Jump to content

श्रीशिवलीलामृत/अध्याय दहावा

विकिस्रोत कडून


श्रीगणेशाय नमः ॥

कामगजविदारकपंचानना ॥ क्रोधजलदविध्वंसप्रभंजना ॥ मदतमहारकाचंडकिरणा ॥ चंद्रशेखरा वृषभध्वजा ॥१॥

मत्सरदुर्धराविपिनदहना ॥ दंभनगच्छेदका सहस्त्रनयना ॥ अहंकार अंधकारसुरमर्दना ॥ धर्मवर्धना भालनेत्रा ॥२॥

आनंदकैलासनगविहारा ॥ निगमागमवंद्या सुहास्यवक्रा ॥ दक्षमखदलना आनंदसमुद्रा ॥ ब्रह्मानंदा दयानिधे ॥३॥

नवामाध्यायाचे अंती ॥ उद्धरिला शबर सिंहकेतनृपती ॥ यावरी सूत शौनकादिकांप्रती ॥ नैमिषारण्यी सांगत ॥४॥

आनर्तदेशी वास्तव्य करीत ॥ एक द्विज नामे देवरथ ॥ वेदाध्ययनी शास्त्ररत ॥ पंडित आणि वंशज होय ॥५॥

त्याची कन्या चातुर्यखाणी ॥ शारदा नामे कमलनयनी ॥ जिचे स्वरूप देखोनी ॥ जन होती तटस्थ ॥६॥

तव ते झाली द्वादशवर्षी ॥ पित्याने लग्न करूनि संभ्रमेसी ॥ पद्मनाभद्विजासी ॥ देता झाला विधियुक्त ॥७॥

तोही परम अधीत ब्राह्मण ॥ सभाग्य आणि वेदसंपन्न ॥ जयाची विद्या पाहोन ॥ राजे होती तटस्थ ॥८॥

लग्नसोहळा जाहलियावरी ॥ काही दिवस होता श्वशुरघरी ॥ सायंकाळी नदीतीरी ॥ संध्यावंदनासी तो गेला ॥९॥

परतोन येता अंधार ॥ पायास झोंबला दुर्धर विखार ॥ तेथेच पडिले कलेवर ॥ नगरात हाक जाहली ॥१०॥

मातापित्यासमवेत ॥ शारदा धावोनि आली तेथ ॥ गतप्राण देखोनि प्राणनाथ ॥ शरीर घालीत धरणीवरी ॥११॥

म्हणे विद्याधनाचे सतेज ॥ आजि बुडाले माझे जहाज ॥ वोस पडली सेज ॥ बोले गुज कोणासी ॥१२॥

माझे बुडाले भांडार ॥ सर्परूपे वरी पडला तस्कर ॥ दग्ध झाली आभरणे समग्र ॥ म्हणोनि टाकी तोडोनिया ॥१३॥

देखोनि शारदेची करूणा ॥ अश्रु आले जनांचिया नयना ॥ म्हणती अहा पशुपते भाललोचना ॥ हे आता करील काय ॥१४॥

मग त्या विप्राचे करूनि दहन ॥ माता पिता बंधु आप्तजन ॥ शारदेशी संगे घेऊन ॥ सदनाप्रति गेले ते ॥१५॥

कित्येक दिवस झालियावरी ॥ घरची कार्यास गेली बाहेरी ॥ शारदा एकली मंदिरी ॥ तव एक अपूर्व वर्तले ॥१६॥

नैध्रुव नामे ऋषीश्वर ॥ वृद्ध तपस्वी गेले नेत्र ॥ शिष्य हाती धरोनि पवित्र ॥ सदना आला शारदेच्या ॥१७॥

शारदा आसन देऊनि सत्वर ॥ पूजन करोनि करी नमस्कार ॥ नैध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार ॥ हो तुज पुत्र वेदवक्ता ॥१८॥

विप्रास न दिसे केवळ अंध ॥ अमोघ वदला आशीर्वाद ॥ हासोनि शारदा करी खेद ॥ शोक करी दुःखभरे ॥१९॥

म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण ॥ सांगितले पूर्ववर्तमान ॥ नैध्रुव म्हणे माझे वचन ॥ असत्य नोहे कल्पांती ॥२०॥

माझे जिव्हेबाहेर आले ॥ ते माघारे न सरे कदाकाळे ॥ माझे तपानुष्ठान वेगळे ॥ अघटित तेचि घडवीन ॥२१॥

घरची बाहेरूनि आली त्वरित ॥ माता पिता बंधु समस्त ॥ समूळ कळला वृत्तांत ॥ म्हणती विपरीत केवी घडे ॥२२॥

ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र ॥ क्षणे रंकाचा करी सहस्त्रनेत्र ॥ शापे न लागता क्षणमात्र ॥ कुळासहित संहारीत ॥२३॥

शापबळेचि विशेष ॥ सर्प केला राजा नहुष ॥ यादवकुळ निःशेष ॥ भस्म झाले ब्रह्मशापे ॥२४॥

ब्राह्मणी क्षोभोनि निर्धारी ॥ शुक्राची संपत्ति घातली सागरी ॥ ब्रह्मशापे मुरारी ॥ अंबऋषीचे जन्म घेत ॥२५॥

विधिहरिहर चित्ती ॥ ब्रह्मशापाचे भय वाहती ॥ विप्रशापे राव परिक्षिती ॥ भस्म झाला क्षणार्धे ॥२६॥

जमदग्नीचा क्रोध परम ॥ चौघे पुत्र केले भस्म ॥ स्त्रिया असता पांडुराजसत्तम ॥ भोग नाही सर्वदा ॥२७॥

विप्रशापाची नवलगती ॥ साठ सहस्त्र सागर जळती ॥ कुबेरपुत्र वृक्ष होती ॥ नारदशापेकरोनिया ॥२८॥

कृष्णासहित यादवकुळ ॥ ब्रह्मशापे भस्म झाले सकळ ॥ दंडकाऐसा नृपाळ ॥ क्षणमात्रे दग्ध केला ॥२९॥

ब्रह्मशाप परम दृढ ॥ नृगराज केला सरड ॥ धराधरशत्रु बळप्रचंड ॥ सहस्त्रभगे त्या अंगी ॥३०॥

क्षयरोगी केला अत्रिनंदन ॥ मेदिनीवसनाचे केले आचमन ॥ शाप देवोनि सूर्यनंदन ॥ दासीपुत्र केला पै ॥३१॥

पाषाणाचे करिती देव ॥ रंकाचेही करिती राव ॥ मंत्राक्षता टाकिता नवपल्लव ॥ कोरड्या काष्ठा फुटेल की ॥३२॥

ब्राह्मण थोर त्रिजगती ॥ हे ब्रह्मांड मोडोनि पुन्हा घडती ॥ यावरी नैध्रुव तियेप्रती ॥ बोलता झाला ते ऐका ॥३३॥

म्हणे ऐके शारदे यथार्थ ॥ तू धरी उमामहेशव्रत ॥ षडक्षरमंत्र विधियुक्त ॥ नित्य जप करावा ॥३४॥

म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण ॥ तववरी मी येथेचि राहीन ॥ मग त्याच्या अंगणात मठ करून ॥ राहाता झाला नैध्रुव तो ॥३५॥

म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी ॥ करावा जाण चैत्रमासी ॥ अथवा मार्गशीर्षेसी ॥ शुक्लपक्षी करावा ॥३६॥

पाहोनि सुमुहूर्त सोमवर ॥ अष्टमी चतुर्दशी परिकर ॥ पूजावा उमामहेश्वर ॥ एक संवत्सर नेमेसी ॥३७॥

गुरुवचन शारदा ऐकोन ॥ तैसेचि करी न पडे न्यून ॥ नैधुवगुरूपासून ॥ षडक्षर मंत्र घेतला ॥३८॥

दिव्य शिवमंदिर करून ॥ वरी दिधले शुभ्र वितान ॥ चारी स्तंभ शोभायमान ॥ नानाफळे शोभताती ॥३९॥

अष्टगंधे सुवाससुमने ॥ भूमी शोधूनि रंगमाळा आस्तरणे ॥ षोडशवर्ण यंत्र करणे ॥ अष्टदळे तयामाजी ॥४०॥

तयामाजी चतुर्दळ ॥ त्यावरी घालोनि तांदूळ ॥ वरी घट स्थापूनि अढळ ॥ शोभा बहुत आणिजे ॥४१॥

उमामहेशप्रतिमा दोन्ही ॥ स्थापिजे सुवर्णाच्या करोनी ॥ मग एकनिष्ठा धरूनि ॥ षोडशोपचारी पूजिजे ॥४२॥

यथासांग ब्राह्मणसंतर्पण ॥ सुवासिनी पूजिजे प्रीतीकरून ॥ षड्रस चतुर्विध अन्न ॥ द्यावे भोजन तृप्तीवरी ॥४३॥

पुराणश्रवण कीर्तन ॥ येणेचि करावे जागरण ॥ गुरुवचनी विश्वास पूर्ण ॥ धरूनि वर्तणे सर्वदा ॥४४॥

कुंदेदुर्वण केवळ ॥ कर्पूरगौर पयःफेनधवल ॥ ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ ॥ रजतवर्ण निर्मळ जो ॥४५॥

सूर्यकोटिसम तेज विरजित ॥ शुभ्र आभरणी भूषित ॥ जगदानंदकंद गुणातीत ॥ स्वर्धुनी विराजित मस्तकी ॥४६॥

शुभ्रजटामुकुटमंडित ॥ सर्प मणियुक्त विराजित ॥ किशोरचंद्र भाळी मिरवत ॥ भस्मचर्चित शुभ्र दिसे ॥४७॥

उन्मीलित भाललोचन ॥ केयूरांगद शुभ्र वीरकंकण ॥ मुंडमाळा शोभायमान ॥ दिसती लोचन सूर्येदुवत ॥४८॥

दिव्यगरुडपाचूहूनि वरिष्ठ ॥ विराजमान दिसेनीलकंठ ॥ दशभुज आयुधे सघट ॥ झळकती प्रळयचपळेऐसी ॥४९॥

खट्वांग त्रिशूळ कपाल डमरू ॥ अंकुश पाश घंटा नागधरू ॥ पिनाक पाशुपत कमलतेजाकारू ॥ शुभ्रवर्ण आयुधे ॥५०॥

शुभ्र तेजस्वी शार्दूलचर्मवसन ॥ शुभ्र स्फटिकवर्ण गजाजिन ॥ मणिमय शुभ्र सिंहासन ॥ नाना रत्ने विराजित ॥५१॥

कैलासगिरी शुभ्रवर्ण ॥ वरी मंडप शुभ्र सहस्त्रयोजन ॥ स्तंभविरहित सहस्त्रकिरण ॥ गगनी जेवी प्रकाशे पै ॥५२॥

ऐरावताहूनि विशाळ शुभ्र ॥ पुढे शोभे नंदिकेश्वर ॥ मणिमय कुंडले सुंदर ॥ शेष तक्षक झळकती ॥५३॥

ब्रह्मानंदसुख मुरोन ॥ ओतिले शिवस्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान ॥ शारदा ध्यानी आणीत ॥५४॥

बाला तन्वंगी सुंदर ॥ विराजमान चंद्रशेखर ॥ चतुर्भुज पाशांकुशधर ॥ गदापद्मयुक्त जे ॥५५॥

सुरतरुसुमनमाळायुक्त ॥ मल्लिकाबकुळमळी विराजित ॥ इभमुक्तावतंस डोलत ॥ शोभा अद्भुत कोण वर्णी ॥५६॥

हरिमध्या भुजंगवेणी ॥ जलजवदना आकर्णनयनी ॥ द्वादशादित्यशोभा जघनी ॥ कांचीवरी झळकतसे ॥५७॥

मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत ॥ निःसीमरूपलक्षणयुक्त ॥ ओवाळूनि टाकाव्या समस्त ॥ जिच्या पादांगुष्ठावरूनी ॥५८॥

कोटिमन्मथशोभा साजिरी ॥ त्रिभुवनजननी त्रिपुरसुंदरी ॥ ब्रह्मांड फोडोनिया वरी ॥ आंगींचा सुवास धावत ॥५९॥

पदमुद्रा जेथे उमटती ॥ तेथे आरक्तकमळे उगवती ॥ द्विजपंक्तीचा रंग पडता क्षिती ॥ खडे होती दिव्यमणि ॥६०॥

या ब्रह्मांडमंडपात देख ॥ ऐसे स्वरूप नाही आणिक ॥ शशि मित्र द्विमुख ॥ जिच्या तेजे शोभती ॥६१॥

विधिशक्रादि बाळे अज्ञान ॥ स्नहे निजगर्भी करी पाळण ॥ समस्त त्रिभुवनलावण्य ॥ ओतिले स्वरूप देवीचे ॥६२॥

विशाल ताटके प्रभा घन ॥ ओतिली शशिमित्रतेज गाळून ॥ गंडस्थळी प्रभा पूर्ण ॥ पडली झळके अत्यंत ॥६३॥

बिंबाधर अतिरिक्त ॥ नासिकींचे वरी डोलता मुक्त ॥ प्रवाळचि केवळ भासत ॥ तेज अमित न वर्णवे ॥६४॥

नेत्रांजनप्रभा पडली मुक्तशिरी ॥ तो गुंजेऐसे दिसे क्षणभरी ॥ जगन्माता हास्य करी ॥ तो रंग दिसे शुभ्र मागुती ॥६५॥

ओळीने बैसल्या हंसपंक्ती ॥ तैसे द्विज हासता झळकती ॥ मुक्तशुभ्रवर्ण मागुती ॥ हैमवतीचे झळकती ॥६६॥

दंतपंक्ती शुभ्र अत्यंत ॥ अधरप्रभेने आरक्त भासत ॥ डाळिंबबीज पक्व शोभत ॥ क्षणैक तैसे दीसती ॥६७॥

कंठीचे मुक्ताहार संपूर्ण ॥ दिसती इंद्रनीळासमान ॥ श्यामलांगप्रभा दैदीप्यमान ॥ मुक्तामाजी बिंबली ॥६८॥

कमंडलु तेजस्वी सुंदर ॥ तेवी विश्वजननिचे पयोधर ॥ कुमार आणि इभवक्र ॥ ज्यातील अमृत प्राशिती ॥६९॥

प्रळयचपळा गाळोनि समग्र ॥ रंगविले वाटे देवीचे अंबर ॥ मुक्तालग कंचुकी प्रभाकर ॥ बाहुभूषणे झळकती ॥७०॥

इंद्रनीलकीलवर्णी ॥ लीलावेषधारिणी ॥ भक्तानुग्रहकारिणी ॥ प्रलयरूपिणी आदिमाता ॥७१॥

आदिपुरुषाची ज्ञानकळा ॥ घडी मोडी ब्रह्मांडमाळा ॥ जिचे स्वरूप पाहता डोळा ॥ जाश्वनीळा धणी न पुरे ॥७२॥

कृत्तिकापुंज झळके गगनी ॥ तैसे जलजघोस डोलती कर्णी ॥ अरुणसंध्यारागा उणे आणी ॥ कुंकुमरेखा आरक्तपणे ॥७३॥

विश्वप्रलयी शिव सगुणपण ॥ टाकोनि होता तत्काळ निर्गुण ॥ परी तिचे सौभाग्य गहन ॥ ताटंककुंकुममहिमा हा ॥७४॥

दोन वेळा वरिले कर्पूरगौरा ॥ भवानीने लाविला कपाळी बिजवरा ॥ तांबूलरेखांकितवदनचंद्रा ॥ अपार कवी वर्णिती ॥७५॥

प्रयागी त्रिवेणी जैसी ॥ अंबेची वेणी शोभे तैसी ॥ कृष्णवर्ण कुरळ निश्चयेसी ॥ आदित्यनंदिनी होय ते ॥७६॥

शुभ्र हार गुंफिला दिव्यसुमनी ॥ तेचि ब्रह्मांडावरूनि स्वर्धुनी ॥ माजी आरक्तपुष्पे दिसती नयनी ॥ पद्मजनंदिनी ॥ गुप्त ते ॥७७॥

मूदराखडी मच्छकच्छादि अलंकार ॥ हे प्रयागी तळपती जलचर ॥ केशाग्री गुच्छ विशाळ थोर ॥ सागराकार शोभती ॥७८॥

काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ ॥ तेचि डोलत मोहनमाळ ॥ जीवशिव दोन्ही तेजाळ ॥ आवरोनि धरिले दोन पक्षी ॥७९॥

अक्षय सौभाग्य नव्हे खंडन ॥ म्हणून वज्रचूडेमंडित कर जाण ॥ दशांगुळी मुद्रिका बंधु जनार्दन ॥ दशावतार नटलासे ॥८०॥

पायी नुपुरे पैंजण ॥ गर्जता शिव समाधि विसरून ॥ पाहे मुखचंद्र सावधान ॥ नेत्रचकोरे करोनिया ॥८१॥

भक्त जे का एकनिष्ठ ॥ पायी दोल्हारे जोडवी अनुवट ॥ ऐसे स्वरूप वरिष्ठ ॥ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ॥८२॥

ऐसे एक संवत्सरपर्यंत ॥ आचरली उमामहेश्वरव्रत ॥ नैध्रुव उद्यापन करवित ॥ यथाविधिप्रमाणे ॥८३॥

अकरा शते दंपत्ये ॥ वस्त्र अलंकारदक्षिणायुक्त ॥ पूजोनि शारदा हर्षभरित ॥ तव रवि अस्त पावला ॥८४॥

जप ध्यान कीर्तन करीत ॥ शारदा गुरुजवळी बैसत ॥ अर्धयामिनी झालिया अकस्मात ॥ भवानी तेथे प्रगटली ॥८५॥

असंभाव्य तेज देखोनी ॥ नैध्रुवासी नेत्र आले तेचि क्षणी ॥ नैध्रुव शारदा लागती चरणी ॥ प्रेमभावेकरूनिया ॥८६॥

देवीचे करिती स्तवन ॥ उभे ठाकती कर जोडून ॥ परी त्या दोघांवाचून ॥ आणिक कोणी न देखती ॥८७॥

जय जय भवानी जगदंबे ॥ मूळप्रकृतिप्रणवस्वयंभे ॥ ब्रह्मानंदपददायिनी सर्वारंभे ॥ चिद्विलासिनी तू माये ॥८८॥

धराधरेंद्रनंदिनी ॥ सौभाग्यसरिते हेरंबजननी ॥ भक्तह्रदयारविंदचिन्मयखाणी ॥ वेदपुराणी वंद्य तू ॥८९॥

तुझिये कृपे निश्चिती ॥ गर्भांधासी नेत्र येती ॥ मागे सांडूनि पवनगती ॥ पांगुळ धावती कृपे तुझ्या ॥९०॥

मुके होतील वाचाळ ॥ मूर्ख पंडित होय तात्काळ ॥ रत्ने होती सिकताहरळ ॥ गारा होती चिंतामणी ॥९१॥

भवभयहारके भवानी ॥ भक्तपाळके मनोल्हासिनी ॥ वेदमाते द्विजजनरंजनी ॥ वेधले ध्यानी ब्रह्मादिक ॥९२॥

त्रिपुरसुंदरी त्रिभुवनजननी ॥ दोषत्रयहारके त्रितापशमनी ॥ त्रिकाळ जे सादर तव ध्यानी ॥ त्रिदेहविरहित ते ॥९३॥

शिवमानससरोवरमराळिके ॥ जय जय विज्ञानचंपककळिके ॥ सकळ ऐश्वर्यकल्याणदायके ॥ सर्वव्यापके मृडानी ॥९४॥

ऐसे ऐकता सुप्रसन्न ॥ देवी म्हणे माग वरदान ॥ नैध्रुवे वृत्तांत मुळींहून ॥ शारदेचा सांगितला ॥९५॥

मम मुखांतूनि वचन आले ॥ ते अंबे पाहिजे सत्य केले ॥ तुवा जरी मनी धरिले ॥ तरि काय एक न करिसी ॥९६॥

यावरी शिवजाया बोले वचना ॥ हे शारदा पूर्वी शुभानना ॥ द्रविडदेशी विप्रकन्या ॥ नाम भामिनी इयेचे ॥९७॥

इच्या भ्रतारासी स्त्रिया दोघीजणी ॥ ही धाकुटी प्रिया मृदुभाषिणी ॥ इणे वर वश करोनी ॥ वडील कामिनी विघडविली ॥९८॥

शेजारी एक जार होता ॥ तो ईस बहुत दिवस जपत असता ॥ एकांत पाहोन इच्या हाता ॥ धरिता झाला दुर्बुद्धि ॥९९॥

इणे नेत्र करोनि आरक्त ॥ झिटकाविला तो जार पतित ॥ मग तो होवोनि खेदयुक्त ॥ गृहासी गेला दुरात्मा ॥१००॥

इचे त्यासी लागले ध्यान ॥ सुरतआलिंगन आठवून ॥ इच्या ध्यासेकरून ॥ तो जार मृत्यु पावला ॥१॥

ईस विधवा हो म्हणून ॥ इच्या सवतीने शापिले दारुण ॥ मग तीही पावली मरण ॥ इच्या दुःखेकरूनिया ॥२॥

मग हेही काळे मृत्यु पावली ॥ तेचि शारदा हे जन्मली ॥ पूर्वीच्या जारे ईस वरिली ॥ ये जन्मी जाण निर्धारे ॥३॥

तोचि पद्मनाभ ब्राह्मण ॥ गेला इसी दावा साधून ॥ इचा पूर्वजन्मींचा भ्रतार जाण ॥ द्रविडदेशी आहे आता ॥४॥

तीनशेसाठ योजन ॥ येथोनि दूर आहे ब्राह्मण ॥ स्त्रीहीन इचे स्वरूप आठवून ॥ तळमळीत सर्वदा ॥५॥

तो ईस स्वप्नामध्ये नित्य येवोन ॥ भोग देईल प्रीतीकरून ॥ जागृतीहूनि विशेष जाण ॥ सुख होईल इयेते ॥६॥

ऐसे लोटता बहुत दिवस ॥ पुत्र एक होईल शारदेस ॥ शारदानंदन नाम तयास ॥ लोकी विख्यात जाण पा ॥७॥

ईस नित्य भोगी होईल जो हरिख ॥ तैसाच विप्र पावेल सुख ॥ स्वप्नानंदे विशेष देख ॥ तृप्ति होईल निर्धारे ॥८॥

ऐसे तयासी सागोन ॥ अंबा पावली अंतर्धान ॥ त्यावरी शारदा नित्य स्वप्न ॥ देखती झाली तैसेचि ॥९॥

तव ती झाली गरोदर ॥ जन निंदा करितीसमग्र ॥ दीर भावे सासू श्वशुर ॥ आप्त सोयरे सर्व आले ॥११०॥

देवीचे करणे अघटित ॥ खदखदा जन हासत ॥ म्हणती हे केवी घडे विपरीत ॥ अंबा ईस भेटली कधी ॥११॥

एक म्हणती कर्ण नासिक छेदून ॥ बाहेर घाला खरारोहण करून ॥ तो आकाशवाणी बोले गर्जोन ॥ सत्य गर्भ शारदेचा ॥१२॥

जन परम अमंगळ ॥ म्हणती हे कापट्यवाणी सकळ ॥ त्यात एक वृद्ध होता पुण्यशीळ ॥ वदता झाला ते ऐका ॥१३॥

ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र ॥ अघटित घडवी निर्धार ॥ स्तंभेविण धरिले अंबर ॥ कुंभिनी तरे जळावरी ॥१४॥

ग्रहगण भगणे विधु मित्र ॥ यास आहे कोणाचा आधार ॥ सर्वदेही व्यापक परमेश्वर ॥ परी शोधिता ठायी न पडे ॥१५॥

परस्परे पंचभूतांसी वैर ॥ ती एकरूपे चालती कौतुक थोर ॥ जननीगर्भी जीव समग्र ॥ रक्षितो कैसा पहा हो ॥१६॥

काय एक न करी जगन्नाथ ॥ राजा पूर्वी यूपकेत ॥ त्याचे जळी पडले रेत ॥ ते जळ प्राशित वेश्या एक ॥१७॥

तितुकेनि झाली ते गर्भिणी ॥ पुत्र प्रसवली उत्तमगुणी ॥ विभांडकाचे रेत जळी पडोनी ॥ ते जळ हरिणी प्राशीत ॥१८॥

तोचि झाला ऋषिश्रृंगी ॥ तेणे ख्याती केली दशरथयागी ॥ सौराष्ट्रराजा स्पर्शता करे मृगी ॥ दिव्य पुत्र प्रसवली ॥१९॥

सत्यवती मत्स्यगर्भसंभूत ॥ तो मत्स्य राजपुत्र होत ॥ महिषासुर दैत्य ॥ महिषीगर्भी जन्मला ॥१२०॥

कित्येक ऋषि करुणावंत ॥ वचनमात्रे गर्भ राहत ॥ रेवतीरमण जन्मत ॥ रोहिणीपोटी कैसा पा ॥२१॥

सांबाचे पोटी मुसळ झाले ॥ ते कोणी कैसे घातले ॥ कुंतीपोटी पांडव जन्मले ॥ पाच देवांसमागमे ॥२२॥

ऐसे बोलती वृद्धजन ॥ तरी निंदा करिती दुर्जन ॥ मागुती देववाणी झाली पूर्ण ॥ ऐका वचन मूर्ख हो ॥२३॥

शारदेस कोणी असत्य म्हणती ॥ तरी जिव्हा चिरोनी किडे पडती ॥ ऐसे ऐकता सात्त्विक सुमती ॥ सत्य सत्य म्हणती त्रिवाचा ॥२४॥

कित्येक दुर्जन पुन्हा बोलत ॥ हे सर्वही कापट्य असत्य ॥ तो जिव्हा चिरोनि अकस्मात ॥ किडे गळो लागले ॥२५॥

हे देखोनि सर्व जन ॥ शारदेसी घालिती लोटांगण ॥ म्हणती माते तू सत्य पूर्ण ॥ जाणकीरेणुकेसारखी ॥२६॥

मग तीस पुत्र झाला सतेज ॥ लोक म्हणती शारदात्मज ॥ वाढत जैसा द्विजराज ॥ शुद्धद्वितीयेपासुनी ॥२७॥

उपनयन झालिया पूर्ण ॥ आठवे वर्षी वेदाध्ययन ॥ चारी वेद षट्शास्त्रे जाण ॥ मुखोद्गत पुराणे ॥२८॥

नवग्रहात जैसा वासरमणी ॥ तेवी पंडितात अग्रगणी ॥ जेणे अनुष्ठाने पिनाकपाणी ॥ प्रसन्न केला सर्वस्वे ॥२९॥

यावरी शारदा पुत्रसमवेत ॥ लक्षूनि शिवरात्रिव्रत अद्भुत ॥ गोकर्णक्षेत्राप्रति जात ॥ यात्रा बहुत मिळाली ॥१३०॥

तो द्रविडदेशींचा ब्राह्मण ॥ तोही आला यात्रेलागून ॥ परस्परे पाहून ॥ कष्टी होती अंतरी ॥३१॥

परस्परा कळली खूण ॥ पूर्वी देवी बोलिली वचन ॥ उमामहेश्वर व्रताचे पुण्य ॥ अर्ध देई पतीसी ॥३२॥

पुत्र देई त्याचा त्यास ॥ तू त्यापासी राहे चार मास ॥ समागम न करी निःशेष ॥ शिवपदासी पावसी ॥३३॥

मग शिवरात्रियात्रा करून ॥ भ्रतारासी केले नमन ॥ म्हणे हा घ्या आपुला नंदन ॥ म्हणोनि करी दीधला ॥३४॥

उमामहेश्वरव्रत ॥ त्याचे अर्धपुण्य देत ॥ मग शारदा सवे जात ॥ द्रविडदेशाप्रति तेव्हा ॥३५॥

शारदा व्रतस्थ पूर्ण ॥ दुरून पतीचे घे दर्शन ॥ विख्यात झाला शारदानंदन ॥ महापंडित पृथ्वीवरी ॥३६॥

तप आचरला अपार ॥ मातृपितृभजनी सादर ॥ माता भवानी पिता शंकर ॥ हेचि भावना तयाची ॥३७॥

जो न करी जनकजननीचे भजन ॥ धिक् त्याचे तप ज्ञान ॥ धिक् विद्या धिक् थोरपण ॥ धिक् भाग्य तयाचे ॥३८॥

घरी साठवी स्त्रियेचे गोत ॥ आणि मायबापा शिणवीत ॥ अन्न नेदी बाहेर घालीत ॥ शब्दबाणे ह्रदय भेदी ॥३९॥

तो जरी पढला षट्शास्त्र ॥ परी अनामिकाहूनि अपवित्र ॥ त्याचे न पहावे वक्र ॥ विटाळ कदान व्हावा ॥१४०॥

यद्यपि झाला स्पर्श जाण ॥ तरी करावे सचैल स्नान ॥ महादोषी तो कृतघ्न ॥ यम दारुण गांजीत ॥४१॥

यावरी शारदेचा भ्रतार ॥ महातपस्वी योगीश्वर ॥ शरीर ठेवोनि परत्र ॥ पावला तो शिवपदा ॥४२॥

शारदाही चिंतूनि मदनदहन ॥ करी विधियुक्त सहगमन ॥ पतीसमवेत कैलासभुवन ॥ पावोन सुखे राहिली ॥४३॥

शिवलीलामृत सुरस पूर्ण ॥ किंवा हे दिव्य रसायन ॥ भवरोगी सेविता जाण ॥ आरोग्य होऊन शिव होती ॥४४॥

जे मृत्यूने कवळिले सहज ॥ त्यांसी नावडे हा रसराज ॥ ज्यांची सुकृते तेजःपुंज ॥ तेचि अधिकारी येथींचे ॥४५॥

ब्रह्मानंदे श्रीधर ॥ श्रोतया विनवी जोडोनि कर ॥ शिवलीलाम्रुत निर्जर ॥ तुम्ही सेवा आदरे ॥४६॥

पुढील अध्यायी सुरस कथा ॥ पावन होय श्रोता वक्ता ॥ मृडानीसहित शिव तत्त्वता ॥ पाठीराखी सर्वार्थी ॥४७॥

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ दशमाध्याय गोड हा ॥१४८॥

इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥१०॥

॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.