Jump to content

वाचावे असे काही

विकिस्रोत कडून


चोखंदळ वाचन सर्वांना जमतंच असं नाही. प्रत्येक पट्टीच्या वाचकास आपलं वाचन चोखंदळ वाटतं. पण दुसऱ्याचं वाचन समजून घेऊ लागलो की लक्षात येतं, अरे, हे लई भारी! असं आस्वादक वाचनाचा ओनामा समजावणारं हे पुस्तक. रूढ अर्थांनी हा वेचक ग्रंथांचा परिचय असला, तरी लेखकाने तो चपखल पद्धतीने करून दिल्याने वेधक नि हृदयस्पर्शी झाला आहे. वाचकाच्या चवीचं रूपांतर चटकेत करणारं हे पुस्तक. ठेवणीतल्या चिजा अलवारपणे उघडून दाखवताना सौदागराची नजाकत, फेक, मर्मबंधातली ठेव उलगडत राहते. पाहणारा डोळे विस्फारत आश्चर्यचकित तर कधी दिङमूढ ! तसाच काहीसा अनुभव 'वाचावे असे काही' वाचताना येतो खरा!





वाचावे असे काही


डॉ. सुनीलकुमार लवटे


वाचावे असे काही
(समीक्षा)
डॉ. सुनीलकुमार लवटे

संपर्क
'निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर - ४१६ ००७
मो. नं. ९८८१ २५ ०० ९३
drsklawate@gmail.com
www.drsunilkumarlawate.in


प्रथम आवृत्ती २०१८


® डॉ. सुनीलकुमार लवटे


प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर. फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com

मुखपृष्ठ
गौरीश सोनार


अक्षर जुळणी
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी


मुद्रक
प्रिमिअर प्रिंटर्स, कोल्हापूर

मूल्य रु२००/-





मला वाचक बनवणाऱ्या
सर्व
पुस्तक आणि लेखकांना!

वाचन छंद मन करी धुंद!

 दैनिक लोकमत, कोल्हापूरच्या आवृत्तीसाठी सन २०१७ मध्ये लिहिलेल्या सदराचे, 'वाचावे असे काही' हे ग्रंथ रूप होय. याच नावाने हे सदर चालले होते. वाचन चोखंदळ व्हावे, वाचन संस्कृती समृद्ध व्हावी, श्रेष्ठ पण विविधांगी ग्रंथांचा परिचय देऊन वाचन चतुरस्र बनावे या उद्देशाने केलेले हे लेखन. नवं, जुनं वाचन वाचकांपुढे ठेवले गेले. वाचकांचा यास उदंड प्रतिसाद लाभला. ही वाचन न लोपल्याची खूण होय. माहिती व संपर्क क्रांती, संपर्क साधन विकास, संगणक प्रचार व प्रसार, जागतिकीकरणातून आलेली आत्मरतता व व्यस्तता या सर्वांनी वाचनाचा पूर्वावकाश व शिळोप्याचा वेळ भौतिक सुख व आभासी समाज जीवनास समर्पित केला. त्यामुळे वाचन वेळाचा झालेला संकोच ही वर्तमानातील खरी समस्या होय. वाचन लोपले नसले, संपले नसले तरी आखडले आहे हे निश्चित. यावर नकारात्मक चर्चा करण्यापेक्षा सकारात्मक पर्याय देण्याच्या उद्देशाने झालेले हे लेखन. त्याच्या ग्रंथरूपामुळे या लेखनास 'चोखंदळ वाचनाचा मार्गदर्शक' असे आलेले रूप हा पश्चात परिणाम होय. हे ठरवून केलेले लेखन नसले तरी ते ज्या पद्धतीने झाले त्यातून पूर्वी असलेला वाचन छंद नव्या काळातील वाचकांना ध्येयधुंद करत ग्रंथान्वेषी बनवेल, चोखंदळ वाचक बनवेल असा विश्वास वाटल्यावरून केलेला हा ग्रंथोद्योग.

 'अक्षर दालन'मुळे हा योग! त्यामुळे अमेय जोशींचे आभार! दैनिक लोकमतचे संपादक श्री. वसंत भोसले व मुख्य वार्ताहर श्री. विश्वास पाटील यांची कल्पना म्हणून हे लेखन घडले नि पुस्तक आकारले.

दि. ११ जानेवारी, २०१८
-डॉ. सुनीलकुमार लवटे
 

वि. स. खांडेकर जयंती.




  अनुक्रम
  • वाचन : एक मुक्त चिंतन/७

१. आजाद बचपन की ओर - डॉ.कैलाश सत्यार्थी १६
२. ऐवज-संपादक अरुण शेवते २०
३. चेहरे-गौतम राजाध्यक्ष २४
४. गझलसम्राट सुरेश भट आणि...-प्रदीप निफाडकर २८
५. राजर्षी शाहू गौरव ग्रंथ -संपादक डॉ.रमेश जाधव ३२
६. कळेल का त्याला आईचे मन? -अरुण शौरी ३७
७. अंगारवाटा -भानू काळे ४०
८. डॉ.बाबासाहेब आंबेडकर -लोकवाङ्मय गृह ४४
९. प्रसिद्ध व्यक्तियों के प्रेमपत्र -हिंद पॉकेट बुक्स ४८
१०. वचन सिद्धांत सार -संपादक डॉ.फ.गु. हळकट्टी ५२
११. आठवणीतल्या कविता-संपादक महाजन/बर्वे/तेंडुलकर/पटवर्धन ५६
१२. साऊथ ब्लॉक दिल्ली -विजय नाईक ६०
१३. ग्रंथगप्पा -शरद गोगटे ६४
१४. राजबंदिनी :आँग सान स्यू की हिचं चरित्र -प्रभा नवांगूळ ६८
१५. फिजीद्वीप में मे २१ वर्ष -तोताराम सनाढ्य ७१
१६. विस्मृतीचित्रे -डॉ.अरुणा ढेरे ७५
१७. आणि मग एक दिवस -नसिरुद्दीन शहा ७९
१८. विल्यम शेक्सपिअर :जीवन आणि साहित्य -के.रं. शिरवाडकर ८२
१९. फाँस -संजीव ८६
२०. शब्द -सार्त्र ८९
२१. जीवनदर्शन -खलील जिब्रान ९३
२२. सारे रान -इंद्रजित भालेराव ९७
२३. रवींद्रनाथ टागोर :समग्र जीवनदर्शन ग्रंथत्रयी -डॉ.नरेंद्र जाधव १०१
२४. कागद आणि कॅनव्हास -अमृता प्रीतम १०४
२५. छ.राजाराम महाराज :जीवन आणि कार्य -डॉ.केशव हरेल १०८





२६. रुग्णानुबंध -डॉ.दिलीप शिंदे ११२
२७. लीळा पुस्तकांच्या -नितीन रिंढे ११५
२८. निवडक नरहर कुरुंदकर/व्यक्तिवेध -संपा.विनोद शिरसाठ ११९
२९. हाऊ टू रीड अ बुक -अॅडलर/डोरेन १२३
३0. रोचक आठवणींची पाने -अशोक चोप्रा १२६
३१. मंटो की श्रेष्ठ कहानियाँ -संपा.देवेंद्र इस्सर १३०
३२. दिवाळी अंक -२०१७ १३४
३३. गुजरात फाईल्स -राणा आयुब १३८
३४. मुक्तिबोध:व्यक्तित्व सही की तलाश में -कृष्णा सोबती १४२
३५. भंगार -अशोक जाधव १४५
३६. कॉ.गोविंद पानसरे समग्र वाङ्मय खण्ड-२-संपा.चौसाळकर/शिंदे १४९
३७. शतकाची विचारशैली (खंड-४)-संपा.-रमेश धोंगडे १५२
३८. निर्बाचित कबिता -तसलिमा नसरिन -अनु.मृणालिनी गडकरी १५६
३९. समारोप :सायोनारा १६०

  • पूर्वप्रसिद्धी सूची/१६४


वाचन : एक मुक्त चिंतन

 वाचन असतं काय? वेड, व्यसन, व्यासंग, शिळोप्याचा उद्योग की प्रतिबद्ध व्रत! मी हे अद्याप ठरवू नाही शकलो. पण एक मात्र खरं की त्याच्याशिवाय मला चैन नाही पडत. आयुष्याच्या एका वळणावर मी एकटा होतो. एकांतच माझा सोबती होता आणि जीवन म्हणजे एक मोठी निर्वात, निर्मनुष्य पोकळी होती. त्या हुरहरी, झुरझुरीच्या दिवसात वाचनानी माझी जी साथ-संगत केली ना त्यांनी मी भरून पावलो नि माझी पोकळी भरून निघाली. वाचन माणसाला गुंतवतं नि गुंत्यातून सोडवतंही! माणूस वाचतोच का मुळी? असं जर तुम्ही मला विचाराल तर मी सांगेन की वाचन हा एक आत्मशोध असतो. माणूस बालपणापासून ते आयुष्याच्या अंतापर्यंत सतत नित्यनूतन वाचत राहातो. गोड गोष्टी, चांदोबा, परीकथा, कुमारकथा, संस्कारमाला, राक्षस, देव, दैत्यकथा, आख्यायिका, बोधकथा, रूपककथा, कादंबरिका, शिकार कथा, हेर कथा, शृंगार कथा, विज्ञानकथा, आत्मकथा, चरित्र, प्रवासवर्णन, तत्त्वज्ञान, गूढकथा सारं पालथं घातलं तरी वाचनाची असोशी, तृष्णा, तहान काय थांबत नाही, थकत नाही. वाचन ही एक अतृप्त तहान खरी.  माणूस एकाचवेळी 'स्वान्तःसुखाय' वाचतो नि 'परसुखाय' ही. स्वतः वाचलेलं दुसऱ्यास सांगण्याची त्याची आतुरता म्हणजे स्वान्तःसुखायचा परसुखाय झालेला कायाकल्प! या अशा स्थित्यंतरातूनच वाचनाने जग बदलते 'जे जे आपणासी ठावे, ते ते दुसऱ्यासी सांगावे' चा भुंगा... तो गुंजारव मना-कानात सतत गुंजत, घुमत राहतो. म्हणून माणूस वाचत राहतो. वेळ काढण्यासाठी वाचणारा कधी काळचा माणूस, रंजन ही त्याची एकेकाळची भूक होती. आज तो वाचनाने शहाणा, सूरता झाला नि माहितीसाठी वाचणारा माणूस ज्ञानपिपासू बनला. पूर्वीचं रंजक वाचन ही रंजक साहित्याची (Penny Literature) परिणती होती. आज माणूस कल्पनेपेक्षा वास्तववादी, जीवनोपयोगी, ज्ञानपर साहित्य (Pretious Literature) वाचू मागतो. कारण त्याचं जीवन आज संघर्षमय, स्पर्धात्मक झालंय रंजनाची उसंत सरली नि जीवन जगणं अनिवार्य होऊन तो जगण्याचा चक्रव्यूह भेदण्यास सरसावलाय.

 पुस्तकं सुजाण सन्मित्रांसारखी असतात. ती तुम्हास कधीच एकटी पडू देत नाहीत. ती संकटप्रसंगी तुमचे मार्गदर्शक बनतात. तुम्हास हात देतात नि संकट निभावून जातं. बहुश्रुत वाचन (Multiple Reading) बहुगुणी औषधासारखं असतं. ते प्रत्येक विकारावर मात करत तुम्हास विचारी बनवतं. वाचनाने मनाचा भ्रमनिरास होऊन जग लख्ख दिसू, भासू लागतं. वाचन दिशा असते तसा दिलासाही. वाचनाने विचार स्पष्ट होतात. माणूस पारदर्शी बनतो. म्हणून तर वाचनास ज्ञानप्राप्तीचे महाद्वार (Gateway of Knowledge) म्हटलं आहे. स्थल, कालाच्या सीमा ओलांडणारं बहुभाषी, बहुआयामी वाचन म्हणून तर श्रेष्ठ असतं. घर, संसार, गृहस्थीच्या रगाड्यात, वाताचक्रात वाचनच आपला धीर बनतो नि ध्यासास ध्येय बनवतो. इतकं वाचल्यावर माझं मतच होऊन गेलंय की माणसानं काहीही वाचावं. ते कधीच वायफळ नसतं नि वाया जात नसतं. निरूपयोगी वाचन अस्तित्वातच नाही नि नसतं.

 जो वाचत नाही तो केवळ अडाणीच नाही राहात तर तो कालबाह्यही ठरत जातो. 'कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला' हे जीवनाइतकेच वाचनासही लागू आहे. रद्दीतही रत्ने असतात म्हणजे काय ? 'No word is useless.' पुडीचा कागदही तुम्हास अभिजात सुख देऊन जातो. जीवनोपयोगी वाचन हे वर्तमान काळातील वाचन व्यवहाराचे ब्रीद होऊन बसले आहे. पण त्यामुळे ललित मनोहारी भाषा व साहित्य सौंदर्यास आपण पारखे होऊ की काय याची मला साधार भीती वाटू लागली आहे. वर्तमानातील मनुष्य ययातीचं जीवन जगू लागला तसा त्याचा मिडास झालाय. त्यामुळे त्याचं आर्किमिडिज, आईनस्टाईन, सॉक्रेटिस, बुद्ध, महात्मा व्हायचं थांबलं. हा विकास नसून र्‍हास होय. भौतिकापेक्षा बौद्धिक, तार्किक, तात्विक लेखन, वाचन माणसास नुसतं प्रगल्भच नाही करत तर ते त्यास प्रज्ञावान बनवत असतं, हे आपणास विसरून चालणार नाही. जीवनोपयोगी साहित्य चरम क्षणिक सुख देतं पण तुम्हास चिरंतन सुख हवं असेल तर तुम्ही बुद्धी मंथन (Brain Storming) करणारं साहित्यच वाचलं पाहिजे. 'जो न देखे रवी, सो देखे कवि' या काव्यपंक्तीत ज्या अपरासृष्टीचं प्रतिबिंब आहे, ते तुम्हास अनुभवायचं तर कल्पनास्पर्शी लेखनास पर्याय उरत नाही. कल्पना हीच वास्तवाची जननी असते. ती नसती तर सृष्टी स्थितीशील राहिली असती. सृष्टीतील प्रत्येक परिवर्तनामागे कल्पिताचा खटाटोपच कारणीभूत आहे. चाकाचा शोध असो वा शेती, अग्नीचा सारं जन्मलं ते तार्किकातूनच. माणूस इतिहास वाचतो तो 'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' या शिक्षण नि शिकवणीसाठी. भूगोल वाचतो तो पर्यावरणाचं भान यावं म्हणून. पण इतिहास मिथक जन्माला घालतो नि भूगोल पर्यावरणाचे भान देतो हे खरं. इतिवृत्तात्मक ज्ञान-विज्ञानाने तुम्हास काळाचे तपशील पुरवतात पण कालभान येतं ते ललितामधून!

 साहित्याचं वाचन आपलं बुद्धिमांद्य घालवतं-नवा उत्साह देणारं वाचन वाचकास नव्या मुशाफिरींची स्वप्ने देतं. बहुविध वाचन आपणास अष्टपैलू बनवतं. वाचन माणसाचा केवळ बुद्ध्यांक नाही वाढवत तर ते त्याचा संवेदना सूचकांक ही वधारत असते. गुरुमुखी शिक्षण, विचार, स्वनिरीक्षण, दृक्-श्राव्य साधनांनी मिळणारं ज्ञान, संगणकीय वाचन अशा वैविध्यपूर्ण ज्ञान साधनांनी विकसित होणारे आजचे साहित्य प्रज्ञासंपन्न असते. ते पाहून, चाळून (Browing) चालणार नाही. समुद्राच्या खोल पोटात शिरून मोती वेचणाऱ्या पाणबुड्या (गोताखोर) प्रमाणे वाचन सव्यसाची, उपसणारे (Surffing), पिंजून काढणारे हवे. माणसाचं मन लोखंडासारखं असलं पाहिजे. न वापरता लोखंडी वस्तू नुसती ठेवली तर तांबेरते, गंजते, पण तेच लोखंड वापरले तर त्यास चकाकी, झळाळी येते. वाचनाने बुद्धी तल्लख होते. त्याचं कारण वाचन ही केवळ शब्द क्रिया नाही तर विचार प्रक्रिया आहे. सत्यनारायण पूजेतील आख्यान वाचन, वाचन नव्हे. शब्दोच्चारी प्रकट वाचन केवळ वाचन कर्मकांड होय. जे वाचन तुमचे विचार बदलून तुम्हास प्रगत, पुरोगामी बनवते ते वाचन समृद्ध! परिवर्तन, कायाकल्प ही वाचनाची खरी कसोटी होय. वाचन विचार-प्रवण असेल तर नुसतं वाचूनही माणूस थकून जातो. ते कष्टप्रद होणं म्हणजे तुम्ही वाचलेल्यावर विचार, चिंतन, मनन करता म्हणून. केवळ वाचिक कसरत वाचन नव्हे. समूहवाचन, प्रकट वाचन पारायण असते. मौन पारायण, आत्मवाचन जितके वेळा तुम्ही कराल तितक्या वेळा ते तुम्हास नवी अनुभूती, जाणीव, विचार देते. म्हणून अभिजात साहित्याचे वाचन कधीच वाचकास समाधान, तृप्तीची ढेकर नाही देत. देतच असेल तर वारंवार वाचनाचा नाद नि छंद!

"प्रसंगी अखंडित वाचित जावे' हा न्याय पाळू तर वाचनाचे रुपांतर वेडात होते. वाचन हा छंद आहे. तो एक नादही! मनात निरंतर रुंजी घालणारं वाचन तुमच्यात वाचन निरंतरता जपतं. जीवनात चतुरस्र वाचनाचं महत्व असाधारण असतं. मुळात विविध ज्ञान-विज्ञाने, विद्याशाखा निर्माण झाल्या त्याच मुळी मानव जीवन सर्वांगी समृद्ध करण्याच्या ध्यासातून. एकाच प्रकारचं वाचन माणसात कंटाळा निर्माण करतं. उलटपक्षी रुचीपालट वाचन तुम्हास नित्य आनंदी, सर्जनशील, नवोपमक्रमी बनवतं. 'पान क्यों सडा? घोडा क्यों अडा?' याचं उत्तर भाकरी करपण्यात आहे. फिरवली नाही, परतली नाही की भाकरी करपते. पानाची चवड बदलत नाही राहिलात की पानं सडू लागतात. घोड्याला पळवलं नाही की त्याचे गुडघे धरतात. वाचनही फिरतं हवं. बहुरस संपन्न, बहुराग केंद्री वाचन वाचकास चिरतरुण बनवतं. आईच्या पोटातील गर्भाप्रमाणे माणसाचा मेंदू चळवळत राहायला हवा. मेंदूच्या घड्या विचार, चिंतन, मनन, निदर्शक असतात म्हणे. मेंदूवरच्या अधिकच्या घड्या बुद्ध्यांक निदर्शक असतात. जितके वाचन अधिक तितक्या घड्या अधिक. 'ज्ञान' हे बहिरागम शिक्षकामुळे शक्य असतं असं सॉक्रेटिसने लिहून ठेवलंय. हा बहिरागम शिक्षक वाचनशील असतो म्हणून त्यात समाजशीलता विकसित झालेली असते. नुसतं वाचन निरुपयोगी. वाचल्याचा परिणाम होऊन तुमचा जीवन व्यवहार बदलला तर ती वाचनाची इतिश्री, फलप्राप्ती समजावी. वाचनाचा वापर त्याचं प्रतिबिंब म्हणजे तुमचा आचारधर्म. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ' तसं वाचनही व्यर्थ! वापराने विकास व नावापराने -हास हा उत्क्रांतीचा नियम आहे. बैलाचा खांदा मजबूत, घोड्याची छाती दमदार, गाढवाची पाठ वजनदार, एडक्याचे शिंग टणक का विचाराल तर त्याचं रहस्य वापरात सामावलेले तुम्हास आढळून येईल. माणसाची शेपूट झडली, लांब केस आखूड झाले, नखे नाजूक झाली याचं कारण त्यांचा वापर नसणे हेच होय. पैलवानाचे दंड, तिरंदाजाचे डोळे, गवयाचे कान, वादकाची बोटे कुशल का तर कौशल्यपूर्ण वापर नि फिरवणूक हेच त्याचं कारण. वाचन ज्ञान-विज्ञानाचा, विद्याशाखांचा फेर धरत माहिती व संदर्भाचा परीघ रुंदावत राहते.

 वाचन' शब्दाची व्युत्पत्ती वच्' धातूपासून झालेली आहे. त्या अनुषंगाने वाचनाचा अर्थ होतो बोलावणे. आपण कागदावर लिहिलेले वाचतो म्हणजे लिखिताला बोलते करतो. आपलं लेखन, वाचन म्हणजे मातृकांचा मिलाफ. मराठीत पंधरा स्वर (ॐ, अनुस्वार, विसर्ग सहित) नि ३५ व्यंजने असा ५० मातृकांचा संच होय. या मातृकांना बोलते करण्याची, क्रियाशील बनवण्याची क्रिया, कला म्हणजे वाचन. बुद्धिमान माणूस कालपव्यय करत नाही. तो काळ सत्कारणी लावतो. काव्य, शास्त्र, विनोद इ. वाचनाने तो काळाचा सदुपयोग करत असतो. उलटपक्षी व्यसनाधीन, निद्राधीन (मूर्ख) आपला वेळ रिकामा दवडतात किंवा वादावादीत घालवितात असा अर्थाचा एक संस्कृत श्लोक आहे तो वाचनाचे महत्व अधोरेखित करतो-

 काव्य शास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम।
 व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा।।

 आपल्या समाजात वाचणारे हाताच्या बोटावर मोजता येईल असे तर अगणित न वाचणारे. वाचता न येणे मी समजू शकतो. ते एकवेळ मी क्षम्यही मानतो. पण वाचता येत असताना न वाचणे माझ्या लेखी शुद्ध अपराध नि आळस होय. वाचासिद्धी असा शब्द मौखिकाशी संबंधित. तशी वाचनसिद्धीही असते. मौखिक काळातील सृजन हे 'वाङ्मय' म्हणून ओळखले जायचे ते वाक्मय' होते म्हणून. संथापठन, पाठांतर हे वाचनाचे प्राथमिक रूप होय. मातृकांची स्वर, स्वरादी, व्यंजनांची ओळख घडविणाऱ्या प्रारंभीच्या काळात प्रगट वाचन मात्र उच्चारण (Utterance) होतं. माणूस जसजसा वाचू, विचार करू लागला तसं उच्चारणाचं आकलन (Com- prehension) होणं महत्वाचं होत गेलं. मग पुढे समजणं (Under- standing) ही वाचनाची कसोटी बनून गेली.

 यातून वाचन विवेक जन्माला आला. वाचन विवेक म्हणजे माणूस का वाचतो याचा विचार रंजनासाठी वाचणं गरजच. पण ज्ञानासक्त वाचन उपयुक्त हा विचार वाचन विवेकातून जन्माला आला. मग वाचन विधिनिषेध माणसास कळला. रस, भाव, विकार, विचार, ज्ञान, विज्ञा, सर्व वाचनातून साकारते.शृंगार सुखावह पण करुणा हितावह असा विचार वाचन विवेकाने दिला. अक्षर, चित्र, शिल्प, आकृती, लिपी सारे घटक वाचनास संपृक्त व संपूर्ण करतात. अक्षरंच नाही वाचायची, चित्रही वाचता आली पाहिजे. चित्र, शिल्प, आकार, भावभंगिमा वाचता आली की देहबोलीचं ज्ञान येतं. मग आपण माणूसही वाचू शकतो. आज निसर्ग वाचन, जंगल वाचन असे शब्द कानी पडतात. तेव्हा वाचन विकासाच्या पाऊलखुणा लक्षात येतात. वाचलेलं विश्लेषित करता येणं ही वाचनाची उच्च कोटी म्हणायची. पण सर्वोच्च वाचन कल्पना, तर्क, तत्वज्ञान, नव ज्ञानविज्ञानास जन्माला घालत असतं हे आपणास विसरून चालणार नाही.

 वाचन कृती आहे, कला की विज्ञान याबाबत विचार करताना असे लक्षात येईल की प्रारंभी ती एक वाचिक कृती होती. पण नंतरच्या काळात वाचन प्रभावी करण्याच्या दृष्टीने विचार सुरू झाला. वाचनात हस्व-दीर्घ उच्चारण, आरोह-अवरोह, विराम यांचं असणारं असाधारण महत्व उमगतं ते आदर्श अभिवाचनातून. यातून मग वाचन कला विकसित झाली. वाचन कला दृष्टी, ध्वनी नि वाचा यांचा त्रिवेणी संगम होय. ही एक अंतर्क्रिया असून तीसाठी तादात्म्याची गरज असते. एकाग्रता निर्माण होते ती वाचनाविषयी तुमच्या प्रतिबद्धतेतून. शिवाय आपण जे ग्रंथ वा मजकूर वाचतो त्याच्या आशय, विषयावरही एकतानता अवलंबून असते. वाच्य मजकूर आकर्षक असेल तर अंतर्दृष्टी, (Insight) नि अंतरात्मा (Inner Mind) यांची एकात्मता घडून येऊन वाचन चिरस्मरणीय ठरते. वाचन गतिमानतेने करणे ही एक कला आहे. पण त्यात उरकून, संपवून टाकायचा भाग आला की ते कर्मकांड बनून जाते. आकलनयुक्त वाचन कौशल्य हे तन्मयतेची फलश्रुती असते. गतिमान वाचन कौशल्यामुळे वाचक कमी वेळात अधिक वाचू शकतो. आता तर गतिमान वाचनासाठी 'The Read- ers Edge' सारखी सॉफ्टवेअर्स, अ‍ॅप्स विकसित झालीत. वाचन कला सरावाने गतिमान करता येते तशी ती कुशलही बनविता येते. त्यासाठी तुमच्यात वाचनाची आवड नि अभिरूची असणे ही पूर्वअट असते. एकदा का तुम्हाला वाचनाची कला साधली की मग स्थल, काळ, वेळाच्या सीमा ओलांडत कसेही, कुठेही तादात्म्य वाचन करू शकता.

 वाचनावर गतकाळात संशोधन झाल्यामुळे वाचन कलेचे वाचन विज्ञानात रूपांतर होत आहे. विदेशात वाचनाचे अभ्यासक्रम तयार झाले असून वाचन गती, व्याप्ती वाढवणे शक्य झाले आहे. आकलन प्रगल्भ करता येणे शक्य असून विश्लेषण अधिक नेमकेपणाने आता करता येते.वाचनातून विचार, साहित्य समीक्षा, परीक्षण इत्यादीची निर्मिती, सृजन आता परिपाठ होऊन गेला आहे. वाचन दोष दूर करणे विज्ञानामुळे शक्य झाले आहे. प्रत्येक व्यक्तीचा वाचन पट वेगळा असतो. म्हणजे एका दृष्टिक्षेपात २.५ ते ३.५ सें.मी. चा मजकूर आपण सर्वसाधारणपणे वाचू शकतो. हा आवाका तंत्र समजून घेऊन वाचल्याने वाढवणे शक्य असते. वाचनातून आपण ऐकणे, बोलणे, लिहिणे, मनन, चिंतन इत्यादी क्रिया प्रगत नि प्रगल्भ करू शकतो. आधुनिक काळात दृक्-श्राव्य साधनांच्या वापरामुळे हे शक्य झाले आहे. मोबाईल, किंडल ही नवी वाचन साधने होत. कॅसेट्स, सीडीज, टेपरेकॉर्डर, टी.व्ही. संगणक, सॉफ्टवेअर इत्यादीतून वाचन व्याप्ती (Scope), वाचन गती (Speed), वाचनपटल (Screen), शब्दसंख्या वाढवणे आता शक्य झाले आहे. शिवाय एकाग्रतेचा वेळ (Span of Attention) वाढवणे आता शक्य झाले आहे. वाचन एकाग्रता, रसग्रहण, आकलन इ.च्या चाचण्या आज प्रयोगातून सिद्ध झाल्या आहेत. वाचन दोष निराकरणाचे उपायही संशोधकांनी शोधून काढले आहेत. दर मिनिटाला वाचल्या जाणाऱ्या शब्द, पृष्ठ संख्येवरून गतिनिश्चिती व गतिवर्धन आज शक्य झाले आहे. आदर्श वाचनाचा विचार होऊन डोळे व पुस्तकातील अंतर, बैठक व्यवस्था, प्रकाश योजना एकाग्रता विचलित करणारे घटक, एकाग्रता टिकविणारे वातावरण, वायुविजन इत्यादीचा आता सूक्ष्म अभ्यास झाला आहे. माणूस दर मिनिटाला १०० ते १५० शब्द वाचू शकतो. यातून वाचन क्षमतेवर संशोधन, प्रयोग झाले आहेत. वाचन आनंददायी, सर्जनात्मक, रसपूर्ण व्हावे यासाठीचा विचारही संशोधनातून पुढे आला आहे. या सर्वांतून वाचन विज्ञान विकसित झाले असून रोज त्यात संशोधन, प्रयोगाची, साहित्य, साधनांची भर पडत ते नित्य अत्याधुनिक व प्रगत बनते आहे.

 वाचन म्हणजे लिखित अक्षरांचा वाच्य बोध होय. लेखनाचे वाच्य रूप वाचनातून साकारते. मौन, मनन, चिंतन ही वाचनाची इतिश्री असते. अक्षरं असतात आकारयुक्त चिन्ह. त्या चिन्हांचे उच्चारण वा ध्वनीरूप म्हणजे वाचन. वाचन ही एक बोध प्रक्रिया असते. पाहणे, ऐकणे, उच्चारण, आकलन, विश्लेषणातून ती संपृक्त नि समृद्ध होते. वाचन ही संकट, प्रश्ने सोडविण्याची मार्गदर्शक वाट असते. जागतिकीकरण, माहिती व तंत्रज्ञान विकास यातून माणसाचं पूर्वापार प्रचलित सांस्कृतिक जीवन बदलून गेलं. या बदलाचा मोठा परिणाम वाचन प्रक्रियेवर झाला आहे. विशेषतः दृक्-श्राव्य साधनांमुळे वाचनाचे स्वरूप बदलून गेले. पाहणं नि ऐकणं वाचन बनून गेल्याने अथवा त्यांनी वाचनाचा अवकाश काबीज केल्याने माणसाचं सरासरी वाचन घटलं. वाचकाकडून अवाचक, अनपढ असा माणसाचा प्रवास चिंता नि चिंतनाचा विषय बनून गेला आहे. त्यातून 'वाचाल तर वाचाल' अशी इशारेबाजी ऐकू येऊ लागली. वाचन संस्कृती लोप पावत चालल्याची, वाचन गती मंदावल्याची खंत समाज शास्त्री, मानसशास्त्री यांना वाटू लागली आहे. भौतिक साधनांच्या सुकाळात बौद्धिक दुष्काळ ही खरोखरीच काळजीची गोष्ट बनून राहिली आहे. वाचन साधनांची समृद्धी होत असलेल्या काळात दरडोई पूर्वापार असलेला वाचन निर्देशांक कमी होतो आहे, हा कळीचा मुद्दा बनून पुढे आला आहे. ग्रंथालये, नाट्यगृहे, सिनेमागृहे ही आपली समाजशील संस्कार केंद्रे होती. त्यांचं ओस पडणं, त्यांना उतरती कळा येणं म्हणजे माणसाचा प्रवास समूहाकडून व्यक्तिगततेकडे वळणं होय. साहित्य, कला, क्रीडा यांचं आस्वादन सामूहिक होण्यातून मनुष्य समाजशील व समाजाभिमुख बनत असतो. ती प्रक्रियाच बंद पडण्याचा धोका व्यक्तीकेंद्रित जीवन शैलीतून उदभवला आहे. ललित साहित्याजागी जीवनोपयोगी, अनुभवजन्य साहित्य निर्मिती, अभिजात ग्रंथांची जागा आध्यात्मिक ग्रंथांनी घेणं यातून एक प्रकारची निराशा, एकांतता, आळस निरूद्देशता जन्म घेती झाली आहे. ही स्थितीशीलता सृजनास मारक ठरते आहे. भाषेचं सर्वनामी, संकोची, चित्ररूप होणं यातून पण सर्जनशीलता लोपते आहे. सुभाषितवजा, अनुप्रासिक, अलंकारिक भाषेची जागा इतिवृत्तात्मक, निवेदी, वर्णन शैलीने घेणं, ती वास्तववादी होणं यातूनही भाव, रस, अलंकार, छंद संपून काव्याजागी गद्य येणं म्हणजे भावहीन शब्द संभार म्हणजेच साहित्य होऊन बसले आहे. यातून माणसाची रसिकता सौंदर्य आस्वादकता लोपणं म्हणजे जीवन एकरस, एककल्ली, एकांगी होणं होय. वाचन संपण्याचं हे अरिष्ट नि अपत्य होय. माणसाचं यंत्र होणं दुसरं काय असतं? 'Books for leisure and books for pleasure' जगायचं तर वाचन वाचलं, जगलं पाहिजे.

टॉलस्टॉय म्हणाला होता, 'मला जीवनात तीनच गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, त्या म्हणजे पुस्तकं, पुस्तकं आणि पुस्तकं.' वि. स. खांडेकर म्हणाले होते की 'ग्रंथालयात माझ्या पुस्तकांची लक्तरं झालेली पाहून माझ्यातला लेखक सुखावतो.' थोरो म्हणाला होता, 'कपडे जुने घाला, पुस्तके मात्र नवी वाचा.' या सर्वांनी वाचनाचं महत्त्व आपापल्या परीने विशद केले आहे. त्यावर आपण लक्ष केंद्रित करणे म्हणजे हरवलेल्या वाचनाचा पुनर्जन्म घडवून आणणे होय.

 एकविसावे शतक हे हक्कांचे शतक होय. आज वाचकांचा जाहीरनामा (Declaration or Manifesto of Reader) जाहीर झाला असून त्यातून वाचकांना हक्क बहाल करण्यात आले आहेत. आज जगभर २३ एप्रिल हा दिवस 'जागतिक पुस्तक दिन' म्हणून साजरा केला जातो. तो दिवस एका अर्थाने 'वाचक हक्क दिन'च होय. डॅनिएल पेन्नाक या फ्रेंच लेखकाने 'दि राइट्स ऑफ दि रीडर' हे पुस्तक सन १९९२ मध्ये लिहिले. त्यातून वाचक हक्क पुढे आले. त्यानुसार (१) वाचन हा प्रत्येकाचा हक्क आहे. (२) वाचताना अधली मधली पाने न वाचता तशीच उलटण्याचा हक्क आहे. (३) पुस्तक पूर्ण न वाचता अर्धवट सोडण्याचा वाचकास हक्क आहे. (४) पुस्तक पुनःपुन्हा वाचण्याचा वाचकास हक्क आहे. (५) वाचकास काहीही वाचण्याचा हक्क आहे. (६) पुस्तक म्हणजे पूर्ण वास्तव असा समज/ गैरसमज करून घेण्याचा वाचकास हक्क आहे. (७) कुठेही कसेही वाचण्याचा वाचकास हक्क आहे. (८) पुस्तकात गढून जाण्याचा वाचकास हक्क आहे. (९) वाचकास मोठ्याने वाचण्याचा हक्क आहे. (१०) पुस्तक वाचल्यावर मत देण्या न देण्याचा वाचकास हक्क आहे.

 सदर हक्कान्वये वाचक जे वाचतो त्यातून त्याच्या जीवनातील ताण- तणाव दूर होण्यास, ते शिथिल होण्यास साहाय्य होते. वाचनामुळे वाचकाचा शब्दसंग्रह वाढून भाषिक क्षमता वृद्धिंगत होते. वाचन माणसास संयमी, सहनशील, समजूतदार, सुसंस्कृत, सभ्य बनवते. नीतीची चाड नि विधिनिषेध विवेक ही वाचनाचीच देणगी होय. कल्पनाशक्तीचा विकास हे तर वाचन वरदानच! वाचनामुळे आत्मशोध सुरू होतो म्हणजे तो एक मनुष्य विकासाचा प्रस्थान बिंदूच!

☐☐

आजाद बचपन की ओर - कैलास सत्यार्थी प्रभात प्रकाशन, ४/१९, असफ अली मार्ग, नवी दिल्ली - ११०००२, प्रकाशन- २०१६ पृ. २४०, मूल्य रु. ४५०/- _____________________________________________________

आजाद बचपन की ओर

 बालमजूर मुक्तीच्या जागतिक कार्याची नोंद घेऊन देण्यात आलेल्या सन २०१४ च्या शांततेच्या नोबेल पुरस्काराचे प्रशस्ती पत्र चोरीला गेल्याची बातमी वाचली नि मन विषण्ण झाले. २००४ साली तर कवींद्र, रवींद्रनाथ टागोरांचे मूळ नोबेल पदकच चोरीस गेले होते. भारतीय चोरांना सोन्या-नाण्यापेक्षा नोबेल महत्त्वाचे वाटते ही भारतीय चोरांची प्रगल्भताच म्हणायला हवी. कैलाश सत्यार्थी; यांचं एक सुंदर हिंदी पुस्तक आहे. 'आजाद बचपन की ओर' हे पुस्तक आहे लेखसंग्रह, पण मुलांच्या स्वातंत्र्याची गाथा म्हणून ते वाचायला हवे. काही माणसं जन्मजातच मुळी जगण्याचं उद्दिष्ट घेऊन येतात. बाळ कैलास शाळेत जाताना एक दृश्य नेहमी पाहात असे. एक चांभार जोडे शिवत बसलेला असायचा. त्याच्या शेजारी त्याचा मुलगापण तेच काम करायचा. आपल्याएवढा मुलगा असून तो शाळेत का येत नाही? या प्रश्नाने शाळकरी कैलासला भंडावून सोडले होते. त्याने आपल्या गुरुजींना विचारून पाहिले, पण त्याला समाधानकारक उत्तर काही मिळाले नाही. म्हणून तो सरळ त्या चांभाराकडेच गेला नि त्याला थेट विचारले की, तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत का पाठवत नाही? चांभार बाबा म्हणाले, "खरंतर हा प्रश्न कधीच कुणी मला केला नाही आणि खरं सांगू का? मलाही कधी असा प्रश्न पडला नाही." पुढे तो म्हणाला, "माझे आजोबा, वडील जे करत आले तेच मी करत राहिलो. माझा मुलगा तेच करणार. बाळ, तुला सांगू का? अरे, आमचा जन्मच मुळी मोलमजुरी करून जगण्यासाठी झालाय ना?" बाबांच्या त्या पराधीनतेने कैलास सत्यर्थीना बेचैन केलं. ती बेचैनी घेऊन कळायला लागल्यापासून गेली ३५ वर्षे अव्याहत ते मुलांना बालपण बहाल करून देण्यासाठी झटत आहेत.

 'आजाद बचपन की ओर' हा त्यांनी गेल्या ३५ वर्षांत वेळोवेळी लिहिलेल्या अशा लेखांचा ऐतिहासिक संग्रह आहे की ज्यामुळे जगात बालकांचे हक्क, बालमजुरी निर्मूलन, बालशिक्षण, बाल यौन शोषण, बालक अत्याचार, बालपण रक्षण इत्यादी प्रश्न जागतिक प्रश्न बनून पुढे आले. आज जगात १७ कोटी मुले-मुली बालमजूर म्हणून कार्यरत आहेत. जगातील ६ कोटी मुलांनी तरी अजून शाळेचे तोंडच पाहिलेले नाही. ८५ लक्ष मुले, मुली अल्पवयीन वेश्या, भिकारी म्हणून जीवन कंठतात. कितीतरी देशातील मुलांच्या हातात पाटी-पेन्सिल येण्याऐवजी बंदूक आणि गोळ्या येतात. अंमली पदार्थ वाहतुकीत मुला-मुलींचा सर्रास वापर केला जातो. भारतातलं बालपण किती गुलामगिरीचं जिणं जगतात, हे त्यांना समजून घ्यायचे आहे. त्यांच्यासाठी हे पुस्तक बालभ्रमाच्या निद्रेतून खडबडून जागे करणारा वैचारिक सूतळी बाँबच.

 कैलाश सत्यार्थीच्या या लेखसंग्रहात विषयनिहाय वर्गवारी केल्याने आपणास त्या विषयाचे विविध पक्ष ते लेख समजावतात. 'मुक्तीचे स्वप्न' या भागात बालपण विशद करण्यात आले आहे. 'बालपणाचे स्वातंत्र्य'मध्ये बालमजुरी मुक्तीशिवाय अशक्य असल्याचे समाजभान देतात व या विषयाची जाणीव, जागृतीपण. 'बालविक्री' विभाग गाव बाजारात शेळ्या, कोंबड्या विकतात तशा मुलीपण विकल्या जातात, ते वाचताना आपल्या माणूसपणाची शरम वाटू लागते. मला आठवतं की मागे विजय तेंडुलकरांनी 'कमला' नावाचे नाटक लिहिले होते. त्यात बालिकांची खरेदी विक्री चित्रित केली होती. पत्रकार, समीक्षकांनी त्या नाटकास 'कल्पनेचे तारे' म्हटल्यावर उसळून कैलाश सत्यार्थीची साक्ष दिली होती. विजय तेंडुलकर तर एकदा म्हणाले होते की, 'भरल्या घरात मुलं अनाथ असतात.' त्या वेळी त्यांनी बाल सुरक्षेचा जो प्रश्न उपस्थित केला होता, तो या लेखसंग्रहात कैलाश सत्यार्थीनी 'बचपन की सुरक्षा' भागात मांडला आहे. या लेखसंग्रहाचं सूत्रवाक्य आहे, “मैं नहीं मानता की गुलामी की बेडियाँ आजादी की  चाहत से ज्यादा मजबूत होती है।" हे समजून घ्यायचं तर या संग्रहातील 'ट्रटेगी दासता की बेड़ियाँ' विभागातील ५-६ लेख मुळातूनच वाचायला हवेत. कैलाश सत्यार्थी शिक्षणास स्वातंत्र्याचे साधन मानतात. ते स्पष्ट करणारे या संग्रहातील तीन-चार लेख वाचकास अस्वस्थ करतात. कैलाश सत्यार्थीचा मूळ धर्म गांधीवादी राहिला आहे. मार्क्स आणि गांधींच्या मुशीत तयार झालेले ते कार्यकर्ते होत.

 एके काळी वृत्तपत्र लिखाणातून मिळणाऱ्या मानधनातून त्यांचं घर चालायचं. मी आणि ते एकाच वेळी बालकल्याण, बालविकासाचे कार्य करू लागलो होतो. त्या वेळी ते 'बचपन बचाओ' आंदोलन चालवत. श्रीनिवास कुलकर्णी, सूर्यकांत कुलकर्णी विदर्भ मराठवाड्यात सक्रिय होते. मी पश्चिम महाराष्ट्रात. कैलाश सत्यार्थीच्या नेतृत्वाखाली आम्ही 'ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर्स' काढला होता. बेंगलोरहून महाराष्ट्रात मोर्चाने कोल्हापुरात प्रवेश केला. दोन बसेस भरून जगभरचे मुक्त केलेली बालमजूर मुले, मुली, कार्यकर्ते कोल्हापुरात आले होते. यजमान संस्था होती बालकल्याण संकुल. कैलाश सत्यार्थी दिवसभर व रात्रीही आमच्या मुलात राहिले, जेवले, झोपले इतका साधा माणूस.

 त्या काळी शासन काखा वर करायचे. देशात बालमजूरच नाहीत म्हणायचे. कैलाश सत्यार्थीनी कितीतरी देशात जागतिक निरीक्षक नेऊन फटाके, गालिचे, काच सामानाचे कारखाने दाखवले. 'हा सूर्य, हा जयद्रथ' ही त्यांच्या कामाची पद्धत या सर्व पुस्तकात उतरली आहे. शिक्षण ही काही धर्मादाय कृती नव्हे, उपकार नव्हे, तो मुलांचा हक्क आहे ठणकावून त्यांनी सांगितल्यानंतर आपल्याकडे 'सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा' (२००९) राष्ट्रीय स्तरावर पास झाला. 'बालमजुरी प्रतिबंधक अधिनियम - १९८६' आला तो सत्यार्थीमुळे. ही सारी लढाई, संघर्ष वैचारिक अंगानी समजून घ्यायची, तर 'आजाद बचपन की ओर' वाचनास पर्याय नाही. कैलाश सत्यार्थी बालविकास, बालकल्याण कार्य, दया, धर्म, पुण्य म्हणून करण्याच्या विरोधी आहेत. तो बालकांचा हक्क असून तो बजावणे देशाचे, जगाचे ते कर्तव्य मानतात. मुलांशी त्यांचं असलेलं नातं संवेदना, समानता, सन्मान व सहाध्यायाचे राहिले आहे. समस्येचा बाऊ करण्यापेक्षा ती सोडवण्याची बांधिलकी ते महत्त्वाची मानतात. ते आशावादी आहेत. 'जो लोग अपने आत्मविश्वास और रचनात्मकता की चिनगारियों से एक छोटा- सा दिया जलाने का उपाय खोज निकालते है, उन्हें अँधेरा कभी हताश नहीं 



कर सकता।' या लेखसंग्रहातील वाक्यातून उमजते. मुलांचे हक्क नाकारण्यासारखी दुसरी हिंसा नाही म्हणणारे कैलाश सत्यार्थी पंडित नेहरूंसारखेचे मुलांचे 'चाचा' होत. पुस्तक मिळवा नि वाचा.

☐☐

ऐवज - संपा. अरुण शेवते ऋतुरंग प्रकाशन, मुंबई प्रकाशन-२०१० पृ. ६८०, किंमत रु. १०००/-


ऐवज

 माणूस जगण्यासाठी खातो आणि सुसंस्कृत, प्रगल्भ होण्यासाठी वाचतो. सकस अन्न शरीरास पुष्ट करते. म्हणून चौरस आहारास पौष्टिक मानले जाते. तसे आपले वाचनही चतुरस्त्र हवे. ते आपणास चतुर, व्यासंगी बनवते. माणसे काहीही वाचून वेळ वाया घालवतात. खरे तर असे नको व्हायला. वाचनात निवड हवी. सारासार विवेक हवा. भारंभार प्रकाशित होण्याच्या आजच्या काळात मी असे पाहतो आहे की माणसे वाचनाऐवजी पाहण्यात वेळ वाया घालवतात. चॅटस्, मेसेजिस, क्लिप्स, कोटेशन्स, पिक्चर्स, मेल्स इ. मोबाईल्स, संगणकावरील हवी-हवीशी वाटणारी सामग्री क्षणिक महत्त्वाची खरी. पण क्षणाक्षणाने दिवस निघून जातात. आणि मन आणि मेंदू रिकामाच राहतो. क्षणिक रंजनाने माणसे नाही घडत. सातत्यपूर्ण वाचन, विचार आणि आचारातून माणूस आकारतो.

 महाराष्ट्र संस्कृतीचे एक वैशिष्ट्य तुम्हास कुठल्यास राज्यात, राष्ट्रात पाहता येणार नाही. ते म्हणजे आपले दिवाळी अंक! मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या प्रांगणात दिवाळी अंकांची परंपरा सन १९०९ मध्ये सुरू झाली. त्यालाही पाहता-पाहता शंभर वर्षे होऊन गेली. 'मनोरंजन' नावाचे एक मासिक त्या वेळी निघत असे. त्याचे संपादक होते काशिनाथ रघुनाथ मित्र. तो पहिला-वहिला अंक माझ्या संग्रही आहेच. शिवाय 'मौज' मासिकाच्या सन १९२४ चा दिवाळी अंकही. वृत्तपत्रे, नियतकालिकांचे पहिले अंक म्हणजे आपला सांस्कृतिक ठेवा, 'ऐवज'च ना! संगीतात ठेवणीतल्या रागदारीस 'चीजा' म्हटले जाते. असे किती ऐवज, चीजा मजकडे आहेत म्हणून सांगू? दैनिक केसरी पहिला अंक (मंगळवार, तारीख ११ जानेवारी, १८८१), दैनिक मराठा पहिला अंक (गुरुवार, १५ नोव्हेंबर १९३३), साप्ताहिक सोबत पहिला अंक (मे, १९६६), माणूस मासिक पहिला अंक (जून, १९६१) असे कितीतरी. शिवाय हे दिवाळी अंक विशिष्ट काळानंतर आपल्या अंकातील निवडक साहित्याचे विशेष अंक, संस्मरणीय ग्रंथ प्रकाशित करीत असतात. असे 'निवडक अबकडई' (रौप्यमहोत्सवी-२०१२), 'श्री दीपलक्ष्मी क्लासिक्स' (निवडक - १९५८ ते २०००), 'ऐवज' (ऋतुरंग दिवाळी - १९९३ ते २००९) ही माझ्या संग्रही आहेत.

 खरे तर या सर्वच अंकांबद्दल लिहायला हवे. पण आज मी फक्त 'ऐवज'बद्दलच तुम्हाला सांगायचे ठरवले आहे. 'ऋतुरंग' दिवाळी अंक मराठी दिवाळी अंक परंपरेत सन १९९३ मध्ये दाखल झाला. त्याचे संपादक आहेत अरुण शेवते. मूळ कवी मनाचा हा मित्र मनुष्य वेल्हाळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. थोरामोठ्यांशी मैत्र हा याचा छंद. त्यांनी व्यक्तिचित्र, नाटक, लेख लिहिले तरी त्यांचा मूळ पिंड संपादकाचाच. 'हाती ज्यांच्या शून्य होते', 'नापास मुलांची गोष्ट', 'मद्य नव्हे मंतरलेले पाणी', 'रंगल्या रात्री', 'मला उमगलेली स्त्री' ही त्यांच्या दिवाळी अंकांची नंतर झालेली पुस्तके. त्यांचा प्रत्येक दिवाळी अंक नंतर ग्रंथ म्हणून प्रकाशित होतो. कारण तो एका विषयावर अनेकांना लिहिते करतो. ही अरुणची किमया। अरुण शेवते यांनी कुणाकुणाला लिहिले केले सांगू? अमृता प्रितम, सोनिया गांधी, एम्.एफ. हुसेन, गुलजार, बेगम परवीन सुलताना, यमुनाबाई वाईकर, विठाबाई नारायणगावकर, दीप्ती नवल, किशोरी आमोणकर, सुशीलकुमार शिंदे, बाबासाहेब पुरंदरे, ना. धों. महानोर, डॉ. रघुनाथ माशेलकर, शबाना आझमी आणि कित्येक. 'मराठीत लिहिलेले भारतीय सेलेब्रेटी' अशी सूची कुणाला तयार करायची तर ऋतुरंग दिवाळी १९९३ ते २०१७ ची नुसती अनुक्रमणिका डोळ्याखाली घातली तर सूची तयार!

 'ऋतुरंग'चा ऐवज' ग्रंथ (२०१०) म्हणजे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील समाजकारण, साहित्य, संस्कृती, कला, संगीत, राजकारण, पत्रकारिता इ.क्षेत्रांतील मान्यवरांच्या निवडक आत्मकथनांचा संग्रह होय. अरूण शेवते त्यांना कळायला लागल्यापासून दोनच कामे करतात. मे ते ऑक्टोबर अंक विषय निश्चित करणे, लेखकांना गाठणे, त्यांच्याकडून लिहून घेणे, जाहिराती मिळविणे व अंक वेळेत तयार करणे. नोव्हेंबर ते एप्रिल अंक वितरण, जाहिरात वसुली, अंकास ग्रंथरूप देणे. असा त्यांचा ऋतू आणि रंग एकच, तो म्हणजे दिवाळी. आहे की नाही गंमत? कोणत्याही गोष्टीचा नावलौकिक लीलया कधीच होत नसतो. त्यामागे असतात माणसाचे कष्ट, चिकाटी, चिंतन!

 गुलजार अरुण शेवते यांना लेखन तर देतातच पण न विसरता दिवाळी भेटही देतात. सुशीलकुमार शिंदे त्यांच्या प्रत्येक अंकात लिहितात. मंगेश पाडगावकर - हा अरुण शेवते नावचा भन्नाट माणूस काही न करता (नोकरी वा अन्य उद्योग!) दिवाळी अंक एके दिवाळी अंक जगतो म्हणून... सांस्कृतिक, सामाजिक कार्य करतो म्हणून, मानधन घेणे नाकारतात, विठाबाई नारायणगावकर अंगात फणफणता ताप असताना फडाफड फडातल्या रात्री जाग्या करते, यमुनाबाई वाईकर तासभर बोलून टेप बंद होता लक्षात आल्यावर आनमान न करता परत 'वन्समोर' बोलत राहतात. हे सर्व अशक्य ते शक्य होते शेवतेंच्या सायासामुळे, जिद्द, चिकाटीमुळे.

 एकदा अरुण शेवते, ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र गुहा यांचा एक लेख वाचत होते. वाचताना त्यांच्या लक्षात आले की महात्मा गांधी एकदा परीक्षेत नापास झाले होते. झालं, दिवाळी अंकाचा विषय ठरला, 'नापास मुलांची गोष्ट' (२००४). कोणकोण नापास विद्यार्थी मिळाले माहीत आहे? - इंदिरा गांधी, आइन्स्टाइन, जे. कृष्णमूर्ती, आर. के. लक्ष्मण, गुलजार, सुशीलकुमार शिंदे, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. नरेंद्र जाधव, अमिताभ बच्चन, व्ही. शांताराम, दादा कोंडके, नेल्सन मंडेला, डॉ. अनिल अवचट, डॉ. अच्युत गोडबोले, अभिनेते गणपत पाटील, डॉ. श्रीराम लागू, किशोरी आमोणकर या थोरामोठ्यांची यादी वाचून आता मला 'मीपण नापास झालो होतो' हे सांगायला लाज वाटत नाही. माणूस मोठा होण्याची बहुधा ही पूर्वअट असावी.

 ऐवज'मध्ये मैत्र जीवाचे, सहजीवन, मला उमगलेली स्त्री, माझं घर,मी व माझे मद्यपान, एकच मुलगी (ज्यांना एक मुलगी झाली तरी ज्यांनी दुसरे अपत्य जन्माला घातले नाही अशांची आत्मकथने), सिनेमाचे दिवस, रंगल्या रात्री, स्वप्नी जे देखिले, प्रेमस्वरूप आई, मनातला पाऊस, नातेसंबंध, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, अविस्मरणीय दिवस, माझं जगणं, माझी भूमिका' सारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर दया पवार, मेघना पेठे, प्रा. मे. पु. रेगे, बाबा कदम, रवींद्र पिंगे, कुमार केतकर, दिनकर रायकर, निळू फुले, आर. आर. पाटील (आबा), सुरेखा पुणेकर, देव आनंद, रामदास भटकळ, इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख, डॉ. सदानंद मोरे प्रभृती मान्यवरांचे लेख वाचायला मिळतात आणि आपले जगच बदलून जाते. आपले जीवन बदलायचे तर बाह्य जग समजून घ्यायला हवेच.

 माणसे आयुष्यात दोन अंगांनी समृद्ध, प्रगल्भ होत असतात. पैकी एक असतो स्वानुभव. दुसरी गोष्ट असते दुसऱ्याचे जीवनानुभव. बऱ्याचदा आपण आपले सुखच दुःख म्हणून गोंजारत कुढत जगतो. दलित, वंचितांचे जीवनानुभव वाचकास अनुभवाच्या पातळीवर हादरवून सोडत असतात. ही असते लेखनाची ताकद. मराठी आत्मकथनात्मक साहित्य भारतीय भाषातील श्रेष्ठ मानले जात असले, तरी जगातील भाषांतील गाजलेली आत्मकथनेच खरा साहित्यिक ऐवज. 'द डायरी ऑफ यंग गर्ल' (अ‍ॅना फ्रैंक), 'लाँग वॉक टू फ्रिडम' (नेल्सन मंडेला), 'माय लाइफ' (इझाडोरा डंकन), "जखन छोटो चिलो (सत्यजीत राय), 'कन्फेशन' (लिओ टॉलस्टॉय), 'द वर्ड' (ज्यां पां सार्त्र), 'अप फ्रॉम स्लेव्हरी' (बुकर टी वॉशिंग्टन) वाचली नसली तरी मिळवून वाचा. यातील अनेकांचे मराठी, हिंदी, अनुवाद उपलब्ध आहे. लक्षात ठेवा, वाचनाने जग बदलते आणि माणूसही!

◼◼

चेहरे - गौतम राजाध्यक्ष प्रकाशक, व्हॅल्युएबल ग्रुप, मुंबई प्रकाशन- २०१० पृ. ३४५, (खासगी वितरणासाठी)


चेहरे

 चित्रं पाहायची असतात की वाचायची असतात, असा प्रश्न कुणी आपणास केला, तर आपण विचारण्याला वेड्यात काढू. सर्व सामान्य माणसाचं उत्तर हेच असणार की चित्रं पाहायची असतात. पण मी अनुभवाने सांगेन, चित्रं वाचता येतात. चित्र वाचता येणं तुमच्या विचार, तर्क, बुद्धिमत्तेची कसोटी असते खरी. चित्रपट, पत्रकारिता, जाहिरात क्षेत्रात आपल्या कॅमेऱ्याची कमाल दाखवणारा एक छायाचित्रकार होता. गौतम राजाध्यक्ष त्याचं नाव. या माणसाचं एक सचित्र पुस्तक आहे. 'चेहरे' असं त्याचं शीर्षक आहे. परत तोच प्रश्न मी विचारीन - चेहरे पहायचे असतात की वाचायचे? याचं उत्तर देणारं हे पुस्तक.

 गौतम राजाध्यक्ष मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये शिकले. शिकत असताना त्यांचे वर्गमित्र, मैत्रिणी कोण तर शबाना आझमी, कविता कृष्णमूर्ती, नितीन मुकेश, पंकज उधास, प्रीती सागर, फारूख शेख. शिकत असताना त्यांचे कॉलेज गायन, नाटक, चित्रकला सर्व क्षेत्रातील पारितोषिक पटकावत असायचे. पारितोषिकं मीनाकुमारीच्या हस्ते मिळायचा तो काळ! कॉलेज संपलं तसं गौतम राजाध्यक्ष 'लिंटास' नावाच्या प्रख्यात जाहिरात कंपनीत छायाचित्रकार म्हणून रुजू झाले. शोभा डे मुळे त्यांना चित्रपट विषयक नियतकालिकात लेखनाची संधी मिळाली. 'स्टारडस्ट', 'सिनेबिझ', "फिल्मफेअर' मध्ये नट, नट्यांचे दिलकश फोटो, काढून ते छापायचे. पुढे ते लेख, मुलाखती लिहू लागले. बॉलिवूडमध्ये प्रघात होऊन गेला होता गौतम राजाध्यक्षांनी काढलेला फोटो छापून येईपर्यंत तुम्हाला कोणी नट, नटी मानणारच नाही. ही असते एका कलाकाराच्या कला साधनेची पावती. अशा काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचं एक इंग्रजी पुस्तक 'फेसेस' सन १९९७ मध्ये प्रकाशित झालं. ते पुस्तक ज्याच्याकडे तो प्रतिष्ठित मानला जाऊ लागला. निखिल वागळे त्यावेळी 'षटकार' नावाचं क्रिकेटला वाहिलेले मासिक चालवायचे. ते चांगलं चाललं तसं त्यांच्या मनात कल्पना आली की आपण चित्रपटावर आधारित मराठी मासिक चालवावं. 'चंदेरी' नाव ठरलं. पण मासिक क्लिक व्हायचं तर राजाध्यक्षांचे फोटो हवेत. 'मानसचित्र' नावाचं सदर सुरू करायचं ठरलं. फोटोसह लेख असं त्या सदरांचं स्वरूप होतं. या सदरातील चित्र व लेखांचा संग्रह म्हणजे 'चेहरे' पुस्तक होय. एकापेक्षा एक अप्रतिम चित्रांनी नटलेल्या या कॉफी टेबल बुकचं वैशिष्ट्य असं की यातली चित्रं वाचता येतात नि लेख पाहता येतात. मी तुम्हाला नुसते एक दोन किस्से सांगतो. गौतम राजाध्यक्षांच्या स्टुडिओमध्ये एकदा फोन घणघणतो. तो आलेला असतो बाँबे हाउसमधून. बाँबे हाउस म्हणजे टाटा उद्योग समूहाचं मुख्यालय. जे. आर. डी. टाटांचे 'की नोट' नावाचे आत्मचरित्र प्रकाशित होणार आहे. त्याच्या मुखपृष्ठावर तुम्ही काढलेला फोटो टाकायचे ठरलेय. यापूर्वी एका फोटोग्राफरने काढलेले फोटो जे. आर. डी. ना पसंत पडलेले नाहीत.' गौतम राजाध्यक्ष ऑफरनेच गलितगात्र होऊन नकार देतात. पण पलीकडून ऐकतील तर खरे! गौतम राजाध्यक्षांनी चौकशी केली की पूर्वीचे फोटो दाखवाल का? म्हणजे ते पाहून मला ठरवता येईल. त्यांनी फोटो पहिले नि नकाराचं कारण विचारलं तर सांगण्यात आलं की फोटोवरच्या सुरकुत्या जे. आर. डी. ना पसंत पडल्या नाहीत. गौतम राजाध्यक्षांनी काढलेले फोटो जे. आर. डी. ना पसंत पडले. त्यांनी काही केले नव्हते. कॅमेऱ्यास डिफ्यूज लेन्स बसवली. सुरकुत्या गायब. जे. आर. डी. फिट अँड फाईन!

 एकदा गौतम राजाध्यक्ष उटी, लव्हडेल, वेलिंग्टनच्या निलगिरी वनात भटकंतीसाठी गेले असताना वाटेत कुनुर नावाचे गाव लागले. त्यांना कळले की फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ इथं राहतात. फोटो काढायला मिळेल तर काय मज्जा येईल ना? वाटलं नि यश आलं. गंमत म्हणजे गौतम राजाध्यक्ष सांगतील ते नि तसे कपडे माणेकशॉ घालते झाले. त्या क्षणी तर फिल्ड मार्शल गौतम राजाध्यक्षच होते, हे वेगळे सांगायला नको. अशी पर्वणी म्हणजे गौतम राजाध्यक्षांना नेहमीच मनातील शंका दूर करायची संधी वाटत आली आहे. त्या वेळी अशी कुणकुण होती की इंदिरा गांधी नि माणेकशॉ यांचे पटायचे नाही. गौतम राजाध्यक्षांनी शंका विचारल्यानंतर माणेकशॉनी केलेला खुलासा मुळातच वाचायला हवा. अफवा होती की माणेकशॉ देशावर मिलिटरी हुकुमत आणणार आहेत. माणेकशॉना पंतप्रधान इंदिरा गांधी- बोलवतात - अर्थात जाब विचारण्यासाठी. माणेकशॉ विनंती करतात ... तुम्ही माझ्या अधिकारात हस्तक्षेप करू नये. मी तुमच्या सत्तेत हस्तक्षेप करणार नाही. कोणताही देश वाचतो, घडतो ते हक्क आणि कर्तव्यांच्या सीमारेषांवर.' मोठी माणसं त्या ओळखतात. म्हणून ती मोठी असतात... ते त्यांचे चेहरे समजावतात, आणि संस्कार, संस्कृतीही.

 सचिन तेंडुलकरांची निष्पापता, माधुरी दीक्षितचं स्पंजाप्रमाणे समजून घेणं, एम्. एफ. हुसेन यांना फकीर व्हावंसं वाटणं, शबाना आझमीचे आयुष्यभरचे सारे फोटो फक्त गौतम राजाध्यक्षांचेच- काय काय गमती असतात आयुष्यात अन् ही सारी कमाल असते फक्त कॅमेरा नि लेन्सची! पण मी सांगू तुम्हाला त्याच्या पलीकडचा चित्रकाराच्या आतला माणूस, मित्र, मानसशास्त्रज्ञ, कलाकार, संपादक, लेखक, कल्पक अशा कितीतरी छटा हे पुस्तक समजावतं. गौतम राजाध्यक्ष एकदा रतन टाटांचे फोटो काढायला गेले. ते नाखूष. मनासारखे फोटोच निघेनात. लक्षात येतं की हा माणूस प्राण्यांबरोबर खुलतो. ते टाटांना कुत्र्याशी नेहमीसारखे खेळत राहायला सांगतात. फोटो मनासारखे मिळून जातात. टीना मुनीम साध्या घरची षोडशवर्षीय तरुणी. 'क्लोजअप'च्या जाहिरात फोटोत ती क्लिक होते नि 'टीन क्वीन' होते आणि म्हणून नंतर अंबानी बनते. फोटो काय करीत नाही?

 लिथो साइजच्या आर्ट पेपरवर छापलेले हे ३५० पानांचे देखणे पुस्तक सुमारे पासष्ट सेलेब्रेटीजचे हे सचित्र चरित्रच! खरं तर कॉफी टेबल बुक हे चाळायसाठी म्हणून तयार केलं जातं. पण गौतम राजाध्यक्षांनी जीवनाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यात घेतलेला धांडोळा वाचताना लक्षात येतं की या माणसांमध्ये असं काही एक रसायन भरलेलं असतं, ते त्याला मोठं करतं. व्ही. शांतारामांचे सर्व चित्रपट कलात्मक का होते? विजया मेहतांच्या अभिनयाचे रहस्य काय? शेखर कपूर सी. ए. असताना चित्रपट सृष्टीत कोणत्या पॅशनने आला? तीनही खान (सलमान, शाहरूख, अमीर) एक असूनही वेगळे कसे? हे सारं कुतूहल निर्माण करणारं नि शमवणारं हे पुस्तक वाचणं, पाहणं हा एक कलात्मक समाधीचा भाग आहे. हे पुस्तक मिटून मिटत नाही. ते तुमचा पिच्छा करतं. तुम्हाला वाचक म्हणून गदागदा हलवतं. ते तुमच्या आतील रसिकाचं खोदकाम, उत्खनन करतं. समजावतं. जगात लीलया काहीच मिळत नाही. जी माणसं निकराच्या क्षणी स्वतःचं जीवन कौशल्य पणाला लावतात, जे आत्ममग्न समाधीत स्वतःस गाडून घेतात, तेच पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पैसा, कला प्राप्त करतात. जगात कुणालाच काही नशिबानं मिळत नाही. जे मिळते ते तुमच्या प्रयत्नाचेच फळ असते.

◼◼

गझलसम्राट सुरेश भट आणि... - प्रदीप निफाडकर नंदिनी पब्लिशिंग हाऊस, सिंहगड रोड, पुणे - ४११०५१ पृ. २९६, मूल्य - ३५० रु. प्रकाशन - ११ जानेवारी, २०१७


गझलसम्राट सुरेश भट आणि...

 मराठी कवितेच्या प्रांतात ज्यांच्या सर्वच कवितांच्या ओळी अधोरेखित करण्याचा मोह रसिक वाचकास होतो, असे कवी म्हणजे गझलसम्राट सुरेश भट होत. माणसाच्या प्रत्येक प्रहरास साद देणारी कविता म्हणून सुरेश भटांची गाणी मराठी जिभेवर घोळत राहतात नि कानात त्यांची गूज नि गाज एकाच वेळी रुणझुणत, झणझणत राहाते. पहाटेला साखर झोपेची संज्ञा बहाल करणारी त्यांची कविता म्हणजे, 'पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची गाठ सैल झाली!' सूर्योदयपूर्व काळ भूपाळीचा मानण्यात येतो. तेव्हा हीच कविता 'चल ऊठ रे मुकुंदा' म्हणून साऱ्या आसमंताला जागे करते, ती चांदण्यांच्या साक्षीने! सकाळ होताच ती 'गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे!' म्हणून प्रार्थना करू लागते. तीच कविता सूर्य डोक्यावर आला की गर्जू लागते, 'नाही नाहत मला चांदणे, तळपे भानू डोईवरती... स्वतः पेटुनी पेटविणारा ज्वलंत मी तर एक निखारा' म्हणत ग्वाही देऊ लागते. सूर्य अस्ताला जाताना ती 'सूर्य केव्हाच अंधारला यार हो, या, नवा सूर्य आणू चला' म्हणून आश्वस्त करते. रात्र होताच ती कविता प्रणयिनी बनून आर्जवू लागते, 'मालवून टाक दीप, पेटवून अंग अंग.' नंतर कूस बदलून निद्रिस्त होणाऱ्या प्रियकरास 'तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे?' म्हणून विचारणारी विराणी सुरेश भटांचीच असते. सुन्या मैफिलीतून ते झपाटलेल्या झंझावातापर्यंतच्या प्रत्येक प्रसंगाचे गीत गाणारे सुरेश भट, त्यांनी काय नाही लिहिलं? अभंग, भूपाळी, स्फूर्तीगीते,भावगीत, भावकविता, गझल, हझल (वक्रोक्ती पूर्ण गझल), हायकू, लावणी, पोवाडा यांसह काही मुक्तकही! असे असले, तरी त्यांच्या कवितेचा आत्मस्वर गझलच होता. हा तसा मूळ उर्दू काव्यप्रकार. पण भटांनी कधी त्याची भ्रष्ट नक्कल नाही केली. उर्दू गझलेला त्यांनी मराठी शब्दमंत्राचा साज चढवला. गझल म्हणजे शब्दांचा प्रमेय आणि अर्थाचा व्यत्यास! शब्द नि अर्थाचं अद्वैत हे तिचं सौंदर्य! अशा सुरेश भटांचं चरित्र मराठीत नसावं हे कुणास सांगून खरे वाटणार नाही. पण ती एक वस्तुनिष्ठ नामुष्की होती खरी। सुरेश भटांचे शिष्य प्रदीप निफाडकर यांनी गुरूदक्षिणेची उतराई करत तिची भरपाई केली. 'गझलसम्राट सुरेश भट आणि...' असं अधुरं शीर्षक लाभलेलं हे चरित्र म्हणजे सुरेश भटांची बंडखोर, संयमी, धाडसी आणि तरल जीवनकहाणी होय.

 अपूर्ण शीर्षक ल्यालेल्या ग्रंथात सर्व जाणकारांनी भर घालून ते पूर्ण करावे अशी चरित्रकाराची अपेक्षा आहे. हे पुस्तक रूढ अर्थाने चरित्र असले तरी तो व्यापक अर्थाने सुरेश भटांच्या कवितेचा समीक्षा ग्रंथही बनला आहे.पण त्यापेक्षा या ग्रंथात सुरेश भटांच्या आठवणींचा जो खजिना आहे,त्यास ज्वालामुखीच म्हणायला हवे. म्हणजे असे की एकेक आठवण म्हणजे सुतळी बाँबचा स्फोटच! हा कवी नुसता कवी नव्हता. कलंदर कलाकार नि बिलंदर पत्रकार, पण त्यांनी झिजवलेली लेखणी पाहू लागू तर लक्षात येते की सुरेश भटांना राजकारणाची चांगली जाण होती. महाराष्ट्राने अनुभवलेले दोन 'साहेब' सुरेश भटांची लेखणी लीलया पेलते. छगन भुजबळांनी शिवसेनेस रामराम ठोकल्यावर सुरेशभट जी हझल (गझल नव्हे!) लिहितात ती भर चौकात फ्लेक्सवर झळकते. मराठी कवितेला फ्लेक्सवर झळकवणारे एकमात्र कवी सुरेश भट! त्यांच्या कवितेस संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी चाली लावल्या. म्हणून ते बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीतले मित्र! पण आपला हा मित्र घरी भेटायला येणार कळल्यावर सूचकपणे हिरवी टोपी घालून बसणारे सुरेश भट! याच सुरेश भटांचे गाणे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहीर अमर शेखांनी आपल्या खड्या आवाजात गाऊन महाराष्ट्रभर पसरविले. आज महाराष्ट्र 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' म्हणत जे अभिमान गीत गातो आहे ते गीत ३५६ गायकांनी मिळून गायिले. त्यात कोण कोण होते माहीत आहे - सुरेश वाडकर, पद्मजा फेणाणी, हरिहरन, श्रीधर फडके, शौनक अभिषेकी, अवधूत गुप्ते, विठ्ठम उमप, देवकी पंडित, अजय-अतुल, सलील इ. ही असते सुरेश भटांच्या प्रतिभेची ताकद! सुरेश भटांच्या किती गीतांना हृदयनाथ मंगेशकरांनी चाली लावल्या नि ती गीते लता मंगेशकर, आशा भोसलेंनी गायिली. या सर्वांमागच्या या चरित्रातील हकिकती मुळातून वाचणे म्हणजे त्या काळाचे आपण साक्षीदार होणे. ही किमया करणारे चरित्रकार प्रदीप निफाडकर कच्चा गुरुचे चेले नव्हेत याची साक्ष चरित्रातील कितीतरी आठवणी देतात. ते वाचताना वाचक शहारतो. या चरित्रात सुरेश भटांचे काव्य वृत्त, शब्द सौंदर्य, आशय, विषय, अलंकार, काव्यप्रकार, रस इ. अंगांनी समजून सांगण्याचा चरित्रकाराने केलेला खटाटोप म्हणजे गुरूप्रती आस्था, आदर, प्रेम आणि त्यापलीकडे जाऊन निस्सीम भक्ती!

 चरित्रकार प्रदीप निफाडकरांनी कल्पकतेने दिलेले अर्धे शीर्षक पूर्ण करायचे म्हणून सांगेन की सन १९८३-८५ च्या दरम्यान सुरेश भटांचे वास्तव्य काही कारणामुळे कोल्हापुरात होते. सुरेश भटांना रिक्षातून फिरायचा छंद होता. रिक्षा नवी लागायची. रिक्षात टेपरेकॉर्डर असणे पूर्वअट होती. शिवाय त्यांनी निवडलेली रिक्षा मिटरवर न पळता दिवसाच्या ठरवलेल्या भाड्यावर चारी दिशा पळत रहायची. त्यांना खाण्या-पिण्याचा शौक होता. अख्खी क्वार्टर एका घोटात रिचवणारे सुरेश भट जीवनाचं सारं जहर विरघळावं म्हणून आसुसलेले असायचे. आतल्या आत खदखदणारा हा विशालकाय कवी अंतर्मनाने मात्र मधाळ होता. त्यांचं ज्यांच्याशी पटलं नाही, अशांनी त्यांची भलामण (की निर्भर्सना) 'करपलेला झंझावात' म्हणून केली असली तरी हा कवी काही येरागबाळा नव्हता की लेचापेचाही! देवाचे देवाला नि सीझरचे सीझरला देण्याचा रोखठोक व्यवहार त्यांनी कशाचीही तमा न बाळगता निभावला. मराठी कवितेस गझलेचा साज चढविणारा हा कवी. त्यास 'त्याने एक नवोदित कवी पिढीस नादाला लावले' म्हणून काहींनी नाके मुरडली खरी. पण 'आज मी जे गातो ते उद्या गातील सारे' असा आत्मविश्वास त्यांच्यात होता. म्हणून पु. ल. देशपांडे यांनी लिहून ठेवले आहे की, 'तिचं निळेपण नि निराळेपण दोन्ही लक्षात राहण्यासारखं आहे.' हा कवी किती संवेदनशील होता, त्याचं एकच उदाहरण देऊन मी थांबतो.

 कोल्हापुरात ते साळोखेनगरमध्ये भाड्याने घर घेऊन राहिले होते. कळंबा जेलमध्ये त्यांचे जाणे-येणे घडले नि लक्षात आले की घरोघरी टी.व्ही. असताना जेलमध्ये मात्र अजून रेडिओचेच युग! त्यांनी तुरुंग प्रशासनास ऑफर दिली. मी एक संध्याकाळ तुमच्यासाठी गातो. झाले. 'रंग माझा वेगळा' हा गझल गायनाचा कार्यक्रम ठरला. तिकिटे छापली गेली. पोलीस, तुरुंग, महसूल, सीमाशुल्क (एक्साइज), परिवहन (आर.टी.ओ.) साऱ्यांनी तिकिटे खपवली. मी वृत्तपत्रात लेख लिहिले. प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात 'एक शाम, गझल के नाम' साकारली. सर्व खर्च जाऊन कळंबा तुरुंगातील बंदी जनांना रंगीत टी.व्ही. मिळाला नि महाराष्ट्रातील सर्व तुरुंगात पुढे टी.व्ही. युग अवतरले.

◼◼


राजर्षी शाह गौरव ग्रंथ संपा. रमेश जाधव प्रकाशक, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, मुंबई प्रकाशन-२०१६ पृ. १२६८, किंमत रु. ३००/-



राजर्षी शाहू गौरव ग्रंथ

 आधुनिक भारताच्या समाज परिवर्तना संदर्भात सन १९७४ हे वर्ष मन्वंतर घडवून आणणारे ठरले. ते होते राजर्षी छत्रपती शाह महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष. हे अशासाठी दिशांतर घडविणारे ठरले की तेव्हापासून राजर्षी शाहू छत्रपतींच्या वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि मूल्यांकनाची एक सकारात्मक व सामाजिक न्यायाची परंपरा सुरू झाली. या जन्मशताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने राजर्षी शाहू गौरव ग्रंथ प्रकाशित केला होता. त्याचे संपादक आमदार पी. बी. साळुंंखे होते. तो सुमारे ६०० पानांचा गौरव ग्रंथ त्यावर्षी अवघ्या दहा रुपयाला मिळाला होता, हे आज कुणाला सांगून खरे वाटणार नाही. आणखी एक गोष्ट आज खरी वाटणार नाही की तत्कालीन लोकप्रतिनिधी वाचत होते, व्याख्यान ऐकत होते, पुस्तके खरेदी करत होते, लिहीत होते, संपादन करत होते. आमदार पी. बी. साळुंंखे यांचे व्यक्तिगत ग्रंथालय समृद्ध होते. तसेच नामदार यशवंतराव चव्हाण यांचेपण.

 या गौरवग्रंथाची तिसरी संवर्धित आवृत्ती गेल्या सामाजिक न्याय दिनी (२६ जून, २०१६) कोल्हापुरातच विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित झाली. याचे संपादन कार्य राजर्षी शाह महाराजांवर अनेक ग्रंथ लिहिलेल्या डॉ. रमेश जाधव यांनी केले आहे. त्यांनी अपार कष्ट व मेहनत घेऊन हा गौरव ग्रंथ सिद्ध केला आहे. मूळ ग्रंथाच्या दुप्पट पाने यात आहेत. शिवाय अनेक लेख व अन्य मौलिक सामुग्रीची यात भर घातल्याने त्या ग्रंथास नव ग्रंथाचे रूप आले आहे. या नव्या आवृत्तीत खण्ड - २ मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या व्यक्ती, विचार, काळ व कार्य या पैलूंवर प्रकाश टाकणारे नवे ४१ लेख असून ते या गौरवग्रंथासाठी म्हणून अनेक मान्यवरांकडून मुद्दाम लिहून घेतलेले आहेत. काही मूळ गौरव ग्रंथ प्रकाशित करताना राहून गेलेले महत्त्वपूर्ण लेख या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सर एस. एम. फ्रेझर, डॉ. रा. चिं. ढेरे, रा. ना. चव्हाण, प्रा. नरहर कुरुंदकर, कॉम्रेड गोविंद पानसरे प्रभृती मान्यवरांची नावे या संदर्भात उल्लेखनीय ठरतात. यामुळे राजर्षी शाहू छत्रपतींची ओळख एका जातीत बंदिस्त न होता ते 'सकल जनांचा आधारू' बनून पुढे येतात. 'Profets are ahead of their time' अशा अर्थाचे जे विधान आहे ते या नव्या खंडामुळे सार्थ ठरले असून संपादक डॉ. रमेश जाधव त्याबद्दल अभिनंदनास पात्र आहेत. या खंडात तीन पिढ्यांचे लेखक एकत्र आल्याने राजर्षी शाहू चरित्र हे त्रिकालाबाधित श्रेष्ठ ठरले आहे.

 सदर नव गौरव ग्रंथात 'आम्ही पाहिलेले शाहू महाराज' अशा शीर्षकाने एक पुस्ती जोडली आहे. त्यात श्रीमंत क्षात्रजगदगुरू, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, कवी ग. दि. माडगूळकर, डॉ. बाबा आढाव, संपादक अरुण टिकेकर प्रभृती मान्यवरांनी दिलेले योगदान वाचनीय ठरले आहे. यात ७५ दुर्मीळ छायाचित्रे दिली आहेत. ती पाहताना शंभर वर्षांपूर्वीचा वैभवी कालखंड जिवंत होतो. नव ग्रंथात अत्यंत दुर्लभ वंशावळ, कागदपत्रे, हकूम, जाहीरनामे संग्रहित असल्याने या ग्रंथाचे संदर्भ मूल्य असाधारण झाले आहे. विशेषतः या ग्रंथात समाविष्ट जे सामाजिक कायदे आहेत, त्यावर नजर फिरविताना लक्षात येते की प्रख्यात चरित्रकार धनंजय कीर शाहूकालीन संस्थानाचे वर्णन 'दुःखितांचे मातृगृह' म्हणून का करायचे. या ग्रंथात 'जंगी पैलवानांचे मल्ल युद्ध' ही जाहिरात, शाह मिल्सच्या शेअर्सचे छायाचित्र, कोल्हापूर संस्थानचा रंगीत नकाशा, शाहू पुतळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९३९ साली संपन्न दलित परिषदेच्या निमित्ताने केलेले अभिवादन छायाचित्र आपल्या आजोबांच्या (छत्रपती राजाराम महाराज) समाधीचे फ्रोरेन्स (इटली) मधील दर्शन (इथे मी जाऊन आलो आहे!) हे सर्व पुनःप्रत्ययाचा आनंद देणारे अविस्मरणीय क्षण! ते टिपून संग्रहित करण्याची संपादक डॉ. रमेश जाधव यांची सव्यसाची दृष्टी केवळ अनुकरणीय होय. शिवाय सदर ग्रंथात राजर्षी शाहू महाराजांचा कालपट उलगडून दाखविणारी कालसूची संलग्न केल्याने ग्रंथातील लेखामधील घटना, प्रसंगांचे आकलन व अवलोकन सोपे होऊन जाते. या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी ग्रंथास मार्मिक प्रस्तावना लिहिली होती. त्यात त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या संबंधातील सुविख्यात साहित्यिक वि. स. खांडेकरांचे विधान उद्धृत केले होते. "पृथ्वीच्या पाठीवर अनेक सम्राट झाले असतील, अनेक राजाधिराज गाजून गेले असतील, पण समाजाच्या तळच्या मानवतेवर माणूस म्हणून मायेची पाखर घालणारे राजे फार थोडे झाले असतील. राजर्षी शाहू महाराज हे त्यापैकी एक होत." असे एतद्देशीयांना वाटणे, मी समजू शकतो. पण सातासमुद्रापलीकडे जर्मन विद्वान सिर्क सियांझ यांना ते वाटून लिहिण्यास ते प्रेरित झाले, ही गोष्ट अधिक महत्वाची अशासाठी की ती उर्मी त्यांना जगाच्या सामाजिक सुधारणांचा अभ्यास केल्यानंतर झाली होती. राजर्षी शाहू छत्रपतींच्या संबंधातील हे विश्वभान अधिक प्रसंगोचित होय.

 माझे एक सोनार मित्र आहेत. त्यांच्या पेढीवर मी पूर्वी फुरसतीच्यावेळी बसत असे. श्रावण महिन्यात खेड्यापाड्यातील भगिनी जोडवी वाढवून घ्यायला येत असत. म्हणत, 'अण्णा जोडवी वाढवायची हायता.' त्या माउलीच्या डोळ्यात मी सौभाग्यवृद्धीचं समाधान पाहात असे. तसे समाधान मला या ग्रंथातील सामाजिक न्यायवृद्धीचे वाटते. मध्यंतरीच्या काळात सर्व महाराष्ट्रभर 'सकल मराठा क्रांती मोर्चा'चे आयोजन होत होते. तेव्हा कोल्हापूरच्या ग्रामीण भागात प्रवास करताना गावच्या पारावरच्या झाडाखाली टांगलेल्या फ्लेक्सवरील एका छोट्या वाक्याने मोठा आशय समजावला होता. 'एक मराठा लाख मराठा' ची जाहिरात करणाऱ्या त्या फलकाच्या डोक्यावर लिहिलं होतं, 'यायला लागतंय' त्याच धर्तीवर या ग्रंथाच्या संदर्भात मी म्हणेन 'घ्यायला लागतंय'. हा ग्रंथ लाख घरात गेला तर ते वर्तमानातील खरे मन्वंतर, दिशांतर ठरेल.

 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी इथे धरण, तलाव, औद्योगिक वसाहत, व्यापार पेठ वसवली म्हणून येथील रयतेला आज 'राजापण' मिळाले आहे. महेंद्रसिंह टिकेत, शरद जोशी, राजू शेट्टी प्रभृतींनी इथे जी शेतकरी आंदोलने उभारली त्यातून ऊस, कापूस, तुरीस भाव मिळू लागला. या आंदोलनांनी शेतकऱ्यास 'कर्जाचा तराजू दिड दांडीचा' असल्याचे भान दिले. त्यातून आलेले शिक्षण व समृद्धी यांच्या लक्ष्मी-सरस्वतीच्या पाऊलखुणा घरी उठल्या का याची कसोटी हीच की तुमच्या घरी 'राजर्षी शाहू गौरव ग्रंथ' आहे का? असेल तर तो वाचलात का? वाचला असेल तर त्यातील विचार आणि आचार अद्वैताचे प्रतिबिंब तुमच्या वर्तमान जीवनात पडले आहे का? कोणतेही राष्ट्र वा राज्य केवळ शिक्षण प्रसार-प्रचारांनी कधीच मोठे होत नसते. मोठेपण येते ते मोठ्यांचं मोठेपण आपण अंगिकारतो का? या प्रश्नांनी निर्माण केलेल्या जिज्ञासेने. ती निर्माण करण्याचे सामर्थ्य या गौरव ग्रंथात आहे. गौरव ग्रंथ म्हणजे एका व्यक्तीचे गुणगान नसून पिढ्यान्तपिढ्या जो ग्रंथ नव्या पिढीस गौरवपूर्ण करण्याची प्रेरणा, दृष्टी देतो तो. असा हा ग्रंथ घरोघरी जाईल तर तेथील सर्वांचे जीवन सामाजिक न्यायाचे बनवून प्रत्येक वाचकास वंचितांचा वाली बनवेल. पण त्यासाठी लक्षात असू द्या - विकत घ्यायला लागतंय आणि वाचायलाही!

◼◼


कळेल का 'त्याला' आईचं मन? अरुण शौरी. भाषांतर - सुप्रिया वकील मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशन २०१४ पृ. ३७८ मूल्य रु.३९०/-



कळेल का 'त्याला' आईचे मन?

अरूण शौरी हे 'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी दैनिकाचे कार्यकारी संपादक होते. तत्पूर्वी ते वर्ल्ड बँकेत अमेरिकेमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणिबाणीने अस्वस्थ होऊन 'भारतात आलेला हा संवेदनशील मनुष्य. तो इथे येतो नि भारताच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यातून (आणिबाणी) लोकशाहीची पुनर्स्थापना करतो. त्याबद्दल त्यांना 'जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य प्रणेता' म्हणून गौरविण्यात येतं. मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड, पद्मभूषण प्राप्त अरूण शौरी अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक होते. अनेक ग्रंथांचे कर्ते. पैकी काही गाजले. तर काही वादग्रस्तही ठरले.

 त्यांचे अलीकडे सन २००९ मध्ये लिहिलेले एक इंग्रजी पुस्तक आहे. 'डज ही नो अ मदर्स हार्ट?' या इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर 'कळेल का 'त्याला' आईचं मन?' उपलब्ध आहे. सुप्रिया वकील यांनी मूळ हृदयस्पर्शी असलेल्या विषयाचे संवेदनक्षम भाषांतर करून ते अरुण शौरीच सारे सांगत आहेत अशा प्रथमपुरुषी जाणिवेचे बनवले आहे. हे मूळ इंग्रजी पुस्तक अरुण शौरींनी अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या व सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या हॉर्वर्ड विद्यापीठात अध्यापन करणाऱ्या डॉ. अमर्त्य सेन यांना पाठविले होते. ते वाचून आपला अभिप्राय देणारे डॉ. अमर्त्य सेन यांनी त्यात म्हटलं आहे की, 'मी वाचलेल्या पुस्तकांपैकी हे सर्वश्रेष्ठ पुस्तक होय. ते हादरवून सोडणारे, प्रभावी तर आहेच, शिवाय हृदयस्पर्शीही!'

 हे पुस्तक अरुण शौरी यांच्या जीवनातील एका घटनेचे सविस्तर विवेचन आहे. त्याला वास्तवाचे कोंदण आहे नि चिंतनाची झालरही। शौरींचं मूळ कुटुंब पाकिस्तानातले. भारत-पाकिस्तान विभाजन सन १९४७ मध्ये झाले, तेव्हा जे हजारो लोक भारताच्या ओढीने परतले त्यापैकी हे एक. अरुण शौरी प्रतिकूल परिस्थितीत शिकत मोठे झाले. विवाह झाला. संसाराची नऊ वर्षे स्वर्ग सुखाची गेली. बाळाच्या ओढीने त्यांनी एका जीवाला जन्म दिला. बाळ सातव्या महिन्यातच जन्मले. खरे तर नैसर्गिक जन्मापूर्वीच बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्याने मदतपूर्व जन्माला घालावे लागले. जन्मलेले बाळ अवघे चार पौंडांचे असते. जन्मजात यातनांच्या गर्तेत, आवर्तनात सापडलेले हे बाळ वाचवण्यासाठी त्याला काचेच्या पेटीत ठेवण्यात येते. त्याला वाचवण्यासाठी हाताची शीर सापडत नाही म्हणून जन्मजात बाळास डोक्यात सुया खोचल्या जातात. बाळाची साखरेची पातळी अस्थिर म्हणून रक्त चढवले जाते. असे महिनाभर जीव वाचवण्याच्या पालकांचा अटापिटा डॉक्टरांनाही असह्य होतो. एक हितचिंतक या पालकांना एका क्षणी कठोर सत्य सांगून मोकळे होतात... 'हे मूल तुमचे आयुष्य संपवेल... पूर्ण आयुष्य! तुम्हाला हा असा मुलगा जगावा असे गांभीर्याने वाटते का?' बाळाची आजी निक्षून सांगती होते, असे काही नाही, आता अपंग मुलेसुद्धा अगदी सक्षम आयुष्य जगतात. बाळाला जीवदान मिळते खरे पण ते त्याला नि पालकांना एक जीवघेणे आयुष्य बहाल करते. पुढे बाळाला मेंदूचा पक्षाघात होतो. तो सात वर्षाचा होतो. तर शाळेचा यक्षप्रश्न उभारतो. स्पॅस्टिक (प्लॅस्टिक नव्हे) मुलांच्या शाळेचा शोध सुरू होतो. शाळा मिळते एकदाची. पण पालकांसाठी 'रात्रंदिनी युद्धाचा प्रसंग'. बाळाला आई रोज गाडीतून घेऊन जायची. एकदा त्यांच्या गाडीला एका जीपने उडवले. बाळ आणि आई दोन्ही जखमी झाले. सदर भीषण अपघातात बाळाच्या आईचे दोन्ही खांदे धरले ते कायमचेच. पुढे त्याचं रुपांतर पार्किन्सनमध्ये झाले. तेही बेचाळीसाव्या वर्षी. आता अरूण शौरी घरातले 'सर्व सेवक' झाले. कल्पनासुद्धा करता येणार नाही असे असह्य आघात झेलत अरुण शौरी अविचल मनोधैर्याने आयुष्याला कसे सामोरे जात राहिले याचे हृदयद्रावक आत्मकथन म्हणजे 'कळेल का 'त्याला' आईचे मन?'

 हा एका आपद्ग्रस्त बापाचा व्यक्तिगत असला तरी त्याला एका सामुहिक हुंकार, हुंदक्याचे रूप येऊन गेलेय. अशा शरणागत क्षणी बुद्धिजीवी, बुद्धिवंतांची प्रज्ञाही गुंग होऊन जाते. मग तो कधी ईश्वर-शरण, कधी नशीबवादी, कधी बुवाबाजीच्याही आहारी जातो. पण सरतेशेवटी शौरींसारखी शहाणी सुरती माणसे दुःखभोगाचे विश्लेषण करण्यातून आयुष्याचा वस्तुनिष्ठ धांडोळा घेणे श्रेयस्कर समजतात. सुमारे पावणे चारशे पृष्ठांचे हे चिंतनपर आत्मकथन. त्याचा पूर्वार्ध बाळ जन्मास समर्पित आहे. मध्यभाग सुमारे ३०० पृष्ठांचा असून त्यात अरूण शौरींनी 'जुना करार' आणि 'कुराण' मधील धर्म चर्चेद्वारे संकटग्रस्त स्थितीत सामान्य मनुष्य दैवाधीन होतो, पण शौरींसारखा विचारवंत अदैवी स्पष्टीकरणातून आपल्या मनाची कवाडे खुली करत दुःखभोगाचे स्वरूप स्पष्ट करतो. ते विवेचन या आत्मकथनाचा गाभा घटक असून तो वाचकास सुन्न करून टाकतो.

 हे पुस्तक रूढ अर्थाने वाचनीय नसून विचारणीय आहे. वेदनेचे नवे तत्त्वज्ञान म्हणून या पुस्तकाकडे पहावे लागते. हे जरूरी नाही की कुणी शौरींच्या मताशी सहमत व्हावे. पण एक निश्चित की हे पुस्तक वाचणारा प्रत्येक जण त्यांच्या दुःखाचा नातलग जरूर होऊन जातो. आयुष्यातला दुःखभोग काय असतो? - सेवा, धर्म, कर्तव्य, विधायक उन्नयन, जीवन कौशल्य, त्याग, समर्पण, शिक्षण, आघात काय असते? याचे उत्तर ज्याने त्याने आपल्या वकूब नि क्षमतेनीच द्यायचे.

 मी बालकल्याण संकुलात अनाथ, निराधार बालकांचे संगोपन, पुनर्वसन कार्य करतानाच्या एका प्रसंगाची आठवण मला या पुस्तकाने करून दिली. मी संस्था कार्यालयात काम करीत होतो नि पोलीस पार्टी एक वॉरंट घेऊन आली. 'एस. टी. स्टँडवर एक लोळागोळा मुलगा पडलाय. चला, ताब्यात घ्या चला.' मी, अधिकारी, काळजीवाहक गेलो. मुलाला आम्हाला नेणे शक्य नव्हते म्हणून सरकारी दवाखान्यातून रुग्णवाहिका मागवली. ती नव्हती म्हणून पोस्टमार्टेमसाठी आलेली शववाहिका बदली म्हणून आली. ती सूचक होती का कुणास ठाऊक? पण दवाखान्यात डॉ. रा. अ. पाठक तेव्हा सिव्हिल सर्जन होते. मोठे रुग्णप्रेमी व सेवाधर्मी डॉक्टर. तपासून मला म्हणाले की, "डॉक्टर, इसको यही रखना पडेगा। यह तो बेजान जान है।" आम्ही त्याचे मानस नाव ठेवले. रोज त्याला सलाईन, पुढे पेज ती पण

वाचावे असे काही/३८
नळीतूनच भरवत जगवत राहिलो होतो, तो जिवंत असेपर्यंत. आमची शर्थ

वर्षातच हरली. आम्ही त्याला नाही वाचवू शकलो. तो मानस अरुण शौरींच्या आदित्यसारखाच होता. जुळा भाऊच म्हणाना! अशी मुले, मुली येतच राहात होती. पुढे त्या दशकात अशा मुलांसाठी कार्य करणाऱ्या 'चेतना', 'स्वयंम्', 'जिज्ञासा', 'चैतन्य' अशा एकामागून एक संस्था कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झाल्या. मी त्यांच्याशी वेगवेगळ्या नात्यांनी जोडला गेलो होतो नि आहे. मला वाचकांना अनुभवाने सांगावेसे वाटते की 'कळेल का 'त्याला' आईचे मन?' पुस्तक त्या सर्व तगमगीची कहाणी आहे, ज्यांच्या पोटी बहुव्यंग अपत्य जन्मते. त्यांचे जीवन समस्याबहुल राहते ते, ते बाळ पदरी असेपर्यंत.

◼◼


अंगारवाटा.... शोध शरद जोशींचा' भानू काळे ऊर्मी प्रकाशन, पुणे-६७ पृष्ठे - ५१० मूल्य - रु.५००/- प्रकाशन - डिसेंबर, २०१६



अंगारवाटा... शोध शरद जोशींचा

 साहित्य संकलन, रक्षण, संपादन, प्रकाशन, संशोधन कार्य करणारे इतिहासकार म्हणून वि. का. राजवाडे यांचा लौकिक होता. या दशकात असे कार्य करणारे 'अंतर्नाद' मासिकाचे संपादक भानू काळे यांनी तीन बृहद चरित्रे मराठीस दिली. 'रंग याचा वेगळा' हे दत्तप्रसाद दाभोळकरांचे लेखन व जीवन स्पष्ट करणारे तर दुसरे 'अजुनी चालतोची वाट' हे रावसाहेब शिंदे यांचे जीवन व कार्यावर प्रकाश टाकणारे. तिसरे आहे 'अंगारवाटा...'. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशींचा यात शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच ते कोल्हापूरचे उद्योगपती वसंतराव घाटगे (घाटगे पाटील आणि कंपनी) यांचे चरित्र देखील या सर्व चरित्रांचा कोल्हापूरशी काही एक संबंध आहे.

 'अंगारवाटा' वाचताना लक्षात येते की शरद जोशी यांचे वडील अनंतराव कोल्हापुरात वार लावून शिकले ते एक अनाथ विद्यार्थी म्हणून. ते तेव्हा इथल्या (बहुधा) आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये शिकत. पुढे ते पोस्ट खात्यात नोकरी करू लागले. ते साताऱ्यात असताना शरद जोशींचा जन्म २ सप्टेंबर १९३५ ला झाला. पार्ले टिळक विद्यालय, मुंबईतून शरद जोशी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. मुबईच्याच सिडनम महाविद्यालयातून ते एम. कॉम. झाले. त्यांना सनदी अधिकारी व्हायचं होतं. पण दरम्यान कोल्हापुरात रत्नाप्पा कुंभार यांनी सुरू केलेल्या कॉलेज ऑफ कॉमर्सचे तत्कालीन प्राचार्य भा. शं. भणगे यांनी शरद जोशी यांना आपल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून बोलावून घेतले. ते त्यांचे 'सिडनॅम'चे विद्यार्थी. प्रा. शरद जोशी त्या वेळी पद्मा टॉकीजमागे असलेल्या पदमा गेस्ट हाउसमध्ये राहात. पगार दोनशे रुपये. खाणावळ मासिक तीस रुपये. तांबडा-पांढरा रस्सा हवा असल्यास पाच रुपये अधिक मोजावे लागत.

 स्पर्धा परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पण गुणांकानुसार त्यांना पोस्ट खात्यातच नोकरी मिळाली. एका अर्थाने त्यांनी वडिलांचीच गादी चालवली. दिल्लीत उच्चपदस्थ नोकरीमुळे त्यांना फ्रान्सला प्रशिक्षणास जावे लागले. तिथे त्यांची बुद्धिमत्ता पाहून त्यांना युनोच्या स्विट्झर्लंडमधील युनिव्हर्सल पोस्टल युनियनमध्ये नोकरी मिळाली. १९६८ ते १९७६ अशी आठ वर्षे नोकरी करून ते भारतात परतले ते शेती करण्यासाठी हे आज सांगितले तर कुणास खरेही वाटणार नाही. आज आपल्या सर्व कृषी महाविद्यालये, विद्यापीठांमधील सन्माननीय अपवाद वगळता तद्दन सर्व विद्यार्थी युपीएससी, एमपीएससी करून शेत, शिवार, बांधावर जाण्याऐवजी शासकीय अधिकारी होणेच पसंत करतात. या पार्श्वभूमीवर शरद जोशी यांचे शेतकरी होणे वेगळी अंगारवाट तुडवणेच होते.

 स्विट्झर्लंडहून परतलेले शरद जोशी पुण्यात स्थायिक झाले. पुण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावरील चाकण रस्त्यावरील आंबेठाण गावी वीस- पंचवीस एकर जमीन खरेदी केली. 'अंगारमळा' त्याचे नाव ठेवले. ते पहिल्याच प्रयोगात हात पोळल्यामुळे.

 शेती करणे आजही भारतात आतबट्ट्याचे का याचा अनुभव शरद जोशींना पहिल्या पिकाच्या पट्टीतच आला. त्याचं असं झालं की लवकर येणारे व रोख पैसे देणारे पीक म्हणून शरद जोशींनी खीरा जातीच्या काकडीचे पीक घेतले. तीन महिन्यात सहा पोती काकड्या निघाल्या. अडत्याकडे पाठवून दिल्या. विक्रीचा खर्च वजा जाता १८३ रु. मिळाले. दुसरे पीक परत काकडीचेच घेतले. तेव्हापण दीडएकशे रुपये मिळाले म्हणून तिसरे पीकही काकडीचेच घेतले. अडत्याकडे बिल आणायला गेले. त्यांनी ३२ रु. येणे असे बील हाती ठेवत पैसे मागितले. वाहतूक, हमाली, दलाली, वजनकाटा, मार्केट कमिटी चार्ज, मुख्यमंत्री फंड वजा जाता ३२ रु. येणे असा हिशोब अक्कल खाते पदरी आल्याने शेतकरी शरद जोशी यांना शेतकरी संघटनेचे नेते व्हावे लागले.

 काकडीनंतर कांदे, बटाटे लावून पाहिले तरी तोटाच. भारतात येण्यापूर्वी त्यांनी फ्रान्सची शेती व तिथल्या शेतकऱ्यांचे आंदोलन पाहिले, अभ्यासले होते. स्विट्झर्लंडमधील जंगल शेती त्यांनी पाहिली होती. शेतमालाला मानवी हमी मिळाल्याशिवाय शेती किफायतशीर होऊ शकणार नाही हे ताडून त्यांनी कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून पहिले आंदोलन सन १९७८ मध्ये केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकाधिकार दंडेलशाहीच्या विरोधात झालेल्या पहिल्या आंदोलनात शासन, लोकप्रतिनिधी विरूद्ध शेतकरी असे त्याचे स्वरूप होते. २०-२५ रूपये क्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या कांद्यास आंदोलनामुळे ४५ ते ५० रुपये भाव मिळाला आणि शेतकऱ्यांच्या स्वराज्याचा प्रारंभ झाला.

 शेतकरी संघटनेची ८ ऑगस्ट, १९७९ ला विधिवत स्थापना झाली. 'वारकरी' साप्ताहिक त्याच वर्षी सुरू झाले. ते शेतकरी संघटनेचे मुखपत्र बनले. ते बांधाबांधावर वाचले जाऊ लागले. यातून संघटना महाराष्ट्रभर पसरली. सन १९८० च्या चाकण कांदा आंदोलनात ६४ किलोमीटरचा महामोर्चा निघाला. मार्चमध्ये झालेल्या आंदोलनात साडेतीनशे शेतकरी अटक झाले. पुढे उसाचे आंदोलन झाले. सन १९८१ च्या या आंदोलनास चिरडण्याचा विडा तत्कालीन अंतुले सरकारनं उचलला होता. शेतकरी हरले नाही की हटले नाहीत. ३१००० शेतकऱ्यांना तुरुंगात डांबून तत्कालीन सरकारने आपली निर्दयता सिद्ध केली. परिणामी शेतकरी संघटना अधिक मजबूत झाली. उसाला ३०० रुपये व कांद्याला ७० रु. प्रतिक्विंटल भाव मिळाला तो दिल्ली सरकारच्या हस्तक्षेपाने. त्याचे कारण होते जगाने घेतलेली आंदोलनाची नोंद. पुढे कांदा, ऊस नंतर कापूस. तंबाखूची आंदोलने झाली. तीही यशस्वी ठरली.

 या आंदोलनातला एक प्रसंग नोंदवण्यासारखा आहे. शरद जोशी औरंगाबादला उपोषणाला बसले होते. आंदोलन ऊस झोनबंदीचं असावं. अनेक दिवस उलटले तरी शासन उपोषणाकडे लक्ष देत नव्हते. ते द्यावे म्हणून एका मुलाने मोर्चा काढला होता. त्या मुलाचं नाव होतं राजू शेट्टी. शासनाने लक्ष घातले. उपोषण सुटले तसे शरद जोशी शिरोळला दाखल झाले. मुलाला शोधून काढले नि त्याच्या छातीवर 'शेतकरी संघटना' बिल्ला लावला. राजू शेट्टी नंतर आमदार, आज खासदार आहेत. परवा एका साहित्य संमेलनात ते नि मी एकाच व्यासपीठावर बराच वेळ होतो. पूर्वी ते

वाचावे असे काही/४२
नि मी मिळून 'लोकमत' मध्ये 'गुडमॉर्निंग' सदर लिहीत असू. त्या सर्व

स्मृतींना उजाळा मिळाला.

 शरद जोशींच्या सन १९८१च्या निपाणीच्या तंबाखू आंदोलनात आम्ही काही प्राध्यापकांनी पाठिंबा म्हणून 'रेल रोको' आंदोलन केले होते. मला एक दिवसाचा तुरुंगवास घडल्याचं आठवतं. मध्यंतरी राजू शेट्टी यांनी ऊसाला रास्त भाव मिळावा म्हणून जी पदयात्रा काढली होती, त्यात मी व कॉम्रेड पानसरे पाच पावले पाठिंबा दर्शक चाललो होतो. अशा आंदोलनात तुम्हाला अर्जुन होता आले नाही, तरी तुम्ही एकलव्य व्हायला हवे. मी शेती नसलेला नागरिक असलो तरी शेतकऱ्यांबद्दल माझ्या मनात एक अतूट कृतज्ञता भाव सतत जागा असतो. 'मी जीवन जगतो आहे, त्याचे एकमेव श्रेय असते शेतकऱ्याचे. 'इडा पिडा टळो नि बळीचे राज्य येवो' अशी माझी मनस्वी धारणा आहे, ती एकाच जाणिवेमुळे की हा कृषीप्रधान देश. स्वातंत्र्याची ७० वर्षे उलटली तरी इथल्या शेतकऱ्याचे दैन्य सरत नाही. शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही. म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. आत्महत्या सत्र थांबत नाही. कर्जमाफीसाठी इथे अजून 'संघर्ष यात्रा' काढावी लागते. इथल्या सर्वकाळच्या शासनास हे केव्हा कळणार की शेतकरी सुखी झाल्याशिवाय देश समृद्ध होऊ शकणार नाही. 'अंगारवाटा... शोध शरद जोशीं' हे चरित्र बांधाबांधावर वाचले गेले तर हे शक्य आहे. कारण हे चरित्र भारतीय शेतकऱ्याच्या दैन्यावस्थेची बखर आहे.

◼◼


डॉ. बाबासाहेब आंबेडकर (सचित्र चरित्र) लोकवाङ्मय गृह, मुंबई - २५ पृ. २८७ (आर्ट पेपर) किंमत - रु. २०००/- प्रकाशन - २००७



डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठीत उपलब्ध साहित्य विपुल आहे. त्यांच्या जीवन, कार्य, विचारांवरही अनेकांनी लिहिले आहे. त्यांच्या जयंती व स्मृतीदिनी मुंबई व नागपूर येथे त्यांना अभिवादन करणारा जो जनसागर लोटतो, तो मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य खरेदी करीत असतो. या महामानवाने 'शिका, संगठित व्हा आणि संघर्ष करा' चा जो संदेश दलित बांधवांना दिला, तो त्यांनी अंमलात आणल्यामुळे आजचा भारतीय दलित समाज उन्नत जीवन जगतो आहे. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चरित्रात्मक पुस्तके अनेक असली तरी चित्रात्मक चरित्रे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मराठीत उपलब्ध आहेत. त्यातही लोकवाङ्मय गृह, मुंबईने प्रकाशित केलेले चित्रमय चरित्र उत्कृष्ट म्हणावे लागेल. ते मराठी बरोबरच हिंदी व इंग्रजीमध्येही उपलब्ध आहे.

 या महान ग्रंथाची मूळ संकल्पना त्या प्रकाशनाचे तत्कालीन व्यवस्थापक व सुविख्यात मुद्रण तज्ज्ञ, कलाकार प्रकाश विश्वासराव यांची. त्यांनी पीटर रूहेचे 'गांधी' हे चित्रात्मक चरित्र पाहिले व त्यांना या चित्रमय चरित्राची कल्पना सुचली. ज्यांनी पीटर रुहेचे 'गांधी' हे चित्रमय चरित्र पाहिले, वाचले असेल त्यांना कल्पना येईल की एखाद्या व्यक्तीविषयी तुमच्या मनात आदर व प्रेम असल्याशिवाय अशा कलाकृती आकाराला येत नाहीत, चर्चित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रात्मक चरित्राचे सारे शिल्पकार विजय सुरवाडे होत. या ग्रंथात 'शोध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्रांचा' शीर्षक त्यांचे प्रास्ताविक वाचले की यातील एक एक चित्र, संदर्भासाठी त्यांनी घेतलेले कष्ट अभिनंदनास खचितच पात्र ठरतात. सदर ग्रंथास संपादक व सुविख्यात कवी, समीक्षक वसंत आबाजी डहाके यांचे पन्नास पानी संपादकीय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन, कार्य, विचारांचे विहंगमावलोकनच होय. या ग्रंथ निर्मितीच्या काळाचा मी जिवंत साक्षीदार असल्याने या सर्वांचे त्यामागे उपसलेले कष्ट मी जाणतो. विजय सुरवाडे यांनी तर आपल्या आयुष्याची ३०-३५ वर्षे याच कामी खर्ची केली आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' हे सचित्र चरित्र असले तरी त्यात केवळ चित्रे नाहीत. त्यात जन्मदाखला, शाळेची रजिस्टर मधील नोंद, शाळेचे हजेरी पत्रक, नोकरीचे मस्टर, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचे शिष्यवृत्ती मंजुरी पत्र, दरबारचे हुजूर हुकूम, राजर्षी छ. शाहू महाराजांचे पत्र, कोलंबिया विद्यापीठ गुणसूची, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या पावत्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविलेल्या 'मूकनायक', 'बहिष्कृत भारत', 'जनता', 'समता', 'प्रबुद्ध भारत' वृत्तपत्रांच्या पहिल्या अंकाची छायाचित्रे, महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या दिवाणी दाव्याची कागदपत्रे, निकालपत्र, 'पुणे करार', महात्मा गांधी-डॉ. आंबेडकर पत्रव्यवहार, विविध निवेदने, जाहीरनामे, आवाहन-पत्रे, हे सारे पाहात, वाचत असताना आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात त्यांच्याबरोबर जगत असल्याची वाचक, प्रेक्षकाला येणारी जिवंत प्रचिती हे या सचित्र चरित्राचे खरे यश होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींना प्रथमतः दि. १४ ऑगस्ट, १९३१ रोजी मणीभवन, मुंबई येथे भेटले होते. तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात महात्मा गांधींना सांगितले होते की, "आपण म्हणता मला देश आहे. पण मी पुन्हा सांगतो की मला देश नाही. ज्या देशात कुत्र्याच्याही जिण्याने आम्हाला जगता येत नाही, कुत्र्या-मांजराला मिळू शकतात तेवढ्या सवलती ज्या देशात आम्हाला गुण्या-गोविंदाने मिळत नाहीत त्याला माझा देश व माझा धर्म म्हणण्यास मीच काय पण ज्याला माणुसकीची जाणीव झाली आहे व ज्याला स्वाभिमानाची चाड आहे असा कोणताच अस्पृश्य तयार

वाचावे असे काही/४५
होणार नाही." त्या करारी संघर्षामुळेच गेल्या ७० वर्षांच्या स्वातंत्र्य काळात

दलित समाजाला मानवाधिकार प्राप्त होऊन ते समाजाच्या मध्य प्रवाहात आले आहेत, याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे.

 बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विदेशात पाठवून केवळ शिकवलेच नाही तर आपल्या संस्थानात नोकरी देऊ केली, संस्थानाच्या विधिमंडळाचे सदस्यत्व बहाल केले, इतकेच नव्हे तर एकदा विदेशातून परतताना डॉ. आंबेडकरांच्या काटकसरीने राहून जमवलेला ग्रंथ संग्रह समुद्रात बुडाला तर महाराजांनी त्याची नुकसान भरपाई केली. डॉ. आंबेडकर लंडनला शिकत असताना राहण्याची अडचण आल्यावर राजर्षी शाहू महाराज आपल्या मित्राला पत्र लिहून डॉ. आंबेडकरांना मदत करण्याची विनंती करतात. या दोन्ही राजांच्या उदार सहाय्यामुळे या देशाचा एक मोठा समाज 'माणूस' झाला, हे सर्व वाचताना अंगावर रोमांच उभे राहते. या सचित्र चरित्रात राजर्षी शाह महाराजांच्या मृत्यूनंतर 'माय डियर युवराज राजाराम' संबोधत छ. राजाराम महाराजांना लिहिलेले पत्र म्हणजे खंदा पाठिराखा गमावल्याचे अरण्यरूदनच होय. ते सर्वांनी मुळातूनच वाचायला हवे. असेच एक हृद्य पत्र या सचित्र चरित्रात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन मध्ये शिकत असताना पत्नी रमाबाईंना 'प्रिय रामू' संबोधून लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "मी जो त्रास घेत आहे तो माझ्यासाठी नसून सगळ्यांचे कल्याण व्हावे म्हणून" यातूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची परहितदक्ष, उदार वृत्ती सिद्ध होते.

 हे सचित्र चरित्र पाहात वाचत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेश, चवदार तळे सत्याग्रह प्रश्नी घेतलेले कष्ट म्हणजे मानव अधिकार प्राप्तीचेच ते रणशिंग होते. राजकीय अधिकार व पदे मिळाल्याशिवाय आम्हाला आमची दु:खे वेशीवर टांगता येणार नाहीत अशी मागणी विविध कमिशन्सपुढे मांडणारे डॉ. आंबेडकर हे खरे द्रष्टे समाजसुधारक होते, याची खात्री हे चरित्र देते. या सर्व कागदपत्रांइतकीच यातील दुर्मीळ छायाचित्रे म्हणजे त्या काळचे चलचित्र होय. भारतीय राज्यघटना लागू होण्यापूर्वीचे हंगामी मंत्रीमंडळ, घटना समिती सदस्यांचे बृहत् सामूहिक छायाचित्र, सुरक्षा समिती छायाचित्र म्हणजे काळाची साक्ष व पुरावे होत.

 या सचित्र चरित्रात डॉ. आंबेडकरांनी प्रसिद्ध केलेली काही निवेदने तत्कालीन समाजाचे कठोर हृदय अधोरेखित करतात. सन १९३५ च्या

वाचावे असे काही/४६
येवला (नाशिक) येथे संपन्न मुंबई इलाखा दलित वर्ग परिषदेनंतर प्रकाशित

'जाहीर खबर' (पृ. १३७) मध्ये ते म्हणतात, "सत्याग्रहाचा त्यांना (सवर्णांना) काहीही उपयोग (परिणाम) होत नसल्याने दलित वर्गाने आपले सामर्थ्य आता विनाकारण मुळीच खर्च करू नये व सत्याग्रहाची मोहीम यापुढे बंद करावी आणि स्पृश्य मानलेल्या वर्गापासून आपला समाज विलग समजून त्यांनी आपले संगठन करावे." हे चरित्र म्हणून समाज परिवर्तनासंदर्भात महत्वाचे. अशी सचित्र चरित्रे वाचण्यातून समाज प्रगल्भ होतो अशी माझी धारणा आहे. प्रगल्भता म्हणजे माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागणे. श्रेष्ठ, कनिष्ठतेच्या भ्रामक पारंपरिक कल्पनेतून मुक्त होऊन जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, लिंग इ. भेदांच्या पलीकडे जाऊन समानभावाचा सदाचारी व्यवहार करणे. सदर सचित्र चरित्र वाचनाने तुमचे 'जाणिवांचे' जग बदलून तुम्हास जात, धर्म निरपेक्ष मनुष्य बनवते. हे चरित्र सापेक्षतेने महाग आहे, याची मला कल्पना आहे. सोने जगाच्या कोणत्याही बाजारात स्वस्त नसते मिळत. भौतिक महागड्या वस्तू खरेदी करण्याची सवय असलेल्या समाजाने महाग पुस्तके खरेदी करून आपली बौद्धिक श्रीमंती सिद्ध करणे ही खऱ्या प्रगल्भतेची निशाणी होय.

◼◼


प्रसिद्ध व्यक्तियों के प्रेमपत्र, हिंद पॉकेट बुक्स, जी.टी. रोड, शाहदरा, दिल्ली - ४०००३२, प्रकाशन - १९७०, पृष्ठे - १५२, मूल्य - ३ रु.



प्रसिद्ध व्यक्तियों के प्रेमपत्र

 'प्रेम' अडीच अक्षरांचाच शब्द! असं सांगितलं जातं की त्यात सारं जग सामावलेलं असतं. तरुणपणात ज्याच्या मनात प्रेम निर्माण झालं नाही असा माणूस विरळाच! माणसं प्रेम व्यक्त करतात फुलातून, डोळ्यातून नि पत्रातूनही! जागतिक साहित्यात प्रेमपत्रे ही ललित काव्य म्हणून श्रेष्ठ मानली गेली आहेत. मुळात प्रेमपत्रे वाचणे ही एक रोमँटिक अनुभूती! असं सांगितलं जातं की आपल्याला आलेल्या प्रेमपत्रापेक्षा दुसऱ्याला आलेली प्रेमपत्रे वाचणं त्याची मजा काही औरच! पूर्वी प्रेमपत्र गुलाबी कागदावर लिहिली जायची. पाकिटावर लिहिलेलं असायचं, 'मालकाशिवाय फोडू नये'. ओळखायचं हे प्रेमपत्रच असणार. अशी पत्रे लिहिणारे कोणकोण? श्वास रोखून वाचा तर... अब्राहम लिंकन, नेपोलियन, रूसो, लेनिन, किटस्, बायरन, टेनीसन, टॉलस्टॉय, फ्राइड, वर्डस्वर्थ, जॉर्ज बर्नार्ड शॉ, व्हिटर ह्यूगो, मेरी क्यूरी, राणी व्हिक्टोरिया इत्यादी इत्यादी. अशा जगप्रसिद्ध व्यक्तींच्या प्रेमपत्रांचा हिंदी अनुवाद उपलब्ध आहे. पुस्तकाचे नाव आहे, "प्रसिद्ध व्यक्तियों के प्रेमपत्र'. यात एकूण ६३ जगप्रसिद्ध व्यक्तींची पत्रे आहेत.

 सदर संग्रहातील प्रेमपत्रे अनेक प्रकारची आहेत. म्हणजे विवाहापूर्वी लिहिलेली. ही अधिक भावविभोर असतात ना? विवाहानंतर लिहिलेली अर्थात पती-पत्नीने एकमेकांना लिहिलेली. पूर्वी म्हणे आई मुलीला मजकूर सांगायची व मुलगी आपल्या पतीला लिहायची (म्हणजे नक्की कोण, कुणाला, काय लिहायचं ते तेच जाणे!) अशा पत्रांचा मायना असायचा, 'प्राणप्रिय पतीदेव, ईश्वरसाक्ष प्रणाम!' पुरुष काय मायना लिहायचे ते मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. 'तेरी भी चूप और मेरी भी'. नव्या संशोधकांना आव्हान! शिवाय तुरुंगातून लिहिलेली प्रेमपत्रे, युद्धभूमीवरून लिहिलेली प्रेमपत्रे तसेच मृत्यूशय्येवरून लिहिलेली काही प्रेमपत्रे या संग्रहात आहेत. ती वाचताना मात्र हृदय पिळवटून निघते खरे! ते काहीही असले तरी प्रेमपत्रे माणसाच्या भाव-भावना, स्वप्ने, आकांक्षा, इच्छांची प्रतिबिंबे असतात तशी गुपितेही. आनंद, आतुरता, आकर्षण, विरह, हुरहुरीने लिहिलेली पत्रे म्हणजे झुरलेल्या शब्दांना आलेला फुलोराच!

 अब्राहम लिंकन यांनी आपली प्रेयसी मेरी ओवेन्सला सन १८३७ मध्ये प्रेमपत्र लिहिलं तेव्हा तो एक साधा लाकूडतोड्याचा मुलगा होता. शिवाय कुरूप. त्यानं प्रेमपत्रात निवेदन केलं होतं, 'जी कोणी स्त्री आपलं जीवन माझ्यात विसर्जित करील तिला मी प्रसन्न ठेवीन. तिच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी प्राणपणाने काळजी घेईन.' इतकं लिहूनही मेरीने लिंकन यांना नाकारले. पुढे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्या दिवशी नक्कीच मेरी ओवेन्सला पश्चात्ताप झाला असणार.

 रशियाचा महान साहित्यिक, विचारवंत लिओ टॉलस्टॉय यांच्या विचारांनी महात्मा गांधीही प्रभावित झाले होते. त्यांची पहिली प्रेयसी होती सोनिया. तिची एक मोठी बहीण होती एलिझाबेथ. घरच्यांना वाटे की टॉलस्टॉयचे तिच्यावर प्रेम आहे. वस्तुतः होते सोनियावर. कारण ती कथाकार होती व तिची पात्रे टॉलस्टॉयला आवडत. तिला एकदा पत्रात टॉलस्टॉयने लिहिले होते, 'प्रेमाची तुझी कल्पना खरी रोमँटिक म्हणायची. तू ज्याच्यावर (माझ्याशिवाय) प्रेम करशील त्याबद्दल मात्र माझ्या मनात ईर्ष्याच राहणार!'

 इंग्रजी कवी ब्राऊनिंगवर कवयित्री बैरेटचे प्रेम होते. ती कविता करून त्या कशा झाल्यात ते विचारण्याच्या बहाण्याने ब्राऊनिंगकडे जात असे. त्या कविता नसायच्या, असायची ती नकळत लिहिलेली प्रेमपत्रेच. ब्राऊनिंग भोळा बिचारा. कविता वाचायचा नि दुरुस्त करून द्यायचा.

 न राहून बैरेटनी शेवटी त्याला विचारलंच, 'तुम्हाला कवितांचा मथितार्थ कळणार तरी केव्हा नि कसा?' मग मात्र दोघे पोट धरून हसत राहिले. मग

वाचावे असे काही/४९
एका पत्रात त्यांनी विकल होऊन लिहिले होते, 'शब्दांना कसंही घडवा. ते

अपूर्णच. किती उलटापालट करतो शब्दांची. पण मला जे सांगायचे आहे, ते नेमकेपणाने व्यक्त करायला पूर्णार्थी शब्दच सुचत नाही.' पुढे ब्राऊनिंगचा विवाह बैरेटशी झाला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिने एक पत्र लिहिले. त्यात लिहिले होते, 'काल आपला चर्चमध्ये विवाह झाला. विवाहास अनेक स्त्रिया आपल्या पतींसह उपस्थित होत्या. त्यापैकी कुणाच्यातच मला विवाह करण्यातला माझ्याइतका विश्वास व विवाह करण्याचे प्रबळ कारण, आकर्षण दिसले नाही. बहुधा प्रत्येक स्त्री याच विश्वासावर पुरुषाशी लग्न करत असणार.

 इंग्लंडचा राजा आठवा हेन्री विलासी होता. आपल्या बहिणीच्या नोकराणीवर त्याचं मन बसलं नि ती इंग्लंडची राणी झाली. मन भरलं तसं त्याने तिला तुरुंगात टाकलं. तिच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. इतर अनेक निष्पापांना हेन्रीने केवळ संशयावरून तुरुंगात डांबले तेव्हा राणी एनोबोलिननी राजाला पत्र लिहून बजावलं, 'हे गुणनिधान राजा, माझ्यावर तू न्यायालयात दोषारोप पत्र जरूर दाखल कर, पण तुझा दावा न्याय सम्मत असू दे. माझ्यावर आरोप करणारेच न्यायाधीश असणार नाही अशी मला आशा आहे. माझा खटला जाहीरपणे चालावा इतकीच माझी माफक अपेक्षा आहे.' हे सांगण्याची गरज नाही की तिला नंतर मृत्युदंडाची शिक्षा झाली.

 नेपोलियननी आपली पत्नी जोसेफाईनला घटस्फोट देण्यापूर्वी एक पत्र लिहिलं होतं... 'मी तर संकटातच वाढलो, जगलो. वाईट दिवसांत न घाबरता जगणं आताशा माझी सवय होऊन गेली आहे. हे जोसेफाईन! तू काळजी करू नकोस. सुखी रहा. जर कोणी एकटा, अभागी, कष्टी, दुःखी असेल तर तो फक्त तुझा पती - नेपोलियन.' जगज्जेता नेपोलियन बोनापार्ट इतका हवालदिल होऊ शकतो यावर विश्वासच बसत नाही.

 मृत्यूशय्येवरून लिहिलेल्या पत्रात जगात श्रेष्ठ समजली जाणारी प्रेमपत्रे टॉलस्टॉयचीच. व्हिक्टर ह्यूगोही याच पठडीतला. 'ला मिजराब' ही जगप्रसिद्ध कादंबरी लिहिणारा. त्यानं आपली प्रेमिका ज्युलिएटला लिहिलेल्या शेवटच्या पत्रात म्हटलं होतं, "प्रिय ज्युलिएट, जर तू माझ्यापूर्वी गेलीस तर मी तुझ्यावरच प्रेम करत राहीन. आणि जर मी तुझ्या अगोदर गेलो तरी मरणानंतरही तुझ्यावरच प्रेम करीत राहीन. तुझा मृत्यू तोच माझाही असेल. - व्हिक्टर.'

 प्रेमपत्रांचा हा खजिना मला रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या जुन्या पुस्तकात

वाचावे असे काही/५०
हाती लागला. हे पुस्तक जगातली एकमेव प्रत असावी. मी ती ओएलएक्सवर

टाकायची म्हणतोय. मला १ रुपयाला मिळालेले हे पुस्तक १ कोटीची बोली देईल अशी खात्री आहे. है कोई माई का लाल? ओ कद्रदान दुनियावालो, दिलवाले हो तो बोली बोलो।

◼◼


वचन सिद्धान्त सार संपादक - डॉ. फ. गु. हळकट्टी, अनुवादक - प्रा. आर. एम. करडीगुद्दी प्रकाशक - महाराष्ट्र बसव परिषद, हिरेमठ संस्थान, भालकी, जि. बिदर (कर्नाटक) पृ. १२१०, मूल्य - रु. १०००/- (सवलत ५०%) प्रकाशन वर्ष - २०१६



वचन सिद्धांत सार

 भारतीय संत परंपरेत काही संत हे पुरोगामी म्हणून ओळखले जातात.हिंदीत कबीरदास, मराठीत तुकाराम तर कन्नडमध्ये बसवेश्वर. संत बसवेश्वरांनी लिंगायत धर्माचे पुनरुज्जीवन केले. कर्नाटक ही त्यांची कर्मभूमी मानली जाते. धर्म, समाज, तत्वज्ञान, साहित्य इत्यादी क्षेत्रातील त्यांचे कार्य क्रांतिकारकच म्हणावे लागेल. त्यांनी आपल्या जीवनकाळात 'अनुभवमंटप' (मंडप) चा जो प्रघात पाडला होता, तो जागतिक धर्मांच्या इतिहासात अभिनव ठरला. या अनुभव मंडपात सर्व जाती, धर्माच्या लोकांना प्रवेश असे. बाराव्या शतकाचा काळ लक्षात घेता, हे काम धाडसाचे निश्चितच होते. चर्चेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर यांनी जी धर्म जागृती घडवून आणली, ती वर्तमान लोकशाहीपूरकच म्हणावी लागेल. या चर्चेतून जी धर्मवचने निश्चित झाली ती कन्नडमध्ये 'वचन साहित्य' म्हणून प्रसिद्ध आहेत. ही वचने अनेकांनी लिहिली. सन १९२३ मध्ये डॉ. फ. गु. हळकट्टी यांनी कन्नडमध्ये 'वचनशास्त्र' सार (भाग-१) संपादित करून प्रकाशित केला होता. त्याचे परिष्करण सन १९८१ मध्ये डॉ. एम. एम. कलबुर्गी व डॉ. वीरण्णा बी. राजूर यांनी केले. डॉ. एम. एम. कलबुर्गी वचन साहित्याचे व्यासंगी अभ्यासक म्हणून ओळखले जात होते. संत बसवेश्वरांप्रमाणेच त्यांचे विचार क्रांतिकारी होते म्हणून तर प्रतिगामी विचाराच्या हिंसक हल्ल्याचे ते बळी ठरले. 'वचन सिद्धांत सार' नावाचे मूळ कन्नडमध्ये असलेल्या या महाग्रंथाचा मराठी अनुवाद प्रा. आर. एम. करडीगुद्दी यांनी केला आहे.

 संत बसवेश्वरांना भारतीय समाजातील जातमूलक विषमता, उच्चनीचता मान्य नव्हती. म्हणून त्यांनी तत्कालीन चातुर्वण्यांचा विरोध केला. बसवेश्वरांच्या लेखी सारी माणसे समान होती. त्यांच्या या उदार आणि व्यापक दृष्टिकोनामुळे त्यांच्या धर्माला विविध जात आणि वर्णातील अनुयायी लाभले. बसवेश्वर आंतरजातीय खानपान व्यवहाराचे जसे समर्थक होते, तसेच ते आंतरजातीय विवाहांनाही प्रोत्साहन देत असत. 'वचन सिद्धांत सार' मध्ये संत बसवेश्वरांची जी वचने आहेत, ती आदर्श मानव धर्माचीच तत्त्वे होत. सत्य बोलावे, चोरी करू नये, हिंसा नको, ज्ञानी तो श्रेष्ठ, व्यभिचार वर्ज्य, सभ्य वर्तन, स्त्रिया, दलितांचा आदर, सहनशील वर्तन इत्यादी तत्वे म्हणजे मानव प्राण्याप्रती आस्थाच. शरण (भक्त) विषयक त्यांचे विचार व आचारही पूज्य भाव व्यक्त करणारा असायचा.

 सत्य बोलावे, बोलल्यागत वागावे.
 असत्य आचरण करून प्रमाद करणाऱ्या
 संसारी माणसास नको म्हणे, कूडलसंगमदेवा.

 संत बसवेश्वरांनी जी वचने लिहिली आहेत त्यात स्वतःसाठी चेन्नबसवण्णा शब्दाचा वापर केला असला तरी तो सर्वसकट वचनांत येत नाही. ईश्वरासाठी ते कूडलसंगमचा वापर करतात. तो शब्द स्थलदर्शकही आहे. धर्माचरण म्हणजे सत्याचरण अशी महात्मा बसवेश्वरांची धारणा होती. बसवेश्वर अत्यंत स्पष्टवक्ते होते. ही पारदर्शिता त्यांच्या वचनांमध्येही प्रतिबिंबित झालेली आढळते-

 एकसारखा 'मी करतो' म्हणून उंच झेंडा
 फडकवून करणाऱ्या भक्ताचे घर
 म्हणजे भाईणीचे घर.

 शरणाने विनम्र असावे, अहंकारी असू नये. 'मी' पणाचा त्याग केल्याशिवाय आपणास ज्ञानी होता येणार नाही, हे संत बसवेश्वर आपल्या भक्तांना परोपरीने सांगत असत. 'ठकाला तोंडामध्ये शेपूट असते' अशा आशयाचे त्यांचे प्रसिद्ध वचन आहे. त्यातून ते 'कुत्रा' आणि 'माणूस' यांच्यातील व्यवहाराचे अंतर आणि फरक समजावतात. बोलघेवड्या माणसांचा बसवेश्वरांना तिटकारा नि तिरस्कार होता. अशा लोकांना त्यांनी आपल्या वचनात 'शब्दसूतकी' म्हटले आहे. अशा लोकांना ते 'रौरवनरकवासी' म्हणजे टोकाचे वाह्यात संबोधले आहे. 'क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे' हेच त्यांना अशा वचनांतून समजवायचे असायचे. पूर्वी धर्म आणि दान हे परस्परपूरक होते नि आहेपण. परंतु प्रदर्शनार्थ दान अथवा हेतू ठेवून केलेले दान बसवेश्वर निषिद्ध मानत. लोक अन्नदान, वस्त्रदान, धनदान करतात. पण या महात्म्याने 'त्रिकरणशुद्ध' शब्द वापरून निरपेक्ष सेवेचे महत्व अधोरेखित केले आहे. वीरशैव शरण लिंगायती असतात. लिंगस्पर्शी हात किती महत्त्वाचे असतात, हे समजून सांगताना त्यांनी एका वचनात म्हटले आहे, "लिंगास स्पर्श केलेला हात सत्कारार्थ राखीव.' म्हणजे एकदा का तुम्ही शरण झालात मग तुम्हास दुष्कृत्य करण्याचा अधिकारच उरत नाही. तुम्ही निरंतर सदाचारी राहणे बंधनकारक. अशा प्रकारे संत बसवेश्वरांनी आपल्या धर्मीय बांधवांना सदाचारी बनवले.

 लिंगायत धर्मातील वचन साहित्याचा प्रारंभ मानण्यात येतो. वचन साहित्यात अबिंगर चौडय्या, अक्कमहादेवी, अल्लमप्रभू, उरिलिंग पेद्दी, काडसिद्धेश्वर, गजेश मसणय्या, जेडर दासिमय्या, तोंटद सिद्धलिंगेश्वर प्रभृती संतांनी मोलाची भर घालत वचन साहित्य समृद्ध केले आहे. ते बाराव्या शतकापासून विकसित होत आलेले आहे. या वचन साहित्यातूनच लिंगायत मततत्वे उदयाला आली आहेत. या 'वचन सिद्धांत सार' ग्रंथाच्या आधारे सुमारे अडीचशे वचनकार आजवर होऊन गेले. त्या सर्वांच्या वचनांचा हा संग्रह असल्याने त्यास धर्मग्रंथाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. मध्ययुगात सर्वच धर्मांमध्ये कर्मकांडाचे स्तोम माजले होते. त्यास छेद देत ज्या संत कवींनी धर्मशुद्धी मोहीम उघडली व ज्यांनी कर्मकांडापेक्षा आत्मिक शुद्धता व मनःपूर्वक भक्ती महत्त्वाची मानली अशा रामानुजाचार्य, मध्वाचार्य श्रेणीत बसवेश्वरांचा समावेश केला जातो. त्यांनी धर्माबरोबर राजकीय परिवर्तन घडवून आणले हे विशेष. या धर्मक्रांतीत वचन साहित्याचा सिंहाचा वाटा होता. गेल्या शतकातही गुब्बी मलहण नामक वचनकाराने लिहिलेला 'गणभाष्यरत्नमाला' (सन १९०५) सारखा महत्त्वपूर्ण ग्रंथ उदयाला आला. यातूनही वचन साहित्याची निरंतरता व अखंडता लक्षात येते.

 कुराण', 'बायबल', 'श्रीमद्भागवत', 'अवेस्ता', 'वचनसिद्धांत सार', 'समयसार', 'त्रिपिटक' इत्यादी धर्मग्रंथ इस्लाम, ख्रिश्चन, हिंदू, पारशी, वैश्य, जैन, बौद्ध इत्यादी धर्माचे प्रातिनिधिक साहित्य म्हणून ओळखले

वाचावे असे काही/५४
जाते. या सर्व धर्मग्रंथांचा जुजबी अभ्यास करताना जी एक गोष्ट माझ्या

लक्षात येते ती अशी की कोणत्याही धर्म, धर्मसंस्थापक, धर्मग्रंथाने अन्य धर्म वा धर्मीयांबद्दल अवाक्षर काढलेले नाही वा असहिष्णुता शिकवलेली नाही. तरी धर्मानुयायी वैर, हिंसा, असहिष्णू, आचरण का करतात याचे उत्तर धर्मात नसून कर्मात असते हेच खरे.

◼◼


आठवणीतल्या कविता (भाग १ ते ४) संपादक - महाजन, बरवे, तेंडुलकर, पटवर्धन. मौज प्रकाशन, मुंबई. पृष्ठे - सरासरी १६०/- रु. किंमत - प्रत्येकी रु. ८०/- प्रकाशन - १९८९


आठवणीतल्या कविता

 माणसाच्या जीवनात सर्वाधिक संस्मरणीय कालखंड कोणता असेल तर तो बालपणाचा! बालपण म्हणजे खेळ, सवंगडी, शाळा, गोष्टी, गाणी याचं गारूड, 'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा', 'अहा ते सुंदर दिन हरपले, मधुभावाचे वेड जयांनी जीवाला लावले', 'आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे' असं 'बालपणीचा काळ सुखाचा' वर्णन करणाऱ्या ओळींचं जीवन म्हणजे बालपण. लहानपणी शाळेत पाठ केलेल्या कविता आयुष्यभर साथ देत मना, कानात गुणगुणतच आपण मोठे होतो. आपण जसजसे मोठे होतो तसतसे बालपणीचं स्मरणरंजन मोहक वाटू लागतं. शाळेतील पाठ्यपुस्तकांतील कवितांचा खजिना, संग्रह उपलब्ध आहे. 'आठवणीतल्या कविता' त्याचं नाव. या पुस्तकाचे एक दोन नव्हे, चांगले चार भाग उपलब्ध आहेत. आणि या चार भागात सुमारे साडेतीनशे कविता उपलब्ध आहेत. या कविता वाचत आपण परत लहान होतो, हे या 'आठवणीतल्या कविता'चं वैशिष्ट्य.

 'थोर तुझे उपकार आई', 'छान किती दिसते, फुलपाखरू', 'पतंग उडवू चला गड्यांनो', 'लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली', 'देवा तुझे किती सुंदर आकाश', "दिवस सुगीचे सुरू जाहले, ओला चारा बैल माजले', 'श्रावणमासी हर्ष मानसी', 'आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक', 'हा हिंद देश माझा', 'उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले' या बालकविता माहीत नाही असा मराठी माणूस विरळा. असं काही आहे या कवितांमध्ये? तर काही नाही, त्यात आपलं सारं जीवन सामावलेलं आहे. महाराष्ट्रातील पहिलं मराठी पाठ्यपुस्तक 'वाचनमाला' बनवलं पहिले ब्रिटिश शिक्षणाधिकारी मेजर टॉमस कँडी यांनी. मराठी भाषेत विरामचिन्हांचा वापरही त्यांनीच सुरू केला. 'बालमित्र' त्यांच्याच काळात सुरू झालं. अव्वल इंग्रजी काळापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपल्याकडे विविध मराठी पाठ्यपुस्तके प्रकाशित झाली. पूर्वी ती आजच्या महाराष्ट्राशिवाय गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशच्या मराठी मुलखात शिकवली जात असत 'नवयुग वाचनमाला', 'नवभारत वाचनमाला', 'मंगल वाचन' अशी ती पुस्तके होती. आज 'बालभारती', 'कुमारभारती', 'युवकभारती' आहेत, पण गंमत अशी की शंभर वर्षे उलटून गेली तरी वर सांगितलेल्या बालकवितांना मरण नाही. त्याचं कारण या बालकविता मराठी साहित्य आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

 पाठ्यपुस्तके आपण जेव्हा शिकत असतो, तेव्हा तो परीक्षेचा अभ्यास असतो हे खरे आहे. पण त्या अभ्यासातून आपल्या मनाची घडण केव्हा नि कशी होते ते आपणास कळत नाही. 'मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!' कविता अर्थासह आपण लहानपणी पाठ करतो. प्रश्नांची उत्तरे लिहितो पण त्यातून राज्यातला उंच ध्वज आपल्या गावी फडकला पाहिजे अशी ऊर्मी, महत्त्वाकांक्षा निर्माण होते, त्याचं बीजारोपण बालपणी म्हटलेल्या महाराष्ट्र गीतात असते. मराठीत राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, यशवंत, सुरेश भट प्रभृती मान्यवर कवींनी महाराष्ट्र गीते लिहून आपल्यामध्ये प्रांताभिमान रुजवला आहे. 'कोंबडा', 'पेरील जे शेतकरी नाही', 'इरलेवाली', 'सुगी', 'नंदीबैल', 'हिरवे तळकोकण' सारख्या कवितांमधून शहरी विद्यार्थ्यांना कृषी संस्कृतीचे कष्ट कळतात म्हणून शेतकरी आत्महत्येने ते कासावीस होतात. 'आई', 'तान्हाभाऊ', 'श्रावणबाळ' कविता नातेसंबंध दृढ करत आपल्यात कर्तव्यभावना रुजवते. 'दसरा', 'दिवाळी', 'होळी' कविता सण समजावतात. 'भोवरा', 'पतंग', 'चेंडू', 'खेळ', 'गोफण' कविता खेळातून जीवनसंस्कार देतात. विशेष म्हणजे हे सारं कळतं ते समज आल्यावर. बालपणीच्या पाठ केलेल्या कविता आयुष्यभर पिच्छा पुरवत, पाठलाग करत कानात घोंगावत राहतात म्हणून आपण सुसंस्कृत, सभ्य राहतो.

वाचावे असे काही/५७
 'आठवणीतल्या कविता' पुस्तकाचे चार भाग जन्माला कसे आले, हे

समजून घेणंही रंजक ठरावे. मराठीचे अमर शिल्प ‘स्मृतिचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळकांची नातसून मायावती अशोक टिळक बालपणी शिकलेली एक कविता शोधत होत्या. कविता होती - 'पडू आजारी मौज हीच वाटे भारी'. शाळा चुकवण्यासाठी आजारी पडणाऱ्या शाळगड्याची कविता. किंवा आजारी पडल्यावर मिळणाऱ्या शुश्रूषा व साग्रसंगीत आहाराची कविता. एका भारतीय आजोबांनी ती पाठ केलेली असते. ते अमेरिकेत जाऊन स्थिरावतात. त्यांचा नातू आजारी पडतो. त्याला ती म्हणून दाखवायची असते नि पुस्तकही दाखवायचं असतं म्हणून ते तमाम भारतीयांना कविता शोधायच्या कामाला लावतात. या शोधात चांगल्या साडेतीनशे कविता जमतात नि त्यांची पुस्तके होतात. तुम्हाला हे सांगून खरं वाटणार नाही की हे पुस्तक येणार कळताच अ‍ॅडव्हान्स बुकिंग फुल्ल! ही असते बालपणीच्या आठवणींची ताकद. या पुस्तकांच्या आवृत्यांवर आवृत्या निघाल्या. माझ्या संग्रही असलेली दहावी आवृत्ती आहे सन २००६ची. आज विसावी आवृत्ती आली असेल तर आश्चर्य वाटायला नको.

 मला आठवतं, आमच्या लहानपणी नवी पुस्तके अपवाद मुलेच खरेदी करीत. वरच्या वर्गात गेलेल्यांची पुस्तके निम्म्या किमतीत घेण्याचा रिवाज होता. वह्याही नवीन मिळत नसत. पास झालेल्या वर्षातील वह्यांची कोरी पाने जमा करायची. त्यांच्या शिवून वह्या करायच्या. वर्तमानपत्राचे कव्हर घातले की झाली नवी वही तयार. विशेष म्हणजे एकाच वहीत रेघी, तिरेघी पाने असत. ही रफ वही असायची. गृहपाठाच्या वह्या फक्त नव्या असत. एका पेन्सिलीचे तुकडे करून भावा, बहिणीत वाटले जात. अख्खी पेन्सिल फक्त दुकानात. शाळेत 'दिल के टुकडे हजार'. तीच गोष्ट सूच्या सुट्टीतील गोळ्यांची. एक तीळ सात जणांनी वाटून खाण्याचा आमच्या पिढीचा अनुकरणीय आदर्श असल्याने दोन मित्रांनी दोन स्वतंत्र गोळ्या खाणे स्वप्नातच घडे. प्रत्यक्षात एका गोळीचे सदऱ्याच्या टोकात गोळी धरून दाताने केलेल्या दोन तुकड्यांच्या गोळ्यात बालपण केव्हा सरले ते समजलेच नाही.

 'आठवणीच्या कविता' वाचत असताना नुसत्या कवितांनी भरती येत नाही. भरती येते बालपणीची अन् सुरू होते प्रौढत्वाची ओहोटी! आठवू लागतात जीव लावणारे शिक्षक. नापास करणारे गुरुजी. वर ढकलणारे हेडमास्तर. मोरपिस देणारी मैत्रीण न आठवली तरच आश्चर्य! पेन्सिलला

वाचावे असे काही/५८
टोक करण्यासाठी अर्ध ब्लेड देणारा, अर्धा खोडरबर देणारा, विसरल्यावर

ड्रॉईंगच्या तासाला ताव, रंग, ब्रश, करकटक, पट्टी देणारे मित्र आठवतात. आणि आठवतात आपल्यासाठी खोटं बोलून पट्टीचा गुरुजींचा मार आपल्या तळहातावर सोसणारे जिगरी दोस्तही! प्रत्येक शिकलेल्या माणसाच्या जीवनात पाठ्यपुस्तके सरल्या ऋतूंचं वास्तव असतं नि असतं न विसरू शकणाऱ्या आठवणींचं मोहोळ! माझ्या संग्रही अशी सर्व पुस्तके आहेत. नंतर मी शिक्षक झालो. मी शिकवलेली पाठ्यपुस्तकेही माझ्या संग्रही आहेत. मी एकविसाव्या वर्षी शिक्षक झालो तेव्हा माझी पहिली बॅच धोक्याच्या वयाची, षोडशवर्षीय होती. त्यांच्या नि माझ्या वयात सहा-आठ वर्षांचंच अंतर. परवा साठीत असलेली ही मुलं मुली घरी आली. मिळून मी शिकवलेली कविता म्हणून आठवणींना उजाळा देत निघून गेली.

◼◼


साऊथ ब्लॉक दिल्ली - विजय नाईक रोहन प्रकाशन, पुणे पृ. २५९ किंमत - रु. ३००/- प्रकाशन - २०१४



साउथ ब्लॉक दिल्ली

 एखादं चांगलं पुस्तक हाती लागणं म्हणजे वाचकास मिळालेली पर्वणीच! काहींना लॉटरी लागल्याचा आनंद व्हावा. 'साउथ ब्लॉक दिल्ली' हे पुस्तक भारताच्या परराष्ट्र व्यवहाराची बित्तंबातमी देणारं पुस्तक म्हणून मोठंच कुतूहलवर्धक. ते भारतीय राजकीय कूटनीतीचा विश्ववेध घेतं. नवी दिल्लीत 'वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून गेलेले नि तिथेच स्थिरावलेले विजय नाईक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ते उतरलंय. सन १९६७ ते २०१२ म्हणजे सुमारे पाच दशकांच्या परराष्ट्र खात्याचा हा लेखाजोखा. परराष्ट्र खात्याची रचना, इतिहास हे पुस्तक समजावतंच. पण त्यापेक्षा हे पुस्तक एक नवे भान देतं, ते म्हणजे देशांच्या सीमा केवळ शस्त्रांनी सैनिक सुरक्षित ठेवत नाहीत तर देशांचे राजदूत, परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी, शिष्टमंडळे व दोन देशांत होणारी बोलणी, करार, आदानप्रदानातूनही तितक्याच गांभीर्याने देशाचे रक्षणच नाही तर विकास घडवून आणण्यास मोठे साहाय्य होत असते.

 लेखक विजय नाईक हे भारतीय राजकारण, परराष्ट्र धोरण, शिष्टाई, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे चांगले जाणकार आहेत. सन १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी 'युद्ध वार्ताहर' म्हणून कार्य केले आहे. त्यांनी ईशान्य भारतातील सशस्त्र उठाव, पंजाबातील 'ऑपरेशन ब्लू स्टार', 'कारगीलचे युद्ध' यांचे वार्तांकन केले आहे. तसेच अनेक पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या विदेश दौऱ्यात व अन्य शिष्टमंडळांतून अनेक देशांचा दौरा केल्याने त्यांना जगाचा इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र चांगलेच माहीत असल्याचे पुस्तक वाचताना जाणवत राहते. भारतीय शासन रचना, कार्यपद्धतीचे त्यांचे निरीक्षण व नोंदी वाचकास एका नव्याच जगात घेऊन जातात.

 भारत स्वतंत्र झाला. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले. त्यांनी परराष्ट्र मंत्रालय आपल्याकडेच ठेवले होते. पुढे ही परंपरा अनेक पंतप्रधानांनी पाळली. आपले पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय हे तिन्ही एकाच राजवाडा शोभेल अशा इमारतीत आहे. त्या इमारतीचं नाव 'साउथ ब्लॉक'. त्या समोर आहे 'नॉर्थ ब्लॉक'. तिथे आहे गृह आणि वित्त मंत्रालय. या दोहोंच्या मध्ये आहे राष्ट्रपती भवन. आणिबाणीत देश क्षणात सूत्रे हलवतो त्याचे हे रहस्य. सगळ्या राष्ट्रांचे दूतावास जिथे आहे तो भाग 'चाणक्यपुरी' म्हणून ओळखला जातो. 'दूतावास' पाहात असताना लक्षात येते की ते त्या देशांचे आपल्या देशातील किल्लेच.

 कोणत्याही देशाचं सामर्थ्य आज शस्त्रांपेक्षा त्या देशाच्या कूटनीतीवरून ओळखलं जातं. भारत हा शांतीप्रिय देश असला, तरी त्याचे राजदूत सर्व देशात आहेत. हा विभाग शिष्टाचार प्रवीण मानला जातो. या विभागाचा संबंध व संपर्क थेट त्या देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यापर्यंत असतो. राष्ट्रप्रमुखांच्या भेटी, दौरे ठरवणे सोपे पण शिष्टाचार पाळणे अवघड. कारण प्रत्येक देशाची भाषा, पोषाख, खानपान, परंपरा, शिष्टाचार वेगळे. जगातील सर्व भाषा येणारे दुभाषी सर्व राष्ट्रांकडे असतात. कार्यक्रमात मिनिटांचं नव्हे सेकंदांचं महत्त्व. विशेष म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाचे कार्य देशाच्या वेळेपेक्षा आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेप्रमाणे चालते. आपले परराष्ट्र अधिकारी, राजदूत त्या त्या देशांचे झाले तरच ते यशस्वी होतात. राजशिष्टाचारात आगमन, स्वागत, सलामी, बैठका, भेटी, भोजन, शिष्टमंडळ चर्चा, करार, निवास, वाहन व्यवस्था ते थेट पाहुणा परत स्वदेशात सुखरूप पोहोचेपर्यंतची काळजी घेणे सर्वांचे भान राखावे लागते. त्यात थोडी कसूर म्हणजे त्या राष्ट्राचा अपमान समजण्यात येतो. या सर्वांचे प्रशिक्षण परराष्ट्र अधिकाऱ्यांना दिले जाते. आपल्या देशात असलेल्या परदेशी राजदूत, अधिकारी, पत्रकारांना हवी ती माहिती देण्याबरोबरच ते देशविरोधी काही कार्य, कृती, प्रचार, हेरगिरी तर करत नाही ना यावर

वाचावे असे काही/६१
'तिसरा डोळा' म्हणूनही हा विभाग कार्य करीत असतो. या विभागाला दोन

'तिसरे डोळे' असतात. दुसरा 'तिसरा डोळा' जगभर उपग्रहासारखा फिरत असतो. म्हणून आपला देश सुरक्षित असतो. प्रत्येक परदेश एकाच वेळी मित्र व शत्रू समजून कार्य करण्यावर या विभागाची कार्यकुशलता जोखली जाते.

 हे पुस्तक अनेक रोचक, खोचक माहिती, घटना, प्रसंगाचा खजिना म्हणून महत्वाचे. वाचक एकदा का वाचू लागला की तो 'शेरलॉक होम्स', बाबूराव अर्नाळकरांच्या 'झुंझारकथा' प्रमाणे पुस्तक एक हाती वाचून संपवतो. यशवंतराव चव्हाण परराष्ट्र मंत्री असताना १९७५ साली पेरू देशाची राजधानी लिमा येथे गेले होते. तेथील राजवाड्यात तेथील राष्ट्राध्यक्ष जुऑन व्हेलॅस्को यांच्याशी भारतीय शिष्टमंडळाची चर्चा सुरू होती. एका फ्रेंच पत्रकाराने यशवंतराव चव्हाण यांना चिठ्ठी पाठवली. 'देशात लष्करी उठाव झाला आहे व राजवाडा लष्कराने वेढला आहे. राष्ट्राध्यक्ष मात्र शांत होते कारण तिथे लष्करी उठाव नेहमीचाच होत होता. 'तुम्ही बोलणी पूर्ण करा' म्हणून राष्ट्राध्यक्ष निघून गेले. उठाव शांततापूर्ण होता. बाहेर सारे पूर्ववत होते. फक्त राष्ट्राध्यक्ष नवे झाले होते. त्यातच इथियोपियाचे अध्यक्ष राजे हेले सेलासी यांच्या निधनाची वार्ता येऊन थडकली. दोन्ही घटनांच्या प्रतिक्रिया देत यशवंतराव चव्हाण स्वदेशी सुखरूप पोहोचले. आपल्याला राजकारण्यांचा मुकुट, मानमरातब दिसतो, जोखीम अशा प्रसंगातून लक्षात येते.

 पंतप्रधान वा राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी असो वा दफनविधी वा अंत्यसंस्कार, त्यास देशोदेशीचे राष्ट्रप्रमुख उपस्थित असतात. अशावेळी गांभीर्य पाळणं फार महत्वाचं असतं. पण त्याचवेळी मोठ्या संख्येने आलेल्या राष्ट्रप्रमुखांची बैठक व्यवस्था करणे मोठी डोकेदुखी असते. सर्व औपचारिक असलं, तरी रोज एकमेकांचे शत्रू समजले जाणारे राष्ट्रप्रमुख एकमेकांस हस्तांदोलन करतात ते उपचार म्हणून. असे फोटो वृत्तपत्रात लक्षवेधी ठरतात.

 राष्ट्रप्रमुख विदेशी दौऱ्यावर जातात तेव्हा त्यांना राज शिष्टाचाराचा भाग म्हणून भेटी दिल्या जातात. पूर्वी पक्षी, प्राणी भेट दिले जायचे. इंडोनेशियाच्या अध्यक्षांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांना आपल्या कमोडो बेटावर सापडणारा जगातला सर्वांत मोठा सरपटणारा प्राणी ड्रॅगन भेट म्हणून दिला. तो त्यांनी व्हाईट हाऊसच्या प्राणीसंग्रहालयात ठेवला. तेथील कुत्र्यांशी त्याचे पटेना. म्हणून त्याची रवानगी मादी ड्रॅगन असलेल्या

वाचावे असे काही/६२
सिनसिनाटी शहराच्या प्राणीसंग्रहालयात करण्यात आली. ती मादी त्याला

इतकी आवडली की तिथे त्याने ३३ ड्रॅगनची पिल्ले जन्माला घातली. त्यांचे काय करायचे हा तेथील परराष्ट्र मंत्रालयापुढे यक्षप्रश्न उभा राहिला. कारण अशा भेटी राजशिष्टाचार म्हणून जपाव्याच लागतात. इजिप्तच्या सुलतानाने इटलीच्या राजकुमाराला चक्क जिराफच भेट दिला, तोही समारंभपूर्वक भर दरबारात!

 १९९६ साली जपानला गेलेल्या भारतीय शिष्टमंडळात मी सदस्य होतो. टोकियोच्या पहिल्या राजकीय भोजनात माझ्या ताटातले सर्व पदार्थ मांसाहारी होते. मी तिथल्या राजशिष्टाचार अधिकाऱ्यांना शाकाहारी असल्याचे समजावत होतो अर्थातच दुभाषामार्फत. ते अधिकारी पर्यायी पदार्थ म्हणून मांसाहारी पदार्थच सुचवत राहिले. शेवटी माझ्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे, जपानला शाकाहार ही कल्पनाच माहीत नव्हती.

 दै. सकाळ चे प्रतिनिधी विजय नाईक यांचे हे पुस्तक म्हणजे जगप्रवासच! पूर्वी भारतीय परराष्ट्र खात्यात अनेक महाराष्ट्र अधिकारी असत. आता त्या आघाडीवर आपला ज्ञानेश्वर मुळे वगळता आपली पिछेहाट झाल्याचे लेखकाचे शल्य महाराष्ट्रीय तरुणांना आव्हान होय. असे असले, तरी जगाच्या क्षितिजावरचा आजचा भारत म्हणजे उगवता तारा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

◼◼


ग्रंथगप्पा - शरद गोगटे मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे पृ. १६०, किंमत - २००/- प्रकाशन - २०१६



ग्रंथगप्पा

 पुस्तकाचं नाव 'ग्रंथगप्पा' असं हलकं-फुलकं असलं, तरी पुस्तक मात्र मराठी ग्रंथव्यवहारावर क्ष किरण टाकणारे आहे. ते एका मराठी ग्रंथव्यवहार जाणकाराने लिहिले आहे. त्यांचे नाव आहे, शरद गोगटे. त्यांनी यापूर्वी 'मराठी ग्रंथप्रकाशनाची २०० वर्षे' नावाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक संदर्भग्रंथ सिद्ध केला आहे. तो ग्रंथ लिहीत असताना मराठी पुस्तकांचा प्रारंभ, निर्मिती, विकास यासंदर्भात विपुल माहिती त्यांच्या हाती आली. सर्व माहिती ते उपरोक्त संदर्भ पुस्तकात देऊ शकले नाहीत. म्हणून मग त्यांनी 'ललित' मासिकात 'ग्रंथगप्पा' सदर सुरू केलं. त्या सदराचं हे ग्रंथरूप होय.

 या पुस्तकाचे तीन भाग आहेत. (१) ग्रंथ : रूप व अंतरंग. (२) ग्रंथव्यवहार (३) ग्रंथोपजीवी. या तीन भागात एकूण २८ लेख आहेत. प्रत्येक लेख म्हणजे संदर्भ, माहिती, इतिहासाचा खजिनाच! म्हणजे मी तुम्हाला असे विचारले की मराठीला सचित्र मुखपृष्ठ लाभलेलं पहिलं पुस्तक कोणतं? तर ते चोखंदळ वाचक व चिकित्सक अभ्यासकाला पण सांगता येणे कठीण. 'ग्रंथगप्पा'तून कळते की १९३३ साली पहिल्यांदा मराठी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चित्र आले. तोवर म्हणजे सन १८०५ मध्ये मराठी पहिलं पुस्तक छापल्यापासून जी पुस्तके प्रकाशित झाली त्यावर फक्त लेखक, पुस्तक, प्रकाशक नाव असे व पुस्तकाची किंमत.

 गोव्याचे पत्रकार व मराठी लेखक बा. द. सातोस्कर मुंबईत छोटी- मोठी पुस्तके प्रकाशित करीत असत. गोव्याचे एक नवोदित कथालेखक जयवंतराव देसाई ‘सुखाचे क्षण' नावाचा मराठी कथासंग्रह घेऊन त्यांच्याकडे आले. त्यांनी तो छापून तयार केला. त्याला पांढऱ्या कागदावर ग्रंथशीर्षक, लेखकाचे नाव, प्रकाशक, मूल्य असं छापून मुखपृष्ठ वेष्टन (कव्हर/ जॅकेट) घातलं. प्रश्न पडला की नव्या कथाकाराचं पुस्तक कोण वाचणार? त्या वेळी ज्येष्ठ मराठी साहित्यिक मामा वरेरकरांभोवती तरुण लेखकांचा पिंगा असायचा. बा. द. सातोस्करांनी आपली अडचण मामांना सांगितली. मामा नाटककारही असल्याने तत्कालीन तरुण अभिनेते, अभिनेत्री मामांना कामासाठी गळ घालीत. सातोस्करांनी अडचण सांगितली तेव्हा त्यांच्या जवळच एक षोडशवर्षीय, अत्यंत सुंदर, गोरी गोरी पान, फुलासारखी छान' अशी एक युवती बसली होती. तिच्याकडे बोट दाखवीत मामा म्हणाले, "हिला घेऊन जा. तिचे दोन-तीन फोटो घे. ब्लॉक तयार कर. छाप. हे जॅकेट असलं तर तुझ्या मित्राचं पुस्तक खपेल की नाही?" सातोस्करांनी मामांचा हुकूम तंतोतंत पाळला नि पुस्तक हातोहात खपलं. त्या तरुणीचं नाव ठाऊक आहे? हंसा वाडकर. ('सांगत्ये ऐका' फेम). मराठी पडद्यावर येण्यापूर्वीच ती मराठी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर झळकली होती. नंतर ती मराठी चित्रपटातील युगनिर्माती अभिनेत्री झाली नि लेखिकापण.

 जी गोष्ट मुखपृष्ठाची तीच मलपृष्ठाची. मलपृष्ठ म्हणजे मुखपृष्ठामागचं पान. ते मळतं म्हणून मलपृष्ठ. पूर्वी ते कोरं असायचं. आज त्या मलपृष्ठावर पुस्तकाचा त्रोटक परिचय असतो. त्याला त्रुटित म्हणतात. हे त्रुटित मराठीत आलं ते इंग्रजी 'ब्लर्ब'वरून. इंग्रजीत ब्लर्ब कसा रूढ झाला, त्याचीही रंजक कथा आहे. मराठी पुस्तकांवर ब्लर्बची परंपरा गेल्या पन्नास वर्षांतली. पण इंग्रजीत ती त्यापूर्वी तितकीच वर्षे रूढ होती. इंग्रजीत लेखक, चित्रकार, समीक्षक, कवी, विडंबनकार म्हणून बर्जेस प्रसिद्ध होता. सन १९०६ मध्ये त्याचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं. त्याचं शीर्षक होतं, 'आर यू ए ब्रोमाइड?' ब्रोमाइड मुळात हे एका रसायनाचं नाव. त्याने तो शब्द 'बोअर' (कंटाळा) अर्थाने रूढ केलं. 'ब्रोमाइड' शब्दाप्रमाणे 'ब्लर्ब' शब्दही बर्जेसनेच जगभर रूढ केला. त्याचं 'आर यू ए ब्रोमाइड?' पुस्तक खपावं म्हणून त्याने पुस्तकाच्या मलपृष्ठावर 'एका प्रेमविव्हळ प्रमदेचं, चटक चांदणीचं' - ती

वाचावे असे काही/६५
ओरडून काही सांगते आहे ('सांगत्ये ऐका'च म्हणा ना!) असं चित्र छापलं.

तिचं नाव होतं बेलिंडा ब्लर्ब. तिच्या नावाने मलपृष्ठ मजकूर 'ब्लर्ब' म्हणून ओळखला जातो. हे ग्रॅहम बेलसारखंच. त्यानं फोनचा शोध लावला. ट्रायल म्हणून पहिला फोन आपल्या प्रेयसीला केला होता. तिचं नाव होतं 'हॅलो'. जगातले सर्व जण फोन उचलला की 'हॅलो' म्हणतात. जणू काही पलीकडची व्यक्ती आपली प्रेयसीच. (गंमत म्हणून नरेंद्र मोदी ट्रंप साहेबाला 'हॅलो' म्हणूनच संवाद सुरू करतात!)

 पुस्तकांना अनुक्रमणिका कशी सुरू झाली? परिशिष्टं कशी जोडली गेली? मराठीत कोश कसे सुरू झाले? जगातलं महाग पुस्तक कोणतं? मानधन नाकारणारा पहिला लेखक कोण? ग्रंथ पुरस्कार कसे सुरू झाले? जप्त पुस्तकं कोणती? 'ग्रंथ-तुला' कशी सुरू झाली? मराठीत स्वस्त पुस्तकांचा जमाना कसा सुरू झाला? पुस्तक प्रदर्शनाद्वारे ग्रंथ विक्री कुणी व कशी सुरू केली? अ‍ॅडव्हान्स बुकिंग (पुस्तकांचे) कसे सुरू झाले? या नि अशा अनेक शंकांचं समाधान करणारे हे पुस्तक नावाने जरी 'ग्रंथगप्पा' असलं, तरी प्रत्यक्षात मात्र ती आहे 'ग्रंथ-बखर'च.

 मराठीत 'ग्रंथगप्पा'सारखी अनेक पुस्तके आहेत. 'ग्रंथसनद' हे युनेस्कोच्या 'दि बुक चार्टर'चा अनुवाद होय. हे पुस्तक वाचन अधिकार, ग्रंथ शिक्षण, निर्भय सर्जनशीलता, प्रकाशन अभिरुची, ग्रंथालय, संदर्भ ग्रंथांचे आंतरराष्टीय आदान-प्रदान इत्यादी संबंधी मूलभूत भूमिका विशद करते. 'ग्रंथक्रांती' पुस्तक ग्रंथ विकास विस्ताराने समजावते. 'ग्रंथवेध' मध्ये मराठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथांचा परिचय मिळतो. 'आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने' अशी ओळ असलेला अभंग नुसता भिंतीवर टांगून काय उपयोग?

 'ग्रंथगप्पा' पुस्तक ग्रंथांसंबंधी माहिती देत जीवन समजावतं. म्हणजे असं की एके काळी मुलगी लग्न होऊन सासरी निघाली की शहाणी आई मुलीच्या रुखवतातून 'रुचिरा', 'अन्नपूर्णा', 'सूपशास्त्र', 'गृहिणी-मित्र' सारखी पुस्तके आवर्जून देत असे. नववधू एका हातात पुस्तक व दुसऱ्या हातात झारा, चमचा, डाव, उलथणे, रवी, चिमटा, पातेली, तवा, कढईच्या कसरती करत नवऱ्याबरोबर सासूचं मन जिंकायचा प्रयत्न करत असायची. सन्मान्य अपवाद वगळता बहुसंख्य सुनांना सासूचं मन जिंकता आलं असं इतिहासात ऐकिवात नाही. अशा या पुस्तकांचा रंजक इतिहास वाचक भगिनींनी मूळ पुस्तकातूनच वाचला पाहिजे.

वाचावे असे काही/६६
 लोकमान्य टिळक प्रकाशक म्हणून कसे होते? महात्मा गांधी साहित्य

प्रकाशन संस्था 'नवजीवन' कशी जन्माला आली? स्वेट मॉर्डेन या जगप्रसिद्ध लेखकाने मानधन न घेता आपल्या पुस्तक भाषांतराचे अधिकार का दिले? चित्र, चेहरा ते ब्लॉक आणि आज हाय रिझोल्यूशन सॉफ्ट कॉपीपर्यंतचा प्रवास कसा झाला? लेखक-प्रकाशक हे सारं गप्पांतून सांगणारं पुस्तक वाचणं म्हणजे वाचकाचं प्रगल्भ होणं. अशी पुस्तकं हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असतात की जी नेहमी उशाखाली असावी अशी वाटतात. पट्टीचा वाचकप्रिय पुस्तके झोपेतही हाती लागेल अशा बेताने ठेवत असतो. अशा ठेवणीतल्या पुस्तकांची रंगतच न्यारी. मराठी अभिमान गीत गाण्यात गैर काहीच नाही. आपले मराठी पुस्तकांचे वाचन अभिमान म्हणून मिरवावे असे आहे का? या प्रश्नांचे काहूर हे पुस्तक जागवते. म्हणून ते जवळ हवे.

◼◼


राजबंदिनी : आँग सान स्यू ची हिचं चरित्र प्रभा नवांगुळ राजहंस प्रकाशन, पुणे प्रकाशन - मे, २०११ पृष्ठे - २८८ मूल्य - रु. २५०/-



राजबंदिनी आँग सान स्यू की हिचं चरित्र

 असं म्हटलं जातं की माणसाला ज्या गोष्टी मिळायच्या, त्या सहज मिळता कामा नये. मग त्याची किंमत नाही राहात. स्वातंत्र्याचेही तसेच आहे. भारताच्या तुलनेने शेजारच्या म्यानमार (ब्रह्मदेश)चा स्वातंत्र्य लढा पाहिला की वरील विधानाची प्रचिती येते. भारत व तत्कालीन ब्रह्मदेश या स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या वसाहती होत्या. त्यामुळे भारतीय ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालीच ब्रह्मदेश असे. तिथल्या नि इथल्या स्वातंत्र्य लढ्याचा समान दुवा म्हणजे सुभाषचंद्र बोस. ब्रह्मदेश स्वतंत्र व्हावा म्हणून लढणाऱ्या ऑँग सान सारख्या तरुण विद्यार्थी कार्यकर्त्यांपुढे सुभाषचंद्र बोसांचा आदर्श होता. आँग सानची स्वातंत्र्य लढ्यात राजकीय हत्या झाली. तो ब्रह्मदेशचा 'राष्ट्रपिता' बनला. त्याच्या पश्चात त्याची पत्नी दॉ खिन की त्याची वारस बनली. ब्रह्मदेश सन १९४८ मध्ये स्वतंत्र झाल्यावर दॉ खिन की भारतातली ब्रह्मदेशची राजदूत बनली. जेव्हा ती आपल्या मुला-मुलींसह भारतात आली तेव्हा आँग सान स्यू की पण तिच्याबरोबर होती. नवऱ्याच्या मृत्यूनंतर दॉ खिन की आँग सान स्यूची घडण आपली वारस म्हणून केल्याने ब्रह्मदेशच्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या लोकशाही विरुद्ध लष्करशाही, हुकूमशाहीच्या संघर्षात आँग सान स्यू की केंद्र राहिली.

 आयुष्यातील ऐन उमेदीची पंधरा वर्षे नजरबंद स्थानबद्धतेतच आयुष्य कंठणारी आँग सान स्यू ची म्हणून 'राजबंदिनी'. लोकशाही स्थापना व खरे स्वातंत्र्य मिळावे म्हणून सर्वाधिक वर्षे स्थानबद्धतेत काढणारी कार्यकर्ती म्हणून जगाने तिला शांततेचे सन १९९१ चे नोबेल पारितोषिक देऊन सन्मान केला. पण ने विन या हुकूमशाहाच्या निर्दयी निर्णयामुळे तो तिला स्वीकारता आला नाही. अशा अनेक हृदयद्रावक घटनांनी भरलेले आँग सान की चे 'राजबंदिनी' शीर्षक चरित्र लिहिले आहे प्रभा नवांगूळ यांनी. ते चरित्र त्यांनी ज्या कष्टाने, प्रयत्नाने लिहिले, ते वाचले तरी आपले नाते लेखिकेशी जुळून जाते. या चरित्रात आणखी एक चरित्र दडलेले आहे. ते म्हणजे आँग सान स्यू चीने आपल्या वडिलांचे राष्ट्रपिता आँग सानचे लिहिलेले चरित्र. या दोन्ही लेखिकात एक समान दुवा म्हणजे चरित्र नायक! नायिकेचे जीवन, कष्ट, ध्येय वाचकांपर्यंत पोहोचावे म्हणून घेतलेले कष्ट व साहित्याप्रती बांधिलकी त्यामुळे सहज वाचायला मिळणाऱ्या चरित्रांमागचा इतिहासही लक्षात येतो.

 'राजबंदिनी' चरित्र केवळ आँग सान स्यू कीचे नव्हे. खरे तर हे चरित्र लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवाधिकाराच्या संघर्षाची गाथा आहे. लोकशाही स्थापनेसाठी लोक अनेकदा मतदान करत राहतात. प्रत्येक वेळी जनता नियुक्त सरकार पदच्युत केले जाते व लष्कर प्रमुख राष्ट्र प्रमुख होतो. प्रत्येक लष्करशहा पहिल्यापेक्षा आपण श्रेष्ठ कसे हे सिद्ध करण्यासाठी अनेक तैमूर निर्णय घेतो व त्वरेने अमलात आणतो. उदाहरणेच सांगायची झाली तर - साठेबाजांना अक्कल घडवायची म्हणून पूर्वसूचना न देता शंभर व पाचशेच्या नोटा रद्द करणे, मतदानात 'होय', 'नाही' मत देण्याची सक्ती करणे, नऊ क्रमांकांनी भाग जातील अशा नोटा चलनात ठेवून बाकी रद्द करणे, विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी मोर्चा पुलावर थांबवून दोन्ही बाजूने गोळीबार करणे, लोकांना संशयावरून स्थानबद्ध करणे (पोर्टर), 'बाँबशोधक' म्हणून नवीन भरती केलेल्या सैनिकांचा वापर करणे (म्हणजे बाँब पेरलेल्या रस्त्यांवर चालायला भाग पाडून त्यांचा बळी घेणे), सुमारे दोन लाख ब्रह्मींचे थायलंडमध्ये स्थलांतर, स्त्रियांचा जगण्यासाठी एड्सचा स्वीकार व मरण. हे कमी म्हणून की काय स्यू कीची आलेली खासगी पत्रे (पती-पत्नी पत्रव्यवहार) वृत्तपत्रात छापून हेतूपूर्वक बदनामी करणे इ.

 खरं सांगू, हे पुस्तक वाचवत नाही इतक्या अत्याचारांनी भरून ओसंडत

वाचावे असे काही/६९
राहतं. ते श्वास रोखून वाचायला लागतं. वाचताना आपल्याला मायग्रेन

होतो का अशी भीती. हे चरित्र म्हणजे लोकशाही, स्वातंत्र्य, अहिंसा, शांती, मानवाधिकाराची मागणी करणाऱ्या एका देशाची शोकात्म कथा आहे. ती वाचत असताना लक्षात येतं की ज्या देशात मुलं लहानपणीच बंदूक घेऊन आपल्या आई-बहिणींचे प्राण, इज्जत वाचावी म्हणून लढायला लागतात तिथे बालपण नुसतं कोमेजलेले नसते, ते हरवलेले असते. दूध न मिळणारा आपला शेजारी देश. आपण मात्र आपल्या दुधावर घट्ट साय का येत नाही म्हणून दुःखी! एक गोकुळ दुधाविना मरणारं नि दुसरं दुधाच्या महापुरात वाहून चाललेलं! तरी दुःखीच.

◼◼


फिजीद्वीप में मेरे २१ वर्ष - तोताराम सनाढ्य प्रकाशक - बनारसीदास चमुर्वेदी, ज्ञानपुर, बनारस प्रकाशन - हिंदी समय अ‍ॅट कॉम प्रकाशन- १९७२ पृ. २४०, मूल्य रु. ४५०/-


फिजीद्वीप में मेरे 21 वर्ष

 परवा मी हिंदीचा जागतिक इतिहास लिहायचा म्हणून संदर्भ गोळा करत होतो. तेव्हा माझ्या लक्षात एक महत्वाची गोष्ट आली ती म्हणजे आपली हिंदी भाषा विदेशात कुणी लेखक, भाषांतरकार, ख्रिश्चन मिशनरींनी नाही नेली. ती नेली एका वेठबिगार गुलामाने. त्याचे नाव आहे तोताराम सनाढ्य. तोताराम अवघे तिसरी शिकलेले पण शहाणपण उपजतच त्यांच्यात होतं. लहानपणीच वडील वारल्यामुळे निर्धन आई सांभाळ करायची. मोठा भाऊ पोट पोटासाठी कलकत्याला गेलेला. आपल्याकडे चाकरमाने मुंबईला जातात, तसा तो गेलेला. हातपाय हालवायचे म्हणून तोताराम प्रयागला गेले. रस्त्यावर हा गृहस्थ वेडापिसा फिरतो असं हेरलं नि एका माणसाने त्याला काम द्यायचं आमिष दाखवून आपल्या घरी नेलं. तिथं एका खोलीत त्याच्यासारखी चांगली शंभर एक माणसं कोंबून नि कोंडून ठेवलेली दिसली. त्यात पुरुष होते तसे, स्त्रियाही होत्या. तोताराम त्यापैकीच एक झाला. तोतारामला कामाचं आमिष दाखवणारा तो माणूस होता दलाल. तो अशी गरीब, गांजलेली माणसं शोधायचा नि इंग्रजांना गुलाम म्हणून विकायचा. ही गोष्ट १९०४ मधली. तोताराम यांना फिजी बेटावर पाठवण्यात आले, ते वेठबिगार मजूर म्हणून तिथे ते २१ वर्षे राहिले. पहिली पाच वर्षे वेठबिगार नंतर अंगावर घेऊन शेती करू लागले. तिथे त्यांनी गुलामगिरी प्रथा निर्मूलनाचे कार्य केले. निरक्षर असलेल्या तोताराम सनाढ्य यांनी आपली रामकहाणी सतत १५ दिवस हिंदीतील सुविख्यात लेखक बनारसीदास चतुर्वेदी यांना सुनावली. त्यांनी ती शब्दबद्ध करून प्रकाशित केली. ते हिंदीतील विदेशात जीवन कंठलेल्या भारतीय माणसांचं पहिलं आत्मकथन. त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. ते पुस्तक 'भारत गौरव' गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लोकनायक जयप्रकाश नारायण (तेव्हा ते तरुण होते!) यांच्या वाचनात आले. ते पुस्तक गुलाम, वेठबिगार म्हणून मॉरिशस, फिजी, दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद, मलेशिया इत्यादी देशांत गेलेल्या भारतीय बांधवांवरील इंग्रज अत्याचारांची गाथा म्हणून जगभर प्रसिद्ध झाले. त्यातून राष्ट्रीय काँग्रेसने गुलामगिरी प्रथा निर्मूलनाची मागणी केली व इंग्रजांना वेठबिगार मजूर पाठवण्यास बंदी घालण्यात आली. त्या पुस्तकाचे नाव आहे, "फिजीद्वीप में मेरे २१ वर्ष'. अनेक वृत्तपत्र, मासिकांनी त्या वेळी या पुस्तकावर अग्रलेख लिहून इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध रान उठवले व रणशिंगही फुकले ते हे पुस्तक!

 भारतातून वेठबिगार विदेशी जाण्याची प्रथा तशी जुनीच आहे. ती सोळाव्या शतकापासून दिसून येते. असे वेठबिगार पहिल्यांदा भारताबाहेर गेले ते मद्रास बंदरातून. ते तमिळ होते. अशा जाणाऱ्या वेठबिगारांना 'कुली' म्हणून ओळखलं जायचं. तमिळ भाषेत कुली शब्दाचा अर्थ आहे मजुरी. मजुरीवर जाणारे ते मजूर. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापार सुरू केला सुरतमध्ये वखार स्थापून. ते वर्ष होते इ. स. १६१२. पण वास्को द गामा भारतात आल्यापासून म्हणजे सन १४९९ पासून हे सुरू झालं. विसाव्या शतकाच्या प्रारंभी औद्योगिकीकरणाला गती आली. कमी श्रमात अधिक उत्पादन मिळण्याचे क्षेत्र म्हणून ब्रिटिशांनी शेतीकडे पाहिले. वसाहती मोफत मिळविल्या तसे त्यांना मजूरही मोफत मिळाले. गुलाम विक्री प्रथा बंद झाली सन १८०६ मध्ये. मग ब्रिटिशांनी नामी युक्ती शोधून काढली. भारतातल्या तुरुंगातले कैदी त्यांनी हक्काचे गुलाम म्हणून वापरायला सुरुवात केली. सन १८१५ ते १८२० या पाच वर्षांत ब्रिटिशांनी असे २५००० कैदी मॉरिशसमध्ये नेले. हा त्यांच्या लेखी बिनभांडवली उत्पन्न मिळविण्याचा 'दिव्य प्रयोग' (ग्रेट एक्सपरीमेंट) होता. गुलाम प्रथा निर्मूलनाचा कायदा सन १८३३ मध्ये मंजूर झाल्यावर इंग्रजांनी करारबद्ध मजुरी पद्धत सुरू केली. गरीब नाडलेल्या माणसांना करारात बांधून घेऊन ते विदेशात घेऊन

वाचावे असे काही/७२
जात. अशा वेठबिगारांना गुलाम म्हणून कसे वागवले जायचे याची दर्दभरी

कहाणी म्हणजे हे पुस्तक.

 तोताराम सनाढ्य यांना रोज १२ आणे मजुरीवर फिजी बेटावर नेण्यात आले. बोटीतच त्यांच्या लक्षात आले की इथे 'सब घोडे बारा टक्के'. तो काळ अस्पृश्यता पालनाचा होता. बोटीत चांभार, कोळी, ब्राह्मण, मुसलमान, स्त्री-पुरुष सर्व समान. प्रत्येकाला बोटीत दीड बाय सहाची जागा आखून देण्यात आली. उठणे, बसणे, झोपणे त्यातच. शिवाशिव अनिवार्य. तोताराम होते ब्राह्मण. शिव शिव म्हणत बसले. तेवढ्यात बोटीचा अधिकारी आला. त्याने कामे वाटून दिली. स्वच्छता, भांडी धुणे, स्वयंपाक, भंगी काम - तो सांगेल त्याने ते काम करणे सक्तीचे. न करणाऱ्याला वेताच्या छडीने फोकलून काढलं जायचं. एखादा बलदंड मजूर जास्तच वाद करू लागला की सरळ त्याला समुद्रात टाकलं जायचं. बोटीचा प्रवास तीन-चार महिन्यांचा असायचा. काहींना बोट लागायची. काही उलट्या, जुलाबाने हैराण व्हायचे. मरायचे पण, त्यांना पोतं टाकावं अशी निर्दय, निष्ठुरपणे जलसमाधी मिळायची.

 फिजीत उतरल्यावर त्यांना शेतीचे काम देण्यात आले. प्रत्येकाने १२०० ते १३०० फूट लांब व ६ फूट रुंद चर दिवसभरात खोदणं सक्तीचे होते. त्याला 'फुलटास्क' म्हणजे नेमून/खंडून दिलेले काम मानले जायचे. त्याची मजुरी बारा आणे. काम पूर्ण नाही केले तर १० शिलिंग ते १ पौंड दंड असायचा. म्हणजे ४ आण्याची कोंबडी आणि १२ आण्याचा मसाला. भीक नको पण कुत्रं आवर अशी स्थिती. कुत्र्यावरून आठवले. मजुरांना चहा बरोबर दोन बिस्किटे असत. गोरे अधिकारी आपल्या कुत्र्यांना जी बिस्किटे द्यायचे तीच भारतीय मजुरांना मिळे. भारतातून जे मजूर जात त्यात स्त्री-पुरुष प्रमाण ठरलेलं असायचं. प्रत्येक १०० पुरुषांमागे ३३ स्त्रियांची भरती करून देणे दलालांवर बंधनकारक होते. पुरुष व स्त्रिया सड्या असायच्या. म्हणजे नवरा-बायको मिळून नेणे नसायचे. पुरुषात स्त्रियांचा अधिकार समान, म्हणजे कोणी एक पुरुष एका स्त्रीस पत्नीसारखा वागू लागेल तर त्याचा खून ठरलेला. काम करून घ्यायला ठेकेदार गोरे मुकादम नेमत. ते गोरेच असत. त्यांना ओव्हरसियर म्हटलं जायचं. स्त्रियांना काम, सवलती, दंड, शिक्षा सारा त्याचा अधिकार. जी स्त्री त्याचे ऐकत नसे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला जाई. अशा स्त्रिया आत्महत्या करीत. या पुस्तकातील कुंती, नारायणी, ललिया, इस्माईल यांच्या कथा अंगावर

वाचावे असे काही/७३
शहारे आणतात.

 या गुलाम, काळ्या, वेठबिगारांना तक्रार करायचा अधिकार होता. पण न्यायालयात कधीच कोण्या गोऱ्या अधिकाऱ्याला शिक्षा झाल्याची नोंद नाही. वकील, न्यायाधीश, पोलीस, साक्षीदार; सारे गोरे असत. अपराधी फक्त काळा. तीन पुरुष वा स्त्रियांना १२ फूट बाय ८ फुटाची बरॅक राहायला दिली जाई. त्यात जात, धर्म, वय काही पाहिले जायचे नाही. सारा व्यवहार त्यांना दिलेल्या नंबरावर चालत असे. ठेकेदाराकडून आठवड्याचे राशन पोटी दर दिवशी १० छटाक पीठ, २ छटाक तूरडाळ, अर्धा छटाक तूप या प्रमाणात दिले जाई. आठवड्याचे राशन चार दिवसात संपत असे. मग उसनवारी करून जगायचे. म्हणजे मिळणाऱ्या मजुरीत कपात व्हायची. घरी चार पैसे पाठवण्याचे स्वप्न घेऊन आलेला मजूर रिकाम्या हातानीच घरी जायचा. त्याची फसवणूक दोन्ही बाजूने व्हायची. तिकडे हे अत्याचार. तर इकडे स्वदेशी, स्वगृही आल्यावर त्याला समाज बाटलेला मानून अस्पृश्य करायचा. हा वेठबिगार 'धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का' व्हायचा.

 फिजीद्वीप में मेरे २१ वर्ष' हे तोताराम सनाढ्य यांचे अवघे ३० पानांचे आत्मचरित्र आहे. ते www.hindisamay.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ते तोताराम सनाढ्य यांनी पदरमोड करून प्रकाशित केले. भारतीय गुलामांवरील अत्याचाराविरुद्ध जनजागरण करायचे म्हणून कुंभमेळा, काँग्रेस अधिवेशने यांमधून मोफत वाटले. त्यामुळे भारतीय काँग्रेसने ठराव करून वेठबिगारिवर बंदी आणली. जे मजूर मॉरिशस, फिजी, त्रिनिदाद, सुरिनाम, दक्षिण आफ्रिकेत राहिले त्यांच्या त्या बलिदानाचे सार्थक म्हणजे त्यांची उत्तराधिकारी पिढी आज त्या देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती झाले आहेत. असे जगात असंख्य देश आहेत. महात्मा गांधींनी सुरू केलेली स्वातंत्र्य चळवळ खरे तर याच गुलामीविरुद्ध होती.

◼◼


विस्मृतिचित्रे - डॉ. अरुणा ढेरे श्रीविद्या प्रकाशन, पुणे प्रकाशन - १९९८ पृ. ४२८ किंमत - रु. ३००/-



विस्मृतिचित्रे

 ज्यांना कुणाला महाराष्ट्रातील स्त्री विकासाचा पट आणि आलेख समजून घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी चांगला वाचन पाठ ठरेल असे पुस्तक आहे "विस्मृतिचित्रे'. ते लिहिलंय डॉ. अरुणा ढेरे यांनी. या पुस्तकाचा आणि कोल्हापूरचा ऋणानुबंध आहे. कारण या चरित्र संग्रहात संस्थानकाळातील पहिल्या 'फिमेल ट्रेनिंग कॉलेज' च्या पहिल्या लेडी सुपरिंटेंडेंट श्रीमती रखमाबाई केळवकर यांच्या विकासाचे चित्र आहे. नंतर त्यांची कन्या डॉ. कृष्णाबाई केळवकर या कोल्हापूर संस्थानच्या पहिल्या 'लेडी सर्जन' झाल्या आणि कोल्हापुरात स्त्री रोग चिकित्सा विभाग सुरू झाला त्यांची धडपड समजून घेता येते. त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या सहाध्यायी. फर्ग्युसन महाविद्यालय, पुणेच्या पहिल्या विद्यार्थिनी. 'सुधारक'कार गोपाळ गणेश आगरकर त्या वेळी फर्ग्युसन कॉलेज, पुणेचे प्राचार्य होते. त्यांनी कृष्णाबाई केळवकरांना कॉलेजात प्रवेश दिला म्हणून लोकमान्य टिळकांनी 'केसरी'तून गहजब केला होता. गंमत म्हणजे फर्ग्युसन कॉलेजातील कृष्णाबाईंच्या वर्गात त्यांच्यासाठी चिकाचा पडदा टाकण्यात आला होता. या पुस्तकात आणखी एक हृद्य चरित्र आहे ते म्हणजे आपल्या इंदुमती राणीसाहेबांचे. राजर्षी छ. शाहू महाराज स्त्री शिक्षण व विकासाचे समर्थक कसे होते, त्यासाठी त्यांना काय काय सोसावं लागलं ते समग्रपणे मुळातूनच वाचायला हवे. इंदुमती राणीसाहेब या प्रिन्स शिवाजी महाराजांच्या पत्नी. राजर्षी शाहू महाराजांनी वधु परीक्षा कशी, कुठे, कधी घेतली हे वाचणे म्हणजे काळ समजून घेणे. आपल्या सुनेस सुपुत्राच्या अकाली निधनाने अकल्पित वैधव्य आल्याचे राजर्षी शाहू महाराजांचे दुःख नि नंतर आपल्या निधनापर्यंत त्यांनी इंदुमती राणीसाहेबांच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट नि प्रयत्न पाहिले की शाहू महाराजांची स्त्री शिक्षण व विकासाची दृष्टी काळाच्या किती पुढे होती ते लक्षात येते, आणि त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित होतो.

 हे पुस्तक अनेक अर्थाने वाचनीय आहे. एकतर यात "विस्मृतिचित्रांचा पार्श्वपट' म्हणून जी पन्नास पानांची प्रस्तावना आहे, ती महाराष्ट्राच्या स्त्री शिक्षणाचा विकास' सांगणारी आहे. ही प्रस्तावना म्हणजे छोटा शोध प्रबंधच होय. यात ब्रिटिश व एतद्देशीय स्त्री-पुरुषांनी स्त्री शिक्षण विकास संदर्भात वेळोवेळी कशी पावले उचलली ते विस्ताराने समजून येते. स्त्री- पुरुष दोघांनी समानपणे हे प्रकरण वाचायला हवे. ते अशासाठी की स्त्री- पुरुष समानतेची वाट त्यातून सुकर होईल. हे पुस्तक केवळ वरील तीन चरित्रांसाठी वाचायला हवे असे नाही तर स्त्री शिक्षण विकासाच्या वाटेवर ज्या विकासोन्मुख स्त्रियांनी आपल्या धडपडीच्या पाऊलखुणा उठवल्या अशा एकूण २० स्त्री चरित्रांचा त्यात समावेश आहे.

 पैकी मेरी कार्पेटर आणि रेबेका सिमियन यांची धडपड वाचली की लक्षात येते की विदेशी असून या विदुषींना येथील स्त्रिया शिकाव्यात म्हणून किती तळमळ होती. मेरी कापेंटर यांनी वंचित बालकांसाठी, त्यांच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी ऐतिहासिक कार्य केले होते. तसेच कार्य त्या भारतात करू इच्छित होत्या. त्यासाठी त्या चारदा भारतात आल्या. हा काळ साधारण १८६६ ते १८७० चा. अहमदाबाद, सुरत, मुंबई, पुणे अशा चार ठिकाणी त्यांनी स्त्री शिक्षण चळवळ सुरू केली. लोकहितवादी गोपाळराव देशमुख यांचे त्यांना साहाय्य लाभले. मेरी कार्पेटर यांनी आपल्या देशात मुलींसाठी नॉर्मल स्कूल सुरू केली. अनाथाश्रमांना भेटी दिल्या. डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूलप्रमाणे मुलींसाठी उद्योगशाळा सुरू करण्याची कल्पना मेरी कार्पेटर यांची. इंग्लंडप्रमाणे त्यांनी इथे सोशल सायन्स असोसिएशन सुरू करून समाजसेवा शिक्षण सुरू केले. तिने भारतीय स्त्री शिक्षणाचा आराखडा भारतमंत्र्यांना सादर केला होता. भारतीय स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्याचे कार्य रेबेका सिमियननी केले. आज भारतात हजारो स्त्रिया

वाचावे असे काही/७६
डॉक्टर्स आहेत. तो पाया घातला रेबेका सिस्टरनी.

 याशिवाय या पुस्तकात आपणास एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्ध व पूर्वार्धातील अनेक कर्तृत्वशाली महाराष्ट्र भगिनी भेटतात. त्यात भेटतात आवडाबाई भिडे. अवघं १९ वर्षांचं आयुष्य (१८६९ ते १८८८). हायस्कूल फॉर नेटिव्ह गर्ल्स म्हणजे एतद्देशीय मुलींची शाळा. आत्ताची हुजूरपागा शाळा. या शाळेची ती पहिली विद्यार्थिनी. विधवा असून शाळेत जाणारी मुलगी म्हणजे त्या वेळच्या समाज जीवनातील आठवे आश्चर्य! सरलादेवी राय मूळच्या बंगाली. पण मुंबईत महिला शिक्षण कार्य प्रार्थना समाजाच्या मदतीने केले. त्यांचे ऐतिहासिक कार्य म्हणजे स्त्रिया शिक्षणासाठी बाहेर पडायला पडदा पद्धतीमुळे तयार नसत. तर यांनी 'अंतःपुर शिक्षण' सुरू केले. म्हणजे स्त्रिला तिच्या शयनकक्षात (बेडरूम) जाऊन शिकवायचं. असं त्यांनी मुस्लीम स्त्रियांनापण लिहितं, वाचतं, बोलतं केलं. गोपाळ कृष्ण गोखले तत्कालीन उदार सुधारक. त्यांनाही तुम्ही जानवे घालता म्हणून पारंपरिक म्हणणाऱ्या सरला राय. दुसऱ्या दिवशी क्षमापत्रासह गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपले जानवे पाकिटात घालवून पाठवून दिले. अशा कितीतरी ऐतिहासिक घटनांनी हे पुस्तक खचाखच भरलेले आहे.

 मी लहानपणी पंढरपूरच्या वासुदेव बाबाजी नवरंगे बालकाश्रमात होतो. आश्रमाच्या व्हरांड्यात वा. बा. नवरंगे, द्वारकानाथ वैद्य, डॉ. काशीबाई नवरंगे, श्रीमती लक्ष्मीबाई वैद्य यांची तैलचित्रे टांगलेली होती. ती पहातच मी मोठा झालो. त्यातील डॉ. काशीबाई नवरंगे व लक्ष्मीबाई वैद्य मला या पुस्तकात भेटल्या. त्यांचे कार्य वाचून माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी की माझी जन्मदात्री कोण असेल ती असो पण अनाथ मुले, मुली, महिला, सनाथ, स्वावलंबी व्हाव्या म्हणून या दोघींनी केलेले प्रयत्न वाचून वाटले की याच आपल्या खऱ्या आई होत... 'ओल्ड मदर्स'. पूर्वपिढीत आयांना वापरला जाणारा हा शब्द मोठा कृतज्ञता सूचक आहे. त्यात आजी, पणजी, खापरपणजीची सारी महामाया भरलेली आहे.

 महाराष्ट्रातील स्त्री विकासासंदर्भात पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल विपुल लिहिलं गेलं आहे. पण इतिहासाने अनुल्लेखाने ज्यांची उपेक्षा केली, दुर्लक्ष केले अशा स्त्री चरित्रांवर प्रकाश टाकण्याच्या हेतूने हे पुस्तक लिहिले गेले असल्याने ते 'स्त्री शिक्षण व विकासाचा अनुल्लेखित इतिहास' असे त्याचे स्वरूप होऊन गेले आहे. योगायोगाने इंदुमती राणीसाहेब कोल्हापूर

वाचावे असे काही/७७
संस्थानच्या स्नुषा झाल्या. जून १९१७ मध्ये मी बरोबर शंभर वर्षांनी स्मरण

म्हणून या ओळी लिहीत आहे. माझ्या लक्षात येते की महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, छत्रपती शाहू महाराज या सर्वांनी स्त्री शिक्षण व विकासाचे कार्य केले त्याच्या कितीतरी आधी ब्रिटिश समाज सुधारक स्त्री-पुरुष अधिकारी व समाजसुधारकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत येथील समाजमन पुरोगामी, सुधारणावादी व्हावे म्हणून केलेली मशागत, कायदे, संस्था, प्रयत्न आपण उदाहरणे समजून घ्यायला हवे याची जाण हे पुस्तक निर्माण करते. शिवाय हे पुस्तक माहीत नसलेल्या कितीतरी हृदयस्पर्शी प्रसंगांचे साधार संदर्भ पुरविते म्हणूनही महत्त्वाचे. डॉ. कृष्णाबाई केळवकर आपल्या जीवनसाथी व्हाव्यात म्हणून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची तगमग, आपल्या सुनेला शिकवितात म्हणून स्वगृही राजर्षी शाहू महाराजांची उपेक्षा, स्त्री शिकते म्हणून पुरुषांचे दुखावलेले अहंकार वाचले की लक्षात येतं आजपण पुरुषांनी समाज जीवनात अतिरिक्त स्त्री दाक्षिण्य दाखवायलाच हवे, तरच स्त्री-पुरुष समानता शक्य.

◼◼


आणि मग एक दिवस - नसिरुद्दीन शहा. भाषांतर - सई परांजपे पॉप्युलर प्रकाशन, मुंबई प्रकाशन - २०१६ पृ. २९० किंमत - रु. ६५०/-



आणि मग एक दिवस

 भारतीय स्वातंत्र्यानंतर लगेच जन्मलेली पिढी सन १९७० नंतर वयात आली होती, तेव्हा भारतीय सिनेमा देमार, मनोरंजनापलीकडे जाऊन काही गंभीर प्रयोग करू लागला होता. सत्यजित रे, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सत्यदेव दुबे, विजय तेंडुलकर प्रभृती मान्यवर नाटक, सिनेमा, साहित्य क्षेत्रात नवनवे प्रयोग करत होती. 'समांतर सिनेमा' नावाने ओळखल्या जाणाऱ्या नव्या प्रवाहाने 'अंकुर', 'निशांत', 'आक्रोश', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?', 'मिर्च मसाला', 'मंडी', 'जुनून', 'अर्धसत्य','कथा', 'गोलमाल' असे हटके सिनेमा बनवून प्रेक्षक अभिरुची संपन्न केली होती. मी पिढीचा समांतर साक्षीदार असल्याने माझ्या मुलांना मी 'निशांत','अंकुर' अशी नावं दिली होती. 'हम दो, हमारे दो' चा प्रभाव नसता तर मी भूमिकेलाही जन्म दिला असता. या काळात गिरीश कर्नाड, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आझमी, स्मिता पाटील, फारुख शेख, सईद मिर्झा, अमोल पालेकर आमची दैवतं होती. यात चरित्र अभिनेता म्हणून नसीरुद्दीन शाहचा अभिनय मनावर कायमचे शिलालेख खोदायचा. अलीकडेत्याची इंग्रजी आत्मकथा प्रसिद्ध झाली आहे. 'अँड देन वन डे' तिचं नाव.ती मराठीतही नुकतीच प्रकाशित झाली आहे. 'आणि मग एक दिवस'या शीर्षकाने, भाषांतर केले आहे प्रख्यात नाटककार सई परांजपे यांनी. हल्ली मराठी प्रकाशने अनुवादगृहे झालीत. त्याबरोबर मराठीत लेखकांपेक्षा अनुवादक अधिक होऊ लागलेत. ते सर्व व्यावसायिक भाषांतरे करीत असताना साहित्यिक कृतीचे भाषांतर किती समरसून करायचे असते याचा वस्तुपाठ सई परांजपे यांनी. या अनुवादाद्वारे पेश केला आहे.

 आत्मकथा उघडं सत्य असायला हवी. ती आत्मस्तुती मुक्त हवी. तिचा नायक लेखक स्वतः असला, तरी आसपासची पात्रं तितकीच महत्त्वाची. ती उत्कृष्ट आत्मटीका असेल तर उत्तम. गुणांबरोबर दोष चर्चा अनिवार्य. माणसाचं आयुष्य जखमांनी भरलेलं असतं तसं त्यात वसंत वर्षावही असतो. माणसाचं जगणं म्हणजे एक संघर्ष गाथाच असते. प्रत्येकाचं जगणं एक आत्मकथाच. पण ती तुम्ही अभिनय, गायन, चित्रकलेच्या तन्मयतेने लिहाल तर तीपण एक कलात्मक कृती होऊ शकते. याचं सुंदर उदाहरण म्हणून 'आणि मग एक दिवस' या आत्मकथेकडे पहावं लागेल. 'सांगत्ये ऐका' नंतरचं हे चंदेरी दुनियेतलं वाचनीय आत्मकथन. त्याला अनुकरणीय मात्र नाही म्हणता येणार.

 नसिरुद्दीन शाह यांचा जन्म सन १९४९-५० चा. ते उत्तर प्रदेशातल्या बाराबंकीमध्ये जन्मले. वडील ब्रिटिश सेवेत होते. नंतर भारतीय प्रशासनात. बदल्या ठरलेल्या. पूर्वज १८५७ च्या लढ्यात ब्रिटिशांच्या बाजूचे होते. स्वातंत्र्यानंतरच्या फाळणीनंतर वडिलांचं कुटुंब दुभंगलं. दोन भाऊ पाकिस्तानात गेले. नसिरुद्दीन शाहांच्या आई-वडिलांनी आले महम्मदशाह व फारूख सुलतान यांनी आपल्या तीन मुलांसह काही जमीन, जायदाद नसताना भारतात राहायचं ठरवलं. ते मुलांना वाढवून मोठे करायचे म्हणून. नसिरुद्दीन प्रख्यात अभिनेते झाले तर मोठा भाऊ झमीर भारतीय सेनेचा उपप्रमुख तर दुसरा झहीर आयआयटी. झमीर शाह पुढे अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरूही झाले. नसिरुद्दीन शाह पदभूषण, फिल्मफेअर, संगीत नाटक अकादमी, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाले.

 ज्या आई-वडिलांची मुलं परीक्षेत नापास होतात, त्यांच्यासाठी नसिरुद्दीन शाहचं जीवन आशा किरण ठरावं. त्यांच्या भाषेत सांगायचं तर 'पन्नास मुलांच्या वर्गात सतत पन्नासावा नंबर असायचा'. औपचारिक शिक्षणात रस नसलेल्या नसिरुद्दीनला जीवनात मात्र गोडी होती. नाटक वाचणे, सिनेमा पाहणे, माणसं निरखणे, नकला करणे त्याचे छंद. पण त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून दिग्दर्शन, अभिनयाचे धडे व पदवी घेतली. पुढे नॅशनल फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून त्यांनी सिनेमा अभिनयात पदवी

वाचावे असे काही/८०

संपादन केली पण तत्पूर्वीच ते 'निशांत' मधून चरित्र अभिनेते बनून पुढे आले होते.

 हिंदी चित्रपट सृष्टीवर अभिनयाची मोहर उठवत ते हॉलिवूडमध्ये 'जेम्स बाँड' फेम सीन कॉनेरी बरोबर पण झळकले. पैसा नसेल मिळवला पण प्रसिद्धी भरपूर! कारण त्यांची निवडक चित्रपटात काम करण्याची शैली. एकावेळी एक चित्रपट अशी शिस्त. भूमिका घेऊन जगायचं हा शिरस्ता. एकमात्र खरे की नटाचे पायपण मातीचेच असतात. व्यवसायाच्या गरजा असतात तसे अभिशापपण. चंदेरी दुनिया म्हणजे तारांगणच ते पृथ्वीतलावरचं. पृथ्वीवरचा हा स्वर्ग रंभा, अप्सरा, मेनका, कुबेर, रती इ. वेढलेला. तिथे विश्वामित्री तपस्या तडीस जाणे कठीण. म्हणून नटांचा विश्वामित्री पवित्रापण ठरलेला. इथे नल-दमयंती आख्यान असते तसे दुष्यंत-शकुंतलेची शोकांतिकापण, नसिरुद्दीन शाह संसारात रमले नसले तरी निभावला खरा. परवीनचा संसार अल्पकालीन तर रत्नाचा कडेला नेणारा. मधेमधे 'आर' नावाची प्रेयसी डोकावत राहते.

 'आणि मग एक दिवस' आत्मकथा सिनेमासारखी नाट्यपूर्ण प्रसंगांनी ठासून भरलेली आहे. त्यातील अमली पदार्थांचं सेवन, वेश्यागमन प्रसंग सोडले तर उर्वरित कथा म्हणजे 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असेच. जी तरुण मुलं, मुली नाटक, चित्रपटात जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी जागा करणारा हा धोक्याचा कंदीलच. चित्रपटसृष्टीतील जीवघेणी स्पर्धा, अहोरात्र मेहनत, लॉटरीची अशाश्वता, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा अशा तिन्ही अंगांनी ठरलेली. एक जग समजावणारं आत्मकथन म्हणून वाचनीय.

 हे आत्मकथन भाषांतराचा साहित्यिक नजराणा. सई परांजपेंची इंग्रजी, मराठीवर सारखी हुकमत असल्याने हे शक्य झालं. रुटुखुटु, किडुकमिडुक, लक्ष्यबिंदू, प्रकाशवाणी, दुखावलेलं दुर्लक्ष, असावे सादर, वायफळाचा मळा असा शब्द, वाक्प्रचार, म्हणींनी हा अनुवाद समृद्ध मराठीचा ऐवज बनला आहे. हे वाचताना लक्षात येत राहतं की मराठीत सक्षम, चपखल शब्द असताना आपण इंग्रजाळलेले असल्याचे प्रदर्शन करण्यासाठी उगीचच इंग्रजी शब्दांची पेरणी करत राहून पिकात तणकट वाढवत मराठी विद्रूप, प्रदूषित करीत राहतो. 'आवाजाचा शोध', 'माझं स्थान - एक शोध', 'भरत वाक्य' हे शेवटचे तीन अध्याय म्हणजे या आत्मकथेचा गाभा, गर्भ म्हणून अंतर्मुख करणारा नि कलात्मकही झालाय. आत्मालोचन, विहंगमावलोकन

म्हणून महत्त्वाचा. पण यात आत्मप्रशंसेचा लवलेश मिळेल तर शपथ!


विल्यम शेक्सपिअर : जीवन आणि साहित्य के. रं. शिरवाडकर राजहंस प्रकाशन, पुणे प्रकाशन - २०१७ पृ. २१६ किंमत - रु. ३३०/-



विल्यम शेक्सपिअर : जीवन आणि साहित्य

 तुम्ही म्हणाल, हा काय शिळ्या कढीला ऊत आणताय. पण तुम्हाला सांगेन, ही खेप 'पहिल्या धारेची' आहे. शेक्सपिअर हे असं रसायन आहे की त्याला शिळी कढी म्हणणे म्हणजे आपल्या साहित्य आस्वादाला ओहोटी लागणे. काही साहित्यिक नि साहित्य कृती अशा असतात की त्यांना 'सदाबहार' शिवाय दुसरा शब्दच वापरता येत नाही. गतवर्ष २०१६ हे जगभर विल्यम शेक्सपिअरचे चारशेवे स्मृतिवर्ष म्हणून साजरे झाले. मराठीत शेक्सपिअरची नाटके आली अठराशे सत्तावन्नच्या बंडात. हा प्रवास आजही अखंड आहे. कुसुमाग्रजांचे धाकटे बंधू के. रं. शिरवाडकर इंग्रजीचे प्राध्यापक होते. अनेक वर्षे आपल्या विद्यार्थ्यांना शेक्सपिअरची नाटके शिकवत राहिले. पण समाधान मिळत नव्हते. अजून आपणास कळलेला शेक्सपिअर पूर्ण सांगू शकलो नाही याची खंत म्हणून त्यांनी सन १९७६ मध्ये 'विल्यम शेक्सपिअर : जीवन आणि साहित्य' ग्रंथ लिहिला. त्याला पु. ल. देशपांडेंची आस्वादक प्रस्तावना आहे. शेक्सपिअरच्या ४०० व्या स्मृतिवर्षानिमित्त या ग्रंथाची 'राजहंस' आवृत्ती दोन - तीन महिन्यापूर्वी हाती पडली. बऱ्याच नव्या गोष्टींची भर यात आहे. त्या सांगाव्यात म्हणून हा शब्दप्रपंच!  पहिली गोष्ट अशी की शेक्सपिअर समजून घ्यायला हे चांगलं पुस्तक आहे. लेखकाने नव्या, विशेष आवृत्तीच्या निमित्ताने पुस्ती जोडली आहे. त्यामुळे शेक्सपिअर समकालाशी जोडला गेला आहे. ज्यांना शेक्सपिअरच्या जीवन व साहित्यात जिज्ञासा आहे, त्यांची तृप्ती करण्याचं सामर्थ्य या ग्रंथात आहे. शेक्सपिअरची सारी नाट्ययात्रा हे पुस्तक आपणास घडवते. याला नव्या विशेष आवृत्तीचा भाग म्हणून माधव वझेंनी 'एलिझाबेथन रंगभूमी आणि नंतर' नावाने जोडलेला लेख वाचकांना नाटकांच्या नव्या दुनियेत नेतो. वाचताना वाटत राहतं की आपण नवं जग पाहात आहोत. शिवाय यात कृष्णधवल आणि रंगीत छायाचित्रे आहेत. ज्यांनी या नाटकांवरचे चित्रपट किंवा नाटके पाहिली असतील त्याचं या पुस्तकामुळे छान स्मरणरंजन होते. परिशिष्टातील नाटक व कवितांच्या सूचीमुळे नव्या वाचकांना पुस्तके शोधून मिळवून वाचणे सोपे होते. शेक्सपिअरकालीन घटना, प्रसंग, परंपरा इ. बद्दल यातली माहिती वाचत वाचक शेक्सपिअरच्या काळात केव्हा जातो ते त्याचे त्याला कळत नाही.

 विल्यम शेक्सपिअरचा काळ म्हणजे सोळावे-सतरावे शतक. त्यापूर्वी युरोपात ग्रीक रंगभूमीवर धार्मिक नाटके होत. रोमन रंगभूमी तशी मुक्त होती. या मुक्ततेतून ती अश्लील होत गेल्याने इ. स. ६०० ते १००० पर्यंत नाटकांवर बंदी होती. नंतर नाटकातील प्रसार क्षमता लक्षात घेऊन धर्म प्रसारार्थ ती उठवण्यात आली. चौदाव्या शतकात धर्मातील चमत्कारांचा विरोध करणारे निबंध लिहिले गेले. त्यातून साहित्य, नाटक, कला धर्म व राजसत्तेच्या जोखडातून मुक्त झाले व ते लोकांचे नि लोकांसाठी झाले. पूर्वी ते राजे, अमीर, उमरावांसाठी खेळले जायचे. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात राजा आठवा हेनरीने कलाविष्कार मुक्त ठरविला, तर त्या शतकाच्या उत्तरार्धात राणी पहिली एलिझाबेथने त्याचा पाठपुरावा केला.

 पूर्वी नाटके शाळा, विद्यापीठात होत. पण जनतेचं नाटक म्हणून ते चक्क खाणावळीतच होत असे. खाणावळीत का तर तिथे प्रवासी, व्यापारी, सैनिक, निरोपे येत, जात, उतरत, राहात, जेवत, झोपत. धर्मशाळाच म्हणा ना! शेक्सपिअरच्या काळातच नाटकासाठी स्वतंत्र गृह (थिएटर) सुरू झालं. नाटक दोन तासाचं. पण येण्याजाण्याला दोन-दोन तास घालवावे लागायचे. लोक घोड्यावरून नाटक पाहायला यायचे. नाटकात लक्ष लागावं म्हणून घोडे सांभाळायला मुले ठेवली जायची. प्रेक्षक व नट यांच्यात दरी नव्हती. नटाने पात्रावर तलवारीने हल्ला केला की प्रेक्षक वाचवायला

वाचावे असे काही/८३

जायचे. नाटकगृहात सजावट, चित्रे नव्हती. पडदे होते पण एकरंगी. नट म्हणायचा, चला डोंगरावर जाऊ. सर्व प्रेक्षक डोंगरावर पोहोचायचे (कल्पनेने). नाटक म्हणजे पाठांतर परीक्षा. जो नट अनेक नाटके एकाच वेळी लक्षात ठेवायचा त्याला मागणी. एकच नट एकाच वेळी अनेक भूमिका करायचे. नाटक सुरू असताना खाणे, पिणे, फळे, दूध विकणे सारे चालायचे. पूर्वी नाटकात काम करायला स्त्रियांना बंदी होती. पुरुष स्त्री भूमिका करीत. स्त्रियांनी स्त्री भूमिका करायला सुरुवात केल्यानंतर नाटक जीवन झाले. पुढे नाटकात संगीत आले नि जान आली.

 शेक्सपिअरची ऐतिहासिक नाटके इतिहासकारांचे आधार ठरली, उदाहरणार्थ हेन्रीवरील नाटके. शेक्सपिअरच्या शोकांतिकांनी माणसास जगण्याचं शहाणपण शिकवलं. 'रोमिओ अ‍ॅण्ड ज्यूलिएट' नी प्रेमास स्वातंत्र्य मिळवून दिले. 'ज्युलियस सिझर'नी मैत्रीचे नवे पदर अधोरेखित केले. शेक्सपिअरची नाटके म्हणजे शोकांतिका असा ग्रह करून देणारी नाटके म्हणजे 'हॅम्लेट', 'ऑथेल्लो', 'मॅक्बेथ', "किंग लियर' इ. नाटकांइतक्याच त्यांच्या कविता, सुनीतेही अमर आहेत. जगातल्या सगळ्या भाषांत शेक्सपिअरची नाटके, कविता भाषांतरित झालेल्या आहेत.

 या पुस्तकात के. रं. शिरवाडकर यांनी शेक्सपिअरला पूर्ण न्याय दिला नाही. पु. ल. देशपांडे यांच्या भाषेत सांगायचे तर, 'कुठेही कणसुरा नाही की चढसुरा शिवाय तो एकसुराही नाही.' मुळात पु. लं. नी हे मात्र शेक्सपिअरच्या पात्रांसंदर्भात म्हटलं असलं तरी ते या पुस्तकासही चपखल लागू पडतं. शेक्सपिअर मात्र परीक्षेचा अभ्यास म्हणून वाचून चालत नाही. सन १९६५-७० च्या दरम्यान मी मौनी विद्यापीठात शिकत होतो. वीज पण नवलाई असल्याचा तो काळ! त्या काळात शेक्सपिअर, बर्नार्ड शॉ, चार्लस् डिकन्स, एच. जी. वेल्स यांची नाटके, कथा, कादंबऱ्या आमच्या अभ्यासक्रमात होत्या. आमचे शिक्षक सकाळी वर्गात हे सारे चवीने शिकवत नि रात्री त्यांचे सिनेमे दाखवत. 'ज्युलिअस सिझर', 'रोमिओ अ‍ॅण्ड ज्युलिएट', 'इन व्हिजिबल मॅन', 'टेल ऑफ टू सिरीज' पाहिल्याचे आठवते. ऐकणं, वाचणं, पाहणं अशा त्रिमितीतून जो शेक्सपिअर वाचकांच्याजवळ येतो, त्याचं एक वैशिष्ट्यं असतं की तो वाचक शेक्सपिअर होऊन जातो. कार्लाईल जे म्हणाला होता ते अगदी खरं आहे की 'ब्रिटिश साम्राज्य आणि शेक्सपिअर' यातील एक गोष्ट सोडा, असे जर कुणी इंग्लिश माणसाला म्हटले; तर तो साम्राज्य सोडण्यास राजी होईल, पण शेक्सपिअर सोडणार नाही.' असा

वाचावे असे काही/८४

प्रश्न कुणी त्यातल्या शेक्सपिअरच्या जागी भारतीय साहित्यिकाचे नाव टाकायचे ठरवून विचारायचे ठरवले तर कुणाचे नाव टाकता येईल?

◼◼


फाँस - संजीव वाणी प्रकाशन, दरियागंज, नई दिल्ली - २ प्रकाशन - २०१५, पृष्ठे - २५५ किंमत - रु. ३९५/-



फाँस

 महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या ही मराठी साहित्यात अपवादाने प्रतिबिंबित झाली. मात्र या समस्येस साहित्याद्वारे राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे कार्य मात्र केले संजीव यांनी. संजीव हे हिंदी कथाकार, कादंबरीकार म्हणून प्रख्यात आहेत. ते प्रेमचंदांनी स्थापन केलेल्या 'हंस' मासिकाचे काही काळ संपादकही होते. त्यांनी विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांना केंद्रित करून 'फाँस' नावाची कादंबरी दोनेक वर्षांपूर्वी प्रकाशित केली आहे. ती हिंदीत असली, तरी महाराष्ट्रावर आधारित असल्याने मराठी वाचक तिच्याकडे आकर्षित न झाला तरच आश्चर्य!

 विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातलं बनगाव हे एक खेडं. शिबू, शकून, छोटी, बडी असं चौकोनी दलित शेतकरी कुटुंब. पोटापुरती शेती पण पुरेनाशी झाली. पिकपालट, दुबारपेरणी सारे प्रयोग करूनही कर्जाची तोंडमिळवणी काही होत नसलेलं ते त्रस्त, ओढग्रस्त, कर्जबाजारी कुटुंब. तरी पोरींनी शिकावं म्हणून धडपड. छोटी मुलगी कलावती युवक महोत्सवाच्या निमित्ताने पाच दिवस मेंडालेखाला राहते. तरणीताठी पोर पाच रात्री बाहेर घालवते म्हणून गावात गहजब होतो. त्याचं खरं कारण असतं तिचं अशोक नावाच्या सवर्णाच्या प्रेमात पडलेलं असणं. शिबू या सर्व विरोधात हुंडा न देऊ शकणारा मुलीचा बाप. आपली अख्खी शेती हंड्यापोटी द्यायला तयार होतो तरी नकार. कारण शेती घेऊन काय आत्महत्या करायची? निराश शिबू शिकून हिंदू धर्माच्या रूढी, परंपरा, अडचणींपुढे हात टेकून बौद्ध धर्म स्वीकारतात. तरी दैन्य सरत नाही म्हणून शिबू कंटाळून आत्महत्या करतो. नंतर निराश शकून शेती विकून आपल्याच शेतीत मजूर म्हणून कापूस वेचू लागते.

 परिसरातले अनेक शेतकरी अनेक कारणांनी आत्महत्या करतात पण मूळ असतं शेती फायद्यात नसणं. मोहन वाघमारे, नाना बापटराव, शंकरराव, सुनील, विजयेंद्र अशा अनेकांच्या कथांनी कादंबरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदनांची महागाथा बनून पुढे येते. रामजी दादा खोब्रागडे. दलित पण प्रगतीशील, प्रयोगशील शेतकरी. कृषी पंडित म्हणून शासन त्यांचा गौरव करते ते त्यांनी शोधून काढलेल्या एचएमटी सोना या बियाणामुळे. ते दलित नसते तर राष्ट्रीय स्तरावर गेले असते. शासन त्यांना जे सुवर्ण पदक प्रदान करतं ते खोब्रागडे प्रतिकूल परिस्थितीत विकायला जातात, तर नकली असल्याचं लक्षात येतं. ही असते शासनाची शेतकऱ्यांविषयीची आस्था व तळमळ. कृषी मंत्र्यांना कृषीपेक्षा क्रिकेटमध्ये अधिक रस. मोहनराव वाघमारे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते. तुरुंगवास नि पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाऊन लुळेपांगळे होतात पण पोटच्या मुलास मात्र नोकरी नाही देऊ शकत. नोकरीसाठी लाच, वशिला इथलं वास्तव. मुलाच्या लेखी बाप कसा? तर 'एक हमारा बाप है, झिंदाबाद, मुर्दाबाद करते खुद मुर्दा बना है।' हे असतं इथल्या शेतकरी संघटनेच्या खऱ्या कार्यकर्त्यांचं जीवन. विदर्भातला शेतकरी रात्रीत श्रीमंत व्हायचं म्हणून बीटी कॉटन पेरतो अन होतो फकीर! शेतकऱ्यांचे गोठे कधी काळी गाय, म्हैस, बैलजोडीने भरलेले असायचे, तिथे आज दिसतो एकमात्र रेडा। बैलगाडीची जागा ट्रॅक्टरने घेतली, कंदिलाची जागा विजेने घेतली तरी शेती तोट्यातच.

 खेड्याचं दुसरं एक वास्तव आहेच. विवाह, जत्रा, जुगार, तमाशाच्या नादी लागलेला निराश, हताश शेतकरी. पण बंडी, खिशात मोबाईल्सचा रिंगटोन 'काँटा लगाऽऽ', 'चोली के पीछे क्या है?' चा नाद लावत डान्स बार, ढाबा आणि बरंच काही. पण हे अपवाद. खरा शेतकरी दुभतं जनावर दारी असून सर्व दूध 'गोकुळ' ला. पण घरचं गोकुळ दुधाविना कुपोषित. सातबारा एकाचा पण कोरा मिळेल तर शपथ! एक कर्ज भागवायला दुसरं कर्ज! का नाही शेतकरी आत्महत्या करणार? शेतमजुराला कोरडवाहू शेती

वाचावे असे काही/८७

कारण तो दलित. सवर्णांच्या हाती बागायती, डेअरी, सोसायटी, कारखाने, गिरण्या, बँका. सबसिडी त्याला... मजूर शेतकऱ्याला कायम सापशिडी! विजयेंद्रसारखा तरुण या परिस्थितीतही बदलासाठी 'मंथन' संस्था काढतो. शेतकऱ्याची हलाखी संपवण्याचे हरएक प्रयत्न करतो. पण पैसा मोठा, माणूस छोटा झालेल्या जगात त्याचं स्वप्न हवेत विरतं. पण वाचकाला एकच वाटत राहतं, 'सूरत बदलनी चाहिए।' असा आशावाद, आत्मविश्वास जागवणारी ही कादंबरी!

 या कादंबरीचा मराठी अनुवाद व्हायला हवा. ही कादंबरी प्रत्येक वाडी, वस्ती, बांधावर पोहोचायला हवी. कारण ती शेतकऱ्यांचे केवळ दैन्य, दुःख, आत्महत्या, निराशा चित्रित करीत नाही. खरं चित्र सांगत नवा आशावाद जागवते, सांगते. शेती पोट भरण्याचे साधन असेल तर परंपरेतून तिची सुटका करायला हवी. व्यवसाय म्हणून तिच्याकडे पाहायला हवं. खेड्याची जीवनशैली काटकसरी व्हायला हवी. शेतकरी व्यसनमुक्त हवा. जंगलावर शेतकऱ्याचा अधिकार हवा. 'जल, जंगल, जमीन पर सर्वाधिकारी किसान'. बाजारभाव बांधून हवेत. असं झालं तरच आत्महत्येचा फास ढिला पडेल. अन्यथा, तो रोज आवळत जाऊन आत्महत्येचा फास सगळ्या भारताला विळखा घालेल. आज तो फक्त महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगढपर्यंतच आहे. आधीच उशीर झालाय. अधिक उशीर म्हणजे कृषिप्रधान भारताचं दफन! संजीव यांनी हे सर्व विलक्षण तळमळीनं मांडलंय. उत्तर प्रदेशातला हा लेखक. त्याच्या डोळ्यांत अश्रू मात्र महाराष्ट्राचे. आश्चर्य वाटते या परकाया प्रवेशाचे नि आत्मीयतेचे!

◼◼


शब्द - जाँ-पॉल सार्त्र. अनुवाद - वा. द. दिवेकर पद्मगंधा प्रकाशन, माडीवाले कॉलनी, पुणे - ४११०३० प्रकाशन -१९९९ पृ. २०० किंमत - १३५/-



शब्द

 फ्रेंच साहित्यिक व तत्त्वज्ञानी म्हणून जाँ-पॉल सार्त्र जगभर प्रसिद्ध आहेत. अस्तित्ववादी चिंतक असलेल्या सार्त्र यांचे जीवन व साहित्य अनेक अंगांनी क्रांतिकारी मानले जाते. ते किती टोकाचे क्रांतिकारी होते याचे एकच उदाहरण मी सांगेन. ते साठी पूर्ण करत असताना साहित्याचा निरोप घेण्याचे ठरवून त्यांनी 'शब्द' नावाचे आत्मचरित्र लिहिले सन १९६३ मध्ये अन् त्यांना सन १९६४ चा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी तो नाकारला, ते हे सांगून की 'पुरस्कारामुळे माझे साहित्य श्रेष्ठ ठरू शकत नाही. वाचकच माझे खरे निर्णायक होत.' सन १९०१ ला नोबेल पुरस्कार सुरू झाला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र, शांती आणि साहित्य अशा सहा क्षेत्रांतील जागतिक श्रेष्ठत्वासाठी हा पुरस्कार प्रतिवर्षी दिला जातो. आजवर तो ५७९ जणांना दिला गेला. पैकी साहित्याला १०९ वेळा दिला गेला. नाकारणारे एकमेव साहित्यिक म्हणजे जॉ-पॉल सार्त्र होय.

 बालपणावर आधारित जगात जी श्रेष्ठ आत्मचरित्रे मानली जातात, त्यात सार्त्रच्या 'शब्द'चा अंतर्भाव होतो. बुकर टी. वॉशिंग्टनचे 'अप फ्रॉम स्लेव्हरी', 'द डायरी ऑफ अ‍ॅना फ्रँक', माया एंजेलोचे 'आय नो व्हाय द केज बर्ड सिंग्ज', देव पेल्झरचे ‘ए चाइल्ड कॉल्ड 'इट' आणि मॅक्झिम गॉर्कीचे 'माय चाइल्डहुड' ही आत्मचरित्रे 'शब्द' इतकीच वाचनीय आहेत. सार्त्रने हे आत्मचरित्र अनेक वर्षे खपून लिहिलं. यात वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंतचे बालपण आहे. सार्त्रचा जन्म सन १९०५ चा. त्याचे वडील सार्त्रच्या जन्मानंतर लगेच वारले. आई अ‍ॅना मारीने त्याचा सांभाळ केला. आईचं माहेर म्हणजे श्वाइट्झर घराणं. या घराण्याला धर्मोपदेशकांची मोठी परंपरा. सार्त्र हा जगविख्यात समाजसेवी अल्बर्ट श्वाइटझरच्याच घराण्यातला. घरी वडील, आजोबांची मोठी ग्रंथसंपदा. ग्रंथ वाचतच सार्त्रचं बालपण सरलं खरं, पण पोरकेपणात नि एकटेपणात. पुस्तकांनी सार्त्रला जगाचा परिचय करून दिला. सार्त्रचे शिक्षण पॅरिसमध्ये झाले. एकोल नॉर्मल सुपेरियर या नामवंत शिक्षण संस्थेत तो शिकला. (मी पॅरिसमध्ये असताना सार्त्रसाठीच तिला भेट दिल्याचं आठवतं!) येथूनच तो पदवीधर झाला. इथेच त्याची मैत्री सिमॉन द बोव्हारशी झाली. तिच्याबरोबर तो आयुष्यभर लग्न न करताही एकनिष्ठ व एकत्र राहिला. 'लिव्ह इन रिलेशनशिप' या दोघांमुळे जगभर मान्य झाली. सिमॉन द बोव्हार प्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार होती. त्यांचा 'द सेकंड सेक्स' हा ग्रंथ जगभर गाजला. त्या ग्रंथाने स्त्रीला जगभर समानता मिळवून दिली.

 'शब्द' आत्मचरित्राचे दोन भाग आहेत - (१) वाचन (२) लेखन, सार्त्रच्या म्हणण्यानुसार आपण लहानपणी जे वाचतो, त्याचा अर्थबोध होत नसतो. पण आकर्षण नक्कीच निर्माण होते. त्या आकर्षणातून नंतर जे वाचत राहतो, ते कळत राहते. लेखनही असेच दोन प्रकारचे असते. एक सहेतुक लिहिलेले व दुसरे असते मुक्त. मुक्त वाचनाप्रमाणे मुक्त लेखन श्रेष्ठ, सार्त्रनी यात लिहिलंय की वयाच्या चौदाव्या वर्षांपर्यंत मी वाचन, लेखनाशी खेळत राहिलो. नंतर माझा शब्द खेळ गंभीर जसा झाला तसा तो सुंदर होत गेला. सार्त्रना लेखनाने, शब्दांनी आत्मभान दिले. शालेय वयात सार्त्र हा उपेक्षित, वंचित बालकाचे जीवन जगला. उपेक्षेने त्याला एकांत दिला. तो सर्वसाधारण बुद्धीचा मुलगा. घरी पोरका म्हणून दुर्लक्षित तर शाळेत सामान्य बुद्धीचा म्हणून उपेक्षित. दोन्ही वंचनांमध्ये त्याने आपला मिळालेला अवकाश वाचन, विचाराने भरून काढला व प्रौढपणी त्याचे रूपांतर लेखनात केले. मानसशास्त्र, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात सार्त्रनी लेखन करून गरीब, वंचितांबद्दल जगात कणव निर्माण केली. 'अस्तित्ववाद आणि मानवतावाद' (१९४६) हे त्याचे गाजलेले पुस्तक. सार्त्रने कादंबरी, नाटक,

वाचावे असे काही/९०

चरित्र अशा सर्व प्रकारचे लेखन केले. फ्लॉबेर, हायडेगर यांच्या विचाराने तो भारावलेला होता.

 सार्त्रने प्रत्येक वेळी नवा विचार मांडला. नोबेल नाकारताना त्यांनी अनेक प्रश्न जगापुढे उपस्थित केले - निवड करणारे निवड केल्या जाणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ असतात का? निवडलेले साहित्य कोणत्या आधारे श्रेष्ठ मानायचे? नंतर पुढच्या वर्षी ज्याला पुरस्कार दिला जातो ते पहिल्यापेक्षा श्रेष्ठ समजायचा का? निवडलेल्याच वर्षी साहित्य अथवा साहित्यकार श्रेष्ठ कसा ठरतो? निवडलेल्या वर्षांपूर्वीचे त्याचे साहित्य हीन समजायचे का? पुरस्काराच्या निमित्ताने व्यवस्था, रचना, कृती, व्यक्ती, विचार, प्रकार अशा कोणत्याच प्रकारची उतरंड सार्त्रला मान्य नव्हती. म्हणून त्याने आयुष्यभरात एकही पुरस्कार स्वीकारला नाही, म्हणूनही सार्त्र श्रेष्ठ ठरतो. 'शब्द' हा मूळ फ्रेंच 'ले मो' चे मराठी भाषांतर होय. ते फ्रेंच भाषेचे जाणकार वा. द. दिवेकर यांनी अभ्यासू वृत्तीने केले आहे. त्यांनी माधव कोंडविलकरांच्या 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' या गाजलेल्या मराठी आत्मकथेचा फ्रेंचमध्ये अनुवाद केला आहे. शब्द आत्मकथा प्रामुख्याने बालपणावर भाष्य करणारी साहित्यकृती म्हणून महत्त्वाची मानली जाते. हे आत्मचरित्र बालपण अधोरेखित करते. माणसाचे बालपण खरे तर बालकाच्या विचार, भावना, कल्पनांना वाव देणारे हवे. प्रत्यक्षात मात्र ते वडील माणसांच्या नियंत्रणाखाली असते. त्यामुळे मोठी माणसं मुलास वैरी, राक्षस वाटू लागतात. आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांना सुखाने जगू न दिल्याचे शल्य सार्त्रनी या आत्मचरित्रात व्यक्त केले आहे. शिवाय आपल्या आईलापण आजोबा उपकृत म्हणून जगवत याचेही सार्त्रना वाईट वाटे. त्या काळात माहेरची माणसं आपली मुलगी कुमारी माता होऊन घरी राहण्यापेक्षा विधवा म्हणून राहणे सुखावह मानत. सार्त्र मात्र या विचारांशी असहमती व्यक्त करतो. तो दोन्ही स्थितीत स्त्रीविषयक करुणा व सहानुभूतीचा व्यापक मानवतावादी विचार स्वीकारतो. कुठल्याच पोरक्या मुलाला पालकांनी वा समाजाने सुबक केसाळ कुत्र्याप्रमाणे चूऽऽ चू ऽऽ करत गोंजारण्यापेक्षा त्याला मुक्त श्वास घेऊ द्यायला हवा, ते सार्त्रनी स्वानुभवातून ज्या परखडपणे मांडले आहे, त्यातून त्यांचे स्वतंत्र अस्तित्ववादी विचार व्यक्त होतात. वस्तू आणि माणसातला मुख्य फरक स्वातंत्र्य व विकास होय. खुर्ची, टेबल, पुस्तक, घंटेसारखा मनुष्य निर्जीव व अस्तित्वहीन असत नाही. फक्त माणसासच काय ते असते. माणूस स्वतः आयुष्य घडवत आपले

वाचावे असे काही/९१

स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतो. त्यासाठी स्वातंत्र्य गरजेचे असते. स्वातंत्र्य त्याचा जन्मसिद्ध अधिकार असतो. ते द्यायची गोष्ट नसून मिळवायची गोष्ट होय. निवडीचे स्वातंत्र्य जबाबदारी घेऊन जन्मते. त्यामुळे निर्णय, कृतीची जबाबदारी ज्याची त्याची असते. जगात ना ईश्वर आहे, ना नियती. आहे ती फक्त कृती व जबाबदारी. माणूस आपल्या जगण्याला अर्थ निर्माण करेल तर त्याचे जीवन सार्थकी लागले समजायचे.

◼◼


जीवन-दर्शन - खलील जिब्रान भाषांतर - रघुनाथ गणेश जोशी प्रकाशन - सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला, १२, टिळक रोड, पुणे - २, प्रकाशन - १९४१ पृष्ठे - ७०, किंमत - १ रु. १२ आणे.



जीवन दर्शन

 मला जर कुणी तुमचे आवडते पुस्तक कोणते? असा प्रश्न केला तर क्षणाचाही विचार न करता उत्तर देईन, खलील जिब्रानचे 'दि प्रोफेट'. मुळात इंग्रजीत लिहिलेले हे महाकाव्य. काव्यात्मक गद्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून 'प्रोफेट ला ओळखले जाते. जगातील ४० भाषांत प्रॉफेट भाषांतरित झाले आहे. मराठीत प्रोफेटची चार भाषांतरे झाली आहेत. र. ग. जोशीकृत 'जीवनदर्शन' हे त्यापैकी एक होय. सार्वकालिक अभिजात साहित्यात प्रोफेटची गणना केली जाते. यात २६ गद्यात्मक कविता आहेत. हे पुस्तक जीवन व मानवसंबंधांवर भाष्य करते. महाप्रस्थान, प्रेम, विवाह, श्रम, बालके, घर, वस्त्र, कायदा, स्वातंत्र्य, मैत्री, अध्यापन, साधुता, सुख, प्रार्थना, धर्म, मृत्यू इत्यादी विषयांवर या गद्यकाव्यात भाष्य केले आहे. जीवनातल्या कोणत्याही प्रसंगी मार्गदर्शन करणारे हे पुस्तक. प्रत्येक वेळी या कविता आपणास नवा अर्थ समजावतात. या पुस्तकाचे सारे सौंदर्य त्याच्या साधेपणात आहे. जगातील सोप्या भाषेतलं महाकाव्य म्हणून त्याचा लौकिक आहे. सर्वसामान्य माणसाला एका शब्दासाठीपण हे काव्य आवडत नाही.

 या काव्याचा कवी खलील जिब्रान हा शेक्सपिअर, लाओत्सेनंतर जगभर वाचला जाणारा, माहीत असलेला साहित्यिक, कवी, चित्रकार, कथाकार, तत्त्वज्ञ म्हणून जगभर तो ओळखला जातो. त्याचा जन्म सन १८८३ चा. सिरियातील लेबॉनन टेकड्यात वसलेला बिशरीं गावी जो जन्मला. बैरूतच्या 'मदरसतुल हिकमत' मध्ये त्याचे शिक्षण झाले. त्याचे सर्व शिक्षण अरबीमध्ये झाले. त्यामुळे त्याचे प्रारंभिक लेखन अरबी भाषेत आढळते. अमेरिकेला गेल्यावर तो इंग्रजी शिकला. उत्तर काळात त्यांनी इंग्रजीत लेखन केले. १९०१ ते १९०३ मध्ये पॅरिसमध्ये राहून चित्रकलेचे शिक्षण घेतले. त्याच्या सर्व पुस्तकात त्याची स्वतःची चित्रे आहेत. मानवी चित्रे अधिकांश नग्न आढळतात, पण ती अश्लील नसतात. लेखनाइतकीच खलील जिब्रानची चित्रे विचारगर्भ मानली जातात. तो स्वतःला राजकारणी मानत नसे. परंतु त्याच्या विचारांची दखल सर्वत्र घेतली जायची. तो सर्व जगास आपली मातृभूमी मानायचा. विश्वबंधुत्व वृत्तीमुळे त्याचे साहित्य सार्वकालिक मानवी उन्नतीचे प्रेरणा गीत मानले गेले. न्यूयॉर्कमध्ये असलेली त्याची समाधी आंतरराष्ट्रीय स्मारक मानली जाते. त्याच्या जन्मगावी उभारण्यात आलेले वस्तुसंग्रहालय प्रेक्षणीय आहे.

 'प्रोफेट' हे संवाद शैलीत लिहिलेले महाकाव्य आहे. ते काव्य असले, तरी गद्यमय आहे. एखाद्या गोष्टीचे पुस्तक वाचतो तसे ते वाचता येते. या काव्यातील नायक अल्-मुस्तफा हा एक प्रवासी आहे. तो आपले गाव सोडून ऑरफॉलीझच्या समुद्रकिनाऱ्यावर उतरून बारा वर्षे उलटली तरी त्याला आपल्या मायदेशी घेऊन जाणारे जहाज भेटत नाही. 'ने मजसी ने परत मातृभूमीला' अशी तळमळ असताना तपभरानंतर तो आज परतणार असतो, पण तपभराच्या वास्तव्यात ऑरफॉलीझवासी व अल्-मुस्तफा यांच्यात जिवाभावाचे नाते निर्माण झाले असते. त्याचे एकमेव कारण असे की तो गावकऱ्यांना आपल्या जगप्रवासाच्या अनुभवावरून ज्या जीवाभावाच्या गोष्टी सांगायचा त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य व्हायचे. जीवन सुसह्य करणारे समुपदेशक काव्य म्हणून वाचणाऱ्या प्रत्येकास जे हवं ते देते म्हणून सर्व जग ते सुमारे शतकभर वाचत आले आहे.

 खलील जिब्रानने 'प्रोफेट' मध्ये प्रेमाविषयी समजावताना म्हटले आहे, 'तुम्हाला कुणाकडून, कुठून प्रेम मिळत असेल तर त्याचे मागे नक्की जा. पण लक्षात असू द्या, प्रेमाचा मार्ग नेहमीच बिकट राहिला आहे. प्रेमाच्या मागे जाणे म्हणजे सुळावरची पोळी. प्रेम पंख पसरेल तर आरूढ व्हा. त्याच्या पंखात लपलेली तलवार तुम्हास जखमी करेल. त्या जखमेवरपण विश्वास ठेवा. ती तुम्हाला खूप शिकवत राहील.' अशा शिकवणीने हे

वाचावे असे काही/९४

काव्य ओसंडून वाहते. ब्रह्मवादिनी अलमित्रा अल-मुस्तफाला लग्नाविषयी सांगण्याचा आग्रह करते तेव्हा तो सांगतो, 'पती-पत्नी एकमेकांसाठीच जन्मलेले असतात. मृत्यूच्या शुभ्र पंखांनी त्यांची ताटातूट होते. मग निःशब्द आठवणी उर्वरित आयुष्यात छळत राहतात म्हणून लग्नानंतरच्या सहत्वातही सुरक्षित अंतर ठेवून जगता आलं पाहिजे. पती-पत्नीने एकमेकांवर प्रेम जरूर करावं, पण ते प्रेम एकमेकांच्या पायातल्या बेड्या बनता नये. लग्न झाल्यावर आपणास मुलं होतात. खलील जिब्रान म्हणतो, तुम्ही मुले जन्माला घालता हे खरे आहे पण ती तुमची नसतात. ती स्वातंत्र्य घेऊन जन्माला आलेली असतात. तुम्ही धनुष्य आहात, तर ते बाण आहेत. तुम्ही बाणास गती देऊ शकता पण लक्षात असू द्या, बाण दिशा स्वतः ठरवत असतो. तुम्ही त्यांच्या शरीरासाठी घर द्या, पण त्यांचा आत्मा नि श्वास मुक्त ठेवा. त्यांना सर्व काही द्या. फक्त त्यांना तुमची स्वप्ने नि विचार मात्र देऊ नका. कारण ती मुले स्वतःची स्वप्ने आणि विचार घेऊन जन्मलेली असतात.

 'प्रोफेट' मध्ये खलील जिब्रान यांनी जीवनातल्या अनेक अंगांना स्पर्श करत आपले विचार मांडले आहेत. एका लक्ष्मीपुत्राने दानाविषयी सांगा म्हटल्यावर जिब्रान म्हणतो, 'दानाबद्दल नेहमीच 'सत्पात्र' शब्द येत असतो. गरज हीच दानाची खरी सत्पात्र कसोटी.' हर्ष आणि शोक हे मानवी जीवनाचे स्थायीभाव होते. त्याबद्दल या काव्यात जिब्रान म्हणतो, 'ज्या विहिरीतून तुमचे हास्य उत्स्फूर्त होत असते, तीच विहीर पुष्कळदा तुमच्या अणूंनी भरून गेलेली असते. घराचे स्वरूप त्यात तुम्ही काय साठवून ठेवले आहे, यावर ते अवलंबून असते. घराचे घट्ट लावून ठेवलेले दरवाजे कशाचे रक्षण करत आहेत? त्याचे हात रेशमाचे असले, तरी हृदय लोखंडाचे असते. माणूस लज्जारक्षणासाठी वस्त्रे परिधान करू लागला. जिब्रान बजावतो, 'तुमची वस्त्रे तुमचे पुष्कळसे सौंदर्य लपवून ठेवतात, तथापि तुमची कुरुपता मात्र ते लपवून ठेवीत नाहीत.' चित्रकार म्हणून खलील जिब्रान यांनी माणसाची, स्त्री-पुरुषांची नग्न चित्रे रेखाटली त्यामागे मात्र तो नग्नतेसच मूळ सौंदर्य मानायचा म्हणून. शिवाय निसर्ग श्रेष्ठत्व तो कलेचं खरं प्रतिमान मानायचा म्हणूनही! या काव्यात सुंदरता, प्रार्थना, विवेक, वासना, स्वातंत्र्य यावरील काव्ये म्हणजे खलील जिब्रानच्या शब्दप्रभू व विचार प्रवण साहित्यिक प्रतिभेची प्रचितीच होय.

 मराठी साहित्यात खलील जिब्रानच्या साहित्याचे वि. स. खांडेकर,

वाचावे असे काही/९५

आचार्य काका कालेलकर, त्र्यं. वि. सरदेशमुख प्रभृती मान्यवरांनी त्यांच्या अनेक कथा नि काव्यांची भाषांतरे केली आहेत. आयरिश कवी जॉर्ज रसेल यांनी 'प्रोफेट' ची तुलना 'गीतांजली'शी केली आहे. सॉक्रेटिसचे 'बँक्वेट'मध्ये एक विधान आहे, ‘आकारसौंदर्यापेक्षा विचारसौंदर्य मनाला अधिक मोहिनी घालणारे असते.' - त्याची प्रचिती ‘प्रोफेट' वाचताना येते.

◼◼


सारे रान - इंद्रजित भालेराव जनशक्ती वाचक चळवळ, समर्थनगर, औरंगाबाद ४३१००१ प्रकाशन - २०१६, पृष्ठे - ४४० किंमत - रु.५००/-



सारे रान

 शेतकवी इंद्रजित भालेराव हा कोल्हापूरने महाराष्ट्राला दिलेला नजराणा! त्यांचा पहिला कविता संग्रह 'पीकपाणी' सन १९८९ ला अनिल मेहतांनी प्रकाशित केला होता. तेव्हापासून ते आज अखेर 'आम्ही काबाडाचे धनी', 'दूर राहिला गाव', 'कुळंबिणीची कहाणी', 'गावाकडं', 'पेरा', 'टाहो', 'मुलूख माझा', 'वेचलेल्या कविता', 'भूमीचे मार्दव' या सारख्यां काव्यसंग्रहातून ज्या कविता प्रकाशित झाल्या त्या श्रीकांत उमरीकरांनी एकत्र करून प्रकाशित केल्या आहेत. 'सारे रान' या शीर्षकातून ती समग्रता सूचित होते. हे शीर्षक साने गुरुजींच्या एका कवितेच्या ओळीतलं. 'आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान। शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण।।' या ओळी स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिलेल्या. त्यापूर्वी सुमारे पन्नास एक वर्षे आधी महात्मा फुले यांनी 'शेतकऱ्याचा आसूड' मध्ये शेतकऱ्यांच्या शोषणाचे केलेले हृदयद्रावक वर्णन आढळते. गेल्या दीडशे वर्षांत अनेक समाजधुरीण, साहित्यिक, राजकारणी यांनी शेतकऱ्यांबद्दल काया, वाचा, मने प्रयत्न करूनही शेतकऱ्यांचे दैन्य काही सरत नाही. त्या साऱ्या शेतसारा, सातबारा, शेतसंस्कृती, पीक, पाणी, कर्ज, आत्महत्या साऱ्यांचं प्रतिबिंब म्हणजे 'सारे रान' मधील कविता! त्या वाचत असताना मला वाटत राहिलं की येथून पुढे पंढरीच्या वारीसाठी जाणाऱ्या दिंड्यांतील पालखीत ज्या सकल संत गाथा असतात त्यात येथून पुढे 'सारे रान' ही 'शेतकरी गाथा' ठेवायला हवी. माझा जन्म व जीवन दोन्ही पंढरीशी जोडलेलं आहे. मी पाहात आलो आहे की पंढरपूर ही 'शेतकऱ्यांची भावभक्ती-राजधानी' होय. पेरणी व कापणीच्या उसंतीनंतर क्रमशः येणाऱ्या आषाढी, कार्तिकी वारीत पायधूळ झाडणारा शेतकरी आषाढीत पेरलेलं पदरी पडू दे म्हणून आळवणी करतो अन् कार्तिकीत पदरी पडलं, भरून पावलो म्हणून आभार मानायला येतो. या सर्व कृषी संस्कृतीचा लेखाजोखा, तपशील, हिशोब, जमाखर्च नि त्याबरोबर पाचवीला पुजलेली कर्जाची साडेसाती व निसर्गाचं लहरीपण सर्व रानवाटांच्या कहाण्यांनी ओसंडून राहणारी कविता बांधांशी वैर करणाऱ्या तरुण शेतकरी पोरा-पोरींनी वाचायला हवी तरच शेतीचं दैन्य, दारिद्रय सरेल.

 'सारे रान'ला प्रा. एकनाथ पगार यांची सुदीर्घ आस्वादक प्रस्तावना आहे. ती त्यांनी सार्थ नि सरस शब्दांत उतरून या कवितांचा भावार्थ सटीक समजावला आहे. यातील 'पीकपाणी' मधील कविता शेतकरी नि त्याचे आप्तस्वकीय यांच्या भावबंधांचे हृद्य वर्णन होय. 'नक्षत्र पेरले माये, ते क्षत्र निघाले वांझ'चा विषाद यात आहे. 'दूर राहिला गाव' म्हणजे शेत-शिवारातील उघडझाप होय. 'पेटला वणवा। जळता हे माती, हिरवीशी नाती। करपली...' चा टाहो इथे घुमतो आहे. 'पेरा'तील कविता कृषी संस्कृतीच्या पीकपालटाचा आग्रह आहे धरणारी म्हणून पुरोगामी. शेतकरी संघटनेचे नि इंद्रजित भालेराव यांचे जीवाभावाचे नाते आहे. एके काळी विदर्भ, मराठवाड्यातील प्रत्येक शेतकरी मेळावा इंद्रजित भालेरावांच्या गाण्याने सुरू व्हायचा. हजारो शेतकरी एकसुरात नि टाळ्यांच्या ठेक्यावर 'काट्या कुट्यांचा तुडवित रस्ता। माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता।' ही कविता समूहगीत म्हणून गायचे. शरद जोशींच्या भाषणांनी मेळावा संपायचा. एकदा तर शरद जोशींनी इंद्रजितच्या कविता ऐकून हंबरडा फोडला होता. 'टाहो' ला जागतिकीकरणानंतर शेतीच्या उभ्या पिकात घुसलेल्या बियाणं, भाव, सहकार, सरकार नामक रानडुकरांचा उच्छाद नि विध्वंस आहे. इथं कर्नाटक, आंध्र, पंजाब, मालवभूमी, बंगाल असा फेर धरत ही कविता शेत-शिवाराचा राष्ट्रीय पट मांडून 'आयत्या बिळावर पायतं सरण। गावाचं झालं जागतिकीकरण' असं वास्तव चित्रित करते. 'मुलूख माझा' म्हणजे मराठवाड्याचं अंतरंग चित्रण होय. यातील कवितांवर जनाई, मुक्ताई, बहिणाईची झाक-झापड दिसते. 'वेचलेल्या

वाचावे असे काही/९८

कविता'त तुकोबा, आई भेटते. वाचक हळवा होऊन जातो. 'कुळंबिणीची कहाणी' दीर्घ कविता तर इथं छोट्या चणीच्या कविता भेटतात. अल्पाक्षरी कविता म्हणून हिचं लमाण सौंदर्य, बिलोरीपण कोण नाकारेल? यमक, अनुप्रासाची खाण म्हणूनही त्या वेचलेल्या ठरतात. 'अखिल निळे। निखळ तळे। बघून चळे। मन माझे।' अशी चाळवणारी ही कविता. 'भूमीचे मार्दव' म्हणजे कुळंबिणीचीच कहाणी. पण इथं लेकी, सुनांचं हिंदोळ्यावरील अल्लडपण, पहिलं न्हाण, लेकीबाळीच्या साऱ्या खेळीमिळी इथं हसतात, रुसतात. बापा, भावाचा घोर इथं नि नवऱ्याचा, दिराचा झोका-झुलवाही इथं अनुभवायला मिळतो, म्हणूनही या कवितेचं नाव 'सारे रान'.

 या साऱ्या रानात तुम्हाला पिके, प्राणी, पक्षी, माती, पाणी, अवजारं, कीटकनाशकं, बियाणं, शेत-शिवाराचं सौंदर्य, अरिष्ट, आत्महत्या, सण, वारी, चैतन्य, दैन्य, भाव, भक्ती सारं मिळून एक कृषिवल संस्कृतीचं गुणगुणतं गाणं ऐकायला मिळतं नि जगण्याची कुणकुण नि शेतकऱ्यांशी निसर्ग व व्यवस्थेने बांधून ठेवलेल्या कुरबुरी. इथली सारी शब्दकळा शेत- शिवारातून जन्मलेली. मेड, भेरी, घरोटं, मीरोग, ढव्ह, बिनगी असे नवे शब्द विदर्भ, मराठवाडी. त्यांचे अर्थ परिशिष्टात दिल्याने संपादकांकडून मोठे साहाय्य होते. 'मी भूमिपुत्र आणि भूमिपिताही। मीच उभा आगडोंब आणि भूमिकन्या सीताही' असं बजावणारी ही कविता शेतकऱ्यांचं सारं कुटुंब चरित्र उभे करते. इथे शेतकऱ्याविषयी कणव नाही पण हलाखीतून हक्कदार बनवण्याचा आग्रह ही कविता धरते. 'मला हवी आहे जमीन काळी काळी' ही तिची मागणी हक्कांची सनद आहे. एक माणूस दुर्बळ कमकुवत नाळाचा। एक माणूस प्रबळ हत्तीच्या बळाचा' म्हणून असलेली सामाजिक विषमता ही कविता अधोरेखित करते.

 भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या टेबलावर एक कवितेची प्लेट होती. ती कविता होती रॉबर्ट फ्रॉस्टची.

 The woods are lovely dark and deep
 but I have promises to keep
 and miles to go before I sleep.

 शेतकऱ्यांचं जीवन निसर्गानं घन, गंभीर, गर्द करून ठेवलंय. म्हणून मला त्याला त्या अभिशापासून मुक्त करायचं आश्वासन द्यायलाच हवं. ते पाळणं हजारो वर्षांचं ऋण नि प्रवास खरा! पण आज झोपण्यापूर्वी तो मला करायलाच हवा, पाळायलाच हवा!! नेहरू रोज ऑफिसमधून 

जाताना ती प्लेट न विसरता वाचून घरी जात. म्हणून त्यांचं धोरण शेतीला अग्रक्रम देणारं होतं. आणि आज सत्तर वर्षे उलटली तरी आपण त्यास आश्वासनेच देत आलोत. त्याला आश्वस्त नाही केलं, हे समजावणारी कविता आहे ‘सारे रान'.

◼◼

रवींद्रनाथ टागोर : समग्र जीवनदर्शन ग्रंथत्रयी १. भयशून्य चित्त जेथ... पृ. ४४२ किंमत - रु. ५००/- २. युगनिर्माता विश्वमानव पृ. ३४९ किंमत - रु. ७००/- ३. समग्र साहित्यदर्शन पृ. ३१० किंमत - रु. ५००/-  भाषांतरकार - डॉ. नरेंद्र जाधव  ग्रंथाली प्रकाशन, मुंबई. प्रकाशन - २०११


'रवींद्रनाथ टागोर : समग्र जीवनदर्शन ग्रंथत्रयी

 कवींद्र रवींद्रनाथ टागोर म्हणजे भारतीय साहित्याचे शिरोमणी! कवी, कथाकार, चिंतक, चित्रकार असं चतुरस्र व्यक्तिमत्त्व त्यांना लाभलं. त्यांच्या 'गीतांजली' काव्यसंग्रहास सन १९१३ चे नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांची 'काबुलीवाला' बालकथा, पण तिच्यावरही चित्रपट निघाला. ते उत्कृष्ट चित्रकार होते. किती उत्कृष्ट? तर ते कथा, कविता, पत्रे लिहिताना खाडाखोड व्हायची. त्या खाडाखोडीचं पण ते चित्रात रूपांतर करत असत. महात्मा गांधींवर धाक होता फक्त रवींद्रनाथांचाच! राखीव मतदारसंघाच्या संदर्भात महात्मा गांधींनी आमरण उपोषण पुण्यात सुरू केले होते. त्यांची प्रकृती खालावली तरी ते उपोषण सोडण्यास तयार होईनात. सारे राष्ट्र चिंताक्रांत झालेले. रवींद्रनाथांनी महात्मा गांधींना पत्रात लिहिले, (खरे तर खडसावलेच) 'सत्याग्रह, उपोषणासारखी हत्यारं आपण सर्रास वापरू लागलो की त्याचे महत्त्व राहात नाही. शिवाय नैतिकतेचा धाक आपण एकाधिकार म्हणून वापरून समाजमनाची हिंसा तर करीत नाही ना? या प्रश्नाने गांधीजींना निरुत्तर केले नि उपोषण सुटले. अशा रवींद्रनाथ टागोरांची शतकोत्तर सुवर्ण जयंती सन २०११ मध्ये सर्वत्र साजरी होत होती. त्याचे औचित्य साधून समग्र रवींद्रनाथ मराठी वाचकांपुढे रवींद्रनाथांच्या कविता, पत्रे, लेख, निबंध, विचार असं सारं अनुवादून ते विक्रमी वेळात (अवघ्या दहा महिन्यात) आणि घसघशीत १०००-१२०० पानात देण्याचे श्रद्धापूर्व कार्य केले आहे डॉ. नरेंद्र जाधव यांनी. असं सांगितलं जातं की, साने गुरुजींनी महाराष्ट्राला 'आई' दिली. तर डॉ. नरेंद्र जाधव यांनी 'बाप' दिला. 'आमचा बाप आन् आम्ही' हे त्यांचं घरोघरी वाचलं गेलेलं आत्मचरित्र.

 डॉ. नरेंद्र जाधव यांनी 'रवींद्रनाथ टागोर : समग्र साहित्य दर्शन' संच त्रिखंडात उपलब्ध करून दिला आहे. 'भयशून्य चित्त जेथ...' मध्ये रवींद्रनाथांच्या प्रातिनिधिक कवितांचे भाषांतर आहे. 'रवींद्रनाथ टागोर : युगनिर्माता विश्वमानव' या दुसऱ्या खंडात रवींद्रनाथांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा परिचय चिकित्सक पण मर्मग्राही शैली करून देण्यात आला आहे. 'रवींद्रनाथ टागोर : समग्र साहित्यदर्शन' खंडात त्यांच्या ललित व वैचारिक लेखांची भाषांतरे आहेत. त्यात लेख, भाषणे, बालगीते, कथा, कादंबरी, नाटक, प्रहसन, कविता यांपैकी निवडक अनुवाद देण्यात आले आहेत.

 'भय शून्य चित्त जेथ...' हा कविता खंड आहे. यात कवींद्र रवींद्रनाथांच्या स्वदेश, समाज, प्रेम, निसर्ग, भक्ती, मृत्यूविषयक १५१ कवितांचा अनुवाद आहे. या खंडास डॉ. नरेंद्र जाधव यांनी 'रवींद्रनाथांची काव्यप्रतिभा' शीर्षक प्रस्तावना दिली आहे. शिवाय 'रवींद्रनाथांचा राष्ट्रवाद' हा स्वदेश प्रेमविषयक कवितांचा परिचय करून देणारे टिपण आहे. अगदी प्रारंभी त्रिखंडाची समान प्रस्तावनाही आहे. या सर्वांमधून सर्वसामान्य वाचकास रवींद्रनाथ टागोर कळणे सुलभ झाले आहे. या कविता खंडातील १५१ कवितांपैकी २७ कविता 'गीतांजली'मधील असून अन्य १२४ विविध विषयांवरील प्रातिनिधिक रचना होत. या भाषांतर खंडाचे वैशिष्ट्ये म्हणजे मूळ बंगाली अथवा इंग्रजी कविता देऊन शेजारील पानावर मराठी भाषांतर दिले आहे. त्यामुळे 'हा सूर्य, हा जयद्रथ' असा साक्षात्कार घेणे वाचकास शक्य होते. यातील १५ कविता तर अशा की त्या प्रथमच मराठीत भाषांतरित झाल्या आहेत. या कविता वाचताना वाचक स्तिमित होतो. विचार करताना लक्षात येते की रवींद्रनाथांच्या कवितांमध्ये भाव, बिंब, चित्र, संगीत, छंद, नाद, ताल यांची एक सुंदर समा (चिरंतर उत्कृष्टता) निर्माण होते, त्यामागे या कवीचा 'मनुषेर धर्म' सतत जागृत असतो. कवी, गीतकार, टीकाकार, चित्रकार, चिंतक, संगीततज्ज्ञ, निबंधकार, शिक्षक, गायक, भाषाविद्, द्रष्टे रवींद्रनाथ एक होऊन अवतरतात, म्हणून तर इंग्रजी कवी वाय. बी. यिटस्ला

वाचावे असे काही/१०२

'गीतांजली' ची भुरळ पडली होती, जशी जर्मन कवी गटेला 'शाकुंतल'ची. यिटसच्या प्रशस्तीमुळेच रवींद्रनाथांना नोबेल मिळाले होते. कोल्हापुरातील रवींद्रप्रेमी दानशूर माधवप्रसाद गोयंका यांनी केलेला 'गीतांजली'चा हिंदी अनुवाद प्रसिद्ध आहे. शिवाय रवींद्रनाथांच्या जन्मशताब्दी वर्षी (१९६१) प्रा. अ. के. भागवत यांनी संपादिलेला व गाजलेला 'टागोर : साहित्य, कला, विचार' ग्रंथ कोल्हापुरातच आकारला होता.

 या त्रिखंडी भाषांतर प्रकल्पामध्ये डॉ. नरेंद्र जाधव यांचं रवींद्र आकलन समजून घ्यायचं तर दुसरा खंड 'रवींद्रनाथ टागोर : युगनिर्माता विश्वमानव' वाचायलाच हवा. अन्य दोन भाषांतरे होत तर हा खंड मौलिक चिकित्सा. रवींद्रनाथांची घडण, नातीगोती, व्यक्तिमत्त्व पैलू, पत्रसृष्टी, समकालीनांशी संवाद यातून डॉ. जाधव यांनी जे रवींद्रनाथ उभारले आहेत, ते केवळ श्रद्धेमुळेच शक्य!

 तिसरा खंड 'रवींद्रनाथ टागोर : समग्र साहित्यदर्शन' हा संग्राह्य ऐवज. यात रवींद्रनाथांचे बहुविध, बहुपेडी साहित्यिक व्यक्तिमत्त्व निर्माण होते, ते त्यांच्या साहित्य नि विचारातून. रवींद्रनाथांवर गौतम बुद्ध, महात्मा गांधी, राजा राममोहन रॉय याचा प्रभाव लक्षात येतो. गांधी वयाने टागोरांपेक्षा लहान असले, तरी त्यांचे कार्य, कर्तृत्व रवींद्रनाथ जाणून होते. स्वदेश आणि राष्ट्रवाद अलीकडे विकृत रूपात पुढे येतो आहे. अशा पार्श्वभूमीवर याबाबत रवींद्र विचार संबंधितांचे डोळे नक्कीच उघडेल. शिक्षण धंदा बनवणाऱ्या वर्तमान युगात शिक्षण माणूस घडणीचे साधन कसे होऊ शकते, जे ज्यांना समजून घ्यायचे आहे, त्यांना हा खंड मार्गदर्शक ठरतो. साहित्य साधना असते. तो शिळोप्याचा उद्योग नाही, हे पण या खंडातून उमजते. संक्षेप व साक्षेपाने रवींद्रनाथांच्या साहित्य प्रकारांची वानगी हा ग्रंथखंड देतो. त्या अर्थाने भाताची चव सांगणारे हे शित एकदा तरी प्रत्येक सुज्ञाने चाखायला हवे.

 भयशून्य चित्त जेथ, सदैव उन्नत माथा
 मुक्त अशा स्वर्गातच होवो, मम जागृत देश आता।

 आजही या ओळी वाचताना गलबलायला होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात रचलेल्या या ओळी शंभर वर्षे उलटली तरी जशाच्या तशा लागू कशा होतात? त्याचं उत्तर एकच, 'जे न देखे रवि, सो देखे कवि'.


कागद आणि कॅनव्हास - अमृता प्रीतम भाषांतर - सुशील पगारिया क्रांती प्रकाशन, 'मनवृंदावन', ओंकारनगर, जळगाव. प्रकाशन - जुलै १९८५, पृष्ठे - ७६ किंमत - रु. ३०/- फक्त



कागद आणि कॅनव्हास

 भारतीय कवयित्री अमृता प्रीतम या सहस्रकातील श्रेष्ठ कवयित्री होत. पंजाबी काव्याच्या त्या विसाव्या शतकाच्या श्रेष्ठ कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. भारतीय ज्ञानपीठाचे सन १९८१ ला प्रदान करण्यात आलेले पंजाबी भाषा व साहित्यासाठीचे पहिले पारितोषिक त्यांच्या 'कागज ते कैनवस' या काव्यसंग्रहास लाभले होते. तो त्यांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह मानण्यात येतो. या काव्यसंग्रहाचे मराठी भाषांतर जळगावच्या प्रख्यात कवयित्री सुशील पगारिया यांनी केलंय. तेही पदरमोड करून. या भाषांतराचे वैशिष्ट्य असे की अमृता प्रीतम यांनी ते वाचून मान्य केल्यानंतर प्रकाशित झाले आहे. त्यामुळे या भाषांतराची कवीगत अधिकृतता आहे. दुसरे असे की याचे मुखपृष्ठ अमृता प्रीतम यांचे आजीवन मित्र असलेले चित्रकार इमरोज यांनी मोठ्या आस्था व तत्परतेने तयार केले होते. 'कागद आणि कॅनव्हास' हे शीर्षकही प्रतीकात्मक आहे. कवयित्री आपली कविता उतरविते कागदावर तर चित्रकार आपलं चित्र उतरवतो ते कॅनव्हासवर. कॅनव्हास म्हणजे फ्रेमबद्ध कापड ज्यावर चित्रकार चित्र रेखाटतो. कागद म्हणजे अमृता प्रीतम तर कॅनव्हास म्हणजे चित्रकार मित्र इमरोज. यातील कविता दोघांच्या जीवनाच्या असल्या, तरी त्या स्त्री-पुरुष संबंधावर चिरंतन व चिरंजीवी भाष्य करतात, म्हणून अभिजात।

 अमृता प्रीतम यांच्या कविता एकाच वेळी आत्मपर असतात नि परात्मपरही. 'उन्हाचा तुकडा' ही या संग्रहातील पहिली कविता. जत्रेत हरवलेल्या मुलाचीपण असते नि कवयित्रीच्या मनातील भाव कल्लोळाचीपण. 'जत्रेतल्या कोलाहलातही एक शांततेचे जग आहे' या ओळीतून ते स्पष्ट होते. 'मी' शीर्षक कविता तर स्पष्टच आत्मपर, वैयक्तिक नि स्वतःची अशी

 ज्या रात्रीच्या ओठांनी कधी स्वप्नांचे भाल चुंबले
 त्या रात्रीपासून कल्पनेच्या पायात जणू पैंजण रुमझुमते आहे

 या ओळी वाचणाऱ्या प्रत्येक वाचकास आपल्या मनातील घुंगरू ऐकायला येऊ लागते. ही असते अमृता प्रीतमच्या कवितेची ताकद नि परप्रत्ययता.

 या संग्रहात 'आवाज' नावाची कविता आहे. ती बेतली आहे सस्सी नावाच्या पंजाबी लोककथेतील एका नायिकेवर. सस्सी प्रियकरामागे तापलेल्या वाळवंटात पळत राहण्याने तिचे तळवे फोडांनी डबडबतात नि पळण्यानेच फोड वेदनाहीन होऊन जातात. ही असते आंधळ्या प्रेमाची ऊर्जा नि ऊर्मी! प्रेमाच्या खुमारीचं वर्णन म्हणजे ही कविता-

 निद्रेच्या ओठांना जणू स्वप्नांचा सुगंध येतो आहे,
 पहिले किरण जणू रात्रीचे भांगेत सिंदूर भरत आहे.

 'कागद आणि कॅनव्हास' मध्ये 'आद्य' शीर्षक कवितांची एक धारावाहिक रचना आहे. सलग सात कवितांमधून अमृता प्रीतम यांनी 'आद्यरचना', 'आद्यपुस्तक', 'आद्यचित्र', 'आद्यसंगीत', 'आद्यधर्म', 'आद्यकबिला', 'आद्यस्मृती' द्वारे जीवनाची सप्तकोनी रचना चित्रित केली आहे. सप्तस्वर, सप्तरंग म्हणजे जीवन ! ते आकारते 'मी' आणि 'तू'मधून. यातला मी आणि तू केवळ प्रियकर-प्रेयसी नाही तर आत्मा-परमात्मा, स्व-पर, व्यक्ती- समाज, शरीर-मन आहे. अमृता प्रीतमांच्या कवितेचे हे वैशिष्ट्य आहे की त्यांची कविता साध्या शब्दांमधून महान व वैविध्यपूर्ण आशयगर्भ विचार वाचकास देऊन त्यास अंतर्मुख करत राहते. ती वाचून सोडता येत नाही. तुम्ही जितका विचार कराल तितक्या खोलात, जंगलात तुम्हास घेऊन जाऊन चकवा, चांदोबा दाखवत राहते. सदर संग्रहातील 'रचना-प्रक्रिया' नावाची कविता काव्यरचनेबरोबर जीवन प्रक्रियाही समजावत राहते.

 'कागद आणि कॅनव्हास'मधील ७३ कविता वाचत असताना लक्षात येते की अमृता प्रीतम आपल्या काव्यातून स्त्री जीवनाच्या विविध भावछटा शब्दबद्ध करीत असतात. आपल्या व्यक्तिगत जीवनात त्या स्व विवेकाच्या कसोटीवर जगल्या. त्यांची ही कविता तुम्हाला सद्सद्विवेक देते म्हणून श्रेष्ठ, जीवनात अनुभवायला आलेले सत्य काळ नि समाजाचा मुलाहिजा न ठेवता निखळपणे मांडणं ही त्यांच्या कवितेची प्रवृत्ती नि प्रकृतीही. सतत नव्या आदर्शाकडे नेण्याचा ध्यास त्यांना भविष्यलक्ष्यी कवयित्रीची संज्ञा बहाल करतो. त्यांच्या या कवितेत पुरुष खलनायक म्हणून न येता मित्र म्हणून येतो, पण त्या मित्राला ती पुरुषत्वाचे जोडे नि वस्त्रे उतरवूनच स्वीकारत असते. ही कविता मानवाच्या नव्या युगांतराचा आग्रह धरणारी म्हणून आधुनिक आहे. ती भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा मेळ सतत घालत असते. ही कविता नियतीचा शोध घेते पण तिच्या अधीन राहण्याचं नाकारते. जीवनाच्या प्रत्येक वळणावर द्वंद्व आणि संघर्षाच्या वेळी निर्णायक असतो स्व. अमृता प्रीतम यांनी जीवनाची स्वतःची 'लिटमस टेस्ट' ठरवली होती.

 अमृता प्रीतम यांच्या 'कागद आणि कॅनव्हास' मधील कवितांमध्ये भावनेस बुद्धीची जोड आढळते. स्त्रीबद्दल त्यांचं स्वतःचं असं स्वतंत्र आकलन लक्षात येतं. स्त्रीला केवळ शरीर मानणाऱ्या पुरुषी समाज रचना विचारांशी उभा दावा म्हणजे त्यांची कविता 'पुरुषांनी आजवर पूर्ण स्त्रीशी मीलन अनुभवलेलेच नाही', असा त्याचा दावा आहे. या त्यांच्या वाक्यात स्त्री समानतेचं ब्रीद आहे. हरणारे युधिष्ठिर द्रौपदीस डावावर लावतात तेव्हा 'उसे क्या हक था ऐसा करने का?' विचारणारी द्रौपदी म्हणजे अमृता प्रीतम होय.

 इमरोजनी एक सुंदर पुस्तक संपादित केलं आहे. 'अमृता के प्रेमपत्र' त्याचं नाव. त्यात त्यांनी म्हटले आहे की अमृताची प्रत्येक कविता एक पत्रच असते नि काळ, समाजाशी केलेली तक्रार, शिकायत, गिले-शिकवे भी! अमृता प्रीतमांच्या कवितेने समकालाशी सहमती कधीच स्वीकारली नाही. त्यांना एकच काळ अपेक्षित होता, तो म्हणजे भविष्य! अर्थात स्वप्नातलं सत्य।। म्हणून त्या वर्तमानात कधी रमल्याच नाही. 'हे माझे आयुष्य कुठल्या सरोवराचे पाणी' असा प्रश्न विचारणारी त्यांची कविता तिला असा भास होत असतो की आपल्या गर्भातील काव्य बीजांचे पंख सतत फडफडत आहेत, नव्या आकाश, क्षितिजाचा वेध घेण्यासाठी. म्हणून प्रीतमांची कविता कधीच समाधानाने सुस्कारे सोडत नाही, ती सोडते फक्त

अस्वस्थतेचे उच्छ्वास, उसासे! स्वतःवर कविता लिहिणारी ही एकमेव कवयित्री. या संग्रहात ‘अमृता प्रीतम' नावाची चारोळी आहे -

  एक व्यथा होती
  जी सिगारेटसारखी मी प्याले आहे
  फक्त काही कविता आहेत -
  ज्या सिगारेटमधून मी राखेसारख्या झटकल्या आहेत.

◼◼

छत्रपती राजाराम महाराज : जीवन आणि कार्य
प्रा. डॉ. केशव हरेल
अक्षर दालन प्रकाशन, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर प्रकाशन - ३१ मे, २०१७ पृष्ठे - २५०, किंमत - रु. ३००/-


छत्रपती राजाराम महाराज : जीवन आणि कार्य

 दोन अडीच महिन्यांपूर्वी डॉ. केशव हरेल लिखित ऐतिहासिक ग्रंथ 'छत्रपती राजाराम महाराज : जीवन आणि कार्य' प्रसिद्ध झाला आहे. कोल्हापूरच्या प्रसिद्ध अक्षर दालन प्रकाशनाने त्याची दर्जेदार निर्मिती करून छत्रपती राजाराम महाराज (१८९७ ते १९४०) यांच्या जीवन व कार्याविषयी एका परीने आदरांजलीच वाहिली आहे. प्रा. डॉ. केशव हरेल यांचा हा ग्रंथ मूलतः त्यांचा पीएच.डी. साठीचा संशोधन प्रबंध. प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. या ग्रंथास शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. भारती पाटील यांची सिंहावलोकनपर प्रस्तावना आहे.

 हा एक वाचनीय असा ऐतिहासिक ग्रंथ होय. छत्रपती राजाराम महाराज (तिसरे) हे राजर्षी शाहू छत्रपतींचे सुपुत्र होय. आपल्या मुलाचे व्यक्तिमत्त्व आपणासारखे घडावे म्हणून राजर्षांनी केलेल्या प्रयत्नांची शर्थ वाचत असताना पालक, पिता छत्रपती शाहू महाराज आपणापुढे उभे राहतात. युवराज राजाराम सन १९१२ मध्ये १५ वर्षांचे होताच छ. शाहूंनी आपल्या मुलास शिकण्यासाठी विदेशात पाठविण्याचा निर्णय घेऊन त्यांना इंग्लंडला पाठवले. मिसेस आयर्विन या युवराजांच्या तेथील स्थानिक पालक होत्या. त्या नियमित राजर्षी शाहू महाराजांना युवराज राजाराम यांची प्रगती कळवीत असत. नि राजर्षी शाहू महाराजही नियमित उत्तरे देत. शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराज हे सुजाण पालक होते, हे या पत्रव्यवहारातून लक्षात येते. आपल्या मुलाला युवराज म्हणून विशेष वागणूक दिली जाऊ नये, त्याने सर्वसामान्य मुलांमध्ये मिसळावे, खेळावे म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा कटाक्ष वाचला की या रयतेच्या राजाचे खरे मोठेपण, माणूसपण लक्षात येते.

 राजर्षी शाहू महाराजांच्या अकाली निधनाने यूवराज राजाराम यांना सन १९२२ मध्ये संस्थानची धुरा अनपेक्षितपणे स्वीकारावी लागून ते छत्रपती राजाराम महाराज झाले. राज्यकारभाराच्या अवघ्या दीड तपाच्या काळात राजाराम महाराजांनी जे कार्य केले ते आपल्या वडिलांची लोकहितैषी परंपरा वर्धिष्णू करणारे ठरले. आपल्यापैकी फार कमी लोकांना हे माहीत असावे की आजचे कोल्हापूर आकाराला येण्यात छ. राजाराम महाराजांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक सुधारणांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी सत्यशोधक चळवळीचे पुनरुज्जीवन केले. त्याबद्दल त्यांना मानपत्र बहाल करून गौरव करण्यात आला होता. त्यांनी सत्यशोधक समाजाप्रमाणेच आर्य समाजास प्रोत्साहन देऊन सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना एकत्र शिकविण्याच्या प्रयत्नांना बळ दिले. राष्ट्रभाषा हिंदीच्या प्रचार, प्रसारास साहाय्य केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी अस्पृश्यता निवारणात पुढाकार घेतला. त्याचे ठळक उदाहरण म्हणजे अस्पृश्य जातीतील लोकांसाठी अनिवार्य असलेली हजेरी पद्धत रद्द केली. आज आपल्या महाराष्ट्र शासनाने जात पंचायत प्रतिबंधक कायदा केला म्हणून आपण त्यांचे कौतुक करतो. पण छत्रपती राजाराम महाराजांनी सन १९३९ मध्येच कोल्हापूर संस्थानास 'सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा लागू केला होता. श्री करवीर निवासिनी देवालय (अंबाबाई मंदिर) १९३२ साली अस्पृश्यांना खुले केले होते. जैन, मुस्लीम, ख्रिश्चन धर्मीयांसाठी पण छ. राजाराम महाराज यांनी उत्पन्नवाढीसाठी जागा, कबरस्तानासाठी जागा देऊन आपले पुरोगामीपण पणाला लावले होते.

 स्त्री शिक्षण प्रसारार्थ त्यांनी अनेक शिष्यवृत्ती सुरू केल्या. सन १९२९ मध्ये मुलींसाठी स्वतंत्र शाळा- महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल (म ल ग हायस्कूल) सुरू केले. स्त्रियांना उच्चशिक्षित व मिळवत्या करण्यासाठी लेडी साइक्स लॉ कॉलेज (आत्ताचे बी.टी. कॉलेज) सुरू केले. कोल्हापूरची आजची महानगरपालिका छ. राजाराम महाराज यांच्या कारकीर्दीत अस्तित्वात आली. त्यांनी कोल्हापूर स्टेट म्युनिसिपल अ‍ॅक्ट - १९२५ मंजूर केला. इतकेच नव्हे, तर आज जिथे महानगरपालिका कार्यरत आहे ती इमारत पूर्वी 'मेरी वेदर बिल्डिंग' म्हणून परिचित होती. तिची उभारणी छ. राजाराम महाराजांनीच केली आहे. आजचे शिवाजी हे टेक्निकल स्कूल जिथे पूर्वी राजाराम सायन्स कॉलेज भरत असे ती बिल्डिंग 'ओब्रायन टेक्निकल स्कूल' म्हणून राजाराम महाराजांनी सन १९२९ मध्ये उभारली. आज आपण राजर्षी शाहू जयंती वा सामाजिक न्याय दिनी दसरा चौकातील राजर्षी शाहू पुतळ्याला अभिवादन करतो, तो शिल्पकलेचा वारसा छ. राजाराम महाराजांनीच निर्माण केला. त्याशिवाय प्रिन्स शिवाजी पुतळा, अक्कासाहेब महाराज पुतळा उभारला. छ. राजाराम महाराजांनी जुनी कोर्ट इमारत (राधाबाई बिल्डिंग) तिथे संस्थानी न्यायालय होते. त्यास हायकोर्टाचा दर्जा छ. राजाराम महाराजांच्या काळात देण्यात आला होता. आणि आज आपण खंडपीठ सुरू करावे म्हणून परत मागणी करीत आहोत, त्याला हा पूर्वेतिहास आहे. लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, साईक्स एक्सटेंशन या नागरी वसाहती राजाराम महाराजांच्या कार्यकाळात पूर्ण झाल्या.

 असा विस्मृतीत गेलेला इतिहास जपण्याचे कार्य हा चरित्र ग्रंथ करतो म्हणून तो सर्वांनी वाचायला हवा. शालिनी पॅलेस ही छ. राजाराम महाराजांचीच देणगी. शिवाजी विद्यापीठाचे स्वप्न त्यांच्याच काळात उदयाला आले. १९३४ साली राजाराम कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या भाषणात तत्कालीन प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी ते स्वप्न आपणास दिले. या चरित्रात आपणास त्याचा आराखडा वाचावयास मिळतो. तो आजच्या शिवाजी विद्यापीठ धुरीणांनी मुद्दाम वाचायला हवा तो अशासाठी की विद्यापीठ स्थापनेचा सुवर्णमहोत्सव होऊनही आपण छत्रपती राजाराम महाराज आणि डॉ. बाळकृष्ण यांचे शिक्षण स्वप्न (व्हिजन) गाठू शकलो नाही. (पृ. १६५)

 सदर चरित्र ग्रंथाचे योगदान हे की ते आपणास छत्रपती राजाराम महाराजांच्या ४३ वर्षांचे आयुष्य समजावते. १८ वर्षांच्या राजकिर्दीचा आलेख ते आपणापुढे उभा करते. त्यातून लक्षात येते की राजाराम महाराजांनी आपल्या कारकीर्दीत जीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करत या समाजाची घडण जातीय ऐक्याची व धार्मिक सहिष्णतेची बनवली. विशेषतः ग्रामीण भागात प्रत्येक नदीतीरांवर नावेची सोय करून ग्रामीण दळणवळण गतिमान केले. रस्ते बांधणीस प्राधान्य दिले. शेतीस प्रोत्साहन दिले. सहकारी संस्था स्थापन केल्या. प्रजाजनांस राजकीय हक्क प्रदान केले. आयर्विन अ‍ॅग्रीकल्चर म्युझियम (आत्ताचे जिल्हाधिकारी कार्यालय) उभारून शेती संशोधन व विकासाचा वस्तुपाठ सुरू केला. ग्रामीण भागात व कोल्हापूर शहरात अनेक पूल (उदा. लक्ष्मीपुरीतील विल्सन पूल) उभारून संस्थानास आधुनिक बनवले. पाणीपुरवठा, कुष्ठधाम, रात्रशाळा, तलाठी शाळा, बालवीर चळवळ, तंत्र शिक्षण, वैदिक विद्यालय इत्यादी योजना वाचताना माणूस या लोकराजाच्या लोकदृष्टीचा आवाका पाहून अवाक् होऊन जातो. राजर्षी शाहूंचे स्वप्न हेच होते, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा!' 'पुत्रात् इच्छेत पराजयः' पण असते.

◼◼

रुग्णानुबंध डॉ. दिलीप शिंदे साधना प्रकाशन, ४३१, शनिवार पेठ, पुणे - ४११०३० प्रकाशन - २०१२ पृष्ठे - १८०, किंमत - रु. १५०/-



रुग्णानुबंध

 लहानपणीच्या पाठ्यपुस्तकात 'आजारीपण' नावाची एक कविता होती. लहान मुलांना आजारी पडायला का आवडतं याचं सुंदर वर्णन त्या कवितेत होतं. त्याचं धृवपदच होतं, 'पडू आजारी। मौज हीच वाटे भारी।।' आजारपण मौज वाटायचा काळ इतिहासजमा झाला आहे. उलटपक्षी काळ असा विचारता झाला आहे की, 'असले आजारपण गोड। असूनि कण्हती का जन मूढ?' फॅमिली डॉक्टरची कल्पना जाऊन डॉक्टर कन्सलटंट, रिपोर्टर झाला. त्यांना कागद वाचता येतो, माणूस नाही! फॅमिली डॉक्टर माणूस वाचायचा. रुग्ण आणि डॉक्टरमध्ये ना पडदा होता ना कागद! हे सारं आठवायचं कारण घडलं ते हाती आलेलं एक पुस्तक. त्याचं नाव आहे 'रुग्णानुबंध'. लेखक आहेत डॉ. दिलीप शिंदे. चाळिशी उलटलेला हा प्रौढ डॉक्टर. त्यांनी साप्ताहिक साधना, पुणे मध्ये सन २०११-१२ च्या दरम्यान याच शीर्षकाने एक सदर चालवले होते. त्याचा हा संग्रह. रुग्णांशी असलेल्या डॉक्टरांच्या ऋणानुबंधाच्या या आठवणी. डॉ. दिलीप शिंदे हे सांगलीतील एक कर्ते सुधारक डॉक्टर होत. ते आणि त्यांच्या काही सहकारी डॉक्टरांनी मिळून सांगलीत 'संवेदना शुश्रूषा केंद्र' चालवले आहे. अंथरुणाला खिळलेल्या, शुश्रूषा, उपचाराची नितांत गरज असलेल्या आणि घरी करायला मनुष्यबळ नसल्याने आबाळ होणाऱ्या वृद्ध रुग्णांची सेवा, शुश्रूषा करणारे हे केंद्र. डॉ. दिलीप शिंदे यांनी आपलं राहतं घर या केंद्रास देऊन ते स्वतः भाड्याच्या घरात राहू लागले आहेत. ही सारी डॉक्टर मंडळी आता या वृद्ध रुग्णांचे सेवाभावी पालक बनलेत. या मंडळींचं काम पाहून सांगलीतल्या तरुण महिला डॉक्टरांनी यांच्यापुढे एक पाऊल टाकले आहे. त्या रुग्णाच्या घरीच जाऊन सेवा, शुश्रूषा करू लागल्यात. डॉक्टरांबद्दल समाज साशंक होत असल्याच्या काळात हे प्रयत्न, पर्याय म्हणजे अजून जग पूर्ण अंधारलं नाही याची आश्वासक खूण! या संवेदनशील पार्श्वभूमीवर डॉ. दिलीप शिंदे यांचं 'रुग्णानुबंध' पुस्तक वाचताना लक्षात येतं की डॉक्टरांनी यांत्रिक उपचारांमागे न धावता रुग्णांशी हितगुज केले तर किती व्याधी उपचारापूर्वी व उपचाराशिवायही बऱ्या होऊ शकतात. आज रुग्णांची खरी गरज आहे ती - त्यांना त्यांचं ऐकणारा डॉक्टर हवाय... ऐकू येणारा... ऐकू इच्छिणारा... अशा डॉक्टरांच्या या आठवणीच वाचकांसाठी उपचार बनतात.

 'रुग्णानुबंध' पुस्तक डॉक्टर नि रुग्ण यांच्यात आत्मीयता व सुसंवाद असण्याची गरज अधोरेखित करते. या पुस्तकास डॉ. नरेंद्र दाभोलकरांची 'भूमिका' लाभली आहे. त्यात त्यांनी डॉक्टर-रुग्ण यांच्यामध्ये विश्वासाचे नाते महत्त्वाचे मानले आहे. सदर पुस्तकास महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू व आरोग्य संबंधी लेखन करणाऱ्या डॉ. रवी बापट यांची प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी डॉक्टरांची 'जागल्या' म्हणून असलेली जबाबदारीही विशद केली आहे.

 रुग्ण डॉक्टरांकडे आला की मोकळेपणाने बोलेल तर डॉक्टर योग्य उपचार करू शकतात. दिनकर नावाचा एक व्यसनी रुग्ण पुढे निर्व्यसनी होतो तो कायमचा. एक लेखक दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण'. एक मूल झालेली पत्नी खेड्यातल्या डॉक्टरांच्या पैशाच्या लोभाने गर्भाशय गमावते. ती कायमची अकारण वांझ बनून आयुष्य काढते. नाबाद शतक पूर्ण करणारे नाना निवर्ततात नि पाठोपाठ नानी जाते. असं असतं - असायला पाहिजे पती-पत्नी नातं. मित्राशी लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवणारी तरुण मैत्रीण. गर्भधारणेनंतर हैराण. डॉक्टरांना पैशात मोजू इच्छिणारी. सेवाभावी दवाखान्यात नेतात तर तिचे सुशिक्षित पालक या सत्कार्याकडे कसे पाहतात, डॉक्टरांशी कसे वागतात हे सर्व 'रुग्णानुबंध' मधून वाचत असताना लक्षात येते की डॉक्टर नि रुग्ण या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. त्या परस्पर संवादी असतील तर समाज, मानवी ऋणानुबंध सद्भावी राहणार.

 या आठवणी वाचताना मागे केव्हातरी डॉ. अनिल अवचट यांनी किर्लोस्कर मासिकात लिहिलेला लेख 'डॉक्टर - जगवतात नि नागवतात' आठवला. आज रुग्णाला डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलमध्ये जायचे म्हटले की नको वाटते. याची अनेक कारणे आहेत. उपचार खर्चीक होत आहेत. उपचारपूर्व तपासण्या आवश्यक/अनिवार्य असतात का याबाबत समाज साशंक आहे. शस्त्रक्रिया, औषधे, लॅबोरेटरी यांचे एकछत्री साम्राज्य रुग्णांच्या की डॉक्टरांच्या फायद्याचे यांची चर्चा सुरू झाली आहे. कट प्रैक्टिस लपून राहिलेली गोष्ट नाही. अशा पार्श्वभूमीवर 'रुग्णानुबंध' वाचणे हे मोठे समाजशिक्षण व समुपदेशन होय.

 'स्वस्थस्य स्वास्थरक्षणम्।
 आतुरस्य विकार प्रशमनं च ||'

 डॉक्टरांचे पहिले कार्य माणसाच्या आरोग्याचे रक्षण करणे होय. म्हणजे अनावश्यक उपचार टाळणे. व्याधी असेल तरच उपचार हा आदर्श परत एकदा या व्यवसायात रुजणे कसे गरजेचे आहे, ते हे पुस्तक समजावते. डॉक्टरांचे काम केवळ गोळ्या देणे नसून दिलासा देणे, आरोग्यविषयक गैरसमज दूर करणे, रुग्णांच्या मनातील भीती, नैराश्य दर करणे, त्याचा आत्मविश्वास वाढवणे हे पण आहे.

 साहित्य म्हणजे केवळ मनोरंजन नसून ते जीवन मार्ग आक्रमण्याचे, जीवनाचा चक्रव्यूह भेदण्याचे, मार्गदर्शनाचे साधन होय, याची प्रचिती देणारे हे पुस्तक. डॉ. दिलीप शिंदे मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते, तेव्हा पहिल्या दिवशी त्यांच्या शिक्षकांनी तुम्ही मेडिकलला का आलात असे विचारल्यावर बाळबोध उत्तर दिले होते, 'मला रुग्णांची सेवा करायची आहे.' त्यांच्या उत्तरावर सर्व विद्यार्थी खो-खो हसले होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या हसण्यात शिक्षकही सामील झाले होते. आज ते शिक्षक, विद्यार्थी डॉक्टर समाज क्षितिजावर कुठेच नाहीत. आहेत फक्त डॉ. दिलीप शिंदे. जी माणसं स्व विवेकाच्या कसोटीवर चालत राहतात, समाज फक्त त्यांना नि त्यांनाच लक्षात ठेवतो नि त्यांच्या मागे उभा राहतो.

◼◼

लीळा पुस्तकांच्या - नितीन रिंढे,
लोकवाङ्मय गृह, मुंबई प्रकाशन - २०१७, पृष्ठे - १८९ किंमत - रु. २५०/-


लीळा पुस्तकांच्या

 नितीन रिंढे हे बहुभाषी वाचक आहेत. आपल्या समृद्ध वाचनानंतर वाचलेल्या पुस्तकांबद्दल त्यांना लिहावंसं वाचलं. अर्थात 'लीळा पुस्तकांच्या' या ग्रंथात ज्या पुस्तकाबद्दल लिहिण्यात आले आहे, ती सर्व इंग्रजी पुस्तके होत. ही सर्व पुस्तके वाचन व्यवहाराशी संबंधित आहेत. नितीन रिंढे यांनी मुंबईच्या दैनिक 'प्रहार' च्या 'बुकमार्क' पुरवणीत सन २०११-१२ मध्ये लिहिलेल्या मजकुराचे हे संकलन. ती सर्व इंग्रजी पुस्तके विश्वविख्यात लेखकांची. पुस्तकवेडी माणसं, पुस्तक संग्राहक, पुस्तक सहवास, पुस्तक वाचन, पुस्तक इतिहास हे त्यांचे विषय. यात शेवट एक लेख आहे. 'हिटलर : पुस्तक जपणारा की जाळणारा'. तो वाचत असताना लक्षात येते की हिटलर चांगला वाचक होता. त्याच्या संग्रहात विशेष म्हणजे महात्मा गांधी, गौतम बुद्ध, रवींद्रनाथ टागोर यांची पुस्तके होती. या नरसंहारक जर्मन हुकूमशहाच्या संग्रहात यांची नि गटे, शिलर, कांटसारख्या तत्त्वज्ञानी लेखकांची पुस्तके कशी याचं आश्चर्य वाटते ते त्याच्या चरित्र, चारित्र्यामुळे नि मनात असलेल्या त्याच्या चित्र, प्रतिमेमुळेही! दुसऱ्या महायुद्धात त्याने साऱ्या ज्यू लेखकांच्या पुस्तकांची होळी करण्याचे फर्मान आपल्या सेनेस काढले. इतिहासात तो 'पुस्तकांचा कर्दनकाळ' म्हणून नोंदला गेला. ३० एप्रिल, १९४५ ला हिटलरने आत्महत्या केली तेव्हा त्याच्या संग्रही एक दोन नव्हे, चांगली सोळा हजार पुस्तकं होती. दुसऱ्या महायुद्धात जर्मन पाडावानंतर दोस्त राष्ट्रातील सैनिकांनी, त्यातही विशेषतः अमेरिकन सैनिकांनी जी लूट केली त्यात हिटलरची पुस्तके मोठ्या संख्येने होती. ती आता अमेरिकेतील लायब्ररी ऑफ काँग्रेस, ब्राऊन विद्यापीठ ग्रंथालयात एकत्र करण्यात आली आहेत. त्यावर संशोधन होऊन 'हिटलर्स प्रायव्हेट लायब्ररी' सारखं पुस्तक प्रकाशित झालं आहे. ते समजून घेताना 'लीळा पुस्तकांच्या' मधून कळतं की हिटलर वाचताना खाणाखुणा करत असे. पुस्तकं संग्रहकास अमर करतात, हे जसं खरं तसं जो पुस्तकं वाचतो तोच त्याचे परिणाम जाणत असतो. म्हणून राष्ट्रप्रमुख वाचणारे हवेत. आणि वाचनातली विधायकता कृतीत आणणारेही. हे सर्व 'लीळा पुस्तकांच्या' वाचताना लक्षात येते.

 'लीळा पुस्तकांच्या' मध्ये विविध इंग्रजी पुस्तकांबद्दल २३ लेख असले, तरी ते शंभराहून अधिक ऐतिहासिक महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती देते. सर्व पुस्तक संग्रह, निर्मिती, दुर्मीळता अशा अंगानी पुस्तकाचं जग समजावते. हे जरी खरं असलं, तरी या पुस्तकातला सर्वांत महत्त्वाचा लेख म्हणजे 'महाराष्ट्रीयांच्या पुस्तक संस्कृतीवर दृष्टिक्षेप'. तो सर्वांनी आवर्जून वाचलाच पाहिजे. अशासाठी की मराठी पुस्तक जगत, पुस्तक विषय, पुस्तक संग्रह, वाचन व्यवहार जगाच्या पार्श्वभूमीवर किती तोकडा आहे, याची तो जाणीव करून देतो. म्हणजे असे की जग भरारी घेत आहे नि आपण अजून रांगतपण नाही.

 एखाद्या भाषा, प्रांत, राष्ट्र याची पुस्तक संस्कृती समृद्ध आहे हे कशावरून ठरतं? तर ते तुमच्या भाषेतील पुस्तकांवर किती पुस्तके लिहिली जातात त्यावरून. पुस्तकांविषयीची पुस्तके (Books on Books) किती, कशी लिहिली जातात हे महत्त्वाचं. पुस्तक इतिहास, पुस्तक आठवणी, पुस्तक वाचक, पुस्तक संग्राहक, पुस्तक मांडणी, पुस्तक बांधणी, रचना, निर्मिती, टंक (फाँटस्), मुद्रण अशा सर्वांगी पुस्तक व्यवहारावर मराठीत अल्प पुस्तके आढळतात. मराठीत पुस्तकांविषयी लिहिले जाते ते काय वाचावे, काय वाचू नये असे सुचवणारे लेखन अधिक. स्वदोष स्वीकारून मी म्हणेन की तुम्ही आत्ता वाचता ते सदर 'वाचावे असे काही' याच पठडीतले. आपण शिक्षित होतो पण वाचनवेडे, पुस्तक संग्राहक होत नाही. शंभर वर्षांपूर्वी मराठी पुस्तकांची आवृत्ती हजाराची असणे मोठी गोष्ट मानली जायची. आज मराठी पुस्तकांची आवृत्ती पाचशेवर येऊन ठेपणे आपल्या वाचन व पुस्तक संस्कृतीचा आखडता प्रदेशच स्पष्ट करते. पश्चिम बंगालमध्ये सर्व शिक्षित घरात समग्र टागोर, समग्र शरत्चंद्र, समग्र बंकिमचंद्र साहित्य असतं. समग्र खांडेकर, कुसुमाग्रज, करंदीकर, नेमाडे हे आपले इनमीन चार ज्ञानपीठ विजेते साहित्य आपल्या घरी असते का? पुस्तकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र घर बांधले होते हे सांगणार. नंतर किती जणांनी अशी घरे बांधली? ते जाऊ द्या - घरात पुस्तकांची संख्या अधिक की कपडे, खेळणी, दागिने, पोषाख, भांडी अधिक? थोरो नावाचा लेखक कुडकुडत्या थंडीत कोट आणायला म्हणून बाहेर पडतो. वाटेत पुस्तकाचे दुकान भेटते. थंडी विसरून तो कोटाऐवजी पुस्तके घेऊन येतो. असे आपले कधी झाले आहे का? असे अनेक प्रश्न विचारणारे हे पुस्तक वाचणे म्हणजे पुस्तकरूपी आरशात स्वतःचं सुशिक्षितपण अनुभवणे, पाहणे होय.

 लोकवाङ्मय गृहाची पुस्तक निर्मिती कशी विषयस्पर्शी असते त्याचा हे पुस्तक म्हणजे उत्कृष्ट नमुना होय. 'हरवलेल्या पुस्तकांचं पुस्तक', 'पुरातन पुस्तके', 'पुस्तकांच्या दंतकथा', 'ग्रंथालयातील मंतरलेली रात्र', 'प्राध्यापक जेव्हा पुस्तक विक्रेता बनतो', 'वाचकच कादंबरीचे पात्र बनतो तेव्हा...', 'पुस्तकचोराच्या मागावरील गुप्तहेर', 'एका शब्दकोशाची जन्मकथा', 'न वाचलेल्या पुस्तकांबद्दल', 'पुस्तकाची असोशी (तहान) ही लेख शीर्षकेच तुम्हास संपूर्ण पुस्तक वाचण्यास भाग पाडतात. पुस्तकांसबंधी या लेखांच्या प्रारंभी लेखक व पुस्तकाविषयी नितीन रिंढे यांनी जो परिचयपर मजकूर दिला आहे, तो जिज्ञासावर्धक आहे. प्रत्येक लेखातील प्रत्येक उदाहरण आपणास आपल्या वाचन दारिद्र्याची जाणीव करून देते. त्या अर्थाने 'लीळा पुस्तकांच्या' हा ग्रंथ स्वतःस सुशिक्षित समजणाऱ्या प्रत्येकाचे गर्वहरण करणारा होय.

 मी जगातील १५ देशांतील ग्रंथालये पाहिली, अनुभवली, वाचली आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्रंथालयांची अनास्था पाहिली की आपणास सुशिक्षित कसे म्हणायचे असा प्रश्न पडतो. डॉ. के. भोगिशयन नावाचे एक अपवाद, कुलगुरू शिवाजी विद्यापीठास लाभले. कार्यालयात पुस्तके वाचणारे ते एकमेव प्राचार्य नि कुलगुरू! शिक्षण संस्था प्रमुखांचं पुस्तक न वाचणं हे मराठी वाचन संस्कृतीचं खरं दारिद्रय होय. आता महाराष्ट्र शासन सार्वजनिक

ग्रंथालयांना वेळेवर व पुरेसे अनुदान जसे देत नाही तसा नीती आयोग शिक्षणावर वाढता खर्च करत नाही. मग मराठी माणूस पुस्तक वाचणार कसा नि पुस्तकांवरील पुस्तके मराठीत निर्माण होणार केव्हा?

◼◼

निवडक नरहर कुरुंदकर - संपादक विनोद शिरसाठ
देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. पुणे प्रकाशन - २०१३ पृष्ठे - २६० किंमत - रु. ३००/-


निवडक नरहर कुरुंदकर

 हल्ली महाराष्ट्रात सर्रास कुणासही आदरणीय, विचारवंत अशी विशेषणे लावण्याचा प्रघात दिसून येतो. अशा पार्श्वभूमीवर ही दोन्ही विशेषणे गांभीर्याने व तर्ककठोरतेने लावता येतील असे साहित्यिक, वक्ते, समीक्षक प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा नि त्यांनी लिहिलेल्या अनेक व्यक्तिवेधक लेखांचा संग्रह आहे 'निवडक नरहर कुरुंदकर'. साप्ताहिक साधनाचे तरुण संपादक विनोद शिरसाठ यांनी या पुस्तकाचे संपादन द्रष्टेपणाने केले आहे. त्याचे उदाहरण म्हणजे या पुस्तकात प्रारंभी असलेला प्रा. नरहर कुरुंदकरांचा 'व्यक्तिपूजा : एक चिकित्सा' शीर्षक लेख. भारतीय समाज परंपरेने व्यक्तिपूजक राहिला आहे. त्यामुळे त्याला आपल्या आराध्य व्यक्ती वा नेत्याची चिकित्सा करणे मान्य नसते. व्यक्तीचे दैवतीकरण करण्याने विचार विकास थांबतो, हे आपल्या लक्षातच येत नाही. समाजाला श्रद्धास्थाने असतात, म्हणून विचारवंत एकाकी पडतो. प्राचार्य नरहर कुरुंदकर आपल्या विचारग्रहीपणामुळे जीवनाच्या अंतिम पर्वात एकाकी पडले होते. अवघ्या पन्नासाव्या वर्षी या प्रखर विचारवंताचं निधन होणं, हे आपला करंटेपणाचं फलित म्हणावे लागेल.

 नरहर कुरुंदकरांनी अनेक व्यक्तिलेख लिहिले होते. व्यक्तिलेख हे आत्मकथेइतकेच प्रेरक असतात. सॉक्रेटिस, शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, सर्वपल्ली राधाकृष्णन, खान अब्दुल गफार खान यांच्यावरील सदर पुस्तकातील व्यक्तिलेख अनेक दुर्मीळ संदर्भानी युक्त आहेत. त्याचं कारण कुरुंदकरांचं चौफेर नि चौरस वाचन होय. 'सॉक्रेटिसचा मृत्यू' लेखात ते म्हणतात, 'इतर कुणाबरोबर स्वर्गात राहण्यापेक्षा सॉक्रेटिसबरोबर नरकात राहणे चांगले.' माणसाचं मोठेपण चपखल शब्दात व्यक्त करण्याची कुरुंदकरांची हातोटी त्यांना प्रज्ञावंत, बुद्धिवंत ठरवते. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं व्यक्तिमत्त्व त्यांच्या तत्त्वज्ञानावरील हुकमतीमुळे जागतिक दरारा निर्माण करणारं होतं, याची अनेक उदाहरणे कुरुंदकरांनी सांगितली आहेत. राष्ट्रपती होण्यापूर्वी सर्वपल्ली राधाकृष्णन् रशियात भारतीय राजदूत होते. तेव्हा स्टॅलिन रशियाचा सर्वेसर्वा होता. तो भल्याभल्यांना भेट नाकारत असे. पण त्यांनी डॉ. राधाकृष्णनना स्वतः भेटायला बोलावले होते. भेटीत स्टॅलिननी सुचविले की रशियात आहात तर इथे लोकांनी उभारलेली संस्कृती पाहून घ्या. भारताच्या उभारणीला त्याचा उपयोग होईल. डॉ. राधाकृष्णन् म्हणाले, 'आकाशातून आपण पाखरासारखे उडू शकता व समुद्रात माशाप्रमाणे खोल वावरू शकता हे मला माहीतच आहे, पण पृथ्वीवर माणसासारखे वागायला शिकलात का?' हे ऐकूनही त्यांनी डॉ. राधाकृष्णन् यांना रशिया सोडून जायचा हकूम दिला नाही, कारण तत्त्वज्ञ म्हणून डॉ. राधाकृष्णन् यांची कीर्ती स्टॅलिन जाणून होता.

 प्रा. कुरुंदकर यांनी थोर व्यक्तींवर जसं लिहिलं तसं आपले मित्र, सुहुद, आई, पत्नीवरही व्यक्तिलेख लिहिले. भारतीय पती पत्नीवर लिहितात हे कुणाला खरे वाटणार नाही. पत्नी प्रभावती कुरुंदकरांशी त्यांचा झालेला विवाह प्रेमविवाह होता. तारुण्याच्या उंबरठ्यावरच ते विवाहित झाले, तेव्हा उभयतांना जग, जीवन, जगणं कळायचं होतं. कुरुंदकर तेव्हा निजाम विरोधी आंदोलनातील तरुण, तडफदार कार्यकर्ते. प्रेमाकर्षणाचं हे एकमेव कारण. मिळकत शून्य असताना लग्न करणं हे प्रेमामुळेच शक्य होतं ना आपल्या पत्नीनं आयुष्यभर जे सोसलं ते 'पत्नी' लेखात अपराधीपणाने परंतु कृतज्ञतापूर्वक प्रांजळतेने त्यांनी प्रभाताई उभ्या केल्यात. सोसलेली पत्नी त्यागी असते म्हणूनच करारीपण असते. तो करारीपणा सोसण्याचीच परिणती असते. एकदा पुरोगामी मुस्लीम चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचा नरहर कुरुंदकरांच्या घरी मुक्काम होता. गप्पांत रात्र अंधारी होत गेली. पत्नी जागीच. रात्री बाराला तिने दोघांना चहा दिला ते दलवाई निघतो म्हणाले म्हणून. परत यांचा गप्पांचा फड रंगलेलाच. वाट पाहून यांच्या घशाला कोरड पडली असेल म्हणून प्रभाताईंनी पहाटे चारला दुसरा चहा आणून ठेवला. आता मात्र हमीद दलवाई खजील झाले. वहिनींना म्हणाले, "वहिनी, काय हा त्रास तुम्हाला! मी म्हणजे काय शुद्धीवर नसतोच मुळी!" प्रभाताई म्हणाल्या, "शुद्धीवर नसणाऱ्यांचेच हे घर आहे. शुद्धीवर असणाऱ्यांना इथे वावच नाही." दलवाई कुरुंदकरांना म्हणाले, "गड्या, धार फार तिखट आहे." अशा पत्नीचं बाहेरून काटे नि आत फणसाच्या गऱ्याची कोमलता असलेलं व्यक्तिमत्त्व वाचणं म्हणजे आपल्या पत्नीला आपल्या मनाच्या आरशात पाहणं होय. या भागात यदुनाथ थत्ते, अनंत भालेरावांवरचे व्यक्तिलेख वस्तुनिष्ठ आहेत.

 या ग्रंथात 'स्वतःविषयी' विभागात नरहर कुरुंदकरांनी जे आत्मचरित्रात्मक लेख लिहिलेत त्यात कुरुंदकर स्वतःविषयी किती कठोर होऊन लिहू शकतात ते वाचलं की या माणसाचं तर्ककठोर व्यक्तिमत्त्व उभं राहतं. मी कुरुंदकरांना शालेय वयात अनेकदा ऐकलं. तरुण वयात अनेकदा वाचलं. 'धार आणि काठ', 'मागोवा', 'रूपवेध' ही कायम लक्षात राहणारी पुस्तकं. इतका मोठा विद्वान पण त्यांचा ग्रंथसंग्रह नव्हता हे वाचलं की आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. सदर पुस्तकात प्रा. नरहर कुरुंदकरांविषयी चार पिढीच्या संपादकांनी लिहिले आहे. 'मराठवाडा'कार अनंत भालेराव, 'साधना'कार यदुनाथ थत्ते, 'लोकमत'कार सुरेश द्वादशीवार आणि 'लोकसत्ता'कार गिरीश कुबेर. सर्वांचं प्रा. नरहर कुरुंदकरांच्या विद्वत्तेवर मात्र एकमत. ही सर्व मंडळी वैचारिक गोंधळावर उतारा म्हणून कुरुंदकर वाचत होते, काही आजही वाचतात. यातील एका विधानाकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो, 'विचारवंत' ही उपाधी तत्कालीन संपादकांच्या मस्तकावर (कुरुंदकरांच्या तुलनेन) सैलच राहिलेली आहे. या महावाक्यात कुरुंदकरांचं समग्र श्रेष्ठत्व सामावलेले दिसते. म्हणूनही समग्र कुरुंदकर वाचले पाहिजेत.

 'निवडक नरहर कुरुंदकर मालेत अजून चार खंड प्रकाशित व्हायचे आहेत. पट्टीच्या वाचकांना त्याची प्रतीक्षा आहे. प्रा. कुरुंदकर व्यक्ती व विचार म्हणून माझ्या पिढीचे 'आयकॉन', 'आयडॉल' होते हे खरे. पण त्यांना पाहात, वाचत, ऐकत असताना आपण त्यांच्या पासंगालाही पुरत नाही या क्षुद्रपणाची जाणीव आम्हास सतत अस्वस्थ ठेवायची. वर्तमानाचं क्षुद्रपण असं की असं अस्वस्थ करणारं व्यक्तिमत्त्व नि विचार संचित

आसपास नाही. त्यामुळे सध्या ‘अहो रूपम, अहो ध्वनी' चा काळ सोकावला आहे, असे वाटते.

◼◼

How to Read A Book Mortimer Adler and Charles Doren. Simon and Schuster, New York (USA) Year - 1940 Pages -424 Rs.465/-



हाऊ टू रीड अ बुक

 काही दिवसांपूर्वी भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन यांच्या शतकोत्तर रजत जयंतीच्या निमित्ताने एका महाविद्यालयात वाचनाविषयी बोलायला म्हणून गेलो होतो. माझ्या व्याख्यानात मी काय नि का वाचावे असे सूत्र घेऊन बोललो. माझे भाषण संपवून बसणार इतक्यात विद्यार्थ्यांतून एक हात प्रश्न करण्यासाठी वर झाल्याचे लक्षात आले. तो म्हणाला, 'तुम्ही काय नि का वाचावे हे चांगले सांगितले, पण कसे वाचावे ते नाही सांगितले." मी त्याला यथामती उत्तर दिले खरे, पण त्याने माझे समाधान नाही झाले. उत्तर शोधात माझ्या हाती मॉर्टिमर ॲडलर आणि चार्ल्स डोरेनचं एक पुस्तक लागलं. त्याचं शीर्षक म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा प्रश्नच होता. 'हाऊ टू रीड अ बुक'.

 हे पुस्तक सन १९४० साली लिहिलं गेलं आहे. या पुस्तकाची फ्रेंच, स्वीडिश, जर्मन, स्पॅनिश, इटालियनमध्ये भाषांतरे झाली आहेत. हे पुस्तक वाचनसंबंधी मूलभूत गोष्टी सांगतं. आपणास वाचावं कसं ते प्राथमिक शाळेत शिकवलं जात नसल्याने वाचन कला म्हणून आपलं नैपुण्य प्राथमिकच राहतं. वाचनाचे कितीतरी प्रकार आहेत. खरे म्हणजे प्रगट-वाचन, मौन वाचन, मनन वाचन, चिंतन वाचन, विश्लेषी वाचन, तुलना वाचन इ. आपली गाडी पहिल्या फलाटालाच थांबलेली असल्याने आपला प्रगल्भ वाचक म्हणून विकास होत नाही. हे पुस्तक आपणास समजावते की अलीकडे माणसाचे वाचन हे रंजकतेकडून उपयोगितेकडे सरकत आहे. म्हणजे असे की गेल्या शतकात माणसं कथा, कादंबऱ्या, नाटके, निबंध वाचत. आता जगावे कसे? जीवन अनुभव, प्रवास, कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकाससंबंधी वाचणे तो पसंत करतो, कारण वाचन आता वेळ घालवायचे साधन राहिले नसून ते जीवन जगण्याचे मार्गदर्शक झाले आहे. शिवाय रेडिओ, टेलिव्हिजन, मोबाईल, संगणक, सिनेमा इ. रंजन व माहिती संपर्क साधनांमुळे माणूस बाह्यतः कृतिशील निष्क्रिय वाटतो. परंतु त्याचे अंतस्थ निद्रित राहते. परिणामी मन निष्क्रिय होते. मनाचे निष्क्रिय होणे म्हणजे अंतर्विकास थांबणे होय. त्यामुळे आपला बौद्धिक, नैतिक, तार्किक, आत्मिक संघर्ष कमी होऊन आपण स्थितीशील होऊन जातो. माणसाची ही वाढ खुंटणे म्हणजे जिवंत मरण जगणे. ते आपण सध्या जगत असल्याचे भान हे पुस्तक देते.

 'हाउ टू रीड अ बुक' आपणास लक्षात आणून देते की वाचन हे श्रेणीबद्ध असते. वाचन ही कृती तर आहेच, शिवाय ती कलाही आहे. वाचनाची पहिली श्रेणी म्हणजे प्राथमिक वाचन. 'त ला काना ता'. 'कमल नमन कर', 'ग गवत ग' असं वाचणं म्हणजे अक्षर ज्ञान ग्रहण करणं. मग आपण निरीक्षणात/पर्यवेक्षणात वाचू लागतो. प्रगट वाचायचं नि शिक्षक, पालकांनी दुरुस्त करायचं, या श्रेणीत उच्चार, विराम, अनुस्वार, उकार इ. चं भान येऊन ते प्रमाणित होतं. तिसरी श्रेणी असते विश्लेषी वाचनाची. स्वयंवाचन, स्वयंविकास असं या वाचनाचे स्वरूप असतं. पण आपल्या औपचारिक शिक्षणाने या वाचनाला स्मरणातच जेरबंद करून टाकलं असल्याने आपला वाचन विकास खुंटला. वाचनाची चौथी परी म्हणजे सत्यान्वेषी वस्तुनिष्ठ वाचन. ते आपणास चिंतन, मनन, तुलना इ. तून निष्कर्षाप्रत पोहोचवते.

 या पुस्तकाची एक मोठी मदत म्हणजे पुस्तकाची पारख करण्याचं कौशल्य वाचकात निर्माण करते. पुस्तकाचा अभ्यास कसा करावा, ते निवडावे कसे, लेखकाची माहिती, पुस्तकाचा संदेश, समीक्षा, यातून आपलं वाचन वाया जाऊ नये याची काळजी घेणारं हे पुस्तक वाचणं म्हणजे वाचनात वाया जाणाऱ्या वेळेची बचत करायची कला शिकणं होय. आणखी एक गोष्ट अशी की हे पुस्तक आपणास कथा, कादंबरी, साहित्य, इतिहास, विज्ञान, गणित, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र इ. विषयक पुस्तकं कशी वाचावी ते सविस्तर सांगतं. त्यासाठीचे स्वतंत्र अध्याय म्हणजे आपल्या आवडीच्या पुस्तक वाचनाचं हे प्रशिक्षणच आहे.

 हे पुस्तक बहुगुणी खरेच. यास जी परिशिष्टे जोडण्यात आली आहेत, ती आपले वाचन समृद्ध तर करतातच शिवाय प्रगल्भ, प्रौढही. म्हणजे असे की एका परिशिष्टात जगभरच्या श्रेष्ठ ग्रंथांची सूची आहे. सुमारे दीडशे ग्रंथांच्या या सूचीच्या कसोटीवर आपण आपल्या वाचनाची प्रत, आलेख, टक्केवारी स्वयंमूल्यमापन करून ठरवू शकतो. दुसऱ्या परिशिष्टात काही चाचण्या आहेत. त्या आधारे वरील चार प्रकारचे वाचन लक्षात घेता त्या श्रेणीतले आपले वाचन तपासता येते. त्यामुळे 'हाऊ टू रीड अ बुक' म्हणजे वाचन संबंधी स्वयंशोध व स्वयंमूल्यमापन ठरते.

 हे पुस्तक वाचत असताना पूर्वी वाचलेले एक पुस्तक माझ्या लक्षात आले. त्या पुस्तकाने मला वाचन हे कला नसून शास्त्र असल्याचं भान दिलं होतं. म्हणजे असे की वाचनाची गती वा वेग असतो. तो मोजता येतो. मोजता येत असल्याने वाढवता येतो. वाढला का ते पाहता येते. वाचकांचे वाचन दोष असतात. ते शोधण्याचे तंत्र, चाचण्या आहेत. हे दोष वाचिक, मानसिक, आकलन विषयक असतात. ते प्रयत्नपूर्वक कमी करता येतात किंवा घालवताही येतात. वाचन पट असतो. म्हणजे दृष्टिक्षेपात येणारी वाचन कक्षा रुंदावता येते. डोळ्याचा आवाका/वाचन क्षमता वाढविता येते. वाचनाची आदर्श पद्धत असते. त्यात बसावे कसे, डोळे व पुस्तक अंतर, पुस्तकाचा कोन, प्रकाश कोणत्या बाजूने हवा, डोळ्यावर प्रकाश का येऊ नये अशा कितीतरी शास्त्रशुद्ध वाचनाचे मार्गदर्शक करणारे अनेक ग्रंथ आहेत.

 जगातल्या अनेक विद्यापीठात पहिलीपासून ते पदव्युत्तर स्तरापर्यंतचे वाचन प्रशिक्षण अभ्यासक्रम आहेत. आपणाकडे याबाबत आपण प्राथमिक विचारही करत नाही. कारण आपण वाचनास अद्याप पोथी वाचन, पारायणच मानतो आहोत. अस्वस्थ करते ते वाचन, विचार करायला शिकवते ते वाचन, विवेक जागवते ते वाचन हे अजूनही आपल्या लेखी नाही. देव व दैव शब्द वाचा. सकृतदर्शनी केवळ एकाच मात्रेचा फरक आहे दोन शब्दात. अर्थात मात्र जमीन आसमानाचे अंतर आहे, हे उमगते फक्त प्रगल्भ वाचनाने.

◼◼

रोचक आठवणींची पाने - अशोक चोप्रा.
अनुवाद - ज्योत्स्ना नेने
प्रकाशक - इंडस सोर्स बुक्स, मलबार हिल्स, मुंबई -४००००६, प्रकाशन - २०१७ पृ. ३७७, किंमत - रु.४२५/-


रोचक आठवणींची पाने

 पुस्तक प्रकाशक असतो कोण? लेखक आणि विक्रेता, वाचकांना जोडणारा दुवा की नवोदित, समीक्षक, वाचकांचा मार्गदर्शक? चतुर व्यापारी की धूर्त उद्योजक? त्याला कोणत्याही एका साच्यात आपणास खचितच बसवता येणार नाही. पण एकमात्र खरे की तो कल्पनेच्या जगात विचरणारा सौदागर असला तरी त्याचे पाय व्यवहाराच्या घट्ट पठारावर उभे असतात. प्रकाशकांचं स्वतःचं असं विश्व असतं, तसं प्रत्येक भाषेचं पण. त्यातही इंग्रजी भाषेचं जग विचाराल तर अलिबाबाची गुहा, आकाशगंगा नि सप्तरंगी निसर्ग वैविध्य नि सौंदर्य! यात सतत चाळीस वर्षं इंबून राहणं म्हणजे रोज नव्या व्यक्ती, व्यवस्थांचं दर्शन. भारतीय इंग्रजी प्रकाशन जगतात विकास, हार्पर कॉलिन्स, हे हाउस, एशिया पब्लिशिंग, मेकॅनिकल इंडिया, इंडिया बुक्स या संस्थांत अशोक चोप्रा यांनी दीर्घकाळ व्यतीत केला. त्या काळात भेटलेले लेखक, कवी, गायक, चित्रकार, राजकारणी, धर्मप्रमुख, अभिनेते, सेनाधिकारी, मुत्सद्दी यांच्या आठवणींचं एक पुस्तक अशोक चोप्रांनी ते इंग्रजीत लिहिलं होतं. त्याचं नाव आहे, 'ए स्क्रॅप बुक ऑफ मेमरीज!' असं उपशीर्षक आहे, 'माय लाइफ विथ द रिच, द फेमस अँड द स्कँडल्स.' त्याचा मराठी अनुवाद केलाय ज्योत्स्ना नेने यांनी. हे पुस्तक भारतीय प्रकाशन व्यवसायावर क्ष किरण आहे नि अनेक मान्यवरांचा खरा चेहरा दाखवणारा आरसाही! चित्रकार एम्. एफ. हुसेन, एफ. एन्. सूझा, सतीश गुजराल, संपादक - पत्रकार खुशवंत सिंह, डॉम मोराएस, अभिनेते दिलीपकुमार, देव आनंद, आय. एस. जोहर, राष्ट्रपती झैलसिंह, सेलेब्रिटी शोभा डे, चित्रपट लेखक डॉमिनिक लॅपिएर आणि लॅरी कॉलिन्स, नोबेल विजेते दलाई लामा यांच्या रोचक आठवणींनी या पुस्तकाची पावणे चारशे पाने केव्हा भरून जातात समजत नाही. हे पुस्तक समजावतं लेखकांची लेखनाची असोशी, त्यांच्या लेखन तऱ्हा नि त्यांचा तऱ्हेवाईकपणाही! शिवाय हे पुस्तक सांगतं भारतीय प्रकाशन व्यवसाय कसा आहे? वाचकांना काय हवं असतं पुस्तकं कशी खपतात नि खपवली पण जातात? पाठ्यपुस्तकं, संदर्भ पुस्तकांचं जग कसं आहे? पुस्तकांचे खटले व त्यावरची बंदी. नवं ई-बुक मार्केट डिजिटल कसं होतंय, हे समजावून घेणं म्हणजे प्रकाशन विश्व आकाळणं!

 हे पुस्तक आपणास श्रीमंत, प्रसिद्ध माणसाचं नवं जग दाखवतं तसंच त्याचं पडद्याआडचं जीवन जगणं. 'संडे स्टैंडर्ड चे संपादक डॉम मोराएस 'मिसेस गांधी' नावाचं पुस्तक लिहितात व प्रकाशित पुस्तकाची पहिली प्रत स्वहस्ते इंदिरा गांधींना द्यायची म्हणून मोठ्या उमेदीने त्यांच्या निवासस्थानी दिल्लीला जातात तर इंदिरा गांधी 'पुस्तक? कसलं पुस्तक? मला नाही गरज त्याची. मी फालतू लिखाण वाचत नाही. घेऊन जा ते परत.' म्हणून त्यांची बोळवण करतात. हा असतो एका आणिबाणीतील एका पंतप्रधानांचा दर्प! संपादक कच्चे नसतात. ते आपले पुस्तक 'संडे' साप्ताहिकात क्रमशः प्रकाशित करतात. पुस्तकाची तडाखेबंद विक्री होते. चर्चा, समीक्षा सर्वत्र. हे वेगळे सांगायला नको की 'संडे'मध्ये आल्याने इंदिरा गांधींना वेळ काढून ते पुस्तक वाचणे भाग पडले.

 अशोक चोप्रा देव आनंदला आत्मकथा लिहिण्यास भरीस पाडतात. देव आनंदही झपाटून लिहितो. 'रोमान्स विथ द लाईफ'. पुस्तक पूर्ण झाल्यावर त्याला त्याची किंमत कळते. तो ते पुस्तक दुसऱ्या प्रकाशकास देतो. अर्थातच भरपूर पैसे घेऊन. गरोदरपणी गर्भपात हा प्रकाशन व्यवसायास येणारा वारंवार अनुभव.

 प्रख्यात उर्दू कादंबरीकार इस्मत चुगताई यांची कन्या रशदा. ती एम्. एफ्. हुसेनांची मैत्रीण. तिला एम. एफ. हुसेन यांच्या ठेवणीतल्या चिजा मिळतात. त्यातून अलौकिक कॉफीटेबल बुक आकारतं, 'इन कॉन्व्हर्सेशन विथ हुसेन पेंटिंग्ज'. सुमारे पावणे तीनशे पानाचं पुस्तक हुसेन यांच्या अंतरंग जीवन, विचारांनी भरलेलं नि भारलेलंही! पुस्तक अर्थात हुसेनला आवडलं. त्यांनी अशोक चोप्रांना आभाराचं पत्र पाठवलं ते सोबत होडीत बसलेल्या घाटदार सुंदरीच्या चित्रासह. गंमत अशी की पोहचतं फक्त पत्र. चित्र गायब! तशीच गोष्ट जगविख्यात चित्रकार एफ. एन. सूझांची. त्याचं आत्मचरित्र लिहून झालं. पुस्तकासाठी म्हणून सूझानी विदेशातून आपली मूळ चित्रं भक्कम विमा भरून भारतास पाठवली. कस्टमनी अश्लील म्हणून जप्त केली. संसदेत मोठा गदारोळ होतो. खटला चालतो. निकाल लागतो. चित्रं अश्लील नसल्याचं जाहीर होतं. पण एव्हाना सूझाचा उत्साह मावळतो. तो पुस्तक न काढायचं ठरवतो. आपण वाचक शासनाच्या लालफितीशाहीमुळे एका चांगल्या पुस्तकाला मुकतो आणि आज तर त्या चित्रकारालाही!

 हे पुस्तक वाचनीय, अवाचनीय मजकुरांनी भरलेले आहे. आंबट शौकिनांना हे पुस्तक फटीतून पाहायला आवडणारे जगही दाखवेल. मला या पुस्तकाने लेखक, लेखन, पुस्तकांची बाजारपेठ, प्रकाशन सोहळे, प्रकाशनाविषयी शासन दृष्टी, साहित्य शोध, प्रकाशन संक्रमण अशा अंगांनी नवं जग दाखवलं. हा लेखक माझ्या दृष्टीने भारतीय प्रकाशन व्यवसायाचा दीर्घकालीन भागीदार, साक्षीदार निरीक्षक म्हणून त्याची मते मननीय वाटली. आपली गोची आहे की आपले सनदी अधिकारी, राजकारणी फार कमी वाचतात व वाचलेल्यावर तर विचारच करीत नाहीत. त्यांना वाचायची सद्बुद्धी झाली तर आपला देश विकास योजनापेक्षा मनुष्य विकासानी लवकर समृद्ध, संपन्न होईल हे त्यांना कळेल.

 अशोक चोप्रा चांगले वाचक, लेखक होते म्हणून चांगले प्रकाशक होऊ शकले. जोसेफ ब्रॉडस्की, लिओ टॉलस्टॉय, अ‍ॅन हॉलंडर, मंटो, मोपांसा, अर्नेस्ट हेमिंग्वे, बोरिस पास्तरनाक वाचलेला असल्यामुळे भारतीय इंग्रजी लिखाणाची प्रत जोखण्याचं त्यांच्यात कौशल्य आलेलं. म्हणूनही या आठवणींचं एक तुलनात्मक महत्त्व आहे. त्यांची अन्य अनेक वाचनीय पुस्तके आहेत. हे पुस्तक लेखकांच्या लकबी, स्वभाव, खासगी जीवन समजावणारं म्हणून चक्षुर्वे सत्यम्। इस्मत चुगताईंना लिहिताना जवळ पत्त्यांचा डाव लागायचा, खुशवंत सिंह नव्या पुस्तकाची सुरुवात नव्या महागड्या पेननेच करायचे, अमृता प्रीतम बिछान्यावर लोळण घेऊन लिहायची, नाटककार बलवंत गार्गीना टेबलाशिवाय लिहिताच यायचं नाही, अर्नेस्ट

हेमिंग्वे उभा राहूनच लिहीत असे, ‘डॉक्टर झिवागो'चा लेखक बोरिस पास्करनाक फक्त रविवारीच इतरांना भेटे, ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट' या भारतीय स्वातंत्र्यावर आधारित पुस्तकाचे लेखक डॉनिमिक लॅपिएरना दौतीत टाक बुडवून लिहायची सवय होती. असं सारं वाचणं म्हणजे थोरा, मोठ्यांसह त्यांच्या मातीच्या पायांना पण पाहाणं!

◼◼

मंटो की श्रेष्ठ कहानियाँ - संपादक : देवेंद्र इस्सर इंद्रप्रस्थ प्रकाशन, कृष्णनगर, दिल्ली - ११००५१ प्रकाशन - १९९१, पृष्ठे - १९३, किंमत - ७५/-



मंटो की श्रेष्ठ कहानियाँ

 सादत हसन मंटो हा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील श्रेष्ठ उर्दू कथाकार. त्यांच्या सर्वश्रेष्ठ कथांचा संग्रह आहे, 'मंटो की श्रेष्ठ कहानियाँ'. या संग्रहाचं संपादन केले आहे उर्दू भाषेचे प्रसिद्ध समीक्षक देवेंद्र इस्सर यांनी. सदर संग्रहात मंटोच्या २२ कथा आहेत. सर्वच उल्लेखनीय असल्या तरी तमाशा, नया कानून, टोबा टेकसिंह, धुआँ, हतक, काली सलवार, ठंडा गोश्त, खोल दो या अत्यंत गाजलेल्या नि वाचनीय कथा आहेत. तुम्ही चांगले वाचक असाल तर तुम्हाला मंटो माहीत असायलाच हवा.

 मंटोचा जन्म समराला गावी ११ मे, १९१२ ला झाला. हे गाव पूर्व पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातलं. मंटोचे पूर्वज काश्मिरी. त्याचं शिक्षण, राहणं अमृतसर, अलीगढ, लाहोर, दिल्ली, मुंबईत झालं. त्याच्या जीवनाचा पूर्वार्ध भारतात तर उत्तरार्ध पाकिस्तानमध्ये गेला. स्वातंत्र्यपूर्व काळात तो भारतात होता. फाळणीनंतर पाकिस्तानला गेला. भारतात असताना तो आकाशवाणीमध्ये नाटककार म्हणून नोकरीस होता. अनेक वृत्तपत्रे, मासिकांत त्यांनी उमेदवारी केली असली, तरी त्याचा मूळ पिंड कथाकाराचा. कलात्मक व आशयगर्भ कथा लिहिणं ही मंटोची खासियत. नैतिकता आणि अश्लीलतेच्या पारंपरिक धारणांशी त्याचं उपजत वैरच होतं म्हणायचं. समाजाच्या रूढ कल्पनांविरोधी तो कथा लिहीत राहिल्याने कायम वादग्रस्त राहिला. 'काली सलवार', 'बू', 'ठंडा गोइत', 'धुआँ', 'खोल दो', 'ऊपर', 'नीचे और दरमियान' या त्याच्या कथांवर वाद होऊन खटले भरवण्यात आले तरी त्यांनी हार न मानता आपल्याला जे पटलं तेच लिहिलं. सन १९८४-८५ च्या काळात माझ्या मानगुटीवर मंटोचं भूत बसलं होतं. त्या काळात मी 'पैस' मासिकासाठी 'काली सलवार'चा अनुवाद केल्याचं आठवतं. मंटो हा जगातला एकमात्र कथाकार असावा की ज्याने मृत्यूपूर्वी आपल्या कबरीवरच्या शिलालेखावर काय कोरलं जावं हे लिहून ठेवलं होतं. विशेष म्हणजे लाहोरच्या मियाँ साहब कब्रस्तानमधील कबरीवर ते आजही आपणास वाचता येतं. ते असं - "इथे सादत हसन मंटोला दफन करण्यात आले. त्याच्या हृदयात कथालेखनाचे सारे गुण नि रहस्यं सामावलेली होती. तो अजूनही या कबरेखाली असा विचार करत पहुडलेला आहे की तो श्रेष्ठ कथाकार होता की परमेश्वर!" त्याचा मात्र अजून निर्णय होऊ शकलेला नाही.

 'मंटो की श्रेष्ठ कहानियाँ' मधील पहिली कथा 'तमाशा' हीच मंटोने लिहिलेली पहिली कथा होय. ती अमृतसरच्या साप्ताहिक 'खल्क' (निर्मिती) मध्ये प्रकाशित झालेली होती. यापूर्वी मंटोनी अनुवादक म्हणून मोठं लेखन केलं होतं. अनेक रशियन कथांची त्यांनी भाषांतरे केली होती. व्हिक्टर ह्यूगोची भाषांतरित कादंबरी 'सरगुजश्त-ए-असीर' उर्दूत प्रसिद्ध आहे. मंटोनी सॉमरसेट मॉम वाचलेला होता. त्याच्या कथांचा प्रभाव मंटोवर दिसतो. 'धुआँ', 'काली सलवार', 'हतक', 'ठंडा गोइत', 'बू' अशा या संग्रहातील कथा अश्लील म्हणून वादग्रस्त ठरल्या होत्या. पण आज त्या स्त्रीमुक्तीच्या मानल्या जातात. कथेमध्ये वेश्या जीवनाचं सूचक चित्रही त्या वेळी अश्लील मानलं जायचं. मंटो मात्र वेश्यांना 'माणूस' म्हणून पाहायचा. सामाजिक व्यवस्थेचं वास्तववादी चित्रण करणाऱ्या कथा म्हणून सदर संग्रहातील 'टोबा टेक सिंह', 'नया कानून', 'खोल दो' महत्त्वाच्या ठरतात. या संग्रहातील 'हतक'ची नायिका सुगंधी नि काली सलवार'ची सुल्ताना, 'टोबा टेक सिंह'चा पागल सिक्ख, 'नया कानून'चा मंगू कोचवान आपण कधीच विसरू शकत नाही, कारण त्यांचं जगणं, झगडणं कालातीत असतं म्हणून. मंटोच्या कथांचा अंत चकवा देणारा असायचा तसा सूचकही. त्यांच्या कथात हिंदू-मुस्लीम पात्रांमधील आत्मीय संबंध केवळ धार्मिक एकता नसायची तर मानवीय नाते संबंधांची ती एक न उकलणारी रेशमी लड असायची. उर्दू भाषांमधील या कथांची भाषांतरे कोणत्याही भाषांत होवोत, पण मंटोचं सामर्थ्य असतं ते कथा प्रसंगांच्या गुंतागुंतीत पात्रांच्या, चरित्रांच्या मानसिक गुंत्यात. ते तुम्हाला पकडता येणं महत्त्वाचं. ही अवघड कला अन्य कथाकारांना आव्हान वाटायचं. म्हणून स्पर्धक कथाकार मंटोपुढे हात टेकायचे. हिंदी कथाकार उपेंद्रनाथ अश्कांना तर 'दुश्मन' वाटायचा. मंटोचं खरं कथा कौशल्य आजमावायचं तर त्यांच्या लघुत्तम कथा वाचायला हव्यात. त्या 'स्पाह हाशिए' कथासंग्रहात वाचण्यास मिळतात. मंटोने आपल्या पडत्या काळात पोट भरण्यासाठी म्हणून नाटकं, श्रुतिका, एकांकिका लिहिल्या पण त्यात कथाकार मंटोची म्हणून ओळख असणारी 'नाही रे' वर्गाची, वंचितांची व्यथा नि वेदना अपवादाने अनुभवायला मिळते. मंटोच्या कथा म्हणजे माणसाचं सांगता नि सोसता न येणारं कारुण्य असतं.

 सादत हसन मंटोचं नि महाराष्ट्राचं जिवाभावाचं नातं आहे. सन १९३७ च्या दरम्यान मंटो पटकथाकार म्हणून मुंबईत होते. त्या काळात त्यांच्या कथांवर बेतलेले 'अपनी नगरिया', 'उजाला', 'चल चल रे नौजवान','आगोश', 'आठ दिन' सारखे हिंदी चित्रपट बाँबे टॉकीज, सरोज मूव्हीटोन, इंपिरियल फिल्मने काढले होते. मंटोचे एक 'कोल्हापूर कनेक्शन' मला माहीत आहे. मराठीतील प्रख्यात पहिले ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर जसे आंतरभारती लेखक होते, तसे आंतरभारती पटकथाकारही. सुमारे दोन एक डझन त्यांचे चित्रपट आहेत. ते मराठीशिवाय हिंदी, तमिळ नि तेलुगूमध्येही आहेत. पैकी सन १९४० साली प्रकाशित झालेला 'धर्मपत्नी' सिनेमा फेमस फिल्मसाठी चक्रपाणी यांनी निर्मिला होता. हंस पिक्चर्ससाठी याचं बरंचसं चित्रीकरण कोल्हापूर परिसरात झालेलं आहे. मूळ योजनेनुसार हा चित्रपट हिंदी, मराठी, उर्दू, गुजराती, तेलुगू अशा पाच भाषांत निघायचा होता. त्यातील मराठीची जबाबदारी भालजी पेंढारकरांवर सोपविण्यात आली होती. पैकी उर्दूची भाषांतरित पटकथा तयार करण्याची जबाबदारी उर्दू साहित्यिक अहमद नदीम कासमी यांच्यावर सोपविण्यात आली होती. दिल्लीच्या चावडी बाजार परिसरातील अल्ट्रा मॉडर्न सिनेमाच्या चौथ्या मजल्यावर खांडेकरांच्या 'धर्मपत्नी' पटकथेच्या उर्दू भाषांतराचे कार्य कासमी करीत व ते टाइप करण्याचे काम सादत हसन मंटो करीत. पुढे असे झाले की या उर्दू पटकथेची अनेक दृश्ये व संवाद मंटो यांनी उत्स्फूर्तपणे स्वतः भाषांतरित करत टाइप केली, इतके मंटो या पटकथेशी एकरूप झाले होते. पण दुर्दैवाने हा चित्रपट फक्त तेलुगू व तमिळमध्येच 

प्रकाशित झाला. मराठी, हिंदी, उर्दू पटकथा तयार होऊनही चित्रपटाची निर्मिती काही मतभेदांमुळे होऊ शकली नाही.

◼◼

दिवाळी अंक -
चित्र - २०१७


दिवाळी अंक - २०१७

 'साहित्यिक येति घरा, तोचि दिवाळी-दसरा' असं म्हणणाऱ्या महाराष्ट्रात दिवाळी अंकांची परंपरा मासिक 'मनोरंजन'ने सन १९०९ मध्ये सुरू केली. त्या मासिकाचे संपादक काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी पहिला दिवाळी अंक वाचकांच्या हाती वेळेत पडावा म्हणून त्याची छपाई चार छापखान्यात केली होती. महिन्याचा आठवडा नि आठवड्याचा दिवस केल्याशिवाय हे अंक वाचकांच्या हाती संपादक देऊ शकत नसतात हे वास्तव शंभर वर्षे उलटून गेली तरी बदललेले नाही. एवढे करूनही संपादक आपल्या हाती आलेले सर्व साहित्य व जाहिराती आपल्या अंकात देऊ शकत नसल्याने 'येथे जे पडले उणे, अधिक ते विद्वज्जनी साहिजे!' म्हणण्याची नामुष्की संपादकांवर नेहमीच येत असते. मासिक 'मनोरंजन' नंतर मासिक 'मौज'ने दिवाळी अंक प्रकाशित करायला प्रारंभ केल्यानंतर पहिल्या वर्षी २००, दुसऱ्या वर्षी ८२०० तर तिसऱ्या वर्षी (१९९४) तब्बल १२,२०० प्रतींची विक्रमी विक्री करणारा 'मौज' अंक मासिक रूपात नसला तरी दिवाळी वार्षिकाच्या रूपात शतकाकडे वाटचाल करत आहे.

 या वर्षीच्या 'मौज' दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ प्रख्यात चित्रकार नि 👏कलासमीक्षक प्रभाकर कोलतेंचे असून अंतरंग सजावट प्रख्यात चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णीच्या चित्रांनी साकारली आहे. प्रारंभीच आस्वाद घेणारा लेख असून तो वाचनीय अशासाठी आहे की हा लेख माणसांच्या जीवनात असलेले साहित्य, कला, संगीत, शिक्षण नि शिक्षकाचे महत्त्व अधोरेखित करतो. या अंकात न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचा काँग्रेसचे तत्कालीन सरचिटणीस व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी गांधीवादी कार्यकर्ते शंकरराव देव यांच्यावरील व्यक्तिविश्लेषण करणारा लेख आजच्या राजकीय कार्यकर्त्यांनी अशासाठी वाचायला हवा की माणसास केव्हातरी आपल्या कार्याचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो जी माणसं जीवनातलं सर्व छोट्या ओंजळीत गोळा करण्याचा आटापिटा करतात अशांची ओंजळच रिकामी राहात नाही तर जीवनही उपेक्षा नि अनुल्लेखाचं राहतं. यातील कथा, ललित लेख, कविता समकाल कवेत घेणाऱ्या नि म्हणून अधिक प्रभावी ठरणारा हा अंक मुळातूनच सर्व वाचायला हवा.

 साप्ताहिक 'साधना'ने यावर्षीही बालकुमार, युवा नि प्रौढांसाठी स्वतंत्र दिवाळी अंक प्रकाशित करून सर्व वयोगटातील वाचकांमध्ये वाचन वृत्ती विकासाचे ध्येय ठेवून तीन दिवाळी अंक प्रकाशित करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. साधना बालकुमार अंक हा विक्रमी विक्री करणारा दिवाळी अंक म्हणून महाराष्ट्रभर मान्य झाला असून यावर्षी त्याची विक्री नोटाबंदी व जीएसटीच्या अडथळ्याची शर्यत पार करूनही दोन लाख होते हे शिक्षक, शिक्षणाधिकारी करत असलेले सांस्कृतिक कर्तव्य म्हणून महत्त्वाचे ठरते. यावर्षी साधनेने बालकुमार अंकात ब्रिटन, केनिया, पाकिस्तान, कॅनडा, मलावी, भारत अशा वैविध्यपूर्ण देशांतील ८ ते १६ वयोगटातील आंतरराष्ट्रीय दखलपात्र बालकुमारांची यशोगाथा शब्दबद्ध करून 'तुमचा आदर्श तुमच्यापुढे' असा आरसा दाखवला आहे. युवा अंकात विनायक पाचलग, रामचंद्र गुहा, मनीषा कोईराला, चिमामांडा एन्गोझी प्रभृती मान्यवरांनी सोशल मीडिया, ज्योतिषाचे वैयर्थ्य, नृत्य, गणित, स्त्रीवादाविषयी युवकांचे प्रबोधन केले आहे तर प्रौढ अंकात साधनाने गोविंद तळवलकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष लेख प्रकाशित केले आहेत.

 दैनिकांची दिवाळी अंकांची परंपरा तशी अलीकडची पण अल्पावधीत 'लोकमत'च्या 'दीपोत्सव'ने 'दिवाळी अंकांचा राजा' बनण्याचा बहुमान संपादून 'मराठी दैनिक नंबर एक' प्रमाणे दिवाळी अंकातही अव्वल स्थान पटकावले आहे. आर्ट पेपरवर छपाई, उत्कृष्ट मजकूर व मांडणी ही या अंकाची जमेची बाजू. यातला 'पॅडमन' हा शर्मिष्ठा भोसलेंचा लेख सर्व ठळक मजकूर स्त्रियांनी पुरुषी सहिष्णुतेच्या अंगाने तर पुरुषांनी स्त्रीदाक्षिण्याच्या उदारतेने वाचायला हवा. 'इसरो' हा मेघना ढोकेंनी लिहिलेला लेख त्याची नुसती चित्रं पाहिली तरी भारताने क्षेपणास्त्र सज्जतेत किती दिव्यातून जात प्रगती साधली हे लक्षात येते. रामदेव बाबा नि आचार्य बालकृष्णावरील अपर्णा वेलणकरांनी आणि मंदार भारदे यांनी लिहिलेला 'कहो ना, करा' लेख आपल्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिकवणी म्हणून वाचायला हवा. 'बुमला पास', 'डिजिटल शाळा' लेख वाचकांचे डोळे उघडणारे ठरले आहेत. 'शेतात जेव्हा बीज पिकते' वाचले की शेतकरी आत्महत्येचा सतत कर्जमाफी हा उपाय नसून उपक्रमशील सातत्य हाच त्याचा खरा पर्याय असल्याचे उमजते. त्याचे अनुकरण मात्र महत्त्वाचे. दैनिक महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, तरुण भारत इ. दैनिकांचे विविध दिवाळी अंकही अनुभव, गाव, काश्मीर अशा वैविध्यपूर्ण माहिती, मनोरंजनाने सजलेले आहेत.

 हे वर्ष 'वसंत' मासिकाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. ते लक्षात घेऊन दिवाळी अंकात विज्ञान, समीक्षा, तंत्रज्ञान, शिक्षण असा फेर धरत दिवाळी अंकाने आपला विषय परीघ रुंद केला आहे. तर एका विशिष्ट विषयाला वाहिलेला दिवाळी अंक म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'ऋतुरंग' वार्षिकाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष. या वर्षीचा विषय आहे 'माझ्या मनातलं!' गुलजार, लता मंगेशकर, नितीन गडकरी, संदीप वासलेकर, गिरीश कुबेर, निखिल वागळे प्रभृती मान्यवरांच्या मनातलं वाचताना लक्षात येतं की माणसाचं मन ही अंत न लागणारी अलिबाची गुहा खरी!

 'ललित', 'दीपावली', 'हंस', 'उत्तम अनुवाद', 'शब्दमल्हार', 'शब्दशिवार' हे साहित्यिक मेजवानी देणारे दिवाळी अंक होत. मराठी साहित्यातून नागर जीवन ओसरत असल्याची खंत, संगीतातलं 'सफेद झूठ', उत्तमोत्तम भारतीय विविध भाषांतील साहित्यिक कृतींची भाषांतरे असा ऐवज या अंकातून हाती येतो नि "दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा'ची प्रचिती येते. दिवाळीच्या ऐन धामधुमीत सारं जग चकचकीत, झगझगीत, चमचमीत खरेदी करत चंदेरी जीवन व चटोर जीभ सुखद बनवत असताना मी मात्र अधिक सकस वाचायला कुठल्या दिवाळी अंकात काय मिळेल म्हणून अधाशी वाचन प्रेरणेने असोशीने दिवाळी अंकांची खरेदी करण्याचे सुजाण शहाणपण जपत राहिलो. कालच्या तुळशीच्या लग्नापर्यंतच्या दिवसात वरील दिवाळी अंकातील निवडक वाचू शकलो. चिवडा खाताना

त्यातील डाळ, शेंगदाणे, मनुके, खोब-याचे तुकडे वेचून खाणार्‍या छंदासारखाच हा छंदही. तो आनंद पुढच्या दिवाळीपर्यंत टिकतो हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव. दिवाळी अंक वार्षिक असल्याने वर्षभर पुरवून पुरवून वाचायचे असतात, ते नवी दिवाळी येण्यापर्यंत. दिवाळीत दिव्याने दुसरा दिवा पेटवतो तसे एका अंकाने दुस-या दिवाळी अंकाचा दुवा जोडत राहायचा तो 'घेतला वसा टाकू नये' न्यायाने.

◼◼

गुजरात फाईल्स - राणा आयुब. प्रकाशक - गुलमोहर किताब, मयुर विहार, दिल्ली - ११००९१ प्रकाशन - ऑगस्ट, २०१७ पृ. - २०९ किंमत - रु. २९५/-


गुजरात फाईल्स

 'गुजरात फाईल्स' हे सन २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या मुस्लीमविरोधी सामूहिक हत्येनंतर नरेंद्र मोदींच्या सत्ता दृढीकरणाचं वास्तव चित्रण करणारं पुस्तक. स्टिंग ऑपरेशन करून सतत राजकीय भूकंप घडवून आणणाऱ्या 'तहलका'च्या तरुण, साहसी महिला पत्रकार राणा आयुब यांनी ते लिहिलंय. राणा आयुब या 'तहलका' या शोध पत्राच्या वरिष्ठ संपादक. वय वर्षे १९. आपल्याच वयाच्या इशरत जहाँ या तरुणीस गुजरातचे पोलीस वरिष्ठ अधिकारी अनधिकार व अनधिकृतपणे अटक करून अज्ञातस्थळी ठेवतात. तिचा अमानुष छळ करतात. तिला नि अन्य जीशान जोहर, अहजद अली व जावेद शेख यांना लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा बनाव करून ते गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी आल्याचं कुभांड रचलं जातं नि एका खोट्या चकमकीत मारलं जातं. विशेष म्हणजे हे सारं गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांच्या इशारा नि आदेशावर होत राहात असतं. याची सर्वत्र दबक्या आवाजात चर्चा होत राहाते. पण त्या वेळी गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा इतका दबदबा असतो (जो आज देशभर पसरलेला आहे!) की सारेजण दबक्या आवाजात सारंकाही अलबेल नसल्याचं कुजबुजत असतात. पण मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची? असा प्रश्न असतो. राणा आयुब ही तरुण, साहसी महिला संपादक हा विडा उचलते. त्यालाही एक कारण घडतं. तिचे मित्र शाहीद आझमी जे आदिवासी हक्कांसाठी लढत असतात त्यांना नक्षलवादी घोषित करून तुरुंगात डांबण्यात येतं.

 हे पुस्तक राणा आयुब यांनी सन २०१० मध्ये गुजरातमध्ये नाव, पोषाख, व्यवसाय इ. बदलून मैथिली त्यागी नाव धारण करून माइक या इंग्रजी फिल्मकाराची साहाय्यक कॅमेरामन असल्याचं भासवून गुजरातमध्ये १९८२, १९८३, १९८५, १९८७ आणि बाबरी मशीद विध्वंसानंतर झालेली १९९२ ची दंगल अशा दशकभराच्या सततच्या धार्मिक दंगलीत प्रथम मुस्लिमांनी हिंदूंच्या केलेल्या हत्या आणि त्याला उत्तर म्हणून नंतरच्या काळात नियोजनपूर्वक घडवून आणलेल्या दंगलीत हिंदूंनी केलेल्या मुस्लीम हत्या, दंगली घडवून आणणारे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक, लोकप्रतिनिधी इत्यादींच्या स्टिंग ऑपरेशनचा भाग म्हणून गुप्त कॅमेरे व रेकॉर्डरच्या साहाय्याने घेतलेल्या मुलाखतींच्या आधारे लिहिलेलं हे पुस्तक. ते मुळात इंग्रजीत सन २०१६ मध्ये प्रकाशित झालं. 'गुजरात फाईल्स : अ‍ॅनॉटॉमी ऑफ एक कवर अप' हे त्याचं मूळ इंग्रजी नाव. राणा आयुब यांनी आपलं हे शोधपत्रिकेचा जागतिक आदर्श गणलं गेलेलं पुस्तक तयार झाल्यावर अनेक मान्यवर इंग्रजी प्रकाशकांच्या पुस्तक प्रकाशनासाठी मिनतवाऱ्या केल्या, उंबरे झिजवले पण हाती आला प्रत्येकाकडून नकारच. या आगीचा विस्तव कोणी आपल्या पदरात घ्यायला धजेना. शेवटी राणा आयुब पदरमोड करून स्वतःच्याच पैशाने पुस्तक प्रकाशित करतात. ते प्रकाशित होताच 'बिझनेस स्टैंडर्ड', 'मिंट ऑन संडे', 'द हिंदू', 'फर्स्ट पोस्ट', 'आऊटलूक', 'एनडीटीवी', 'लाइव मिंट', 'द वायरर', 'इंडिया रेजिस्टस', 'न्यूयॉर्क टाइम्स' इ. सर्व वृत्तपत्रे, नियतकालिके, वाहिन्या दखल घेऊन लेख, समीक्षा, चर्चा घडवून आणतात.

 याचं मुख्य कारण असतं हे पुस्तक जगापुढे जात नि धर्माच्या नावावर घडवून आणलेल्या दंगली आणि हत्यांचं सत्य पुराव्यासकट जगापुढे मांडतं. त्यामुळे जगाला 'हिंदू हृदय सम्राट', "हिंदू राष्ट्रीय गौरव', 'राष्ट्रीय नेता' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या आपल्या वर्तमान पंतप्रधानांचा खरा चेहरा दाखवतं. हे पुस्तक गुजरात नि गोध्रा दंगलीचा पर्दाफाश करणारं म्हणून जसं महत्त्वाचं तसंच भारताचं जातीय व धार्मिक कट्टरपण अधोरेखित करणारं म्हणूनही वाचनीय आणि मननीय. या पुस्तकास सन १९९२ च्या बाबरी मशीद विध्वंसानंतर मुंबईत उसळलेल्या जातीय, धार्मिक दंगलीची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांची प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी गंभीरपणे हे नोंदवले आहे की, 'येथून पुढे राज्य घटनेच्या आधारे स्थापन झालेल्या सरकार आणि संस्था, यंत्रणांनी दंग्यांच्या कारणांची अधिक गांभीर्याने व जबाबदारीने चौकशी करायला हवी.' या पुस्तकात गुजरात दंगलीच्या काळात पोलीस विभागातील सर्वोच्च अधिकारी जी. एल. सिंघल, राजन प्रियदर्शी, अशोक नारायण, उषा राडा, जी. सी. रायगर, पी. सी. पांडे, चक्रवर्ती प्रभृती मान्यवरांच्या स्टिंग ऑपरेशन करून छुप्या कॅमेरा नि रेकॉर्डरच्या आधारे घेतलेल्या मुलाखती आहेत. त्या वाचत असताना माझ्या कानात एक इंग्रजी वाक्य वारंवार घुमत, गुंजारव करत होतं - 'पॉवर करप्टस् अ‍ॅबसोल्यूट पॉवर करप्ट अ‍ॅबसोल्यूटली'. (सत्ता नेहमी भ्रष्टच असते. सत्ता जितकी निरंकुश तितकी ती बेबंद, अमर्याद भ्रष्ट असते.) राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री पोलीस उच्चाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जे बेकायदा काम करण्याचे आदेश देतात, ते वाचले की सरकार नि पोलीस यांच्या संगनमतामुळे लोकशाही, घटना, यंत्रणेवरचा विश्वास उडून जातो, हे मात्र खरं!

 गुजरात राज्याचे पोलीस एटीएस प्रमुख असलेले व ३० वर्षे गुजरातमध्ये आयपीएस सेवेतील उच्चपदे भूषविलेले राजन प्रियदर्शी यांना ते केवळ दलित म्हणून दलित वस्तीतच आजन्म राहावं लागतं. जातीय अस्पृश्यतेचे बळी जी. एल. सिंघल, श्री. वंजारी यांच्या यातील व्यथा वाचा. गावचा न्हावी त्यांचे केस कापायला नकार देतो, उच्चभ्रू वस्तीत त्यांना पद, पैसा, प्रतिष्ठा, सरंजाम असून जागा, घर मिळत नाही. हे कसलं 'इंडिया शायनिंग', 'भारत उदय', 'नवभारत' सारे शब्दखेळ नि बुडबुडे. आपण सारे भारतीय जात, धर्माबाबत अजून बोलघेवडे पुरोगामी आहोत. कृतीच्या क्षणी आपण पारंपरिक, कर्मठ सनातनी होतो. 'कहो ना, करो' हा आपल्या जीवन शैलीचा मूलमंत्र होईल त्या दिवशी आपली लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, विज्ञाननिष्ठा, विवेकवाद इ. मूल्ये आचारधर्म होणार. ती व्हावी याचा आग्रह धरणारे हे पुस्तक. ते कितीतरी बुद्रुक राजकारणी, सत्ताधीशांचं प्रतिमाभंजन करत त्यांचं वास्तविक खुर्द रूप उभं करतं.

 मूळ इंग्रजी पुस्तक कैसर राणा, राहुलकुमार, मुकुल सरल, मुकुल व्यास, एम. प्रभाकर, उपेंद्र स्वामी इ. सहकाऱ्यांनी अध्याय वाटून घेऊन अल्पावधीत हिंदीत आणल्याने बहुसंख्य भारतीय ते वाचू शकले. याचा

मराठी अनुवाद होईल तर महाराष्ट्र जागा होऊन प्रगल्भ होईल. मला त्या दिवसांची प्रतीक्षा आहे. हे पुस्तक वृत्तपत्र, वाहिन्यांतील सर्व पत्रकार, संवादक, संपादक, बातमीदार, कॅमेरामन, वृत्तांकनकार सर्वांना प्रेरक ठरणारे म्हणूनही ऐतिहासिक झाले आहे. राणा आयुब यांना पुलित्झर, बुकर मिळायला हवे, सत्य जिवंत असण्याची ती निशाणी ठरेल.

◼◼

मुक्तिबोध : एक व्यक्तित्व सही की तलाश में कृष्णा सोबती राजकमल प्रकाशन, सुभाषमार्ग, दरियागंज, नई दिल्ली - ११०००२ प्रकाशन - २०१७ पृ. १२४, किंमत - रु. ४९५/-



मुक्तिबोध

 हिंदीतील प्रख्यात कादंबरीकार कृष्णा सोबती यांना यावर्षीचा (२०१७) भारतीय ज्ञानपीठाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. हा भारतीय ज्ञानपीठाचा ५३ वा पुरस्कार होय. हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या हिंदीतील ११ व्या साहित्यिक. त्यांचं नि मराठीचं एक नातं आहे. हिंदीतील श्रेष्ठ कवी गजानन माधव मुक्तिबोध हे मूळ मराठी भाषी. पण शिकले, वाढले मध्यप्रदेशात. घरी मराठीत बोलत. समाजात हिंदी. लेखनाचा भाषिक क्रम मात्र इंग्रजी, हिंदी नंतर मराठी. मराठी साहित्यावरचं त्यांचं एक टिपण माझ्या संग्रही आहे. मात्र ते आहे इंग्रजीत लिहिलेलं. महाराष्ट्र स्वतंत्र राज्य होण्यापूर्वी मराठी भाषी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पाठ्यपुस्तकं लिहिलीत. ती पुस्तकं ते हिंदीत लिहीत. मग मराठी भाषांतर करून छापत, प्रकाशित करत. अशा या श्रेष्ठ हिंदी कवीचं हे जन्मशताब्दी वर्ष (२०१७) होय. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणाऱ्या कृष्णा सोबती यांनी जन्मशताब्दी निमित्त एक पुस्तक लिहिलं असून नुकतंच त्याचं प्रकाशन झालं. पुस्तकाचं नाव आहे, 'मुक्तिबोध : एक व्यक्तित्त्व सही की तलाश में'. कृष्णा सोबती यांनी मुक्तिबोधांच्या कवितेतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला शोध म्हणून या पुस्तकाचं असाधारण महत्त्व आहे. यापूर्वी कृष्णा सोबती यांनी 'हम हशमत' नावाचे तीन खंड प्रकाशित केले असून हिंदी, उर्दू, पंजाबी भाषेतील समकालीन सुमारे ५० साहित्यिकांचे व्यक्तिमत्त्व शब्दबद्ध करणाऱ्या आठवणी लिहिल्या आहेत. चेहरा, चित्रात्मकता नि चित्र शैली असं त्रिविध सौंदर्य लाभलेलं हे पुस्तक कृष्णा सोबतींच्या 'जिंदगीनामा', 'मित्रो मरजानी', 'डार से बिछुडी', 'ऐ लडकी' सारख्या कादंबऱ्यांप्रमाणेच श्रेष्ठ साहित्यकृती मानली जाते. 'मुक्तिबोध' पुस्तकाचा पोत या सर्वांपेक्षा आगळा, वेगळा म्हणायला हवा. कृष्णा सोबतींनी मुक्तिबोधांच्या कवितांच्या द्वारे त्यांचे विचार, काव्यत्व, चरित्र अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. लेखन शैलीच्या आत्मीयतेमुळे हे पुस्तक हृद्य संवाद बनले आहे.

 मुक्तिबोध : एक व्यक्तित्त्व सही की पहचान' पुस्तक कवी गजानन माधव मुक्तिबोध यांच्या काव्यातून त्यांच्या जीवन, विचार, धारणांचा आस्वादक शोध घेत व्यक्ती म्हणून मुक्तिबोध कसे होते यांचा धांडोळा घेते. विशेष म्हणजे हिंदीचा हा सर्वश्रेष्ठ कवी पण त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या कवितेचं एकही पुस्तक झालं नव्हतं. त्यांच्या कविता कल्पनासारख्या अनेक मासिकांत मात्र प्रकाशित होत राहिल्या. या कवीनं आपल्या काव्यातून सत्याचा वेध घेत मानव जीवन समजावलं-

 'अपनी अटैची (बॅग) सँभाल
 कर रखो,
 जमाना उचक्का (चोर) है।'

 ते अशा ओळींमधून. हा कवी सतत आतल्या आत अस्वस्थ असायचा. कारण होतं घरची गरिबी नि समाजातली बदमाशी. 'एक बेचैन भारतीय आत्मा' म्हणून ते आयुष्यभर कुढत राहिले. जग विचारावर जगावं असं त्यांना वाटत असे. हा आत्ममुग्ध कवी. पण त्याची आत्ममुग्धता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' अशा श्रेणीतली. कृष्णा सोबती यांनी त्याचं मार्मिक वर्णन करत या पुस्तकात मुक्तिबोधांची केलेली मीमांसा वाचनीय ठरते ती सोबतींच्या कवीविषयक आत्मीयतेमुळे 'हे हृदयीचे ते हृदयी' असा हा अद्वैत संवाद बनलेलं पुस्तक परकाया प्रवेशाचं दुर्लभ उदाहरण बनून पुढे येतं.

 कवी मुक्तिबोधांनी आपल्या समग्र काव्यातून मानवी मूल्यांचा आग्रह धरला. मानवीय प्रतिभेचं सौंदर्य म्हणजे त्यांचं विशाल हृदय! 'अनैतिकता नैतिकता की संतान है और अधर्म धर्म का पुत्र है।' सारख्या वाक्यातून ते कठोरपणे मानवीय मूल्य साचं वर्णन करत राहिले. ते स्वतःस परहितकारी व्यक्तिवादी (Trans Individual) मानत असत. 'मैं न साम्यवादी हूँ, न समाजवादी, सच तो यह है कि आज का समाज व्यक्ति की गुणवत्ता को कुचल देता है।' ज्या समाजात गुणवत्ता जिवंतपणे उपेक्षिली, पायी तुडवली जाते, त्या समाजास पतनोन्मुखच मानायला हवं. आपण मुक्तिबोधांकडे त्यांच्या जिवंतपणी दुर्लक्ष केल्याचं शल्य कृष्णा सोबतींनी या पुस्तकात ठायी ठायी व्यक्त केलंय. आपल्याकडे आपण नारायण सुर्वे, ग्रेस, आरती प्रभू यांची अशीच उपेक्षा केली. आणि सुरेश भटांचीपण! 'ऊपर उठना अपने से नीचे गिरना है।' असं मुक्तिबोध मानत असत.

 'आँखों में आँसू भर लाया
 मेरा जग से द्रोह हुआ पर
 मैं अपने से ही विद्रोही।'

 स्वतःशी विद्रोही, विद्रोह असलेल्याचं कुणाशीच सूत जमत नसतं. म्हणून संवेदनाशील माणसं समाजाशी फटकून जगत असतात. कुटुंब, कबिला, व्यक्ती, नागरिक, जातीयता, समाज समूह, राजकारण, दल, आखाडे कुणाशीच त्याचं देणं-घेणं नसतं. 'मुझे जान, पहचान, मैं मरा नहीं हूँ' म्हणणारा कवी जग सोडून गेलेल्याला पन्नास वर्षे झाली तरी तो आजही आपला वाटतो, आपल्यात असल्याचा भास हेच त्याच्या काव्य, विचारांचं आभासी वैभव!

 मराठी माणूस कडियल (कठोर) स्वभावाचा. मातीचं भांडं! कठोर पण धक्क्यानं तुटणारं, फुटणारं! सच्छिद्र पण एकत्व असलेलं. कृष्णा सोबतींना मराठी माणसाच्या या अगम्यतेचं कुतूहलमिश्रित आश्चर्य या पुस्तकात भरूनही उरलेलं! या कवीचं मोठेपण अधोरेखित करताना डॉ. प्रभाकर माचवे यांनी लिहून ठेवलं आहे, "मी त्यांना मायक्रोव्हस्की, ब्रेख्त, मर्ढेकर, नझरूल यांच्या तोडीचा कवी मानतो. त्यांचा मार्क्सवाद-मानवतावाद एका प्रामाणिक मानवी व्यथेचा शोध घेणाऱ्या व्यक्तीचा विश्वास आहे. तो नुसता पांघरलेला बुरखा नाही किंवा आग्रही, प्रचारकी जाहीरनामा नाही. ते अमर शेख किंवा कवी शिवमंगल सिंह 'सुमन', सुकांत भट्टाचार्य किंवा 'श्री.श्री.' प्रमाणे किंवा नागार्जुन, जोशसारखे 'जनवादी कवी' नाहीत. त्यांच्यात विंदांची बौद्धिकता किंवा विष्णू डे यांची साफसफाई नाही. फैजची सूक्ष्मताही नाही. पण एक विलक्षण अनघडपण खचितच आहे.

◼◼

भंगार - अशोक जाधव (गोसावी), मनोविकास प्रकाशन, पुणे प्रकाशन - १५ नोव्हेंबर, २०१७, पृ. १८६, किंमत - रु. २००/-



भंगार

 मराठी दलित, वंचित साहित्यात समाजातील उपेक्षितांनी आत्मकथने लिहून मोलाची भर घातली आहे. 'बलुतं', 'उपरा', 'उचल्या', कोल्ह्याट्याचं पोर', 'गबाळ', 'तीन दगडांची चूल' अशा आत्मकथनांनी डोंबारी, कैकाडी, कोल्हाटी, जोशी अशा समाजाचं जगणं चित्रित केलं. भटक्या नि विमुक्त जाती प्रवर्गातील गोसावी समाज यापैकी एक होय. गोसावी समाजाचं जीणं समजावणारी चित्तरकथा म्हणून या समाजात जन्माला आलेल्या, स्वतःच्या उपजत जिद्दीने शिकून शिक्षक झालेल्या अशोक जाधव यांनी 'भंगार' शीर्षकाने आपण भोगलेल्या व्यथा, वेदना शब्दबद्ध केल्या असून मराठी दलित आत्मकथेत त्यामुळे मोलाची भर पडली आहे.

 एन. टी. बी. प्रवर्गात आज गोसावी जमात अंतर्भूत आहे. या समाजाच्या जीवन, परंपरेबद्दल फारसं लिहिलं गेलं नसल्याने आपणास या समाज समूहाबद्दल फारशी माहिती नाही. विश्वकोश, समाज विज्ञान कोशातील या जात समूहाच्या उगम नि विकासाबद्दल फारच त्रोटक माहिती हाती येते. गोसावी, संन्यासी, बैरागी म्हणून परिचित हा जात संप्रदाय मूलतः भटका. त्यात तीर्थाटन नि भिक्षाटन करणारे दोन समुदाय दिसतात. अशोक जाधव यांनी ज्या समुदायाचं, जात पंचायतीचं जगणं चित्रित केलं आहे, तो वर्ग भिक्षाटन करणारा. हा समाज तीन दगडांच्या चुलीवर आपली भाकरी भाजतो. तीन थामल्यांवर (काठ्या) उभ्या केलेल्या पालात राहतो. पालाच्या वेशीवर त्यांच्या अस्मिता नि अस्तित्वाच्या अभिमान नि अभिवादनाचे झेंडे रोवलेले असतात. कधी काळी भीक मागून जगणारा हा समाज आज भंगार गोळा करून जगतो. 'हाय का रद्दीऽ, प्लॅस्टिकऽ s लोखंड ऽ' म्हणून पुकारा करत कधी काळी खंदाडी (मोठी झोळी) खांद्यावर लटकावून कागद, काच, कपडे, कचरा यातून विक्री योग्य वस्तू गोळा करून जगणारा हा समाज। गाई-गुरं सांभाळणारा गुराखी 'गोस्वामी' म्हणून ओळखला जायचा. त्याची एके काळी समाजात मोठी प्रतिष्ठा होती. कुंभमेळ्यात श्रेष्ठी म्हणून मिरवणारा हा वर्ग आज उकिरडा उपसून जगतो, हे त्यांच्या कर्माचे फळ नसून समाज उपेक्षेचा परिणाम होय, हे अशोक जाधव यांच्या 'भंगार' ने अधोरेखित केले आहे.

 पत्रा, लोखंड, काच, कागद, कपटे, प्लॅस्टिक गोळा करणारे गोसावी आजच्या समाजातील खरे 'स्वच्छता दूत'. पंचायती, नगरपालिका, महानगरपालिका कचरा उचलून कंपोस्ट खत तयार करतात, तर गोसावी समाज त्यातलं पुनर्प्रक्रियायोग्य (रिसायकल/रिप्रॉडक्शन) योग्य साहित्य गोळा करून पर्यावरण नियंत्रण व स्वच्छ राखण्याचं कार्य करतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी डोळे उघडणारा वस्तुपाठ म्हणूनही हे आत्मकथन डोळस ठरतं. उकिरड्यात नको म्हणून समाजाने टाकलेल्या चीजवस्तू गोसावी गोळा करतात व भंगारवाल्याला विकून गुजराण करतात. हे काम गोसावी कुटुंबातील मुलं, मुली, महिला करतात. शिवाय ते घरोघरी, दारोदारी भीकही मागतात. घरचा पुरुष मात्र आयत्या बिळातला नागोबा. तो दारू ढोसत, जुगार खेळत आयुष्य काढतो. भंगारातून आलेल्या पैशातून छाटण, मस्कांड (खाटक्याकडे विकलं न जाणारं) म्हणजे मटण आणायचं. ते बायका, पोरांच्या श्रमातलं. दारू ढोसायची, छाटण-मस्कांडावर आडवा हात मारायचा नि चढली की हे सगळं आणून देणाऱ्या बायका-पोरांनाच शिवीगाळ करत झोडपायचं हा या समाज पुरुषांचा रोजचा पुरुषार्थ नि दिनक्रम!

 सूर्य उगवण्याआधी उकिरड्यावर उगवणारी गोसावी माउली नि तिची लेकरं दिवस बुडेपर्यंत कचरा कुंड्या चिवडत राहतात. अंग अक्षरशः कुजतं ते कुत्री, डुकरांच्या तावडीतून जगण्याची शिदोरी गोळा करताना. अशा स्थितीत अशोक बापाकडे 'मे साळा शिकवारो' (मी शाळेत शिकणार!) असा हट्ट धरतो. 'भीक, भंगार काय तुझा बाप गोळा करणार काय?' असा प्रतिप्रश्न करणारा जन्मदाता बाप पोराला बदाबदा बडवतो. पोरगं न बोलता मार खातं तसं न बोलता चोरून शिकत राहतं. शाळेपूर्वी व नंतरच्या वेळात भीक, भंगार गोळा करून बापाची भर करत राहतो. शाळेतले गुरुजी या पोराची हुशारी पाहून पदरमोड करून दफ्तर, गणवेश, फी भरतात. हा स्कॉलरशिप मिळवून हायस्कूल, कॉलेज, बी. एड्. करून शिक्षक होतो, तरी न ते गावाच्या गावी की घराच्या दारी. उपेक्षा, संघर्ष पाचवीला पुजलेला अशोक जात पंचायतीला विरोध करत स्वतःचं लग्न स्वतःच्या निवडीने व हिमतीने करतो म्हणून बहिष्कृत होतो.

 अशोक हिम्मत हरत नाही. जात पंचायतीच्या नाकावर टिच्चून बहिणीला डॉक्टर करतो. जात पंचायतीविरोधात कोर्टात जातो. जात पंचायत विरोधी कायदा होण्यापूर्वीच आपल्या हक्काची लढाई जिंकतो. समाजातील शिकलेला वर्ग अशोकच्या बाजूने उभा राहतो व जात पंचायत मोडीत काढून स्त्रियांना स्वातंत्र्य बहाल करतो. या समाजात स्त्री जन्मतःच पापी समजली जाते. नवरा मनाला येईल तेव्हा सोडचिठ्ठी देतो. जात पंचायत आपल्या मर्जीने तिचा 'धारूच्यो' करणार. म्हणजे तिच्याकडून (बापाकडून) दंड वसूल करणार नि तिचं लग्न दुसऱ्याशी करून देणार. हा पुनर्विवाह अधिकार जात पंचायतीचा. स्त्रीनं तो गुमान मानायचा. सांगेल त्याच्याशी सोयरीक करायची. जात पंचायतीचे पंच म्हणजे 'पंच परमेश्वर'. ते कोणाही स्त्रीस संशय, पैसे (लाच) इ. मुळे 'उभायत' ठरवतात. उभायत ठरवल्या गेलेल्या स्त्रीच्या गळ्यात नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र राहतं, पण ती नवऱ्याची राहात नाही. नवरा तिला नांदवत नाही. ती विवाहित विधवा जिणं जगते. ती आकर्षक दिसू नये म्हणून तिनं दातवण लावून सक्तीने आपले दात आपल्या हाताने काळे करायचे. या नि अशा अनेक डागण्या तिला दिल्या जातात, ते वाचताना हा महाराष्ट्र, भारत स्वतंत्र आहे यावर नि इथे कायदा, व्यवस्था, सामाजिक न्याय, मानव अधिकार, समता आहे यावर विश्वासच बसत नाही.

 भंगारची भाषा गोसावी समाजाची. हिंदी, मारवाडी, राजस्थानी, गुजरातीचा तिच्यात मेळ. कारण हा सारा मेळा या प्रांतातून भटकत इथे आलेला. थारो, मारो, खारो अशा ओकारांत क्रियांची ही भाषा बंजारा समाज असण्याची खूण. शिव्या-शाप, शौर्य-क्रौर्य, दुःख-दारिद्रय साऱ्याला छेद-भेद देत अशोक जाधव राधानगरी, करवीर, हातकणंगले अशा शाळात

फुटबॉलप्रमाणे रोज अतिरिक्त होत भटकत जगत आहेत. मायबाप सरकारच्या शिक्षण खात्याने त्यांना भटकत ठेवण्याचा विडा उचलला तरी अशोक जाधव आज इचलकरंजीच्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये स्थिर, सन्मानित, आदर्श शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या गळ्यातले ताईत आहेत.

◼◼

कॉ. गोविंद पानसरे समग्र वाङ्मय खण्ड - २ संपा. डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. रणधीर शिंदे प्रकाशक - लोकवाङ्मय गृह, मुंबई प्रकाशन - २०१७ पृष्ठे -४००, किंमत - ४००/-



कॉ. गोविंद पानसरे समग्र वाङ्मय (खण्ड - २)

 कॉ. गोविंद पानसरे समग्र वाङ्मय खण्ड - २ चे प्रकाशन नुकतेच लोकवाङ्मय गृह, मुंबईतर्फे आदरपूर्वक करण्यात आले आहे. त्याचे संपादन डॉ. अशोक चौसाळकर व डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे. कॉ. गोविंद पानसरे समग्र वाङ्मय खण्ड - १ चे प्रकाशन कॉ. गोविंद पानसरे यांच्या सन २०१० मध्ये संपन्न झालेल्या अमृत महोत्सवानिमित्त करण्यात आले होते. त्याचे संपादन डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले होते.

 पहिल्या खंडात कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या छोट्या-मोठ्या २२ पुस्तिकांचे संकलन आहे. तर खण्ड - २ मध्ये विविध विषयांवरील लेखांचे संकलन आहे. दुसऱ्या खंडाच्या संपादकद्वयांनी सर्व लेख वाचून त्यांची वर्गवारी आठ भागात केली आहे. पहिले सात भाग लेखांचे असून आठवा भाग तीन साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणांचा आहे. समाजवाद आणि लोकशाही, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि कामगार चळवळ, जात आणि वर्ग, जागतिकीकरण आणि सामाजिक न्याय, शिक्षण, इतिहास आणि संकीर्ण अशा वर्गवारीत विभागलेले लेख वाचत असताना लक्षात येते की हे लेखन समाज प्रबोधनाच्या तळमळीतून व ध्यासातून झाले आहे. त्या लेखांचा पाया कम्युनिस्ट विचारसरणी आहे. पण हे लेखन पठडीबद्ध नाही. काळाची पावले ओळखून आपले तत्त्वज्ञान नव्या आव्हानांना कसे तोंड देऊ शकेल याचे कॉ. गोविंद पानसरे यांचे स्वतःचे म्हणून स्वतंत्र आकलन असायचे. त्याचे प्रतिबिंब या समग्र लेखनात आहे.

 ते समाजवादी लोकशाही मानत. भांडवलधार्जिणी लोकशाही म्हणजे विषमता व शोषणास आमंत्रण! त्यामुळे जागतिकीकरणास त्यांचा विरोध होता. नववसाहतवादी वाढत्या विळख्याचे त्यांना भान होते. म्हणून हक्क हिरावून घेणाऱ्या खासगीकरणासही त्यांचा विरोध होता. लोकशाही जनहिताची असली पाहिजे यावर ते ठाम होते. या सर्वांचे प्रतिबिंब या वाङ्मय खंडातील सर्व लेखांमध्ये दिसून येते. 'लोकजागृती, लोकसंघटन, लोकप्रबोधन आणि लोकसंघर्ष' हे लोकशाहीतील अत्यावश्यक व अपरिहार्य घटक आहेत.' निवडणूक त्याचा मार्ग असल्याने ती निकोप वातावरणात व्हायला हवी असे प्रतिपादन त्यांनी लोकशाहीविषयक लेखांमधून केले आहे.

 कॉ. गोविंद पानसरे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कामगार संगठन करून चळवळीद्वारे अनेक हक्क मिळवले ते जागतिकीकरणात हिरावून घेतले जात असल्याचे वैषम्य त्यांच्या मनात होते. संघटित कामगार चळवळीपुढील खासगीकरणाने उभी केलेली आव्हाने ते जाणून होते. तद्वतच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्राधान्याने संगठन व चळवळ उभारली पाहिजे म्हणून त्यांचा प्रयत्न असायचा. मोलकरणी नि आशा कर्मचारी संगठन उभारून नव्या स्त्री कामगार वर्गाबद्दल ते विशेष आग्रही होते. पक्ष व संघटना यात अद्वैतता निर्माण करू इच्छिणाऱ्या या कॉम्रेडला सतत नवे प्रश्न अस्वस्थ करत. भारत प्रजासत्ताक झाल्यापासून ते कामगार चळवळ व संगठनेत सक्रिय होते. पण त्याच्यातील लेखक जागा झाला तो आणिबाणीत. नव्या शतकाचे नवे भान त्यांच्या संगठन विषयक लेखनात आहे.

 जात आणि धर्म यात त्यांनी वर्ग लढा प्रमाण मानला. जात विचार केवळ विभाजन नसते तर श्रेष्ठ/कनिष्ठ अशा उतरंडीवर तो विचार उभा असल्याने आर्थिक विकासाशिवाय विषमता व शोषणमुक्ती शक्य नाही हे ते जाणून होते. समतेसाठी उभय स्तरावर समतेची चळवळ व संगठन हाच त्यावर उपाय ते मानत. 'जातीय विषमता, वर्गीय विषमता आणि स्त्री-पुरुष विषमता या सर्व विषमतांविरुद्ध एकत्र संघर्ष करून संपवता येतील.' असा आशावाद ते आपल्या लेखांमधून व्यक्त करतात.

 जागतिकीकरणाने सामाजिक न्यायापुढे नवे प्रश्न निर्माण केले आहेत. औद्योगिक सेझने शेतकरी आत्महत्या करत आहे. भांडवलदारी व्यवस्था सामान्यांचे जिणे जिकिरीचे करते आहे. सहकार संपुष्टात येऊन भांडवलदार पुन्हा मालक होत आहे. शेतकरी व कामगार यांच्या मुळावर उठलेले जागतिकीकरण टोल, बीओटी, आऊट सोर्सिंग, कॉन्ट्रॅक्ट लेबर इ. माध्यमातून सामान्यांचे जगणे अशाश्वत करते आहे. हा हल्ला परतवून लावायचा तर लोकचळवळ हाच त्यावरील परिणामकारक उपाय असल्याची खात्री झाल्याने सन १९९० नंतर त्यांनी चळवळ केंद्री प्रबोधनाच्या मार्गाचे समर्थन आपल्या उत्तर कालखंडातील समग्र वाङ्मयात केलेले दिसते.

 व्यापार, उद्योग, सहकार, शेतीच नाही तर शिक्षणासही खाजगीकरणाचे ग्रहण लागले असल्याचे कॉ. गोविंद पानसरे यांनी आपल्या विविध लेखांमधून लक्षात आणून दिले आहे. शिक्षण व इतिहास यांचा मेळ घालत त्यांनी केलेले लेखन अधिक वस्तुनिष्ठ व वैज्ञानिक झाले आहे. धर्मनिरपेक्षता, बहुजनवाद, विवेकवाद इ. मूल्यांवरील त्यांची वाढती आस्था हे लेखक म्हणून कॉ. गोविंद पानसरे यांच्या विचार विकासाचे निदर्शक होय. नेत्यांना जातीय संकीर्णतेत बांधण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल त्यांची विधाने व लेखन याचीच साक्ष देणारे सिद्ध होते.

 समकालीन प्रश्न, प्रसंग लक्षात घेऊन प्रतिक्रियात्मक व्यवहार व लेखन हे त्यांच्या पारदर्शी व्यक्तिमत्त्वावर मोहर उठवणाऱ्या गोष्टी होत. माहिती अधिकार, परकीय गुंतवणूक, परप्रांतीयांचा प्रश्न यावर ते कधीच बघे राहिले नाहीत. जग काही करो न करो, मी प्रक्षिप्त राहिले पाहिजे अशी धडपड या साऱ्या लेखनामागे दिसून येते. तिथे कॉ. गोविंद पानसरे व त्यांचे समग्र वाङ्मय इतरेजनांपेक्षा वेगळे सिद्ध होते.

 डॉ. अशोक चौसाळकर व डॉ. रणधीर शिंदे यांनी या खंडास लिहिलेली प्रस्तावना म्हणजे दुसऱ्या खंडाच्या विषय व आशयाची साक्षेपी उकल होय. समग्र वाङ्मय खंड, गौरविका, गौरव ग्रंथ, आरपार कॉम्रेड, कोल्हापुरातील सामाजिक व राजकीय चळवळी अशा अनेक ग्रंथ संदर्भातून उभे राहणारे कॉ. गोविंद पानसरे व्यक्तीपेक्षा विचार व व्यवस्था म्हणून समाजहितैषी गृहस्थ होते. सतत व्यवस्था व समाजाबद्दल असंतुष्ट व अस्वस्थ असणारे गोविंद पानसरे बिघडलेली घडी व्यवस्थित करू पाहणारे चळवळे कार्यकर्ते नि कळवळे साहित्यिक होते. म्हणून कॉ. गोविंद पानसरे समग्र वाङ्मय खंड - २' वाचणे म्हणजे समाज कसोटीवर स्वतःस पारखण्याचा वस्तुपाठ ठरतो. तो एकदा प्रत्येकाने करावा.

◼◼

शतकाची विचारशैली (खंड - ४) संपादक - डॉ. रमेश धोंगडे प्रकाशन - दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. शनिवार पेठ, पुणे - ४११०३० प्रकाशन - २०१७ पृष्ठे - ८४८, किंमत - १०००/-



शतकाची विचारशैली (खंड - ४)

 कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून सन २००९ ते २०१२ या कालखंडात कार्य केलेले लक्ष्मीकांत देशमुख हे पुढील वर्षी बडोदा (गुजरात) येथे संपन्न होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. सदर संमेलन सुरू झाल्यापासून (सन १८७८) संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र समाजास उद्देशून अध्यक्षीय भाषण करत आले आहेत. मराठी भाषा व साहित्याबद्दल चिंता नि चिंतन व्यक्त करणारी ही भाषणे मराठी साहित्याच्या इतिहासातील महत्त्वाची पाने ठरत आली आहेत. या भाषणांना गंभीरपणे घेऊन त्यावर वेळोवेळी वाद-विवाद, चर्चासत्रे, संशोधन प्रबंध, समीक्षा ग्रंथ इत्यादीद्वारे विचार मंथन होत आले आहे. "शतकाची विचारशैली' नावाने संमेलनाध्यक्षांच्या भाषणांची चिकित्सा करणारे तीन खंड (प्रत्येकी सुमारे ७५० पृष्ठे) सन २००२ पासून क्रमशः प्रकाशित होत आले आहेत. त्यात सुमारे ७५ अध्यक्षीय भाषणांची समीक्षा करण्यात आली होती.

 शतकाची विचारशैली (खण्ड - ४) चे प्रकाशन या वर्षी झाले आहे. दिलीपराज प्रकाशन, पुणे यांनी हे खंड प्रकाशित केले असून त्याचे संपादन डॉ. रमेश धोंगडे यांनी केले आहे. चौथ्या खंडात एकविसाव्या शतकात संपन्न सतरा संमेलनाध्यक्षांच्या भाषणांवर विचार करण्यात आला आहे. समकालीन मराठी भाषा व साहित्य चिंतनाचे प्रतिबिंब म्हणून या अध्यक्षीय भाषणांचे मोठे महत्त्व असते. भाषा व संस्कृती संबंध, साहित्य व राजकारण, मराठी साहित्य परंपरा आणि इतिहास, मराठी भाषा शिक्षण व लोकव्यवहार, संमेलनांचे महत्त्व, अभिजात जागतिक साहित्यात मराठीचे स्थान, मराठी ज्ञानभाषा कशी होईल, शिक्षण माध्यम, शासन व साहित्य अशा अनेक विषयांवर या अध्यक्षीय भाषणांमधून खल होत आला आहे. सन १८७८ ते १९०७ पर्यंतच्या ५ संमेलनांची लिखित भाषणे उपलब्ध नसली, तरी सारसंक्षेपाने त्यांचे विचार उपलब्ध आहेत. लिखित भाषणे उपलब्ध असली, तरी ती बाजूला ठेवून अनेक अध्यक्षांनी त्या आधारे उत्स्फूर्त भाषणे केल्याचे दिसून येते. काही संमेलन अध्यक्षांची भाषणे उपलब्ध आहेत पण काही अपरिहार्य कारणांमुळे ती होऊ शकलेली नाहीत. उदाहरणार्थ, डॉ. आनंद यादव यांचे सन २००९ चे महाबळेश्वर संमेलन भाषण. अशा अंगानेही या भाषणांचा आपला असा इतिहास आहे.

 पहिल्या तीन खंडातील सुमारे पाऊणशे भाषणे वाचत असताना लक्षात येते की स्वातंत्र्यपूर्व काळातील अध्यक्षीय भाषणे मराठी भाषा व साहित्याची स्वप्ने पाहणारी आहेत. इंग्रजी साहित्यापासून प्रेरणा घेऊन आपले साहित्य सरस करण्याची धडपड यात दिसते. तसेच अनुवादापासून मुक्त होऊन स्वतंत्र, एतद्देशीय प्रश्न व समस्यांची उकल मराठी साहित्य कसे करेल याची चिंता वाहताना ती दिसतात. तद्वतच स्वातंत्र्योत्तर काळातील भाषणांमधून मराठी भाषा व साहित्यातील स्थित्यंतरांचे प्रतिबिंब आढळते. सुमारे दीडशे एक प्रश्नांचा उहापोह या भाषणांमधून झालेला आहे. सर्व भाषणे समकालीन भाषा, साहित्य, संस्कृती प्रश्नांची प्रतिक्रिया होत. आणिबाणीचा काळ असो वा वर्तमान असहिष्णुतेचा प्रश्न असो. साहित्यिक प्रतिक्रियात्मक असतात. पण विद्रोह अपवाद! यातून साहित्यिकांच्या प्रतिमेचा प्रत्यय येतो. मराठी भाषा व साहित्यात अल्पसंतुष्टता असल्याने ती भाषणे आत्मस्तुती व आत्मगौरवात अडकलेली आढळतात. त्यात 'आंतरभारती', 'विश्वभारती', 'विश्वसाहित्य' असे भान आढळत नाही. परिणामस्वरूपी मराठी भाषा व साहित्याचा दर्जा भारतीय साहित्यात काय आहे, याची कठोर चिकित्सा अभावाने दिसते. मराठी साहित्य हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित होतात. या वा अन्य भारतीय भाषांतील साहित्यकृतींची भाषांतरे मराठीत होत असतात. पण त्यांच्या अभ्यासातून प्रयोगशीलतेद्वारे आपले मराठी साहित्य अभिजाततेकडे अग्रेसर होत आहे असे म्हणावयाला फारसा वस्तुनिष्ठ वाव प्रत्ययास येत नाही. जागतिकीकरण, माहिती व तंत्रज्ञान यांच्या पार्श्वभूमीवर मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध होते असे म्हणणे धाडसाचे ठरावे. कारण मराठीचा इंटरनेट, वेब, सॉफ्टवेअर इत्यादी रूपातील वावर नि वापर अन्य भाषांच्या तुलनेने अल्प आहे. मराठी साहित्यिकांची संकेतस्थळे नसणे, मराठी साहित्यिकांची माहिती विकिपिडीयावर सुमार स्वरूपात असणे, मराठी वेब मासिके अपवाद असणे ही वानगी म्हणून सांगता येतील. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षांच्या भाषणात जागतिकीकरणानंतर जी सजगता दिसायला हवी होती, तिचा अभाव हे आपल्या साहित्य, भाषाविषयक कासव गतीचेच निदर्शक नव्हे काय?

 या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा 'शतकाची विचारशैली' (खंड - ४) मधील भाषणे वाचू लागतो तेव्हा लक्षात येते की एकविसाव्या शतकातील १७ भाषणे इंग्रजीमुळे मराठीच्या पिछेहाटीच्या भयगंडाने ग्रासलेली आहेत. भाषा वाचायची असेल तर तिच्यात दैनंदिन व्यवहार होणे, शिक्षण होणे, ती माध्यमांची भाषा होणे ही पूर्वअट असते. लेखनाचा क्रम त्यानंतरचा. ललित साहित्य कलात्मक असते. ती एक तार्किक, कल्पनात्मक निर्मिती असते. वैचारिक आणि वास्तववादी साहित्य दाहक असते. ते जीवनोपयोगी असते. पण कल्पितात जी सर्जनात्मकता असते तिला पायबंद होत राहण्यातून नवनिर्मितीक्षमतेचा क्षय वा लोप हे वर्तमान मराठी भाषा व साहित्यापुढचे खरे आव्हान आहे, त्याची फारशी चर्चा चौथ्या खंडातील भाषणात होताना दिसत नाही. उल्लेख म्हणजे उपाय चर्चा नव्हे. यासाठी जे साहित्यिक पर्यावरण लागते त्याचा अभाव आपल्या चिंतेचा विषय व्हावा. मराठी प्रकाशक कविता संग्रह, नाटके प्रकाशित करण्यास नाखूष असतात. कथा, कादंबऱ्यांपेक्षा कविता नि नाटक हे साहित्य प्रकार प्रतिभेच्या अंगाने सरस असतात, हे कोण नाकारेल? ११ कोटी मराठी भाषिकांत १ कोटी लोकही वाचक बनत नसतील तर पूर्वी मराठी साहित्याची आवृत्ती १००० प्रतींची असायची, ती आता 'प्रिंट ऑन डिमांड' पद्धतीमुळे ५०० वर येऊन ठेपली आहे. मराठी अभिमान गीत गाणे अस्तित्व नि अस्मिता म्हणून जितके महत्त्वाचे तितकेच विकत घेऊन वाचणे महत्त्वाचे. 'पुस्तकाचा गाव' अनुकरणीयच. पण 'पुस्तकाचे घर' प्रत्येक घर बनणे तितकेच अनिवार्य ना? हे सारे 'शतकाची विचारशैली' खंड चारमधील 'वैचारिक सापळे' म्हणून दिलेला मजकूर आपणास समजावतो. नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष 

लक्ष्मीकांत देशमुखांचे आगामी अध्यक्षीय भाषण मराठी भाषा व साहित्याचा वर्तमान चक्रव्यूह भेदणारे ठरावे अशी आशा करत निवडीबद्दल शुभचिंतन व नवविचारांबद्दल असीम आकांक्षा, अपेक्षा करत पूर्णविराम.

◼◼

निर्बाचित कबिता तसलिमा नसरीन अनुवाद - मृणालिनी गडकरी प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे प्रकाशन - २००० पृष्ठे - ११३, किंमत - रु. ७०/-



निर्बाचित कबिता

 परवा पुस्तकांच्या शोधात तसलिमा नसरिनचा काव्यसंग्रह “निर्वाचित कविता' हाती आला. माझ्याकडे तिची सर्व पुस्तके तिच्या सहीने भेट मिळालेली आहेत. पण याच एका पुस्तकावर मात्र तिने स्वहस्ताक्षरात 'with love' अशी मोहर उठवलेली आहे. याचा इतकाच अर्थ आहे की, ते तिचे आवडते पुस्तक आहे, बाकी काही नाही. 'निर्बाचित' शब्द बंगाली. मराठीत त्याचा अर्थ होतो 'निवडक'. सन १९८० च्या सुमारास त्या कविता लिहू लागल्या. १९८२-१९९३ या दशकात त्यांचे सहा काव्यसंग्रह प्रकाशित झाले. त्यांचे समग्र साहित्य म्हणजे स्त्रीत्वाचा घेतलेला शोध होय! तशाच कविताही! काहींना त्या पुरुषविरोधी वाटतात. वाटतं त्या सतत पुरुषास आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की आजवर पुरुषाने स्त्रीस वस्तू, पशू, उपभोगाचे साधन म्हणून तिच्याकडे पाहिले आहे. तिची कविता स्त्रीस मनुष्य बनवण्याची विनवणी नसून मागणी आहे. तो जोगवा खचितच नाही. असेल तर अन्यायाला फोडलेली वाचा आहे. नि ती स्त्री हक्काचा जाहीरनामा आहे. तो पुरुषी मानसिकतेविरुद्ध स्त्रीने पुकारलेला जिहाद आहे. 'निर्बाचित कबिता' (१९९३) शिवाय 'निर्बासित बाहिरे अंतर' (१९८९), 'आमार किछु आय असे ना' (१९९०), 'अतले अंतरिण' (१९९०), 'बलिकार गोल्लाछुट' (१९९२) असे अन्य कवितासंग्रह आहेत. प्रातिनिधिक कवितासंग्रह म्हणून 'निर्वाचित कबिता'चे महत्त्व असून प्रसिद्ध बंगाली अनुवादक मृणालिनी गडकरी यांनी या कवितांचा समर्पक मराठी अनुवाद केला आहे.

 या सर्व कवितांमधून स्त्रीची तगमग स्पष्ट होते. स्त्रियांवर होणारे अन्याय, स्त्रियांची होणारी प्रतारणा, कुचंबणा, घुसमट, बंधने या सर्वांना या कवितांमधून वाचा फोडण्यात आल्याने सर्व स्त्रियांनी या कविता वाचायला हव्यात. ज्याला पुरुषाने स्त्री सुखाची संज्ञा दिली ते सुख नसून मतलबी शोषण आहे, याची जाणीव या कविता करून देतात. पुरुषांना त्या आपल्या अपराधाबद्दल अंतर्मुख करतात म्हणून त्यांनीही त्या वाचल्याच पाहिजेत. अशा उभयपक्षी वाचन व्यवहारातूनच स्त्री-पुरुष एकमेकांना मनुष्य मानून व्यवहार करणार, करतील अशी आशा करत तसलिमा नसरीन यांनी त्या लिहिल्यात. त्या विचारतात -

 'एखाद्याच्या सहवासात सबंध आयुष्य घालवलं
 तरी खरंच माणूस ओळखता येतो का?'

 'शुभ विवाह' कवितेत त्या समजावतात विवाहाच्या नावावर हिडीस पुरुष एका जिवावर कब्जा मिळवतात नि तिनं सोनेरी मेणबत्तीसारखं प्रेमात विरघळून जावं अशी अपेक्षा करतात. वर त्यांची अपेक्षा असते स्त्रीनं पातिव्रत्य राखावं. पुरुषी पातिव्रत्याची हमी नाही का मागायची स्त्रीनं? -

 सर्व पुरुष सभ्यच असतात
 त्यांना नाही लागत पातिव्रत्याची सनद.

 पुरुषांनी स्त्रीला हरत-हेने दुबळी करून ठेवले आहे. तिने मैदान ओलांडायचं नाही. तिने तळ्यात पोहायचं नाही. तिने एकटीनं उंबरा ओलांडायचा नाही. तिला नाही का वाटत...चांदण्यात फिरावं, नौकाविहार करावा, पावसात भिजावं... पण नाही. ती नाजूक, तिला सर्दी, तिलाच ताप.

 क्षणासाठी घराचा उंबरठा ओलांडू देत नाही कोणी
 स्वप्नात नाही तर जागेपणीच पाहते
 विषारी साप, सुरवंट, राक्षसांचं घर आणि रानटी रेडा.

 समाजात स्त्रीला घेरणारा फक्त पुरुष नाही. समाजाने तिच्याभोवती जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत अशी कितीतरी काटेरी कुंपणं उभी केलीत. शिवाय देव, दैव, भविष्याचे ललाटलेख सटवाईने लिहून ठेवलेले नि कर्म म्हणून आलेले ते वेगळेच. म्हणून ती प्रश्न करते -

 धर्मानं आवळलंय आपल्या पंजात अवघ्या जगाला
 एकानं विरोध करून किती मोडणार हाडं?
 आणि दूरवर पसरलेलं हे विषमतेचं जाळं
 कितीसं तुटणार? फाटणार?

 स्त्री सौख्याची भुकेली असते. लक्ष लक्ष स्वप्नं उरी सांभाळत ती बोहल्यावर चढते. तीन दिवसात हाका मारण्याचा प्रसंग येतो, नि अवघ्या तीन महिन्यात तिनं सर्वस्व गमावलेलं असतं -

 स्त्रीला फसवून भोगल्याशिवाय
 भोगाची तृप्ती नाही
 तृप्तीचा सुवासिक ढेकर नाही.

 भोगपूर्ण समाजानं स्त्रीचं विरूप वेश्यारूपात परिवर्तीत करून टाकलं. वेश्या फक्त स्त्रीच असते -

 सगळ्या वेश्या स्त्रियाच असतात
 पुरुष कधीच वेश्या नसतात.

 असं जळजळीत अंजन डोळ्यात घालणाऱ्या कविता आपणास आतून, बाहेरून उसवतात; विचार करायला भाग पाडतात आणि स्त्रीस माणूस म्हणून स्वीकारण्याचा संस्कार देतात म्हणून त्या वाचायच्या. पुरुषांना परकाया प्रवेश करण्यास भाग पाडणाऱ्या या कविता स्त्रीस तिचं सामाजिक स्थान दाखवून भानावर आणतात.

 जगात आजवर अनेक कवी, लेखक, कलाकार, विचारक यांनी असे मूलभूत प्रश्न विचारले की समाजाने त्यांना बहिष्कृत ठरवलं. पूर्वी गॅलिलिओ, सॉक्रेटिसच्या पदरी तुरुंगवास, विषप्रयोग, क्षमायाचना त्यांच्या पदरी आली. आज अशांना बहिष्कृताचं जीवन जगावं लागत आहे. तसलिमा नसरिन मूळ बांगला देशी. त्यांचं लेखन धर्मविरोधी मानलं गेलं नि त्यांना आपला देश सोडून युरोप, अमेरिकेत राहावं लागलं. सध्या त्या बहिष्कृत, विस्थापित होऊन भारताच्या आश्रयाखाली सुरक्षित जीवन जगत असल्या तरी एकटेपणा खायला उठतोय. मध्यंतरी त्यांना मानसोपचाराची गरज निर्माण झाली होती. दर तीन-पाच वर्षांनी त्यांना देशाकडे आश्रयासाठी याचना करावी लागते. जग प्रगल्भ केव्हा होणार? विचार स्वातंत्र्य केव्हा अजरामर होणार? जात, धर्म, लिंगनिरपेक्ष समाज-मानव समाज, मानवधर्म केव्हा अवतरणार असा प्रश्न करणारी ही कवयित्री आपल्या या सर्व कवितांतून माणसाच्या मनाचा  खरं तर ठाव घेऊ इच्छिते -
  जवळ झोपलेली दोन माणसं
  पण नाही थांग एकाला दुस-याच्या मनाचा
  कोणाचं मन भराऱ्या मारतं
  तर कोणाचा जणू बंद पिंजरा
  कोणी झोपतं, तर कोणाला पडतो प्रश्न
  झोपलेली रात्र सरायची कशी?
 निर्बाचित कबिता
 तसलिमा नसरीन

◼◼


समारोप सायोनारा

 दैनिक 'लोकमत'च्या वाचकांसाठी मी 'वाचावे असे काही' लिहावे ही कल्पना संपादकांची. सन २०१७ उगवून जानेवारी महिना लोटत आलेला होता, जेव्हा ही चर्चा फोनवर झाली. १० फेब्रुवारीपासून हे सदर मी नियमित लिहिले तरी ते नियमित प्रकाशित होऊ शकले नाही. त्यामुळे सुमारे चाळीस पुस्तकेच वाचकांप्रत पोहोचू शकली. मी कोल्हापुरी असलो तरी ब्रह्मपुरी राहातो. माणसाचं राहणं, जगणं आता आभासी झालंय खरं! लेखक, संपादक, वाचक एकमेकांना भेटत, दिसत, बोलत नसले तरी जग चालू आहे. मी जमिनीवर राहात असलो, तरी माझा निवास आभासी जगात अधिक असतो. माणूस ज्या गावात, शहरात राहतो त्या समाजजीवनाशी त्याचा संबंध त्याच्या निवडीवर अवलंबून असतो. म्हणजे असे की तो म्हटला तर सामाजिक अन्यथा व्यक्ती.

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बुकआर्मी, बुकीश, आयड्रीमबुक, लायब्ररी २.०, लायब्ररी किंग रिडगीक, शेल्फरी ही अशी संकेतस्थळे आहेत की ती जगातील पुस्तकांचं बदलतं जग तुम्हाला समजावतात की मी या जगात राहतो. शिवाय गुडरिडर, ॲकॅडमिया एज्युकेशन, खान ॲकॅडमी ही माझी रोज भटकायची ठिकाणे आहेत. तिथे रोज नवे लेखक, वाचक भेटतात. एकमेकांशी बोलतात. ब्लॉग, ट्विट, मेल, कॉमेंट, लाइकच्या माध्यमातून इथे माझ्यासारखे पुस्तक समीक्षकही नियमित असतात. त्यांची पुस्तक परीक्षणे, मुलाखती प्रसिद्ध होत असतात. 'गुडरिडर'वर मी या महिन्याची एमिली मे या समीक्षिकेची मुलाखत वाचली. ती सात वर्षे अ‍ॅमॅझॉनच्या 'गुडरिडर'ची समीक्षक आहे. गेल्या सात वर्षांत तिने १३०० पुस्तकांची परीक्षणे लिहिली. म्हणजे वर्षाला दोनशे. मी तर फक्त ४०च लिहू शकलो. प्रश्न तुलनेचा नसून आपल्या वाचन, लेखन गतीचा आहे. जगाची वाचन, लेखन गती आपल्या पाच पट आहे. तिचं मुलाखतीतलं पहिलंच वाक्य आहे, 'I don't remember ever not reading.' मी वाचत नाही असा काळ मला आठवत नाही. यावरूनही नित्य वाचनाचे महत्त्व अधोरेखित होते. 'प्रसंगी अखंडित वाचित जावे', 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' या ओळी जोवर आपल्या दैनंदिन जीवनाचा परिपाठ होणार नाही, तोवर वाचन संस्कृती रुजणार नाही.

 वाचावे असे काही' मध्ये मी नव्या-जुन्या ज्या ४० पुस्तकांवर लिहिले ती पुस्तके 'हटके' पद्धतीची होती. ती व्यवच्छेदक अशा अर्थाने होती की तिचं समाजमूल्य मी महत्त्वाचं मानलं होतं. पुस्तक प्रकार म्हणाल तर कथा, कादंबरी, काव्य, नाटक, चरित्र, आठवणी, वैचारिक, समीक्षा, पत्र, माहिती,चित्रमय, गौरवग्रंथ, तत्त्वज्ञान, अनुभव, आत्मचरित्र सर्वांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सर्वच लेखक प्रसिद्ध नव्हते. डॉ. दिलीप शिंदे, अशोक जाधव यांच्यासारखे नवशिके परंतु समाजाला नवं शिकवणारे होते. कैलाश सत्यार्थी, अरुण शौरी, तसलिमा नसरीन असे जगप्रसिद्ध एकीकडे तर दुसरीकडे सुरेश भट, इंद्रजीत भालेराव, अरुणा ढेरे, असे एकदम प्रादेशिकपण.भाषा म्हणाल तर त्रिभाषा सूत्र वापरले. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथाबद्दल लिहून वाचन परीघ रुंदावण्याचा, खोल करण्याचा तसेच तो बहुकोणी होईल असे पाहिले. हे सर्व मात्र मी हेतृतः केलं नाही. ते घडून आलं. वाचन हा माझा नित्य छंद असल्याने काही जुनं वाचलेलं आठवलं ते लिहिलं. जे नवं वाचताना लिहायलाच हवं असं आतून वाटलं, लिहिलं गेलं. 'लोकमत'च्या संपादकांचे आभार अशासाठी की त्यांनी मी लिहिलेलं जसंच्या तसं कानामात्रा, वेलांटी न बदलता छापलं. गमतीची गोष्ट अशी की अनवधानाने माझा एखादा चुकीचा गेलेला शब्दही त्यांनी इमाने इतबारे चुकीचा छापला. त्याचं कारण लेखक सन्मान. आपण प्रथितयश लेखकास लिहायला लावतो तर त्याचं लेखन प्रमाण हे गौरवीकरण मला सकारात्मकता वा उदार जीवनव्यवहार म्हणून अनुकरणीय वाटते. चुकांच्या छिद्रान्वेषणापेक्षा मला आशय समृद्धी अधिक महत्त्वाची!

 या लेखनाने वर्षभर मला वाचकांशी जोडले. गेल्या वर्षभराचा शुक्रवार माझ्यासाठी कोल्हापुरी शुक्रवार ठरला. आठ वाजले की फोन घणघणत राहायचा. कधी कधी तर भल्या पहाटेही! संजय कांबळे या वाचकाचे चाळीस फोन या सदराचा मी गौरव समजतो. 'सगळ्या बिया खडकावर नसतात पडत' हा आशावाद या लेखनाने दृढ केला. माझे अनेक वाचक येऊन भेटत बोलत. त्यापेक्षा पुस्तक विक्रेते मोठ्या पुस्तकांबद्दल लिहीत ती त्या आठवड्यात आणून वाचकांना पुरवत. ग्रंथालयातील लिपिक काऊंटरवर ती पुस्तके काढून ठेवत कारण चोखंदळ वाचक ते मागणार हे ठरलेलं असायचं ते पूर्वानुभवाने.

 यापेक्षाही माझ्या या सदर लेखनाचा मला मिळालेला ब्रह्मानंद म्हणजे मी ज्या लेखकांच्या पुस्तकांबद्दल लिहिले, वाचक, मित्र, प्रकाशक, नातेवाईक त्या लेखकांना 'वॉट्सअप' करून पाठवत. मग मला साक्षात लेखकांचेच फोन, संदेश, मेल येत. हे 'लई भारी' वाटायचे! इंद्रजित भालेराव, शरद गोगटे, डॉ. रमेश जाधव असे काही फोन आठवतात.

 सदर लेखनाने मला चतुरस्र समृद्ध केले. मी काही जुनी वाचलेली पुस्तके लिहायचे म्हणून परत हाती घेतली. त्यांनी मला परत वाचताना नवा प्रकाश दाखवला. नव्या पुस्तकांनी नवं जग दाखवलं. नवी क्षेत्रे, नवी दुःखं तशीच काही आश्चर्यमिश्रित जीवने उमगली. उदाहरणच द्यायचे तर अरुण शौरींचं 'कळेल का त्याला आईचे मन?' ते वाचताना दिव्यांग अपत्यास वाढवणं पालकांच्या लेखी काय दिव्य असतं हे नव्यानं समजलं. 'प्रसिद्ध व्यक्तियों के प्रेमपत्र' पुस्तकाने मला अनुवादाची, अनुरचनेची प्रेरणा दिली. लेखन कामाठी असो वा वाचन कामाठी ती तुम्हास नित्य नवं देते म्हणून जग नित्य नूतन घडत राहतं.

 हे लेखन संग्रहित रूपात 'वाचावे असे काही' याच शीर्षकाने 'अक्षर दालन' मार्फत पुस्तकाकार होत आहे. ही देखील या सदराचीच फलनिष्पत्ती म्हणायची. जगात अशा सदरातून अनेक गोष्टी घडत असतात. वर्षश्रेष्ठ वाचक, लेखक, ग्रंथ, समीक्षा असे पुरस्कार जाहीर होत असतात. वाचनाने जग बदलते, फिरते ते असे. मी अनेक मासिके, दैनिकांतून स्तंभ लेखन केले. या स्तंभलेखनाने मला अधिक प्रतिसादित अनुभूती दिली. त्याचं कारण हे दैनिक नावाचं नसून व्यवहाराने 'लोकमत' झाले असल्याची प्रचिती होय. 'सायोनारा, सायोनारा। वादा निभाऊँगी सायोनारा।' म्हणत नाचणाऱ्या त्या गाण्यातील अभिनेत्रीच्या उदंड उत्साहाने मी हे स्तंभ लेखन केले. 'जो वादा किया वो S S निभाना पडेगा' गुणगुणतच मी वादा पूर्ण केला. "निरोपाचा हा विडा तुम्ही घ्यावा. आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा रामराम घ्यावा' म्हणत निरोप घेताना मला दुःख, शल्य असेल तर पुढचा शुक्रवार ओकाबोका वाटेल याचेच. स्तंभलेखन लेखकास पण त्या वाराशी, त्या जागेशी जोडत असते. 'आज्जा मेला, नातू झाला' हा जीवनक्रम असल्याने माणसं येतात, जातात. काळ नित्य असतो म्हणून तर रोजच्या सूर्याबरोबर 'लोकमत' ही प्रकाशित होत राहतो. तो अखंड प्रकाशित होत राहावा ही शुभेच्छा! सायोनारा!!

◼◼

पूर्वप्रसिद्धी सूची


दैनिक लोकमत, कोल्हापूर - २०१७

१.   आजाद बचपन की ओर
डॉ. कैलाश सत्यार्थी/१० फेब्रुवारी, २०१७
२. ऐवज
संपादक अरुण शेवते/१७ फेब्रुवारी, २०१७
३. चेहरे
गौतम राजाध्यक्ष/३ मार्च, २०१७
४. गझलसम्राट सुरेश भट आणि...
प्रदीप निफाडकर/१० मार्च, २०१७
५. राजर्षी शाहू गौरव ग्रंथ
संपादक डॉ. रमेश जाधव/ १७ मार्च, २०१७
६. कळेल का त्याला आईचे मन ?
अरुण शौरी/ ३१ मार्च, २०१७
७. अंगारवाटा
भानू काळे/ ७ एप्रिल, २०१७
८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लोकवाङ्मय गृह/१४ एप्रिल, २०१७
९. प्रसिद्ध व्यक्तियों के प्रेमपत्र
हिंद पॉकेट बुक्स/२१ एप्रिल, २०१७
१०. वचन सिद्धांत सार
संपादक डॉ. फ. गु. हळकट्टी/२६ मे, २०१७
११. आठवणीतल्या कविता
संपादक महाजन/बर्वे/तेंडुलकर/पटवर्धन/५ मे, २०१७
१२. साऊथ ब्लॉक दिल्ली
विजय नाईक / १२ मे, २०१७
१३. ग्रंथगप्पा
शरद गोगटे/१९ मे, २०१७
१४. राजबंदिनी : आँग सान स्यू की हिचं चरित्र
प्रभा नवांगूळ/२ जून, २०१७
१५.   फिजीद्वीप में मे २१ वर्ष
तोताराम सनाढ्य/९ जून, २०१७
१६. विस्मृतीचित्रे
डॉ. अरुणा ढेरे/१६ जून, २०१७
१७. आणि मग एक दिवस
नसिरुद्दीन शहा/२३ जून, २०१७
१८. विल्यम शेक्सपिअर : जीवन आणि साहित्य
के. रं. शिरवाडकर/३० जून, २०१७
१९. फाँस- संजीव
७ जुलै, २०१७
२०. शब्द - सात्र
१४ जुलै, २०१७
२१. जीवनदर्शन
खलील जिब्रान/२१ जुलै, २०१७
२२. सारे रान
इंद्रजित भालेराव/२८ जुलै, २०१७
२३. रवींद्रनाथ टागोर : समग्र जीवनदर्शन ग्रंथत्रयी
डॉ. नरेंद्र जाधव/४ ऑगस्ट, २०१७
२४. कागद आणि कॅनव्हास
अमृता प्रीतम/११ ऑगस्ट, २०१७
२५. छ. राजाराम महाराज : जीवन आणि कार्य
डॉ. केशव हरेल/१८ ऑगस्ट, २०१७
२६. रुग्णानुबंध
डॉ. दिलीप शिंदे/२५ ऑगस्ट, २०१७
२७. लीळा पुस्तकांच्या
नितीन रिंढे/१ सप्टेंबर, २०१७
२८. निवडक नरहर कुरुंदकर/व्यक्तिवेध
संपादक विनोद शिरसाठ/८ सप्टें२बर, २०१७
२९. हाऊ टू रीड अ बुक
अॅडलर/डोरेन /१५ सप्टेंबर, २०१७
३०.  रोचक आठवणींची पाने
अशोक चोप्रा/६ ऑक्टोबर, २०१७
३१. मंटो की श्रेष्ठ कहानियाँ
संपादक देवेंद्र इस्सर /२७ ऑक्टोबर, २०१७
३२. दिवाळी अंक
२०१७/दि. ३ नोव्हेंबर, २०१७
३३. गुजरात फाईल्स
राणा आयुब/१० नोव्हेंबर, २०१७
३४. मुक्तिबोध : व्यक्तित्व सही की तलाश में
कृष्णा सोबती/१७ नोव्हेंबर, २०१७
३५. भंगार
अशोक जाधव/२४ नोव्हेंबर, २०१७
३६. कॉ. गोविंद पानसरे समग्र वाङ्मय खण्ड-२
चौसाळकर/शिंदे/८ डिसेंबर, २०१७
३७. शतकाची विचारशैली (खंड-४)
संपादक - रमेश धोंगडे/१५ डिसेंबर, २०१७
३८. निर्बाचित कबिता
तसलिमा नसरिन - अनु. मृणालिनी गडकरी/२२ डिसेंबर, २०१७
३९. समारोप : सायोनारा
२९ डिसेंबर, २०१७
१.  खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००६/पृ. २१०/रु. १८० सहावी आवृत्ती
२. भारतीय साहित्यिक (समीक्षा)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००७/पृ. १३८/रु. १४० तिसरी आवृत्ती
३. सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह)
निर्मिती संवाद, कोल्हापूर/२०१२/पृ.१००/रु.१००/दुसरी आवृत्ती
४. वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१८६/रु.२५०/तिसरी सुधारित आवृत्ती
५. एकविसाव्या शतकातील शिक्षण (शैक्षणिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती
६. कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७५/रु.२०० /तिसरी आवृत्ती
७. प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती
८. दुःखहरण (वंचित कथासंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३०/रु.१७५/दुसरी आवृत्ती
९. निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१४८/रु.२००/दुसरी आवृत्ती
१०. शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/तिसरी सुधारित आवृत्ती
११. आकाश संवाद (भाषण संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३३/रु.१५०/दुसरी सुधारित आवृत्ती
१२. आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह)
साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२०१४/पृ.१६०/रु.१८०/प्रथम आवृत्ती
१३. एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१९४/रु.२००/दुसरी आवृत्ती
१४. समकालीन साहित्यिक(समीक्षा)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/दुसरी आवृत्ती
१५.  महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा (सामाजिक
लेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२००/तिसरी आवृत्ती
१६. वंचित विकास : जग आणि आपण (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.११९/रु.२००/दुसरी आवृत्ती
१७. नवे शिक्षण, नवे शिक्षक (शैक्षणिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती
१८. भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा)
साधना प्रकाशन पुणे २०१७/पृ. १८६/रु. २००/दुसरी आवृत्ती
१९. मराठी वंचित साहित्य (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.८३ रु.१५० /पहिली आवृत्ती
२०. साहित्य आणि संस्कृती (साहित्यिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. १९८ रु. ३०० /पहिली आवृत्ती
२१. माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१३६ रु.१७५ /पहिली आवृत्ती
२२. वेचलेली फुले (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. २२० रु. ३०० /पहिली आवृत्ती
२३. सामाजिक विकासवेध (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१८५ रु.२५० /पहिली आवृत्ती
२४. वाचावे असे काही (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१५५/रु.२००/पहिली आवृत्ती
२५. प्रशस्ती (प्रस्तावना संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.२८२/रु.३७५ /पहिली आवृत्ती
२६. जाणिवांची आरास (स्फुट संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१७७/रु.२५०/पहिली आवृत्ती
आगामी
भारतीय भाषा (समीक्षा)
भारतीय साहित्य (समीक्षा)
भारतीय लिपी (समीक्षा)
वाचन (सैद्धान्तिक)
* वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण अक्षर दालन

◼◼