श्री देवीचे जोगवा
<poem>
जोगवा 1
[संपादन]वाढ ग माय जोगवा । वाढ ग माय जोगवा । जोगवा मागते मी मागते जोगवा ॥धृ॥ हिरवी अंबेची कांकण । घ्या नारळ हिरवा खण । परडीत घालाया तुम्ही । हळद कुंकू मागवा ॥१॥ तेल घाला की दिवटीला । वंशी दिवा तो लाभावा । नवसाचं लेण् आपुलं । असच तुम्ही भागवा ॥२॥ ही तुळजापुरची अंबा । घ्या नाव सदा जगदंबा । जोगवा देऊनशान । भक्तिला जागवा ॥३॥ दारी आलिया माऊली । अहो सुखाची साऊली । आयांनो बायांनो । या देवीला बोळवा ॥४॥
जोगवा 2
[संपादन]दे बाई दे जोगवा दे, आई अंबेचा जोगवा दे ॥धृ॥ मंगळवारचे दिवशी नाही सारवले घर आई अंबाबाई एवढा गुन्हा माफ कर ॥१॥ आई अंबाबाई तुला घालीन मी स्नान पाटावर बसवूनी करीन पूजन ॥२॥ आई अंबाबाई तूझ्या कानामध्ये झुबा तुझ्या दर्शनाला राजा, कोल्हापूरचा उभा ॥३॥ आई अंबाबाई तुला नेसवीन पातळ श्रावणाचा महिना झाला बाळ गोपाळ सांभाळ ॥४॥ आई अंबाबाई तुझ्या नाकामधे नथ नथीमध्ये मोती हजाराचा एक ॥५॥ आई अंबाबाई तुझे तळघर खोल ऐकू येत नाही तुझ्या पुज्याऱ्याचे बोल ॥६॥ आई अंबाबाई तुझ्या हातामध्ये गेंद तुझ्या दर्शनाचा मला लागला छंद ॥७॥
जोगवा 3
[संपादन]गोंधळ घालू या ग गोंधळ मांडू या ग । महिषासूर मर्दिनेचा गोंधळ घालू या ग, गोंधळ घालू या ग ॥धृ॥
त्रैलोक्याची जी स्वामीनी । आदिशक्ती श्री भवानी चंडीका ही महालक्ष्मी चला पाहू या ॥१॥
तेजोमय अतःस्फूर्ती । अंतरीची दिव्य ज्योती पाजळोनी स्वातंत्र्याची दिवटी लावू या ॥२॥
मंगल लेणे सौभाग्याचे । काजळ कुंकू रिपू रक्ताचे या ग त्याने जगदंबेचे मळवट भरु या ॥३॥
स्वातंत्र्याच्या दुष्मातांची । मस्तक तोडुनी चांडाळांची या ग त्याने जगदंबेची ओटी भरु या ॥४॥
गोंधळात दंग होऊ । उदोकार गर्जत राहू शुभदा वरदा जगन्माता तृप्त करु या ॥५॥
जोगवा 4
[संपादन]आईचा गोंधळ, गोंधळ, घालिते आईचा जोगवा, जोगवा मागते ॥धृ॥
काम, क्रोध हे, क्रोध हे महिषासूर आईने मर्दूनी, मर्दूनी, मर्दूनी, केले चुर
सत्त्व गुणाची, गुणाची, हाती तलवार ॥१॥ बोध संबळ, संबळ, संबळ घेऊनी हाती
ज्ञान दिवटया, दिवटया, पाजळल्या ज्योती तेथे रमले मी, रमले मी, दमले दीनरात्री ॥२॥
सूक्ष्म स्थळी या, स्थळी या आईचेही घेण अंबा भवानी, भवानी, तेथे तूझ ठाण
चैतन्य स्वरुपी, स्वरुपी,स्वरुपी नित्य राहण ॥३॥ या बा गोंधळा, गोंधळा, गोंधळाच्यासाठी
भक्त पडियेले, पडीले आटाआटी विष्णू दासाची, दासाची, दासाची कृपा दृष्टी ॥४॥ <poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |