संपूर्ण बाळकराम/कवीचा कारखाना
उत्तिष्ठोत्तिष्ठ राजेंद्र मुर्ख प्रक्षालयस्व ट:। प्रभाते रोदिती कुक्कु-चवैतुहि चवैतुहि॥ 1॥
- सुभाषित
ऐशी काव्ये कराया इकडून तिकडून आणलेली बुध्दी दे चक्रपाणी।
- स्मरणातून
या जगतीतलावर अखिल मानवजातीच्या सुखसमाधानाची जी जी साधने आहेत, त्या सर्वात काव्याला सर्व राष्ट्रांनी, सर्व धर्मांनी आणि सर्व जातींनी एकमताने अग्रस्थान दिलेले आहे. काव्यात राष्ट्राचे बुध्दिवैभव आणि कर्तृत्वशक्ती इतिहास आणि संस्कृती, विकारोत्कर्ष आणि नीतिमत्ता, अशी जोडपी एकाच वेळी विहरत असल्यामुळे राष्ट्राचे सर्वस्व त्याच्या काव्यात प्रतिबिंब होत असते. ज्यांना लिपी नाही, अशी राष्ट्रे थोडीबहुत सापडतील; परंतु लौकिक काव्याविरहित राष्ट्र कधीही सापडणार नाही. लेखनकलेच्या अभावी इलियडसारखी महाकाव्ये कैक पिढयांपर्यंत नुसती जिभेच्या शेंडयावर नाचत आली होती. कवितेचा व राष्ट्रोत्कर्षाचा परस्परांशी निकट संबंध आहे. कवितेने वीरांना आणि प्रणयीजनांना उत्साह दिला आहे, आणि वीरांनी व प्रणयीजनांनी कवितेला विषयांचा पुरवठा केला आहे; सुंदर स्त्रियांना चढवून ठेविले आहे. कवितेने किती तरी लोकांना शुध्द वेडे केले आहे, तर शुध्द वेडयांनी किती तरी कविता केल्या आहेत! आणि म्हणूनच या महत्त्वाच्या विषयावर चार शब्द लिहिण्याचा आज मी प्रयत्न करून पाहणार आहे.
कविता हा एकच शब्द उच्चारल्याबरोबर किती तरी गोष्टी एकदम डोळयांसमोर येऊन उभ्या राहतात! ते समासप्राचुर्य, ती रचना, ती प्रतिमा, त्या भरार्या, ती वैदर्भी रीती, ते हृदयंगम, त्या डोळयांतून अश्रुधारा, ते मार्दव, तो रसपरिपोष, ते अरसिकेषु कवित्वनिवेदनम्, ते शब्दसौष्ठव, ते कवीला अगम्य, ती प्रियतमा, ती कमले, ते लाटानुप्रास, ते निरंकुशा: कवय:, ते ओज, ते प्रवाह, ती स्वर्गापर्यंते, ती तादाम्ये, त्या सर््फूत्या, ती वेडे- बस्स! एकटयादुकटया माणसाला खरोखरीच या हलकल्लोळात वेड लागावयाचे!
कविता! कविता!! कविता करणे जितके सोपे आहे, तितकेच कवितेची व्याख्या करणे अवघड आहे! विषयव्यापकतेचा पसारा डोळयांपुढे ठेवून कवितेची व्याख्या करणेही भिन्नभिन्न पदार्थांशी संलग्न होणार्या पाण्याचा रंग ओळखण्याप्रमाणे, किंवा चार खंडांतून पसरलेल्या इंग्रजी राज्याच्या सरहद्दी सांगण्याप्रमाणेच मानवी मतीच्या आटोक्याबाहेरचे आहे. कवितेच्या विषयांची यादी विराट्स्वरूपवर्णनालाही लाजविण्यासारखी आहे. मेरुमांदारापासून मृच्छकटिकातील जोडयांतल्या खडयापर्यंत यच्चयावत् पाषाणसृष्टीला कवितेच्या प्रांतात जागा मिळालेली आहे. ज्वालामुखीच्या तेजस्वी रसगंगेत उजळलेली तिची अंगकांती चिलमीच्या धुराने धुरकटलेलीही आहे. स्वर्गलोकांतून पाताळाकडे अमृतकुंभ नेणार्या गरुडाबरोबर हिने भरारी मारली आहे. 'तशी लालबागेच्या सगुण पोपटां'बरोबर बेवडयाची बाटली घेऊन भटकण्यातही हिने मागे पुढे पाहिले नाही. राधाकृष्णाच्या रासक्रिडेप्रमाणे राघुमैनेचे रागरंगही कवितेने आळविलेले आहेत. श्रीखंडीप्रमाणे रणांगणात व बृहन्नडेप्रमाणे बायाबापडयांत हिचा केरवा नाच झालेला आहे. रामरावण, अकिलिसपॅरिस किंवा कर्णार्जुन यांच्यामधील महायुध्दात थैमान करून ही थकली, तशी नार्यासुभार्या, चिंगीरंगी किंवा सोम्यागोम्या यांच्यातील अटीतटीचे सामनेही हिने साजरे केले आहेत. त्रिकालदर्शी व सर्वतोगामी ऋषीच्या गंभीरतेने जिने दिक्कालाच्या अनंत ब्रह्मांडात भरार्या मारल्या आहेत, तीच लहान मुलाच्या उत्सुकतेने सनावळी किंवा मुंबई इलाख्यातील तालुक्यांची यादी गात बसली आहे. एकीकडे संसारातल्या अनुरूप वधूवरांच्या विवाहासाठी मंगलाष्टके म्हणत आहे, तर दुसरीकडे खेळातल्या बिझिकची गुलाम-राण्यांची विजोड जोडपी जमविण्यासाठी 'फुलवरराणी पहा बदामाला' असे नियम ठरवून देत आहे. घटकेत एकान्तातल्या योगाभ्यासी जनाला अचल समाधीचे रहस्य सांगत आहे. तर घटकेत बडोद्याच्या जुम्मादादाच्या तालमीतल्या बाळगोपाळांना 'जंपिंग म्हणजे उडी मारावी जोडी मुद्गलाची फिरवा। सेक्शन सहा मोजूनी पहा'। असा कसरतीचा उपदेश करीत आहे. सर्कशीतल्या नायिकेप्रमाणे वाघसिंहाशी लगट केल्यानंतर ही मागीलदाराच्या मोलकरणीप्रमाणे कुत्र्यामांजरांबरोबर खरकटयात वावरू लागते. हिमालयवर्णनानंतर तिने चव बदलण्यासाठी ग्रांटरोडवर्णन केले आहे. सहस्त्रदल कमलापासून दगडफुलापर्यंत, सीतेसारख्या साध्वीपासून साळूसारख्या गावगौरीपर्यंत क्षीरसागरातील पारिजातपुष्पापासून डबक्यातल्या फुलापर्यंत, चवरीपासून केरसुणीपर्यंत, सहस्त्राक्ष इंद्रापासून आंधळया मुलापर्यंत, सप्तदीपांच्या नामावळीपासून जी.आय.पी. स्टेशनच्या शिरगणतीपर्यंत, भास्कराचार्याच्या लीलावतीपासून तात्यापंतोजीच्या तोंडच्या हिशेबांच्या चालीपर्यंत, पुराणपुरुषाच्या सहस्त्रनामापासून आधुनिक कवींच्या खानेसुमारीपर्यंत, फार काय सांगावे, तुळशीच्या बुंध्यापासून रामाच्या शेंडीपर्यंत, सर्वत्र कवितेने आपले एकछत्री साम्राज्य पसरून ठेवले आहे. सर्वाभूती, सर्वाघटी पसरलेल्या परमात्म्यापेक्षाही कवितेची व्यापकता मोठी आहे. पुरुषसूक्तांतल्या नायकाची सत्ता जे अस्तित्वात आहे तेवढयावरच काय ती असते; पण कवितेने जे आहे ते तर आपलेसे केलेच आहे, पण जे नाही तेही आपलेसे केले आहे- अगदी जे नाही नाही तेही करून ठेवले आहे.
याप्रमाणे कवितेचे स्वरूप यद्यपि रंग उडालेल्या तसबिरीप्रमाणे पुसट असले, तथापि तिने कार्य मात्र लहानसहान केलेले नाही! कवितेच्या कर्तृत्वाचा थोडासा उल्लेख प्रारंभी केलेला आहे. तिच्या उपकाराचे साकल्याने वर्णन करावयाचे असल्यास आजपासून काळाच्या शेवटपर्यंत सर्व भावी काव्ये त्या एकाच विषयावर करावी लागतील. कवितेने जगावर उपकारांचे ब्रह्मांडच्या ब्रह्मांड करून ठेवलेले आहे. गद्याच्या गबाळ अमर्यादपणाला कवितेने आटोपशीर आकारात आणून मनुष्य जातीच्या स्थळकाळाची विलक्षण बचत केली आहे. एका समग्र गद्य ग्रंथाच्या मोकाट मैदानात एखाद्याला आपल्या एका घटकेचा मूर्खपणासुध्दा नीटसा फिरवून दाखविता येणार नाही, तेच कवितेत एका श्लोकाच्या बंदिस्त चौकात तो आपल्या आजन्म मूर्खपणाचे प्रदर्शन करून मोकळा होईल! तसेच, गद्यातल्या लेखांतून भल्याबुर्याची सेळभेळ असल्यामुळे बरेवाईटपणाबद्दल खात्री करून घेण्यासाठी प्रत्येक लेख आपल्याला बहुधा निम्माअधिक तरी वाचावाच लागतो; आणि बराच वेळ गेल्यावर त्यातील फोलपणा आपल्या लक्षात येत जातो. मासिक पुस्तके वाचताना कित्येकदा तरी आपली अशी फसगत होऊन उगाच वेळ फुकट जातो. कवितेच्या बाबतीत अशी फसवणूक बहुतेक होत नाही! कविता दिसली, की आपण तिकडे मुळी पाहतच नाही! त्याचप्रमाणे गद्याच्या नियमशून्यतेमुळे 'आव जाव घर तुम्हारा' अशातला त्याचा प्रकार होऊन बसला आहे. गद्यलेखकाच्या मनात आले की, ते कसेबसे तरी कागदावर उतरतेच; आणि त्यामुळेच गद्याचे गाठोडे मर्यादेबाहेर फुगत जात असते. परंतु गणमात्रायमकांसारख्या अडचणींमुळे आज किती तरी लोकांच्या कविता करण्याच्या कल्पना वार्यावर विरून जगाच्या मागचा जंजाळ चुकलेला आहे. तात्पर्य, गद्यापेक्षा काव्याचा मनुष्यजातीला अतोनात जास्त फायदा होत आलेला आहे.
वस्तुत: पाहता प्रस्तुत लेखकासारख्या सामान्य मनुष्याला सदरहू विषयावर अधिकारयुक्त वाणीने बोलता येणे अशक्य कोटीच्याहीपलीकडचे कार्य झाले असते; परंतु अलीकडे कवितादेवीच्या शिखरावर-नव्हे, कवितामंदिराची लागवड- तसेही नाही,- काव्यामृताची स्वैरलकेरी- छे; नाही साधत! कवितेची रचना व टीकांचा भडिमार ही दोन्हीही इतक्या अमर्याद प्रमाणावर वाढत चालली आहेत की, नियतकालीन वाङ्मयाकडे नुसते धावता धावता पाहणारालाही तद्विषयक बरीचशी माहिती झाल्यावाचून राहणार नाही. त्यातून मला तर मित्रत्वाच्या नात्याने उभयपक्षींच्या वाग्भटांचा जिवंत वाणीचाही लाभ होत असल्यामुळे 'अधिकस्याधिकं फलम्' होऊन बसले आहे. आणि म्हणूनच आप
- ल्या तावडीत सापडलेल्या हरिणाला जसा चित्ता।
बघतो तशा प्रकारे तत्परतेने व पूर्ण समचित्ता॥ 1॥ ने वाचक जर माझा प्रस्तुतचा लेख नीट बघतील। तर त्यांना कवितेचे पुष्कळसे ज्ञान खास होईल!॥ 2॥
जगातली एकंदर काव्यसंपदेकडे निरखून पाहणाराला तिचे दोन अगदी ठळक भाग करता येण्यासारखे आहेत.
- गद्य व पद्य यांचे परस्परभिन्न रचनानियम बहुतेक काटेतोल सावधगिरीने सांभाळून हे 'काव्यगद्य' निर्माण केलेले आहे. गद्य व कविता- अतएव निसर्ग व कला- यांच्या एकजीव तादाम्याचे हे पहिले उदाहरण आहे अशी उमेद आहे. लांबलांब संस्कृत समास व कोवळे कोवळे शब्द यांच्या जाळयांतील शाब्दिक उपमांची जी एक गुंतावळ अलीकडे 'एक गद्यकाव्य' म्हणून लोकांसमोर मांडण्यात येते, तिच्यावरून या काव्यगद्याची कल्पना सुचलेली आहे.
- बाळकराम
एक जगातील घडामोडींमुळे सुचलेली कविता व दुसरी अशा प्रकारची कविता वाचल्यामुळे किंवा एखाद्या कवीशी बराच परिचय झाल्यामुळे केलेली कविता. पहिल्या प्रकारची कविता व्हावयाला एखाद्या 'कवी'खेरीज दुसरे काही लागत नाही. दुसर्या प्रकारच्या एखाद्या कवितेचे सोळा सोपस्कार व्हावयाला मात्र, पहिल्या प्रकारची एखादी चांगलीशी कविता, तिचा अर्थ न समजणारा आणि स्वत:ला 'कवी' समजणारा एखादा ब्रह्मदेव, त्या काळी एखादी लोकप्रिय झालेली चाल, कवितेत नेहमी दिसून येणारे काही संस्कृत शब्द, 'जनि', 'जगी', 'खचितचि', 'ग', 'या काळी' यांसारखे काही उडाणटप्पू शब्द, काही बेकार शुध्दशब्दयोगी अव्यये, हव्या त्या ठिकाणी सापडणार्या थोडयाशा उज्ज्वल उपमा, या सर्वांचा अचूक उपयोग करण्याची हातोटी, धाडस व अज्ञान, असल्या काव्यनिष्पत्तीच्या परिणामाबद्दल बेफिकीरपणा, वाटेल त्या ढोबळ चुकीला दुर्बोध गुणांच्या कोटीत ढकलण्याइतका निस्सीम आत्मविश्वास, हा एकंदर खटाटोप उरकण्याला पुरेसे रिकामपण, प्रसिध्द मासिक पुस्तकांतील परतवाणाला मतभेदाच्या गंभीर स्वरूपाखाली ऐसपैस जागा देणारे एखादे मासिक पुस्तक, या कर्त्याचे नुसते नाव किंवा फार तर दोन ओळींचा मासला पाहिल्याबरोबर ते पान बदलणारे थोडेसे वाचक, पुढे काही कारणांमुळे जुन्याच्या अभिमानाचे सोंग घेऊन कुठल्या तरी वृत्तपत्रात तिच्यावर खरमरीत थोबाडसुख घेणारा त्याच किंमतीचा एखादा टीकाकार, त्या टीकेवर कविराजांच्या तोंडच्या असंबध्द शिव्यागाळीचा भडिमार, भाविक अजागळपणे ऐकणारे त्याचे सलगीतले सोबती, त्याच मुक्ताफळांतल्या तुटपुंज्या तयारीने प्रतिटीका करणारा एखादा जानी दोस्त आणि अखेरीला बारा महिन्यांतून केव्हा तरी एखाद्या सभेत या कवीचा त्याच्या जातगोतासकट वर्षश्राध्द करणारा त्याच्याच देशातला दुसरा उपटसुंभ इतकी सामग्री असावी लागते!
याप्रमाणे दुसर्या प्रकारच्या कवितेसाठी साधनबाहुल्याची गरज असल्यामुळे तिची निष्पत्ती मर्यादित प्रमाणावर होते, असे मात्र मुळीच नाही. भरण्याच्या (Quantity) दृष्टीने पाहिले असता मिठाईच्या पुडयांत पेढयांचे बताशांशी, मोरीसाठी केलेल्या मिश्रणात फेनाईलचे शुध्द पाण्याशी, माळयाच्या पुडयांत गुलाबांचे कण्हेर फुलांशी, पुणा मेलच्या प्रवासात थांबावयाच्या स्टेशनांचे न थांबावयाच्या स्टेशनांशी, मोठमोठया ऑफिसांतून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कारकुनाशी, क्लबांच्या बैठकींतून त्या बाटल्यांचे सोडालिमलेटच्या बाटल्यांशी, प्रेमयाचनेच्या संवादांतून रमणीच्या शब्दांचे वल्लभाच्या शब्दांशी, किंवा एकंदर समाजात शहाण्यांचे मूर्खांशी जे प्रमाण असते, तेच पहिल्या प्रकारच्या कवितेत दुसर्या प्रकारच्या कवितेशी असते.
आताच केलेल्या उत्पत्तिविवेचनावरून वाचकांच्या ध्यानात आलेच असेल, की जन्यजनकसंबंधामुळे दुसरीचे सामान्यस्वरूप अगदी पहिल्यासारखेच असते. वरवर पाहणारांना या दोन प्रकारच्या कवितांचा भेद चांगलासा लक्षातसुध्दा येत नाही. उलट दुसर्या प्रकारात रागरंगाची रेलचेल आणि अलंकारांचा अमर्याद भरणा जास्तच दिसून येत असल्यामुळे सामान्य वाचक पुष्कळदा बुचकळयात पडल्यावाचूनही राहत नाही. नैसर्गिक फलसृष्टीपेक्षा गोकाकची लाकडी करामत रंगेलपणात फाजील भडक व खर्या राजापेक्षा त्याच्या नाटकी प्रतिनिधीच्या उरावर पाहणाराचा ऊर दडपून टाकणारी मोत्यांची कंठाल बेसुमार प्रमाणाची असावयाची हा रोजच्या पाहण्यातला खेळ आहे! दुसर्या प्रकारच्या कवितेचा फारपणा याप्रमाणे अवाढव्य असल्यामुळे, प्रस्तुत लेखात आपणाला तिच्याबद्दलच उहापोह करावयाचा आहे. पहिल्या प्रकारच्या कवितेशी आपणाला मुळीच प्रयोजन नाही, असे म्हटल्यास चालेल; आणि म्हणूनच सदरहू लेखातून पहिल्या व दुसर्या प्रकारच्या लेखकांसाठी अनुक्रमे 'सत्कवि' व 'कवि' असे तात्पुरते पारिभाषिक शब्द वापरण्याचे योजिले आहे, एवढे लक्षात ठेवण्याची वाचकांनी खटपट करावी. मराठी भाषेच्या सुदैवाने व दुर्दैवाने सध्याचे सारेच काव्यलेखक दुसर्या प्रकारचे नाहीत.* काही सत्कवी आपल्या मातृभाषेची वंदनीय सेवा करीत आहेत; अर्थात प्रस्तुत लेखात त्यांच्याबद्दल काहीएक लिहिण्याचे कारण नाही.
मात्र जाता जाता यांच्याबद्दल एवढे म्हणून ठेवल्यावाचून राहवत नाही की, यांच्या काव्यरचनेपासून सुदैवाने जसा आनंद होतो, तसाच दुर्दैवाने त्याच्या शतपट त्रासही होतो; कारण, यांच्या एकेक कवितेपासूनच, एकाचे एकवीस आणि पाचाचे पंचवीस याप्रमाणे कवितेची कमअक्कल पैदास होत असते. त्यांच्या कविता व्हावयाच्या बंद झाल्या, तर आपल्या नकली नाण्याच्या टाकसाळीही खडाखड बंद होतील.
- माझ्या कविवाचका! तुझ्या छोटया मनाच्या समाधानासाठी मी मुद्दाम या मोघम शब्दाची योजना केलेली आहे. गोड फसवणीच्या भरात माझ्या योजलेल्या अंदाजाबाहेर आणखी एक वळकटी तू या बेदाद धर्मशाळेत हळूच आणून टाकणार आहेस हे मला आता उघड उघड दिसत आहे. - बाळकराम
मोराचा नाच डोळयांसमोर नसला म्हणजे लांडोरीच्या अंगात उसने अवसान येत नाही आणि गंगेला पूर आला नाही म्हणजे 'गावगावांनाही तुंबा' बसण्याचे कारण उरत नाही. एखाद्या सत्कवीच्या कवितेची पालखी छबिन्यासाठी बाहेर पडल्याबरोबर तिच्या पाठोपाठ तिची जुनेरी नेसणार्या जाफराबादी छबेल्यांच्या धिंडकांची धांदल पाहणाराला आकाशातल्या मेघांची गंभीर गर्जना होताच त्याच्या कृपाजलाचे चार थेंब न पचविण्याइतक्या हलक्या पोटाच्या बेडकांच्या आरोळयांची, हुबळी-धारवाडाकडे पोळयाच्या दिवशी वर्खाने शिंगे शोभविणार्या मोठमोठया बैलांच्या मागून आपल्या टीचभर शिंगांवरही तिचीच बेगडी मखलाशी करून निघालेल्या बोकडांच्या तांडयाची, किंवा पुण्यासातार्याकडे दसर्याच्या दिवशी झेंडूच्या माळा घालून मिरविणार्या जातिवंत घोडयांच्या बिनीला लागून रंगीबेरंगी पट्टयांनी नटून चालणार्या कुंभारी गा-- धौतेश्वर! अशा प्रसंगी मात्र या सत्कवींच्या काव्यानंदाचाही क्षणभर विसर पडून त्रासलेल्या मनाला हल्ली मोठमोठया शहरांतून 'तीन वर्षाच्या आतील मुले' हातोहात नाहीशी करण्याची युक्ती परमेश्वराला या सत्कवींच्या लहानपणी न सापडल्याबद्दल एक प्रकारची हळहळ वाटू लागते! तो एखाददुसरा मोरही नको आणि त्याच्या मागचा लाखो लांडोरीचा तो कळपही नको, असे होऊन जाते!
या दोन प्रकारच्या कवींच्या कृति सकृद्दर्शनी सारख्या स्वरूपाच्या भासल्या तरी त्यात सूज बाळशाइतके अंतर असते. सत्कवीच्या कवितेत नवनव्या कल्पना विहरत असतात व आपल्या दोस्त कवीच्या बेसूर बडबडीत, येथून तेथून त्याची स्वत:ची आपण कवी असल्याची एकच कल्पना दिसून येते. पहिल्याला रसिकांच्या झुंडीच्या झुंडी शोधीत असत, दुसरा रसिकांच्या तपासात फिरत असतो; एकाला त्याचे वाचक तो कवी असल्याचे वारंवार सांगत असतात, दुसरा आपल्या वाचकांना आपण महाकवी असल्याचे सांगत असतो; एकाच्या कवितेत परस्पर असंबध्द गोष्टींतून सुसंबध्द तत्त्व काढलेले दिसून येते, तर सुसंबध्द गोष्टींना असंबध्द रूपाने दाखविण्यात दुसर्याची कविता पटाईत असते; एकाची कविता वाचताच तिला मस्तकी धारण करावी असे वाटते, तर दुसर्याची कविता पाहताच माथे फिरावयाला लागते; पहिल्या प्रकारच्या कवितेत कधीकधी उघड दिसणार्या अर्थाच्या आड गमतीचा गूढार्थही दृगोच्चार होतो. तर दुसर्या कवितेत काहीच अर्थ नसतो; एक गरिबाच्या झोपडीतसुध्दा स्वर्गसुख तुच्छ वाटावयास लावितो, तर दुसर्याच्या कवितेतली स्वर्गसुखाची वर्णने ऐकताना नरकयातना भोगण्याइतका त्रास होतो; थोडक्यात आणि स्पष्ट सांगावयाचे झाल्यास एक खराखुरा कवी असतो आणि दुसरा शुध्द नंदी शिव-शिव! बोलण्याच्या भरात केवढे वाईट काम करीत होतो मी! परनिंदा! अतिशयोक्तीच्या नादाने या यमकमित्रांची किती नालस्ती केली ही! क्षमा करा, गणदासांनो, क्षमा करा. महाकवीत आणि तुमच्यात मी म्हणतो तितके विशेष अंतर नसून खरे पाहता ते अगदी दुर्लक्ष करण्याइतके थोडे, केवळ दोन बोटांइतके आहे! महाकवी अगदी वर्गात भरार्या मारीत असतात, आणि प्रासपुत्रांनो! तुम्हाला स्वर्ग केवळ दोन बोटे उरलेला असतो, एवढेच!
प्रयोजनाची आणि भातुकलीची परिभाषा बहुतांशी एकरूप असते. त्याचप्रमाणे गोरगरिबांच्या गौरीपुढील मांडणावळीत ज्याप्रमाणे त्या त्या आळीतील श्रीमंतांच्या घरची आरासच ज्याच्या त्याच्या पतीप्रमाणे दिसून येते, त्याप्रमाणे चालू काळच्या सत्कवींच्या कवितेच्या अलंकारांनीच बहुतेक कवींच्या कविता नटतथटत असतात; कारण पहिल्या प्रकारच्या कवितेत योग्य कारणामुळे आलेल्या बहुतेक गोष्टी पहिलीत त्या आल्या एवढयाच कारणामुळे दुसरीत उतरत असतात; भूतकालाचा सबंध जामदारखाना याप्रमाणे आपल्यासमोर उघडा सापडल्यामुळे कवीला काव्यसाधनाची मुळीच वाण पडत नाही; परंतु या वडिलोपार्जित मिळकतीची मांडणी मात्र फारच अस्ताव्यस्त स्वरूपाची असते. आणि त्यामुळे आकाशात फिरणार्या ढगाप्रमाणे पहिलीत खरोखरीच पाणी खेळत असते; एखाद्या जलाशयातील त्याच्या प्रतिबिंबाप्रमाणे दुसरीची सारी करामत पाण्यात पडलेली असते. अल्लीबाबाने पाहिलेल्या चाळीस चोरांच्या गुहेत अगणित अलंकारांची जिन्नसवार जुळणी तरी केलेली असेल, बारा घरच्या तुकडयांनी भरलेल्या मधुकरीच्या ताटातसुध्दा ठोकळ मानाची काहीतरी शिस्त सापडेल, चौकीवर पडून राहिलेल्या बेवारशी सामानाची व्यवस्थाही अगदीच आडमाप नसेल; पण कवितेच्या या रचनेत मात्र जुन्यानव्या काळचा सारा चांगुलपणा चोरबाजारातल्या लिलाववाल्यांच्या दुकानातील सामानाप्रमाणे अगदीच गैरशिस्तपणे कोंबून भरण्यात येत असतो. खर्या कवितेपासून नकली कवितेची भेद स्पष्टपणे दाखविणे अद्यापि अगदी दुष्कर असले, तरी त्याची काही ठळक लक्षणे देता येण्यासारखी आहेत. तयार साठयांतून मनसोक्त उचल व्हावयाची असल्यामुळे असल्या कवीच्या कवितेत रूढ शब्द, कल्पना किंवा अलंकार या ज्यांचा विलक्षण भरणा झालेला असतो; मात्र यांचा उपयोग करण्यात मालकीच्या सरावातील मनमोकळेपणाच्या ऐवजी पाहुण्याच्या स्वागतसमारंभासाठी शेजारच्या श्रीमंतांकडून आणलेल्या रुप्याचांदीच्या भांडयांचा वापर करताना आपलेपणाचा छाप वठविण्याच्या हेतूने हलक्या मानाचा मनुष्य जो फाजील बेफिकीरपणा दाखवीत असतो, तोच या कवितांतून येथून दिसून येत असतो. ठिकठिकाणी क्षुल्लक वर्णनासाठी निर्वाणीच्या, व उत्कट रसपोषणासाठी अगदीच निर्जीव शब्दांचा उपयोग झालेला असतो. यामुळे या कविता तयार कपडे विकावयाच्या मोठमोठया इंग्रजी दुकानांतून दाराशी नखशिखांत सजवून ठेवलेल्या पुतळयांच्या खडया थाटात असलेल्या दिसतात.
आहे, वाचकहो! उपमादृष्टांताच्या या फाजीलपणामुळे त्रासलेल्या तुमच्या मनाची स्थिती माझ्या लक्षात आहे! त्याचप्रमाणे प्रस्तुत लेखाचे लांबलचक चऱ्हाट कवितेइतकेच कंटाळवाणे होत चालले आहे, हेही मी पुरेपूर जाणून आहे; पण इलाज नाही. लेखाचा विषय कविता असल्यामुळे माझ्या अंगात या वेळी ती गद्यरूपाने संचरली आहे; तेव्हा उपमा वगैरे अलंकारांची गर्दी ही व्हावयाचीच! तसेच तुमच्या दृष्टीला दिसणारे हे चऱ्हाट विश्वव्यापी कवितादेवीच्या गंगावनातील गोफालासुध्दा पुरावयाचे नाही.
भिन्नभिन्न उपमा, कल्पना किंवा शब्दप्रयोग यांचे एका वाक्यात मिश्रण हे या भेदाचे दुसरे स्पष्ट लक्षण होय. उदाहरणांनी हे लक्षण सुबोध करावयासाठी वैयक्तिक टीकादोषाला प्राप्त होणे अपरिहार्य असल्यामुळे प्रस्तुत लेखातील 'कवितादेवीचे शिखर' वगैरे प्रारंभीची वाक्यरचना वाचकांना पुन्हा पाहण्याची शिफारस करून मी मोकळा होतो. एकीचे पूर्वार्ध दुसरीच्या उत्तरार्धाशी सांधून सजलेली मिश्र कल्पना पाहताच अर्धमीनाकृती सागरसुंदरी पाहणार्या ग्रीक खलाशाप्रमाणे, किंवा कमरेपर्यंत फत्तराच्या व वर मानवी देह धारण करणार्या बकावलीपरीला पाहणार्या ताजुलमुलकाप्रमाणे बिचार्या वाचकाला गोंधळून गेल्यासारखे होत असते. तिसरी खूण रचनेच्या स्वरूपाबद्दलची असते. कोणत्याही विषयावर कविता करावयाला बसताच आपल्या कवीला प्रथम स्वाभाविकपणेच इतरांच्या त्या विषयावरील उत्तमोत्तम कल्पना आठवतात. यांचा उपयोग झाल्यानंतर दुसर्या प्रतीच्या कल्पनांच्या पलटणीची हजिरी होते. याप्रमाणे उतरत उतरत शेवटी स्वत:च्या रद्दड कल्पकतेची पुरवणी जोडण्यात येते. यामुळे सहजच रसपरिपोष, कल्पनासौंदर्य वगैरे बाबतीत आपल्या कवीची कविता नेहमी उतरत्या भाजणीत केलेली दिसून येते. प्रारंभीच्या दोनचार ओळींशी शेवटल्या ओळींची तुलना करून पाहताच ही गंमत वाचकांच्या चटकन लक्षात आल्यावाचून राहत नाही. अशी कविता पाहणाराला पहिल्या दुसर्या वर्गाच्या डब्यांना जोडवूनच मालाचे डबे ओढणार्या सदर्न मराठा रेल्वेच्या गाडीची, किंवा कॉलर नेकटायपर्यंत सुधारलेल्या पोषाखानंतर कमरेभोवती पिढीजाद रुमालाचा फडकाच लावून कार्ल्याच्या जत्रेत मिरवणार्या कोळीदादाच्या मूर्तीची आठवण होत असते. अलीकडे काही मासिक पुस्तकांतून कवितेच्या प्रारंभीच कवीचे नाव देण्याची वहिवाट पडत आहे, ती या दृष्टीने पाहता अस्थानी आहेशी वाटू लागते. कारण शेवटच्या भागावर कवीची खरीखुरी मालकी असल्यामुळे त्याचे नाव शेवटी येणेच रास्त आहे. याशिवाय विशेषणाचा दुरुपयोग, कल्पनेची चोरी छपविण्यासाठी मूळच्या साध्या शब्दांऐवजी संस्कृतातल्या आडरस्त्यावरच्या शब्दांची योजना, इत्यादी बारीकसारीक लक्षणेही सांगता येण्यासारखी आहेत. सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास लांबलांब संस्कृत समास वापरण्याच्या रीतीचा उगमही असल्या छपवाछपवीच्या इच्छेपासूनच झालेला आहे, असे दिसून येईल.
कोणत्याही काळी कवींचा एक भला मोठा कळप समकालीन सत्कवींची री ओढून अशा प्रकारची कविता करण्यासाठी सारखा झटत असतो. नवे नवे सत्कवि उदयाला येतील, तसतशी यांच्या काव्यरचनेची पध्दती बदलत जात असते. मोठमोठया कचेऱ्यांतून वरचा अधिकारी वेळोवेळी बदलला जाऊन कारकूनपेशाचे कारागीर मात्र अगदी बुढ्ढेपणातही आपल्या जागी तितक्याच आज्ञाधारक लघुवृत्तीने काम करीत असतात, तद्वत या कवींच्या मेळयांची स्थिती असते. कोणीकोणी कवी उभ्या आयुष्यात एखाददुसरी कविता नीटशी समजताच तिच्या भिन्नभिन्न शिळया आवृत्ती काढण्याचा उपक्रम सुरू ठेवीत असतात. जगाच्या अमुद्रित काव्यसंग्रहात अशा शिळा छापाचे कामच विशेष असल्याचा तज्ज्ञांचा अभिप्राय आहे. अष्टौप्रहर चाल करून ठरावीक वर्तुळांतच गिरक्या खाणार्या घडयाळातील काटयांप्रमाणे यांची कटकट अखंड चालूच असते. मात्र घोडकेसांच्या झाडणीचे केस जसे कितीही काळ गेला तरी पांढरे होण्याचा संभव नसतो, तसा वाढत्या कालमानाप्रमाणे यांच्या पोरकटपणाचेही ज्ञानवृध्दद्वात कधी पर्यवसान होण्यासारखे नसते. आता आपल्या चालू काळच्या कवीचा साधारण नकाशा काय असतो, हे पाहण्याचा थोडाबहुत प्रयत्न करून पाहू.
प्राणिसृष्टीतील इतर घटकांप्रमाणेच 'कवि हा जन्मावा लागतो', मडके, वस्तरा, गुडधानी वगैरे पदार्थांसारखा तो 'करून होत नाही.' सर्व जगाशी याचे बंधुत्वाचे नाते असल्यामुळे जातिभेदाच्या अभावी हा अगदीच विजातीय असतो. याचे आयुष्य बाल्यावस्था, तारुण्यावस्था, व विरहावस्था या तिहींनी विभागलेले असते. कवी म्हातारा मात्र असल्याचे अजून ऐकिवात नाही. याचे बाळपण मोठया सुखात गेलेले असते; परंतु तारुण्य मात्र तितकेच दु:खपूर्ण असते. याच्या जीविताची श्वसनक्रिया आजन्म दीर्घ नि:श्वासांनीच होत असते. याच्या अंतरी कसली तरी आग भडकलेली असते. हा रानावनांतून, डोंगरांवरून, जलाशयाच्या तटांवरून किंवा बागबगिच्यांतून नेहमी फिरत असतो. आनंदात निमग्न असणे, रडणे, तंद्रीत पडणे, किंकाळया मारणे, आलोचन जाग्रणे करणे; स्वप्ने पाहणे, भ्रांतिष्टासारखे भटकणे, अश्रूंच्या पुरात वाहून जाणे, फुलपाखरांच्या मागे लागणे, जगावर लाथ मारणे यांसारख्या करमणुकीच्या प्रकारात हा आपला फावला वेळ घालवीत असतो. याला फुलांची दांडगी आवड असते. मात्र हा लहरी स्वभावाचा असल्यामुळे गाण्याबजावण्याचाही याला बराच शोक असतो. याचा मुख्य आहार म्हणजे अमृत होय. ते आणण्यासाठी हा हरघडी स्वर्गापर्यंत येरझारा घालीत असतो. वर्णनावरून पाहता अमृताचा रंग पांढरा असावा. या अमृतपानामुळे हा जिवंतपणी मेल्यासारखा असतो, तरी मरणोत्तर चिरंजीव होण्याची याला खात्री असते. आपली कविता पुढल्या पिढीला आवडण्याबद्दल हा वाटेल तशी हमी देत असतो. याची एकंदर वृत्ती एखाद्या बालकासारखी असते. कवीच्या वस्त्रप्रावरणाबद्दल बहुतेक कोठेही उल्लेख केलेला नाही. 'अरसिकेषु कवित्वनिवेदनम्', 'निरंकुशा: कवय:', 'तान्प्रतिनैष यत्न:' आणि 'कवि हे शब्दसृष्टीचे ईश्वर' या चार बुरजांच्या किल्ल्यांत याचे वास्तव्य असते. जगाच्या कल्याणाची जबाबदारी याने आपल्या टाळक्यावर घेतलेली असते. व्यवहाराच्या सोईसाठी याने गुणविभागश: मनुष्याच्या दोन जाती पाडिलेल्या असतात. आपली कविता वाखाणणारी शेलकी मंडळी 'रसिक' वर्गात बसवून हा बाकीच्या सर्वांना जात्या 'अरसिक' कोटीत ढकलून देतो. (ही विभागणी वैयक्तिक तत्त्वावर होत असल्यामुळे एका कवीचा रसिक दुसर्याच्या हिशेबी अरसिकांत जमा व्हावयाला काही हरकत नसते.) पैकी रसिकांशी याची जिवाभावाची दोस्ती असून अरसिकांशी मात्र याचे हाडवैर असते. कवीचे व्याकरणाशीही असेच दांडगे शत्रूत्व असते. काही काही कवी तर जवळजवळ अक्षरशत्रूही असतात. याशिवाय गंधर्व, अप्सरा इत्यादी परलोकच्या रहिवाशांशीही कवीची थोडीबहुत पैछान असते. याचे सर्व जगभर प्रेम असते. हा विलक्षण मत्सरी असतो. आपल्या कवितेविषयी बोलताना तो पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या धिंगाण्याने गर्जत असतो; तसेच दुसऱ्यांच्या कवितेविषयी बोलणे निघताच त्याच्या तोंडावर समाजिष्टाची स्तब्ध गंभीरता पसरते. कवी स्थल-कालाविषयी बिलकूल पर्वा करीत नाही; नाही म्हणावयाला मासिक पुस्तकाच्या संपादकाजवळ मात्र 'पुढच्याच महिन्यात' 'आपल्या कविते'ला स्थळ देण्याविषयी तो कधीमधी अजीजी करीत असतो. कीर्तीविषयीही तो असाच बेफिकीर असतो. एखाद्याने आपली कविता वाचल्यावर तो आतुरतेने ती कशी काय असल्याबद्दल चौकशी करतो, ती केवळ वाचकाची रसिकता पाहण्यासाठी. हा घरचा अतिशय दरिद्री असतो. मात्र अस्सल गर्भश्रीमंतांना आपल्या गजान्तलक्ष्मीबद्दल वाटत नसेल इतका कवीला आपल्या दारिद्य्राचा अभिमान असतो. आकाशात गिरक्या घेणार्या गिरकेबाज कबुतराला गरिबीच्या गिलोलाने कोलमडून तडफडताना पाहिले, म्हणजे जगाची काळजी वाहणार्या या जिवाचे असे हाल करणारा परमेश्वर मोठा निर्बूज असला पाहिजे, असे तिऱ्हाइतालासुध्दा कधीकधी वाटण्याचा संभव असतो; परंतु प्रत्येक कवीच्या घरी मासिक पुस्तकांकडून परतलेल्या कवितांचे द्रव्याभावामुळे न छापलेले बाड पाहणाराला मात्र कवीपेक्षा परमेश्वरालाच जगाची जास्त काळजी वाटते, असे प्रांजलपणे कबूल करावे लागते. कवीचे अंत:करण आरशासारखे असते! अर्थात अशा हृदयात समोर असेल त्या काव्याचे जसेच्या जसे प्रतिबिंब वठत असल्यास ते रास्तच आहे. अगदी लहानपणापासूनच याला कविता करण्याचा रोग जडलेला असतो. हा रोग कोणत्याही उपायाने हटण्यासारखा नसतो. एकदा हालू लागलेला दात सोन्याच्या तारेने काही काळ तरी बांधून स्थिर ठेवता येतो, पांढरा झालेला केस कलपाने तात्पुरता तरी काळा होतो; परंतु कवी मात्र सोन्याची रास पुढे ठेविली, किंवा टीकेमुळे ठिकठिकाणी काळाठिक्कर पडला, तरी कविता करावयाचा थांबत नाही. कवीचे नाव बहुधा त्याच्या आप्तेष्टांच्या नावाशी संलग्न असते. नाव मिळविण्याइतकी अक्कल नसल्यामुळेच कवीला सग्यासोयऱ्यांच्या नावावर भिस्त ठेवावी लागत असेल, अशी क्षुद्र कल्पना लढवून कोणी कोणी या प्रघाताला नावे ठेवण्याचा प्रयत्न करतात; परंतु त्यात नावापुरतेसुध्दा तथ्य नसते. पुढेमागे कवितेमुळे आपले नाव घालविण्याची भीती असल्यामुळे आप्तेष्टांना दूरदृष्टीने पुढे लोटणार्या कवीला अक्कल नाही, असे कोण म्हणेल? शिवाय दातांवरून जाणत्यांना घोडयाचे वय ओळखता येते, त्याप्रमाणे दर्दी मनुष्याला कवीच्या या नावावरून त्याचे काव्यारंभाच्या काळचे वय हुडकून काढता येण्याचीही या पध्दतीने थोडीशी सोय होते. पुत्र किंवा बंधू या अर्थाच्या शब्दांनी नावाचा शेवट करणारा कवी बहुधा बाळपणीच कविता करण्याला शिकलेला असतो, असा अंदाज करणे फारसे चुकीचे होणार नाही. कारण प्रणयाची लज्जत कोवळया वयात समजण्याजोगी नसल्यामुळे मुलाच्या प्रेमाची मर्यादा आईबाप, बहीणभाऊ यांच्यापुरतीच पसरलेली असते. 'भ्रमर', 'मयूर' वगैरे काव्यसृष्टीतल्या परक्या मंडळींच्या नावावर विकावयाला तयार झालेल्या उमेदवाराला बाल्य व तारुण्य यांच्या सीमारेषेवर उभा करता येईल. या वयातील प्राणी जन्मदत्त नातेवाईकांच्या प्रेमाला तृप्तीमुळे कंटाळलेला, स्त्रीविषयक प्रेम न जाणणारा; परंतु त्याची अंधुक कल्पना असल्यामुळे ते शोधावयाच्या मार्गाला लागलेला असा असतो; आणि म्हणून या भटकण्यातच त्याची वरील मंडळींशी ओळख घडून येत असते. रमणाच्या नात्याने सरसावणारा प्रणयी वीर तरुण वयाचा असतो, हे सांगावयाला नकोच. यापुढील वयात कविता प्रसिध्द करायला लागलेला कवी स्वत:च्या संपूर्ण नावाने, किमानपक्षी 'यशवंत', 'सदाशिव' याप्रमाणे एकतृतियांश नावाने तरी पुढे येऊ लागतो. कवीचे सर्वच जीवन जगाविरहित असल्यामुळे नात्याच्या बाबतीत त्याच्या कल्पनांतून कधीकधी विसंगतपणा दिसून येतो. आपल्या कवितेला हा कधी कन्या कल्पून तिला वाटेल त्या रसिकांच्या गळयात बांधण्यासाठी झटत असतो, तर कधी तिला आपलीच वल्लभा ठरवून तिच्याभोवती नाचत सुटतो! बाकी एका अर्थी कवीच्या विश्वबंधुत्वामुळे या विरोधाचे सहज खंडन होण्याजोगे आहे.
सार्या जन्मभर कविता करणे हा जरी कवीचा व्यवसाय असला, तरीही वर सांगितलेल्या अवस्थात्रयींमुळे त्याच्या जीवनक्रमात वेळोवेळी महत्त्वाचे फेरफार घडून येत असतात. बाळपणी आईच्या मांडीवर लोळत राहणे, फुलांत उठणे-बसणे, पतंग फुलपाखरांच्या बरोबर बागडणे, हाच त्यांचा मुख्य रोजगार असतो. पुढे लवकरच याला कविता करण्याची कला प्राप्त होते. या वयात शकुंतलेच्या सखीप्रमाणे याला 'मेले विषयासंबंधी वारे'ही लागले नसल्यामुळे अर्थातच हा कवितेसाठी विषयसुध्दा उघड उघड प्रसिध्द कवितांतीलच घेत असतो. या वयातील त्याची कविता स्थलवर्णनात किंवा नीतिपर तत्त्वे हुडकण्यात गढलेली असते. षडरिपूंशी सामने, संसाराच्या भोवर्यात सापडल्याबद्दल खेतप्रदर्शन, चौर्याएेंशी लक्ष योनींचा फेरा चुकविण्यासाठी ईश्वराची प्रार्थना वगैरे भानगडी याच वयाच्या कवितेत उरकून टाकण्यात येतात. कवी काळाच्या पुढेच असतो, ही गोष्ट सर्वत्र मशहूरच आहे. तिला अनुसरून जरासे वयोमान वाढताच आपला कवी शृंगाराकडे वळतो. या अल्पवयस्क अवस्थेतील त्याची सारी कविता बहुतकरून शृंगारालाच वाहिलेली असते. या वेळी हा सुखसागरात पोहत असतो. यानंतर बहुतेक लवकरच त्याचे लग्न झाल्यामुळे विरहावस्थेचा काळ सुरू होतो. साधारण दहाजणींसारखी बायको मिळाल्यामुळे त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटून हा सुखसागरातच गटांगळया खाऊ लागतो. बायको मिळाल्यामुळे विरहाला प्रारंभ होणे हा कवीच्या आयुष्यातील सर्वांत मोठा विरोधाभास अलंकार होय. कवीचे लग्न जरी एकदाच होत असते, तरी त्याला दोन स्त्रिया असतात. एक संसारकामात राबणारी बायको व दुसरी कवितेत नाचणारी प्रिया. यापैकी बायको घरातल्या घरात काबाडकष्ट करून पोराबाळांच्या खस्ता खात असते, आणि प्रिया कवीला गुंगारा देऊन कोठेतरी दडून बसलेली असते. बायकोशी याचे चारचौघांसमक्ष राजरोस लग्न झालेले असते, प्रियेशी हा गांधर्वविवाहाने संबंध जोडू पाहात असतो. ती याच्या इष्टमित्रांनी कधी पाहिलेली नसते, किंबहुना यानेही पाहिलेली नसते. तिला आळविण्यासाठी हा परोपरीने रडत असतो. कधी कधी हा छातीवर फुले ठेवून पडलेला असतो. याच्या डोळयांतून अश्रूंचे अलोट पूर वाहत असतात. आमच्या तिंबूनानांनी तर आगीसाठी बंब ठेवण्याच्या आटाआटीपेक्षा विरहावस्थेतील कवींचाच उपयोग करण्याची आमच्या म्युनिसिपालिटीला शिफारस करण्याचे मनात आणिले होते; परंतु कवीला आपल्या अलोट पुराने स्वत:च्या हृदयातील विरहाग्नीच्या ज्वाळा विझविता येत नाहीत, असे पाहून नानांनी आपला हा बेत रद्द केला. या अवस्थेत कवीच्या सभोवार भयाण अंधार पडलेला असतो. या अंधारात बसून तो सिनेमा थिएटरातील प्रेक्षकांप्रमाणे कल्पनातीत गोष्टी पाहत असतो. पृथ्वीवरील लहानसहान गोष्टींच्या वर्णनासाठीसुध्दा याला स्वर्गापर्यंत भरारी मारावी लागते. उंटावरून शेळया वळण्यापेक्षाही वरच्या दर्जाच्या या करामतीत कवीकडून कधी कधी गमतीचा वस्तुविपर्यास होत असतो. एका कवीने मोराच्या मधुर गायनाची शिफारस केली आहे. दुसर्याला अश्विनमासाचे दिवस विलक्षण शांतीचे वाटून जमीन हिरव्या कुरणांनी मंडित झालेली दिसली आहे. तिसर्याने बोरघाटात हंसाची वसाहत करून ठेविली आहे. कोणी फुलपाखराचे गाणे ऐकिले आहे. कोणी काकडभुंग्याला सकाळी सूर्याला सामोरे जाऊन स्वागतपर गाताना पाहिले आहे. एकाने आपण बोलूनचालून स्पष्ट रोडकेच असलो, तरी आपला तिरस्कार न करण्याबद्दल आपल्या प्रियेला विनवणी केली आहे; जणू काय सुंदर स्त्रियांच्या डोळयात भरण्यासाठी तरुणांच्या अंगी गलेलठ्ठपणा हा गुण अवश्यच आहे! या व याच धर्तीच्या अनेक आचरट चुका पाहून वाचकांना राग येण्याचा संभव आहे खरा; परंतु हे सारे शोध कवीने स्वर्गात भरारी मारून तेथून केलेले आहेत, असे कळल्यावरून तरी ते क्षम्य वाटावयाला हरकत नाही, असे वाटते. स्वर्गाच्या खालोखाल कवीला स्मशानाची आवड असते. यामुळे भुताखेतांशीही त्याची बरीच जानपछान झालेली असते. विरहावस्थेत कवी मरणाची सारखी अपेक्षा करीत असतो; परंतु बहुधा त्याच्या काव्यनिर्माणशक्तीला वचकूनच यम त्याची ही प्रार्थना होताहोईतो ऐकत नाही. मला वाटते, प्राणिमात्राच्या यच्चयावत् हालचालींची नोंद ठेवणार्या चित्रगुप्तानेसुध्दा, आपल्या आधुनिक कवीच्या कवितांच्या नकला करण्यापुरती देवाजवळून सवलत मागून घेतलेली असेल. आमचा भांबूराव (याच्या व आबाभटजींच्या कवित्वाचे विस्तृत वर्णन पुढे येणारच आहे.) आपल्या विरहावस्थेच्या काळात मरण्यासाठी असाच आतुर झाला होता. या एकाच विषयावर त्याने इतक्या कविता केल्या की, अखेर नानांनी कंटाळून त्याच्या टेबलावर अफू, सोमल वगैरे द्रव्यांची सार्या आधुनिक कवींना पुरून उरण्याइतकी रास आणून ठेविली होती! विरहदु:ख भोगीत असताना आयुष्याच्या शेवटच्या टोकाप्रमाणे प्रारंभीच्या टोकावरही कवी मधूनमधून नजर टाकीत असतो. चालू काळाच्या दु:खामुळे त्याला बालपण विशेषच सुखाचे वाटू लागते! शिवाय बाळपण मूळचेच सुखप्रद असल्याबद्दल सर्व जगाचीच एकवाक्यता आहे! वाचकहो! आपले बाळपण कोणाला रमणीय वाटत नाही? मोठमोठया कवींनासुध्दा 'बाळपणीचा काळ सुखाचा', 'रम्य ते बाळपण देई देवा फिरूनी' किंवा 'बाळपणीच्या नाना तऱ्हा' अशासारखे बाळपणाचे पोवाडे गायिलेले आहेत! अहाहा! ते बाळपण आणि त्या लीला! ते अर्ध्या तिकिटाने प्रवास करणे! ते निम्म्या दराने नाटक पाहणे! ते सर्वांनी कौतुक करणे! माझ्या लहानपणी शेजारपाजारच्या बायकांनी पटापट चुंबने घेऊन माझे लाड पुरवावेत; पण तेच आता-! वाचकहो, बाळपणीचे सुख अवर्णनीय आहे, असे म्हणतात ते काही खोटे नाही!
यानंतर कवीच्या अंगच्या मुख्य गुणाचे वर्णन करावयाचे आहे. हा गुण म्हणजे कवीचे वेड होय. कवीच्या वेडासाठी स्वतंत्र टप्पा (पॅराग्राफ) न राखणे निव्वळ वेडेपणाचे होईल. कवी हा उपजत वेडा असतो. लेखाच्या तोंडातच कवीचा व वेडाचा संबंध उडत्या उल्लेखाने दर्शविलेला आहे. कवीचे हे वेड घालविण्याचा प्रयत्न करणे तर दूरच राहिले, परंतु ते नाकबूल केल्यानेसुध्दा आपल्याशी कवी उभा दावा धरील. या वेडाच्या भरात कवी वाटेल तो विलक्षण चमत्कार करून दाखवितो. एका कवीने आपल्या कुटुंबातील सारी माणसे गेल्याचे एका सद्गृहस्थाला पत्र पाठविले आणि दुसर्या दिवशी सर्वांच्या खुशालीचे दुसरे पत्र पाठवून त्यात पहिल्यातील सर्व गोष्टी आपण वेडाच्या भरात लिहिल्याबद्दल खुलासा केला! जगाला उपदेश करावयाला तयार झालेला हा महात्मा स्वत: वेडापीर असतो, हे साहित्यशास्त्रासंबंधी सत्य, पदार्थमात्राला दृष्टीगोचर स्वरूप देणारा प्रकाश स्वत: अदृश्य असतो या पदार्थशास्त्रातील तत्त्वालाही लाजविण्याजोगे आहे! कोणाला पैशाचे वेड लागते, कोणाला कीर्तीचे वेड लागते. एका बाईला आपण पोस्टाचे तिकिट असल्याबद्दलचे वेड लागले होते; एका गृहस्थाला आपण प्रमाणाबाहेर लठ्ठ असल्याचे व दुसर्याला अक्षय पाऊस पडत असल्याचे वेड लागले होते; परंतु कवीला आपण वेडे असल्याचेच वेड लागलेले असते! प्रत्येक कवी आपल्याला निर्भेळ वेड लागल्याबद्दल अट्टाहासाने दवंडी पिटत असतो. लोकांना हे वेड खरे वाटण्यासाठी तो भर दोन प्रहरीच फिरावयाला निघतो, केसांच्या झिंज्या पसरतो, चारचौघांत बोलताना मध्येच स्वगत भाषणाला सुरुवात करतो, पंक्तीत जेवताना 'दुग्धी लिंबू' पिळणार्या अर्जुनालाही शहाणा म्हणवितो, (एकाने तर एकदा आपल्या शेजारी जेवावयाला बसलेल्या एका वृध्द गृहस्थालाच प्रियामजकूर समजून त्याच्या तोंडात घास भरविण्यालाही कमी केले नाही.) कोटाची बटणे उघडी टाकतो, टाळक्यावरची टोपी सव्वा हात मागे ठेवितो, किंवा भर रस्त्यात मध्येच बैठक मारतो. इस्पितळातील वेडयांच्या आणि कवींच्या तांडयांची थोडीशी तुलना करणे फारसे वावगे होणार नाही. इस्पितळातील प्रत्येक वेडा तिऱ्हाइताला स्वत:खेरीज तेथील बाकी सर्व रहिवाशी वेडे असल्याबद्दल बजावीत असतो, आणि कवीच्या टोळीतील प्रत्येकजण हा हक्क स्वत:पुरताच राखून ठेवीत असतो. वेडा उगीच आडव्यातिडव्या उडया मारितो, तसा हा रसिकांच्या अंगावर धूळ उडवितो, तर दुसरा लोकांच्या डोळयात धूळ टाकण्यासाठी झटत असतो! या कवींच्या स्वर्गापर्यंतच्या सार्या उडया केवळ त्यांच्या वेडाच्या जिवावर चाललेल्या पाहून मात्र स्वर्गाच्या सरहद्दीवरील बंदोबस्त फारच ढिलाईचा होत चालला असावा, असे वाटू लागते! हे स्वर्गस्थ देवांनो, आम्हा आर्यांची टीकांची बाडे मासिक पुस्तकांची कपाटे फोडून तुमच्या कानांवर येऊन आदळत नाहीत काय? स्वर्गप्राप्तीचे ते कडक निर्बंध आज कोठे गेले? आपल्या विधवेच्या केसाने किंवा जानव्याच्या सुताने स्वर्गास जाण्याच्या आमच्या कार्य-कल्पना लयाला जाऊन नुसत्या वेडाच्या कल्पनेनेच आता स्वर्गसुख मिळणार काय?
कवीच्या आणखी एका गुणाचा उल्लेख करून त्याचे हे लांबलेले वर्णन पुरे करू. कविता करण्याइतकाच त्याला आपल्या कविता दुसर्याला वाचून दाखविण्याचाही हव्यास असतो. अर्थात नव्या कवितेचा पहिला मारा कवीच्या निकटच्या मित्रांवरच होत असतो. काही कवी आपले बाड बरोबर घेऊन हिंडत असतात, आणि काही तर सार्या कविता पाठ म्हणून दाखवीत असतात. या कवितेतील लहानसहान गुणांचे सविस्तर स्पष्टीकरणसुध्दा श्रोत्याला ऐकावे लागते! माझ्या एका कविमित्राने मला कविता ऐकविण्याचा इतका त्रास दिला की, ज्याचे नाव ते! कोठेही व केव्हाही तो भेटला, की त्याच्या सगळया बेगम कवितांचा मला नजराणा केल्यावाचून राहात नसे! एकदा भर बुधवारात त्याने तालासुरावर आपल्या कविता म्हणून दाखवायला सुरुवात केली. हळूहळू आमच्याभोवती तमासगिरांचा तांडा जमू लागला! लोक आपणाला वेडे समजतील, असे मी त्याला सुचविताच त्याला दुप्पट अवसान येऊन रंग चढत चालला. शेवटी बुधवार चौकात येईपर्यंत आमच्या मागे इतका बेताल घोळका जमला की, ज्याचे नाव ते! त्याच रत्नाने आणखी एकदा माझा असाच कोंडमारा केला होता! त्या वेळी मी एका निकडीच्या कामात गढून गेलो होतो. अशात कोठल्याशा आप्ताच्या मरणाबद्दलचे आपले शोकरसप्रधान छोटेखानी काव्य आणून त्याने माझ्या सेवेला सादर केले. मला त्या वेळी फुरसत नसल्यामुळे पुढे केव्हा तरी स्वत:च ते वाचून पाहण्याचे अभिवचन देऊन तूर्त माझा वेळ न घेण्याबद्दल मी मोठया काकुळतीने त्याची विनवणी केली. बराच वेळ नाखुषीने आढेवेढे घेऊन शेवटी त्या काव्यातील निदान सतरावे कडवे तरी आपल्या तोंडूनच ऐकण्याचा मला आग्रह केला. माझा रुकार मिळताच त्याने ते कडवे अगदी ठाईत आळवून आळवून म्हणण्याला प्रारंभ केला. त्यातील गुणांच्या विवंचनात मागील संदर्भ माझ्या लक्षात येण्यासाठी त्याने सोळावे कडवे म्हणून दाखविले! सोळाव्याच्या स्पष्ट बोधासाठी पुन्हा पंधराव्याची साक्ष! याप्रमाणे अरेबियन् नाईटस्मधील गोष्टीतून गोष्ट निघण्याच्या तत्त्वाबरहुकूम आम्ही मागल्या पावली जात जात पहिल्या कडव्यावर जाऊन ठेपलो! आणि तेथून संगतवार शेवटपर्यंत आलो. गुणांच्या सूक्ष्म शोधासाठी याप्रमाणे त्या काव्याची आम्ही एकंदर तेरा पारायणे केली. शिवाय प्रत्येक वेळी चरण नीट कळण्यासाठी तो चारचारदा घोळून म्हणत होता, ते वेगळेच! मधून मधून आत्मस्तुतिपर मल्लिनाथीचा माराही सारखा चालू होताच. आमच्या संवादातील चार-सहा वाक्ये नमुन्यासाठी पुढे दिली आहेत.
तो- लक्षात नाही आले तुमच्या! ही या चरणातली मुख्य मख्खी आहे. मी- आले लक्षात! फार मार्मिकपणाने तुम्ही हे वर्णिले आहे खरे! तो- माझ्यात हेच तर विशेष आहे! सृष्टीचे सूक्ष्म अवलोकन! तुमच्या सामान्य दृष्टीला जिथे काही दिसत नाही तिथे मला हजारो गोष्टी दिसतात.
मी- तुमची कविताच याबद्दल साक्ष देईल! (त्याच्या कवितेत मला एकही गुण दिसत नसून त्याच्या दृष्टीने मात्र तिच्यात गुणांनी गजबजलेली शहरेच्या शहरे दिसत होती. मात्र माझ्या या वाक्यातील खोच त्याच्या लक्षात आली नाही. पण त्याची कविता ऐकण्याचा कंटाळा मी माझ्या तोंडावर स्पष्टपणे दाखवूनही जेथे त्याचा सूक्ष्मदर्शक यंत्राच्या आटोक्यात आला नाही, तेथे त्या गर्भित सूचनेचा काय पाड?)
तो- उगीच अशी कविता नाही होत! अंत:करण सृष्टीशी एकजीव झाले पाहिजे! बस्स, कवीला हृदय पाहिजे! कवीला डोक्याची काही जरूर नाही!
मी- अगदी बरोबर! आपल्या पुष्कळशा कवींना विधात्याने डोके दिले आहे, ते उपयोगाकरिता नसून केवळ मनुष्यदेहाची परंपरा सांभाळण्याकरिताच असावे असा माझा समज आहे!
तो- तुमचा समज अगदी खरा आहे! माझेच उदाहरण घ्या की, हृदय मृदू नसते, तर अशी कविता होती का? अहो, हृदयच काय, माझा हात पाहा, कविता लिहून लिहून किती मऊ झालेला आहे तो! स्वर्गापर्यंत भरार्या एरवी साधत नाहीत!
नुसता हात मऊ झाल्याने स्वर्गापर्यंत जाण्याचे त्याला सामर्थ्य आलेले पाहून पाठीचीसुध्दा हाडे मऊ करून त्याला अजिबात स्वर्गवासी करण्याची परोपकारबुध्दी क्षणभर माझ्या मनात येऊन गेली! हे काव्यवाचन चालले असताना तो त्या मेलेल्या आप्ताबद्दल मधून मधून रडतही होता! मीही मयतमजकूर अगदी अवेळी मेल्याबद्दल मनापासून दिलगिरी प्रदर्शित केली! पुढे तो शोकाने ओक्साबोक्सी रडू लागताच मी किंकाळया मारावयाला लागलो, आणि शेवटी दु:खावेगाच्या भरात बेशुध्द झाल्याचे सोंग करून धाडकन् धरणीवर अंग टाकले! माझ्या अंदाजाप्रमाणे डॉक्टर वगैरे आणण्याच्या खटपटीत न पडता तो आपल्या शीघ्रकवित्वाच्या जोरावर अश्रुजलानेच मला सावध करू लागला! काही वेळ श्वासोच्छवास साफ बंद ठेवून मी तसाच निपचित पडून राहिलो त्या वेळी मात्र आपल्यावर काही किचाट येईल, या भीतीने तो आपले चंबूगबाळे आवरून घाईघाईने निघून गेला, आणि मी एकदाचा त्या जाचातून सुटून अस्वलाच्या तावडीतून वाचलेल्या इंग्रजी प्रवाशाप्रमाणे मोकळेपणाने आपल्या कामाला लागलो! प्राणायामाचे महत्त्व या वेळेपर्यंत मला नीटसे समजले नव्हते!
काव्यवाचनाबद्दल कवीचा लकडा इतका चिकाटीचा असल्यामुळे त्याच्याशी ओळख होणे हे दुर्दैवाचे लक्षण आहे. माझा तर असा तर्क आहे, की वाल्मीकीच्या शतकोटी रामायणाचे तीन तुकडे तीन लोकी वाटून देऊन स्वत:साठी 'राम' ही दोनच अक्षरे ठेवण्यात भगवान कैलासनाथाचा हाच लोकहितपर हेतू असला पाहिजे, कारण एवढे मोठे काव्य वाचण्याची जबाबदारी कोणत्याही एकाकी लोकावर टाकणे केवळ निर्दयतेचे झाले असते. (मात्र एका सबंध काव्याचे तीन तुकडे केल्यानंतरही प्रत्येक तुकडा ठाकठिकीने सलगच्या सलग कसा राहिला, हे माझ्या बाळबोध मनाला न सुटण्याजोगे कोडे आहे. त्या दिवशी शृंगीभृंगी वगैरे गणांनी थंडाई थोडी विशेष कुसरीने केली असावी असे वाटते.) काही लोकांचा आमच्या आधुनिक कवींवर असा आरोप आहे, की त्यांना महाकाव्ये करता येत नाहीत. मी हा कवीचा दोष नसून उलट गुण समजतो. त्यांच्या इवलाल्या स्फुट काव्यांनीच वाचकांना बेजार करून सोडिले आहे, मग महाकाव्ये निघू लागली, तर काय प्रलय होईल न कळे! छे; छे! कवीश्वरांनो! भलत्या भरीला पडून तुम्ही महाकाव्ये रचण्याच्या नादी मात्र मुळीच लागू नका! नुसत्या छऱ्यांनी जमीनदोस्त होणारांवर क्रपतोफांची सरबत्ती कशाला हवी! काही कवींना आपल्या कवितेत प्रेतांनाही उठविण्याइतकी धमक असते, असे वाटत असते, ते बहुतेक याच जोरावर! खरोखरीच स्मशानात एखाद्या कवीने लांबसे काव्य जोराने वाचावयाला प्रारंभ केला तर खात्रीने प्रेते खडाखड उठून उभी राहतील! मात्र ती ते काव्य ऐकायला एक क्षणभर तरी थांबतील किंवा नाही, एवढाच प्रश्न आहे! चालू महायुध्दात सरकारने हिंदी शिपायांच्या इतक्या पलटणी नेल्या, त्यापेक्षा आधुनिक कवींची लहानशी तुकडी पुढे घातली असती तर शत्रूची ताबडतोब पांगोपांग झाली असती, अशी माझी बालंबाल खात्री आहे!
आपल्या कविमित्राचा निरोप घेण्यापूर्वी काही भाग्यशाली कवीचे अभिनंदन केल्यावाचून माझ्याने राहवत नाही. या कवींच्या घरातूनही कवितेचा वावर चाललेला असतो. कोठे कोठे तर कवितेची साथ थेट पोराबाळांपर्यंत पसरलेली आढळून येते. नामदेवाच्या कुटुंबाप्रमाणे हल्ली महाराष्ट्रात बरीच घरे कविता करण्यात रमलेली आहेत. आमच्या भांबूरावांचा धाकटा मुलगा तर उपजताक्षणीच स्त्रग्धरावृत्तात रडत असल्याचे तो शपथेवर सांगत असतो. याप्रमाणे सहकुटुंब सहपरिवारे स्वर्गापर्यंत भरार्या मारणार्या आमच्या आधुनिक कवीपुढे एकटादुकटा सदेह स्वर्गाला जाणारा तुकाराम अगदीच फिक्का पडतो, हे पुराणाभिमानी लोकांनाही कबूल करावे लागेल!
अशा प्रकारे चालत्या जमान्यातल्या कविवर्गाचे वर्णन केल्यानंतर दुसर्या एका वर्गाकडे न वळणे केवळ अन्यायाचे होणार आहे. हा वर्ग आधुनिक कवींच्या आक्षेपकांचा होय. आजकाल कवितेच्या कारभारात पडलेल्या लोकांचे मतभेदानुरूप दोन स्पष्ट विभाग पडलेले आहेत. यांपैकी एका वर्गाला 'नव्याचे सोयरे' व दुसर्या कंपूला 'जुन्याचे सुतकी' अशी नावे देता येतील. पहिला पंथ कोणत्याही नव्या गोष्टीचे अभिनंदन करीत असतो, आणि दुसरा प्रत्येक जुन्या गोष्टीबद्दल हळहळत असतो! एकाच्या मते हिंदुस्थानचे उष्टावण अजून व्हावयाचे आहे, तर दुसर्याच्या दृष्टीने त्याच्या उत्तरक्रियेसाठी भाताचे पिंड वळावयाचेच काम तेवढे राहिलेले आहे! याची ही सोयरसुतके केव्हाही फिटण्याजोगी नसतात. आपल्या बहुतेक कविमित्रांचा सोयर्यात समावेश होत असून त्यांचे आक्षेपक सुतक्यांच्या थव्यात सामील झालेले असतात. मात्र आनंदाच्या स्मितहास्यापेक्षा दु:खाच्याच किंकाळया नेहमी तीव्र असल्यामुळे सोयरेमंडळींपेक्षा सुतक्यांचीच मुजोरी जास्त जोराची असते. नव्या पक्षाला जुनी कविता इथूनतिथून कमकुवत वाटत असते, आणि जुन्या पंथाला नवी कविता बाटग्या स्वरूपाची भासत असते. या सुतक्यांची काही मते पुढे मासल्यासाठी दिलेली आहेत. भक्ती व कविता एकच होत, हे त्यांचे अत्यंत लाडके मत होय. अर्थात् सर्व इंग्रजी कविता, बहुतेक चांगली संस्कृत कविता, आणि नलोपाख्यानासारखी बरीच मराठी कविता यांच्या दृष्टीने बाष्फळ ठरून मोकळी होते! भक्तीखेरीज कविता नाही आणि भक्तिविषयक जे काही असेल, ते पूर्वजांनी म्हणून ठेवलेलेच आहे; त्यामुळे नव्या कवींनी मुळीच कविता करू नये हा यांचा पहिला सिध्दांत होय! प्रीतीसारख्या पाचकळ विषयावरील कविता अश्लील असावयाचीच, हे याचे आवडते मत असते! लग्नसमारंभावर अश्लीलत्वाचा आरोप करण्याला यांची सेना अजून कशी सरसावत नाही, हे मोठे आश्चर्य आहे. मेघदूतासारखी चटोर काव्ये, आणि शाकुंतलासारखी चघळ नाटके यांच्या डोळयांदेखत राजरोस मिरवत आहेत, हे त्यांच्या उजळ ब्रीदाला अगदी लांच्छनास्पद आहे! प्रीतीविषयक कविता करावयाच्या झाल्या, तर त्यांना पुराणाची थोडीशी फोडणी तरी असावी असा यांचा आग्रह असतो! प्रणयकल्पनांची किळसवाणी बडबड सोडून देऊन, यशोदेजवळ गाऱ्हाणी सांगावयाला आलेल्या गोपींजवळून पाच वर्षांच्या निर्दोषवृत्ती कृष्णाने आपला चेंडू काढून घेण्यात जे हृदयजंगम हस्तकौशल्य दाखविले, त्याचे वर्णन करावयाला अर्थात यांची आडकाठी नसते! नावडत्या गोष्टीवर तुटून पडताना देवादिकांची आणि साधुसंतांची पथके पुढे केल्याखेरीज यांचे नीट जमत नाही! हल्ली चोहीकडे अधर्म, भ्रष्टाकार आणि पीछेहाट जोराने सुरू आहे, हे यांचे जन्मवेड असते. नव्या कवींना किंवा त्यांच्या कविता छापणार्या मासिक पुस्तकांवर लोक अद्यापि सार्वत्रिक बहिष्कार कसा घालीत नाहीत याचे या वर्गाला मोठे गूढ वाटत असते. परमेश्वराचा अकरावा अवतार बहुधा या सत्कार्याकरिताच होणार, असा यांचा आवडता होरा असतो. आधुनिक कवींना महाकाव्ये करता येत नाहीत, हा यांचा तिसरा आक्षेप असतो. चवथा आक्षेप असा आहे, की आधुनिक कवींना मुळीच ज्ञान नसते. आधुनिक कवींना वेडाची 'सोल एजन्सी' घ्यावीशी वाटते, तर हा आक्षेपक वर्ग सर्वज्ञतेचा मक्ता आपल्याकडेच ठेवू पाहत असतो. भूमध्यरेषेच्या एका टोकावरील उत्तर ध्रुवाप्रमाणे दुसरीकडील दक्षिण ध्रुवाच्याही माथ्यावर विधात्याने बर्फाच्या घडया घातलेल्या आहेत, हे लहानसे तत्त्व मात्र यांच्या सर्वज्ञतेत सामील व्हावयाचे चुकून राहिल्यासारखे वाटते! आधुनिक कवी मोठे गंभीर तत्त्वज्ञान सांगतात; पण त्याप्रमाणे स्वत: वागत नाहीत, हा यापुढील आक्षेप आहे. या दृष्टीने पाहता ज्या वैराग्यपर भक्तिभावाच्या काव्याचे यांना पूर्ण रहस्य समजलेले आहे, त्याच्या उपदेशाबरहुकूम अंगाला राख फासून निघालेला यांचा भला मोठा तांडा आपल्याला कधी तरी पाहावयाला मिळण्याची आशा वाटू लागते. कलियुगात चांगले कवी होणे शक्य नाही, हा यांनी सहावा सिध्दांत ठरवून ठेवलेला आहे. अर्थात कलियुगाचा आरंभकाल मात्र आपली कविता किंवा लेख अलीकडच्या मासिक पुस्तकांकडून परत आल्या दिवसापासून ज्याचा त्याने स्वतंत्रदृष्टया मोजावयाचा असतो. मागील सात-आठच शतकांत सुमारे आठ-दहा चांगले कवी निर्माण होऊन गेल्या पन्नास वर्षाच्या लांबलचक अवधीत शेपन्नाससुध्दा उत्तम कवी होऊ नयेत, हे वरील विधानाचे बिनतोड प्रत्यक्ष प्रमाण आहे. हल्लींची कविता टिकाऊ नसते, हे या वर्गाचे सरते म्हणणे असते, आणि हा मुद्दा मात्र माझ्या दृष्टीने अगदी बरोबर आहे. जुन्या बाडांचा पसारा केला, तर त्यातून गतकवींच्या चारचारशे वर्षाच्या मुरलेल्या कविता किती तरी काढून दाखविता येतील; परंतु आजकालच्या एकाही कवीला आपली कविता शंभर वर्षांपेक्षा जास्त टिकली आहे, असे म्हणता येणार नाही! ही क्षणभंगुरता खरोखरी लाजिरवाणी आहे!
रस्ता चुकून वाङ्मयाच्या फंदात पडलेल्या या दोन वर्गांचे परस्परांशी जे हाडवैर असते, त्यांच्या मानाने अहिनकुलाचे, देवदानवांचे, कोर्टाची पायरी चढलेल्या सख्ख्या भावांचे वैरसुध्दा गुण्यागोविंदाच्या वागण्यासारखे निर्दोष ठरेल. दोन्ही पक्ष आपापल्या (गैर) समजुतीप्रमाणे नेटाचे प्रयत्न करीत असतात. त्यामुळे मायभाषेला कवितेच्या काढयाबरोबर टीकांच्या निकाढयाचाही भरपूर पुरवठा होत असतो. एक पक्ष मराठी कवितेला नवाईने बाटगी बनविण्याचा प्रयत्न करितो, तर दुसरा तिला फक्त वारकऱ्यांबरोबर तीर्थक्षेत्रांवर पाठवून अगदी सोवळी करण्यासाठी धडपडत असतो. पहिल्याचा पुढील पिढीवर भरवसा, तर दुसर्याची मागील लोकांवर भिस्त! एक भविष्यपुराणवादी आणि दुसरा तर सारीच पुराणे उराशी बाळगणारा! जगातील चैतन्य आपल्या कवितेमुळेच उत्पन्न होत असते हा पहिल्याचा अभिमान तर प्रलयकाळ लांबणीवर पडण्याला केवळ आपली पुण्याईच कारण असल्याबद्दल दुसर्याची खातरजमा! या आक्षेपक वर्गाची जुन्या लोकांबद्दलची आस्था, चालू काळच्या तरुण मंडळींविषयीची कळकळ आणि पुढील पिढीसंबंधी हळहळ ही पाहिली, म्हणजे त्यांच्याबद्दल आदर वाटू लागतो! आधुनिक कवितेच्या धुडगुसामुळे आम्हा आर्यांच्या आर्यत्वाचे, इतिहासाचे, व्याकरणाचे, धर्माचे, प्रासयमकांचे, नीतिमत्तेचे, सर्वस्वाचे पार वाटोळे होणार अशी यांच्या मनाने हाय खाल्लेली दिसते. भिऊ नका, जरीपुराण्यांनो! भिऊ नका! आधुनिक कविता कितीही बोकाळली, तरी तिने आपले काहीच नुकसान होणार नाही! त्या कवितेने पुढच्या पिढीचे अहित होणे हे तुमच्या टीकांनी आधुनिक कवींना धोका पोहोचण्याइतकेच दुरापास्त आहे. त्यांची चट्सारी काव्ये तुमच्या स्वत:च्या अप्रसिध्द कवितांप्रमाणे (हो, हे सांगावयाचे राहिलेच! सार्वभौम चमत्कार असा आहे की, या आक्षेपकांपैकी बहुतेकांजवळ मात्र आपापल्या कवितांचे थोडेबहुत भरताड हटकून असतेच.) कोणालाही न कळविता पचनी पाडावयाला काळ समर्थ आहे! सरस्वतीच्या सदावर्तीत बेकार दुष्काळी पाहुण्यांना सदर परवानगी असते, त्याप्रमाणे तुमच्यासारख्या सोवळेकरांची सोय होणेही अवश्य आहे! आपापले मत सांभाळून तुमच्या त्यांच्या खडाजंगी अशाच जोराने चालू द्या! मात्र हल्लीच्या काही सत्कवींनाही सरसकट लाथाडण्याचे जोखीम तुम्ही आपल्या अंगावर न घेतल्यास बरे; कारण हा वाद त्रिकाळ चालू असल्यामुळे तुमच्या पूर्वजांना, भवभूतीला छळताना कालिदास वगैरेंच्या कविता जशा उपयोगी पडल्या, तुकारामाचे अभंग बुडविण्यासाठी ज्ञानेश्वरादि कवींची काव्ये आधारभूत झाली, तशा आजच्या सत्कवींच्या कविता उद्यापरवाच्या आधुनिक कवींच्या बोकांडीला बसताना तुमच्या वंशजांच्या कामी येणार आहेत! आधुनिक कवींचा लौकिकही तुमच्या घराण्याप्रमाणेच पूर्वापार चाललेला आहे! पंडितराजाच्या काळच्या 'नृत्याति पिनाकपाणौ' वगैरे उक्ती, रामदासांची 'धीटपाठ' काव्यांची वर्णने, किंवा तुकोबारायांचे 'घरोघरी जाहले कवि' यांसारखे उद्गार सध्याच्या कवींना उद्देशून केलेले नसावेत असा तर्क करण्याची मी तुमच्याजवळ नम्रपणे परवानगी मागतो! स्वत:ची टिमकी वाजविण्याच्या हेतूने लोकांच्या भाविक पूर्वजाप्रियतेचा फायदा घेण्यासाठी साधूकवींच्याभोवती तुमच्यासारख्या स्वार्थसाधूंनी मांडलेला सुळसुळाट, आणि नव्या-जुन्यांतून आपली शिधासामग्री काढणारी सालोमालोसारख्या उचल्यांची हातचलाखी, काळाप्रमाणे अनाद्यनंत आहेत! तुमच्या या धक्काबुकीत सत्कवींनासुध्दा थोडासा उपद्रव झाल्यास त्यांनी दिलगीर होण्याचे काही कारण नाही! कधीकाळी एखाद-दुसर्यालाच आत घेण्यासाठी उघडणार्या सरस्वतीमंदिराच्या दरवाजाने प्रत्येक सत्कवीच्या प्रवेशकाली पहिल्याने थोडी कुरकूर करणे अगदी साहजिकच आहे.
येणेप्रमाणे मतभेदाच्या धांदलीमुळे चालू काळ मराठी कविता अगदी संकीर्ण स्वरूपाची होऊन बसली असल्यास काही नवल नाही. इंग्रजी कविता, संस्कृत कविता, आणि जुनी मराठी कविता, या तिघांचाही तिच्यावर थोडाथोडा अंमल बसलेला आहे. फोटो घेण्याच्या कॅमेर्यातील आधी अर्धवट उघडलेल्या काचेवर दुसर्यावेळी ज्याप्रमाणे चमत्कारिक मिश्राकृती उमटते, त्याप्रमाणे आमच्या आधुनिक कविहृदयावरही उपरीनिर्दिष्ट छिन्नभिन्न काव्यसंस्कृतीमुळे विलक्षण वर्णसंकराच्या भावनांचा छाप वटत असतो. त्यामुळे सध्याच्या कवितेच्या स्वरूपाची एकरूपता पार नाहीशी होऊन गेली आहे. संस्कृतातील मुग्ध श्रृंगारकल्पना इंग्रजीच्या उत्तान रीतीने प्रकट करताना मराठी कविता सर्कशीच्या रिंगणात उतरलेल्या मर्दानी थाटाच्या पोरीसारखी उघडी दिसते. आणि इंग्रजी ढंगाने सांगताना तिला झगा पोलका घालून शेतकाम करणार्या बारदेशगोव्याकडील किरिस्ताविणीची कळा येते. कधी शुध्द मराठी गोष्टीवर इंग्रजी कल्पनेचे टोपण घालून वरलीदादरकडे शिमग्याच्या दंगलीतून साडीचोळीच्या साजावर टोपी चढवून नाचणार्या गोमीप्रमाणे ती बागडू लागते, तर कधी मराठी वेदान्त इंग्रजी गंभीरतेने सांगण्याच्या भरात, मडमेची नक्कल करणार्या देशी दाईप्रमाणे किळंजून बोलत असते. अशा बकाली अवस्थेमुळे तिचे गुणधर्म इतके संख्यातीत बनले आहेत की, त्यांचा नुसता नामनिर्देश करणेही एका लेखाच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. त्यातून माझ्या कवींच्या कारखान्याचा पसारा टाटा कंपनीच्या लोखंडी कारखान्यापेक्षाही वाढत चालल्यामुळे मराठी कवितेची अगदी लांबून डोळेभेट घेण्याखेरीज गत्यंतर नाही.
कवितेतील वर्णभेद आम्हा हिंदू लोकांनाही लज्जेने खाली पहावयाला लावण्याजोगा आहे. रचनापरत्वे कवितेचा जातिभेद उभयविध आहे. संस्कृतातून सरळ जन्म झाल्यामुळे श्लोक आणि आर्या यांची फार उच्च जातीत गणना होते. भिन्नभिन्न वृत्तांमुळे यावरील वर्गात गोत्रभेदाचीही सोय झालेली आहे. अभंग, ओव्या, पोवाडे ही मंडळी कनिष्ट वर्गात असून लावण्या, छकडी वगैरे अस्पृश्य जातीत जमा होतात. उखाणे, म्हणी, आहाणे यांना गद्य व पद्य यांच्यामधील सरहद्दीवर राहणार्या बिनआकारी टोळया म्हटल्यास चालेल. हुतुतू-हमाम्यांसारख्या खेळातून म्हणावयाची समर्पक वाक्ये किंवा 'अलीकडे गंगा पलीकडे गंगा' वाहवून त्यांच्याकरवी शब्दब्रह्मार्तात पातकांचा उध्दार करविणार्या शिमग्यातल्या फाका, ही वरील वर्गाची अत्यंत रानटी उदाहरणे होत. याखेरीज गायकी धर्तीच्या कवितेचा संग्रह फार मोठा आहे. त्यांच्यातही चालीरीतीचे लक्षावधी भेदभाव आहेत. युरोपियन लोकांच्या निकट सहवासाने ज्याप्रमाणे हिंदुस्थानातील मूळच्या अगणित जातीत युरेजियन, गोवानीज वगैरे नवीन भर पडली आहे, याप्रमाणे इंग्रजी कवितेच्या वशिल्याने आमच्या इकडे चतुर्दशके, वैणिके इत्यादि नवनवे प्रकार प्रचारात येत आहेत. शिवाय, मनुष्याच्या मागे जसे राक्षसगण, मनुष्यगण या प्रकारचे उपजत उपद्व्याप लागलेले असतात, तसे अक्षरांतही कोमल, कठोर वगैरे भेद जात्याच ठरून बसलेले आहेत. इतकेच नाही, तर संस्कृत साहित्यशास्त्राने निरनिराळया गणांची आणि अक्षरांची कायमची शुभाशुभ लक्षणेही ठरवून टाकलेली आहेत.
वर्ण्यविषयपरत्वेही कवितेचे अनेक प्रकार झालेले आहेत. महाकाव्याची रचना फार मोठी असून त्यातील लोकांना राष्ट्रहितैकपर समाजशासनपध्दतीबरहुकूम वागणार्या स्पार्टन लोकांप्रमाणे व्यक्तिश: जीवितस्वातंत्र्य मुळीच मिळत नाही, खंडकाव्ये तशाच वळणाची, पण लहान असल्यामुळे त्यांची उभारणी नागपुरातील बोहरी लोकांच्या मेहेंदीबाग संस्थेसारखी दिसते, एवढेच! मासिक पुस्तकांतून येणार्या छोटया कविता अविभक्त कुटुंबपध्दतीच्या वळणावर जातात. आपले सर्वस्व बरोबर वागविणार्या सुभाषितांचा कंपू यद्यपि एकोप्याने हिंडत असतो, तरी त्यापैकी कोणालाही आगापिछा नसल्यामुळे त्याला बैराग्याच्या तांडयाची उपमा देता येईल. धावे, पाळणे ही पडदानशीन मंडळी असते. तसाच मंगलाष्टकांचा मेळाही कधी लग्नमंडपाच्या बाहेर पडत नाही. भूपाळया पहाटेलाच म्हटल्या जात असल्यामुळे मला त्याबद्दल विशेष माहिती नाही. आरत्या, मुरळयांप्रमाणे केवळ देवांना वाहिलेल्या असतात. शिवाय संस्कृत कवितेच्या मार्मिक अनुकरणामुळे कूट प्रश्न, कर्तृगुप्ते क्रियापदे, कर्मगुप्ते, भावगुप्ते इत्यादि अनेक अवघड काव्यप्रकारही मराठीत उतरताना दिसून येतात. परंतु यांचा प्रचार अतिशय थोडया प्रमाणावर असल्याकारणाने माझ्या तद्विषयक कल्पना बर्याच अंधुक असण्याचा फार संभव आहे; म्हणून पुढील माहिती साशंकवृत्तीनेच स्वीकारण्याची वाचकांना विनंती आहे. कूटप्रश्नात एखादे कोडे सांगितलेले असते. उत्तर हुडकून काढण्यासाठी 'षण्मासिचा वायदा' सवलतीदाखल देणारे 'विचित्र पुतळा' किंवा 'विलक्षण वधू' यांच्यासंबंधीचे मराठी कूटश्लोक बहुश्रुत वाचकांना ठाऊक असतीलच. शिवाय ज्या कविता वाचून पाहिल्यावर कवीला काय म्हणावे, याचे वाचकांना मोठे कोडे पडते, त्यांचीही मी याच सदरात गणना करितो. कर्मगुप्तात किंवा क्रियागुप्तात अनुक्रमे कर्म किंवा क्रियापद शब्दांच्या संधिसमासात दवडून ठेविलेले आणि ते वाचकाने हुडकावून काढावयाचे असते. कर्तृगुप्तात कर्ता नापत्ता होण्याचा प्रयत्न करीत असतो. अलीकडे आपण कविता करून स्त्रीशिक्षणपर सहानुभूतीचा फायदा घेण्यासाठी बायकांच्या नावाने त्या छापावयासाठी पाठविण्याचा शिरस्ता पाडू पहात आहे तोच कर्तृगुप्ताचा मराठी मासला असावा! भावगुप्तातून भावार्थ सहसा लक्षात येत नाही. हल्लीची बहुतेक मराठी कविता या सदराखाली येते. इंग्रजी कवितेचाही नवा पायंडा अलीकडे पडू लागला आहे. 'मिस्टिक' कवितेत अत्यंत गहनार्थ अगदी अंधुक रितीने ध्वनित केलेला असतो. वाच्यार्थातून तो अंशत: शोधून काढावयाचे काम वाचकांकडे सोपविलेले असते; पुष्कळ प्रसंगी कवी मूर्ख, भ्रमिष्ट, अजाण वगैरे जी विशेषणे स्वत:कडे लावून घेत असतो, ती सत्यार्थाने अथवा शालीनतेने, याचा वाचकांना नीटसा उलगडा होत नाही. ही सारी 'मिस्टिक' कविता होय. 'पॅस्टोरल' कविता धनगराच्या जीवनक्रमाला वाहिलेली असते. अशा धनगरी कवितेचे मराठी 'मेंढयांवरी लोकर दाट भारी' हे एकच उदाहरण काय ते ऐकण्यात येते!
मराठी कवितेच्या एका बर्याच मोठया भागाचे वर्णन करावयाचे चुकून राहिले आहे. हा भाग म्हणजे संगीताच्या वशिल्याने नाटकात घुसलेल्या पदांचा होय. मात्र इतर प्रकारची कविता जसजशी जास्त मुरेल तसतशी नावे देशांतील भाकरीप्रमाणे अधिकाधिक रूचकर होत जाते; तसा याचा प्रकार नाही. नाटकी पदांचा जमाना सारखा बदलत असतो. पहिल्यापहिल्याने रसपोषासाठी यांच्यात काव्यसौंदर्याचा उत्कर्ष साधण्याकडे लेखकाची प्रवृत्ती असे. परंतु नाटयसंगीताचा गायकी चालींकडे मोर्चा वळल्यामुळे अलीकडे मात्र कोठेही पाहिले, तरी पण नाही मी बोलत आता! कारण लौकरच नाटकविषयासंबंधी स्वतंत्रपणे लिहिण्याचा माझा इरादा आहे.
कविता करता येण्याला गणमात्रांचे ज्ञान अतिशय आवश्यक आहे. अक्षरांच्या ऱ्हस्वदीर्घत्वाप्रमाणे ती लघु किंवा गुरू ठरत असून 'लघूची तो एक मात्रा गुरूच्या दोन मानिती' हा तद्विषयक मुख्य नियम आहे. याशिवाय काही किरकोळ नियमही आहेत. आर्या, गीति वगैरे मात्रागणवृत्तांतून व पद्यांतून मात्रांची मोजदाद ठेवायची असते, आणि श्लोकाच्या रचनेला तीनतीन अक्षरांच्या गणांची आवश्यकता असते. गुजराती कवितांतून दीर्घ अक्षरांना मारून मुटकून लघुत्व देण्यासाठी किंवा लघु अक्षरांना गुरुपदी बसविण्यासाठी त्यांच्या डोक्यांवर अनुक्रमे ॅ आणि - अशा खुणा ठेवण्याचा रिवाज आहे. यामुळे वर ओळीचा बांध नसल्यामुळे गद्यात जी गुजराती अक्षरे देशावरच्या धाब्याच्या घरांसारखी दिसतात तीच कवितेत या खुणांच्या योयाने, रिकाम्या टोपल्या वाहणार्या मुंबईतल्या हेलकऱ्यांसारखी किंवा नारळीच्या चोडांची ने-आण करणार्या मलबारी मजुरांसारखी दिसावयाला लागतात. मराठी कवी मात्र असा खुणाखुणांचा अजागळपणा कधीच दाखवीत नाहीत. कारण त्यांना बहुतकरून गणमात्रांची मुळीच माहिती नसते!
कवितेला नटविण्यासाठी अलंकारांची जरूर असते. त्यांचे शब्दालंकार व अर्थालंकार असे दोन स्थूल भेद असून प्रत्येकाचे कोटयवधी सूक्ष्म पोटभेद आहेत. अर्थालंकारापैकी एकटया उपमेचे चौर्याएेंशी प्रकार आहेत, असे म्हणतात. तूर्त आपणाला या चौर्याएेंशी फेर्यात पडण्याचे काहीएक कारण नाही. ठोकळ नगांची माहिती झाली म्हणजे बस्स आहे. शब्दालंकारात यमक व प्रास यांना मुख्य महत्त्व मिळालेले आहे. यमके देशादेशाच्या रिवाजाप्रमाणे निरनिराळया प्रकारची आहेत. मराठी-गुजराती कवितांना सबंध अक्षरांचे यमक जुळविण्याची आटाआट असते; इंग्रजीत शेवटच्या स्वराशी स्वर जमला म्हणजे यमकाची पूर्णता होते. संस्कृतात स्तोत्रे, अष्टके वजा जाता, अन्यत्र कोठेही यमके नाहीत; तर फारसी वाङ्मयात पद्याप्रमाणे गद्य वाक्यांचीही यमके जमवितात. मराठीत संस्कृतातील सयमक अपवादाइतकाच भाग, फार झाले तर निर्यमक असेल. इंग्रजी यमकांचा मुळीच विधिनिषेध नाही. (मराठीतील हा निर्यमक भाग अगदी आधुनिक कवींनीच केलेला आहे. जुन्या कवितेत थोरल्या शास्त्रीबुवांच्या 'ज्याची स्पर्धा' इत्यादी श्लोकांचे शेवटचे व 'गोविंद गोपाळ' हे दोन बंधू या श्लोकातील पहिले चरण, निर्यमक उदाहरणे आहेत.) मराठीत अनुष्टुभ श्लोकाला मात्र नजरचुकीने निर्यमक फिरण्याची सवलत मिळालेली असून आर्याच्या दुसर्या-चवथ्या चरणांची यमके जोडण्याचा विलक्षण प्रघात पडला आहे. इकडे इंग्रजी-मराठीत यमकाक्षरे एकाच शब्दाची असून चालत नाहीत, तर तिकडे उर्दू-फारशीत दहादहा चरणांच्या शेवटी एकच शब्द यमकांची बाजू राखीत असतो. आमच्यातही पोथीतल्या ओवीच्या तीन चरणांची यमके जमून चौथा आडमाप असतो, तर बायकांच्या ओव्यांतून दुसर्यातिसर्या चरणांचेच यमक दिसून येते. मराठीतून यमके साधण्याच्या व्यासंगाची उदाहरणे देता येण्यासारखी आहेत. पैकी 'अनलसमीहित' ही दोन्ही एकरूप चरणाची आर्या एका टोकावर असून, 'ल,ळ' 'त,ट' 'ह,व,य,अ' यांसारख्या अक्षरांची यमके जुळविण्याच्या सवलतीचा फायदा घेणारी उदाहरणे दुसर्या टोकाशी पडलेली आहेत. प्रास हे यमकाचेच जुळे भावंड होय. त्याच त्याच अक्षरांच्या पुनरावृत्तीने प्रास तयार होत असतो. व्यवहारातील उदाहरण घ्यावयाचे असल्यास, मुंबईच्या रस्त्यांवरून चार-चार, पाच-पाच घरे टाकून चहाच्या दुकानांचा प्रास साधला आहे असे म्हणता येईल. श्लेषालंकार हाही शब्द व अर्थ या दोघांच्याही मदतीने तयार होतो. श्लिष्ट शब्दाला दोन अर्थ असल्यामुळे तद्युक्त वाक्यांकडे, एकीकडून कृष्णाच्या रासक्रीडेचे आणि दुसरीकडून रामपंचायतनाचे, अशी एकाच कागदावर दोन चित्रे दाखविणार्या तसबिरीप्रमाणे निरनिराळया दृष्टींनी पहावयाचे असते. शब्दालंकारात चित्रबंध, पद्यबंध वगैरे हजारो करामती असतात. या प्रकारच्या कौशल्यात भूमितीची वर्तुळे, ज्योतिषातील कुंडल्या, कमळाच्या पाकळया वगैरे सर्वच प्रकार सामील झाल्यामुळे प्रेक्षकाला गणितविद्या, चित्रकला, कविता, ज्योतिषशास्त्र या सर्वांच्या प्रीतिभोजनाचा भास होतो. संस्कृत काव्यात काही श्लोकांतून दोनच आणि काहींतून तर फक्त एकाच अक्षरावर सारी कसरत करून दाखविलेली पाहण्यात येते. या सर्व प्रकारच्या शब्दच्छलाची यद्यपि तज्ज्ञांनी अधमकाव्यात गणना केली असली, तरी त्याचा ब्यामोह मात्र फारच जबरदस्त आहे. मोठमोठया सत्कवींनाही या सैतानाने पछाडलेले आहे. रसाळ वाणीच्या वामनपंडितासारख्या थोर सत्कवीनेसुध्दा रसिकांना 'वंशी नादनटी तिला कटितटी' या प्रकारच्या 'टीपाटर्या' देऊन 'यमक्या' ही पदवी कमविली आहे! अर्थालंकाराच्या सम्यग्ज्ञानापोटी वाचकांना थोडक्यात एवढे सांगता येईल की, काव्यप्रकाश वाचा.