Jump to content

श्री शिवस्तुति

विकिस्रोत कडून

<poem>

कैलासराणा शिवचंद्रमौळी | फणींद्र माथां मुकुटीं झळाळी | कारुण्यसिंधू भवदुःखहारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || १||

रवींदु दावानल पूर्ण भाळीं | स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी | ब्रह्मांडधीशा मदनांतकारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || २||

जटा विभूती उटि चंदनाची | कपालमाला प्रित गौतमीची | पंचानना विश्वनिवांतकारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || ३||

वैराग्ययोगी शिव शूलपाणी | सदा समाधी निजबोधवाणी | उमानिवासा त्रिपुरांतकारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || ४||

उदार मेरू पति शैलजेचा | श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा | दयानिधी जो गजचर्मधारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || ५||

ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ | भुजंगमाला धरि सोमकांत | गंगा शिरीं दोष महाविदारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || ६||

कर्पूरगौरीं गिरिजा विराजे | हळाहळे कंठ निळाचि साजे | दारिद्र्यदुःखें स्मरणें निवारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || ७||

स्मशानक्रीडा करितां सुखावे | तो देवचूडामणि कोण आहे | उदासमूर्तीं जटाभस्मधारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || ८||

भूतादिनाथ अरिअंतकाचा | तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा | राजा महेश बहुबाहुधारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || ९||

नंदी हराचा हर नंदिकेश | श्री विश्वनाथ म्हणती सुरेश | सदाशिव व्यापक तापहारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || १०||

भयानक भीम विक्राळ नग्न | लीलाविनोदें करि काम भग्न | तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || ११||

इच्छा हराची जग हें विशाळ | पाळी रचीतो करि ब्रह्मगोळ | उमापती भैरव विघ्नहारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || १२||

भागीरथीतीर सदा पवित्र | जेथें असे तारक ब्रह्ममंत्र | विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || १३||

प्रयाग वेणी सकळा हराच्या | पादारविंदीं वहाती हरीच्या | मंदाकिनी मंगल मोक्षकारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || १४||

कीर्ती हराची स्तुति बोलवेना | कैवल्यदाता मनुजां कळेना | एकाग्रनाथ विष अंगिकारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || १५||

सर्वांतरीं व्यापक जो नियंता | तो प्राणलिंगाजवळी महंता | अंकीं उमा ते गिरिरूपधारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || १६||

सदा तपस्वी असे कामधेनू | सदा सतेज शशि कोटिभानू | गौरीपती जो सदा भस्मधारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || १७||

कर्पूरगौर स्मरल्या विसांवा | चिंता हरी जो भजकां सदैवा | अंतीं स्वहीत सुचना विचारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || १८||

विराम काळीं विकळ शरीर | उदास चित्तीं न धरीच धीर | चिंतामणी चिंतनें चित्तहारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || १९||

सुखावसाने सकळें सुखाचीं | दुःखावसाने टळती जगाचीं | देहावसानें धरणी थरारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || २०||

अनुहातशब्द गगनीं न माय | त्याचेनि नादें भव शून्य होय | कथा निजांगें करुणा कुमारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || २१||

शांति स्वलीला वदनीं विलासे | ब्रह्मांडगोळीं असुनी न दीसे | भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || २२||

पीतांबरें मंडित नाभि ज्याची | शोभा जडीत वरि किंकिणीची | श्रीदेवदत्त दुरितांतकारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || २३||

जिवा-शिवाची जडली समाधी | विटला प्रपंच तुटली उपाधी | शुद्धस्वरे गर्जति वेद चारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || २४||

निधानकुंभ भरला अभंग | पहा निजांगें शिव ज्योतिलिंग | गंभीर धीर सुरचक्रधारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || २५||

मंदार बिल्वे बकुलें सुवासी | माला पवित्र वहा शंकरासी | काशीपुरीं भैरव विश्व तारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || २६||

जाई जुई चंपक पुष्पजाती | शोभे गळां मालतिमाळ हातीं | प्रतापसूर्य शरचापधारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || २७||

अलक्ष्यमुद्रा श्रवणीं प्रकाशे | संपूर्ण शोभा वदनीं विकासे | नेई सुपंथें भवपैलतीरीं | तुजवीण शंभो मज कोण तारी || २८||

नागेशनामा सकळां जिव्हाळा | मना जपें रे शिवमंत्रमाळा | पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || २९||

एकांति ये रे गुरुराज स्वामी | चैतन्यरूपीं शिव सौख्यनामी | शिणलो दयाळा बहुसाल भारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || ३०||

शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको तीर्थांसि जाऊं नको | योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको ||

काळाचें भय मानसीं धरुं नको दुष्टांस शंकूं नको | ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको || <poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.