संपूर्ण बाळकराम/संगीत मूकनायक

विकिस्रोत कडून

अंक पहिला

प्रवेश पहिला

(स्थळ : विक्रांताच्या घरातील माजघर. पात्रे: ठमाबाई, उमाबाई, भामाबाई, चिमाबाई वगैरे बायका व आवडी, बगडी वगैरे परकर्‍या पोरी, बाळंतपदर घेतलेली व पिवळीफिक्कट अशी विक्रांताची आई, मध्यंतरी टांगलेला पाळणा*; पाळण्यात बारा दिवसांचा विक्रांत.)

सर्व बायका : पद - (चाल- हजारो वर्षे चालत आलेलीच.) गोविंद घ्या कुणी। गोपाळ घ्या कुणी। गोविंद घ्या कुणी। गोपाळ घ्या कुणी। ('नाही मी बोलत नाथा' हा चरण जितके वेळा म्हणण्याचा साधारणपणे प्रघात आहे तितके वेळा हेच एकसारखे, प्रेक्षकांस कंटाळा येईपर्यंत घोळून म्हणतात.)

ठमाबाई : (उमाबाईच्या कानाशी कुजबुजतात.) उमाबाई, बख्खळ पोरे बघितली, पण असले चिन्ह नव्हते बघितले बाई कधी! चांगले बारा दिवसांचे पोर- पण रडतसुध्दा नाही अजून! आज बारसे ना?

उमाबाई : (तसेच करून) नसेल रडत मेले. रडेल उद्या चार दिवसांनी! जिवासारखा जीव काय रडल्यावाचून राहील?

चिमाबाई : (की ज्यांना हा संवाद आगंतुकपणाने ऐकिलेला आहे, त्याही तसेच करून) अहो, कुठले रडते आहे ते? उमाबाईंना आपले काहीतरी संपादून घ्यायला हवे! म्हणे रडेल! रडायला जीव आहे कुठे त्या पोरात? अन् म्हणे रडेल. बरे रडेल ते? रडेल म्हणे रडेल!

भीमाबाई : (विक्रांताचे आईस) नाव काय ठेवायचे म्हणालात?

विक्रांतची आई : विक्रांत!

ठमाबाई : हे असले कसले बाई नाव?

विक्रांतची आई : तिकडून सांगायचे झाले आहे ना! ( ते नाव ठेवतात. पडदा पडतो.)

  • टीप: हे पात्राचे नाव नाही.

- नाटककर्ता

प्रवेश दुसरा

(स्थळ : सरकारी मराठी शाळा. पात्रे, हेडमास्तर, विक्रांताचा बाप, हातात एक लहानशी कोरी पाटी घेऊन व डोक्याला पांढरी कानटोपी घालून उभा असलेला विक्रांत, उमर वर्षे 5.)

विक्रांताचा बाप : आपल्या चरणावर घातला आहे, आता जरा लक्ष-

हेडमास्तर : बिगारीत बसवा नेऊन त्याला!

विक्रांतचा बाप : बरे. (विक्रांतासह जातो. पडदा पडतो.)

प्रवेश तिसरा

( स्थळ: विक्रांताच्या घरातील माजघर, संध्येची सामग्री घेऊन बसलेला व सोवळयाची लंगोटी नेसलेला विक्रांत- उमर वर्षे 7॥.)

विक्रांत : (हातवारे करीत मनातल्या मनात संध्येतील शब्द पुटपुटतो.) (काही वेळ गेल्यावर)

विक्रांतची आई : (स्वयंपाकघरातून) अरे विकू, पान वाढले रे!

विक्रांत : (घाईघाईने दोन आचमने टाकून पळत जातो; वाटेत चिरगुटावर पाय पडतो; तो घाबरून इकडे तिकडे पाहतो व तसाच स्वयंपाकघराकडे जातो.) (पडदा पडतो.)

प्रवेश चौथा

(स्थळ : रस्ता. पात्रे : पाटीदप्तरे घेऊन शाळेतून घरी जात असलेला विक्रांत, प्रतोद वगैरे मुले.)

(विक्रांत- उमर वर्षे 12. विक्रांत अजागळासारखा चालत आहे. मध्येच प्रतोदला त्याचा धक्का लागतो व प्रतोदची दौत पडते.)

प्रतोद : विकर्‍या, लेका दौत सांडलीस, नाही?

विक्रांत : (केविलवाण्या नजरेने प्रतोदकडे पाहतो.)

प्रतोद : (काही न छापण्याजोगे (अप)शब्द हासडून) डोळे फुटले होते का? (विक्रांतच्या दोन तीन थोतरीत ठेवून देतो.)

विक्रांत : (मोठयाने रडू लागतो.)

प्रतोद : (होलिकासंमेलन कमिटीच्या सभासदांना न रुचणारे शब्द वापरून) रड लेका. आणखी एक तडाखा घेऊन ठेव तिसर्‍या प्रहराच्या फराळासाठी अन् हवा तसा रड! (थप्पड मारावयास जातो.)

विक्रांत : (सूं बाल्या ठोकतो.)

प्रतोद : हट् लेका भागूबाई! (पडदा पडतो.)

प्रवेश पाचवा

(स्थळ : विक्रांताच्या घराची ओटी. पात्रे : विक्रांत, विक्रांतची बहीण रोहिणी, तिचा नवरा शरच्चंद्र, शेजारची वेत्रिका, विक्रांतला दाखविण्यासाठी आणलेली सरोजिनी, सरोजिनीच्या गळयात तिच्या आईची गळसरी, कानात प्रमद्वरेच्या मोठाल्या बुगडया, डोळयांत फारच काजळ.)

वेत्रिका : अगं सरे, अशी गुडघ्यात काय मान घालतेस? अंमळ वर बघ तरी! तो बघ- समोर होता कोनाडा- त्याच्याकडे बघ.

रोहिणी : अरे विकू, तू तरी असा इकडे तिकडे काय बघतोस? सरीकडे पाहा एकदा! आज ती तुला दाखवायला आणली आहे.

शरच्चंद्र : हं, विक्रांत, सांग लवकर, पसंत आहे ना ती तुला ही मुलगी?

(एकदम माजघरातून विक्रांतचा बाप येतो.)

विक्रांतचा बाप : अगं रोहिणी, हा काय पोरखेळ मांडला आहे नसता? लग्नाआधी मुलाने मुलगी बघितल्याचे बघितले आहे का अजून कुणी? शरोबा, असले भलतेच केले तर जनरीत सुटेल ना?

शरच्चंद्र : नाही, म्हटले आपले अलीकडच्या रीतीप्रमाणे मुलाने मुलगी बघून पसंत केली म्हणजे जरा-

विक्रांतचा बाप : अहो, म्हणजे जरा काय? लग्नाच्या गोष्टी पोरासोरी का ठरवायच्या आहेत? अहो, मी याचा बाप ना? प्रत्यक्ष मी पसंत केली ना मुलगी- मग याचा बाप पसंत करील मुलगी! अन् ए हणमोबा, तुला तरी असा जेठा मारून बसायला लाज नाही रे वाटली? ऊठ. (सर्व जाऊ लागतात. आधी विक्रांतचा चेहेरा व मग पडदा पडतो.)

प्रवेश सहावा

(स्थळ : लग्नमंडप. पात्रे : अशा वेळी साधारणपणे लागण्याइतकी.)

भिक्षुक : तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव! .... शुभलग्न सावधान!*

(मंडळी अंदाजाने अक्षता उधळतात, भिक्षुक अंतरपाट काढून घेतात, शरच्चंद्र विक्रांतची मानगूट वाकवितो. प्रमद्वरा सरोजिनीला उचलते. सरोजिनी विक्रांतच्या डोक्यावर माळ टाकिते.)

बरेचजण : (आवेशाने व कोल्हेकुईने) अरे, वाजवा रे! (पडदा पडतो.)

अंक पहिला समाप्त

  • माझी पुरी खात्री आहे की, ऐन गडबडीमुळे या श्लोकाचे पुढील दोन चरण

अजून कोणीही नीटसे ऐकलेले नाहीत. - नाटककर्ता.


अंक दुसरा


प्रवेश पहिला


(स्थळ: सरकारी मराठी शाळा. पात्रे: दिपोटी, जरा बाजूस हेडमास्तर, त्यांच्या मागे उत्कंठित असा विक्रांतचा बाप. मुलांची परीक्षा चालली आहे, विक्रांत दीपोटीच्या पुढे उभा आहे.)

दिपोटी : वांदिवाशची लढाई कधी झाली?

विक्रांत : (बुचकळयात पडतो.)

दिपोटी : काळीचा वसूल करण्याची अकबराची रीत काय होती?

विक्रांत : (काळा पडतो.)

दिपोटी : छट्टू कधी मेला?

विक्रांत : (त्याला मेल्यापरीस मेल्यासारखे होते.)

दिपोटी : पेशवाई बुडविल्याचे खापर कोणाच्या माथी फुटते?

विक्रांत : (डोके खाजवितो.)

दिपोटी : पिवळा समुद्र कुठे आहे?

विक्रांत : (त्या समुद्रात बुडाल्याप्रमाणे गुदमरतो.)

दिपोटी : पाणलोट कशाला म्हणतात?

विक्रांत : (डोळयांतून घळघळा पाण्याचे लोट वाहू लागतात.)

दिपोटी : (काही लिहित) आपल्या जागेवर जाऊन बसा.

विक्रांत : (मटकन् खाली बसतो.)

विक्रांतचा बाप : (हेडमास्तरांस एकीकडे) काय झाले?

हेडमास्तर : (हळूच) नापास!

विक्रांतचा बाप : हत् दळभद्र्या! (पडदा पडतो.)


प्रवेश दुसरा


(स्थळ: विक्रांतच्या घरातील एक खोली. पात्रे: विक्रांत- उमर वर्षे 17. खोलीच्या बाहेर थोडी कुजबूज. थोडा वेळ गेल्यावर कोणी बाहेरून खोलीत ढकललेली सरोजिनी प्रवेश करते.) सरोजिनी : (मुळूमुळू रडते.)

विक्रांत : (गोंधळून जातो.) (पडदा पडतो.)

प्रवेश तिसरा


(स्थळ: मामलेदाराची कचेरी. पात्रे: गादीवर ऐसपैस हातपाय पसरून पडलेले अजम रावसाहेब मामलेदार. हात जोडून उभा असलेला विक्रांतचा बाप; जवळच हातपाय गळून गेले आहेत ज्याचे, असा विक्रांत- उमर वर्षे 20.) विक्रांतचा बाप : परीक्षा वगैरे काही नाही साहेब; पण-

मामलेदार : मग इथे काय बळी द्यायचा आहे? जा, पोसवत नसला तर पांजरपोळात नेऊन घाला!

विक्रांतचा बाप : रावसाहेबांनी थोडी दया केली तर होण्यासारखे आहे! कुठे उमेदवारीत चिकटवून दिला-

मामलेदार : कशाने चिकटवून देऊ? गोंदाने का सरसाने? अरे, तुम्हा लोकांना नोकरी म्हणजे का परडयातील भाजीबिजी वाटते की काय?

विक्रांतचा बाप : रावसाहेबांची आम्हास मोठी आशा आहे; बापूसाहेबांनी हे पत्र दिले आहे आपल्याजवळ द्यायला! (एक पत्र देतो.)

मामलेदार : (पत्र वाचताच त्यांचा चेहेरा निवळत जातो.)

विक्रांतचा बाप : (आशेने त्यांच्याकडे पाहतो; त्यांच्या चेहे-याशी याच्या चेहे-याचे जमत जमत जाते.)

मामलेदार : अरे, मग हे आधी का नाही दाखविलेस पत्र? ठीक आहे. उद्यापासून बारनिशीकडे लावतो याला.

विक्रांतचा बाप : (आनंदाने मामलेदाराचे पाय धरतो.) (पडदा पडतो.)


प्रवेश चवथा


(स्थळ: विक्रांताचे घर. पात्रे: विक्रांत-उमर वर्षे 40. कचेरीतील काम घरी करण्यासाठी आणलेले पाहात बसला आहे. त्याच्या बायकोला वेळोवेळी मिळालेला संततीविषयक आशीर्वाद संस्थेच्या दृष्टीने सफल झालेला आहे. त्या आठ पोरींची मधून आवकजावक.)

विक्रांत : (पुढे पडलेल्या कागदांकडे पाहात आहे.)

पोर नं. 3 : बाबा, मला भूगोलपत्रक आणायचे आहे!

पोर नं. 2 : मला एक कचकडयाची फणी पाहिजे.

पोर नं. 1 : माझी धोतरे फाटली आहेत.

पोरे नं 1 ते 8 : (आलटून पालटून राष्ट्रीय सभेच्या एका वर्षाच्या ठरावांइतक्या मागण्या पुढे करतात.)

विक्रांत : (सरकारप्रमाणे तटस्थ असतो.)

सरोजिनी : (स्वराज्याच्या मागणीपेक्षाही जरा जोराच्या निकडीने) आज तांदूळ नाहीत, संध्याकाळला.

विक्रांत : (पार्लमेंटपेक्षाही शांतवृत्तीने मूग गिळून बसतो.) (पडदा पडतो.)


प्रवेश पाचवा

(स्थळ: कचेरी. पात्रे: अजम रावसाहेब मामलेदार आणि विक्रांत.)

मामलेदार : इतकी वर्षे काम करीत आहात तरी ही अशी चूक अजून होतेच आहे तुमच्या हातून. काय म्हणावे तुम्हाला?

विक्रांत : (मुंडी खाली घालतो.)

मामलेदार : अहो, ही चूक म्हणजे काय समजता तुम्ही? हिचा परिणाम काय होतो माहीत आहे का?

विक्रांत : (भेदरतो.)

मामलेदार : फार, फार मोठी गंभीर चूक आहे ही!

विक्रांत : (सर्द होतो.)

मामलेदार : केवढा दंड होतो अशा गाढवपणाने ठाऊक आहे?

विक्रांत : (सर्दी वाढते.)

मामलेदार : एक महिन्याचा पगार दंड होतो खाड्दिशी!

विक्रांत : (सर्दीची जोराची वाढ.)

मामलेदार : शिवाय, खटलासुध्दा करता येतो अशाने.

विक्रांत : (गोठू लागतो.)

मामलेदार : अहो, आहात कुठे? वर्ष दीड वर्षाची ठेप व्हायची ना एखादे वेळी?

विक्रांत : (आईस्क्रीम होतो.)

मामलेदार : आता आम्हीच आहोत म्हणून बरे आहे.

विक्रांत : (बर्फाचे पुन्हा रक्तमांस होऊ लागते.)

मामलेदार : जा, पुन्हा काळजीने लिहून आणा ते सगळे!

विक्रांत : (पहिल्यासारखा शाबुत.)

मामलेदार : (कागदांचे बिंडोळे टाकतात, विक्रांत ते उचलू लागतो.) (पडदा पडतो.)


अंक दुसरा समाप्त


अंक तिसरा


प्रवेश पहिला


(स्थळ: कचेरी. पात्रे: विक्रांत- उमर वर्षे 50. इतर कारकून कामात.)

विक्रांत : (पेन्शनीत येतो.) (विक्रांत पेन्शनचा हुकूम घेऊन जातो. पडदा पडतो.)


प्रवेश दुसरा

(स्थळ: विक्रांताचे घर. पात्रे: आजारी पडलेला विक्रांत- उमर वर्षे 55. भोवताली आप्तइष्ट मंडळी, वैद्य.)

आप्त : (दुस-यास हळूच) आता आशा दिसत नाही, काही सांगावयाचे आहे का विचारावे आता!

2 रा आप्त : विचारतो बरे मीच. (उठू लागतो.)

वैद्य : (अगदी हळू पण जरा दटावून) अहो, आता काय विचारता? वाचा बंद पडलीसुध्दा!

3 रा आप्त : (ह्याच्या नाकाशी धरलेले सूत काढून अर्थपूर्ण नजरेने इतरांकडे पाहतो, सुस्कारा टाकतो व जरा डावीकडे मान चढवून खूण करतो. बायकांत एकदम रडारड, पुरुष मंडळी त्या मुडद्यापेक्षाही गंभीर.) (पडदा पडतो.)

प्रवेश तिसरा

(स्थळ: मसणवटी. पात्रे: ताटी वर करून उचलून सरणावर घातलेला विक्रांत, इतर मंडळी सरण पेटवितात.)

मंडळी नं. 1 : चला झाले! संपला त्यांचा आपला ऋणानुबंध!

मंडळी नं. 2 : एक चांगला मनुष्य गेला! कोणाच्या अध्यात ना मध्यात! कधी खटखट नाही की कधी ठकठक नाही! उभ्या जन्मात याच्या हातून चारचौघांनी नावे ठेवण्यासारखे काही झाले नाही तेवढया आठ मुलांखेरीज, (चिता धडकते. तिच्या जाळाने पडदा पेटून जळतो.)

खेळ खलास!