Jump to content

शिवमहिम्नस्तोत्र

विकिस्रोत कडून

पुष्पदन्त उवाच

महिम्न: पारं ते परमविदुषो यद्यसद्दशी ।
स्तुतिर्ब्रह्मादीनापि तदवसन्नास्त्वयि गिरः ॥
अथावाच्यः सर्व स्वमतिपरिणामावधि गृणन् ।
ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः ॥१॥

पुष्पदन्त म्हणतो - हे शंकरा, तू सर्वांची दु:खे हरण करतोस म्हणून तुला हर म्हणतात. त्या तुझा हराचा अपार महिमा न जाणणाऱ्यांनी केलेली स्तुती जर अयोग्य असेल तर ब्रह्मादि थोर थोर देवांनी केलेली तुझी स्तुतिसुद्धा अयोग्यच म्हणावी लागेल; कारण त्यांना तरी तुझा संपूर्ण महिमा कोठे कळला आहे! आपापल्या बुद्धीप्रमाणे सर्वांनी स्तुती केली तरी त्यात काही दोषास्पद नाही; असे असेल तर हे हरा! माझाही हा स्तुतीचा प्रयत्न निरपवादच होय. ॥१॥


अतीतः पन्थानं तव च महिमा वाड्मनसयो ।
रतद्व्यावृत्या यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि ॥
स कस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः ।
पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न वचः ॥२॥

हे हरा, तुझा महिमा वाणी आणि मन यांच्या मार्गापलीकडचा आहे; वेद सुद्धां भीतभीतच आणि 'नेति नेति' म्हणजे असे नव्हे, असे नव्हे अशा प्रकारे नकारात्मकच ज्याचे कसेतरी वर्णन करतात, त्या तुझी स्तुती करण्यास कोण समर्थ आहे? तुझे किती विविध गुण आहेत? तू कोणाच्या वर्णनाचा विषय होणार? परंतु या अनिर्वचनीय निर्गुणरूपाचे अलीकडील जे भक्तानुग्रहार्थ स्वीकारलेले वृषभ वाहन, जटाजूटधारी, पार्वती परमेश्वरस्वरूप याकडे कोणाचे मन आणि वाणी जडणार नाही? सर्वांचेच जडेल. ॥२॥


मधुस्फीता वाचः परममृतं निर्मितवतस्तव ।
ब्रम्हन् किं वागपि सुरगुरोर्विस्मयपदम्‌ ॥
मम त्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवतः ।
पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसिता ॥३॥

हे ब्रह्मरुपी शिवा, मधासारख्या माधुर्याने ओतप्रोत भरलेल्या आणि अमृततुल्य अशी वेदरुपी वाणी श्वासोच्छ्वासाप्रमाणे सहज निर्माण करणारा असा तू, त्या तुला प्रत्यक्ष ब्रह्मदेवाची किंवा बृहस्पतीची वाणी तरी चमत्कृतिजनक कशी वाटेल. असे असतानाही हे त्रिपुरनाशका, तुझ्या गुणवर्णनाच्या पुण्याने आपली वाणी पवित्र करावी याच केवळ हेतूने माझी बुद्धी तुझे गुणवर्णन करण्यास प्रवृत्त झाली आहे. ॥३॥


तवैश्वर्य यत्तज्जगदुदयरक्षाप्रलयकृत्‌ ।
त्रयीवस्तु व्यस्तं त्रिसृषु गुणभिन्नासु तनुषु ॥
अभव्यानामस्मिन् वरद रमणीयामरमणीं ।
विहन्तुं व्याक्रोशीं विदधत इहैके जडप्रिय: ॥४॥

हे वरदायका, सर्व जगाची उत्पत्ति, रक्षण आणि विनाश करणारे, वेदांनी वर्णिलेले आणि सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या योगाने ब्रह्मा, विष्णु, महेश्वर अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तीमध्ये प्रकट झालेले असे जे तुझे माहात्म्य; त्यालाही नावे ठेवून दोष देणारे मंदबुद्धि पुरुष दुर्दैवी आणि अडाणी जनांनाच प्रिय वाटतात, परंतु सज्जनांना मात्र अतिशय कंटाळा आणणारा कोलाहल करतात. ॥४॥


किमीहः किंकायः स खलु किमुपायस्त्रिभुवनं ।
किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च ॥
अतर्क्यैश्वर्ये त्वय्यनवसरदुःस्थो हतधियः ।
कुतर्कोऽयं कांश्र्चिन् मुखरयति मोहाय जगतः ॥५॥

तो कोलाहल असा की, 'परमेश्वर जगत निर्माण करतो असे म्हणता तर तो कोणत्या रुपाने, कशाप्रकारे, कशापासून, कशाच्या आधाराने आणि कोणत्या उपायांनी निर्माण करतो ते सांगा पाहू. जसा मातीपासून कुंभार घडा निर्माण करतो, तसाच हा. मग त्यात विशेष ते काय? ते सांगता येत नसेल तर तुमचा परमेश्वर नसलाच पाहिजे.' असले कुतर्क हे मूढबुद्धि लोक सगळ्या जगाला मोह उत्पन्न करण्यासाठी वारंवार बडबडत असतात. परंतु कल्पनातीत आणि अघटित घटना घडविणाऱ्या तुझ्या माहात्म्यापुढे ते सर्व कुतर्क फोल आहेत. ॥५॥


अजन्मानो लोकाः किमवयवन्तोऽपि जगताम्‌ ।
अधिष्ठातारं किं भवविधिरनादृत्य भवति ॥
अनीशो वा कुर्याद् भुवनजनने कः परिकरो ।
यतो मन्दास्त्वां प्रत्यमरवर संशेरत इमे ॥६॥

ते कसे फोल आहेत पहा, हे सर्व अवयवयुक्त असणारे लोक काय जन्मलेलेच नाहीत की काय? जन्मलेलेच आहेत तर या सर्व जगताची उत्पत्ति कर्त्यावाचूनच होते काय? बरे; तो कर्ता ईश्वरावाचून दुसरा कोणी असेल तर त्याच्याजवळ हे जगत निर्माण करण्याची सामग्री तरी कोणती आणि कोठून आली ! स्वतःच्या शरीराची रचनासुद्धा ज्याला कळत नाही तो या चतुर्दश भुवनांची रचना कशी करू शकणार? तेव्हा अशा सर्व जगताची उत्पत्ति, लय करणारा परमेश्वरावाचून कोण आहे? पण हे देवा, असे असूनही जे तुझ्याविषयी संशय बाळगितात त्यांना खरोखर मूढच म्हटले पाहिजे. ॥६॥


त्रयी सांख्यं योगः पशुपतिमतं वैष्णवमिति ।
प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च ॥
रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिलनानापथजुषां ।
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णवइव ॥७॥

सर्व वेदविद्या, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, शैवागम, वैष्णवशास्त्र अशा वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये हेच श्रेष्ठ, हेच हितकर अशा समजुतीने रुचिवैचित्र्यामुळे बऱ्यावाईट नानाप्रकारच्या मार्गांनी उपासना करणाऱ्या सर्व मानवांना आपल्या उपासनेच्या योगाने साक्षात वा परंपरेने, जसा आकाशातून पडलेल्या जलबिंदूना सागर हाच एक प्राप्तव्य असतो तसा तूच एक परमेश्वर मिळवावयाचा आहेस. ॥७॥


महोक्षः खट्वा परशुरजिनं भस्म फणिनः ।
कपालं चेत्तीयत्तव वरद तन्त्रोपकरणम्‌ ॥
सुरास्तां तामृद्धिं दधति तु भवद् भ्रूप्रणिहितां ।
न ही स्वात्मारामं विषयमृगतृष्णा भ्रमयति ॥८॥

हे वरदा, तुझ्या कौटुंबिक संसाराची साधने वृद्ध नंदिकेश्वर, खट्वांग, परशु, गजचर्म किंवा व्याघ्रचर्म, चिताभस्म, सर्प आणि नरकपाल हीच आहेत. परंतु तुझ्या सेवेने आणि कृपादृष्टीने देव मात्र पाहिजे ती संपत्ति मिळवू शकतात. जो इतरांवर कृपा करून त्यांना समृद्ध करतो तो स्वतः मात्र असा दरिद्री परिवारात का राहतो; याचे कारण एवढेच की जो सच्चिदानंद परमात्मस्वरूपांत नेहमी रमणारा त्याला हे वेगवेगळ्या रुपरसगंधादि विषयांचे मृगजळ कधीच मोह उत्पन्न करू शकत नाही. ॥८॥


ध्रुवं कश्र्चित्सर्व सकलमपरस्त्वध्रुवमिदम्‌ ।
परो ध्रोव्याध्रौव्ये जगति गदति व्यस्तविषये ॥
समस्तेऽप्येतस्मिन्पुरमथन तैर्विस्मित इव ।
स्तुवञ् जिर्‍हेमि त्वां न खलु ननु धृष्टा मुखरता ॥९॥

कोणी शास्त्रज्ञ हे सगळे जग शाश्वत (उत्पत्ति विनाशरहित) आहे असे म्हणतात, दुसरे कोणी म्हणतात की ते सर्वथा अशाश्वतच आहे. तिसरे तर्कशास्त्री म्हणतात की जगामध्ये काही पदार्थ शाश्वत आणि काही अशाश्वत अशी वेगवेगळी व्यवस्था आहे. अशा विद्वानांच्या भिन्नभिन्न मतांमुळे आश्र्चर्यचकित होऊनही हे त्रिपुरहरा ! तुझी स्तुती करण्यात मला लाज वाटत नाही. कारण वाचाळतेचे धारिष्ट काही विशेषच असते. ॥९॥


तवैश्र्वय यत्नाद्यदुअपरि विरिञ्चिर्हरिरध: ।
परिच्छेत्तुं यातावनलमनलस्कन्धवपुषः ॥
ततो भक्तिश्रद्धाभरगृरु गृणभ्द्यां गिरिश यत्‌ ।
स्वयं तस्थे ताभ्यां तव किमनुवृत्तिर्न फलति ॥१०॥

हे कैलासपते ! अग्नीप्रमाणे तेजःपुंज शरीर धारण करणाऱ्या तुझ्या माहात्म्याचे परिणाम ठरविण्याकरिता वर भूरादि सप्तलोकात ब्रह्मदेव आणि खाली पातालादि सप्तलोकात विष्णु मोठ्या प्रयत्नाने जेवढे जाणे शक्य तेवढे गेले, परंतु त्यांना ते परिणाम ठरविताच आले नाहीत. तेव्हा भक्तिपूर्वक तुझी सेवा आणि स्तुतीच करीत राहिले आणि नंतर तुझा साक्षात्कार त्यांना झाला. खरेच सेवा काय करू शकत नाही? (तर सर्व प्रकारचे फल देऊ शकते.) ॥१०॥


अयत्नादापाद्य त्रिभुवनमवैरव्यतिकरम्‌ ।
दशास्यो यद् बाहूनभृत रणकण्डूपरवशान् ॥
शिरः पद्मश्रेणीरचितचरणाम्भोरुहबलेः ।
स्थिरायास्त्वभ्दक्तेस्त्रिपुरहर विस्फूर्जितमिदम्‌ ॥११॥

हे त्रिपुरमथना! रावणाला सर्व निर्वैर असे त्रिभुवनाचे राज्य त्याची रणकंडू वृत्ती न शमतांच सहज प्रयत्नांवाचून मिळाल्यामुळे त्याचे वीसही हात तसेच राहिलें; त्याच्या हातांची रग जिरली नाही. हे जे विशेष सामर्थ्य रावणाला प्राप्त झाले ते त्याने आपली नऊ मस्तके तुझ्या चरणकमली समर्पण करून जी दृढभक्ति दाखवली त्या भक्तीचाच प्रभाव होय. ॥११॥


अमुष्य त्वत्सेवासमधिगतसारं भुजवनम्‌ ।
बलात्‌ कैलासेऽपि त्वदधिवसतौ विक्रमयतः ॥
अलभ्या पातालेऽप्यलसचलिता ष्ठशिरसि ।
प्रतिष्ठात्वय्यासाद् ध्रुवमुपचितो मुह्यति खलः ॥१२॥

हे महेश्वरा, याच रावणाची तुझ्या सामर्थ्यापुढे काय अवस्था झाली बरे ! तुझ्याच सेवेने सामर्थ्यसंपन्न झालेल्या बाहूंचा उपयोग तुझ्याच वसतिस्थानावर - कैलासपर्वतावर करून त्या पर्वताला जोराने उपटण्याचा रावण आपल्या वीस हातांनी उपदव्याप करू लागला; तेव्हा तुम्ही सहज पायाच्या अंगठ्याच्या टोकाने तो पर्वत दाबून ठेविताच रावण त्याच्याखाली दडपून जाऊ लागला. त्याची पाताळातसुद्धा स्थिरता होईना अशी स्थिती झाली. खरोखर दृष्ट प्राणी थोडासा समृद्धिसंपन्न होताच अविचारी होऊन कृतघ्न बनतो. ॥१२॥


यदृद्धिं सुत्राम्णो वरद परमोच्चैरपि सतीम्‌ ।
अधश्चक्रे बाणःपरिजनविधेयत्रिभुवनः ॥
न तच्चित्रं तस्मिन् वरिवसितरि त्वच्चरणयोर्न ।
कस्या उन्नत्यै भवति शिरसस्त्यय्यवनतिः ॥१३॥

हे वरदायका ! त्या बाणासुराने सगळे त्रैलोक्य आपले दास बनविले आणि इंद्राचे फारच मोठे असलेले जे ऎश्वर्य त्यालाही कमीपणा आणला; यात तुझ्या चरणांची सेवा करणारा जो बाणासुर त्याच्याविषयी फारसे आश्वर्य करण्याचे कारण नाही. कारण तुझ्या चरणी आपले मस्तक भक्तीने विनम्र केले असता कोणाची उन्नति होणार नाही बरे? ॥१३॥


अकाण्डब्रह्माण्डक्षयचकितदेवासुरकृपा विधेयस्यासीद्यस्त्रिनयनविषं संहतवतः ॥
स कल्माषः कण्ठे तव न कुरुते न श्रियमहो ।
विकारोऽपि श्र्लाघ्यो भुवनभयभव्यसनिनः ॥१४॥

हे त्रिनयना ! समुद्रमंथनाचे वेळी उत्पन्न झालेले कालकूट विष जेव्हा सर्व ब्रह्मांडाला जाळू लागले तेव्हा हा अवेळी होऊ लागलेला ब्रह्मांडाचा क्षय पाहून भ्यालेल्या देवदानवांच्या प्रार्थनेने कृपावंत होऊन त्या विषाचे प्राशन तुम्ही केले, त्यामुळे तुमच्या कंठाला जो नीलवर्णाचा डाग पडला तो कंठाला शोभाच देत नाही काय? खरेच आहे की जगाची भीती नष्ट करण्यासाठी झटणाऱ्याचा दोषही प्रशंसनीय होत असतो. ॥१४॥


असिद्धिर्था नैव क्वचिदपि सदेवासुरनरे ।
निवर्तन्ते नित्यं जगति जयिनो यस्य विशिखाः ॥
स पश्यन्नीश त्वामितरसुरसाधारणमभूत्‌ ।
स्मरःस्मर्तव्यात्मा न ही वशिषु पथ्यः परिभवः ॥१५॥

हे ईश्वरा! ज्या मदनाचे बाण देव, दानव, मनुष्य यासह सर्व जगामध्ये नेहमीच विजय मिळवून कधीही कार्य साधल्यापासून परत फिरलेच नाहीत, असा तो मदन तुलाही इतर देवांसारखाच मानून जेव्हा तुझ्यावर आपले बाण सोडू लागला तेव्हा तुझ्या केवळ दृष्टिक्षेपानेच दग्ध होऊन गेला आणि नावच तेवढे शेष राहिले. कारण जितेंद्रिय लोकांविषयी तिरस्कार बुद्धि दाखविणे हितकर नव्हे. ॥१५॥


मही पादाघाताद् व्रजति सहसा संशयपदम्‌ ।
पदं विष्णोर्भ्राम्यभ्दुजपरिघरुग्णग्रहणम्‌ ॥
मुहुर्द्यौर्दौःस्थ्यं यात्यनिभृतजटाताडिततटा ।
जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वामैव विभुता ॥१६॥

हे शंकरा! तू जगाच्या रक्षणासाठीच तांडवनृत्य करतोस. परंतु तुझ्या नृत्यप्रसंगीच्या पायाच्या आघाताने ही भूमी एकदम संशयात पडते. आता आपला प्रलय होणार की काय असे तिला वाटू लागते. विष्णुपद अंतरिक्ष हे तुझ्या नृत्यप्रसंगीच्या गरगर फिरणाऱ्या हातांमुळे नक्षत्रग्रहगणासह पीडित होऊन जाते. तसेच स्वर्गलोक तुझ्या मोकळ्या सुटलेल्या जटांच्या ताडनाने वारंवार घाबरून जातो. खरेच, प्रभुत्व हे काही वेगळेच आहे.मोठ्यांच्या आचरणामागील हेतु सामान्य लोकांना आकलनच होत नाही. ॥१६॥


वियव्दयापी तारागणगुणितफेनोद्रमरुचिः ।
प्रवाहो वारां यः पृषतलघु दृष्टः शिरसि ते ॥
जगद् व्दीपाकारं जलधिवलयं तेन कृतमि ।
त्यनेनैवोन्नैयं धृतमहिम दिव्यं तव वपुः ॥१७॥

महेश्वरा, सर्व आकाशभर पसरलेला आणि तारागणांच्या योगाने ज्याच्या फेसाची शोभा अधिकच वाढलेली आहे असा जो गंगाजलप्रवाह, तुझ्या मस्तकावर एकाद्या बिंदूसारखा लहान दिसतो. पण त्याच जलप्रवाहाने हे समुद्रवलयांकित जगत व्दीपाच्या आकाराचे बनविले आहे. यावरूनच तुझ्या दिव्य शरीराचे मोठेपण किती हे तर्किले पाहिजे. ॥१७॥


रथः क्षोणी यन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो ।
रथो चद्रार्कौ रथचरणपाणिः शर इति ॥
दिधक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमाडम्बरविधिः ।
विधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतन्त्राः प्रभुधियः ॥१८॥

हे महादेवा, त्या त्रिपुरासुररूपी तृणाला जाळून टाकण्याकरिता केवढा हा खटाटोप! भूमीचा रथ केला, ब्रह्मदेव सारथी झाला, मेरुपर्वत हे धनुष्य, चंद्रसूर्य ही त्या रथाची चाके आणि चक्रधर विष्णु याची बाणाच्या ठिकाणी योजना केलीस. खरेच आहे की, ईश्वराचे संकल्प किंवा इच्छा आपल्या स्वाधीन असणाऱ्या पदार्थांशी खेळ करीत असतात. कारण त्या परतंत्र नसतात. ॥१८॥


हरिस्ते साहस्रं कमलबलिमाधाय पदयोर्यदेकोने तस्मिन्निजमुदहरन्नेत्रकमलम्‌ ॥
गतो भक्त्युद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषा ।
त्रयाणां रक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम्‌ ॥१९॥

हे त्रिपुरहरा! एकदा विष्णु तुझ्या चरणांवर सहस्र कमलांचे अर्पण करण्यासाठी बसला असता, वाहता वाहता पाहतो तो त्यात एक कमळ कमी पडू लागले. तेव्हा ती नियमित सहस्र संख्या पूर्ण करण्यासाठी विष्णूने आपले नेत्र कमळ आपल्या हाताने उपटून समर्पण केले आणि आपला संकल्प पुरा केला. इतकी उत्कृष्ट भक्ती केल्यावर तिचे फळ म्हणून तूच स्वतः सुदर्शनचक्राचे रूप धारण करून त्या रूपाने विष्णूच्या हाती राहून तिन्ही जगतांच्या रक्षणार्थ जाग्रुत आहेस. ॥१९॥


क्रतो सुप्ते जाग्रत्‌ त्वमसि फलयोगे ऋतुमताम्‌ ।
क्व कर्म प्रध्वस्तं फलति पुरुषाराधनमृते ॥
अतस्त्वां संप्रेक्ष्य ऋतुषु फलदानप्रतिभुवम्‌ ।
श्रुतौ श्रद्धां बदध्वा दृढपरिकरः कर्मसु जनः ॥२०॥

भगवन्! यज्ञकर्म संपून गेल्यावर यज्ञकर्त्याला त्याचे फळ देण्याविषयी तूच जागृत असतोस, कारण विनाश पावलेल्या कर्माचे फळ त्या फलदात्या परमेश्वराच्या (तुझ्या) आराधनेवाचून कोठेतरी मिळेल काय? म्हणून श्रौतस्मार्त सर्व यज्ञांमध्ये फलप्राप्तीला तूच जामीन आहेस असे जाणून वेदवचनावर श्रद्धा ठेवून लोक निरनिराळे यज्ञ करण्याकरिता उद्युक्त होत असतात. ॥२०॥


क्रियादक्षो दक्षः क्रतुपतिरधीशस्तनुभृताम्‌ ।
ऋषीणामार्त्विज्यं शरणद सदस्याः सुरगणाः ॥
क्रतुभ्रेषस्त्वत्तः क्रतुफलविधानव्यसनिनो ।
ध्रुवं कर्तुः श्रद्धाविधुरमभिचाराय ही मखाः ॥२१॥

हे सर्वरक्षका, भक्तिश्रद्धापूर्वक योग्य कर्म केले तरच फलप्राप्ती होते, नाहीतर अनर्थ कसा होतो हे तुम्हीच दाखविले आहे. सर्व प्रजेचा स्वामी आणि स्वतः यज्ञकर्मामध्ये निपुण असणारा असा दक्ष प्रजापति हा यजमान, त्रिकालज्ञ भ्रुगु आदि ऋषि हे ऋत्विज्ञ, सर्व देव हे सदस्य, अशी सर्व सामग्री असूनही यज्ञफलदानाचे व्यसनच ज्याला आहे अशा तुजकडूनच त्या यज्ञाचा विध्वंस झाला. खरेच आहे की भक्तिविरहित यज्ञ हे यजमानाला फलप्रद न होता नाशालाच कारण होतात. ॥२१॥


प्रजानाथं नाथ प्रसभमभिकं स्वा दुहितरम्‌ ।
गतं रोहिदभूतां रिरमयिषुमृष्यस्य वपुषा ॥
धनुष्पानेर्यातं दिवमपि सपत्राकृतममुम्‌ ।
त्रसन्तं तेऽद्यापि त्यजति न मृगव्याधरभसः ॥२२॥

हे जगन्नियामका! हा प्रजानाथ ब्रह्मदेव आपली कन्या जी सुंदर अशी संध्या तिला पाहून कामुक झाला आणि तिच्याजवळ जाऊ लागला, तेव्हा ती लज्जेने मृगरुपी झाली. तेव्हा तोही मृगाचे रूप धारण करून अतिशय कामुकपणाने तिच्याशी रममाण होण्याकरीता गेलेला पाहून सर्व जगताचा नियामक जो तू त्या त्वा हाती पिनाकधनुष्य घेऊन त्याच्यावर बाण सोडलास; तो बाण त्याच्या शरीरात पिसाऱ्यासह शिरल्याने ब्रह्मदेव भयाने स्वर्गात गेला. तथापि अजूनही तुझा तो मृगव्याधाचा वेग आणि उत्साहातिरेक तुला सोडीत नाही. तो शर अजूनही मृगाच्या मागेच आहे. ।।२२॥


स्वलावण्याशंसाधृतधनुषमहनाय तृणवत्‌ ।
पुरः प्लुष्टं दृष्ट्वा पुरमथन पुष्पायुधमपि ॥
यदि स्त्रैणं देवी यमनिरतदेहार्धघटनाद् ।
अवैति त्वामद्धा बत वरद मुग्धा युवतयः ॥२३॥


श्मशानेष्वाक्रीडा स्मरहर पिशाचाः सहचराश्र्चिताभस्मालेपः स्नगपि नृकरोटीपरिकरः ॥
अमल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलम्‌ ।
तथापि स्मर्तुणां वरद परमं मलमसि ॥२४॥

हे मदननाशना! तुझी क्रीडा स्मशानामध्ये, तुझे जोडीदार पिशाच्च; चिताभस्म हे तुझे उटणे आणि गळ्यात मृत माणसांच्या कपालांची माला; हे तुझे सगळे आचरण पाहिले तर अतिशय अमंगल आहे. परंतु तुझे स्मरण करणारे जे भक्त त्यांना मात्र हे वरप्रदा तू निरंतर मंगलकारकच असतोस. ॥२४॥


मनः प्रत्येकचित्ते सविधमवधायात्तमरुतः ।
प्रह्नष्यद्रोमाणः प्रमदसलिलोत्सतिदृशः ॥
यदालोक्याहलादं -ह्द इव निमज्यामृतमये ।
दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत्किल भवान् ॥२५॥

योगी लोक यथाविधि पाणायामादि अष्टांग योगसाधनांच्या योगाने आपले मन विषयांपासून परावृत्त करून ह्दयकमळामध्ये स्थिर केल्यावर त्यांच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहतात आणि नेत्रही हर्षाश्रूंनी भरून जातात. अशा रितीने जे काही तत्त्व पाहिल्यावर अमृताच्या डोहात बुडी मारल्याप्रमाणे त्यांच्या अंतःकरणात अपरिमित आल्हाद होतो ते तत्त्व म्हणजे, हे शंकरा! तूच आहेस. ॥२५॥


त्वमर्कस्त्वं सोमस्त्वमसि पवनस्त्वं हुतवह्स्त्वमापस्त्वं व्योम त्वमु धरणिरात्मा त्वमिति च ॥
परिच्छिन्नामेवं त्वयि परिणता बिभ्रतु गिरम्‌ ।
न विद्यस्तत्तत्त्वं वयमिह तु यत्त्वं न भवसि ॥२६॥

तू सूर्य आहेस; तू चंद्र आहेस; तू वायु आहेस; तू अग्नि आहेस; तू जल आहेस; तू आकाश आहेस; तूच पृथ्वी आहेस आणि आत्माही तूच आहेस. अशारीतीने विद्वान लोक तुझे अष्टमूर्तिरूपी वर्णन करितात ते करोत, परंतु आम्हाला तर जगात असे कोणतेच तत्त्व आढळत नाही की जे तू नव्हेस! ॥२६॥


त्रयीं तिस्त्रो वृत्तीस्त्रिभुवनमथों त्रीनपि सुरान् ।
अकाराद्दैर्वर्णैस्त्रिभिरभिदधत्तीर्णविकृति ॥
तुरीयं ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभिः ।
समस्तं व्यस्तं त्वां शरणद गृणात्योमिति पदम्‌ ॥२७॥

हे शरणागतरक्षका महेश्वरा! तीन वेद, जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति ह्या अंतःकरणाच्या तीन अवस्था, तीन भुवने आणि ब्रह्मा, विष्णु, महेश्वर हे तीन देव यांना अकारादि तीन वर्णांनी (अकार, उकार, मकार) प्रतिपादन करून आणि विकाररहित तसेच सूक्ष्म ध्वनींनी बोध करणारे ओम्‌ हे पद चतुर्थ रूपाचे ज्ञान करून समस्त म्हणजे समष्टिरूप आणि व्यस्त म्हणजे व्यष्टिरूप अशा तुझेच वर्णन करिते. ॥२७॥


भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सहमहांस्तथा ।
भीमेशानाविति यदभिधानाष्टकमिदम्‌ ॥
अमुष्मिन् प्रत्येकं प्रविचरति देव श्रुतिरपि ।
प्रियायास्मै धाम्ने प्रविहितनमस्योऽस्मि भवते ॥२८॥

हे देवा! भव, शर्व, रुद्र, पशुपति, उग्र, सहमहान म्हणजे महादेव, भीम आणि ईशान हे जे तुझे नामाष्टकं आहे, या प्रत्येक नावाच्या ठिकाणी वेदवचने ओंकाराप्रमाणेच प्रवृत्त होतात; म्हणजे ही सर्व नामेही वेदप्रतिपादितच आहेत. म्हणून अत्यंत प्रिय आणि चैतन्यस्वरूपी अशा तुला मी नमस्कार करतो. ॥२८॥


नमो नेदिष्ठाय प्रियदव दविष्ठाय च नमो ।
नमः क्षोदिष्ठाय स्मरहर महिष्ठाय च नमः ॥
नमो वर्षिष्ठाय त्रिनयन याविष्ठाय च नमो ।
नमः सर्वस्मै ते तदिदमिति शर्वाय च नमः ॥२९॥

हे निर्जनवनप्रिया ! अत्यंत जवळ तसेच अत्यंत दूर राहणाऱ्या तुला नमस्कार असो. हे कामांतका ! अतिशय लघु तसेच अतिशय महान अशा तुला नमस्कार असो. हे त्रिनयना ! अतिशय वृद्ध तसेच अतिशय तरुण अशा तुला नमस्कार असो. सर्वरूपी अशा तुला नमस्कार असो. परोक्ष आणि अपरोक्ष अशा सर्वाधिष्ठानभूत शिवाला माझा नमस्कार असो. ॥२९॥


बहलरजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः ।
प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः ॥
जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः ।
प्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः ॥३०॥

विश्वाचे उत्पत्तिकाळी उत्कट रजोगुणात्मक ब्रह्मदेवाचे रूप धारण करणाऱ्या भवा ! तुला नमस्कार असो. जगाच्या संहारकाळी अत्यंत तमोगुणात्मक रुद्राचे रूप धारण करणाऱ्या हरा! तुला नमस्कार असो. लोकांचे सुखसाधनकाली सत्त्वगुणाचे आधिक्यात्मक असे विष्णुरूप धारण करणाऱ्या हे मृडा! तुला नमस्कार असो. त्रिगुणातीत, अत्यंत परम मंगल शिवाला माझा नमस्कार असो. ॥३०॥


कृशपरिणति चेतः क्लेशवश्यं क्व चेदम्‌ ।
क्व च तव गुणसीमोल्लड्घिनी शश्वदृद्धिः ॥
इति चकितममन्दीकृत्य मां भक्तिराधाद् ।
वरद चरणयोस्ते वाक्यपुष्पोपहारम्‌ ॥३१॥

हे वरदा! अतिशय अपरिपक्व आणि मोठ्या यत्नांनी आवरले जाणारे माझे मन कोणीकडे आणि असंख्य गुण असलेली नित्य परम समृद्धि कोणीकडे! यामुळे भयभीत होऊन स्तुतीपासून पराड्मुख होणाऱ्या मला माझी भक्ति हीच जोर देऊन चरणांचे ठिकाणी ही वाक्यरूपी पुष्पांची अंजली समर्पण करीत आहे. ॥३१॥


असितगिरिसमं स्यात्‌ कज्जलं सिन्धुपात्रे ।
सुरतरूवरशाखा लेखनी पत्र मुर्वी ॥
लिखति यदि गृहित्वा शारदा सर्वकालम्‌ ।
तदपि तव गुणानामीश पारं न याति ॥३२॥

हे ईश्वरा ! सागराच्या पात्रात काळ्या पर्वतासारखे काजळ कालवून शाई केली, कल्पवृक्षाच्या फांदीची लेखणी केली, लिहिण्यासाठी कागदाचे पान म्हणून पृथ्वी कल्पिली आणि स्वतः सरस्वती जरी सर्वकाल लिहीत बसली तरीही तुझ्या गुणांचा पार लागणार नाही. ॥३२॥


असुरसुरमुनीन्द्रैरर्चितस्येन्दुमौलेर्ग्रथितगुणमहिन्मो निर्गुणस्येश्वरस्य ॥
सकलगणवरिष्ठः पुष्पदन्ताभिधानो ।
रुचिरमलघुवृत्तैः स्तोत्रमेतच्चकार ॥३३॥

देव, दानव, मुनिवर यांनी पूजिलेला, मस्तकी चंद्र धारण करणारा आणि ज्याच्या गुणांचे माहात्म्य सर्वत्र वर्णिलेले आहे अशा निर्गुण ईश्वराचे हे सुंदर स्तोत्र; शंकराच्या गणांतील मुख्य जो पुष्पदंत नावाचा गंधर्व, ह्याने मोठ्या वृत्तांनी केले आहे. ॥३३॥


अहरहरनवद्यं धूर्जटेः स्तोत्रमेतद् ।
पठति परमभक्त्या शुद्धचित्तः पुमान् यः ॥
स भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथात्र ।
प्रचुरतरधनायुः पुत्रवान् कीर्तिमांच्श्र ॥३४॥

हे शंकराचे पवित्र स्तोत्र परमभक्तीने आणि शुद्ध चित्ताने जो मनुष्य पठण करितो तो शिवलोकामध्ये शिवासारखा होतो आणि इहलोकात पुष्कळ धनवान, आयुष्यमान, पुत्रवान आणि कीर्तिमान होतो. ॥३४॥


महेशान्नपरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः ।
अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम्‌ ॥३५॥

महेश्वरापेक्षा दुसरा श्रेष्ठ देव नाही, महिम्नस्तोत्रापेक्षा दुसरी श्रेष्ठ स्तुती नाही, 'अघोरेभ्यो' या मंत्रापेक्षा दुसरा श्रेष्ठ मंत्र नाही आणि गुरूहून श्रेष्ठ असे दुसरे तत्त्व नाही. ॥३५॥


दीक्षा दानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकाः क्रियाः ।
महिम्नस्तव पाठस्य कलां नार्हन्ति षोडशीम्‌ ॥३६॥

मंत्राची दीक्षा, दान, तपच्श्रर्या, तीर्थयात्रा, ज्ञान, यज्ञक्रिया ही सर्व या महिम्नस्तोत्राच्या सोळाव्या कलेचीसुद्धा तुलना करण्यास योग्य नाहीत. ॥३६॥


कुसुमदशननामा सर्वगन्धर्वराजः ।
शशिधरवरमौलेर्देवदेवस्य दासः ॥
स गुरुनिजमहिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात्‌ ।
स्तवनमिदमकार्षींद् दिव्यदिव्यं महिम्नः ॥३७॥

चंद्रमौलि देवाधिदेव महादेवाचा सेवक पुष्पदंत नावाचा एक मोठा गंधर्व होता; तो शंकराच्या रोषामुळे आपल्या मोठ्या अधिकारापासून भ्रष्ट झाला होता. त्याने हे शंकराच्या महिम्याचे दिव्य स्तोत्र रचिले. ॥३७॥

सुरवरमुनिपूज्यं स्वर्गमोक्षैकहेतुम्‌ ।
पठति यदि मनुष्यः प्राजंलिर्नान्यचेताः ॥
वज्रति शिवसमीपं किन्नरैः स्तूयमानः ।
स्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम्‌ ॥३८॥

देव आणि मुनी यांना मान्य झालेले, स्वर्ग आणि मोक्ष यांचे मुख्य साधन असे हे पुष्पदंतविरचित अमोघ स्तोत्र जर मनुष्य एकाग्रचित्ताने हात जोडून पठण करील तर तो किन्नरांनी स्तविला जाऊन शिवाचे समीप जाईल. ॥३८॥


आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्वभाषितम्‌ ॥
अनौपम्यं मनोहारि शिवमीश्वरवर्णनम्‌ ॥३९॥

पुष्पदंताच्या मुखकमलापासून उत्पन्न झालेले, पाप नाहिसे करणारे आणि शंकराला प्रिय असणारे हे स्तोत्र कंठस्थ करून लक्षपूर्वक पठण केले असता तो भूतनाथ महादेव अतिशय संतुष्ट होतो. ॥३९॥


इत्यषा वाड्मयी पूजा श्रीमच्छ्ड्करपादयोः ।
अर्पिता तेन देवेशः प्रीयतां मे सदाशिवः ॥४०॥

याप्रमाणे ही वाड्मयरूपी पूजा श्रीमच्छंकराच्या चरणकमली अर्पण केली आहे; तिच्यामुळे तो देवाधिदेव मजवर संतुष्ट होवो. ॥४०॥


तव तत्त्वं न जानामि कीद्शोऽसि महेश्वर ।
यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः ॥४१॥

हे महेश्वरा, तुझे तत्त्वतः खरे रूप मी जाणत नाही. (खरेच) तू कसा बरे असशील? हे महादेवा, तू जसा असशील तसाच तुला माझा वारंवार नमस्कार असो. ॥४१॥


एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः ।
सर्वपापविनिर्मुक्तः शिवलोके महीयते ॥४२॥

जो मनुष्य हे स्तोत्र एकदा, दोनदा किंवा तिन्हीत्रिकाळ पठण करील तो सर्व पापांपासून पूर्णपणे मुक्त होऊन शिवलोकात त्याचा आदर केला जातो. ॥४२॥


श्रीपुष्पदन्तमुखपड्कजनिर्गतेन ।
स्तोत्रेण किल्बिषहरेण हरप्रियेण ॥
कण्ठस्थितेन पठितेन समाहितेन ।
सुप्रीणितो भवति भूतपतिर्महेशः ॥४३॥

श्रीपुष्पदंताच्या मुख कमलातून निघालेल्या, पापाचा नाश करणाऱ्या, शिवाला प्रिय असणाऱ्या आणि पाठ करून एकतानचित्ताने म्हटल्या गेलेल्या या स्तोत्राने सर्व प्राण्यांचा नाथ महेश्वर अत्यंत प्रसन्न होतो. ॥४३॥

शिवमहिम्न: स्तोत्रं सपदच्छेदान्वयार्थम्

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.