Jump to content

संपूर्ण बाळकराम/नाटक कसे लिहावे

विकिस्रोत कडून

नाटकाच्या धंद्यात मोरावळयाप्रमाणे मुरलेल्या माझ्या एका सन्मान्य मित्राने मराठी नाटयविदृक्षु लोकांस 'नाटक कसे पाहावे?' हे सांगण्याचा यत्न केला आहे. हेच गृहस्थ भावी मराठी लेखकांना 'नाटक कसे लिहावे?' याविषयी काही धडे देणार आहेत असे माझ्या कानावर आले आहे. त्यावरून सदरहू विषयासंबंधीचे माझे विचार मी सध्या प्रसिध्द करीत आहे. वर सांगितलेल्या गृहस्थास किंवा या विषयावर लिहू इच्छिणार्या दुसर्या कोणासही माझ्या या विचारांचा मनमुराद फायदा घेता यावा म्हणून मी मुद्दाम या विचारांचे 1837 च्या 25 व्या आक्टान्वये सर्व हक्क राखून ठेविले नाहीत! नाटक लिहू इच्छिणार्या भावी तरुणास तर हा लेख फारच उपयोगी आहे. यातील सूचनांच्या योग्य विचाराने जे नाटक लिहिले जाईल ते सध्याच्या नाटकग्रंथांच्या मालिकेत बसावयास पात्र झाल्याखेरीज राहणार नाही.


नाटक लिहावयाचा विचार कायम ठरल्यानंतर सहा महिनेपर्यंत रोज या विचाराच्या निश्चयाबद्दल निजावयाचे पूर्वी तीन तास विचार करावा. कोणतीही गोष्ट पूर्ण विचारांती करावी असे वृध्दाचे म्हणणे आहे. अशा प्रकारे वागत गेल्याने केवळ नाटक लिहिण्याचा आपला हेतू पूर्ण विचारांती ठरविण्यात आलेला असतो; इतकेच नाही, परंतु या सहामाहीतील झोपसुध्दा दररोज तीन तासांच्या पूर्ण विचारांती घेतली जाऊन एका दगडाने दोन पक्षी मारल्याचे श्रेय पदरी येते. सहा महिने हा निश्चय जर कायम राहिला तर मग पुढील कार्यक्रमास सुरुवात करावी आणि जर निश्चय सहा महिन्यांच्या आतच ढासळून पडला, तर पुढे नाटक न लिहिण्याचा निश्चय करून टाकावा व हा दुसरा तरी कायम राहतो की नाही याबद्दल पुन्हा सहा महिने खात्री करून घ्यावी. सहा महिनेपर्यंत एकाच निश्चयाला चिकटून बसण्याइतके स्थैर्य मनाला नसले तर पुन्हा हीच विचारांची आवर्तने चालू ठेवावीत. वर्षाच्या एका सहामाहीत दक्षिणेच्या एका टोकाला पोहोचून पुन्हा हळूहळू उत्तरेकडे मोर्चा फिरविणार्या व दुसर्या सहामाहीत याच्या उलट प्रवास करणार्या सूर्यनारायणाप्रमाणे आपल्या मनाला असे विचारांच्या क्रान्तीमधून फिरवीत गेल्याने काही काळाने तरी (अर्थात् आपण मध्येच मेलो नाही तरच) आपला कोणता तरी एक विचार कायम होतो.



घटकाभर असे धरून चालू या, की नाटक लिहावयाचा आपला विचार एकदाचा कायम झाला आणि इतक्या अवधीत आपण मेलोही नाही; मग पुढे काय करावयाचे? सबंध नाटक आपल्या हातून पूर्ण होईपर्यंत आपण खास मरत नाही अशी एखाद्या ज्योतिर्विदाकडून चांगली खात्री करून घ्यावी. का की, असे अपूर्ण नाटक टाकून गेल्याने ते पूर्ण करण्याची पुष्कळच लोकांस अनावर इच्छा उत्पन्न होते आणि शेवटी आपल्या नाटकाची दुर्दशा होते. उदाहरणार्थ, बिचारे 'रामराज्यवियोग'च घ्या ना! एखाद्या छानदार पतंगाचे शेपूट अपुरते झाले म्हणजे मुले त्याला उकिरडयावर पडलेल्या दोनचार लांब लांब धांदोटया बांधतात; त्याप्रमाणेच त्या बिचार्या सुंदर नाटकाच्या तीन अंकी देहाला दोन दोन अंकी चारपाच शेपटे लावण्यात आली आहेत. हा सारा अकाली मरण्याचा परिणाम! खरोखर, बिचार्या किर्लोस्करांना जर पूर्वीच कळते, की आपल्या आवडत्या शेवटच्या नाटकाचा शेवट असा होणार आहे, तर त्यांनी आपला स्वत:चा शेवट इतक्या लौकर कधीही होऊ दिला नसता. असो.

याप्रमाणे जगण्याची खात्री झाल्यावर आपल्याला बालबोध लिहितावाचता येते की नाही याची आपल्याशीच नीट चौकशी करावी. येत नसल्यास शिकावे. त्याखेरीज स्वत:चे नाटक लिहिता येणार नाही व दुसर्याची नाटके वाचता येणार नाहीत. शुध्दलेखनाच्या नियमांची फारशी माहिती नसली तरी चालते; कारण त्याबद्दलच्या चुकांचे खापर छापखानेवाल्याच्या डोकीवर फोडता येते. जेवताना ताटाच्या आजूबाजूस पडलेल्या शितांची जबाबदारी जशी वाढणाराच्या माथी लादावयाची रीत आहे तशीच पुस्तकांतील शुध्दलेखनाच्या चुकांची जबाबदारी टाईप जुळविणार्याच्या माथी लादावयाची वहिवाट आहे; म्हणून कंपोझिटरला कसे तरी वाचता येण्याजोगे लिहिता व दुसर्याच्या नाटकातून साधारण विचार चोरता येण्याजोगे वाचता येऊ लागले म्हणजे पुढे इंग्रजी अभ्यास सुरू करावा. याचा उपयोग पुढे कळेल. शाळेतल्या मठ्ठ विद्यार्थ्यांना साधारण इंग्रजी बोलताचालता (इंग्रजी चालायचे कसे?)यायला जरी पाच वर्षे लागत असली तरी आपल्याला शिक्षकाच्या मदतीवाचून उत्तम इंग्रजी 20/30 दिवसांतच येण्याचे राजमार्ग अलीकडे काही पुस्तककर्त्यांना सापडले आहेत. वीसतीस दिवसांत एखाद्या परक्या भाषेचे ज्ञान होणे अशक्य आहे असे कोणास वाटेल; पण असे वाटण्याचे कारण नाही. याहीपेक्षा मोठाल्या गोष्टी अगदी थोडया मुदतीत आटोपल्याची उदाहरणे आहेत. एवढे मोठे भारती युध्द पण सार्या अठरा दिवसांतच आटोपले! आपल्या 'नाटक्या'चा राजा कालिदास इतके सारे शिक्षण एका रात्रीतच शिकला. आपणही पर्यायाने त्याचेच 'बच्चे' आहोत हे विसरता कामा नये. आपले राजमार्ग शोधून काढणारे बहाद्दरसुध्दा कालिदासांच्या आख्यायिकेतील नायिका जी 'काली' तिला हार जाण्याजोगे नाहीत. परंतु या पुस्तकांवरून इंग्रजी शिकलेला कोणी आधुनिक 'कालिदास' मात्र अजून दिसून आला नाही. असा जर कोणी असेल तर त्याची योग्यता मात्र लाकडाच्या द्रोणगुरूपासून धनुर्विद्या शिकणार्या किराताइतकी आहे यात शंका नाही. या रीतीने इंग्रजी भाषा साध्य करून घ्यावी. आपल्या मराठी भाषेची आई जी संस्कृत ती आपोआपच येते असे म्हणतात; आणि ते खरेही असावे; कारण ती आपली 'मोठी आईच' असते.

हे ज्ञानसंपादन झाल्यावर नाटक लिहिण्यासाठी थोडे कोरे कागद, लेखण्या, शाई, दौत वगैरे सामान बाजारातून विकत आणावे. हे मात्र कोणाचे चोरलेले नसावे. कारण असा माल चोरल्याबद्दल खटला होऊ शकतो. ही तयारी नेहमी जय्यत असावी. कवीला स्फूर्ती केव्हा होईल याचा नेम नाही.

इतकी बाह्य व्यवस्था झाल्यानंतर नाटकाच्या अंतर्गत व्यवस्थेकडे लक्ष देण्यास ठीक पडते. कोणत्याही ग्रंथास प्रस्तावनाही असावीच लागते. हिंदुस्थानच्या नकाशात खुद्द हिंदुस्थानच्या जोडीला जशी लंका असावयाचीच तशी पुस्तकाच्या मुख्य भागाला प्रस्तावनेची जोड ही असावयाचीच. 'प्रस्ताव' 'हेतू' 'उद्देश' 'धर्म' 'हार्द' 'हृदगत' 'दोन शब्द' आणि 'आधी इकडे पाहा' ही प्रस्तावनेची निरनिराळी नावे आहेत. यातील शेवटली तीन ग्रंथकाराची सुधारणाप्रियता व जुन्या चालीरीतीबद्दल तिटकारा दाखविणारी आहेत. प्रस्तावनेला आताच सिलोन बेटाचा दृष्टान्त दिला आहे त्याच्या समर्थनार्थ प्रस्तावनेचे व बेटाचे असलेले विशिष्ट साधर्म्य पुढे नमूद केले आहे. प्रस्तावनेची व्याख्या पुष्कळशी बेटाच्या व्याख्येच्या स्वरूपाची आहे. दोन्ही बाजूस कोरी पाने असून मध्ये जी मजकुराने भरलेली पाने असतात त्यात 'प्रस्तावना' असे म्हणावे. यापेक्षा प्रस्तावनेची अधिक मर्यादित व्याख्या करणे शक्य नाही. कारण प्रस्तावनेतील मजकूर अमुकच एक प्रकारचा असावा अशातला काही निर्बंध नाही. ग्रंथ लिहिण्याचे कारण, प्रकाशकाने दिलेला त्रास, आपल्या घरची स्थिती, आपल्यावर कोसळलेले प्रसंग, प्लेगाचा त्रोटक इतिहास, इंग्रजी राज्यापासून आम्हास झालेले फायदे, हिंदुस्थानची सामान्य माहिती, गुलामांचा व्यापार, एकंदर जगातील चालू भानगडीचे आटोपशीर स्वरूप, किंवा थोडक्यात म्हणावयाचे असल्यास आपल्या नाटकाची भर करून बाकी उरलेले आपले सर्व ज्ञान प्रस्तावनेत ढकलून देण्याची पूर्ण मुभा असते. प्रस्तावनेची लांबीरुंदी अनियंत्रित आहे. कमीत कमी एक शब्द आणि जास्तीत जास्त आपणाला लिहवेल तितके हेच काय ते तिचे प्रमाण आहे. काही काही प्रसंगी तर मूळ पुस्तकापेक्षा प्रस्तावनेचाच पसारा जास्त दिसून येऊन 'धन्याचे नाव गण्या आणि चाकराचे नाव रुद्राजी' या म्हणीची आठवण होते. अशा ठिकाणी पुस्तकासाठी प्रस्तावना की प्रस्तावनेसाठी पुस्तक ह्या बिकट प्रश्नाचे उत्तर वाचकांच्या कल्पनाशक्तीशी लपंडाव खेळल्याखेरीज राहात नाही. एका प्रसिध्द इंग्रजी नाटकाच्या मराठी भाषांतराला तर अशी प्रस्तावना आहे की, त्या विद्वान ग्रंथकाराला त्याच्या भाषांतरापेक्षा त्या प्रस्तावनेबद्दल अधिक शाबासकी द्यावीशी वाटते. या भाषांतरासंबंधी बोलत असताना मंडळी जेव्हा भाषांतर आहे साधारण, पण प्रस्तावना काय झोकात लिहिली आहे असे म्हणून खूष होत असते; त्या वेळी 'मुलगी आहे साधारणच, पण हुंडाकरणी मात्र चोख आहे' असे म्हणून व्याह्यांचे अभिनंदन करणार्या वऱ्हाडी मंडळींची अल्पसंतुष्टता मूर्तिमंत डोळयांपुढे उभी राहते. प्रस्तावनेत अमुकच गोष्टी असल्या पाहिजेत अशातला काही नियम जरी नसला, तरी कर्त्याने काही गोष्टी स्वत:च्या फायद्याकरिता म्हणून अवश्यमेव नमूद कराव्या. कर्त्याच्या काही विद्वान मित्रास हे नाटक पसंत पडल्यावरून ... या आरंभाचे एक वाक्य प्रस्तावनेत असावे. आपले सर्व मित्र आपल्यासारखेच (!) असल्यास त्यांना नाइलाजास्तव 'विद्वान' ही पदवी द्यावी. आपण नाटक गोगलगाईच्या गतीने लिहिले असले तरी देखील 'घाईघाईने शेवटचे प्रवेश लिहून' ते छापून काढिले आहे असे स्पष्ट म्हणावे. या वाक्यांच्या जोरावर नाटकाच्या निदान शेवटच्या भागाच्या गचाळपणाबद्दल टीकाकारांशी भांडता येते; निदान टीकाकारांना तरी आपली दया येते. शिवाय टीकाकारांचे निर्बीज करण्याचा आणखी एक मार्ग आहे. आपल्या नाटकाची हस्तलिखित प्रत टीकाकार होण्याजोगे जे लोक असतील त्यांच्याकडे पाठवावी व नंतर प्रस्तावनेत 'कित्येक उपयुक्त सूचना करून परोपरीने साह्य केल्याबद्दल' त्यांचे आभार मानावेत; म्हणजे ते लोक आयतेच गप्प बसतात. पुस्तक छापून झाल्यावर त्यांना एक एक प्रतीची खंडणी पाठविण्यास मात्र चुकू नये. आभाराच्या मसुद्यात 'कर्त्याचे काही विद्वान उपपदधारी मित्र (ज्यांची नावे येथे घालता येत नाहीत) हे शब्द असलेले विशेष शोभादायक होतात. या आभाराच्या मालिकेत जितके मणी जास्त तितके उत्तम. लिहितावाचता येणार्या सर्वच लोकांचा समावेश जर तिच्यात करता येत असेल तर सोन्याहून पिवळे! कारण मग टीकाकारांचे भय मुळीच उरत नाही. एका ठिकाणी तर ही यादी इतकी लांबलचक होती की, ही नावे आगाऊ प्रती घेणारांची असावीत असेच मला वाटले, व त्या दृष्टीने ती यादी साधारण लहानच वाटून कर्त्याच्या दुर्दैवाबद्दल मला वाईट वाटले, परंतु खरा प्रकार कळताच त्याच्या जगन्मित्रत्वाबद्दल उलट आनंद वाटला. त्याचप्रमाणे फुकट प्रती वाटण्याचाही फायदा मोठा आहे. माझ्या एका नाटककार मित्राने आपल्या एकूण एक शत्रूंना व बहुतेक मित्रांना नाटकाची एक एक प्रत पाठवून दिली. त्याचा परिणाम असा झाला की, त्या पुस्तकावर एकही प्रतिकूल टीका आली नाही, परंतु 'भेटी' देण्यात पहिली आवृत्ती सबंध संपून विक्रीसाठी त्याला ताबडतोब दुसरी आवृत्ती काढण्याची पाळी आली आहे. एवढे मात्र यात थोडे गौण झाले आहे. असो. प्रस्तावनेसंबंधी इतकी माहिती पुरे आहे. अर्पणपत्रिका असली नसली तरी सारखीच. असल्यास मात्र तिच्यात 'परवानगीवाचून' हा शब्द असावा.

याप्रमाणे प्रस्तावनेदाखल 'प्रस्तावने'पर्यंतच लिहून प्रस्तुत पत्र आता पुरे करतो. पुढील 'ईशस्तुती'पासून सुरुवात करीन.

आपला 'सवाई नाटकी'

ता.क.- 'सवाई नाटकी' हे माझे नाव पाहून 'मनोरंजना'तील 'नाटकी' कदाचित् रागावतील; परंतु 'सवाई' हा शब्द मी 'नाटकी' याच्यावर ताण करण्यासाठी वापरला नाही. एका नावाचा एक मनुष्य होऊन गेल्यावर त्याच नावाचा दुसरा कोणी असल्यास त्या नावाला 'दुसरा (the second)' हे शेपूट जोडण्याचा प्रघात आहे; पण ही इंग्रजी रीती आहे. 'बहिष्कार'-योगाचे वेळी हिचा उपयोग करणे इष्ट नाही म्हणून मी मराठी रीत उचलली आहे. 'थोरल्या' माधवरावांनंतर 'सवाई' माधवराव झाले ही गोष्ट सर्वांस मशहूरच आहे. त्या प्रकारात चढाओढ नव्हती हे कोणीही कबूल करील. 'स.ना.'