Jump to content

शांत व मृदू स्वभावाचे चौधरी

विकिस्रोत कडून

शांत व मृदू स्वभावाचे चौधरी


 चौधरी चरणसिंग दि. २९ मे रोजी सकाळी शेवटी कालवश झाले. तसे गेले कित्येक महिने त्यांची गणना नसल्यातच होती. शेवटी शेवटी दोन वेळा मी भेटीला गेलो तेव्हा फक्त बेशुद्धीत असलेल्या देहाचेच दर्शन घेऊन आलो होतो.

 मृत्यूसुद्धा चौधरींच्या बाबतीत निर्दय ठरला. इंदिराजींची लोकप्रियता झपाट्याने ढासळत होती. पण त्यांच्या मृत्यूची घटनाच इतकी विलक्षण की त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सगळे हिणकस ते जळून खाक झाले. आणि लक्षावधींच्या मनात शिल्लक राहिली ती फक्त एक उज्ज्वल देदीप्यमान मूर्ती. चरणसिंगाचा मृत्यू इतका गद्यमय झाला की हा माणूस एकेकाळी काय देश हलवून गेला याची कुणाला आठवणसुद्धा येऊ नये.

 चौधरी चालते बोलते असताना त्यांचे आणि संघटनेचे घनिष्ठ संबंध होते. दिल्लीतली काही कामे चौधरींच्या सहकार्याने आम्ही बिनधास्त सोडून देत असू. आमच्यातल्या मतभेदांची दरी खूप मोठी. पण चौधरींना व्यक्तिश: माझ्याविषयी अतोनात प्रेम. आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना अर्धवट कौतुकाने, अर्धवट उद्वेगाने म्हणायचे, "जरा देखो तो यह महाराष्ट्रका लडका कैसे काम बना रहा है." मी राजकारणात यावे, लोकदलात नाही तरी कोणत्यातरी पक्षात यावे अशी त्यांची फार इच्छा होती. निवडणुका लढवल्याखेरीज आणि सत्ता हाती घेतल्याखेरीज शेतकऱ्यांचा प्रश्न धसाला लागू शकत नाही अशी त्यांची बालंबाल खात्री होती.

 चौधरींचे व्यक्तिमत्त्व मोठे शांत आणि मृदू होते. हस्तांदोलन करताना त्यांचा हातसुद्धा इतका मऊ लागे की आपण एका म्हाताऱ्यासमोर आहोत याचा विसर पडावा. राजकारणातील अनेक वादळे, मंत्रिमंडळांच्या उलथापालथी, सत्तावीस हजार तलाठ्यांना एका हुकुमात नोकरीवरून काढून टाकण्याची जिद्द हे सगळे या माणसाने केले असेल हे खरे वाटणेच कठीण.

 चौधरीजींना श्रद्धांजली वाहताना सगळ्यांचा एकच सूर, चौधरी शेतकऱ्यांचे कैवारी, ग्रामीण कष्टकऱ्यांचे दैवत आणि सहकारीकरणाचे कट्टर विरोधक. अनेकांनी मृत्यूप्रसंगाच्या गांभीर्याची जाणीवही न ठेवता त्यातल्या त्यात 'केवळ' शेतकऱ्यांचे, 'केवळ' जाटांचे, 'केवळ' उत्तर हिंदुस्थानातील शेतकऱ्यांचे अशी चिखलफेक करण्याचा प्रयत्न केलाच.

 आचार्य अत्र्यांच्या एका व्यंग कवितेत सिंह मरून पडल्यानंतर त्याची कुचेष्टा

करणाऱ्या आलतू फालतू जनावरांचे सुंदर वर्णन केले आहे. पण एक काळ असा होता की चौधरींच्या एका इशाऱ्यावर लक्षावधी शेतकरी जमत होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात शेतकरी म्हणून जाणीव निर्माण करणारा हा पहिला नेता. ग्रामीण भागाच्या दुःखाची आणि यातनांची आर्थिक परिभाषेत सविस्तर मांडणी करण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते. चोवीस मे रोजी म्हणजे चौधरींच्या मृत्यूच्या आधी पाच दिवस उत्तर प्रदेशातील शुक्रताल येथे मी कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण शिबीर घेत होतो. प्रश्नोत्तराच्या काळात कार्यकर्त्यांना मी एक प्रश्न विचारला. "चौधरी चरणसिंगांचे मत आहे की, स्वातंत्र्यानंतर पंतप्रधानपदी जवाहरलाल नेहरू आले आणि शेतकऱ्यांची आणि ग्रामीण भागाची ही धूळधाण झाली. चौधरींच्या या म्हणण्याबद्दल तुमचे काय मत आहे?" दोघा तिघा कार्यकर्त्यांनी चौधरींवर थोडी टिका करायचा प्रयत्न केला. त्याबरोबर बाकीचे कार्यकर्ते इतके काही चवताळून उठले की मलासुद्धा चौधरींबद्दलच्या लोकांच्या मनांतील प्रचंड आदराची साक्षात जाणीव झाली.

 चौधरींच्या आयुष्याच्या शोकांतिकेचे कारण काय ? एका आडवाटेच्या खेड्यातील शेतकऱ्याच्या झोपडीत जन्मलेला हा पोरगा, औटघटकेचा का होईना, पंतप्रधान झाला. इतिहास घडवण्याची चालून आलेली संधी त्याच्या हातून निसटून गेली. एवढेच नव्हे तर आयुष्याच्या अखेरीस ते स्वत: आणि त्यांची मते हास्यास्पद मानली जाऊ लागली.
 हे का घडले?

 मला वाटते याची दोनतीन महत्त्वाची कारणे आहेत. चौधरींचा पिंडच राजकारणी नेत्याचा होता. हे राजकारण चालवण्यातील सोय म्हणून त्यांनी शेतकऱ्यंचा कैवार घेतला. शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र अभ्यासून, विचक्षणा करून ते शेतकऱ्याच्या मागे उभे राहिले नाहीत. ज्या ज्या वेळी जसजसे सोयीस्कर वाटले त्या त्या वेळी तसतशी त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांच्या विचारात प्रचंड गोंधळ होता.

 दुसरे एक महत्त्वाचे कारण, चौधरीजींचा पिंडच आंदोलकाचा नव्हता. या बाबतीत त्यांची स्थिती जुन्या काळातील थोर शेतकरी नेते सर छोटूराम यांच्या सारखीच. शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्याची आणि सोडवण्याची त्यांना माहीती असलेली एकमेव पदत म्हणजे भाषणे करणे, निवेदने तयार करणे, अहवाल लिहिणे, इत्यादी. त्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांवरील अन्याय राजकीय सूडबुद्धीने होत आहेत याची जाणीव नव्हती. योग्य अधिकारी पुरुषांच्या ध्यानात त्यांची दुःखे आणून दिली म्हणजे तो प्रश्न आपोआप सुटेल अशी त्यांची कल्पना.

 सर छोटूरामाप्रमाणेच चौधरी चरणसिंग उत्तरेत-त्यातल्या त्यात जाट प्रदेशांतच अडकून राहिले. हे दोघेही दक्षिणेत कधीच का आले नाहीत?

 चार वर्षांपूर्वी मी चौधरीजींना म्हटले होते, "चौधरीजी, हा निवडणुकांचा नाद सोडा. निवडणुकांचे राजकारण म्हणजे चेटकिणीबरोबर पट खेळणे आहे. पट तिचा, मोहरा तिच्या, सोंगट्या तिच्या, फासे तिचे, एवढेच नाही तर दिवाही तिचा आणि काळे मांजरही तिचे. राजकारणात जे जे काही करायचे ते सर्व तुम्ही करून पाहिले. निवडणुकीचा एक अखेरचा जुगार तुम्ही आता झोकून देऊन खेळू पाहता. यातून काही निघायचे नाही. त्या पेक्षा बाहेर पडा, आम्ही तुम्हाला गावोगाव घेऊन जातो. तुम्ही पंतप्रधान पुन्हा व्हाल किंवा नाही हे मी सांगू शकणार नाही. पण शेतकऱ्यांचा 'प्रेषित' म्हणून तूमचे नांव कायमचे इतिहासांत राहिल एवढी खात्री देतो."

 पण चौधरींना हे पटण्यासारखे काहीच नव्हते. ते जुगार खेळले, हरले. पंतप्रधानपद तर सोडा पण आख्खे मिळून दोन खासदार सुद्धा लोकदलाचे काही निवडून आले नाही. शेतकऱ्यांचे दैवत हे स्थानही डळमळीत झाले. अगदी शेवटच्या दिवसांत चौधरींचा बालेकिल्ला असणाऱ्या बागपतपासून तीस कि.मी. अंतरावर लाखालाखांनी शेतकरी जमले आणि त्यांनी आंदोलन केले. पण चौधरींचे नाव कुठे निघाले नाही. आणि चौधरींच्या मुलाला प्रयत्न करूनही आंदोलनात प्रवेश मिळाला नाही.

 चौधरींची राजकीय कारकीर्द अलीकडच्या काळातील मोठी शोकांतिकाच मानायला

हवी.


(साप्ताहिक ग्यानबा, १४ जून १९८७)

■ ■