषयात अपवाद सूत्राची प्रवृत्ती होते तशी अपवाद सूत्राच्या बाबतीत उत्सर्गसूत्राची प्रवृत्ती होत नाही. ज्या प्रमाणे चक्रवर्ती राजाच्या राज्यात मांडलिक व जमीनदार यांची प्रवृत्ती असते परंतु मांडलिक राजांच्या राज्यात चक्रवर्ती राजांची प्रवृत्ती नसते, तसेच हे आहे
    अशाच प्रकारे पाणिनी महर्षीनी सहस्र श्लोकांमध्ये अखिल शब्द, अर्थ व संबंध यांची विद्या प्रतिपादन

केली आहे. धातुपाठ शिकवून झाल्यावर उणादिगण शिकवावा. तो शिकविताना सर्व सुबंताचा विषय उत्तम प्रकारे समजावून द्यावा. नंतर पुनः शंका, समाधान. वार्तिक, कारिका, परिभाषा वगैरे विषयीची घटना शिकवून अष्टाध्यायीची दुसरी अनुवृत्ति शिकवावी.

    त्यानंतर महाभाष्य शिकवावे. शिकणारे व शिकविणारे बुद्धिमान, पुरुषार्थी, निष्कपटी, विद्याव्यासंगी

असतील तर दीड वर्षांत अष्टाध्यायी आणि दीड वर्षात महाभाष्य शिकून तीन वर्षांत पूर्ण वैयाकरणी होता येते. वैदिक व लौकिक शब्दांचे व्याकरण उत्तम रीतीने समजल्यामुळे इतर शाखांमध्येही शीघ्र व सहज शिकणे शिकविणे होऊ शकते. मात्र व्याकरण शिकण्यात जेवढे परिश्रम घ्यावे लागतात तेवढे श्रम इतर शास्त्रांच्या अध्ययनात घ्यावे लागत नाहीत; आणि अष्टाध्यायी व महाभाष्य हे आर्ष ग्रंथ शिकल्याने तीन वर्षांत जेवढे ज्ञान प्राप्त होते तेवढे सारस्वत, चंद्रिका, कौमुदी, मनोरमा इत्यादी पन्नास वर्षे शिकल्यानेही होत नाही. कारण महाशय महर्षांनी महान विषयांचे जे विवेचन जितक्या सहजपणे आपल्या ग्रंथांमध्ये केले आहे तसे ते या क्षुद्राशय मनुष्यांच्या कल्पित ग्रंथांमध्ये कोठून असणार ?

    महर्षांनी रचलेल्या ग्रंथांमध्ये विषयाचे विवेचन सुगम आणि थोड्या वेळात पुष्कळ करता येईल असे

असते. तर शुद्धशयी लोकांची इच्छा अशी असते की रचना होईल तितकी अवघड करावी; तिचे परिश्रमपूर्वक अध्ययन केल्यानंतर त्यापासून अगदीच थोडा लाभ पदरात पडावा. डोंगर पोखरून उंदीर मिळावा तसे ते असते. याउलट आर्ष ग्रंथांच्या अभ्यासाने समुद्रात एक बुडी मारल्यावर असंख्य बहुमूल्य मोती मिळावेत अशी स्थिती होते.

     व्याकरण शिकून झाल्यावर यास्कमुनींचे 'निघंटु' व 'निरूक्त' हे दोन ग्रंथ सहा किंवा आठ महिन्यांत

अर्थासह शिकावे शिकवावे. नास्तिकांच्या अमरकोशादी ग्रंथांच्या अध्ययनात वर्षानुवर्षे वाया घालवू नयेत.

    त्यानंतर पिंगलाचार्यकृत छन्दोग्रन्थ चार महिन्यात शिकता व शिकविता येतो. या ग्रंथाच्या अध्ययनाने

वैदिक लौकिक छंदांचे परिज्ञान होऊन नवीन रचना कशी करावीते समजते. हा ग्रंथ आणि श्लोकांची रचना व प्रस्तार हे चार महिन्यात शिकता शिकविता येईल आणि वृत्तरत्नाकरासारखे अल्पबुद्धीच्या लोकांनी रचलेले ग्रंथ शिकण्यात व शिकविण्यात अनेक वर्षे वाया घालवू नयेत.

    यानंतर मनुस्मृति, वाल्मीकी रामायण आणि महाभारतातील उद्योगपर्वान्तर्गत विदुरनीति  इत्यादि चांगली चांगली प्रकरणे, म्हणजे ज्यांच्यापासून विद्यार्थ्यांना नीतीचा बोध होऊन ते दुष्ट व्यसनांपासून दूर राहतील व उत्तम, सभ्य नागरिक बनतील तसेच पद्यग्रंथ काव्य शिकविण्याच्या पद्धतीने म्हणजे पदच्छेद. पदार्थोक्ती, अन्वय, विशेष्य विशेषण संबंध आणि भावार्थ यांचे विवेचन करीत शिकवावे; आणि विद्याध्यांनी ते सोरे समजून घ्यावे. यांच अध्ययन-अध्यापन एका वर्षात पूर्ण करावे.
    त्यानंतर पूर्वमीमांसा, वैशेषिक, न्याय, योग, सांख्य व वेदान्त ही षड्दर्शन शक्य असल्यास ऋषिप्रणीत भाष्यांसह किंवा ते शक्य नसल्यास उत्तम विद्वानांनी केलेल्या सरल व्याख्यांसह शिकवावीत. परंतु वेदान्तसूत्रे शिकण्यापूर्वी ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्डक, माण्डूक्य, ऐतरेय, तैत्तिरीय, छान्दोग्य व बृहदारण्यक ही दहा उपनिषदे शिकावीत. ही उपनिषदे व भाष्य सूत्रवृत्तीसह षड्दर्शन दोन वर्षांच्या आत शिकावी आणि शिकवावीत त्यानंतर सहा वर्षांमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे चार वेदवत्यांची ऐतरेय, शतपथ, साम व गोपथ ही ब्राह्मणे स्वर, शब्द, अर्थ, संबंध व क्रिया यांसह शिकणे उचित आहे याला प्रमाण :-

स्थाणुरयं भारहारः किलाभू दधीत्य वेदं न विजानाति योऽर्थम्। योऽर्थज्ञ इत्सकलं भद्रमश्नुते नाकमेति ज्ञानविधूतपाप्मा ।। निरुक्त अ.४ | मं. १८

    हा निरुक्तातील मंत्र आहे. जो मनुष्य वेद केवळ स्वरानुसार पाठ करतो, पण त्यांचा अर्थ जाणत नाही तो केवळ भारवाही म्हणजे ओझे वाहणारा आहे असे समजावे. ज्याप्रमाणे एखादा वृक्ष फांद्या, पाने, फुले व फळे यांचे ओझे अंगावर वागवतो किंवा एखादा पशुधान्य वगैरेचे ओझे वाहतो तसा हा मनुष्य भारवाहक असतो आणि जो कोणी वेदांचा यथावत अर्थ नीट समजून घेतो, वाचन करतो त्यालाच संपूर्ण आनंद प्राप्त होतो देहान्तानंतर त्याची पापे ज्ञानाने धुतली जातात आणि पवित्र धर्माचरणाच्या प्रतापाने त्याला सर्वानंद  प्राप्त होतो.

उत त्वः पश्यन्न ददर्श वाचमुत त्वः शृण्वन्न शृणोत्येनाम् । उतो त्वस्मै तन्वं१ वि सस्रे जायेव पत्य उशती सुवासाः ।।– ऋ मं० १०। सू० ७१। मं० ४।।

    जे अविद्वान असतात ते ऐकत असूनही ऐकत नाहीत, पाहत असूनहीं पाहत नाहीत, बोलत असूनही

बोलत नाहीत. याचा अर्थ असा की अविद्वान लोक या विद्यावाणीचे रहस्य जाणत नाहीत. परंतु जो शब्द अर्थ व संबंध जाणतो त्याच्या बाबतीत विद्या ही जशी सुंदर वस्त्रे व आभूषणे धारण करून आपल्या पतीची इच्छा बाळगणाऱ्या आणि शरीर व रूप यांचा प्रकाश पतीला अर्पण करणाऱ्या स्त्री सारखी असते तशी विद्या ही विद्वानांना आपल्या स्वरूपाचे दर्शन घडविते. ती अविद्वानांसाठी असे करीत नाही.


ऋचो अक्षरे परमे व्योमन्यस्मिन्देवा अधि विश्वे निषेदुः । यस्तन्न वेद किमृचा करिष्यति य इत्तद्विदुस्त इमे समासते ।।– ऋ मं० १। सू० १६४ १। मं० ३९ ।।

    ज्या व्यापक अविनाशी सर्वोत्कृष्ट परमेश्वरामध्ये सर्व विद्वान आणि पृथ्वी, सुर्य इत्यादी सर्व लोक स्थित

आहेत, त्याच्यामध्येच सर्व वेदांचे मुख्य तात्पर्य आहे. त्या ब्रह्माला जो जाणत नाही त्याला ऋग्वेदादींचे काय सुख प्राप्त होऊ शकते? मुळीच नाही. परंतु जे लोक वेदांचे अध्ययन करून, धर्मात्मा योगी बनून त्या ब्रह्माला जाणतात ते सर्व परमेश्वरामध्ये स्थित होऊन मुक्तिरूपी परमानंद प्राप्त करतात. यासाठी जे काही अध्ययन अध्यापन करावयाचे ते अर्थज्ञानासहित असले पाहिजे.

    अशा प्रकारे सर्व वेदांचे अध्ययन झाल्यावर आयुर्वेदाचा अभ्यास करावा. आयुर्वेद म्हणजे चरक, सुश्रुत

आदि ऋषिमुनिप्रणीत वैद्यक शास्त्र. त्यांचे अर्थ, क्रिया, शस्त्र, छेदन, भेदन, लेप, चिकित्सा, निदान, औषध, पध्य, शरीर, देश, काल आणि वस्तूंचे गुण या गोष्टी ज्ञानपूर्वक चार वर्षात शिकाव्या, शिकवाव्या.

    त्यानंतर धनुर्वेद. त्यामध्ये राज्यासंबंधीची सर्व कार्य करणे समाविष्ट आहे. त्याचे दोन भेद आहेत. एक

स्वतः राजपुरुषासंबंधीचा भाग आणि दुसरा प्रजेशी संबंधित भाग असतो. राजकार्यामध्ये सेनाध्यक्ष , सर्व सैन्याची रचना, शस्त्रास्त्र विद्या, नाना प्रकारचे व्यूह यांचा अभ्यास ज्याला आजकाल कवायत म्हणतात जी लढाईच्या वेळी शत्रूंच्या बाबतीत ज्या क्रिया कराव्या लागतात त्यांना व्यूह रचना याचा यथायोग्य अभ्यास करावा. त्या सर्व पद्धतशीरपणे शिकून घ्याव्यात. तसेच प्रजेचे पालन व तिची सुखसमृद्धी यांसाठी काय करावे लागते ते शिकून घ्यावे. साऱ्या प्रजेला न्यायपूर्वक कसे सुखात ठेवावे, दुष्टांना कशी यथायोग्य शिक्षा द्यावी आणि श्रेष्ठांचे पालन, प्रकार हे सर्वप्रकारे शिकून घ्यावे.

    ही राजविद्या दोन वर्षांत शिकून त्यानंतर गांधर्ववेद शिकावा. त्यालाच गानविद्या किंवा संगीत शास्त्र असे म्हणतात. त्यामध्ये स्वर, राग, रागिण्या, समय, ताल, ग्राम, तान वाद्य, नृत्य,गीत इत्यादी. ते सर्व व्यवस्थितपणे शिकून घ्यावे. परंतु मुख्यतः सामवेदाचे गायन वाद्यवादनासह शिकावे आणि नारदसंहिता वगैरे जे आर्ष ग्रंथ आहेत त्यांचे अध्ययन करावे. मात्र भडवे, वेश्या आणि विषयासक्तीकारक अरागी यांचे गर्दभशब्दवत् व्यर्थ आलाप कधी काढू नयेत.
    त्यानंतर अथवेद ज्याला शिल्पविद्या म्हणतात ज्यात पदार्थगुणविज्ञान क्रियाकौशल, नानाविध पदार्थाची

निर्मिती, पृथ्वीपासून आकाशापर्यंतच्या विद्येचा समावेश होतो. त्या सर्वांचे नीट अध्ययन करावे. अर्थवेद हा ऐश्वर्य वाढविणारा आहे. ती विद्या शिकून घेऊन दोन वर्षांत ज्योतिषशास्त्र, सूर्यसिद्धांत इत्यादी ज्यामध्ये बीजगणित, अंकगणित, भूगोल, खगोल व भूगर्भविद्या आहे हे यथायोग्य अभ्यासावे.

     त्यानंतर सर्वप्रकारच्या हस्तकला, यंत्रकला वगैरे शिकाव्यातमात्र जितके ग्रह, नक्षत्र, जन्मपत्रिका,

राशी, मुहूर्त वगैरेशी संबंधित फलज्योतिषाचे ग्रंथ आहेत हे खोटे समजून त्यांचे | अध्ययन-अध्यापन कधी करू नये.

    शिकणारे व शिकविणारे यांनी असा प्रयत्न करावा की ज्यायोगे वीस-एकवीस वर्षात सर्व विद्या उत्तम

शिक्षण प्राप्त होऊन, माणूस कृतकृत्य होऊन सदैव आनंदात राहावा या पद्धतीने जेवढी विद्या वीस एकवीस वर्षात प्राप्त होऊ शकते तेवढी दुसऱ्या पद्धतीने शंभर वर्षातही मिळू शकणार नाही.

ग्रंथप्रामाण्य

    ऋषिप्रणीत ग्रंथांचे अध्ययन यासाठी करावयाचे की ऋषी हे मोठे विद्वान, सर्व शास्त्रे जाणणारे व धर्मात्मे

होते. जे अनृषी, अल्पज्ञ व थोडच शास्त्रे शिकलेले असतात आणि ज्यांचा आत्मा पक्षपाती असतो त्यांनी लिहिलेले ग्रंथही तसेच असतात.

    पूर्वमीमांसेवर व्यासमुनिकृत व्याख्या, वैशेषिकदर्शनावर गौतममुनिकृत भाष्य, न्यायसूत्रावर

वात्स्यायनमुनिकृत भाष्य, पतंजलीमुनिकृत (योग) सूत्रावर व्यासमुनिकृत भाष्य, कपिलमुनिकृत सांख्यदर्शनावर भागुरिमुनिकृत भाष्य, व्यासमुनिकृत वेदान्तसूत्रावर वात्स्यायनमुनिकृत भाष्य अथवा बौधायनमुनिकृत भाष्य वृत्तिसहित शिकावे व शिकवावे. इत्यादी सूत्रांना कल्प अंगांतही समाविष्ट समजावे.

    ज्याप्रमाणे ऋवेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे चारही वेद ईश्वरकृत आहेत, त्या प्रमाणे ऐतरेय,

शतपथ, साम व गोपथ ही चार ब्राह्मणे, शिक्षा, कल्प,व्याकरण, निघण्टु, निरुक्त, छन्द व ज्योतिष ही वेदांची सहा अंगे, मीमांसादी वेदांची सहा उपांगे, आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद व अर्थवेद हे चार वेदांचे उपवेद, इत्यादी सगळे ऋषिमुनिप्रणीत ग्रंथ आहेत. यांमध्ये जे-जे वेदविरुद्ध प्रतीत होईल ते-ते सोडून द्यावे. कारण वेद ईश्वरकृत असल्याने निर्भ्रान्त स्वतः प्रमाण आहेत. म्हणजे वेदाचे प्रामाण्य वेदावरूनच होते. ब्राह्मणादी सर्व ग्रंथ परतः प्रमाण आहेत. म्हणजे त्यांचे प्रामाण्य वेदाधीन आहे. वेदांविषयींचे अधिक विवेचन ‘ऋग्वेदादिभाष्यभूमिका' या ग्रंथात पाहावे. या ग्रंथामध्येही त्यासंबंधी पुढे लिहिण्यात येईल.

    आता परित्यागास योग्य असणाऱ्या ग्रंथांची मोजणी थोडक्यात करतो. पुढे ज्या या ग्रंथांचा उल्लेख केला

आहे ते भ्रामक ग्रंथ आहेत असे समजावे. व्याकरणामध्ये कातंत्र, सारस्वत, चंद्रिका, मुग्धबोध, कौमुदी, शेखर, मनोरमा वगैरे; कोशांमध्ये अमरकोश वगैरे; छंदोग्रंथांमध्ये वृत्तरत्नाकर वगैरे; शिक्षण ग्रंथांमध्ये ‘अथ शिक्षां प्रवक्ष्यामि पाणिनीयं मतं यथा' इत्यादी. ज्योतिषग्रंथांमध्ये शीघ्रबोध, मूहूर्तचिंतामणि इत्यादी काव्यांमध्ये नायिकाभेद, कुवलयानन्द, रघुवंश, माघ, किरातार्जुनीय वगैरे. मीमांसा ग्रंथांमध्ये धर्मसिंधु, व्रतार्क वगैरे. वैशेषिकांमध्ये तर्कसंग्रह वगैरे न्यायामध्ये जागीशी वगैरे, योगामध्ये हठप्रदीपिका आदी; सांख्य ग्रंथामध्ये सांख्यतत्वकौमुदि वगैरे, वेदान्तामध्ये योगवासिष्ठ पञ्चदशी इत्यादी. वैद्यकामध्ये शर्ङ्गधर आदी. स्मृतिग्रंथामध्ये मनुस्मृतीतील प्रक्षिप्त श्लोक आणि इतर सर्व स्मृतिग्रंथ, सगळे तंत्रग्रंथ, सर्व पुराणे, सगळी उपपुराणे, तुलसीदासाचे भाषारामायण, रुक्मिणीमंगल आणि सर्व भाषग्रंथ. हे सर्व कपोलकल्पित, मिथ्या ग्रंथ आहेत. (प्रश्न) या ग्रंथामध्ये थोडेही सत्य नाही काय? (उत्तर) थोडेसे सत्य आहे. परंतु त्याच बरोबर पुष्कळसे असत्यही आहे. म्हणून ‘विषसम्पृक्तान्नवत् त्याज्याः’ म्हणजे अत्युत्तम अन्न विषयुक्त झाल्यास त्याज्य ठरते, या न्यायाने हे ग्रंथ त्याज्य आहेत. (प्रश्न) तुम्ही पुराणे, इतिहास यांना मानीत नाही काय? (उत्तर) अवश्य मानतो. पण आम्ही सत्याला मानतो असत्याला नाही. (प्रश्न) खरी कोणती व खोटी कोणती ? (उत्तर) ब्राह्मणानीतिहासान् पुराणानि कल्पान् गाथा नारशंसीरिती। हेगृह्यसूत्रातील वचन आहे. पूर्वी जो ऐतरेय, शतपथ आदी ब्राह्मण ग्रंथांचा उल्लेख केला आहे. त्यांचीच

इतिहास, पुराण, कल्प, गाथा व नाराशंसी ही पाच गवे आहेत. श्रीमद्भागवत आदींचे नाव पुराण नाही. (प्रश्न) त्याज्य ग्रंथांमध्ये जे सत्य आहे त्याचा स्वीकार का करीत नाही? (उत्तर) त्यांमध्ये जे-जे सत्य आहे ते सर्व वेदादी सत्यशास्त्रांतील आहे. जे मिथ्या आहे ते त्यांचे स्वत:चे आहे. वेदादी सत्यशास्त्रांचा स्वीकार करण्यामध्ये सर्वे सत्याचे ग्रहण होऊन जाते. जर कोणी या मिथ्या ग्रंथांमधून सत्याचे ग्रहण करू पाहील तर त्याच्या गळ्यात असत्यही पडेल. म्हणून ‘असत्यमिश्रं सत्यं दूरतस्त्याज्यमिति’ म्हणजे रस्त्याने भरलेल्या ग्रंथातील सत्याचाही विषयुक्त अन्नाप्रमाणे त्याग केला पाहिजे. (प्रश्न) तुमचे मत काय आहे? (उत्तर) वेदमत. वेदांमध्ये जे-जे करावे असे सांगितले आहे ते करावे आणि जे-जे सोडावे असे सांगितले आहे ते सोडावे (करू नये.) असे आम्ही मानतो. ज्याअर्थी वेद आम्हाला मान्य आहेत त्याअर्थी वेद हेच आमचे मत आहे. तसेच मानून सर्व मनुष्यमात्रास विशेषत: आर्यांनी एकमताने राहिले पाहिजे. (प्रश्न) सत्यासत्याच्या बाबतीत इतर ग्रंथांमध्ये जसा परस्पर विरोध आहे. तसा अन्य शास्त्रांमध्येही आहे उदाहरणार्थ, सृष्टीच्या बाबतीत सहा शास्त्रांचा आपसात विरोध आहे. मीमांसा कर्मापासून, वैशेषिक काळापासून, न्याय परमाणूपासून, योग पुरुषार्थापासून, सांख्य प्रकृतीपासून आणि वेदान्त ब्रह्मापासून सुटीची उत्पत्ती मानतात. हा विरोध नव्हे काय ? (उत्तर) पहिली गोष्ट अशी की सांख्य आणि वेदान्त यांच्या खेरीज इतर चार शाखांमध्ये सृष्टीच्या उत्पत्तीविषय स्पष्टपणे काहीच सांगितलेले नाही; आणि त्यात मुळीच विरोध नाही. तुम्हांला विरोध व अविरोध यांचे ज्ञान नाही असे दिसते, मी तुम्हांला विचारतो की, विरोध कोणत्या ठिकाणी होतो ? एका विषयात की भिन्न-भिन्न विषयांमध्ये ? (प्रश्न) एका विषयामध्ये अनेकांचे परस्परविरोधी कथन असेल तर त्यास विरोध असे म्हणतात. वरील सहाही दर्शनात सृष्टी हा एकच विषय आहे. (उत्तर) विद्या ही एक आहे की दोन? एक आहे. ती जर एक आहे तर व्याकरण, वैद्यक, ज्योतिष आदि भिन्न-भिन्न विषय का आहेत ? ज्याप्रमाणे एका विद्येत अनेक विद्यांच्या अवयवांचे एकमेकांहून भिन्न प्रतिपादन असते. त्याचप्रमाणे सृष्टिविद्येच्या वेगवेगळया सहा अवयवांचे सहा शाखांमध्ये प्रतिपादन करण्यात आलेले आहे. म्हणून त्यात काहीही विरोध नाही. ज्या प्रमाणे माठ बनवावयाचा असतो तेव्हा कर्म, वेळ, माती, विचार, संयोगवियोगादिवा पुरुषार्थ, प्रकृतीचे गुण आणि कुंभार अशी कारणे आहेत. त्याच प्रमाणे सृष्टिचे जे कारण आहे त्याची व्याख्या मीमांसेमध्ये, काळाविषयी वैशेषिकामध्ये, उपादान कारणाविषयी न्यायदर्शनामध्ये, पुरुषार्थाविषयी योगामध्ये, तत्त्वांच्या अनुक्रमाने परिगणनेविषयी सांख्यामध्ये आणि निमित्तकारण असणाऱ्या परमेश्वराविषयी वेदान्तशास्त्रामध्ये विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे कसलाच विरोध नाही. ज्याप्रमाणे वैद्यशास्त्रात निदान, चिकित्सा, औषधिदान आणि पध्य प्रकरणे वेगवेगळी सांगितली आहेत. परंतु सर्वाचा सिद्धांत रोगनिवारण हाच असतो. त्याच प्रमाणे सृष्टीची सहा कारणे आहेत. त्यांपैकी एकेका कारणाची व्याख्या षड्दर्शनातील एकेका शास्त्रकाराने केलेली आहे. त्यामुळे त्यात परस्पर विरोध मुळीच नाही याचे विशेष विवेचन सृष्टिप्रकरणात करू.

विघ्ने

     विद्येचे अध्ययन-अध्यापन करण्यात जी विघ्ने येतात ती टाळावीत. उदाहरणार्थ कुसंग म्हणजे दुष्ट, विषयासक्त लोकांची संगत, दुष्ट व्यसन; मद्यपान व वेश्यागमनादि वाईट व्यसने; बाल विवाह म्हणजे पुरुषाचे वयाच्या पंचवीसाव्या वर्षापूर्वी आणि स्त्रीचे वयाच्या सोळाव्या वर्षापूर्वी लग्न होणे, पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन न होणे; राजा, माता, पिता आणि विद्वानांचा स्नेह वेदादी शास्त्रांच्या प्रचारामध्ये स्वारस्य नसणे; अतिभोजन, अतिजागरण; अध्ययन-अध्यापन व परीक्षा देणे-घेणे यांमध्ये आळस व कपट करणे; विधेचा लाभ हा सर्वश्रेष्ठ असतो असे न समजणे; बळ, बुद्धि, पराक्रम, आरोग्य, राज्य व धन यांची वृद्धी होते यावर विश्वास ने ठेवणे ईश्वराचे ध्यान करण्याचे सोडून दगडाधोंड्याच्या निर्जीव मूर्तीच्या दर्शन-पूजनात निरर्थक वेळ वाया घालविणे; माता, पिता, अतिथी, आचार्य व विद्वान यांना सत्याचे प्रतीक मानून त्यांची सेवा  व सत्संग न करणे वर्णाश्रमधर्म सोडून ऊध्वपुंड्र , त्रिपुंड, तिलक, कंठी, मालाधारण, एकादशी, त्रयोदशी इत्यादी व्रते करणे; काशी आदि तीर्थाची यात्रा आणि राम, कृष्ण, नारायण, शिव, भगवती, गणेश इत्यादींचे नामस्मरण याने पापे नाहीशी  होतात असा विश्वास ठेवणे, पाखंड लोकांचा उपदेश ऐकून विद्याभ्यासाच्या बाबतीत अश्रद्धा असणे; विद्या, धर्म, योग, परमेश्वराची उपासनाविना मुक्ती मिळते असे मानतो. भागवतादी भ्रामक पुराणातील कथा वाचून-ऐकून मोक्ष मिळतो असे समजणे; लोभाच्या आहारी जाऊन धनप्राप्तीची प्रवृत्ती होऊन विद्येची गोडी ठेवणे; इकडे-तिकडे निष्कारण भटकत राहणे. इत्यादी मिथ्या व्यवहारांमध्ये फसून लोक ब्रह्मचर्य व विद्या यांच्यापासून होणाऱ्या लाभांना मुकतात आणि त्यामुळे रोगी व अडाणी होत राहतात.

स्त्रिया-शूद्र यांना वेदाध्ययनाचा अधिकार

    आजकालचे जे सांप्रदायी व स्वार्थी ब्राह्मण वगैरे इतरांना विद्या व सत्संग यांपासून दूर ठेवतात आणि

आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचे टॅन, मन, धन नष्ट करतात आणि अशी इच्छा करतात की क्षत्रियादी वर्ण विद्याभ्यास करून विद्वान बनले तर ते आमच्या पाखंडाच्या जाळ्यातून बाहेर पडतील आणि आमचे कपट ओळखून आमचा अपमान करतील. 'म्हणून राजा व प्रजा यांनी ही विघ्ने दूर करून आपल्या मुलांना व मुलींना विद्वान बनविण्यासाठी तन, मन, धनाने प्रयत्न केला जावा.' (प्रश्न) स्त्रिया व शुद्ध यांनीही वेदाभ्यास करावा काय? त्यांनी वेदपठण केले तर मग आम्ही काय करायचे ? शिवाय त्यांनी वेदपठण करावे याला काही आधारही नाही.उलट असा निषेध आहे:

स्त्रीशूद्रौ नाधीयातामिति श्रुतेः। स्त्री व शूद्र यांनी अध्ययन करू नये, ही श्रुती आहे. (उत्तर) तुमचा सर्वनाश होवो जे तुम्ही असे म्हणता. कारण सर्व स्त्रिया आणि पुरुष यांना म्हणजेच मनुष्यमात्राला वेदाध्ययनाचा अधिकार आहे. तुम्ही म्हणता ती श्रुती म्हणजे तुमची कपोलकल्पना आहे श्रुतींमध्ये ते वाक्य नाही.

    कोणत्याही प्रमाणित ग्रंथातील ती श्रुती नाही. सर्व मनुष्यांना वेदादी शास्त्रे अध्ययनाचा व ऐकण्याचा

अधिकार आहे असा पुरावा यजुर्वेदाच्या सव्वीसाव्या अध्यायातील दुसऱ्या मंत्रात आहे.

यथेमां वाचं कल्याणीमावदानि जनेभ्यः । ब्रह्मराजन्याभ्या शूद्राय चार्याय च स्वाय चारणाय ।।

परमेश्वर सांगतो की (यथा) जस मी (जनेभ्य) सर्व मनुष्यांसाठी (इमाम्) ही (कल्याणीम्) सुखे म्हणजे संसार व मुक्ती यांची सुखे प्राप्त करून देणारी (वाचम्) ज ऋग्वेदादी चारही वेदांच्या वाणीचा (आ वदानि ) उपदेश करतो तसे तुम्ही करा. (प्रश्न) येथे कोणी असा प्रश्न विचारील की, 'स्मृतिग्रंथांप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनाच वेदाध्ययनाचा अधिकार आहे स्त्रिया व शुद्र यांना नाही म्हणून जन या शब्दाचा अर्थ द्विज असा , केला पाहिजे ? (उत्तर) परमेश्वर स्वत:च सांगतो आहे की मी (ब्रह्मराजन्याभ्या ) ब्राह्मण, क्षत्रिय, (अर्य्याय) वैश्य, (शूद्राय) शूद्र आणि (स्वाय) आपले नोकर अथवा स्त्रिया वगैरे व (अरणाय) अतिशूद्रादी यांच्यासाठी वेदांचा प्रकाश केला आहे. म्हणून सर्वानी वेदांचे अध्ययन-अध्यापन व श्रवण-कीर्तन करून आपले ज्ञान वाढवून, चांगल्या गोष्टींचा स्वीकार व वाईट गोष्टींचा त्याग करून दु:खांपासून सुटका करून घ्यावी आणि आनंद मिळवावा. आता तुम्हीच सांगा, आम्ही तुमचे म्हणणे मान्य करावे की परमेश्वराचे ?

    परमेश्वराचे सांगणेच माननीय आहे, यात शंका नाही, तरी पण जर कोणी हे मान्य करीत नसेल तर तो

नास्तिक म्हटला जाईल. कारण ‘नास्तिको वेदनिन्दकः वेदांची निंदा करणारा आणि वेदांना न मानणारा नास्तिक म्हटला जातो. परमेश्वर शूद्रांचे कल्याण करू इच्छित नाही काय? परमेश्वर पक्षपाती आहे काय? की द्विजांनीच वेदाध्ययन करावे आणि शूद्रांसाठी निषेध आहे? शूद्रादीनी वाचन, श्रवण करू नये अशी परमेश्वराची इच्छा असती त रत्याने त्यांच्या शरीरामध्ये वाणी व कान ही इंद्रिये कशाला निर्माण केली? ज्या प्रमाणे परमेश्वराने पृथ्वी, जल, अग्नि, वायु, चंद्र, सूर्य आणि अन्नादी पदार्थ सर्वांसाठी निर्माण केले आहेत. त्याच प्रमाणे त्याने वेदही सर्वांसाठी प्रकाशित केले आहेत. जेथे कोठे शुद्रांनी वेद म्हणू नयेत' असा निषेध केला असेल तेथे त्याचा अभिप्राय हा आहे की ज्याला शिकविले असता काहीच येत नाही तो निर्बुद्ध अडाणी असल्याने त्याला शुद्ध म्हटले जाते .त्याचे शिकणे त्याला शिकविणे व्यर्थ आहे आणि जे लोक स्त्रियांना शिकवू नये असे म्हणताततो त्यांचा मूर्खपणा, स्वार्थीपणा व निर्बुद्धपणाचा प्रभाव आहे. पाहा ! वेदांमध्ये मुलींना शिकण्याचा हा पुरावाः

ब्रह्मचर्य्येण कन्या युवानं विन्दते पतिम् ।।-अथर्व० अ० ३। प्र० २४। कां० ११। मं० १८।।

    ज्याप्रमाणे मुले ब्रह्मचर्याचे पालन करून पूर्ण विद्या व सुशिक्षण प्राप्त केल्यानंतर युवती, विदुषी व

आपल्याला अनुकूल व प्रिय अशा स्त्रियांशी विवाह करतात त्याप्रमाणे (कन्या) कुमारी (ब्रह्मचर्येण) ब्रह्मचर्य पालन करून वेदादि शास्त्रे शिकून पूर्ण विद्या व उत्तम शिक्षण मिळवून युवती होऊन आणि पूर्ण यौवनात प्रवेश केल्यावर आपल्यासारखा प्रिय विद्वान (युवानम्) वपूर्ण यौवनयुक्त पुरुष (विन्दते) प्राप्त करो. म्हणून स्त्रियांनीही ब्रह्मचर्याचे पालन करून विद्याध्ययन अवश्य केले पाहिजे. (प्रश्न) स्त्रियांनीही वेदांचे पठण करावे काय ? (उत्तर) अवश्य करावे, पाहाः श्रौतसूत्रादींमध्ये:- इमं मन्त्रं पत्नी पठेत्। अर्थात यज्ञमध्ये पत्नीने हा मंत्र म्हणावा. जर स्त्रीने वेदादी शास्त्रांचा अभ्यास केलेला नसेल तर तिला यज्ञामध्ये स्वरसहित मंत्रांचे उच्चारण व संस्कृत भाषण कसे करता येईल? भारतवर्षांमध्ये स्त्रियांना भूषणास्पद ठरलेल्या गार्गी वगैरे महिला वेदादी शाखांचे अध्ययन करून पूर्ण विदुषी बनल्या होत्या, असे शतपथ ब्राह्मणात स्पष्ट सांगितले आहे. जर पुरुष विद्वान आणि स्त्री अडाणी किंवा स्त्री विदुषी व पुरुष अडाणी अशी स्थिती असेल तर उठल्यासुटल्या घरात देवासुर संग्राम माजून राहील, मग सुख कोठले ? तसेच स्त्रिया शिकल्या नाहीत तर मुलींच्या शाळांमध्ये शिक्षिका कोठून मिळणार? राज्यकार्य, न्यायाधीशत्व वगैरे कामे गृहाश्रमाचे कार्य जे पतिला स्त्री आणि स्त्रीला पति प्रसन्न ठेवणे. घरातील सर्व कामांची जबाबदारी स्त्रीवर असते, ती स्त्री सुशिक्षित नसेल तर इत्यादि कामे तिच्याकडून चांगल्या प्रकारे कधीच होऊ शकत नाहीत.

    पहा! आर्यावर्तातील राजपुरुषांच्या स्त्रिया धनुर्वेदात म्हणजे युद्धविद्येतही अत्यंत निष्णात असत.तशा

त्या नसत्या तर कैकयी सारख्या राण्या दशरथासारख्या राजांबरोबर लढाईत का म्हणून गेल्या असत्या ? आणि युद्ध कशा करू शकल्या असत्या? म्हणून ब्राह्मण स्त्रीला सर्व विद्या, क्षत्रिय स्त्रीला सर्व विद्यांबरोबरच युद्धशास्त्र व विशेष राजविद्या, वैश्य स्त्रीला व्यवहार विद्या आणि शुद्ध स्त्रीला पाकक्रियादी सेवांच्या विद्या यांचे शिक्षण अवश्य दिले गेले पाहिजे. ज्याप्रमाणे पुरुषांनी किमान व्याकरण, धर्मशास्त्र व आपल्या व्यवहाराची किमान विद्या अवश्य शिकून घेतली पाहिजे त्याप्रमाणे स्त्रियांनीही व्याकरण, धर्मशास्त्र, वैद्यक, गणित व शिल्पविद्या, अवश्य शिकून घेतली पाहिजेत. कारण त्यावाचून सत्यासत्याचा निर्णय, पती वगैरेशी अनुकूल वर्तन, यथायोग्य संतानोत्पत्ति, मुलांचे संगोपन संवर्धन व सुशिक्षण, घरातील सर्व कामे योग्य प्रकारे पार पाडणे, वैद्यक शास्त्राच्या ज्ञानाच्या आधारे समतोल आहार बनविणे वगैरे गोष्टी त्यांना करता येणार नाहीत. त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे नीट लक्ष पुरविले तर घरामध्ये कधीही आजार प्रवेश करणार नाही आणि सर्व लोक आनंदित राहतील शिल्पविशेचे ज्ञान नसेल तर घराची मांडणी, वस्त्रे व आभूषणे तयार करणे व करवून घेणे, गणित विद्या अवगत नसेल तर हिशेब ठेवणे व इतरांना समजावून सांगणे, आदी वेदादी शास्त्रविद्याविना ईश्वर व धर्म यांना जाणून अधर्मापासून कधीही दूर राहू शकत नाहीत.

    म्हणून जे लोक आपल्या मुलांना ब्रह्मचर्य, उत्तम शिक्षण व विद्या यांच्या द्वारे शरीर व आत्मा यांना

सामर्थ्यपूर्ण बनविण्याची प्रेरणा देतात ते धन्यवादार्ह व कृतकृत्य होत. या शिक्षणामुळे मुले आईवडील, पती, सासू, सासरा, राजा, प्रजा, शेजारी, इष्टमित्र आणि मुलेबाळे यांच्याशी यथायोग्य धर्माप्रमाणे वर्तन करतील विद्या हाच अक्षय कोष (खजिना) आहे. जो जितका खर्चावा तितका वाढत जातो. इतर सर्व कोष खर्च केल्याने घटत जातातशिवाय वारसदारही आपापले वाटे काढून घेतातपरंतु विद्यारूपी भांडाराची चोरी किंवा त्याचा कुणीही वारसदार होऊ शकत नाही. या कोषाचे रक्षण व वृद्धि करण्याची जबाबदारी घेणारी विशेषतः राजा व प्रजा ही असते.

कन्यानां सम्प्रदानं च कुमाराणां च रक्षणम्।। मनु०. अ.७।।श्लो. १५२।।

सर्व कुमार व कुमारिका यांना अमुक काळापासून अमुक काळापर्यंत ब्रह्मचर्य पाळावयास लावणे व विद्वान बनविणे हे राजास योग्य आहे. या राजाज्ञेचे पालन जे करणार नाहीत त्यांच्या आईवडिलांना शिक्षा करणे उचित होय. आठव्या वर्षांनंतर मुलामुलांना घरी न ठेवता राजाज्ञेने आचार्यकुलामध्ये ठेवावे. समावर्तनाची वेळ येईपर्यंत कोणीही लग्न करू नये.

सर्वेषामेव दानानां ब्रह्मदानं विशिष्यते। वार्यन्नगोमहीवासस्तिलकाञ्चनसर्पिषाम्।। मनु०. अ. ४ ।। श्लो. २२३ ।।

जल, अन्न, गाय, पृथ्वी, वस्त्र, तीळ, सुवर्ण व तूप इत्यादी जितकी दाने जगात आहेत त्या सर्वांहून वेदविद्येचे दान हे अत्यंत श्रेष्ठ आहे, म्हणून विद्यावृद्धीसाठी तन मन धनाने होईल तेवढा प्रयत्न करावा. ज्या देशात यथायोग्य ब्रह्मचर्य, विद्या आणि वेदोक्त धर्म यांचा प्रचार होत असतो तो देश सौभाग्यशाली होत असतो.

     या प्रकरणात ब्रह्मचर्याश्रमातील शिक्षणाविषयी संक्षेपाने लिहिले आहे. या नंतरच्या चौथ्या समुल्लासात

समावर्तन, विवाह व गृहस्थाश्रमाचा उपदेश यांची चर्चा करण्यात येईल.

इति श्रीमद्दयानन्दसरस्वतीस्वामिकृते सत्यार्थप्रकाशे सुभाषाविभूषिते शिक्षाविषये

तृतीयः समुल्लासः सम्पूर्णः।।३।।