Jump to content

शेतकरी आंदोलन आणि साहित्यिक

विकिस्रोत कडून

शेतकरी आंदोलन आणि साहित्यिक


 शेतकरी कुटुंबाची ही बैठक आहे. एका बाजूला, कालिदासाच्या शब्दांत सांगायचं झालं तर,

निसर्गभिन्नस्पदमेकसंस्थम्
अस्मिन् द्वयम् श्रीश्च सरस्वती च ॥

 म्हणजे, ज्यांच्यावर सरस्वती प्रसन्न आहे आणि श्री काही फारशी अप्रसन्न नाही अशी मंडळी आणि दुसऱ्या बाजूला, लक्ष्मी आणि सरस्वती दोघींपासून फारकत झालेली मंडळी अशी ही एका कुटुंबातली माणसं जमली आहेत. मला जेव्हा या साहित्य संमेलनाचं निमंत्रण मिळालं तेव्हा मी फारसा काही उत्साही नव्हतो हे खरं, पण मी 'हो' म्हणालो त्याचा आज अत्यंत आनंद होतो आहे. गेली वीस वर्षे अनेक सभा केल्या. पण, तिथं पाहोचलो की कार्यकर्त्यांनी पटकन मंचावर घेऊन जायचं, बोलत्या वक्त्याला बाजूला सारून मला बोलायला उभं करायचं आणि भाषण संपलं की पुढच्या सभेची वेळ झाली म्हणून धावत पळत निघून जायचं. गेले दोन दिवस, मधे एक लहानसा प्रश्न विचारला ते सोडलं तर नुसता ऐकण्याचा आनंद घेत होतो. दोन दिवस फार आनंदात गेले याबद्दल तुम्हा सर्व साहित्यिकांना आणि संमेलनाच्या संयोजकांना धन्यवाद देऊ इच्छितो.

 दोनच दिवसांपूर्वी आंबेठाणला काही मंडळी जमली होती. सध्या आमच्या आंदोलनाचे काही फारसे चांगले दिवस नाहीत हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यावेळी चर्चा निघाली की गेली २० वर्षे आपण जी काही धावपळ केली, लोकांच्या म्हणण्यानुसार, संसार उजाड करून टाकले त्याचे शेवटी काही सार्थक झाले का? हाती काही लागलं का? तेव्हा कुणीतरी म्हणाले, "नाही कसं म्हणता? शेतीमालाच्या भावाचा तुमचा सिद्धांत जगन्मान्य झाला आहे; वीस वर्षापूर्वी वि.म. दांडेकरांसारखे अर्थशास्त्रज्ञसुद्धा तो मानत नव्हते. देशात डंकेल प्रस्तावाबद्दल चर्चा चालली होती तेव्हा हिंदुस्थानातले सगळे अर्थशास्त्रज्ञ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी संघटना अशी कुस्ती झाली आणि आपण त्यात जिंकलो. शेतकरी महिला आघाडीच्या 'लक्ष्मीमुक्ती' कार्यक्रमाने १८ महिन्यात २ लाखांच्यावर महिलांच्या नावाने जमिनी झाल्या." खरं आहे. शेतकरी संघटनेचे महिला अधिवेशन झाले नसते आणि शेतकरी महिला आघाडी तयार झाली नसती तर आम्ही आमच्या लक्ष्मीकडे कायमचं जनावर म्हणून पाहिलं असतं, माणूस

म्हणून कधी पाहिलं नसतं' असं म्हणणारी शेतकरी भावांची अनेक पत्रे माझ्याकडे आहेत.

 मला सार्थकतेचा आणखी एक अनुभव इथे आल्यानंतर मिळाला. रा.रं. बोराडे म्हणाले, "साहित्यिक मंडळी सहजासहजी अशी एक मंचावर जमा होत नाहीत. त्यांना बोलावणं पाठवावं लागतं, त्यांची मिनतवारी करावी लागते. हा येणार आहे का, तो येणार नाही ना असा थोडा पडताळा केला जातो. आणि यायचं मान्य केलं तरी शेवटी व्यवहाराचा भाग असतोच. येण्याजाण्याच्या खर्चाचं काय? तिथे खाण्यापिण्याची, राहण्याची सोय कशी होणार अशी चौकशी केली जाते."

 इतर साहित्य संमेलनात अशी व्यवस्था, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या संमेलनात असू शकत नाही. पण, बोराडेंनी पुढे आणखी एक वाक्य वापरलं, "शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानं संमेलन आयोजित केलं आहे आणि शरद जोशी दोन्ही दिवस ऐकायला बसणार आहेत हे समजल्यावर आम्ही ताबडतोब यायचं ठरवलं; कोणी प्रवास खर्चाचा विषय काढला नाही, ना सोयीसुविधांचा." माझ्या सार्थकतेच्या कलमात एक कलम वाढवायला हरकत नाही. धन्य झालो.

 शेषराव मोहिते, रघुनाथदादा पाटील हे शेतकरी संघटनेचे मोठे उत्साही कार्यकर्ते आहेत. त्यांना असं वाटत की ज्यांची ज्यांची गावाबद्दल निखळ स्वच्छ भावना आहे त्यांनी त्यांनी सगळ्यांनी एकजुटीनं चालावं म्हणजे आपण हा जो यज्ञ आरंभला आहे- शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी- त्याची सांगता लवकर करता येईल आणि उत्साहाच्या भरात त्यांनी ते बोलून दाखवलं; पण त्यामुळं या साहित्य संमेलनातील परिसंवादाला एक वेगळंच स्वरूप आलं. आमची घोडी थकली आहेत तेव्हा साहित्याच्या चळवळीचं घोडं शेतकरी चळवळीच्या रथाला जोडून तो थोडा वेगाने चालता करावा अशी शेतकरी संघटनेची इच्छाविनंती पुढे मांडण्यासाठी हे साहित्य संमेलन भरवलं असावं असा समज होऊन थोडी चकमक उडाली.

 या संमेलनात एका परिसंवादाचा विषय 'उदारीकरण आणि शेतकरी' असा होता, तो केवळ तसा न ठेवता, 'उदारीकरण आणि शेतकरी व साहित्यिक' असा ठेवला असता तर या संमेलनाच्या चौकटीत चपखल बसला असताच, शिवाय वरील चकमकीत आनंद यादवांना जो मुद्दा मांडावा लागला- व्यक्तिमत्वाचा, साहित्यिकांच्या व्यक्तिमत्वाचा, कलाकाराच्या व्यक्तिमत्वाचा- ते करण्याची गरज उरली नसती. कारण हा व्यक्तिमत्वाचा मुद्दाच गृहीत धरून सारी शेतकरी चळवळ चालली आहे, आर्थिक उदारीकरणाची चळवळ चालली आहे. साहित्यिक तेवढेच काय ते स्वत:च्या वक्तिमत्वाला जोपासणारे असं

समजू नका. शेतकरी संघटनेच्या प्रतिज्ञेत म्हटले आहे की, 'सामान्य माणसासारखं का होईना जगता यावं.' चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनातील घोषणा पत्रातही म्हटलं आहे, की आम्ही लाख लाख स्त्रिया घोषित करतो की आम्ही माणूस आहोत.' माणसाला माणूस न मानता एका समूहाचा, एका कळपाचा सदस्य करण्याचं काम शेकडो वर्षे चाललं आहे - धर्मिकांनी चालवलं, जातीच्या नावानं चालवलं आणि समाजवादाच्या नावाखालीही तेच केलं गेलं. या कळपवादातून माणसाला मोकळं करण्याचा विचार देणारी ही शेतकरी संघटना आहे.

 उदारीकरण झालं तर काय होईल? एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या माणसाला, ज्यांच्या कारखान्यामध्ये एक किलो लोखंडात एक कणभरही वाढ होऊ शकत नाही त्यांच्याकडे भीक मागायला जावं लागतं. या कोड्याचं उत्तर शोधण्याकरिता साहित्यिकांना त्याचा काहीतरी उपयोग झाला असता. साहित्यिकांच्या दृष्टिने उदारीकरणाला काय महत्त्व आहे? समाजवादाच्या पद्धतीमध्ये राजकीय सरकारने सगळा समाज ग्रासून टाकला आहे. सरकार पाहिजे; सरकार नको असं कोणी म्हणत नाही. कायदा आणि सुव्यवस्था टिकविण्याकरिता, परकीय आक्रमणापासून देशाचं रक्षण करण्याकरिता सरकार पाहिजे, मजबूत पाहिजे; जो कोणी कायदेभंग करायला जाईल त्याला भीती वाटेल अशा तऱ्हेचं ताकदवान सरकार पाहिजे. पण, त्या सरकारची भूमिका एवढीच मर्यादित पाहिजे; अर्थकारणात सरकारला काहीही स्थान नाही. 'जिथं सरकार व्यापारी बनतं, तिथं प्रजा भिकारी बनते' अशी गुजराथीत म्हण आहे. मला आजकालच्या साहित्यिकांची, कलाकारांची, बुद्धिमंतांची मोठी कीव येते. भर्तृहरीच्या अनेक साहित्यामध्ये एका प्रसंगाचा उल्लेख येतो. एका गुरूच्या एक शिष्य राजाच्या दरबारात उभा राहून राजाला सांगतो, 'तू मोठा श्रीमंत असशील; आपल्या वैभवाचा, साम्राज्याचा तुला अभिमान असेल; पण मलासुद्धा ज्या गुरूची मी उपासना केली त्या गुरूच्या परंपरेचा अभिमान आहे. माझाही मोठा शिष्यगण आहे. माझं हे वैभव तू मानत नसशील तर मीही तुला मानत नाही; मी हा निघून चाललो.' ज्याला तुम्ही सरंजामशाही म्हणता त्या सरंजामशाहीच्या काळामध्ये, जिथे काही न्याय नाही, जिथे जुलूम होतात अशा राजाच्या दरबारमध्ये उभा राहून एक विद्वान आपल्या विद्वतेचा डौल सांगतो.

 आणि आज? आज आपल्याकडे लोकशाही आहे असं आपण म्हणतो. या लोकशाहीच्या काळात, बी. कॉमच्या परीक्षेत कॉपी करताना पकडला गेलेला मनुष्य जर मुख्यमंत्री झाला आणि तो आपल्या केबिनमध्ये येतो आहे म्हटलं तर आमच्या विद्यापीठांचे

कुलगुरूसुद्धा उठून उभे राहतात ! हे म्हटल्यानंतर एका प्राचार्यांनी मला सांगितले की "मुख्यमंत्री कशाला, मुख्यमंत्र्याचा चपराशी येतो आहे असं कळलं तरी आम्ही उभे राहतो!"

 साहित्यिकांच्या स्वातंत्र्याला मी मानतो. पण, ते स्वातंत्र्य आपण मिरवतो आहोत, वापरतो आहोत असं साहित्यिकही मानणार नाहीत. माझं एखादं पुस्तक छापायची परवानगी कोणी मागितली तर मी एक अट घालतो- कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पुस्तक सरकारी पारितोषिकाकरिता पाठवले जाता कामा नये.

 शेतकरी संघटनेने साहित्यासाठी काही केलं का, साहित्यासंबंधी काही अभ्यास केला का असा एक प्रश्न या संमेलनात विचारला गेला. खरं म्हटलं तर मी शेतकरीही नाही. या सगळ्या हॉलमध्ये, शेतकऱ्यांच्या घरी जन्मलेला नाही असा, बहुतेक मी एकटाच आहे. त्यामुळे माझ्याकडे भूमिहीन शेतमजुराच्या किंवा शेतमालकाच्या घरी जन्मल्याचा डौल सागण्यासारखं काही नाही.

 आणि मी साहित्यिकही नाही. साहित्यिक होण्याचा माझा विचार होता. मी कॉलेजमध्ये असताना कथा लिहायला सुरवात केली होती. माझा त्यावेळेचा आवडता लेखक सॉमरसेट मॉम- आजही आवडता आहे - याच्या कथांचं भाषांतर करू लागलो. त्यावेळच्या एका प्रसिद्ध मराठी मासिकामध्ये माझी एक गोष्ट प्रसिद्ध झाली. मुंबईत लोकल गाडीखाली सापडलेल्या एका तरूणाचे प्रेत घरी आणल्यानंतर तिथे जमलेल्यांमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या असाव्या असा त्या कथेचा विषय होता. चाळीमध्ये त्या तरूणाच्या शेजारी एक विधवा स्त्री रहात होती. तिच्या चेहऱ्यावर काय भाव उमटला असावा याचे वर्णन करताना, मी माझ्या खवचट स्वभावाने, लिहिले होते की, 'एखाद्या विधवा बाईला दुसऱ्या बाईचा नवरा मेल्यावर समाधान झाल्यावर व्हावा तसा तिचा चेहरा झाला होता.' माझ्या वडिलांनी ती प्रसिद्ध झालेली गोष्ट वाचली. माझे वडील अगदीच वेगळ्या पठडीचे. राग आला तर दुष्ट, कपटी, अभद्रेश्वर, राक्षस यापलीकडे पाचवी शिवी त्यांना माहिती नव्हती. माझी गोष्ट वाचून ते रागाने म्हणाले, "मनुष्य जितका दुष्ट आहे तितकं सगळं कागदावर लिहिण्याची काही आवश्यकता नाही." मी मोठा पंचाईतीत सापडलो; जे आहे, जे मला दिसतंय ते लिहायचं नाही, म्हणजे मग काय करायचं? मग मी हळूहळू साहित्यापासून दूर व्हायला लागलो.

 शेतकरी आंदोलन चालू झाल्यानंतर, सुदैवाने, 'योद्धा शेतकरी'चे लेखक भेटले. त्यांना सांगावं नाही लागलं की तुम्ही आमच्याबरोबर या. कुठे तरी अपघातानं गाठ पडली

आणि त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही नाशिक भागांमध्ये असं असं आंदोलन करतो आहोत; चाकणच्या आंदोलनासंबंधी तुम्ही वाचलंच असेल. ते म्हणाले, "शरदराव, आजपासून मी, माझी गाडी आणि माझी बायको तुमच्याबरोबर राहणार." आणि त्या गृहस्थाने निपाणीचं तंबाखू आंदोलन संपेपर्यंत अकरा महिने मोठ्या तपश्चर्येनं काम केलं. हे काही विनंत्या करून होणारं काम नाही. मी जो जो शब्द त्या काळात बोललोसभेमध्ये असो, खासगी बैठकीमध्ये असो- तो शब्दन् शब्द कॅसेटवर नोंद करून कागदावर उतरून काढण्याचं महान तपस्येचं काम त्यांनी केलं. त्यातूनच 'योद्धा शेतकरी' तयार झालं. मानलं पाहिजे ! मीसुद्धा बऱ्यापैकी प्रभावी गद्य लिहितो. ललित साहित्य लिहित नसलो तरी अर्थशास्त्रासारखा कठीण विषय सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दांमध्ये मांडतो. पण माझ्या पुस्तकांनी शेतकरी संघटनेचा प्रचार झाला नाही तितका 'योद्धा शेतकरी'ने झाला ही गोष्ट खरी. त्यांनी निपाणीच्या आंदोलनातील रक्तकांडावरही 'रक्तसूट' नावाची लेखमालिका 'माणूस' मधून लिहिली. अंतिमत: अशी पुस्तके कितपत उपयुक्त ठरू शकतील याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण स्वत:हून असा उपक्रम करणारांचा उत्साहभंग मी करीत नाही. शेतकरी संघटनेवर शिंतोडे उडविणारी पुस्तकेही लिहिली गेली. किंबहुना अशी पुस्तके जाणीवपूर्वक, पैसे देऊन लिहून घेतली जातील. संघटनेचे कार्यकर्ते आनंद यादवांना विनंती करतात की 'गावा'बद्दल तुमच्या मनात सहानूभूती आहे, तेव्हा तुम्ही उभे रहा आणि काहीतरी 'गावां'तील भावांबद्दल बोला. अशी पुस्तकं येऊ लागली तर त्याची येणारी प्रतिक्रियाही लक्षात घ्यायला हवी. ज्यांच्याकडे पैसे आहेत अशी मंडळी भाडोत्री लेखक लावून हवी तशी पुस्तकं लिहून घेतील. तेव्हा, कोणताही कार्यक्रम हाती घेताना त्याला प्रतिक्रिया काय येईल हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

 चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनात आम्ही एका कार्यक्रमाचा प्रस्ताव केला होता. ज्या बायांचे नवरे दारूडे असतील त्यांना गावातल्या सगळ्या बायांनी पकडून पाण्यात बुचकळावं किंवा ठोकून काढावं. आमच्या कार्यकर्त्या महिलांना खूप आनंद वाटला. महिला प्रश्नाच्या विचाराबाबतीत मी ज्यांना गुरूस्थानी मानतो अशा एका महिलेने मला सांगितले की हे चूक आहे. कोणत्याही पद्धतीने महिला चळवळ हिंसाचाराच्या मार्गने नेऊ नका. जर का हिंसाचाराचा मार्ग अवलंबला तर दुसऱ्याही बाजूने हिंसाचार होईल आणि हिंसाचार वाढला म्हणजे स्त्रिया नेहमीच दोन पावले मागे हटतात. आमचा प्रस्ताव आम्ही मागे घेतला.


   स्वयंप्रेरणेने लिहिले जाणे काही अशक्य नाही; भास्कर चंदनशिवांना काही आम्ही सांगायला गेलो नाही की तुम्ही लिहा. पण जर का आत्मप्रेरणेने कुणी साहित्य तयार करायला निघालेलं नसेल आणि त्याला जर का आपण लिहिण्याची गळ घातली आणि असं जर लिहिलं गेलं तर तेच हत्यार आजच्या जगामध्ये चुकीचं वापरलं जाण्याचीसुद्धा शक्यता आहे. निपाणी आंदोलनात त्याचा आम्ही अनुभव घेतला आहे.

 सुरुवातीला प्रचाराचे साहित्य तयार करण्याबद्दल माझ्या आणि अरविंद वाम कुलकर्णी वगैरेंमध्ये बरेच वाद झाले. माझा प्रश्न होता की तुम्हाला कुणापर्यंत निरोप पोहोचवायचा आहे ? शेतकरी संघटनेचा विचार शेतकरी समाजापर्यंत पाहोचवायचा आहे ना? त्याला वाचता येतं का? ज्या थोड्यांना थोडंफार वाचता येतं त्यांना वाचण्यात रस नाही. ही गोष्ट आजही खरी आहे. मी 'शेतकरी संघटक'मध्ये लिहितो. पण शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरी त्या अंकाच्या पिनासुद्धा न काढलेल्या प्रती अजूनही सापडतात. आणि ज्यांना वाचायची आवड आहे ती माणसं तुमच्या प्रचाराने आणि पुस्तकांनी बदलतात यावर माझा मुळीच विश्वास नाही. कारण माणसाचं विचाराचं इंद्रिय मेंदू नसून खिसा आहे. माणूस विचार करतो म्हणजे आपल्या खिशाला परवडणारं सोयीस्कर जे आहे त्याचं समर्थन करण्याकरता त्याचा मेंदू वेगवेगळे तर्कवितर्क लढवतो त्यामुळे मतपरिवर्तन हे काही खरं नाही. ज्याचा पगार ठरलेला आहे तो शेतीमालाच्या भावाच्या बाजूने येणं शक्य नाही; अपवादानं एखादा येईल. पण साधारणपणे पगारदाराच्या मनातला हिशोब असा की तीन हजार रूपये पगारातल्या पाचशे रूपयांता जर का दूध, भाजीपाला, खाणंपिणं करता आलं तर उरलेल्या अडीच हजारात मला अमुक खरेदी करता येतं, पुढच्या महिन्यात रेडिओ घेता येईल, पुढच्या वर्षापर्यंत टेलिव्हिजन घेता येईल. असे त्याचे हिशेब सगळे तयार असतात. तेव्हा ज्वारीचा भाव तुम्ही वाढवून मागितला की त्याच्यासमोर उत्पादनखर्च येत नाही, तुमच्या 'माये'ची उघडी पाठ येत नाही, तुमच्या डोळ्यातले अश्रू येत नाहीत, रिकामं जातं येत नाही. खाण्यापिण्यावर पाचशेच्या ऐवजी सातशे रूपये खर्च करावे लागले तर माझा रेडिओ आणि टू इन वन यायला किती वेळ लागेल याबद्दल पहिल्यांदा त्याच्या मनात प्रश्न उभा राहातो. आणि मग, तो युक्तिवाद शोधून काढतो- शेतीमालाचा रास्त भाव हे मुळी गरिबाच्या फायद्याचं कलम आहे का? यात शेतमजुरांचा विचार आहे का? त्यांनी फारसे शेतमजूर पाहिले असतात असे नाही. त्यांच्या घरची मोलकरीण जिन्याखाली तुटक्या कपातून चहा पीत असेना. हे युक्तिवाद अशासाठी काढले जातात की मुळात आर्थिक

संबंधांचा काही संदर्भ असतो. माझी भूमिका ही अशी असल्यामुळे माझी पुस्तकं प्रसिद्ध करायला मी काही राजी नव्हतो. त्यामुळे पुस्तकं प्रसिद्ध करण्याचे मी बराच काळ प्रयुक्तीने टाळलं. ज्या लोकांपर्यंत मला पाहोचायचं आहे त्या लोकांपर्यंत मला तोंडच्या शब्दांनीच पोहोचावे लागेल, पुस्तकं वगैरे आधुनिक साधनं कितीही परिणामकारक असली तरी ती काही सगळ्यालोकांपर्यंत पोहोचणार नाहीत याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती-नाही.

 एकदा विनय हर्डीकर भेटले. म्हणाले, "मला काम करायचे आहे. पण, मला शेतीचा अनुभव पाहिजे. तुमची भाषणं ऐकली की आम्हीही तशीच भाषणं करतो, प्रसंगी अधिक सुरस करतो. पण भाषणानंतर शेतकऱ्यांच्या ज्या बैठका होतात त्यात एखाद्यानं शेतीतील एखादी अडचण, समस्या मांडली तर तुमच्याकडे त्यावर उत्तर तयार असतं. असं उत्तर आम्ही देऊ शकत नाही, आम्ही तिथं कमी पडतो." मी हर्डीकरांना सांगितलं की "कोणाही माणसाचं 'मॉडेल' समोर ठेवून मोठं होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला शरद जोशींबद्दल आदर वाटत असेल तर आनंदाची गाष्ट आहे; पण 'शरद जोशी' ही कमीत कमी उंची गाठायची आहे आयुष्यात, हे लक्षात ठवा."

 मी त्यांना म्हटलं, "हिंदुस्थानच्या सगळ्या भाषांमध्ये मला शेतकरी नायक म्हणून कुठं दिसत नाही. साहित्यात शेतकरी म्हणजे दुष्ट, जमीनदाराचा पोरगा, खांद्यावर बंदूक टाकून फिरतो, तमासगिरीणीकडे जातो, पोरी पळवतो किंवा विदूषक असतो, सोंगाड्या असतो; माणसासारखा माणूस हाडामांसाचा शेतकरी मला कोणत्याच साहित्यात सापडत नाही- मराठी नाही, हिंदी नाही, गुजराती नाही, कोणत्याच भाषेत नाही. तुमचा विषय साहित्य आहे तर शोधून काढा. ही काय भानगड आहे ते." त्यांनी बरेच परिश्रम घेऊन अभ्यास केला, गावोगाव परिसंवाद घडवले.

 आम्ही गद्य माणसं असल्यामुळे डाव्या चळवळीकडे आहेत तशी लेखक कवी माणसं आमच्याकडे वळत नाहीत हे खरं आहे.

 मी शेतकरी जीवनाचं उदात्तीकरण करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. काय ते जीवन, काय ती हिरवी हिरवी झाडं, काय स्वच्छ हवा, कसं झुळझुळ पाणी, शेतीवर असणं म्हणजेच परमेश्वराच्या सान्निध्यात असणं असला वाह्यातपणा मी काही केला नाही.

 शेतकरी ही एक जीवनपद्धती आहे. इतिहासाच्या एका ठरावीक काळामध्ये त्यांचं

महत्त्व होतं. पण पुढे, जितकी माणसं शेतीतून निघून बिगरशेती व्यवसायाकडे वळतील तितका त्या समाजाचा विकास आहे. फक्त, शेतकऱ्यांनी उत्पन्न केलेलं वरकड मूल्य

लुटून नेणारे, शेतकऱ्यांची संपदा लुटून नेतात आणि शेतकऱ्याला मागे ठेवतात. स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षातील महत्त्वाची आकडेवारी कोणती? शेतीवरील लोकसंख्या जवळजवळ कायम - ७४ ऐवजी ७० % आहे; आणि शेतीचा राष्ट्रीय उत्पादनातील हिस्सा ६४ % वरून आज २३ % वर आला आहे. शेतीतील मालमत्ता बाहेर घेऊन जायची आणि माणसं तिथंच ठेवायची हे होऊ नये, हे इतिहासाच्या विरूद्ध आहे, निसर्गाच्या विकासाच्या सिद्धांताच्या विरूद्ध आहे अशी मांडणी आम्ही करत आहोत. आमच्या मागे साहित्यिक, कवि, शाहिर का आले नाही याचं रहस्य यातच असे कदाचित, पण या प्रश्नाचा शोध घेतला पाहिजे.



 'ग्रामीण मराठी साहित्य संमेलन' असे या संमेलनाचे नाव आहे. यातील तीन शब्दांचा थोडा विचार करू या.

 'ग्रामीण' म्हणजे काय? 'हत्ती आणि चार आंधळे' ही गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे कोणाचा हात पायाला लागता तो म्हणे हत्ती खांबासारखा आहे आणि ज्याच्या हाती शेपटी आली तो म्हणे हत्ती दोरीसारखा आहे. आनंद यादवांनी पाहिलेल्या त्यांच्या गावाच जे वर्णन केलं ते एक विदारक सत्य आहे यात काही शंका नाही; पण बोराड्यांनी, त्यांनी पाहिलेल्या गावाचं केलंलं वर्णन हेही विदारक सत्य आहे. मग गावाची नेमकी व्याख्या काय? 'ग्रामीण' म्हणून वर्णन करताना गावाच्या कोणत्या मुखवट्याचा आपण विचार करतो? त्यापलीकडे, हा फक्त साहित्याचाच प्रश्न आहे काय? मला असं दिसतं की शेतकरी आंदोलनाविषयी जसं साहित्य तयार झालं नाही, तसंच एकही नाटक तयार झालं नाही. माझ्याकडे मराठीमधील दोनचार प्रसिद्ध नाटककार येऊन गेले, त्यांनी माझे विचार एकदोनदा ऐकले आणि विचार सोडून दिला. शेतमजुरांवर आणि आदिवासींवर आधुनिक असे कितीतरी चित्रपट निघाले. का? शेतमजूर आणि आदिवासींच्या जीवनावर आधारित चित्रपटात अभिनेत्रींना अधिक आकर्षकपणे दाखविण्याची संधी होती म्हणून, सांगायचा मुद्दा हा, की शेतकरी नायक नाही; शेतमूजर असू शकतो, आदिवासी असू शकतो हे फक्त साहित्याच्याच बाबतीत नव्हे तर सर्व कलांच्या बाबतीत खरे आहे म्हणजे, या प्रश्नाचा विचार करावयाचा झाला तर फक्त गावाविषयी करून चालत नाही फक्त मराठीविषयी करून चालत नाही, फक्त साहित्याविषयी करून चालत नाही; त एका अर्थाने सर्वच शेतकरी समाज आणि नागरी समाज यांच्यातल्या संबंधांचं को सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्हालातरी इतक्या वर्षांनीसुद्धा हे कोडं उलगडलेलं नाही

 मी काही जन्माने शेतकरी नाही; पण या बाबतीत माझ्या मनात जे काही प्रश्न तयार झाले ते सांगतो. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये काम करीत असताना वेगवेगळ्या देशांत जाण्याचा योग आला. तिसऱ्या जगातील गरिबीचा उगम शेतीत आहे हे त्यावेळी लक्षात आले माणि मग मी शेती विकत घेऊन शेतकरी बनलो. मी शेतकऱ्याच्या जातीचा नाही; किंबहुना ज्यांनी शेतकऱ्यांना पिढ्यान् पिढ्या पिळलं अशा ब्राह्मण जातीत जन्मलेला आहे. हे मुद्दाम सांगतो, अशाकरिता, की कोणी आपल्या पैतृक वारशाने शेतकऱ्यांशी निष्ठा सांगू नये. मी जेव्हा हिंदुस्थानात परत आलो, त्याच्या आधी बारा वर्षे मराठी बोलत नव्हतो; घरी मुलींबरोबरसुद्धा फ्रेंचमध्येच बोलत होतो. जन्माने शेतकरी नाही, धर्माने नाही, मराठीशीही संपर्कही नाही. एवढं असूनसुद्धा शेतकरी झाल्यानंतर ज्या काही गोष्टी मला प्रकर्षानं जाणवल्या, त्या गोष्टी मला ग्रामीण साहित्यामध्ये सापडल्या नाहीत. यावर्षी, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न उभा राहिला तेव्हा सगळीकडे खळबळ उडाली; पण फारशी नाही. मंडल आयोगाचा अहवाल जेव्हा व्ही.पी. सिंगांनी मान्य केला त्यावेळी राजेंद्र गोस्वामीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर पाच आत्महत्या झाल्या आणि सरकार पडलं. दिल्लीमधल्या एखाद्या गटानं आंदोलन केलं, काहींनी आत्महत्या केली तर संबंध देश खळबळून उठतो, पेटून उठतो, सरकार पाडतो आणि आज पाचशे शेतकरी मेले तर कोणी म्हणतं, "कदाचित कर्जाच्या बोजामुळे असेल किंवा इतरही काही कारणांनी हे घडलं असेल, काय भानगडी असतील आपण काय सांगावं?" असं मुख्यमंत्रीसुद्धा खुशाल सांगत फिरू शकतात.

 ग्रामीण आणि नागरी समाजातील संबंधांबाबतच्या कोड्याच्या आधीची कोडी माझ्या मनात आहेत, ती सांगतो.

 पूर्वी गावातल्या सावकारांनी, जमीनदारांनी गावातील छोट्या शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं शोषण केलं यात काहीही शंका नाही. पण हे शोषणाचं आदिकारण आहे असं धरणारांची निरीक्षणशक्ती कुठे कमी पडली नाही ना? कागलच्या ब्राह्मण वस्तीतून जातांना तिथं राहतात ती सुखवस्तू दिसतात हे पाहतांना त्यांच्यातील सर्वच काही शेतीतून श्रीमंत झालेले नाहीत, एखादा त्यांनं स्वीकारलेल्या वकिलीच्या व्यवसायामुळे श्रीमंत झाला आहे हा मुद्दा त्यांच्या लक्षात का नाही आला? मी वीस वर्षांपूर्वी सांगायला सुरवात केली, की शेतीवर श्रीमंत होणे अशक्य आहे. शेती जर तोट्याचं साधन असेल तर शेती की जितकी मोठी तितका तोटा अधिक. शेती घेऊन लाखोंचा नफा मिळवणारे कुणी असतील तर ते अशी कोणती पिकं घेऊन तो मिळवतात त्याचा हिशेब तर सांगू द्यात? वीस वर्षांपूर्वी मी हे मांडायला सुरवात केली तेव्हा वि. म. दांडेकरांपासून सगळ्यांनी विरोध केला. पण आज या विषयावर काही वाद नाही राहिला. आता हिंदुस्थान सरकारने जागतिक व्यापार संघटनेकडे पाठविलेल्या आकडेवारीत कबूल केले आहे, की हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला बाजारपेठेत जितकी किंमत मिळाली असती, त्याच्यापेक्षा ७२ % कमी मिळावी अशी आमची व्यवस्था आहे. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्याला शेतकऱ्यांचा प्रश्न समजला असं सांगितलं, कुणी बिनधुराच्या चुली काढल्या, कुणी स्वच्छताकूप काढले, कुणी पाणी जिरण्यासाठी शोषखड्डे घेतले, कुणी म्हणाले सुबाभूळ लावा, कुणी म्हणाले संकरित गायी पाळा. यांना सगळ्यांना आमचा विनम्र प्रश्न आहे, की तुमच्या ग्रामोद्धाराच्या या ज्या काही योजना होत्या त्या योजनांमध्ये सरकारने जाणीवपूर्वक ठरविलेली ७२ % लूट भरून काढण्याचा काही मार्ग होता? तुमच्या लक्षात आलं नसेल तर तो काही अक्षम्य गुन्हा नाही; पण आता ते स्पष्ट झाल्यानंतर तुमच्या अहंकारापोटी तुमचंच म्हणणं चालू ठेवलं तर तुमच्या ग्रामीण जीवनाशी सांगितलेल्या निष्ठांबद्दल संशय तयार होतो.

 मी शेती चालू केली तेव्हा पहिल्यांदा बटाटे लावले. खूप तण झालं होतं, डोंगराच्या उताराचा भाग असल्यामुळे. तण काढायला माणसं लावायला पाहिजेत, नाहीतर बटाट्याचं पीक जाणार अशी परिस्थिती उभी राहिली. माणसं शोधायला गेलो तर गावातल्या लोकांनी सांगितलं, की आता तण काढायला कुणी मजूर मिळणार नाहीत; बाया नाहीत आणि पुरुषही नाहीत. का? तर म्हणे, आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि लोक मोठ्या संख्येनं पंढरपूरच्या वारीत चालले आहेत. मला मोठं आश्चर्य वाटलं. ज्या काळात शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्रचंड कामं असतात अशा वेळेला लाखो लोकांना उठवून पंढरपूरला घेऊन जाणारी ही भक्तिमार्गाची परंपरा टिकलीच कशी? केवळ विठोबाच्या दर्शनाकरिता ही मंडळी जातात हे काही मला पटेना; मग मी सरळ देहूला गेलो, यात्रेमध्ये सामील झालो आणि एक भयानक विदारक सत्य माझ्यासमोर आलं.

 आमच्या कोरडवाहू भागातील शेतकरी, बियाण्यासाठी कशीबशी बाजूला ठेवले ज्वारी शेतामध्ये कुंकून टाकली, की घरी खायलासुद्धा काही राहत नाही म्हणून वारीमधे जातो आणि वारीच्या पहिल्या दिवसापासून कुठं फुटाणे वाटताहेत, कुठं कुरमुरे वाटताहेत कुठं केळी वाटताहेत त्याच्या आशेवर पुढे पुढे जात राहतो. देहूपासून पंढरपूरपर्यंत जाणाऱ्या या यात्रेचा भक्तिसंप्रदायाशी काहीही संबंध नाही, कोरडवाहू भागातल्या उपाशी शेतकऱ्यांची पंढरपूरपर्यंतच्या रस्त्यावरील पाण्याची सोय असलेल्या भागातून जाणा

ती भीकदिंडी असते. हे साहित्याला का जाणवले नाही?

 चाकणच्या कांदा आंदोलनाच्या वेळी तेथे जे पोलिस इन्स्पेक्टर होते त्यांची पुढे पुणे स्टेशनला बदली झाली. तेथून ते एकदा मला भेटायला आले. त्यांनी मला सांगितले की पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर दररोज चारपाच तरी अल्पवयीन मुली, खेड्यापाड्यातून आलेल्या, सैरभैर अवस्थेत उतरतात. नंतर त्या दिसत नाहीत; पण तपास केल्यानंतर कळले, की शेतीवर राबणाऱ्या आईबापांच्या घरी धड पोट भरत नाही म्हणून घर सोडून काम शोधण्यासाठी आलेल्या या मुली असतात. त्यांच्या या प्रवासाचा शेवट कुंटणखान्यात होतो. घर सोडून आल्यानंतर कुंटणखान्यात जाईपर्यंत त्यांच्या मनाची काय अवस्था असेल? नंतर सबंध आयुष्य त्या मनाच्या कशा अवस्थेत कंठीत असतील? पुण्यामुंबईसारख्या शहरांतील हे वेश्यांचे पिंजरे शेतीमालाला भाव नसल्यामुळे दरिद्री होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनाचे, खेड्यातल्या परिस्थितीचे प्रतीक आहेत. त्याचं चित्र साहित्यात कुठेच उतरलेलं दिसत नाही.

 शेतकऱ्यांच्याबद्दल एक विचित्र गोष्ट लक्षात आली. बहुतेक शेतकऱ्यांच्या घरी एकाच भावाचा संसार धड होतो. दुसऱ्या भावाची बायको माहेरी तरी लावून देतात किंवा त्याची मुलं जगतच नाहीत. मला कळेना, सगळीकडे असं कसं होईल? मग, माझ्या असं लक्षात आलं, की जमिनीचे तुकडे फार पडू नयेत म्हणून शेतकऱ्यांच्या घरामध्ये एकाच भावाचा संसार साधारणपणे धड होतो. हे असं मुद्दाम घडवून आणतात का आणखी काही मार्गाने होतं हे तपासून पाहावे लागेल; पण, आकडेवारीने तपासले तर असे घडते हेच कळून येते. मला 'ग्रामीण' अनुभूतीमध्ये हे दिसत नाही.

 अजून एक गोष्ट माझ्या मनाला बरेच दिवस लागून राहिली आहे.

 शेतकरी आईबाप म्हातारे झाले की त्यांच्या लक्षात येतं, की आपल्या हातून काही काम होत नाही. पोराच्या संसाराला आपण ओझं झालो आहोत. ते म्हातारे आईबाप पोराला म्हणतात. "पोरा, आमचं आता वय झालं, सारा काही संसार पार पडला, तूही आता कर्तासवरता झाला, आता एकच इच्छा राहिली आहे; काशीला मरण यावं आणि देहाचं सोनं व्हावं. एवढी एक इच्छा पुरी करू द्या, नाही म्हणू नका." शेतकऱ्याघरचे म्हताराम्हातारी काशीला जायला निघतात. एखादं बोचकं आणि घेतले तर पाचपन्नास रुपये घेऊन. पोहोचली तर पोहोचली. काशीपंढरपूरसारख्या तीर्थस्थानी पोहोचलीच तर तिथे पुष्कळ धर्मात्मे 'पुण्याय पापक्षालनाय च' भोजनावळी घालत असतात. तिथं जितके दिवस जगता येईल तितके दिवस जगावं आणि काशीला मरण आलं तर सरणाचाही
खर्च येत नाही. कोणीही गंगेत लोटून दिलं, की गंगामाई वाहून नेते. सिंदबादच्या कहाण्यात एक वर्णन आहे- एका बेटावर हत्तींची अशी एक दरी असते. म्हातारे झालेले हत्ती तिथे जातात आणि मरतात. काशी हे हिंदू लोकांचे, विशेषत: शेतकऱ्यांचे धर्मभावनेने से ठेवण्याचं स्थान नाही; तर आपल्या पोराला आपला भार सोसत नाही म्हणून आईबापांनी करावयाच्या आत्मत्यागाची जागा आहे. हे विश्लेषण मी अनेक लोकांशी बोलून, चर्चा करून केले आहे. हे विश्लेषण मला साहित्यात कुठे सापडत नाही. माझ्यासारख्या बाहेरच्या माणसाला या गोष्टी समजतात, 'ग्रामीण' म्हणवणारे, सर्व गावाचं दुःख घालवण्याऐवजी गावागावामधले वाद; हे झोपडं, ती वस्ती, तो वाडा यांच्याच वर्तुळात गिरक्या घेत का बसतात? गावामध्ये वाडा आहे, वाडी आहे, वस्ती आहे आणि गावाचं रूप वाडा हेही खरं आहे, वस्ती हेही खरं आहे आणि वाडी हेही खरं आहे. या सगळ्यांच्या छटा ग्रामीण साहित्यात आल्या आहेत. आपण ग.ल. ठोकळांच्या कवितेची चेष्टा करतो. त्यांच्यासारखे इतरही अनेक कवी आहेत. गावावर जेव्हा ब्राह्मण, सावकार, जमीनदार, शिक्षक यांचा पगडा होता त्या वेळी जी काव्यरचना झाली, त्याचं प्रातिनिधिक स्वरूप 'ग.ल.ठोकळ' आहेत. 'अजुनि कसे येती ना परधन्या राजा' यांसारख्या ब्राह्मणी तोंडवळ्याची; पाण जानपद भाषेतील कविता त्या काळात तयार झाली. हा त्या ग्रामीण आविष्काराचा एक भाग आहे. त्यानंतर पाटील, माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी आली, ती कोणाचों प्रतिनिधित्व करतात? वाड्यांमधून सहकारी चळवळीत किंवा त्या संबंधात जी माणसं गेली आणि मोठी झाली त्यांचा गाव सांगणारे साहित्य ते तयार करतात. तेही गावच आहे; पण ते गावाचं एक वेगळं रूप दाखवतं. ग्रामीण साहित्य चळवळ म्हणून जी म्हटली जाते तिने मोठं काम केलं आहे. त्यातल्या प्रत्येकानं आपल्याआपल्या अनुभवातलं गाव चितारलं; ते अत्यंत प्रामाणिक चित्रण आहे; पण ते हत्तीचा पाय किंवा शेपूट सांगणारं आहे. याच्या पलीकडे वाडा, वाडी आणि वस्ती यांचं एकक सांगणारं ग्रामीण साहित्य का तयार होत नाही. मी असं म्हणत नाही, की गावातला सावकार अन्याय करतो तरी त्याच्याविरुद्ध बोलू नका. कोणी कोणाला अडचणीत आणीत असेल तर ते सांगितलं पाहिजे. पण, तेच तेच सांगायचं, गावातली झोपडी आणि विटांचं घर यांच्यातला संघर्ष वारंवार सांगायचा आणि गावातल्या झोपडी आणि विटांच्या घरातील दरिद्री, जीवनामागे मुंबईच्या चोवीस मजली इमारती आहेत, त्याच्याबद्दलमात्र एक अक्षर काढायचं नाही. असं दिसत नसेल तर 'जे न देखे रवि ते देखे कवी' ऐवजी सोयीसोयीने पाहणारा हा कवी आहे असा प्रकार होईल. आजकालचं शेतकरी साहित्य किंवा ग्रामीण

साहित्य म्हणजे जणू विनोदी विषय आहे. या साहित्यातील शेतकरी म्हणजे कुठे गण्याभामट्या किंवा पाटलाचा पोर- खांद्यावर बंदूक टाकून जुलूम करणारा नाही तर सोंगाड्या किंवा विदूषक किंवा थोडाफार अर्धवट. ग्रामीण साहित्यामध्ये जिवंत भाडामांसाचं चित्रण फार कमी होतं; Characterization(व्यक्तिचित्रण) कमी होतं, caricaturingच (विद्रूपीकरण) जास्त होतं. म्हणजे लेखक काही गुण मनात धरतो आणि एखादी व्यक्ती म्हणजे त्या गुणांचं मूर्तिमंत रूप असं धरून पहिल्या पानापासून तीनशे बावन्नाव्या पानापर्यंत त्या व्यक्तीची तीच गुणवत्ता कायम ठेवून मांडणी करतो.

 शेतकरी संघटनेमध्ये एकेका वेळी लाखांनी माणसं आंदोलनात उतरली; सभांना जमली, शहरामध्ये जाऊन पराभूत होऊन परतलेला, पायजमा घालणारा शेतकऱ्याचा मुलगा या संघटनेचा पाईक आहे. याच्या ऊर्मी काय? घरचे सर्व पैसे खर्च करून हा का धावतो आहे? मला प्रश्न पडतो, की या शेतकरी तरुणाचं चित्रण का झालं नाही? त्यापलीकडे, शेतकरी महिला आघाडीचं काम आहे. दोन लाख महिलांच्या नावावर जमिनी करून दिल्या. तुम्ही शेतकरी बायांना विचारलं तर त्या सांगतील, की 'चांदवडच्या महिला अधिवेशना'नंतर आम्हाला, पहिल्यांदा, माणूस म्हणून जगायला मिळालं; आधी आमची घरची माणसंसुद्धा आम्हाला माणसासारखं वागवत नव्हती. या महिलेचं चित्रण साहित्यामध्ये का नाही दिसत? तसंच आणखी एक पात्र आहे; महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये शिकलेली बी.ए., एम.ए. झालेली, थोडाफार पैसा हाती असलेली मुलं आली, एखाद्या आंदोलनामध्ये तडफेने चमकली आणि दुसऱ्या आंदोलनाच्या वेळी चमत्कार असा घडला, की ती राज्यकर्त्या पक्षात सामील झाली. आपल्या साहित्यात त्याचं प्रतिबिंब कुठंतरी पडायला काय हरकत आहे? सत्तर टक्के शेतकरी आहेत म्हणजे सत्तर टक्के साहित्य शेतकऱ्यांचंच असलं पाहिजे असा काही माझा आग्रह नाही. किंबहुना, ते तसं असूही शकणार नाही. कारण, साहित्य हा सौंदर्याच्या आविष्काराचा भाग आहे आणि सौंदर्याची व्याख्या,  क्षणेक्षणेऽयं नवतामुपैति । तदैव रूपम् रमणीयताय: ।। अशी आहे. सतत बदलत असतं तिथं सौंदर्याचा साक्षात्कार होतो आणि त्याच्या आविष्कारातून साहित्यकृती जन्माला येते. आपण आजूबाजूला वावरत असताना संदर्भाने महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात, त्याच नोंदल्या जातात. उदाहरणार्थ, एखादा रहदारीचा रस्ता ओलांडताना डावीउजवीकडून येणारी सगळी वाहने आपल्या नजरेसमोरून जातात, पण एकदा का रस्ता ओलांडला आणि कुणी विचारलं, की कशाकशा गाड्या होत्या तर काही सांगता येत नाही; रस्ता ओलांडत असताना एखादी गाडी करकचून ब्रेक लावून थांबली असेल तर तेवढंच लक्षात राहतं. तेव्हा, महत्त्वाच्या ज्या गोष्टी अनुभवाला येतात त्याच साहित्यात नोंदल्या जातात. त्यामुळे, शेतकरी जीवनात जितकं नवनवीन घडलं असेल तितकंच साहित्यात उतरेल हे मला माहीत आहे; पण महाराष्ट्राच्या ग्रामीण साहित्याचा वारसा सांगताना, गेल्या वीस वर्षांत महाराष्ट्रातील शेतकरी जीवनात जे घडलं ते पूर्णपणाने न येवो, पण त्याची छटाही ग्रामीण साहित्यात दिसत नाही, हे का? बीजिंग परिषदेच्या नावाने जगभरच्या महिला जमा झाल्या आणि त्यांनी काढलेल्या जाहीरनाम्यात म्हटको की बायांना स्वातंत्र्य नको, स्वातंत्र्य मिळालं तर बायांचं नुकसान होतं. महाराष्ट्रातल्या शेतकरी महिला एकमेव अशा, की शिक्षणात मागे पडो की आरोग्यात मागे पडो आम्ही स्वातंत्र्य हे मूल्य महत्त्वाचं मानतो. ज्या ज्या प्राण्याला जीव आहे तो स्वतंत्रतेवर जगतो. ही बाई ग्रामीण साहित्याला कशी दिसली नाही?

 मागे, मला दिल्लीच्या एका महाराष्ट्रीयन विद्वानानं सांगितलं, "हल्ली कोणीही उठतो आणि डंकेल प्रश्नावर बोलतो; कोणी काही वाचलेलं नसतं किंवा डंकेल प्रस्ताव पाहिलेला नसतो. डंकेल साहेब आहे, राक्षस आहे, तो तुमचं बियाणं काढून नेईल, गाईचा गोऱ्हा ओढून नेईल, - काय तोंडाला येईल ते सांगावं. फक्त सभागृहामध्ये कोणी लाल बिल्लेवाला बसला नाही ना पाहावं आणि वाट्टेल ते बोलावं !" शेतकरी संघटना ही आंदोलनापेक्षाही महाराष्ट्रातलं महाप्रचंड विद्यापीठ आहे याचं हे प्रमाणपत्र नाही काय? एक संपूर्ण वेगळा विचार संघटनेनं दिला. जे विद्वानांना समजत नाही ते अर्थशास्त्र शेतकऱ्याघरच्या अर्धशिक्षित/अशिक्षित पोराला समजू लागलं. याची आपल्या साहित्यात काही छटा उमटावी अशी आम्ही अपेक्षा ठेवली तर ती चूक होईल; पण माफी न करण्याइतकी चूक होईल?

 शेतकरी संघटनेचा मी अभिमान बाळगतो; पण ग्रामीण साहित्याला ती दिसली नाही. एका अर्थाने शेतकरी संघटनेचा पराभव झाला आहे आणि ग्रामीण साहित्याचीही चळवळ काही फार जोरात चालू नाही. एका तऱ्हेने आपण दोघेही हरतो आहोत आणि ज्या लोकांचा आपण कडवा विरोध केला ते लोक आता मोठ्या तेजाने तळपताहेत. वेगळ्या अर्थाने सांगायचे झाले तर, जोतिबा फुल्यांचा तिसऱ्यांदा पराभव झाला आहे. जोतिबांनी स्पष्टपणे मांडलं आहे- इंग्रज इथं कायमचा राहणार आहे असं नाही, इंग्रज एक दिवस जाणारच आहे; पण हजारो वर्षे आपण जातीजातींना दास्यात ठेवलं, इंग्रजांमुळे त्यांना विद्या मिळायची शक्यता पहिल्यांदा तयार झाली आहे, ती विद्या गावागावात

माणसामाणसापर्यंत पोहोचू द्या. मग, आपण इंग्रजांना काढून लावू या. वासुदेव बळवंत फडके रामोशांच्या मुलांची डोकी फिरवून इंग्रजांना विरोध करतो आहे असे जोतिबा फुल्यांनी स्पष्टपणे मांडले. 'जोपर्यंत राष्ट्र एक नाही 'एकमय लोक' या अर्थी राष्ट्र नाही तोपर्यंत 'न्याशनल काँग्रेस' कसली काढता?' असा परखड प्रश्न त्यांनी केला. लोकांना 'अविद्ये'चे अंकितच ठेवून स्वातंत्र्याची चळवळ केली आणि स्वातंत्र्य मिळालं, तर इथे पुन्हा पेशवाई अवतरेल हे सांगणारा महात्मा शंभर वर्षांपूर्वी होऊन गेला.

 जोतिबा फुल्यांचा पहिला पराभव राष्ट्रवाद्यांनी केला. ते म्हणाले, आपल्यातलं जातीयवादाचं प्रकरण आपण नंतर बघून घेऊत, लोकांना विद्या द्यायचं कामही नंतर करू; पण परदेशी संस्कृतीचा, परदेशी तंत्रज्ञानाचा वारा आमच्याकडच्या खालच्या जातीच्या लोकांना मिळता कामा नये; म्हणून त्यांनी ओरडा केला, 'राष्ट्र महत्त्वाचं आहे, स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे' आणि जोतिबा फुल्यांचा पहिला पराभव झाला.

 स्वातंत्र्य मिळालं. शेतकरी समाज सगळा स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकरी समाजाला वाटलं, की आतातरी शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य येईल, आतातरी विद्येचा प्रवाह आमच्यापर्यंत येईल. सरकारनं सांगितलं की विद्येचा प्रवाह तुमच्यापर्यंत आवश्य येईल पण तो खळाळत वाहणारा नसेल. आमच्या शिक्षणखात्याच्या डबक्यातून जेवढं पाणी तुमच्याकडे सुटेल तेवढंच घ्या; जगाशी तुमचा संबंध नाही. पहिल्यांदा जोतिबांचा पराभव झाला राष्ट्रवादाच्या नावानं; १९४७ मध्ये त्यांचा पुन्हा पराभव झाला आणि समाजवादाच्या नावाखाली देश स्वावलंबी बनविण्याच्या कल्पनेने पुन्हा एकदा स्वातंत्र्याचे दरवाजे बंद झाले.

 १९९१ मध्ये समाजवादाचे वाटोळे झाले आणि आता पुन्हा एकदा खुले वातावरण येईल, बाहेरच्या तंत्रज्ञानाशी लोहार, मिस्त्री, तांबट अशांसारख्यांचा संबंध येईल म्हटल्याबरोबर पुन्हा राष्ट्रवादी उठू लागले आहेत, स्वदेशीवाले उठू लागले आहेत. जोतिबांचा तिसऱ्यांदा पराभव होतो आहे.

 मी स्वत:ला जोतिबांची पताका घेऊन जाणारा समजतो. मी फार थोड्या लोकांना मानतो. जोतिबांना मानतो ते व्यक्तिपूजा म्हणून नाही. जोतिबांनी जे काही लिहिले आहे त्यातले सात-आठ टक्केच मला मान्य आहे; पण शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्यातील तुम्हाला सात-आठ टक्के पटावं ही काही लहानसहान बाब नाही.

 जोतिबांच्या विचारात मला सापडलेले काही महत्त्वाचे पैलू सांगतो. जोतिबा फुल्यांनी तीन सरहद्दी ओलांडायला सांगितल्या.

 पहिली गावामध्ये वाडा, वाडी, वस्ती हा भेद नको. आठ बैलांचा ज्याचा बारदाना आहे अशा शेतकऱ्याच्या घरची काय दुरवस्था आहे हे त्यांनी सविस्तरपणे सांगितलं; संघर्ष आहे तो शूद्र आणि भटशाहीतला आहे, वाडी-वस्तीतला नाही.

 दुसरी सरहद्द. हिंदु-मुसलमान वाद खोटा. 'महंमदाचे जवांमर्द शिष्य' जेव्हा हिंदुस्थानात आले तेव्हा कुणब्यांनी त्यांचं स्वागत केलं, हे त्यांनी रोखठोकपणे सांगितलं आजसुद्धा असं म्हणायची कोणी हिंमत करीत नाही.

 आणि तिसरी. इंग्रज आले तरीसुद्धा पाश्चिमात्य संस्कृतीचा फायदा आपल्याकडच्याः सर्व जातीजमातींना मिळाला पाहिजे.

 अशा तऱ्हेने गावातले अंतर्गत भेद बाजूला टाका, हिंदू-मुसलमान भेद बाजूला टाका राष्ट्र आणि परराष्ट्र असा भाव न ठेवता विद्येचा अवलंब करा असं सागणारा विशाल दृष्टीचा, खुल्या मतवादाचा पाईक जोतिबांच्या रूपाने आपल्यासमोर आला. शेतकरी संघटनेमध्ये आम्ही जोतिबा फुल्यांचंच काम चालवतो आहोत, हे मी सुरवातीपासूनच सांगत आलो आहे.

 जोतिबा फुल्यांचा पराभव झाला आणि मग काय झालं? जोतिबांच्या विचारातील काही भागाचं महत्त्व फार वाढवलं. उदाहरणार्थ जातिवाद. त्यापलीकडे, समाजवादाचं खूळ सगळीकडे पसरलं तेव्हा जोतिबा फुले आणि समाजवाद असं मिश्रण तयार केलं गेलं: त्यापढे जाऊन फुले, आंबेडकर, मार्क्स असं काहीही! जे जे चटपटीत असेल त्याची भेळ करा, इथे खपते ! फुले आणि मार्क्स यांच्यामध्ये काही मूलभूत फरक आहे, तो लक्षात न घेता फुल्यांच्या विचाराला मार्क्सवादाचं झापड लावून सामूहिक पुरुषार्थाच्या कल्पना त्यामध्ये टाकल्यामुळे फुले मागे पडले. शेतकरी संघटनेने महात्मा फुल्यांचा आत्मा जपला, व्यक्तिस्वातंत्र्याची निष्ठाही जपली आणि त्यांच्या सहा कार्यक्रमांपैकी 'शेतीमालाचा भाव' हा कार्यक्रम घेऊन पुढे मार्गक्रमण सुरू केलं. आता आम्हीही थकलो.

 आज आपण या ठिकाणी विचार करायला जमलो. तुम्ही साहित्यिकांनी 'साहित्य कामाठी' करावी अशी माझी मुळीच इच्छा नाही. कारण तुमच्या व्यक्तिस्वातंत्र्याची चिंता तुमच्यापेक्षाही मला जास्त आहे. तुम्हाला आतून ऊर्मी येऊन या प्रश्नावर काही लिहावंसं वाटलं तरच लिहा, नाही तर, खुद्द शरद जोशींनीसुद्धा कधी चुकून सांगितलं 'लिहा' तरी लिहू नका. तुम्हाला लिहायला लावायचंच असं ठरलं तर मी काय करीन? मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगेन, की प्रत्येक शेतकरी कुटुंबाने दरवर्षी निदान एक मराठी कादंबरी घ्यावी. तुम्हीच काय, गंगाधर गाडगीळ आणि व.पु. काळेसुद्धा ग्रामीण कथा

लिहायला लागतील. ग्रामीण भागामध्ये कादंबऱ्यांचा खप एक कोटीचा आहे असं झालं तर हे अशक्य नाही. तेव्हा, साहित्यिकांना ग्रामीण साहित्य लिहिण्यास उद्युक्त करायचे झाले तर त्यासाठी मी काही संमेलनांत आणि परिषदांत जाणार नाही.

 आपण जे जमलो आहोत ते त्याच्याहीपेक्षा जास्त महत्त्वाच्या प्रश्नांवर विचार करायला. शेतकरी आणि नागरी समाजांमध्ये ही अशा तऱ्हेची भिंत तयार का व्हावी?

 पहिलं कारण, शेतकरी हा वाचण्यात आणि लिहिण्यात, दोन्हींतही कच्चा आहे. म्हणजे, पुस्तक लिहिणं हे काही शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं साधन नाही. भजन, कीर्तनं, तमाशे, लावणी अशाच साधनांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येतं ही फार जुनी परंपरा आहे. 'लिहिणारा ब्राह्मण, गाणारा महार, नाचणारी महारीण' ही फार जुनी परंपरा आहे. त्यात, कुणबी किंवा शहाण्णव कुळीच्या मराठ्याने कविता लिहिल्या असं काही कुठं दिसत नाही. तात्पर्य असं, की शेती करणाऱ्या ज्या काही जाती आहेत त्यांचा लिखाणाशी काही संबंध नाही; भजनं करतील, कीर्तनं ऐकतील, वारीला जातील, संत वाङ्मय पाठ असेल हे सगळं खरं; पण हे श्रवणभक्तीनं आलेलं आहे, लिखाणावाचनाने नाही.\

 दुसरा मुद्दा. मराठीतील पुस्तकं सगळ्यात जास्त कोण वाचतो? मंबईतील लोकल गाडीत बसलेला मनुष्य तासभरच्या प्रवासात वाचतो. त्यामुळे, मराठीतील सर्वश्रेष्ठ, जास्तीत जास्त खप असणारे साहित्यकार आहेत ते रहस्यकथा किंवा पाणचट कथा लिहिणारे आहेत. शेतकरी वाचत नाही तर त्याच्या बाजूनं लिहिलेलं साहित्य प्रकाशक कसे काय प्रकाशित करणार? शेवटी व्यवहार आहेच. पुस्तकाची बाजारपेठ ही शहरी आहे. त्यानंतर, सगळ्यांना मान्य करावं लागेल की, बहुतेक साहित्यिक नोकरदार आहेत, त्यांतलेही बहुतेक प्राध्यापक आहेत. अर्थशास्त्रीसुद्धा जवळजवळ सगळे प्राध्यापक आहेत. आणि शेवटी शेतकऱ्याचा पोटचा मुलगा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर गेला, की तो बापाचीसुद्धा कीव करीत नाही. ज्याचं पोट शेतावर आहे तोच फक्त आपल्या शेतकरी बापाची काळजी करतो; दुसऱ्या व्यवसायात गेलेला कुणी करीत नाही. त्या नोकरदाराने आपल्या आईबापाचं दु:ख कितीही आठवून लिहिण्याचा प्रयत्न केला तरी त्यात प्रतिभा थोडीच उतरणार आहे? माओ त्से तुंगने म्हटलं की 'पर्मनंट रिव्होल्युशन' तरी ते अशक्य आहे. तुमची राहण्याची स्थिती सुधारली, घरात टेलिव्हिजन आला, दारापुढं गाडी आली, छानशी बायको आली, की क्रांती करू नये असं वाटतं! तेव्हा, माझी सर्व ऐहिक परिस्थिती बदलली, सुधारली तरीसुद्धा माझ्या विचारात फरक पडत नाही असं कोणी म्हणेल तर तरे खरं नाही. परिस्थिती बदलल्यानंतर मनुष्य बदलणारच.

 पुस्तकांना सरकारी आश्रय हीही एक महत्त्वाची गोष्ट बनली आहे. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नवनवीनता नाही; वर्षावर्षाला चक्र तेच आहे. मनुष्याच्या आयुष्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट हवा; पण या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीला काही किंमत पडत नाही कारण ती सदासर्वकाळ सहज उपलब्ध असते. जी वस्तू सहजी उपलब्ध होत नाही तिचा जितका तुटवडा तितकी तिची किंमत वाढते. बाळाचा जन्म होणे हे सगळ्यांत मौल्यवान उत्पादन, मोठा चमत्कारच असतो तो; पण,एवढा चमत्कार फार वेळा होतो म्हणून आपण तक्रार करतो आणि कुटुंबनियोजन करतो. एवढंच नव्हे तर एवढं महत्त्वाचं उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना काहीच महत्त्व नाही. ज्या कारणाने बाईच्या उत्पादनाला महत्त्व नाही त्याच कारणानं शेतकऱ्याच्या उत्पादनाला महत्त्व नाही. किंबहुना शेतकरी आणि बाई या दोघांची परिस्थिती सारखीच असते. शेतकरी हा देशाची 'बायको' आहे असं समजलं तर यामागचं सगळं कोडं समजेल. तुम्ही उत्पादन करता ते महत्त्वाचं आहे, पण त्यात जर नवनवीनता नसेल तर त्याला महत्त्व येण्याची शक्यता नाही आणि साहित्यिकांचं, कलाकारांचं काम नवनवीन असेल त्याचा उन्मेष दाखवणं आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे.

 सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ॲडम स्मिथचा मी भक्त आहे. १७ व्या शतकामध्ये इथे शिवाजी महाराज जेव्हा इतिहास घडवीत होते त्याच वेळी त्याचं — wealth of the Nation (राष्ट्राची संपत्ती)' सारखं पुस्तक लिहिलं गेलं, हे मला मोठं अदभुत वाटतं; पण ॲडम स्मिथनं आणखी एक पुस्तक लिहिलं, त्याची माहिती फार थोड्या लोकांना आहे. या पुस्तकाचं नाव आहे 'Theory of Moral Sentiment '. मनुष्याला स्वार्थाची भावना आहे का? जो तो स्वार्थाकरिताच धावतो काय?

 बाजारपेठेचं तत्त्वज्ञान सांगणारा ॲडम स्मिथ म्हणतो, 'नाही. मनुष्याला स्वार्थ ही जितकी उपजत प्रेरणा आहे तितकीच सहानुभूती आणि करुणेची नैसर्गिक प्रेरणा असते.' तुम्ही कुणाचं दु:ख पाहिलं तर कसं पाहता? तुम्हाला दुसऱ्याचं दु:ख पाहून दु:ख का होतं? कारण, आपल्या बुद्धीची रचनाच अशी असते, की अपण स्वत: त्या माणसाच्या जागी आहोत अशी कल्पना करतो. एखाद्या माणसाला जखम झालेली पाहिली, की आपल्याला अशी जखम झाली तर काय होईल या कल्पनेत आपण जातो. म्हणून तर डॉक्टर टाके घालीत असताना ते पाहणारे चक्कर येऊन पडतात. मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मुद्दामहून सांगतात, की टाके घालताना आपण माणसाच्या शरीराला टाके घालत नसून एखाद्या ज्वारीच्या पोत्याला टाके घालतो आहोत अशी कल्पना करा. दुसऱ्याविषयी करुणा असणं, सहानुभूती असणं ही माणसाची उपजत प्रेरणा आहे. आपण हळूहळू हुशारीहुशारीनं आपल्या करुणेवर पांघरूण घालात आलो. 'मदर तेरेसा' वेगळी. रस्त्यावर कितीही मरणारे दिसले तर ते उचलून घेऊन जातात. आपण दररोजच्या कामातली माणसं. आपण काय करतो? आपण विचार करतो, एकदा थांबलो होतो; आता थांबलो तर उशीर होईल. साहेब रागावेल आणि म्हणून तिथून पुढे निघतो. मग आपण मनाला शिकवतो, मनामध्ये उत्पन्न होणारी करुणेची भावना झाकून टाकायला शिकवतो.

 हिंदु-मुसलमान दंगा झाला तर हिंदू मेला का मुसलमान मेला, बलात्कार झालेली बहीण हिंदू होती का मुसलमान याने काय फरक पडतो? पण कोणी सांगितलं, "दंगा झाला" की आपण विचारतो "किती मेले आज?", सांगणारा सांगतो, "बावन्न." मग आपण विचारतो, "त्यांचे किती? आणि आपले किती?" जणू काही क्रिकेटचा स्कोअर आहे. कारण, आपल्या संस्कृतीने आपल्याला जे आपल्या धर्माचे नाहीत त्यांच्याविषयी करुणा बाळगायची नाही अशी मन बधिर करायची कला शिकवली आहे. पाकिस्तानातही हिंदुस्थानच्या लोकांविषयी बधिरता तयार झाली आहे. नागरी समाज आणि शेतकरी यांच्यामध्ये अशी बधिरता आणण्याचा कार्यक्रम चाललेला असतो आणि माझ्या मते, ग्रामीण साहित्य प्रभावशाली न होण्याचं सर्वांत मोठं कारण हे आहे. नगरे आणि खेडी यांच्यातला संघर्ष फार जुना आहे. मार्क्सने त्याबद्दल लिहिलं आहे, गांधीजींनीही लिहिलं आह; पण आज फ्रान्समध्ये, जपानमध्ये, अमेरिकेमध्ये शेतकरी विरुद्ध नागरी किंवा शेतकरी विरुद्ध बिगरशेतकरी हा संघर्ष संपलेला दिसतो. त्याचं कारण, आज या सगळ्या सुधारलेल्या देशांमध्ये शेती तोट्याची नाही, इतकेच नव्हे तर शेतीला सबसिडी दिली जाते- जपानमध्ये ८० %, युरोपमध्ये ६० %, अमेरिकमेध्ये ३५ %- लोकांनी शेतकरी राहावं म्हणून. गाव विरुद्ध शहर हा वाद या सगळ्या देशांमध्ये मिटला. हिंदुस्थानात अजूनही शेतीला उणे बहात्तर टक्के सबसिडी का आहे?

 सगळ्या जगामध्ये शेती आणि बिगरशेती यांच्यामध्ये दोन फरक आहेत. एक म्हणजे शेतीच्या कामाचं स्वरूप वेगळं आहे, शेतीची शैलीच वेगळी आहे आणि दुसरा, शेतीचा भूगोल वेगळा आहे. शेतकरी सगळे खेडेगावांत असतात आणि नागरी संस्कृतीचे लोक, मग ते वेशीच्या आतले असोत बाहेरचे असोत, ते वेगळे असतात.

 हिंदुस्थानात, दुर्दैवाने, आणखी एक तिसरा फार मोठा फरक आहे. तो फरक आहे जातीचा. शेती करणारांची जात वेगळी आहे आणि त्यामुळे शेतकरी समाजाविषयी शहरातील बहुतेक लोकांनी आपली मनं बधिर करून घेतलेली आहेत. मी जेव्हा शेतकरी

संघटनेचं काम सुरू केलं तेव्हा माझ्या कुटुंबातील सर्वांनी, मी कामातून गेलो असंच म्हटलं. माझ्या बायकोनं तिच्या बहिणीला मी काय करतो आहे, कसं चांगलं काम करतो आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती बहीण म्हणाली, "हे शेतकरी दुःखी कष्टी वगैरे असतात हे काही खरं नाही. त्या लोकांना असं जगायची सवयच असते." 'आम्हाला ताट वाढून आलं नाही तर मोठं दु:ख होतं आणि त्यांना भाकरी मिळाली नाही तरी त्यांना दु:ख होत नाही कारण त्यांना उपासमारीची सवय असते.' ही भावना नागरी संस्कृतीची आहे.

 आणि थोडं तथ्यही असावं त्यात ! भाकरी नाही मिळाली, कर्ज नाही मिळालं तर शेतकरी लोक आत्महत्या करतात आणि ज्यांना संध्याकाळची व्हिस्की मिळाली नाही, त्यांनी राज्यक्रांत्या केल्या, सरकारं उलथवून टाकली; मग आता कोणती गरज मोठी म्हणायची ? शेतकऱ्यांच्या जीवनात हे असं चालायचंच, त्यांनी धान्य काढायचंच असतं, ते आपल्याला पुरवायचंच असतं, त्याचा विचार अधिक करू नये, केला तर क्लेशदायकच असतो असा विचार करून म्हणा किंवा काही म्हणा, शेतकऱ्यांविषयी नागरी समाजानं आपली मनं बधिर करून घेतली आहेत; मग त्या समाजातलं ते कलाक्षेत्र असो, नाट्य असो, काव्य असो, सगीत असो का साहित्य असो. नागरी समाजाच्या. ग्रामीण जनतेबद्दलच्या करुणेच्या सहभावनेच्या इंद्रियाला आलेली बधिरता दूर होणे, ही सगळ्यात महत्त्वाची आवश्यकता आहे.

 ही बधिरता जर आपल्याला दूर करता आली तर ग्रामीण साहित्य हे प्रभावशाली होऊ शकतं. ते करण्याचा एकमेव मार्ग आहे- बापाकडून जर का त्यांना बऱ्यापैकी जमीन मिळणार असेल तर महाराष्ट्रातल्या देशमुखांघरची पोरं बापासमोर बसत नाहीत; पण जर का बापाकडनं काहीच मिळण्यासारखं नसेल तर ती बापाला विचारतसुद्धा नाहीत. शरयू दप्तरींनी एका ठिकाणी म्हटले आहे, "आपली सारी संस्कृती शेतकऱ्याला गरजू ठेवण्यामुळे टिकून आहे." ज्या दिवशी शेतकरी म्हणू शकेल, की आमचं पीक व्यवस्थित आलं, पोती नीट भरली, कणगीला लावून ठेवली, जेव्हा चांगला बाजार येईल तेव्हा बघू. त्या दिवशी शेतकरी हा गरजू जनावर नाही, तो माणूस आहे अशी जाणीव तयार होईल आणि त्यादिवशी सहभावनेचे झरे पुन्हा वाहू लागतील.


 (शेतकरी संघटक, ३ ऑगस्ट १९९८- इस्लामपूर येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात शरद जोशी यांनी केलेले भाषण.)

■ ■