विष्णूच्या आरत्या

विकिस्रोत कडून

आरती १

आरती आरती करूं गोपाळा ।
मीतूंपण सांडोनी वेळोवेळां ॥ ध्रु० ॥

आवडीं गंगाजळें देवा न्हाणिलें ।
भक्तींचे भूषण प्रेमसुगंध अर्पिलें ॥
अहं हा धूप जाळूं श्रीहरीपुढें ।
जंव जंव धूप जळे तंव तंव देवा आवडे ॥ आरती० ॥ १ ॥

रमावल्लभदासें अहंधूप जाळिला ।
एका आरतीचा मा प्रारंभ केला ॥
सोहं हा दीप ओंवाळूं गोविंदा ।
समाधी लागली पाहतां मुखारविंदा ॥ आरती० ॥ २ ॥

हरिखें हरीख होतो मुख पाहतां ।
प्रगटल्या ह्या नारी सर्वहि अवस्था ॥
सद्भावालागीं बहु हा देव भूकेला ।
रमावल्लभदासें अहं नैवेद्य अर्पिला ॥ आरती० ॥ ३ ॥

फल तांबूल दक्षिणा अर्पिली ।
तया उपरी नीरांजनें मांडिलीं ॥
पंचप्राण पंचज्योति आरति उजळली ।
विश्व हें लोपलें तया प्रकाशातळीं ॥ आरती० ॥ ४ ॥

आरतीप्रकाशें चंद्रसूर्य लोपले ।
सुरवर नभीं तेथें तटस्थ ठेले ॥
देवभक्तपण न दिसे कांहीं ।
ऐशापरी दास रमावल्लभा पायीं ॥ आरती० ॥ ५ ॥

आरती २

जय देव जय देव जय लक्ष्मीकांता ।
मंगल आरति करितों भावें सुजनहिता ॥ ध्रु० ॥

नारायण खगवाहन चतुराननताता ।
स्मर‍अरितापविमोचन पयनिधिजामाता ॥
वैकुंठाधिपते तव महिमा मुखिं गातां ।
सहस्त्र मुखांचा तोही थकला अनंता ॥ १ ॥

सदैव लालन पालन विश्वाचें करिसी ।
दासांस्तव तूं नाना अवतार धरिसी ॥
दुष्टां मर्दुनि दुःखा भक्तांच्या हरिसी ।
निशिदिनीं षण्मुखतातातें हृदयीं स्मरसी ॥ जय० ॥ २ ॥

चपला सहस्त्र जयाच्या जडल्या वसनासीं ।
कोटिशशि क्षयविरहित शोभति वदनासी ॥
कौस्तुभमुगुटविराजित मूर्ती अविनाशी ।
ज्यातें हृदयीं ध्यातां भवभय अघ नाशी ॥ जय० ॥ ३ ॥

तारीं वारीं संकट मारी षड्रिपुला ।
स्मरती त्यांतें देइं संपत्ती विपुला ॥
तापत्रय जाळितसे निशिदिनिं मम वपुला ।
दास म्हणे वोसंगा घे बालक आपुला ॥ जय० ॥ ४ ॥

आरती ३

लक्ष्मीरमणा भवभयहरणा चित्सुखसदना हत्कमला ।
बहु प्रेमानें पंचारति ही करित असो बा तुज विमला ॥ ध्रु० ॥

दृढ भक्ती पाहुनियां दिधलें ध्रुवपद जैसें ध्रुवबाला ।
अर्जुनरथिं सारथ्य हि करुनि अवगाहीलें अश्वांला ॥
ऐकुनि ऐशा तव औदार्या आठवितो तव पदकमला ।
दृढ भक्तीनें रुक्मिणिसुत हा, देईं दर्शना तव विमला ॥ १ ॥

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.