श्री गोविन्दाष्टकम्

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठप्राड्गणरिड्गणलोलमनायासं परमायासम् | मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं क्ष्माया नाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ||१||

जो सत्यस्वरूप आणि ज्ञानस्वरूप आहे, (विश्वात सर्वकाळ सर्वत्र सर्व पदार्थांच्या रूपाने व्याप्त असल्याने ज्याच्या स्वरूपाचा अन्त लागत नाही म्हणून) जो अनन्त आहे, (कधीही नाश होत नाही म्हणून) जो नित्य आहे, (आकाशादि पंचमहाभूते ज्याच्या स्वरूपात सामावलेली असल्याने) जो आकाशाहून भिन्न आहे, तथापि तो परमाकाश म्हणजे महाकाश किंवा चिदाकाश स्वरूप आहे, आकाशापेक्षाही मोठा आहे, दुसऱ्या कोणत्याही तत्त्वात समाविष्ट नसल्याने अनाकाश आहे, जो गोकुळाच्या अंगणात रांगण्यामध्ये अत्यंत चपळ आहे, जे अनन्य भक्त आहेत त्यांना ज्याच्या प्राप्तीसाठी काही आयास (कष्ट) पडत नाहीत; ज्याला काही परिश्रम नाहीत तरीपण जो फार थकल्यासारखा दिसतो, तत्त्वतः ज्याला काही आकार नाही पण मायेने ज्याने अनेक आकार कल्पून धारण केले आहेत, जो विश्वाच्या आकाराने नटला आहे, जो संपूर्ण पृथ्वीचा आणि लक्ष्मीचा अधिपति (नाथ) असूनही अनाथ आहे (म्हणजे ज्याचा कोणीच अधिपति नाही) अशा आनन्दस्वरूप गोविन्दाला प्रणाम करा. ॥१॥

मृत्स्नामत्सीहेती यशोदाताडनशैशवसंत्रासं व्यादितवक्त्रालोकितलोकालोकचतुर्दशलोकालिम् । लोकत्रयपुरमूलस्तम्भं लोकालोकमनालोकं लोकेशं परमेशं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥२॥

"अरे ! तू माती खातोस काय?' असे विचारणारी यशोदा माता आता आपल्याला मार देईल असे समजून बालस्वरूपाला अनुरूप अशा भावाने जो घाबरलेला आहे, 'आई ! मी माती नाही ग खाल्ली, पाहा माझे तोंड !' असे बोलून "आ" करून आपल्या मुखात यशोदेला लोकालोक पर्वतांसह चौदा भुवने दाखवित आहे, जो त्रैलोक्यरूपी नगराचा आधारस्तंभ आहे, जो सर्व लोकांना प्रकाशित करतो पण ज्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही, त्या सर्व लोकाधिपतीला, परमानंदस्वरूप असलेल्या गोविन्दाला प्रणाम करा. ॥२॥

त्रैविष्टपरिपुवीरघ्नं क्षितिभारघ्नं भवरोगघ्नं कैवल्यं नवनीताहारमनाहारं भुवनाहारम् । वैमल्यस्फुटचेतोवृत्तिविशेषाभासमनाभासं शैवं केवलशान्तं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥३॥

जो देवांचे शत्रु असलेल्या दैत्यवीरांचा नाश करणारा आहे, पृथ्वीचा भार दूर करणारा आहे, भवरोगाचा नाश करणारा आहे, जो मोक्षपदस्वरूप आहे, तत्त्वतः ज्याला काही खायला लागत नाही पण जो गोकुळातील गोपींनी दिलेले नवनीत (लोणी) खाणारा आहे, प्रलयकाळी सर्व विश्वाचे भक्षण करणारा आहे, जो तत्त्वद्ष्ट्या कोठेच प्रतिबिंबित होत नाही पण सत्त्वगुणाच्या उत्कर्षाने निर्मल झालेल्या चित्तवृत्तीत विशेष रूपाने प्रतिबिंबित होतो; अशा त्या अद्वितीय, शान्त, कल्याणरूप परमानंदमय गोविंदाला नमस्कार करा. ॥३॥

गोपालं भूलीलाविग्रहगोपालं कुलगोपालं गोपीखेलनगोवर्धनधृतिलीलालालितगोपालम् । गोभिर्निगदितगोविन्दस्फुटनामानं बहुनामानं गोधीगोचरदूरं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥४॥

जो गायींचा पालक आहे, ज्याने पृथ्वीवर क्रीडा करण्यासाठी गोपाल-शरीर धारण केले, ज्याने गोपाल वंशात जन्म घेतला, गोपीं बरोबर खेळणें, गोवर्धनपर्वत करंगुळीवर धारण करणे इ. लीलांनी ज्याने गोप-जनांचे लालन पालन केले, वेदांनी किंवा गायींनी देखिल 'गोविंद गोविंद म्हणून ज्याच्या नामाचा स्पष्ट उच्चार केला, ज्याची अनेक नामे आहेत, जो वाणी आणि बुद्धी ह्यांच्या विषयांपासून दूर आहे अशा त्या परमानंदरूप गोविंदाला नमस्कार करा. ॥४॥

गोपीमण्डलगोष्ठीभेदं भेदावस्थमभेदाभं शश्र्वद्गोखुरनिर्धूतोद्धतधूलीधूसरसौभाग्यम् । श्रद्धाभक्तीगृहीतानन्दमचिन्त्यं चिन्तितसदभावं चिन्तामणिमहिमानं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥५॥

जो गोपीसमुदायातील गोष्टींमध्ये विराजमान होणारा आहे, जो तत्त्वतः अभिन्न (एकरूप) असूनही भिन्न भिन्न अवस्था धारण करणारा आहे, वरचेवर गायींच्या खुरामुळे उडणाऱ्या धुळीने धुळकट होण्यात जो स्वतःला भाग्यवान समजतो, श्रद्धा आणि भक्तीने ज्याचा आनंद प्राप्त करता येतो, चिन्तन करण्यास अशक्य असूनही ज्याच्या सत्स्वरूपाचे चिन्तन केले जाते, ज्याचा महिमा चिन्तामणी प्रमाणे आहे (जो भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो) त्या परमानंदस्वरूप गोविंदाला प्रणाम करा. ॥५॥

स्नानव्याकुलयोषिद्वस्त्रमुपादायागमुपारूढं व्यादित्सन्तीरथ दिग्वस्त्रा ह्युपदातुमुपाकर्षन्तम् । निर्धूतद्वयशोकविमोहं बुद्धं बुद्धेरन्तःस्थं सत्तामात्रशरीरं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥६॥

स्नानामध्ये व्यग्र असलेल्या गोपींची वस्त्रे घेऊन जो यमुनेच्या काठावरील कदंबवृक्षावर जाऊन बसला, आपापली वस्त्रें घेण्याकरतां उत्सुक झालेल्या त्या दिग्वस्त्रा (नग्न) गोपींना वस्त्रे घेण्यासाठी पाण्यातून बाहेर यायला लावणारा, स्मरणमात्राने शोक आणि व्यामोह दूर करणारा, ज्ञानस्वरूप असून बुद्धीच्या आत किंवा पलीकडे असणारा, केवळ सत्ता म्हणजे अस्तित्व हेच शरीर असलेला असा जो परमानन्दस्वरूप गोविन्द, त्याला नमस्कार करा. ॥६॥

कान्तं कारणकारणमादिमनादि कालमनायासं कालिन्दीगतकालियशिरसि मुहुर्नुत्यन्तं सुनृत्यन्तम् । कालं कालकलातीतं कलिताशेषं कलिदोषघ्नं कालत्रयगतिहेतुं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥७॥

जो अत्यंत सुंदर आहे, विश्वाला कारण असलेल्या मूळ प्रकृतीचेही जो कारण आहे, जलयुक्त ढगाप्रमाणे ज्याची अंगकान्ती कृष्णवर्ण आहे, यमुनेच्या डोहात असलेल्या कालिया नागाच्या मस्तकावर नृत्य करणारा, अत्यन्त कौशल्याने नाचणारा, कालस्वरूप असूनही जो काळाच्या कलीच्या पलीकडे आहे, जो सर्व विषयांचे आकलन करणारा आहे, ज्याच्या स्मरणाने कली दोष नष्ट होतात, तीन्ही काळांच्या गतीचे-कालचक्राच्या गतीचे जो कारण आहे, त्या परमानंदस्वरूप गोविन्दाला नमस्कार करा. ॥७॥

वृन्दावनभुवि वृन्दारकगणवृन्दाराध्यं वन्देऽहं कुन्दाभामलमन्दस्मेरसुधानन्दं सुह्रदानन्दम् । वन्द्याशेषमहामुनिमानसवन्द्यानन्दपदद्वन्द्वं वन्द्याशेषगुणाब्धिं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥८॥

वृंदावनाच्या परिसरात देवगणांचे समुदाय आणि वृन्दा ह्यांच्याकडून ज्याची आराधना केली गेली अशा श्रीकृष्णा ! मी तुला वन्दन करतो. कुंदफुलांच्या कान्तीप्रमाणे निर्मळ असलेल्या ज्याच्या मन्द हास्यामध्ये अमृतासारखा आनन्द भरला आहे, जो मित्रांना आनन्द देतो, ज्याचे आनन्ददायक चरणयुगुल सर्व वन्दनीय महामुनींच्या ह्रदयाला वन्दनीय वाटतात, जो सर्व शुभगुणांचा सागर आहे, अशा त्या परमानंदस्वरूप गोविंदाला नमस्कार करा. ॥८॥

गोविन्दाष्टकमेतदधीते गोविन्दार्पितचेता यो गोविन्दाच्युत माधव विष्णो गोकुलनायक कृष्णेति । गोविन्दाङ्‌घ्रिसरोजध्यानसुधाजलधौतसमस्ताघो गोविन्दं परमानन्दामृतमन्तःस्थं स समभ्येति ॥९॥

ह्या स्तोत्रात वर्णन केल्याप्रमाणे सर्वगुणसंपन्न अशा गोविन्दामध्ये आपले मन लावून जो कोणी ह्या गोविन्दाष्टकाचा पाठ करील, गोविंदा, अच्युता, माधवा, विष्णो ! गोकुलनायका कृष्णा ! अशा रीतीने म्हणत राहील, त्याची सर्व पापे गोविन्दाच्या चरणकमलाच्या ध्यानरूपी अमृतजलाने धुवून निघतील आणि तो स्वतःच्याच अन्तःकरणात विराजमान असलेल्या सर्वश्रेष्ठ आनंदरूप अमृतमय अशा गोविन्दाला प्राप्त करून घेईल. ॥९॥

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.