शून्य कचरा

विकिस्रोत कडून
वापरा
आपणच निर्माण करत असलेल्या सर्व प्रकारच्या जैविक कचऱ्याचे घरच्या घरी खतात रूपांतर करणारे इच्छाशक्तीच्या उर्जेवर चालणारे


शून्य कचरा
मराठी भाषा :
पहिली आवृत्ती :चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा)शक १९२८,३०-०३-२००६
तेरावी आवृत्ती :श्रावण शुद्ध प्रतिपदा, शके १९४०, १ ऑगस्ट २०१८
हिंदी भाषा :
पहिली आवृत्ती : भाद्रपद शुद्ध चतुर्थी (अंगारक चतुर्थी) शक १९३४, १६ ऑगस्ट २०१२
गुजराती भाषा :
पहिली आवृत्ती : मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा शक १९३३, २६ नोव्हेंबर २०११
इंग्लिश भाषा :
प्रथम आवृत्ती : ०१-०१-२०१६

लेखनाचे सर्वाधिकार : श्री. कौस्तुभ ताम्हनकर
प्रकाशनाधिकार : कौस्तुभ ताम्हनकर
१०३ - धैर्य सोसायटी, स्वामी विवेकानंद मार्ग, नौपाडा, ठाणे - ४०० ६०२. दूरध्वनी : २५४२ ४३९४, भ्रमणध्वनी : ९८१९७४५३९३
kdtamhankar@gmail.com
अक्षरजुळणी : अक्षय फोटोटाइपसेटर्स, चित्रकूट सहनिवास,डॉ. आंबेडकर मार्ग, ठाणे (प) संपर्क : ९९ ८७ ०५ १५ २९
मुद्रक : राजमुद्रा प्रिंटर्स
ए १८ - अमरग्यान औद्योगिक वसाहत, लाल बहादूर शास्त्री मार्ग,
ठाणे (पश्चिम) - ४०० ६०१.

किंमत : 'आपल्याला योग्य वाटेल ती'

किंमत कृपया खालील खात्यात जमा करावी.

१) बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे, नौपाडा शाखा - खाते क्र. २००५८७१५९५६ IFSC CODE : MAHB 0000110
२) आय.सी.आय.सी.आय. बँक, ठाणे, वीर सावरकर मार्ग, पाचपाखाडी शाखा खाते क्र. ००३५०१०५८८११/ICIC 0000035



मनोगत

शून्य कचरा - अंतिम स्वच्छता - म्हणजेच वापरलेल्या वस्तूंचे किंवा नकोशा वस्तूंचे योग्य व्यवस्थापन. मी करत असलेले हे व्यवस्थापन बघायला अथवा त्याबद्दल चौकशी करायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी माझे हे लिखाण देत होतो, लोक ते उत्सुकतेने वाचत होते. काही थोडे लोक मी लिहिल्याप्रमाणे आचरणही सुरू करत होते. असे हस्ते-परहस्ते पोहचत-पोहचत काही मासिकांतून आणि वर्तमानपत्रांतून माझे हे लेख प्रसिद्ध झाले.
 दर खेपेला झेरॉक्स काढायचा त्रास होऊ लागला. शिवाय ते खर्चीकही होऊ लागलं. म्हणून एकदाच या सगळ्याची छपाई करावी आणि आपल्या नावावर एक पुस्तक रुजू करून घ्यावे ह्या द्वयर्थी उद्देशानी मी पुस्तकाच्या वाटेला लागलो.
 हे पुस्तक वाचून जे कोणी त्याप्रमाणे वागू लागतील त्यांनी एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवावी की; हे एक व्रत आहे, ते नेटाने पाळले, तर आपल्या वृत्ती बदलतात. स्वच्छता हा आपला गुणधर्म बनून जातो. प्रथम तुम्ही वागायला सुरुवात करा. तुमच्या घरातील लोक तुमचे बघून तुम्हाला साथ द्यायला लागतील.
 आमच्या घरातसुद्धा सौ. शरयू ताम्हनकरांना स्वच्छतेची अतिशय आवड आहे आणि तिच्या स्वच्छतेला आम्ही सर्व नेहमीच दाद देतो. तिला मदत करताकरताच ‘शून्य कचरा' ह्या संकल्पनेचा जन्म झाला आहे.
 ह्या पुस्तकाची किंमत काय ठेवावी हा मोठा गहन प्रश्न माझ्यासमोर होता. या पुस्तकाचा जर वापर झाला नाही, तर या कागदांचे मूल्य कच-यासारखे; पण जर वापर झाला, तर मूल्य हे अमूल्यच आहे. तेव्हा किमतीसमोर मी आपल्याला योग्य वाटेल ती अशी अक्षरी किंमत लिहिली आहे. ज्याला जेवढी वाटेल, तेवढी त्याने ती द्यावी. येणाऱ्या पैशांचा विनियोग ह्या पुस्तकाच्या प्रती काढून त्या वाटण्यातच केला जाईल एवढी हमी मी देतो.
 हे माझे पहिलेच पुस्तक कोणाला अर्पण करावे हाही एक प्रश्नच होता. ज्याला अर्पण करीन तो म्हणेल, “कसले हे कचऱ्याचे पुस्तक मला अर्पण केलेत!" त्यामुळे, ज्यांना कचरा आवडतो,अशाच व्यक्तींना, म्हणजेच 'वस्तू वापरून झाल्यावर तिला वाट्टेल तशी टाकून देणाऱ्या सर्व माणसांना' मी हे पुस्तक अर्पण करत आहे.
 हे पुस्तक तयार करताना माझे मित्र श्री. अरुण फडके यांनी शुद्धलेखनाच्या नजरेतून ते स्वच्छ केले. ह्या पुस्तकावर काम करताना त्यांनी दाखवलेली आत्मीयता आणि रस हा पुन्हापुन्हा वापरण्यासाठी मी जपून ठेवला आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानण्याचा औपचारिकपणा मी करणार नाही. श्री. विकास फडके ह्यांनी ह्या कचऱ्याच्या पुस्तकाला सुंदर मुखपृष्ठ बनवून दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. राजमुद्रा प्रिंटर्सच्या राजेंद्र फडक्यांनी ज्या तत्परतेने हे पुस्तक छापून दिले त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे.

--कौस्तुभ ताम्हनकर

*
सप्रेम नमस्कार,

 ‘शून्य कचरा' ही फक्त कल्पनाच असू शकते असे सर्वांप्रमाणे मलाही वाटायचे. पण थोडासा विचार अन् त्याप्रमाणे आचरण केल्यास अशक्य कोटीतील ही कल्पना सहज शक्य होते, हे मी अनुभवले आहे. यासाठी लागतात रोजची फक्त १० ते १५ मिनिटे. हा एक शोधच मला लागला आणि त्याप्रमाणे मी वागू लागलो. माझ्या दारावर मी पुढीलप्रमाणे एक पाटी लावली

'येथे कचरा तयार होत नाही'

 गेली अकरा वर्षे आम्ही आमच्या घरातून कचरा बाहेर देत नाही. हे कसे घडले, हे तुम्हांला सांगावेसे वाटते म्हणून हा खटाटोप. सोबत मी तुम्हांला पुढीलप्रमाणे माझे बारा लेख देत आहे.

१) कच-याचा खरा प्रश्न आणि त्याचे उत्तर .................. ०५-०९
२) वाव : वापरलेल्या वस्तूंचे व्यवस्थापन .................... १०-१४
३) शून्य कचरा : मला लागलेला शोध ...................... १५-१९
४) येथे कचरा तयार होत नाही ............................ २०-२३
५) वापरा आणि वापरत राहा...जरा विचार तर करा............. २४-२७
६) दर्जेदार कचरा...दाखवाल का निर्माण करून ?.............. २८-३१
७) शून्य कचरा :प्रत्यक्ष कृती ............................. ३२-३७
८) एक अशक्य गुणोत्तर ................................ ३८
९) कचरा निर्मूलन-एक युद्ध .............................. ३९-४२
१०) पापी प्लॅस्टिक .................................... ४३-४५
११) सोसायटीसाठी अविरतपात्र.................. .......... ४६-४८
१२) निर्माल्य- एक प्रसाद ................................ ४९-५१
१३) थोडक्यात ........................................ ५२
१४) सिंहावलोकन ...................................... ५३-५६

 सोबत माझ्या घरावर लावलेली पाटीही मी तुम्हांस देत आहे. अशी पाटी दारावर लावणारी घरे वाढोत एवढीच माफक इच्छा.
 कृपया हे लिखाण कपाटात बंद न करता अथवा रद्दीत न टाकता,आपल्या मित्रांना वाचायला द्या.

आपला,

कौस्तुभ ताम्हनकर

 आम्ही ‘शून्य कचरा' ही संकल्पना गेली चौदा वर्षं अंगीकारली असून आमच्या घरातून कचरा म्हणून कोणतीही वस्तू बाहेर फेकली जात नाही. कचऱ्याला आम्ही कचरा न म्हणता त्यांना वापरलेल्या वस्तू म्हणजेच ‘वाव' म्हणतो. “आम्ही कचरा तयार करणारी माणसं नाही" असं अभिमानानं म्हणतो. आमच्या घराच्या दारावर येथे कचरा तयार होत नाही अशी पाटी लावलेली आहे. कारण ही पाटी म्हणजे आमच्या वागण्याची जाहिरात आहे. शून्य कचरा ही संकल्पना आचरणात आणायला फार पैसा आणि खूप वेळ लागतो हा समज पूर्णपणे खोटा आहे आणि आम्ही आचरणात आणत आहोत तेच कच-याच्या प्रश्नाचे एकमेव आणि १00 टक्के उत्तर आहे. “शून्य कचरा' ही संकल्पना प्रत्येक नागरिकानं आचरणात आणावी म्हणून मी संधी मिळेल तेव्हा आणि त्या ठिकाणी या संकल्पनेचा प्रचार करतो. लोकांना सांगत असतो. ह्या प्रवासात मला आलेले दोन अनुभव हे आपल्या समाजाचं बोलकं चित्र आहे.

 पहिला अनुभव : मी माझ्या मित्राच्या दुकानात शून्य कचऱ्याविषयी बोलताना तेथे त्या संकुलाचा सफाई कामगार उभा होता. मी कचऱ्याविषयी काहीतरी बोलतो आहे हे ऐकून तो ते लक्षपूर्वक ऐकत उभा होता. कारण तो त्याच्या जिव्हाळ्याचा विषय होता.दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राचा मला फोन आला. तो फोनवर म्हणला, "ताम्हनकर कालचे तुझे सांगणे ऐकून आमचा सफाई कामगार कचऱ्याचा खरा प्रश्न आणि त्याचे उत्तर * ५काय म्हणाला माहीत आहे? तो म्हणाला, हे साहेब तर आमच्या पोटावर पाय आणताहेत! हे सांगतात त्याप्रमाणे जर का सगळे वागू लागले तर आम्हांला काम काय उरणार ? आमचे खायचे वांदे होणार."
 दुसरा अनुभव : आम्ही मित्र बरेच दिवसांनी एकत्र जमलो होतो. फार वर्षांनी सगळे भेटत होतो त्यामुळे प्रत्येकाकडे काहीतरी सांगण्यासारखं होतं. मीदेखील माझी शून्य कचऱ्याची संकल्पना सर्वांना सांगितली ह्या संकल्पनेचा मी प्रचार करतो. ते आता माझं मिशन आहे, हे ऐकून माझा एक प्रतिथयशी उच्चविद्याविभूषित आणि पैशाने गब्बर असलेला मित्र लगेच म्हणला,“अरे असं वागलं तर सफाई कामगार मरतील. ज्यांना दुसरं काही येत नाही, तेच लोक ही कामं करतात!"
 दोन्ही अनुभवांवरून आणि दोघांच्याही वक्तव्यावरून असा निष्कर्ष निघतो की,
 १) सफाई कामगाराला हे काम घाण आहे. कचऱ्यात काम करण्यामुळे त्याच्या आयुष्याची बरबादी होत आहे. कचऱ्यात काम केल्यामुळे आपल्याला व्यसन लागते आणि रोग होतात, याची त्या सफाई कामगाराला जाणीवच नाही. २) उच्च विद्याविभूषित पैसेवाल्या सुशिक्षित भारतीय नागरिकाला, आपला एक बंधू चुकीचे काम करतो आहे, त्याला ते घाणीतील काम करायला लावण्यामागे मी स्वत: कारणीभूत आहे, मलिदा मी खातो आणि सफाई कामगाराला कचऱ्यात काम करावं लागतं, याची जाणीवच नाही. समाजातील श्रीमंत वर्गानं कचरा तयार करायचा आणि ज्याला कमी बुद्धी आहे अशा वर्गानं त्याचं व्यवस्थापन करायचं, हा एक सामाजिक अन्याय आपण करत आहोत याची या वर्गाला पुसटशीसुद्धा कल्पना नाही.
 या दोन अनुभवांवरून जर कचऱ्याचा प्रश्न मुळापासून सोडवायचा असेल, तर सफाई कामगारांनी स्पष्टपणे सांगायला हवे की, तुम्ही नागरिकांनी केलेली घाण आम्ही उचलणार नाही. आमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही वर्गीकरण करून स्वच्छ करून दिलेला कचरा, नव्हे तर वापरलेल्या वस्तूच आम्ही उचलू.
 नागरिकांनी ‘शून्य कचरा' ही संकल्पना आचरणात आणायला हवी. शून्य कचरा ही संकल्पना आचरणात आणण्यात पहिली अडचण आहे वर्गीकरणाच्या प्रशिक्षणाची. आज सतत सांगितलं जातं की, ओला कचरा आणि सुका कचरा असं वर्गीकरण करा. पण प्रत्यक्ष वर्गीकरणाचे शास्त्रोक्त वर्ग घेतले जात नाहीत. कचऱ्याचे वर्गीकरण कसं करायचं हे शिकवायला हवं. शिकवायचं असेल तर कचऱ्याचा अभ्यास करण्यासाठी प्रथम कचरा कुंडीत उतरायला हवं. घरातून तयार होणाऱ्या कचऱ्याकडे जरा लक्षपूर्वक बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की फक्त दहा प्रकारचा कचरा आपल्या घरातून निघतो.
१) निसर्गनिर्मित- बायोडिग्रेडेबल २) कागद ३) काच ४) नारळाच्या करवंट्या ५) चिनी मातीची भांडी ६) जाड प्लॅस्टिक ७) हाडं ८) पातळ प्लॅस्टिक ९) सॅनिटरी नॅपकिन्स १०) E-Waste आता या प्रत्येक कचऱ्याकडे आपण जरा अभ्यासू नजरेनं बघू या.
 १) निसर्गनिर्मित - बायोडिग्रेडेबल कचरा : खरंतर या कचऱ्याचा प्रश्न तेवढा गंभीर नाही कारण तुम्ही करा अथवा करू नका, निसर्ग या सर्व गोष्टींचे मातीत रूपांतर करतच असतो. तो तुमच्यासाठी थांबत नाही. मग आपण या कचऱ्याच्या व्यवस्थापनात का लक्ष घालायचं असा प्रश्न सहाजिकच मनात येईल. याचं कारण असं आहे की तुमचा परिसर तुम्हांला स्वच्छ ठेवायचा आहे. शिवाय या कचऱ्यापासून आपल्याला गॅस मिळू शकतो, खत मिळू शकतं. लगेच पुढचा प्रश्न आपल्या मनात येईल की, मग या कचऱ्यासाठी उभारलेला एकही गॅस प्रकल्प किंवा खत कारखाने चालू स्थितीत का नाही? याचं एकमेव कारण आहे आपण अनेक ठिकाणचा कचरा एकत्र करतो. त्याच्या वाहतुकीवर अतोनात पैसे खर्च करावे लागतात. हे पैसे वरील गॅस प्रकल्प किंवा खत कारखाने ह्यांना परवडत नाहीत. आर्थिक गणित कोलमडतं आणि हे प्रकल्प बंद होतात. वाहतुकीचा खर्च जर नाहीसा करायचा असेल, तर जिथं हा कचरा तयार होतो तिथंच या कचऱ्याचं रूपांतर खतात करायला हवं. हे सहज करता येतं. यासाठी मी अविरतपात्र नावाचं संयंत्र बनवलं आहे. त्याच्या साहाय्याने तुम्ही घरच्या घरी सर्व निसर्गनिर्मित (बायोडिग्रेडेबल) वस्तूचं रूपांतर खतात करू शकता.
२) कागद : कागद वापरून झाला की आपण तो कसा टाकतो याचा अभ्यास केल्यास कागदाचा प्रश्न सुटतो. कागद वापरून झाला की आपण त्या कागदाचा बोळा करतो आणि तो कचऱ्याच्या बादलीत टाकतो. कागदाचा बोळा करणं आणि कागद फाडणं या दोन क्रिया आपण का करतो? या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘उगाचंच!' आणि कचऱ्याची बादली आहे म्हणून त्यात तो कागद टाकला जातो. म्हणजे कागदाचा कचरा शून्य करायचा असेल तर कागदाचा बोळा करायची किंवा तो फाडून बारीक करायची सवय प्रथम बंद करायला हवी. ती सवय बंद करायची असेल तर घरातील कचऱ्याच्या सर्व बादल्या काढून टाकायला हव्यात. कचऱ्याची बादलीच नाही मग बोळा केलेला कागद टाकणार कुठे? फाडलेले कागद टाकणार कुठे? अशी परिस्थिती निर्माण झाली की कागदाला कागदाच्याच स्वरूपात ठेवावं लागेल आणि असा कागद ठेवण्यासाठी प्रत्येक घरात एक जागा असतेच ती म्हणजे रद्दीचा खण. वर्तमानपत्राची रद्दी तुम्ही विकताच तिच्याबरोबर हे कागतही रद्दीच्या घरी आपोआप जातील आणि घरातील कागदाचा कचरा शून्य होईल. चार पैसे मिळतील.
३) काच : प्रत्येक घरात काच असतेच आणि ती फुटतेच. काच फुटली की करायचं काय असा प्रश्न पडतो. फुटलेली काच घरातील लोकांच्या हाता-पायाला लागू नये, म्हणून जाणीवपूर्वक उचलली जाते. ती कागदात गुंडाळून आपण कचऱ्याच्या बादलीत टाकतो. दुसऱ्या दिवशी ही कचऱ्याची बादली सोसायटीच्या मोठ्या कचऱ्याच्या बादलीत रिकामी होते. तो कचरा जो माणूस हातळतो त्याला काच हाताला लागून जखम होण्याची शक्यता असते. काचेचं सध्या होत असलेलं व्यवस्थापन योग्य नाही. मग काय करायला हवं? कागद जसा रद्दीतून कागदाच्या कारखान्यापर्यंत पोहोचवला जातो, तशीच आपल्या घरातील नको असलेली काच, तसेच सर्व प्रकारच्या फुटलेल्या काचासुद्धा काच कारखान्यांना भट्टीतील पहिला चार्ज म्हणून हव्या असतात. आपल्याकडील फुटलेली काच जर आपण आपल्या रद्दीवाल्यापर्यंत नेऊन दिली तर तो ती काच घेतो. मात्र आपल्याला त्याचे पैसे मिळणार नाहीत. ठरावीक कालावधीनंतर जमा झालेल्या काचा घेऊन जाण्यासाठी रद्दीवाल्याकडे एक वाहन येतं, आणि सर्व काचा घेऊन जातं. अशा रितीने काचेचा कचरा शून्य झाला. आपलं काम आहे, गावातील असा रद्दीवाला शोधायचा जो सर्व प्रकारच्या काचा घेतो आणि काचा त्याच्यापर्यंत पोचवायच्या.
४) जाड प्लॅस्टिक : प्लॅस्टिकशिवाय आपण जगूच शकत नाही. आपल्या घरात अनंत प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वस्तू येत असतात. वापरून झाल्या की त्या आपण सहज टाकून देतो. पण आता आपल्या घरात त्या टाकण्यासाठी कचऱ्याची बादलीच नाही. मग या वापरून झालेल्या, मोडलेल्या, नको असलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू कुठेतरी ठेवायला हव्यात, त्यासाठी एक साधा उपाय आहे. घरात एक मोठी पिशवी अडकवून ठेवा आणि त्या पिशवीत टाकण्यासाठी तयार झालेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू ठेवायला सुरुवात करा. हळूहळू ही पिशवी भरेल. भरली की ती पिशवी रद्दीवाला किंवा भंगारवाल्याला द्या. अशा वस्तूंचे पैसे तो नक्की देतो. या सर्व वस्तू रीमोल्डींगसाठी वापरल्या जातात. पैसे मिळाले आणि सर्व जाड प्लॅस्टिक योग्य ठिकाणी पोहोचले. जाड प्लॅस्टिकचा कचरा शून्य झाला.
५) चिनी मातीची भांडी : ह्या प्रकारात बहुतकरून कप-बश्या, फरश्या (टाईल्स), मग, बरण्या ही मंडळी येतात. काचेप्रमाणे या गोष्टी फुटतात. त्यांच्या नावातच या प्रकारच्या वस्तूंचे व्यवस्थापन कसे करायचे हे लगेच लक्षात येईल. या सर्व वस्तू म्हणजे तापवलेली माती. सध्या अनेक इमारती तयार होत आहेत. त्यांना भरावासाठी दगड-माती असे पदार्थ लागतातच. फुटलेल्या कपबशीला ह्या दगड-मातीच्या ढिगाऱ्यापर्यंत पोचवणं हे आपलं काम आहे. ज्या कपबशीनं तुम्हांला चहा पाजला तिला तिच्या माहेरी पोहचवले तर त्यांचा कचरा होणार नाही.
६) नारळाच्या करवंट्या : ह्या जरी जैविक असल्या तरी त्यांच्या विघटनाला बराच कालावधी लागतो. या इंधन म्हणून म्हणजेच जाळण्यासाठी वापरणे अति उत्तम. अजूनही आपल्या नशिबानं या करवंट्या जाळून पाणी तापवणारी माणसं आपल्या आजूबाजूला राहत आहेत. त्यांना या करवंट्या द्याव्यात.
७) हाडं : सामीष आहारात हाडांचा कचरा तयार होतो. लहान हाडं ही अविरतपात्रात खतात रूपांतरीत होतील. मोठी हाडं म्हणजे कॅल्शियम म्हणजे दगड. या हाडांना चिनीमातीच्या भांड्याप्रमाणेच दगड-मातीच्या ढिगा-यात टाकावे.
८) पातळ प्लॅस्टिक : पातळ प्लॅस्टिक हा खरंतर फार भयावह आणि कोणाकडेच उत्तर नसलेला असा प्रकार आहे. हे पातळ प्लॅस्टिक तयारच करू नये असं म्हणणं जरी बारोबर असलं, तरी ते शक्य नाही. काही मंडळींनी या प्लॅस्टिकपासून तेल निर्मितीचे प्रयोग केले आहेत. पण अजून तरी ते पूर्णपणे व्यापारी तत्त्वावर यशस्वी झालेले नाहीत. या तेल काढण्यातसुद्धा वाहतुकीचा खर्च हीच एक मोठी अडचण आहे. मी माझ्या परीनं या प्लॅस्टिकचा उपयोग करून त्याच्यापासून निर्माण होणारा कचरा शून्य केला आहे. मी या पातळ प्लॅस्टिकपासून ५'x ९' आकाराच्या छोट्याछोट्या अशा वेष्टण पिशव्या (Packing Pouch) बनवतो आणि त्या आमच्या कारखान्यात पॅकिंगसाठी वापरतो. आमच्या अजूबाजूला राहणारे जे नागरिक जागरूक आहेत ते मला त्यांच्याकडील पातळ प्लॅस्टिक आणून देतात. रस्त्यावर उनाड मुलाप्रमाणे पसरलेल्या पातळ प्लॅस्टिकला कामाला लावल्यामुळे त्याचा उपद्रव थांबला आहे. ज्यांच्याकडे कारखाना नाही ती मंडळी त्यांच्या घरात तयार होणाच्या पातळ, मऊ, बाजारात किंमत नसलेल्या प्लॅस्टिकपासून अशा गाद्या, सॉफ्ट टॉइज बनवू शकतात. कमीत कमी ह्या प्रकारचे प्लॅस्टिक रस्त्यावर न टाकता घरात साठवू शकतात. ह्या प्रकारचे प्लॅस्टिक साठवण्यासाठी खूप कमी जागा लागते. एक प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. असे प्लॅस्टिक एकत्र गोळा झाले की तुम्हांलादेखील नवीन कल्पना सुचू शकेल.
९) सॅनिटरी नॅपकिन : ह्यांची विल्हेवाट अॅनसीनरेशन पद्धतीने जाळून करायला हवी. पण ती सुविधा आपल्याकडे नाही. तूर्तास घमेल्यात वाळू घालून गच्चीवर जाऊन जाळणे याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. हा १०० टक्के योग्य मार्ग नाही पण कचराकुंडीत अथवा ड्रेनेज लाईनमध्ये टाकण्यापेक्षा गच्चीत नेऊन घमेल्यात जाळणं जास्त चांगलं.
१०) E-Waste : हा नव्या युगाचा कचरा आहे. तो वाटेलतसा टाकणं घातक आहे. ह्या वस्तू घेणारी मान्यवर मंडळी सरकारने नेमली आहेत. आपण ज्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि संगणक खरेदी करतो त्या पुरवठादाराकडून वस्तू घेतानाच हा E-Waste कचरा तू परत घ्यायला हवास अशी अट घालावी. कमीतकमी त्याच्याकडून E-Waste कचरा कोण घेतो त्याची माहिती तरी घ्यावी.
 एवढं वाचल्यानंतर त्याप्रमाणे वागायला लागलात तर 'कचरा करा' असं सांगितलं, तर तुमच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभ राहील! शून्य कचऱ्यासाठी मी काहीतरी करायला हवं, असं तुम्हांला वाटणं आवश्यक आहे.

*
शून्य कचरा - म्हणजेच पराकोटीची स्वच्छता किंवा वापरून झालेल्या गोष्टींचे, वस्तूंचे योग्य व्यवस्थापन होय.

 ‘शून्य कचरा' असे म्हणण्याऐवजी पराकोटीची स्वच्छता' असे म्हटले तर ? लोकांच्या लक्षातच येणार नाही. कारण आपल्याकडे स्वच्छतेबद्दल आस्थाच नाही.
 ‘शून्य कचरा' म्हटले की कसे लोकांच्या लगेच लक्षात येते. याला कारण आहे. स्वच्छतेपेक्षा कचराच आपल्या जास्त परिचयाचा आहे.
 साधारणपणे इयत्ता चौथीपर्यंत शाळेत मुलांना स्वच्छतेचे धडे दिले जातात. चौथीनंतर मुलांना आणि स्वच्छतेला खऱ्या अर्थाने वाऱ्यावर सोडलेले असते. आज आपल्याकडील बहुतांश शाळांमधील वर्गात उभे राहून वर नजर केली की जळमटे हमखास दिसतात.
 कचरा तयार होण्याचे मूळ खरे तर इथे रुजलेले आहे. या वयात जर आपण मुलांच्या अंगी स्वच्छतेचे बाळकडू पाजले, तर त्यांना खऱ्या अर्थाने कचऱ्याचा अर्थ समजेल. सर्वप्रथम आपण कचरा हा शब्द बदलू या. कारण कचरा म्हणजे घाण,गलिच्छपणा हे आपल्या डोक्यात बसले आहे.
 जुनी गाडी म्हणायच्या ऐवजी आजकाल आपण ‘प्रिओनड कार' असं म्हणतो. बाळ्या किंवा बाळू म्हणायच्या ऐवजी बाळराजे, किंवा बन्याऐवजी बबनराव म्हटलं की जसा त्याच व्यक्तीला भारदस्तपणा येतो, तसच कचरा हा शब्द बदलून वाव (वापरलेल्या वस्तू) असं म्हटलं तर कसं वाटेल ! नावाची झूल बदलल्यावर आतल्या वस्तूलाही आपोआप हळूहळू बदलावे लागेल. जशा प्रिओन्ड गाड्या चकाचकच असतात, तशाच वापरून झालेल्या गोष्टीसुद्धा स्वच्छ अन् व्यवस्थितच ठेवायची सवय आपल्याला लागेल.
 एखादी गोष्ट वापरून झाली की ती आपल्याला नकोशी होते. ती आपण जोपर्यंत वापरत असतो, तोपर्यंत आपल्याला तिची घाण, किळस वाटत नाही. उदाहरणच घ्यायचे झाले तर, बटाट्याच्या सालीच घ्या, केळ्याची साल बघा किंवा बाजारातून पावभाजी ज्या पिशवीतून येते, त्या प्लॅस्टिकच्या पिशवीकडे जरा नजर टाका. जोपर्यंत बटाटा, केळे, पावभाजी यांना आपल्याला सांभाळायचे किंवा कोठेतरी घेऊन जायचे आहे, तोपर्यंत त्यांच्या साली अन् पिशव्या आपल्याला हव्या असतात. ज्या क्षणाला साली अन् पिशव्या, बटाटा, केळी आणि पावभाजी यांपासून सुट्या होतात, त्या क्षणाला त्यांच्या नशिबी कचरेपण येते किंवा या गोष्टी ‘वाव' बनतात. पुढे त्यांच्यावर योग्य संस्कार न केल्याने किंवा त्यांचे योग्य व्यवस्थापन न केल्याने त्यांना किळसवाणे रूप येते. या ‘वाव'च्या माथी हे किळसवाणं रूप यायला सर्वस्वी आपण, म्हणजेच त्यांना वापरणारा, जबाबदार आहे.
 एखादी गोष्ट वापरून झाली की जराही विचार न करता ती टाकून द्यायची सवय आपल्या अंगी इतकी मुरली आहे की, असं करताना आपण काही गैर करत आहोत हे आपल्या लक्षातदेखील येत नाही.
 या सवयीवर जरा विचार करायला पाहिजे. वापरून झालेल्या गोष्टी टाकून द्यायच्या या सवयीच्या अतिरेकाचे उदाहरण म्हणजे आजकालचे आजी-आजोबा आहेत. वापरून झाले ! आता यांचे काय करायचे ! वाऱ्यावर सोडून देता येत नाहीत, मग करा दुर्लक्ष त्यांच्याकडे. वापरून झालेल्या वस्तू टाकून द्यायची सवय लागलेल्या मुलांनी सोडून दिलेल्या ह्या आईवडिलांकडे बघितले की वाटते, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आपण मुलांना वेळीच शिकवले नाही त्याचीच तर ही फळे नाहीत ना.
 ‘कैझन, सिक्स सिग्मा, झिरो डिफेक्ट, ISO9000, जस्ट ईन टाइम' ही नाव आपण आजकाल बऱ्याच वेळा ऐकतो. कसली आहेत ही नावे ? एका विशिष्ट तऱ्हेने वागायच्या, विचार करायच्या ह्या वेगवेगळ्या प्रणाल्या आहेत. ISO9000, ची मूळ संकल्पना तर आपल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचीच आहे. “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. याचा खरा अर्थ परदेशी लोकांना समजला. त्यांनी त्याला ISO9000, च्या ढाच्यात बसवलं आणि तो ढाचा आपल्यालाच विकला.
 उद्या कदाचित MOUA (मौ) म्हणजेच मॅनेजमेंट ऑफ यूजडू आर्टिकलस्' अशी एखादी प्रणालीही आपल्याकडे विकायला येईल !
 मग मोठमोठ्या सोसायट्या मोठ्या अभिमानाने, खूप पैसे खर्च करून आपल्या फाटकावर पाटी लावतील, ‘आमची सोसायटी ‘मौ' आहे !'
 तेव्हा कोणीतरी जपानहून किंवा अमेरिकेहून आयात करून आपल्याला ही 'मौ' प्रणाली विकण्यापेक्षा, आपणच का नाही 'वाव' प्रणाली बनवून जगाला विकावी ? वापरलेल्या वस्तूचे व्यवस्थापन करण्यासाठी काय करायला पाहिजे? हा पहिला प्रश्न आपणा सर्वांच्या मनात येईल. त्याचं उत्तर असं -
 ‘प्रथम तुम्हांला मनापासून वाटले पाहिजे की, या वापरून झालेल्या वस्तूचे मी योग्य व्यवस्थापन करणार आहे. तसे मी मनापासून ठरवले आहे. आणि ते माझे कर्तव्य आहे असे मी मानतो.'
 यासाठी पहिली क्रिया कोणती करायला पाहिजे ? ती म्हणजे तुम्ही जाहीर करायला पाहिजे की, माझ्या घरात वापरून झालेल्या गोष्टी आजपासून मी घराबाहेर टाकणार नाही.
 आपल्या घरावर ‘शून्य कचरा' असा फलक लावणे म्हणजे जाहिरीकरणच होय. ‘आधी केले मग सांगितले' असे असतानासुद्धा दारावर अशी पाटी का लावायची असा प्रश्न तुमच्या मनात साहजिकच डोकावेल.
 पण ही पाटी साधीसुधी नाहीये. हे एक प्रकारचे स्वत:चेच स्वत:ला बजावणे आहे.
 आपण एका घराशी बांधलेले आहोत हे जाहीरपणे सांगण्यासाठीच सौभाग्यवती स्त्री ही कपाळावर कुंकू लावते आणि गळ्यात मंगळसूत्र घालते. आपण विठोबाशी लीन झालेले आहोत हे जाहीर कण्यासाठीच वारकरी मंडळी गळ्यात माळ अन् कपाळावर टिळा लावतात.
 आम्ही जनतेचे सेवक आहोत हे सांगण्यासाठी समस्त राजकारणी मंडळी नाही का पांढरे कपडे घालतात !
 जसे कपाळावरील कुंकू, भालावरचा टिळा, अंगावरचे पांढरे कपडे तसाच ‘शून्य कचरा- येथे कचरा तयार होत नाही' हा दारावर लावलेला फलक.
 एकदा का आपण असे जाहीर केले की ते जाहीर करणेच आपल्याला सतत जागृत ठेवत असते. आज जर जाहीरपणे तुम्ही तुमच्या दारावर अशी पाटी लावलीत, तर उद्या सकाळी सोसायटीच्या सफाई कामगाराला कचरा द्यायला तुम्ही जेव्हा बाहेर याल, त्या वेळी ही पाटीच तुमच्याशी बोलले आणि तुमचे तुम्हीच मागे वळाल.
 नवे काहीही निर्माण होत नाही. आणि जगातील कोणतीही गोष्ट आपण नाहीशी करू शकत नाही. हा अविनाशित्वाचा नियम आपणा सगळ्यांनाच माहीत आहे. निसर्गातील वेगवेगळ्या चक्रांकडे आपण जाणीवपूर्वक बघितले पाहिजे. पाण्याचे चक्र बघा.
 पाणी... पाण्याची वाफ...वाफेचे ढग....ढगापासून परत पाणी.
 आपल्या आवतीभोवती असलेली झाडे बघा. ह्या झाडांमध्ये देखील एक चक्र असते. हवा, पाणी आणि जमीन यांमधील मूलद्रव्य यांपासून झाड बनते. झाडातून पाने बनतात, फुले बनतात, फळे बनतात. आपल्या आधीपासून ह्या वृक्षवल्ली ह्या पृथ्वीतलावर आहेत. इतकी वर्ष इतक्या अगणित झाडांनी बनवलेली पाने, फुले, फळे आणि स्वतः झाडे जन्मली आणि नाहीशी झाली. ती गेली कुठे ? याचा कधी आपण विचार केला आहे का ? या सगळ्यांची माती झाली. हेही एक चक्रच आहे. हवापाणी-मूलद्रव्य, त्यांची झाडे...झाडांपासून पाने, फुले, फळे अन् त्यापासून पुन्हा हवा, पाणी अन् मूलद्रव्य आणि माती. या चक्रात या सर्व गोष्टी फिरत असतात.
 आपणदेखील निसर्गातील चक्रांचा एक भाग आहोत. नुसते आपणच नाही, तर आपला आत्मादेखील या चक्रात अडकलेला आहे, हे आपणांस माहीत आहे. असंभव मालिकेमुळे आम जनतेचा यावर गाढा विश्वासही बसत चाललेला आहे. आपण म्हणजेच आपले शरीरदेखील निसर्गाच्या कार्बनच्या चक्रात असेच फिरत असते.
 म्हणजेच, एका परीने निसर्गातील सगळ्याच वस्तू ह्या वापरून झालेल्या वस्तू आहेत. तेव्हा निसर्गाने विविध चक्रे निर्माण करून वापरून झालेल्या गोष्टींच्या योग्य व्यवस्थापनाची सोय केलेलीच आहे. आपले काम आहे ह्या निसर्गचक्रांच्या गतीला विरोध न करता जगायला शिकणे. वापरून झालेल्या गोष्टींचे योग्य व्यवस्थापन करून आपण या निसर्गाच्या विविध चक्रांमध्ये अडथळे न बनवता त्यांना आणखीन गतिमान करण्यात यशस्वी होऊ.
 वापरून झालेल्या गोष्टींचे योग्य व्यवस्थापन करायला पाहिजे, असे आत्तापर्यंत मी सतत सांगत होतो. साहजिकच तुमच्या मनात येणार की, म्हणजे नक्की काय करायला पाहिजे ते सांगा. फक्त एकच करा-कोणतीही गोष्ट वापरून झाली की तिला वाऱ्यावर न सोडता क्षणभर तिच्याकडे बघा. तुमच्या मनात हा विचार येऊ दे की, या वस्तूने तुम्हाला मदत केली आहे. आता तिला टाकून कशी द्यायची ?
मग काय करायचे ?
 खरच या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे आज नाहीये. आणि हेच खरे तर सगळ्या कचरा समस्येचे मूळ आहे. आपण या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे.
 आपण साध्या गुटक्याच्या पाउचचेच उदाहरण घेऊ या. चिमूटभर गुटका आपल्यापर्यंत पोहोचवायला खरे तर हा पाउच किती उपयोगी पडला आहे. पाउच उघडला, गुटका खाल्ला. आता या पाउचचे करायचे काय ? नाहीये आपल्यापाशी उत्तर. म्हणून तो रस्त्यावर टाकला जातो.
 शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याचेही असेच आहे. या कचऱ्याचे करायचे काय ? माहीत नाही, म्हणून मग नागरिक घरातला कचरा रस्त्यावर टाकतात. नगरपालिका तो उचलते आणि दूर शहराबाहेर नेऊन टाकते.
 नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकणे आणि नगरपालिकेने तो उचलून शहराबाहेर टाकणे, या दोन्ही क्रिया सारख्याच आहेत. कोणी कोणाला दोष देऊ नये. या प्रश्नाला एक आणि एकमेव उत्तर आहे. प्रत्येकाने ‘टाकणे' ही क्रिया प्रथम बंद केली पाहिजे.
 ‘शून्य कचरा म्हणजेच ‘वाव (वापरलेल्या वस्तू), यांचे व्यवस्थापन या संकल्पनेचा त्रिसूत्री कार्यक्रम आता तुमच्या लक्षात आला असेल.
१. प्रथम तुम्ही दारावर पाटी लावून जाहीर केले आहे की, तुम्ही तुमच्या घरातून कचरा बाहेर देणार नाही. २. वापरून झालेल्या गोष्टींकडे त्या वापरून झाल्यानंतर, तुम्ही क्षणभर विचारपूर्वक बघणार आहात. ३. टाकण्यापेक्षा ठेवण्याची सवय तुम्ही स्वतःला लावून घेणार आहात.
 आता कचरा तयारच होणार नाही. कारण एखादी गोष्ट ठेवायची, तिचे जतन करायचे म्हणजे तिला स्वच्छ करणे हे ओघाने आलेच.
 आता वापरून झालेल्या गोष्टी तुमच्या घरात जमा होऊ लागतील. रद्दी तर तुम्ही विकताच. त्यात वापरून स्वच्छ केलेले कागदपण तुम्हांला विकता येतील.
 धातूच्या वस्तूंना चांगली किंमत येते हे तुम्हांला माहीत आहेच. जे विकले जात नाही किंवा ज्यापासून जास्त पैसे मिळत नाहीत, अशा वस्तू वाऱ्यावर सोडून दिल्या जातात.
 ह्या टाकलेल्या वस्तू गोळा करून त्यावर उदरभरण करणारे लोकही आहेत. ह्या माणसांना तुमच्याकडे जमा झालेल्या वाव देऊन टाका. तेवढंच पुण्य तुमच्या खाती जमा होईल.
 ज्या वस्तू कोणीही घेणार नाही अशा सर्व गोष्टी ह्या ‘बायोडिग्रेडेबल' म्हणजेच जैविक वस्तू असतात, त्यांचं योग्य व्यवस्थापन करून त्यांना मातीत रूपांतरित करणे ही ज्या त्या माणसाची जबाबदारी आहे. ह्या वस्तू अतिशय सहजपणे मातीत गाडून मातिमय होतात. त्यासाठी अविरतपात्र, त्यातील गांडुळांसकट तुमच्या सेवेला हजर आहे. यातील गांडुळे अन् अनेक किडे, कृमी हे सर्व जैविक पदार्थांना मातीत रूपांतरित करतील.
 हा लेख वाचून झाला की तोदेखील वापरलेली वस्तूच होणार. तेव्हा याला रद्दीत न टाकता या संकल्पनेचा जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे एक दिवस असा उगवेल की, आपल्या आजूबाजूला सुंदरता बहरलेली असेल.

*
 कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ? नागरिकांनीच निर्माण केलेल्या आणि एका न सुटणाऱ्या प्रश्नाशी नगरपालिकेला झुंजावे लागत आहे.

 मोठमोठ्या योजना आखल्या जातात, त्यांवर बरेच पैसे खर्च होतात, पण रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या कचऱ्याच्या कुंड्या मात्र ओसंडून वाहतच असतात.
 कोणत्याही रोगाच्या मुळाशी जाऊन औषधोपचार करावा, असे म्हणतात. म्हणून मी आमच्या घरात रोज भरणाऱ्या कचऱ्याच्या तीन बादल्यांचा अभ्यास कुतूहलाने करू लागलो. त्या बादल्यांमध्ये चक्क डोकावू लागलो आणि हा कचरा मुळात तयार कसा होतो, याचा शोध घेऊ लागलो.
 आमच्याकडे कचऱ्याच्या एकूण तीन बादल्या होत्या. त्यांपैकी एकीत माझ्याकडूनच सर्वात जास्त कचरा जमा होत होता. ती होती मी कामासाठी बसायचो तेथे असलेली डस्टबिन ! मला नको असलेले कागद मी फाडून अथवा बोळा करून त्या डस्टबिनमध्ये टाकत होतो. जोपर्यंत मी ते कागद वापरत होतो, तोपर्यंत ते चागले होते, पण ज्या क्षणाला मी ते कागद फाडायचो अथवा त्याचा बोळा करायचो त्या क्षणाला कचरा तयार व्हायचा. त्या माझ्या डस्टबिनमधील बहुतांशी कचऱ्याचे मूळ हेच तर होते, हीच तर त्याची जन्मवेळ होती. कागद फाडायची अथवा त्याचा बोळा करायची क्रिया मी का करतो ? या प्रश्नाला उत्तर होते ‘उगाचच !' आता कोणी म्हणेल आपली गुपिते दुसऱ्याला कळू नयेत म्हणून कागद फाडणे अत्यंत आवश्यक आहे. अहो पण आपली गुपिते काय प्रत्येक पानावर असतात का ?
 कागद फाडण्याची माझी सवय मी बंद केली, तर हा कचरा निर्माण होणार नव्हता. हे अशक्य आहे असे मला प्रथम वाटले. नंतर मी पणच केला, वापरून झालेल्या अथवा नको असलेल्या कागदाचा चोळामोळा करायचा नाही आणि त्याला फाडायचे तर नाहीच नाही, असे मी ठरविले आणि काय आश्चर्य ! माझी कचरापेटी ओस पडू लागली. नको असलेल्या कागदाचे एका ठरावीक आकाराचे गठ्ठ तयार होऊ लागले, जे मी रद्दीवाल्याला सहज देऊ शकणार होतो, विकू शकणार होतो.
 बारीक कागद, उदाहरणार्थ छोटी-छोटी बिले, दिवसभरात जमा झालेल्या बारक्याबारक्या चिठ्या-चपाट्या हेसुद्धा मी एकत्र गोळा करून ठेवू लागलो.
 माझ्याकडे रोज टपाल येते. त्या टपालात काही पाकिटे असतात. ही पाकिटेसुद्धा टराटर फाडून उघडायची मला सवय होती. जर पाकिटे नीट उघडली, तर त्यांपासून कचरा निर्माण होणार नाही. पाकीट अथवा कोणतेही टपाल वेडेवाकडे उघडले की त्यापासून कचऱ्याची निर्मिती होते. ते व्यवस्थित, थोडासा विचार करून शांतपणे उघडले, तर पाकीट पाकीटच राहते. त्याचा आपण पुन्हा उपयोग करू शकतो अथवा अशा पाकिटांचा गठ्ठा जमला, तर तो रद्दीत देऊ शकतो. थोडक्यात, कागदांची फाडफाडी आणि चोळामोळा करून बोळे करायचे थांबवले, तर कमीतकमी एका डस्टबिनमधील कचरानिर्मिती तरी थांबत होती.
 आता माझा उत्साह वाढला. मी स्वयंपाकघरातील कचऱ्याच्या बादलीकडे माझा मोर्चा वळविला. त्या बादलीत हात घालता येत नव्हता, कारण बादली उघडताच हाताचा उपयोग नाक दाबायला करावा लागत होता. म्हणून दुसऱ्या दिवशी त्या बादलीत कचरा होण्यापूर्वीच ती तपासायची असे मी ठरवले.
 नेहमीप्रमाणे मी दूध घेऊन आलो. कात्री घेतली आणि दुधाच्या पिशवीचा एक कोपरा उडविला. दूध पातेल्यात तापत ठेवले. चहा टाकावा म्हणून चहाचे पातेले घ्यायला बाजूला वळलो. मघाशी कात्रीने उडविलेला दुधाच्या पिशवीचा तुकडा ओट्यावर पडला होता. माझ्याकडे तो केविलवाण्या नजरेने बघतोय, असे मला वाटले. जोपर्यंत तो पिशवीचा भाग होता, तोपर्यंत तो कचरा नव्हता. ज्या क्षणाला मी त्याला पिशवीपासून अलग केले, त्या क्षणाला तो कचरा बनला. म्हणजे माझी पिशवी फाडायची पद्धत चुकीची होती. पिशवी जर मी ब्लेडने आडवी चीर देऊन फाडली असती, तर असा कचरा झाला नसता.
 दुधाची पिशवी जर मी बेसिनमध्ये तशीच पडू दिली असती आणि तासा-दोन तासांनी तिला साफ करायला गेलो असतो, तर पिशवी धुताना प्रथम मला थोडीशी तरी किळस वाटली असती. एखाद्या गोष्टीबद्दल किळस वाटणे, हे ती वस्तू कचऱ्यात रूपांतरित होत आहे, याचे द्योतक आहे. मी लगोलग त्या दोन्ही पिशव्या उलट्या करून साबणाने स्वच्छ धुतल्या. फडक्याने पूर्ण पुसल्या. आता त्यांना दूध नासल्याचा आंबूस वास येणार नव्हता. हे सर्व काम दूध तापून चहाला उकळी फुटेपर्यंत झाले होते. किती थोडा वेळ ! नाहीतर या वेळेत मी काय केले असते ? कचरा बनलेल्या त्या पिशवीच्या छोट्या तुकड्याची क्षमा मागून मी पेपर वाचायला बसलो.
 आज सुट्टीचा दिवस होता. पेपरमधून हॅण्डबिलांच्या जाहिराती बाहेर पडत होत्या. पूर्वी या कागदांना मी सरळ डस्टबिनची वाट दाखवीत असे, पण आता शून्य कचऱ्याचे गणित मला उलगडू लागले होते. मी त्या सर्व जाहिराती व्यवस्थित गोळा केल्या आणि रद्दीच्या खणात एका बाजूला ठेवून दिल्या.
 चहा पीत, पेपर वाचत मी रविवारची सकाळ मजेत घालवीत होतो. ओट्यावर चहाचे पातेले धुवाचये राहिले होते. गाळण्यात चहाची ओली पूड जमा झालेली होती. "आता माझे काय करणार ? चहा झाला. आता मी कचराच ना ?" चहाची पूड जणू काही माझ्याशी बोलत होती.
 “हो, हो; तू आता कचराच, पण तुला मी आता तशीच सोडणार नाही. तुझ्यात मुरलेला साखरेचा गोडवा कमी करून मगच तुला मी डस्टबिनमध्ये टाकणार. असे केल्याने तुला मुंग्या चावणार नाहीत. काय, बरोबर की नाही ?' चहाची पूड माझ्याकडे बघून गोडशी हसली. भांडे किती मोठे घ्यायचे हे ठरणार होते. मी एका भांड्यात पाणी भरून घेतले. त्या भांड्यावर चहाची पूड असलेले गाळणे ठेवले. आता चहाची पूड भांड्यातील पाण्यात बुडणार होती, तिचा गोडवा पाण्यात उतरणार होता. कचऱ्याच्या एका बादलीत मी ती चहाची पूड टाकली. चहाचे भांडे विसळून झाले होते. शेजारीच शिळ्या दुधाचे पातेले आता मला विसळून स्वच्छ केव्हा केलं जातंय' याची वाट पाहत होते. मी पातेले हातात घेतले. याला असेच सरळ विसळले, तर सर्व साय गटारात जाणार होती. म्हणून चमचा घेतला आणि सर्व साय खरवडून काढली. कितीही खरवडले, तरी पातेले काही पूर्णपणे सायमुक्त होत नव्हते. म्हणजे काही प्रमाणात साय कचरा बनून गटारात जाणार होती. मला ती तशी जाऊ द्यायची नव्हती. प्रश्न असेल आणि तो सोडवायची इच्छा असेल, तर उत्तर सापडते. पातेले स्वच्छ करण्यासाठी मला अशी कोणतीतरी पावडर पाहिजे होती की, जी सायीला खराब न करता पातेल्यापासून वेगळे करणार होती. उत्तर म्हणून मला कालची उरलेली पोळी सापडली. दुधाच्या पातेल्यात मी पोळी कुस्करली. थोडीशी साखर टाकली. साखर आणि शिळ्या पोळीच्या चुन्याने सर्व साय निघून आली. त्या एका पोळीचा छोटासा लाडू बनवला. आता दुधाचे पातेले फक्त विसळायचे बाकी होते.
 सकाळच्या नाश्त्याचा जंगी बेत होता. शिवाय सुट्टी असल्यामुळे स्वयंपाकघरात माझी अन् मुलांची सत्ता होती. नाश्त्याला कांदा-बटाटा पोहे करायचे ठरले. लागणारे सर्व सामान टेबलावर जमा झाले. या पदार्थांतील आम्हाला पाहिजे असलेले भाग काढून घेतल्यानंतर, पोह्याचा चुरा, कांद्या-बटाट्याची सालं, कोथिंबीर आणि कढीपत्त्याच्या काड्या, मिरचीची देठे, नारळाची करवंटी ह्या पदार्थांचा ढीग टेबलावर जमला. हा ढीग जोपर्यंत टेबलावर आमच्यासमोर होता, तोपर्यंत तो कचरा नव्हता. या ढीगाला कचऱ्याच्या टोपलीत लोटण्याची क्रिया होताच, त्यावर टाकाऊ' असे लेबल लागणार होते. परिस्थिती सत्य होती.
 बटाट्यावर साले होती म्हणून आपल्याला चांगला बटाटा मिळत होता. कढीपत्ता आणि कोथिंबीर यांच्या काड्यांनी आजपर्यंत पानांना धरून ठेवले होते. देठ होते म्हणून मिरची वाढली होती आणि करवंटीमुळेच खोबरे जमा झाले होते. आज या सगळ्या मंडळींना आम्ही कचऱ्याच्या कुंडीत लोटणार होतो, पण काही पर्याय नव्हता. असते एकेकाचे नशीब असे म्हणायचे.
 यांचे कचऱ्याचे नशीब टाळता येत नव्हते. निदान त्यांच्या नशिबी आलेला हा कचऱ्याचा फेरा आपल्याला कमी करता येईल का ? माझ्या हातात सुरी होती, समोर विळी होती. मी ही दोन्ही अस्त्रे परजली. या सर्व टाकाऊ वस्तू घेऊन त्याचे बारीकबारीक तुकडे केले आणि मग ते कचऱ्याच्या बादलीत जमा केले. असे केल्याने या सर्व टाकाऊ बनलेल्या वस्तूंना त्यांच्या सध्याच्या अवस्थेतून मातीत रूपांतर व्हायला लागणारा कालावधी कमी होणार होता.
 अशा तऱ्हेने सकाळी जेवणापर्यंत आमच्या घरातील कचऱ्याच्या तीन बादल्यांपैकी एका बादलीतच तळाशी थोडासा कचरा जमा झालेला दिसू लागला होता. हा कचरा अतिशय थोडासा दिसत होता याचे मुख्य कारण होते, या कचऱ्याला बादलीत टाकण्यापूर्वी आम्ही तो करता येईल तेवढा बारीक केला होता.
 त्या दिवशी संपूर्ण दिवस घरात काहीबाही येतच होते. घरात येणाऱ्या या अनेक वस्तूंबरोबर वेष्टणाच्या स्वरूपातही बऱ्याच वस्तू घरात येत होत्या. ह्या वस्तूंचे वेष्टण सोडून आतला पदार्थ बाहेर काढल्यावर या वेष्टण मंडळींच्या नशिबी कचराकुंडीच होती. मी दक्ष झालो. वेष्टणाचे सर्व कागद वेगळे केले, प्लॅस्टिकच्या पिशव्या वेगळ्या केल्या, त्या स्वच्छ केल्या आणि वाळवण्यासाठी टांगून ठेवल्या. इस्त्रीवाला भय्या कपडे घेऊन आला. कपड्यांच्या बंडलाचा दोरा सोडला, कागद बाजूला केला, कपडे घरात घेऊन गेलो. दोऱ्याचा गुंडाळा केला, कपड्यांना गुंडाळलेला कागद तसा मोठा होता, तो रद्दीत ठेवला.
 संध्याकाळी जंगी खरेदी झाली. खरेदीबरोबरच पुठ्याचे बरेच खोके आणि प्लॅस्टिकच्या बॅगा घरात आल्या. पुठ्याचे खोके रद्दीच्या खणात ठेवले. या सर्व गोष्टी पूर्वी मी कचऱ्याच्या बादलीत टाकल्या असत्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोसायटीच्या कचरेवाल्याला दिल्या असत्या. त्याने हे सर्व खोके मोठ्या बादलीत कोंबले असते. माझ्या रद्दीच्या खणात सुंदर दिसणारे खोके उद्या सकाळी क्षणात कवडीमोल, विद्रूप झाले असते.
 रात्रीच्या जेवणासाठी हॉटेलमधून जेवण मागवायची आयडिया सर्वांना एकदम पसंत पडली. हॉटेलमधून प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि डबे यांतून सर्व जेवण आले. सगळ्यांना कडाडून भुका लागल्या होत्या. त्यातून तो खमंग वास सगळ्यांची अस्वस्थता वाढवीत होता. आलेले जेवण प्रथम भांड्यात काढायला पाहिजे होते. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांची तोंडे मोकळी करायला पाहिजे होती. या पिशवीला मारलेली गाठ निघणारच नाही अशी समजूत आपण करून घेतलेली असते. आपण नेहमी ही गाठ कापूनच पिशवी उघडतो आणि पिशवीचा एक भाग कचरा म्हणून जन्म घेतो. आज मला या कचऱ्याचा जन्म होऊच द्यायचा नव्हता. मी अगदी थोडासा वेळ दिला आणि प्लॅस्टिकच्या पिशवीच्या गाठीवर लक्ष केंद्रित केले. माझ्याकडून ती गाठ खरोखरच अल्प वेळात सुटली. सर्व पिशव्यांच्या गाठी सोडल्यानंतर लक्षात आले की, प्लॅस्टिकच्या पिशवीला घट्ट गाठ बसूच शकत नाही.
 पूर्वी मी, या पिशव्यांतील अन्न काढून पिशव्या कचऱ्याच्या बादलीत टाकल्या असत्या, पण आज मला तसे करायचे नव्हते. लागल्या हाती मी त्या पिशव्या उलट्या करून साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुतल्या. टेबलावर जेवणाची मांडामांड होईस्तोवर माझ्या पिशव्या धुऊन झाल्या होत्या. जेवण होईस्तोवर त्या वाळून कोरड्यादेखील झाल्या होत्या. सुट्टीचा दिवस कसा संपला, ते समजलेच नाही. आमच्या कचऱ्याच्या बादलीत जेमतेम तीन-चार इंच कचरा जमा झाला होता. हा ओला कचरा असाच ठेवला, तर यावर चिलटे बसणार, दुर्गंधी सुटणार. यापासून बचाव कसा करायचा ? वाटले याला झाकून ठेवावे, पण कितीही झाकून ठेवले, तरी बादली उघडताच वास येणारच. दुर्गंधी आणि चिलटे यांपासून बचाव करणारे झाकण मला पाहिजे होते. ते झाकण होते माती ! मी धावतच अंगणात गेलो. मला चांगली जिवंत माती हवी होती. पण पसाभर चांगली माती मला मिळेना. सर्व सोसायटीतील जमिनी सिमेंट क्राँक्रिटच्या झाल्या होत्या. मातीला आपण आई मानतो. आज आपली आईच आपल्यापाशी नाही! मग मी एका रोपवाटिकेत जाऊन तेथून चांगली जिवंत माती विकत घेऊन आलो. चांगली पसा-दोन-पसा माती आणली. ती माती बादलीतील कच-यावर पांघरूण घातल्यासारखी पसरली. आता बादलीत कचरा दिसतच नव्हता. मातीच्या पांघरुणाखाली झोपलेल्या कचऱ्याचे यथावकाश मातीत रूपांतर होणार होते.

*

'शून्य कचरा - येथे कचरा तयार होत नाही.' अशी पाटी मी माझ्या घरावर लावली आहे. अपेक्षा आहे की, मी राबवत असलेल्या प्रकल्पाची माहिती येता-जाता एकतरी माणूस कुतूहलापोटी विचारेल. मात्र आजपर्यंत फारच थोड्या व्यक्तींचे कुतूहल जागृत झालेले आहे, म्हणूनच मी आशावादी आहे.
 कचरा निर्मूलनाचा विषय निघाला की प्रत्येक जण दुसऱ्याने काय करावे हेच कायम सांगत असतो. "मी शून्य कचरा प्रकल्प घरात राबवतो आहे, तुम्हीपण राबवा," असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. ओला कचरा जर बारीक करून जाळीच्या टोपलीत टाकला, तर त्याचे खतात लवकर रूपांतर होते, हे मला समजले होते आणि पटलेदेखील होते. ओला कचरा बारीक करणे, हे एक कामच होते. हे काम कमी वेळेत कसे करता येईल, याचा मी विचार करत होतो. माझ्या एका मित्राच्या घरी बेसीनला एक मिक्सर बसवला आहे, तो बघायला मी गेलो. मला जसा पाहिजे होता, अगदी तसाच तो मिक्सर होता. त्यात वरून कचरा टाकला की तो खालून बारीक होऊन बाहेर पडायचा. फक्त हे होताना त्या मिक्सरमध्ये सतत पाणी सोडावे लागायचे.
 बेसीनमध्ये हे आपोआप घडायचे. पण मला हा कचरा बेसीनमधून ड्रेनेजमध्ये जाऊ द्यायचा नव्हता. मी ते मशीन विकत घेतले, भिंतीवर बसवले. पाण्याची सोय केली.
 आता मला सर्व ओला कचरा बारीक होऊन मिळणार होता. त्यापासून उत्कृष्ट खत बनणार होते. कचऱ्यापासून मी खत बनवतो हे कळल्यावर त्या मिक्सरचा कारखानदार मला भेटायला आला. त्याला एका सोसायटीकडून मोठा मिक्सर बनवायची ऑर्डर मिळणार होती.
 त्या सोसायटीमध्ये ३५ सभासद होते. त्यांनी एक योजना बनवली होती. प्रत्येक घरातील ओला कचरा त्या घरातील मोलकरीण त्या मशीनपर्यंत नेऊन देईल. मग वॉचमन तो कचरा तपासून मशीनमध्ये टाकेल. ते मशीन तो कचरा बारीक करेल आणि ड्रेनेज लाइनमध्ये सोडेल. त्या कारखानदाराने मला विचारले, “अशी कुठली संस्था आहे का, की जी हा तयार होणारा, बारीक केलेला ओला कचरा घेऊन जाईल, किंवा तुमच्या सल्ल्याने या कचऱ्याचे जागेवरच खतात रूपांतर होऊ शकेल का?”
 मी म्हणालो, “मला वाटते, ही योजना दिसायला खूप चांगली वाटत आहे; पण राबवायला खूप अवघड आहे, कारण :
 येथे आपण दुसऱ्याने काय करावे हेच पुन्हा सांगत आहोत.  सभासदाच्या घरातील ओला कचरा मोलकरणीने का म्हणून खाली नेऊन द्यायचा ? एकवेळ स्वत:च्या ओल्या कचऱ्यात स्वतःला हात घालायला किळस वाटणार नाही; पण दुस-याच्या कच-यासमोर उभे राहायलासुद्धा कोणालाही किळसच वाटेल. मोलकरणीच्या आणि वॉचमनच्या दृष्टीने सभासदांचा कचरा हा दुसऱ्याचाच कचरा आहे. या घाण कामाबद्दल सभासद त्यांना घसघशीत वेगळे पैसे देणार आहेत का ? मी घाण करायची आणि दुसऱ्याने ती साफ करायची ही मानसिकता प्रथम बदलली पाहिजे."
 आपल्याकडे एखादा माणूस परदेशी गेला की अभिमानाने सांगतो की, तेथे सगळी कामे मी स्वतः करायचो; पण त्याच माणसाला भारतात घरी आल्यावर मात्र मोलकरीण लागते. मोलकरीण, कामवाली बाई, साफसफाई कामगार, असे लोक तयार करणे, हा खरे तर सामाजिक अन्याय आहे. असे म्हटले तर लगेच लोक म्हणतील, "मग या लोकांनी करायचे काय ?" या लोकांना अशी कामे देऊन सामाजिक अन्याय का होतो ? कारण या लोकांना अत्यंत अल्प पैसे दिले जातात. स्वच्छता करण्याच्या कामाचा अत्यंत कमी मोबदला दिला जातो. येथेच स्वच्छतेला आपण किती खालचा दर्जा देतो हे दिसून येते.
 "आपल्याला कायम एखादे काम मोठ्या स्वरूपात करायचा खूप सोस असतो. जसजसा प्रकल्प मोठा होत जातो, तसतसे त्याचे नियोजन अवघड बनत जाते. त्यातून जर का तो सतत चालणारा प्रकल्प असेल, तर सातत्याने अनेक जणांकडून शिस्तबद्ध काम करून घेणे खूपच अवघड असते. मोठी कामे सोपी आणि यशस्वी तेव्हाच होतील, जेव्हा त्यांच्यासाठी आपण मुबलक फंडाची सोय करू. येथे फंडाच्या पेटीत खुळखुळाट आहे. जे काम १५ X ११ X ९ इंचांच्या जाळीवर प्लॅस्टिकच्या टोपलीत दिवसातील फक्त एका माणसाची (स्वतःची), फक्त १५ ते २० मिनिटे खर्च करून होईल, त्यासाठी एवढा खटाटोप का करायचा ?"
 मिक्सरचा कारखानदार म्हणाला, “साहेब, मला माझे मशीन विकायचे आहे.' मी म्हणालो, “आता कसे मुद्द्याचे बोललास."
 लहानपणी तिसरी-चौथीत आपल्याला शिकविलेले असते. ग्रामपंचायत, नगरपालिका यांची कामे काय ? त्यांच्या अनेक कामांत गावात स्वच्छता ठेवणे' हे एक काम असते. येथे मनात एक प्रश्न निर्माण होतो. स्वच्छता जर ग्रामपंचायतीने करायची, तर अस्वच्छता कोणीतरी केली पाहिजे. लहानपणापासून आपण असेच गृहीत धरून चालतो. घाण ही होतेच, कचरा निर्माण होणारच. तो कोण तयार करतो ? का तयार करतो? आणि कसा तयार करतो ? याचा आपण कधीच मागोवा घेत नाही. याचे कारण असे की, या सगळ्यांचे उत्तर एकच असते; ते असते, आपण स्वतः'.  कचरा निर्मूलनाच्या अनेक पद्धतींत एक योजना बऱ्यापैकी यशस्वी झालेली दिसते; ती आहे ड्रेनेज सिस्टिमची. पूर्वी आपल्याकडे पाटीचे संडास असायचे. डोक्यावरून मैला वाहून नेणारी माणसे मी बघितली आहेत. हा सामाजिक अन्याय नाहीसा होण्यामध्ये ड्रेनेज सिस्टिमचा मोठा वाटा आहे. ही सिस्टिम का यशस्वी होते ? याचे खरे कारण आहे नैसर्गिक गुरुत्वाकषर्णाचा नियम. खरे तर, खऱ्या अर्थाने ही योजना यशस्वी झालेली नाही. कारण गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने आपण मैला फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवला. तो समुद्रात, नदीत न सोडता त्यापासून खत बनविले, तर निर्मूलनाची प्रक्रिया खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. आजकाल सगळ्या योजना कचरा उचलायचा आणि दुसरीकडे नेऊन टाकायचा, हेच काम करीत असतात.
 ज्या गोष्टीतून बऱ्यापैकी पैसा निर्माण होतो, ती गोष्ट यशस्वी होते. साधे आपल्या घरात बघितले, तर आपल्याला दिसून येईल की, रोजचे दैनिक आपण व्यवस्थित घडी घालून एकत्र ठेवतो. वास्तविक दैनिक वाचून झाले की तो कचराच आहे; पण असे अंक आपण कधीच सोसायटीच्या साफसफाई कामगाराला देत नाही. याचे महत्त्वाचे कारण असे आहे की, याच अंकांची रद्दी विकून आपल्याला पैसे मिळणार असतात. तसे कालच्या उरलेल्या भाजीचे, मटारच्या सालांचे, प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे पैसे मिळत नाहीत. म्हणून आपण त्यांना वाऱ्यावर टाकून देतो आणि मग कचऱ्याचा प्रश्न निर्माण होतो.
 जर का नगरपालिकेने असे जाहीर केले की, तुमच्या वावचे (कचऱ्याचे) घनकचरा आणि खते यांमध्ये रूपांतर करून तुम्ही ते आमच्याकडे घेऊन आलात, तर आम्ही ते विकत घेऊ! तर घरच्याघरी कचऱ्याचे रूपांतर खतात करण्यासाठी लोक निश्चितच तयार होतील. परंतु नगरपालिका हे खत विकत घेणार नाही. कारण या खताची किंमत ती काय असणार आहे ! त्यातून नगरपालिकेला किती पैसे मिळणार ? शिवाय हे खत नगरपालिका कोणाला विकणार ? खताच्या विक्रीला जास्त पैसे मिळणार नाहीत म्हणून खरेदी कवडीमोल भावाने होणार. आज कचरा वाहून नेण्यासाठी केवढी मोठी यंत्रणा कार्यरत आहे. तिच्यावर किती अब्जावधी पैसे खर्च होत आहेत. ही या कचऱ्याची किंमतच नव्हे का ? हे पैसे कचऱ्यापासून बनविलेल्या खताच्या खरेदीसाठी वापरता येणार नाहीत का?
 कोठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे. सरकारी यंत्रणेला हे पटवणे खूपच अवघड आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे आल्या, तर ही अशक्य कोटीतील गोष्टसुद्धा शक्य होईल. सहकारी तत्त्वावर जर दूध गोळा केले जाते; आणि अतिशय दर्जेदार दूध जर मिळू शकते, तर दर्जेदार खत का नाही मिळणार ? प्रत्येक घरातून जर का खत प्रकल्प सुरू झाले, तर प्रदूषण निर्माण करणारे खत प्रकल्प, रासायनिक कारखाने बंद करायची पाळी येईल.
 प्रत्येक घरात एक देवघर असते, तसेच प्रत्येक घरात गांडूळ खतनिर्मितीचे एक सयंत्र असावे.
 खत निर्माण करणारे माझ्या घरातील सयंत्र आणि त्यात सतत कार्यरत असणारी गांडुळे यांनाच मी तरी देव मानतो. देवपूजेसाठी जेवढा वेळ खर्च झाला असता, तेवढाच वेळ या गांडुळांबरोबर घालवला, तर ती खरी देवपूजा असे मला वाटते.
 प्लॅस्टिकला आपण नेहमी ‘याचा किती कचरा होतो, हे डीकम्पोस्ट होत नाही म्हणून नावे ठेवतो. त्याचा वापर कमी करा असे सांगतो; पण या त्याच्या गुणधर्माला दोष न मानता त्याचा उपयोग करून घ्यावा. म्हणजे असे की, एकच प्लॅस्टिक अनेकदा वापरावे. माणूस अमृताच्या शोधात असतो. त्याने त्याला अमरत्वाची प्राप्ती होते असा समज आहे. आपल्याला विज्ञानाने निर्माण करून दिलेले प्लॅस्टिक अमरत्व घेऊन जन्माला आलेले आहे. प्लॅस्टिकच्या अमरत्वामुळे कचरा होतोय म्हणून समस्त मानवजात चिंतेत आहे. उद्या जर का मानवाला खरोखरच अमृत मिळाले, तर मानवाचे प्लॅस्टिक होईल ! तेव्हा अमृताचा नाद सोडलेला बरा.
 मी माझ्या घरावर “शून्य कचरा - येथे कचरा तयार होत नाही,' अशी पाटी लावली आहे. स्वतःची टिमकी वाजविण्याचा उद्देश अजिबात नाही, पण अपेक्षा आहे की, जाता-येता एकतरी माणूस मी राबवत असलेल्या प्रकल्पाची माहिती कुतूहलापोटी तरी विचारेल. पण छे ! आजपर्यंत फारच थोड्या व्यक्तींचे कुतूहल जागृत झालेले आहे आणि म्हणून मी आशावादी आहे.
 आजूबाजूची माणसे निद्रावस्थेत वावरत आहेत, असे आपल्याला वाटते. पण ती जिवंत माणसे आहेत. म्हणून त्यांचे अंतर्मन मात्र जागृतावस्थेत असेल. आज ना उद्या त्यांच्या मनावर ‘शून्य कच-याचा परिणाम होणार आहे.

एक-ना-एक दिवस
आपण एका सुंदर जगात नक्की प्रवेश करणार आहोत.
*
 न्यूटनला झाडावरून पडणारे फळ दिसले, डार्विनला माणूस घडत-घडत घडला असे वाटते... तसे पाहायला गेले, तर आज या कल्पना किती सोप्या, साध्या अन् साहजिक आहेत असे आपल्याला वाटेल, पण न्यूटनने झाडावरून पडणाऱ्या फळाचा पाठपुरावा केला, तो त्या फळाच्या पडण्याच्या मागेच लागला. डार्विनने त्याचे आयुष्य सजीवांचा अभ्यास करण्यात घालविले, तेव्हा कोठे हे शोध प्रस्थापित झाले.

 'शून्य कचरा'. जगात कचरा म्हणून काहीही नाही, हीदेखील एक साधी, सरळ अन् सोपी अशीच साहजिक गोष्ट आहे, पण हे सत्य आपल्या लक्षातच येत नाही.
 वापरून झाल्यानंतर नको असलेल्या वस्तूंची यादी केली, तर ती यादी केवढी मोठी होईल, हजार, दहा हजार, असा काहीतरी तो आकडा येईल. पण या वस्तूंचा जर बारकाईने अभ्यास केला, तर असे दिसून येईल की, यात प्रामुख्याने तीन प्रकार पडतात.
 पहिला - ज्याच्या विक्रीतून लगेच पैसे मिळतात अशा वस्तू.
 दुसरा - ज्याच्यातून अतिशय कमी किंवा अजिबात पैसे मिळत नाहीत अशा वस्तू.
 तिसरा - जैविक पदार्थ - निसर्गतःच ज्यांचे मातीत रूपांतर होते. अशा वस्तू.
 पहिल्या प्रकारामुळे अनेक वर्षांपासून भंगार खरेदी-विक्री हा एक मोठा व्यवसाय म्हणून अस्तित्वात आहे.
 आपला लढा आहे तो दुसऱ्या अन् तिसऱ्या प्रकारातील कवडीमोल किमतीच्या वस्तूंना त्या वापरून झाल्यानंतर वाऱ्यावर सोडणाच्या वृत्तीशी.
 माणूस हा प्राणी खूप हुशार आहे. त्याला स्वतःचा फायदा चटकन समजतो. पाणी जसे उताराकडेच वाहत जाते, तसेच माणसाचे वागणे असते. तो कायम फायद्याच्याच वाटेने जातो. मुळात त्याची वृत्ती तशीच असते. या वृत्तीकडे दोष म्हणून न बघता, तो एक गुणधर्म आहे, असे आपण एकदा का मान्य केले की, सगळ्या गोष्टी बऱ्याच सोप्या होतात. मग प्रश्न उरतो पद्धत तयार करण्याचा. माणसांसाठी कुठलीही पद्धत तयार करताना त्यातून त्याला फायदा कसा होईल, हा उद्देश समोर ठेवावा. माणसाची प्रत्येक कृती ही त्याच्या फायद्यासाठीच असते, हे मान्य केल्यावर एखादी वस्तू फेकून देण्याच्या त्याच्या वृत्तीचे उत्तर अगदी स्पष्टपणे समोर येते. ज्या वस्तूचा काहीही उपयोग नसतो, जिच्यापासून त्याला चार पैसे मिळणार नसतात, म्हणूनच तो ती वस्तू रस्त्यावर टाकतो. सुशिक्षित असेल, तर कचऱ्याच्या कुंडीत टाकतो. कोठे टाकतो हे महत्त्वाचे नसून, तो ती वस्तू टाकतो हे सत्य आहे.
 एखादी वस्तू माणूस का टाकतो, या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे. टाकण्याच्या वृत्तीला दोष देत बसलो, तर नुसतेच वाद होतील. पद्धतच अशी तयार केली पाहिजे की, माणूस कोणतीच वस्तू टाकून देणार नाही.  परवा मी एका पानाच्या टपरीसमोर उभा होतो. बाईच्या चेहऱ्यावरून ‘अवंतिका बट' जशी खाली यावी, तशा या टपरीच्या तोंडावरून अनेक पाउचच्या माळा खाली लटकल्या होत्या. एक माणूस आला. झाडावरील एखादे फळ तोडावे, तसा त्याने त्या पाउचच्या माळेतील एक पाउच तोडला. तेथेच उभे राहून त्याने तो पाउच दाताने फाडून उघडला. त्यातील पदार्थ आ वासून तोंडात टाकला आणि तो पाउच तेथेच रस्त्यावर टाकून दिला. मी सहज त्या माणसाच्या लक्षात आणून दिले की, आपण पैसे देऊन विकत घेतलेला पाउच रस्त्यावर पडला आहे. तो माणूस माझ्याकडे बघतच राहिला. तो वापरून झालेला पाउच खाली रस्त्यावर टाकून दिला यात त्याला काहीच गैर वाटत नव्हते.
 आपण काहीतरी चुकतोय, हेच त्याच्या गावी नव्हते. वापरून झाल्यानंतर या पाउचचे करायचे काय, हाच प्रश्न त्याला पडला असणार. त्या माणसाने तो पाउच तिथेच ठेवलेल्या एका कचऱ्याच्या डब्यात टाकायला पाहिजे होता. त्या डब्यात कवडीमोल किमतीच्या अनेक वस्तू सकाळपासून पडत होत्या. कोणीतरी सहज जाता-येता, त्यात पिंकही मारीत होते. हा डबा संध्याकाळी तो पानवाला कोपऱ्यावर ठेवलेल्या कचऱ्याच्या कुंडीत अथवा कुंडीजवळ उपडा करणार होता. म्हणजे सुपारी खाऊन पाउच रस्त्यावर टाकून देणे आणि संध्याकाळी कचऱ्याचा डबा कुंडीजवळ रिकामा करणे.
 या दोन्ही क्रिया मग काय करणार ?' या असाहाय्यतेतूनच आल्या आहेत.
 हे थांबवायचे कसे हाच खरा मोठा गहन प्रश्न आहे. सांगून-सांगून माणसाचे प्रबोधन करत राहायचे, हा एक मार्ग आहे, पण हा खूप मंदगतीचा मार्ग आहे. याचे परिणाम नक्की चांगलेच आहेत, पण आपण शोधत आहोत गतिशील मार्ग, कारण आपण वेगवान युगात वावरत आहोत. नको असलेल्या वस्तूची संख्या ज्या वेगाने वाढते आहे, त्याच वेगाने आपल्याला त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. आम्ही एका दुकानात खरवस विकत घेतला. आम्ही किंमत विचारली, तेव्हा तो दुकानदार म्हणाला, "खरवस ५० रुपयांचा आणि डबा ३५ रुपयांचा असे ८५ रुपये द्या." आम्ही म्हटले, "आम्हाला डबा नको. तो दुकानदार म्हणाला, "आत्ता ३५ रुपये देऊन डबा घेऊन जा, डबा स्वच्छ धुवा आणि परत घेऊन या, ३५ रुपये घेऊन जा." एका प्लॅस्टिकच्या पिशवीचा प्रश्न किती सहजतेने सुटला होता. अन्यथा हाच खरवस त्याने प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून दिला असता, लोकांनी घरी जाऊन खरवस काढून घेतला असता आणि प्लॅस्टिकची पिशवी साफ न करता वाऱ्यावर सोडून दिली असती.
 आपण क्षणभर कल्पना करू या. बाजारातील भाजीवाल्या बाईंकडून आपण भाजी खरेदी केली आणि आपण तिच्याकडे पिशवी मागितली. तिने पातळ प्लॅस्टिकची पिशवी देण्याऐवजी एका चांगल्या पिशवीत ही भाजी घालून दिली अन् म्हणाली, “भाजीचे १५ रुपये आणि पिशवीचे १५ रुपये. ३० रुपये द्या. पिशवी परत घेऊन या अन् १५ रुपये घेऊन जा. प्रत्येक भाजीवाली असे म्हणू लागली, तर आपण काय करू ?
 म्हणजे वापरा अन् फेकून द्या' ही मार्केटिंगच्या लोकांनी रुजवलेली कल्पना वापरलेल्या वस्तूंचे कचऱ्यात रूपांतर करायला कारणीभूत आहे असे दिसते. पॅकिंग मटेरिअल अत्यंत कमी किमतीचे, पण आकर्षक बनवायचे असा सर्व कंपन्यांचा प्रयत्न सतत चालू असतो. त्याऐवजी पॅकिंग मटेरिअल महागच वापरायचे की जेणेकरून त्याचा वापर करून झाल्यावर त्याला किंमत येईल. त्या वस्तूपासून पैसे मिळतात, हे लक्षात येताच माणसे ते पॅकिंग मटेरिअल, ती वेष्टणे रस्त्यावर टाकणार नाहीत.
 महागडे चॉकलेट प्लॅस्टिकच्या सुंदर कागदात पॅक करून विकण्याऐवजी चांगल्या डबीतून विकले, तर काय हरकत आहे. डबी परत, तर पैसे परत; किंवा डबीला भंगारमध्ये किंमत येऊ लागली, तर रॅपरने निर्माण होणारा कचरा निर्माण होणार नाही.
 पाण्याची बाटली इतकी पातळ का करायची ? चांगली मजबूत टिकाऊ केली, तर पाणी पिऊन झाल्यावर लोक तिला इकडेतिकडे टाकून देणार नाहीत, फुकट मिळायला पाहिजे असे पाणी जी माणसे विकत घेतात, ती माणसे १० रुपयांऐवजी थोडे जास्त पैसे द्यायला कुरकुरणार नाहीत. वापरून झालेल्या बाटलीचे पैसे मिळतात, हे समजल्यावर महागाई होते म्हणून तकरार करायचा प्रश्नच येत नाही.
 रस्त्यावर पडणाऱ्या प्लॅस्टिककडे जरा बारकाईने बघितले, तर असे लक्षात येईल की, हे प्लॅस्टिक सुस्थितीत आणि सधन असणाऱ्या मंडळींकडूनच फेकले गेलेले आहे, त्यामुळे वेष्टणे चांगली बनविली, तर वाढणाऱ्या किमतीमुळे आरडाओरडा नक्की होणार नाही.
 बायो डिग्रेडेबल रॅपर्स बनविण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे, असे काही मोठ्या कंपन्या प्रौढीने सांगतात. खरे तर त्यांचा प्रयत्न चालू असतो पॅकिंग मटेरिअल आणखी स्वस्त कसे बनेल याचा. आम्ही निसर्गाची काळजी घेतो, असे प्रौढीने म्हणणाऱ्या या कंपन्या त्यांच्या रॅपर्समध्ये असे आमूलाग्र बदल करतात का ? खरवस विकणाऱ्या एका साध्या दुकानदाराने जे करून दाखविले, ते या मोठ्या कंपन्या आपणहून करतील का, खचितच नाही, त्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे.
 पातळ प्लॅस्टिकच्या पिशव्या बनविणारे कारखाने बंद करण्याऐवजी त्यांना जाड प्लॅस्टिकच्या पिशव्या बनवायला लावले पाहिजे. आपला माल चांगला राहावा, खुलून दिसावा, बरेच दिवस टिकावा म्हणून उत्पादक पॅकिंगची खूप काळजी घेतात, पण ते पॅकिंग मटेरिअलची काळजी घेत नाहीत. कमी किमतीत उत्कृष्ट पॅकिंग ही कल्पना बदलायला पाहिजे. कारण कमी किमतीतील पॅकिंग मटेरिअल, काम झाले की कवडीमोलाचे असते. जी वस्तू आपल्या मालाचा दर्जा टिकविण्यासाठी कारणीभूत असते, तिला इतके कमी लेखून चालणार नाही, कारण तिला वाऱ्यावर सोडल्यावर आपले काय नुकसान होते, ते आपण अनुभवतच आहोत.
 'वापरा अन् फेकून द्या' ही कल्पना - ‘वापरा अन् वापरतच राहा' अशी बदलली गेली पाहिजे.
 ज्या वेळी use & throw ही कल्पना माणसाला भावली, त्या वेळची परिस्थिती वेगळी होती. आपली लोकसंख्या आजच्यापेक्षा खूप कमी होती. प्लॅस्टिकचा शोध नव्यानेच लागला होता. त्याच्या अनेक गुणधर्मांचा मोह आपल्याला पडला होता. त्या मोहाचा चटका केवढा भयानक असतो, हे आता आपण प्रत्यक्ष पाहिले आहे. चटक्याचा अनुभव येईपर्यंत लहान मूल एकदाच विस्तवाजवळ जाते. एकदा चटका बसला की पुन्हा ते चटका खात नाही. आपल्याला चांगलेच चटके बसत आहेत. लहान मूल जर अनुभवातून शहाणे होते, तर आपण का नाही होणार ? आपण तर मोठी माणसे आहोत !

*
"हे तुम्ही करून दाखवाच"

 युरोपमध्ये म्हणे प्रत्येक नागरिक आपल्या आयुष्यातील एकदोन वर्षे सैन्यात दाखल होतो. असं सैनिकी आयुष्य जगल्यामुळे त्यांच्या वागण्यात शिस्त येते. देशाचं संरक्षण म्हणजे काय हे समजतं. देशप्रेम, देशनिष्ठा अंगी बाणली जाण्याचे हे बाळकडूच आहे.
 सैनिक देशाच्या सीमांचे रक्षण करतात. देशाच्या अंत:सीमांचे काय ? देश आतून पोखरणारे अनेक शत्रू आहेत. गुंड, तस्कर, स्वार्थी राजकारणी, या सगळ्यांबरोबर आम सामान्य माणूस हासुद्धा देशाचा शत्रूच आहे. वापरून झालेल्या वस्तू सतत इतस्तः टाकून, शहरभर कचरा निर्माण करून तो आपल्या शहराचे अंतरंग कायम घाण करत असतो. कचरा निर्माण करणे हे देशावर केलेले एक प्रकारचे आक्रमणच आहे.
 नागरिकांनी निर्माण केलेला कचरा साफ करण्यासाठी त्या कचऱ्याबरोबर लढणारे सफाई कामगार रोज थोडे-थोडे मरत असतात. या सर्व मंडळींना सफाई कामगार म्हणण्यापेक्षा सफाई-सैनिक म्हटले पाहिजे आणि त्यांना लष्करी सैनिकांचा दर्जा दिला पाहिजे.
 समजा, आपण हे मान्य केले, तर लष्करात भरती होऊन आयुष्यातील एक दोन वर्षे देशसेवेत घालवण्यासाठी आपल्याला फार लांब देशाच्या सीमेवर जायची काहीच गरज नाही.
 या सफाई सैन्यात दाखल होऊन आपणच निर्माण केलेल्या ह्या कचरारूपी शत्रूशी लढून बघा.

एक दिवस घंटागाडीवर काम कराल का ?

 हे तुम्ही करून दाखवाच अन्यथा
 शून्य कचरा ही संकल्पना आचरणात आणा.

 रोजच्या जगायच्या धावपळीत प्रत्येक माणसाकडून जो कचरा निर्माण होतो, त्याच्या निर्मूलनाच्या प्रश्नाशी आपल्याला सतत झगडावे लागत आहे. जेव्हा कचरा निर्माण होतो, तेव्हाच जर तो नाहीसा केला, तर प्रश्न चुटकीसरशी सुटेल.

 कचरा निर्मूलन म्हणजेच स्वच्छता. आपण जर संपूर्ण स्वच्छतेचा ध्यास घेतला, तर कचरा निर्मूलन आपोआपच होणार आहे. एकदा का स्वच्छता आपल्या अंगी भिनली की आपोआप चांगले विचार येतील. चांगल्या विचारांच्या मागोमाग समृद्धी येईलच येईल.
 खरे तर कुठलीही गोष्ट कचरा अशी नसतेच. आपल्याला नको असलेल्या वस्तू बेजबाबदारपणे वाट्टेल तशा टाकून देण्याच्या सवयीमुळे कचरा निर्माण होतो. हा कचरा आपणच करत असल्यामुळे त्याच्या व्यवस्थापनाची (विल्हेवाटीची) जबाबदारी प्रत्येकाचीच आहे, ही साधी गोष्ट आपण जाणीवपूर्वक विसरतो.
 कचरा व्यवस्थापनाच्या कुठल्याही चर्चासत्रात -"हे असं.. असं .. करायला पाहिजे - असे, दुस-यांनी काय करायला पाहिजे, याबद्दलच सतत बोलले जाते. - "मी हे असे.. असे केले आहे." - असे सांगणारे फारच कमी असतात. कचऱ्यासंबंधी, असे सांगण्यासारखे काहीतरी मी करू शकतो का ? ह्या विचारांतूनच - शून्य कचरा - ह्या संकल्पनेचा जन्म माझ्या मनात झाला. जसे ठरवले, तसे मी वागू लागलो.
 - शून्य कचरा - ही फक्त कल्पनाच असू शकेल असे सर्वांप्रमाणे मलाही वाटायचे. पण विचार आणि त्याप्रमाणे आचरण केल्यास ही अशक्य वाटणारी कल्पना, सहज शक्य होऊ शकते, हे मी अनुभवत आहे. यासाठी लागतात रोजची फक्त दहा ते पंधरा मिनिटे. 'कचरा' - नव्हे; नको असलेल्या वस्तू, त्या वापरून झाल्या की स्वच्छ करावयाच्या, त्यांचे वर्गीकरण करायचे, चांगल्या स्वरूपातील नको असलेल्या वस्तू पुनःप्रक्रियेसाठी द्यायच्या आणि गांडुळांच्या साह्याने जैविक वस्तूंचे रूपांतर मातीत करायचे. एवढे जर प्रत्येकाने केले, तर रोज घराघरांतून निर्माण होणा-या नको असलेल्या वस्तू नाहीशा होतील आणि शहरांतून कोप-याकोप-यांवर ओसंडून वाहणाच्या कच-याच्या कुंड्या दिसेनाशा होतील. घंटागाडी ज्या वेळी घंटा वाजवत रस्त्यारस्त्यांवरून फिरते, त्या वेळी ती माणसांच्या चुकीच्या वागण्याचा डंका पिटत गावभर फिरत आहे, असे मला वाटते.
 प्लॅस्टिकबद्दल आपण सतत तकरार करत असतो.प्लॅस्टिकमुळे कचरा होतो, हाही एक चुकीचा समज समाजात पसरवला जात आहे. प्लॅस्टिकसारखा बहुगुणी पदार्थ नाही. प्लॅस्टिकचा नाश होत नाही, म्हणजेच त्याला अमरत्वाचे देणे लाभले आहे. त्याच्या ह्या गुणाकडे आपण दोष म्हणून बघत आहोत. आपली सारी रीतच न्यारी. छोटा प्लॅस्टिक उत्पादक, जो दहा माणसांना कामाला लावून दहा कुटुंबांचा उदरनिर्वाह निर्माण करत असतो, त्याला मोठा गुन्हेगार ठरवून सर्वांत जास्त दंड केला जातो. जो दुकानदार गिऱ्हाइकांच्या सोयीसाठी प्लॅस्टिकची पिशवी देतो, त्याला दोषी ठरविले जाते आणि जो सामान्य माणूस प्लॅस्टिकची पिशवी वापरून झाली की गुपचुपपणे स्वच्छ न करता वाट्टेल तिथे टाकून देतो, तो मात्र सभ्यपणे कॉलर ताठ ठेवून समाजात उघडपणे वावरत असतो. पाउचमधील मसाला तोंडात भरून पाउच रस्त्यावर टाकणारा गुन्हेगार, का पाउचमध्ये माल भरणारा कारखानदार गुन्हेगार ? हेच आपल्याला ठरविता येत नाही.
 आपले वागणे किती विचित्र असते बघा.. सकाळी उठून सगळ्या गावातून घंटा वाजवत थोडा-थोडा करत प्रथम आपण कचरा गोळा करतो आणि मग त्याच कचऱ्याच्या ढिगासमोर बसून ........ "अरे बाप रे केवढा मोठा हा प्रश्न ? आता हा कचरा कसा नष्ट करायचा ?" यावर खल करत बसतो. कचऱ्याचा जन्म जेथे होतो, तेथेच त्याचा नाश नाही का करता येणार ?.. नक्कीच येईल.
 समजा, जर एखाद्या नगरपालिकेने असे जाहीर केले की ... नागरिकांनी केलेली घाण नेणे हे आमचे कामच नाही. आम्ही घेऊन जाणार त्या नागरिकांच्या वापरून झालेल्या, त्यांना नको असलेल्या वस्तू. आम्ही या वस्तू तेव्हाच स्वीकारू, जेव्हा त्या व्यवस्थित वर्गीकरण केलेल्या आणि स्वच्छ स्वरूपात असतील.... असे जर झाले, तर काय होईल ?
 -- स्वच्छ कपडे घातलेला एक माणूस दारावरील बेल वाजवेल, दार उघडले की तो म्हणेल, "बाई, मला तुमच्याकडील तुम्हांला नको असलेल्या आणि स्वच्छ केलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या द्या."
 -- दुसरा येईल तो म्हणेल, "मला तुमच्याकडील तुम्हांला नको असलेल्या आणि स्वच्छ केलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, रेझर, सेल्स पिना, पेन्स, रिफिल्स इत्यादी इत्यादी वस्तू द्या."
 -- तिसरा माणूस येईल तो म्हणेल, --- "काल तुम्ही हॉटेलमधून ॲल्युमिनियमच्या कटोरीतून गरमगरम भाजी मागविली होतीत. ती स्वच्छ केलेली कटोरी मला द्या."
 कचऱ्याच्या कुंडीत पडणाऱ्या कचऱ्याचे आपण जर नीट निरीक्षण केले, तर त्यात ठरावीक वस्तूच सापडतील. आपल्याला कधी त्या कुंडीत कालचे वाचून शिळे झालेले वर्तमानपत्र सापडणार नाही. कधी लोखंड आणि इतर धातूंचे सामान सापडणार नाही. दारू आणि बिअर यांच्या बाटल्या कधी कचऱ्यात पडलेल्या दिसणार नाहीत, तसेच आपले वापरून झालेले जुने कपडे कधी कोणी घंटा गाडीत टाकत नाहीत. असे का बरे असते ? या प्रश्नाचे अगदी सोपे आणि सरळ उत्तर आहे... या वस्तूंना बाजारात किंमत मिळते.  वर्तमानपत्रे रद्दी म्हणून विकली जातात,भंगारवाला धातूच्या वस्तू आणि काच विकत घेतो आणि जुन्या कपड्यांना बोहारीण भांडीरूपी पैसे देतेच की !
 म्हणजे यातून असा मथितार्थ निघतो की --- नको असलेल्या वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी सामान्य माणसाला पैसे मिळाले, तरच तो हे काम करेल !--- दाम करी काम असे म्हटले जाते, ते काही खोटे नाही. कुठल्याही सरकारी माणसाला हे काही वेगळे पटवून द्यायला नको.
 मग गरीब बिचाऱ्या बेरक्या सामान्य माणसानेसुद्धा तसेच म्हटले, तर त्यात वावगे काय आहे ? एखादा प्रश्न सोडवायचे साम, दाम आणि दंड असे तीन मार्ग असतात. ह्या पर्यायांपैकी, 'दाम' पर्यायाचा अर्थ आपण फक्त पैसे घेणे असाच गृहीत धरतो. पैसे घेण्याऐवजी जो माणूस वापरलेल्या वस्तूंचे योग्य व्यवस्थापन करेल त्याला पैसे देण्याचा विचारपूर्वक अवलंब केल्यास प्रश्न सुटू शकतात.
 क्षणभर आपण अशी कल्पना करू या की, एखाद्या नगरपालिकेला माझे म्हणणे पटले, तर त्या गावात, वापरून झालेल्या विविध वस्तूंची ‘कलेक्शन सेंटर्स’ उघडलेली दिसतील आणि त्या 'कलेक्शन सेंटर'वरील माणूस पैसे घेण्याऐवजी, पैसे देताना आपल्याला दिसेल.
 वापरून झालेल्या आणि नको असलेल्या वस्तूंचा प्रश्न एकदा सुटला की प्रश्न उरेल नको असलेल्या जैविक वस्तूंचा. हा प्रश्न खरे तर फार गहन नाही. कारण हे काम निसर्ग अगोदरच करत आहे. तुम्ही करा अथवा करू नका, सर्व जैविक पदार्थांचे मातीत रूपांतर करण्याचे काम निसर्ग अनादी-अनंत कालापासून करतच आहे. आपले काम आहे, त्याला मदत करायचे. निसर्गाला मदत हीसुद्धा हास्यास्पदच कल्पना आहे. निसर्गाला मदत असे न म्हणता त्याच्या बरोबरीने चालायची सवय आपल्याला करायची आहे. माती हे प्रत्येक सजीवाचे अंतिम स्थानक आहे. जैविक कचरा हा खरोखरच जिवंत कचरा आहे. जिवंत अशासाठी की, त्यात प्रचंड ऊर्जा साठलेली आहे. जैविक पदार्थांचे मातीत रूपांतर होते, तेव्हा ह्या ऊर्जेमुळे उत्कृष्ट प्रकारची खतयुक्त माती तयार होते.
 प्रत्येक घरामध्ये जसे देवघर असते, तशी १५ इंच X ११ इंच x ९ इंच ह्या मापाची सर्व बाजूंनी जाळीदार असलेली प्लॅस्टिकची टोपली बसवली, तर त्या टोपलीमध्ये साधारण पाच माणसांच्या कुटुंबातून निर्माण होणाऱ्या जैविक पदार्थांचे रूपांतर उत्कृष्ट गांडूळखतात करता येते. प्रत्येक घरातून जर असे गांडूळखत निर्माण होत असेल, तर ती त्या नगराची संपत्तीच असेल. रासायनिक खत-कारखाने उभारण्यासाठी आणि ते चालविण्यासाठी अनंत कोटी रुपये खर्च होत असतात. त्यातील थोडीशी जरी रक्कम ह्या घराघरांत लावलेल्या गांडूळखत प्रकल्पांना दिली, तर सामान्य माणसे दामाच्या प्रलोभनाला आकृष्ट होऊन हिरिरीने घराघरांमध्ये गांडूळखत प्रकल्प सुरू करतील.  प्रत्येक घरात गांडूळखत-प्रकल्प ही कदाचित अशक्यप्राय कल्पना असेल, पण प्रत्येक घरातून निर्भेळ असा जैविक पदार्थाचा साठा मिळायला काय हरकत आहे ? जो सामान्य माणूस बाजारातील भेसळीबद्दल तावातावाने ओरडत असतो, त्या सामान्य माणसाने उत्कृष्ट प्रतीचा, विनाभेसळ असा जैविक पदार्थांचा साठा नगरपालिकेला द्यायची जबाबदारी का उचलू नये ?
 कशी गंमत आहे बघा, आपण कचरासुद्धा दर्जेदार करू शकत नाही ! त्यातसुद्धा भेसळ! आणि ती कोण करते ?
 भेसळीविरुद्ध टाहो फोडणारा सामान्य माणूसच !

"आपण हे सहज करू शकतो."

 पाठीवर भला मोठा झोला घेऊन, कचरा कुंडीतून प्लॅस्टिक, पुठे, कागद गोळा करणाच्या बायका आपण नेहमी बघतो. किती घाणीत काम करावे लागते त्यांना ! त्यांचे नशीब आपण बदलू शकू का ? हो.... जर आपण ठरवले, तर नक्कीच!
 थोडासा विचार बदलला आणि थोडेसे आचरण बदलले तर हे सहज साध्य होईल.
 कचराकुंडीत जाणारे प्लॅस्टिक आपल्या घरातूनच जात असते. हे प्लॅस्टिक वेळीच वेगळे केले, स्वच्छ केले, घरात एका कोपऱ्यात साठवून ठेवले आणि या प्लॅस्टिक गोळा करणाऱ्या बायकांना एक दिवस सन्मानाने घरी बोलावून हे स्वच्छ, चांगले पण आपल्याला नको असलेले प्लॅस्टिक त्यांना दिले, तर त्यांना किती बरे वाटेल ! असे प्लॅस्टिक घेताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली स्मितरेषा पाहून तुम्ही सुखावून जाल.
 आजकाल शॉर्टकटचा जमाना आहे. आपल्या घरात नको असलेले प्लॅस्टिक कचराकुंडीत आणि तिथून बायकांच्या झोळ्यात जाण्याऐवजी, आपल्या घरातून थेट त्यांच्या झोळ्यात पडले, तर सर्वांचाच फायदा आहे.
 लक्षात आले, समजले, पटले अन् उमगले; तर असे वागणे खरेच काही अवघड नाही.
 एकदा प्रयत्न तर करून बघा !

१. निसर्गतः कोणतीही गोष्ट कचरा म्हणून जन्मत नाही.

२. संपूर्ण स्वच्छता - म्हणजेच - शून्य कचरा - हाच उन्नतीचा एक मार्ग आहे.
 ही गृहीतके मान्य करूनच आपण या येथे आला आहात असे गृहीत धरले आहे. कचरा कोठे अन् कसा तयार होतो, याचा शोध घेत-घेत तो नाहीसा कसा होईल, याची उत्तरे आपणाला येथे समजणार आहेत. घरात तयार होणाच्या म्हणजेच, सुसंस्कृत नागरिक तयार करत असलेल्या आणि ज्यासाठी महानगरपालिकेला साफ-सफाईसारखे मोठे खर्चीक खाते सांभाळावे लागते, अशाच कचऱ्याचा विचार आपण येथे केला आहे.
घरात कचरा निर्माण होऊ न देण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता आहे - १. चाकू : १/२” रुंद X २” लांब.
२. चार पाय असलेली प्लॅस्टिकची जाळीदार बास्केट : सुमारे १५' x ११"x ९"अविरतपात्र (फोटो पाहा).
३. फोटो रोल ज्या डबीतून मिळतो, त्या वाया गेलेल्या प्लॅस्टिकच्या ४ डब्या :फोटो रोल डबी (फोटो पाहा).
४ प्लॅस्टिकचा ट्रे : सुमारे १९' x १२' x ४' (फोटो पाहा).

५. कातरी

६. प्लॅस्टिकची मोठी पिशवी आणि झोळा (फोटो पाहा).

ह्या सर्व सामानाची मांडणी पुढीलप्रमाणे करावी -
१. प्लॅस्टिकच्या जाळीदार बास्केटला खालच्या बाजूला भोके नसल्यास भोके पाडून घ्यावीत.
२. प्लॅस्टिकच्या बास्केटला चार टोकांस चार फोटो रोल डब्या जोडून घ्याव्यात.
३. चार पाय असलेली प्लॅस्टिकची बास्केट प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये ठेवावी.
४. प्लॅस्टिकच्या बास्केटमध्ये नारळाच्या शेंड्या व उसाची चिपाडे पसरवावीत. त्यावर थोडेस सुकलेले शेण व गांडूळखत टाकावे व हलकासा पाण्याचा फवारा मारावा आणि या प्लॅस्टिकच्या बास्केटमध्ये चारपाच गांडुळे सोडावीत. आता ही प्लॅस्टिकची बास्केट तुमच्या घरातील नको असलेले सर्व जैविक पदार्थ पचविण्यास तयार झाली आहे. तुम्ही नको असलेले जैविक पदार्थ वरून या प्लॅस्टिकच्या बास्केटमध्ये टाकत जा, शक्य असल्यास हे बारीक केलेले पदार्थ मातीत घोळवून घ्या. गांडुळे त्याचे रूपांतर गांडूळखतात करतील. ही क्रिया सतत चालू राहील. म्हणूनच या प्लॅस्टिकच्या बास्केटला आपण 'अविरतपात्र' असे म्हणणार आहोत.
५. घरात निर्माण होणारे सर्व जैविक पदार्थ अविरतपात्रात बारीक करून टाकावेत त्यासाठी घरातील सुरी, चाकू, विळी अथवा कात्री यांचा वापर करावा. मिक्सर किंवा फूड प्रोसेसरवर हे पदार्थ बारीक करून टाकल्यास अति उत्तम.
६. वापरून झालेले जे जैविक पदार्थ बारीक करून अविरत पात्रात टाकले आहेत,त्यांच्यावर साधारण आठ-पंधरा दिवासांनी गांडूळखत अथवा शेणखत आणि मातीचे मिश्रण यांचा पातळसा थर द्यावा. तीन चार महिन्यांनी त्यात नारळाच्या शेंड्या आणि उसाची चिपाडे टाकावीत. ७. वरीलप्रमाणे अविरतपात्र बनवणे अवघड वाटत असेल, तर मी हे अविरतपात्र त्या व्यक्तीस बनवून द्यायला तयार आहे. अर्थात योग्य किंमत घेऊन.
८. बास्केट टाईप अविरत पात्र वापरत असताना त्यात काही अडचणी येतात. १) अविरत पात्रातील पदार्थ उंदीर या प्राण्याचे पक्वान्न आहे. त्यामुळे उंदीर,चिचुंद्रया,घुशी अथवा खार या प्लॅस्टिकच्या बास्केटवर हल्ला करतात आणि ती चक्क तोडतात. २) या अविरत पात्रातील कचरा वारंवार हलवून वर-खाली करावा लागतो. ३) हे अविरत पात्र पूर्ण भरल्यानंतर बाहेरून अस्वच्छ दिसते. वरील तीन्ही दोषांचे निवारण करणारे असे ड्रम टाइप अविरत पात्र नव्याने तयार केले आहे. हा ड्रम पूर्णपणे फायबर ग्लासचा बनवलेला असल्यामुळे त्याला उंदीर आणि इतर प्राणी तोडू शकत नाहीत. त्याचप्रमाणे हे फायबर ग्लासचे असल्यामुळे गंजतदेखील नाही. या अविरत पात्राची क्षमता २० लिटरची आहे. हे अविरत पात्र एका कुटुंबासाठी उपयोगी आहे. यापेक्षा मोठे २०० लिटर क्षमतेचे साधारणपणे १२ ते १५ कुटुंबांसाठी उपयुक्त असे महाअविरत पात्रदेखील तयार केलेले आहे.
९. घरात एका कोपऱ्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या फोटोत दाखविल्याप्रमाणे अडकवाव्यात. यातील एका पिशवीत वापरून झालेले प्लॅस्टिक स्वच्छ करून टाकावे अन् दुसरीत करवंट्या जमा कराव्यात.

नको असलेले पदार्थ घरात कुठेकुठे अन् कसेकसे तयार होतात ते आता आपण पाहू या -

अ) कागदांचा कचरा :
 सकाळपासून घरात कागद यायला सुरुवात होते. प्रथम वर्तमानपत्रे येतात. त्यातून अनेक हॅण्डबिले येतात. दुपारी टपाल येते. त्यातून पाकिटे येतात. सायंकाळी आपण हिशोब करायला बसतो, तेव्हा आपल्याच खिशातून अनेक चिठ्या-चपाट्या बाहेर पडतात. या सर्व वस्तू बघून झाल्या की त्या आपल्याला नको असतात. या वस्तूमधील फक्त वर्तमानपत्रांचे पैसे आपल्याला रद्दीतून मिळतात, म्हणून फक्त तेवढे ठेवून बाकी सर्व वस्तूंना आपण कचऱ्याच्या बास्केटमध्ये टाकतो. छोटे कागद, पॅकिंग बॉक्सेस ह्या वस्तू रद्दीवाला घेत नाही, हा आपला चुकीचा समज आहे. ज्या वस्तू रिसायकल होतात त्या सर्व तो घेतो.
या वस्तू आपण कचऱ्याच्या बास्केटमध्ये कशा टाकतो हे बघू या -
 हॅण्डबिले फाडून अथवा बोळा करून; पाकिटे वेडीवाकडी फाडून; चेक्स, रिपोर्टस आणि बिले यांना असलेली परफोरेशन्स फाडून. असे आपण का करतो ? हॅण्डबिले का फाडतो ? त्या कागदांचा बोळा का करतो ? पाकिटे वेडीवाकडी का फाडतो ? चेक्स, रिपोर्टस आणि बिले यांना असलेली परफोरेशन्स का फाडतो ? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे. ते म्हणजे उगाचच !
 म्हणजे आपल्या सवयी थोड्याशा बदलल्या, तर निदान कागदांचा कचरा तयार होणे तरी थांबेल. व्यवस्थित घड्या घालून ठेवलेले कागद रद्दीत विकता येतील. व्यवस्थित ठेवलेला बारक्यातला बारीक कागदही रद्दीवाला नक्की घेतो.
ब) स्वयंपाकघरातून तयार होणारा कचरा :
येथे नको असलेल्या वस्तू तीन वेळेला तयार होतात.
१) स्वयंपाक करण्यापूर्वी
२) स्वयंपाक व जेवणे झाल्यानंतर
३) बाहेरून आणलेल्या खाद्यपदार्थांमुळे

१) स्वयंपाक करण्यापूर्वी :
 भाजी निवडल्यानंतर प्रामुख्याने ह्या गोष्टी तयार होतात. निवडून झाल्यावर नको असलेल्या पदार्थांचे रूपांतर जर बारीक तुकड्यांत केले, तर एकतर त्यांचे आकारमान कमी होते आणि त्यांचे गांडूळखतात रूपांतर होण्यास कमी वेळ लागतो. पदार्थ बारीक करण्यासाठी सुरी, कात्री किंवा विळी यांचा उपयोग करावा. मिक्सर अथवा फूड प्रोसेसरचा उपयोग केल्यास अति उत्तम. २) स्वयंपाक व जेवणे झाल्यानंतर :
 खरे तर माणसाच्या हव्यासापाई हा कचरा तयार होतो. जेवढे पाहिजे, तेवढेच बनविले अन् जेवढे पाहिजे, तेवढेच ताटात वाढून घेतले, तर उरलेल्या अन्नाचा व उष्ट्याखरकट्यामुळे निर्माण होणारा कचरा तयारच होणार नाही. पण प्रत्यक्षात असे होत नाही. उरलेले अन्न टाकून दिले जाते आणि मग त्याचा कचरा होतो. त्याऐवजी हे उरलेले अन्न जर ‘अविरतपात्रात’ - टाकले तर, त्यापासून गांडूळ खत तरी तयार होईल. भांडी घासण्यापूर्वी जर ती विसळून घेतली, तर पानात टाकलेले अन्न ड्रेनेजमध्ये जाणार नाही. विसळलेले पाणी गाळण्याने गाळून घ्यावे. पाणी झाडांना घालावे व गाळण्यातील अन्न ‘अविरतपात्र' टाकावे.
३) बाहेरून आणलेल्या खाद्यपदार्थामुळे :
 हे पदार्थ प्लॅस्टिकच्या पिशव्यांतून, अॅल्युमिनिअमच्या वेष्टणातून अथवा अॅल्युमिनिअमच्या बॉक्समधून घरात येतात. बाहेरील आवरण व्यवस्थित उघडून आतील पदार्थ काढून घेतला व ते आवरण लगेच धुतले, तर ते अतिशय कमी श्रमांत चांगले स्वच्छ होते. साहजिकच त्या आवरणांचे रूपांतर कचऱ्यात होत नाही.
 दुधाच्या पिशवीला चाकूने जर एक छोटीशी चीर देऊन दूध काढून घेतले आणि पिशवी पाण्याने लगेच धुतली, तर दुधाची पिशवी कचरा होणार नाही. न धुता तशीच ठेवली, तर तिला आंबूस वास यायला लागेल. एकदा का घाण वास यायला लागला की पिशवीला धुणे किळसवाणे होते. कोणतीही प्लॅस्टिकची पिशवी सुरीने तीन बाजूंनी कापली तर तिचे सपाट प्लॅस्टिक तयार होते. पिशवी पाण्याने धुण्यापेक्षा हे सपाट प्लॅस्टिक धुणे सोपे जाते आणि ते जास्त चांगले स्वच्छ होते.
क) छोट्या-छोट्या वस्तूंमुळे होणारा कचरा :
 खालील गोष्टी वेळीच वेगळ्या करून, कोप-यात बांधलेल्या प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीत (झोल्यात) (फोटो पाहा) जमा करत गेल्यास त्यांचा कचरा होत नाही. या वस्तू कचरा गोळा करणा-या माणसांना दिल्यास त्यांना त्यापासून चार पैसे मिळतील आणि या सत्कर्माबद्दल थोडेसे पुण्य आपल्या पदरी पडेल.
पिशवीत टाकायच्या वस्तू :
 टूथपेस्टचे टोपण,बाटल्या - काचेच्या, प्लॅस्टिकच्या, बाटल्यांची झाकणे, दाढीचे रेझर, अॅल्युमिनिअमचे खोके, डिस्पोझेबल प्लॅस्टिकचे पेले, थर्मोकोलचे पेले, रेडीमेड कपड्यांबरोबर येणारे प्लॅस्टिक.
 त्यातून येणारे पॅकिंग मटेरिअल, प्लॅस्टिकच्या पिना, प्लॅस्टिकचे दोरे, दाढीची पेस्ट, नको असलेले अथवा वापरून झालेले किंवा मशिन्सचे मोडलेले छोटे-छोटे भाग, रिफिल्स, पेन्स, सेल, फ्लॉप्या, सीडीज, कॅसेटस्, फोटो रोलच्या डब्या, कॉन्फरन्समध्ये लावायला देतात ते छातीवर लावायचे प्लॅस्टिकचे बिल्ले, बल्ब्ज, ट्यूब्ज, प्लॅस्टिकची घासणी, औषधाच्या स्ट्रिप्स, प्लॅस्टिकचे चमचे, प्लॅस्टिकची भांडी वगैरे, वगैरे....
कवडीमोलाच्या वस्तू :
 वरील सर्व वापरून झालेल्या वस्तूंना जुन्या बाजारात किंमत मिळते. बाजारात अजिबात किंमत मिळत नाही अशी वस्तू म्हणजे पातळ प्लॅस्टिकच्या पिशव्या; गुटका, पानपराग, शांपू यांची छोटी प्लॅस्टिकची पाकिटे, प्लॅस्टिकचे दोरे, तुटलेले रबर बॅण्ड; वेफर्स, पॉपकॉर्न बिस्किटे यांची रॅपर्स; चॉकलेट, गोळ्या यांची प्लॅस्टिकची आवरणे; चहाचे कप इत्यादी. थोडासा विचार केला, तर या मंडळींनाही आपल्याला कामाला लावता येईल. कसे ते दहाव्या प्रकरणात वाचा.
 नारळाच्या करवंट्यांसाठी वेगळी पिशवी लावावी. या करवंट्या अविरतपात्रात टाकू नयेत. कारण नारळाच्या करवंट्यांचे मातीत रूपांतर होण्यासाठी सर्वात जास्त वेळ लागतो. या करवंट्या जळणासाठी वापरल्या जातात. करवंट्या एकत्र मिळाल्या, तर त्याचा जळणासाठी वापर करणाऱ्याला आनंदच होईल.
 यापेक्षा वेगळ्या प्रकारचा कचरा एखाद्या घरात तयार होत असेलही. एकदा जर का आपण मनापासून ठरवले की, मी कचरा निर्माण होऊ देणार नाही, तर त्या वेगळ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे उत्तर आपल्याला निश्चित मिळेल आणि त्या नको असलेल्या वस्तूला कचऱ्याच्या कुंडीचा रस्ता आपण नक्कीच दाखविणार नाही.

*
ट्यूब आणि पेस्ट ह्यांचा पूर्ण, स्वच्छ वापर !

 कुठल्याही पेस्टच्या ट्यूबमधून आतला पदार्थ (पेस्ट) ती ट्यूब दाबूनदाबून बाहेर काढायचा आपण आटोकाट प्रयत्न करतो. तरीपण आपल्याला सर्व पेस्ट काही बाहेर काढता येत नाही. सर्व पेस्ट बाहेर काढण्यासाठी ट्यूब गळ्यातून कापा आणि ट्यूबची खालची बाजू सुरीने उघडा. आता, सहाणेवरून आपण जसे गंध काढतो, तशी पेस्ट काढून घ्या. विशेषतः ही पेस्ट जर दात घासायची पेस्ट असेल, तर ती भांडी घासायच्या साबणाच्या डब्यात टाका. ती आपोआप वापरली जाईल. पेस्टची ट्यूब स्वच्छ झाल्यामुळे ती विकत घेणा-याला ती घेताना आनंद होईल आणि वापरून झालेल्या वस्तूचे योग्य व्यवस्थापन केल्याचे समाधान आपल्याला मिळेल.

८. एक अशक्य गुणोत्तर ?

 ठाणे शहराची लोकसंख्या आहे १८,१८,८७२. ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेत घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी आहेत २३५९, रस्ता साफसफाई कर्मचारी आहेत ९२५, घंटागाडीवरील कर्मचारी आहेत ४०४, आणि कचरा वेचक आहेत ३४४. अशी सर्व मिळून ४०३२ माणसे ठाणे शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करणार ! यांचे गुणोत्तर काढल्यास १८,१८,८७२/ ४०३२ = ४५१.११ असे उत्तर येईल. याचाच अर्थ ४५१ माणसे कचरा करणार आणि एक माणूस त्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणार !

कसे शक्य आहे हे ?
हे गुणोत्तर जेव्हा एक येईल तेव्हाच कचऱ्याचा प्रश्न सुटेल. जो कचऱ्याचा जन्मदाता, तोच त्याचा पालक. पालकाने आपल्या कचरारूपी पाल्याची जबाबदारी टाळून कसे चालेल ? म्हणूनच आपण निर्माण करत असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन प्रत्येकाने स्वतःच केले पाहिजे. ते प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.
 निसर्गतः कोणत्याही पदार्थाचे विघटन होताना ज्वलनाची क्रिया घडत असते. कचऱ्याच्या बाबतीतही हे असेच घडते. कचरा मंदज्वलन क्रियेने विघटन पावतो.

 जेव्हा हवा न लागता मंदज्वलन होते, तेव्हा त्या ज्वलनाला सडणे असे म्हणतात. या क्रियेत प्रामुख्याने घाण वास बाहेर पडतो. हा घाण वास का बाहेर पडतो ? कारण ही क्रिया घडत असताना हायड्रोजन सल्फाईड, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन, अमोनिया आणि फॉस्फाईन असे विषारी व घाण वास असलेले वायू बाहेर पडत असतात. त्याचबरोबर सडण्याच्या क्रियेत रोगजंतूंचीही वाढ होते, कारण ते वातावरण रोगजंतूंच्या वाढीस पोषक असते. इतर ज्वलनांप्रमाणे या ज्वलनातून कार्बन डाय ऑक्साईड हाही वायू बाहेर पडत असतो.
 सडण्याची क्रिया आपल्याला हानिकारक असते, म्हणूनच कचरा निर्मूलनातील सडण्याची क्रिया टाळायची असते. सडण्याच्या क्रियेचे रूपांतर कुजण्याच्या क्रियेत होण्यासाठी आवश्यक असतो तो जरासा ओलावा अन् भरपूर खेळती हवा. ह्या दोनच गोष्टी मिळाल्यावर प्रथम नाहीसा होतो तो वास (दुर्गंधी). एकदा वास बंद झाल्यावर समजावे की, सडण्याचे रूपांतर कुजण्यात होते आहे. आणि असे झाल्यावर आजूबाजूच्या सर्व सजीवांना जगणे सुसह्य होऊ लागेल.
 हवा आणि पाणी यांव्यतिरिक्त आणखीही काही गोष्टींनी आपल्याला कुजण्याची क्रिया गतिमान आणि सजीवांसाठी उपयुक्त अशी करता येते. कुजण्याच्या क्रियेतसुद्धा कार्बनडाय-ऑक्साईड व रोगजंतू यांची वाढ होत असते, पण सडण्यापेक्षा कुजण्याच्या क्रियेत रोगजंतूंची वाढ अल्प प्रमाणात होत असते.
 हवा आणि पाणी देऊन आपण वास तर थांबवला, आता आपल्याला हल्ला करावयाचा आहे तो निर्माण होणाऱ्या रोगजंतूंवर. यासाठी आपल्याला असे काही बॅक्टिरिआ तेथे निर्माण करावे लागतील की, ज्यांचे अन्न हे ‘रोगजंतू' आहेत आणि त्या बॅक्टिरिआंचे उत्सर्जन सजीवांसाठी हानिकारक नाही.
 फोटो सिंथेटिक, अॅक्टिनो मायसेटिस, लॅक्टिक अॅसिड आणि यिस्ट या पदार्थांमधून आपल्याला अपेक्षित आहेत असे बॅक्टीरिआ मिळू शकतात. हे बॅक्टिरिआ रोगजंतूना खातात व त्यांच्या उत्सर्जनातून अॅमिनो अॅसिडस, साखर, फॉस्फेट आणि सल्फेट असे पदार्थ बाहेर पडतात. या पदार्थांचा फायदा कचऱ्यातील गांडूळांना व इतर कृमींना होतो. या पदार्थांवर त्यांचे चांगले पोषण होते व त्यांची वाढ होऊ लागते.  एवढे समजल्यावर एक मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे हे बॅक्टिरिआ आणायचे कोठून ? बाजारात आपल्याला अनेक बायोकल्चरर्स मिळतात. ह्या बायोकल्चरर्समध्ये हे बॅक्टिरिआ मोठ्या संख्येने एकवटलेले असतात. ही बायोकल्चरर्स डायल्यूट करून त्यांचा शिडकावा आपल्या साठविलेल्या कचऱ्यावर रोज केल्यास, हळूहळू कचऱ्यावरच बॅक्टिरिआंची वाढ होऊ लागते व ते रोगजंतूंवर हल्ला चढवितात.
 आंबविण्याच्या क्रियेतून प्रामुख्याने ही बायोकल्चरर्स तयार होतात. पाणी आणि उबदारपणा मिळाला की आंबण्याची क्रिया चालू होते आणि बॅक्टिरिआंचा जन्म होतो. आता ही गोष्ट सरळ, साधी, सोपी अन् स्पष्ट आहे की, ज्या आंबविण्याच्या क्रिया आपल्याला चालतात त्यातून रोगजंतूंचा जन्म नक्कीच होणार नाही. सजीवांना उपयुक्त असेच बॅक्टिरिआ यांतून निपजतील. अशा कुठल्या आंबविण्याच्या क्रिया ? याचा जरा शोध घेतला, तर आपल्याला पुढील आंबविण्याच्या क्रिया चटकन लक्षात येतील.
 १) दही २) यिस्ट ३) इडलीचे पीठ ४) अनारशाचे पीठ ५) बिअर ६) देशी दारू ७) नारळाचे पाणी - निरा, ताडी, माडी हे पदार्थ एक प्रकारची बायोकल्चरर्सच आहेत. हे पदार्थ जर आपण कचऱ्याच्या ढिगावर टाकले, तर आपले उद्दिष्ट साध्य होईल.
 बऱ्याच वेळा कचऱ्यावर चिलटे जमा झालेली दिसतात. चिलटे दुर्गंधीला आकृष्ट होतात, म्हणूनच ती प्रामुख्याने घाणीवर जमा होतात. म्हणजे चिलटे जमा होणे हे सडण्याची क्रिया सुरू झाल्याचे द्योतक आहे. तेव्हा चिलटे दिसली की त्या कचऱ्यावर लगेच बायोकल्चर्सचा मारा सुरू करावा. म्हणजे कचऱ्यात उपयुक्त बॅक्टिरिआची वाढ होऊ लागेल. हे बॅक्टिरिआ प्रथम रोगजंतूंवर हल्ला करतील. ह्याचे उत्सर्जन हे कचऱ्यातील किडे आणि गांडुळे यांचे उपयुक्त अन् पोषक खाद्य असेल, त्यामुळे कचरा फस्त करणाच्या गांडुळांची संख्या वाढेल व हळूहळू सडण्याच्या क्रियेचे रूपांतर कुजण्याच्या क्रियेत होईल. यासाठी काही कालावधी निश्चितपणे जाईल. तोपर्यंत चिलटांचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल, तर काट्याने काटा काढावा.
 म्हणजे कसे, तर चिलटे घाण वासाला आकृष्ट होतात, तर आपण या वासाला प्रतिवासाचे अस्त्र चिलटांवर सोडायचे, आपल्या दैनंदिन जीवनात उग्र वासांचे अनेक पदार्थ सहज उपलब्ध असतात. यादीच करायची झाली, तर..... १) झेंडूची फुले २) गवती चहा ३) बिना साखरेच्या चहाचा वापरलेला चोथा ४) कुंपणाला लावतात ती मेंदीची पाने ५) कडुलिंब ६) करंज्याच्या बियांची पेंड ७) ओव्याच्या झाडाची पाने ८) सीताफळाच्या झाडाची पाने ९) सीताफळाचे साल १०) कांद्याचा रस ११) लिंबाच्या सालीची पूड १२) कडू कारले १३) मिठाचे सौम्य पाणी १४) पापडखार १५) वेखंडाची पावडर १६) शिकेकाई १७) बाजारात मिळणारे सिंगल सुपर फॉस्फेट १८) पोटॅशियम फॉस्फेट, वगैरे... वगैरे... वगैरे. चिलटे येऊ लागल्यास वरील पदार्थ त्या कचऱ्यावर टाकावेत.

याही उपायाला जर चिलटांनी दाद दिली नाही, तर चक्क बाजारात मिळणारा छोटा एक्झॉस्ट अथवा केबिन फॅन, अविरतपात्रावर हवेचा झोत जाईल असा बसवा. दिवसातून थोड्यावेळ जरी हा पंखा चालू ठेवला, तरी चिलटे नाहीशी होतील. पंखा किती मोठा वापरायचा आणि कधी अन् किती वेळ चालू ठेवावा लागेल हे अर्थातच आपण अविरतपात्रात काय टाकले आहे त्यावर अवलंबून आहे.
 आजकाल आपली घरे खूपच लहान झाली आहेत. अविरतपात्र जर व्यवस्थित वापरले, तर छोट्या घरातसुद्धा ते चालू शकते. तरीपण काही लोकांच्या मनात ‘गांडूळे घरात इतस्तः वावरतील का ?' ‘चिलटं झाली तर काय करायचं ?' “घरात घाण वास येईल का ?', असल्या प्रश्रांनी अविरतपात्राबद्दल भीती असते. या भीतीपोटी ही मंडळी अविरतपात्र घरात लावू शकत नाहीत. मग त्यांनी काय करायचे ? जैविक कचरा असाच रस्त्यावर टाकून द्यायचा ! खचितच नाही. अशा वेळीसुद्धा आपल्याकडे एक मार्ग आहे.
 जैविक पदार्थ म्हणजेच आपण खातो ते आपले अन्न. त्याचे पोटात पचन होते आणि राहिलेले नको असलेले पदार्थ आपण विष्ठेवाटे बाहेर टाकून देतो. ही क्रिया जर आपण टाकून द्यायच्या जैविक पदार्थांवर केली, तर अविरत पात्राची जरूर लागणार नाही. एक मिक्सर या कामासाठी नेमावा. तोंडात अन्न जसे बारीक करून पोटात ढकलले जाते, तसे या मिक्सरमध्ये सर्व टाकाऊ जैविक पदार्थ बारीक करावेत आणि तयार झालेली पेस्ट चक्क ड्रेनेज लाईन मध्ये टाकावी. ड्रेनेज लाईन तुमचीच आहे. ती चोकअप झाली, तर तुम्हांलाच त्रास होईल. त्यामुळे नको असलेले आणि वापरून झालेले सर्व जैविक पदार्थ जास्तीत जास्त बारीक करावेत.
 अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्या ब्रह्माला असं ड्रेनेज लाइनमध्ये कसं सोडायच ही शंका काही शंकेखोर मंडळींना अस्वस्थ करीलच. अन्न पदार्थांतील उपयुक्त घटक म्हणजेच ब्रह्म. ते तर तुम्ही काढून घेतले आहे. मग राहिलेले, नको असलेले, वापरून झालेले किंवा अन्यथा तुम्ही टाकून देणार आहात ते पदार्थ ब्रह्म कसे असतील ? ते अब्रह्मच. तेव्हा त्यांना जास्तीत जास्त अगदी पेस्ट स्वरूपात बारीक करून ड्रेनेज लाइनमध्ये टाकायला काहीच हरकत नाही. असं करण्यात एकच तोटा आहे, तो म्हणजे अविरतपात्रातून मिळणारे खत आपल्याला मिळणार नाही, पण परिसर स्वच्छ तर राहील.
 'कचरा निर्मूलन','शून्य कचरा' हे एक प्रकारचे युद्धच आहे. कारण येथे सतत जिवंत गोष्टींशी आपली गाठ पडते. युद्ध दोन गटांत चालते. एका गटाने एक चाल केली की त्यावर मात करण्यासाठी दुसरा गट त्यावर दुसरी चाल करतो. येथेही असेच होते. चिलटांवर झेंडूच्या फुलांचे अस्त्र सोडले की काही दिवसांतच चिलटे झेंडूच्या फुलांना मानेनाशी होतात. झेंडूच्या वासाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यात तयार होते. तो निसर्गनियमच आहे. अशा वेळी चिलटांसारख्या क:पदार्थ प्राण्यावर विजय मिळविण्यासाठी दुसरे कुठले तरी ‘वासास्त्र' त्यांच्यावर सोडणे भाग आहे. हे सतत चालणारे चक्र आहे. तेव्हा या लढाईला अंत नाही.
 नुसते अविरत पात्रात कचरा टाकून कचरा निर्मूलन होणार नाही. त्या पात्राकडे सतत जागरूकपणे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तरच आपण विजयाची इच्छा धरू शकतो. अन्यथा चिलटांकडून हार पत्करण्याची नामुष्की आपल्यावर येईल.
 तेव्हा सावधान ! शत्रू सीमेपर्यंत आला आहे. विजयासाठी तयार व्हा !

अडचणी येणार,
प्रश्न पडणार,
थोडासा विचार केल्यास त्यातून मार्गही नक्कीच सापडणार.....
प्रश्न आहे, तुम्ही मनापासून ठरविणार आहात का की,
....... मी कचरा निर्माण करणार नाही.......
*

 अमरत्व घेऊन जन्मलेल्या प्लॅस्टिकला पापी अशी उपाधी लागावी, असा काय अपराध त्या प्लॅस्टिकने केला ? मानवाच्या अथक प्रयत्नांनतर प्लॅस्टिक बहुगुणी व बहुउपयोगी ठरले. मात्र, त्याचा नाश होत नाही हा त्याचा गुण, गुण न राहता अवगुण बनला. याला जबाबदार कोण, प्लॅस्टिक की आपण ?
 प्लॅस्टिकच्या पातळ पिशवीकडे आपण जरा वेगळ्या नजरेने बघू या. इतक्या कमी खर्चात, इतक्या कमी वजनात, इतक्या कमी जागेत मावणारी ही प्लॅस्टिकची पातळ पिशवी, कितीतरी किलो सामान इकडून तिकडे वाहून नेण्यासाठी आपल्या उपयोगी पडते, शिवाय तिला आपण वारंवारही वापरू शकतो.
 पण आपण असे करत नाही, कारण का, तर ही प्लॅस्टिकची पातळ पिशवी अगदी कवडीमोलाने, जवळजवळ फुकटच आपल्याला मिळत असते. फुकट मिळालेल्या कोणत्याही गोष्टीची किंमत नसते, असे म्हणतात ते खरे आहे.
 वस्तू वापरून झाल्यावर ती टाकून द्यायची, हे माणसाच्या नसानसांत मुरलेले आहे. या पातळ पिशवीमुळे किंवा कुठल्याही प्लॅस्टिकच्या आवरणामुळे आतला माल आपल्यापर्यंत सुस्थितीत पोहोचला आहे, याचा विचार माणूस क्षणभरही करत नाही. इतका शिकलेला माणूस असे का वागतो ? कारण असे वागणे ही त्याची सहज प्रवृत्ती आहे, आणि दुसरे कारण म्हणजे या वापरून झालेल्या प्लॅस्टिकचे करायचे काय ? या प्रश्नाचे उत्तर त्याला माहीत नाही आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या पातळ प्लॅस्टिकपासून त्याला पैसे मिळत नाहीत ! उद्या जर हे पातळ प्लॅस्टिक विकत घेतले जाऊ लागले, तर ते नक्कीच रस्त्यावर टाकले जाणार नाही.
 पण आज परिस्थिती अशी आहे की, सहज म्हणून कोठेही नजर फिरवा, आपल्याला पातळ प्लॅस्टिक दिसतेच दिसते. आज ते नुसते दिसते आहे; पण आपण जर वेळीच जागे झालो नाही, तर हेच इतस्तत: पडलेले प्लॅस्टिक आपले जगणे मुश्कील करेल किंवा सहज जगण्यासाठी आपल्याला जबरदस्त किंमत मोजावी लागेल.
 अनेक जण अनेक उपाय सुचवत असतात. ते तर आपण आचरणात आणलेच पाहिजेत. वापरून झालेल्या प्लॅस्टिकचे काहीतरी करू या, त्याला टाकून तरी नको देऊ या, एवढा कमीतकमी विचार जरी प्रत्येकाने केला, तरी एक पाऊल पुढे टाकल्यासारखे होईल.
 प्लॅस्टिक टाकून द्यायचे नाही हे एकदा ठरवल्यावर खरेदीला बाहेर पडताना आपण आपसूकच घरातील प्लॅस्टिकची पिशवी घेऊनच बाहेर पडू, आपण दुकानदारकडे पिशवी मागणार नाही. असे केल्याने प्लॅस्टिकच्या एका पिशवीचा वापर कमी होईल. तरीदेखील, आपल्या घरात अनेक मार्गानी पातळ प्लॅस्टिक रोज येतच असते, त्याचे काय करायचे ?
 येणारे प्लॅस्टिक टाकायचे नाही, असे आपण आता ठरविले आहे. ते प्लॅस्टिक आपल्याला आपल्याजवळ ठेवायचे आहे. त्यामुळे आता ती पिशवी किंवा तो रॅपर किंवा ते सँचेट स्वच्छ करणे हे ओघाने आलेच ! प्लॅस्टिकची पिशवी सुरीच्या साहाय्याने तिन्ही बाजूंनी कापून उघडली, तर तिचे रूपांतर सपाट प्लॅस्टिकमध्ये होईल. आता हे प्लॅस्टिक सहज धुऊन कोरडे करता येईल. अशा प्लॅस्टिकपासून एक नवे उत्पादन बनू शकते.
 सोबतच्या फोटोत आपल्याला प्लॅस्टिकचा एक पॅकिंग पाउच' दिसत आहे. त्यावर पुढील चार वाक्ये लिहिली आहेत -

 हा पॅकिंग पाउच एका वेगळ्या जाड प्लॅस्टिकच्या पिशवीपासून बनविला असून, ते प्लॅस्टिक सहजासहजी फाडता येत नाही; आणि पाउच चारी बाजूंनी सिलबंद असल्यामुळे आत भरलेले पातळ प्लॅस्टिक बाहेर येत नाही.
 कारखान्यातून बाहेर पडणारा माल पॅक करण्यासाठी सध्या गवत/पेपरवूल/फोमचे तुकडे/थर्मोकोलचे तुकडे असे विविध पदार्थ वापरले जातात. एकदा का पॅकिंग उघडले की या पदार्थांचे काय करायचे, असा प्रश्न असतो. या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नसते. म्हणून मग त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचा सोपा मार्ग अवलंबिला जातो.  सध्या वापरात असलेल्या पॅकिंग मटेरियलऐवजी जर चित्रात दिसणारा पॅकिंग पाउच पॅकिंगसाठी वापरला, तर तो वापरून झाल्यावर आपल्याला परत-परत वापरता येणार आहे. तो आकाराने खूप लहान नाही, त्यामुळे त्याला टाकून दिले जाणार नाही. आणि खूप मोठाही नाही त्यामुळे तो कोठे ठेवायचा, हा प्रश्न पडणार नाही. आणि समजा, एखाद्याने तो फेकून दिलाच, तर तो आपला परिसर विद्रूप करणार नाही.
 या पॅकिंग पाउचमध्ये नक्की कोणते प्लॅस्टिक घालायचे, हा प्रश्न एवढे सांगूनही काही जणांच्या मनात येईल. या प्रश्नाचे उत्तर समोर दिसणाऱ्या प्लॅस्टिकला पुढील चार प्रश्न विचारले असता, लगेच मिळेल -
१. हे प्लॅस्टिक वापरून झाले आहे का ?
२. हे प्लॅस्टिक स्वच्छ आहे का ?
३. हे प्लॅस्टिक मऊ आहे का ?
४. ह्या प्लॅस्टिकला बाजारात किंमत मिळत नाही का ?
 ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जर होकारार्थी आली, तर ते प्लॅस्टिक पॅकिंग पाउचमध्ये बंद करायला योग्य आहे, असे समजावे.
 लोकांनी टाकून दिलेले प्लॅस्टिक उचलायचे, ते साफ करायचे आणि त्याचा पॅकिंग पाउच बनवायचा तर तो महाग होईल.
 मग कारखानदार तो विकत कसा घेईल ?
 वापरून झालेले प्लॅस्टिक जर स्वच्छ करून कोरडे केले, तर ते पुन्हापुन्हा वापरता येईल. रद्दीवाल्याकडे जर आपण हे पातळ प्लॅस्टिक घेऊन गेलो, तर तो ते विकत घेत नाही; पण त्याच स्वच्छ अन् कोरड्या, वापरून झालेल्या प्लॅस्टिकचे चित्रात दिसतात त्याप्रमाणे पॅकिंग पाउच केलेत, तर कोणताही कारखानदार ते वाजवी भावात सहज विकत घेईल.
 अर्थात असे करण्यासाठी थोडासा व्यावसायिक दृष्टिकोन हवा. तो प्रत्येक माणसाला कसा असेल ? पण प्रत्येक माणूस पातळ प्लॅस्टिकची पिशवी वापरतोच. जर मनापासून ठरवलं, तर पॅकिंग पाउचऐवजी तुमच्या घरातून वापरून झालेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून तुम्ही उशी किंवा उशा बनवू शकता. तुम्ही जर जास्तच पातळ प्लॅस्टिकचा वापर करत असाल, तर त्यापासून गाद्या तक्के, रजया ह्या वस्तूसुद्धा बनू शकतील.
 वापरून झालेले आणि वाऱ्यावर सोडलेले प्लॅस्टिक म्हणजे एक महाभयंकर राक्षस आहे. या राक्षसाच्या मुसक्या बांधून आपण त्याला पॅकिंग पाउचमध्ये जेरबंद केल्यावर तो आपल्या सेवेला अनंतकाल हजर राहणार आहे. असे करण्याने आपला परिसर स्वच्छ होईल, हा केवढा मोठा फायदा आहे.*  सर्व पुस्तक वाचून झाल्यावर किंवा माझी संपूर्ण शून्य कचरा ही संकल्पना समजून घेतल्यावर काही लोकांच्या मनात ही संकल्पना मोठ्या स्वरूपात सोसायटी स्तरावर कशी राबवता येईल याचे विचारचक्र सुरू होते. खरेतर माझा स्वत:चा सामुदायिकरीत्या कचऱ्याचा प्रश्न हाताळण्यास विरोध आहे. कचरा जेथे तयार होतो तेथेच त्यावर प्रक्रिया करणे हे सर्वांत कमी खर्चाचे आणि सोपे असते. परंतु आपल्या समाजात सर्व गोष्टी मोठ्या स्तरावर, सामुदायिकरीत्या आणि समारंभपूर्वक करायची लोकांना भारी हौस असते. असे करण्यातील धोके आणि अडचणी प्रथम विचारात घ्यायला हव्यात. त्यांची यादी करायची झाल्यास ती अशी होईल.
 १) कचऱ्यापासून खत बनविण्याच्या कामात सर्वांत महत्त्वाची आणि मूलभूत गरजेची गोष्ट असते ती म्हणजे सोसायटीतील सर्व सभासदांचे सहकार्य आणि सहयोग. बहुतेक संकुलांत या दोन गोष्टींचा प्रामुख्याने अभाव असतो. आपल्या बहुतेक सोसायट्या ह्या नावालाच को-ऑपरेटीव्ह सोसायट्या असतात.
 २) सामुदायिकरीत्या प्रकल्प राबवायचा झाल्यास एका कुटुंबासाठी जे अविरत पात्र काम करते त्याच्यापेक्षा आकाराने मोठे अविरत पात्र बनवावे लागेल. अविरत पात्राचा आकार संकुलातील सभासदांच्या संख्येवर अवलंबून राहील. त्यासाठी साधारणपणे कमीतकमी १00 चौरस फूट जागा लागेल. साहजिकच त्यासाठी लागणारा खर्चही जास्तच असणार आहे.
 ३) कल्पना करू या की एखाद्या सोसायटीत अशी जागा आहे आणि सोसायटी पैसेदेखील खर्च करायला तयार आहे. या प्रकल्पाला पहिला विरोध होईल तो ज्या सभासदाच्या घराजवळ हा प्रकल्प उभा राहणार आहे त्या सभासदाकडून आणि तेथेच प्रकल्प गोठेल.
 ४) समजा होणारा विरोध डावलून एखाद्या सोसायटीत उत्साहाच्या भरात प्रकल्प सुरू केला, तर त्या प्रकल्पावर काम कोणी करायचे असा प्रश्न निर्माण होईल. बहुतेक जण लगेच म्हणतात की, “आमचा कचरेवाला किंवा सोसायटीचा वॉचमन ते काम करेल.' सोसायटीतील सभासदांनी कचरा करायचा आणि त्याचे व्यवस्थापन कचरेवाला किंवा वॉचमन लोकांनी का करायचे? एखाद्या माणसाला घाण काम करायला लावणे हा सामाजिक अन्याय आहे. ह्या मानसिकतेतूनच आपल्याकडे जातिव्यवस्था निर्माण झाली आहे.
 ५) आजकाल आणि भविष्यात कचरा व्यवस्थापनातील घाण काम करायला माणसे मिळणार नाहीत आणि मिळालीच तर त्यांना भरपूर मोबदला द्यावा लागणार आहे. त्यामुळे माणूस न मिळाल्यामुळे किंवा त्याला द्यावा लागणारा मोबदला सभासदांच्या कुवतीपलीकडे जाऊ लागला तर प्रकल्प बारगळणार.
 ६) कोणताही प्रकल्प राबविण्यासाठी एक मॅनेजर आणि ऑपरेटर लागतो. मॅनेजर म्हणून सभासदांपैकी एखादी व्यक्ती सुरुवातीला तयार होईल. पण त्या सभासदाने किती दिवस काम करायचे? इतर सभासदांपैकी कोणी त्याच्या जागेवर आपणहून काम करण्यास तयार होईल का? या प्रश्नाचे उत्तर बहुतेक ठिकाणी नाही असेच येईल. मग त्या काम करणाऱ्या सभासदाला वाटू लागेल, मीच का म्हणून हे काम करायचे ?' समजा बाहेरचा माणूस नेमला, तर पुन्हा जादा पैशांचा भार सोसायटीला सहन करावा लागणार आणि प्रकल्प बारगळणार.
 ७) समजा एका सोसायटीत ३० सभासद आहेत आणि त्यांनी जागा, पैसे आणि मनुष्यबळ वापरून प्रकल्प सुरू केला आणि वरील कारणांमुळे तो प्रकल्प काही दिवसांनंतर बंद पडला तर यश ०% आले असे म्हणावे लागेल. त्याऐवजी तीस सभासदांनी आपापल्या घरात अविरतपात्र बसवून प्रकल्प सुरू केला आणि काही दिवसांनी ३० पैकी २० जणांनी अविरत पात्र वापरणे बंद केले तर यश ३३% टक्के मिळाले असे म्हणावे लागेल. तेव्हा ०% चांगले का ३३% चांगले ते तुम्हीच ठरवा.
 म्हणून सामुदायिकरीत्या असे प्रकल्प राबवू नयेत असे माझे प्रांजळ मत आहे. वरील सर्व अडचणींवर मात करून असे दोन प्रकल्प दोन ठिकाणी कार्यरत आहेत. ती ठिकाणे आहेत
 १) डोंबिवली-अंबरनाथ रस्त्यावरील खोणी या गावातील अमेय पालक संघटनेच्या घरकुल या मतिमंद मुलांचे वसतीगृह. रोज येथे ५० जणांचे जेवण बनते. हे घरकुल गावाबाहेर आहे. त्यांच्या कुंपणापलीकडे मोकळे रान आहे. तिकडे कचरा टाकून त्यांचा प्रश्न सुटणार होता. पण या संस्थेचे संस्थापक श्री.बर्वे सरांना हे असे करणे मान्य नव्हते. ते माझ्याकडे आले. आम्ही तेथे ६'x४'x३' या आकाराचे अविरत पात्र बांधले. तेथील सर्व कर्मचाऱ्याना प्रशिक्षित केले. आज हा प्रकल्प अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे.
 २) डोंबिवली येथील टिळक नगरमधील वृंदावन सोसायटीतील श्री. महेश खरे हे घरापुरते अविरत पात्र वापरत होते. सोसायटीतील इतर सभासदांचा कचरा त्यांना बाहेर जाऊ द्यायचा नव्हता. त्यांच्या संकुलात मोठ्या आकाराचं ड्रम टाइप महाअविरत पात्र बसवले आहे. हे महाअविरत पात्र २00 लिटर क्षमतेचे आहे आणि १२ ते १५ सभासदांसाठी ते पुरेसे आहे. श्री. महेश खरे जातीने या प्रकल्पाकडे बघतात.

 या दोन ठिकाणी हे शक्य होते. तर अन्य सधन, सुसंस्कृत शिकल्यासवरलेल्या पैसेवाल्या मंडळींना ते का जमत नाही? याला काय म्हणावे?
 नुकताच ताजा असलेले अनुभव मी आपणा सर्वांस सांगू इच्छितो. मी रोज सकाळी फिरायला जातो. येताना वाटेवर असलेल्या दत्ताचे दर्शन घेऊन परततो. साधारण तीन महिन्यांपूर्वी मला देवळातील पुजारी भेटले. ते एका पिंपात निर्माल्य गोळा करत होते. पिंप भरलेलं होतं, म्हणून त्यांना निर्माल्य दाबूनदाबून भरावं लागत होतं.

 मी त्यांना विचारलं, “काय करता या निर्माल्याचं ?
 "काय करणार? झाडूवाल्याला सांगतो कुठेतरी टाकून यायला."
 "तो कुठं टाकतो?"
 "माहीत नाही. घेऊन जातो खरा."
 योगायोगानं झाडूवालादेखील तिथंच उभा होता.
 पुजाऱ्यानं त्याला विचारलं, "काय रे, कुठे टाकतोस हे सर्व?"
 मी कोणीतरी सरकारी अधिकारी असेन असं त्याला वाटलं म्हणून तो सांगायला तयार नव्हता. पुजाऱ्यानं त्याला माझ्याबद्दल खात्री देताच तो म्हणाला,"असंच उचलतो आणि नेऊन टाकतो लांब खाडीत."
 दोघांच्याही चेहऱ्यावर असहायतेचे भाव होते.
 मी विचारलं "इथंच निर्माल्याचं खत का नाही करत?"
 "मालक नाही म्हणतात! या निर्माल्यामध्ये अनंत प्रकार असतात."
 "कोणते कोणते ?"
 "फुलं, हार या शिवाय गुळ असतो, खोबरं असतं, फुलवाती असतात, कापसाची वस्त्र असतात, भिजवलेल्या कणकेचे गोळे असतात, उदबत्या, मेणबत्या, काड्यापेटीतील जळक्या काड्या, कागद, शिवाय प्लॅस्टिकाच्या आणि कागदाच्या बंद पाकीटांत डालडा, अबीर, गुलाल, हळद कुंकू हेही असतं. हारामध्ये प्लॅस्टिकचे चकाकणारे गोळे असतात. पुष्पगुच्छात थर्माकोलचे बारी बारीक गोल असतात. अशा अनेक गोष्टी लोक निर्माल्यात टाकतात."
 अरे बापरे!"आता याचं खत करायचं म्हणजे हे सगळं वेगळंवेगळं करायला हवं. ते कोण करणार?"
 "म्हणजे खरा प्रश्न हे सगळं वेगळं कोण करणार हा आहे तर ?"
 "हो ना!"
 "पण मला सांगा, हे सगळं तुम्ही एकत्र का करता? आणि हे प्लॅस्टिकच्या पिशवीत असं गच्चं का बांधता ?"
"टाकायला सोपं जातं ना!"
 मी दत्ताला नमस्कार केला आणि बाहेर पडलो. माझ्या डोक्यातून तो निर्माल्याचा ढीग काही जात नव्हता. आपण दत्ताचं काही तरी देणं लागतो असं सारखं वाटू लागलं. असहाय दत्त मला अस्वस्थ करू लागला.
 दुसऱ्या दिवशी मी फिरायला जाताना एक प्लॅस्टिकची पिशवी बरोबर घेऊन गेलो.
 देवळात पुजारी दत्तावरचे हार आणि फुलं उरतवत होते. मी त्यांना म्हणालो, "थांबा, ते हार आणि ती फुलं बाकीच्या निर्माल्यात न टाकता ह्या पिशवीत भरा. म्हणजे आपोआपच ती वेगळी होतील." पुजार्‍यांनी माझं ऐकलं. पण त्यांच्या पुढे प्रश्न होता आता पिशवीतील हारफुलांचे करायचं काय?
 मी त्यांची शंका लगेच दूर केली.
 "मी ह्या पिशवीतील हार आणि फुलं घरी घेऊन जाणार आहे." पुजारी माझ्याकडे बघतच राहिले.
 मी ती पिशवी घेऊन आलो. पिशवीतले हार आणि फुलं बाहेर काढली. हारातून फुलं वेगळी केली. फुलांच्या पाकळ्या वेगळ्या केल्या. पाकळ्यांच्या विघटनाच्या वेगापेक्षा हारातील दोच्यांचा विघटनाचा वेग कमी आहे म्हणून मला त्या निर्माल्यातून दोरा वेगळा काढायलाच हवा होता. मी एक बास्केट घेतली आणि त्यात त्या सर्व पाकळ्या भरल्या. माझ्या समोर दिसणारा फुलांचा ढीग दहाएक मिनीटांत इवलासा झाला.
 पुजार्‍यांना वाटलं होतं माझा उत्साह दोन दिवस टिकेल. मी मात्र आठवडाभर नियमितपणे दत्ताची सेवा करत होतो.
 आता पुजारीसुद्धा हार आणि फुलं माझ्यासाठी वेगळी काढून ठेवत होते.
 मी जेव्हा हारातून फुलं वेगळी काढायचो, तेव्हा दर दहा फुलांमागे एक घडी केलेलं पान मिळायचं. हारात पान का गुंफतात? मला प्रश्न पडायचा. हार चांगला दिसावा किंवा फुलांपेक्षा पानांची किंमत कमी हा व्यापारी दृष्टिकोण त्या पानांमागे दडला असणार हे सत्य नाकारता येत नाही.
 खरं तर झाडांची पानं तोडताच कामा नयेत. कारण पान हे झाडाचं नाक आहे. पण हे कोण कोणाला सांगणार? आणि कोण कोणाचं ऐकणार? मला एक युक्ती सुचली. मी पुजार्‍यांना हारात पान गुंफणं कसं चुकीचं आहे हे पटवून देऊ शकलो. मी त्यांना सांगितलं तुम्ही दत्ताच्या भक्तांना सांगा ह्या दत्ताला पानांची अॅलर्जी आहे.!  ते पुजारी खरचं सांगतील का भक्तांना ? त्यांनी नाही सांगितलं, तरी हा मुद्दा निसर्गप्रेमी लोकांच्या नजरेत आणून द्यायलाच हवा.
 आज तीन महिने होतील, मी नियमितपणे दत्ताच्या निार्मल्यावर काम करत आहे. हे करताना मला एक आत्मिक सुख मिळतं. रोज एक ते पाच किलोच्या दरम्यान हार आणि फुलं असतात. म्हणजे सरासारी दिवसाला अडीच किलो धरली तर ९० दिवसांचे २२५ किलो निर्माल्य माझ्या रोजच्या दहा ते पंधरा मिनिटं खर्च करण्यानं मार्गी लागलं आहे. आता माझ्याकडे दोन बास्केट आहेत, एकीत मी फुलांच्या पाकळ्या करून टाकतो. दुसरीत नुसती फुलं टाकतो. आणि एक दिवस सर्व फुलं आमच्या आवारातील जांभळाच्या झाडाच्या अळ्यात टाकतो. आमच्या सोसायटीत एकच झाड आहे. मात्र झाडाच्या अळ्यातली फुलं लवकर विघटन पावतात असा माझा अनुभव आहे. त्यानंतर बास्केटमधल्या पाकळ्यांचा नंबर लागतो. आणि संपूर्ण फुलं असलेल्या बास्केटमधील निर्माल्याला विघटन पावायला जास्त वेळ लागतो. तिन्ही प्रकारांत कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही.
 उत्सवाच्या काळात आपल्याकडे निर्माल्यासाठी मोठे घट उभे केले जातात. सर्व निर्माल्य एका घाटात टाकून आपण काय साध्य करतो? अनेक ठिकाणचे निर्माल्य एकत्र करणं मुळात चुकीचं आहे, हेच आपल्याला का समजत नाही याचच आश्चर्य वाटतं. सर्व निर्माल्य एकत्र करण्याऐवजी प्रत्येकानी थोडेथोडं निर्माल्य देवाचा प्रसाद म्हणून घरी घेवून जावं आणि त्याचे व्यवस्थापन करावं. देव नक्की खूश होईल आणि खूश झाला की तो पावेलही.
 पेढे, बर्फी, साखरफुटाणे, नारळ, लाडू असा प्रसाद घरी नेण्याऐवजी प्रसाद म्हणून निर्माल्य घरी नेण्याचे धारिष्ठ्य स्वत:ला निसर्गप्रेमी म्हणवणारे तरी करणार आहेत का? किंवा हेच धारिष्ठ्य ‘स्वच्छ भारत अभियानात स्वत:हून काम करणारे दाखवू शकणार आहेत का? निदान लोकांना हे पटवून देण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेणार आहेत का ?
 आपल्याला आपला परिसर स्वच्छ ठेवायचा आहे ना? मग प्रसाद म्हणून निर्माल्य घरी न्यायलाच हवं किंवा मूर्तीवर हार-फुलं घालायची सवय स्वत:हून बंद करायला हवी. आपण यातलं काय स्वीकारणार आहोत ?

*
१३. थोडक्यात

 १) कचऱ्याकडे एका वेगळ्या नजरेने बघा.
 २) कचरा नव्हे, त्या आहेत सगळ्या वापरलेल्या वस्तू--

म्हणजेच 'वाव !'

 ३) 'वाव'चे जन्मदाते आपणच आहोत.
 ४) या पाल्याचे ('वाव'चे) व्यवस्थापन आपणच केले पाहिजे.
 ५) कोणतीही गोष्ट टाकून अथवा फेकून द्यायची नाही एवढेच मनाशी ठरवा.
 ६) लवकर विघटन होणाऱ्या वस्तूंचे रूपांतर अविरत पात्राच्या साहाय्याने घरच्या घरी खतात करा.

 ७) कागदाचे बोळे करू नका, कागद टराटर फाडून त्याचे बारीक तुकडे करू नका. सर्व कागद रद्दीत
 
विकले जातात.

 ८) जाड, कडक, वजनदार असे प्लॅस्टिक अथवा धातूच्या वस्तू भंगारवाल्यास द्या.
 ९) प्लॅस्टिकच्या पिशव्या सुरीच्या साहाय्याने तीन बाजूंनी कापा. आता हे प्लॅस्टिक धुणे, साफ करणे सोपे जाईल.
 १०) स्वच्छ केलेले प्लॅस्टिक कचरा वेचकांना द्या. कचरा वेचक जे पातळ, स्वच्छ, मऊ, प्लॅस्टिक घेणार नाहीत त्यांचे पाऊचेस बनवा आणि कारखानदारांना पॅकिंग मटेरिअल म्हणून द्या किंवा मला आणून द्या अथवा ज्या कंपनीतून ते प्लॅस्टिक आले त्या कंपनीस ते प्लॅस्टिक परत पाठवा. (गांधीगिरी) कंपनीत असे रॅपर्स परत येऊ लागले की एक दिवस त्या कंपन्या असे रॅपर्स बनवतील की ते परतपरत वापरता येईल.
 ११) एवढे केलेत की तुमच्याकडे टाकायला/फेकायला काही उरणारच नाही.
 १२) एवढे सगळे सांगूनही आपण असे वागणार नसाल, तर सहजपणे कोणालाही नावे ठेवायचा हक्क आपण गमावलेला असेल.

***
 आज बारा वर्षानंतर काय साध्य झाले; असा जेव्हा मी विचार करू लागतो, तेव्हा असे लक्षात येते की, “वापरून झालेली वस्तू टाकायची नाही' हा माझा शरीरधर्म झालेला आहे. माझाच नव्हे तर आमच्या घरातील सर्वांचा. छोट्या स्वराला आणि विहानला तर ते जन्मापासून मिळालेले बाळकडूच आहे, असे म्हटले तर ते वावगे होणार नाही.

 शरीरधर्म म्हणजे जितक्या नकळत आम्ही श्वास घेत असतो, जितक्या अनाहूतपणे आम्ही सकाळी उठल्याबरोबर दात घासतो, बाहेर जाताना जितके नकळत आरशासमोर उभे राहून केसातून कंगवा फिरवून चेहऱ्याला पावडर लावतो; तितक्या सहजपणे आम्ही वापरून झालेल्या वस्तूंचे व्यवस्थापन करतो. ते करताना आम्हाला वेगळा विचार करावा लागत नाही. थोडादेखील त्रास होत नाही.
 ‘टाकायचे नाही, हेच शून्य कचरा या संकल्पनेचे सार आहे. आजमितीस ‘शून्य कचरा' या संकल्पनेच्या प्रसारासाठी शून्य कचरा या पुस्तकाच्या मराठीत १२,०००, हिंदीत १०००, गुजरातीत १०००, इंग्लिशमध्ये ३००० प्रती म्हणजे एकूण १७,००० प्रती समाजात वितरित झाल्या आहेत. मराठीची ही १३वी आवृत्ती प्रकाशीत झाली आहे. मराठी आणि इंग्लिशमधील संगणकीय पुस्तक (e-book) तयारच आहे. आजपर्यंत ते मी अनेक जणांना पाठवले आहे. अंदाजे दोन-तीनशे अविरत पात्रे मी लोकांना बनवून दिली आहेत. शून्य कचरा' या संकल्पनेवर अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. ईटीव्ही आणि झी२४ तास, लोकमत News 18 ह्या वाहिन्यांवर माझ्या मुलाखती घेतल्या गेल्या आहेत. अनेक वृत्तपत्रे आणि मासिके ह्यांतून माझे लेख पसिद्ध झाले आहेत. १००,००० पॅकिंग पाउचेस बनवून मी ते आमच्या कारखान्यातून माल बाहेर पाठवताना वापरले आहेत. जर मी हे १००,००० पाउचेस केले नसते, तर ह्या पाउचेसमधले प्लॉस्टिक आसमंतात बागडत राहिले असते आणि आपला परिसर विद्रूप झाला असता.
 माझे पाउचेस करणे बघून अन् शून्य कचऱ्याबद्दल सतत ऐकून आमच्या सुनिता मावशीत केवढा बदल झाला. आज त्या ज्या दहा घरांत स्वयंपाक करण्यास जातात, त्या दहा घरांतून रोज सकाळ-संध्याकाळ येताना वापरून झालेले, स्वच्छ, मऊ, ज्याला बाजारात किंमत नाही, असे प्लॅस्टिक, पाउच बनवण्यासाठी घेऊन येतात. त्यांना मी काय देतो? काहीही नाही. सुनीता मावशीप्रमाणेच संगिता बागुल नावाच्या एक गृहिणी मला प्लॅस्टिक आणून देतात, मुंबईच्या रंजना इंगळे नावाच्या वयस्क आजी वापरून झालेले प्लॅस्टिक मला आणून देण्यासाठी त्यांच्या मर्सिडीज गाडीतून येतात. आमचे दोन्ही व्याही श्री. केळकर आणि दापोलीचे श्री. करंदीकर, मित्तल टॉवरमधील नेहा दळवी, सौ. भावे, प्राची भिडे, अश्विनी जोगळेकर, लता मावशी पुण्याचे माधव आणि रेखा आणि सीमा वहिनी माझे मित्र सुमुख जोशी, आनंद ओक आणि देवेंद्र निमकर, नरेन्द्र आपटे वापरून झालेले प्लॅस्टिक त्यांच्या घरात जमा करून ठेवतात आणि जेव्हा भेटतील तेव्हा ते मला पाऊचमध्ये भरण्यासाठी आठवणीने देतात. ह्याशिवाय ज्यांची मला नावेदेखील माहीत नाहीत असे अनेक लोक आमच्या सोसायटीच्या वॉचमनच्या केबिनमध्ये वापरून झालेले प्लॅस्टिक माझ्यासाठी आणून ठेवतात. कळव्याच्या नेनेबाई, रत्नागिरीच्या सौ. करमरकर, अंबेजोगाईचे डॉ. खुरसाळे, पुण्याच्या सौ. विजया जोशी, रोह्याचे श्री. सुखद राणे आणि त्यांच्या सौ. समृद्धी राणे यांनी इंदूर ते नाशिक असा सायकल प्रवास करत असताना प्रवासात माझ्या प्रस्तुत पुस्तकाचे वाटप करून शून्य कचरा या संकल्पनेचा प्रचार केला. शून्य कचरा या संकल्पनेचा प्रचार करताना अनेक लोकांनी आपल्याला योग्य वाटेल' अशी पुस्तकाची किंमत अदा करून या कार्यात आर्थिक मदत केली आहे. मुंबई महानगर पालिकेने एक वर्ष त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या परीक्षेसाठी ‘शून्य कचरा' हे पुस्तक अभ्यासासाठी लावले होते. पुण्याच्या सौ. गोरे ह्यांनी संक्रांतीचे वाण म्हणून ही पुस्तके वाटली.
 ही सर्व माणसे कोण आहेत? ती सामान्य माणसे आहेत. या माणसांमध्ये एकही प्रसिद्ध व्यक्ती नाही, सेलिब्रेटीदेखील नाहीत किंवा राजकारणी नाहीत अथवा एकही सरकारी वरिष्ठ अधिकारी नाही. हा बदल सामान्य माणसात होतो आहे, म्हणजेच तो बदल मुळापासून होत आहे. प्रसिद्धीसाठी केलेला वरवरचा दिखाऊ बदल नाही.
 माणसांचे वागणे असे बदलायला हवे. ‘वापरून झालेली वस्तू टाकायची नाही हा त्यांचा श्वास व्हायला हवा.
 काय, हे शक्य आहे का? बारा वर्षांनंतर मागे वळून बघताना माझ्या अनुभवावरून मला तरी ते अशक्य वाटत नाही.
 हीच माझी एका तपाची कमाई !

 आणखीन काय हवे?
________________