वाटचाल/माझी लेखन उमेदवारी

विकिस्रोत कडून



माझी लेखन उमेदवारी


प्रकाशनासाठी पाठविलेले माझे पहिले साहित्य म्हणजे एक कविता होती. वयाच्या दहाव्या वर्षी मी मराठी पाचव्या इयत्तेत शिकत होतो. या वयात प्रेमकविता लिहिण्याचे काहीच कारण नव्हते. पण लिहिली.आजही तिच्यातील एक कल्पना मला आठवते. त्या कवितेत प्रेयसीचे डोळे हिरव्या चाफ्याप्रमाणे आहेत अशी नोंद होती. माझे मामा मराठीचे हैद्राबादमधील नामांकित प्राध्यापक होते. ते नेहमी नवनवीन कल्पनाविलासाचे उल्हासाने स्वागत करीत. त्यामुळे कल्पना नवीन असली पाहिजे हा माझा आग्रह होता. माझे मामा डॉ. नांदापूरकर मराठी कविता विद्यार्थ्यांना शिकवतात ती आधुनिक मराठी कविता आहे. ते केशवसुत, बालकवी इ. ची चर्चा कर-

ताना जुन्या मराठी कवितेपेक्षा आधुनिक मराठी कविता निराळी कशी आहे, हे सांगतात. नवीन कल्पनाविलास हा या विवेचनाचा भाग आहे हे मला त्या वेळी नीटसे कळलेच नव्हते. एक मुद्दा लक्षात आला होता तो म्हणजे कल्पनाविलास नवा हवा. ज्याला मामा आधुनिक मराठी कविता म्हणतात ती आपल्या जन्मापूर्वी पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेली कविता आहे हेही त्या वेळी मला कळले नव्हते. खांडेकरांची 'हिरवा चाफा' ही कादंबरी नुकतीच वाचलेली होती. हे एका फुलाचे नाव असून या फुलाचा वास मोठा मादक असतो इतके मला माहीत होते. मामांना आपल्या भाच्याचे कौतुक फार होते. कारण मी वाचन खूप करीत असे. मी मामांना विचारले, "स्त्री च्या डोळयांना उपमा कोणत्या देतात ?" मामा म्हणाले, " हरीणशावकाचे डोळे, मासोळी, कमळ, अशा उपमा देतात." मी म्हटले, " कमळ ही उपमा देतात, मग शेवंती, गुलाब का नको?" मी काय विचारतो आहे हे बहुधा मामांना त्या क्षणी लक्षात आले नाही म्हणा, वा त्यांना थट्टेची लहर आली म्हणा; ते म्हणाले, " हरकत काहीच नाही, ती नवी कल्पना ठरेल." आणि मी मनाशी पक्का निर्णय घेतला की, कवितेतील माझ्या प्रेयसीचे डोळे हिरव्या चाफ्यासारखे आहेत.
 अनुभव नसताना कुणाचे तरी अनुकरण करून काहीतरी लिहिणे हा हौशी नवोदित लेखकाचा उद्योग असतो. माझे वय दहाच वर्षांचे असले तरी मी हौशी व उदयेच्छू लेखक होतो. यमके जुळवीत मोठ्या प्रयत्नाने मी कविता केली आणि 'वसंत' मासिकाला पाठविली. आपली कविता या अंकात येईल, त्या अंकात येईल म्हणून मी वाट पाहत राहिलो. मोठ्या दृढतेने माझे गुपित मी जतन केलेले होते. तीन महिन्यांनंतर मात्र मी रडकुंडीला आलो व मग दमादमाने मामांना सारे सांगितले. डॉ. नांदापूरकर मला 'आचार्य' म्हणत. ते म्हणाले, “ आचार्य, थोडे दमाने घ्या. परतीचे पोस्टेज होते का कवितेस ते सांगा. पत्ता बरोबर होता का, ते सांगा. आणि दर मासिकाकडे दरमहा किती कविता शेकड्याने येतात, त्याची कल्पना आहे का तेही सांगा." या विषयात आपणास अजून खूप शिकणे आहे याची मला जाणीव झाली. नाकारले गेलेले ते माझे पहिले साहित्य. ती कविता होती.
 इथून पुढे अकरा वर्षे मधूनमधून मी मासिकांना काही ना काही पाठवीतच होतो. सगळेच लिखाण रद्दी होते असे मला वाटत नाही. पण फार चांगले असे त्यात काही नव्हते. क्वचित बऱ्यापैकी, क्वचित सुमार, पण प्राय, रद्दी असेच ते लिखाण होते. कविता, कथा, ललितनिबंध, ग्रंथपरीक्षण, वैचारिक लिखाण असे विविध प्रकार या लिखाणात होते. 'यांपैकी' एकही लेख, कविता कधी प्रकाशित झाली नाही. दुःखात सुख असेल तर ते हे आहे की, ज्यांनी माझे लिखाण नाकारले ती फार नामवंत नियतकालिके होती. सामान्यांना मी लिखाण पाठवीत नव्हतो. नामवंत माझे लिखाण छापत नव्हते. ही तपश्चर्या अकरा वर्षे चालली होती.
 अनेकदा, साभार परतीच्या वाळवंटातून मी फार दीर्घ प्रवास केलेला आहे, हे माझ्या मित्रांच्या व विद्यार्थ्यांच्या लक्षातच येत नाही. वयाची पंचविशी गाठण्यापूर्वीच माझे 'मुंबई मराठी साहित्य संघा'त भाषण झाले. 'सत्यकथे'त लेख आले. पुण्याला व्याख्यान झाले. साहित्य संमेलनातून मी परिसंवादाचा वक्ता होतो. आणि हे घडले तेव्हा मी पदवीधरही नव्हतो. प्राध्यापकही नव्हतो. मराठवाड्यातील लेखकांच्यामध्ये अल्पवयातच प्रतिष्ठा मिळालेला मी लेखक. तेव्हा मलाही साभार परतीचे धक्के वर्षानुवर्षे खावे लागले असतील हे कुणाच्या ध्यानीमनी नसते. १८ २० व्या वर्षी लेखनारंभ करणारी मंडळी २२ व्या वर्षी आपले लिखाण कुणी छापत नाही म्हणून संतापतात, वैतागतात तेव्हा मी ११ वर्षांची पायपीट समजावून सांगतो. त्यांचे दुःख दूर करण्याचा हाच एक मार्ग मला उपलब्ध असतो.
 माझ्या जीवनात अती उत्साहावर पाणी ओतणारे गुरुजन मला लाभले हे मी माझे भाग्य समजतो. पराभवाने नाउमेद न होणारे आणि विजयाने बेताल न होणारे मन संपूर्णपणे मला मिळालेले नाही. ती दशा स्थितप्रज्ञाची म्हणावयाची. पण काही प्रमाणात हे मन मजजवळ आहे, ही कृपा गुरुजनांची. माझा पहिला लेख प्रकाशित झाला डिसेंबर १९५३ मध्ये. ते एक ग्रंथपरीक्षण होते. माझे एक गुरू न. शे. पोहनेरकर यांनी 'विरलेल्या गारा' या नावाचे व्यक्तिचित्रांचे पुस्तक लिहिले होते. मामा के. नांदापूरकर 'प्रतिष्ठान' या मराठवाडा साहित्यपरिषदेच्या मुखपत्राचे संपादक होते. गुरुवर्य भालचंद्र महाराज कहाळेकरांनी परीक्षण लिहिण्यास सांगितले. ते मी लिहिले. कहाळेकरांनी तपासून दिले व मग 'प्रतिष्ठान'मध्ये नांदापूरकरांनी ते छापले. आपला लेख छापला गेलेला पाहण्यात एक आनंद असतो. नवीन लेखकांना तर तो आनंद फार असतो. आनंद मलाही खूप झाला. पण कहाळेकर म्हणाले, " लेख छापून आला. बरे झाले, वाचणार कोण ? जे जे छापले जाते ते ते वाचले जातेच असे नाही. आपला लेख अनेकांना वाचण्याजोगा वाटला पाहिजे. जर कुणी वाचणारच नसेल तर मग लेख मामांच्या मासिकात छापला जातो याचे महत्त्व तरी किती?" कहाळेकरांनी असे आनंदावर पाणी ओतले. आज असे वाटते की, हा उतारा नव्या लेखकांना फार आवश्यक असतो. प्रसिद्धीची नशा फार लवकर चढते. ती लेखकाचा नाश करते.
 यानंतर फार आनंददायक असे प्रसंग पुढच्या दोन वर्षांत आले. त्यांतील प्रमुख दोन प्रसंगांचा ठसा माझ्या मनावर आज पंचवीस वर्षे अबाधित आहे. कदाचित तो ठसा जन्मभर राहील. डिसेंबर १९५३ नंतरही मी लिहीत होतोच. एक लेख सप्टेंबर १९५४ ला लिहिला आणि मराठवाडा' दिवाळी अंकात तो दिला. शरदचंद्रांच्या कादंबऱ्यांविषयी तो लेख आहे. १९५४ सालच्या मराठवाडा' दिवाळी अंकात तो लेख छापला गेला आहे. मराठवाड्याचे संपादक : अनंत भालेराव माझे मामा नव्हते. तसे नातेवाईकही नव्हते पण माझे कौतुक करणारे आप्तच होते. शिवाय भालेराव हे कहाळेकरांचे मित्र. " आपली माणसे कौतुक करणारच इथे दर्जाचा प्रश्नच काय ?" असे कहाळेकर म्हणणार, ह्याची मला खात्री होतीच. नोव्हेंबर १९५४ अखेर एक लेख मी लिहिला आणि तो 'नवभारत' मासिकाला पाठवला. त्या वेळी 'नवभारत'चे संपादक जावडेकर होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचार्य शं. दा. जावडेकरांचे मला पत्र आले. जावडेकरांनी लिहिले होते, "तुमचे नाव कुठे वाचलेले स्मरत नाही. अनुमान असे की, तुम्ही तरुण नवोदित लेखक आहा, नवोदित लेखकाला आपल्या साहित्याचे काय झाले याचा उत्साह फार असतो. म्हणून तातडीने कळवीत आहे. लेख स्वीकारलेला आहे. यथावकाश प्रसिद्ध होईल." नवोदितांची इतकी चिंता वाहणारे फार दुर्मीळ. जावडेकरांच्या पत्राने मला फार आनंद झाला. 'नवभारत'चे संपादक म्हणजे मामा नव्हेत की चाहते नव्हेत; शिवाय ते मराठवाड्यातील मासिकही नव्हे. 'नवभारत' मासिक माझा लेख छापते हे तरी गुणवत्तेचे प्रमाणपत्र मानाल की नाही, हा प्रश्न कहाळेकरांना विचारायचे मी ठरवत होतो, त्या वेळी मी होतो वडिलांच्याकडे वसमतला आणि कहाळेकर हैद्राबादला.
 त्या काळी मौज साप्ताहिकाला साहित्याच्या दरबारी प्रतिष्ठा फार. दिवाळी अंकाच्या मधून आलेल्या लिखाणाचा आढावा 'मौज' घेत असे. जावडेकरांचे पत्र आले आणि दोन दिवसांनी मौजेचा अंक आला. मौजेच्या परीक्षणकाराने माझ्या शरदबाबूंच्या वरील लेखाची मनमोकळेपणाने स्तुती करून तो दिवाळी अंकाच्या मधील एक अतिशय चांगला लेख म्हणून वाखाणला. पाठोपाठ मित्रांची अभिनंदने सुरू झाली. तु. शं. कुळकर्णीचे एक अती भलावण करणारे पत्र आले. कारण ते प्रिय मित्र.
 भेट झाल्यावर कहाळेकर म्हणाले, "आपण लिहितो ते छापण्याजोगे, वाचण्याजोगे आहे असे लोक मानू लागले, इतकाच या घटनांचा सौम्य अर्थ आहे. कुणी मोकळेपणाने कौतुक करू लागला तर तो त्या माणसाचा मोठेपणा. तो आपण मानावा. स्तुती खरी मानू नये." पण कहाळेकर काहीही म्हणाले तरी मला चढायचे ते बेतालपण चढले होते. कहाळेकर स्वतः सुखावले होते. मी फार बेताल होऊ नये यासाठी जपत होते. हे मलाही कळले. डिसेंबर १९५४ सालीच ह्या घटना घडल्या तेव्हा माझे २३ वे वर्ष चालू होते. म्हणजे मी अपक्वच होतो. पण पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई ही ठिकाणे आपली उपेक्षा करतात, आपल्यावर अन्याय करतात असे पुढच्या जीवनात मला कधीही जाणवले नाही. त्याचे कारण आरंभापासूनच झालेले माझे कौतुक हेच असणार, असे मला वाटते. गैरसमज बळकट असावेत यासाठी कारण लागत नाही. वातावरण पुरते. वातावरण असूनही गैरसमज नसावेत याला मात्र कारण लागते, असा याचा अर्थ घेता येईल.