रुणझुणत्या पाखरा/विधीव्रतांतली सामूहिकताः गणगौर, चैत्रगौर

विकिस्रोत कडून



 उमलत्या वयात 'का' हा प्रश्न मेंदूत उगवला की मनाच्या क्षितिजात नवनव्या चांदण्या चमकू लागतात. त्या मिणमिणत्या प्रकाशामागच्या शोधाचा ध्यास लागतो. ..माझे आजोबा असेपर्यन्त सण-वार माहेरच्या समाजवादी घरात खाण्यापुरते साजरे होत. नागपंचमीला तांदुळाच्या रव्याची खमंग खांडवी होत. कोकणात व देशावरही या दिवशी चुलीवर तवा चढवत नाहीत. पंचमीच्या आधीपासून रात्री गल्लीतल्या महिला एकत्र जमत. फेर धरून गाणी म्हणत. मराठा, माळी, साळी, ब्राह्मण.. सर्व जातीच्या बाया हातात हात घालून फेर धरीत. नंतर आमची लाडकी भुलाबाई भाद्रपद पौर्णिमेला घरी येई. कोनाड्याला मखर लावून, तोरण बांधून तिला, तिच्या भुलाजीला आणि त्यांच्या गणेश बाळाला, त्यात 'बसवले जाई' मग सर्व जातीजमातीच्या मुली सायंकाळी शाळा सुटल्यावर एकीमेकींच्या घरी टिपऱ्या घेऊन फेरधरून गाणी म्हणायला जात. चारपाच गाणी म्हटली की खाऊ मिळे. अर्थात् आधी तो ओळखण्याचा विधी असे. सात आठ घरचे नवनवे खाऊ खाऊन घरी येई पर्यन्त रात्रीचे आठ वाजून जात. मंगळागौरीची पूजा. मैत्रिणीच्या घरी नव्या नवलाईच्या भावजयीची नाही तर काकूची मंगळागौर असे. मग फुलं, दुर्वापत्री गोळा करून सुंदर सजावट करण्याची, संध्याकाळच्या फराळाची, रात्रीच्या जागरणाची नि सूप नाच, फुगड्या झिम्मा, 'खुर्ची का मिर्ची' खेळत नवविवाहितेला फेरात अडकवून नाचण्यात व तिला फेरा बाहेर पळू न देता नाव घ्यायला (अर्थात नवऱ्याचे) लावण्यात वेगळीच धमाल असे. या फेरात सत्तरी गाठलेल्या आज्या, पणज्याही सामील होत. ही सर्वच व्रते, त्यातील खेळ, जागरण यातही एकत्र येऊन खेळण्यावर भर असे. तेव्हापासून स्त्रियांच्या व्रतांतली, विधींमधली सामूहिकता मनाला आगळी वेगळी वाटत असे.
 विवाहानंतर आंब्याला आले. माहेश्वरी... राजस्थानी घरातील सून म्हणून. तिथेही स्त्रियांच्या नव्या विधी, व्रतांचा अनुभव सहभागी होऊन घेतला. महाराष्ट्रपासून दक्षिणेकडे सर्वसाधारणपणे अमावस्येनंतर नवा महिना सुरू होतो. तर उत्तरेकडे पौर्णिमेनंतर सुरू होतो. फाल्गुनी पौर्णिमेनंतर चैत्र सुरू होतो. तर महाराष्ट्रात फाल्गुनी अमावस्येनंतर.
 ...होळीच्या दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करणाऱ्या दादीजी घरातली मोठ्ठी कढई डोक्यावर पालथी घालून लगबगा मोठ्या घरी आल्या.
 'बाई' सुवारं गौर बेठवाळी हं. थाकी नई देवरानी पूजा करी कांई?'
 'न कराया काय झालं? आता आपली झालीये ना? सगळं करील.' भाभीजींचे उत्तर. मग बड्डी तीज.. हरियाली तीज, शिळा सात, गणगौर यांत मीही उत्सुकतेने सामील झाले.
 वर्षे भरारा भरारत होती. लोकसाहित्य, त्यातील स्त्रियांची व्रते, विधी, गाणी यांत मन गुंतले आणि विशेष अभ्यासाचे शोधनाचे क्षेत्र म्हणून 'स्त्रियांची विधी, व्रते, उत्सव यातील सामूहिकता' हा विषय निश्चित केला.
 फाल्गुन उजाडला की घरादारातील पोरीसोरींना आणि नव्यानवेल्या 'बिनणीनां' गोर पूजण्याचे ...त्यासाठी माहेरी जाण्याचे वेध लागत. सुहासिनीही गणगोरीची आतुरतेने वाट पहात. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उत्तरेतल्या.. राजस्थानातल्या चैत्र प्रतिपदेच्या दिवशी गोर (गौर) माहेरपणाला येते. होळीची राख सुफलनासाठी अत्यन्त चांगली. या राखेचे १६ मुटके, शेणाचे १६ मुटके करतात. भिंतीवर ओल्या हळदी कुंकवाचे १६/१६ ठिपके रेखाटतात. त्या खाली ते मुटके मांडतात. ते गौरीचे प्रतिक. पहिल्या दिवशी गव्हाच्या नव्या ओंब्यांनी, दुसऱ्या दिवशी हळदीने पूजा करतात. सातव्या दिवशी भिंतीवर काजळाचे १६ ठिपके मांडून खाली दोन कुंड्या वा मडकी काव, चुना यांनी सुंदर रंगवून त्यात होळीची राख शेण, माती घालून, त्यांत गहू, साळ, सरकी, ज्वारी, तूर, हरभरा अशी सात प्रकारची धान्य पेरतात, आणि गौरीच्या मुटक्यांजवळ ज्वारीचे कणिस त्याला पांढरा दोरा बांधून उभे करतात. तो 'ईसर' म्हणजे ईश्वर.. शंकर. त्याच्या जवळ दुसरे कणिस, त्या कणसाला केसाचा गुंता आणि लाल पिवळा शुभकारक दोरा बांधतात. त्याला मोळी म्हणतात. ते कणिस..ती गौर... गौरी. या दिवशी पाटावर नवे गहू पसरून त्यावर या कुंड्या ठेवतात. रोज पूजेनंतर जवळच्या विहिरीवर वा तळ्यावर सगळ्या जणी मिरवत गाणी गात जातात. दोन कळशात पाणी घेऊन येतात. एक शिव तर दुसरी पार्वती. ते कुंडीत टाकतात. दुसऱ्या दिवशी त्यांचे लग्न. अगदी सात फेऱ्यांसह. ज्या दिवशी महाराष्ट्रात चैत्रगौर मांडली जाते त्या दिवशी.. चैत्र शुक्ल तृतियेला, राजस्थानी गणगौर विसर्जित केली जाते. तिचे माहेरपण संपते. जातांना गव्हाच्या पिठात गूळ तूप घालून त्रिकोणी मुटके तळतात. त्याला फळ म्हणतात. गव्हाच्या पिठाच्या तळलेल्या डबीच्या आकारात सात फळे ठेवतात. त्यात फणी, काजळ कुंकवाच्या डब्या तळून ठेवतात. त्या दिवशी चंदनबटव्याची, (तो थंड असतो) भाजी करतात. न मिळाल्यास मेथी.. हरभरा.. पालक अशी हिरवी भाजी करतात. मुलीच्या विवाहानंतर या व्रताचे माहेरी उद्यापन होते. म्हणजे हे व्रत कुमारिकांचे नंतर सुवासिनींचे असते. घराला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देऊन गौर परत जाते...
 थंडीच्या काट्याने मोहरलेली आंब्याची राने फाल्गुनच्या अखेरीस बाळ कैऱ्यांचे झुलते डूल कानात घालून वहात्या वाऱ्यासोबत ठुमकू लागतात. चैत्राचे.. चैत्री पाडव्याचे, झोक्यावर बसून हिंदाळणाऱ्या गौरीचे, त्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या महिलांना एकत्र आणणाऱ्या हळदी कुंकवाचे वेध मराठी घरातल्या नववयसा लेकी बाळींना लागतात. एकत्र येऊन फराळाचे पदार्थ, गौरीची सजावट, अंगणात रांगोळ्या घालून चैत्रांगण सजवायचे...
 आम्ही भारतीय सण, उत्सव, विधींवर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो. काही महिने तर सण उत्सवांनी बहरलेले. श्रावण, भाद्रपद, मार्गशीर्ष, पौष, चैत्र.. यादी वाढतच चाललीय. चैत्र आला की गवरण्यांची सजावट, ओल्या हरबऱ्याची उसळ, कैरीची सणसणित फोडणीची खमंग वाटलेली डाळ, मस्त मधुर कैरीचं पन्हं. सुटलं ना तोंडाला पाणी? चैत्र म्हणजे नव्या वर्षाचं स्वागत. ते संपूर्ण भारतात विविध रितीनी होते. कश्मिरात चैत्राला चिथुर म्हणतात. पाडव्याला नवरोज किंवा नवरेह. या दिवशी सरस्वतीची पूजा करतात. आदल्या रात्री एका थाळीत तांदूळ, बदाम, दही, फुले, रूपया, आरसा, नवे पंचांग आणि मीठ ठेवतात. नवरेह रोजी घरातली सून पहाटे सर्वांना उठवते. प्रत्येकजण अन्नदेवतेला प्रणाम करतो. आरशात पाहून हसतो. वर्ष हसतमुखाने जाते. धान्यलक्ष्मीचेच नाही तर गृहलक्ष्मीचे.. घरातल्या अन्नपूर्णेचे दर्शन घेऊन नव्या वर्षाची सुरवात करावी हा हेतू.
 तर केरळमध्ये या दिवसाला 'विषु' म्हणतात. उठल्यावर अन्नाचे.. शुभ आणि जीवन देणाऱ्या वस्तूंचे दर्शन व्हावे म्हणून रात्रीच. काशाच्या भांड्यात तांदूळ पसरून त्यावर कोन्ना नावाच्या झाडाच्या फुलांची आरास मांडतात. त्यात सोन्याचे दागिने, रुपये, मोठी पिवळी काकडी, नारळ, शुभ्र वस्त्र ठेवून दोनही बाजूंनी समया चेतवून ठेवतात. या सजावटीला 'विषुकणि' म्हणतात. सकाळी उठल्यावर पहिले दर्शन विषुकणीचे.
 आसाम तर नृत्यसंगीताने नटलेला. पण तिथे वैशाख प्रतिपदेस नवे वर्ष सुरू होते. या दिवसाला 'रंगाली बिहू' किंवा 'बहाग बिहू' म्हणतात. कडू लिंबाची डहाळी घराघरात बांधतात. महिनाभर त्याच्या कोवळ्या पानांची गूळ घालून चटणी हवीच. बंगालमध्येही हाच दिवस नव्या वर्षाचा. वहीची पूजा करतात.
 महाराष्ट्रातही चैत्री पाडव्याला वहीची, पाटीवर काढलेल्या शारदेची... १ हा आकडा एकापुढे एक असा, पांच..सात वेळा मांडायचा आणि वर रफार..आकृतीमय सरस्वतीची पूजा करतात.
 'गौर' म्हणजे पार्वती, चैत्र तृतियेला ती माहेरपणाला येते. ती थेट अक्षय्य तृतियेपर्यन्त माहेरी राहून घराला अक्षय्य धान्यसमृद्धीच्या शुभेच्छा, आशीर्वाद देऊन सासरी जाते.
 हे महिने उन्हाचे. ओरिसात तर तीन आठवडे चंदनोत्सव करतात. चंदनाचे तेल, पंखे एकमेकांना देतात. उन्हाची तलखी सुद्धा सुसह्य करण्याची रीत.
 भारतीय सण खानपानाच्या रितीभातीतून सामाजिक आरोग्याची, ऋतूमधील बदलत्या निसर्गाच्या स्वागतास, धान्यलक्ष्मीशी जोडलेले आहेत. कडुलिंब आरोग्यदायी, गूळ थंड, कैरी चवदार.. भूक वाढवणारी. या सुमारास गहू, मोठी ज्वारी यांची खळी होऊन गेलेली. म्हणून पूजेत त्यांना स्थान.
 भाद्रपद अश्विनात पावसावर पोसली जाणारी पिके तरारतात. त्या काळात हादगा, बदकम्मा, भुलाबाई, सांझी, नवरात्र यासारखे समूहाने साजरे करायचे सण, व्रते येतात. जमिनीची उर्वराशक्ती वाढून धान्यलक्ष्मी घरी यावी, ती वाढावी म्हणून हे सामूहिक विधी. मार्गेसरी पासून वैषाखापर्यन्तचे सण सूर्याच्या पूजेचे. सूर्याला 'अपागर्भ' ...गर्भात पाण्याचा साठी असणारा म्हटले आहे. सूर्य प्रखरपणे तळपावा, भूमीची पाणी रिचवण्याची शक्ती वाढावी, ज्यामुळे तिची सर्जन शक्ती वाढेल या शुभेच्छेने पौषातले रविवार, सक्रान्त, चैत्र पाडवा, गणगौर.. चैत्रगौर, अक्षय्य तृतीया यासारखे सण साजरे करण्याची लोकपरंपरा, तीही समूहाने. एकत्र येऊन गाणी गात.
 रविन्द्रनाथांचे बंधू अवनीन्द्रनाथ यांनी बंगाली स्त्री-व्रतांचा अभ्यास केला. त्यात ते नोंदवतात.
 A Vrata is a just desire. We see it represented in the pictures, listen to its echo in the songs and rhymes, witness its reactions in the dramas and dances...
 ...यात्वात्मक सामर्थ्याने कामनापूर्ती करण्याचे माध्यम म्हणजे व्रत. यातील प्रार्थनांत ईश्वरीकृपेचा संबंध नसतो. व्रताचरण हे सामूहिक कर्म असते. व्रतांचे सामर्थ्य यात्वात्मक असते. 'धर्म' ही संकल्पना दृढ होऊन जनमानसात रूजण्यापूर्वीचे, जेव्हा स्त्रिया शेती.. अन्न.. वस्त्र निर्मितीचे उत्पादनाचे काम करीत, त्यांना समाजात मध्यवर्ती... संवादिनीचे स्थान होते तेव्हा पासून ही व्रते स्त्रियांनी भूमीच्या सुफलीकरणारसाठी निर्मिली. असे 'लोकायत' या ग्रंथाचे निर्माते देवीप्रसाद चटर्जी यांनी नमूद केले आहे.
 राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेशातील निमाड इत्यादी भागातली गणगौर आणि महाराष्ट्र कर्नाटकातली चैत्र तृतीयेला बसवली जाणारी गौर. या दोनही स्त्री व्रतोत्सवातली सामूहिकता त्यातील विधी. गाणी, पाणी, माती, सप्तधान्याची पेरणी, उगवणाऱ्या अंकुरांची पूजा, स्त्रीला व भूमीला निसर्गाने दिलेले सृजनात्मकता यातील नेमके नाते? आणि अनुबंध कोणता?
 ही मनात उगवणारी नवी चांदणी आणि मग शोध... पुढे जाण्याची नवी दिशा...