Jump to content

संपूर्ण बाळकराम/नाटक कसे पहावे

विकिस्रोत कडून

पूर्वार्ध

काही वर्षांपूर्वी 'केसरी' पत्रात एका पुस्तकाबद्दल विनोदात्मक, परंतु मनन करण्यासारखा अभिप्राय आला होता. त्या पुस्तकाचे नाव 'जेवावे कसे' हे होते. केसरीकारांनी त्या पुस्तकाच्या बरेवाईटपणाकडे फारसे लक्ष न देता त्याच्या अकालदर्शनाबद्दल मात्र अभिप्राय दिला होता. सध्या लोकांपुढे 'जेवावे कसे' हा प्रश्न नसून 'जेवावयाचे मिळवावे कसे' हा आहे. अशा आधाराने केसरीकारांनी त्या पुस्तकाच्या अप्रयोजकतेचा उल्लेख केला होता. कधी कधी अनुभवी मनुष्याकडून वरील लेखकाप्रमाणे मौजेच्या चुका घडून येतात. 'रंगभूमी'च्या संपादकांनी 'ग्रंथसार' या नात्याने हीच चूक केली आहे. 'नाटक कसे पाहावे?' या प्रश्नाचा ऊहापोह करण्यासाठी त्यांनी सबंध एक पुस्तक लिहिण्याचे श्रम घेतले आहेत; पण दिलगिरीची गोष्ट आहे की, त्यांनी या प्रश्नाची केवळ उत्तरार्धाचीच बाजू घेतली आहे आणि मूळ महत्त्वाची बाजू तशीच ठेविली आहे. नाटकगृहात शिरल्यानंतर या प्रश्नाची बाजू प्रेक्षकांसमोर येते ती इतकी सोपी असते की, एखादा पाच वर्षांचा पोरसुध्दा तिचा उलगडा करील. 'डोळे उघडे ठेवून' हेच या प्रकारच्या प्रश्नाचे सोपे आणि सरळ उत्तर आहे; परंतु नाटकगृहात प्रवेश होण्यापूर्वी, नाटक पाहण्याच्या इच्छेला दाबून टाकणारा हा प्रश्न जेव्हा भावी प्रेक्षकांच्या पुढे उभा राहतो तेव्हा मात्र याचे उत्तर फार बिकट वाटते. ते उत्तर शोधून काढण्याचा सडेतोड मार्ग म्हटला म्हणजे रा. मुजुमदारांचे सहा आण्यांचे पुस्तक घेणे हा नसून चारसहा आण्यांचे नाटकाचे तिकिट घेणे हा असतो; परंतु शाळेत गणिताचे उत्तर जसे दोन रीतींनी शोधून काढता येते त्याचप्रमाणे प्रस्तुत प्रश्नाचे उत्तरही दोन रीतींनी शोधून काढिता येते. गणिताचा पहिला प्रकार जसा स्वत:ची अक्कल खर्चून उत्तर शोधून काढणे, तसा या प्रश्नाचा पहिला प्रकार स्वत:चे पैसे खर्चून उत्तर शोधून काढणे; परंतु दुसरा व्यवहारज्ञानाचा प्रकार शेजारच्या पाटीवर नजर फेकून काम साधणे, आणि नाटकी गणिताच्या उत्तराचा दुसरा प्रकार शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या वशिल्याने काम साधणे हा होय. या रीतीने नाटक पाहण्याचे अनेक मार्ग आहेत. ते सर्वच येथे नमूद करण्याचा विडा मी उचलीत नाही. नाटकाच्या धंद्यात पडल्यामुळे जे अगदी ठळक रीतीने माझ्या निदर्शनास आले आणि ज्यांच्या सफलतेबद्दल माझी खात्री झालेली आहे ते शेलके मार्गच माझ्या वाचकांच्या फायद्यासाठी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. याखेरीज अन्य मार्ग शोधून काढण्याचा माझ्या वाचकांनी प्रयत्न केल्यास माझी आडकाठी नाही. रा. मुजुमदारांनी हाती घेतलेल्या प्रश्नाचा प्राथमिक विचार मी करीत असल्यामुळेच मी माझ्या निबंधाच्या मथळयाला 'पूर्वार्ध' ही संज्ञा दिली आहे. एखाद्या पुस्तकाचा उत्तरार्ध आधी निघून नंतर पूर्वार्ध निघाल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे, हेही वाचकांना त्यातल्या त्यात लक्षात ठेवण्यासारखे आहे.

पैसे खर्चून नाटक पाहावयाचे नाही आणि नाटक पाहिल्यावाचून तर राहावयाचे नाही असा दुहेरी निश्चय केल्यानंतर संध्याकाळी सात वाजण्याचे सुमारास आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून घराला रामराम ठोकावा. ही इष्टदेवता अर्थात् नाटक दाखविण्याजोग्या व्यक्तीखेरीज दुसरी कोण असणार? घरातून निघते वेळी खिशांतून पैशाचे पाकीट- अर्थात असेल तरच- काढून ठेवावयास कधीही विसरू नये. कारण नाटक पाहण्याची हौस काही अंशी समुद्राच्या भरतीप्रमाणे असते. साडेनऊ वाजेपर्यंत ती एकसारखी वाढत असते आणि अगदी साडेनऊ वाजता तर तिची 'समा' होते! सर्व प्रकारच्या प्रयत्नांची पिछेहाट झाली तरी या वेळी नाटकगृहाच्या दरवाजापासून दूर व्हावेसे वाटत नाही! आपल्या आणीबाणीच्या प्रसंगी काहीतरी दैवी चमत्काराने आपल्याला नाटक पाहायला मिळणार अशी निराश आशा या वेळी मनात उत्पन्न होते. पुराणातल्या द्रौपदीवस्त्रहरणासारख्या अद्भूत कथांवर आपला विश्वास नसूनही तशाच एखाद्या प्रसंगाची आपण आतुरतेने अपेक्षा करीत असतो! येणाराजाणारांपैकी प्रत्येकाकडे आपण ओळख पटविण्याच्या तीव्र दृष्टीने न्याहाळीत असतो! नाटकाच्या 'मॅनेजर'ने सहज आपल्यावर दृष्टी टाकली तरी तो आपल्याला बोलावण्याकरिताच पाहतो आहे असा आपल्या वेडया मनाला भास होतो. आपण उत्सुकतेने त्याच्याकडे पाहू लागतो आणि तोंडावर कृतज्ञतादर्शक हसण्याची पेरणी करतो! इतकेच नाही, परंतु शकुंतलालोलुप दुष्यन्ताप्रमाणे बसल्या जागीच आपल्याला त्याच्याजवळ गेल्यासारखे वाटते! अशा या आशेच्या हेलकाव्यात अगदी साडे नावाचा सुमार होतो! तिकडे नाटकाची पहिली घंटा होते; इकडे आपल्या हृदयात उत्कंठतेचा दणदणाट सुरू होतो! तिकडे सूत्रधार पडद्याबाहेर येतो; इकडे आपला प्राण शरीराबाहेर येऊ पाहतो! सारांश, ही वेळ मोठया आणीबाणीची असते! आणखी अशा वेळेस अखेर निराशेने बेफाम होऊन आपण साहजिक पैसे खर्चून नाटक पाहण्याच्या मार्गास लागतो! पण मुळीच पैसे बरोबर न घेण्याची आधीपासूनच सावधगिरी ठेविली म्हणजे या अत्याचारामुळे आपल्या हातून प्रतिज्ञाभंगाचे पातक घडत नाही आणि फुकट नाटक पाहण्याच्या इच्छेप्रमाणे पैसे खर्चून नाटक पाहण्याची इच्छाही त्याच कारणामुळे दबली जाते! एवढयासाठी अशा रीतीने नाटक पाहावयास निघताना नेमाने पैसे घरीच ठेवावेत; त्याप्रमाणेच पैशाबरोबरच लाजलज्जा, भीडमर्यादा, अंत:करण, वाईट वाटण्याची मनाची शक्ती वगैरे सर्व भानगडीसुध्दा घरीच ठेवाव्या; कारण 'दरवाज्या'वरील धक्काबुक्कीत आपल्या नाजूक मालमत्तेचा सांभाळ करणे जड जाते! त्यांच्याऐवजी निर्लज्जपणा, कोडगेपणा यांसारख्या ढाली घेतलेल्या असल्या म्हणजे नाटकगृहाच्या पहारेकऱ्याने शब्दशास्त्रांचा कसलाही मारा केला तरी त्यातून निभावून जाता येते! असो!


अशा प्रकारे 'सशस्त्र तयार' होऊन बाहेर निघाल्यानंतर आपल्या ओळखीच्या नाटकवाल्यांशी संबंध कसा जोडता येईल याविषयी विचार करावा. हा संबंध जोडण्याचे दुवे पुढे चढत्या भाजणीच्या क्रमाने दिले आहेत. परीट, दूधवाला, माळी, दुकानदार, छापखानेवाला, पोस्टमन, म्युनिसिपालिटीचे नोकर, कचेरीतील कारकून, थेटरवाला, रेल्वेकडील लोक व पोलीस अधिकारी. ही खानेसुमारी सर्वांगपरिपूर्ण करावयाची असल्यास, नाटकवाल्यांचे स्नेही व दूरदूरचे आप्त, त्यांना औषध देणारा डॉक्टर, नाटक मंडळीत पूजार्चनासाठी जाणारा ब्राह्मण, नाटकगृहातला चहावाला, त्याच्या शेजारचा विडीवाला, स्टेशनावरचा हमाल, गावातले सुप्रसिध्द गावगुंड, भांडीवाली मोलकरीण आणि दळणवाली या साऱ्या बाजारबुणग्यांची वरील यादीत भरती करावी लागेल! इतक्या लोकांच्या मध्यस्थीने होतकरू प्रेक्षकाला नाटकगृहात प्रवेश करून घेता येतो. अर्थात या सर्व लोकांना तर फुकट नाटक पाहण्याचा हक्कच आहे असे मी समजतो; म्हणून आजच्या लेखात मी या हक्कदार लोकांकडे विशेष लक्ष देत नाही. ज्यांचा नाटक मंडळींशी प्रत्यक्ष संबंध नसून, जे केवळ भूमितीच्या पहिल्या प्रत्यक्षेप्रमाणाच्या मदतीने नाटक पाहतात, त्यांच्या सोईसाठीच आजचा प्रयत्न आहे हे वाचकांनी विसरता कामा नये.

या हक्कदारांपैकी ज्याचा आपला संबंध असतो त्याच्या योग्यतेच्या मानाप्रमाणे नाटक मंडळीत आपली कमीअधिक संभावना होते. उघड उघड या सर्वच हक्कादारांची योग्यता सारखी नसते. नाटक मंडळीला त्यांच्यापासून होणाऱ्या उपयोगाच्या मानाने यांचे हक्क स्थापित होत असतात. हल्ली आपल्या अगदी रोजच्या परिचयातले उदाहरण घेऊन या हक्कदारांचे वर्गीकरण करावयाचे झाल्यास सध्याच्या हिंदी राजकीय परिस्थितीचा उपयोग करून घेता येईल. स्वराज्य मिळविणे आणि नाटक पाहण्याची परवानगी मिळविणे यातील सादृश्य मान्य केले तर ही उपमा काव्यप्रकाशाच्या केशभेदक व्याख्येबरहुकूम अगदी पूर्णोपमा होते. स्वराज्याचा हक्क देणारे सरकार आणि नाटक पाहण्याची परवानगी देणारी नाटक मंडळी यांचे कितीतरी साधर्म्य आहे. स्वराज्याचा हक्क मागणाऱ्या लोकांचे त्यांच्या शक्तीप्रमाणे निरनिराळे भेद पाडता येतात. कमीपणापासून सुरुवात केली तर राष्ट्रसभेसारख्या लौकिक सभांच्याद्वारे मिठ्ठास भाषेचे अर्ज व विनंती करणारे राजकीय भिकारी पहिल्याने पुढे येतात. परीट, दूधवाला, भांडीवाली, मोलकरीण, ब्राह्मण, आप्तइष्ट, विडीवाले वगैरे मंडळी नाटकी चळवळीतील मवाळ होत. (येथे एक सूचना देणे भाग आहे. या सर्व प्रकारच्या हक्कदारांचा स्वत: नाटक पाहण्याचा हक्क अचिन्त्यच असतो. त्यांच्याबरोबर येणाऱ्या त्यांच्या दोस्तांना हा हक्क मिळवून देण्यासाठीच ही स्वदेशी चळवळ चाललेली असते. एवढयासाठी इंग्रजीतील Transfer of Epithet अलंकारान्वये आपण त्या त्या हक्कदारांची नावे त्यांच्या उपग्रहांना देऊ.) वरील नाटकी मवाळांना स्वराज्याचा हक्क अर्थातच फार जपून मागावा लागतो. नाटकगृहात फारशी गर्दी नाही, मॅनेजरसाहेबांची मर्जी सुप्रसन्न आहे, वगैरे वगैरे गोष्टींची तरतूद लक्षात घेऊन हे नाटकी मवाळ आपल्या मागणीचा अर्ज अत्यंत नम्र भाषेने, परिणत अंगाने, हसतमुद्रेने मॅनेजरपुढे टाकतात. राजकीय मवाळांना सरकार एखादे वेळी स्थानिक स्वराज्य, कौन्सिलात मुकाटयाने बसण्याचा हक्क वगैरे फोलपटे देण्याची मेहेरबानी करते, त्याप्रमाणे नाटक सरकारसुध्दा आपल्या मवाळांना कधी 'पिट'मध्ये बसण्याचा, कधी पडदे ओढण्याच्या माडीत बसण्याचा, तर कधी दरवाजातच बसून खेळ पाहण्याचा हक्क देत असते. दरवाज्यावरील व्यवस्थापकांना माळयाकडून येणारे फुलांचे गजरे, चहावाल्याकडून मिळणारा चहा, विडीवाल्याने दिलेल्या पानाच्या पट्टया, या गोष्टी हिशेबात घेतल्या म्हणजे मवाळ लोकांकडून अधिकारी साहेबांना होणाऱ्या 'टी' पाटर्या, पानसुपाऱ्या यांची उणीव भरून येणार आहे. या नाटकी मवाळांची नम्र भाषा, कितीही वेळा हाकून दिले तरी पुन: पुन्हा येण्याचा लोचटपणा, कठीण शब्दांच्या मारालाही दाद न देणारा मोंडपणा, नाटक 'खलास' होण्याची वेळ झाली तरी चिकाटी धरून बसलेला आशावादीपणा या सर्व गोष्टी पाहिल्या म्हणजे राष्ट्रीय सभेत बसल्याचा भास झाल्यावाचून राहात नाही. हे साम्य इतके परिपूर्ण आहे की, कधी साहेबांच्या बंगल्यावर मिळणाऱ्या लाथांचा नमुनासुध्दा नाटकगृहाच्या दरवाज्यावर दृष्टीस पडतो. एखादा माथेफिरू 'डोअरकिपर' या लोचट भिकाऱ्याला एखादे वेळी गचांडयासुध्दा देत असतो. असो. यंदाच्या लाहोरच्या काँग्रेसचा टाहो घेणाऱ्या राजकीय भिकाऱ्यांना शनिवार-बुधवारी नाटकगृहाच्या दरवाज्यावर येऊन या नाटकी मवाळांपासून कायक्रमाचे धडे घेण्याची शिफारस करून आमच्या नाटकी सृष्टीतल्या स्वराज्यासाठी भीक मागणाऱ्या या 'जवानमर्द भिकारभाई'चा तिरस्कारपूर्वक निरोप घेऊ.

या मवाळात आणखी एका वर्गाचा समावेश न करणे अन्यायाचे होणार आहे. पाचसात इंग्रजी ग्रंथांची भाषांतरे करून विद्वान ठरलेले लेखक, केवळ लोकांच्या करमणुकीसाठी लेखणी शिवविणारे ग्रंथकार, जन्मभर संस्कृत भाषेत रुळून शेवटी राजकीय प्रकरणात शिरणारे पेन्शनर वगैरे जसे राजकीय मवाळात असतात त्याप्रमाणे नाटकी मवाळांतही पाच-सात नाटकांतल्या चोऱ्या करून वेडीवाकडी नाटके लिहिणारे लुंगेसुंगे नाटककार, नाटकवाल्यांच्या स्तुतीची श्लोकात्मक अष्टके करून आणणारे कवी वगैरे स्थानिक हक्कदार असतातच! यांच्या वशिल्यानेही प्रसंगवशात नाटकगृहात प्रवेश करून घेता येतो. मुक्कामाच्या गावचे गवईसुध्दा याच वर्गात ओढिता येतील. याचे तोंड बंद करण्यासाठी अर्थात घरी येऊन कर्कश सुरात गात बसतील या अर्थानेच- पासाचा बोळा यांच्या तोंडात कोंबावा लागतो. यांना पास न दिले तर हे गावभर निंदेचे रडगाणे सुरू करतात. मात्र यांच्या स्तुतीपर संगीतात आणि निंदात्मक गद्यात अधिक कर्कश कोणते हे मला अजून ठरविता येत नाही.

यानंतर 'नि:शस्त्र प्रतिकारा'चा मार्ग स्वीकारणारे नाटयसृष्टीतले 'जहाल' लोक येतात. पोस्टमन, म्युनिसिपालिटीतले नोकर, रेल्वेकडील अधिकारी गावातल्या ठिकठिकाणच्या अड्डयांतले प्रमाणीभूत प्रमुख वगैरे लोकांचा या 'जहाल' वर्गात समावेश होतो. अप्रत्यक्ष प्रतिकार करण्याच्या बाबतीत हे पूर्णपणे वाकबगार असतात. कलकत्त्याच्या राष्ट्रसभेपासून गाजत असलेले, मवाळांना थरथर कापविणारे आणि अधिकाऱ्यांच्या डोळयात सलणारे राष्ट्रीय पक्षाचे चार कंठाळी ठराव* या नाटकी जहालांजवळ वेडयावाकडया रूपाने हजर असतात. नाटकवाल्यांनी आपल्याला नाटकाला फुकट सोडलेच पाहिजे ही यांची स्वराज्याची कल्पना, गावच्या बडबडया लोकांचा धुमाकूळ ही यांची स्वदेशी चळवळ, लोकांना नाटकाची तिकिटे न घेण्याचा उपदेश करणे हा यांचा बहिष्कारयोग आणि नाटक चालले असता दंग्याधोप्यांना उत्तेजन देणे हेच यांचे राष्ट्रीय शिक्षण! क्वचित् प्रसंगी नाटकगृहाभोवती लोकांना न येऊ देण्याचे 'पिकेटिंग'सुध्दा अंमलात येते! यांच्या अप्रत्यक्ष प्रतिकाराच्या मार्गाचे काही नमुने नमूद करितो. नाटक सुरळीत चालले असता मध्यंतरी 'वन्समोर-नोमोर'चा धुमाकूळ घालणे; पोस्टमनने नाटक मंडळींची पत्रे उशिरा आणून देणे किंवा अजिबात फाडून टाकणे; म्युनिसिपालिटीतील लोकांनी नाटकमंडळींच्या राहत्या घरी व नाटकगृहात पाण्याची टंचाई करून सोडणे; रेल्वेकडील लोकांनी पार्सले अडकवून ठेवणे, सामानाचे डबे मध्यंतरीच 'सिक' करणे किंवा भलत्याच स्टेशनवर रवाना करणे वगैरे ... हे किंवा यांसारखे अडवणुकीचे मार्ग राजकीय जहालांच्या प्रयत्नांपेक्षा शतपट फलदायक असतात हे येथे नमूद करणे केवळ जरुरीचे आहे. या नाटकी जहालांनासुध्दा पिटमध्ये बसण्यासारखे हलक्या प्रतीचे 'वसाहतीतील स्वराज्य' नको असते. अगदी इंग्लिशमनप्रमाणे- अर्थात पैसे खर्चणाऱ्या लोकांप्रमाणे नाटकगृहात 'निर्भेळ स्वराज्य' मिळविणे हे यांचे अंतिम साध्य असते.

  • या चार ठरावांचा असा दुरुपयोग करताना मला मनापासून वाईट वाटत आहे.

- सवाई नाटकी

यानंतर माझ्या वाचकांनी माझ्या मागोमाग फार जपून येण्याची खबरदारी घ्यावी. कारण आता आपणाला प्रत्यक्ष प्रतिकार करणाऱ्या छातीठोक वर्गाशी भिडावयाचे आहे. तुर्कस्तान, इराण वगैरे देशांतील सशस्त्र प्रजाजनांप्रमाणे राज्यकर्त्यांना सामन्यात जेरीस आणून त्यांच्याकडून स्वराज्य हिसकावून घेणारे लोकसुध्दा नाटकी सृष्टीत आहेत. पोलीस व त्यांचे अधिकारी, मॅजिस्ट्रेट व त्यांचे अनुयायी वगैरे अधिकारी लोक या वर्गात मोडतात. खेळ बंद करणे, खेळाला मुळीच परवानगी न देणे, प्रेक्षकांतील दंगा मोडण्याच्या निमित्ताने कायदेशीर दंगा करणे यासारख्या मर्दानी मार्गांनी नाटकवाल्यांशी हमखास लढून, त्यांना दाती तृण धरावयास लावून शरण आणणारा हा वर्ग फारच बलवान् असतो. 'मॅग्नाचार्टावर' सही करणारा 'किंग जॉन' जसा गोगलगाय बनला होता तसाच नाटकाचा मॅनेजर या महात्म्यांपुढे नरम पडतो. हे लोक आपल्या परिवारासह नाटकगृहात येऊ लागेल म्हणजे मॅनेजरच्या अरेरावीपणाला आळा पडून दरवाजावरील राजसत्तेला 'नियंत्रित राजसत्तेचे' (Limited Monarchy) स्वरूप येते. या वर्गाचा दरारा इतका विलक्षण असतो की इतर वर्गांशी जुलमी राजसत्ता चालविणारा मॅनेजर यांना पाहताच आपल्या सिंहासनाचा- खुर्चीचा- सक्तीचा राजीनामा देतो; नाही तर यांनी अधिकाराचे शस्त्र वापरलेच म्हणून समजावे! हा सारा सशस्त्रतेचा प्रभाव आहे.

आता राहता राहिला अराजकांचा- निहिलिस्टांचा- वर्ग! वर सांगितलेले, राजकीय किंवा नाटकी तीन वर्ग या नात्याने तरी आपला हेतू सिध्दीस नेण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांचे प्रयत्न आशेच्या पायावर होतात! पण अराजक म्हणजे वैतागलेले निराशावादी! इष्ट हेतूकडे यांचे फारसे लक्ष नसते. परंतु केलेल्या प्रयत्नांच्या निष्फळतेमुळे सुडासारखा फलहीन परंतु भयानक मनोविकार यांचा स्वामी असतो. निराशेचा बेफामपणा यांच्या हातून मोठमोठाले अत्याचार घडवून आणितो. स्पेन, पोर्तुगाल, रशिया वगैरे देशात हे अराजक लोक पूर्वीपासून आहेत. हिंदुस्थानात मात्र हे महात्मे अलीकडेच उदयास येत आहेत. हिंदुस्थानात मात्र हे महात्मे अलीकडेच उदयास येत आहेत. बाँबसारख्या स्फोटक द्रव्यांची फेक सुरू करून हे अराजक स्वत: गुप्त राहतात. राजकीय वातावरणात हे लोक हिंदुस्थानात जरी नुकतेच दिसत असले तरी नाटकी सृष्टीतले अराजक मात्र फार प्राचीन काळापासून आहेत. दगड, धोंडे यांसारख्या स्फोटक-डोकी फोडणाऱ्या द्रव्यांचा नाटकगृहावर वर्षाव करून हे आपल्या मनोवृत्तीचे समाधान करीत असतात. राजकीय अराजकांचे प्रयत्न जसे सहसा यशस्वी व्हावयाचे नाहीत तसे यांचे धोंडेही फार करून कोणाला लागत नाहीत हे सुदैवच समजले पाहिजे. स्पेन, पोर्तुगाल, सर्बिया वगैरे देशातल्या राज्यकर्त्यांवर कैक वेळा बाँबगोळे टाकण्यात येतात; परंतु ते बहुधा चुकतात! नाटका-अराजकांनाही कधी यश येत नाही. उलट अतिपरिचयामुळे हा धोंडे मारण्याचा प्रकार अलीकडे हास्यास्पद होऊ पाहात आहे! नाटकाच्या मॅनेजर मंडळीला त्यांचे आता काहीच वाटेनासे झाले आहे. बंगालचे पोलीस बाँबच्या आवाजाने दचकल्याच्या बातम्या ऐकून पत्र्यावर पडलेल्या धोंडयांचे आवाज शांतपणे ऐकणारे नाटकाचे मॅनेजर त्या पोलिसांना हसत होते. दारूची पोती पेटवून पार्लमेंटच्या सभागृहाला आग लावण्याची कल्पनासुध्दा आमच्या नाटकी वातावरणात अंमलात येऊन गेली आहे. चाळीसगावच्या कित्येक 'गायफॉक्स'नी राजापूरकर मंडळींचे नाटकगृह जाळण्यात यश मिळवून 'गनपावडर प्लॉट'मध्ये सापडलेल्या अर्धवट अराजकांना लज्जेने खाली पाहावयास लाविले आहे. अर्थात बेछूट तालीमबाज, पोलीसच्या नजरेत भरलेले उडाणटप्पू यांसारखी शेलकी मंडळीच या अराजक वर्गात असते हे सांगावयास नकोच! त्याचप्रमाणे मनुष्यपणाला काळोखी आणणारी ही कृत्ये काळोखातच होतात हेही साहजिकच आहे! येथेच आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणे योग्य आहे! शरीराचे जसे धर्म आहेत तसे मनाचेही तेच धर्म आहेत. कित्येक शरीराने सुदृढ असतात तर कित्येक मनाने सुदृढ असतात. उलटपक्षी कोणी शारीरिक उडाणटप्पूही असतात, तर कोणी मानसिक उडाणटप्पूही असतात आणि वरील अराजकांत या दोन्ही तऱ्हाच्या उडाणटप्पूंचा भरणा असतो. फरक एवढाच की, शारीरिक अराजक स्वत:ची विचारसरणी यथातथ्याने आचारात आणितात आणि मानसिक अराजक तिचा नुसता उच्चारच करून थांबतात! दुबळया शरीरात राहणारे अराजक मन कमकुवतपणामुळे खुनासारख्या कृत्यासाठी हत्याराऐवजी लेखणीकडे धाव घेते आणि हा खून पाडण्यात त्याच्या हातावर रक्ताऐवजी शाईचे डाग पडतात. सारांश, कमताकद अराजकांचे अत्याचार धमकीच्या पत्रांपलीकडे जात नाहीत; राजकीय भानगडीत जशी ही धमकीची व शिव्याशापांची निनावी पत्रे आहेत तशी ती नाटकांतही आहेत. प्रत्येक नाटकमंडळीला अशी पत्रे यावयाचीच! परंतु हे कागदी बाँबगोळे कधीच त्रासदायक होत नाहीत. यांच्या जन्मदात्या हलक्या मनाच्या समाधानासाठी यांना मानसिक बाँब किंवा भाववाचक बाँब अशी दिसण्यात भयंकर परंतु अगदी नि:सत्त्व नावे देता येतील. या पत्रांतून आचरट विधाने, असंभाव्य बेत, धाडसाच्या धमक्या आणि अत्यंत घाणेरडया शिव्या हा मालमसाला ठेचून भरलेला असतो. हे बाँब ताबडतोब फाडून (फोडून!) टाकण्यात येतात. परंतु परोपकाराच्या दूरदृष्टीने येथून पुढे तरी मानसिक अवनतीचा हा किळस जपून ठेवण्याची मी प्रत्येक मंडळीच्या व्यवस्थापकाला नम्र सूचना करितो. कारण, पुढेमागे स्त्री-शिक्षण सार्वत्रिक होऊन बाजारबसव्यांनासुध्दा शिव्यांचे शिक्षण देण्याच्या शाळा निघाल्या तर त्या वेळी या मानसिक उकळयांची बाडे वाङ्मयादाखल (Classical Literature) उपयोगी पडण्याचा संभव आहे, किंवा आपल्या बाजूवर प्रकाश पाडण्यासाठी समर्थनार्थ प्रमाणांऐवजी प्रतिपक्षांना सर्रास अचकटविचकट शिव्या देणाऱ्या सध्याच्या काही मवाळ पत्रांनाही हे अपशब्दांचे कोश उपयोगी पडतील! असो!

येथपावेतो फुकट नाटक पाहणारे बरेवाईट हक्कदार सांगितले. आपली यांची ओळख असली म्हणजे आपले काम झाले. परंतु नाटकगृहात प्रवेश करण्याचा हा फक्त एक मार्ग झाला. खरे म्हटले तर कोणताही किल्ला स्वाधीन करून घेण्याचे तीन मार्ग असतात. एक समोरासमोर लढून किल्ला घेण्याचा; दुसरा गनिमीकाव्याने छापा घालण्याचा; आणि तिसरा फंदफितुर करण्याचा. नाटकगृहाचा किल्ला पाडाव करण्यालासुध्दा हे तिन्ही मार्ग मोकळे आहेत. इतका वेळ विवेचन केले ते केवळ पहिल्या मार्गाचे! उघड उघड वशिला लावणे आणि छातीस छाती लावून लढणे ही दोन्ही सारख्या छातीची कामे आहेत. आता गनिमीकाव्याने कसे लढावयाचे ते पाहा.

गनिमीकाव्याची लढाई म्हटली म्हणजे फारच अकलेची, धीमेपणाची आणि गुप्तपणाची! तीत अखेरपर्यंत लढणाऱ्याच्या हेतूचा मागमूसही लागत नाही आणि छापा येतो तो असा अचानक, की शत्रूला बेसावधपणामुळे प्रतिकारच करिता येऊ नये! इतिहासात गनिमीकाव्याची लढाई छत्रपती शिवाजी, नेपोलियन, मल्हारराव होळकर यांसारख्या कसलेल्या वीरांनाच साधली आहे. नाटयकलेत मात्र ही बरीच सुसाध्य आहे. प्रथम आपल्या एखाद्या मित्राच्या किंवा चुलत मित्राच्या बरोबर नाटकमंडळीच्या बिऱ्हाडी जायचे; तेथे पहिल्याच भेटीत एक दोन प्रमुख व्यक्तींशी मित्रत्वाचा संबंध जोडावयाचा आणि एखादे दुसरे काम अंगावर घ्यावयाचे व पुढे त्या कामाच्या पूर्ततेसाठी येऊन दुसरे काम अंगावर घ्यावयाचे! अरबी भाषेतील सुरस गोष्टींची, एका दिवशी एकीचा शेवट व दुसरीचा आरंभ अशा गुंतागुंतीच्या तत्त्वावर रचना केली आहे; तीच रचना या भेटीच्या हेतूमध्ये कितीतरी दिवस मोठया सावधगिरीने ठेवावी लागते! आठ दहा दिवस हा क्रम चालला असता मध्यंतरी होणारी नाटके पैसे खर्चून पाहावी लागतात! एखादे दिवशी खेळ चालला असता मध्येच नेपथ्यात जाऊन गप्पा मारीत बसावे. आपल्या ओळखीचा पारा कितपत वर चढला आहे हे पाहण्याची ही सारी साधने आहेत! एखाद वेळी नाटक चालू असता नाटकाचा मुख्य मॅनेजर बसला असेल त्याच्याशी काही निराळयाच विषयावर बोलत बसावे! या गोष्टीमुळे आपल्याला नाटक पाहण्याचा फारसा हव्यास नाही असा नाटकवाल्यांचा ग्रह होतो. स्वार्थत्यागाचा हा छाप बसवीत असताना मधून मधून स्तुतीचे 'डोस' देण्यात चुकू नये! खेळ चालला असता लोकमतांचे 'टेलेग्राफ' नटमंडळीस नेऊन पोहोचवीत असावे! अर्थात या 'ताज्या तारा' कोणत्या धोरणाच्या असाव्या लागतात हे सांगणे नकोच! याप्रमाणे सर्व तयारी झाली म्हणजे एके दिवशी छाप्याला सुरुवात करावी! छापा केवळ चाचणी करण्यापुरताच असतो. एखाद्या खेळाच्या दिवशी तिकीट न काढता नाटकगृहात शिरण्याचे धाडस करावे! नाटक बहुधा साडेनऊ वाजता 'उभे राहते' आणि नऊ वाजल्यापासून लोकांची गर्दी साधारणपणे जमू लागते! परंतु नाटकाचे व्यवस्थापक व नट आठ वाजता नाटकगृहात जातात. म्हणून आपला छापा सव्वाआठ साडेआठच्या सुमारास घालावा! ही वेळ पसंत करण्याचे कारण इतकेच की, अजून लोकांची गर्दी नसल्यामुळे व्यवस्थापक लोकांस आपल्याशी बोलावयास वेळ असतो आणि त्याच कारणाने आपले येणे त्यांच्या नजरेसही ठळकपणे येते. छाप्याच्या मोहिमेचे स्वरूप घाईचे असावे! एकंदर प्रकार पाहून कोणीतरी आपल्याला 'कारणबोधक' प्रश्न विचारतो आणि याच प्रश्नाच्या स्वरूपावरून, आणि हेतूवरून आपल्या नाटकी कारकिर्दीचे पुढील धोरण ठरवायचे असते! या प्रश्नाचा एकंदर प्रकार समाधानकारक असला म्हणजे झाले! किल्ला सर झाल्याची मुहूर्तमेढ खुशाल ठोकावी! या प्रश्नाचे आजपर्यंतचे ठरावीक आणि योग्य उत्तर नवशिक्या लोकांपुढे शब्दश: देतो. आता काही नाटकाला आलो नाही. अजून जेवणसुध्दा झाले नाही. त्या आमच्या यांच्याकडे इतका वेळ बसलो होतो, आता आत त्या आपल्या त्यांच्याकडे जाऊन येतो. मग घरी जाणार, जेवणार आणि इतक्यावर नाटकाला येणार! बाकी आज यायला सापडेल किंवा नाही याची शंकाच आहे. वर्तमान, भूत, भविष्य या तिन्ही काळचे आपले धोरण सांगणारे, जन्मदात्या प्रश्नाकडे लक्ष न देता आपल्याच मार्गाने जाणारे, लांबलचक, क्वचित प्रसंगी अप्रासंगिक परंतु अपरिहार्य असे हे आपले उत्तर मात्र हसत हसत दिले पाहिजे! या उत्तरावर जर नाटकवाल्यांनी मोकळया मनाची उत्साहवर्धक, आशाजनक आणि विनोदी टीका केली तर आपल्या मनाशी विजयाची खूणगाठ बांधावी आणि ते लुटुपुटीचे काम कसे तरी आटोपून घरी चालते व्हावे! आणि वाटेल तर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या प्रयोगाच्या दिवशी खुशाल तिकीट न काढता नाटकगृहात प्रवेश करावा आणि आपला जय झाल्याबद्दल द्यावा हरहर महादेवाचा घोशा उडवून! यापुढे त्या मंडळींची नाटके पाहण्याचा तहहयात हक्क आपल्याला मिळतो! पुढे कर्तबगारीच्या जोरावर आपल्याला प्रत्यक्ष किल्लेदाराची- दरवाज्यावर पास देण्याची- जागासुध्दा मिळविता येते. थोडयाबहुत फरकाने गनिमीकाव्याच्या लढाईचे हे कायमचे स्वरूप आहे. मी नाटकाच्या धंद्यात शिरून फक्त साडेतीन वर्षे झाली आहेत. परंतु इतक्या अल्प अवधीत आणि फक्त आमच्याच मंडळींत किती तरी लोकांना या रीतीने कायमचे हक्कदार होताना पाहिले आहे! नाटकी मित्रत्वाची वाढ मी अगदी लक्ष लावून पाहिली आहे. हिच्या यशस्वीतेबद्दल माझी बालंबाल खात्री झालेली आहे, आणि म्हणूनच मी या रीतीची वाचकांना शिफारस करीत आहे!

आता फंदफितुरीच्या मार्गाकडे वळू! फंदफितुरी ही नेहमी एकटया दुकटया मनुष्याला एकीकडे गाठून त्याच्यामार्फत करावयाची असते! इतिहासाकडे नजर फेकल्यास त्यातल्या त्यात असे दिसून येईल की, फंदफितुरीच्या बाबतीत पुरुषांपेक्षा प्रेमळ स्त्री जातीचाच जास्त उपयोग होत आला आहे. नाटकी सृष्टीही या अनुभवाच्या विरुध्द नाही. आता अर्थात या सृष्टीतल्या स्त्रीजातीत स्त्रीवेष घेणाऱ्या नटांचीच योजना केली पाहिजे. एवढी तरतूद लक्षात ठेवून पुढे कार्याला सुरुवात करावी. फंदफितुरीसाठी प्रथम काही भांडवल खर्च करावे लागते. हे भांडवल पुन्हा मिळण्याचा संभव नसतो. परंतु त्याच्यावर रेल्वे कंपनीच्या शेअरप्रमाणे व्याज मात्र दामदुपटीपेक्षा अधिक मिळविता येते! फंदफितुरीला सुरुवात रस्त्यावर करावयाची असते. संध्याकाळी नाटकवाले बहुधा फिरावयास जातात अशा वेळी त्यांच्या बिऱ्हाडावर पाळत ठेवून एखादे भोळसरसे सावज एकटेदुकटे दिसले, की त्याच्यावर झडप घालावी. हा फसवणुकीचा विषय नाटकात साधारण तरी महत्त्वाचा असावा; अगदी पडदे ओढणारा गडी किंवा 'कोकिले'चे काम करणारा छबडा असा उपयोगी नाही. नवीन ओळख पाडण्याचे दोन प्रकार आहेत. एक, नवी ओळख या खऱ्या स्वरूपाने आणि दुसरा, जुन्या ओळखीच्या जीर्णोध्दाराच्या स्वरूपाने. दोन्ही मार्ग सारखे सुसाध्य असून सारखे फलप्रद आहेत. प्रथम नवीन ओळखीबद्दल विचार करू. आपले इष्ट सावज घरांतून बाहेर निघाल्याबरोबर आपणही रेंगाळत त्याच्यामागे चालू लागावे! मध्यंतरी तो कोणाशी बोलावयास थांबला तर आपणही लघवीसारख्या निमित्ताने कालक्षेप करावा. परंतु जर का त्याच्याशी बोलणारा इसम सुदैवाने आपल्याही ओळखीचा असला तर काम झालेच! लागलीच 'द्वाभ्या तृतीय:' होऊन पुढे बरोबर चालण्याइतकी ओळख करून घ्यावी आणि तो मध्यस्थ आपल्या मार्गाने जाताच त्याच्याबद्दल बोलणे सुरू करून ओळखीच्या मात्रेचे दोन वेढे जास्त द्यावेत! ओळख करून देणाऱ्या मनुष्याबद्दल 'याची तुमची कुठली ओळख?' हा प्रश्न विचारावा आणि त्याच्या उत्तराबरहुकूम पुढील कार्यक्रम ठरवावा. त्याच्या उत्तरानंतरच्या आपल्या धोरणाचे नमुने 'प्रिस्क्रिप्शन फार्म'च्या धर्तीवर पुढे दिलेले आहेत.

मध्यस्थाच्या मदतीने अशा प्रकारे ओळख झाली तर ठीकच झाले. परंतु असा कोणी उपयुक्त महात्मा नच भेटल्यास आपण स्वावलंबनाचा मार्ग सोडू नये. नाटक मंडळींचे बिऱ्हाड दिसत असेपर्यंत त्या सावजाच्या मागे रेंगाळत चालावे. बरेच लांब गेल्यामुळे किंवा आडवळणाच्या फायद्यामुळे ते बिऱ्हाड दिसेनासे झाले, की आपली गती त्याच्याशी समांतर ठेवावी. पुढे एकदाची त्याची आपली नजरानजर होताक्षणीच पुढील प्रश्नांचा मारा करावा.

प्रश्न 1 - पुढला खेळ कोणता?

प्रश्न 2 - तुमचे काय काम आहे त्यात?

प्रश्न 3 - येथे किती दिवस मुक्काम आहे?

प्रश्न 4 - पुढला मुक्काम कोठे होणार?

महाकवी कालिदासाने स्पष्ट सांगून ठेविले आहे की, 'संबंधमाभाषणापूर्व माह:' या महातत्त्वाच्या आधाराने आपला आणि त्या नटाचा या चार प्रश्नोत्तरानंतर स्नेहसंबंध झाला असे मानायला काही हरकत नाही. उपर्युक्त श्लोक म्हणणाऱ्या दिलीपाचा नि सिंहाचा स्नेहही एवढयाच आधारावर उभारलेला होता. असा स्नेह झाल्यानंतर नाना प्रकारचे विषय काढून स्नेहाचे दृढीकरण करणे हे केवळ आपल्या हाती असते. त्यातल्या त्यात चालू दिवसाची त्याची फिरावयाला जावयाची जागा फारशी उत्तम नसून तिच्यापेक्षा चांगली जागा आपणास माहीत आहे हे सांगण्यास व दुसरे दिवशी आपल्या सोबतीने त्या बाजूला फिरावयास येण्याचे त्यास आमंत्रण देण्यास मात्र विसरू नये. मध्यंतरी चहाकॉफीचे दुकान आढळताच त्यातल्या वस्तूंची लाच देण्यास कसूर होता कामा नये! लाच म्हणजे फंदफितुरीचा जीव आहे. हे स्नेहाचे दोरखंड नाटकवाल्या लोकांची व आपली 'टग ऑफ वॉर' झाली तर तुटणार नाही अशी खात्री होईपर्यंत हा चहाकॉफीचा खुराक चालू ठेविलाच पाहिजे. याशिवाय दोन्ही बाजूंचे वजन जोखून मधून मधून बिडी, पानतंबाखूपासून तहत दारू, चरस, अफू, बचनाग यांसारख्या चैनीच्या पदार्थांचाही मारा करीत गेल्यास फायदेशीर आहे. इष्ट उंचीपर्यंत स्नेहाची परमावधी झाली म्हणजे या फितुरी पात्राच्या मध्यस्थीने नाटकगृहाच्या किल्ल्याचा दिंडीदरवाजा मोकळा करून प्रवेश करून घेता येतो. असो. जुन्या ओळखीचा जीर्णोध्दार करण्याच्या स्वरूपाने नवीन ओळख पाडण्याचा प्रकारही असाच सुकर आहे. एकदम हसत हसत बोलण्यास सुरुवात केली तरीसुध्दा शेकडा नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव शतांश हिश्श्याने यश येतेच येते! अतिशय परिचयामुळे नाटकवाल्याला आपल्या मित्रांची व ओळखीच्या प्राण्यांची खरोखरीच मोजदाद नसते! उलटपक्षी नवीन स्नेह करण्याकडे त्याची प्रवृत्ती जास्त असते. या दोन्ही गोष्टींचा परिणाम आपल्या धाडशी प्रयत्नाला पथ्यकरच होतो. हा फंदफितुरीचा मार्ग इतक्या विस्तरत: वर्णीत बसण्याचे कारण इतकेच की, वरील दोन्ही मार्गांपेक्षा हा मार्ग श्रेयस्कर असून यात हिंदूपणाने वागल्याचेही श्रेय मिळते. अनादिकालापासून फंदफितुरी आमच्या आर्यराष्ट्रात प्रचलित आहे. ज्या फंदफितुरीच्या जोरावर श्रीरामचंद्रांनी लंकेची राखरांगोळी केली; ज्या फंदफितुरीच्या जोरावर दिल्लीचा दौलत शहाबुद्दीन घोरीने मातीत मिसळून टाकिली; ज्या फंदफितुरीच्या जोरावर पेशवाईचे वाटोळे झाले; त्या फंदफितुरीच्या जोरावर- प्रियवाचक, असे कंटाळू नका. फंदफितुरी आम्हा हिंदू लोकांचा आत्मा आहे! बिभीषण, जयचंद, मीर-जाफर, उमीचंद, मुरारीराव, रायगडचा रायनाक महार यांसारख्या महात्म्यांचा ज्या अलौकिक गुणामुळे उत्कर्ष झाला त्याचे योग्य वर्णन करावयास नको का! फाटक्या पानांनीच भरलेल्या आमच्या इतिहासात पदोपदी काळया डागाखाली 'फंदफितुरी' हीच अक्षरे दिसून येतील! याच गुणाने आम्ही मातीला मिळालो; हाच गुण आमच्या हाडीमासी खिळून राहिला आहे! आणि म्हणूनच या आर्यमार्गाने जाण्याची मी माझ्या प्रत्येक आर्यवाचकाला विनंती करीत आहे! नाटकी सृष्टीतसुध्दा या आर्यगुणाने मोठमोठाली कार्ये घडून आली आहेत. म्हणून अशा मार्गाने एखादे पात्र आपल्या स्वाधीन करून ठेविले म्हणजे झाले! आपल्या सुदैवाने जर का मुख्य स्त्रीपार्टीच आपल्या हाती लागला तर मग विचारावयासच नको! कित्येक महात्म्यांनी अशा प्रकारे चांगल्या चालत्या मंडळया नामशेष करण्याचासुध्दा प्रयत्न केल्याचे माझ्या ऐकिवात आहे!

याशिवाय घोरपड लावून किल्ला सर करण्याचा एक बिकट मार्ग आहे. परंतु नाटकात आणि इतिहासात हा अगदी क्वचित दिसून येतो; नाटकाच्या किल्ल्यावर घोरपड लावणे म्हणजे घोरपडीप्रमाणे मॅनेजरच्या पायाला घट्ट मिठी मारून अर्थाअर्थी संबंध नसताही नाटक फुकट पाहण्याची आळ घेणे! हा मार्ग अगदी निर्वाणीचा आहे! आमच्या मंडळीत एकदा एक गृहस्थ येऊन दरवाजावर अशीच आळ घेऊन बसले. स्वारीचा पोषाख साधारण चांगला असून बोटात एक अंगठीसुध्दा होती. या राजेश्रीचे प्रतिज्ञावाक्य पुढील शब्दांत दिले आहे, जवळ पैसा नाही; नाटक पाहण्याचा तर निश्चय केला आहे! बापाने घरातून हाकून दिले आहे; तुम्ही लाथेने दूर लोटून द्या, पोलिसांच्या ताब्यात द्या; पण प्राण गेला तरी नाटक पाहिल्यावाचून राहणार नाही; तरी या अशा पावसात रात्रभर अस्सा पडून राहीन. विशेष शोधाअंती असे कळून आले की, जिवावर उदार होऊनही निर्वाणीचे शब्द बोलणारा हा महात्मा रेल्वेवरील एक स्टेशनमास्तर आहे! भडाभड पैसे खर्चून नाटक पाहणारे माझे उधळे वाचक या सडेतोड मार्गाकडे लक्ष देतील काय? ब्राह्मणांचा स्वधर्म भिक्षा। ओम् भवति या पक्षा। रक्षिले पाहिजे। हे समर्थांचे वचनही ध्यानात ठेवण्यासारखे आहे! ब्राह्मणांबद्दल तक्रारच नाही; आणि वेदोक्ताचे अधिकार मागणाऱ्या क्षत्रियादिकांनी इतर अधिकारांबरोबर याही अधिकाराची मागणी केली म्हणजे झाले!

यानंतर वेष पालटून तात्पुरता प्रवेश करण्याच्या मार्गाचा विचार करू. नाटकवाल्याच्या मित्रत्वाचा वेष पुरेनासा झाला म्हणजे कोणी पोलिसाचा वेष घेऊन येतो, कोणी रेल्वेचा हमाल होऊन येतो, कोणी थेटरवाल्याचा कामचलाऊ आप्त होतो, कोणी नाटकवाल्याच्या नातेवाईकाचा वेष घेतो आणि कोणी चहावाल्याच्या हाताखालचा असिस्टंट होतो! एवंच, नाटकगृहाच्या आत नटांची सोंगासाठी वेष बदलण्याची क्रिया आणि बाहेर या आशाळभूतांची या प्रकारे वेष पालटण्याची क्रिया सारख्याच जोराने चालू असते. नाते लढविण्याचे आणि ओळखी पटविण्याचे मार्ग अनेक आहेत. कधी कधी हे नात्याचे अणूरेणू इतके बारीक असतात की, साध्या डोळयांनी ते दिसतच नाहीत. आमच्या गणूच्या एका प्रेमळ नातेवाईकाने ही नात्याची तार इतकी लांबविली होती की, तिच्या वेढयात आमचा गणूचसा काय; पण पृथ्वीवरील यच्चयावत् प्राणीही सापडले असते! त्या गृहस्थाच्या चुलत्याची मेव्हणी आमच्या गणूच्या मामेभावाला देण्याचे ठरले होते; परंतु पत्रिका न जमल्यामुळे हे लग्न शेवटी फिसकटले हेच त्या गृहस्थाच्या आणि गणूच्या नात्याचे स्वरूप होते! काही दिवसांमागे आमच्या मंडळींत एक माकड बाळगिले होते. एक दिवस एक गृहस्थ डार्विनसाहेबांचे 'ऑरिजिन ऑफ स्पेसीस' पुस्तक घेऊन दरवाज्यावर आले. या पुस्तकातले आधार दाखवून त्यांनी त्या माकडापासून आपली उत्पत्ती आहे हे सिध्द करून दाखविले! आणि त्या नात्याच्या जोरावर फुकट नाटक पाहण्याची परवानगी मागू लागले! त्यांच्या काही अंगविक्षेपांवरून त्यांच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला आणि आमच्या मंडळींतील एका प्राण्याचे आप्त म्हणून आम्ही त्यांना नाटकास फुकट सोडिले! मात्र दुसऱ्या प्रयोगाच्या दिवशी त्या माकडाचा वंशवृक्ष इतका फोफावला की, त्याच्या शाखांवरून उडया मारण्यासाठी त्या माकडास कायमचे सोडून देणे भाग पडले! असो! या वेषांतराच्या भानगडीत विषयांतर होत चालल्यामुळे आपण या माकडाचा येथेच निरोप घेऊ!

या माकडचेष्टात वेषांतराचा एक महत्त्वाचा प्रकार चुकून तसाच राहात होता! प्रत्येक नाटक मंडळी बहुधा दर मुक्कामास 'विद्यार्थ्यांसाठी निम्मे दराने' एक खेळ लावीत असते! त्या दिवशी अगदी गावगुंडाला सुध्दा विद्यादेवीच्या भक्तीचा उमाळा येतो! चार चार विद्यार्थ्यांचे बापसुध्दा त्या दिवशी टोपी घालून विद्यार्थी बनतात! आपल्या 'भुजंगनाथी' चेहेऱ्याकडे शारदादेवी ढुंकूनही पाहणार नाही; आपल्या ओठावरच्या केरसुण्या शाळेची झाडलोट करण्यासाठी मात्र योग्य आहेत असल्या विरोधक गोष्टींबद्दल ते अगदी बेदरकार असतात! डोक्यात विद्या नसली तरी चालेल; पण डोक्यावर टोपी असली की झाला विद्यार्थी! अशा रीतीने आधी स्वत: टोपी घालून मग नाटकवाल्यांना टोपी घालावयास तयार होणारे विद्यार्थी बहुधा प्रत्येक गावी आढळतात! विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासारख्या फंदात पडण्यापेक्षा सरकारने सर्व नाटकवाल्यांना प्रत्येक खेळ 'विद्यार्थ्यांसाठी निम्मे दराने' लावण्याचा हुकूम केल्यास जास्त यश येण्याचा संभव आहे! असो. नेहमी जोडा घालणारे रावबहादुर वगैरे लोक नामदारसाहेबांच्या धूळभेटीसाठी बूट मिळविण्याच्या खटपटीस लागतात, तद्वत् या दिवशी नाटकवाल्यांच्या डोळयात धूळ टाकण्यासाठी गावगुंडांची टोप्या जमविण्याची खटपट चालू असते. (धूळभेट आणि धूळ टाकणे यांतील सादृश्य मुद्दाम जुळवून आणलेले नाही.) तसेच, या दृष्टान्तात शरीराच्या दोन निरनिराळया टोकांबद्दल जरी भिन्नत्व आहे तरी दोहोतही क्रियानुकरण दिसून येते हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे. सारांश, या दिवशी गावभर टोप्यांची देवघेव चाललेली असते! संध्याकाळी नाटकगृहाभोवती जिकडे तिकडे टोप्याच टोप्या दिसून येतात आणि हिंदुस्थानात टोपीवाल्यांचे राज्य आहे ही गोष्ट वाजवीपेक्षा फाजील खरी वाटू लागते! किंवा 'यथा राजा तथा प्रजा' या म्हणीचाही अक्षरश: प्रत्यय येतो! असो. या प्रकारात नाटकवाल्यांकडून अप्रत्यक्षरीत्या विद्यावृध्दी घडत असते. आता फुकट नाटक पाहण्यासाठी गावगुंड जसे चांगल्या वर्गात शिरू पाहतात तसे चांगले लोकही वाईट वर्गात शिरतील काय, या प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी निव्वळ 'हलकट लोकांसाठी निम्मे दराने' एखादे नाटक लावण्याची मी एकदा आमच्या मॅनेजरास विनंती केली होती. परंतु आमच्या मॅनेजराचे माझ्याबद्दल फारसे चांगले मत नाही आणि अतएव मी आपल्या मित्रमंडळींसाठी ही तजवीज करीत असेन अशा समजुतीने त्यांनी माझ्या विनंतीकडे दुर्लक्ष केले!

ताज्या घोडयांभोवती गोमाशा असतात, तशीच बारीक बारीक चिलटेही असतात. ढेकणांपेक्षा त्यांच्या अदृश्यकल्प पोरांचाच सुळसुळाट अधिक जाणवतो. हाच नियम मनुष्यांनाही लागू! जेथे कायद्यात आलेल्या मनुष्यांची इतकी हमखास गर्दी तेथे बेकायदा पोरांची दंगल ही असावयाचीच! मुलांचे नाटकात घुसण्याचे मार्ग अगदी निराळया धर्तीचे असतात! आळीतल्या कोणातरी हक्कदार प्रेक्षकांची माणसे घेऊन येणे; नाटकवाल्यांच्या बिऱ्हाडाभोवती रखडून शेवटी हँडबिले वाटण्याची कामगिरी मिळविणे; व्यवस्थापकाला दया येईपर्यंत केविलवाण्या मुद्रेने नाटकाच्या दरवाज्यासमोर उभे राहणे; निदान चहावाला, विडीवाला यांच्या दुकानांतले 'सेल्समन' म्हणून पानपट्टया विकावयास नाटकगृहात शिरणे; हे सामान्य मार्ग आहेत; कधी कधी मुलांची मजल त्याच्यापुढेही गेलेली आढळून येते! थोडेसे नाटक पाहून घरी जाणाऱ्या एखाद्या प्रेक्षकाचा 'पास' मिळवून 'एकाचा पास दुसऱ्यास चालणार नाही' या नाटकी पिनल कोडाच्या कलमाला चळविण्यासारखा, किंवा अंक सुटल्यानंतर प्रेक्षकांच्या आवकजावक गडबडीचा फायदा घेऊन गर्दीत अगदी खाली वाकून नाटकगृहात घुसण्यासारखा नजरबंदीचा खेळही काही चलाख मुले मधून मधून करीत असतात. परंतु या सर्व मार्गांपेक्षा एक मार्ग फारच कल्पनेचा आणि यशस्कर आहे! आईबापांना न जुमानणारे काही बालपुंडलीक नाटकात राहावयाचे म्हणून नाटकमंडळींतच मुक्काम देतात! दिवसभर वाटेल तिकडे हिंडण्याची परवानगी नाटकवाल्यांकडून तेव्हाच मिळविता येते! 'घरी जाऊन येतो' म्हटले की झाले! या स्वैर भटकण्याने आपल्या नेहमीच्या कार्यक्रमात फरक झालेला आपल्या ग्रामस्थांना कळत नाही! नाटकवालेही काही ताबडतोब 'सोंग' देत नाहीत! त्यांच्या मते नवीन मुलगा काही दिवस नाटकांत 'मुरावा' लागतो. परंतु हा 'मोरांबा' तयार होईपर्यंत बहुधा त्यांचा मुक्काम बदलण्याची वेळ येते; यामुळे सोंग घेण्याच्या त्रासातूनही हा बालप्रेक्षक मोकळा असतो! याप्रमाणे नाटकवाल्यांचा मुक्काम असतो. फुकट नाटक पाहण्याची, शिवाय त्यांच्याकडे जेवणाखाण्याचीही सोय होऊन आपला कार्यभाग वाजवीपेक्षा जास्त सफल होतो! पुढे नाटक मंडळी मुक्काम बदलण्याच्या बेतात आली म्हणजे आपणही आपला मुक्काम बदलून आपला घराचा रस्ता धरावा! या प्रकारात आपले इष्ट हेतू तर परिपूर्ण होतातच; परंतु आपल्या ग्रामस्थ सोबत्यांच्या दृष्टीने आपण किती तरी महत्पदाला चढलेले असतो! या महत्त्वमापनाचे साधारण शब्दचित्र काढून पाहूया! खेळाच्या दिवशी संध्याकाळी नाटकातील मुले नाटकगृहाकडे चालली आहेत; आपणही त्यात आहोत, ती आपसात बोलत आहेत; त्यांचे आपल्याकडे लक्ष नाही; पण आपल्या ओळखीचे लोक जाता येता आपल्याकडे पाहात आहेत; आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून नाटकवाल्यांच्या गोष्टीकडे आपले लक्ष आहे असे दाखवीत आहोत; आपले सारे उनाड सोबती आपल्यामागून येत आहेत; ते आपल्याशी सलगी करू पाहात आहेत; आपण नाटकी मुलांना चिकटून राहण्याचा प्रयत्न करीत आहोत; त्या नाटकी मुलांनी तबला, डग्गा, तंबोरा यांसारखी रोज घरून थिएटरात न्यावयाची ब्याद आपल्या गळयात अडकविली आहे; पण इसापनीतीतल्या चावऱ्या कुत्र्याप्रमाणे आपल्याला त्या घाटेचाच अभिमान वाटत आहे; आपल्या भाग्यशाली कामगिरीकडे आपले जुने सोबती मत्सराने पाहात आहेत; त्यांची ती दृष्टी ओळखल्यामुळे आपण मनात आनंदमय होत आहोत; आजपर्यंत आपल्या सोबत्यांसह कित्येक वेळा आपण या नाटकी मुलांकडे उत्सुकतेने पाहात होतो पण आज आपण अखेर त्यांच्यापैकी एक झालो आहोत आणि आपले सोबती पूर्वीप्रमाणे आपल्याकडे पाहात आहेत, यांसारख्या विचाराच्या भरात आपण तुरतुर चालत आहोत. आपल्या कमनशीब सोबत्यांची कीव येऊन आपण मधून मधून त्यांच्याकडे सदय तुच्छतेने पाहात आहोत आणि आपले सोबतीही आपला कमीपणा ओळखून निराशेच्या उत्सुकतेने आपल्याकडे पाहात आहेत! अहाहा! कोण मनोहर स्थिती ही! माझ्या उनाड बालवाचकांनो, तुमच्यात असा कोण फत्तर आहे की, जो या स्थितीत पडण्याची इच्छा करीत नाही? उद्याच्या भावी गावगुंडांनो, द्या तर आईबापांना झुकांडी आणि शिरा पाहून भराभर नाटकात!

याप्रमाणे नाटकगृहात शिरण्याचे हे बेकायदेशीर मार्ग संक्षेपाने नमूद करण्याचा येथवर प्रयत्न केला आहे! आठ वाजल्यापासून नाटकाच्या दरवाजासमोर हे सर्व प्रकार एकसारखे चालू असतात. निरनिराळया पंथांचे लोक आपापल्या उक्त मार्गाने नाटकगृहात शिरण्यासाठी धडपडत असतात. दरवाजावरचे यमदूत या होतकरू प्रेक्षकांना धक्के देतच असतात! कोणी पोलिसांच्या वहाणा घालून पोलीस होत असतात; त्यांचे कपट ओळखून व्यवस्थापक त्यांना वहाणांच्या भरतीस जोडेही देत असतात! घरून एका शिपायानिशी बाहेर निघालेले विशिष्ट अधिकारी नाटकगृहाजवळ येईपर्यंत एका लहानशा टोळीचे नाईक होतात! कारण गावचे प्रत्येक 'लेंडवोहोळ' या 'वाहत्या गंगेचा' फायदा घेण्यासाठी तिच्यामागे लागतात. ही फलटण आत शिरू लागताच तिकिटांचे धनीसुध्दा मागे सरकतात! कधी कधी पुढाकार घेणाऱ्या अधिकाऱ्याला आपल्यामागे पसरलेल्या या शेंडेनक्षत्राच्या लांबीची कल्पनाही नसते आणि म्हणूनच, बिळात घुसणाऱ्या सापांचे निदान शेपूट तरी तोडण्याचे लोक यत्न करितात त्याप्रमाणे नाटकगृहात घुसणाऱ्या या सर्पाचेही शेपूट तोडण्याचा नाटकवाले प्रयत्न करीत असतात. इकडे 'धारकरी' पंथाचे वीर असे तलवार चालवीत असतात. तर 'वारकरी' पंथाचे भिक्षेकरी तिकडे तोंड वेंगाडीत असतात. एका घटकेच्या अवधीत नाटकाच्या दरवाजापुढील आकुंचित क्षेत्रात जितके खोटे बोलण्यात येते तितके उभ्या वर्षात अति पवित्र क्षेत्रातले ब्राह्मणसुध्दा बोलत नसतील. कित्येकांच्या मुद्रा इतक्या केविलवाण्या आणि सुक्या दिसतात की, तशा मुद्रा एखाद्या साहेबाच्या मरणाबद्दल भरलेल्या दु:खप्रदर्शक सभेस जमणाऱ्या मवाळांनासुध्दा साधावयाच्या नाहीत! चिकाटीच्या, दीर्घ प्रयत्नाच्या वगैरे बाबतीतसुध्दा नाटकी सृष्टी इतर सर्व सृष्टीभेदांपेक्षा अद्भूतरम्य आहे! बारा हात खंदक पैलपार होणारी लक्ष्मीबाई झाशीवाली इतिहासाच्या सृष्टीत क्वचितच दिसते; पण नाटकगृहाभोवतालच्या गटारांवरून ताड ताड उडया मारणारे किती तरी महात्मे नाटकी सृष्टीच्या वाटणीस आलेले आहेत! तिकडे वसईच्या किल्ल्यात निदान माझे मस्तक तरी पडू द्या असे म्हणणारा चिकाटीचा चिमाप्पा एखादाच सापडला, तर इकडे निदान 'कोरसा'च्या वेळच्या गडबडीत तरी माझा देह नाटकगृहात जाऊन पडो असे म्हणणारे कैक चिमाप्पा पोलिसांच्या तडाक्यात सापडत असतात! मुद्दाम अद्भूत म्हणून निर्मिलेल्या काव्यसृष्टीतसुध्दा प्रेमासाठी भिंत ओलांडणारा रोमियो एकच आहे; पण इकडे, नाटकगृहाभोवतालची पडकी भिंताडे ओलांडून आवारात शिरणारे रोमियो रोमागणित आढळतात! उलटपक्षी, त्यांचे प्रतिपक्षी म्हणजे दरवाजावरचे लोकही काही कमी नसतात! थर्मापिलीच्या घाटात असंख्य पार्शियन लोकांना अडवून धरणारा स्पार्टन सेनानी लिऑनिडास, रोमच्या अगणित शत्रूंना टायबर नदीच्या पुलाच्या तोंडाशी थोपवून धरणारा एकाकी रोमन वीर होरेशिअस्, पावनखिंडीच्या तोंडाशी हजारो यवनांच्या तोंडात माती घालणारा हिर्डसमावळचा लढवय्या बाजी देशपांडे यांनी जो पराक्रम केला तोच पराक्रम शेकडो बदमाषांना एकटा अडवून धरणारा नाटकाचा द्वाररक्षक दररोज करीत नाही असे कोण म्हणेल? रजपुतांचे साहस, इंग्रजांची चिकाटी, कोकणस्थांचा कावा, मिशनऱ्यांचा मुर्दाडपणा वगैरे यच्चयावत् विशिष्ट गुणांचा या वेळी नाटकगृहासमोर बाजार भरतो! आघात आणि प्रत्याघात यांनी दाही दिशा दुमदुमून जातात. याप्रमाणे गडबडीचे एक-दोन अंक संपल्यावर नाटकवाले नाटकगृहाची दारे लावून घेतात; परंतु तरीही प्रेक्षक हिंमत सोडत नाहीत. बंदोबस्ताने लावलेल्या मच्छरदाणीभोवती हे लोचट डास गाणे ऐकतात तरी कार्यभिन्नत्वामुळे त्याच्या त्रासदायकपणात तिळमात्र अंतर नसते. सरोवरात एक खांबाचा सभामंडप करून बंदोबस्ताने राहणाऱ्या परीक्षिती राजाला ज्याप्रमाणे तक्षकाने अखेर बोरातली अळी होऊन गाठले, त्याप्रमाणे प्रेक्षकांपैकी काही दीर्घोद्योगी तक्षक हजारो वेळा झालेल्या अपमानाला न जुमानता काही अकल्पित मार्गाने नाटकगृहात शिरून आपला डाव साधीत असतात. असो.

आता वर सांगितलेल्या मार्गाचे अवलंबन कोणी करावे याबद्दल काही नियम आहेत काय याचा विचार करून नाटकगृहात शिरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या 'पुरवणी'प्रमाणे लांबलेल्या या लेखाचा समारोप करू. नियम, निर्बंध या धर्तीचे शब्द ऐकताच आपण आता या हक्काला मुकतो की काय, अशा कल्पनेने माझे काही वाचक भीतिग्रस्त होतील; परंतु वाचकहो, तुमची भीती निराधार आहे! अशा प्रकारचा निर्बंध काहीएक नाही! कोणत्याही मनुष्याला यापैकी पटेल तो व साधेल तो मार्ग स्वीकारता येतो! राजापासून रंकापर्यंत धर्मासाठी झटणाऱ्या 'श्री'च्या अनुचरांपासून धर्माला पायाखाली तुडविणाऱ्या सुधारकांपर्यंत, दंगा करणाऱ्या गावगुंडांपासून दंगा मोडणाऱ्या पोलिसांपर्यंत, दात पडलेल्या थेरडयांपासून दात न आलेल्या अर्भकापर्यंत, वाटेल त्याला फुकट नाटक पाहण्याचा प्रयत्न करण्याची समाजाने मोकळीक ठेविली आहे. नाटकवाल्यांना दारी हलकटपणा करण्याची पूर्ण मुभा देत आहे! नाटकाला फुकट जाण्यासाठी नीतिविषयक फाजील कल्पनांना रजा देण्यास धर्माचीही आडकाठी नाही! निंदेच्या भरात नाटकवाले आणि वेश्या यांच्यात कल्पनासाहचर्य उत्पन्न करणारे धर्मात्मेसुध्दा नाटकवाल्यांनी 'फुकट पास' देताच त्यांचे स्तुतिपाठक होतात! भाराभार धर्मांची बाडे उपसणाऱ्या एका वेदोनारायणाने धर्मासाठी अवतरलेल्या आपल्या चोपडयांत नाटकवाल्यांची स्नानसंध्या केल्याबद्दल पाठ थोपटल्याची हकिगत चाणाक्ष वाचक अजून विसरले नसतीलच! त्यांच्या दृष्टीने पाहिले म्हणजे एखाद्या वेश्येने सायंकाळी शिवदर्शन घेतले तर तिची पापे विसरून तिच्या घरी दक्षणेसाठी जावयाला हे धर्माधार मागेपुढे पाहणार नाहीत असे वाटते! क्षुद्र तिरस्करणीय मानिलेल्या नाटकवाल्यांच्या द्वारी रात्री थोडक्यासाठी खोटे बोलणारे, तोंड वेंगाडणारे, स्वाभिमान सोडून धक्काबुक्का खाणारे, दोन आणे वाचविण्यासाठी दोन आणे लाच देणारे, मॅनेजर नाहीत तितक्या वेळात मला मुकाटयाने सोड म्हणून आपल्या ओळखीच्या 'डोअरकीपर'ला सांगणारे, आपली सद्सद्विवेकबुध्दी पायाखाली तुडवून क्षुल्लक किमतीच्या नाटकासाठी दुसऱ्यालाही त्याच संकटात पाडणारे सद्गृहस्थ दुसऱ्या दिवशी उजळ माथ्याने समाजात नाटकवाल्यांची अवहेलना करताना दिसले म्हणजे मात्र तिरस्काराने असेच उद्गार तोंडातून निघतात की, बा समाजा, हीच का तुझी नीतिमत्ता, हाच का तुझा मनुष्यपणा! नाटकासारख्या क्षुल्लक बाबतीत जर आम्ही आमच्या मनोदेवतेला अशी पायाखाली दडपून टाकितो तर महत्त्वाच्या गोष्टीत आमचा क्षुद्र स्वार्थ आम्हाला काय करावयाला लावणार नाही! शिक्षणक्रम सोडून देऊन नाटकाच्या धंद्यात पडल्यानंतर काही दिवसांनी माझी व पूर्वाश्रमातील माझ्या एका विद्वान मित्राची गाठ पडली. जवळ जवळ पदवीधर झालेल्या या माझ्या मित्राने माझी अशी कानउघडणी केली की, हा हलका मार्ग पत्करून तुम्ही आपली योग्यता कमी करून घेतलीत... तुमच्या मित्रांना आता तुमच्याशी मित्रभाव ठेवण्यात लाज वाटेल. अशा प्रकारच्या वाग्बाणांनी माझे हृदय विदारण केल्यानंतर हा नीतिपाठ ओकणारा महात्मा शांत झाला; पण शांत होताक्षणीच या नैतिक मेरूने मला हसत हसत विचारले की, आता आम्हाला कोणते नाटक दाखविणार? काय म्हणावे या प्रकाराला! त्याच्या विसंगतपणाची अखेर मलाच लाज वाटली! पुढे माझे असे हितचिंतक बरेच आहेत असे मला आढळून आले! त्यांनी नाटकवाल्यांना निंद्य मानले तर त्याबद्दल कोणाचे काही म्हणणे नाही. हा व्यक्तिविषयक प्रश्न आहे. पण लागलीच त्याच नाटकवाल्याजवळ मेहेरबानीची याचना करणे लाजिरवाणे नाही काय? एखाद्या शेजाऱ्याने दारूचे दुकान काढल्याबद्दल आधी त्याची खरडपट्टी काढून, नंतर त्याच दमात त्याचेजवळ फुकट दारूचा घोट मागणे किंवा एखादी स्त्री वेश्या झाल्याबद्दल तिला बोध करून नंतर... पण जाऊ द्या, उगीच कोळसा उगाळून आपल्या हाताला काळे कोण लावून घेतो.

वरील मार्गात रुळलेल्या हक्कदारांना माझे आजचे लिहिणे आवडणार नाही; धंद्यातली रहस्ये उघडकीस आल्यामुळे त्यांचा माझ्यावर रोष होईल हे मी जाणून आहे; परंतु त्याला माझा नाइलाज आहे. त्यांच्याप्रमाणेच माझ्या वाचकांनाही या मार्गाचा लाभ व्हावा अशी माझी सदिच्छा आहे. परोपकारासाठी लेखणी उचलणाऱ्या माझ्यासारख्या व्रतस्थांनी लोकापवादाकडे मुळीच लक्ष देता कामा नये.


- सवाई नाटकी