शंकराची आरती/जय जय त्र्यंबकराज
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो । त्रिशूल पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ॥ वृषभारुड फणिभूषन दशभुज पंचानना हो । विभूतिमाळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥ धृ. ॥
पडलें गोहत्येचे पातक गौतमऋषिच्या शिरी हो । त्याने तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरी हो ॥ प्रसन्न होउनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो । औदुंबरमुळ प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय. ॥ १ ॥
धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णू किती हो । आणिकही बहुतीर्थे गंगाद्वारादिक पर्वती हो ॥ वंदन मार्जन करिता त्यांचे महा दोष नासती हो । तुझिया दर्शनमात्रे प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ जय. ॥ २ ॥
भावे ज्याला ब्रह्मगिरींची प्रदक्षिणा जरि घडे हो । तै ते काया कष्टें जंव जंव चरणी रूपती खडे हो । तंव तंव पुण्य विशेषकिलमीष अवघें त्यांचें झडे हो । केवळ तो शिवरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो ॥जय.।।३॥
लावुनिया निजभजनी सकळही पुरविसी मनकामना हो । संतति संपत्ति देसी अंती चुकविसी यमयातना हो ॥ शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना हो ॥ गोसावीनंदन विसरे संसारभवयातना हो ॥ जय. ॥ ४ ॥