वाटचाल/अनंतराव भालेराव

विकिस्रोत कडून


अनंतराव भालेराव



कुणाला पटो अगर न पटो, माझा स्वभाव श्रद्धाळू आहे. मात्र प्रत्येक रंगीत दगडाला देव समजणे मला जमत नाही. दीर्घकाळ घासून, तपासून मगच मी श्रद्धा ठेवतो. यामुळे श्रद्धा बसण्याचे अगर उडण्याचे प्रसंग फारच कमी येतात. पण त्याला इलाज नाही. माझी श्रद्धा विचारांपेक्षा माणसांवर अधिक असते ! मात्र त्या व्यक्तीच्या गुणदोषांची, सामर्थ्य उणिवांची शक्यतो डोळस चिकित्सा मी आधी करून टाकतो. म्हणूनच माणसांचा देव करण्याच्या भानगडीत मी पडत नाही. ही चौकट मान्य करून माझा श्रद्धाळूपणा मी हट्टाने जतन करीत आलो आहे आणि अनंतराव हे माझ्या मोजक्या श्रद्धास्थानांपैकी एक आहेत. त्यांची आणि माझी पहिली साक्षात भेट अठ्ठेचाळीस

साली झाली. नंतर लौकरच या माणसाकडे मी ओढला गेलो. त्याही आधी त्यांचे नाव मी ऐकूनच होतो. हैद्राबादच्या स्वातंत्र्यलढ्यात अग्रभागी असणारा जो पुरोगामी, लोकशाहीवादी समाजवादी गट श्रॉफ गट म्हणून ओळखला जात असे त्यात अनंतराव महत्त्वाचे नेते होते. खरे म्हणजे त्यांचा पिंड नेत्याचा नाही. वरिष्ठ दर्जाचा, पण अनुयायाचा असा त्यांचा पिंड आहे. नेत्याच्यासारखे मोजून वोलणे त्यांना जमत नाही. त्याप्रमाणे जनतेत तीव्रता नसणान्या प्रश्नांवर तीव्र लिखाण करणे त्यांना जमत नाही. अनंतरावांच्या लेखणीला धार जनतेच्या उग्र संतापातून येते. चळवळीच्या वेळी ते तलवारीने लिहितात. सगळीकडे सामसूम असली म्हणजे मग त्यांची लेखणी सौम्य आणि रसिक होऊ लागते. जनतेत ज्या प्रश्नांवर तीव्रता नाही तो प्रश्न कितीही न्याय्य असो, अनंतराव फार वेळ एकाकी धर्मयुद्ध खेळू शकत नाहीत !
 त्यांना मी प्रथम पाहिले त्या वेळी ते 'मराठवाडा'चे उपसंपादक होते. आमच्यासारख्या तरुण लेखकांचे लिखाण ते आग्रहाने मागवीत व न चुकता ‘साभार परत' करीत ! ज्या संपादकाने पुनःपुन्हा माझे लेख साभार परत केले आणि तरीही ज्याच्या आग्रहाखातर मी लिहीत गेलो असे एकमेव संपादक तेच आहेत ! कुठल्या तरी युगातला फाटका कोट त्यांच्या अंगावर होता. पायांत झिजलेल्या वहाणा, मराठाऊ पद्धतीने नेसलेले खादीचे मळकट धोतर असा त्यांचा वेष असे. डोक्यावर टोपी नसणे ही एकच पुरोगामित्वाची दर्शनी खूण शिल्लक होती ! त्याही वेळी त्यांचा चेहरा थोडा बेफिकीर आणि सुस्त दिसे. प्रथमदर्शनी छाप पाडण्याची सामग्री त्यांच्याजवळ फारशी नाही. गेली चौदा वर्षे या रंगरूपात फारसा फरक पडलेला नाही.
 काही माणसेच अशी असतात की, त्यांच्यात फारसा बदल होत नाही. उन्हाने लाल होणे, पावसाने मस्त होणे अगर हिवाने उजळ होणे त्यांच्या बाबतीत संभवत नाही. तुरळक केस पांढरे होऊन ही माणसे तरुणपणीच प्रौढ दिसू लागतात आणि दीर्घकाळ तशीच दिसतात. त्या मंडळींच्या अंगावर कोणताही कपडा घाला, कपड्याचा नूर जातो, यांचा नूर कायम राहतो ! चेहरा पाहून थकवा की हुरूप यांतले काहीच कळत नाही, अशी एक माणसाची जात असते. या जातीचे अनंतराव श्रेष्ठ प्रतिनिधी आहेत. ओबडधोबड व्यक्तिमत्त्वाचा, कारकुनांत सरळ मिसळून जाणारा हा माणूस तळहातावर शिर घेऊन लढलेला क्रांतिकारक वीर आहे ; सहस्रावधी मनांवर प्रभाव गाजविणारा कुशल संपादक आहे; निवडणुकीच्या फडात ‘फडी' भाषण देणारा वक्ता आहे आणि मराठवाड्यातील अत्यंत बुद्धिमान कार्यकर्ता आहे; वाङमयाचा डोळस रसिक आहे ; यावर विश्वास बसणे पुष्कळच कठीण जाते. त्यांचा पिंड गर्दीत धसमुसळेपणाने वागणारा आहे. त्यांच्याबरोबर तिसऱ्या वर्गाचा प्रवास सुरक्षित होतो. भांडणे करून जागा मिळवणे आणि नस ओढीत तासन्तास मित्रमंडळींना हसवीत राहणे त्यांना जमते. मात्र ही बोली-शैली मार्मिक व मुलायम असण्यापेक्षा राठ, कडक आणि दिलखुलास अशी असते. सूचकता, स्मित या बाबींचा त्यांच्याशी फारसा संबंध नाही. अस्सल मराठवाडी शैलीत शिव्या दिल्याप्रमाणे खाजगी बैठकीत ते समजूत घालतात. त्यांच्या नम्र विनंतीला साहेबी आज्ञेचा 'टोन' असतो. हे बदलून जोवर सौम्यपणे कुजबुजणे व मचूळ हसणे ते शिकून घेत नाहीत, तोपर्यत अनंतराव विरोधी पक्षातच राहणार. याला कुणाचाच इलाज नाही !
 पण त्यांची पकड फार घट्ट असते. दमादमाने, पण परिचित माणूस सगळाच्या सगळा ते पचवून टाकतात. त्यांच्या सहवासाच्या जाळ्यात एखादा प्राणी गुरफटला म्हणजे तो कायमचा अडकतो. अनंतराव त्यांना पटेल त्या दिशेने जात राहतात. त्यांचे शेकडो मित्र ओरडत, कुरकुरत, त्यांना शिव्या मोजीत, पण त्यांनी सांगितलेले ऐकत त्यांच्यामागे फरफटत जातात. सामान्यांत लोकप्रिय असणारा, पण स्वतःची संघटना नसणारा असा हा मराठवाड्यातला सर्वांत महत्त्वाचा लोहचुंबक आहे. त्याचे घर एक अन्नछत्र असल्याप्रमाणे आहे! 'येथे कुणाही माणसाला मोफत आग्रह करून वाढले जाईल,' अशी पाटी त्या घरावर लावायला हरकत नाही. बहुतेक सामाजिक कार्यकर्ते बायकोचे शत्रू नंबर १ असतात. ते मुळी बायकोच्या मुळावर येण्यासाठीच जन्मले असतात. अनंतराव याही जातीचे श्रेष्ठ प्रतिनिधी आहेत ! हा गोतावळा त्यांच्या घरी जेवतो. तिथे येऊन आजारी पडतो. काही सज्जन आजारी असले म्हणजे तिथे येतात ! काही महाभाग जिथे आजारी पडतील तिथे जाग्रणासाठी सपत्निक अनंतराव जातात. असा हा नित्यक्रम सदैव चालू असतो. त्यांचा चेहरा पाहून इतरांना मात्र हे काही जाणवण्याचा संभव नसतो.
 शालेय जीवनात व कॉलेजात अनंतराव स्कॉलर होते म्हणून ऐकतो. पण विद्वत्तेचे तेजोवलय त्यांच्याभोवती फारसे दिसत नाही. तसेच कारण घडल्याशिवाय त्यांचे चिंतन व बुद्धीची चमक प्रकट होत नाही. रिकामटेकड्या खुशालचेंडू गप्पिष्टांचा अड्डा ज्या पातळीवरून सर्व विषय हाताळीत असतो तीच पातळी सामान्यत्वे खाजगी बैठकीत त्यांची असते. विषयातून विषय निघाला म्हणजे मग आपण वाचलेली पुस्तके त्यांनी आधीच वाचली आहेत, आपल्याला आज आलेल्या मौलिक शंका त्यांना पूर्वीच जाणवल्या आहेत हे कळते. मात्र असल्या 'ॲकॅडमिक' चर्चांची त्यांना फारशी आवड नाही. एखादा मित्र बौद्धिक मस्तवालपणा फार करू लागला म्हणजेच फक्त अनंतराव त्याची मस्ती उतरवून देतात. एरवी सगळा मामला 'जनते 'च्या पातळीवरून चाललेला असतो. शिक्षण गुंडाळून देशाची हाक म्हणून ते राजकारणात उतरले. गरीब घरच्या सामान्य कार्यकर्त्याला जो झगडा द्यावा लागतो तो त्यांनाही द्यावा लागला. त्याचे आता पूर्ण घट्टे पडले आहेत. उपेक्षा, कुचंबणा, अपयश यांची व त्यांची मैत्री फार जुनी आहे ! दारिद्रयही अनंतरावांनी खूपच सोसले. विरोधी पक्षात असणान्या गरीब, प्रामाणिक कार्यकर्त्याची ही सार्वत्रिक कहाणी आहे. निजामी कारकीर्दीत जी माणसे फारसा विरोध न करता राजानुकुल राहिली तोच गट व त्यांचे वारसदार आजच्या दिल्लीपतींच्या पक्षात टेसाने मिरवत आहेत ! ज्या वेळी काँग्रेस ही आगीची खाई होती त्या वेळी अनंतराव त्या खाईत होते. आज ज्या वेळी विरोधी पक्ष पराभवाची भुई झाली आहे, त्या वेळी अनंतराव विरोधी पक्षात आहेत ! तीच ताठ मान, तोच बेदरकारपणा, तोच चिवट निगरगट्टपणा. पण या साऱ्या घटनांनी त्यांची रसिकता लोपलेली नाही. पराभवामुळे येणाऱ्या निराशेचा अगर कटुतेचा त्यांच्याजवळ लेशही नाही. ज्या जनतेने दारिद्रय, पराभव, मनस्ताप यापेक्षा अधिक काही त्यांना दिले नाही तिच्यावरच त्यांचे गाढ प्रेम आहे ! तिच्याशी निष्ठा ठेवून त्यांची वाटचाल चालू राहते.
 मराठवाडा मागासलेला म्हटला तरी आता नियतकालिके इकडेही खूपच झाली आहेत. दर जिल्ह्यात चारदोन साप्ताहिके आहेत. एक दैनिक आहे. पण 'मराठवाड्यात' जो दर्जा आहे त्याला अजून तरी तोड उत्पन्न झाली नाही. मराठवाड्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रांत घडणाऱ्या घडामोडी समजून घ्यायच्या असतील तरीही; आणि या भागातील जनतेच्या ठणकणाऱ्या सर्वच प्रश्नांचे एकमेव व्यासपीठ पाहायचे असेल तरीही; 'मराठवाडा' वाचणे याखेरीज दुसरा मार्ग नाही. सदर नियतकालिकाचे संस्थापक अनंतराव नव्हेत, पण या नियतकालिकाला हे जे प्रातिनिधिक स्वरूप प्राप्त झाले आहे, ते कर्तृत्व मात्र अनंतरावांचेच. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीचे दोन तीन महिने 'मराठवाडया'त जे लिखाण आले ते एकत्र केले तर मराठवाड्यातील दुर्दशेचा व जनतेच्या तक्रारीचा आकडेवार, पुरावेशुद्ध संदर्भ-ग्रंथ तयार करता येईल. निवडणुकीच्या धामधुमीत प्रक्षोभक लिखाण, उपहास, टर उडवणे याला महत्त्व असते. अनंतरावांनी हा माल कमी पडू दिला नाही. पण या निमित्ताने बुद्धीला आवाहन करणारे समतोल लोकशिक्षण साधण्याचा जो प्रचंड प्रयोग त्यांनी केला त्याला इतर भागातील (विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई) एकाही नियतकालिकात तोड सापडणार नाही. ते कर्तृत्व अनंतरावांचेच म्हटले पाहिजे. सर्वपक्षीय जनतेच्या तक्रारींचा चव्हाटा, जनतेच्या इच्छेचे वाहन व तिच्या गरजांचे दर्पण असे नियतकालिक दीर्घकाळ एका राजकीय पक्षाशी निगडित असणाऱ्या कार्यकर्त्याने यशस्वीरीत्या चालवावे, यात अनंतरावांचे सामर्थ्य दडलेले आहे. मधे मधे तर ना. यशवंतरावजींचा औरंगाबादी मुक्काम ही अनंतरावांची तक्रारी सादर करण्याची व मुख्यमंत्र्यांची या तक्रारीना प्रतिसाद देण्याची पर्वणी ठरून गेली होती! ना. यशवंतरावांनी औरंगाबादच्या आपल्या दर व्याख्यानाचा एक दीर्घ भाग यासाठी देण्याची प्रथा पाडली होती.
 अनंत रावांचे वक्तृत्व असेच सरळसोट असते. व्याख्यानात ढंगदार शैली, नर्मविनोद, सूचकता फारशी नसते. बुद्धीला आवाहन देत, पण धारदार आव्हानवजा भाषेत ते बोलतात. श्रोते असले आणि नसले तरी त्यांचे अडत नाही! रिकाम्या सभेसमोर दीड-दोन तास सतत बोलणे ही क्रिया जमण्याइतका मख्खपणा त्यांच्याजवळ आहे ! 'सर्व लोक आपापल्या घरी बसून चिंतनशील मनाने माझे व्याख्यान ऐकत होते !' असे वर्णन करण्याइतका मिस्किलपणा त्यांना उपजत आहे. पण त्यांच्या व्याख्यानाला गर्दी जमतेच. मात्र हा प्रभाव वक्तृत्वाचा नसून निरलसपणे दोन तपे जनतेसाठी झिजणान्या सचोटीचा आहे. जनता कितीही उदासीन असली तरी तिलाही थोडीफार लाज असते ! सचोटीसमोर नमण्याची थोडीफार सवयही परंपरेने प्राप्त झालेली असते. त्यांचा दिवाळी अंक महाराष्ट्रभर तज्ज्ञांत व जाणकारांत आकर्षण निर्माण करणारा असा असतो. ललित साहित्याबरोबर वैचारिक साहित्यावर भर देणारा दिवाळी अंक म्हणून 'मौजे 'सारख्या कठोर परीक्षणकारांनी या अंकाला मान्यता दिली आहे. मराठवाड्यातून दर्जेदार दिवाळी अंक याच नियतकालिकाचा निघतो. साहित्याची निवड अनंतराव करतात. याविषयी त्यांना स्वतःचेत्र नाक प्रमाण वाटते ! चोखंदळ अभिरुची व निर्दोष रसिकता नसली म्हणजे असा प्रयोग अंगलट येतो. आज अनेक वर्षे हा प्रयोग यशस्वी होत आला यावरून खडकामागे जिवंत पाण्याचे फार मोठे झरे आहेत, असे म्हणण्याला हरकत नाही. मराठवाड्यात जे काही नवे टीकाकार, साहित्यिक आले व बनले त्यांच्यामागे हाच साधासीधा माणूस खंबीर होता. परिणामी वृत्तपत्र व राजकारण यांच्या जोडीला मराठवाडा साहित्य परिषद त्यांच्याच गळ्यात पडली आहे. संस्थांचे जाळे डाव्या-उजव्या खांद्यावर टाकून, मित्रांचा गोतावळा खिशात घालून या माणसाचे हात पुन्हा नाव ओढण्यासाठी रिकामे आहेतच ! चेहऱ्यावरचा निर्घोर सुस्तपणा कायम आहे.
 महाराष्ट्रात दारूबंदी असली तरी त्याचा परिणाम अनंतरावांना शुद्धीवर आणण्यात झाला नाही ! गेली वीस वर्षे एका नशेत घालवल्यासारखी त्यांनी घालवली आहेत. चालुक्यांच्या काळात हत्तींना दारू पाजवून रणमैदानात नेत. अनंतरावांना न पिताच चढलेली असते ! 'नाही, नाही' म्हणत एखाद्या कार्यात ते गुंतून पडतात. त्यांना थकवा आलेला असतो. विश्रांतीची गरज असते. " झटकन हे एक काम संपवून टाकू व मग मोकळ्या मनाने चार-आठ दिवस विश्रांती घेऊ," असे ते ठरवतात व अंगावर पडलेले काम वेगाने आटोपण्यासाठी प्रयत्नाला लागतात. या इच्छेचीच नशा त्यांना चढते. तहानभूक विसरून मग महिना दोन महिने त्यांची धडपड चालू राहते. शेवटी एकदाचे हे काम संपते. त्यात कधी यश कधी अपयश आलेले असते. काम संपताच गेले अनेक दिवस आपले डोके व छाती दुखत होती', 'घरची मंडळी आजारी आहेत,' इत्यादी गौण मुद्दे त्यांना आठवतात ! 'उद्यापासून चार-आठ दिवस पूर्ण विश्रांती' असा निश्चय ठरतो व ते झोपतात. दुसऱ्या दिवशी झोप संपण्याआधी नव्या कामाचे आमंत्रण वाढून आलेले असते. नकार देत अनंतराव त्यात गुरफटतात. दुपारपर्यंत त्यांना नव्या कामाची नशा चढते. ही नशा आता 'क्रॉनिक' झाली आहे. निदान या जन्मी तरी तिच्यावर इलाज नाही.