श्री देवीचे जोगवा संबळगीत

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागोनी । त्रिविध तापाची करावया झाडणी । भक्ता लागोनी लागोनी पावसी निर्वाणी ॥ आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥१॥ द्वैत सारोनी सारोनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी धरीन् । भेद रहित रहित वारीस जा‌ईन । आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥२॥ नवविध भक्तिच्या करुनी नवरात्रा । करोनी निराकरण कारण मागेन ज्ञानपुत्रा । दंभ सासरा सासरा संडीन कुपात्रा । करीन सद्भावे अंतरीच्या मुद्रा ॥ आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥३॥ पूर्ण बोधाची बोधाची भरीन मी परडी । आशा मनशांच्या मनशांच्या पाडीन दरडी । मनविकार विकार करीन कुरवंडी । अमृत रसाची भरीन मी दुरडी ॥ आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥४॥ आता साजणी साजणी झाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडीयला मी संग । काम क्रोध हे झोडियले मांग । केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग । सत्‌चित आनंद आनंद झाले मी अभंग ॥ आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥५॥ ऐसा जोगवा जोगवा मागून ठेविला । जावुनी महाद्वारी महाद्वारी नवस मी फेडीला । एका जनार्दनी जनार्दनी एकपणे देखिला । जन्म-मरणाचा मरणाचा फेरा हा चुकविला ॥ आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥६॥