वाटचाल/तात्यासाहेब कानोले
तात्यासाहेब कानोले
पुण्यपावन गोदेच्या परिसरात नाभिस्थानी असलेल्या नंदिग्रामाचे महत्त्व अनेकांना अनेकपरीनी वाटत असेल. वाकाटकाच्या एका ताम्रपटात 'नंदिकटकम्' असा या गावचा उल्लेख आला आहे. कानोले यांचा तर्क जर खरा मानावयाचा तर पोढ्ढण ऊर्फ बोधन येथपर्यंत नंदराज्य पसरलेले होते असे मानण्यास जागा आहे. नंद- साम्राज्याचे शेवटचे टोक म्हणून 'नंदतट' असे या गावाचे जुने नाव असावे. प्राचीन काळपासून गोदावरीचे नाभिस्थान असल्यामुळे नांदेड हे एक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरात इतक्या संतपरंपरा आहेत की त्यामुळे या क्षेत्रस्थानाला धर्मक्षेत्र म्हणणे वावगे ठरणार नाही. शिखांचे दहावे गुरू श्री गोविंदसिंग यांच्या समाधिस्थानामुळे शिखांचे
भारतीय कीर्तीचे धर्मक्षेत्र म्हणून नांदेड तर महत्त्वाचे आहेच, पण याखेरीज मराठवाड्यातील एक औद्योगिक केंद्र आणि तदनुषंगाने कामगारांच्या संघटनेचे जागृत केंद्र म्हणूनही या गावाचे महत्त्व आहे. पोलिस -ॲक्शनपूर्व मराठवाड्यात नांदेडचे वाङमयीन चळवळीचे केंद्र म्हणूनही महत्त्वाचे स्थान आहे. महाजन आणि कान्त यांच्या कार्याची बैठक मूळ येथलीच. पण मला नांदेडविषयी जे ममत्व वाटते त्याचे कारण निराळे आहे. वजिराबाद हायस्कूल समोरील एका बसक्या घरातील 'वेष असावा बावळा' या म्हणीचे प्रात्यक्षिक अशी तात्यासाहेबांची मूर्ती हेच ते आकर्षण होय. मराठवाड्यातील संस्कृती, जुने मराठी साहित्य, जुने संस्कृत व फारसी ग्रंथ आणि मराठवाड्याचा इतिहास यांचे परिश्रमपूर्वक संशोधन करून तो अमोल ठेवा जनतेसमोर घवघवीतपणे ठेवण्याचे आवश्यक आणि महत्त्वपूर्ण कार्य कानोले गेली अनेक वर्षे करीत आहेत. केव्हाही जा, संशोधनाची एक तंद्री त्यांना लागलेली दिसून येते. त्या पलीकडे त्यांना जीवन नाही. परवाच पंजाबात एका महानुभावाने लिहिलेले भगवद्गीतेचे सचित्र छोटेखानी भाषांतर ते मला मोठ्या कौतुकाने दाखवीत होते. त्यांच्या सहवासात बसले म्हणजे माणूस मोठ्या झपाट्याने मधली दीडशे वर्षे विसरून जातो व त्या आधीच्या वाङमयीन जीवनाची चित्रे डोळ्यांसमोरून तरळू लागतात. संशोधकांची माहिती जनतेला करून द्यावी लागते. प्रसिद्धीचे वलय इतिहाससंशोधकाच्या भोवती कधीच नसते. ही स्थिती दुर्दैवाची असली तरी ते एक कटू सत्य आहे. गेली अनेक वर्षे माझे आणि कानोल्यांचे बरेच जुळले आहे. साऱ्या संशोधकांना असणाऱ्या काही खोडी त्यांनाही आहेत, हे मी ओळखून आहे. साधी गोष्ट सांगतो. संशोधनातला एक महत्त्वाचा नियम असा की, 'सामग्री' कुठे आहे याचा पत्ता कुणाला द्यायचा नाही. कोण आपल्या आधी जुने ग्रंथ हस्तगत करील याचा नेम नसतो. हे वळण कानोल्यांच्या अंगवळणी इतके पडले आहे की, त्यांना केव्हाही विचारा हमखास जागेचे नाव वगळून दिशेचे नाव ते सांगतील. ' काय कानोले! कुठे निघालात ?' कानोले निघालेले असतात बाजारात भाजी आणण्यासाठी. पण त्यांच्याच्याने हे सांगणे होणार नाही. एक गोल उत्तर लगेच देतील. " असाच निघालो होतो वायव्येला. अनेकांना या उत्तराचा राग येतो. मला एकदम उचंबळून आल्यासारखे होते. काय माणूस हा ! संशोधनाच्या खेरीज याला जणू दुसरे जीवन नाही; असे वाटू लागते. कधी कधी त्यांच्या या स्वभावामुळे माणूस मोठा अडचणीत सापडतो. एकदा एका कवीलाच त्यांनी चक्क संशोधक म्हणून बोलावयास सुरुवात केली. " वा, वा, वाचलंय तर; तुमचे अशोकावरील लेख मला फार आवडले." बिचारा कविमित्र गोंधळून गेला. कानोल्यांना नावे पाठ असतात. खरे म्हटले म्हणजे, वासुदेवशास्त्री खरे, बाळताई खरे. त्यांना माहीत नाही. फार तर ग. ह. खरे. आपटे म्हटले म्हणजे, दत्तोपंत आपटे. त्यांना ह. ना. आपटे आठवत नाहीत. करंदीकर म्हटले म्हणजे अ. म., ज. स., अगर म. अ. करंदीकर. विंदा करंदीकर त्यांना ज्ञात नाहीत. असा माणूस सोबतीला थोडा कठीण जातो. एका क्षेत्रावर एकान्तिक निष्ठा. माझ्या क्षेत्रातलं बारीक सारीक विचारून घ्या, बाकी आमचा संबंध नाही, असा थोडासा वागण्याचा प्रकार आहे. त्यांच्याकडे अनेक हस्तलिखिते असतात. हस्तलिखित हरवले म्हणजे सर्वच संपले. नंतर तक्रार करून उपयोग नाही. म्हणून सामान्य पद्धत ही की, कुणाला हस्तलिखित दाखवायचेच नाही. अशा संशोधकांना असणान्या सर्व खोडी कानोल्यांना आहेतच. व्यावहारिक
वा...६ धूर्तपणा त्यांना जमत नाही, अहंता त्यांच्याजवळ आहे की नाही, सांगता येत नाही. पण ती प्रकट करणे त्यांना जमत नाही. तसे ते भोळे आणि भिडस्त आहेत. मात्र त्यांचे तुमचे सूत जमले पाहिजे. म्हणून वर मुद्दाम त्यांचे-माझे बरेच जुळले आहे हा उल्लेख केला. नांदेडला असलो म्हणजे त्यांच्या सहवासात तास-दोन तास घालविल्याखेरीज कधी परतत नाही. सांगण्याजोग्या सहस्र आठवणी मनात आहेत. पण तो मोह आवरला पाहिजे.
तात्यांचे पूर्ण नाव विश्वेश्वर अंबादास कानोले असे आहे. चार ऑगस्ट १९०५ ला जुन्या वैदिक घराण्यात त्यांचा जन्म झाला. पन्नास वर्षांपूर्वी होऊन गेलेले तात्यांचे आजोबा विश्वेश्वर ऊर्फ भटजी यांच्या विद्धत्तेचा लौकिक दूरवर पसरलेला होता. त्यांचे वडीलही दशग्रंथी होते. भटजी या नावानेच अंबादास कानोले ओळखले जात. ते वैदिक पंडित असले तरी नशिबाच्या व व्यापारादी साधनांच्या बळावर फार मोठा पैसा त्यांनी कमावला. तात्यांचे बालपण चांगले श्रीमंतीत गेले. पण भटजींची ही परिस्थिती शेवटपर्यंत राहिली नाही क्रमाने दैवाचे फासे उलटले. वडिलांचे छत्र डोक्यावर होते तोवर श्रीमंती असो, गरिबी असो घरचा भार वडिलांवर होता. हे छत्रही दीर्घकाल तात्यांच्या डोक्यावर होते. तात्या जवळजवळ चाळिशीत आल्यावर वडील वारले. वडील जोवर होते; तोवर चिंतेचे कारण नव्हते. तात्यांनी व्यवसाय असा केलाच नाही. लहानपणापासून जुने ग्रंथ त्यांनी शोधले. इतिहासाचा व्यासंग केला. मराठवाडाभर ग्रंथ मिळवण्यासाठी पायपीट केली. वडिलांच्या नंतर नोकरी करण्याचे वय राहिले नव्हते. प्रतिकूल परिस्थितीत तात्या आपल्या कामात गर्क राहिले. जीवनाचा फार मोठा दैन्यपूर्ण इतिहास त्यांच्या शरीरावरून ओघळून गेला. त्यांचे ठसे वेषावर, घरावर कुठेही दिसतात. मन मात्र जे एकदा भूतकाळात जाऊन बसले त्याच्यावर वर्तमानकालीन चितांचा ठसा फारसा उमटलेला नाही. आपल्या जीर्ण बैठकीत मोडक्या पेटीसमोर तात्या सचिंत बसून असतात. चिंता कसली म्हणाल ? तर वामन पंडिताचा आजा, वामन अनंत शेष आदिलशाहीच्या शाही ग्रंथालयाचा रखवालदार होता हे खरे, की 'क्युरेटर ' होता हे खरे ? घराची चिंता दोनशे वर्षे मागे गुंतलेल्या मनाला जाणवतच नाही.
तात्या शिकले फारसे नाहीत. कसेबसे उर्दू माध्यमातून मॅट्रिकच्या वर्गापर्यंत गेले. त्यांचे आजचे इंग्रजी पाहता हे खरे वाटत नाही, पण हा इंग्रजीचा व्यासंग इतिहासाच्या अभ्यासाचे उत्तरकालीन उपांग आहे. तसे त्यांना चांगलेच संस्कृत येते. फारसीही बऱ्यापैकी येते. पण याना शालेय शिक्षणाशी संबंध नाही. विद्यार्थीदशेतच जुन्या मराठी वाङमयाची व इतिहासाची त्यांना गोडी लागली. कोणे एकेकाळी तात्या कविता करीत हे आज सांगितले तर कोणाला खरे वाटणार नाही, मंदारमालेच्या एका जुन्या अंकात तात्यांची एक कविता परवा वाचली. आणि आम्ही ज्या सर्वांनी मिळून वाचली ते पोटभर हसलो. कविता करणे यात ते रमले नाहीत. विद्यार्थीदशेतच 'गोदावरीमाहात्म्य' व स्थानिक नांदेडचे स्थल-माहात्म्य यांच्या आधारे ' नांदेड क्षेत्राचा पूर्वेतिहास' हा लेख त्यांनी लिहिला. विद्यार्थीदशेत लिहिलेल्या या लेखातील मांडणीचा चटकदारपणा आजही त्या लेखाला वाचनीय ठरवील. पण तात्यांची प्रतिभा त्या वेळी बाल्यात होती. आज ते जसे काटेकोर व तोलून लिहितात तसा प्रकार त्या वेळी नव्हता. त्यांचा पहिला लेख इतकेच त्या लेखाचे महत्त्व ! पण पुढच्या काळात तात्यांनी सारे काही उकरून काढले. नांदेडच्या संतपरंपरेवर; संस्कृत पंडितांच्या वाङमयावर; आजूबाजूला असणाऱ्या कंदकूर्ति देगलूर, वस्मत, कंधार, उमरी येथील धार्मिक मठांच्या मूळ सत्पुरुषांवर; त्यांच्या वाङमयावर तात्यांनी खूप लिहिले आहे. न लिहिलेली माहिती तर त्यांनी इतकी गोळा केली आहे की, त्या आधारे मराठवाड्यातील गेल्या दोन-तीनशे वर्षातील सत्पुरुषांच्या चरित्रांचा एक कोश सहजच निघू शकेल.
लवकरच त्यांचे लक्ष नांदेडच्या गुरुद्वाराकडे वळले. शिखांचे दहावे गुरू गुरुगोविंदसिंह यांचे समाधिस्थान नांदेडला असल्यामुळे असे होणे स्वाभाविक होते. निजामी राजवटीच्या खाली असणाऱ्या कुणालाही हिंदू धर्मरक्षणाच्यासाठी शिखांच्या ज्या धर्मगुरूंनी आपले प्राण पणाला लावले, त्यांच्याविषयी आत्मीयता वाटणे स्वाभाविक होते. दुर्दैवाने मराठीत शिखांच्याकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. मराठ्यांच्या इतिहासातच आम्ही इतके गुरफटून गेलो आहोत की, ज्यांनी शे-सव्वाशे वर्षे बलिदानपूर्वक पंजाबात हिंदू धर्म टिकवला, त्या शिखांच्याकडे आमचे फारसे लक्ष वळलेच नाही. तात्यांनी त्यांना उपलब्ध झालेले सर्व प्रकाशित साहित्य अभ्यासून याखेरीज गुरुद्वारात उपलब्ध झालेले विपुल साहित्य अभ्यासून गुरुगोविंदसिंहाचे चरित्र लिहिले. १९२७ साली ' चित्रमयजगता' तून हे चरित्र प्रकाशित झाले आहे. गुरू गोविंदसिंहाचे मराठीत लिहिलेले इतके विस्तृत व अभ्यासपूर्ण असे हे पहिलेच चरित्र म्हणता येईल. यानंतरच्या काळात त्यांनी गुरुद्वारचाही सविस्तर इतिहास १९३१ साली ' चित्रमयजगता'तून लिहिला आहे. हळूहळू त्यांच्या संशोधनाचा व्याप वाढू लागला. जुने ग्रंथ शोधणे, त्यावर अभ्यासपूर्ण टिपणे लिहिणे हा प्रश्न मौजेचा छंद होता. हळूहळू पुढे त्याला जीवनव्यापी व्यसनाचे स्वरूप आले. १९३१ साली हैद्राबादेस ज्ञानकोशकार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली जे महाराष्ट्र साहित्य संमेलन भरले होते, त्या प्रसंगी आपल्याजवळील जुन्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचा एक विभागच कानोल्यांनी मांडला होता. येथेच त्यांची व दत्तोपंत पोतदारांची भेट झाली व ते पोतदारांचे एकनिष्ठ व अभिमानी शिष्य बनले. याच संमेलनात कानोल्यांनी ज्ञानेश्वरीची एक जुनी प्रत पुढे ठेवली, हीच प्रत पुढे नांदेड प्रत म्हणून संशोधकांत प्रसिद्ध झाली. ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतीत नांदेड प्रत ही एक महत्त्वाची प्रत मानली जाते. १९३७ साली पोतदार कानोल्यांच्यासाठी मुद्दाम नांदेडला आले होते. त्या प्रसंगी केलेल्या भाषणात पोतदार म्हणतात," कानोले यांना त्यांच्या संशोधनकार्याबद्दल लोक भ्रमिष्ट म्हणतात, हे ऐकूनही मला तितकाच आनंद वाटला; कारण ते चांगले कसाला उतरले आहेत अशी माझी खात्री झाली... मनुष्य वेडा तेव्हाच होतो जेव्हा त्याला जीवनातले इतर सर्व आनंद या इतिहासापुढे फिके वाटतील...काव्यशास्त्रात अनेक रस आहेत. त्यातच संशोधनाच्या या कागद-रसाचा अंतर्भाव करावा. या रसाचा आस्वाद एकटया संशोधकासच घ्यावा लागतो. उंदीर, कसर हे मात्र काहीसे समानधर्मी रसज्ञ दिसतात...माझा जीव ज्यात गुंतला आहे त्यातच त्यांचाही जीव अडकला असल्यामुळे आम्ही व ते एकजीव होणे स्वाभाविक आहे." पुढे १९४३ साली मराठवाडा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा पोतदार नांदेडला आले होते. या वेळी तर संमेलनाचे सूत्रधार कानोले व अध्यक्ष गुरू पोतदार असा योग जुळून आला होता.
१९३३ सालापासून कानोले यांच्या कार्याला अजून एक कलाटणी मिळाली. योगायोगाने प्रसिद्ध महाराष्ट्र कवी वामन पंडित यांच्याशी निगडित असणारी काही कागदपत्रे उपलब्ध झाली. कानोल्यांनी याबाबतीत प्रचंड माहिती गोळा केली. मूळ वामन पंडित हे जरी आरंभस्थान असले तरी अनेक पिढयांचे त्यांचे पूर्वज, त्यांचे वंशज शेष पंडितांचा काशीपर्यंतचा दरारा, या पंडितांचे संस्कृत वाङ्मयात स्थान, स्वतः वामन, त्याचे ग्रंथ, त्याचा मुलगा रघुनाथ शेष, त्याचा ग्रंथ अशी प्रचंड सामग्री त्यांनी गोळा केली. यांपैकी शेष घराण्याच्या माहितीवर 'पोतदारगौरव' ग्रंथात एक विस्तृत लेख लिहिला. याआधी भारत इतिहाससंशोधक मंडळात, त्यावर त्यांनी व्याख्यानही दिले होते. १९३३ साली रामचंद्र महादेव आठवले व कानोले यांचा वामन पंडितविषयक वाद वृत्तपत्रांतून बराच गाजला.
१९३५ साली अखिल भारतीय इतिहास परिषदेत त्यांनी वाचलेला विमलदेव चौहानाच्या 'प्रबोध चंद्रिके ' वरील लेख अगर धर्मनिर्णय सिंधुकार कमलाकराला समकालीन असणान्या नांदेड येथील मुद्गलभट वैद्य याच्या 'विमल बोध' या धर्मशास्त्रावरील संस्कृत ग्रंथाच्या परिचयाचा लेख. हे लेख त्या त्या विषयांतील ज्ञानात भर घालणारे, नवीन माहिती पुढे आणणारे म्हणून विद्वानांच्या प्रशंसेला पात्र ठरले.
तात्यांचे हे संशोधन व त्याचा व्याप सारखा वाढतच गेला. आज जवळजवळ दीड हजार हस्तलिखिते त्यांच्या संग्रहात आहेत. या हस्तलिखितांत अतिशय मौलिक, वेचक अप्रकाशित असे अनेक ग्रंथ आहेत. कागदपत्रे, जुन्या सनदा यांचाही साठा त्यांच्याजवळ फार मोठा आहे. वेगवेगळ्या विषयांवर संशोधनपर असे शंभरवर लेख आजवर त्यांनी लिहिले. अशात त्यांना शिलालेखांच्या वाचनाचा नवा नाद लागू लागला. १९५४ साली हैद्राबाद संस्थानच्या इतिहासविषयक स्टेट बोर्डाचे ते सभासद नेमले गेले. तेव्हापासून पुढे द्वैभाषिकात काय अगर आजच्या महाराष्ट्र राज्यात काय ते सतत स्टेट बोर्डाचे सभासद होते. या स्थानाच्या निमित्ताने मराठवाड्याचा ऐतिहासिक आढावा वेळोवेळी त्यांना घ्यावा लागला. यातूनच शिलालेखांचा नाद त्यांचा वाढत गेला. अर्धापूरला त्यांनी एक शिलालेख उजेडात आणला. लहानसाच पण महत्त्वाचा असा हा शिलालेख आहे. भारतातील अनेक राजघराण्यांपैकी राष्ट्रकूटांचाही उगम पुष्कळच अंधारात आहे. या उगमस्थलावर प्रकाश टाकणारा असा हा शिलालेख आहे. रट्टवंश समुद्भव असे कुणी देवपाळ विक्रम व बल्लाळ या शिलालेखात उजेडात आले आहेत. हा शिलालेख म्हणजे दंतिदुर्गाच्या पूर्वी परंपरेने राष्ट्रकूटांच्या जहागिरी महाराष्ट्रात होत्या; याचा पुरावा ठरेल. अर्धापूरला संवत् ११५३ चा अजून एक शिलालेख त्यांना सापडला. हा नाद ह्यापुढे सतत वाढत जाणार अशी चिन्हे दिसू लागली. कानोले यांना, आधी जे संशोधन झाले आहे त्याच पुराव्याचे नव्याने विवेचन करण्याची आस्था वाटत नाही. त्यांच्या मते नवी माहिती उजेडात आणणे व तिच्या आधारे जर गरज पडेल तर आजची माहिती दुरुस्त करणे यावर भर देणे हे काम अधिक जिकिरीचे; पण महत्त्वाचे आहे. कधी कधी गंमत म्हणून काही माहिती ते आमच्यासमोर ठेवीत असतात. एकदा मी, कानोले व प्रा. गाडगीळ बोलत होतो. बोलण्याहून बोलणे बदलत गेले व ज्ञानेश्वरीतील एका कूटस्थळावर चर्चा सुरू झाली. तात्या म्हणाले, " थांबा ! माझ्याजवळ सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा ज्ञानेश्वरीतील दुर्बोध स्थळांचा हस्तलिखित कोश आहे. त्यांचे काय म्हणणे आहे ते पाहू." घाईघाईने तात्यांनी जुना कोश काढला. त्यात पाहिले. पण आम्हाला अडलेली जागा त्या कोशकारालाही अडलेलीच होती. कानोले म्हणाले, " चला, हे कूटस्थळ गेली दोनशे वर्षे कूटस्थळ राहिले आहे, ही नवी माहिती मिळाली." असेच एकदा ज्ञानेश्वर एक का दोन, यावर आम्ही बोलत होतो. तात्या म्हणाले, " निवृत्तिशिष्य अगर निवृत्तिसुत अशा ज्ञानेश्वराने लिहिलेल्या गीताटीकेच्या मजजवळ अनेक आवृत्त्या आहेत. कुठे ही गीता टीका पन्नास-पाऊणशे ओव्यांची, कुठे दोन-तीनशे ओव्यांची अशी असते. ज्ञानेश्वरीकार ज्ञानेश्वराचे हे ग्रंथ खासच नाहीत. याचाअर्थ ह्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या काळी अनेकांनी ग्रंथ लिहिले; व हेतुतः ज्ञानेश्वरांच्या नावावर बसवून दिले. तात्या म्हणतात, माझ्याजवळ ज्ञानेश्वरांची अशी एक गीता टीका आहे, ज्यात चुकून कर्त्याने भावार्थ दीपिकाकार ज्ञानेश्वराला मोठ्या आदराने पूर्वकवी म्हणून नमन केले आहे. आपला उल्लेख मात्र निवृत्तिसुत ज्ञानेश्वर असाच केला आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर दोन आहेत हे सिद्ध करण्याचा निर्णायक पुरावा द्या,या म्हणण्याला अर्थ उरत नाही. स्वतःला ज्ञानेश्वर म्हणून घेणारे, निवृत्तिसुत म्हणविणारे असे अनेक तोतये महाराष्ट्रात होऊन गेले हे सिद्ध होते. उलट अभंगकार ज्ञानेश्वर हाच भावार्थदीपिकाकार आहे, याचा निर्णायक पुरावा मागण्याची वेळ आली आहे." तात्यांच्या सहवासात अशा अनेक खाचाखोचा रोज कळत जातात.
कानोले यांनी 'मुक्तेश्वरांचे भावार्थ रामायण ' उजेडात आणले व परंपरागत भावनेला एक मोठा धक्का दिला. एकनाथांनी 'भावार्थ रामायण' हा ग्रंथ युद्धकांडाच्या ४४ व्या अध्यायापर्यंत लिहून संपविल्यानंतर नाथांना आपला निर्याणकाल समीप आला हे कळले. नाथांनी बाकीचा भाग पूर्ण करण्याचे काम गाववानामक आपल्या एका शिष्याकडे सोपविले व नंतर गावबाने पुढील सर्व रामायण लिहून पूर्णतेला नेले असे आज मानले जाते. पण एकनाथांचे नातू मुक्तेश्वर यांनी 'भावार्थ रामायण' पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, हे लक्षात घेतले म्हणजे एकनाथ आपले रामायण अपूर्ण सोडून वारले व त्यानंतर ज्याने त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे ते रामायण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, अशा एका प्रयत्नांपकी मुक्तेश्वराचा प्रयत्न म्हटला पाहिजे. कानोल्यांना जी प्रत सापडली त्या प्रतीत मुक्तेश्वरांचे नाव नव्हते. मुक्तेश्वर-मोरोपंत यांच्या वाङमयोदधीत आयुष्यभर मज्जन केलेल्या नांदापूरकरांनाही सदर उत्तरकाण्ड मुक्तेश्वराचे वाटले नाही, पण आता हा मुद्दा निर्णायकरीत्या सिद्ध आहे; कारण नंतर या उत्तरकाण्डाची पूर्ण प्रत इतरत्र उपलब्ध झाली.
महानुभावीय वाङमयाशीही त्यांचा चांगलाच परिचय आहे. कवींची घराणी उजेडात आणणे हा तर कानोल्यांचा हातखंडा ! त्यांनी डिंभ कुळातील अनेक कवींची सगती गोळा करून चक्रधरसमकालीन रामदेव डिंभ व कृष्णमुनी विराटदेशे उर्फ कृष्ण डिभ यांचा सांधा जोडून दिला. महानुभाव वाङमयाच्या विवेचकांना ही संगती मोलाची वाटल्याशिवाय राहणार नाही. मध्येच त्यांनी गोरखनाथाच्या योगशास्त्रावरील आपला टीकाग्रंथ लिहिणारा एक चौदाव्या शतकातील योगमार्तडकार मुकुंदराज उघडकीस आणला आहे. राजवाडे यांच्या ज्ञानेश्वरीचा लेखक हाच असावा हे कानोल्यांचे अनुमान जरी वादग्रस्त असले तरी ज्ञानेश्वरी कोणा मुकुंदराजाने लिहिली आहे यावरून विवेकसिंधुकार मुकुंदराज ज्ञानेश्वरोत्तरकालीन होते असे मानण्याची गरज नाहीशी होते.
कानोल्यांनी 'मुकुंदराजांची अंबानगरी कोणती ?' या शीर्षकाची पुस्तिका प्रकाशित केली आहे. व्यक्तिशा: मला स्थलनिर्णयाचे वाद अगर कालनिर्णयाचे वाद आवडत नाहीत. व्यक्तिशः माझ्या मते मुकुंदराज अंबेजोगाईचे बहुधा असावेत हे जरी खरे म्हटले तरी मुकुंदराज ज्ञानेश्वरपूर्वकालीन आदिकवी आहेत हे पटणे कठीण आहे. पण माझ्या मते या पुस्तिकेचे महत्त्व थोडे निराळे आहे. मराठी इतिहाससशोधनात, सामग्री मराठवाड्यात गोळा करावयाची व इतिहास लिहिताना कवीचे मराठवाड्याबाहेर स्थान निश्चित करावयाचे ही प्रवृत्ती फार प्रभावी आहे. नामदेव, जनावाई, वामन पंडित, मुकुंदराज अशी अनेक नावे या संदर्भात सांगता येतील. कानोले यांचे पुस्तक या प्रवृत्तींतील सर्वात प्रभावी अशा ठिकाणावर आघात करणारे आहे. इतिहासाचार्य राजवाडे हे मोठे युगप्रवर्तक, प्रतिभाशाली इतिहाससंशोधक होऊन गेले यात वाद नाही. पण कल्पनेच्या वावड्या उडवून पुरावा न मिळणाऱ्या जागा अंदाजाने भरून काढणे ही त्यांना फार मोठी सवय होती; नव्हे, तो त्यांचा चमत्कारिक असा दोष होता. नाइलाज म्हणून आग्र्याला गेलेला शिवाजी त्यांनी प्रत्यक्ष दिल्लीला भेट देऊन 'चकत्यांच्या पादशाहती'चा ' रामबोलो' करण्याचा विचार मनात बाळगणारा मुत्सद्दी ठरवला. अशाच एका लहरीत राजवाड्यांनी मुकुंदराज अंभोरचा ठरवून ठेवला. आजकाल विदर्भाची प्रवृत्ती मोठी गमतीची आहे. आपण आदिमहाराष्ट्र आहो याचा अभिमान विदर्भाचा सुटत नाही. (आणि सुटण्याचे कारण नाही. कारण विदर्भ-मराठवाडा हा पूर्वी एकजीव भाग होता. व हाच आदिमहाराष्ट्र होता, ही गोष्ट स्पष्ट आहे.) पण एकूण महाराष्ट्रात एकजीव होऊन सर्व महाराष्ट्राचे नेतृत्व आपण घ्यावे ही जिद्द त्याच्या मनात निर्माण होत नाही. उलट आपले आपण वेगळे राहिलो तर बरे, असेच त्याला वाटत राहते. राजवाड्यांनी कारण नसताना मुकुंदराज अंभोरला नेऊन बसवला. गेल्या अनेक वर्षांत वैदर्भीय पंडितांनी मोठ्या आपुलकीने व अभिमानाने मुकुंदराज आमचा ही भूमिका मनात बाळगली आहे. दुर्दैवाने ऐतिहासिक सत्य यापेक्षा निराळे आहे. मुकुंदराजांच्या विदर्भात आढळणाऱ्या मठ-परंपरा अर्वाचीन असून नांदेडहून 'वैतुल गॅझीटियर' निघेपर्यंत म्हणजे १९०९ पर्यंत मुकुंदराज अंभोरचे होते, असे कुणीच म्हटलेले नाही. 'कमळेश्वर मंदिरा'तील कागदपत्रे बनावट आहेत. मुकुंदराजांची जुनी शिष्यपरंपरा मराठवाड्यात असून, मुकुंदराज अंबेजोगाईचे ही भूमिका परंपरेत एकमुखाने इतकी दृढ आहे की, विदर्भातील उद्धवसुतसुद्धा मुकुंदराज अंबेजोगाईचे असे स्पष्ट म्हणतो. या वादातील निर्णायक पुरावा 'योगेश्वरीमाहात्म्य' आहे. या ग्रंथाचा काळ कोणता? कानोल्यांच्या मते हा काळ चौदाव्या शतकातील आहे. कृ. पा. कुळकर्णी यांनी सदर ग्रंथ पंधराव्या शतकात ओढला आहे. ते जरी क्षणभर गृहीत धरले तरी पंधराव्या शतकापासून आजतागायत मुकुंदराजांना अंबेजोगाईचे म्हणणारी परंपरा आहे. त्याचप्रमाणे भाविकांची परंपरा हा मुकुंदराजांचा मठ अंबेजोगाईस आहे. या बाबी नाकारता येणाऱ्या नाहीत. माझी अतिसावध भूमिका म्हणून मी म्हणतो, मुकुंदराज अंभोरचे खात्रीने नाहीत. अंबेजोगाईचे बहुधा असावेत. पण ही अतिसावधगिरी झाली. इतकी सावधगिरी बाळगावयाची म्हटले तर निम्मे इतिहाससंशोधन बाद गृहीत धरले पाहिजे. हर्षाच्या पूर्वीचा भारतेतिहास तर फारच संदिग्ध मानला पाहिजे. या पुस्तकात कानोले यांचे परिश्रम, त्यांची चौरस अभ्यासाची पद्धती, इतरांचे मत खोडण्यातील बारकावे, आपले मत मांडण्याची तर्कशुद्ध सूक्ष्मता या साऱ्यांचे प्रतिबिंब पडले आहे. भारतेतिहासाचा त्यांचा व्यासंग किती गाढ आहे हे या पुस्तिकेने कळू शकेल. हा गाढ व्यासंग कानोल्यांच्या लेखनात कुठेही दिसतो. अमृतानुभवावरील फुटकळ लेख जरी घेतला, तरी मूळ अमृतानुभवात प्रकरणे नव्हती. ती शिवकल्याणांनी पाडली याचे मोठे नमुनेदार विवेचन ते करतात.
कानोले यांच्या लिखाणावर फारशी प्रतिकूल टीका कधी झाली नाही. एक तर दर वेळी नवा पुरावा मांडावयाचा, पुराव्याखेरीज फारसे लिहावयाचे नाही ही त्यांची पद्धती असल्यामुळे कानोल्यांवर प्रतिकूल टीका करणे अवघड जाते. कारण त्यांनी उजेडात आणलेला नवा पुरावा इतरांना अज्ञात असतो. दुसरे म्हणजे मराठवाड्यातील लेखकांच्या वाट्याला उपेक्षा हाच वारसा दीर्घकाळ आला आहे. कानोले याला अपवाद नाहीत.
तात्यांच्या कार्याचे स्वरूप हे थोडक्यात असे आहे. हे कार्य करताना कुणाचेही साहाय्य फारसे त्यांना लाभले नाही. ते स्वतःला पोतदाराचे शिष्य म्हणवतात; पण गुरूचा दीर्घकाळ सहवास त्यांना लाभला असे नाही. एकलव्याप्रमाणे मातीचा द्रोण समोर ठेवून त्यांनी तप केले आहे. हे तप सिद्धीला जावे एवढे प्रेरक सामर्थ्य मूळ द्रोणात असेल कदाचित. पण तात्यांपुरते पाहायचे तर या सिद्धींत मोठा वाटा एकलव्याच्या परिश्रमाचा !