लाट/महफिल

विकिस्रोत कडून


महफिल


 तो गाव एका खोऱ्यात बसला होता. धनधान्याची तिथे विपुलता होती. मुबलक पाणी मिळत होते आणि सुख तिथे नांदत होते. त्यामुळे फारसा कामधंदा न करण्याची त्या गावच्या लोकांना सवय झाली होती. ते लोक आळशी बनले होते. सकाळी दहा वाजेपर्यंत झोपा काढीत होते. खात होते, पुन्हा अंथरुणात लोळत होते. शहर गावापासून दूर असल्यामुळे करमणुकीचे काही साधन त्यांना उपलब्ध नव्हते. त्यांना कसले खास शहरी शौकही जडले नव्हते.
 असे ऐद्यासारखे जीवन व्यतीत करणाऱ्या त्या गावच्या जवान लोकांना आपला वेळ कसा घालवावा हे कळत नसे. ते रोज रात्रीचे जेवण होताच आपल्या दारातून बाहेर पडत आणि गावापासून फर्लांगभर अंतरावर रस्त्याला बांधलेल्या पुलापाशी गोळा होत. त्या पुलावर ते बसत आणि गप्पा ठोकत. रात्रीच्या काही घटका व्यतीत करीत.
 रोज रात्री पुलावर बसून गप्पा मारण्याचे फक्त एक व्यसन त्यांना जडले होते. या गप्पा मारल्याखेरीज त्यांना रात्रीची चैन पडत नसे, त्यांना खरंच झोप लागत नसे, बरे वाटत नसे. या गप्पांची अशी मोहिनी त्यांच्यावर पडली होती की, आपल्या बायकांचीदेखील त्यांना तमा वाटत नसे.
 गप्पांच्या त्या ओघात अर्थात अनेक विषयांचे चर्वितचर्वण होई. गावातल्या अनेक बातम्या कळत, अनेक रहस्ये उलगडली जात; आणि कित्येक गुप्त गोष्टींवर प्रकाश पडे. त्याचबरोबर एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्यादेखील काढल्या जात. एकमेकांची वेळप्रसंगी टिंगलदेखील केली जाई. पण गप्पांची ती जालिम अफू त्यांना तिथे सतत गुंगवून ठेवीत असे
 अर्थात सारे काही तिथे बोलत नसत. काही नुसते बोलत राहत आणि उरलेले फक ऐकत! काही जण प्रेक्षकांची भूमिका पार पाडीत. आपल्यापाशी सांगण्यासारखे असलेले काही जण त्यात असत. तसेच स्वत: त्या कुणाच्या सांगण्याचा विषय बनलेलेही त्यात असत. त्या बोलणारातले मात्र काही थोडेच आरंभापासून अखेरपर्यंत आपला प्रभाव पाडीत असत.
 दिलावर हा या रात्रीच्या 'महफिल'चा एक प्रमुख सूत्रधार होता. अशी 'महफिल' गाजवावयाचे एक खास कौशल्य त्याने हस्तगत केले होते. त्याच्यापाशी विनोदी कथांचा फार सुकाळ होता. आणि सतत बडबडत राह्यची हातोटी त्याने साध्य केली होती. लोकांच्या व्यंगावर नेमके बोट ठेवायची कला त्याला चांगली अवगत झाली होती. तो कसला उद्योग करीत नव्हता. त्याच्यावर कसली जबाबदारी नव्हती. त्याचे दोन भाऊ मुंबईला नोकऱ्या करीत होते आणि लागेल तेवढा पैसा त्याला पाठवीत होते. त्या पैशावर तो मजा मारीत होता. सिगारेट ओढीत होता. गप्पा मारीत होता.
 आता त्याला दैववशात प्राप्त झालेल्या या सुखावर त्याने आपल्या मगजाने एक विनोदी कथा रचली होती.
 त्या कथेप्रमाणे त्याच्या संसाराच्या गाडीला दोन बैल जोडलेले होते. ते गाडी ओढीत होते आणि तो ती गाडी हाकीत होता. लगाम घट्ट धरून बसला होता आणि जोवर ते बैल ओढत होते तोवर त्याला काळजीचे काही कारण नव्हते. या कथेतले बैल म्हणजे त्याचे दोन भाऊ होते!
 स्वत:वर रचलेल्या त्याच्या या कथेचा सारांश त्याच्या भावांच्या कानापर्यंत जाऊन पोहोचला होता. परंतु त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर असा काही जबरदस्त प्रभाव पडला होता की, स्वत:च्या अपमानास्पद स्थानाची लाज वाटण्याऐवजी त्यांना उलट त्याच्या विनोदी वृत्तीचे कौतुक वाटले होते. तेही त्या विनोदावर खूष होऊन इतरांबरोबर हॅS हॅS करून हसले होते.
 आपल्या भावांना हे कळावे ही गोष्ट खुद्द दिलावरला मात्र तितकीशी रुचली नव्हती. त्यांच्या कानावर ती घालणाऱ्या लोकांवर त्याने यथेच्छ तोंडसुख घेतले होते. भावाभावांत बेबनाव करावयाची त्या लोकांची ही वृत्ती असल्याचा त्या लोकांवर त्याने आरोप केला होता. आणि या गोष्टीचे त्याने पुढे बरेच दिवस भांडवल केले होते. स्वत: केलेल्या विनोदाच्या कथनाने हा मनुष्य एवढा चिडावा याचे त्या लोकांना आश्चर्य वाटले होते. त्याचा त्यांना रागही आला होता. परंतु त्यांनी त्या गोष्टीला फारसे महत्त्व न द्यावयाचे ठरवले होते. नेहमीसारखे ते पुलावर जमत होते. आणि त्याच्या नवनव्या कथा रंगून जाऊन ऐकत होते.
 एके रात्री ते सारे असेच पुलापाशी जमले होते. ती काळोखी रात्र होती आणि पायाखालचा रस्तादेखील धड दिसत नव्हता. येताना कोणी टॉर्च घेऊन आला होता. कोणी काठी ठोकीत चालत आला होता. आपल्याला कुणी दिसले नाही तरी निदान समोरून येणाऱ्याला काठीचा आवाज ऐकू येईल असा त्यामागचा त्याचा हिशेब होता. आणि हाच हिशेब मनाशी करून कोणी विड्या फुकीत कुंकीत आले होते.
 परंतु सगळे आले तरी दिलावर मात्र आला नव्हता. आणि तो न आल्यामुळे तिथे गळा झालेल्या लोकांना गोळा झाल्यासारखे वाटत नव्हते. त्या महफिलचा प्राण आल्यासारखे त्यांना वाटत नव्हते. त्या पुलावर ते एकट्याने आणि अशा रीतीने बसून राहिले होते की, इतरांचे अस्तित्व त्यापैकी प्रत्येकाला जणू जाणवतच नव्हते. जणू पुलाच्या त्या कठड्यावर निष्प्राण पुतळेच बसून राहिले होते!
 अखेर बऱ्याच उशिराने दिलावर प्रकट झाला. त्याने चालण्यासाठी टॉर्चचा आधार घेतला नव्हता. काठीचा खडखडाट त्याला पसंत नव्हता. शिवाय त्यावेळी त्याच्या तोंडात पेटती सिगारेटही नव्हती. वास्तविक ती असायला हवी होती आणि टॉर्चच्याऐवजी काळोखात त्याने रस्त्याने चाचपडत येणे अधिक संभवनीय होते. पण तो आला हेच अधिक महत्त्वाचे होते. तो सावकाश आपल्या झुकत्या चालीने चालत पुलापाशी आला आणि त्या जमलेल्या लोकांना म्हणाला, "काय? तुम्ही लोक केव्हा आलात?"
 त्याला पाहून त्या लोकांना एकदम हुरूप आला. त्यांच्यातला निघून गेलेला प्राण जणू परत आला. त्यांना सुरसुरी वाटू लागली. ते हुशारीने बसले. नाराजीने दिलावरला म्हणाले, "किती उशीर केलास!"आधी तो काही बोललाच नाही. नुसता खोकला. मग सावकाश आपल्या खिशातल्या सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढून ती त्याने शिलगावली आणि तिचा झुरका मारून किंचित हसल्यासारखे करीत तो उद्गारला, “आज एक गंमत झाली."
 लोकांमध्ये औत्सुक्य निर्माण करण्याचे हे त्याचे एक खास कौशल्य होते आणि त्याचा तसा तात्काळ परिणामदेखील होत असे. त्या सगळ्यांनी ते ऐकून कान टवकारले. आता आपल्याला कुणाचे तरी कुलंगडे ऐकावयास मिळणार, या आशेने त्यांनी आपले चित्त एकवटले.
 "मी जेवण होताच लागलीच इकडे यावयास निघालो आणि सरळ आलो असतो तर केव्हाच इथे येऊन पोहोचलो असतो. पण एक तर माझ्यापाशी टॉर्च नव्हता, काठी आवडत नसल्यामुळे मी ती घेतली नव्हती आणि रस्त्याने चालू लागल्यावर सिगारेट पेटवण्याचा विचार करीत होतो, तेवढ्यात मला कुणाचा तरी धक्का लागला. धक्का एवढ्या जोराने लागला की, मी कोलमडलो. पण सावरून उभा राहिलो तेव्हा कमऱ्याची खतीजा समोर उभी दिसली."
 तिचे नाव तोंडातून बाहेर निघताच साऱ्याचे श्वास रोखले गेले. नाडीचे ठोके वाढले. रक्त जोराने वाहू लागले. मनात नाना तर्क सुरू झाले.
 कमऱ्याची खतीजा कुठे गेली होती?
 कुठे जात होती?
 इतक्या रात्री?
 अपरात्री?
 कुणाला भेटायला?
 हे काय गौडबंगाल आहे?
 "हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याचे मला दिसत आहे." दिलावर म्हणाला. “पण त्यात अशक्य काय आहे? कमऱ्याची खतीजा कुणाला भेटायला जाऊ शकत नाही काय?"
 “नाही. आम्हाला हे पटत नाही."त्या साऱ्यांनी म्हटले.
 "आपणाला हे पटवून घेतले पाहिजे."
 “का बरे?"  "ती रस्त्याने चालली होती आणि काळोखात तिला माझा धक्का लागला. मी तिला ओळखले. तेव्हा ती म्हणाली, 'दिलावर दादा, मी तुमला रस्त्यात भेटलू ती कुणाला सांगू नुको हां-"
 "मग तू काय म्हणालास बरे?"
 "नाही सांगणार! मला लोकांना सांगायची काय जरुरी पडली आहे?"
 "कसम खा...सांगणार नाही म्हणून कसम खा." ती म्हणाली.
 “कसमेची काय जरुरी आहे? तू मला माझ्या भयनीपरमाने आहेस. मी तुझे गुपित कुणाला बोलून दाखवणार नाही."
 "पण ते गुपित तरी काय?"
 "ते मी तिला विचारले नाही. पण ते आपल्याला तर्काने ओळखणे सोपे आहे. ती कुणाला तरी भेटायला गेली असणे शक्य आहे."
 पण या त्याच्या उत्तरावर कोणी सहजासहजी विश्वास ठेवायला तयार झाले नाही. तो तिला ते न विचारण्याची गफलत करील ही कल्पनाच कुणाला पटली नाही. “आम्हाला पटत नाही. तिला तू विचारले नाहीस?"
 “विचारणार होतो. पण तेवढ्यात कोणीतरी आल्याची चाहूल लागली तेव्हा ती चटकन निघून गेली."
 त्या लोकांनी त्याला अधिक प्रश्न विचारणे यानंतर थांबविले. एकूण साऱ्या प्रकाराचा ते आपल्या मनाशी विचार करू लागले. शक्याशक्यतेचा अदमास घेऊ लागले. तिचा प्रियकर कोण असावा याचा अंदाज करू लागले.
 दिलावरने त्या रात्री त्या लोकांना असे गोंधळात टाकले. ते आपापल्या घरी गेले आणि सरळ झोपी न जाता आपापल्या बायकांना विचारू लागले, "काय गो? ती खतीजा कैशी मुलगी हय!"
 "का बरा?"
 "राती ती मला रस्त्यात दिसली. रस्त्यानी जात होती. एकटी होती आनी घाबरलेली दिसत होती. इतक्या रात्री खय गेली होती?"
 "तुम्ही हटकले नाही?"
 “नाही. ती थोपली नाही. लगेश नायशी झयली."
 "काय म्हायेत?" त्या बायका उत्तरल्या. परंतु मनात त्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचा निश्चय केला. नवऱ्याने सांगितलेली कथा त्यांनी इतर बायकांना सांगितली, तेव्हा प्रत्येकीच्या नवऱ्याने खतीजाला त्या रात्री पाहिले असल्याचे कळून आले. खतीजा नक्कीच कुणाला तरी भेटायला गेली असली पाहिजे, याबद्दल त्यांची खात्री पटली.
 पण कुणाला तसा नेमका सुगावा मात्र लागला नाही. खतीजाचा प्रियकर कोण असावा हे कुणाला सांगता आले नाही. त्यांच्या महफिलमध्ये लागोपाठ अनेकदा तो विषय चर्चिला गेला. दिलावरने पाहिलेल्या प्रसंगावर विनोद झाला. तिच्याविषयी थोडं अश्लीलही बोलले गेले. पण मग लोक इतर विषयांकडे वळले. दुसरे विषय त्यांना मोहवू लागले. खतीजाच्या प्रियकराचा विषय मागे पडला, विसरला गेला.
 परंतु काही दिवसांनीच खतीजा ‘पोटाशी' असल्याची गावात अफवा पसरली. लोकांना बोलायला नवा विषय सापडला. बायकांचे थवे दिवसभर त्या अफवेवर काथ्याकूट करीत राहिले. रात्रीची या लोकांची महफिल त्या अफवेच्या आधारे पुन्हा ताजीतवानी झाली. दिलावरने काही दिवसांपूर्वी सांगितलेल्या त्या प्रसंगाची त्यांना आठवण झाली. त्या अफवेत तथ्य असले पाहिजे असे त्यांना वाटू लागले.
 परंतु तरीही काही धागेदोरे सापडत नव्हते. तिला पोटाशी असल्याचे कणी पाहिले होते? ती (निदान दिवसाची तरी) घराबाहेर कुठे पडत होती? कुणाकडे कुठे जात होती? तिच्या घरी तरी कोण गेले होते? खरे कुणा लेकाला माहीत होते?
 मग ती पोटाशी असल्याची माहिती मिळवली तरी कुणी?
 "पण त्यात माहिती मिळवायची ती काय? त्या महफिलच्या एका सदस्याने-इसाकने-म्हटले, "ती घराबाहेर पडायला कशाला पाहिजे? माझ्या मते ती बाहेर पडत नाही हाच ती पोटाशी असल्याचा पुरावा आहे!"
 "पण ती केव्हाच घराबाहेर पडत नव्हती."
 "रात्रीची पडत होती.”
 "आताही कदाचित पडत असेल. आपल्याला काय माहीत? काय रे दिलावर?"
 त्यांच्या नजरा दिलावरकडे वळल्या. गावातल्या अवघ्या बित्तंबातम्यांचे केंद्र असलेल्या या माणसाला यातली कितपत माहिती आहे?
 "मला माहिती नाही." त्याने सांगितले. "त्यानंतर मला ती कधी दिसली नाही. दिसल्यास मी सांगितले नसते का?"
 "मग हे कळायचे कसे?"
 “एक उपाय आहे." दिलावर म्हणाला, “या इसाकच्या सासूला त्या घरी पाठवणे. तिला तशी खास पाठवायची जरुरी नाही. फक्त तिच्या कानावर ही बातमी घातली की पुरे! ते कार्य इसाकने करावे म्हणजे आपल्याला बसल्या जागी बित्तंबातमी कळेल."
 त्याच्या या सूचनेप्रमाणे इसाकने खरोखरच आपल्या सासूच्या कानावर ही बातमी घातली. पण तिला ती आधीच कळली होती. आणि आपल्या मनाची खात्री करून घेण्यासाठी ती कमऱ्याच्या घरी जाणारही होती. तिने मग अधिक वेळ दवडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच ती खतीजाला प्रत्यक्ष पाहायला गेली.
 तिच्या घराचा पुढचा दरवाजा बंद होता. इसाकच्या सासूने तो जोराने खडखडावला. खतीजाच्या आईच्या नावाने ती हाका मारू लागली.
 बऱ्याच वेळाने खतीजाच्या आईने येऊन दार उघडले. इसाकच्या सासूला पाहताच ती चमकली. पण बोलली, "इतक्या सकलुजची का गो आयलीस?"
 "खालाच्या जात होतू. जाता जाता तुजो याद आयलो. वाटला भेटून जावा. मला तान लागलेय. जरा पाणी दे बघू."
 नाइलाजाने खतीजाच्या आईला दरवाजातून बाजूला व्हावे लागले. इसाकची सासू सरळ घरात घुसली आणि स्वयंपाकघरात गेली. खतीजा तिथे भाकऱ्या थापत असलेली तिच्या दृष्टीस पडली.
 इसाकच्या सासूने तिचे शरीर लक्षपूर्वक न्याहाळले. आणि तिच्या आईला विचारले, "काय गो? खतीजाला अगदी भायेर धाडत नाय?"
 "घरात काम असते."
 “मोप काम सांगतेस तिला वाटते? तबीयत खराब झयलेय तिची!" आणि असे म्हणून ती खतीजाच्या जवळ गेली. तिचे हात, पाय, डोके आणि सारे अवयव तिने जवळून पाहिले. मग तिच्या आईकडे वळून विचारले, “पोरीला झालेय तरी काय?"
 “वाताची बेमारी झयली आहे.”
 “मंग दवा करा. ऐशी डोळे झाकून बसू नकोस. नायतर गल्यात येल!"
 त्या बाईचे हे अखेरचे शब्द ऐकून तिची आई एकदम ओक्साबोक्सी रडू लागली. इसाकच्या सासूच्या गळ्याला लागली आणि म्हणाली, "मला यातनं सोडव. मी तुझ्या पाया परते-"
 “मग अजून चीप कैशी बैसलीस? कुणाला बोलली का नाहीस? दवापाणी का केले नाहीस?"
 "कुणाला बोलवू? कुणाला सांगू?"
 "कुणाचे हे काम?"
 "मला कैसा कळणार?"
 "तुझी पोर काय बोलते?"
 "काही बोलतच नाय."
 "तुला कुनाचो संशय येतो?"
 "माझी अक्कल नाय चालंत!"
 "ठीक आहे. ऐशी घाबरून जाव नको. आपन यातनं मारग कारू." असे म्हणून ती तिथून निघून आपल्या घरी आली आणि आपल्या जावयाला तिने सविस्तर कथा निवेदन केली.
 इसाकने सांगितलेली ही कथा पुलावर साऱ्यांनी शांतपणे ऐकून घेतली.
 आता पुढे काय करायचे? साऱ्यांनी भावी मार्गदर्शनासाठी दिलावरच्या तोंडाकडे पाहिले.
 "मला वाटते, आपण त्या बाईला मदत करावी." दिलावरने उत्तर दिले.
 "पण तो हरामखोर कोण? कुणी तिला फंदात पाडले?"
 "ते आपण मागाहून बघू." दिलावर म्हणाला, "पण आधी तिची यातून सुटका करावी असे मला वाटते."
 तो हे सारे अत्यंत गंभीरपणाने बोलत होता. त्याचा नेहमीचा अश्लीलपणा त्याला त्या क्षणी तरी सोडून गेला होता. त्याचे अंत:करण त्या बाईविषयीच्या करुणेने ग्रासून गेल्यासारखे त्याच्या शब्दांवरून वाटत होते. त्याच्या शब्दांचा त्यामुळे त्या लोकांवर अतिशय परिणाम झाला. त्यांनी विचारले, “आपण कशी मदत करणार तिला? कोणत्या मार्गाने?"
 "मार्ग मी सांगतो. इसाकच्या सासूलाच आपण सारे करायला सांगू झाले!"
 "पण काय करायला सांगायचे?"
 “काय? काय सांगायचे?" थोडा वेळ थांबून तो म्हणाला, “पोर पाडायचे!"
 "पोर पाडायचे"' त्या लोकांनी दचकून विचारले.
 "अर्थातच! पाडायचे नाही तर काय ती बाळंत होईपर्यंत थांबायचे? चार गावात बोंब होईपर्यंत डोळे मिटून बसायचे? हा आपल्या गावच्या इभ्रतीचा सवाल आहे!"
 दिलावरच्या या बोलण्याने त्याच्या बेताला असलेला काही लोकांचा विरोध मोडून पडला. पुन्हा पूर्वीसारखे इसाकच्या गळ्यात त्या बेताचे उत्तरदायित्व येऊन पडले.
 इसाकची सासू दुसऱ्या दिवशी सकाळीच धापा टाकीत खतीजाच्या घरी गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “हे बघ, मी सारा बंदोबस्त केलो हाये. आज राती आपुन काम करून टाकू."
 “पन माझ्या पोरीच्या जीवाला काय अपाय होनार नाही ना?"
 "नाय. तू कसली काळजी करू नुको. रातची तयार राहा. मी येते.”
 "बरा बरा." खतीजाची आई उद्गारली. त्याशिवाय तिला गत्यंतरच नव्हते!
 त्या दिवशी दिवसभर इसाक, त्याची सासू आणि दिलावर एकमेकांशी खलबते करीत राहिले. कुणाला सुगावा लागू न देता सारे गुप्तपणे कसे पार पाडायचे याच्या त्यांनी मसलती केल्या. त्यांनी कुठून तरी कसले तरी गावठी, जालिम औषध पैदा केले.
 रात्र होताच सारे इसाकच्या घरी जमले आणि काळोखाच्या आवरणाखाली तिथून खतीजाच्या घरी गेले. दबकत दबकत आणि सावधपणे चालत ते चटकन त्या घरात शिरले. आणि एका खोलीत जाऊन बसले. इसाकची सासू आत गेली. खतीजाला तिने एका खोलीत घेतले आणि आतून दरवाजा बंद करून टाकला.
 त्या बाहेरच्या खोलीत बसलेल्या लोकांच्या हळूहळू गप्पा सुरू झाल्या. अनेक विषय चघळण्याचा प्रयत्न ते करू लागले. पण त्यांना ते जमेना. मनातल्या मनात ते विलक्षण अस्वस्थ होऊन गेले होते. आतल्या खोलीकडे त्यांचे कान लागले होते आणि खतीजाच्या कण्हण्याचा आवाज तेव्हा त्यांना ऐकू येऊ लागला, तेव्हा तर ते बोलायचेदेखील बंद झाले. तो कण्हण्याचा आवाज ऐकत राहिले.
 त्या आवाजाने त्या लोकांना विलक्षण अस्वस्थ करून सोडले. त्यांची मने गांभीर्याने भरून गेली. तिच्या दुर्दशेबद्दल ते हळहळू लागले.
 परंतु दिलावरला तशा स्थितीत एकाएकी विनोद करण्याची लहर आली. तो दबत्या आवाजात पुटपुटला, "बघा, बघा कशी बकऱ्यासारखी ओरडते आहे!"
 "असे बोलू नकोस, विनोद करू नकोस." इसाकने म्हटले. त्या कण्हण्याने त्याला खरोखरच वेदना होत होत्या! दिलावरचा विनोद त्याला रुचला नाही.
 "मग काय करू? तिची तारीफ करू? अरे, मजा करताना तिला कळले नाही?"
 "गप्प बैस. गप बैस म्हणतो ना!" ते सारे चिडून त्याला म्हणाले, “तूच तिला यातून सोडवावयाचा बूट काढलास आणि आता तूच टिंगल करतो आहेस?"
 "मी फक्त तिच्या चुकीबद्दल बोलतो आहे."
 "ते आता कशाला?"
 पण तेवढ्यात खतीजाचा अधिक जोराने कण्हण्याचा आवाज त्यांच्या कानी आला आणि ते बोलायचे बंद झाले. लागोपाठ इसाकची सासू तिथे आली आणि म्हणाली, “सारेच मुसळ केरात!"
 "का? काय झाले?" त्यांनी विचारले.
 "अरे पोरानू? असले औषध घेतल्यानंतर त्या बाईने आपल्या याराचा नाव घ्यायचा असते! पन ही बया काय नाव घ्यायला तयार नाही आणि तिची सुटका काही होत नाही. बरे, आता दवाचा तिच्यावर अयसो परिनाम झाला आहे का सुटका झाल्याशिवाय गत्यंतर नाही. नाहीतर माझी मान अडकेल!"
 ते ऐकून ते सारे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. असल्या काही अडचणींची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.
 "पण तिला नाव घ्यायला काय हरकत आहे?" इसाकने म्हटले.
 "पण ती घेत नाही त्याला काय करायचं?"
 "नाही घेत तर राहू दे! मरू दे सालीला!" तो संतापून म्हणाला. कुठून आपण या फंदात पडलो असे त्याला वाटू लागले.
 "ती मेली तर आपल्या गळ्याला नख लागेल ना पण!" दिलावर म्हणाला, “यातूनही काहीतरी मार्ग आपल्याला काढला पाहिजे."
 पण इसाकला दिलावरचाही आता राग आला होता. तो म्हणाला, "तूच आम्हाला या फंदात पाडलेस!"
 "मला काय माहीत ती नाव घेणार नाही!" दिलावर त्याला उत्तरला. इसाकलाही ते पटले. यात बिचाऱ्या दिलावरचा काय दोष? "मग आता काय करावे?" त्याने विचारले.
 "हे बघ." दिलावर त्याला समजावीत म्हणाला, “यातून तिची सुटका झाली नाही तर आपली मान आता त्यात अडकणार आहे. तेव्हा शहरातून रातोरात डॉक्टर आणवू या. जो काही खर्च येईल तो आपण सारे सोसू! पण मला दुसरा मार्ग दिसत नाही."
 "दिलावर बोलतो ते बरोबर हाये. लगेच दागतरला हनवा. नाय तर पोरीची जीव जायेल आनी आपुन फाशी जावू!" इसाकच्या सासूने त्याला सुनावले.
 ते ऐकताच इसाकने आणखी एकाला आपल्याबरोबर घेतले आणि तो लागलीच सायकलवर बसून शहरात गेला. तासाभरात डॉक्टरला घेऊन तो परतला.
 डॉक्टर खोलीत शिरण्याआधी दिलावर त्याच्या कानाला लागला आणि सारी परिस्थिती त्याने त्याला निवेदन केली. डॉक्टरला त्याने ती केस हातात घ्यायला कसेतरी प्रवृत्त केले. तो खोलीत शिरला आणि इसाकची सासू बाहेर पडली.
 सुमारे तासाभराच्या अवधीत सारे बिनबोभाट पार पडले. खिशात पैसे टाकून डॉक्टर पहाटेच्या अंधारात शहरात पसार झाला! मग ते सारे हळूहळू उठले आणि खतीजाच्या आईला दोन धीराचे शब्द सांगून बाहेर पडले. आपापल्या घरी जाऊन आडवे झाले.
 त्यानंतर दोनतीन दिवस लागोपाठ जमून त्यांनी खर्चाचा हिशेब केला. आणि त्यांनी तो आपल्या अंगावर सारखा घेतला. मनातल्या मनात चरफडत, दिलावरला शिव्या घालीत त्यांनी ते पैसे इसाकच्या स्वाधीन केले. तो हिशेब आटोपल्यानंतर मग त्यांना त्या घटनेवर विनोद सुचू लागला आणि खतीजाच्या विव्हळण्यावर ते बोलू लागले. त्या साऱ्याच घटनेवर काही काळ बोलत राहिले. काही दिवसांनी बोलायचे बंद झाले!
 परंतु कशी कुणास ठाऊक, ती बातमी साऱ्या गावात सावकाश पसरत गेली आणि आश्चर्य असे की, त्या संदर्भात दिलावरचे नाव घेतले जाऊ लागले. त्या लोकांच्या कानापर्यंत ही बातमी जाऊन थडकली, तेव्हा ते थक्क होऊन गेले. असे कसे होईल? त्यांना ते खरे वाटेना!
 त्यांनी एके रात्री सहज दिलावरला म्हटले, "गावात लोक काय म्हणतात तुला माहीत आहे काय?"
 "काय म्हणतात?"
 "लोक तुझे नाव घेतात. आणि तुला मदत आम्ही केली असे म्हणून आम्हासही दोष देतात!"
 "मग काय झाले? लोक म्हणतात ते खरेच आहे!" त्याने अत्यंत थंड सुरात उत्तर दिले. "खरे आहे?" त्या साऱ्यांनी ओरडून त्याला विचारले. त्यांना आता तर पराकाष्ठेचा धक्का बसला होता.
 "अलबत! खरेच आहे."
 ह्या उत्तराने ते लोक मूढ बनून गेले. मग त्यांना त्याचा विलक्षण संताप आला. त्याच्याविषयी तिरस्कार वाटू लागला. आपल्याला फसवल्याबद्दल तीव्र चीड त्यांच्या मनात निर्माण झाली.
 "असे होते तर तू आम्हाला त्यात कशाला ओढलेस? आमची मान कशाला अडकवलीस?" त्यांनी बेभानपणे त्याला विचारले.
 “माझी मान अडकू नये म्हणून!"
 "असे? आणि आता अब्रू गेली ती?"
 "ती जाऊ दे रे! या गावात साला अब्रूदार आहेच कोण? त्याला मी डरत नाही. लोक घेत ना आत्ता आपलं नाव? आपले काय जाते?"
 "तू याकरता आम्हाला चूतिया बनवलेस!" ते सारे किंचाळले. "चल, चालता हो! यापुढे तू आमच्या महफिलीत येऊ नकोस. आमच्याबरोबर बसू नकोस. आमच्याशी बोलीभाषा करू नकोस."
 "बरे आहे!" दिलावर थंडपणे उत्तरला, “मी तुमच्यात येऊन बसणार नाही." आणि तो सरळ चालू लागला. आपल्या झुकत्या चालीने सिगारेट फुकत तो त्या अंधारात नाहीसा झाला.
 तो गेला हे पाहून लोकांना बरे वाटले. त्याला यापुढे आपल्या 'महफिल'मध्ये घ्यायचा नाही असाच त्यांनी आपल्या मनाशी निश्चय केला. तो जाताच यांना आनंद वाटला. त्या आनंदात नव्या हुरुपाने ते रोज रात्री पुलावर येऊन बसू लागले.
 दिलावर काही दिवस पुलाकडे अजिबात फिरकला नाही. पुलावर न जाणाऱ्या काही लोकांनी जेव्हा त्याला याबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला, “माझ्या भावांना मी बैल म्हणतो असे हे लोक म्हणतात. पण माझेच भाऊ बैल आहेत असे थोडेच आहे? हे लोकही बैलच आहेत की! आता त्या खतीजाच्या भानगडीत सारे बैलच बनले नाहीत काय?"
 त्याचा हा विनोद पुलावर बसणाऱ्या लोकांच्या कानावर गेला. त्या लोकांच्या अंगाचा तिळपापड झाला. परंतु काही लोकांना मात्र त्यात तथ्य आहे असे वाटले. ते म्हणाले, "तो म्हणतो ते थोडे खरे आहे. आपल्या हुशारीने त्याने आपल्याला बैल बनवले हे काय खोटे आहे?"
 "असेल! असेल!" इसाक म्हणाला. कारण मनातून त्यालाही ही गोष्ट पटली होती.
 "पण म्हणून त्याने मला असे बोलून दाखवावे काय? ते काही नाही. त्याला इथे घ्यायचा नाही."
 "पण आता पूर्वीसारखी इथे बसायला मजा येत नाही." कोणी तरी म्हणाले आणि साऱ्यांनी त्याला साथ दिली. आता नवनवे विषय त्या महफिलमध्ये निघत नव्हते. शिळ्या कढीलाच ऊत येत होता. नव्या भानगडी कळत नव्हत्या. कुणाची कुलंगडी बाहेर निघत नव्हती. मग तिथे बसायला रंग येणार कसा? मजा येणार कशी?
 पण 'त्याला बोलवावा' असे मात्र कोणी बोलू शकले नाही. इसाकला आपली सूचना आवडणार नाही, दिलावरविषयीचा त्याचा संताप अद्याप पुरता ओसरलेला नाही हे पाहून ते मूग गिळून स्तब्ध बसले.
 हळूहळू ते पुलावर यायला आळस करू लागले. त्यांचा उत्साह ओसरला. हळूहळू ते पुलावर यायचे बंद पडू लागले. जमणाऱ्या लोकांची संख्या रोडावू लागली. इसाकच्याही लक्षात हा फरक आला आणि अखेर पुलावर भरणाऱ्या 'महफिल'ला आपण एकटेच राहणार असे त्याला वाटू लागले. त्याला नमते घ्यावे लागले. दिलावरला त्याने बोलावणे पाठविले.
 त्यांचे बोलावणे दिलावरला अनपेक्षित नव्हते. त्याने हा अंदाज केव्हाच केला होता. परंतु त्याने सुरुवातीला मात्र थोडे आढेवेढे घेतले. मानभावीपणे तो म्हणाला, "मी कशाला येऊ? बनवाबनवी करणारा मी मनुष्य! माझे काय काम?"
 "असू दे रे!" ते लोक म्हणाले, "आता ते सारे कशाला काढतोस?"  "मी तुम्हाला बैल बनवणारा!"
 "असू दे! त्याबद्दलही आमची काही हरकत नाही! पण तुझ्याबिगर आम्हाला मजा येत नाही. पुलावर बसायला उत्साह वाटत नाही!" आणि त्यांनी त्याच्या दंडाला हात घालून त्याला उठवले आणि ओढत घेऊन चालवले.
 अशा रीतीने दिलावर पुन्हा 'महफिल' गाजवू लागला; पुन्हा लोक मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी गोळा होऊ लागले. आपल्या मूर्खपणाची रसभरित कथा त्याच्या तोंडून ऐकण्यात दंग होऊ लागले.